सौ राधिका भांडारकर
☆ “लोकमान्य बाळ गंगाधर टिळक “एक उत्तुंग व्यक्तीमत्व”…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆
मुंबईच्या हायकोर्टाच्या आवारात एका संगमरवरी पाटीवर हे शब्द कोरलेले आहेत.
“IN SPITE OF THE VERDICT OF THE JURY IS STILL MAINTAIN THAT I AM INNOCENT. THERE ARE HIGHER POWERS THAT RULE THE DESTINY OF MEN AND NATION…“
“जुरीने मला दोषी ठरवले तर खुशाल ठरवू दे पण मी गुन्हेगार नाही लौकिक गोष्टींचे नियंत्रण करणारी एक शक्ती या न्यायपिठाहून वरिष्ठ आहे. मला शिक्षा व्हावी आणि मी शिक्षा भोगल्यानेच मी अंगीकारलेल्या कार्याला ऊर्जीतावस्था यावी अशी कदाचित या शक्तीचीच इच्छा असेल.”
हे स्पष्ट, कणखर, खडे बोल आहेत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक या जहालमतवादी, उत्तुंग व्यक्तीचे.
राजेद्रोहाच्या आरोपावरून त्यांना सहा वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली गेली होती. या काळात टिळकांना साबरमतीच्या तुरुंगात ठेवलं गेलं आणि नंतर रंगून मार्गे त्यांना मंडालेच्या तुरुंगात रवाना केलं गेलं .(१९०८) पण आरोप, शिक्षा, कारावास , टिळकांसारख्या महापुरुषाला यत्किंचीतही विचलित करत नसत. त्यांना त्यांच्या ध्येयापासून दूर नेत नसत. उलट या सहा वर्षाच्या अत्यंत कष्टमय, तापदायक आणि प्रतिकूल वातावरणात मंडाले येथील तुरुंगवास भोगत असतानाच गीतारहस्य हा अनमोल ग्रंथ त्यांनी लिहिला.
वास्तविक रत्नागिरी येथे जन्मलेले (२३जुलै १८५६) केशव गंगाधर टिळक म्हणजेच बाळ गंगाधर टिळक यांच्यात जन्मतःच काही ठळक गुण होते. शालेय जीवनात ते एक उज्वल विद्यार्थी होते. त्यांच्यात एक नैसर्गिक सच्चेपणा आणि सरलता लहानपणापासूनच होती. लहान वयातच त्यांची स्वतंत्र मते होती. त्यांची वृत्ती सहिष्णु होती आणि अन्यायाबद्दल त्यांना अपार चीड होती.
स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासातील एक युग म्हणजे लोकमान्य टिळक होय. अनेक वर्ष इंग्रजांचे गुलाम झालेल्या जनतेच्या मनात प्रखर राष्ट्रवाद, देशप्रेम व स्वातंत्र्याची भावना निर्माण करण्याचे महत्त्वाचे काम टिळकांनी केले.
लोकमान्य टिळक म्हणजे प्रखर पत्रकार.
थोर समाज सुधारक.
स्वातंत्र्य सेनानी.
राष्ट्रीय नेता.
संस्कृत भाषेचे पंडित आणि एक विद्वान शिक्षक.
जातीय व्यवस्थेचे योग्य समर्थन करणारे समाज सुधारक.
लोकमान्य टिळकांचे विचार हे जनतेद्वारे स्वीकृत होते म्हणूनच त्यांच्यापुढे लोकमान्य हे संबोधन लावलं गेलं.
भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या अग्रस्थानी ते होते. लोकमान्य टिळकांचे सामाजिक कार्य खूप विस्तृत आहे. राष्ट्रीय कल्याणासाठी,, जनजागृतीसाठी आणि एक राष्ट्रीय मन घडवण्यासाठी त्यांची अविरत धडपड होती.
शैक्षणिक जाण वृद्धिंगत व्हावी म्हणून डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना त्यांनी केली आणि त्यातूनच पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजची स्थापना झाली जिथे टिळक स्वतः विद्यार्थ्यांना गणित व संस्कृत या विषयांचे धडे देत. या कार्यामध्ये आगरकर, चिपळूणकर, रानडे, भांडारकर या थोर राष्ट्रीय विभूती त्यांच्यासोबत होत्या. न्यू इंग्लिश स्कूल ची स्थापनाही याच संस्थेच्या माध्यमातून झाली. सर्वसामान्य विद्यार्थ्यांना स्वस्तात शिक्षण उपलब्ध व्हावे हा या मागचा प्रमुख हेतू होता.
आर्यभूषण छापखान्याची सुरुवात करून केसरी आणि मराठा ही दैनिके सुरू करून त्या माध्यमातून परखड लेख लिहून स्वातंत्र्यासाठी टिळकांनी जनजागृती केली. तरुणांमध्ये देशप्रेम जागृत व्हावे, सर्व समाज एकत्र यावा या भावनेने त्यांनी गणेशोत्सव, शिवजयंती उत्सव यांना सार्वजनिक स्वरूप दिले. आजही देशभर हे उत्सव जोशाने साजरे केले जातात. मात्र यामागच्या टिळकांच्या पायाभूत संकल्पनेचे काय झाले हा विषय वेगळा आणि विचार करण्यासारखा आहे. होमरूल लीगची स्थापना टिळकांनी केली. ही एक राष्ट्रीय राजकीय संघटना होती.
स्वातंत्र्यलढ्यात जाणीवपूर्वक आणि आंतरिक तळमळीने उतरणारी अनेक माणसे होती. त्यांचे ध्येय आणि उद्दिष्ट एक असले तरी दिशा निराळ्या होत्या, वाटा निराळ्या होत्या, विचार प्रवाह भिन्न होते. टिळकांची विचारधारा ही प्रखर होती. थेट होती. ” सरकारचे डोके फिरले आहे का” असे निर्भीड वक्तव्य ते करत. त्यामुळे एकत्र काम करणाऱ्या धुरीणांमध्ये फूट पडली. दोन वैचारिक गट त्यातून निर्माण झाले. जहाल मतवादी आणि मवाळ मतवादी. टिळकांनी जहाल गटाचे नेतृत्व स्वीकारले. त्यामुळे टिळकांची आणि इतर जहाल मतवादी विचारसरणीच्या लोकांची काँग्रेस मधून हकालपट्टी झाली. या सगळ्या घटना १९०७/१९०८ या दरम्यान घडल्या.
स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य असा चतुसूत्रीचा कार्यक्रम त्यांनी राबवला. त्यातूनच परदेशी कापडाची होळी ही ऐतिहासिक घटना घडली. स्वदेशी वस्तूंचीच खरेदी करण्यासाठी टिळकांनी जनजागृती केली.
टिळकांचा खरा भरवसा होता तो देशातील युवाशक्तीवर. त्यांना संघटित करण्यासाठी टिळकांनी अनेक राष्ट्रीय कार्यक्रम राबवले. त्यांची “जाज्वल्य राष्ट्रप्रेम, राष्ट्रासाठी काहीही, देश पहिला” ही मानसिकता त्यांनी त्यांच्या दमदार लेखनातून आणि भाषणातून तयार केली. ते तरुणांना सांगत, “धर्माची सत्यप्रियता, भीमाचे बाहुबळ आणि अर्जुनाची तत्परता आणि शौर्य अंगी बाळगण्याचा प्रयत्न करा”
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे टिळकांनी ब्रिटिशांना ठणकावून सांगितले. आणि टिळकांच्या या घोषणेमुळे स्वातंत्र्यलढ्याचे आंदोलन अधिक तीव्र झाले.
टिळक आणि आगरकर यांच्यातील मैत्री ही इतिहासात प्रसिद्ध. मात्र वैचारिक मतभेदांमुळे या मैत्रीत फाटाफूट झाली. आगरकरांचे म्हणणे होते स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक सुधारणेला प्राधान्य द्यावे तर टिळकांच्या मते राजकीय स्वातंत्र्य हे अग्रक्रमावर होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर समाज सुधारणेला गती मिळेल असे टिळकांचे ठाम, परखड मत. बालविवाहाच्या प्रश्नांवरून आणि संयत वयाच्या धोरणावरून ही मतभेदांची दरी रुंदावत गेली. वास्तविक दोघेही आपापल्या तत्वाशी तडजोड न करणारे. ध्येय एक असले तरी मार्ग भिन्न झाले पण या मतभेदातही परस्पर मैत्रीच इतिहासाने पाहिली. मतभेद झाले पण मने तुटली नाहीत .
कोण बरोबर कोण चूक हे अजूनही काळाला ठरवता मात्र आलेले नाही.
