मराठी साहित्य – विविधा ☆ “श्रीकृष्ण आणि सूरदास…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “श्रीकृष्ण आणि सूरदास…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट☆

श्रीकृष्ण म्हणजे युगाचा महानायक, युगंधर ,.ह्याची अनंत रुपे,आणि वेगवेगळी नावे.त्याचं सगळ्यांना भावलेलं नाव म्हणजे कान्हा.कान्हा म्हंटला की आठवतो आपल्या जवळचा,आपल्याला समजून घेणारा सखा.

श्रीकृष्ण जितका जितका आपण जाणायला,समजायला पुढेपुढे जावं तितका तितका तो मारुतीच्या शेपटीसारखा वाढतच जातो.पण तरीही कान्हाला जाणून घ्यायची ओढ पण स्वस्थ बसू देत नाही हे खरे.

आजपासून एकवीस वर्षांपूर्वी म्हणजे दोन हजार साली श्रीकृष्णाच्याच कृपेने श्रीकृष्ण कळायला सुरवात झाली. प्रख्यात लेखक मा.श्री. शिवाजी सावंत ह्यांनी हळुहळू माझ्यासारख्या वाचकांच्या बुद्धीस झेपेल,पचेल,आकलन होईल असा माझा कान्हा माझ्यासमोर उलगडायला सुरवात केली.तेव्हा प्रकर्षाने जाणवले की आपल्याला आपला हा मधुसूदन कितीतरी कमी कळलायं.हिमनगाच्या टोकाप्रमाणं.जेवढा कळलायं त्यापेक्षाही त्याच्या कितीतरी पट जास्त कळायचा राहिलायं.खूप सुंदर रितीने कृष्णाची विविध रुपे ह्यामध्ये उलगडून दाखविली आहेत.मध्ये महाभारतात घडलेल्या कित्येक घटकांचा उलगडा संदर्भासहित कळतो.

या पुस्तकातून कळतं श्रीकृष्णाला,गुरू दोन,भगिनी तीन,माता पिता दोन,तसेच बहुपत्नी,कन्या,पुत्र होते.सख्या मात्र दोनच.एक राधा आणि दुसरी द्रौपदी. राधा ह्या शब्दाचा नव्यानेच अर्थ कळला युगंधर मधून.”रा” म्हणजे लाभो किंवा मिळो आणि धा म्हणजे मोक्ष किंवा जीवनमुक्ती.

आज कृष्ण हा शब्द उच्चारल्याबरोबर आठवतात ते सगळे कृष्णावर अलौकिक प्रेम , भक्ती करणारे समस्त कृष्णप्रेमी. त्यापैकी एक पराकोटीचे कृष्णप्रेमी म्हणून ज्यांची हमखास आठवण येते ते संत सूरदास. ज्यांना आपण  आध्यात्मिक क्षेत्रातील सूर्य पण म्हणतो. त्यांची जयंती नुकतीच झाली. त्यांना विनम्र अभिवादन.

सूरदास हे नाव उच्चारल्या बरोबर “मै नही माँखन खायो”ही रचना आठवते.अशा कित्येक लोकप्रिय रचना सूरदासांच्याच. ह्या कर्तृत्वात त्यांच अंधत्व कुठेही आड आलं नाही.

सूरदासांची एक मला अत्यंत भावलेला गुण म्हणजे त्यांचे “एका देवा केशवा” अशी परमोच्च भक्ती.हिंदीच्या ब्रज 

बोलीभाषेत लिहिणारे एक भक्तकवी होते.हे त्यांच्या सूरसागर या ग्रंथासाठी  ते प्रसिद्ध आहेत.

सूरदासांचा जन्म दिल्लीजवळील एका लहान गावात ,एका सारस्वत ब्राम्हण कुटूंबात झाला. त्यांचे आयुष्य आग्र्याजवळच्या गऊघाट व मथुरेजवळच्या गोवर्धन या गावांत गेले.  वल्लभाचार्यांनी त्यांना 

श्रीकृष्णभक्तीचा उपदेश दिला. सूरसागर ह्या त्यांच्या ग्रंथात श्रीकृष्णाच्या जीवनाचे वर्णन आहे. त्यातील काव्य व गानसौंदर्यामुळे ते तत्कालीन समाजात प्रसिद्ध झाले. सूरदासांची प्रसिद्धी ऐकून  तानसेनाच्या  मध्यस्थीने अकबर बादशहा त्यांना भेटायला आला. तेव्हा अकबराच्या आज्ञेनंतर सुद्धा  सूरदासांनी त्याची स्तुतीकवने लिहीण्यास नकार दिला अशी आख्यायिका आहे.  सूरसागरा शिवाय सूरदासांनी  सूरसारावली, साहित्यलहरी नलदमयन्ती अशा इतर ग्रंथांचेही लिखाण केले.

साक्षात भगवान श्रीकृष्णांनी ह्यांना दर्शन देऊन त्यांचे अंधत्व दूर केले होते. परंतू त्यांनी भगवंताकडे मागणे मागितले की मला पुन्हा अंध कर.मला फक्त तू दिसायला हवा आहेस आणि तू तर मला अंध असतांनाही दिसतो. किती अपरंपार भक्ती ही.

अशा ह्या अलोट भक्ती असणाऱ्या कृष्णप्रेमी सुरदासांचे वयाच्या 101 व्या वर्षी निधन झाले. त्यांना आणि त्यांच्या अतूट भक्ती ला मनोमन प्रणाम.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “पानी तेरा रंग कैसा…?” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “पानी तेरा रंग कैसा…?” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

पानी तेरा रंग कैसा….?

काल एक खूप मस्त आणि विचारात पाडणारी शाँर्टफिल्म बघण्यात आली. त्या शाँर्टफिल्मच नाव “जी ले जरा…..लाईफ तक.

नावाप्रमाणचं ही शाँर्टफिल्म थोडक्यात खूप सारा आशय देऊन जाणारी आहे.

शाँर्टफिल्म मध्ये काम करणारे कलाकार इन मीन तीन. एक तरुण जोडपं आणि त्या जोडप्यातील मुलाची आई ,असे तीघजणं एकत्र घरी राहात असतात.  सून, मुलगा दोघही नोकरीवाले, त्या बाईचा नवरा गेल्यापासून तिची संसारातील विरक्ती, नोकरी सोडून घरी बसणं, बाहेर समाजात वावरणे एकदम बंद, घरातं एक घरातं हा वसा घेऊन चालल्यासारखं त्या बाईचं वागणं खूप खुपतं असतं त्या जोडप्याला.शेवटी आईला दुःख विसरायला लावून समाजात परत पूर्वी सारख आईला वागायला लावायचचं अशी त्या जोडप्याची मनोमन ईच्छा.नेहमीप्रमाणे शाँर्टफिल्म चा शेवट गोड.

ह्या फिल्ममधून खूप गोष्टी कळल्या,शिकाव्या अश्या वाटल्या. कुठलिही व्यक्ती समाजात वावरतांना,संसारात रमतांना अनेक वेगवेगळ्या नात्यांनी जोडल्या जाते, बांधल्या जाते.आणि मग सर्वांशी ती व्यक्ती नकळत अगदी मनातून, मनापासून असे बंध तयार करते. शक्यतो कुठलिही व्यक्ती अनेक व्यक्तींमध्ये गुंतून जाते. अर्थातच त्यातील काही व्यक्ती ह्या अगदी अतिजवळच्या,काही थोड्या जवळच्या अशी वर्गवारी आपोआपच सगळ्यांचीच पडते.

अनेक बंधनांनी घट्ट बांधल्या गेलेल्या अनेक व्यक्तींपैकी केव्हा तरी कुठलीतरी व्यक्ती ही आपल्याला कायमची दुरावणारच.हे निसर्गचक्र वा जगरहाटीच म्हणावी लागेल. काही वेळेस अगदी जवळची व्यक्ती दुरावली की तो आघात खूप जास्त असतो ,अगदी मान्य ,पण म्हणून ह्याचा अर्थ बाकी नाती संपली,व्यवधान तुटले, असं अजिबात नसतं.पण काय होतं, ह्या अपरिमीत दुःखापुढे कधीकधी आपली कर्तव्य, आपले इतर गुंतलेले भावबंध, इतर नात्यांच्या वाट्याचं प्रेम ह्याचा जणू विसर पडून कुणी कुणी स्वतःभोवती घट्ट कोष विणून घेतात, ह्या कोषात शिरायची ना कुणाला प्राज्ञा असते वा ना कुणात हिंमत. आणि इथेच गणित चुकत जातं.

