लहानपणी भाऊबीजेचे खूप अप्रूप असे! भावाकडून काय भाऊबीज मिळवायची याचे प्लॅनिंग आधीपासूनच चालू असे. पैसे खूप नव्हते, पण उत्साह खूप होता. दिवाळीला एकच ड्रेस घेतलेला असे. तोच भाऊबिजेला पुढे केला जाई. एक वर्षी माझ्या भावाने गंमत म्हणून नाणी गोळा करून त्याचे छान पॅकिंग करून दिले होते. तेव्हा १९६२ सालच्या एक पैशाच्या नाण्यात सोनं आहे अशी बातमी होती! त्यामुळे ती नाणी पॅक करून मला भाऊबिजेला दिली !त्यात काय आहे ह्या उत्सुकतेने ते गडबडीने उघडले, तो आनंद आगळाच होता. पुढे मोठे झाल्यावर दोन्ही भाऊ नोकरीला लागले. . दोन दोन साड्या मिळू लागल्या!
लग्न होऊन सासरी गेल्यावर भाऊबिजेला भावाचे येणे अपुर्वाईचे असे. कधीतरी त्या निमित्ताने माझेही माहेरी जाणे होई ! मग मुले बाळे झाल्यावर आपल्या पेक्षा मुलांची भाऊबीज महत्वाची होऊ लागली! एक मुलगा, एक मुलगी असा भाऊबिजेचा कोटा पूर्ण झाला! दरवर्षी त्यांत काही ना काही नाविन्य असे. पाहुणे मंडळी येत, मग हसत खेळत दिवाळी साजरी होई. आमच्याकडे माझ्या पुतण्या उत्साहाने मोठा कार्यक्रम
आखत असत. जवळपास ३५/४० जण एकत्र येऊन भाऊबीज साजरी करत ! वरची पिढी, मधली पिढी आणि छोटी मुले. . . सर्वांची ओवाळण्याची गडबड, मिळालेल्या भाऊबिजेच्या वस्तू गोळा करणे, आणि शेवटी खाण्यापिण्याचा कार्यक्रम ! गेली दोन वर्षे हे सगळं बंद होतं ! पण यंदा भाऊबीज साजरी झाली!
भाऊबीज म्हणजे बहिण भावाच्या प्रेमाचे प्रतीक ! आपल्या हिंदू संस्कृतीत प्रत्येक गोष्ट सणाच्या निमित्ताने गुंफली आहे, त्यामुळे त्याचे महत्त्व जास्त आहे. अशा सणांमुळे नाती दृढ होण्यास मदत होते. बहिण-भावातील बंध रेशमाचे भाऊबीजेसारख्या सणामुळे अधिक मुलायम बनतात हे नक्कीच ! कधी चुकून झालेले समज गैरसमज अशा सणांच्या निमित्ताने दूर केले जातात. आपले सण ही आपली समाज मन एकत्र जोडतात !
… दिवाळीचा हा शेवटचा दिवस असा गोड आनंदात साजरा होतो !
यमही आपल्या बहिणीकडे जातो आणि यमीकडून औक्षण करतो. बदल्यामधे आजच्या दिवशी कुणा भावाला मरण नाहीच पण भावासाठी दीर्घायूचे वरदान. ही धारणा.
पण आपल्या प्रतिज्ञेप्रमाणे ‘सारे भारतीय माझे बांधव आहेत’ असे समजून सगळ्यांसाठीच चांगले वरदान मागता येईल ना? हेच ज्ञानेश्वरांसारखे पसायदान होऊ शकेल ना?
मग ज्यांना भाऊ नाही त्यांनीच फक्त चंद्राला ओवाळायचे या पेक्षा सगळ्या बांधवांपर्यंत जाता येत नाही म्हणून या एका वैश्विक बंधूला औक्षण केले तर सगळ्या बांधवांपर्यंत हे औक्षण जाईल ना? अगदी मनापासून केलेली प्रार्थना सगळ्यांपर्यंत पोहोचेल ना?
मनापासूनची केलेली प्रार्थना सकल बांधवांपर्यंत पोहोचल्यावर त्यांचेही बंधुत्व जागृत होईल ना? मग स्त्री दाक्षिण्य, नारी आदर हे आपोआपच आल्यावर आपली संस्कृती जी महानच आहे ती अढळपदावरच धृवतार्याप्रमाणे राहील ना?. . . . . दिवाळीचा शेवटचा दिवस गोड होईल ना? आपले सर्व बांधव, जे सीमेवर असतात, जे पोलीस रुपात वावरत असतात जे दुसर्यांचा रोग बरा करणंयासाठी रात्रंदिवस झटत असतात आणि जे कोणत्याही पेशात असून कायम आपल्यासाठी समाजासाठी जागृत असतात अशा सगळ्या भावांसाठी माझे आजचे औक्षण आहे. सगळ्याचे केलेले हे स्मरण आहे.
चला नवा जमान्यात नवा विचार करू आणि आजचा भाऊबिजेचा दिवस परिवारापुरता मर्यादित न ठेवता वैश्विक रूप देऊ. … आपल्या महान भारताला समृद्ध आणि प्रेमाच्या ताकदीने सशक्त करू.
शुभ दीपावली ! नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष कसे ? तर महापराक्रमी राजा विक्रमादित्याच्या नावाने होणारी कालगणना आजपासून सुरू होते. आजपासून हे विक्रम संवत्सर सुरू होते. शालिवाहन शकानुसार चैत्री पाडवा हा वर्षारंभ मानला जातो. तर बलिप्रतिपदेपासून नवे व्यापारी वर्ष सुरू होते. दिवाळी पाडव्याला व्यापारी वही पूजनाची प्रथा महत्त्वाची असते.
