फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला होळी हा सण साजरा केला जातो. कांही ठिकाणी हा सण प्रत्येकाच्या घरी, तर काही ठिकाणी गावकरी मिळून साजरा करतात. एरंडाच्या रोपाभोवती लाकडे व गोऱ्या यांची मांडणी करतात. त्याभोवती रांगोळी घालतात व त्याचे दहन करतात. वैयक्तिक सण असेल तर दुपारी अंगणात होळी पेटवून तिची पूजा आरती करतात. प्रदक्षिणा घालतात व पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करतात. सार्वजनिक होळी ही साधारणपणे संध्याकाळी पेटवितात. पूजा करून नारळ नैवेद्य अर्पण करतात. दुसऱ्या दिवशी त्या राखेचे गोळे करून मुले खेळतात. खरे पाहता हे अग्निदेवतेचे पूजन आहे.
हा सण साजरा करण्यामागे एक पौराणिक कथा प्रचलित आहे. हिरण्यकश्यपु नावाचा एक असुर राजा होऊन गेला. तो घमेंडी, ताकदवान व अहंकारी होता. त्याला देवाचे नाव घेतलेले आवडत नसे. त्यात विष्णूचा तो जास्तच द्वेष करीत असे. पण त्याचा मुलगा प्रल्हाद हा विष्णू भक्त होता. ही गोष्ट राजाला आवडत नव्हती. कितीही राजाने सांगितले तरी प्रल्हादाने विष्णू भक्ती सोडली नाही. तेव्हा राजाने प्रल्हाद याला दहन करून मारण्यासाठी आपली बहीण ‘होलिका’ हिच्या मांडीवर बसवले. कारण तिला ‘अग्नीपासून भय नाही’ असे वरदान होते. तिने प्रल्हादासह अग्निप्रवेश केला. पण वेगळेच घडले. विष्णू कृपेने होलिकेचे दहन झाले. आणि प्रल्हाद सुरक्षित राहिला. अशाप्रकारे असत्यावर सत्याचा विजय झाला. तेव्हापासून होळी हा सण साजरा करतात. वाईट जाळून चांगले आत्मसात करावे हे सांगणारा हा सण. वेगवेगळ्या प्रांतात वेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. होलिकेच्या दहनाचा दिवस म्हणून होलिकोत्सव.
कोकणातील हा मोठा सण. याला ‘शिमगा’ म्हणतात. हा शेतकऱ्यांचा निवांतपणाचा काळ. शेतीची भाजावळ झाल्यापासून पावसाची वाट बघण्याचा हा काळ. या दिवसात देवांच्या पालख्या गावभर मिरवतात. लोक रांगोळ्या काढून त्यांचे स्वागत करतात. नृत्य गाण्याचा आनंद घेतात. काही ठिकाणी गावकरी वेगवेगळी सोंगे धारण करून लोकांचे मनोरंजन करतात. कधी पुरुष स्त्रीवेश धारण करतात. स्पर्धा होतात. मर्दानी खेळ खेळतात. कोळी लोक होडक्याची पूजा करून पारंपारिक नृत्य करतात. आदिवासीही सामुदायिक नृत्य करतात. गावानुसार प्रथा बदलते.
एकमेकातील वादविवाद, द्वेष, राग विसरून सर्व समाजाला एकत्रित आणणारा असा हा सण. भ्रष्टाचार, अत्याचार, चोऱ्या या आत्ताच्या काळातील होलिका आहेत. त्यांचा नाश करून सत्याच्या मार्गावर चालण्याचा संदेश हा सण देतो. सर्व अशुद्ध भस्मसात करून शुद्ध वातावरण करणारा हा सण. म्हणून ही अग्नीची पूजा.
होळी म्हणजे वसंतऋतुच्या स्वागताचा उत्सव असेही म्हणायला हरकत नाही. जुने दुःख विसरून नवचैतन्याकडे वाटचालयाला शिकणे हाच होळीचा अर्थ.
जगातील प्रत्येक धर्म आईचा अपार महिमा सांगतो. प्रत्येक धर्मात आणि संस्कृतीत ‘ आई’च्या अलौकिक गुणांचे आणि रूपांचे विलक्षण वर्णन आहे. आई’ या दोन अक्षरी या शब्दाचा महिमा सारं विश्व व्यापून आहे. मराठी साहित्यात आईचे मोठेपण वर्णन करणाऱ्या साहित्यकृतींमध्ये ‘श्यामची आई’ ही सर्वश्रेष्ठ आहे, हे कुणीही नाकारू शकत नाही. सानेगुरुजींच्या सिद्धहस्त सृजनशील लेखणीतून साकारलेली ही साहित्यकृती रसिकवाचकांना अतिशय उत्कटतेने मातृमहिमा सांगून मंत्रमुग्ध करते
‘आई’ हा तो अलौकिक शब्द आहे, ज्याच्या नुसत्या स्मरणाने हृदय फुलून जाते, भावनांचा अंतहीन सागर हृदयात आपोआप साठवला जातो आणि मन आठवणींच्या समुद्रात बुडून जाते. ‘आई’ हा अगम्य मंत्र आहे, ज्याच्या केवळ पठणाने प्रत्येक वेदना नष्ट होतात. आई’चे प्रेम शब्दात वर्णन करता येत नाही, ते फक्त अनुभवता येते. बाळाला नऊ महिने पोटात ठेवणे, प्रसूती वेदना सहन करणे, स्तनपान करणे, बाळासाठी रात्रभर जागे राहणे, त्याच्याशी गोड गोड बोलणे, त्याच्यासोबत खेळणे, बोट धरून चालायला शिकवणे, प्रेमाने फटकारणे, त्याला सुसंस्कारित करणे, सर्वात मोठ्या आव्हानाला धैर्याने सामोरे जाणे या सगळ्या गोष्टी फक्त आईच करू शकते.
आपले वेद, पुराणे, तत्वज्ञान, स्मृती, महाकाव्ये, उपनिषदे इत्यादी सर्वच ‘आई’ च्या अगाध महात्म्याने आणि स्तुतीने परिपूर्ण आहेत. अनेक ऋषी, तपस्वी, पंडित, महात्मे, विद्वान, तत्त्वज्ञ, साहित्यिक या सर्वांनी आईविषयी निर्माण होणाऱ्या भावना शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. इतकं सगळं असूनही ‘आई’ या शब्दाची संपूर्ण व्याख्या आणि त्याचा असीम महिमा आजपर्यंत कोणीही शब्दात मांडू शकलेलं नाही.
आपल्या भारत देशात आई हे ‘शक्ती’चे रूप मानले जाते आणि वेदांमध्येसुद्धा आई ही प्रथम पूजनीय आहे, असे म्हटले आहे.
पुढील श्लोकातही प्रमुख देवतेला प्रथम ‘ माता’ असे संबोधले आहे.
त्वमेव माताच, पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या, द्रविणम् त्वमेव, त्वमेव सर्वम मम देव देव।
ऋग्वेदात मातेचा महिमा अशाप्रकारे सांगितला आहे की, ‘ हे उषेसारख्या जीवाची माता! महान मार्गावर चालण्याची प्रेरणा द्या. तुम्ही आम्हाला कायद्याचे पालन करणारे बनवा. आम्हाला कीर्ती आणि अथांग ऐश्वर्य द्या. ‘
सामवेदात एक प्रेरणादायी मंत्र सापडतो, ज्याचा अर्थ आहे, ‘हे जिज्ञासू पुत्रा! आईच्या आज्ञेचे पालन करा. तुमच्या गैरवर्तनाने आईला त्रास देऊ नका. आईला जवळ ठेवा. मन शुद्ध करून आचाराचा दिवा लावा.
प्राचीन ग्रंथांमध्ये अनेक औषधांच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मांची तुलना मातेशी करण्यात आलेली आहे. एका प्राचीन ग्रंथात, अमलाला ‘ शिव ‘ (कल्याणकारी), ‘ वैस्थ ‘ (राज्याचे रक्षणकर्ता) आणि ‘ धात्री ‘ (मातेप्रमाणे संरक्षक) म्हटले आहे. राजा बल्लभ निघंटू यांनीही ‘ हरितकी’ (हरडा) च्या गुणांची तुलना एके ठिकाणी आईशी केली आहे.
यस्य माता गृहे नास्ति, तस्य माता हरितकी ।
म्हणजे ज्या घरात आई नसते त्याठिकाणी हरितकी (हरडा) मानवाला त्याच्या आईसमान हितकारक असते.
श्रीमद् भागवत पुराणात नमूद केले आहे की, मातेच्या सेवेतून मिळालेले वरदान, सात जन्मांचे दु:ख आणि पाप दूर करते आणि तिची भावनिक शक्ती मुलांसाठी संरक्षणाची ढाल म्हणून काम करते. यासोबतच श्रीमद् भागवतात ‘आई ’ ही मुलाची पहिली गुरू आहे, असे सांगितले आहे.
रामायणात श्रीराम आई’ला स्वर्गापेक्षा श्रेष्ठ मानतात. ते म्हणतात-
‘जननी जन्मभूमीश्च स्वर्गदपि गरियसी ।’,
(म्हणजे आई आणि जन्मभूमी स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहेत.)
महाभारतात यक्ष धर्मराजा युधिष्ठिराला विचारतो, ‘जमिनीपेक्षा भारी कोण? ‘ तेव्हा युधिष्ठिर उत्तरतो- ‘माता गुरुतरा भूमे:’ म्हणजे, ‘आई या भूमीपेक्षा खूप भारी आहे. ‘
महाभारताच्या अनुशासन पर्वात पितामह भीष्म म्हणतात, ‘भूमीसारखे दान नाही, मातेसारखा गुरू नाही, सत्यासारखा धर्म नाही आणि दानासारखे पुण्य नाही. यासोबतच महाभारत महाकाव्याचे लेखक महर्षी वेद व्यास यांनी आई बद्दल लिहिले आहे-
‘नास्ति मातृसमा छाया, नास्ति मातृसमा गतिः।
नास्ति मातृसमं त्राण, नास्ति मातृसमा प्रिया।।’
(म्हणजे आईसारखी सावली नाही, आईसारखा आधार नाही. आईसारखा रक्षक नाही आणि आईसारखी प्रिय वस्तू नाही.)
तैत्तिरीय उपनिषदात ‘ आई ‘ बद्दल पुढीलप्रमाणे उल्लेख आहे-
‘मातृ देवो भवः।’
(अर्थात, आई देवासमान आहे.)
‘आई’च्या चरणी स्वर्ग आहे, असे संतांचेही स्पष्ट मत आहे. आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांनी ‘सतपथ ब्राह्मण’ या स्तोत्राचा त्यांच्या ‘ सत्यार्थ प्रकाश’ या ग्रंथाच्या सुरुवातीच्या टप्प्यात पुढीलप्रमाणे उल्लेख केला आहे-
अथ शिक्षण प्रक्रिया:
मातृमान् पितृमान आचार्यवान् पुरुषो वेद:
(म्हणजेच, जेव्हा तीन उत्तम शिक्षक असतील, म्हणजे एक आई, दुसरा पिता आणि तिसरा शिक्षक, तेव्हाच माणूस ज्ञानी होईल.)
