मराठी साहित्य – विविधा ☆ शेकोटी… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सौ. सुचित्रा पवार

??

☆ शेकोटी… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

वातावरणाच्या हेराफेरीत हल्ली कधीपण पाऊस पडतो.सध्या हवेत इतकी उष्णता आहे की हा थंडीचा महिना आहे का ?असा प्रश्न निर्माण झालाय.हाही ग्लोबल वॉर्मिंगचा प्रसाद.या श्रुष्टीचे काय होणार ? ते श्रुष्टी निर्मात्यालाच माहीत!

सहजच मला आमच्या लहानपणीचे थंडीचे दिवस आठवले.ऑक्टोबरपासूनच थंडीची चाहूल लागायची.दिवाळीत कडाक्याची थंडी पडायची.सर्वत्र दाट धुके पडायला सुरुवात व्हायची.शेत शिवार धुक्यात नहायचे.झाडांच्या पानावरून दवाचे थेंब टपकायचे.हातापायाला  भेगा पडायच्या.ओठ फुटून रक्त यायचे,गालाची त्वचा फुटून खरबरीत काळे मिट्ट दिसायचे गाल.कोल्ड क्रीम वगैरे तसले काही प्रकार नसायचे,डोक्याला तेल लावताना तोच तेलाचा हात चेहऱ्यावर,हातावर,पायावर दररोज फिरवायचा.जाड जाड वाकळा अंगावर घेतल्या तरी झोपेत थोडीशी जरी हालचाल झाली की थंडी पांघरुणात शिरायची म्हणून उठल्या उठल्या पहिल्यांदा चुलीपुढं जाऊन बसायचं.

दिवाळीच्या अंघोळीला तर पहाटे उठूच वाटायचे नाही.तेल लावून कडक पाण्याचा तांब्या अंगावर ओतेपर्यंत अंग काकडून जायचे.अंघोळ केली की चुलीपुढं ऊबीला बसायचं थोडं फटफटायला लागलं की मग फटाके उडवायला  अंगणात जायचं.

शेतकरी पीक राखणीला शेतात जायचे.जागोजागी मग शेकोट्या पेटायच्या.अंगणात,रस्त्याच्या कडेला,शेतात आसपासचे चार पाच शेतकरी मिळून शेकोट्या करायचे आणि गप्पा मारत शेकोटीभोवती बसायचे.शेतात चगळाची कमी नसायची त्यामुळं शेकोटीच्या ज्वाला कमरेइतक्या ,डोक्याइतक्या उंच उंच जायच्या.रात्रभर असे आळीपाळीने जागून पहाटे पहाटे झोप घ्यायची,दिवस उगवला की घरला यायचे.

आम्हीही वाकळेतून उठून पहिले चुलीपुढं बसायला जागा धरायचो.चुलीपुढं गर्दी होऊ लागली की तिथून उठून अंगणात येऊन शेकोटी पेटवायचो.पूर्वी प्रत्येकाच्या परसात उकिरडा असायचा,त्यामुळं चगळाची कमतरता नसायची पण जो पण शेकोटीला येईल त्याने स्वतःचा चगाळ आणायचाच नाहीतर शेकोटीपासून हकलपट्टी व्हायची त्यामुळं नियम पाळलाच जायचा.चगाळ,पालापाचोळा ,चिपाड एखादं शेणकूट बारकी वाळलेली झुडुपे आमच्या शेकोटीला काही चालायचे.शेकोटी जसजशी रसरसायची तसा गप्पांचा फड रंगायचा.कधी कविता कधी पाढे ,नकला तर कधी सिनेमातली गाणी! प्रत्येकाची काहीतरी विशेषता असायचीच. बरेचदा गाण्यापेक्षा विडंबनच जास्त असायचे.

त्या त्या वेळच्या फेमस गाण्यात आपलं कायतर घुसडून जोडायच न त्याचं विडंबन करायचं.

मेहबुबा मेहबुबा  या गाण्यावर त्यावेळी वात्रट पोरांनी केलेलं खट्याळ विडम्बन असायचं-

मेहबुबा मेहबुबा

छ्ड्डीत शिरला नागोबा..आणि अशीच गाण्यांची, कवितांची विडंबन…

हातापायाला ऊब मिळेपर्यंत पाठ गार पडायची. मग शेकोटीकडे पाठ करून बसायचे.बऱ्याचदा तोंडाने फुंकर मारून जाळ पेटवताना एकदम ज्वाला भडकायची आणि पुढील केसांना हाय लागून तिथले केस प्लास्टिक जळल्यासारखे गोळा व्हायचे.दाताला तिथंच बसून राखुंडी लावायची ,ऊबीपासून दूर जावेच वाटायचं नाही .पाठीवर उन्ह येईपर्यंत शेकोटीची ऊब अंगावर घेत राहायचो.कधी शेंगा तर कधी हरभऱ्याचे ओले किंवा सुकलेले डहाळे विझत आलेल्या शेकोटीच्या आरात टाकायचे आणि भाजल्यावर राखेतून शोधून खायचो,ओठ,बोटे,गाल काळेमिट्ट व्हायचे पण ते आम्हाला महत्वाचे नव्हते, भाजलेला हावळा खाण्याचा आनंद अभाळाएव्हढा मोठ्ठा होता.

लहान मुलांच्या शेकोटीला मोठी माणसे कधी येत नसत,चुकून आलेच कुणीतरी आम्हाला खूप आनंद व्हायचा.किती मजेशीर आणि आनंदी होते जीवन! कुठली घाई नाही की जीवघेणी स्पर्धा नाही की कोणता ताण नाही! उन्ह चढू लागतील तसतशी एक एक मेंबर शेकोटीपासून काढता पाय घ्यायचे.कुणाला मधूनच हाक आल्यावर घरी जावे लागायचे.शेवटी जो थांबेल त्याने गरम राखेवर पाणी ओतायचे अन्यथा आसपासचा उकिरडा किंवा गंजी पेटण्याचा धोका असायचा म्हणून शेवटच्या सदस्याने पाणी ओतायचे किंवा माती टाकायची.

घरातले मोठे शेताभातात जायचे,म्हातारे कोतारे घर राखायला अन आम्ही शाळेला.शेकोटीची राख मात्र आम्ही पुन्हा यायची वाट पहात तिथेच बसायची.

आजही आम्ही तिथेच शेकोटीपुढं आहोत आणि शेकोटीच्या उबेत आहोत असे वाटतेय. काय नव्हतं त्या ऊबीत?सवंगड्यांचे अतूट स्नेहबंध,आसपासच्या शेजाऱ्यांची आपुलकी,मोठ्यांचा धाक,मुक्त ,निष्पाप ,समृद्ध बाल्य,अवतीभवतीचा संपन्न निसर्ग आणि बरेच काही जे काळाबरोबर वाहून गेलं.आमच्या मोकळ्या वेळेवर फक्त आमचाच अधिकार होता.

आज निसर्गचक्र बिघडलेय माणसाच्या चुकीमुळेच.शेकोटीच्या उबीची मजा अनुभवयाला ना हवामान तसे राहिले न माणसे!दिवस उगवायच्या आधीच मुलांना गरम पाण्यात बुचकळून स्कूल बसमध्ये बसावे लागते आणि बसच्या चाकाच्या गतीतच बाल्य सम्पते.कुठे असतो वेळ स्वतःच्या मनाप्रमाणे घालवायला किंवा निसर्गातील गमतीजमती अनुभवयाला?आणि ते न अनुभवल्यामुळेच निसर्गाची ओढ अन प्रेमही उत्पन्न होत नाहीय.

भिंतीतल्या शाळेसाठी भिंतीबाहेरची शाळा भिंतीबाहेरच रहाते.

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चव आणि चटक… ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ चव आणि चटक… ☆ श्री अरविंद लिमये ☆

चव, लज्जत, गोडी, रुचि, खुमारी असे वेगवेगळ्या अर्थछटा असणारे शब्द म्हणजेच ‘स्वाद’ या शब्दाची अर्थरूपे आहेत. स्वाद काय किंवा त्या शब्दाचे हे विविध अर्थ काय थेट खाद्यपदार्थांशी जोडले गेलेले आहेत असे वाटणे स्वाभाविक आहे. कारण गोडी, रुचि म्हटलं की विविध चविष्ट पदार्थांच्या आठवणीनेच  तोंडाला पाणी सुटते. हे सगळेच शब्द ऐकतानाही स्वादिष्ट वाटावेत असेच! खरंतर विविध खाद्यपदार्थांच्या तितक्याच विविध चवी आणि त्यांचे वर्णन करणारी तशीच चविष्ट विशेषणे असा मोठा ऐवज स्वाद या अल्पाक्षरी शब्दात कसा सामावलेला आहे हे पहाणे अतिशय गंमतीचे ठरेल. त्यासाठी स्वाद या शब्दाचे आणि वर उल्लेख केलेल्या चव, रूचि आदी अर्थशब्दांचे मैत्रीपूर्ण धागे परस्परात  गुंफवत इतरही अनेक शब्द कसे आकाराला आलेले आहेत हे पहाणे अगत्याचे आहे. खमंग, चमचमीत,  झणझणीत,  चटकदार,  लज्जतदार,  मसालेदार,  चवदार,  खुमासदार,  मिष्ट, चविष्ट, खरपूस.. अशी अनेक विशेषणे त्या त्या पदार्थांच्या स्वादांचे असे कांही चपखल वर्णन करतात की ते पदार्थ न चाखताही त्यांचा आस्वाद घेतल्याचे (क्षणिक कां होईना) समाधान मनाला स्पर्शून जातेच.

खरंतर फक्त खाद्यपदार्थांनीच नव्हे तर अशा स्वादाधिष्ठीत असंख्य शब्दांनीही आपली खाद्यसंस्कृती समृद्ध केलेली आहे असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही.

अशा अनेक शब्दांतून व्यक्त होणारा आणि त्या त्या पदार्थांमध्ये मुरलेला स्वाद चाखणे म्हणजेच त्या पदार्थांचा आस्वाद घेणे!

या ‘आस्वाद’ शब्दाला अंगभूत अशी एक शिस्त अपेक्षित आहे. आस्वाद घेणे म्हणजेच चवीने खाणे. आस्वादाला बेशिस्त वर्ज्य आहे. म्हणूनच मटकावणे,  ताव मारणे,  फडशा पाडणे, ओरपणे म्हणजेही खाणेच पण हे ‘चवीने खाणे’ नसल्याने  ‘आस्वाद’ म्हणता येणार नाही. कारण आस्वादाला जशी शिस्त तसाच आनंदही अपेक्षित आहे. ताव मारण्यात किंवा फडशा पाडण्यात जिथे आस्वाद नव्हे तर हव्यास मुरलेला आहे तिथे आस्वाद घेण्यातला आनंद कुठून असणार?

एखाद्या पदार्थाची अशा हव्यासाने चटक लागते. आणि एकदा का अशी चटक लागली की पोट भरलेले असूनही तो पदार्थ समोर आला की परिणामांची पर्वा न करता तो खायचा मोह होतोच. हे खाणे आस्वाद घेणे नव्हे तर जिभेचे चोचले पुरवणेच ठरते!