या दिवशी सर्व वर्षातील व्यापाराचा आढावा घ्यायचा असतो. याच पद्धतीने आपण प्रत्येकाने आपल्या जीवनाचा ही आढावा घेतला पाहिजे. जुन्या वर्षातल्या राहिलेल्या गोष्टी, नवीन वर्षात करायच्या गोष्टी यासाठीचे नियोजन, जुने राग-द्वेष, भांडणं विसरून पुन्हा नव्याने स्नेहबंध जुळवणे, श्रद्धा उत्साह वाढेल याकडे लक्ष दिले पाहिजे.
बलिराजाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करतात. विरोचन पुत्र बली धर्मप्रिय, लोकप्रिय राजा होता. श्री विष्णूंनी त्याच्यासाठी वामन अवतार घेतल्याची कथा आपल्याला माहीत आहेच. हा बलिराजा उदार होता. त्याच्या गुणांचे स्मरण आपल्याला वाईट माणसातही असणारे चांगले गुण पाहण्याची दृष्टी देते.
कनक आणि कांता यामुळे माणूस असूर बनतो. म्हणूनच श्रीविष्णूंनी या दोघांकडे पाहण्याची विशिष्ट दृष्टी देणारे दोन दिवस प्रतिपदेच्या आगेमागे जोडून तीन दिवसांचा उत्सव साजरा करण्याचा आदेश दिला. त्यानुसार लक्ष्मीपूजनाला कनक म्हणजे लक्ष्मीला पूजण्याची पूज्य दृष्टी; तर भाऊबीजेला समस्त स्त्री वर्गाकडे आई किंवा बहिणीच्या मायेने पाहण्याची दृष्टी देणारे दोन दिवस येतात. थोडक्यात म्हणजे अज्ञान, मोह, लालसा, सत्ता यांच्या अंधारातून ज्ञान, श्रद्धा, सद्भावना यांच्या प्रकाशात जाण्याचा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे.
आजचा दिवस हा संकल्पासाठी एकदम शुभ आहे. हा पाडवा साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक दिवस आहे. कोणत्याही कार्याची सुरुवात आजपासून करावी असे संकेत आहेत. त्यामुळे त्या कामाला आपोआप पावित्र्य, नैतिकता प्राप्त होते. ते काम उत्तम रीतीने, चांगलेच करण्याचा आपला प्रयत्न होतो. चांगल्याचे फळ शेवटी चांगले मिळते असा विश्वास मनात दृढ असला की फलश्रुती चांगलीच होते.
काही ठिकाणी या दिवशी गोवर्धन पूजा असते. श्रीकृष्णाच्या किंवा विष्णूच्या देवळात ही पूजा होते. या दिवशी देवाला अनेक पक्वान्नांचा आणि मिठायांचा भोग अर्पण केला जातो. त्याची डोंगराच्या स्वरूपात मांडणी केली जाते म्हणून याला ‘अन्नकूट ‘ असेही म्हणतात.
हा दिवस पती-पत्नीच्या नात्यातील पावित्र्य जपणारा आहे. पत्नी आपल्या स्नेहज्योतींनी पतीला ओवाळते तर पती तिला प्रेमाची भेट देतो अशी संकल्पना आहे. आयुष्यातील रोजची धावपळ, रूक्ष व्यवहार, वैचारिक मतभेद यामुळे या नाजुक नात्याला अपरिहार्यपणे धक्के बसतात. नात्यात नाराजी, दुरावा येतो. या सणाच्या निमित्ताने तो दूर करून पुन्हा मनोमिलनाची जवळीक साधत आनंदाची वाटचाल सुरू करायला हा सण उत्तम पर्वणी असतो.
आनंदाची, उत्साहाची हसतखेळत बरसात करणारा हा दीपोत्सव. या सणाच्या निमित्ताने सर्वांच्या आयुष्याला चैतन्याने उजळून टाकावे, नात्यांना नवीन झळाळी देत ती आणखी घट्ट करावीत, उद्योग व्यवसायात उत्तम यश मिळावे आणि सर्वांची आनंदाची, समृद्धीची, उत्तम आरोग्याची वाटचाल व्हावी अशा भरभरून हार्दिक शुभेच्छा.
आपल्या चांगल्या कृतीचा चांगल्या भावनांचा देवालाही हेवा वाटो ईतके चांगले वागण्याचा प्रयत्न तरी करायला हवा ना? पाताळात जाऊनही एक दिवस का होईना पण भूलोकातील आपल्या प्रजेला भेटण्याचे भाग्य ज्याला मिळाले असे बळीराजाचे भाग्य सकल पुरुषांना मिळो म्हणून सर्व स्त्रियांनी केलेली प्रार्थना पतीची उदंड आयुष्याची कामना आणि यमानेही परत जावे म्हणून केलेले औक्षण•••
व्यापारी लोकांनी नव्या वहीत सरस्वती गणपती काढून केलेली पूजा आणि त्या दिवसापासून नव्याने हिशेब मांडण्याला सुरूवात•••
आपल्या आयुष्याचे सगळेच हिशेब आपल्यालाच मांडायचे असतात. जुने हिशेब पुसून जुने हेवेदावे विसरून नात्यांचे नवे हिशेब सुरू केले ना की सुखी जीवनाचे गणित बरोबर सुटते. म्हणूनच आज पासून प्रामुख्याने पती पत्नी नात्यातील रुसवे फुगवे दूर करून नवीन प्रेमाने सुरूवात केली की बाकीची सगळी नाती फुलाप्रमाणे आपोआप बहरातात.
पूर्वी फक्त बायकोने नवर्यालाच तेल लावून औक्षण करावे असे नव्हते तर••• आईने मुलाला, भावजयने दिराला, काकूने पुतण्याला, मामीने भाच्याला अशा अनेक नात्यांनाही दृढ केले जायचे. खर्या अर्थाने सण नात्यांचा साजरा करून संस्कृती जपली जायची. त्यामुळे स्त्रीचा मान सन्मान आपोआप व्हायचा
आज समाजातील प्रत्येक स्त्रीकडे बघण्याची दृष्टी बदलणे गरजेचे असल्याने सगळ्या स्त्रियांना आदराचे स्थान मिळून त्यांच्याशी असलेल्या सामाजिक नात्याचे स्मरण आज करून दिवाळीचा पाडवा/ बलीप्रतिपदा/ व्यापारी नव वर्षाची सुरुवात करताना या दिवसाच्या सगळ्यांनाच मंगलमय शुभेच्छा !!
आज दिवाळीतील लक्ष्मीपूजनाचा दिवस. आज समृद्धीची, संपन्नतेची पूजा केली जाते. यावेळी निसर्ग सुद्धा सर्वांगाने बहरून आलेला असतो. पावसामुळे धरणी हिरवीगार आणि शरद ऋतूचे आल्हाददायक वातावरण असते. शेतामध्ये धनधान्याचा हंगाम असतो. त्यामुळे आनंदाचे, चैतन्याचे वातावरण असते आणि हाच आनंद दिवाळीत ओसंडून वाहत असतो.
दारापुढे सुंदर रांगोळ्या, दाराला पाना फुलांचे तोरण, दिव्यांच्या माळा, फुलांच्या माळा, तेवत्या पणत्या, प्रकाशमान आकाश कंदील अशा थाटामध्ये प्रत्येक घर उजळून निघालेले असते. महालक्ष्मीच्या स्वागतासाठी सज्ज झालेले असते. मोठ्या उत्साहामध्ये लक्ष्मीपूजन केले जाते. दारिद्र्याचा अंधार दूर सारून समृद्धीचा दीप चेतवावा हा संदेश यावेळी सर्वार्थानं प्रकट होतो.
घरामध्ये, व्यवसायात समृद्धी रहावी, दारिद्र्य दूर व्हावे यासाठी लक्ष्मीची पूजा करायची. त्याच बरोबरीने कुबेराची पूजा केली जाते. कुबेर हा देवांच्या संपत्तीचा राखणदार समजला जातो. तो संपत्ती संग्राहक, धनाधिपती, पैसा कसा राखावा हे शिकवणारा, स्वतःला संपत्तीचा मोह नसणारा, अतिशय निरोगी आहे असे त्याचे गुण सांगितलेले आहेत. तेव्हा धनधान्य प्राप्त झाल्यावर मनुष्याला अहंकाराची बाधा होऊ नये यासाठी कुबेराचे स्मरण करायचे.
‘लक्ष्मी’ला चंचल म्हणतात. पण लक्ष्मी चंचल नसते. लक्ष्मीवान माणसाची मनोवृत्ती चंचल असते. वित्त ही एक शक्ती आहे. त्यामुळे मानव देवही बनू शकतो आणि दानवही बनू शकतो. लक्ष्मीला भोग प्राप्तीचे साधन समजणाऱ्या माणसांचा ऱ्हास हा ठरलेलाच असतो. लक्ष्मीची पूजा करून तिचा योग्य सन्मान करणार्याची भरभराट तर होतेच. पण इतरांनाही तो सहाय्यभूत होतो. म्हणूनच दैन्य जाणवेल इतके कमी पण नको आणि बुद्धीचा तोल ढळेल इतके जास्त पण नको, इतकेच धन देवाने द्यावे अशी त्याची प्रार्थना करायला हवी.
लक्ष्मीचा वापर कोण, कशासाठी करतो यावर तिचे फळ अवलंबून असते. विपरीत मार्गाने वापरली जाते ती ‘अलक्ष्मी’, स्वार्थात वापरतात ते वित्त, दुसऱ्यासाठी वापरली जाते ती ‘लक्ष्मी ‘आणि देवकार्यासाठी वापरली जाते तिला ‘महालक्ष्मी ‘ म्हणतात. उदारहस्ते सांस्कृतिक कार्यात, सत्कार्यात लक्ष्मी खर्च करणाऱ्याच्या घरी ती पिढ्यानपिढ्या वास करते. म्हणूनच म्हणतात, ‘लक्ष्मी ही एक महान शक्ती असल्याने ती चांगल्या लोकांच्या हातातच राहिली पाहिजे, तरच तिचा सुयोग्य वापर होतो.
लक्ष्मी प्रमाणातच मिळाली पाहिजे. कारण लक्ष्मीच्या नाण्याला दोन बाजू असतात. तिचा वापर स्वार्थासाठी करायचा का परमार्थासाठी हे आपणच ठरवतो. तेव्हा या वित्ताला अनर्थ न मानता जीवन सार्थकी लावणारी शक्ती मानून तिचे पूजन करायचे. बुद्धीचा समतोल राहू दे अशी प्रार्थना करायची.
एक गोष्ट महत्त्वाची आहे गैर मार्गाने आलेली लक्ष्मी कधीही स्थिर राहत नसते. तिच्यापासून शाश्वत सुख मिळत नाही तर प्रामाणिकपणे मिळवलेली लक्ष्मी शाश्वत सुखासमाधानाने आपली झोळी भरते. म्हणूनच असे सांगितले जाते की, “जो दुसऱ्याचे ओरबाडून खातो त्याला विकृती म्हणतात, जो आपले स्वतःचे खातो त्याला प्रकृती म्हणतात आणि जो आपल्यातले इतरांना खाऊ घालतो त्याला संस्कृती म्हणतात”. हेच या लक्ष्मीपूजनाचे सार आहे. लक्ष्मीमातेने सर्वांवर भरभरून कृपा करावी अशी तिच्या चरणी प्रार्थना करूयात.
ज्यांना संस्कृत म्हणणे अवघड वाटते आणि जोडाक्षर म्हणणे गैरसोयीचे वाटते अशा लोकांनी धनत्रयोदशी म्हणण्याऐवजी वसुबारस नंतर धनतेरस असा फंडा तयार करून धनत्रयोदशीला धनतेरस असे नाव देण्याची रूढी निर्माण केली.
त्याचप्रमाणे धनत्रयोदशी ही कशासाठी आहे हे माहीत नसणाऱ्यांनी धनतेरस किंवा धनत्रयोदशी याचा संबंध धनाशी जोडून धनाची पूजा करण्याची रूढी निर्माण केली. धनत्रयोदशी म्हणजे धन्वंतरी पूजनाचा दिवस. धन्वंतरी चा धन त्रयोदशीला जोडून हा शब्द झाला आहे.
दिवाळीचा उत्सव सुरू करण्यापूर्वी पहिल्यांदा वसुबारस म्हणजे गाईचा आदर्श समोर ठेवावा. गाईचे शुद्ध दुग्धजन्य पदार्थ वापरून आपला आहार आरोग्यपूर्ण ठेवावा. नैसर्गिक आणि शाकाहारी पदार्थांचा वापर करून आहार संतुलित ठेवावा. हा वसुबारसचा संदेश आणि उद्देश.
त्यानंतर येणारे धनत्रयोदशी म्हणजे धन्वंतरीला आठवावे. धन्वंतरी ही आरोग्य देणारी देवता. त्याला आपण अलीकडच्या काळात देवांचे डॉक्टर असे म्हणून ही संबोधतो. उत्सव साजरा करताना आरोग्याची काळजी घ्यावी, स्वतःचे कुटुंबाचे आणि समाजाचे आरोग्य नीट राहावे, सर्वांनीच आरोग्यपूर्ण जीवन जगावे यासाठी धन्वंतरीची शिकवण सगळ्यात महत्त्वाची. हा संदेश उत्सव साजरा करण्यापूर्वी देण्यासाठी धनत्रयोदशीचं प्रयोजन असलं पाहिजे असं मला वाटतं.
अलीकडच्या काळात या संदेशाला जास्तच महत्त्व आहे. स्वतःचं आरोग्य सांभाळण्यासाठी आरोग्यपूर्ण, प्रदूषण रहित आणि शक्यतो आपुलकीच्या भावनेने घरीच आरोग्यपूर्णरित्या बनवलेले पदार्थ उत्सव साजरा करण्यासाठी सेवन करावेत. कुटुंबाच्या आरोग्यासाठी कुटुंबातील सर्व वयाच्या आणि सर्व परिस्थितीतील व्यक्तींना योग्य अशा पथ्यकारक आणि आरोग्यपूर्ण पदार्थांसाठी आग्रह धरावा हा कौटुंबिक उद्देश. सामाजिक आरोग्यासाठी एकमेकांच्या घरच्या शुद्ध आणि आपुलकीने बनवलेल्या पदार्थांची देवाण-घेवाण करावी. समाजाचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी घरासभोवतीचे वातावरण स्वच्छ आणि आरोग्यपूर्ण असावे यासाठी फटाक्यांसारख्या धोकादायक आणि प्रदूषणात्मक गोष्टींपासून दूर राहिले पाहिजे. आपले स्वतःचे घर आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ व निर्मळ राहावा यासाठी परिसराची स्वच्छता व परिसर दिव्यांनी उजळून निघावा प्रकाशाची पूजा व्हावी हा उत्सवाचा मूळ आत्मा. फटाक्यामधून आपण या मूळ आत्म्यालाच उडवून टाकतो असे नाही वाटत? विकतचे पदार्थ आणून आणि एकमेकांना देऊन आपण सामाजिक आरोग्याचा आत्माच हरवून टाकतो असे नाही वाटत? अलीकडे उत्सवांचं सामाजिकरण होण्याऐवजी व्यापारीकरण होत राहिल्यामुळे उत्सवाचे मूळ उद्देश आणि त्या उत्सवातील आनंदाचा आत्माच हरवून चालला आहे असे नाही का वाटत?
आज ‘ नरक चतुर्दशी ‘. आजची पहाट रांगोळ्यांनी सजलेली, दिव्यांनी उजळलेली मंगल-प्रसन्न पहाट असते. आज पहाटेचे अभंगस्नान, यमाचे तर्पण, नरकभय निवारणासाठी दिवा लावणे, देवदर्शन, फराळाचा आस्वाद, रात्री दिव्यांची आरास असा दिवसाचा दिनक्रम असतो.
स्वर्ग आणि नरक या संकल्पना बहुतेक सगळीकडेच रूढ आहेत. आयुष्यात चांगली कृत्ये केल्यास मृत्युनंतर स्वर्ग मिळतो आणि वाईट कृत्यांमुळे नरकात जावे लागते अशी समजूत आहे. या नरकाचे सर्वांनाच भय असते. तेव्हा या नरकभयापासून मुक्त होण्यासाठी आजच्या दिवशी एक दिवा लावावा आणि संध्याकाळी घर, मंदिर, मठ या ठिकाणी दिव्यांची आरास करावी असे सांगितले आहे.
आजच्या दिवशी श्रीकृष्णाने नरकासूराचा वध केला. नरकासूर प्रागज्योतिष्पूर नगरीचा राजा होता. आपल्या असूरी शक्तीने तो देव आणि मानव सर्वांना त्रास देत असे. त्याने सोळासहस्र राजकन्यांना पळवून आणून आपल्या कैदेत ठेवले. त्यांच्या सुटकेसाठी भगवान श्रीकृष्णाने युद्ध करून त्याला ठार मारले. त्या आनंदाप्रीत्यर्थ लोकांनी उत्सव साजरा केला. दिवे लावून अंधाराला, संकटाला, भीतीला दूर पळवले.
मरताना नरकासुराने श्रीकृष्णाकडे वर मागितला. आजच्या तिथीला जो मंगलस्नान करेल त्याला नरकाची पीडा होऊ नये. श्रीकृष्णाने तसा वर दिला. म्हणूनच आज पहाटेच्यावेळी अभ्यंगस्नान करतात. आसूरी शक्तींचा, आसूरी महत्त्वाकांक्षेचा शेवटी नाशच होतो असा संदेश ही कथा देते. म्हणून प्रत्येकाने या दिवशी चांगले वागणे, चांगल्याची साथ देणे असा संकल्प केला पाहिजे.
स्त्री उध्दाराच्या या कामासाठी सत्यभामेने पुढाकार घेतलेला होता. नरकासूराच्या बंदीवासात राहिल्याने या राजकन्यांना कलंकित मानले जाऊ नये, त्यांचे सामाजिक स्थान हीन होऊ नये म्हणून श्रीकृष्णाने त्या सर्व राजकन्यांशी विवाह केला अशीही कथा आहे.
स्त्रियांवरील अत्याचाराच्या बातम्या सतत ऐकायला मिळतात. त्यांना आळा कसा घालायचा हा खरा प्रश्न आहे. यासाठी कोणी श्रीकृष्ण धावून येईल असा चमत्कार होणार नाही. त्यासाठी सर्वांनीच आपल्या मनात श्रीकृष्णाचे विचार जागृत करून स्त्री शक्तीचे रक्षण केले पाहिजे. यामधे स्त्रियांनी सुद्धा सहभागी व्हायला हवे. आपले रक्षण आपणच करण्यासाठी आवश्यक गोष्टी लहानपणापासून शिकायला हव्यात. मन कणखर बनून अंगी धिटाई येईल. मुली स्वयंपूर्ण बनतील. त्याचबरोबर मुलांना लहानपणापासून स्त्रीचा आदर करायचा, स्त्री-पुरुष दोघेही समान आहेत, कोणत्याही प्रसंगात त्रास द्यायचा नाही असेच संस्कार द्यायला हवेत. त्यामुळे मुला-मुलींची मानसिकता विवेकी, सुदृढ व निकोप बनून ते मोठेपणी सुजाण, जबाबदार नागरिक बनतील.
प्रत्येकाने आपल्या मनातल्या परमेश्वराचे स्मरण ठेवले ; तर हातून वाईट कृत्य घडणारच नाहीत. जीवनाला नरक बनवणाऱ्या अस्वच्छता, आळस, प्रमाद, वासनांधता, व्यसनाधीनता या गोष्टी नरकासूरच आहेत. त्यांना आज नष्ट करायचे. वाईटातून चांगल्याची, अंधारातून उजेडाची वाट धरायची. तेव्हा चांगल्याचे रक्षण व्हावे, नाती जास्त जवळ यावीत यासाठी एकत्रितपणे पण नियम पाळत, सामाजिक भान राखत श्रध्देने, आनंदाने हा सण साजरा करू या.
(पूर्वसूत्र- आठवड्यातून ठरलेले दोन दिवस बँकेत येतानाच ‘लिटिल् फ्लावर’ मधे जाऊन कॅश व्यवस्थित मोजून घेऊन मी स्वतःच बँकेत घेऊन येऊ लागलो. कांही दिवस हे असं सुरू राहिलं पण अचानक एक दिवस या क्रमाला अतिशय अनपेक्षितपणे वेगळंच वळण लागलं आणि या सगळ्या चांगल्यात मिठाचा खडा पडला! मला मुळापासून हादरवून सोडणारी ती एक नाट्यपूर्ण कलाटणी मला पूर्णत: हतबल करून गेली होती!
मला पुढे येऊ पहाणाऱ्या एका अतर्क्य आणि गूढ अशा अनुभवाची हीच तर पार्श्वभूमी ठरणार होती आणि सुरुवातसुद्धा.. !) इथून पुढे —-
तो शुक्रवार होता. आमच्या रिजनल ऑफिसकडून आलेल्या फोनवर दुसऱ्या दिवशी शनिवारी संध्याकाळी ५. ३० वाजता अचानक ठरलेल्या ब्रॅंच मॅनेजर मिटिंगसाठी मला कोल्हापूरला येण्याचा निरोप मिळाला. योगायोग असा की मीटिंगच्या दुसऱ्या दिवशी रविवारी पौर्णिमा होती आणि मीटिंग संपताच सांगलीला घरी मुक्कामाला जाऊन तिथून रविवारी माझ्या नेमानुसार पौर्णिमेला नृसिंहवाडीला दत्तदर्शनासाठी जाणंही सुलभ होणार होतं.
पण हा निरोप मिळताच मीटिंगची आवश्यक ती माहिती गोळा करून फाईल तयार करायलाच खूप रात्र झाली. म्हणून मग रात्री उशिरा न निघता शनिवारी पहाटेच्या बसने निघायचं ठरवलं. रात्री अंथरुणाला पाठ टेकली आणि शनिवारी सकाळी ‘लिटिल् फ्लॉवर’ मधे जाऊन आपल्याला कॅश कलेक्ट करायचीय याची आठवण झाली. रिजनल ऑफिसच्या फोननंतर सुरू झालेल्या या सगळ्या गदारोळात शनिवारी कॅश कलेक्शनसाठी मला येता येणार नाहीय असा मिस् डिसोझांना निरोप देणं राहूनच गेलं होतं त्यामुळे कॅश कलेक्ट करणं क्रमप्राप्तच होतं.
शेवटी पहाटे उठून प्रवासाची तयारी करून मी बॅग घेऊन बाहेर पडलो ते नेहमीप्रमाणे आठ वाजताच. ‘लिटिल् फ्लाॅवर’ मधे जाऊन पैसे मोजून ताब्यात घेतले. बँकेत जाऊन पैसे व स्लीप सुजाताच्या ताब्यात दिली.
“कॅश नीट मोजून घे. मगच मी निघतो. ” मी गंमतीनं म्हटलं. ती हसली. समोर इतर कस्टमर्स थांबलेले होते म्हणून मग तिने मी दिलेली ती कॅश आणि स्लीप समोर बाजूला सरकवून ठेवली आणि…. “सर, असू दे. तुम्ही स्वत: कॅश मोजून आणलीय म्हणजे ती बरोबरच असणाराय. मी नंतर मोजते. तुम्हाला उशीर होईल. तुम्ही तेवढ्यांसाठी नका थांबू. ” ती मनापासून म्हणाली. ते खरंही होतंच. मला तातडीने स्टॅण्ड गाठणं आवश्यक होतंच. सर्वांचा निरोप घेऊन मी निघालो.
पुढचं सगळंच सुरळीत झालं. मीटिंग चांगली झाली. मला घरी रहाताही आलं. सर्वांना भेटता आलं. गप्पा झाल्या. आराम करता आला. रविवारी नृसिंहवाडीचं दत्तदर्शनही निर्विघ्नपणे पार पडलं. आणि मग नेहमीच्या चक्रात अडकण्यासाठी मी रविवारी रात्री उशिराची सोलापूर बस पकडली. पहाटे साडेपाचच्या सुमारास घरी पोचलो. थोडा आराम करायलासुध्दा वेळ नव्हताच. सगळं आवरून साडेआठला ब्रॅंच गाठली. रात्रभराच्या जागरणाचा शीण सोबत असल्याने उत्साह फारसा नव्हताच. पण जो होता तो उसना उत्साहही नाहीसा करणारं एक अशुभ आक्रित
ब्रॅंचमधे माझी वाट पहात होतं!मी केबिनमधे जाऊन बसलोही नव्हतो तेवढ्यांत माझीच वाट पहात असल्यासारखे हेडकॅशिअर सुहास गर्दे माझ्या पाठोपाठ केबिनमधे आले.
“गुड मॉर्निंग सर”
“गुड मॉर्निंग. बसा. कांही विशेष?”
“विशेष असं नाही… पण एकदा तुमच्या कानावर घालावं असं वाटलं. तुम्ही परवा शनिवारी इथून गेल्यानंतर थोडा घोळच झाला होता… ” ते म्हणाले.
“घोळ ? म्हणजे.. ?”
“म्हणजे.. ‘लिटिल् फ्लॉवर’ च्या कॅशमधे साडेआठशे रुपये कमी होते सर… “
“काय? अहो, भलतंच काय? कसं शक्य आहे हे?.. “
“हो सर. पन्नास रुपयांच्या सतरा नोटा कमी होत्या… “
एव्हाना प्रचंड दडपणाखाली असलेली सुजाता बोबडे केबिनबाहेर घुटमळत उभी होती, ती आत येऊन माझ्यासमोर खाली मान घालून उभी राहिली.
“सुजाताs. काय म्हणतायत हे?”
” ह.. हो सर. आठशे पन्नास रुपये.. शॉर्ट होते.. “
तिचा आवाज भीतीनं थरथरत होता. तिचे डोळे नेहमीप्रमाणे पाझरु लागले. ती उभीच्या उभी थरथरू लागली. टोकाच्या संतापाने माझं मन भरुन आलेलं असतानाही कांही न बोलता मी डोकं गच्च धरून क्षणभर तसाच बसून राहिलो. संतापाने भरलेल्या जळजळीत नजरेने सुजाताकडे पाहून तिला जायला सांगितलं. डोळे पुसत ती केबिनबाहेर गेली. मी व्यवस्थित पैसे मोजून हिच्याकडे दिलेले असताना आठशे पन्नास रुपये कमी येतीलच कसे? एखाद दुसरी नोट कमी असणंही शक्यच नव्हतं आणि पन्नास रुपयांच्या सतरा नोटा कमी?शक्यच नाही. माझ्या मनातला संशयी विचार सुजाताच्या पाठमोऱ्या आकृतीचा पाठलाग करत राहिला. तिचे कौटुंबिक प्रश्न, थोड्याच दिवसात येऊ घातलेलं तिचं बाळंतपण, आर्थिक ओढग्रस्तता.. सगळंच माझ्या मनातल्या संशयाला पुष्टी देणारंच होतं. पण तो संशयाचा कांटा मनात रुतण्यापूर्वीच मी क्षणार्धात उपटून तो दूर भिरकावून दिला. नाही… सुजाता असं कांही करणं शक्य नाही… ! मी माझ्या मनाला बजावून सांगितलं. पण तरीही ते साडेआठशे रुपये गेले कुठं हा प्रश्न मात्र माझं मन कुरतडत राहिला.
“सुहास, इतर कुठल्यातरी रिसीटमधे चूक असेल.. काहीतरी गफलत असेल. त्या कॅशमधे चूक असणं शक्यच नाही… “
” सगळ्या रिसिटस् दोन दोनदा चेक करून खात्री करून घेतलीय सर. सगळं बरोबर होतं. त्यादिवशी सगळेजण खूप उशीरपर्यंत याच व्यापात होतो. पण आता काळजीचं कांही कारण नाहीय सर. त्या संध्याकाळी आम्ही प्राॅब्लेम साॅल्व्ह करुन मगच घरी गेलो सर. आता प्रॉब्लेम मिटलाय. पैसेही वसूल झालेत. “
“मी ‘लिटिल् फ्लाॅवर’ला त्याच दिवशी संध्याकाळी फोन करून सांगितलं सर. तुम्ही मीटिंगसाठी कोल्हापूरला गेलायत हेही सांगितलं. त्यांनी लगेच पैसे पाठवले सर. “
ऐकून मला धक्काच बसला. काय बोलावं, कसं रिअॅक्ट व्हावं समजेचना. मिस् डिसोझांना फोन करण्यासाठी रिसिव्हर उचलला खरा पण हात थरथरू लागला. फोन न करताच मी रिसिव्हर ठेवून दिला.
माझ्या अपरोक्ष नको ते नको त्या पद्धतीने घडून गेलं होतं. सुहास गर्देने बाहेर जाऊन स्वतःचं काम सुरू केलं, पण जाताना त्याच्याही नकळत त्यानं मलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय असंच वाटू लागलं. मी शांतपणे डोळे मिटून खुर्चीला डोकं टेकवून बसून राहिलो. पण स्वस्थता नव्हती.
माझ्या मिटल्या नजरेसमोर मला सगळं स्वच्छ दिसू लागलं होतं… ! हो. हे असंच घडणाराय.. !माझ्यासमोर उभं राहून मिस् डिसोझा संशयग्रस्त नजरेने माझ्याकडे पहातायत असा मला भास झाला… न्.. मी भानावर आलो. खुर्ची मागे सरकवून ताडकन् उठलो.
काहीतरी करायलाच हवं… पण काय? मन सून्न झालं होतं. काय करावं तेच सुचत नव्हतं. आणि.. आणि अचानक.. अस्वस्थ मनात अंधूक प्रकाश दाखवू पहाणारा एक धूसर विचार सळसळत वर झेपावला… आणि केबिनचं दार ढकलून मी बाहेर आलो… !
वसुबारस ला दिवाळीची सुरुवात तर झालीच, पण आजचा धनत्रयोदशीचा दिवस हा अनेक दृष्टीने महत्त्वाचा आहे! या दिवसाच्या नावातच धनाचे महत्त्व कळते! पौराणिक द्रुष्ट्या या दिवसाच्या वेगवेगळ्या कथा तर आहेतच, पण वैद्य किंवा डॉक्टर म्हणून या दिवसाचे महत्त्व मला लग्नानंतर अधिक जाणवले. ह्यांचा वैद्यकीय पेशा असल्यामुळे या दिवशी संध्याकाळी आम्ही धन्वंतरीची पूजा करत असू. धन्वंतरीच्या फोटो समोर ह्यांची रोजच्या वापरातील शस्त्रे म्हणजे स्टेथोस्कोप, सीझर वगैरे ठेवून पूजा केली जाई. धने आणि गुळाचा नैवेद्य दाखवून आरती करत असू. आपल्या हातून रोग्यांची चांगली सेवा व्हावी यासाठी प्रार्थना करत असू.
वैद्यकीय काम हे व्यवसाय नसून सेवा आहे ही भावना कायम मनात ठेवलेली होती. पैसा ही गोष्ट त्याकाळी थोडी दुय्यम होती.
यावरून एक दोन आठवणीत राहिलेल्या गोष्टी सांगाव्याशा वाटतात. एक वर्षी धनत्रयोदशी आणि नरक चतुर्दशी एका च दिवशी होती बहुतेक! आम्ही सकाळी फराळाला बसलो असताना धावत पळत एक जण आले, त्यांच्या मुलाने फटाके उडवताना हात भाजून घेतला होता. फराळाच्या ताटावरून उठून डॉक्टर तसेच पेशंट बघायला आधी गेले. सण-वार काहीही असले तरी आपला वैद्यकीय पेशा महत्त्वाचा समजून नेहमी पेशंट्सना प्राधान्य दिले जाई. कधीकधी अगदी चिडचिड होत असे, की काय हा डॉक्टरचा व्यवसाय! पण स्वेच्छेने पत्करलेला असल्यामुळे तो राग तात्पुरता च असे. दिवाळीच्या दिवसात फटाक्यांमुळे होणार्या छोट्या छोट्या अपघातांना बरेच वेळा तोंड द्यावे लागत असे. पण
धन्वंतरी च्या कृपेने यांच्या व्यवसायात नेहमी यश मिळत गेले हे मात्र खरे!
अशीच एक आठवण ! सिविल हॉस्पिटल मध्ये R. M. O. म्हणून काम करत असताना ह्यांची दिवाळी बरीचशी दवाखान्यातच साजरी होत असे! एके वर्षी सासूबाई आजारी असताना दिवाळीपर्यंत सिव्हिल हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होत्या, तेव्हा त्यांच्याजवळ मी थांबत असे. हॉस्पिटल मधील धनत्रयोदशी अनुभवायला मिळाली. तेथील सर्व स्टाफ रात्रीच्या ड्युटीवर असताना आकाश कंदील लावणे, पताका लावणे, मेणबत्त्या, पणत्या लावणे, रांगोळ्या काढणे हे सर्व घरी जसे उत्साहाने साजरे करतो तसेच तिथे साजरे करत होते. आजारी माणसांना आनंद मिळावा म्हणून हे सर्व लोक झटत होते. ते पाहून खरोखरच मन भारावून गेले. संध्याकाळी तिथे धन्वंतरी ची प्रतिमा उभी करून पूजा करण्यात आली. बऱ्याच जणांनी पेशंट साठी फराळाचे वाटप केले होते. एकंदरच आपल्या हिंदू समाजामध्ये कोणत्याही सणाचा, उत्सवाचा आनंद सर्वांसोबत घेतला जातो, ही गोष्ट खूपच छान वाटली!
आरोग्य आणि धन या दोन्ही गोष्टी आयुष्यात महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी आपले आरोग्य जपण्याबरोबरच धनाची पूजा करून परमेश्वराबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आपण
आनंदाने साजरा करू या!
….. दिवाळी सारख्या मोठ्या सणाचे स्वागत करून अमंगल ते सर्व जाऊ दे अशी धन्वंतरीची प्रार्थना करू या!
मनाने एक हळुवार गिरकी घेतली. ‘ दिवाळी ‘वर्षाचा मोठा, रंगांचा, प्रकाशाचा सण! अनेकविध रंगांचे आकाराचे आकाशदीप नक्षीदार सुंदर रांगोळ्या, अभ्यंगस्नान, नवी कोरी विविध रंगांची सुंदर वस्त्र प्रावरण, झगमगत्या रंगीत दिव्यांच्या माळा, घरात दारात, अंगणात प्रकाशणारे दीप- पणत्या अन् तिखट गोड पदार्थांनी सजलेली तबकं, फुलबाज्या, चक्र, फटाके, सू़ं सूं आवाज करीत आकाशांत झेपणारे बाण, अशी कितीतरी आतिषबाजी, पाहुण्यांची- मित्रमंडळींची वर्दळ, पहाटेच सर्व आवरून, पूजाअर्चा करून देवळात देवाला जायची लगबग.. मग फराळ, पक्वांनाच जेवणं, सगळंच कसं आनंदमय वातावरण अगदी हवंहवंस. !
पूर्वीची दिवाळी अन् -आजची दिवाळी यात फरक आहे तो दिवाळी साजरी करण्याच्या पद्धतीचा. तरीही, आनंद तोच उत्साह तोच असतो…. दिवाळीला आपल्याकडे एक धार्मिक अधिष्ठान आहे ते पूर्वी इतकंच आजही पाळलं जातं प्रत्येक दिवसाचं धार्मिक महत्त्व असलं तरी सर्वांनी म्हणजे आप्त-स्वकीयांनी एकत्र यावं भेटी घ्याव्या असा हा आनंदाचा सण! वेगवान जीवन चक्रात सगळंच बदलत गेलं. चाळ, वाडे संस्कृती इतिहास जमा होत गेली. सगळ्यांनी मिळून एकत्र सण साजरा करायला जमत नाही. जागा लहान, वेळ कमी यातच सगळं आलं. त्यामुळे मी आणि फक्त माझंच असा विचार घेऊन प्रत्येकाचं किंवा आपल्या छोट्या कुटुंबाचं वेगळं छोटसं वर्तुळ तयार झालं. फ्लॅट संस्कृती आली. आता मनासारखंच घरालाही मोठं प्रशस्त अंगण फारसं दिसत नाही. तरीही आप्तस्वकीय मित्रपरिवार सर्वांना यानिमित्ताने भेटणारे आणि आवर्जून बोलावणारे ही आहेत. घरोघरी घरकुल, किल्ले जरी होत नसले तरी सोसायटीच्या प्रांगणात लहान मोठी मुले -मुली मिळून त्याचा आनंद घेतात अगदी चढाओढीने किल्ले घरकुल बनवतात… आज राजाच्या घरी रोजच दिवाळी असते म्हणतात. तसे आज सगळेच राजे आहेत मनात आलं की तयार पिठापासून तयार पदार्थांपर्यंत अगदी गोड तिखट हवं तसं आणि हवं तेव्हा मिळतं पण, त्यात गृहिणीच्या म्हणजे घरच्या अन्नपूर्णेच्या हाताची चव असते का?.. आमच्या वेळी.. वगैरे असं काहीच म्हणायचं नाही मला कारण काळाप्रमाणे बदल होतच असतात. प्रत्येकाने बदलायलाच हवं. आताच्या गृहिणीला वेळ नसतो पण हौस तर असते तेव्हा, हे आपण समजून घ्यायला हवं… लक्ष्मीपूजन, पाडवा, आजही दणक्यातच साजरे होतात. बहिण भावाच्या निस्वार्थी प्रेमाचं प्रतीक म्हणजे भाऊबीज. हा दिवाळीतला महत्त्वाचा दिवस. भावाने बहिणीकडे यावं बहिणीने त्याला फराळ अन् सुग्रास भोजन द्यावे. आपल्या भावाला उदंड आयुष्य मिळावं सुख समृद्धी मिळावी. ही देवाला प्रार्थना करीत त्याला ओवाळावं. बालपण आठवावे. मन- मोकळ्या सुखदुःखाच्या गोष्टी कराव्यात… पण आज ‘ओवाळणं ‘हा एक सोपस्कार झालाय का असंही वाटतं. दोघा बहिण भावांना आपल्या वर्तुळातून वेळ काढणं अवघड होऊ लागलंय. असं का झालं? कधी झालं ? हे प्रश्न तसे अवघडच. हा काळाचा महिमा की, संवादाचा, पैशाचा हे कळेनासं झालंय.
लहानपणी भाऊबीजेला मिळालेली रिबन, नक्षीदार पिना, बांगड्या, यात समाधान असायचं. वडिलांकडून पाडव्याला मिळालेल्या ‘बंद्या’ रुपयांचं भारी अप्रूप वाटायचं. आज ज्येष्ठत्व आलं – वयही उताराला लागलं.. त्यामुळे पूर्वीची दिवाळी व आजची दिवाळी मनात रुंजी घालतेच. तरीही, आज’ ‘प्रकाश- ज्योती’ उजळतांना वाटतं..
खरंच, आजची दिवाळी बदलली आहे का? पण नाही.. सगळं तर तसंच आहे. एवढंच की त्यावेळी एवढा लखलखाट, झगमगाट, डामडौल नव्हता. आज नव्या युगाची ‘नवी दिवाळी ‘तेव्हा सारखी मर्यादित नाही. दिवाळी पहाट सारखे कार्यक्रम, खास अशी नाटक, सिनेमा असतात. दिवाळी अंकांनी, पुस्तकांचे स्टॉल सजतात. रसिक आवर्जून याचा आनंद घेतात. आमच्यासारख्या ज्येष्ठांना ती पर्वणीच वाटते. तरुण पिढीला नव्या पिढीला सहली सहभोजन असा सुट्टीचा आनंद कुटुंबाबरोबर घेता येतो एरवीच्या धावपळीत ते शक्य होत नाही म्हणून वाटतं सगळंच हरवलं नाही पण जे कुठे उणं वाटतं, बिनसलंय, यासाठी आपल्या मुलांना नातवंडांना नात्यांतील आपलेपणा, पावित्र्य, प्रेम संबंध, टिकवून ठेवण्याची गरज – या गोष्टी आपणच समजावून सांगायला हव्यात. कुटुंब वर्तुळाचा परीघ वाढविल्यानंतरचे फायदे त्यातील आनंद सांगायला हवेत. त्यांना पटले तर आनंदाचं आहे. तसेच समाजाचे ऋण मानून आपल्याबरोबर दुसऱ्याच्या अंगणातही ‘प्रकाशाचा दिवा’ लावणारेही आहेत. संस्था आहेत. त्यांच्याबरोबर सहकार्यासाठी, आपण असायला हवं. ही काळाची चांगली पाऊले आपणही टाकायला हवीत ! यासाठी दिवाळीच योग्य ! अंधारातून प्रकाशाकडे नेणारा हा सण आहे. दिव्याने दिवा लावून आपल्याही ज्ञानज्योती’ उजळूयात -. ! याच “दीपावलीच्या सर्वांना शुभेच्छा.. !”