भारतीय असंतोषाचे जनक म्हणजे लोकमान्य टिळक. आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ते स्फूर्तीदाते होते. सावरकरांच्या क्रांतिकारक जीवनाच्या स्फूर्तीचे गुरु पद त्यांनी टिळकांनाच बहाल केलं होतं. सावरकरांच्यातलं स्फुल्लिंग टिळकांनीही टिपलं होतं.
टिळकांच्या नेतृत्वाचा दबदबा त्यावेळी वाढलेला होता आणि त्यातूनच सावरकरांसारखी तरुण क्रांतिकारी माणसं स्वातंत्र्यलढ्याच्या भविष्यासाठी तयार होत होती. टिळकांच्या उत्तुंग आणि दिव्य व्यक्तिमत्त्वामुळे ब्रिटिशही हादरले होते.”वंदे मातरम्”ची गर्जना ब्रिटीशांची झोप उडवून देत होती.
लखनऊ करारानंतर चिरोलवर खटला भरण्यासाठी टिळक विलायतेला गेले होते निकाल विरुद्ध लागला आणि टिळक भारतात परतले. त्यावेळी टिळक लोकमान्यतेच्या शिखरावर होते. मात्र विलायतेच्या प्रवासाने त्यांना शारीरिक आणि मानसिक शीण आला होता. त्याही वेळी त्यांच्यातली जहाल वृत्ती टिकूनच होती. सरकारला सहकार्य करण्याच्या मुद्द्यावर टिळकांनी प्रतियोगी सहकारिता हा शब्द चाणाक्षपणे वापरला. यावरून टिळक आणि गांधींमध्ये वादही झाले पण तरीही हिंदू मुस्लिम एकत्र येतील, ब्राह्मणेतर चळवळीला स्वराज्याची दिशा मिळेल अशी टिळकांनी तयारी करून ठेवली.
हळूहळू प्रकृती ढासळू लागली होती. तरीही आल्या गेल्यांशी ते हास्यविनोद करत होते. कौटुंबिक जीवनात ते अडकले नाहीत. शेवटपर्यंत ते फक्त देशाच्या राजकारणाबद्दलच बोलत होते.
एक ऑगस्ट १९२०चा दिवस! मुंबईच्या सरदार गृहापुढे लोक रस्त्यावर उभे होते. मध्यरात्र उलटली होती. लोकमान्य यांचे देहावसन झाल्याची बातमी आली आणि प्रचंड जनसमुदायांच्या तोंडून शोकाचे आणि दुःखाचे विदारक उद्गार बाहेर पडले. लोक अक्षरशः धाय मोकलून रडले.
महानिर्वाण यात्रेत स्त्रिया, पुरुष ,म्हातारे, हजारो गिरणी कामगार, हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती, पारशी, जैन सारेच होते. आकाशाची शिवण उसवावी आणि आभाळ फाटावे असा पाऊस होता आणि त्या मेघगर्जनेपेक्षाही “टिळक महाराज की जय” ही लोकगर्जना अवघ्या महाराष्ट्राला हलवून सोडत होती.
आज हे सगळं लिहीत असताना, मागे वळून पाहताना मनात येतं, या थोर उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा ऐतिहासिक वारसा लाभलेला आपला देश आज कुठे चालला आहे? राष्ट्रासाठी यांचे संसार पणाला लागले. प्रत्येक वेळी तुरुंगात जाताना पत्नीकडून हातावर ठेवलेले दही घेताना टिळक पत्नीला म्हणत “तुमच्या खांद्यावर संसार ठेवून आम्ही हा राष्ट्राचा संसार सांभाळू शकतोत”. धन्य त्या स्त्रिया! कळत नकळत स्वातंत्र्याच्या लढाईत त्यांनीही अशा रितीने विडा उचलला होता.त्यांचे संसार सर्वसामान्यांसारखे नव्हतेच,
आज मनात येतं “कहाँ गये वो लोग”? त्यांचा त्याग, त्यांचे बलिदान, त्यांचे कार्य देशवासीयांच्या मनात सदैव उजळत राहो हीच त्यांच्या स्मृतीला खरी श्रद्धांजली!
(लोकमान्य टिळकांवर लिहायला पाहिजे असेच ठरवले आणि ते एका कर्तव्य भावनेने, कृतज्ञतेच्या,ऋणी भावनेने. वास्तविक अशा लोकमान्य व्यक्तीवर लिहिणे किती अवघड आहे हे लिहिताना जाणवत राहिले पण तरीही…. दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती)
धन्यवाद!
© सौ. राधिका भांडारकर
ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७
मो. ९४२१५२३६६९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