आस्वादाला, चवीने खाण्याला आरोग्यदायी आनंद अपेक्षित आहे आणि हव्यासाची परिणती ठरलेली चटक मात्र अनारोग्याला आमंत्रण देते!

आस्वाद या शब्दाची चवीशी जुळलेली ही नाळ खाद्य संस्कृतीइतकीच आपल्या संपूर्ण जगण्याशीही निगडित आहे. आस्वाद या शब्दाचा परीघ आपलं संपूर्ण जगणं व्यापून अंगुलीभर उरेल एवढा विस्तृत आहे. म्हणूनच जगण्यातला आनंद फक्त चांगल्या खाद्यपदार्थांचा आस्वाद पुरताच मर्यादित स्वरूपाचा नाही तर विविध आनंददायी गोष्टींचा आस्वाद घेत आपले जगणे समृद्ध करता येते.

गीत, संगीत, चित्रपट, नृत्य, नाटक अशा विविध कला प्रकारांचा आस्वाद हे याचेच उदाहरण ! अशा कलाप्रकारांमधे रस असणारे त्यांचा रसिकतेने आस्वाद घेऊ शकतात! मग एखादे गाणे आस्वाद घेणाऱ्याचे मन प्रसन्न करते, नृत्य त्याला मंत्रमुग्ध करते, चित्रपट सुखावतो, नाटक उत्कट नाट्यानुभव देते. हे सगळे विशिष्ठ कला सादर करणारे ते ते कलाकार सादरीकरणाचा आनंद घेत तल्लीन होऊन ती सादर करत असतात आणि रसिक रसिकतेने त्या सादरीकरणाचा आस्वाद घेत असतात म्हणूनच शक्य होते.

जगण्याचेही तसेच. आनंदाने जगणे म्हणजे तरी काय? तर समोर येणारा प्रत्येक क्षण आनंदाने स्वीकारून जगण्याचाही आस्वाद घेत जगणे. मग ते क्षण सुखाचे असोत वा दुःखाचे,यशाचे असोत वा अपयशाचे.. ते तात्कालिक आहेत, क्षणभंगुर आहेत हे जे जाणतात, तेच त्या त्या क्षणांचा आस्वाद घेत जगू शकतात. आपल्याला गोड पदार्थ आवडतात म्हणून फक्त गोड पदार्थच खात राहून इतर विविध चवींचे पदार्थ वर्ज्य करून कसे चालेल? कारण वेगवेगळ्या रुचि,रस,आणि स्वादच खाण्यातील गोडी टिकवून ठेवत असतात जे आरोग्य आणि आनंदी जगण्यासाठी पूरक ठरत असते. जगणेही यश-अपयश, सुख-दुःख, ऊन-पाऊस यांच्यातील पाठशिवणीच्या खेळामुळेच एखाद्या चविष्ट पदार्थ सारखे खुमासदार बनत असते!

खाण्यातली असो वा जगण्यातली अशी खुमारी चाखण्यासाठी आपण खऱ्या अर्थाने आस्वादक मात्र बनायला हवे !

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जरा विसावू या वळणावर….! ☆ श्री राहूल लाळे ☆

श्री राहूल लाळे

परिचय

शिक्षण –

  • B.E.:Electronics & telecommunications.
  • M.Sc.: Engineering Business Management.
  • इंग्लंडमधील  University of Warwik  विद्यापीठाचे सुवर्णपदक प्राप्त.

संप्रति –

  • भारत फोर्ज, पुणे येथे असोसिएटेड व्हाईस प्रेसिडेंट येथे कार्यरत.
  • भारत फोर्जच्या Machined component division चे  Head of Maintenance.
  • भारत फोर्ज तर्फे अनेक सेमिनार मध्ये प्रतिनिधित्व.
  • Association of Maintenance Management & Reliability forum चे क्रियाशील सभासद.
  • तसेच Corporate social responsibility अंतर्गत चालवल्या जाणा-या वृद्धाश्रमाशी निगडीत.
  • रोटेरियन, पुणे रोटरी क्लब.

अन्य – संगीत, गायन, वाचन, लेखन, काव्य, खेळ, पर्यटन, गिर्यारोहण अशा विविध कलांमध्ये रूची  आणि सहभाग .

?  विविधा ?

☆ जरा विसावू या वळणावर….! ☆ श्री राहूल लाळे ☆ 

लहानपणापासून…… रेडिओवर…”भले बुरे जे घडून गेले… विसरुनी जाऊ सारे क्षणभर”… हे गाणं अनेकदा कानावर पडत आलंय…!

जेव्हांही हे गाणं ऐकतो ..हळूहळू ते गाणं कानात झिरपतं आणि ऐकत रहावसं वाटतं…… अर्थपूर्ण कडवे…सुरेख चाल…! तेंव्हापासुन collection मधलं हे ही एक नितांत आवडीचं गाणं…!

खरंच आहे…आयुष्यात किती तरी वळणे येतात… कधी संकटातून.. वेदनेतून…कधी आनंदातून… ही वळणं येतातच येतात.. मग ते वळण कौटुंबिक स्तरातील असो अथवा नात्या समाजातलं, मित्रपरिवार असो… किंवा कामाच्या ऑफिसच्या ठिकाणी…! अगदी शाळा, कॉलेज, शैक्षणिक वयातलं सुद्धा… पुढचा प्रवास बदलणारा असतो… हेच वळण जे निर्विकार असतं.. एक वाट संपुन दुसरं सुरू होणार असल्याचं एक अंतराळ…अवकाश दाखवणारं असतं…! भलं बुरं.. घडामोडी घडून गेलेल्या असतात नि त्यामधला हा विसावा असतो …क्षणिक या वळणावर…!

खुप उन्हांनं बेजार झाल्यावर जसं पाऊस पडण्यापूर्वीचं आभाळ तयार होतं किंवा खूप पाऊस पडून कंटाळवाणं झाल्यावर पावसाने उघडीप दिल्यानंतर जसं स्वच्छ ऊन पडतं ना अगदी तसं..!

ह्याच वळणावर जरा आयुष्य संथ झालेलं असतं… मनाला वाटतं की घडामोडींना पूर्णविराम मिळालाय पण वास्तवात तो स्वल्पविराम असतो…… जसं एक वाक्य संपत असतं नी दुसरं वाक्य सुरू होण्याच्या बेतात असतं  तसंच जणू काही…!

पान उलटणार असतं नि माहिती नसतं पुढच्या पानावर काय ओळी लिहिल्यात ते…….! पुस्तक बंद करता येतं हो एकवेळ, पण आयुष्याचं पुस्तक शेवटच्या श्वासापर्यंत वाचावंचं लागतं…! नको असलेली पानं सोडून पुढं जाता येत नाही… अन हवी असलेली मागची पानं परत कधीतरी वाचताही येत नाहीत…! ती आपोआप पालटत असतात…! पलटवावीच लागतात…नवीन वाचावीच लागतात….! फक्त विसावा काय तेवढा आपला… बाकी वळणांचं नशिबावर सोपवुन आपण जीवन प्रवास करायचा…!

या वर्षाआधीच्या दोन वर्षांत आपण करोना – लॉक डाऊन – क्वारंटाईन यातून गेलो होतो. याच  कारणांमुळे अनेक दुःखद घटनांना सामोरेही गेलो  होतो.   आपल्या दैनंदिन आयुष्यात – कौटुंबिक, सामाजिक आणि व्यावसायिक सर्वच क्षेत्रात अनेक अडचणीं ना सामोरे गेलो होतो  – आर्थिक दृष्टया फटका बसला होता.  पण या सरत्या वर्षानं  आपल्या सर्वांच्या जीवनप्रवासात  आलेल्या बिकट वाटेतही आशेचा किरण दाखवला. – आपल्या सर्वांची काळाने जरा जास्तंच  परीक्षा घेतली. पण त्यातही आपण तावून सुलाखून बाहेर आलो आहोत.

करोनाचं सावट आता परत येईल अशा बातम्या येत आहेत, पण  न्यू नॉर्मल का काय म्हणतात त्याची आपल्याला चांगलीच सवय झाली आहे – थोडीफार ती गेली असेल तर परत ती लावायला लागेल . अनेक बंधनं  कंटाळा न करता आपल्यावर घालून घेऊन संयमाने वागायला लागेल.

अशा वेळी रजनीगंधा चित्रपटातलं मधलं माझं एक आवडतं  गाणं मला आठवतं  – “कई  बार यूं भी देखा है – ये जो मन की सीमारेखा है – मन तोडने लगता है – अनजानी आंस के पीछे … मन दौडने  लगता है “

सिनेमात गाण्याचा संदर्भ वेगळा असला तरी –  रोज हेच व्हायला पाहिजे – असंच  व्हायला हवं या मर्यादा आपणच आपल्याला घालून घेतलेल्या असतात – अनेकदा इतरांनी आपल्याला घातलेल्या असतात – त्या अनेकदा आपण पाळतो – अनेकदा त्या तोडून अमर्याद जागून आनंद घेण्याचा प्रयत्न करतो –

आता या काळात सर्व प्रतिबंधात्मक उपाय ,काळजी घेत राहून आपण आपल्यावरच घालून ठेवलेल्या कामाच्या- काही वेळेच्या आणि  इतर काही मर्यादा ओलांडून आपण नक्कीच मोकळेपणाने   आनंद घेऊ शकतो हे मात्र कळाले.

लवकरच एक आयुष्यातलं अवघड पण लक्षात राहील असं वळण संपून नवीन सुरु होईल….

आणि असंख्य अडचणी – खडतर मार्ग येऊन गेले असले तरी  सर्वच काही निराशजनक नाहीये..

सूर्योदय -सूर्यास्त चालू आहे – ऑफिसची -व्यवसायाची दैनंदिन  व्यावहारिक -कौटुंबिक अगदी सामाजिक- सांस्कृतिकही कामं चालू आहेत. प्रेम-माया , कुटुंबासाठीचा वेळ, संवेदनशीलता कल्पकता, शिकण्याची प्रोसेस,गप्पा गोष्टी , लेखन-वाचन, नाती-गोती , भक्ती, व्यायाम-विश्रांती ,आनंदित राहणं याला लॉकडाऊन, स्लो डाऊन कोण करू शकतो? –

यावर्षी अगदी संक्रांती- पाडव्यापासून गणपती – दसरा -दिवाळी पर्यंत सगळे सण  जोशात साजरे झाले

स्लो डाऊन  कायमचं राहणारं नाही आणि  ” As long as life is there, there is a hope”  याची खात्री पटली.

 मरनेवालों के लिये मरा नहीं  जाता – 

उनकी यादे जरूर  रहती है –

जीवन का सफर चालू रहता है !

शेवटी

जीवन है चलने  का नाम !

चलते रहो सुबह-ओ-शाम !!

दोन पावलं मागं सरकलो होतो …आता चार पावलं परत पुढे आलोय – रोज पुढंच जायचंय- मोठा पल्ला गाठायचाय – नक्कीच गाठू.