‘चाणक्य नीती’मध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, ‘ मातेसारखी कोणतीही देवता नाही. आई ही सर्वोच्च देवी आहे. ‘
मराठी वाड्मयामध्येसुद्धा माधव ज्युलियन, भास्कर दामोदर पाळंदे, कवी यशवंत आणि अलीकडील काळातील फ. मुं. शिंदे या आणि इतर कवींनी आपल्या कवितांमधून आईची महती सांगितली आहे.
भारतीय चित्रपटसृष्टीतही आईवर आधारित अनेक चित्रपट आणि गाणी बनवली गेली आहेत. अनेक गाणी इतकी हृदयस्पर्शी झाली आहेत की, ती ऐकून माणूस पूर्णपणे भारावून जातो.
हिंदू धर्मात देवींना ‘माता’ असे संबोधले जाते. धार्मिक परंपरेनुसार, संपत्तीची देवी ‘ लक्ष्मी माँ’, विद्येची देवी ‘सरस्वती मां’ आणि शक्तीची देवी ‘ दुर्गा माँ’ आहे. नवरात्रात आईची नऊ वेगवेगळ्या रूपात पूजा केली जाते.
ख्रिश्चन धर्मातही आईला सर्वोच्च स्थान देण्यात आले आहे. ख्रिश्चनांच्या पवित्र ग्रंथात स्पष्टपणे लिहिले आहे की, आईशिवाय जीवन नाही. यासोबतच प्रभु येशूची आई मदर मेरी हिला सर्वोच्च मानले जाते. बौद्ध धर्मात, महात्मा बुद्धांच्या स्त्री रूपातील तारा देवीची स्तुती केली गेली आहे. ज्यू लोकही ‘ आई’ला सर्वोच्च स्थानी ठेवतात
थोडक्यात, देश कोणताही असो, संस्कृती किंवा सभ्यता कोणतीही असो आणि भाषा, बोली कोणतीही असो’ मातेबद्दल अतूट आणि अपार आदर आहे.
☆ स्त्री… विविध भूमिकांमधील…☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆
जागतिक महिला दिन !!!
स्त्री……. विविध भूमिकांमधील
सर्वप्रथम सर्व माता भगिनींना जागतिक महिला दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा आणि त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्रिवार वंदन !!!
आपल्या आयुष्यात स्त्रीया (महिला) कायम वेगवेगळ्या भूमिका पार पाडत असतात आणि आपले आयुष्य समृद्ध करत असतात. हे सर्व करताना त्यांना काय मिळतं याचा कितीही अभ्यास केला तरी पूर्णत्वाने ते मला कळेल असे म्हणणे धाडसाचेच होईल. “जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे।” हेच खरे. आज ‘जागतिक महिला दिनाच्या’ निमित्ताने आपल्या जीवनात मोलाची भूमिका बजावणाऱ्या काही प्रमुख नात्यांस या लेखाच्या माध्यमातून मानाचा मुजरा करीत आहे.
आई
आज हा लेख लिहिण्याचा प्रयत्न करु शकतोय कारण एक स्त्रीने (मातेने) मला जन्म दिला आहे. आपल्या आयुष्यातून स्त्री वजा केली तर आपले आयुष्य अर्थहीन होईल असे म्हटले तर वावगे होऊ नये. आई नुसता जन्म देत नाही तर ती आपली बाळाच्या जीवनास आकार देते. आई देताना काही हातचे राखून ठेवत नाही. जे शक्य असेल ते सर्व आपल्या बाळास देते आणि सर्व देऊनही भरुन पावते. या “जगात ‘रिती’ होऊनही ‘भरुन’ पावणारी” कोण असेल तर फक्त ‘आई’!! ‘आई’ या शब्दात सारे विश्व सामावलेले आहे. सर्व शास्त्रे, शस्त्रे, सुखदुःख आणि अध्यात्म ‘आई’ दोन अक्षरी शब्दात मावते. ज्याला संपूर्ण समाधान प्राप्त करायचे असेल त्याने समोरच्या मनुष्याची ‘आई’ व्हावे अथवा त्याला आपली ‘आई’ मानावे. ज्याला अध्यात्मात प्रगती करायची आहे त्याने सद्गुरुंना किंवा आपल्या आराध्य देवतेला ‘आई’ मानावे आणि स्वतःला ‘बालक’. सर्व ठिकाणी जर मातृभाव ठेवता आला तर कोणत्याही शस्त्र अथवा शास्त्राची गरजच पडणार नाही, असे वाटते. मनुष्याने सुखी होण्यासाठी एकतर ‘मातृभाव’ ठेवावा किंवा ‘पुत्रधर्म’ पाळावा. दोन्हीकडे कर्तव्यपूर्तीचे समाधान खात्रीने लाभते. सर्व महान संतांचा हाच अनुभव आहे. आपण तसा प्रयत्न करू. *
बहीण
आईनंतर सर्वात जवळचे नाते कोणते असेल तर ते बहिणीचे. बहीण लहान असावी की मोठी यावर वाद होऊ शकतो पण बहीण असावीच असे प्रत्येकाचे मत असेल असे खात्रीने वाटते. ताई आणि माई. घरात मोठी मुलगी असेल तर घराला आपसूक वळण लागते असे माझे मत आहे. जे आपण आई किंवा बाबांना सांगू शकत नाही ते आपण आपल्या बहिणीला नक्की सांगू शकतो. मन मोकळं करण्यासाठी सर्वात खात्रीचे, जवळचे कोण असेल तर बहीण. कारण तिच्यात आणि आपल्यातील वयाचे अंतर फार नसते त्यामुळे ती आपली मनःस्थिती अधिक सजगतेने समजून घेऊ शकते. कधी ती आपली ‘ढाल’ बनते तर कधी ‘तलवार’!! बहीण लग्न होऊन प्रथम सासरी जायला निघते तो क्षण भावाच्या आयुष्यातील सर्वात कसोटीचा !! जरी ती सासरी गेली तरी तिची नजर कायम आपल्या भावंडांवर असते. पुढे कालांतराने आई वडील नसले तरी बहिणीमुळे भावाला एकाकीपण येत नाही. ती आपल्या आयुष्यात सावली सारखी असते. ती शीतल छाया जरुर देते पण आपल्या आयुष्यात अडसर बनत नाही. द्रौपदीने हरि ला चिंधी बांधली आणि तिच्या आयुष्याचे ‘सोने’ झाले. *’बहिण अथवा भावासाठी आपल्या आयुष्याची ‘चिंधी’ करणाऱ्या अनेक बहिणी या जगात आहेत. आज आपण त्यांना वंदन करू.
पत्नी
एखाद्या स्त्रीसाठी सर्वात नाजूक आणि आव्हानात्मक भूमिका कोणती असेल तर पत्नीची. आपल्याकडे परंपरेनुसार स्त्रीच सासरी जाते. साधारण २० ते २२ वर्षे माहेरी राहिल्यावर लग्न होऊन दुसऱ्या घरी जायचे. तेथील सर्व माणसांना आपले मानायचे. पती, सासूसासरे, नणंद, दीर, आणि कुटुंबातील इतर नातेवाईक तसेच पुढे मुलांना समजून घेऊन त्यांच्याशी आपुलकीने सुसंवाद साधायचा. ते घर आपलं मानून आवश्यक ते सर्व त्या घरासाठी करायचे. एका अर्थांने त्या घराला घरपण द्यायचे. हे लिहायला, वाचायला सोपे नक्कीच आहे पण आचरणात आणायला तितकेच अवघड. इतकं सारं करीत असताना स्वतःचे भावविश्व जपायचे. इतकं सारं फक्त स्त्रीचं करु शकते.
*कार्येषु मंत्री करणेषु दासी|
भोज्येषु माता शयनेषु रम्भा ||
धर्मानुकूला क्षमया धरित्री |
भार्या च षाड्गुण्यवतीह दुर्लभा||*
(भावार्थ :- कार्यात मंत्री, गृहकार्यात दासी, भोजन करताना माता, संसारधर्म पाळताना रंभा, धर्मकार्यात अनुकूल आणि क्षमाशील पत्नी असावी. पण असे सहा गुण असलेली पत्नी मिळणे दुर्लभ आहे.)
वर सांगितलेल्या गुणांपेक्षा कितीतरी अधिक गुण आज प्रत्येक ‘पत्नी’ने आत्मसात केलेले असतात असं म्हटलं तर अतिशयोक्ती होऊ नये. पत्नी ‘पत्नी’ राहिलेली नाही तर ती आज सर्वार्थाने घराची पालनकर्ती झाली आहे असे म्हटले तर चुकीचे ठरु नये. आजच्या महिला दिनाच्या निमित्ताने आपण हे नातं निभावणाऱ्या सर्व स्त्रियांना वंदन करू.
लेक अर्थात मुलगी
“मुलगी शिकली तर सारे घर शिकते”असे बरीच घोषवाक्ये आपण ऐकतो. कुटुंबाचा विचार केला तर घरात मुलींचे स्थान खूप महत्वाचे असते. त्यातल्यात्यात बापलेकीचे नाते अधिक रेशमी आणि तितकेच उबदार. मुलगी जशी घराची शान असते तशी ती बाबाचा प्राण असते. खरं ती घराचं ‘नाक’ असते. ‘कालचा’ बाबा आणि ‘आजचा’ बाबा यात लौकीक अर्थाने फरक दिसत असेल पण लेकीच्या बाबतीतील आजचा बाबा अगदी तसाच संवेदनशील आहे आणि पुढेही राहील…. उलट तो अधिक भावुक झालेला दिसेल. ‘दमलेल्या बाबांची कहाणी’ त्या त्या घरात जितकी लेकीला उमगते तितकी खचितच दुसरं कोणाला उमगत असेल. मुलीचा जन्म झाल्यापासून ती सासरी जाईपर्यंत आणि त्यानंतरही ह्या नात्यात तसूभरही फरक पडत नाही. बालपणी ‘लाडकी बाहुली होती माझी एक…. ‘ म्हणून जोजवणाऱ्या बाबाला आपली ‘बाहुली’ कितीही मोठी झाली तरी त्याला ती ‘बाहुली’च वाटते. लेक चालली सासरला…. यातील वेदना आणि भावना फक्त एक बापच खऱ्या अर्थाने समजू शकतो. तिच्या मनात बाबासाठी एक खास रेशमी कप्पा कायम असतोच. आज या नात्यालाही वंदन करू.
मैत्रीण (स्त्री अथवा पुरुष दोघांची)
मैत्रीण :- स्पर्श न करताही जिला आधार, ज्याला आधार देता येतो तो मित्र अथवा मैत्रीण असे म्हटले तर सयुक्तिक होईल असे वाटते. आज अनेक स्त्रपुरूष सहकारी आहेत, एकत्र काम करतात त्यामुळे त्यांच्यात मैत्री होणे अधिक सहज. बदलत्या जीवनशैलीमुळे एखादी स्त्री पुरुषाला अधिक चांगले समजून घेत असेल. आज मैत्रीत कोणताही विषय वर्ज्य नाही. नीती नियमांचे, विधीनिषेधाचे नियम पाळून जेव्हां निकोप मैत्री केली होते, तेव्हा ते मैत्री न राहता त्याचे मैत्र कधी होते ते कळतही नाही. कृष्ण (युगंधर) आणि द्रौपदी (युगंधरा) हे आपल्यासाठी स्त्री पुरुष मैत्रीचा आदर्श आहेत.
