श्री राजीव गजानन पुजारी
विविधा
☆ जाणता राजा… ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆
छत्रपती शिवाजी महाराजांचे वर्णन करतांना समर्थ रामदास स्वामी म्हणतात,
“निश्चयाचा महामेरू। बहुत जनांसी आधारू ॥
अखंड स्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी ॥”
समर्थ पुढे म्हणतात,
“यशवंत कीर्तिवंत। समर्थ्यवंत वरदवंत॥
नीतिवंत पुण्यवंत। जाणता राजा॥”
पहिल्या कडव्यातील प्रत्येक चरणामध्ये नीट पाहिले तर महाराज एक शासक व व्यवस्थापक म्हणून कसे होते याचे वर्णन आहे. यातील ‘श्रीमंत योगी’ हा शब्द महत्वाचा आहे. महाराज श्रीमंत असून श्रीमंतीपासून अलिप्त होते. ‘ खजिन्यात जमा झालेली संपत्ती रयतेची आहे ’ यावर महाराजांचा ठाम विश्वास होता, ती संपत्ती त्यांनी फक्त आणि फक्त रयतेच्या कल्याणासाठीच वापरली. हे त्यांच्या व्यवस्थापनाचे महत्वाचे तंत्र होते.
दुसऱ्या कडव्यातील पहिल्या तीन चरणांमध्ये महाराजांचा गुणगौरव केला आहे. शेवटच्या चरणातील ‘जाणता राजा’ हे शब्द महत्वाचे आहेत. महाराज ‘राजे’ होतेच, पण तो एक ‘जाणता’ राजा होता. जाणता म्हणजे जाणणारा. ज्याला आजूबाजूच्या परिस्थितीची जाण असते व जो प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल कसे बनवायचे हे जाणतो, त्याला ‘ जाणता ‘ म्हटले जाते. महाराजांचे व्यवस्थापन कौशल्य अद्वितीय होते. आजदेखील त्यांनी दिलेल्या व्यवस्थापन तंत्रांचा वापर केल्यास आपला देश निश्चितच ‘विश्वगुरु’ होऊ शकतो.
व्यवस्थापनाचा मूलमंत्र म्हणजे ‘दूरदृष्टी’. आपल्या प्रजेचा जर विकास करायचा असेल तर पारतंत्र्याचे जोखड झुगारून स्वतःचे राज्य – म्हणजे स्वराज्य निर्माण करावे लागेल हे त्यांनी बालपणीच ओळखले. कारण स्वातंत्र्यातच रयतेचा विकास होतो हे जाणण्याची दूरदृष्टी लहान वयातच त्यांचेकडे होती. या त्यांच्या दूरदृष्टीमुळेच त्यांना ‘आनंदभुवन’ समान स्वराज्याची निर्मिती करता आली.
रयतेसाठी स्वराज्याची निर्मिती करायची तर त्यासाठी ‘कार्याप्रती समर्पित मनुष्यबळ’ हवे. त्यासाठी माणसे ओळखावी लागतात, ओळखलेली माणसे जोडावी लागतात, जोडलेली माणसे संघटित करावी लागतात. एक संघटित शक्ती निर्माण करावी लागते आणि त्यातूनच कोणतेही महान कार्य घडत असते, हे शिवरायांनी ओळखले होते. महाराज रत्नपारखी होते. त्यांचेकडे माणसांतील गुण ओळखण्याचे अलौकिक कौशल्य होते. त्यामुळे त्यांनी येसाजी कंक, बाजीप्रभू देशपांडे, जिवा महाला, तानाजी मालुसरे अशी एक नाही अनेक माणसे हेरून त्यांच्या मनात स्वराज्याचे बीज रोवले.
त्यानंतर प्रत्येक सुलतानशाहीस कधी दिशाभूल करून, कधी गहाळ पाडून तर कधी नुसते झुलवत ठेऊन महाराजांनी आपला कार्यभाग साधण्यास सुरुवात केली. आपल्या राजकीय हालचालींचा कोणासही सुगावा लागू न देता अचानक हल्ला करणे, शत्रूस गाफिल ठेऊन त्याचा मुलुख लुटणे इत्यादी कामांत महाराजांची राजनीती दिसून येते. आपल्या शत्रूला आपल्या विरोधात कोणी सहाय्य केले तर, नंतर वेळप्रसंगानुसार त्याचा बदला घेणे हाही महाराजांच्या राजनीतीचा भाग होता. पुरंदरच्या तहाशिवाय इतर कोणताही तह त्यांनी पाळला नाही. त्यांच्या दृष्टीने तह म्हणजे संकटमय परिस्थितीतून सुटका करून घेण्यासाठी एक तात्पुरता इलाज होता. केवळ आपला हेतू साध्य करण्यासाठी महाराज तह करीत असत.
शत्रू जर आपल्यापेक्षा बलाढ्य असेल तर त्याला हरवण्यासाठी महाराजांनी गनिमी काव्याचा वापर केला. ‘शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ’ ही उक्ती त्यांनी वारंवार खरी करून दाखवली आणि बेसावध शत्रूला गनिमी काव्याने वारंवार धूळ चाटवली. त्यांच्या ह्या गनिमी काव्याचा युद्धनीती म्हणून आजही जगभरातील सैन्यांद्वारे अभ्यास केला जातो.
जुलूमी परकीय सत्तेला विरोध करत असतानाच महाराजांनी राज्याची आर्थिक घडी व्यवस्थित बसवून आर्थिक स्थैर्य निर्माण केले. शेतीला बिनव्याजी कर्ज देणे, पुरोगामी शेतसारा पद्धत राबविणे, व्यापाराला प्रोत्साहन देणे, पडीक जमिनी लागवडीखाली आणणे, ठिकठिकाणी बाजारपेठा निर्माण करणे या बाबींना प्राधान्य दिले व त्याची अंमलबजावणी केली.
शिवाजी महाराज हे पहिले भारतीय राजे होते, ज्यांनी नौदल किंवा आरमार उभारले. त्यामुळे पोर्तुगीज, डच, फ्रेंच व इंग्रज या परकीय सत्तांवर दबाव निर्माण झाला व त्यांच्या बरोबरीने समुद्रात सार्वभौमत्व सिद्ध झाले.
महाराजांनी अगदी सुरुवातीपासूनच पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या बाबतीत दक्षता घेतली होती. स्वराज्यात वृक्षतोडीस सक्त मनाई होती. अगदी जुन्या व जीर्ण झालेल्या साग, आंबा व जांभळीच्या लाकडांचाच उपयोग जहाज बांधणीसाठी होत असे. वृक्षांच्या संरक्षणासाठी खास सेवक असत. तुकाराम महाराजांची ‘वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे’ ही उक्ती शिवाजी महाराजांनी तंतोतंत अमलात आणली होती.
स्वराज्याच्या संरक्षणाच्या दृष्टीने किल्ल्यात पाण्याचा साठा असणे महत्वाचे होते. त्यामुळे पाण्याचे संधारण आणि साठा साधारण वर्षभर पुरेल अशी उपाययोजना महाराजांनी केली होती. म्हणजे चुकून गडावर हल्ला झाला तरी आणीबाणीच्या परिस्थितीतसुद्धा गडावर आवश्यक तेवढा पाणीसाठा कसा राहील ह्याची काळजी घेतली गेली होती. आज आपण जे ‘रेन हार्वेस्टिंग’ म्हणतो त्याचे जनक शिवरायच होत.
शिवाजी महाराजांना कायमच सर्व धर्मांबाबत आदर होता. महाराजांचे अनेक सेवक मुस्लिम होते व ते महाराजांशी अत्यंत एकनिष्ठ होते. स्वराज्यात धर्मावर नाही तर शौर्य, बुद्धी, स्वामीनिष्ठा आदि गुणांवर बढती दिली जात असे. युद्धकाळात इस्लाम धर्माचा धर्मग्रंथ सापडला असताना महाराजांनी त्याचा आदरच केल्याचा उल्लेख आहे.
महाराज प्रत्येक स्त्रीला देवीसमान मानत. कोणत्याही युद्धात महाराज किंवा त्यांचे सैनिक यांचेकडून स्त्रियांना उपद्रव झाला नाही. चोरी व स्त्रीचा अवमान या गोष्टींना कडक शासन केले जात असे. तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सेवकांना बक्षीस म्हणून मौल्यवान वस्तू दिल्या जात.
वरील विवेचनावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या जाणतेपणामुळे आपणास दिलेली व्यवस्थापन तंत्रे खालील प्रमाणे सांगता येतील :
- विविध कर आदि प्रकारे देशाच्या खजिन्यात जमा झालेली संपत्ती जनतेची आहे याची जाणीव ठेऊन तिचा विनियोग जनतेच्या सोयी सुविधांसाठी करणे.
- देशाच्या विकासासंदर्भातील निर्णय दूरदृष्टीने घेणे.
- कार्याप्रती समर्पित असे मनुष्यबळ प्रशिक्षण व समुपदेशनाद्वारे तयार करणे व त्यांच्यात देशप्रेमाचे बीजारोपण करणे.
- आपल्या देशाच्या सार्वभौमत्वास सर्वोच्च प्राधान्य देणे व ते टिकविण्यासाठी वेळप्रसंगानुसार कोणताही मार्ग अवलंबणे.
- शत्रूस गाफिल ठेऊन त्याचेवर चढाई करणे.
- आपल्या शत्रूस आपल्या विरोधात कोणी सहाय्य केल्यास त्याचा बदला योग्य प्रसंगी घेणे.
- शत्रुवर आवाजवी भूतदया न दाखविणे.
- देशाच्या हिताचा विचार सर्वोच्च ठेवणे. त्यासाठी केलेले तह पायदळी तुडवायला मागेपुढे न पाहणे.
- शत्रू बलाढ्य असेल तर गनिमी काव्याचा अवलंब करून त्याला नेस्तनाबूद करणे
- देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी कर व इतर मार्गानी मिळालेला पैसा पायाभूत सुविधांमध्ये गुंतविणे जेणेकरून त्यापासून अधिकचे उत्पन्न मिळेल.
- शिवाजी महाराजांनी काळाचा विचार करून आरमार उभारले. तसेच आपण काळाचा विचार करून नवीन तंत्रज्ञान वापरून भविष्यातील युद्धप्रसंगांसाठी सज्ज असायला हवे. कदाचित भविष्यातील युद्ध अंतराळात लढले जाईल किंवा माहिती-तंत्रज्ञानाधारित असेल.
- पायाभूत सुविधा निर्माण करतांना पर्यावरणाचे भान ठेवणे.
- पाण्याचे योग्य नियोजन करणे.
- सर्व धर्मांचा आदर ठेवणे.
- स्त्रियांचा आदर करणे. तो न करणाऱ्यास कडक शासन करणे.
- चोरी व फितूरीस कडक शिक्षा ठोठावणे, व त्याची अंमलबजावणी त्वरित करणे.
महाराजांनी दिलेली वरील व्यवस्थापनाची तंत्रे आजच्या काळातही तितकीच लागू पडतात, त्यांचा वापर केल्यास आणि त्यामागील त्यांचे ‘ जाणतेपण ‘ शिकण्याचा प्रयत्न केल्यास– नव्हे त्याचा ध्यास घेतल्यास , भविष्यात आपला देश महासत्ता होईल यात शंका नाही.
© श्री राजीव गजानन पुजारी
विश्रामबाग, सांगली
ईमेल – [email protected] मो. 9527547629
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