बरंच  काही करायचंय – अनेक वाटा शोधायच्यात –

परिस्थिती नक्कीच बदलतीय – नवीन आव्हानं सामोरी येतील – – पुढच्या वेगवान प्रवासासाठी…

रिता जरी दिन वाटे

मन भरलेले ठेवू

धीर धरून सदा

आशा जागती ठेवू

भले बुरे ते विसरुनी जाऊ

धैर्य -आनंदाने पुढे जाऊ

येणाऱ्या नववर्ष २०२3च्या हार्दिक शुभेच्छा !!

© श्री राहुल लाळे

पुणे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सावित्रीबाई फुले यांचे काव्यविश्व… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

प्रा.डॉ.सतीश शिरसाठ

?  विविधा ?

☆ सावित्रीबाई फुले यांचे काव्यविश्व… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆ 

आज ३ जानेवारी — क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांचा जन्मदिन. त्यानिमित्त त्यांना माझी ही काव्यरूपी वंदना —

वंदन सावित्रीबाईमातेला…

अज्ञानाच्या काळोखाला भेदून शिक्षणसूर्य तळपला

परंपरेच्या बेड्या तोडून नवसमाज तू निर्मिला…१

उठा बंधुंनो, अतिशुद्रांनो,– हाक घुमली खेडोपाडी

सनातनी किल्ल्यांचे बुरुज कोसळले अन क्रांतिपुष्प उमलले…२

समतेची ,मानवतेची, धैर्याची तू माऊली

लोकसेवेचे कंकण हाती, भारतवर्षाची तू सावली !

या निमित्ताने सावित्रीबाई फुले यांचे काव्यविश्व माहिती करून घेऊ या. —

भारतीय समाजपरिवर्तनाच्या क्षितिजावरील एक तेजस्वीपणे तळपणारा तारा म्हणून सावित्रीबाई फुले यांना ओळखले जाते. भारतातील अग्रगण्य अशा पुणे येथील विद्यापीठास ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले.यांचे नाव देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे.

मानवी स्वातंत्र्य,समता आणि ह्क्क, वैज्ञानिक दृष्टिकोन, तसेच स्त्रियांच्या सबलीकरणासाठी जीवनभर झटणाऱ्या, लोकभावनांचा  आदर करूनही धर्माच्या नावाखाली सर्वसामान्य माणसाच्या शोषणाविरूध्द, अन्यायाविरुद्ध, दैववादाविरूध्द आवाज उठवणाऱ्या, मानवतेच्या उदात्त  तत्वांनी भारलेल्या आणि आवाज दडपल्या गेलेल्या, समाजाच्या तळाशी असलेल्या उपेक्षितांच्या जीवनात प्रबोधनाने जागृतीची ज्योत जागवणाऱ्या एक

समाजक्रांतिकारक !—-अशा अनेक पैलूंनी सावित्रीबाई ज्ञात आहेत. समाजासाठी आवश्यक पण अनेकदा न आवडणारे परिवर्तन करणाऱ्या समाजकार्याची त्यांची जातकुळी होती. त्यामुळे त्यांच्या कार्याला पाहिजे तेवढी प्रसिद्धी त्यावेळी मिळाली नाही.

सावित्रीबाई फुले या एक श्रेष्ठ साहित्यिक होत्या; हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील फारसा उजेडात न आलेला पैलू आहे. पुढील बाबींतून त्यांचे साहित्य क्षेत्रातील श्रेष्ठत्व स्पष्ट होते —

१. त्याकाळी अनेक समाजबंधने, कौटुंबिक रितीरिवाज आणि कुटुंबातील कामं यामुळे स्त्रियांमध्ये शिक्षण कमीच होतं. सावित्रीबाईही विवाहापर्यंत शिक्षणापासून दूर होत्या. मात्र लग्नानंतर पती जोतीराव फुले यांच्या सहाय्याने चिकाटी, जिद्द आणि तळमळीने त्या शिकल्या. आणि पुढे त्यांनी साहित्याच्या क्षेत्रात जी भरारी घेतली त्यामुळे त्या आदराला पात्र झाल्या.

२. त्यांचा पहिला कवितासंग्रह ‘ काव्यफुले ‘ १८५४ मध्ये प्रकाशित झाला होता.

३. सावित्रीबाई आणि जोतीराव यांचे कौटुंबिक जीवन वादळी होते. समाजातील उपेक्षित घटकांच्या कल्याणासाठी,  त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी, त्यात अडसर असलेल्या धार्मिक शोषणाविरुद्ध ते आयुष्यभर लढले.आजच्या काळातही विस्मयकारक ठरेल अशा क्रांतिकारी जीवनाचा त्यांनी अंगीकार केला होता. (अर्थात त्याची किंमतही त्यांना मोजावी लागली होती).तरीही अशा अतिशय धावपळीच्या जीवनातही सावित्रीबाईंनी आपल्यातल्या लेखिकेला, कवयित्रीला फुलू दिले, हे त्यांचे असामान्यत्व होते.

४. ‘साहित्य हे समाजपरिवर्तनासाठी असावे ‘ या भूमिकेतून सावित्रीबाईंनी साहित्यनिर्मिती केली. सावित्रीबाईंनी समाजव्यवस्थेत परिवर्तन करण्यासाठी, समाजातील  शूद्रातिशूद्र यांच्या बरोबरीनेच अज्ञान आणि अन्यायाचे बळी ठरलेल्या, शिक्षणापासून वंचित राहिल्याने आपल्या दैन्याचीही जाणिव नसलेल्या, हतबल होऊन…हे सारे आपल्या नशिबाचे भोग आहेत म्हणून जगणाऱ्या, समाजातील साऱ्याच उपेक्षितांच्या जीवनात आत्मविश्वास जागविण्यासाठी अनेक पध्दतींचा उपयोग केला.लोकशिक्षण ही त्यापैकी एक महत्वपूर्ण पध्दत. आशयपूर्ण आणि लोकजीवनाचा ठाव घेऊन वास्तव चित्रण करणाऱ्या अनेक प्रभावी कवितांतून सावित्रीबाईंनी हे कार्य केले. म्हणूनच त्या कवितांचे मोल अधिक आहे— काव्य, गद्य, पत्रे …या साहित्याच्या क्षेत्रांत त्यांनी मुक्त संचार केला. साहित्य हे समाजशिक्षण आणि समाजपरिवर्तनाचे हत्यार आहे, या भूमिकेतून त्यांनी साहित्य विकासित केले; त्याचा प्रसार केला. सामाजिक परिवर्तनाचे स्वप्न पाहणाऱ्या सावित्रीबाईंच्या  कवितेतील सामाजिक आशय धारदार होता. त्यातून समाजबदलाची कळकळ दिसून येते.

आत्तापर्यंत त्यांचे दोन काव्यसंग्रह उपलब्ध आहेत- (१) काव्यफुले. (२) बावन्नकशी सुबोध रत्नाकर.

काव्यफुले या काव्यसंग्रहात एकूण एक्केचाळीस कविता आहेत. यातील ‘श्रेष्ठ धन’ या कवितेतून शिक्षणाचे महत्त्व सांगताना त्या म्हणतात,

विद्या हे श्रेष्ठ धन आहे रे,श्रेष्ठ साऱ्या धनाहून ।

तिचा साठा जयापाशी, ज्ञानी तो मानती जन ।।

— शिक्षणाने युगायुगांची अज्ञानाची आणि दारिद्र्याची गुलामगिरी तोडून टाकण्याचे आवाहन करताना त्या म्हणतात,

“अज्ञानाची दारिद्र्याची गुलामगिरी ही तोडू चला

युगायुगाचे जीवन आपले फेकून देऊ चला चला”.

त्यांचा ‘ बावन्नकशी सुबोध रत्नाकर ‘ हा काव्यसंग्रह जोतीरावांच्या निधनानंतर (१८९२ मध्ये) प्रकाशित झाला होता.

त्यांचे हे सर्व साहित्य आवर्जून वाचावे असेच आहे.

© प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ

ईमेल- [email protected]

मो व वाटसॅप नं. – ९९७५४३५१५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! – विधायक कार्य ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

 😂 चं म त ग ! 😅 विधायक कार्य ! 🤠 ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

“गुडमॉर्निंग पंत”

“नमस्कार, नमस्कार. पण आज तुझ्या आवाजात उत्साह वाटत नाही.”

“पंत कसा असणार उत्साह ? बारा तेरा दिवस सारखं घरात बसून कंटाळणार नाही का माणूस ?”

“तू म्हणतोयस ते बरोबरच  आहे. अरे सारखं सारखं घरात बसून, मला पण मी US ला मुलाच्या घरी तर नाही ना, असं वाटायला लागलंय हल्ली ! पण मग तुझ्या घरातल्या कामांचे काय, सगळी कामं संपली की काय ?”

“पंत आता साऱ्या कामांची एवढी सवय झाल्ये की… “

“दोन तीन तासात तू मोकळा होत असशील ना रोज ? “

“हो ना, मग करायच काय हा प्रश्न आ वासून उभा राहतो.”

“अरे मग बायको बरोबर गप्पा मारायच्या !”

“आता लग्नाला दोन वर्ष होऊन गेली, सगळ्या गप्पा बिप्पा मारून संपल्या.”

“काय सांगतोस काय, दोन वर्षात गप्पा संपंल्या ? पण आमच्या लग्नाला चाळीस वर्ष झाली तरी आमच्या गप्पा अजून काही संपत नाहीत !”

“काय सांगता काय पंत, तुमच्या लग्नाला चाळीस वर्ष झाली तरी तुमच्या गप्पा अजून…. “

“अरे म्हणजे ही गप्पा मारते आणि मी गप्प राहून फक्त हुंकार देत त्या ऐकतो एव्हढेच ! ते सोड, गप्पा नाही तर नाही बायको बरोबर पत्ते बित्ते तरी…… “

“नाही पंत, ती पुण्याची असल्यामुळे तिला पत्त्यांचा तिटकाराच आहे, लहानपणा पासून.”

“मग काही वाचन…… “

“अहो पंत, वाचून वाचून वाचणार तरी किती आणि काय काय ? आणि दुसरं असं की वाचायला सुरवात केली,  की झोप अनावर होते आणि झोपून उठलं की पहिली पाच सात मिनिट कळतच नाही, की आपण दुपारचे झोपून उठतोय का रात्रीचे ?”

“पण मग टीव्ही आहे ना बघायला ?”

“अहो पंत त्यावर पण हल्ली सगळे जुने जुने एपिसोड दाखवतायत, काही ‘राम’ नाही उरला आता त्यात !”

“मग टीव्ही वरच्या बातम्या….”

“त्या करोना व्हायरस घालवायला चांगल्या आहेत !”

“म्हणजे, मी नाही समजलो.”

“पंत, म्हणजे त्या बातम्या करोना व्हायरसला दाखवल्या ना, तर तो त्या बघून स्वतःहून पळून जाईल चीनला !”

“काही तरीच असतं तुझ बोलण !  आता मला सांग, आज काय काम काढलेस माझ्याकडे ?”

“पंत, माझ्याप्रमाणेच आपल्या चाळीतले सगळे रहिवाशी बोअर झालेत आणि…. “

“चाळ कमिटीचा अध्यक्ष या नात्याने ते तुला मोबाईलवरून सारखे फोन करून यावर काहीतरी उपाय करा, टाइम पास कसा होईल ते सांगा, असे सतवत असतात, बरोबर ?”

“कस अगदी बरोबर ओळखत पंत !”

“अरे चाळीस वर्षांचा तजुरबा आहे मला चाळकऱ्यांचा, सगळ्यांची नस अन नस ओळखून आहे म्हटलं मी !”

“हो पंत, आपल्या चाळीतील तुम्हीच सर्वात जुने रहिवासी, त्यामुळे तुम्हाला… “

“मस्का बाजी पुरे, तुझा प्रॉब्लेम माझ्या लक्षात आलाय आणि त्यावर माझ्याकडे उपाय सुद्धा आहे !”

“सांगा सांगा पंत, तुमचा उपाय ऐकायला मी अगदी आतुर झालोय !”

“सांगतो, सांगतो, जरा धीर धरशील की नाही !”

“हो पंत, पण एक प्रॉब्लेम… “

“आता कसला प्रॉब्लेम?”

“अहो सध्या सगळेच कोरोनाच्या संकटामुळे आपापल्या घरी अडकलेत आणि एकमेकांना भेटू…”

“शकत नाहीत, माहित्ये मला.

खरच दुर्भाग्याची गोष्ट आहे ना ?”

“यात कसली दुर्भाग्याची गोष्ट, साऱ्या जगावरच संकट ओढवलं आहे त्याला… “

“अरे त्या बद्दल नाही बोलत मी.”

“मग कशा बद्दल बोलताय पंत ? “

“आता हेच बघ ना, गेल्या बारा तेरा दिवसात मुंबईची हवा, कसलेच पोल्युशन नसल्या मुळे कधी नव्हे इतकी शुद्ध झाली आहे आणि त्याचा आनंद घ्यायचे लोकांच्या नशिबातच नाही. उलट लोकांना मास्क लावून फिरायची पाळी आली आहे.”

“हो ना पंत, पण माझी बायको म्हणते मी अजिबात मास्क नाही लावणार.”

“का, ती पुण्याची आहे म्हणून का ?”

“म्हणजे ?”

“अरे जसा पूर्वी पुणेकरांचा हेल्मेटला विरोध होता तसा मला वाटलं मास्कला पण आहे की काय, म्हणून मी विचारलं.”

“तस नाही पंत, त्या मागे तीच वेगळेच लॉजिक आहे.”

“कसलं लॉजिक ?”

“ती म्हणते ‘मी मास्क लावला तर, मी रागावून गाल फुगवून बसल्ये हे तुम्हाला कस काय कळणार ?”

“खरच कठीण आहे रे तुझ !”

“ते जाऊ दे पंत, आता दोन वर्षात मला सवय झाल्ये त्याची.  पण आधी मला सांगा तुमच्याकडे टाइमपास साठी काय… “

“अरे नेहमीच टाइमपास न करता, सध्याच्या परिस्तिथीत थोडे विधायक कार्य पण करायला शिका ! एकदा का या संकटातून सुटका झाली की मग जन्मभर टाइमपासच करायचा आहे.”

“म्हणजे, मी नाही समजलो?”

“सांगतो, आता आपल्या चाळीत एका मजल्यावर पंधरा बिऱ्हाड आणि चार मजले मिळून साठ, बरोबर ?”

“बरोबर !”

“तर तू चाळ कमिटीचा अध्यक्ष या नात्याने सगळ्यांना सांग, येत्या रविवारी सगळ्यांनी घरटी दहा दहा पोळ्या आणि त्यांना पुरेल इतकी कुठलीही भाजी भरून ते डबे चाळ

कमिटीच्या ऑफिस मधे आणून द्यावेत.”

“आणि ?”

“तू आज एक काम करायचस,  आपल्या के ई एम हॉस्पिटल मधे जाऊन तिथल्या अधिकाऱ्यांना भेटून सांगायचं,  की येत्या रविवारी आमच्या अहमद सेलर चाळी तर्फे,  आम्ही जेवणाचे साठ डबे पाठवणार आहोत. ते आपल्या हॉस्पिटल मधे कार्यरत असणाऱ्या डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्ड बॉईजना वाटायची व्यवस्था करा.”

“काय झकास आयडिया दिलीत पंत, त्या निमित्ताने सगळ्यांचा वेळ पण जाईल आणि काहीतरी विधायक कार्य हातून घडल्याचा आनंद पण मिळेल ! धन्यवाद पंत !”

© श्री प्रमोद वामन वर्तक

०३-०२-२०२३

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग 50 – स्वामीजी आणि मॅडम कॅल्व्हे ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग 50 – स्वामीजी आणि मॅडम कॅल्व्हे ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

अमेरिका आणि युरोप खंडात प्रचंड लोकप्रियता मिळवलेली रंगभूमीवरील गायिका मॅडम एम्मा कॅल्व्हे एका मेट्रोपोलियन ऑपेरा कंपनीबरोबर युरोपातून अमेरिकेत आलेली. तिची रंगभूमीवरची भूमिका, गायन सर्व काही तिनं गाजवलेले. त्यामुळे अमाप संपत्ति आणि प्रचंड लोकप्रियता, प्रसिद्धी मिळाली तरी सुद्धा ती मात्र मनातून पुरती दु:खी होती. खचलेली होती. पैसा आणि प्रसिद्धीमुळेच की काय, कला क्षेत्रात अशी परिस्थिति उद्भवते. पुरुषांच्या दृष्टीकोणातून स्त्री ही भोगवादीच वस्तु असते याचे तिने अनुभव घेतले. उत्कट आणि निरपेक्ष प्रेम तिला मिळत नव्हतं. दोन जणांशी ब्रेक अप झालं. त्यामुळे ती उध्वस्त झाली होती. ही दुसर्‍यांदा घडलेली घटना ताजी असतानाच ती आपल्या लहान मुलीला घेऊन अमेरिकेत आली होती. रंगभूमीची सेवा मात्र चालूच होती . तिच्या जवळच्या काहींना तिनं यातून बाहेर पडावं असा वाटत होतं. शिकागोमध्ये ज्या ऑडिटोरीयममध्ये तिचे कार्यक्रम होत होते, त्या ओपेरा हाऊसचे व्यवस्थापक मिलवर्ड अॅडम्स यांच्याकडे त्यावेळी  विवेकानंद राहत होते आणि वेदांताचे वर्ग घेत होते. अॅडम्स यांनी कॅल्व्हेला “तू विवेकानंद यांना एकदा भेट” म्हणून सांगितलं.

अनेक वेळा सांगूनही तिच्या मनात नव्हते. मैत्रिणीने सुद्धा हेच सांगितले पण तिचेही ऐकले नाही. तिच्या मनात आत्महत्येचे विचार होते. ती या विचाराने बाहेर पडत असे .पण तिचे पाय आपोआप विवेकानंद राहत होते तिकडे  निवासस्थानाकडे वळत आणि आपण एका भयंकर स्वप्नातून जागे झाल्यासारखे वाटे. मग पुन्हा घरी येई. असे चार पाच वेळा झाले. शेवटी एका उद्विग्न क्षणी ती विवेकानंद यांना भेटायला गेली. नोकराने घराचे दार उघडले, कॅल्व्हे  बाहेर खुर्चीवर बसून राहिली. आपल्याच विचारात. थोड्या वेळाने आतून आवाज आला, “ये, मुली,ये ! कोणतीही भीती बाळगू नकोस”. कॅल्व्हे आत गेली आणि समोर विवेकानंद बसले होते त्यांच्याकडे बघत स्तब्ध झाली. कारण ध्यानअवस्थेत विवेकानंद बसले होते. त्यांची भगवी वस्त्रे, खाली नजर अशा अवस्थेतच ते तिच्याकडे न पाहता म्हणाले, “मुली किती विषण्ण आणि मन निराश करणारं, काळवंडून टाकणारं वातावरण तुझ्या भोवती आहे. मन शांत कर. ते फार आवश्यक आहे”. ती कोण? नाव काय? काहीही माहिती नसताना, तिच्याकडे न बघताच यांनी कशी आपल्या मनाची अवस्था ओळखली याचं तिला फार आश्चर्य वाटलं.

आपली परिस्थिति आणि समस्या केवळ आपल्यालाच माहिती आहेत तरीही हे एका अलिप्त आणि समाधान भावनेने आपल्याशी बोलत आहेत. यांना काय घडले ते कसं कळल असेल ? असं वाटून तिच्या लक्षात आलं की हे काहीतरी अद्भुत आहेत. ती विवेकानंद यांना म्हणाली, हे सारं तुम्हाला कसं माहिती? तुम्हाला कोणी बोललं आहे का ? स्वामीजी म्हणाले, “माझ्याजवळ कोणी काही बोलले नाही. तशी काही जरूर आहे असं मला वाटत नाही. एखादं उघडं पुस्तक वाचावं तसं तुझं मन मला स्पष्ट दिसतं आहे. तुला सारं काही विसरून गेलं पाहिजे. पुन्हा एकदा प्रसन्न आणि आनंदी वृत्ती धारण कर.तब्येत सुधार,दु:खाचा सतत विचार करत बसू नको. भावनांना कोणते तरी रूप देऊन व्यक्त हो. ही गोष्ट आध्यात्मिक दृष्टीने आवश्यक आहे. कलेला तर आवश्यक आहेच.

या शब्दांचा आणि स्वामीजींच्या व्यक्तिमत्वाचा काल्व्हे वर सखोल परिणाम झाला. या प्रभावामुळे तर आपल्या डोक्याला ताप देणार्‍या सार्‍या कटकटीच्या  गोष्टी डोक्यातून काढून टाकून, त्याऐवजी स्वत:चे सुस्पष्ट व शांतिप्रद विचार मनात निर्माण केले होते असं काल्व्हे ला वाटलं.स्वामीजींच्या या समर्थशाली विचाराने तिचे मन पुन्हा उल्हसित झाले. आणि ती तिथून बाहेर पडली. हा काही संमोहन विद्येचा परिणाम नव्हता.विवेकानंदांच्या मनाची शुद्धता, त्यांचे सामर्थ्यशाली पवित्र आचरण यामुळे हा परिणाम झालेला होता. मन एकदम निश्चिंत झाले होते.

ही भेट होण्या आधी एक दु:खद प्रसंग घडला होता. तिचा कार्मेंनचा  प्रयोग चालू होता.तिचा अभिनय आणि गाणं ही उत्तम सादर होत होतं. पण मनातून ती वैफल्य ग्रस्त होती. आणि आता पुढच्या अंकात आपण काम करू शकणार नाहीत असं तिच्या मनाने घेतलं. अशाही अवस्थेत ती मनाचा निग्रह करून रंगभूमीवर गेली. तो अंक ही उत्तम झाला, पण दुसर्‍याच क्षणी आपण काम करू शकणार नाही मला बरे वाटत नाही असे सांगून टाकले.आणि पुढचा अंक होऊ शकत नाही असे दिलगिरी पूर्वक सांगा म्हणून सुचविले. परंतु प्रेक्षकांनी तर तिचे काम डोक्यावर घेतले होते.त्यामुळे व्यवस्थापकांनी तिला हर प्रकारे समजाऊन सांगत रंगभूमीवर जवळ जवळ ढकललंच. मग काय काल्व्हे कलेशी निष्ठावान होती तिने पाय ठेवतच सर्व बाजूला सारून आपली भूमिका सादर करू लागली.तिच्या आतल्या वैफल्याच्या भावनांमुळे तिच्या आवाजात आर्तता आणि उत्कटता होती.या वेळचे गाणे तर अत्यंत सुंदर झाले.श्रोत्यांनी प्रचंड दाद दिली होती.पण ती ते ऐकायला अजिबात उत्सुक नव्हती.तडक रंगमंचावरून आत गेली आणि कोचावर आडवी झाली आणि एक आश्चर्य वाटले की बाहेर एव्हढे लोक उभे आहेत मग या क्षणाला सारे निशब्द कसे?असा संशय येऊन ती दाराजवळ आली.तो समोर व्यवस्थापक आणि लोक गोळा होऊन बघताहेत.धीर करून व्यवस्थापकांनी सांगितलं,की “प्रयोग चालू असताना तुमच्या मुलीचा अपघाताने भाजून मृत्यू झाला आहे”. भयंकर धक्का होता तिला. या घटनेनंतर ती पार कोसळून गेली असणार . यातून बाहेर पडण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांमुळे तिची व  विवेकानंदांची भेट झाली होती त्यानंतर तीचं आयुष्य पुर्णपणे बदललं.

स्वामीजींच्या संपर्कात आल्यानंतर तिला अनेक विषय नव्याने कळले होते. त्यांच्याशी ती पटलेल्या न पटलेल्या गोष्टी व विषयांची चर्चा करू लागली होती. त्यांचे विचार ऐकून घेत होती. एकदा अमरत्व या विषयावर चर्चा सुरू होती.काल्व्हे या बद्दल म्हणाली, “मला ती कल्पनाच पटत नाही. मी माझ्या व्यक्तीत्वाला चिकटून राहणार.मग ते कितीही क्षुल्लक असेना. मला शाश्वत ऐक्यात मिसळून जाण्याची इच्छा नाही. तो नुसता विचारही मला भयंकर वाटतो”. त्यावर स्वामीजींनी उत्तर दिले. “एके दिवशी अथांग महासागरात पाण्याचा एक थेंब पडला. स्वत:ची ही स्थिति पाहून जलबिंदू रडत तक्रार करू लागला.जशी तुम्ही आता करताहात , महासागर जळबिंदुला हसला. त्याने जलबिंदुला विचारले, की, का रडतोस बाबा?तुझ्या रडण्याचं कारण मला नाही समजत. तू जेंव्हा मला येऊन मिळालास तेंव्हा तू आपल्या सर्व बंधुभागिनींना येऊन मिळालास. त्या इतर जलबिंदूनीच मी बनलो आहे.त्यामुळे तू ही साक्षात महासागररूप झालास. मला सोडून जाण्याची जर तुझी इच्छा असेल तर, एखाद्या सूर्यकिरणावर स्वार हो आणि एखाद्या ढगात जाऊन राहा की झाले. तेथून तू पुन्हा पिपासार्त पृथ्वीला आशीर्वादासारखा व वरासारखा होऊन एखाद्या जलबिन्दूच्या रूपाने खाली येऊ शकतोस.” 

स्वामीजी रूपकांच्या भाषेत बोलत असत असं काल्व्हे म्हणते. ती पुढे स्वामीजिंबरोबर, त्यांच्या स्नेही आणि शिष्यांसोबत तुर्कस्तान, इजिप्त, ग्रीस मध्ये सहलीला गेली होती.त्यांच्या बरोबर फादर लॉयसन,त्त्यांची पत्नी तसेच मिसेस मॅक्लाउड सहलीला होते. ती म्हणते या सहलीत, विज्ञान, तत्वज्ञान आणि इतिहास कोणतीच गुपिते स्वामीजिंपासून लपून राहिली नव्हती. त्यामुळे त्यांची जी विद्वत्तापूर्ण आणि ज्ञानपूर्ण चर्चा चाले ती मी लक्ष देऊन ऐकत असे. वादविवादात मी कधी भाग घेत नसे. पण विद्वान नामांकित असलेले फादर लॉयसन यांच्या बरोबर स्वामीजींची सर्व प्रकारची चर्चा चाले. धर्मासंबधी  चाललेल्या चर्चेत फादर यांना एखाद्या चर्च कौन्सिल ची तारीख खात्रीशीरपणे सांगता येत नसे, पण स्वामीजींना सांगता येई. स्वामीजी एखाद्या धार्मिक ग्रंथातील अवतरण सुद्धा अगदी बिनचूक सांगायचे .  

ग्रीसमध्ये इल्युसिसला भेट दिली तेंव्हा स्वामीजींनी त्याची सर्व रहस्ये समजाऊन सांगितली. तिथल्या सर्व मंदिरातून हिंडवले, जुन्या प्रार्थनांचे मंत्र हुबेहूब प्राचीन पद्धतीने म्हणून दाखवले. इजिप्त मधेही असाच तल्लिंनतेने ऐकण्याचा अनुभव सर्वांनी घेतला. सर्वजण शांतपणे मंत्रमुग्ध होऊन ऐकत असत, एकदा तर, इतके की भान न राहिल्यामुळे तिथल्या स्टेशनवरील प्रतिक्षालयात स्वामीजींनी श्रोत्यांना आपल्या संभाषणाने खिळवून ठेवले होते. तेंव्हा गाडी निघून गेली तरी भान नव्हते. असे अनेक वेळा व्हायचे.

कॅल्व्हे या प्रवासातल्या आपल्या स्वामीजींच्या आठवणी सांगताना म्हणतात,  “कैरो मधला प्रसंग – कैरो मध्ये बोलता बोलता सर्वजण रस्ता चुकले आणि एका अत्यंत घाणेरड्या ओंगळ वाण्या रस्त्यावर येऊन पोहोचलो. आजूबाजूच्या घरांच्या खिडकीतून स्त्रिया स्वताचं अंग प्रदर्शन करीत होत्या. स्वामीजींचे याकडे लक्षच नव्हते. पण तेव्हाढ्यात बाहेर बसलेल्या, गलका करणार्‍या स्त्रिया स्वामीजींना खुणेने आपल्याकडे बोलावू लागल्या. इथून चटकन बाहेर पडावे म्हणून प्रयत्न केला पण  स्वामीजी अचानक त्या स्त्रियांपुढे जाऊन उभे राहिले.म्हणले, “ बिचार्‍या मुली, दुर्दैवी जीव, त्यांनी त्यांचे देवपण त्यांच्या सौंदर्यात निविष्ट केले आहे. पहा त्यांची आता काय दशा झाली आहे ती”. असे बोलून स्वामीजींच्या डोळ्यातून अश्रु वाहू लागले. त्या सर्व अत्रीय एकदम गप्प झाल्या आणि संकोचल्या. एकीने पुढे वाकून स्वामीजींच्या कफनीच्या टोकाचे चुंबन घेतले.आणि स्पॅनिश भाषेत देवमाणूस! देवमाणूस! असे म्हणू लागल्या, दुसरीने हात तोंडावर ठेऊन चेहरा लपविला”. अशा या स्वामीजींबरोबर च्या आठवणी कॅल्व्हेच्या  शेवटच्या आठवणी ठरल्या होत्या. कारण यानंतर स्वामीजी थोड्याच दिवसात भारतात निघून गेले. आणि वर्षभरातच त्यांनी महासमाधी घेतल्याचे कळले.कॅल्व्हे यांनी म्हटलंय, “ एकही पृष्ठ नष्ट न करता त्यांनी आपला जीवनग्रंथ लिहिला”. त्यानंतर काही वर्षानी काल्व्हे भारतात आली तेंव्हा, अखेरचा श्वास जिथे घेतला त्या स्वामीजींच्या बेलूर मठाला तिने भेट दिली. त्यांच्या आईला भुवनेश्वरी देवी यांना भेटली. या माऊलीनेच कॅल्व्हेला या मठात नेले होते .                       

काल्व्हे यांनी आपल्या आत्मचरित्रात हे सर्व लिहून ठेवले आहे. कॅल्व्हे जानेवारी १९४२ ला  वयाच्या ८३ व्या वर्षी निधन पावली. तिच्या उर्वरित आयुष्यात स्वामीजींमुळे खूप मोठा बदल झाला होता. योग्य आध्यात्मिक विचारांची समज आली होती. आत्महत्येपासून परावृत्त करून एक चांगले जीवन जगण्याचा मार्ग स्वामीजींनी तिला दाखवला होता. असे भारताबाहेर अनेक जण स्वामीजींच्या सहवासात आले त्यांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलला. काहींनी त्यांना रामकृष्ण संघाच्या कामात मदत केली, काही स्वामीजींचे शिष्य झाले.

भारताबाहेरील लोकांना एका भारतीय माणसानेच योग्य दिशा दाखवली होती, आज भारतातच रंगभूमी  आणि चित्रपट क्षेत्रात प्रसिद्धी आणि जीवघेणी स्पर्धा आणि कोटीच्या कोटी पैशांची उड्डाणे आणि त्यामुळे तरुण कलाकारांची, आयुष्याची झालेली वाताहत, कुटुंबाचं उध्वस्तपण हे बघितलं की वाटत यावर अंमल ठेवणारी व्यवस्थाच नाही ? जिथे विवेकानंद यांच्या रूपात पाश्चिमात्य देशात लोकांना मार्गदर्शन मिळत होतं. त्याच विवेकानंद यांच्या भारतात आज काय स्थिति आहे? राजकारण, प्रशासन किंवा कुठल्याही व्यवस्थेत भ्रष्टपणे काम करणारी माणसे/व्यक्ती लहानपणा पासून कशी घडली आहेत? कोणाच्या संगतीत घडली आहेत? आई वडिलांनी काय शिकविले आहे, काय संस्कार केले आहेत? हे अत्यंत महत्वाचे ठरते. कारण नरेंद्रला घडविणारे त्याचे पालक भुवनेश्वरी देवी, विश्वनाथ बाबू आणि गुरु रामकृष्ण परमहंस होते .

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “नवी वाट चालताना” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

?  विविधा ?

☆ “नवी वाट चालताना” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

“नवी वाट चालताना”

एक जानेवारी तारीख उजाडली. नवीन वर्षाचा पहिला दिवस. २०२३ सालाने दिमाखात प्रवेश केला आहे. आता,

नवे वर्ष नव्या आशा

नव्या स्वप्नांना नवीन दिशा

मिळणार आहेत. या वर्षाच्या पोटात असंख्य गुपिते असणार आहेत. काही आनंदाचे क्षण, प्रगतीच्या, भरभराटीच्या संधी, काही मोठ्या स्वप्नांची परिपूर्ती, नवीन नात्यांची जुळणी असणार आहे. प्रत्येकासाठी काही ना काही आनंदाची भेट नक्की असणार आहे.

एखादं वर्ष म्हणजे दिनदर्शिकेच्या तारखेप्रमाणे दिवस आणि पानांप्रमाणे महिना उलटून ‘मागील पानावरून पुढे चालू’ अशी साधी सरळ प्रक्रिया नसते. तर ती असते प्रत्येकाच्या आयुष्यातील आठवणींची पुंजी, तर समाजाच्या, देशाच्या बाबतीत असंख्य चांगल्या वाईट घटनांचा ठेवा.

म्हणूनच सरत्या वर्षातल्या घटनांचा ताळेबंद मांडून उणे-अधिकाची गोळाबेरीज केली जाते. काही अप्रिय घटनांनी मनाची घालमेल होते. कारण काही नाती दुरावलेली असतात. त्याच वेळी काही नवीन नाती जोडलेलीही  असतात. काही गोष्टीत यशाला गवसणी घातलेली असते, तर आगामी नवीन आव्हाने आता खुणावत असतात. काही बेत यशस्वीरीत्या तडीस नेलेले असतात, तर येत्या काळासाठी नवीन बेतांची आखणी सुरू झालेली असते. अशा मनाच्या एका भारावलेल्या अवस्थेतच नवीन वर्षाचे आगमन होत असते. तेव्हा २०२३ सालाचे  आपण अतिशय उत्साहाने, आनंदाने स्वागत करू या.

मराठी वर्ष हे चैत्र प्रतिपदेपासून सुरू होते. तेव्हा शिशिराची पानगळ झालेली असते. नव्या कोंबातून कोवळी पोपटी चैत्र पालवी फुटते. ही लवलवणारी नाजूक पाने हळूहळू हिरवी होत झाड हिरवेगार होत झुलू लागते. पुढे नाजूक कळ्या, कोमल फुले, मधुर फळे असा बहर अनुभवत पुन्हा  शिशिराची पानगळ सुरू होते. जुन्या वर्षाची सांगता आणि नव्या वर्षाचे आगमन असे निसर्गाच्या अविष्कारातून साजरे होत असते.

पण जागतिक वर्षाचा कालखंड वेगळा आहे. त्याचे स्वागतही वेगळ्याच पद्धतीने होते. जागतिकीकरणाने या सर्व गोष्टी आता जगभर उत्साहात साजऱ्या केल्या जातात. हिवाळ्याच्या थंडीने शरीरं गारठलेलीअसली तरी नव्याच्या स्वागताच्या आनंदाने प्रफुल्लित मने मोठ्या जल्लोषात नवीन वर्षाचे स्वागत करतात. जागोजागी त्यासाठी रंगारंग कार्यक्रमांचे आयोजन केलेले असते.

यंदा नव्या वर्षात पदार्पण करताना काही खूप मोठ्या अनुभवांची पुंजी आपल्याकडे जमा झालेली आहे. कारण मागची दोन-तीन वर्षे सर्व जगाच्या दृष्टीने धास्तावणारी गेली. कोविड १९ च्या विषाणूने अख्ख्या जगाला वेठीला धरले होते. ‘न भूतो न भविष्यती’ अशी परिस्थिती ओढवली. अनेक जिवलगांचे हात हातातून अचानक सुटून गेले. मृत्यूचे हे भयानक दर्शन सर्वांनाच मुळापासून हादरवून गेले. हे संकट अनेक गोष्टी आपल्याला शिकवूनही गेले. अशावेळी पैसा, सत्ता, अधिकार काहीही कामाला येत नाही. चांगले शारीरिक, मानसिक आरोग्य या तडाख्यातून सही-सलामत बाहेर आले. माणसांची ओढ, नात्यांचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले. पुन्हा नाती जवळ आली. पैशाचा, सत्तेचा, अधिकाराचा अती हव्यास न करता आपल्या मर्यादा, आपल्या गरजा ओळखून संयमी, विवेकी वाटचाल करायला हवी याची जाणीव अतिशय प्रखरतेने झाली.

रोजची एवढी धावाधाव करून पैसा मिळवायचा तो कशासाठी ? तो नक्की किती मिळवायचा ? आपल्या नेमक्या गरजा किती ? नक्की महत्व कशाला ? पैशाला का माणसाला ? अशा मूलभूत गोष्टींचा पुन्हा सर्वंकष विचार करायला सगळ्यांनाच हा मोठा विराम मिळाला होता. सर्वांच्या विचारात काही अंशी फरक पडलाही आहे. पण थोडक्यामधेच समाधान मानून, आपल्या माणसांना धरून राहायला हवे हे मात्र खरे, याची खूणगाठ प्रत्येकाने मनाशी बांधली पाहिजे. अजूनही या संकटाचे सावट पूर्णपणे दूर झालेले नाही. त्यामुळे त्याच्यापासून संरक्षण मिळावे म्हणून योग्य ती खबरदारी प्रत्येकाने घेत राहिले पाहिजे. आरोग्यासाठी काही चांगल्या सवयी कायमस्वरूपी लावून घेतल्या पाहिजेत.

नव्या प्रगत तंत्रज्ञानात आपल्या देशाने आघाडी घेतलेली आहे. त्यात आता 5G सेवा ही उपलब्ध झालेली आहे. याद्वारे अनेक दैनंदिन व्यवहार सुकर होत आहेत‌. आपणही हे तंत्रज्ञान आत्मसात करून घेऊन नव्या प्रवाहात सामील होणे खूप गरजेचे आहे.

नवी सुगी नवं पीक

सुकाळाची आशा

नवं ज्ञान नवं ध्येय

उन्नतीची दिशा ||

आत्ता जागतिक वातावरण तणावपूर्ण आहे. अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. अशावेळी प्रत्येकाने प्राधान्याने देशहित जपले पाहिजे. अनावश्यक खर्च टाळणे, भ्रष्टाचार न करणे, स्वदेशी गोष्टींना प्राधान्य देणे, देशहिताला बाधा पोहोचवेल अशी कोणतीही कृती-उक्ती न करणे, आपली कुटुंब व्यवस्था नीट सांभाळणे अशा कितीतरी गोष्टी करता येण्यासारख्या आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणारा आपला देश अनेक आघाड्यांवर प्रगतीची शिखरे गाठत आहे. त्याच्या उज्ज्वल वाटचालीत प्रत्येकाने आपले योगदान दिले पाहिजे.

घालू गवसणी नव्या यशाला

सदैव जपू या देशहिताला ||

नव्या वर्षात पदार्पण करताना या सर्व अनुभवातून आलेले शहाणपण, नवे भान यांचा आपल्याला निश्चितपणे चांगला फायदा होणार आहे. त्यामुळे नव्या वर्षाचे आगमन प्रगतीची, आनंदाची, उत्तम आरोग्याची पर्वणी घेऊन येणारे ठरो हीच प्रार्थना आहे.

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ महिना अखेरचे पान – 12 ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? विविधा ?

महिना अखेरचे पान – 12 ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

काळ अव्याहतपणे चालतच असतो. त्याची पाऊले वाजत नाहीत. पण चाल मात्र जाणवत असते. कालचा दिवस संपून आजचा दिवस उजाडला की काळ पुढे सरकल्याची जाणीव होते. या अक्राळविक्राळ काळाला कवेत घेण्यासाठी माणसाने कालगणना सुरू केली. बारा महिन्यांचे एक वर्ष बनवले आणि काळाची मोजदाद सुरू झाली. एक महिना म्हणजे काळाचे जणू एक पाऊलच. अशी अकरा पावले चालून झाली की काळ बारावे पाऊल टाकतो शेवटच्या महिन्यात आणि वर्ष संपत आल्याची जाणीव होते. हा शेवटचा महिना म्हणजे  डिसेंबर महिना, म्हणजेच  काही दिवस कार्तिकाचे आणि काही दिवस मार्गशीर्षाचे !

दसरा दिवाळी सारखे आनंददायी सण होऊन गेलेले असतात. एकंदरीतच सणांची गडबड संपत आलेली असते. पण सुगीचे दिवस मात्र सुरू झालेले असतात. साखर कारखान्यांसाठी ऊस वाहून नेणा- या बैलगाड्या आणि ट्रॅक्टर यांनी रस्ते ताब्यात घेतलेले असतात. त्यातच ऊस पळवणा-या बाल गोपालांच्या टोळ्या आपल्याच नादात असतात. बाजारातही वेगवेगळ्या फळांची रेलचेल असते. हवेतला गारवा वाढू लागलेला असतो. मागच्या वर्षीची थंडी, यंदाची थंडी अशा थंडीच्या गप्पा मारण्यासाठी मात्र शेकोटीची आवश्यकता वाटत असते. हुरडा पार्टी  रंगात आलेल्या असतात.उबदार कपड्यांना आणि गोधडी, वाकळ यांना बरे दिवस आलेले असतात. झाडांची पाने गळून ती मात्र ओकीबोकी दिसू लागतात. अशा या गोठवणार-या थंडीत दूर कुठेतरी भजनाचे स्वर ऐकू येतात आणि लक्षात येते, अरे, दत्तजयंती आली वाटते. खेड्यापासून शहरापर्यंत श्रद्धेने साजरी होणारी दत्त जयंती एक नवा उत्साह निर्माण करते. उत्पत्ती, स्थिती आणि लय या निसर्गाच्या नियमांची जाणीव करून देते. याच मार्गशिर्ष महिन्यात श्रीदत्तगुरूंचे अवतार श्री नृसिंह सरस्वती यांचाही जन्मदिन असतो. शिवाय भगवान पार्श्वनाथ आणि गुरू गोविंदसिंह यांचा जन्मदिवसही याच महिन्यातील.

मार्गशिर्ष शुद्ध एकादशी या दिवशी  गीता जयंती असते.

त्या दरम्यानच येतो तो नाताळचा सण. येशू ख्रिस्ताचा प्रकटदिन. प्रार्थनामंदिरे आणि परिसर सुशोभित झालेला असतो. छोट्या छोट्या झोपड्या, येशूचा जन्म सोहळा हे सगळे देखावे  लक्ष वेधून घेत असतात. बच्चे मंडळीचे लक्ष असते ते मात्र सांताक्लाॅजकडून मिळणा-या गिफ्टवर.

असा हा डिसेंबर किंवा मार्गशिर्ष महिना विविध धर्मातील भक्तांच्या दृष्टीने खूपच महत्वाचा आहे.

याशिवाय थोर गणिती श्रीनिवास रामानुजन्, पू.साने गुरुजी आणि रसिकांना मंत्रमुग्ध करणारे मोहम्मद रफ़ी यांचा जन्मही याच महिन्यात झाला आहे.

सहा डिसेंबर हा दिवस म्हणजे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महपरिनिर्वाण दिन. कोल्हापूरच्या छत्रपती ताराराणी, भारतीय संस्कृत कोशाचे जनक पं. महादेवशास्त्री जोशी, क्रांतिसिंह नाना पाटील आणि माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांचा स्मृतिदिन याच महिन्यात असतो. याच मार्गशिर्ष महिन्यात मोरया गोसावी, श्री

गोंदवलेकर महाराज आणि संत गाडगेबाबा या संतांची अवतार समाप्ती झाली.

अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्वाच्या घडामोडी डिसेंबर महिन्यात घडल्या आहेत. त्यामुळे त्यांचेही स्मरण वेगवेगळ्या स्वरूपात केले जाते. एक डिसेंबर हा एडस् निर्मुलन दिन आणि तीन डिसेंबर हा अपंग दिन म्हणून जागतिक स्तरावर पाळला जातो. चार डिसेंबर हा भारतीय नौदल दिन आहे. पाच डिसेंबर जागतिक मृदा दिन म्हणून साजरा केला जातो. आठ डिसेंबर 1985ला सार्क परिषदेची स्थापना झाली. दहा डिसेंबर हा मानवी हक्क दिन आहे. 1946 साली अकरा डिसेंबरला युनिसेफची स्थापना झाली. बारा डिसेंबर हा दिवस हुतात्मा बाबू गेनू यांच्या स्मरणार्थ स्वदेशी दिन म्हणून पाळला जातो. सतरा डिसेंबर पेन्शनर्स डे आहे. 1961 साली एकोणीस डिसेंबरला दीव,दमण आणि गोवा यांना स्वातंत्र्य मिळाले व हे प्रदेश भारताचा अविभाज्य भाग बनले. तेवीस डिसेंबर हा किसान दिन व चोवीस डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन आहे. 1945 साली सत्तावीस डिसेंबरला आंतरराष्ट्रीय नाणे निधीची स्थापना झाली. तीस डिसेंबर 1906 ला मुस्लिम लीग ची स्थापना झाली होती. एकतीस डिसेंबर हा दिवस परिवार एकता दिन म्हणून साजरा केला जातो.   

मार्गशिर्ष म्हणजे धनुर्मास. मार्गशिर्ष म्हणजे सूर्याच्या उत्तरायणाचा मास. याच मासात असते शाकंभरी नवरात्र. मार्गशिर्ष म्हणजे शिशिर ऋतूचे आगमन. काही वेळेला डिसेंबरच्या शेवटी शेवटी मार्गशिर्ष संपून पौषमासाची सुरुवातही झालेली असते.

अशा विविध घटनांची नोंद घेत सण, उत्सव साजरे होत असतानाच सरत्या वर्षाला निरोप देण्याची आणि नव वर्षाचे स्वागत करण्याची तयारी सुरू होते. गत वर्षाचा हिशोब मनात मांडत असतानाच आपण सर्वांनाच नव्या वर्षाच्या शुभेच्छा देत असतो. आंतरराष्ट्रीय नवे वर्ष सुरू होत असते. आपणही त्यात सामील होत असतो. नव्या वर्षाचे संकल्प मनात सुरू झालेले असतात. ते सिद्धीस नेणे आपल्याच हातात असते. जुन्या परंपरा आणि नव्या कल्पना यांचा सुंदर मेळ घालून आयुष्य अधिक सुंदर बनवण्यासाठी  सरत्या   गेल्या वर्षाला बाय बाय करत नव्या वर्षात पाऊल टाकायचे आणि नवी आव्हाने स्वीकारायची. काळाचा हात धरून त्याच्या पावलाबरोबर चालायचे हे तर ठरलेलंच. महिनाअखेरचं पान म्हणता म्हणता वर्षाअखेरच पान आलं. चला स्वागत करूया नव्या वर्षाचं. नव वर्षाच्या शुभेच्छा देत चला एक नवा प्रवास सुरू करूया  !

कॅलेंडरची बारा पाने

पाहता पाहता संपून गेली

किती कटू-गोड आठवणी

मनामध्ये  साठवून  गेली

नवे दिवस येत राहतील

नवे किरण घेऊन येतील

नवे क्षण फुलत राहतील

नवी स्वप्ने घेऊन येतील

नवे जुने सारे काही

बरोबर घेऊन जायचे आहे

फूल सहज फुलावे तसे

जीवन हे फुलवायचे आहे.

 

© सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆☆ (आपण) लोक सिरियल्स का बघतात (बघतो)? – भाग 2 ☆ सुश्री साधना प्रफुल्ल सराफ ☆

सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

? विविधा ?

(आपण) लोक सिरियल्स का बघतात (बघतो)? – भाग 2 ☆ सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

(आणि हल्ली परत परत नव्याने त्यांच्या नवीन आवृत्त्या निघत असतात. पण त्या नव्या बघितल्यावर मात्र त्या जुन्या कितीतरी चांगल्या होत्या, असं म्हणायची वेळ येते!  पुढे चालू…)

आता आणखी नवीन प्रकार म्हणजे, वेब सिरियल्स आणि ओटीटी यांचीही भर पडलेली आहे, करमणूक क्षेत्रात. बहुतेक तरुण पिढीतले लोक यातल्या इंग्लिश, हिंदी सिरियल्स बघत असतात. या तरुण पिढीला रहस्यमय, थरारक काहीतरी बघायला आवडते. रोजच्या रुटीनमुळे वैतागून गेलेले असताना त्यांना या मालिका बघायला आवडणं स्वाभाविक आहे. आणि टी. व्ही. वरच्यासारखा जाहिरातींचा व्यत्यय पण नसतो ओटीटी वर. आम्ही पण मध्यंतरी ओटीटी वर ‘बंदिश बॅन्डीट’ ही सिरीयल पाहिली होती. खरोखरच सुरेख होती, आणि दहाच भागात संपवल्यामुळे शेवटपर्यंत उत्सुकता टिकून होती. शास्त्रीय संगीताच्या एका घराण्याची कहाणी दाखवलेली होती यात. सध्या ‘God Freinded Me’ ही मालिका बघतोय. अर्थातच, अमेरिकेत घडणारी. त्यात एका तरुण आफ्रिकन अमेरिकन मुलाला फेसबुक वर देवाची फ्रेंड रिक्वेस्ट येते, हा मुलगा असतो नास्तिक, त्याचे वडील एका चर्चमधे रेव्हरंड असतात. तो ही रिक्वेस्ट बघून गडबडून जातो, ती स्वीकारावी की नाही, अशा गोंधळात पडतो. पण त्याचा मित्र असतो एक भारतीय मुलगा. तो त्याला ती स्विकारायला तयार करतो. आणि मग या ‘गॉड अकाउंट’ वरून त्याला एकेक फ्रेंड रिक्वेस्ट येत रहातात. आणि कर्म धर्म संयोगाने ते लोक याला भेटतात, आणि त्या प्रत्येकाच्या आयुष्यातले काहीतरी प्रॉब्लेम सोडवायला हे दोघे मित्र त्यांना मदत करतात. याच प्रवासात त्याला एक मैत्रीण पण मिळते. प्रत्येक गोष्ट वेगळी. प्रत्येक एपिसोडमधे एकेक गोष्ट. प्रत्येकाचा वेगळा प्रॉब्लेम. बघताना आपण रंगून जातो अगदी! अजिबात कंटाळा येत नाही. अशा काही वेगळ्या थीमवर आपल्याकडच्या लोकांना का मालिका बनवता येऊ नयेत? आपले काही मराठी तरुण हल्ली खूप वेगळे विषय घेऊन चित्रपट काढतात. मग मालिका का नाही?

सध्या चालू असलेल्या काही मराठी मालिका, उदा. ‘राजा राणीची गं जोडी’ आणि ‘सुंदरा मनामधे भरली’ यात थोडा वेगळा विषय जोडलेला आहे, नेहमीच्या कौटुंबिक मालिकेला, पण यातही नायक नायिकेची अती छळणूक चालूच आहे! काय होतं, एका ठराविक वेळेला ते बघायची आपल्याला सवय लागलेली असते, आणि मग, ‘धरलं तर चावतं, आणि सोडलं तर पळतं’ अशी गत झाल्यामुळे आपल्याला ते बघवतही नाही, आणि सोडवतही नाही! असे आपण त्या मालिकेच्या जाळ्यात अडकतो आणि त्यांना TRP मिळत राहिल्याने, तेही मालिका बंद न करता, कथानकात पाणी घालून वाढवत रहातात! असं हे एक दुष्टचक्र आहे!  अशीच एक हिंदी मालिका, ‘बॅरिस्टर बाबू’ नावाची. स्वातंत्र्यापूर्वीच्या काळातली. बंगालमधे घडणारी, त्यात इंग्लंड मधे शिकून, बॅरिस्टर बनून आलेला एक तरुण एका सात आठ वर्षाच्या मुलीला, म्हाताऱ्या माणसाशी होत असलेल्या लग्नातून वाचवायला जातो आणि त्याच्यावर नाईलाजाने तिच्याशी लग्न करायची वेळ येते. आणि मग त्याच्या जमीनदार कुटुंबातून त्या लग्नाला विरोध, त्या छोट्या मुलीला येणाऱ्या अडचणींमधून तिला वाचवण्याची त्याची धडपड अशी खूप छान सुरुवात केली होती. पण ही पण मालिका भरकटत जाऊन आजही तिचं दळण चालूच आहे!

या मालिकांशिवाय वेगवेगळ्या चॅनल्सवर ‘रिअॅलिटी शो’ पण चालू असतात अधून मधून. हे शो पण जेंव्हा चालू झाले, तेंव्हा खरे वाटायचे. गाण्याच्या कार्यक्रमात गाण्यालाच महत्व असायचं. परीक्षक नामवंत गायक, संगीतकार आणि स्पर्धकही चांगले गाणारे असायचे. खूप चांगली जुनी, क्लासिकल गाणी ऐकायला मिळायची. हे कार्यक्रम खूप आनंद द्यायचे. नृत्याचे असे स्पर्धात्मक कार्यक्रमही चांगले असायचे. पण आताशा गायनाच्या परिक्षकात सिनेमात कोरिओग्राफी करणारे, काव्य लिहिणारे, आणि नृत्याचे परीक्षक म्हणून लेखक असा सगळा विचित्र मामला सुरु झालेला आहे! आणि स्पर्धकांच्या गाण्यापेक्षा, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर जास्त फोकस, स्पर्धकांच्या किंवा परीक्षकांच्या खोट्या नाट्या प्रेमकहाण्या रंगवणं यातच अधिक वेळ घालवणं, एखाद्या स्पर्धकाच्या गरिबीचा तमाशा मांडणं हेच सुरु झालेलं आहे. या मागे त्यांची काय कारणं असतात, ते त्याचं त्यांना माहीत! पण गाण्याची आवड असलेल्यांचा मात्र रसभंग होतो आणि त्या कार्यक्रमातला इंटरेस्ट कमी होतो, हे कळत नाही का या लोकांना? पूर्वी या कार्यक्रमात परीक्षकांकडून स्पर्धकांना त्यांच्या काय चुका होताहेत, काय सुधारणा करता येतील, हे सांगितलं जायचं. आणि काही परीक्षक तर त्या स्पर्धकांचा आत्मविश्वासच खच्ची होईल, इतकी नावं ठेवत असत त्यांच्या गाण्याला. हे अर्थात चुकीचंच होतं, पण हल्ली त्याच्या उलट, प्रत्येक स्पर्धकाची वारेमाप स्तुती करत असतात परीक्षक! आणि त्या स्पर्धकांपुढे काही आव्हानं ठेवण्याची पद्धतही बंदच केलेली आहे. प्रत्येक जण आपला जो ठराविक प्रकार किंवा शैली हातखंडा आहे, त्यातलीच गाणी प्रत्येक वेळी सदर करून वाहवा मिळवत असतो. सगळ्यांनी सगळे प्रकार सादर करावेत म्हणजे त्यांची खरी गुणवत्ता पारखली जाऊ शकते. या सगळ्या गोष्टींमुळे एखादा सवंग मनोरंजनाचा प्रकार असं स्वरुप आलेलं आहे या कार्यक्रमांना! 

त्याचमुळे हल्ली टी. व्ही. पेक्षा OTT वरचे कार्यक्रमच अधिक पहावेसे वाटतात. अजून तरी ते दर्जेदार असतात आणि भरकटण्याआधीच संपवले जातात. टी. व्ही. वाल्यांनी याची दखल घेतली नाही, तर त्यांची अधोगती आणि विनाश अटळ आहे!

– समाप्त –

© सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

संपर्क – 1565, सदाशिव पेठ, ‘लक्ष्मी सदन’, पी. जोग क्लास लेन, पुणे, ४११०३०. मो. 7709014058.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆☆ (आपण) लोक सिरियल्स का बघतात (बघतो)? – भाग 1 ☆ सुश्री साधना प्रफुल्ल सराफ ☆

सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

? विविधा ?

(आपण) लोक सिरियल्स का बघतात (बघतो)? – भाग 1 ☆ सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

विचार करा बरं एकदा! का बघतो आपण टी. व्ही. वरच्या सिरियल्स?  टाईम पास, मनोरंजन हे तर आहेच. करोनाच्या काळात तर घराबाहेर पडणंसुद्धा काहीजणांसाठी अवघडच झालेलं होतं, त्यामुळे टी. व्ही. वरच्या मालिका बघणं हा या काहीजणांसाठी, आणि ज्यांना एरवीही घराबाहेर जाणं अशक्य आहे, अशांसाठीही जीवनावश्यक विधी झालेला आहे! अर्थात, काही लोक तर व्यसन लागल्यासारखे टी. व्ही.बघत असतात!

 पूर्वी जेंव्हा फक्त दूरदर्शनच दिसत असे, तेंव्हा आठवड्यातून एकदाच ठराविक वेळेला ठराविक मालिका दिसत असत. तेंव्हा त्या मालिकांना काहीतरी स्टॅन्डर्ड असायचं, पुढच्या भागाबद्दल उत्सुकता असायची. आणि आठवड्यातून एकदाच बघायला मिळत असल्यामुळे, त्यांचं अप्रूपही असायचं. पण आता टी. व्ही. वर चॅनल्सचा इतका सुळसुळाट झालेला आहे, की विचारायची सोय नाही! आणि वेळकाळ याचंही काही बंधन नाही! 24 तास टी. व्ही. सुरूच! आणि मग आलटून पालटून त्याच त्याच मालिकांचे ‘रिपीट एपिसोड’! बघा लेको, केंव्हाही!

या मालिकांची काही वैशिष्ट्यं आहेत बरं का! मालिकेत खलनायिका असलीच पाहिजे, त्या शिवाय, बहुतेक मालिका दाखवायला परवानगी मिळत नसावी! तिचे एकदोन जोडीदार तर हवेतच! आणि हे सगळे नायक-नायिकेच्या घरातले लोकच असतात बरं! आपल्याच घरातल्या लोकांना असा त्रास देताना या लोकांना अगदी आंनदाच्या उकळ्या फुटत असताना पण दाखवतात! आणखी श्रीमंती तर दाखवलीच पाहिजे मालिकांमधे! हिंदी मालिका बघितल्या, तर भारतात कुठे दारिद्र्य आहे, हे खरंच वाटणार नाही! त्या मानाने मराठी मालिकांमधली श्रीमंती मर्यादित प्रमाणात दाखवली जाते! आणखी एक, त्या नायक-नायिकांना सुखानं जगू द्यायचंच नाही, असा विडा खलनायिकेनं आणि मालिकेच्या दिग्दर्शकानंही मिळून उचललेला असतो! याच्या मागे काय कारण असावं, हे काही माझ्यासारख्या पामराला तरी कळत नाही बुवा! खलनायिकेचं एक ठीक आहे, पण दिग्दर्शकाचं काय घोडं मारलेलं असतंय नायक-नायिकेनं देवच जाणे! आणखी एक मज्जा म्हणजे, खलनायक, तिचे जोडीदार अत्यंत हुशार आणि जितके म्हणून चांगले लोक असतील मालिकेत, ते, अगदी नायक-नायिका धरून, ते सगळे बिनडोक! सतत खलनायिका या लोकांवर मात करत रहाणार आणि ह्यांना कळतच नाही, कोण सगळं वाईट घडवतंय आपल्या आयुष्यात ते! अगदी मालिका संपेपर्यंत हा लपंडाव चालूच! शिवाय, हे नायक-नायिका, विशेषतः नायिका तर संत महंतच जणू! आसपासच्या सगळ्या लोकांशी इतकं चांगलं वागणार, की त्या चांगुलपणाचं अजीर्ण व्हावं! सगळ्यांसाठी सतत त्याग करत रहाणार, कशाचा ना कशाचा. असे दोन प्रकार माणसांचे, एक पूर्णतः काळी छटा असलेला, आणि एक पूर्ण, पवित्र शुभ्र रंगाचा! सामान्यतः प्रत्येक माणसात दोन्ही छटा मिसळलेल्या असतात. कोणीच पूर्णतः वाईट किंवा पूर्णतः, म्हणजे, अती चांगला नसतो. खरोखरचे संत-महात्मे सोडून! पण नायिका गुणांची पुतळीच दाखवली पाहिजे असाही नियम असावा, मालिका बनवण्यासाठी.

बरं, एखादी मालिका आधी विनोदी म्हणून जाहिराती करतात, आपल्याला वाटतं, चला, त्या सासवा-सुनांच्या मालिकांपेक्षा काहीतरी वेगळं बघायला मिळेल, म्हणून आपण ती मालिका बघायला सुरुवात करतो, पण थोड्याच दिवसात आपला भ्रमनिरास करून त्या मालिकेत खलनायिका घुसवली जाते आणि सुरु होतं परत तेच दळण! क्वचित काही मालिका या सगळ्याला अपवाद ठरतात आणि बघायला आवडतात.  उदा. ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ सारखी निखळ विनोदी मालिका. आजही त्या मालिकेच्या नुसत्या आठवणीने सुद्धा हसू येतं. ही हिंदी मालिका होती. पण अशा निखळ विनोदी मालिका फार दिवस चालू ठेवणं अवघड असतं. कारण सातत्त्यानं निखळ विनोदी लिहिणं ही खूप अवघड गोष्ट आहे. पु. लं. सारखे जीनियस या क्षेत्रात कमीच असतात.

मराठीतही सुरुवातीच्या काळात चांगल्या मालिका असायच्या. पूर्वीच्या, फक्त दूरदर्शन होतं, त्या काळातल्या ‘बुनियाद’ आणि ‘हम लोग’ या मालिकांनी लोकप्रियतेचा कळस गाठलेला होता. तसेच ‘तमस’ ही देशाच्या फाळणीबद्दलची मालिका, सई परांजपे यांची ‘अडोस-पडोस’ या काही दर्जेदार मालिका आजही लक्षात आहेत.  ‘झोका’, ‘अग्निहोत्र’, ‘असंभव’, ‘आनंद भुवन’ इ. मी बघितलेल्या काही मराठी मालिकाही आजही आठवतात. पण हळूहळू रोजच्या मालिकांचा रतीब जसा सुरु झाला, तसतसा मालिकांचा दर्जा घसरत गेला. आणि पूर्वी मालिकांना तेरा भागांचं बंधन असायचं, आता तशी काही मर्यादाच नसल्यामुळे प्रेक्षकांच्या सहनशक्तीचा अंत बघत आणि वाट्टेल तशा भरकटत मालिका वर्ष नु वर्षे चालूच रहातात.

या मालिकांमधून न पटणाऱ्या, वर्तमान जगाशी सुसंगत नसलेल्या गोष्टीही इतक्या घुसडलेल्या असतात, की विचारायची सोय नाही! हल्ली कोणत्या तरुण मुली साड्या नेसतात? तरुण जाऊ दे, सासू, आई, आज्जी या स्त्रियाही हल्ली फक्त सणा-समारंभातच साडी नेसतात. ही अगदी सामान्य गोष्ट झालेली आहे. पण या मालिकांमधल्या मुली लग्नाआधी ड्रेस वगैरे घालत असल्या तरी लग्न झाल्या क्षणापासून साड्याच नेसायला लागतात. नाहीतर त्या मग वाईट चालीच्या असतात! आता या कर्माला काय म्हणावं? दुष्ट, खलनायिका यांनाच ड्रेस घालायची परवानगी असते मालिकांमधे! आणि सासू, सुना, आत्या, मावशी जी काही स्त्री पात्रं असतील, त्या दिवसरात्र झगमगीत भारी साड्या आणि भरपूर दागदागिने घालून सदैव लग्न समारंभासाठी तयार असल्यासारख्या वावरत असतात मालिकेत! आणि तरीही कुठे बाहेर जायचं असेल तर “मैं तयार हो के आती हूं”, अरे काय! हे हिंदी मालिकांचं जग आहे. हल्ली मराठीमध्ये बहुतेक इतका भडक प्रकार नसतो, पण लग्नानंतर साडी कम्पल्सरी! आणखी एक गम्मत! आपल्यासारख्या सामान्य माणसांचा पोलिसांशी असा कितीकसा संबंध येतो? फार फार तर एखादे वेळी सिग्नल तोडला, किंवा वन वे मधून उलटं जाताना पकडलं गेल्यास दंड भरण्यापुरता! हो की नाही? पण या प्रत्येक मालिकेत या सामान्य घरातला एक तरी माणूस तुरुंगात गेलेला  दाखवलाच पाहिजे, असाही नियम असावा! साध्या-सरळ, सज्जन लोकांचा अतोनात छळ झालेला दाखवला, की या लेखक -दिग्दर्शकांना कसला आसुरी आनंद मिळतो, कोणजाणे!

ऐतिहासिक मालिका बघणं तर मी कधीच सोडून दिलंय. त्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली इतिहासाची एवढी मोडतोड करतात, की जे लोक अगदी थोडंफार जाणतात, वाचतात त्यांनाही ते बघवू नये! काही अपवाद असतीलही, पण सर्वसाधारण अनुभव काही चांगला नाही! पौराणिक मालिकांमधे, किंवा देव देवतांवर काढलेल्या मालिकांमधे तर काहीही दाखवायची प्रचंड मुभाच मिळालेली असते, या लोकांना. कारण, त्यात खरं खोटं कसं आणि कोण सांगणार? पहिल्या ‘महाभारत’ आणि ‘रामायणा’ मधील चमत्कारांनीच त्याची सुरुवात करून दिलेली आहे. पण ते आपले टी. व्ही. बघण्याचेच सुरुवातीचे दिवस होते, म्हणून त्या मालिका प्रचंड लोकप्रिय झाल्या. आणि हल्ली परत परत नव्याने त्यांच्या नवीन आवृत्त्या निघत असतात. पण त्या नव्या बघितल्यावर मात्र त्या जुन्या कितीतरी चांगल्या होत्या, असं म्हणायची वेळ येते! 

क्रमशः…

© सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

संपर्क – 1565, सदाशिव पेठ, ‘लक्ष्मी सदन’, पी. जोग क्लास लेन, पुणे, ४११०३०. मो. 7709014058.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares