प्रा.डॉ.सतीश शिरसाठ
विविधा
☆ सावित्रीबाई फुले यांचे काव्यविश्व… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆
आज ३ जानेवारी — क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांचा जन्मदिन. त्यानिमित्त त्यांना माझी ही काव्यरूपी वंदना —
वंदन सावित्रीबाईमातेला…
अज्ञानाच्या काळोखाला भेदून शिक्षणसूर्य तळपला
परंपरेच्या बेड्या तोडून नवसमाज तू निर्मिला…१
उठा बंधुंनो, अतिशुद्रांनो,– हाक घुमली खेडोपाडी
सनातनी किल्ल्यांचे बुरुज कोसळले अन क्रांतिपुष्प उमलले…२
समतेची ,मानवतेची, धैर्याची तू माऊली
लोकसेवेचे कंकण हाती, भारतवर्षाची तू सावली !
या निमित्ताने सावित्रीबाई फुले यांचे काव्यविश्व माहिती करून घेऊ या. —
भारतीय समाजपरिवर्तनाच्या क्षितिजावरील एक तेजस्वीपणे तळपणारा तारा म्हणून सावित्रीबाई फुले यांना ओळखले जाते. भारतातील अग्रगण्य अशा पुणे येथील विद्यापीठास ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले.यांचे नाव देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे.
मानवी स्वातंत्र्य,समता आणि ह्क्क, वैज्ञानिक दृष्टिकोन, तसेच स्त्रियांच्या सबलीकरणासाठी जीवनभर झटणाऱ्या, लोकभावनांचा आदर करूनही धर्माच्या नावाखाली सर्वसामान्य माणसाच्या शोषणाविरूध्द, अन्यायाविरुद्ध, दैववादाविरूध्द आवाज उठवणाऱ्या, मानवतेच्या उदात्त तत्वांनी भारलेल्या आणि आवाज दडपल्या गेलेल्या, समाजाच्या तळाशी असलेल्या उपेक्षितांच्या जीवनात प्रबोधनाने जागृतीची ज्योत जागवणाऱ्या एक
समाजक्रांतिकारक !—-अशा अनेक पैलूंनी सावित्रीबाई ज्ञात आहेत. समाजासाठी आवश्यक पण अनेकदा न आवडणारे परिवर्तन करणाऱ्या समाजकार्याची त्यांची जातकुळी होती. त्यामुळे त्यांच्या कार्याला पाहिजे तेवढी प्रसिद्धी त्यावेळी मिळाली नाही.
सावित्रीबाई फुले या एक श्रेष्ठ साहित्यिक होत्या; हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील फारसा उजेडात न आलेला पैलू आहे. पुढील बाबींतून त्यांचे साहित्य क्षेत्रातील श्रेष्ठत्व स्पष्ट होते —
१. त्याकाळी अनेक समाजबंधने, कौटुंबिक रितीरिवाज आणि कुटुंबातील कामं यामुळे स्त्रियांमध्ये शिक्षण कमीच होतं. सावित्रीबाईही विवाहापर्यंत शिक्षणापासून दूर होत्या. मात्र लग्नानंतर पती जोतीराव फुले यांच्या सहाय्याने चिकाटी, जिद्द आणि तळमळीने त्या शिकल्या. आणि पुढे त्यांनी साहित्याच्या क्षेत्रात जी भरारी घेतली त्यामुळे त्या आदराला पात्र झाल्या.
२. त्यांचा पहिला कवितासंग्रह ‘ काव्यफुले ‘ १८५४ मध्ये प्रकाशित झाला होता.
३. सावित्रीबाई आणि जोतीराव यांचे कौटुंबिक जीवन वादळी होते. समाजातील उपेक्षित घटकांच्या कल्याणासाठी, त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी, त्यात अडसर असलेल्या धार्मिक शोषणाविरुद्ध ते आयुष्यभर लढले.आजच्या काळातही विस्मयकारक ठरेल अशा क्रांतिकारी जीवनाचा त्यांनी अंगीकार केला होता. (अर्थात त्याची किंमतही त्यांना मोजावी लागली होती).तरीही अशा अतिशय धावपळीच्या जीवनातही सावित्रीबाईंनी आपल्यातल्या लेखिकेला, कवयित्रीला फुलू दिले, हे त्यांचे असामान्यत्व होते.
४. ‘साहित्य हे समाजपरिवर्तनासाठी असावे ‘ या भूमिकेतून सावित्रीबाईंनी साहित्यनिर्मिती केली. सावित्रीबाईंनी समाजव्यवस्थेत परिवर्तन करण्यासाठी, समाजातील शूद्रातिशूद्र यांच्या बरोबरीनेच अज्ञान आणि अन्यायाचे बळी ठरलेल्या, शिक्षणापासून वंचित राहिल्याने आपल्या दैन्याचीही जाणिव नसलेल्या, हतबल होऊन…हे सारे आपल्या नशिबाचे भोग आहेत म्हणून जगणाऱ्या, समाजातील साऱ्याच उपेक्षितांच्या जीवनात आत्मविश्वास जागविण्यासाठी अनेक पध्दतींचा उपयोग केला.लोकशिक्षण ही त्यापैकी एक महत्वपूर्ण पध्दत. आशयपूर्ण आणि लोकजीवनाचा ठाव घेऊन वास्तव चित्रण करणाऱ्या अनेक प्रभावी कवितांतून सावित्रीबाईंनी हे कार्य केले. म्हणूनच त्या कवितांचे मोल अधिक आहे— काव्य, गद्य, पत्रे …या साहित्याच्या क्षेत्रांत त्यांनी मुक्त संचार केला. साहित्य हे समाजशिक्षण आणि समाजपरिवर्तनाचे हत्यार आहे, या भूमिकेतून त्यांनी साहित्य विकासित केले; त्याचा प्रसार केला. सामाजिक परिवर्तनाचे स्वप्न पाहणाऱ्या सावित्रीबाईंच्या कवितेतील सामाजिक आशय धारदार होता. त्यातून समाजबदलाची कळकळ दिसून येते.
आत्तापर्यंत त्यांचे दोन काव्यसंग्रह उपलब्ध आहेत- (१) काव्यफुले. (२) बावन्नकशी सुबोध रत्नाकर.
काव्यफुले या काव्यसंग्रहात एकूण एक्केचाळीस कविता आहेत. यातील ‘श्रेष्ठ धन’ या कवितेतून शिक्षणाचे महत्त्व सांगताना त्या म्हणतात,
विद्या हे श्रेष्ठ धन आहे रे,श्रेष्ठ साऱ्या धनाहून ।
तिचा साठा जयापाशी, ज्ञानी तो मानती जन ।।
— शिक्षणाने युगायुगांची अज्ञानाची आणि दारिद्र्याची गुलामगिरी तोडून टाकण्याचे आवाहन करताना त्या म्हणतात,
“अज्ञानाची दारिद्र्याची गुलामगिरी ही तोडू चला
युगायुगाचे जीवन आपले फेकून देऊ चला चला”.
त्यांचा ‘ बावन्नकशी सुबोध रत्नाकर ‘ हा काव्यसंग्रह जोतीरावांच्या निधनानंतर (१८९२ मध्ये) प्रकाशित झाला होता.
त्यांचे हे सर्व साहित्य आवर्जून वाचावे असेच आहे.
© प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ
ईमेल- [email protected]
मो व वाटसॅप नं. – ९९७५४३५१५२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