खरंतर स्त्री अनेक नाती/भूमिका निभावत असते, मी इथे प्रमुख ‘नात्यां’चे वर्णन केले आहे. आज स्त्री काय करीत नाही असे नाहीच. मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रांना स्त्रीशक्तीने स्पर्श केलेला आहे. नुसतं स्पर्श न करता स्त्रीशक्तीने प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. चूल, मूल, कला, क्रीडा, शास्त्र, संरक्षण, अग्निशमन, नौकानयन, अग्निरथ/विद्युतरथ, प्रशासन, शिक्षण, राजकारण, धर्मकारण, सेवा, उद्योग, अशा विविध क्षेत्रात महिला अव्वल स्थानावर आहेत. याबद्दल या सर्व स्त्रिया आदरास पात्र आहेत.
लेखाचा समारोप करताना काही गोष्टी जाणीवपूर्वक नमूद कराव्याश्या वाटतात. आज आपण स्पर्धेच्या युगात आहोत. सामाजिक बंधने आज सैल होताना दिसत आहेत. समाज झपाट्याने बदलत आहे. स्त्रीला अनेक उपमा दिल्या जातात. *त्यामध्ये स्त्रीला प्रामुख्याने शक्ती म्हटले जाते आणि ते खरे देखील आहे. पण विज्ञान असे सांगते की शक्ति जर नियंत्रित नसेल तर अधिक घातक आहे. स्त्री शक्तीची अनेक उदाहरणे आपल्याला माहीत आहेत म्हणून ती मुद्दाम इथे देत नाही. शक्ति जर ‘स्वनियंत्रित’ असेल तर अधिक चांगले!! त्यासाठी संपूर्ण समाजाने यमनियम पाळले पाहिजेत असे सुचवावेसे वाटते.
श्रीसद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे एक वचन आहे. “आजपर्यंत धर्म टिकला तो घरातील स्त्रियांमुळेच!!!”* सर्व संतांनी स्त्रियांचे नेहमीच कौतुक केले आहे, त्यांचा आदर केला आहे. सर्व संतांनी कायम पुरुष जातीला उपदेश केला आहे पण स्त्रियांना उपदेश केल्याचे उदाहरण नाही. पुरुष मूलतः स्खलनशील आहे पण स्त्री संयमी आहे, मर्यादा पाळणारी आहे, असा त्यांना विश्वास आहे. आज स्त्रीमुक्तीबद्दल अनेक आंदोलने करणाऱ्या महिला दूरदर्शन वरील ‘अर्धनग्न’ जाहिराती बघून मूग गिळून गप्प बसतात, तेव्हा मनास खंत वाटते. उदाहरण द्यायचे झाल्यास एखादा सुगंधित फवारा मारला म्हणून परपुरुषाच्या मागे पळणाऱ्या अनेक स्त्रिया जाहिरातींमधून दाखवल्या जातात तेव्हा हा समस्त स्त्रीशक्तीचा अपमान आहे. पण यात आपला अवमान होतो असे स्त्रियांना वाटत असते तर अशा जाहिराती बनल्या नसत्या किंवा त्या प्रसारित झाल्या नसत्या. त्यांच्याविरुद्ध कोणी न्यायालयात गेल्याचे ऐकिवात आलेले नाही. #स्त्रीमुक्ती म्हणजे फक्त पेहरावबदल’ इतकाच अर्थ अभिप्रेत आहे का? पुरुषाने प्रत्येक स्त्रीचा तिच्या वयानुसार सन्मान करावा अशी आपली संस्कृती सांगते. मग ती कधी आई असेल, कधी बहीण असेल तर कधी मुलगी तर कधी आज्जी आणि स्त्रीनेही याच नात्याने प्रत्येक पुरुषाकडे पाहावे असा दंडक होता. पूर्वी स्त्रिया स्वतःची ओळख मी अमक्याची आई (उदा. राजूची आई) अशी करून देत असत. समाजात मातृत्वाला मूल्य होते, प्रतिष्ठा होती, आज पुन्हा याचीच गरज आहे असे जाणवते. आपल्या देशाला ‘माता’ मानणारा भारत हा एकमेव देश आहे. ‘स्त्रीशक्तीचा इतका मोठा गौरव खचितच कोणी केला असेल.. !’
आज समाजात काय चालू आहे, हे आपण सर्व उघड्या डोळ्यांनी बघत आहोत. पण ही स्थिती आपल्यालाच बदलावी लागेल. हे काम फक्त स्त्रियांनी करुन जमणार नाही तर ते प्रत्येक समाजघटकाचे दायित्व आहे. आजच्या महिला दिनाच्या शुभमुहूर्तावर प्रत्येक माता भगिनीस घरात आणि समाजात योग्य तो सन्मान मिळेल असा प्रयत्न आपण सर्वांनी करु.
संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत महदंबा, संत सोयराबाई, संत कान्होपात्रा, संत बहिणाबाई, संत वेणाबाई हे स्त्री संत सप्तक१३ व्या शतकापासून १७ शतकापर्यंतच्या चारशे वर्षाच्या काळात होऊन गेले. सर्वांची लौकिक जीवनातील पार्श्वभूमी खडतर होती. संत वेणाबाई व संत महादंबा या बाल विधवा होत्या. संत मुक्ताबाई व संत जनाबाई अविवाहित होत्या. संत बहिणाबाईंचा विषम विवाह होता. संत सोयराबाई शुद्र, अशिक्षित, तर संत कान्होपात्रा या गणिकेची मुलगी. पण या सर्वांचे नाम स्वातंत्र्य कोणालाही हिरावून घेता आले नाही. सर्वांनी पुरुष गुरु केले व परमार्थाची वाटचाल केली. परमार्थात जात, धर्म, स्त्री, पुरुष भेद नाही म्हणून मुक्ताबाईंना पुरुष शिष्यही करता आले (चांगदेव). संत कान्होपात्रेला कुणी गुरुपदेश केला नाही. असे प्रत्येकीचे जीवन वेगळे वेगळे.
या सर्वांच्या साहित्य निर्मितीला त्या काळातील समाजातील अनिष्ठ चाली कारणीभूत आहेत. संत मुक्ताबाई कुट रचनेकडे, संत जनाबाई विठ्ठलभक्ती कडे, संत महदंबा कृष्णभक्ती कडे, संत सोयराबाई विटाळाकडे, संत बहिणाबाई जीवनातील अनुभवाकडे व कान्होपात्रा तारणहार विठ्ठलाकडे, संत वेणाबाई रामलीलेकडे वळल्या. प्रत्येकीचे आयुष्य वेगळे पण भक्ती व विरक्ती एकच. ईश्वरी सामर्थ्याचा प्रत्यय हाच आधार. संसारिक घटकांना त्यांनी अध्यात्मिक अर्थ दिला. समाजाशी संघर्ष करत उच्च पातळीवरचे पारंपरिक जीवन जगल्या. देवाशी विठ्ठलाशी त्यांचा मनमोकळा संवाद. तोच सखा, सांगाती, माऊली. कुणीही पतीचे नाते विठ्ठलाची जोडले नाही हेच महाराष्ट्रातील या संत स्त्रियांचे वैशिष्ट्य. समाजाला सदाचाराचा सद्वविचाराचा मार्ग दाखवण्याचे त्यांचे कार्य मोलाचे आहे. पतनाकडे वाटचाल होत असलेल्या समाजाला नाम भक्तीचा सोपा मार्ग दाखविला. अभंग व ओव्या रूपाने आपल्या भावना व्यक्त केल्या. मराठी साहित्यात मोलाची भर घातली. त्यामुळे स्त्रियांच्या स्वतंत्र विचाराला चालना मिळाली. समाजात स्त्रियांना स्थान मिळाले. धीटपणा मिळाला.
आजच्या सर्व क्षेत्रात उच्च स्थान मिळवणाऱ्या स्त्रियांच्या मागे या सर्वांचे पाठबळ नक्कीच आहे. कोणीतरी बीज पेरावे तेव्हा काही काळाने त्याचा वृक्ष होतो. आणि तो बहरतो. हेच खरे! सावित्रीबाई फुले, सिंधुताई सपकाळ आणि असेच कार्य करणाऱ्या स्त्रिया या अलीकडच्या काळातील संतच. पूर्वीच्या स्त्रियांची परंपरा त्यानी चालवली आणि पुढेही चालू आहे. फक्त प्रत्येकीचे क्षेत्र वेगळे. महिला दिनानिमित्त स्त्री शक्तीला सलाम!
(काही स्त्री संतांविषयी सविस्तर माहिती देणारे लेख लवकरच प्रकाशित करत आहोत… संपादक)
पुरुषांनी लाथाडल्यावर तिची काय अवस्था होते, ही व्यथा मी तुमच्या पुढे मांडणार आहे.
मी सादर करते आहे कोल्हाट्याचं पोर मधील शांताबाईचे मनोगत. ‘कोल्हाट्याचं पोर’ या किशोरच्या आत्मकथनाच्या आधारेच मी ते लिहिलेले आहे.
पुरुषांनी लाथाडल्यावर त्या स्त्रीची काय अवस्था होते हे व कोल्हाटी समाजाचे चित्रण या पुस्तकात केलेले दिसून येते त्याचप्रमाणे स्वतःचीच आई शांताबाई हिच्या माध्यमातून कोल्हाटी समाजाची समाजातील स्त्रियांची अवस्था किशोरने मांडली आहे.
हे आहे कोल्हाट्याचं पोर मधील किशोर ची आई शांताच मनोगत….
मी शांता! किशोरची आई.
कोल्हाट्याचं पोर असलेल्या किशोर नं, माझ्या किशोरने त्याची कैफियत तुमच्यापुढे मांडलीच आहे. त्याच्यासोबत माझीही कहाणी त्याला तुम्हाला सांगावीच लागली. कारण कोल्हाट्याची पोर शांता जन्माला येते म्हणूनच कोल्हाट्याचं पोर किशोर जन्माला येतो.
माझी कहाणी मला तुम्हाला सांगायचीही लाज वाटते पण
पण सांगितल्याशिवाय तुम्हाला तरी ती कशी कळणार ?
जीजी साळी समाजातली होती पण माझ्या आज्याने, कृष्णा कोल्हाट्याने लक्ष्मीला, म्हणजे तिच्या निराधार आईला आसरा देण्याचं नाटक केलं व तिच्यासोबत ठेवलेल्या बाईप्रमाणे राहू लागला. तिची मुलगी जीजी त्याची स्वतःची नसल्यामुळे कृष्णा कोल्हाट्याने कोल्हाट्याच्या पिढीजात व्यवसायाला तिला लावले. ती तरी काय करणार? स्वतःचे वेडसर वडील घरातून पळून गेल्याने तिच्या आईला व जिजीला ते जीवन स्वीकारावेच लागले.
जीजी खूप सुंदर असल्यामुळे माधवराव पाटीलांनी तिला बायको प्रमाणे जवळ वागवले. स्वतःला दोन बायका असतानाही!
किशोरची आई शांता ही कृष्णा कोल्हाट्याच्या लग्नाच्या बायकोपासून झालेल्या कोंडीबा नावाच्या मुलाची मुलगी. म्हणजे मीच! मी पण सुंदर असल्याने आयतं बसून खाण्यासाठी माझ्या बापानं कोंडीबानं, मला नाच गाण्याच्या व्यवसायाला लावले.
पण जीजी सोबत माझाही सांभाळ माधवराव पाटलांनी मुलीप्रमाणे केला व मला शिक्षिका व्हायचे स्वप्न दाखवले. परंतु त्यांच्या मृत्यूनंतर आम्हा दोघींना पण घराबाहेर काढल्या गेले.
जीजी सोबत माधवराव पाटलांनानी माझाही उद्धार केला एका शिळेची अहिल्या केली पण दुर्दैवाच्या फेऱ्यात सापडल्याने या अहिल्येची पुन्हा शिळा झाली.
झाली कसली! माझा जन्मदाता प्रत्यक्ष कोंडीबा यानंच ती केली. स्वतःच्या स्वार्थासाठी !आयतं बसून खाण्यासाठी! स्वतः सारखेच बैल असलेले माझेच भाऊ पोसण्यासाठी! कोल्हाटी पुरुष ना ते !
याच कोल्हाटी जातीत सुंदर स्त्री म्हणून जन्माला येण्याच्या माझ्या दुर्दैवानेच माझा घात केला !
कोल्हाटी समाजात जन्माला येऊनही माधवराव पाटलांनी माझ्या मनात निर्माण केलेलं मास्तरीण होण्याचं आरशासारखं स्वच्छ सुंदर स्वप्न !
पाटलाच्या मृत्यूनंतर कोंडीबा ने त्याचा एका क्षणात चुराडा केला.
माझ्या मनात उत्पन्न झालेलं नव्या जीवनाच्या स्वप्नाचं बीजांकुर उगवायच्या आतच तुडवल्या गेलं! या….
या माझ्या बापानच चंद्रकलाबाईच्या पार्टीत मला नाचायला पाठवलं व माझ्या पायाला घुंगरू बांधले.
चंद्रकला बाईची पार्टी बंद पडली आणि मी घरी आले.
पुन्हा कुठल्या बाईच्या पार्टीत नाचायला जायची माझी इच्छा नव्हती. वाटत होतं नको ते पार्टीतलं जिणं!
माझ्या बापाला तर हृदय नव्हतंच! आणि बाहेरच्या समाजातील तरी आता कोण माझ्याशी लग्न करणार होतं?
घुंगराची बेडी एकदा पायाला पडली की ती पक्की होऊन जाते. दलदलीत फसलेल्याला बाहेर येणे कठीण असते!
हं! एखाद्या बाप आपल्या पोरीला घडवतो एखादा स्वार्थासाठी बिघडवतो.
करमाळ्याचे आमदार जगताप यांनी माझ्याशी चिरा लावला आणि किशोर चा जन्म झाला.
किशोरच्या जन्मा अगोदरच जगताप यांनी मला सोडलं.
एका नाचणारीणची समाजात काय किंमत असणार !
मला सोडल्याबद्दल त्यांना कोण जाब विचारणार !
आमचे भाऊ आणि बापच तर आमच्याशी सावत्रपणाने वागतात !
पुन्हा नशिबाला पार्टी आलीच! किशोरला रडत ठेवूनही नाचायला जावं लागायचं छातीवर दगड ठेवूनच.
ढेबेगावला किसन पाटलांनं माझी खोडी काढली. जीजीने तर त्याला चप्पलच मारली. गुंडाप्पा पाटलाच्या तावडीतून सुटून कसेबसे आम्ही नेरल्याला आलो. पुन्हा दुसरी पार्टी! पुन्हा धारूरकरांशी माझा चिरा लागला आणि दीपक चा जन्म झाला.
धारूरकर तसे चांगले. पण माझ्या दुर्दैवाने तिथेही माझा घात केला. धारूरकरांना मृत्यू आला. पुन्हा मला नाचायला जावं लागणार होतं.
कारण कोंडीबा च घर माझ्यावरच होतं.
आता तर माझी लहान बहीण सुशीलाही माझ्याबरोबर नाचायला तयार झाली होती.
‘ शांता सुशीला’ पार्टी नावारूपाला आली. आता हेच काम मनापासून करायचं ठरवलं होतं. मी गायची सुशीला नाचायची. गाण्यातच मी प्रगती केली. कारण पुन्हा नाचगाणं करायला जायचं असं जीवन मला नकोस झालं होतं. म्हणून कित्येकांनी मला मागणी घातली तरी मी त्यांना नको म्हटलं.
पण नाना वाडकर मात्र मला रडून रडून खूप विनंती करायचे. अखेरीस त्यांच्या भुलथापांना मी बळी पडले. माझ्याही पायातलं घुंगरू सुटणार याचा आनंद मला मनातून होताच!
स्त्रीचे दैव पुरुष कसे फिरवतो पहा त्यातून मी तर एक नाचणारी
नाना वाडकर यांनी मला पुन्हा संसाराचं आमिष दाखवलं.
त्यांच्याशिवाय मला गती नाही हे कळताच त्यांनी मला हवं तसं छळलं!
मुख्य म्हणजे माझ्या किशोरला मला मुकावं लागलं! कारण पायात पक्के फसलेले घुंगरू मला काढायचे होते ना!
पाय रक्तबंबाळ होणारच होते !मन जखमी होणारच होतं!
माझ्याच नाही तर माझ्यासारख्या माझ्या भगिनींच्याही माथ्यावरचा कलंक मला धुवून काढायचा होता !कायमचा !
नानांनी माझा किती छळ केला तरी म्हणूनच मी तो निमुटपणे सहन केला. त्यांनी किशोर आणि माझी ताटातूट केली.
आदर्श संसारी स्त्री बनण्याच्या नादात किशोरवरही माझ्याकडून अन्यायच झाला.
कारण माझ्या मनात केवळ एकच विचार होता!
पायातलं घुंगरू कायमचं फेकण्याचा! त्या एका वेडापायी किशोरच्या बाबतीत मी चुकलेच.
किशोरनंच एकदा म्हटले आहे आईच्या पायातलं घुंगरू सुटलं आणि मी मात्र तुटलेल्या घुंगराप्रमाणे एकाकी झालो. या कोल्हाटी समाजातच राहिलो. खरंच माझ्या किशोरला ही दलदलीतून बाहेर निघण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला.
त्यातूनही माझा किशोर एमबीबीएस डॉक्टर झाला.
पण किशोरला मला सांगावसं वाटतं की माझ्यासारख्या अनेक शांतांच्या पायातलं घुंगरू कायमचं सुटल्यावर या समाजातल्या अनेक किशोर वर तुटलेल्या घुंगरासारखं जीवन जगायची वेळ येणार नाहीये…
मार्च महिना आला की वेध लागतात ते आठ मार्च “जागतिक महिला दिनाचे “. ” पहाटे अंथरुणावरून उठल्यापासून शुभेच्छांचा वर्षाव सुरू होतो. जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा….. शुभेच्छा… शुभेच्छा. “
महिलांच्या यशाचा, कर्तृत्वाचा गौरव दिवस. या दिवशी आमच्या बाई म्हणून जगण्याला एक वेगळाच रूबाब येतो. बाई म्हणून जगण्याचा एक अभिमान मनाला स्पर्शून जातो. आणि मनात येते एक विचारधारा ” बाई म्हणून जगताना “
मुलगी लग्न होऊन सासरी येते आणि कु. ची सौ. होते. तिच्या नावातील हा सौ. चा बदल म्हणजे तिच्या आयुष्यातील एक नविन टप्पा असतो. स्वतःवर पडलेल्या अनेक नवीन जबाबदारीतून ती मुलगीची बाई कधी होते ते स्वतःला सुध्दा उमगत नाही. लग्नानंतर जुन्या नात्यांची आठवण आणि नवीन नात्यांचे आगमन याचा मेळ घालत ती आपले बाईपण जपू लागते. परक्या घरून आलेली एक मुलगी बाई म्हणून जगणं स्विकारताना
अंगणातील तुळशीपासून ते स्वयंपाकघरापर्यंत सासरकडील घराला केंव्हाच नव्याच्या नवलाईने आपले मानू लागते. हे बाईपण एकदा स्वीकारले की, सुरू होतो तिचा नवीन जीवनप्रवास. कधी आपल्या कष्टातून, कधी जबाबदारीतून, कधी संघर्षमय वाटचाल करत तर कधी कर्तृत्वातून ती स्वतःला सिद्ध करत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटते. घराची, कुटुंबाची जबाबदारी पार पाडता पाडता कालांतराने तिच्या जगण्याला अनेक फाटे फुटतात. अनेक नवनवीन नात्यांची भर पडते. म्हणजे बाई म्हणून जगता जगता काळानुसार तिच्या डोक्यावरचा भार वाढतच जातो. संसाररूपी भवसागरात अनेक व्यापांनी बाई वेढली जाते. आर्थिक जबाबदारी पार पाडताना बाईला घरातून बाहेर पडून बाहेरच्या अनेक वाटा गवसतात. खेड्यातील बाई असेल तर घरातून बाहेर पडून तिची पावले शेताकडे वळू लागतात. शहरात राहणारी बाई कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यास घरातून बाहेर पडून नोकरी करू लागते. आजच्या धावपळीत घर आणि रान किंवा घर आणि ऑफिस, नोकरी अशी दुय्यम जबाबदारी पार पाडत असताना बाईच्या वाट्याला येणारे कष्ट, यातना, मान-सन्मान, अपमान, अस्मितेचा प्रश्न, तिच्या अस्तित्वाची लढाई या सर्व गोष्टी तिच्या दैनंदिनीचा अविभाज्य भाग झाला आहे. इतका सगळा संघर्ष झेलण्यास आज ती स्वतः सज्ज आहे. आपल्या कर्तृत्वाचा ठळक ठसा तिने समाजमनावर उमटला आहेच. तिने गवसलेल्या या नव्या क्षितिजावर ती रममाण होते. “संघर्षातून स्वनिर्मित केलेले अस्तित्व हा तिचा अधिकार आहे. आणि बाई म्हणून जगतानाचा स्वाभिमान सुध्दा आहे ” हा स्वाभिमान टिकवून ठेवण्यास ती सदैव तत्पर असते.
पुरुष माणसाचे काम हे एकमार्गी असते. कुटुंबासाठी पैसा निर्माण करणे. त्यासाठीची धडपड अशी एकच मुलभूत जबाबदारी त्यांनी स्विकारलेली असते. आपल्या एकमार्गी नेतृत्वातून पुरुष कुटुंबाप्रती आपली जबाबदारी पार पाडतात. पण बाईचे तसे नसते. तिचे हात अनेक कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांनी बांधलेले असतात. अनेक रूढी परंपरांचे साखळदंड तिच्या पायी जखडलेले असतात. काही तिने स्वतः बांधून घेतलेले तर काही समाजाने अडकवलेले. यात ती कितीही थकलीभागलेली असली तरी कर्तव्य आणि जबाबदारीतून ती मागे हाटत नाही. अगदी अंथरुणावर पडे पर्यंत. रात्री अंथरुणावर पडली तरी पुन्हा ऊठून दरवाजा नीट बंद केला आहे का हे पाहूनच ती पुन्हा निवांत झोपते. आपल्या कुटुंबावर ती नितांत प्रेम करत असते. आपले बाईपण जपताना खऱ्या कसोटीत उतरते तेंव्हा ती स्वतःचे भान हरपून जगते. अगदीच आजारी असताना अंथरुणावर पडून असेल तरी सुध्दा ती आपल्या आजारपणापेक्षा ती कुटुंबाचा जास्त विचार करते. थकल्या-भागल्या, खचल्या मनाला बाई नव्याने उभारी देवून कंबर कसून भक्कम उभी रहाते. आपले घर सावरताना अथवा निटनेटके ठेवताना बाई अंतर्मनातून कितीही विस्कटलेली असेल तरीही ती मोठ्या जुजबी हातोळीने ती आपला घरसंसार सावरते. पुरुष जेंव्हा बाहेरून कामावरून किंवा ऑफिसमधून घरी येतात तेंव्हा ते घरी येऊन आरामशीर बसू शकतात. घरातले बाईमाणूस त्यांची चहापान वगैरे विचारपूस करते. पण बाईच्या बाबतीत असे नसते ती बाहेरून कितीही थकूनभागून आलेली असेल तरीपण ती घरात येताच घरपण जपू लागते. म्हणूनच बाई म्हणून जगणं हे रूढी, परंपरा, कर्तव्य आणि जबाबदारीची जणू पेटती मशालच आहे. “आतून विस्कटलेल्या मनाला सावरणं आणि कुटुंबासाठी प्रसन्नतेचा मुखवटा चढवून चेहरा फुलवणं हे बाई म्हणून जगतानाचं ब्रीद आहे. “
प्राचीन इतिहासातून स्त्रीविषयक अनेक दंतकथा, कल्पक कथा चालत आल्या आहेत. आजही त्यांचा प्रभाव समाजमनावर आहेच. त्यामुळे आजही स्त्री ही पुरूषामागे दुय्यम स्थानी उभी असताना दिसते. पण कालानुरूप स्त्री ही या नवयुगाची रागिणी आहेती वीरांगना आहे. आकाशाला गवसणी घालणारी ती प्रगतीची उडान आहे. आजच्या स्त्रीस्वातंत्र्याला विस्तृत स्वरूप आले आहे. प्रत्येक बाई आपली व्यक्तिगत अस्मिता जपू लागली आहे. त्यासाठी तिची सदैव धडपड सुरू असते. आजची स्त्री आपल्यातील लुप्त शक्तीचा उद्रेक करून अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध आवाज उठवताना दिसत आहे. आपल्या संकुचित स्वातंत्राचे एक विस्तृत अवकाश बाईने स्वतःच निर्माण केले आहे. बोचट रूढी परंपरा, दुःखाची शृंखला ढासळून ती आधुनिकतेची स्वीकृती झाली आहे. पण बाईचे असे पलटते रूप काही ठिकाणी पुरुषी अहंकाराला ठेच लागणारे ठरत आहे. म्हणूनच आज काळाची गरज म्हणून आदिमतेतून चालत आलेल्या या दंतकथा, कल्पक कथांना वेगळे वळण, वेगळे स्वरूप देणे. जरूरी आहे. स्त्री-पुरुष समानतेचा वारसा हक्क सांगणारे साहित्य निर्माण होऊन समाजात आणने गरजेचे आहे.
शेवटी बाई म्हणून तुम्ही काय आणि मी काय आपण सगळ्याचजणी या समाजव्यवस्थेच्या ढाच्यात चेपून, स्वतःला वरवरचे पाॅलिश चढवून, रूढी आणि परंपरेच्या धाग्यात विणून घेतलेले एकाच माळेचे मणी आहोत. प्रत्येकीच्या वाटा जीवनशैली, गाव-शहरीवस्ती हे काहीही वेगळेपण असो पण बाई म्हणून जगतानाचा एकंदरीत संघर्ष आहे तो प्रत्येकीच्या वाट्याला थोडाफार सारखाच आहेच हे सत्य नाकारता येणारे नाही. असो.
जीवन तिथे संघर्ष हा आलाच. पण पुरुषांच्या तुलनेत बाईच्या वाट्याला थोडाफार जास्तीचा भोग असतो. पहाटे उठल्यापासून ते रात्री अंथरुणावर पडेपर्यंत आपल्या कुटुंबाप्रती निगडीत दैनंदिनीत बाई व्यस्त असते. यामधून अधिक विचार केला तर शहरातील बाई पेक्षा खेड्यातील बाईची, बाई म्हणून जगण्याची धडपड आणि संघर्ष जास्त असतो. कारण खेड्यातील बाईवर फक्त कुटुंबाची जबाबदारी नसते तर तिची नाळ शेतबांधाशी सुध्दा जोडलेली असते. त्यामुळे गाववाड्यांवर रहाणार्या बाईवर जास्त कष्टाचा भार पडतो. पण आपली हुशारी आणि कौशल्यातून आपली जबाबदारी ती उत्तम पार पाडते. मोठ्या चातुर्याने ती पैला-पै जोडून ठेवते. कुटुंबाची आर्थिक घडी सुरळीत बसविण्यात यशस्वी होते. कष्ट, जबाबदारी, आर्थिक नियोजन यात खेड्यातील बाई सदैव सक्षम आहे. त्यामुळे कुटुंब ढासळण्याचे, विस्कळीत होण्याचे अथवा आर्थिक घडी विस्कटण्याचे शहराच्या तुलनेत खेड्यातून प्रमाण कमी आहे.
बाई म्हणून जगणे म्हणजे ना कुणी ज्योतिषाला अथवा ना कुणी शास्त्रज्ञाला थांग न लागणारे ‘जणू एक विराट भावविश्व आहे.’ मी स्वतः बाई असले तरी बाई मनाचे गुढ उकलण्यास मी असमर्थ आहे. त्यामुळे हा लेख म्हणजे बाई म्हणून जगतानाचा …… एक अनुभव समजावा.
एकंदरीत विचार केला तर बाईचे जगणं म्हणजे सुख-दुख, आनंद, समाधान, कष्ट, यातना, संघर्ष, त्रागा, ओढ, जिव्हाळा……. इत्यादी अनेक छोटे मोठे प्रवाह एकत्रीत येऊन संपुर्ण मानवजातीमधील विशिष्ट आणि महत्वपूर्ण धारा आहे. या धारेच्या किनाऱ्यावर ती थोडी का होईना विसावत असतेच ….
☆ महिला दिन आत्ताच का? ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी☆
अनादी अनंत चार युगे उलटली महिला आहे, म्हणूनच जग आहे. हे खरं आहे, जगाला आजच का सजगता आली, स्त्री केव्हापासून पूजनीय वाटू लागली? पूर्वी ती पूजनीय नव्हती का? चाली रूढी परंपरा ही तर भारतीय संस्कृती. विसरलात का! मग आजच नारीचा, नारीशक्तीचा डांगोरा पिटण्यात कुठला पुरुषार्थ (स्रीअर्थ) आला बुवा?
पाश्चात्य संस्कृतीचे अंध अनुकरण का? पूर्वी इतकी स्त्री पूज्यनीय आता आहे असं वाटत नाही का? बिलकुल नाही. पूर्वी जेवढी स्त्री पुजनीय होती, तेवढी आता नाही! होय मी ह्या विधानाचा समर्थन करतोय.
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः—– ह्या विधानात सर्व काही आले व ते खरे केले. पुरुष प्रधान संस्कृतीच आत्ता ज्यास्त फोफावली आहे हे लक्षात ठेवा. बस म्हटले की बसणारी, उठ म्हटले की उठणारी स्त्री म्हणजे हातातील खेळणं आहे असं वाटत काय?
हल्ली काळानुसार सोई सुविधांचा वापर करणे इष्टच, कारण ती गरज आहे. गरज शोधाची जननी! काळ बदलला, नारी घरा बाहेर पडली. कारण परिस्थितीच तशी चालून आली. एकाच्या कमाई वर भागात नाही म्हणून, प्रत्येक क्षेत्रात ती उतरली. व ते साध्य साधन करून दाखवत, ती सामोर गेली व उभी राहिली. ती साक्षर झाली, मिळवती झाली, अर्थ कारण हा पुरुषार्थ तिने सहज साध्य केला. अस जरी असलं तरी तिच्या मागचा चुल, मुलं, बाळंतपण, पाळणा ह्या गोष्टी परत आल्याच व त्या पण साध्य केल्या, हे त्रिवार सत्य!
पूर्वीच्या काळातही परिस्थिती ला अनुसरून महिलांनी घर खर्चाला आधार कैक पटीने ज्यास्त दिला! आठवा त्या गोष्टी गिरणी नव्हती हाताने दळण कांडणच काय? घरातील जनावरांचा पालन पोषण, गाय म्हैस बकरी इत्यादीचे धारा, चारा पाणी, इत्यादी करून दुध दुभते त्या विकून घरार्थ चालवीत. अजूनी खेड्यात ही प्रथा चालु आहेच. जोडीला शेती काण्यात पण स्त्रिया मागे नव्हत्याच!
मथुरा असो की द्वारका तिथं पण हे वरील सर्व व्यवहार सुरळीत चालु होतेच की. नुसतं गौळण श्रीकृष्ण राधा, रासक्रीडा काव्यात जे मांडतो ते, तिथं अस्तित्वात होतच ना? कपोलकल्पित गोष्टी नाहीतच ह्या. स्त्रीया पुरुषां बरोबरीने अंग मेहनत करत. त्या अर्थार्जन करत होत्या! ! !
लग्न झालेली नवं वधु तिचे आगमन, तिच्या हाताचे पायाचे कुंकवाचे ठसे, जोडीने केलेली पुजा असो वा कुलदैवत दर्शन असो तिचे मंगळागौर असो किंवा डोहाळ जेवण इत्यादि गोष्टी ह्या, स्त्री जन्माला आलेला मान पानच, किंवा गौरव च होतो ना! प्रत्येक गोष्टीत तिचा पुढाकार हा महिला दिनच होता ना!
सावित्री, रमा, जिजाऊ, कित्तूर राणी चन्नांमा, झाशीची राणी ह्या सर्व लढाऊ बाण्याची प्रतीकच होती ना?
काळ बदलला, आस्थापना, कार्यशैली बदलली. युग नवं प्रवर्तन घेऊन नवं कार्याचा भाग पण बदलला.
तरी स्त्री आजुनी खम्बीर आहे. कामाचा व्याप क्षेत्र बदलले. पूर्वीपेक्षा अत्याचार, बलात्कार, गर्भपात मात्र दिवसा गणिक वाढते आहे! पूर्वी पेक्षा नारी सुरक्षित नाहीं कारण स्पष्टच. चित्रपट टेलीव्हिजनवर येणाऱ्या मालिका, चंगळवाद यांनी मनोवृत्ती बिघडली आहे.
महिला दिनाच्या निमित्ताने नारी संघटित होऊ पाहत आहे. पूर्वीही संघटीत होत्या. नाही असे नाही. तरीपण आज मात्र ही काळाची गरज आहे!
स्त्रियांनी शिकावे, स्वत:च्या पायावर उभे रहावे या ध्येयाने प्रेरित होऊन त्यासाठी आयुष्य वेचणारे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले, तसेच विशेषत: निराधार महिलांसाठी याच दृष्टीने सतत प्रयत्नशील असणारे महर्षी कर्वे हे समस्त स्त्री जातीसाठी कायमच अतिशय वंदनीय आहेत यात दुमत असण्याची शक्यताच नाही.
स्त्रीने शिकायला हवे, आत्मनिर्भर व्हायला हवे, या विचाराचे बीज मुळात कुठे रोवले गेले असावे, असा विचार करतांना मात्र मन नकळत १७ व्या शतकात पोहोचले… सज्जनगडावर घिरट्या घालू लागले, शिवथर घळीत रेंगाळले, ते या संदर्भात श्री समर्थ रामदास स्वामींची प्रकर्षाने आठवण झाली म्हणून. याबाबतीत समर्थांनी इतक्या वर्षांपूर्वी उचललेली पावले, आणि एकूणच त्यांच्या प्रागतिक विचारांचा आजच्या महिला दिनाच्या निमित्त जरासा आढावा घेण्याचा हा प्रयत्न…..
समाजाला बरोबर घेऊन जाणारा संप्रदाय अशी समर्थ संप्रदायाची सार्थ ओळख सांगता येईल. त्या काळच्या परिस्थितीत अनेक नको त्या अहितकारी आणि अवाजवी विचारांमुळे आणि अस्मानी तसेच सुलतानी संकटांमुळे अती दीन झालेल्या आणि रूढी-परंपरांना अनेक प्रकारे जखडल्या गेलेल्या समाजाचा कायापालट करण्याचा निर्धार समर्थांनी केला होता हे त्यांच्या चरित्रावरून आणि दासबोध, मनाचे श्लोक यासारख्या त्यांच्या ग्रंथनिर्मितीवरून स्पष्टपणे लक्षात येते. संपूर्ण समाज संघटित करायचा, समाजाचा कायापालट करायचा तर स्त्री-पुरुष समानता आवश्यक आहे, या विचाराची ठाम जाणीव समर्थांना होती, असेच खात्रीने म्हणायला हवे. त्यावेळच्या सामाजिक विचारधारेच्या पूर्णपणे विरोधात जाऊन, समाजाने स्त्रीच्या आत्मसन्मानाची जाणीव ठेवायला हवी हे त्यांनी स्वत:च्या आचरणातून दाखवून दिले होते. ‘परमार्थ’ हा प्रांत फक्त पुरुषांसाठी राखीव नसून, स्त्रियांनाही तो हक्क आहे असे फक्त आवर्जून सांगून ते थांबले नाहीत, तर त्यांनी स्त्रियांनाही आपल्या संप्रदायाचे शिक्षण दिले…आपले लोकहिताचे… लोककल्याणाचे विचार त्यांनाही शिकवले. (‘लोकहित’.. ‘लोककल्याण’ म्हणजे काय या विचारात किंवा व्याखेत त्या काळाच्या तुलनेत आता आमूलाग्र बदल झालेला आहे हे तर यासंदर्भात गृहीतच धरायला हवे. ) समाजाला त्यावेळी आवश्यक असणारी योग्य दिशा दाखवण्याच्या आपल्या सततच्या कार्यात स्त्रियांनाही, अगदी अल्प प्रमाणात का होईना, पण सहभागी करून घेण्यासाठी त्यांनी अविचल प्रयत्न केले. त्या काळात त्यांनी एकूण ४० स्त्रियांना सती जाण्यापासून रोखले होते हे वास्तव अनेकांना बहुदा ज्ञात नसावे… हे अंधश्रद्धेविरुद्ध उचललेले पाऊल नक्कीच होते.
आपले उदात्त ध्येय साध्य करण्यासाठी भ्रमंती करत असतांना मिरज येथे त्यांना वेण्णाबाई भेटली… केवळ लग्न झाले होते म्हणून ती ‘बाई’… प्रत्यक्षात ती जेमतेम ११-१२ वर्षांची बालविधवा होती. आणि त्यावेळी ‘मान्यता प्राप्त’ असलेले विधवेचे जीवन जगत होती… घरकाम, देवाचे नाव घेत रहाणे आणि चुकून अक्षर ओळख झालेली असली तर जमेल तसे धार्मिक ग्रंथ वाचणे… एवढंच काय ते ‘जीवन’.
एकदा समर्थ तिच्या घरी भिक्षा मागण्यासाठी गेलेले असतांना, वेण्णाबाई एकनाथी भागवत वाचत असल्याचं त्यांनी पाहिलं आणि ‘‘ मुली तुला यातले काही समजते का? ” असं विचारलं. आणखीही काही प्रश्न विचारले… समर्थांना तिचं…तिच्या बुध्दीचं वेगळेपण जाणवलं. आणि वेण्णाबाईलाही ‘हेच आपले गुरू’ असं मनापासून जाणवलं…आणि त्यांनी समर्थांचं शिष्यत्व पत्करलं… त्याही काळात त्यांचं वाचन प्रचंड होतं, नकळत अध्यात्माची आवडही निर्माण झाली होती…पण हे सगळं उंबऱ्याच्या आत… चार भिंतीत. पण त्यांच्या वडलांना त्यांची तगमग समजत होती… ज्ञानाची ओढ समजत होती… त्यांनी तिला समर्थांबरोबर जाण्याची परवानगी दिली. आणि हेही त्या काळानुरुप अपवादात्मक आणि म्हणून कौतुकास्पदच होते.
‘‘उत्कट भव्य तेचि घ्यावे। मळमळीत अवघेंचि टाकावे।
निस्पृहपणे विख्यात व्हावे। भूमंडळी॥”
– – हा समर्थांनी त्यांना शिकवलेला पहिला धडा असावा. यातला ‘मळमळीत’ हा शब्द तेव्हाच्या स्त्री जीवनावर लख्ख प्रकाश टाकणारा आहे.
– या विचाराचे बीजही समर्थांनी त्यांच्या मनात पेरलं. त्यांची तैलबुद्धी आणि गोड गळा लक्षात घेऊन समर्थांनी त्यांना सातत्याने ग्रंथवाचन, पाठांतर तर करायला लावलंच, पण एक गायन गुरू नेमून गायनदेखील शिकवलं.. आणि एक दिवस त्यांना चक्क कीर्तनाला उभं केलं. विधवा स्त्रीने लोकांसमोर उभं राहून कीर्तन करणं ही स्त्रीच्या आत्मनिर्भरतेची अनासायाने सुरुवातच समर्थांनी करून दिली होती असं नक्कीच म्हणायला हवं… पण त्या काळात विधवा स्त्रीने असं जाहीर कीर्तन करणं ही खरोखरच एक ‘क्रांती’ होती. समाजाच्या उध्दारासाठी अशी क्रांतीकारक पावलं उचलणा-या सर्वांनाच आधी जननिंदेला, समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागतं हे वास्तव आपल्याला ज्ञात आहेच, आणि समर्थ त्याला अपवाद नव्हते.
मानवी जीवनाचा अटळ नियम असा आहे की कालांतराने जीवन मूल्यांमध्ये, जीवनपद्धतीमध्ये परिवर्तन घडावेच लागते… घडवावे लागते. त्यामुळे समाजातील जिवंतपणा टिकून रहातो. त्यासाठी ‘क्षणाक्षणा परीक्षिले पाहिजे लोक’ असं समर्थांना ठामपणे वाटत असे. पण म्हणून त्यांनी स्त्रियांना हे क्षेत्र उपलब्ध करून देतांना उतावळेपणा केला नव्हता.
‘अभ्यासे प्रगट व्हावे। नाहीं तरी झाकोन असावे।’ असाच त्यांचा उपदेश होता. स्त्रीने आत्मनिर्भरता अंगी बाणवावी, पण ते करत असतांना मनातली मातेची ममता त्यागू नये हेही त्यांनी स्त्रियांना बजावल्यासारखे सांगितले होते हे आज आवर्जून लक्षात घ्यायला हवे. … ज्ञान मिळवतांना आणि स्वावलंबी होतांना स्त्रीने हेही लक्षात ठेवले पाहिजे की … वीट नाही कंटाळा नाही। आलस्य नाही त्रास नाही। इतुकी माया कोठेचि नाही। मातेवेगळी॥ असेही त्यांनी आवर्जून बजावले होते. पण आत्ताच्या काळातल्या आत्मनिर्भर होऊ इच्छिणा-या स्त्रिया नेमके हेच विसरतात की काय, अशी शंका येते, कारण अशीच परिस्थिती आता दिसते आहे.
समाज परिवर्तन करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने सुधारायला हवे यावर समर्थांचा भर होता, आणि हे साध्य करण्यासाठी स्त्री-पुरुष असा भेद अजिबातच असायला नको असंच त्यांचं प्रतिपादन होतं, म्हणून त्यांनी स्वत:ही असा भेद केला नाही. स्त्रियांनीही आत्मोन्नतीची संधी सोडू नये यासाठी ते आग्रही होते. अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाण्याचा हक्क स्त्री-पुरुष सर्वांनाच आहे हा विचार त्यांनी आपल्या वागण्यातून ठळकपणे अधोरेखित केला होता. त्या काळानुसार समर्थांनी यासाठी भक्तिमार्ग सांगितला खरा, पण तो मार्ग विलक्षण बुध्दीप्रधान आणि विवेकाचा पुरस्कार करणाराच होता. परमार्थ हा सगळ्यांसाठी आहे…सगळ्यांना…म्हणजे स्त्रियांनाही तेथे अधिकार आहे हे सांगतांना… ‘‘भवाच्या भये काय भीतोसी लंडी। धरी रे मना धीर, धाकासीं सांडी॥” हा त्यांचा सल्ला स्त्री-पुरुष दोघांनाही दिलेला होता, हे आवर्जून लक्षात घेण्यासारखे आहे.
वेण्णाबाईंप्रमाणेच त्यांनी आक्काबाई, अंबिकाबाई या स्त्रियांनाही अभ्यासासाठी प्रवृत्त केले. कीर्तने करण्यास अनुमती दिली. वेण्णाबाईसारखी एक बालविधवा स्त्री धर्मग्रंथांचा अभ्यास करते, कीर्तने करते, जनतेचे प्रबोधन करते, याचा निषेध म्हणून कोल्हापुरात त्यांच्यावर अनेक आरोप होत होते. विषप्रयोगही झाला पण त्यांनी ते विष पचवून दाखवले… निंदकांना पश्चात्ताप झाला आणि त्यांनी त्यांची व समर्थांची क्षमा मागितली… त्यांनीही मोठ्या मनाने क्षमा केली…मग त्यांचा आणि त्यांच्याबरोबरच्या इतर स्त्रीशिष्यांचा अभ्यास आणि कीर्तन करणे चालूच राहिले. ‘ स्त्री कीर्तनकार इथूनच उदयाला आल्या ‘ असे म्हटले तर अजिबात वावगे ठरणार नाही.
याखेरीज वेण्णाबाईंमधील व्यवस्थापन-क्षमताही समर्थांनी जाणली होती. आणि अनेकदा रामनवमी उत्सवाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती अर्थात् वेण्णाबाईंनी ती उत्तम प्रकारे पार पाडली होती. त्यांनी त्याकाळात ‘सीता-स्वयंवर’, मंचीकरण (वेदान्तावरील गद्य टिप्पण्ण्या), रामायणाची कांडे, आणि यासारखे ७-८ ग्रंथही लिहिले होते. काही अभंग, पदे असे स्फुट लेखनही केलेले होतं. आणि यासाठीही समर्थांनी त्यांना उत्तेजन दिलेलं होतं.
दुस-या शिष्या संत अक्काबाई यांनी समर्थ हयात असतांना ३५ वर्षे चाफळचा कारभार सांभाळला होता…त्यांच्या पश्चात ३८ वर्षे सज्जनगडाचा कारभार सांभाळला. १२व्या वर्षापासून त्या समर्थांबरोबर होत्या आणि त्यांच्यातले गुण ओळखून समर्थांनी त्यांना त्यानुसार शिक्षण देऊन तयार केले होते. (यासाठी ‘व्यवस्थापन’ हा वेगळा विषय तेव्हा नक्कीच नव्हता हे लक्षात घ्यायला हवे. ) विशेष म्हणजे औरंगजेबाने आक्रमण केल्यावर अक्काबाईंनी स्वत: हिम्मत करून गडावरचे पंचायतन वाघापूरला नेऊन रामनवमी साजरी केली होती.. आणि हे नियोजन आणि त्यामागचे त्यांचे धाडस याचे श्रेय समर्थांच्या द्रष्टेपणाला द्यायलाच हवे. आपल्या चाफळच्या मठात अशा अनेक विधवा, परित्यक्ता, अनाथ स्त्रियांना समर्थांनी बापाच्या मायेने आश्रय दिला होता. समर्थ इतक्या पुरोगामी विचारांचे होते की त्यांनी अशा प्रत्येक स्त्रीचे उपजत गुण, आवड, आणि कुवत लक्षात घेऊन प्रत्येकीला वेगवेगळी कामे शिकायला प्रवृत्त केले होते. कुटुंबाला नकोशा झालेल्या कित्येक स्त्रियांना आपल्या विविध मठांमध्ये त्यांनी फक्त मानाने आसराच दिला नाही, तर योग्यतेनुसार प्रत्येकीला आवश्यक तेवढे शिक्षण देऊन वेगवेगळ्या कामांची स्वतंत्र जबाबदारी पेलण्याइतके सक्षमही केले.
आत्ताच्या तुलनेत अशा स्त्रियांची संख्या अतिशय कमी होती हे जरी खरे असले, तरी “ स्त्री आत्मनिर्भर असायलाच हवी “ या समर्थांच्या ठाम विचाराचे इवलेसे बीज नक्कीच त्यामुळे रोवले गेले आणि आता त्या बीजाचा अवाढव्य वृक्ष झाला आहे हे सत्य नाकारता येणार नाही. या विचारामागची समर्थांची कळकळ, अतिशय दूरगामी विचाराने त्यादृष्टीने त्यांनी टाकलेली अत्यंत महत्वाची पावले, म्हणजे “ स्त्री शिक्षण.. तिचा आत्मसन्मान.. आणि तिचे आत्मनिर्भर असणे “.. या समाज-सुधारणेसाठी अत्यंत आवश्यक असणाऱ्या एक प्रकारच्या ‘ क्रांती ‘ साठी पायाच्या दगडासारखी होती हे सत्य त्रिवार मान्य करायलाच हवे …. काळ कितीही पुढे गेला तरीही.
श्री समर्थ रामदास हे खऱ्या अर्थाने काळाच्या पुढे असलेले द्रष्टे गुरू होते, स्त्री-उन्नतीचे खंदे समर्थक आणि आद्य पुरस्कर्ते होते, आणि त्यासाठी सर्व काही करण्यास तत्पर असणारे हाडाचे कार्यकर्ते होते … खऱ्या अर्थाने ‘ समाजसेवक ‘ होते, असं नक्कीच म्हणायला हवं … नव्हे मान्य करायला हवं. त्यांना मनःपूर्वक वंदन.
☆ “सुशिक्षित आहेत तरी कोठे?…” ☆ श्री जगदीश काबरे ☆
शिक्षणाचा प्रचार-प्रसार वाढला तसे साक्षरतेचे प्रमाण वाढले आहे… वाढले नाही ते “सुशिक्षित”तेचे प्रमाण. उच्चपदवीधरही क्वचितच सुशिक्षित असतांना दिसून येतात. कारण ते त्यांच्या अविकसित जाणीवांच्या, बुरसटलेल्या विचासरणींच्या अधीन राहिल्यामुळे आणि आधुनिक विचारांपासून दूर पळण्याच्या प्रवृत्तीमुळे. त्यामुळे सामाजिक-सांस्कृतीक प्रश्न सुटणे तर दुरच, पण अधिकाधिक गुंतागुंतीचे होत चालल्याचे आढळुन येते. त्याचे पडसाद आपण जातपंचायतीच्या अनाचारातून अथवा नित्यश: वाढतच चाललेल्या जाती-धर्म-वर्चस्ववादातून आणि अंधश्रद्धायुक्त घटनांचे छद्मविज्ञानाच्या साह्याने समर्थन करतांना पाहू शकतो.
झापडबंद शिक्षणपद्धतीमुळे नागरिक “सुशिक्षित” होत नाही म्हणूनच तो आधुनिकही होऊ शकत नाही. अत्याधुनिक तंत्रज्ञाने मुबलकपणे वापरात आणली म्हणून कोणी आधुनिक होत नसतो. उलट असे कारणे म्हणजे माकडाच्या हाती कोलीत देणे होय. कारण आधुनिकता ही विचारांत व आचारांत आणावी लागते. सहिष्णुता-उदारता आणि प्रश्न मुळातून समजावून घेत नंतरच त्यावर भाष्य करण्याची प्रवृत्ती विकसीत करावी लागते. प्रत्यक्षात आपल्या सामाजिक जीवनात त्याचा दिवसेंदिवस अभाव वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अर्धवट ज्ञानाने अत्यंत घाईत नि:ष्कर्ष काढण्याच्या प्रवृत्तींना प्रोत्साहन मिळत आहे.
वाढत्या असहिष्णुतेचे दुसरे उदाहरण म्हणून आपण चिकित्सा नाकारण्याच्या वाढत्या दु:ष्प्रवृत्तीकडे पाहू शकतो. धर्मपंडितांना चिकित्सा अमान्य असते, हे गृहित धरले तरी ज्ञानाच्या विकसनासाठी ती सर्वसामान्यांना आवश्यक असते हे आपण लक्षात घेतले पाहिजे. इतिहासाची, ऐतिहासिक व्यक्तिमत्वांचीही पुन्हा पुन्हा चिकित्सा करणे हे समाजाच्या भावी विकसनासाठी आवश्यकच असते. किंबहुना अचिकित्सक समाज हा अंध समाज बनत जातो. म्हणूनच तो अंधारयुगात जगत असतो. आज अंधश्रद्धेच्या गर्तेत खोलवर बुडणारा, ढोंगी बाबांबुवांच्या पायाशी लीन होणारा आपला समाज एकूणातच अंधारयुगाकडे जोमाने वाटचाल करत आहे, असे खेदाने म्हणावे लागतेय. कारण आम्ही क्रमश: इतिहासाची परखड चिकित्सा आणि धर्मचिकित्सा थांबवत नेल्या आहेत. इतिहासाचे नको तसे उदात्तीकरण आणि ऐतिहासिक पुरुषांचे दैवतीकरण करत चाललो आहोत.
आज बुद्ध, राम, पैगंबर, शिवाजी महाराज ते बाबासाहेब यांची चिकित्सा करणे म्हणजे कोणता ना कोणता समाज सरळ शत्रू बनवून घेणे होय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. चिकित्सा, टिकात्मक टिप्पणी म्हणजे द्वेष पसरवणे असा सर्वसाधारण समज आपल्याकडे दृढ होत चालला आहे. प्रत्येक महापुरुष जातीत वाटला गेल्याने आपला इतिहास हा जातीनिहाय, धर्मनिहाय बनत गेला आहे. इतिहासाचे शुद्धीकरण करण्याच्या नादात जातीय मंडळी इतिहासाचे विकृतीकरण करत चालली आहेत. हे आपण असंख्य उदाहरणांतून पाहू शकतो. कुंभमेळा दरम्यान कोट्यावधी लोकांनी आंघोळ केल्यामुळे गंगेचे पाणी प्रदूषित झाले, त्यात मानवी विष्टेचे कण आढळले असा निष्कर्ष काढणाऱ्यांना आपण सहजपणे हा सनातन धर्माचा अपमान आहे म्हणून मोकळे होतो. एखाद्या व्यक्तीवरील टीका म्हणजे ती त्या व्यक्तीच्या जातीतील सर्वांवरीलच टीका असा सोयिस्कर अर्थ घेतल्यामुळे टीकाकारांवर झुंडीने हल्ले चढवणाऱ्या ट्रोलर महाभागांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याचे कारण म्हणजे लोक पक्षीय, जातीय आणि धार्मिक बेड्यांत घट्ट अडकत आहेत. या बेड्या त्याला झुंडीच्या मानसशास्त्रानुसार वर्तन करायला लावतात.
चिकित्सेच्या अभावात ज्ञान आणि विचार पुढे जावू शकत नाहीत याचे भान आपण हरपून बसलो आहोत. आमचे पालक चिकित्सा नाकारतात. आमची शिक्षणपद्धतीही चिकित्सा नाकारते. धर्मशिक्षण, शालेय शिक्षण, उच्च-शिक्षण हे एकाच तागड्यात मोजता येईल असे बनवले जात आहे. धर्म नेहमीच चिकित्सा नाकारतो, कारण धर्माची बिंगे फुटण्याचा धोका असतो. धर्मचिकित्सकाला “पाखंडी” ठरवून मोकळे होणे त्यांना गरजेचे वाटते. माध्ययुगात युरोपातही असे घडून गेले आहे…पण तिकडील विचारकांनी धर्मलंडांचा प्रसंगी छळ सोसुनही शेवटी त्यांना शरण आणले. वैज्ञानिक सत्य स्वीकारण्यास भाग पाडले. कारण ते चिकित्सक होते… प्रश्न विचारत होते… उत्तरेही शोधत होते. म्हणून ते आधुनिकही बनले. आपण केव्हा बनणार? की अजूनही आपली मानसिकता प्राचीन आणि मध्ययुगात अडकलेली रहाणार?🤔
(पूर्वसूत्र- “तुझ्या आईकडून समीर गेल्याचं मला समजलं त्या क्षणापासून खूप अस्वस्थ होते रे मी. तू हे सगळं कसं सहन करत असशील याच विचाराने व्याकूळ होते. घरी येताच सुचतील तसे चार शब्द लिहून पत्र पोस्टात टाकलं तेव्हा कुठे थोडी शांत झाले होते. खरं सांगू? मी काय लिहिलं होतं ते विसरूनही गेले होते. आज तू मनातलं सगळं बोललास तेव्हा ते मला नव्याने समजलं. समीरचा आजार पृथ्वीवरच्या औषधाने बरा होण्याच्या पलिकडे गेलेला आहे हे मला शप्पथ सांगते, खरंच माहित नव्हतं. ते सगळं
दत्तगुरुंनीच माझ्याकडून लिहून घेतलं हे आज माझ्या लक्षात आलंय. त्यांना दिलासा द्यायचा होता तुला आणि त्यासाठी मध्यस्थ म्हणून मी त्यांना योग्य वाटले हे लक्षात आलं आणि मी भरून पावले. हा दत्तगुरुंचाच सांगावा आहे असं समज आणि निश्चिंत रहा… !” लिलाताई म्हणाली. )
तिचा निरोप घेऊन मी बाहेर पडलो ते मनात भरुन राहिलेलं समाधान सोबत घेऊनच. समाधानाबरोबरच क्षणकाळापुरती कां होईना पण मनात निर्माण झालेली कांहीतरी राहून गेल्याची भावनासुद्धा होतीच. कारण लिलाताईने बोलून दाखवले होते ते तिच्याच मनातले विचार. पण नेमकं तसंच घडलं असेल? दत्त महाराजांनी खरंच ते त्या शब्दांत लिहायची प्रेरणा तिच्याही नकळत तिला दिली असेल? मनात अशी शंका घेणं मला योग्य वाटेना पण त्याचं समाधानकारक उत्तरही मला सापडेना. तिचा निरोप घेऊन मी बाहेर पडलो तेव्हा मनाला स्पर्शून गेलेल्या समाधानामुळे मन थोडं शांत होतं खरं पण या सगळ्या
अघटितामागचं गूढ मात्र उकललेलं नव्हतंच. माझ्या मनातल्या दत्तमूर्तीच्या चेहऱ्यावरील स्मितहास्यात लपून ते गूढ अधिकच गहिरं होत चाललेलं होतं.. !
मी घरी आलो. रुटीन हळूहळू सुरू झालं. आरती पूर्णपणे सावरली नसली तरी तिने आता मात्र लवकरात लवकर सावरायला हवं, तिने नव्याने सुरुवात करायला हवी असं मला मनापासून वाटतं होतं. तिच्या स्वास्थ्यासाठी ते गरजेचं होतं. ती तेव्हा आमच्या लग्नानंतर लगेचच मिळालेला युनियन बँकेतला जॉबच करीत असे. सुदैवाने कोल्हापूरमधे तेव्हा आमच्या बॅंकेच्या दोन ब्रॅंचेस असल्याने तिचं पोस्टिंग दुसऱ्या ब्रॅंचमधे सहजपणे होऊ शकले होते. तिची खरंतर शिक्षणक्षेत्रात काम करायची इच्छा होती. म्हणून तिला ही नोकरी अचानक मिळाली तेव्हा ती फारशी आवडलेली नव्हती. आता मात्र एकटेपणातून आणि पुत्रवियोगाच्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी ही नोकरीच तिला मदतीची ठरणार होती. समीर गेल्यानंतर पुढे जवळजवळ एक महिना बिनपगारी रजा घेऊनही ती स्वस्थ नव्हतीच. म्हणूनच असं एकटेपणात रुतून बसणं हा आपल्या दुःखावरचा उतारा नाहीये हे तिलाही हळूहळू जाणवू लागलेलं होतं.
“चार दिवस का होईना जॉईन हो. तुझ्या प्रदीर्घ रजेमुळे स्टाफ शॉर्टेजचा त्रास ब्रॅंचमधील सगळ्यांनाच सहन करायला लागतोय. आपली गरज होती तेव्हा तेच सगळे मदतीसाठी धावून आलेले होते ना? मग निदान आता तरी त्यांचा त्रास वाढू नये याचा विचार आपण करायला हवा की नको? तुझं मन तिथं नाही रमलं तर एक महिन्याची नोटीस देऊन जॉब रिझाईन करायचं स्वातंत्र्य तुला आहेच. पण यापुढे असं अधांतरी नको राहूस. ” मी माझ्या परीने तिला वेळोवेळी हे सगळं समजावत रहायचो. अखेर तिने प्रयत्न करून पहायचं ठरवलं आणि एकटेपणाच्या खाईतून ती हळूहळू माणसात आली. वेगळं वातावरण, नवे विषय, नवी व्यवधानं यामुळे आपसूक ती नकळत सावरू लागली. तरीही मला बँकेतून घरी यायला तिच्यापेक्षा खूप उशीर व्हायचा. संध्याकाळी ती एकटी घरी आल्यानंतर बंद दाराआड समीरच्या व्याकूळ करणाऱ्या आठवणी तिच्या स्वागताला हजर असायच्याच.. ! त्या तशा रहाणारच होत्या. त्यांनी निघून जावं असं मलाही वाटत नव्हतं. पण त्या आठवणींमधे हिने रुतून बसू नये यासाठी माझे प्रयत्न असायचे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर एक दिवस नवीन बाळाची चाहूल लागली! त्या जाणिवेच्या स्पर्शाने तिचे डोळे पाणावले. पण ते दुःखाचे नव्हे तर आनंदाचे अश्रू होते! समीर नक्की परत येणार आहे ही खूणगांठ माझ्या मनात पक्की होती पण आरतीला मात्र अजून मनापासून ते सगळं स्वीकारता येत नव्हतं.
यथावकाश या खेपेलाही तिच्या काळजीपोटी तिचे आई-बाबा बाळंतपणासाठी तिला आपल्या घरी सांगलीला घेऊन गेले. इकडे मी, माझी आई आणि माझा लहान भाऊ. तिकडचाच विचार आम्हा सर्वांच्या मनात सतत ठाण मांडून असायचा. समीरच्या स्वागतासाठी मी मनोमन अतिशय उत्सुक होतो पण ते उघडपणे व्यक्त करता येत नव्हतं तर दुसरीकडे आईच्या मनात सगळं सुखरूप पार पडेल ना याचीच काळजी असे!
बँकेत कामाच्या व्यापात काही काळ माझं मन गुंतून रहायचं खरं पण ते तेवढ्यापुरतंच. सांगलीहून येणाऱ्या निरोपाची वाट पहाणारं माझं मन उत्सुक अस्वस्थतेमुळे सतत बेचैनच असायचं.
असंच एक दिवस मी कामात व्यग्र असताना कुणाची तरी चाहूल लागली म्हणून मी मान वर करुन पाहिलं तर समोर माझे सासरे उभे होते! मी क्षणभर पहातच राहिलो त्यांच्याकडे न् भानावर येताच ताडकन् उठून उभा राहिलो. ते काय सांगतायत हे ऐकण्यासाठी माझे कान आतूर झाले होते पण उत्सुक मन मात्र आतल्याआत थरथरत होतं…. !!
“तुम्ही असे अचानक?”
“हो. खूप आनंदाची बातमी घेऊन आलोय. मुलगा झालाय… “
“आरती कशी आहे? आणि बाळ… ?”
“तिनेच ‘समक्ष जाऊन सांगून या’ म्हणत मला लगोलग पाठवलंय. बाळ गोड आहे. तीन किलो वजन आहे बाळाचं. घरी आईंनाही सांगा लगेच. मला निघायला हवं… “
” नाही नाही.. असं कसं?” मी म्हणालो. “घरी नाही तरी निदान समोरच्या रेस्टाॅरंटमधे काॅफी तरी घेऊया” म्हणत मी ड्राॅवर बंद केला तसं त्यांनी मला थांबवलं.
“नाही… खरंच नको. तुम्ही कामात आहात, व्यत्यय नको. मी शाहुपूरीत माझ्या बहिणीकडे जाऊन हा निरोप सांगणाराय. तिथं खाणंपिणं होईलच. म्हणून नको ” त्यांनी मला समजावलं. जायला वळले आणि कांहीतरी आठवल्यासारखं थांबले. त्यांनी खिशात हात घालून कागदाची एक घडी बाहेर काढली आणि…
” हे तुमच्या बायकोने दिलंय तुमच्यासाठी.. ” ते हसत म्हणाले आणि ती घडी माझ्या हातात देऊन निघून गेले..
ती घडी उलगडून पाहिलं तर थरथरत्या हातानं लिहिलेली ती मोजक्या शब्दांची फक्त एक ओळ होती….
‘आपला.. समीर.. परत आलाय.. ‘
ते वाचलं आणि एक अनामिक अशी सुखसंवेदना माझ्या मनाला स्पर्शून गेली.. त्या स्पर्शाने मी शहारलो! कसाबसा खुर्चीत टेकलो. ओलसर नजरेने त्या अक्षरांवरून नजर फिरवीत त्या कागदाची अलगद घडी घातली आणि ती खिशात जपून ठेवली.. !
“आपल्याला पुन्हा मुलगा झाला तर आपला समीरच परत आलाय असंच तुम्ही म्हणणार…. पण मी.. ? तुम्हाला कसं सांगू? रात्री अंथरुणाला पाठ टेकली, अलगद डोळे मिटले कीं केविलवाण्या नजरेने माझ्याकडे पहात दोन्ही हात पुढे पसरत झेपावत असतो हो तोss.. आहे माहित? त्याचे टपोरे डोळे’ गोरा रंग’, लांबसडक बोटं, दाट जावळ… सगळं मनात जपून ठेवलंय हो मीss. आपल्याला मुलगा झालाच तर तो आपला समीरच आहे कीं नाही हे फक्त मीच ठरवणार… बाकी कुणीही नाहीss…. ” कधीकाळी आरतीच्याच तोंडून बाहेर पडलेले हे शब्द आणि त्यानंतरचं तिचं खऱ्याखोट्याच्या सीमारेषेवरचं घुटमळणं मला आठवलं आणि पूर्णतः नास्तिक असणारी तीच आज मला ‘आपला समीर परत आलाय’ हे अतिशय आनंदाने, मनापासून सांगत होती !! यापेक्षा वेगळं मला तरी दुसरं काय हवं होतं?
ही अतिशय करूण आणि तितक्याच भयावह अशा अरिष्टाची अतिशय सूचक अशी सांगताच आहे असं मला त्याक्षणी वाटलं खरं पण ते तेवढंच नाहीये हे मात्र तेव्हा माहित नव्हतं. पुढे जवळजवळ १४-१५ वर्षांचा प्रदीर्घ काळ लोटल्यानंतर एक दिवस अतिशय अकल्पितपणे मला समजलं ते या सगळ्या अघटीतामधे लपलेलं गूढ उकलणारं एक रहस्य.. !!
तोवर ‘समीर परत आलाय’ ही भावना आमच्या निखळ समाधानासाठी आम्हाला पुरेशी होती. पण तो कसा परत आला.. सगळं कां आणि कसं घडलं याची उकल मात्र झालेली नाहीय हे माझ्या गावीच नव्हतं. १५ वर्षांचा प्रदीर्घ काळ लोटल्यानंतर अगदी अकल्पितपणे ती उकल झाली.. आणि.. मी त्यातला थरार अनुभवताना माझ्या मनातल्या ‘त्या’च्यापुढे मनोमन नतमस्तक झालो… !!