माझ्या मते आपल्या मनाचे भावनांचे अनेक लाँकर्ससारखे कप्पे करावे,त्या प्रत्येक कप्प्याला स्वतंत्र किल्ली असावी, कुठलीच किल्ली ही दुसऱ्या कप्प्याला लागणारी नसावी. म्हणजे काय होईल समजा एखाद्या कप्प्याची किल्लीच अचानक हरवली तर दुसऱ्या कप्प्यांवर त्याचा काही परिणाम होणार नाही. ही भुमिका असते जरा अवघड,परीक्षा बघणारी पण अगदीच अशक्यप्राय अशी नसते. आपण एखाद्या नात्याच्या स्मृतीतच फक्त गुंतुन राहतांना जर आपल्याला बाकी उर्वरित चालत्या बोलत्या नात्यांचा विसर पडला तर बाकीच पुढच सगळंच अवघड होऊन जातं. म्हणून तेव्हा मग “पानी तेरा रंग कैसा,जिसमे मिलाँए वैसा” ही भुमिका आणि अशी वर्तणूक बाकी उरलेल्या नात्यांना न्याय देऊ शकते आणी महत्त्वाचे म्हणजे आपल्याशी जोडलेली ही नाती जास्त आनंद आणि सुखसमाधान उपभोगू शकतात हे नक्की.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! – जालीम इलाज ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

 😂 चं म त ग ! 😅 जालीम इलाज ! 🤠 ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

“गुडमॉर्निंग पंत !”

“नमस्कार, नमस्कार कसा आहेस ?”

“बरा आहे.”

“अरे पण तुझ्या आवाजावरून आणि मरगळलेल्या हालचाली वरून, नुकताच एव्हरेस्ट वगैरे चढून आल्या इतका दमलेला वाटतोयस.”

“हो, दमलोय खरा, कारण सध्या वर्क फॉर होम चालू आहे ना माझ !”

“काय ?”

“वर्क फॉर होम म्हटलं मी, काही चुकलं का ?”

“चुकलं म्हणजे काय चुकलंच, अरे आमचा मुलगा वर्क फ्रॉम होम करतोय आणि…. “

“मी वर्क फॉर होम.”

“म्हणजे चुकलं की नाही तुझं ?”

“पण पंत, मी वर्क फॉर होमच करतोय, म्हणजे घरची सगळी काम, स्वयंपाक सोडून एकट्याने करतोय.”

“अरे पण माझा मुलगा…. ?”

“अहो पंत, तो वर्क फ्रॉम होम करतोय, म्हणजे ऑफिसच काम घरून करतोय आणि मी… “

“वर्क फॉर होम म्हणजे घरची काम, बरोबर ?”

“आता कसं बोललात पंत ! सध्या कामवाल्या मावशी येऊ शकत नाहीत कारण…..”

“मला कारण माहिती आहे, पण तुला तुझ्या या वर्क फॉर होम मधे तुझी बायको काही मदत करीत असेलच ना ?”

“अजिबात नाही, ती म्हणते मी तुम्हाला मदत केली तर स्वयंपाकाचे काय, तुमची उपाशी रहायची तयारी असेल तर करते मदत, आता बोला !”

“म्हणजे कठीणच आहे तुझं आता मावशी कामाला येई पर्यंत.”

“हो ना, म्हणूनच माझा आवाज तुम्हाला जरा दमल्या सारखा वाटला असेल.”

“असेल असेल, पण काय रे तुझे कान….. “

“कान ? कान आहेत जाग्यावर पंत आणि मला ऐकायला सुद्धा नीट…. “

“अरे त्या बद्दल नाही मी बोलत पण तुझे कान नेहमी पेक्षा… “

“पंत माझ्या कानाचे काय ते स्पष्ट बोला, उगाच मला कोड्यात टाकू नका.”

“अरे हो हो, किती घाई करशील. जरा मला नीट जवळून पाहू दे बरं तुझे दोन्ही कान.”

“बघा बघा पंत, नीट जवळून बघा पण सकाळी मी दाढी केली तेव्हा ते आपापल्या जागीच होते.  मला नाही त्यांच्यात काही फरक… “

“फरक पडला आहे, हे मी तुला खात्रीपूर्वक सांगू शकतो.”

“फरक आणि माझ्या कानात? मग मला तो सकाळी कसा… “

“दिसला नाही, असंच ना ?”

“बरोबर.”

“अरे त्याच काय असतं, एखादा माणूस बारीक झाला आहे किंवा जाड झाला आहे, ते दुसऱ्याने त्याला बरेच दिवसांनी बघितलं तर… “

“कळत हे मला माहित आहे.  पण ते सगळे सोडा आणि माझ्या कानाचे काय ते… “

“ते थोडे मोठे झाल्या सारखे वाटतायत मला.”

“काहीतरीच काय पंत, कान कसे मोठे होतील ?”

“का नाही होणार? अरे जिथे माणसाची उंची सुद्धा जसजसे वय वाढते तसतशी कमी होते,  तर तुझ्या कानांचे काय घेऊन बसलास !”

“आता ही तुमची नवी थियरी वाटत ?”

“माझी कसली नवी थियरी? मी काय शास्त्रज्ञ थोडाच आहे माझी स्वतःची अशी थियरी मांडायला.”

“मग कशावरून तुम्ही म्हणताय की…. “

“तुझे कान मोठे झालेत म्हणून ?”

“ते नाही हो पंत, माणसाची उंची वय वाढत चालल की कमी कमी होते म्हणून.”

“अरे तुमचं प्रगत विज्ञानच म्हणतय तस, मी कशाला म्हणायला हवंय.”

“काय सांगताय काय पंत, खरच असं…. “

“होत, तुला खोटं वाटत असेल तर गुगल मारून बघ.”

“ते तर मी बघिनच पण….”

“अरे त्या गुगलवरच मी हे कधीतरी वाचल होत, ते आठवलं आणि म्हणून तस म्हणालो मी.”

“हो, पण पंत वय वाढतांना उंची कमी होण्याची काही कारण दिली असतील ना त्यात ती… “

“अरे उंची कमी होते म्हणजे वय वाढते तसतशी माणसाची हाडं काही प्रमाणात आकुंचन पावतात आणि… “

“त्याचाच परिणाम माणसाच्या उंची कमी होण्यावर होत असणार, बरोबर ?”

“बरोबर, अगदी फ्रॅक्शन ऑफ इंचेस मधे हा उंचीच्या बाबतीत फरक पडतो, पण त्यामुळे तो डोळयाला तसा जाणवत नाही इतकंच.”

“ते सगळे खरच असेल म्हणा, पण माझे कान मोठे होण्याचे कारण काय ?”

“मला वाटत तो तुझ्या वर्क फॉर होमचा परिणाम असावा !”

“काहीतरीच काय पंत, कसं शक्य आहे ते ?”

“हां, इथे मी माझी थियरी सांगतो तुला, बघ तुला पटते का ती.”

“बोला पंत, बोला, मी अगदी उत्सुक आहे तुमची थियरी ऐकायला.”

“आता असं बघ, हल्ली तू चौवीस तास घरीच असतोस वर्क फॉर होम करत, तेव्हा बायको तुला आता हे करा, ते करा, हे आत्ता नका करू असं सारखं कामाच्या बाबतीत सुनावत असेल ना, त्याचाच परिणाम होऊन तुझे कान… “

“खरच मोठे झाले असतील ?”

“अगदी गर्दभा एव्हढे नाही, पण फ्रॅक्शन ऑफ इंचेसने नक्कीच मोठे झाले आहेत.”

“असेल, असेल तसही असेल कदाचित.  पण पंत आता मी निघतो, नाहीतर बायकोचा तोफखाना सुरु व्हायचा माझ्या नावाने.”

“जा, जा आणि कानाची जास्त काळजी करू नकोस, तुझं वर्क फॉर होम संपल की येतील ते जाग्यावर. पण जाण्या आधी माझ एक काम सांगतोय ते जरा करशील का?”

“का नाही पंत, सांगा ना काय काम आहे ते तुमचे.”

“अरे काल माझ्या डोंबिवलीला राहणाऱ्या करव्याचा फोन आला होता.”

“हां, म्हणजे डोंबिवलीला स्टेशनं जवळच ज्यांची सोसायटी आहे तेच कर्वे काका ना ?”

“हो, त्याला सध्या झोपेचा प्रॉब्लेम झाला आहे, झोप लागत नाही रात्री.”

“मग डॉक्टरकडे जा म्हणावं त्यांना.”

“अरे तो गेला होता, डॉक्टरने त्याला झोपेच्या गोळ्यांचा डोस दिला, पण त्या घेऊन सुद्धा त्याची झोप उडालेली ती उडलेलीच, म्हणून त्यानं मला फोन केला, काही उपाय आहे का विचारायला.”

“मग तुम्हाला उपाय सापडला की काय त्यांच्या झोपेवर ? “

“हो अगदी जालीम इलाज सापडला आहे आणि त्या साठीच मला तुझी मदत हवी आहे.”

“बोला पंत काय मदत करू मी तुम्हाला.”

“अरे तुझ्याकडे टेपरेकॉर्डर आहे ना त्यावर मला, एका कॅसेटवर ट्रेन धावल्याचा आवाज रेकॉर्ड करून देशील का ? “

“हो, पण त्यानं कर्वे काकांचा झोपेचा प्रॉब्लेम…. “

“नक्कीच सॉल्व होईल याची मला शंभर टक्के खात्री आहे !”

“तो कसा काय पंत ?”

“अरे असं बघ, त्याची सोसायटी ट्रॅकला लागून आहे आणि सध्या सगळ्या ट्रेन बंद म्हटल्यावर या पठ्याला झोप कशी लागणार, रोजचा ट्रेनचा खडखडाट ऐकल्या शिवाय, काय खरं ना ?”

“मानलं तुम्हाला पंत !”

“मानलंस ना, मग आता लाग सांगितलेल्या कामाला आणि मला ती रेकॉर्डेड कॅसेट आणून दे लवकर.  एकदा ती करव्याला कुरिअर केली की मी निवांत झोपायला मोकळा.”

“धन्य, धन्य आहे तुमची पंत !”

© श्री प्रमोद वामन वर्तक

२७-१२-२०२२

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग –४९ – सर्वधर्म परिषदेनंतर शिकागोतील वास्तव्य ☆ डाॅ.नयना कासखेडीकर  ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग –४९ – सर्वधर्म परिषदेनंतर शिकागोतील वास्तव्य डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

११ सप्टेंबरला शिकागो येथे सर्व धर्म परिषद उद्घाटन जोरदार झालं.स्वामीजींचे स्वागतपर छोटेसे भाषण ही आपण पहिले. परिषदेला आलेल्या पाहुण्यांची निवास व्यवस्था अनेक वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आली होती. स्वामी विवेकानंद यांची सोय जे. बी. लायन यांच्याकडे केलली होती. लायन यांच्याकडे आधीच परप्रांतातून अनेक प्रतींनिधी राहायला होते. घर जरी प्रशस्त मोठं असलं तरी गर्दी झाली. त्यात विवेकानंद यांना लायन यांच्याकडे ११ सप्टेंबरला रात्री पाठवण्यात आले. लायन यांच्या पत्नी एमिली यांनी आपल्या मुलाला दुसरीकडे पाठवून ती खोली रिकामी करून ठेवली. कोण येणार हे माहिती नसल्याने त्यांच्या मनात शंका आली की आपल्याकडे दक्षिण अमेरिकेतील लोक उतरले आहेत त्यांच्या बरोबर हा कृष्णवर्णीय प्रतिनिधी कसा काय चालेल? कारण दक्षिण अमेरिकेत वर्णभेद खूप होता. मग त्यांनी मिस्टर लायन यांना सुचविले की यांची सोय हवं तर आपण शेजारच्या ऑडिटोरियम मध्ये करूया.

मिस्टर लायन गप्पच. ते उठून खाली जाऊन वर्तमान पत्र वाचून आले. तिथे स्वामीजी भेटले आणि तसेच वरती येऊन एमिली यांना म्हणाले, “आपले इतर पाहुणे जरी इथून गेले तरी हरकत नाही, मला काही वाटणार नाही. पण हे भारतीय पाहुणे अतिशय बुद्धीमान असून इतकी मनोवेधक व्यक्ती यापूर्वी आपल्याकडे कधीच आली नव्हती. त्यामुळे त्यांना हवे तेव्हढे दिवस इथे ठेवले तरी चालेल. त्यांची इच्छा असेल तेव्हढे दिवस त्यांना इथे राहुदे”. विवेकानंद लायन यांच्याकडे राहिले आणि त्या घरचेच एक सभासद होऊन गेले, इतके त्यांच्यात मिसळले. यावरून लायन किती उदार विचारांचे होते हे लक्षात येते. वर्णभेदाचा विचार त्यांनाही करावा लागला होता. अमेरिकेत पोहोचल्यापासूनच विवेकानंदांना अशा अनेक चित्रविचित्र अनुभवांना सामोरे जावे लागले होते.

इथे, नुकत्याच अमेरिकेत घडलेल्या प्रसंगाची आठवण झाली. २०० वर्षांचा काळ लोटला तरी अमेरिकेत वर्णभेदाची चिंगारी मधूनच पेटते हे आता नुकतच सगळ्यांनी पाहिलं आहे. काळे गोरे या वादात मूळ कैरोलीनाचा असलेला आफ्रिकी अमेरिकन जॉर्ज फ्लॉयड याला मिनियापोलीस मध्ये नकली नोटेने बिल दिले अशा तक्रारीवरून पोलिसांची कारवाई होताना जीवाला मुकावे लागले. याचा परिणाम असा झाला की अमेरिकेत सगळीकडे त्या विरूद्ध आवाज उठवला गेला. मोर्चे निघाले, हिंसक वळण लागले. वॉशिंग्टन डी.सी,अटलांटा, फिनिक्स,डेनवर, लॉस एंजिल्स, लास वेगास सगळीकडे त्याचे पडसाद उमटले. एखादा चुकीचा विचार मनुष्याच्या मनात रूजला की तो बाहेर निघणे फार कठीण जाते. म्हणून चांगले विचार समाजात रुजविणे हे प्रत्येक माणसाचे कर्तव्य असते. वर्तमानात सध्या चांगले कशाला म्हणायचे हेच लोकांना आधी शिकवावे लागेल. असो .             

शिकागो क्लबमध्ये विवेकानंद यांनी लायन यांच्या मित्रांसमोर मत व्यक्त करताना म्हटले होते, “आजपर्यंत मला भेटलेल्या व्यक्तींमध्ये लायन हे ख्रिस्तांशी सर्वात अधिक साम्य असलेले आहेत, अशी माझी धारणा आहे”.

लायन यांची नात कॉर्नेलिया कोंगर यावेळी सहा वर्षांची होती. तिची विवेकानंदांची चांगली मैत्री जमली. निरागस आणि अजाण अशा  कॉर्नेलियाला स्वामीजी मोर, पोपट,  वानर यांच्या गोष्टी सांगत. झाडे, फुले यांची मनोरंजक माहिती सांगत. विवेकानंद संध्याकाळी बाहेरून आले की लगेच मांडीवर जाऊन बसत मला गोष्ट सांगा म्हणून ति मागे लागे. यावेळी विवेकानंद वास्तविक तीशीचे होते, पण त्यांचे लहान मुलांशी वागण्याचे कौशल्य मात्र आजी आजोबांच्या वयातले असे. कार्नेलियाचे वडील तरुण वयातच स्वर्गवासी झाले होते. त्यामुळे तिच्या आईवर मोठा आघात झाला होता. अजूनही तो ताजा होता. त्यातून ती बाहेर आली नव्हती. घरात तिच्याशी वागता बोलताना विवेकानंद काळजी घेत. त्यांच्या व्याख्यांनांना ती जात असे. त्यातले नीट कळायला हवे म्हणून तिने पौर्वात्य तत्वज्ञानाचा परिचय करून घेतला. आणि पुढे स्वामी विवेकानंद यांचे ग्रंथ अभ्यासले.

एमिली लायन यांचा स्वभाव वागणं बोलणं यामुळे त्यांना, त्या आपल्या आई भुवनेश्वरी देवी सारख्या वाटत. म्हणून ते त्यांना मदर म्हणत असत.एमिली यांनीही विवेकानंद यांना पुत्रवत प्रेम दिलं, तिथले  उच्चवर्गीय सामाजिक शिष्टाचार शिकविले. त्यांना आपल्या एखाद्या अज्ञाना बद्दल संकोच नाही वाटायचा. घरी आल्यावर ते ती गोष्ट समजून घ्यायचे. ज्ञानात भर घालायचे.

त्यांना बाहेर व्याख्यान दिल्यावर जे मानधन मिळत असे, ते पैसे ते आपल्या रुमालात बांधून आणत असत आणी एमिली लायन यांच्यासमोर ठेवत असत. जवळ जवळ सत्तर ऐंशी डॉलर असत.संन्यासी, त्यात पैसे बाळगायची एकतर सवयच नव्हती. मग एमिली यांना न मोजताच ते पैसे देऊन सांगत, “हे तुम्ही सांभाळा”. एव्हढा विश्वास. विवेकानंद कशासाठी पैसे जमवत आहेत हे लायन यांनाही माहिती होते.त्यांनी मग पैसे कसे सांभाळायचे हे त्यांना शिकविले. नाणी ओळखायची शिकविले. पैसे ठेवण्यासाठी त्यांनी तर बँकेत खातेच उघडून दिले.

मिसेस लायन स्त्रियांसाठी असलेल्या रुग्णालयाच्या अध्यक्षा होत्या. एकदा त्या विवेकानंदांना तिथे घेऊन गेल्या. विवेकानंद यांनी तिथल्या सर्व गोष्टींची बारीक सारिक माहिती घेतली. तिथल्या अधिकारी डॉक्टर्स, नर्सेस सर्वांशी बोलून कामाची पद्धत जाणून घेतली.तिथलं बालमृत्यूचं प्रमाण जाणून घेतलं. भोजन गृहातले आचारी आणि कपडे धुणारे कर्मचारी यांच्याशी ही संवाद साधला. अशाच पद्धतीने त्यांनी उत्सुकतेने शिकागो मधली वस्तु संग्रहालये, दालने, विद्यापीठे पाहिली. छोट्या कोर्नेलियाच्या  बालवाडीत सुद्धा जाऊन आले. आपल्या देशात स्त्रियांसाठी रुग्णालये नाहीत आणि मुलींसाठी शाळा नाहीत याची त्यांना खंत वाटली.

शिक्षण क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या कर्नल वेलॅन्ड यांनी त्यांच्या शिकागोत उघडलेल्या शाळेत विवेकानंद यांना भेट द्यायला बोलावले. लहान मुलांवर संस्कार व्हावेत असा त्यांचा उद्देश होता. मुलांसमोर विवेकानंद यांनी केलेले भाषण मुलांना फार आवडले. ते झाल्यावर बाहेर पडत असताना शाळेतल्या एकमेव भारतीय विद्यार्थ्याने, खाली वाकून स्वामीजींच्या अंगावरील वस्त्राला आदराने स्पर्श केला. ते पाहून शेजारील मुलीने विचारले तू हे काय केलेस? कोण आहेत हे पाहुणे?तो भारतीय विद्यार्थी म्हणाला, “हे  स्वामी विवेकानंद आहेत, भारतातून आले आहेत. फार मोठे संत आहेत”. त्या मुलीला आश्चर्य वाटलं, “आता तर संत कुठेच नाहीत?”मुलगा म्हणाला, इथं तुमच्या देशात नाहीत. पण आमच्या भारतात आजही आहेत”.

असे अनुभव स्वामीजी घेत होते . एक दिवस ते एमिली लायन यांना म्हणाले, आज मला एका सुंदर गोष्टीचा शोध लागला आहे. लायन यांनी विनोदाने विचारले की, कोण आहे ती? विवेकानंद हसत सुटले आणि म्हणाले, अहो ती कोणी मुलगी नाही.ती गोष्ट म्हणजे संघटना. कोणतेही काम पद्धतशिरपणे व्हावयास हवे असेल तर, अमेरिकेत आहेत तशा वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळ्या स्वतंत्र संस्था हव्यात त्यांचे नियम हवेत, कामात शिस्त हवी. असे केले तर खर्‍या अर्थाने कोणतेही काम होऊ शकते आणि सतत चालू राहू शकते”. हे सर्व सत्य त्यांच्या मनात आल होतं आता पर्यन्त केलेल्या निरीक्षणातून. इथून पुढे त्यांची या विचारांची पकड घट्ट झाली. आता त्यावर चिंतन पण सुरू झाले. त्यातूनच निर्माण झाली ती आपल्या सर्व गुरुबंधूंना एकत्र बांधून ठेवेल अशी संस्था उभी करण्याचे स्वप्न. याचा संबंध आपल्या देशातील धार्मिक आणि सामाजिक परिस्थितिशी घालून एक संस्था मूर्तरूपात आणावी अशी संकल्पना मनात रूजली. इथे लायन यांच्याकडे स्वामीजी जवळ जवळ दीड ते दोन महीने राहिले, या काळात त्यांनी तिथल्या सुंदर इमारती व वास्तुसौंदर्य, तिथलं संगीत, सुखसोयी,यांच्याकडे अभ्यासपूर्ण बघितले.त्यांनी 1898 मध्ये पत्रात मेरी यांना लिहिलं की,तुमचे घर आणि तुम्ही सर्व जणांनी मला एव्हढे प्रेम दिले आहे की, आपले पूर्वजन्मीचे काहीतरी नाते असले पाहिजे. 

याच प्रमाणे परिषदेला आल्यानंतर सर्वप्रथम पत्ता शोधत शोधत कंटाळून स्वामीजी रस्त्यावर बसले असताना मिसेस बेली हेल यांनी त्यांना घरी नेले होते, तेही कुटुंब विवेकानंदांना घरच्यासारखेच मिळाले होते. विवेकानंद यांच्या आयुष्याच्या अखेरीस पर्यन्त त्यांचा हेल कुटुंबीयांशी संपर्क होता. पुढे पुढे कुठूनही ते प्रवास करून आले की सरळ हेल यांच्याकडेच येत. हेल यांच्या मेरी आणि हॅरिएट, जॉर्ज हेल यांच्या बहिणीच्या इजाबेल आणि मॅक किंडले यांन ते बहिणी मानत. तर मिसेस हेल यांना मदर म्हणत. सगळे जण स्वामीजींची चांगली व्यवस्था ठेवत आणि काळजी घेत असत. स्वामीजींना इथे मोकळेपणा वाटत असे. स्वास्थ्य लाभत असे.

परिषद संपल्यानंतर विवेकानंद यांनी प्रा.राईट यांनाही पत्रे लिहिली आणि त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. राईट यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून आपल्याला पत्र लिहायला वेळ पुरेसा नव्हता आणि केवळ औपचारिक पत्र लिहू नये असे वाटल्याचे प्रांजळ पणे सांगितले. तसेच इथल्या परिषदेत केवळ राईट यांच्यामुळे आणि परमेश्वरमुळेच शक्य झाले. हे सर्व श्रेय स्वामीजींनी राईट यांना दिले आहे. हे लिहिताना स्वामीजींनी आता आपण पाश्चात्य जीवनाशी जुळवून घेण्याचे ठरविले आहे. असेही लिहिले आहे. कारण कपडे आणि अन्न पदार्थ यात त्यांना जुळवून घेणं क्रमप्राप्त होतं. आणि नंतर ते तिथे सन्यासी वेष सोडून पाश्चात्य वेषात दिसतात. हा बदल त्यांनी केला. बहिरंगाला अखेर काहीही महत्व नाही असे ते आधीही वारंवार सांगत असत.

अमेरिकेतली एकूण संस्कृती, आचार-विचार, तिथली परिस्थिति आणि आपला उद्देश याचा ताळमेळ स्वामीजींनी घातला. संन्याशाचा वेष जाऊन कोट पॅंट घातले तरी आपल्या मनात जे विचार आहेत जे उद्देश आहेत ते तसेच कायम असणं महत्वाचं आहे.

भारतात उद्योगधंदे उभे करण्यासाठी अमेरिकन उद्योगपतींचे मन वळवावे, म्हणजे भारतातल्या लोकांना तंत्र कळेल आणि गरीब जनतेला दोन वेळच अन्न मिळेल असं त्यांना वाटलं होतं, शिवाय देणग्या गोळा  कराव्यात असाही त्यांनी विचार केला होता पण त्यातली अव्यवहार्यता त्यांच्या लक्षात आल्यावर हे विचार त्यांनी मनातून काढून टाकले. नुसती देणगी मागितल्याने हळूहळू त्यात लाचारीचा भाव येतो आणि आपण भिक्षेकरी आहोत असे वाटू लागते असा विचार त्यांनी केला.पूर्वेकडून अनेक लोक जसे योजना घेऊन अमेरिकेत येतात आणि आवश्यकते पेक्षा जास्त निधि घेऊन जातात तसेच आपणही गणले जाऊ. यात स्वाभिमान राहणार नाही. मग यापेक्षा वेगळा विचार त्यांच्या मनात आला. त्यामुळे आपल्याला व्याख्यानाद्वारे जो पैसा मिळेल तेव्हढाच आपण घ्यायचा असे त्यांनी ठरवले. हाच मार्ग बरा आहे असे त्यांनी राईट आणि मिसेस वुड्स यांनाही पत्रातून कळवला. परिषद होऊन महिनाच होत होता तेंव्हाच हा निश्चय पक्का केला.

परिषद संपल्यावर विवेकानंद अनेक ठिकाणी राहिले. जिथे जिथे राहत आणि ज्यांना भेटत त्यांचा दृष्टीकोण आमुलाग्र बदलत असे. या काळातल्या आठवणी त्या त्या व्यक्तींनी लिहून ठेवल्या आहेत. काही आठवणी स्वामीजींनी स्वत: सांगितल्या आहेत. अमेरिका आणि युरोप खंडात अत्यंत लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली रंगभूमीवरची गायिका मॅडम एम्मा कॅल्व्हे हिची विवेकानंद यांची भेट तीच आयुष्य बदलून टाकणारी ठरली.उद्विग्न अवस्थेत ती विवेकानंद यांना भेटली आणि…

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “अपघात आणि सुरक्षा…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “अपघात आणि सुरक्षा…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

काही  दिवसांपूर्वी यवतमाळला मन सुन्न करणारी घटना घडली. यवतमाळातील सुप्रसिद्ध गायनिक डॉक्टर सुरेखा बरलोटा ह्यांच अतिशय दुर्दैवी अपघाती दुःखद निधन झालं. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

डॉ. सुरेखा ह्यांच्या निधनानं यवतमाळातील एक सुविद्य, निष्णात डॉ. तर आपण गमावलाच पण त्याचबरोबर निष्णात मऩोविकारतज्ञ डॉ. पियुष बरलोटा ह्यांना त्यांच्या सेवाभावी कार्यात भक्कम साथ देणारी सहधर्मचारिणी आणि दोन उमलत्या वयांतील मुलांची आई गमावल्या गेली.

सगळं गेलेलं परत पुन्हा मिळू शकतं परंतु आपली गमावलेली व्यक्ती मात्र परत कधीच हाती येत नाही.

आपल्या आजूबाजूला अशा प्रकारचे घडलेले अपघात हे आपल्याला हादरवून तर सोडतातच परंतु खूप विचारात देखील पाडतात.

सगळ्यात पहिला मुद्दा स्वरक्षण,स्वतःची काळजी घेण्याचा. ह्या अपघाती घटनांवरुन एक लक्षात येतं सुविद्य, समजदार व्यक्ती सुद्धा प्रवास करतांना घ्याव्या लागणा-या आवश्यक खबरदा-यांमध्येही बेफिकीरी,लापरवाही करतात आणि हीच गोष्ट कदाचित आपल्या स्वतःच्या जीवावर बेतते. बरेचवेळा आपल्या कामाच्या घाईने म्हणा वा एक प्रकारच्या वेगाच्या धुंदीत वाहन बेसुमार वेगात चालवितात

कुठलही वाहन अपघात झाला असता जितक्या कमी वेगात असतं तितकी हानी कमी होते. त्यामुळे सिटबेल्ट न बांधण, वाहन अतिस्पीड मध्ये पळवणं ह्या गोष्टी सुद्धा “आ बैल मुझे मार”

सारखं अपघातांना आणि वेगवेगळ्या होणाऱ्या नुकसानींना आमंत्रण देत असतात हे विसरून चालणार नाही.

बरेचसे अपघात हे सहलीला जातांना, सहलीहून परततांना वा देवदर्शनासाठी जातांना वा येतांना घडतात. ह्या बाबीकडे लक्ष पुरविलं असता एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते. आजचं आपल जीवनमान हे अतिशय वेगवान झालयं. त्यात आपल्याला कमी कालावधीत, झटपट सगळ्याचं गोष्टी हव्या असतात,जणू कमी कालावधीत “कर लो दुनिया मुठ्ठीमे”सारखं. जरा काही दिवस गेले की आपल्याला “चेंज” हवा असतो.आणि हा चेंज बहुतेकांना त्यांच्या अल्प सुट्टीतच कसाबसा कोंबून भरल्यासारखा हवा असतो.

सहल ,पर्यटन तसं आवश्यकच. पण कुठलिही गोष्ट निवांतपणे आणि जरा वाटबघून अल्प प्रमाणात मिळाली की ती तब्येतीला मानवते,आनंद देते बघा. पण आजकाल अगदी दोन दिवसाच्या सुट्टी मध्येही स्वतःच्या घरात पाय टिकंत नाही, सतत कुठेतरी घाईबडीत का होईना बाहेर जायचंच ही प्रघात असल्यासारखी पद्धतच जणू पडतेयं.कदाचित आता नातेवाईक आणि पाहुणे जाणं ही संकल्पना हळूहळू -हास पावतेयं म्हणूनही असावं.असो

त्यामुळे शांतपणे, निवांतपणे भरपूर वेळेची स्पेस ठेवूनच पर्यटनाला जावं,वाहनं हळू आणि कमी वेगात हाकावी, सीटबेल्ट सारख्या सोयींचा वापर करावा  ह्या निदान आपल्या हातात असलेल्या गोष्टी तरी माणसांनी पाळाव्यात असं वाटतं.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “बंध नात्यांचे…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “बंध नात्यांचे…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

काल सुट्टीचा दिवस. एक सुट्टी सुद्धा खूपसारा शीण घालवते. त्याच त्याच रुटीनला जरा मन कंटाळलं असतं त्यात ह्या बदलाने खूप सकारात्मक फरक पडतो.

काल रविवार. त्यामुळे घरी मस्त आरामात साग्रसंगीत स्वयंपाक,गप्पा गोष्टी करीत जेवणाचा घेतलेला आनंद काही ओरच असतो. खेळीमेळीच्या वातावरणात जेवणं सुरू असतांना “अहो आई” सहज बोलल्या आपण तीस वर्षे झालीत ,एकत्र,एकविचाराने,आनंदाने एकाच छताखाली राहातो आहे,भांडण तर सोडाच आपल्यात कधी साधी कुरबुर पण नाही, ह्याचं काय कारण असावं बरं? कारण सासूसुन हे नात जरा जास्तच नाजूक असतं म्हणून विचारलं.

त्यांच्या प्रश्नाने विचारात पडले आणि कारण शोधतांना दोन तीन प्रमुख कारणं सापडली,एक म्हणजे दोघीही ह्या सुमधुर संबंधाचं क्रेडीट हे एकमेकींना देतो, आपापली कर्तव्य दोघीही चोख बजावित असल्याने एकमेकींना स्वतः पेक्षाही काकणभर जास्त विश्वास दुसरीवर वाटतो,आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या नात्यात “ईगो”ला अजिबात स्थान देत नाही. अर्थातच ह्या वरील गोष्टींच दोघींकडूनही तंतोतंत पालन होतं.

आम्ही दोघीही एकमेकांनी वेळ हा देतोच, कितीही व्यस्त दिनचर्या असली तरी रात्री झोपायच्या आधी कमीत कमी दोघीही आजचा दिवस कसा गेला हे परस्परांना सांगतो.

कुठल्याही नात्यामध्ये परस्परांना दिलेला वेळ  हा नातं पक्क करायला काँक्रीट चे काम करतो. ह्यावरून गुलजारजींच्या मला आवडत असलेल्या ओळी आठवल्या त्या पुढीलप्रमाणे,

“मुझसे समय लेकर भी मत आना,हाँ अपना समय साथ लाना,फिर दोनो समय को जोड बनाएँगे एक झुला ।।। खरचं किती आशयपूर्ण आहेत नं ह्या ओळी,किती गहरा अर्थ दडलायं नं ह्यात. दोन व्यक्तींच्या नात्यात परस्परांना दिलेले सर्वोत्तम गिफ्ट म्हणजे परस्परांना दिलेला वेळ. मग ते नातं मुला-पालकांच असो, सासू सुनेचं असो,नवराबायकोचं असो वा प्रियकरप्रेयसीचं. भावंड,मैत्री ह्या नात्यांमध्ये तर खरी लज्जत वेळ देऊन संवाद, वादविवाद ह्यामध्ये असते.

जर परस्परांशी बोलायला वेगवेगळे विषय असतील, बोलतांना वेळेचं भान सुद्धा राहात नसेल,परस्परांशी शेअर केलेली लहानात लहान गोष्ट ही दोन्ही नात्यात खूप महत्त्वाची वाटत असेल,मनात आलेला विचार पटकन कोणाला सांगायचा तर परस्परांशी बेझिझक बोलावेसे वाटत असेल तर समजून जावं आपलं नातं मुरलेल्या मोरब्यांसारखे झालेयं.वर्षानुवर्षे. टिकणारं,तरीही अजिबात गोडी तसूभरही कमी न होऊ देणारं.परंतु जर कुठे तरी संवादच खुंटत असतील, बोलायला काही विषयच सुचत नसतील तर कुठेतरी, काहीतरी,कुणाचंतरी  हमखास चुकतयं हे समजावं.

व्यक्तींमधील दुरावा, बेबनावं ह्याचं खूप महत्त्वाचं एक कारणं म्हणजे  स्व मध्ये ठासून भरलेला “ईगो”. ह्या ईगोमुळेच “पहले आप, पहले आप “करीत सुखासामाधानाची स्टेशन्स भराभर निघून जातात. दुराव्याचं दुसरं कारण म्हणजे “कायम दुसऱ्या कडूनच अपेक्षा आणि कधीकधी तर त्या अवास्तव सुद्धा. आपण आपल्या व्यक्तीच्या बाबतीत खूप जास्त पझेसिव्ह असतो.एकच व्यक्ती ही विविध लोकांशी वेगवेगळ्या नात्यांनी बांधल्या गेलेली असते.प्रत्येक व्यक्ती ही संपूर्णतः भिन्न मतांची, विचारांची,आवडींची असते तेव्हा समोरील व्यक्ती ही आपल्याच मतांनी,आवडींनी कशी बरे चालेल ?

असो हे सगळे विचार मला निरनिराळ्या नात्यांनी जोडल्या गेलेल्या माझ्याच व्यक्तींनी शिकविले. ही माझी सगळी जोडली गेलेली नाती , काही प्रत्यक्ष तर काही फोनने  संवाद साधून त्यासाठी आपला स्वतः चा बहुमोल वेळ खर्चून ह्या नात्यांमधील प्रेम,जिव्हाळा, गोडी अधिकाधिक वृद्धिंगत करण्यासाठी पुढाकार घेतात हे पण खरेच. ह्या संपर्काने,बहुमोल वेळ देउन साधलेल्या सुसंवादाने विचारांच्या आदानप्रदानातून कित्येक अडचणींमधून परस्परांना योग्य दिशा,वाट मिळवून देतो आणि मग हे नात्यांचे बंध अधिकच दृढ आपोआप होतात.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “माझ्या आठवणीतले गदिमा” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “माझ्या आठवणीतले गदिमा” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

एक अद्भुत, मनभावन आविष्कार म्हणजे रामायण. अगदी वाचन शिकायच्या सुद्धा आधी हे अद्भुत रामायण कळलं ते दोन व्यक्तींमुळे एक म्हणजे “गीत रामायणा” चे रचयिता ग.दि. माडगूळकर आणि दुसरे म्हणजे ही गीत सुस्वर आवाजात गाऊन आम्हाला झोपाळ्यावर झुलवणारे माझे बाबा. माझ्या बाबांचा आवाज खूप गोड आहे आणि अगदी मोजकीच आवडीची गीतं ते गातात त्यातीलच एक “गीत रामायणा”मधील गाणी. अर्थात बाबांना ऐकलं फक्त आणि फक्त घरच्यांनीच आणि खास करुन आम्ही, त्यांच्या मुलांनी. ते बाहेर कुठेही,कधीच गात नाहीत. पण खर सांगायचं तर लहानपणी रामायण, ऐकलं,समजलं आणि आवडलं ते फक्त आणि फक्त गदिमांमुळे आणि बाबांमुळेच. ग.दि.माडगूळकर ह्यांना  “गदिमा” ह्या संक्षिप्त नावाच्या रुपात लोक ओळखायचे.

Best Bhojpuri Video Song - Residence w

स्व गजानन दिगंबर माडगूळकर ‘गदिमा’

माडगूळकर म्हणजे एका चांगल्या अर्थाने सर्वगुणसंपन्न व्यक्ती. ते कवी,गीतकार, लेखक असून त्यांनी विविध अंगी  साहित्यिक क्षेत्रात अनमोल योगदान दिलयं.आज त्यांचा स्मृतीदिन.त्यांना विनम्र अभिवादन.

गदिमा भावकवीही होते. त्यांच्या काव्यावर संत काव्य आणि शाहिरी काव्य या दोन्हींचा प्रभाव जाणवतो. त्यांच्या लावण्या व चित्रपट गीतेही प्रसिद्ध आहेत. उत्तम समरगीते आणि बालगीतेही त्यांनी लिहिली. त्यांनी लिहिलेली बालगीते आणि भक्तीगीते आजही फार लोकप्रिय आहेत. शिर्डीच्या साई बाबांची काकड आरती ही माडगूळकरांनी लिहिलेली आहे, या आरतीला सी. रामचंद्र यांनी अतिशय उत्तम चाल लावली आहे. या काकडआरती साठी गदिमांनी ‘रामगुलाम’ हे टोपणनाव घेतलं होतं.पेशवाईवर त्यांनी गंगाकाठी नावाने काव्य कथा लिहिली आहे. गदिमांनी अथर्वशिर्षाच मराठीत भाषांतर केले.

ग दि माडगूळकर यांनी ‘भूमिकन्या सीता”  या नाटकातील पदेसुद्धा लिहिली होती. ‘मी पुन्हा वनांतरी फिरेन हरिणीवाणी’, ‘मानसी राजहंस पोहतो’,’सुखद या सौख्याहुनी वनवास ‘ ही त्यातील लोकप्रिय आणि प्रसिद्ध गाणी.

कित्येक आपल्याला खूप आवडत असलेली गाणी आपण कायमं ऐकतो आणि गुणगुणतो पण बरेचदा आपल्याला मिहीती सुद्धा नसतं ह्या गीतांचे रचयिते कोण ?

गदिमांची आपण कायम आवडीने ऐकतं आलो ती बालगीतं पुढीलप्रमाणे,” नाचरे मोरा आंब्याच्या वनात,नाच रे मोरा नाच”, “झुक झुक झुक झुक अगीनगाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया,”बाळा जो जो रे,बाळा जो जो रे,”गोरी गोरीपान, फुलासारखी छान, दादा, मला एक वहिनी आण”,”चांदोबा चांदोबा भागलास का? निंबोणीच्या झाडामागे लपलास का?”, तसेच त्यांची लोकप्रिय भक्तिगीते पुढीलप्रमाणे,

“कबिराचे विणतो शेले, कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम, भाबड्या या भक्तासाठी, देव करी काम ! “,”दैवजात दुःखे भरता.. दोष ना कुणाचा पराधीन आहे.. जगती पुत्र मानवाचा “, “इंद्रायणी काठी देवाची आळंदी “,”वेदांनाही नाही कळला अंतपार याचा कानडा राजा पंढरीचा “,”विठ्ठला तू वेडा कुंभार “,. याबरोबरच त्यांची देशभक्तीपर गीतं ही मनाचा ठाव घेतात ती पुढीलप्रमाणे,”हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे आ-चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे”,

“माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमुचे सुरू जिंकू किंवा मरू ,”वेदमंत्राहून आम्हां वंद्य वंदे मातरम्”

त्यांचे चित्रपटक्षेत्रात ही तेवढेच महत्त्वाचे योगदान आहे, त्यांची ह्या क्षेत्रातील काही लोकप्रिय गीतं पुढीलप्रमाणे,”बुगडी माझी सांडली ग… जाता साताऱ्याला,”सांगा या वेडीला, माझ्या गुलछडीला”,”एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे”,”उद्धवा, अजब तुझे सरकार”,”या चिमण्यांनो परत फिरा रे”,फड सांभाळ तुऱ्याला ग आला तुझ्या उसाला लागंल कोल्हा”,”अपराध माझा असा काय झाला का रे दुरावा ,का रे अबोला” आणि अशी कित्येक लोकप्रिय गीतं गदिमांनी त्यांच्या कारकिर्दीत १५७ पटकथा आणि २००० गाणी लिहिली. त्यांनी बऱ्याच मराठी व हिंदी चित्रपटांसाठी कथा, पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. लिखाणासोबत त्यांनी काही चित्रपटांमध्ये अभिनय देखील केला.

गदिमा स्वातंत्राच्या चळवळीत देखील अग्रभागी होते. याच काळात त्यांची यशवंतराव चव्हाण यांच्याशी चांगली ओळख झाली. त्या वेळी त्यांनी जे काही काव्य रचलं ते “शाहीर बो-या भगवान”ह्या टोपणनावाने. पुढे संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना १९६२ मध्ये गदिमांची राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेवर आमदार म्हणून करण्यात आली होती.

भारत सरकारने १९६९ मध्ये गदिमांना पद्मश्री हा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन त्यांचा गौरव केला.१९५७ मध्ये गदिमांना संगीत नाटक अकादमीचा उत्कृष्ट नाट्य लेखक पुरस्कार मिळाला. तसेच १९५७ मध्ये संगीत नाटक अकादमी चा उत्कृष्ट नाट्य लेखक पुरस्कार ,१९६९ मध्ये ग्वाल्हेर येथीलअखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले.१९७१ मध्ये विष्णुदास भावे सुवर्णपदकाचे मानकरी हे झालेत.१९७३ मध्ये यवतमाळला झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ह्यांनी भुषविले.त्यांच्या बऱ्याच गाण्यांना व चित्रपटांना महाराष्ट्र राज्य सरकारचे पुरस्कार मिळाले आहेत.

खरोखरच ह्यांच्या सारख्या अनेक साहित्यिक  कलावंतानी आपल्यासाठी आनंद फुलविणारी किती अनमोल संपत्ती ठेवलेली आहे हे बघून नतमस्तक व्हायला होतं.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जा दू ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

 ☆ 🤠 जा दू ! 👀 ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

“जादू ssss तेरी नजर, खुशबू तेरा ssss बदन, तूं हां…..”

सॉरी, सॉरी, मंडळी, माफ करा मला ! आपण म्हणाल यात माफी मागण्या सारखं तुम्ही काय केलंय, म्हणून माफी मागताय ?  सांगतो, सांगतो मंडळी. त्याचं काय आहे, मला खरं तर “जादू तेरी नजर” या, मतकरींच्या एका नाटकाच्या नावाने आजच्या लेखाची सुरवात करायची होती. पण वरच्या गाण्याच्या ओळींची “जादू” आज इतक्यावर्षांनी देखील, माझ्यासकट तमाम रसिकांवर त्या गाण्यातील शब्दांचे असं काही गारुड करून बसली आहे, की त्याची पुढची ओळ माझ्या हातून आपोआपच लिहिली गेली हे मी मान्य करतो आणि त्यासाठी मी तुमची माफी मागितली मंडळी ! चला, म्हणजे एका अर्थाने लेखाच्या सुरवातीलाच, एखाद्या गाण्याची अनेक तपानंतर सुद्धा आपल्यावर कशी “जादू” शिल्लक असते, हा एक मुद्दा निकालात निघाला ! अर्थात ते गाणं त्यातील शब्दांमुळे, संगीतामुळे, का ते ज्या कलाकारांवर चित्रित झालं आहे त्यांच्यामुळे, कां अजून कोणत्या  गोष्टींमुळे रसिकांच्या मनावर आज तागायत जादू करून आहे हा वादाचा विषय होऊ शकतो, यात वादच नाही मंडळी. असं जरी असलं, तरी त्या गाण्याच्या जादूची मोहिनी आजच्या घडीपर्यंत टिकून आहे, हे आपण या लेखाद्वारे मी तुमच्यावर कुठल्याही प्रकारची शब्दांची जादू न करता सुद्धा मान्य कराल ! असो !

मंडळी, आपली माफी मागितल्या मागितल्या, मला एका गोष्टीची मनांत मात्र नक्की खात्री वाटत्ये आणि ती म्हणजे, आपण सुद्धा वरील गाण्याची पाहिली ओळ वाचताच, लगेच दुसरी ओळ मनांत नक्कीच गुणगुणली असेल, हॊ का नाही ? खरं सांगा ! बघा, मी जादूगार नसलो तरी “माझ्या” वाचकांच्या मनांत नक्की काय चाललं असेल ते ओळखण्या इतका मनकवडा जादूगार नक्कीच झालोय, असं लगेच माझं मीच म्हणून घेतो. दुसरं असं, की माझ्या मनावर अजून जरी जुन्या अनेकानेक अजरामर हिंदी गाण्यांची कितीही जादू असली आणि हिंदी आपली राष्ट्रभाषा असली तरी, राष्ट्रभाषेत लेख लिहिण्याइतकी काही त्या भाषेची माझ्यावर जादू झालेली नाही, हे मी मान्य करतो ! त्यामुळे आता या वयात अंगात नसलेली एखादी कला, कोणा जादूगाराच्या जादूने अंगी बाणेल, मग मी आपल्या राष्ट्र भाषेत एखादा लेख लिहीन यावर माझा 101% विश्वास नाही ! पण हां, स्टेजवरचे जादूचे प्रयोग पहात असतांना, हे सगळं खोटं आहे हे मनांला ठामपणे माहित असतांना देखील, माझे डोळे (चष्मा लावून सुद्धा) मात्र त्यावर विश्वास ठेवतात हे मात्र तितकंच खरं.  म्हणजे असं बघा, रिकाम्या नळकांड्यातून फुलांचा गुच्छ काढणे, तर कधी पांढरे धोप कबुतर ! तर कधी टेबलावर झोपलेल्या माणसाच्या शरीरारचे तीन तुकडे करणे, ते परत जोडणे, असे नाना खेळ करून तो जादूगार लोकांचे मनोरंजन करत असतो. मला असं वाटतं की “जादू” या शब्दातच एक प्रकारची अशी “जादू” आहे जी सानथोरांना तो खेळ बघताना, अक्षरशः देहभान विसरायला लावून खिळवून ठेवते. एवढच नाही, तर ज्या व्यक्तीला जादूगाराने एखाद्या खेळात आपल्या इंद्रजालाने वश केले आहे, त्या व्यक्तीला तर ती इतकी कह्यात ठेवते, की त्या जादूगाराने “आज्ञा” करताच, ती व्यक्ती सफरचंद समजून, कच्चा बटाटा पण साऱ्या प्रेक्षकांसमोर मिटक्या मारीत आनंदाने खाते, हे आपण सुद्धा कधीतरी बघितलं असेल !

या दुनियेत जादूचा उगम कधी झाला, जगात पाहिली जादू कोणी, कोणाला आणि कोठे दाखवली असे साधे सोपे प्रश्न घेवून, त्या प्रश्नांची मी उत्तर देईन अशी अपेक्षा हा लेख वाचतांना कोणा वाचकाने कृपया ठेवू नये.  कारण त्याची उत्तर द्यायला सध्याच्या विज्ञानयुगातला जागतिक कीर्तीचा “गुगल” नामक विश्व विख्यात जादूगार आपल्या खिशातच तर आहे मंडळी !  पण हां, माझ्या आयुष्यात मी पाहिलेल्या पाहिल्या दोन जादू कोणत्या या प्रश्नाचं उत्तर मात्र मी तुम्हांला नक्कीच सांगू शकतो. किंबहुना मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहिलेल्या दोन जादू, आपल्या पैकी माझ्या पिढीतील लोकांनी पाहिलेल्या त्यांच्या आयुष्यातल्या सुद्धा त्यांनी पाहिलेल्या पहिल्या दोन जादू असू शकतात, (आधीच वाक्य वाचून तुम्हांला थोडं गोंधळायला झालं असेल, तर बहुतेक तो माझ्या लिखाणावर झालेला आजच्या विषयाचा परिणाम असू शकतो) यावर माझा ठाम विश्वास आहे !

मंडळी, त्यातील पाहिली जादू म्हणजे, आपल्या दादाने किंवा ताईने मुठीत राहणारी लहान वस्तू उजव्या हाताने दूर फेकल्याचा अभिनय करून, ती वस्तू आपण सांगताच आपल्याला लगेच दाखवणे आणि दुसरी जादू म्हणजे डाव्या हाताचा अंगठा उजव्या हाताने कापणे ! काय, बरोबर नां मंडळी ?

लहानपणी डेव्हिड कॉपरफिल्ड नामक एका विदेशी जादूगाराचे एका पेक्षा एक विलक्षण जादूच्या प्रयोगाचे विडिओ बघून डोळे आणि डोकं अक्षरशः गरगरायला लागायचं ! त्याच पाण्यावर चालणं काय, हवेत उडणं काय किंवा नायगाऱ्याच्या प्रचंड धबधब्यात पिंपात बसून उडी मारून परत काठावर प्रकट होणं काय ! बापरे, ते त्याचे सारे जादूचे खेळ आज नुसते आठवले तरी अंगावर काटा येतो मंडळी !

आपल्या देशातसुद्धा तसे अनेक छोटे मोठे जादूगार होऊन गेले, पण डेव्हिडशी तुलना करायची झाल्यास, पी सी सरकार, सिनियर आणि पी सी सरकार, ज्युनियर ही कलकत्याच्या पिता पुत्रांची नांव या संदर्भात प्रकर्षाने लगेच आठवतात.

माझे जन्मापासूनचे आजतागायतचे आयुष्य शहरात गेल्यामुळे, “काळी जादू” किंवा “चेटुक” या विषयात एखाद्या “गाववाल्याचे” जेवढे “ज्ञान” (का अज्ञान ?) आहे, त्याच्या ते 0.001% सुद्धा नाही. त्यामुळे या विषयावर मी काही बोलणे अथवा लिहिणे, हा या विषयात स्वतःला तज्ञ समजणाऱ्या एखाद्या “गाववाल्याचा” अपमान होऊ शकतो. म्हणून उगाच त्या तथाकथीत जादूच्या उप शाखेला कोणत्याही तऱ्हेनं स्पर्श नं केलेलाच बरा. शिवाय माझा हा लेख अशा एखाद्या तज्ञ गाववाल्याने “चुकून” वाचलाच, तर त्याला आलेल्या रागापोटी तो माझ्यावर एखादं “लिंबू” फिरवायचा ! उगाच नको ती रिस्क आता या वयात कशाला घ्या ?

मंडळी, शेवटी एकच सांगतो, माझा सुद्धा जादूवर विश्वास आहे.  पण ती जादू करणारा सर्वशक्तिमान जादूगार हा वर बसलेला आहे, असं माझं मत आहे ! आपल्या आयुष्यात वेळोवेळी निरनिराळे खेळ करून “तो” आपल्याला दाखवत असतो ! त्यातील त्याच्या कुठल्या खेळाला आपण टाळी वाजवायची, कुठला खेळ दाखवल्या बद्दल त्याचे मनापासून आभार मानायचे किंवा कुठल्या खेळातून काय बोध घेवून पुढे जायचं, हे ज्याचं त्यानं ठरवायचे !

तर अशा त्या सर्व शक्तिमान जादूगाराने आपल्याला दाखवलेल्या नानाविध खेळांचे वेळोवेळी अन्वयार्थ लावायची शक्ती, तो जादूगारच आपल्या सगळ्यांना देवो हीच सदिच्छा!

शुभं भवतु !

© प्रमोद वामन वर्तक

०३-१२-२०२२

स्थळ – बेडॉक रिझरवायर, सिंगापूर.

मो – 9892561086, (सिंगापूर)+6594708959

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सार्क… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ सार्क… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

वाचनक्षेत्र हे एक अथांग सागरासारखे अफलातून क्षेत्र आहे. ह्या वाचनातून आपल्याला कितीतरी विविध क्षेत्रातील माहिती मिळते,कधी ज्ञानात भर पडते,तर कधी भावनेला वाट मिळते, कधी खळखळून हसावसं वाटत तर कधी छान गंभीर विचारांच्या डोहात डुंबायला मिळतं. कधी कधी वाचल्यावर जाणवतं की हे खरंच छान लिहीलयं किंवा अरेच्चा आपल्याच मनातील शब्द तंतोतंत कागदावर उतरलेयं जणू.

हे वाचन करतांना काही गोष्टी आधी माहीत असलेल्या परंतु वेगळ्या शब्दांत मांडलेल्या असतात तर काहींच्या बाबतीत आपण संपूर्ण अनभिज्ञ होतो हे जाणवतं. असेच काही शब्द वाचनात येतात, हे शब्द फक्त आपण ऐकले असतात परंतु ह्याची माहिती म्हणाल तर शुन्य. मग कुतूहल जागं होतं आणि माहिती शोध मोहीम सुरू होते.काल असाच “सार्क संघटना” हा शब्द वाचनात आला.

कुठल्याही संघटना तयार होतांना त्या काहीतरी भरीव कामगिरी, चांगले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बनवितात.  अशीच एक संघटना म्हणजे सार्क संघटना ,जिच्या निर्मितीची तारीख होती 8 डिसेंबर 1985.

दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटना (South Asian Association for Regional Cooperation  असं त्या संपूर्ण संघटनेचे नाव. त्या नावाचं संक्षिप्त रुप म्हणजे सार्क (SAARC); ही दक्षिण आशिया खंडातील  8 देशांची एक आर्थिक व राजकीय सहयोग संघटना आहे. अमेरिका व चीन खालोखाल सार्क सदस्य राष्ट्रांची एकत्रित अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर असून जगातील लोकसंख्येच्या 21 टक्के लोक सार्क क्षेत्रामध्ये राहतात. भारत हा सार्कमधील सर्वात बलाढ्य देश आहे हे उल्लेखनीय. 6 जानेवारी 2006 रोजी सार्क सदस्य राष्ट्रांनी प्रादेशिक व्यापाराला चालना देण्यासाठी दक्षिण आशियाई मुक्त व्यापार कराराची निर्मिती केली.

सार्क संघटनेची कल्पना 1950 मध्ये  मूळ धरू लागली. 1970 च्या सुमारास भारत, बांगलादेश,भूतान, मालदिव, पाकिस्तान,नेपाळ श्रीलंका आणि अफगाणिस्तान या देशांना एकत्रितपणे व्यापार व सहकार करण्याच्या दृष्टीने एका संस्थेची आवश्यकता भासल्याने ह्याची संकल्पना अस्तित्वात येण्याच्या दृष्टीने जोर धरु लागली. दक्षिण आशियामध्ये आर्थिक व सामाजिक प्रगती  करण्याच्या उद्देशाने तसेच सांस्कृतिक विकास व विकसनशील देशाबरोबर सहकार्य करण्यासाठी सार्क संघटना एकत्रित ऊभी राहिली.

लोकसंख्या, संसाधने, लष्करी सामथ्र्य, आर्थिक आणि तंत्रज्ञानात्मक विकास, भौगोलिक स्थान या सर्व बाबींचा ऊहापोह आणि उपाययोजना ह्याबद्दल ही संघटना कार्य करते.  सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक क्षेत्रांत परस्परांच्या सहकार्याची अपेक्षा ह्यामध्ये व्यक्त करण्यात आली. तसेच महिलांचे प्रश्न व त्यांच्या शिष्यवृत्त्या, अभ्यासवृत्त्या, आर्थिक सहकार्य, महिला आणि मुले यांच्या भवितव्याचा तसेच दहशतवाद व स्त्रियांचे लैंगिक शोषण यांच्याबद्दल ठोस तजवीज ह्यामध्ये केल्या जाते. 

खरंच अशा अनेक संघटना विविध कार्य करीत असतात पण आपल्याला त्याबद्दल फारच कमी माहिती असते हे ही खरे.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! – रिटर्न गिफ्ट ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

 😂 चं म त ग ! 😅 🎁 रिटर्न गिफ्ट ! 🎁 ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

“गुडमॉर्निंग पंत !”

“हां, सुप्रभात.”

“हे काय, आज तुमचा मूड नेहमी सारखा दिसत नाही.”

“हो, आहे खरा आज थोडा त्रासलेला.”

“मला कारण सांगितलं पंत, तर तुम्हाला पण थोडं हलक हलक वाटेल आणि त्यावर काहीतरी… “

“तुला कधी, सरकारी किंवा कुठल्या ऑफिस मध्ये ‘लाल फितीचा’ त्रास झालाय ?”

“लाल फित म्हणजे…. “

“अरे, म्हणजे कुठचेही सरकारी काम, तू त्या ऑफिसला गेला आहेस आणि लगेच…. “

“काहीतरीच काय पंत, साध्या रेशन कार्डावरचा पत्ता…. “

“बदलायला पण दहा दहा खेपा माराव्या लागतात, बरोबर ना ?”

“आता कसं बोललात पंत !”

“अरे त्यालाच तर… “

“कळलं, कळलं, पण तुम्हाला कुठे आला हा लाल फितीचा अनुभव?”

“अरे त्याच काय झालं, मोनो रेल सध्या तोट्यात चालली आहे, म्हणून आता कमी गर्दीच्या वेळात त्याचा एखादा रेक…. “

“बारस, वाढदिवस, लग्न, कोणाची साठी, पंच्यातरी, असे समारंभ साजरा करायला भाड्याने देणार आहेत, ही बातमी कालच वाचली, पण त्याच काय ? तुम्हाला पण एखादा रेक भाड्याने…. “

“हवा होता म्हणून गेलो होतो चौकशी करायला तर… “

“पंत तुम्हाला कशाला…… “

“अरे माझ्यासाठी नाही, नातवाच बारस करणार होतो, मोनोच्या रेक मध्ये. कुणी विमानातून उड्या मारून हवेत हार घालून लग्न करतात, कुणी क्रूझवर मुंज ! म्हटलं आपण पण जरा वेगळ्या पद्धतीने नातवाचे बारसे करूया, म्हणून चौकशी करायला गेलो तर… “

“तर काय, उपलब्ध नाही म्हणाले का रेक ?”

“हो ना, म्हटलं कालच तर  तुम्ही रेक भाड्याने देणार असं जाहीर केलेत आणि आज लगेच बुकिंग फुल्ल कसं काय ?”

“मग काय म्हणाला तिथला माणूस ?”

“तो म्हणाला, चारीच्या चारी रेक राजकीय पक्षांनी बुक केले आहेत म्हणून.”

“ते कशा साठी ?”

“अरे ज्या दिवशी मला बारशाला रेक पाहिजे होता त्याच दिवशी त्या सर्व पक्षांची कसली तरी मिटिंग आहे.”

“पंत, पण त्यांना चारही रेक कशाला पाहिजेत, एकात पण मिटिंग….. “

“होऊ शकते, पण सध्या तीन पक्षाच सरकार आहे ना म्हणून…. “

“मग तीन रेक पुरे की, चौथा तुम्ही बुक …. “

“करू शकत नाही, कारण ज्या अपक्षांनी बाहेरून सरकारला पाठिंबा दिला आहे त्यांची वेगळी मिटिंग चौथ्या…. “

“कळलं, म्हणजे तुम्हाला आता एखादा छोटा हॉल घेण्या शिवाय….. “

“पर्याय नाही खरा.”

“तुम्ही काळजी करू नका पंत, आपल्या अहमद सेलर चाळींचे सभागृह द्यायची जबाबदारी माझी !”

“मला ठाऊकच होत, तू मला या बाबतीत मदत…. “

“झालंच तुमचं काम समजा पंत, तुम्ही निश्चिन्त असा.  पण मला एक वेगळाच प्रश्न पडलाय… “

“आता कसला प्रश्न?”

“ती तुम्ही आपल्या चाळीच्या गच्ची मधे कसली पोती….. “

“ती होय, अरे ती ‘बीटाची’ पोती आहेत, म्हणजे असं बघ…. “

“पंत आपण ज्या ‘बीटाची’ कोशिंबीर वगैरे करतो किंवा सॅलेड मध्ये….. “

“वापरतो तीच ही, अगदी  बरोबर ओळखलस.”

“हो पण एव्हढी पोती भरून बिटाचं तुम्ही…… “

“सांगतो, सांगतो. अरे मोनो रेल मध्ये बारसे केले असते तर जवळच्याच लोकांना बोलवावे लागले असते, मग बाकीचे चाळकरी नाराज होणार…. “

“म्हणून त्यांना शांत करायला तुम्ही काय बिट…… “

“काहीतरी बोलू नकोस, अरे तेव्हढी….. “

“पंत, पण तुम्ही एव्हढी पोती भर भरून ‘बिट’ आणल्येत ना,  की ती सगळी आपल्या आठ चाळींना…..

“पुरावित याच हिशोबानेच आणली आहेत बरं !”

“काय सांगता काय पंत, तुम्ही खरच आठी चाळींना….. “

“अरे नीट ऐकून तर घे, तू मगाशी मोनो भाड्याने देणार, ही बातमी वाचलीस म्हणालास ना, मग तशीच दुसरी एक बातमी तुझ्या नजरेतून सुटलेली दिसत्ये.”

“ती कुठची ?”

“अरे RBI चे ‘बिटकॉइन’ बद्दलचे अपील दिल्ली हायकोर्टाने फेटाळले, ती बातमी.”

“असं, म्हणजे आता ‘बिटकॉइन’ या आभासी चलनाला भारतात पण मान्यता….. “

“मिळाली आहे आणि बारशाच्या रिटर्न गिफ्ट मध्ये मला खरे ‘बिटकॉइन’ देण या जन्मीच काय पण पुढचे सात जन्म पण शक्य नाही, म्हणून मी बारशाचे रिटर्न गिफ्ट म्हणून येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला त्या सगळ्या बीटांची कॉइन पाडून ती वाटायचा माझा विचार पक्का झाला आहे.”

“खरच धन्य, धन्य आहे तुमची पंत !”

“आहे ना धन्य, मग तुझ्यासाठी बारशाच्या दिवशी एक एक्सट्रा कॉइन आठवणीने घेऊन जा, मला बारशाला हॉल मिळवून देणार आहेस ना, त्या बद्दल !”

© प्रमोद वामन वर्तक

स्थळ – बेडॉक रिझरवायर, सिंगापूर.

मो – 9892561086, (सिंगापूर)+6594708959

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares