मराठी साहित्य – विविधा ☆ चांदोबाला अनावृत्त पत्र… अनामिक ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

? विविधा ?

☆ चांदोबाला अनावृत्त पत्र… अनामिक ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

प्रिय चांदोमामा,

         सस्नेह नमस्कार !

आज आबालवृद्ध भारतीयांना तुझी खूप खूप आठवण येत आहे. तुझ्या प्रत्यक्ष भेटीसाठी आम्ही नेहमीच आतुर राहिलो.आमच्यापासून तू आता फार दूर राहिलेला नाहीस. आमचा दूत चांद्रयान-3 तुझ्या कक्षेत आलाय.

चंदामामा, तुझा स्वतःभोवती आणि पृथ्वीभोवती फिरण्याचा वेग एकसमान असल्यामुळे तुझी दुसरी बाजू आम्हाला इथून कधीच दिसत नाही.पण आमच्या दूतानं त्याही बाजूची छायाचित्रं आम्हाला पाठवलीत. आजवर आम्ही तुझ्या छातीवर अंकित असलेला ससा पाहिला आणि त्यावरून तुला “शशांक’ असं नावही दिलं. आता तुझी दुसरी बाजूही आम्हाला दिसली आणि तीही तितकीच सुंदर आहे.

तुझं आणि आमचं नातं प्रभू श्री रामरायांपासून आहे.तुझ्याकडे पाहून लहानग्या रामचंद्रांनी तुझ्याशी खेळण्याचा हट्ट केला आणि कौसल्यामातेनं रामचंद्रांच्या हाती आरसा दिला. त्यात तुझं रूप पाहून प्रभू रामचंद्रांची कळी खुलली. तेव्हाच कदाचित राम आणि चंद्र हे शब्द एकत्र येऊन ‘रामचंद्र’ शब्दाचा उदय झाला असावा. तेव्हापासूनच प्रत्येक माता आपल्या बाळाला तुझं रूप दाखवते आणि बाळंही तुझ्याकडे पाहून हरखून जातात.

‘निंबोनीच्या झाडामागे । चंद्र झोपला गं बाई हे’। अंगाई गीत ऐकत येथे बाळ लहानाचं मोठं होतं. ‘चांदोबा, चांदोबा भागलास का? निंबोनीच्या झाडामागे लपलास का?’ हे पिढ्यानुपिढ्या लोकप्रिय बालगीत आजही कायम आहे.’चांदोबाची शाळा’ पाहण्याची उत्सुकता बालमनाला असते.’सुंदर चांदण्या,चंद्र हा सुंदर,चांदणे सुंदर पडे त्याचे’ ह्या प्रार्थनेतल्या ओळींनी शालेय शिक्षणाला सुरुवात होते.’चंदा है तू ,मेरा सुरज है तू’।,’उगवला चंद्र पुनवेचा’, ‘कैवल्याच्या चांदण्याला ,भुकेला चकोर’, ‘चंद्र व्हा हो पांडुरंगा। मन करा थोर।,’ चंद्र आहे साक्षीला’, ‘कोणता मानू चंद्रमा?’, ‘चौदाहवी का चाँद’, ‘हे सुरांनो,चंद्र व्हा।’ अशी कितीतरी गाणी येथल्या मनामनात रुजली आहेत.

प्रत्येक माता तुला मनोमन भाऊ मानते आणि त्यामुळे प्रत्येक बाळाचा तू ‘मामा’ बनतोस. तुझी आणि गणपतीबाप्पांची गोष्ट ऐकून आम्ही लहानाचे मोठे होतो. तरुणपणात तुला साक्षीदार मानून प्रेमाच्या आणाभाका घेतल्या जातात. प्रेमात यश मिळो वा अपयश, प्रेमाचं आजन्म स्मरण राहतं ते तुझ्यामुळेच. त्या आठवणी जपत लोक म्हातारे होतात. वयाला ऐंशी वर्षे पूर्ण होतात, तेव्हाही आम्ही ‘सहस्रचंद्रदर्शन’साजरं करतो.

तात्पर्य, जिथल्या प्रत्येक माणसाचा जन्मभर तुझ्याशी संपर्क असतो, अशा भारत देशाचे आम्ही नागरिक आहोत आणि आज तुझ्याशी प्रत्यक्ष संपर्क स्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहोत.

आज दि.23 ऑगस्ट 2023 संध्याकाळची 6 वाजून 4 मिनिटं ही वेळ आमच्यासाठी आणि आमचा नातलग असल्यामुळे तुझ्यासाठीही खूप महत्त्वाची आहे.चांद्रयान-3चं ‘विक्रम लॅंडर’ तुझ्या दक्षिण ध्रुवाला स्पर्श करण्यास व्याकूळ झालंय.

अपयशातून बोध घेऊन पुढे जाणाऱ्यांचा हा देश आहे. मागील वेळी अल्गोरिदमच्या अपयशामुळे तुला कवेत घेण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला होता. हा दोष यावेळी आम्ही दूर केलाय. यशापयशाचा खेळ आजन्म सुरूच असतो; पण आम्ही थकणारी माणसं नाही. तीनच दिवसांपूर्वी रशियाच्या “लुना-25′ यानाचा तुला स्पर्श करण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला आणि मिखैल मारोव नावाच्या शास्त्रज्ञाला रुग्णालयात दाखल करावं लागलं. तुझ्या भेटीची आस किती तीव्र असते, हे एवढ्यावरूनच तू समजून जा!

आम्हा भारतवासीयांचं आणि तुझं नातं तर विज्ञानाच्या पलीकडचं. आमच्या भावविश्‍वात तुझं स्थान अढळ. म्हणूनच ‘विक्रम’ची आणि तुझी भेट होणं हा आमच्यासाठी केवळ ‘विक्रम’नसून, ते भावनिक मिलन आहे, हे ध्यानात ठेव.

शास्त्रज्ञांच्या मते, शेवटची पंधरा मिनिटं खूप महत्त्वाची आहेत. शास्त्रीय भाषेत ज्याला ‘सॉफ्ट लॅंडिंग’ म्हणतात, तीच खरी कसोटी. चांदोमामा, ही आपल्या नात्याचीही कसोटी आहे, असं समजून आम्हाला यश दे. रक्षाबंधनाचा दिवस फार दूर नाही. तुझ्या कोट्यवधी भारतीय बहिणींची माया फळाला येऊ दे. तुझे कोट्यवधी भाचे श्‍वास रोखून बसलेत. आम्हा सर्वांसाठी ‘मामाचा गाव’ किती महत्त्वाचा आहे, हे तू जाणतोस. आता तो हाकेच्या अंतरावर आलाय. तुझ्या ‘विक्रम’ला प्रेमानं कुशीत घे.एवढंच आत्मीय मागणं.

विश्वास वाटतो की,तू आमची मनस्वी इच्छा पूर्ण करशील.मामाला भेटण्याची अशी संधी पुन्हा पुन्हा मिळू दे.

बाकी सारे क्षेम.भेटीत अधिक बोलूयाच.

             तुझे लाडके,

तमाम भारतीय बंधू-भगिनी व भाचे मंडळी

संग्रहिका: सौ.बिल्वा शुभम् अकोलकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “घनिष्ठ मैत्री…” ☆ श्री वैभव चौगुले ☆

? विविधा ?

☆ “घनिष्ठ मैत्री…” ☆ श्री वैभव चौगुले ☆

निस्वार्थ विश्वास जिथे असतो,  मानवी परिवर्तन जिथे होते, मर्यादितता, बंदिस्तता मधून जिथे मोकळा श्वास घेता येतो अशा ठिकाणी मैत्रीचे भक्कम कायमस्वरूपी वसलेले घर असते.

कृष्ण सुदामासारखी, कर्ण दुर्योधनासारखी मैत्री हल्ली कोठे अनुभवयाला मिळत नाही. मला मैत्रीची नक्की व्याख्या आपल्याला सांगता येणार नाही. पण माझ्या कल्पनेने, अनुभवानी,समोर घडलेल्या गोष्टी, ऐकलेल्या गोष्टी ज्या मैत्री या विषयाशी जोडल्या गेल्या आहेत त्यावरून मी मैत्रीवर थोडं लिहीत आहे.

घनिष्ठ मैत्री आयुष्याचा अविस्मरणीय ठेवा असतो हे खरे, पण केव्हा? जर मैत्री निभवली तर. ती ही मरेपर्यत!  ही मैत्री भविष्यकाळात येणा-या परिस्थितीवर बदलणा-या  मनावर, क्षणीक सुखाच्या मोहावर अंवलबून असेल तर ती कशी टिकेल?

घनिष्ठ मैत्री होण्यासाठी खूप वेळ जातो. ही मैत्री कुठे विकत मिळत नाही. या मैत्रीला कोणती कंपनी नाही. मैत्री सर्वांशी होत नाही आणि मुद्दाम कोणीशी मैत्री जाऊ न करावी म्हटली तरीही ती करता येत नाही.

आजारावर औषधं डॉक्टरांच्या सल्याने आपण घेत असतो. योगासनामध्ये हसण्याचे भाग घेतले जातात. कारण तो भाग योग अभ्यासामध्ये येतो. हसण्याने माणसाचे आयुष्यमान वाढते. असं मी नेहमीच ऐकतो. वरवरून नाईलाज म्हणून आपण खोटे हसू चेह-यावर आणत असतो.

एक सांगू ?  आनंदावर, मनातून येणा-या हसण्यावर जर का प्रभावी औषध असेल  तर ते औषध अंतरमनातून निखळ निर्माण झालेल्या मैत्रीतूनच मिळत असते. असे मला वाटते.

मैत्रीत एक हात धरून दुसरा हात दुस -या ठिकाणी बळकट करत, पहिला हात सोडून पुन्हा पहिला हात रिकामा ठेवून दुस-या हात शोधत मैत्रीला डाग लावत फिरणा-या मैत्रीचा प्रकार ही पहावयास मिळतो. मी या मैत्रीला न्यू आफ्टर ब्रेकअप फ्रेडशीप म्हणेन 😊 हे कधी होतं मनात काही गोष्टी लपवून ठेवणे, काही गोष्टीचा त्याग न करता सर्वच गोष्टाीना महत्व देत बसणे, अशा गोष्टी समोर येवू  लागल्या की मैत्रीमधला दुरावा निश्चित होत जातो. पण या सवयीमध्ये एक मन निर्णय घेण्यात यशस्वी होतं आणि दुसरं मन मानसिकतेचं शिकार होवून जातं. किती प्रकार आहेत मैत्रीचे माहित नाहीत. मी घनिष्ठ मैत्रीवर लिहीत आहे हे लक्षात घ्या.

प्रेमांनी ओंजळ भरणे, भावनांच मोल जपणे, मळभ भरणे, मनाला निरभ्र करणे, आयुष्य वाटून घेणे, दिलासा देणे, काळवंडल्या क्षणातून बाहेर पाडणे. ही घनिष्ठ मैत्रीतले घटक मी म्हणेन! न बंधन न कुंपण घालता दुस-याच्या जीवनात फुलपाखरासारखे बागडणे, विचाराचे आदान प्रदान निखळपणे, निस्वार्थीपणे करणे पण हे शक्य होतं का हा प्रश्नच?

माणसाला मेल्यानंतर दफन करायला किंवा जाळायला जितकी जागा लागते ना तितक्याच मैत्रीच्या जागेत स्वर्गसुखाचा आनंद मिळतो. पण या जगा मध्ये अनेक नको असलेल्या गोष्टीकडे माणसाचं चंचल मन वळत असतं! काय तर मनाचं मनोरंजन होत नाही. म्हणून जीवाला जीव देणारं मन भेटलं तर वाळल्या उचापती होतात का? हे कळत नाही.काय लागतं जीवन जगायला दोन प्रेमाचे शब्द,  अन्न, वस्त्र व निवारा या तीन गोष्टी सोबत एक गोष्ट वाढली आहे ती म्हणजे इटरनेट..🙂 इंटरनेट नसेल तर माणसाचे आयुष्य संपल्यासारखेच आहे. दोन चार दिवस माणसाला इन्टरनेट नाही मिळालं की डायरेक्ट सलाईनच लावावे लागेल. कारण जाळं, खूप पसरलेलं आहे. मनाचं पण आणि इंटरनेटचं पण. उभे आयुष्य कोणताही मोह न करता सुखाने जगता येतं, फक्त आयुष्यात एका मनाशी घनीष्ठ मैत्री होवून मरेपर्यत टिकली पाहिजे. हे तितकेच खरे वाटते . पण त्या जागेमध्ये आणि  मैत्रीमध्ये कोणत्याही आमीश दाखवणा-या चिटपाखरूचा चुकून सुध्दा वावर होवू न देणे.

कमळाच्या फुलातील परागकण खाण्यासाठी भुंगा ज्याप्रमाणे त्याच्या आजुबाजूच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करतो त्याच प्रमाणे घनिष्ठ मैत्री जपण्यासाठी आजुबाजूच्या परिस्थितीकडे दुलर्क्ष केले किंवा मनावर न घेता त्या गोष्टी व्यवहाराने हातळल्या की घनिष्ठ मैत्रीमध्ये दुरावा निर्माण होणार नाही. पण हे करताना आपल्या दुस-या मनाला सांगून विचारात घेऊन निर्णय घेणे तितकेच आवश्यक आहे.

भावनेशी संबंध असलेलं हे एकच नातं जे रक्तांच्या अनेक नात्यापेक्षा पवित्र आणि परिपूर्ण असलेलं घनीष्ठ मैत्रीचं नातं आहे. असे म्हणावे लागेल. मैत्री टिकवून ठेवणं हे सर्वानाच जमते असे नाही. हव्यासा पोटी मोहाला बळी पडून चांगली मैत्री संपुष्टातसुध्दा आलेली पाहिली आहे.

When I am free you should also free..असं जर समजलं तर मैत्रीमध्ये दुरावा होत जातो. येथे समजून घेण्याची ताकत कमी पडते आणि मनाची चिडचिड होते, मानसिकता खचते. संयम सुटतो व नको ते होवून जाते. मैत्री ही मोहक वा-याची झुळूक असते. मैत्री करताना त्यांच्या गुणदोषासंगे स्वीकार करण्याची तयारी दर्शिवलेली असते. पण ज्यावेळी दोन मनांचे रस्ते एक होतात त्यावेळी आपला स्वभाव व चंचलपणा बदलावा लागतो, एकमेकांचा आदर करावा लागतो, कित्येक गोष्टीचा त्याग करावा लागतो. चालायला लागले की मग मागे हटण्याचा विचार मनात यायलाच नाही पाहिजे. जिथे अपेक्षा संपतात, जिथे शोध संपतो, जिथे अपेक्षाच राहत नाहीत तिथे अपेक्षा येतात कोठून आणि मग अपेक्षा भंग होण्याचे कारण तरी काय असू शकते. द्या ना जितका वेळ द्यायचा तितका  तुमच्या मैत्रीला. सर्व सोडून मैत्रीमध्ये सर्वस्व अर्पण केलेलं असतं. मात्र तिथे कानाडोळा, लपवाछपवी केली तर ख-या मैत्रीचा स्वप्नचुरा होण्यास कितीसा वेळ लागणार आहे.

मैत्री ही अशी भावना आहे जी दोन मनांना अंतःकरणापासून जोडते. खरा मित्र त्याला योग्य सल्ला आणि योग्य दिशाच दाखवत असतो. मैत्री ही फक्त आनंदातील क्षणांची सोबत नसून दु:खात ढाल होवून समोर येण्याची ताकत असते.

घनिष्ठ मैत्रीचा विश्वास हाच पाया असतो. मैत्रीही दु:खात हसवते, संकटावर मात करायला शिकवते, जगायला शिकवते. संयमी राहायला शिकवते, चांगले कठोर निर्णय घ्यायला शिकवते. मैत्री ही आधार होऊन राहते. आणि शेवटी इतकच म्हणेन मैत्री ही हृदयाचे निखळ सौंदर्य दाखवणारा आरसा असते…

© श्री वैभव चौगुले

सांगली

मो 9923102664

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “शब्द… आणि… हुंकार…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “शब्द… आणि… हुंकार…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

शब्दांचा आधार घेतल्याशिवाय आपण मनातल काहीच व्यक्त करु शकत नाही. मनातल्या भावना पोहोचवण्याच प्रभावी माध्यम म्हणजे शब्द आणि हुंकार. आपल्या चेहऱ्यावर काही भाव दिसतात. पण भावनांना प्रकट करतात ते शब्द. म्हणूनच शब्दातून प्रेम, राग, तिरस्कार, अभिमान, कौतुक सगळ व्यक्त होत. *शब्दात धार आहे. शब्दात मार आहे. शब्दात प्रेमाचा सार देखील आहे. शब्द कठोर आहेत तसेच मवाळ, व मधाळ सुध्दा आहेत.

शब्दात प्रार्थना, याचना, मागणं आहे,  स्तुती, गौरव, क्षमा आहे. त्यात विश्वास, आधार आहे. आपलेपणा, परकेपणा आहे. उदारता आहे, स्वार्थीपणा सुद्धा आहे.*

एकदा शब्द दिला म्हणजे दिला असे म्हटले की यात ठाम विश्वास असतो. तर….. तर त्याच्या शब्दांवर भरवसा नाही.‌…. असं म्हटलं की अविश्वास. आपल वागण हिच आपल्या शब्दांची किंमत असते.

खूप आनंद झाला की बोलायला शब्द सुचत नाही. तर कठीण प्रसंगी शब्द फुटत नाहीत. काही वेळा म्हणतो, शब्दात कस सांगू तेच कळत नाही. किंवा सांगायला शब्द अपुरे आहेत.

शाहण्याला शब्दांचा मार असेही म्हणतात. माणूस नि:शब्द झाला की सुचेनासे होते, किंवा सुचेनासे झाले की माणूस नि:शब्द होतो.

एकाच गोष्टीसाठी अनेक शब्द असले तरी त्या शब्दांना आपला एक अर्थ आणि त्यात एक भाव असतो. थोड सविस्तर सांगायच तर प्रवीण दवणे यांनी एका गीतामध्ये आभाळ आणि आकाश असे दोन्ही शब्द आले त्या बद्दल विचारलेला किस्सा (बहुतेक शांताबाई शेळके यांनी लिहिलेले गीत आहे.) त्यावर मिळालेल उत्तर  निरभ्र असते ते आकाश. भरुन येत ते आभाळ. यावर पुढे असं सुद्धा म्हणता येईल की बरसात ते मेघ. असे समर्पक अर्थ शब्दात आहेत.

हुंकाराच ही तसच काहीसं आहे.  बऱ्याचदा विचारलेल्या गोष्टींना आपण हुंकाराने उत्तर देतो किंवा आपल्या प्रश्नांना हुंकाराने उत्तर मिळत. अं…. हं….. अंह….. उं….. असे काही हुंकार परिस्थिती नुसार आपण काढतो, किंवा ते नकळत निघतात.

या हुंकारात सुध्दा ते आनंदाचे, नाराजीचे, सकारात्मक, नकारात्मक, आळसावलेले असे असतात.  हुंकार कसा आहे हे त्याचा निघालेला आवाज आणि त्याची लय यावरून समजतो.

भावना पोहचवण्याच काम शब्द करतात. आणि आपण प्रेमाचे दोन शब्द ऐकायला आतुर असतो. शब्द तेच किंवा तसेच असतात. आपल्या भावना त्यात जाणीव निर्माण करतात.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गझलेतला हवासा हसरा श्रावण… ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

प्रा. सुनंदा पाटील

? विविधा ?

☆ गझलेतला हवासा हसरा श्रावण ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

श्रावण ! प्रत्येक कवीचा आवडता विषय ! अगदी बालकवींच्या ” श्रावणमास “ या कवितेपासून तर आजच्या अगदी नवोदित कवी पर्यंत पिढी दरपिढी अनेक कवितांमधून श्रावण रसिकांच्या भेटीला येतोच आहे. मग गझलकार तरी याला अपवाद कसा असणार ? कारण आधी गझलकार हाही कवीच आहे ! फक्त त्याने गझलेच्या तंत्राकडे म्हणजेच शरीरशास्त्राकडे अतिशय गंभीरपणे बघायला हवे ! केवळ मंत्राच्या मागे लागून जर गझलेच्या आकृतीबंधाकडे दुर्लक्ष झाले तर ती कविताही राहत नाही आणि गझलही होत नाही , हे मी अत्यंत जबाबदारीने विधान करीत आहे. गझलेतील लय , यती आणि एकूणच आकृतीबंध सांभाळून वाचकाला आवडणारी रचना / गझल देणे हे साधे सोपे नसते ! यासाठी प्रचंड मोठा शब्दसाठा , किमान व्याकरणाची माहिती , शुद्धलेखन याची गरज असतेच . पण त्याच बरोबर भौगोलिक / प्रादेशिक जाणीवा असणे हे सुद्धा गरजेचे असते ! अन्यथा आषाढात रिमझिम पाऊस आणि श्रावणात कोसळधारा कवितेतून बरसतात ! काही गझलांमधे उन्हाळ्यात प्राजक्त फुलतो तर पावसात पानझड होते . हे हास्यास्पद प्रकार होऊ नयेत याचीही काळजी गझलकाराने घ्यायला हवी !

सध्या आणखी एक प्रकार बघायला मिळतो की , हवी तेवढी सूट घेऊ नवोदित गझलकार गझल लिहितात ! अगदी एक शेर झाला की त्यात भरीचे ४ शेर घालून गझल पूर्ण करून समाज माध्यमावर पोस्ट करतात ! बरं त्यावर कुणी प्रश्न विचारलाच तर ” अमुक तमुक प्रस्थापित गझलकाराने ही सूट घेतली होती म्हणून मीही घेतली !” हे सांगतात . यावर काय बोलणार ? आम्हीच आमची जबाबदारी ढिसाळपणे वापरत असू तर नवीन लोकांना कां दोष द्यायचा ?

गझल तंत्राधिष्ठीत पण काव्यात्म लेखन प्रकार आहे ! गझल असते किंवा नसतेच ! त्यात ” गझले सारखे किंवा गझलवजा ” म्हणण्याचा प्रघात आताशा रूढ होत आहे. याच्याशी अनेक कारणे निगडीत आहेत , त्यातील ” गझलगुरू ” हाही प्रकार महत्वाचा आहे. ते गझलतंत्र तर सोडाच , पण चक्क गझल शिकवतात . (?) त्यामुळे आज गझलेची संख्यात्मक वाढ होत आहे , पण गुणात्मकतेची काळजी वाटते ! अष्टाक्षरी , ओवी , अभंग , गवळण , भावगीत , भक्तीगीत , भारूड , पोवाडा , पाळणे , आरत्या , श्लोक , आर्या , दिंडी असे अनेक प्रकार मान्य करणाऱ्यांना गझलचे तंत्रच तेवढे का खटकते / का खुपते हा अभ्यासाचा विषय आहे ! त्यावर कृत्रिमतेचाही आरोप होतो . असो !

हीच बाब विषयांशीही निगडीत आहे . आज जुने , नवे जेवढे हात गझल लिहू लागले आहेत , त्या गझलेतला श्रावण शोधावाच लागतो . समाज , सुधारणा , भूक , दारिद्रय यांच्याच परीघात रमलेली गझल प्रेम , माया , निसर्ग यापासून दूर जाते आहे की काय ही भिती वाटते . पण तेव्हाच काही दादलेवा शेर वाचले की कळतं ” पेला अर्धा भरला आहे “.

मिठीत होती अधीरता अन् दिठीत होता साजण

सायंकाळी . ढगात आला श्रावण

हा श्रावणाचा माझाच एक शेर आहे ! अस्ताचलास जाणारा सूर्य , त्याची ढगावर पडलेली किरणे आणि उमटलेलं इंद्रधनुष्य , ही श्रावणाची ओळख चट्कन पटते ती सायंकाळी .

तुझ्या फुलांचा सडा पहाया रोज अंगणी

श्रावण येतो मज भेटाया रोज अंगणी

कोल्हापूर येथील श्री .नरहर कुलकर्णी यांचा हा राजस शेर मनाला भावतो !

हासरा नाचरा श्रावण कुसुमाग्रज दाखवतात ! तर ” ऋतू हिरवा ऋतू बरवा या ओळीनी श्रावण वेगळाच भासतो !

समीक्षक प्रकाश क्षीरसागर त्यांच्या एका शेरात म्हणतात ,

गझलेस भावलेला श्रावण किती निराळा

सृष्टीस भाळलेला श्रावण किती निराळा

श्रावण सुरू झाला की कवीच्या प्रतिभेला धुमारे फुटू लागतात , असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही . नयनरम्य श्रावण , रंगाने , गंधाने आपल्याला मोहून टाकतो . अशाच अर्थाचा प्रसाद कुलकर्णी यांचा एक शेर बघा !

तनही बरवा मनही बरवा श्रावण हिरवा

धुंद करी ही बेधुंद हवा श्रावण हिरवा

श्रावणावर अनेक कविता आहेत पण गझल मात्र मोजक्याच आहेत . त्यातही तुरळक शेर सापडतात . नवोदित आणि जेष्ठ गझलकारांना असे सुचवावेसे वाटते की सृष्टीतला कण न् कण आपल्या काव्याचा विषय होऊ शकतो . फक्त ती दृष्टी हवी ! त्यामुळे त्याच त्या विषयांच्या रिंगणात फिरण्यापेक्षा नवनवे विषय घेऊन आपली गझल पूर्ण करावी ! आज नवोदित गझलकारांमध्ये काही आश्वासक हात नक्कीच आहेत . त्यामुळे तंत्र सांभाळून गझलेचा मंत्र सांभाळला जात आहेच . एवढेच नाही तर नाण्याला जशा दोन बाजू असतात , आणि दोन्ही खणखणीत असाव्या लागतात , तीच गोष्ट गझलेची आहे . तंत्र मंत्र योग्यच असायला हवे एवढेच नाही तर नाण्याला एक तिसरी बाजू म्हणजे एक कडापण असते . अत्यंत गरजेची ! तशीच मराठी गझलेची कडा म्हणजे , मराठी व्याकरण आणि शुद्धलेखन सांभाळून , निर्दोष तंत्रात आलेली  गझलेतली गझलियत .

या तीनही बाजुंचा सारासार विचार करून गझलेकडे वळणारे बघितले की ,

” विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही “

ही भट साहेबांची ओळ सार्थ झाली असे वाटेल .

विस्तारभयास्तव इथेच थांबते माझ्या एका गझलेसह !

 घरात आला श्रावण ☆

संध्याकाळी मी जपलेला घरात आला श्रावण

मृद्गंधाची हाक ऐकुनी नभात आला श्रावण

 

या हळदीच्या देहावरती सोनरुपेरी आभा

केस मोकळे पाठीवरती मनात आला श्रावण

 

सायंकाळी शुभशकुनाच्या आज पाहिल्या रेषा

इंद्रधनूला झुला बांधुनी ढगात आला श्रावण

 

उत्साहाची घरात माझ्या अवघी पखरण झाली

ओलेती तू समोर येता क्षणात आला श्रावण

 

मल्हाराचे गूज उकलले वर्षत अमृत धारा

कूजन सरले तरी कुणाच्या स्वरात आला श्रावण

 

लयतालाने येत समेवर मैफल जिंकत गेले

गुणगुणताना गझल मनीची सुरात आला श्रावण

 

ओठावरती पुन्हा उमटली मेघसावळी नक्षी

पहाट होता प्रणयाची मग भरात आला श्रावण

© प्रा.सुनंदा पाटील

गझलनंदा

८४२२०८९६६६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ निसर्ग आणि आम्ही… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

सौ.वनिता संभाजी जांगळे

🌸 विविधा 🌸

☆ निसर्ग आणि आम्ही… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

पावसाळा सुरू झाला की ओसाड झालेली वसूंधरा पुन्हा हिरव्या रूपात सुवासिन होऊन सजू लागते.  पण सृष्टीचे सजलेले रूप पाहण्यास वेळ कुणाकडे आहे. आपण आधुनिकतेच्या पिंजऱ्यात अडकून वेळांचे साखळदंड पायात गुंतविले आहेत. आपण काळाच्या अधिन होत आपल्या जीवनाची सगळी सुत्रे मोबाईल, संगणक यांच्या हाती दिलेली आहेत. त्यामुळे ॠतंप्रमाणे बदलत जाणारे सृष्टीचे रूप पाहणे आणि तो वेगळा आनंद घेणे आपण विसरतोच. मोबाईल वरती येणारे निसर्गचित्रण पाहून आपण हा कृत्रिम आनंद घेतो पण निसर्गाच्या जवळ जावून त्याच्या विवीधतेतून सजलेले रूप पाहण्यास आपणास वेळच नाही.

वार्‍याच्या झोकात हिरवी वनराई आनंदाने डुलते. पावसाच्या सरी येऊन हिरव्या रानासोबत जणू झिम्मड घालून जातात. श्रावण आला की , कधी उन तर कधी पावसाचा खेळ रंगतो. कानावर  पक्षांचा किलबिल आवाज येतो. एखांदा पक्षी झाडाच्या शेंड्यावर झुलताना दिसतो , तर एखांदा उंच आकाशात झेपावताना. कुठे दुरवर डोंगर-दरीतून एखांदा ढग उतरतो. आणि पुन्हा उन-पावसाचा लहरी खेळ चालू होतो. ओहळ, ओढ्यात येणारा पाण्याचा खळखळ आवाज मधूर वाद्याप्रमाणेच

कानास मंत्रमुग्ध करून जातो. उंचावरून कोसळणारा शुभ्र धबधबा डोळ्याचे पारणे फेडतो. दुरवर पसरलेली हिरवी राने मनास आनंदी करतात. माळावर फुलणारी रंगबेरंगी फुले नाजूक स्पृर्शानी प्रसन्न करतात.

किती तो आनंद ! मनात मावेना इतका. हिरवा रंग !  नजर भरभरून ओसंडणारा. मधूर सुर ते ! पक्षांचे ,धो धो वाहत्या पाण्याचे ,वाऱ्याच्या सनईचे  ,सळसळ करणार्‍या पानांचे खरच इतका भरभरून आनंद फक्त निसर्ग देऊ शकतो. आणि तोही फुकटात . संत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे ,

“आनंदाचे डोही आनंद तरंग “

असाच हा डोळ्यांना भरभरून आनंद देणारा निसर्ग आपल्या भोवताली असतो .त्याच्यापासून परके होतो ते आपण  , स्वतःहून जखडलेल्या कृत्रिम यांत्रिक बेड्यात.

मनास खंत आहे की निसर्गाने भरभरून दिलेला आनंद आपणास घेता येत नाही. म्हणतात ना ‘ देव आला द्यायला पदर नाही घ्यायला ‘ असेच आपले आहे. आपण आपल्या दैनंदिन जीवनात इतके व्यस्त आहोत की , बहरलेला ,विविधतेने नटलेलेला निसर्ग पाहण्यास आपणास वेळच नाही. मग निसर्गाचे रंग, रूप  जाणून घेणे त्याचे संवर्धन या गोष्टी तर फारच दूर

खरोखर निसर्गाने आपणास दिलेल्या केलेल्या कित्येक गोष्टी आहेत. त्या आपणाला जगण्यातला खरा आनंद देतात. आपण सकाळी उठल्यावर पूर्वक्षितिजावर फुटणारे तांबट आणि रात्रीच्या भयान, निरव शांततेला भेदित करणारे घरट्यातून येणारे किलबिल आवाज अशी अतिशय रम्य पहाट आपल्या दैनंदिन स्वागतास रोजच येते. तिमीरातून तेजाकडे उजळत जाणारे दिवसाचे आगमन मनाला भरभरून उत्साह देते. मनास नव्या साहसाची  ,नव्या आकांक्षांची जाणिव होते. येणाऱ्या नव्या दिवसाची सुरुवात आपण मन प्रफुल्लित आणि चित्त प्रसन्न ठेवून सुर्य नमस्कार घालून स्वतःस येणाऱ्या दिवसाच्या स्वाधीन केले तर  ‘दुधात साखरेची भर पडेल. ‘ सायंकाळी पश्चिमेकडे क्षितिजावर उमलणारे तांबट पिवळे रंग मनाला मोहून टाकतात. दिवसभर थकल्या भागल्या मनाला प्रसन्न करतात. हळदउनात पिवळी झालेली सृष्टी नजर दिपवून टाकते.

येणारा प्रत्येक ॠतू हा आपल्यासाठी आनंदाची ओंजळ भरून आणतो. आपल्या जीवनाची नाळ ही प्रत्येक ॠतूशी जोडलेली असते. कवी मंगेश पाडगावकर आपल्या कवितेत म्हणतात

“सहा ऋतूंचे सहा सोहळे , येथे भान हरावे

या जन्मावर , या जगण्यावर शतदा प्रेम करावे “

पानगळ करणारा शिशीर ॠतू सुध्दा जाता जाता आपणास संदेश देतो, ” जीवन संपले नाही उद्या येणारा वसंत ऋतू तुमच्यासाठी पुन्हा नविन कोवळा आनंद घेऊन येणार आहे. मी फक्त जुने आणि जिर्ण झालेले सोबत नेत आहे “

निसर्गाच्या कणाकणात आनंद भरलेला असतो. उत्साह भरभरून वहात असतो. हिरवी झाडे-वेली त्यावर उमलणारी रंगबेरंगी फुले ,डोंगर, दऱ्या,उसळणारा अथांग सागर, खळखळणारे झरे, शांत वाहणारी नदी ,प्राणी, पक्षी, या सगळ्याशी आपण एकरूप झालो तर कळेल, जीवनाचा खरा आनंद निसर्गातच आहे. आपल्या दैनंदिन जीवनातील थोडा का होईना वेळ या दानशूर निसर्गाकरिता द्यावाच .निसर्गाचे संवर्धन ही सुध्दा आजच्या काळाची गरज आहे. पण आपण जेंव्हा त्याच्या कुशीत जगायला शिकू,तेंव्हाच त्याची काळजी सुध्दा नक्कीच घेऊ. ‘ सर्व काही विसरून निसर्गाच्या विविधतेत आयुष्य खुप छान जगता येते.’

© सौ.वनिता संभाजी जांगळे

जांभुळवाडी-पेठ, ता. वाळवा , जि. सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पाऊस अंगणातला… पाऊस मनातला ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे ☆

सौ. अर्चना सुरेश देशपांडे

?  विविधा ?

☆ पाऊस अंगणातला… पाऊस मनातला ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे☆

3     विविधा :

पाऊस  अंगणातला, पाऊस  मनातला

अर्चना देशपांडे

पाऊस अंगणातला….. पाऊस मनातला

व्हाट्सअप वर एक छान संवाद वाचण्यात आला पावसाबरोबरचा. एक माणूस पावसाला विचारतो “पावसा पावसा तुझे वय काय?”पावसाने छान उत्तर दिलं” जर तू पावसात नाचत असशील तर माझे वय दहा वर्षे, जर कविता करत असशील तर माझे वय 18 वर्षे जर तुला ट्रेकिंगला जावेसे वाटत असेल तर 24 वर्षे जर तुला बायकोला मोगऱ्याचा गजरा घ्यावासा वाटेल असेल तर मी तीस वर्षाचा” स्मित हास्य करत पाऊस म्हणाला. तू जसा अनुभवशील तेच माझे वय असेल.

पाऊस म्हटले की पावसाची विविध रूपे डोळ्यापुढे येतात , मृग नक्षत्रातला पहिला पाऊस आपल्याला आनंद देतो. पहिल्या पावसाने येणारा मृदगंध चित्तवृत्ती उल्हसित करतो. आषाढात संत धार तर श्रावणात पावसाची एक सर तर पुढल्या क्षणी ऊन, यावेळी पडलेले इंद्रधनुष्य पाहून डोळ्याचे पारणे फिटते ,काही वेळा अतिवृष्टी होऊन माळीन सारख्या गावाचे होत्याचे नव्हते तेव्हा मात्र जीव हळहळतो.

प्रत्येकाला वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या कारणासाठी पाऊस आवडत असतो.

काहींना तो रोमँटिक वाटतो तर शेतकऱ्याला तो अमृतधारा वाटतो.

तसे पाहता प्रत्येकाला पाऊस आवडतो .बालपणात तर मुलांना पावसात भिजायला आवडते, साठलेल्या पाण्यात उड्या मारून इतरांच्या अंगावर पाणी उडवण्यात मजा वाटते मग आपले बूट पायमोजे ओले झाले तरी त्याचे भान नसते .कागदाच्या होड्या करून डबकातल्या पाण्यात सोडण्यात त्यांना आनंद मिळतो.

वय वाढत जाईल तसं पावसाचा आनंद वेगवेगळ्या वळणावर भेटत राहतो .धो धो पावसात मित्राबरोबर भिजत आईस्क्रीम खाण्यात मस्त वाटतं, पावसात भिजून आल्यावर उबदार कपडे घालून गरम गरम भजी खाताना तर आनंद द्विगुणीत होतो .वर्षा सहलीत भिजताना तर वेगळीच अनुभूती मिळते. आपल्या थेंबाने चातकाची भूक भागवणारा ,मयूराला नाच करायचा उद्युक्त करणारा पाऊस सर्वांना हवाहवासा वाटतो .अंगणात पाणी साचलं की छान वाटतं .अंगणातल्या झाडं वेली नाहू-माखू.  घातलेल्या लेकरासारख्या टवटवीत दिसतात. पक्षी कुडकुडत वळसणीची जागा शोधतात. पावसाने तुडुंब भरून वाहणारे नदी नाले पाहून डोळ्यांचे पारणे फिटते. पावसाची जातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या शेतकऱ्याच्या झोपडीत पाणी गळत असले तरी पीक हाती येणार या विचाराने तो सुखावतो तर असा हा पाऊस सृष्टीला हिरवा शालू नेसवणारा ,धरणी मातेला सृजनाचं समाधान देणारा ,प्रत्येकाची तृष्णा भागावणारा असतो.

पण मनातल्या पावसाचे काय? मनातला पाऊस सतत चालूच असतो. तो कधी ढग होऊन बरसतो तर कधी मनातल्या मनात विरून जातो. पण जेव्हा इशाळ वाडीतील पावसाची कहाणी ऐकली तेव्हा मनातला पाऊस मूकपणे नयनातील…पाऊस ठरला. डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रुधाऱा अशाच असतात, पावसाच्या    ‌ व यासारख्या. कधी लहानपणी हट्टाचे ,रडू,तर कधी टोचणाऱ्या शब्दांनी दुखावलेली कळ तर कधी कौतुकाने आलेले आनंदाश्रू तर कधी विरहाच्या दुःखाने घशात दाटलेला आवंढा. मनातला पाऊस माणसापासून सुरू होणारा आणि माणसापाशी संपणारा असतो.तो मायेच्या माणसाकडे व्यक्त होतो. कधी पावसाच्या पाण्याला पूर येतो तर कधी मनात आठवणींचा पूर येतो.मनात मायेचा ओलावा नाही आणि डोळ्यात अश्रू नाही असा माणूस शोधूनही सापडणार नाही.

©  सौ. अर्चना सुरेश देशपांडे

पुणे

मो. ९९६०२१९८३६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ राष्ट्र मजबुतीचा संकल्प… भाग-3 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

डॉ गोपालकृष्ण गावडे

🌳 विविधा 🌳

☆ राष्ट्र मजबुतीचा संकल्प… भाग-3 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

(देण्यातही खुप आनंद असतो याची मला प्रथमच प्रचीती आली.) — इथून पुढे —  

माझे कर्तव्य पुर्ण झाले होते. आता याविषयी कुणाला काही बोलायची आवश्यकता नव्हती. मला हवा असणारा आनंद मला मिळाला होता. पण एका जवळच्या डॉक्टरांकडे आॕपरेशनसाठी गेल्यानंतर उरी चित्रपटाविषयी बोलता बोलता सर्व बोलून गेलो. त्या डॉक्टरांनी सुद्धा लगेच माझ्यासारखाच संकल्प केला. माझ्या संकल्पाने आणखी काही लोक प्रेरित होऊ शकतात याची जाणीव मला त्या दिवशी झाली. मग लाज बाजूला ठेवून ज्यांच्याकडे आॕपरेशनला जातो त्या प्रत्येक डॉक्टरला मी माझा संकल्प सांगितला. बहुतेक डॉक्टरांनी स्वतः हून National Defence Fund मध्ये दर वर्षी काही रक्कम भरण्याचा संकल्प केला. 

आपला शत्रू ताकदवान आहे. माझा सैनिक मात्र जुन्या पुराण्या साधनांनी अशा शत्रूचा सामना करत आहे. उरी वा पुलवामा सारख्या भ्याड हल्ल्यांमुळे ते माझ्या सैन्याचे मनोबल तोडू शकणार नाहीत याची मला खात्री आहे. पण सैन्याच्या मागे जनता खंबीरपणे उभी आहे हे सैन्याला कळणे गरजेचे आहे. सर्व भारतीय आपल्या कामाचा प्रचंड आदर करतात हे प्रत्येक सैनिकाला कळणे गरजेचे आहे. सैनिक देशासाठी मोठा त्याग करतात. थोडाफार त्याग त्याचे देशबांधव त्याच्यासाठी करायला तयार आहेत हे प्रत्येक सैनिकापर्यंत पोहचले पाहिजे. त्यातून आपण करत असलेला त्याग वाया जात नाही अशी भावना सैनिकांमध्ये नक्कीच वाढीला लागेल. त्यांचे मनोबल नक्कीच वाढेल. पण त्यासाठी मोठ्या संख्येने लोकांनी पुढे येऊन NDF मध्ये दान करणे गरजेचे आहे. हा मेसेज सैनिकांपर्यंत पोहचवणेही गरजेचे आहे.

मग मी एक निर्णय घेतला. सोशल मेडियावर याच आशयाची एक पोस्ट तयार करून टाकली. शेवटी ‘NDF ला पैसे पाठवताना काही अडचणी आल्या तर मला फोन करा’ असा मेसेज टाकून खाली माझा नंबर दिला. पुढील एक दोन महिने मला महाराष्ट्रातील काना कोपऱ्यातून फोन येत होते. मी जवळपास हजार लोकांचे फोन घेतले. 

आता फक्त रक्षाबंधनला सैनिकांना राख्या पाठवून वा स्वातंत्र्यदिनी सोशल मेडियावर देशभक्तीपर मेसेज पाठवून जनतेचे कर्तव्य संपणार नाही. सैनिकांना उच्च दर्जाचे बुलेटप्रुफ जॕकेट, हेल्मेट, रायफल्स आणि नाईट व्हिजन सारखे अत्याधुनिक साधने देण्याची गरज आहे. सरकार त्याच्या परीने काम करतच आहे. पण आपल्यालाही आपली जबाबदारी टाळता येणार नाही.  

प्रत्येकाने दर महिन्यात सरासरी फक्त 100 रूपये बाजूला टाकले तर National Defence Fund मध्ये दर वर्षी कमीत कमी सव्वा लाख कोटी रुपये जमा होतील. आपल्या सैन्यदलांचे वार्षिक बजेट साडे चार लाख कोटी आहे. त्यातील बहुतेक पैसा सैनिक आणि अधिकाऱ्यांच्या पगारात जातो. लोकवर्गर्णीतून जमा पैशातून आपले सैनिक जगातील सर्वोत्तम युद्ध तंत्रज्ञान वापरू शकतील. आपल्या जवानांचे मनोबल वाढेल. शत्रूची आपल्या बलवान सैनिकांशी लढण्याची खुमखुमी आपोआप नष्ट होईल. शांततेतून स्थिरता, स्थिरतेतून व्यापार-उद्योग-गुंतवणूक वाढून आर्थिक सुबत्ता, आर्थिक सुबत्तेतून बलवान सेनादले आणि बलवान सेनादलातून पुन्हा शांतता स्थापित होईल. 

सर्वात महत्वाचे म्हणजे ही प्रक्रिया थांबता कामा नये. ‘एकदा पैसे दिले म्हणजे संपले’ असे करता येणार नाही. भविष्यामध्ये स्थैर्य असावे म्हणून आपण जसे आयुष्यभर PF वा विम्यामध्ये गुंतवणूक करत असते तसेच देशात स्थैर्य रहाण्यासाठी सैन्यदलामध्ये गुंतवणूक करावी लागेल. कारण या स्थैर्यातूनच सुबत्ता येणार आहे आणि या सुबत्तेतून प्रत्येकाला त्याचा वाटा गुंतवणुकीच्या अनेक पटींमध्ये परत मिळणार आहे. हा फायद्याचा व्यवहार आहे. 

कुणीतरी म्हणाले होते की “डोळ्यासाठी डोळा” या न्यायाने सर्व जग लवकरच आंधळे होईल. पण आपल्या डोळ्याकडे वाईट नजर ठेवायची कुणाची हिंमत होणार नाही इतके स्वतःला मजबुत केले तरच युद्ध टळतात हा आजवरचा इतिहास आहे. तुमची कमजोरी शत्रूची लढण्याची हिंमत आणि खुमखुमी वाढवते. पण राष्ट्र सैनिकदृष्ट्या प्रबळ असेल तर शत्रू उघड लढण्याचे धाडस सुद्धा करत नाही. अमेरिका आणि रशियातील शीतयुद्ध हे याचे ज्वलंत उदाहरण आहे. 

“जे इतिहासाला विसरतात ते नष्ट होतात” हे त्रिकालबाधीत सत्य आहे. ते कुणी विसरता कामा नये. सोन्याचा धुर निघणारा देश सुदृढ सैन्यशक्ती अभावी गुलामगीरीत गेला तर भुके-कंगाल व्हायला वेळ लागत नाही. हजार वर्षांच्या गुलामगिरीत भारताला मोठे आर्थिक, सामाजिक, धार्मिक शोषण भोगवे लागले आहे. सामरीक दृष्ट्या कमजोर झालेल्या देशाच्या गुलामगीरीला वा शोषणाला त्या देशातील निद्रिस्त जनताच जबाबदार असते. कमजोर लोकांच्या प्राक्तनात गुलामगिरी तसेच आर्थिक आणि धार्मिक शोषणच लिहलेलेच असते. ते स्वतःच त्याला जबाबदार असतात.

चला तर मग, देशाची संरक्षण व्यवस्था मजबूत करण्याचा आज संकल्प करू या. दर महिन्याला थोडी रक्कम देशाच्या म्हणजे स्वतःच्या संरक्षणासाठी वेगळी काढून ठेवा. कुटुंबाच्या संरक्षणासाठी जसा विम्याचा हप्ता वेगळा ठेवता तसाच देशाच्या संरक्षणासाठी छोटा हप्ता दर महिन्याला बाजूला काढून ठेवा. वर्षाच्या शेवटी ही सर्व रक्कम National Defence Fund मध्ये जमा करा. 

आपल्या गरजा आणि आणखीची हाव कधीच संपणार नाहीत. सर्व दुःखाच कारण हाव आहे असे कुठतरी वाचले होते. फक्त दानाने हाव कमी होऊ शकते असेही कुण्या महानुभवाने लिहून ठेवले आहे. 

दान आणि त्यातही देशसेवेसाठी केलेले दान! यापेक्षा जास्त आनंद आणखी कशात मिळेल? आपण सर्व गोष्टी आनंदासाठी करतो. देशावर उपकार करण्यासाठी नाही तर  स्वतःच्या आनंदासाठी प्रत्येकाने राष्ट्र मजबुतीचा संकल्प केलाच पाहिजे. गेली पाच वर्षे मी हा प्रचंड मोठा आनंद उपभोगतो आहे. 

स्वातंत्र्यदिनी फक्त सोशल मीडियावर देशप्रेम दाखवण्याऐवजी लष्करासाठी काहीतरी भरीव करु या. 

Ref : https://www.pmindia.gov.in/en/national-defence-fund/

प्रत्येक 15 आॕगस्टला या साईटवर जाऊन नेट बँकींग द्वारे वा NEFT करून जमेल तसे पैसे भरण्याचा संकल्प करा. NEFT केले तर त्याची माहिती   [email protected] या  email id वर मेल करा. आयकर सवलत मिळण्यासाठी ते लगेच तुम्हाला 80G ची पावती पाठवतात. या NDF मधील दानासाठी सरकारने 100% कर सवलत दिलेली आहे. 

काही अडचण असेल तर तुम्ही NDF च्या 011 2301 0195 या नंबर वर फोन करू शकता. 

केवळ स्मार्ट नागरिक राष्ट्र मजबूत करण्याला प्राधान्य देतात. त्यांना त्यांचे खरे हित कशात आहे हे कळते. चला तर मग, आपणही स्मार्ट होऊ या. या स्वातंत्र्यदिनी राष्ट्र मजबुतीचा संकल्प करू या.

– समाप्त – 

©  डॉ गोपालकृष्ण गावडे

सिटी फर्टिलिटी सेंटर, पाटिल हॉस्पिटल, सिंहगड रोड, पुणे 

मो 9766325050

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ राष्ट्र मजबुतीचा संकल्प… भाग-1 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

डॉ गोपालकृष्ण गावडे

परिचय

शिक्षण : MBBS, DGO, DNB from BJ Medical College Pune

डॉ गोपालकृष्ण गावडे हे पुणे येथील सिंहगड रोड वरील प्रसिद्ध City Fertility Center या टेस्ट ट्युब बेबी सेंटरचे डायरेक्टर आणि IVF consultants म्हणून कार्यरत आहेत, तसेच सिंहगड रोड वरील Gurudatta Diagnostic Centre & Annual Heath Check Up Clinic चे डायरेक्टर म्हणून ते कार्यभार बघतात.

डॉ गावडे पुण्यातील अनेक मोठ्या रूग्नालयांमध्ये स्त्रीरोग आणि प्रसुती तज्ञ म्हणून सेवा पुरवतात. सामाजिक बांधिलकी जपत ते सरदार वल्लभाई पटेल cantonment हॉस्पिटल पुणे येथे गेल्या आठ वर्षांपासून मानद सेवा पुरवत आहेत.

आजवर त्यांनी पाच हजारापेक्षा (५,०००) जास्त शस्त्रक्रिया केल्या आहेत.

दरवर्षी स्वातंत्र्यदिनी एका सैनिकाला आवश्यक असणारे बॕटल गिअर म्हणजे असॉल्ट रायफल, बुलेटप्रूफ जॅकेट (bullet Proof Jacket), हेल्मेट(helmet), नाईट विजन गोगल्स (Night Vision Goggles) आणि इतर सामुग्री यांच्या साठी लागणारी रक्कम (दोन लाख) सैन्य दलास भेट देतात. तसेच 2019 पासून हे अभियान इतरांनी चालवावे यासाठी जनजागृती सुद्धा डॉक्टर करत असतात.

डॉ गावडेंनी दोन पुस्तके लिहली आहेत.

  1. असामान्य यश मिळवणारे मन नक्की कसा विचार करते याचा शोध घेणारे स्मार्टर सेल्फिश हे पुस्तक आणि
  2. वैद्यकीय प्रॅक्टिसमध्ये डॉ गावडेंना आलेल्या हृदयदस्पर्शी अनुभवांचे संकलन असलेले पुस्तक अनुभुति अशा दोन पुस्तकाचे ते लेखक आहेत.

🌳 विविधा 🌳

☆ राष्ट्र मजबुतीचा संकल्प… भाग-1 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

तेव्हा मी सिंहगडाच्या पायथ्याला डोणजे गावात छोटे हॉस्पिटल चालवत होतो. 2019 साल चालू होते. पानशेत धरणाच्या खाली BSF चा मोठा कँप आहे. तेथील जवानांना मी मोफत वैद्यकीय सेवा देत असे. आधून मधून BSF चे जवान मला दाखवायला येत. असाच एका दुपारी पस्तिशीच्या आसपासचा एक जवान दाखवायला आला. 

“डाक्टर साहब, बुखार से शरीर तप रहा है. थंड भी लग रही है.” त्याने त्याच्या उत्तर भारतीय हिंदी टोनमध्ये आपला त्रास सांगितला. 

“लघवीको आग हो रही है क्या? आग मतलब जलन.” मी आपल्या गुलाबी हिंदीत त्याला विचारले.

“नही डाक्टर साब” 

“घसा दुखता है क्या?” 

“ना” 

“संडास पतला हो रहा है? पेट दर्द वगैरा?”

“नही. बाकी कुछ भी तखलिफ नही. सिर्फ थंडी-बुखार है.” 

“अच्छा, बेड पर लेटो. जरा BP वगैरा जांच कर लेता हुँ.” 

तो जवान उठला आणि बुट काढुन एक्झामिनेशन बेड वर झोपला.

मी त्याच्या उजव्या हाताला बी पी कप बांधू लागलो. फोर आर्मवर एका जखमेचा वेडावाकडा व्रण मला दिसला. “इधर क्या हुआ था?”

“गोली लगी थी साहब.”

मी उडालोच, “यह गोली का जखम है?” 

“एक नही साहब, छह लगी थी. यहाँ से यहाँ तक ब्रश फायर लगा था.” त्याने आपला डाव्या हाताच्या तर्जनीने उजवा हात, उजवा खांदा, उजवी छाती आणि शेवटी डाव्या खांद्यापर्यंत निर्देश केला. 

“बाप रे, फिर बचे कैसे? आप सनी देओल हो क्या?” 

“काहे का सनी देओल साहब! इतना खुन बहा था की मुझे मरा समजके छोड दिया था. मेरा नसीब अच्छा था की खुन की बडी नली फटी नही. वक्त पर फस्ट एड मिला. हॉस्पिटल के लिए एअर लिफ्ट मिली इसलिए वक्त पर सर्जरी हो पाई. नही तो उस दिन मै खत्म हुआ था.”

“यह सब कहाँ हुआ था?”

“व्हॕलीमे साहब, कश्मीर व्हॕली में.”

मी त्याला तपासले. आम्ही दोघे परत आपापल्या जागांवर स्थानपन्न झालो. मी त्याला हिमोग्राम, युरीन, डेंगू, मलेरिया, टामफॉईड अशा दोन तीन तपासण्या करायला सांगितल्या. औषधे लिहून दिली. कशी घ्यायची ते समजावून सांगितले. आराम, हायड्रेशन वगैरे काही पथ्य सांगितली. पण त्याची पुर्ण स्टोरी ऐकायची तीव्र इच्छा माझ्या मनात निर्माण झाली होती.

“तो व्हॕलीमे क्या हुआ था उस दिन? यह सब कैसे हुआ था?” 

“कुछ नही साहब, हमको इंटिलिजंस मिला की एक गाँवमे एक घरमें टेररिस्ट छुपे है. तो हमने गाँवका कॉर्डन कर लिया. काॕर्डन कर लिया मतलब गाँव को घेर लिया. रात का वक्त था. लाईट भी नही थी. टेररीस्ट किस घर में छुपा है पता नही था. तो हर घर की तलाशी शुरू हुई.

हम चार लोक एक घर में घुसे. एक जेसीओ और हम तीन जवान थे. घर मे पुरा अंधेरा था. जेसीओ साहबने जैसेही टॉर्च लगाया तो कोनेसे ब्रस्ट फायर आया. सामनेवाले तीनोंको गोली लगी और हम गिर पडे. पिछे वाले चौथे जवानने टेररीस्ट के गन के मझल फ्लॕशके ओर अंदाजेसे गोलीयाँ चला कर उसे मार डाला. 

जेसिओ साहब और मेरे सबसे अच्छे दोस्तने जगहपरही दम तोड दिया. मै मरते मरते बचा. बस मेरा वक्त नही आया था उस दिन.” मित्राच्या आठवणीने त्याचा आवाज कातर झाला होता. कंसल्टिंगमध्ये काही क्षण शांतता होती. 

“आपने नाईट व्हिजन गॉगल्स या बुलेटप्रुफ जॕकेट नही पहने थे?” मी आश्चर्याने विचारले. 

“कहाँ साहब? दस-बारा साल पुरानी बात है. तब यह सब चिजें कहा मिलती थी? नाईट व्हिजन गॉगल्स तो आज भी सिर्फ स्पेशल फोर्सेके पास होते है. आज भी बहुत सारे जवानोंके पास पुरानी इंसास राइफल होती है. वह AK के मुकाबले उतनी कारगर नही है.” मी अवाक होऊन ऐकत होतो. 

“चलो साहब, निकलता हुँ. खुन जाँच कराके रिपोर्ट दिखाने आता हुँ. तब तक गोली चालू करू न?” तो उठला.

“हाँ हाँ. चालू करीए. व्हायरल ही लग रहा है. ठिक हो जाओंगे. लेकिन आजकल डेंगू और मलेरिया के पेशंट भी मिल रहे है. इसलिए जांच जरूरी है.” 

“ठिक है साब.” असे म्हणत तो केबीनच्या बाहेर पडला. मी मात्र विचारांमध्ये गढून गेलो.

आपली सेनादले आज किती खराब परिस्थितीत लढत आहेत! ही परिस्थिती सध्या हळूहळू सुधारते आहे. तरी पण ही परिस्थिती पटकन सुधारण्यासाठी माझ्यासारखे सामान्य नागरीक काही करु शकतो का?     

2004 सालापासून सैन्य बुलेटप्रुफ जोकेटची मागणी करत आहे. पण ती अंशतः पुर्ण व्हायला 2016 उलटला. भारताचा शत्रू AK 47रायफल ने लढतो आणि आमचा सैनिक मात्र त्याचा सामना इन्सास सारख्या निकृष्ट रायफलने करतो. आपल्यावर वेळ आली तर अशा विषम परिस्थितीत लढून आपण आपला जीव धोक्यात घालू का? टेररिस्ट असल्याचा संशय असलेल्या आंधाऱ्या खोलीत आपण असे नाईट व्हिजन गॉगल्सशिवाय शिरण्याचे धाडस करण्याचा विचार तरी करू का? आणि ते ही बुलेटप्रुफ जॅकेटशिवाय?  

दरम्यान मधल्या सरकारने उद्योजक आणि शेतकऱ्यांचे लाखो कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. लाख लाख कोटींचे अनेक घोटाळे झाले. पण सैन्याच्या बुलेटप्रुफ जॕकेट वा आधुनिक रायफल सारख्या मुलभुत गरजा मात्र पुर्ण झाल्या नाहीत. 

या काळात कितीतरी जवानांनी निधड्या छातीवर गोळ्या झेलल्या असतील. कितीतरी स्रिया विधवा झाल्या आणि कितीतरी मुलं अनाथ झाली असतील. घरातील कर्ता पुरूष गेल्यानंतर त्यांच्या वाट्याला सहानुभूती आणि बंदुकीच्या तीन फैरींची सलामी सोडल्यास फार काही पडले नसेल. 

वायुसेनेला अजूनही सत्तर वर्षांपुर्वीची जुनी मिग 21 विमाने वापरावी लागत आहेत. नेव्हीची एकमेव विमान वाहक नौका आणि बहुतेक लढावू जहाजे सेकंड हँड आहेत. कुणासाठी मी माझा जीव धोक्यात घालतोय हा प्रश्न प्रत्येक सैनिकाला पडत नसेल? कमी पगार, कुटुंबापासूनचा अनेक महिन्यांचा दुरावा, अपुऱ्या साधनसामुग्रीने शत्रूचा सामना, सतत जीवावरचे संकट, अशा परिस्थितीत काम करूनही भारतीय सैनिकांचे मनोबल आणि राष्ट्रभक्ती टिकून आहे. ही खरोखर आश्चर्याची गोष्ट आहे. 

प्रत्येक जन आपल्या हितांचे रक्षण करण्याचा प्रयत्न करत असतो. पण आपले हित नक्की कशात आहे हे कळण्याचा स्मार्टनेस सर्वांमध्ये असतोच असे नाही. कुटुंबाचे रक्षण झाले तर कुटुंब आपले रक्षण करते. राष्ट्राच्या सीमांचे रक्षण झाले तरच राष्ट्र आपले रक्षण करते. कुटुंब, समाज वा राष्ट्र यासारख्या संकल्पना जपण्यात घटक जनांचा दुरोगामी स्वार्थ असतो. कारण कुटुंब, समाज आणि राष्ट्र आपल्या प्रत्येक घटक जनांचे संरक्षण, पालन आणि पोषण करत असते. असा मोठा फायदा असल्याने या संकल्पना जगात आज खोलवर रुजल्या आहेत. 

— क्रमशः भाग पहिला 

©  डॉ गोपालकृष्ण गावडे

सिंहगड रोड, पुणे 

मो 9766325050

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ १५ ऑगस्ट – स्वातंत्र्यदिन  ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? विविधा ?

१५ ऑगस्ट – स्वातंत्र्यदिन ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव

माझ्या प्रिय देशबंधूंनो आणि भगिनींनो,

आपणा सर्वांना ७६ व्या स्वातंत्र्यदिनाच्या खूप शुभेच्छा! 🙏🇮🇳💐

आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्याला १५ ऑगस्ट २०२३ ला ७६ वर्षे पूर्ण झालीत, म्हणून आपला देश ७६ वर्षांचा तरुण झाला असे म्हणावे लागेल. पारतंत्र्याच्या बेड्या, जाच आणि अत्याचार अनुभवणारे आणि स्वातंत्र्यलढ्यात हिरीरीने प्राणपणाला लावून लढणारे तरुण स्वातंत्र्यसैनिक आता नव्वदी आणि शतकाच्या मध्ये असतील.  हे मोजके प्रत्यक्षदर्शी सोडले तर बहुसंख्य लोकांना हेच माहिती नाही की आपण जे स्वातंत्र्य उपभोगतो आहोत, त्याकरता अगणित स्वातंत्र्यसैनिकांचे रक्त सांडलेले आहे. त्यातील मोजकी नावे अर्थातच नेत्यांची, बहुतेक तर अनामिकच राहिले, त्यांच्याकरता मला महान कवी कुसुमाग्रजांचे शब्द आठवतात:

अनाम वीरा, जिथे जाहला तुझा जीवनान्त

स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली ना वात!

या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यातील ‘सोहळा’ अन्य कुठल्याही सोहळ्यापेक्षा वेगळा का आणि कसा आहे? आपल्या तेव्हाच्या पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी १५ ऑगस्ट १९४७ च्या शून्य प्रहरी  तिरंगा फडकावला. त्यांचे जगप्रसिद्ध भाषण सगळीकडे उपलब्ध आहेच, पण त्यातील एक वाक्य मला नेहमीच भावते, नेहरूजी म्हणाले होते, “आज रात्री १२ वाजता जेव्हा संपूर्ण जग झोपले आहे, त्यावेळी भारत स्वतंत्र जीवनाची नवी सुरुवात करेल.” सुरुवातीची कांही वर्षे या नवोन्मेषात प्रगतीचा आलेख उंच उंच चढत गेला. मात्र ही चढती भाजणी लवकरच स्थिरावली. स्वातंत्र्याने सर्व समस्यांचे निराकरण होईल, या आशावादावर अवलंबून राहणे कठीणच होते. नवीन सुनेला घरची जबाबदारी मिळेपर्यंत खूपच उत्सुकता असते. ‘मला राज्य मिळू दे, मग मी काय करते ते बघाच’ हे कधी मनात तर कधी ओठावर आणून सांगणारी सून जबाबदारीचे भान आल्यावर लवकरच सासूसारखी केव्हा वागायला लागते, ते तिचे तिलाच कळत नाही! नंतर हे राजकर्त्यांना देखील कळायला लागले.

मंडळी, आपण जेव्हा आपल्या स्वातंत्र्याविषयी इतके जागरूक असतो तेव्हा आपण इतरांच्या स्वातंत्र्याची पायमल्ली करतो आहे का? हे भान असणे महत्वाचे नाही का? एक रोजचेच उदाहरण! रस्त्याच्या कडेला ‘फुटपाथ’ नामक छोटीशी मार्गिका असते, तिला चांगले रंगवून वगैरे ठेवल्याने ती पायदळ चालणाऱ्यांना चांगलीच ठसठशीत दिसत असते. मात्र गर्दीच्या वेळी याच फुटपाथवरून शिताफीने स्कूटर, मोटारसायकल इत्यादी वाहनांनी ती व्यापलेली असते. बिच्चाऱ्या कारवाल्यांसाठी ती अंमळ अरुंद असते! आता पायिकांनी कुठे अन कसे चालायचे याचे धडे कोणी द्यावे? थोडक्यात काय, ‘माझे स्वातंत्र्य तर माझे आहेच अन तुझे बी माझेच’ असा कारभार आहे! मला संविधानाने अधिकार दिलाय, तसा तो इतरांना देखील दिलाय, हे समाजभान अन राष्ट्र्भान कसे येईल याचा गंभीरपणे विचार व्हायला हवा!

आपण स्वातंत्र्यदिन साजरा करतांना त्याची ‘इव्हेंट’ का होते? ध्वनिक्षेपक ठराविक राष्ट्र्भक्तीने भारलेली गाणी प्रसारित करीत असतो. कधी लहान मुले ‘पाठ करून “आजादी”  विषयी त्यांच्या वयाला डोईजड होतील अशी शाळा शाळांमधून भाषणे देत असतात. त्यांच्या स्मरणशक्तीचे आणि शिक्षक व पालकांच्या मेहनतीचे खूप कौतिक करावे हे अगदी स्वाभाविक! पण या निष्पाप मुलांना त्या टाळ्याखाऊ भाषणाचा संपूर्ण अर्थ समजावून सांगणे हे संबंधित वडिलधाऱ्यांचे कर्तव्य असावे! म्हणजे ही पोपटपंची न राहता खरीखुरी देशभक्ती होईल. कोण जाणो अशातूनच एखादा मुलगा व मुलगी देशसेवेचे व्रत घेऊन सैन्यात भरती होण्याचे स्वप्न बघेल!     

शेवटी असे वाटते की, ‘या देशाने मला काय दिले?’ असा प्रश्न ज्यांना वारंवार सतावतो त्यांनी ‘मी देशाला काय देतोय?’ या एकाच प्रश्नाचे अत्यंत प्रामाणिकपणे स्वतःलाच उत्तर द्यावे! आपल्या मुलाला शिक्षण देताना पालक त्यावर केवळ ५ ते १० टक्के खर्च करतात, उर्वरित खर्चाचा भार समाज उचलतो. हे आपल्या देशाचे अनामिक नागरिक आपल्या या प्रगतीचा किती वाटा उचलत आहेत, हे ध्यानात आले तर या स्वातंत्र्याचे मोल आपल्याला कांही अंशी कळेल!   

या शुभ प्रसंगी सर्वांचे पुन्हा एकदा खूप अभिनंदन,

धन्यवाद! 🙏🇮🇳💐

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे 

दिनांक १५ ऑगस्ट २०२3

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सृजनानंद… ☆ सौ.मंजुषा आफळे

सौ.मंजुषा आफळे

🌳 विविधा 🌳

सृजनानंद… ☆ सौ. मंजुषा आफळे ☆

प्रत्येक मनुष्य प्राण्यांमध्ये एक चित्रकार दडला आहे. परमेश्वराने बहाल केलेल्या आयुष्य रुपी कॅनव्हास वर तो आपले कर्तुत्व रेखाटतो. परिस्थितीनुसार त्याला जी शिकवण संस्कार शक्ती बुद्धी मिळते त्याचा तो ब्रश प्रमाणे वापर करतो. निसर्गतः त्याच्याकडे विविध रंग उपलब्ध आहेत. ते म्हणजे त्याचे सकारात्मक विचार,’ आचार आणि उच्चार. त्याने, फक्त सुंदर रंगांची योग्य निवड करून ते कल्पकतेने चित्रात भरायचे असतात. म्हणजे सृजनानंद निर्मिती तयार होते. पण स्वकर्तुत्वाने अशी कलाकृती निर्माण करताना त्याला प्रथम दुःख विरह संकटे यातना यातून पार पडावेच लागते. म्हणूनच  सर्व रंग मिसळून तयार होणारी काळी चौकट चित्राला शोभून दिसते. चित्राला सुरक्षित ठेवते आणि चित्राचे सौंदर्य वाढवते.

© सौ.मंजुषा सुधीर आफळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares