मराठी साहित्य – विविधा ☆ जय गणेश आणि निळी कमळं !! ☆ वसंत वैभव ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? विविधा ?

☆ जय गणेश आणि निळी कमळं !! ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

गणपती आणि निळी कमळं यांचं माझ्या मनात अतूट नातं आहे… २००३ साली माझ्या मुलाचं अभिजितचं लग्न झालं त्यानंतर पाच महिन्यांनी गणेशोत्सव आला. आमच्या घरात गणपती बसत नाही… पण घराच्या दारातच मंडळाचा गणपती बसतो… माझी सून प्रिया एक दिवस म्हणाली, आपण उद्या पहाटे दगडूशेठ हलवाईं च्या गणपतीला जाऊ ! आम्ही सर्वजण तयार होऊन पहाटे चार वाजता गणपतीच्या दर्शनाला गेलो, ते गणपती दर्शन अलौकिकच असतं ! गणेशाचा वाहण्यासाठी मुली /बायका निळी कमळं विकत असतात! गेली अनेक वर्ष आम्ही ती निळी कमळं विकत घेतोय बाप्पासाठी आणि घरी परतताना आमच्यासाठीही ! निळी कमळं फक्त त्याच एका पहाटे घेतली जातात… माझ्या आजोळच्या गावात एक तळं होतं ..म्हणजे आहे.. आमच्या लहानपणी त्यात असंख्य निळी कमळं असायची… निळ्याकमळाचं आकर्षण तेव्हांपासूनचं… पुढे निलकमल हा सिनेमा पाहिला तेव्हाही राजकुमारी “निलकमल” अर्थात वहिदा रेहमानला पाहून तळ्यातली निळी कमळंच आठवली होती….

दगडूशेठच्या गणपतीचं दर्शन घेण्याचा नेम अर्थात सूनबाईनी पाडलेला पायंडा २००३ पासून आम्ही पाळतोय कोरोना काळात तो खंडित झाला ! या वर्षी कदाचित पहाटे पाऊले गणेशाच्या दर्शनासाठी वळतील पण आता ही प्रथा आमच्या घरात सुरू करणारी प्रिया आणि अभिजित, सार्थक तिघेही सिंगापूरला आहेत सध्या! पण माझ्यासारखी एरवी “सूर्यवंशीय” असलेली बाई सूर्य उगवायच्या आत उठून तेव्हा सारखंच आताही गणेश दर्शन घ्यायला जाईल असं वाटतंय…

ती निळी कमळंही साद घालतीलच आ ऽऽऽऽ जाओ….अशी☺बस गणेशजी का बुलावा आना चाहिए….🙏

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ डोळ्यांतले पाणी…भाग 5 ☆ सौ. अमृता देशपांडे ☆

सौ. अमृता देशपांडे

? विविधा ?

☆ डोळ्यांतले पाणी…भाग – 5 ☆ सौ. अमृता देशपांडे  

मुलींच्या शाळेत ‘ सारेगमप ‘ स्पर्धा होती. नमिताची  व ईशाची 30 मुलींमधून निवड झाली. इतर मुलीही होत्या. आठवडाभर प्रॅक्टीस आणि रविवारी स्पर्धा असे दोन महिने चाललं होतं.  शेवटी फक्त दोनच स्पर्धक राहिले.  नमिता आणि ईशा. दोघीही अतिशय तयारी करून आल्या होत्या. अंतिम टप्पा गाठला.  दोघींचीही चार चार गाणी झाली आणि निकालाचा क्षण आला.  मंचावर दोन स्पर्धक – दोघी मैत्रिणी होत्या. उत्सुकता, बावरलेपण, धडधडणारी छाती, दोघींही आतुरतेने वाट पाहत होत्या. एकमेकींचे हात घट्ट पकडून उभ्या होत्या. निकाल घोषित झाला.  नमिता जिंकली होती.  दोघीही एकमेकींना घट्ट मिठी मारून रडायला लागल्या. किती समजावले तरी थांबेनात. शेवटी मुख्याध्यापिका मंचावर गेल्या.  त्यांनी दोघींना सावरले. त्यांनी नमिताला विचारले, “नमिता,  तू का रडते आहेस? तू Winner आहेस ना?” नमिता रडतच बोलली, ” मॅडम,  ईशा जिंकली नाही म्हणून मला वाईट वाटलं ” तर ईशा म्हणाली, ” नमिता Winner झाली म्हणून मला खूप आनंद झालाय, इतका कि मला रडू आलं ” .

अश्रू चं इतकं निरागस, सुंदर रूप दुसरं कुठलं असू शकेल?

नमिता, ईशा एकमेकींसाठी रडल्या. आपल्या यशापेक्षा जिवलग मैत्रिणीचं अपयश मनाला लागणं, आणि मैत्रिणी च्या यशात आपलं अपयश विसरून जाणं,  हा मैत्रीचा आणि यश अपयश या दोन्ही ला योग्य प्रकारे सामोरे जाण्याचा धडा दोघींनी घालून दिला.

जर त्या भावना आवरून रडल्या नसत्या तर मैत्रीची,  प्रेमाची जागा असूया, ईर्ष्या  , हेवा यांनी घेतली असती. किती धोकादायक होतं ते! म्हणून त्या रडल्या ते योग्यच होतं ना!

(क्रमशः… प्रत्येक मंगळवारी)

© सौ. अमृता देशपांडे 

पर्वरी – गोवा

9822176170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग ३२ – परिव्राजक १० – लोकसंपर्क ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग ३२ – परिव्राजक १० – लोकसंपर्क  ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

स्वामीजींच्या लोक संपर्कात सुशिक्षित लोक जास्त असायचे पण त्याचा बरोबर ग्रामीण भागातले लोक सुद्धा असायचे. सुशिक्षित लोकांबरोबर त्यांचा सतत विविध संवाद,चर्चा होत असत. सुशिक्षित तरुणांकडून त्यांना ही अपेक्षा होती की, ‘त्यांनी आपल्या देशाचा इतिहास समजून घेतला पाहिजे. एव्हढंच नाही तर भारतीयांनीच भारताचा इतिहास लिहिला पाहिजे. नाहीतर परकीय लोक आपल्या देशाचा इतिहास लिहितात. त्यांना आपली संस्कृती आणि परंपरा यांची काहीही माहिती नसताना तो लिहीत असतात. त्यामुळे त्यांना भारताच्या इतिहासातले बारकावे समजत नाहीत. अशांनी इतिहास लिहिला आणि तो आपण वाचला तर आपली दिशाभूल होते असे त्यांना वाटायचे’.

स्वामीजी राजस्थान सारख्या ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या प्रदेशात आले होते, त्यामुळे त्यांना साहजिकच ही तुलना करता आली असणार. आज तर आपल्या राजकीय परिस्थितीमुळे आपल्या इतिहासकडेही राजकीय द्वेषातूनच पाहिलं जातय. ही परिस्थिति इतकी वाईट आहे ही राजकीय स्वार्थापोटी देशाचा इतिहास, देशाभिमान यांचं महत्व राहिलेलं दिसत नाही. त्याकाळात ही गुहेत राहणार्‍या आध्यात्मिक स्वामीजींनी सामाजिक भान सुद्धा जपलं होतं. त्यांचा मोलाचा सल्ला,उपदेश अशा समाजात जिथं अनुभव येईल, जिथं गरज आहे तिथं तो देत असत.

भारत कृषि प्रधान देश आहे त्यामुळे जास्त संख्या ग्रामीण भागात राहणारी आहे. पण ग्रामीण भागातले खेडूत जास्त शिकले की शहराकडे धाव घेतात. खर तर देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतीकडे हा वर्ग नोकरीला भुलून पाठ फिरवतो. हे स्वामीजींच्या त्या काळात सुद्धा लक्षात आलं होतं. उलट शहरातल्या सुशिक्षित लोकांनी खेड्यात जाऊन तिथल्या शेतकर्‍यांशी संवाद साधला पाहिजे. उलटा प्रवास झाला पाहिजे. म्हणजे दोन्ही वर्गात आपुलकीचे नाते निर्माण होईल असे स्वामीजींचे मत होते. त्यानुसार ते सहवासात आलेल्या लोकांना मार्गदर्शन करत असत.

आज कोरोना साथीच्या परिस्थितून पुन्हा एकदा हीच गोष्ट सिद्ध झाली आहे. इतके कामगार आणि मजूर, कारागीर असेच खेड्याकडून शहराकडे नोकरीच्या आमिषानेच स्थलांतरित झाले आहेत. त्याचा अशा संकटाच्या वेळी केव्हढा परिणाम व्यवस्थेवर आणि त्यांच्याही जीवनावर पडलेला दिसतोय. आता तर शहराकडून खेड्यात जाऊन तिथली अर्थव्यवस्था भक्कम करण्याची वेळ आली आहे.

स्वामीजींनी अशा खेडूत लोकांबरोबर तरुण लोकांना पण दिशा देण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी तरुणांना संस्कृत भाषेचा अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त केले होते. त्याचे काही प्राथमिक धडेही त्यांनी तरुणांना दिले कारण, संस्कृत शिकलं तरच भारताची परंपरा खर्‍या अर्थाने समजू शकेल असं त्यांना वाटत होतं. शिवाय पाश्चात्य देशात जे जे काही नवे ज्ञान असेल, नवे विचार असतील, त्याचाही परिचय भारतीयांनी करून घेतला पाहिजे. सर्व अभ्यासला शिस्त हवी, माहितीमध्ये रेखीवपणा हवा,नेमकेपणा  हवा. कोणत्याही विषयाच्या ज्ञांनाच्या बाबतीत परिपूर्णतेची आस हवी या गोष्टींवर स्वामीजींचा भर होता. हे गुण आपण भारतीयांनी पाश्चात्यांकडून घेतले पाहिजेत असे त्यांना वाटे.

त्यांचे नुसते तात्विक गोष्टींकडे च लक्ष होते असे नाही .इतके लोक भेटायला येत, त्यांना कोणाला कशाची गरज आहे या व्यावहारिक गोष्टींकडेही त्यांचे लक्ष असे. अलवर मुक्कामात एका गरीब ब्राम्हणाला आपल्या मुलाची मौंज करण्याची इच्छा होती पण त्याची तेव्हढी आर्थिक परिस्थिति नव्हती. तेंव्हा स्वामीजींनी लोकांना विनंती केली की सर्वांनी वर्गणी गोळा करून, त्या मुलाची मौंज करावी. सर्वांनी संमती दिली. पण पुढे स्वामीजी जेंव्हा अबुला गेले तेंव्हा त्यांनी तिथल्या अनुयायला पत्र लिहून विचारले की, सांगितलेल्या सर्व गोष्टी चालू आहेत ना आणि त्या ब्राम्हणाच्या मुलाची मौंज झाली का हे ही विचारले.

अशा प्रकारे स्वामीजींनी पुढच्या प्रवासाला गेल्यावर आधीच्या मुक्कामातल्या लोकांशी पत्र संवाद चालू केला. संपर्क ठेवला आणि उपदेश पण करत राहिले. परिव्राजक म्हणून फिरताना ते कुठेही गुंतून पडत नव्हते पण  पत्र लिहिणे, संबंधित लोकांचे पत्ते लक्षात ठेवणे, जपून ठेवणे या नव्या व पूरक गोष्टी अनुभावातून त्यांनी स्वीकारल्या होत्या आणि यातूनच मग स्वामीजींनी आपल्या वराहनगरच्या मठातील गुरुबंधूंना संपर्कात राहण्यासाठी पत्र लिहिणे सुरू केले.

अलवरचा निरोप घ्यावा असं त्यांना वाटलं, सात आठवडे झाले होते इथे येऊन. त्यात अनेकांनी अनुयायित्व पत्करल होतं. खूप हितचिंतक जमवले होते. प्रवास पुढे सरकत होता तसे त्यांच्या अडचणी कमी होत होत्या. मोठ्या संख्येने लोक ओळखू लागले होते. पुढे पुढे तर, पुढच्या मुक्कामाला कोणीतरी परिचय पत्र द्यायचे ते बर्‍याच वेळा आधीच्या मुक्कामातील प्रभावित झालेली व्यक्तीच असायची. सहज ही सोय व्हायची, पण त्यांनी स्वत: कधी अशा सोयीसाठी प्रयत्न केला नव्हता.

अलवर सोडून स्वामीजी आता जयपूरला पोहोचले. यावेळी अलवरचे त्यांचे खूप हितचिंतक लोक त्यांना सोडायला त्यांच्या बरोबर पन्नास साठ किलोमीटर पर्यन्त आले होते. यावरून स्वामीजींच्या सहवासाचा परिणाम कसा होत होता याची कल्पना येते.

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गणेशोत्सव काल आणि आज … ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सौ. सुचित्रा पवार

?  विविधा  ?

☆ गणेशोत्सव काल आणि आज… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सर्वांच्या जिव्हाळ्याचा, आनंदाचा, उत्साहाचा सण म्हणजे गणेशोत्सव ! तो कधीपासून सुरु झाला याची नोंद इतिहासात असणार, पण गणपती मळाचा की चिखलाचा ? आख्यायिकाही वेगवेगळ्या आहेत. कुणी पुराणात जाऊन पाहिलंय ? नाही, तेही कल्पनेनेच लिहिले. त्यामागे तत्कालीन परीस्थिती, भौगोलिक, आर्थिक सामाजिक वैज्ञानिक ही असेल कदाचीत पण ते प्रमाण मानत आपण पाळत आलो, कदाचित त्या काळी काळाशी सुसंगत असेल ही ! 

ब्रिटिशांविरुद्ध समाजात एकी निर्माण करण्यासाठी टिळकांनी घरातला गणपती चौकात ठेवला की जेणेकरून लोक एकत्र येतील मग त्यांना समजावणे, सांगणे सोपे जाईल आणि नंतरच्या काळात त्याला सार्वजनिक रूप आले. टिळकांचा मूळ उद्देश जनजागृती व लोकांना एकत्र येणे हे सफल झाले असतीलच, पण पुढे ही प्रथा तशीच राहिली अन मंडळे वेगवेगळ्या कल्पना लढवून कल्पकता अन सामाजिक प्रबोधन करू लागली. मनोरंजनाच्या विविधरंगी कार्यक्रमानी उत्सव बहरू आणि भारु लागले. एक चैतन्य संचारले या उत्सवात नियमितच्या रुटीनमधून लोकांचे मनोरंजन होऊ लागले, विरंगुळा मिळू लागला. लोक शिकले, शिक्षित झाले, उत्सवात बदल झाले, लोकसंख्या वाढली, आता खरे तर काळानुसार बदल व्हायला हवे होते पण उलटेच घडले. भरमसाठ मंडळे एकमेकांवर ईर्षा, भांडणे अन जबरदस्तीच्या देणग्या, उंचच उंच मुर्त्या, डॉल्बी, बीभत्स गाणी यांनी उत्सवाचे सात्विक रूप जाऊन हिडीस रूप आले. प्रसादाच्या नावाखाली जेवणावेळी अन अन्नाचा अपव्यय होऊ लागला. रस्त्यावरची गर्दी, डॉल्बीचे शरीरावरील घातक परिणाम, पाणी प्रदूषण, ट्रॅफिक जॅम अन सामाजिक वातावरण गढूळ केलंय या सार्वजनिक उत्सवाने !आचार विचारात काळानुसार बदल होऊन सुसंस्कृतपणा यायच्या ऐवजी त्याची दिशा भरकटली अन दशा दशा झाली की हे आवरायला गणेशालाच बोलवावे वाटतेय.

सामाजिक वातावरण पर्यावरण यांचा विचार आम्ही करत नसू तर मग कायदाच का करत नाहीत एक छोटे गाव एक गणपती, मोठे शहर एक गल्ली एक गणपती ? मोठ्या मूर्ती बनवणे कायद्याने बंद का केले जात नाही ? पर्यावरण पुरकच मूर्ती तयार करा म्हणून कायदा का होत नाही ? घरगुती, सार्वजनिक मूर्तींना ठराविक उंचीचे प्रमाण का दिले जात नाही ?कारण या सर्वांना खतपाणी घालायला राजकारणी मंडळी कारणीभूत आहेत. उत्सव जवळ येताच मंडळांना शर्ट, भरमसाठ देणगी दिली जाते अन ऐतखाऊ, चंगळवादी पिढ्याना सवय झालीय की उत्सव आला की राजकारण्यांकडे भीक मागून जगायचे, टोकाच्या अस्मिता अन श्रद्धाही ! सामाजिक जागृती अशा विचित्र, ओंगळ वळणावर आलीय, करोडो रु चा चुरा पाच ते सात दिवसात होतोय. अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच मंडळे सामाजिक बांधिलकी, सलोखा अन विधायक उपक्रम राबवतात, बाकी सर्व तेच ते जेवणावेळी, रोषणाई अन डॉल्बी !

खरे तर भारत हा कृषिप्रधान देश आहे  म्हणून सर्व सण उत्सव हे शेतकरी जीवनाशी निगडित होते.

देवाचा प्रसाद अन फुले फळे ही त्या त्या ऋतूनुसार ! चिखलाचे देव पाण्यात विसर्जित करायचे म्हणजे पुन्हा ते निसर्गात मिसळावेत. जसे मनुष्य जन्मास येतो अन शेवटी मातीत मिसळून एकरूप होतो ! तसेच या देवांच्या मूर्तीचे देखील ! बघा, नागोबा, बैल, मातीचेच अन गणपती ही मातीचाच ! बारा बलुतेदारांना वेगवेगळ्या सणाला महत्त्व होते अन त्यांचा चरितार्थ यातून होत असे म्हणून हे सण अन औपचारिक गोष्टींचे चक्र त्या गावगाड्याच्या गरजेनुसार फिरत असे ! आता ते सर्व सम्पले, शेती सम्पली, कृषिप्रधान देश व्यापार प्रधान अन नोकरीप्रधान झाला अन सगळे सण व्यापारी गणिते करू लागले ! शेतातून, परसातून फुले, पत्री, दुर्वा न मिळता थेट बाजारातून मिळू लागली, पाना फुलांचा, फांद्यांचा बाजार बसू लागला अन कसल्याही परस्थितीत ते केलेच पाहिजे ही मानसिकता वाढली.

अमुक सण अमुक स्पेसॅलिटी याचे स्तोम वाढले शेतात पिकापेक्षा तनकट फोपावल्यासारखे !

मला आठवतो माझ्या बालपणीचा गणेशोत्सव ! श्रावणातल्या झडीने अन भादव्याच्या उन्हाने पिकं तरारून यायची सोबत गवत तणही फोपवायचे पिकांशी स्पर्धा करत, रस्त्याच्या दुतर्फा तरवड, गवतफुल फुललेली असायची, परसदारी विविधरंगी गौरी फुलायच्या   रंगीबेरंगी फुलपाखरे सगळीकडे आनंदाने भिरभरायची, ज्वारी, मका कम्बरेला लागलेली असायची, मूग, काळा श्रावण, चवळीच्या शेंगा अंगणात ऊन खात पडायच्या, मुगातल्या लाल अळ्या अन  चवळीच्या पांढऱ्या अळ्या शेंगेतून बाहेर पडून वाट दिसेल तिकडं धवायच्या, उन्हात टरफल फुटून शेंगा चट चट आवाज करत फुटायच्या अन कडधान्य बाजूला पडायची, चिमण्या दिवसभर या आळ्या गट्टम करण्यात व्यस्त अन शेतकरीन धान्याची उगा निगा करण्यात ! इकडे शेतीच्या पिकांची लगबग अन सण चौकटीत ! पटपट ही काम आवरून सणाच्या तयारीला लागायची ! घराघरात देवळीला सोनेरी बेगड लावून मखर करून गणपती विराजमान व्हायचा क्वचितच तो टेबल किंवा तत्सम वस्तूवर स्थानापन्न व्हायचा. शेतात दुर्वा दव बिंदूंचे मुकुट परिधान करून पावसाची नव्हाळी लेऊन हिरव्या कंच लुसलुशीत पेहरावात मुबलकपणे हवेवर डुलायच्या, आघाडा रस्त्याच्या कडेला कुंपणात आपली डोकी उंचावत अस्तित्वाची दखल घ्यायला भाग पाडायचा ! उदबत्ती, निरांजन, कागदाच्या झुरमुळ्या, दरवर्षी याच सणाला राखून ठेवलेले नवीन रंगीबेरंगी कापड टेबल वर बस्स इतकीच घरगुती गणपतीची आरास ! फार फार तर कागदाची  एखादी प्रभावळ ! पेढे, पेरू, केळ, चुरमुरे बत्तासे, शिरा, मोदक प्रसाद इतकाच माफक !

सार्वजनिक मंडळ गल्लीत एकच साधी मूर्ती, छोटासा मंडप, विद्युत रोषणाई स्टेरीओवर तेव्हढाच गल्लीपुरता गाण्यांचा आवाज घुमायचा अन मनात आनंदी आनंद भरायचा. आमची गल्ली गावाच्या एका टोकाला, खूप मोठी ! जणू छोटेसे एक गावच ! गल्लीतल्याच नाटक कंपनीचं एखादं नाटक किंवा विविध गुण दर्शन बस इतकेच मनोरंजन ! गावात वेगवेगळ्या पेठांचे वैशिष्ट्य पूर्ण आरास, देखावे कधी जिवंत देखावे अन तीच स्टेरिओवरील गाणी त्या त्या काळातील मराठी हिंदी चित्रपटातील ! वातावरण आनंदान भरून  जायचं ! वेगळं काही वाटत नव्हतं किंवा देव आणि गाणी यांचा काही संबंध असावा हे ध्यानी येत नव्हतं ! कुठेही धावपळ, ताण किंवा बोजा नसायचा. पाच दिवस घरोघरी विराजमान होऊन पुरणपोळी खाऊन, सार्वजनिक गणपती शिरा खाऊन त्यांच्या गावी जायचे मन हुरहूरते ठेऊन अन शेतकरी पुढील शेताच्या कामाच्या लगबगीत !

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वाडगेभर निर्जीव अन्न… वैद्य रूपाली पानसे ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? विविधा ?

☆ वाडगेभर निर्जीव अन्न… वैद्य रूपाली पानसे ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

वाडगेभर निर्जीव अन्न : आजची फॅशन “🍲🍜🍚

“अ बाउल ऑफ डेड फूड” या माझ्या wordpress च्या ब्लॉगबद्दल खूप सकारात्मक प्रतिक्रिया आणि आभार वाचकांनी कळवले. काही वाचकांनी ही पोस्ट अजून विस्तृत करून मराठीमध्ये लिहिली तर  जास्त लोकांपर्यंत पोचून लिखाणाचे ध्येय साध्य होईल, असे वारंवार सुचवले. ही पोस्ट त्या वाचकांना समर्पित !

आज आहारशास्त्रात , पाकविधीशास्त्रात थोडक्यात फूड इंडस्ट्रीमध्ये अफाट, आमूलाग्र technical क्रांती झाली आहे. गमतीने आपण म्हणतो, काही धंदा चालो ना चालो पण वडापावची गाडी आणि खाण्याचे दुकान याला मरण नाही. किती खरे आहे हे.आज सर्वात जास्त नफा फूड इंडस्ट्री, हॉटेल आणि फूड manufacture सेक्टर कमावतंय. उद्याही हेच चित्र असेल किंबहुना अजून विस्तार वाढला असेल.

ज्या वेगात हा ‘रेडी टू ईट’ पदार्थांचा उद्योग फोफावतोय, त्याच वेगात lifestyle disorders औषधी आणि आरोग्यसेवा क्षेत्रातही वाढ होतेय. याचा अर्थ असा तर नाही ना की, फूड इंडस्ट्री औषधी मार्केटसाठी कस्टमर तयार करतेय? दुर्दैवाने काही अंशी ते खरेही आहे. काही घरात ‘रेडी टू ईट’ पदार्थ हे अगदी रोज, खूप प्रमाणात खाल्ले जातात. अगदी लहान मुलांनाही दिले जातात. (हो, कारण जाहिरातीत टार्गेट ऑडियन्स लहान मुले व त्यांच्या आयाच असतात )

‘रेडी टू ईट’ पदार्थांची यादी भली मोठी आहे. आज उदाहरणादाखल आपण घेऊ ….

कॉर्न फ्लेक्स, ओट मिल, चॉकोस, मुसेली इत्यादि :

अति उच्च तापमानात, अति दाबाखाली मूळ धान्यातील पाण्याचा अंश काढून हे पदार्थ तयार होतात. उष्णता, अति दाब यामुळे यातील नैसर्गिक पोषणमूल्ये जवळजवळ नष्ट होतात. राहतो तो निर्जीव पोषणमूल्यरहित चोथा! आता हा चोथा कोण खाणार म्हणून मग त्यात टाका कृत्रिम व्हिटॅमिन, कॅल्शिअम,  लोह इत्यादि, जे शरीरात नीट शोषले जाईल याची काही शाश्वती नाही.

किती गम्मत आहे नाही? आधी त्या धान्याचा जीव घ्या आणि मग त्यात परत जीव आणण्याचा प्रयत्न करा. या सगळ्यात मूळ पदार्थांपेक्षा processing कॉस्ट वाढलेली असते तसेच टिकवणे, चव वाढवणे,  दिसायला आकर्षक असावे या गोष्टीतून त्यात वेगवेगळी रासायनिक preservatives, रंग, मीठ, साखर आणि फ्लेवरची भर पडते. काही ब्रॅण्ड्समध्ये तर वाळवलेल्या भाज्या, फळेही असतात. समस्त पिरॅमिड रिटर्न mummy, मृत शाक, फल, धान्य संमेलनच जणु !

असे पदार्थ वारंवार खाण्यात असणाऱ्या स्त्रियांच्या गटाचा आणि असे पदार्थ न खाणाऱ्या स्त्रियांच्या गटाचा अभ्यास केला असता, हे पदार्थ खाणाऱ्या स्त्रियांमध्ये स्थूलता, अतिउच्चरक्तदाब, तसेच मधुमेहाचे प्रमाण अधिक असल्याचे आढळले. कमालच आहे! पण जाहिरातीत तर सुडौल कमरेची बाई हे ३ आठवडे खा आणि वजन कमी होईल असे सांगत असते. वरून टाकलेल्या मीठ,  साखरेचे परिमाण दुसरे काय. आयुर्वेदानुसार असे निर्जीव, अति उष्णतेचा संस्कार झालेले, कोरडे अन्न हे वात दोष वाढवून शरीरात अनेक व्याधी उत्पन्न करण्याचे एक मुख्य कारण मानले जाते.

ओट हे तर अतिशय निकृष्ट धान्य वर्गात गणले जावे, इतके याचे पोषणमूल्य कमी आहे. ओटचा ग्लायसिमीक इंडेक्स (म्हणजे हे पचवताना रक्तातील वाढलेली साखरेची पातळी) ही जास्त असते. मी प्रत्यक्षात मात्र खूप मधुमेही रुग्णांना, “डॉक्टर, म्हणजे मी अगदी नियमित ओट मिल घेते, unhealthy असे काहीच खात नाही हो.” असे भक्तिभावाने सांगताना पाहते. बसतोय ना धक्का एक एक वाचून. असो !

ओट meal नियमित घेणाऱ्या व्यक्तींमध्ये कुपोषणाचे सगळी लक्षणे आढळून येतात, ज्यामुळे हाडे, सांधेदुखी, थकवा, पचनाच्या तक्रारी,  मलबद्धता, अहो, इतकीच नाही ही गोष्ट! अगदी आतड्यामध्ये मार्गावरोध होणे (intestinal obstruction, जी सिरिअस स्थिती असते) इतपत आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात. याला डेटा,  research, सगळ्याचा आधार  आहे. गुगल करा.

मूळ म्हणजे पोषणरहित अन्न खाऊन शरीराचे हाल करा, वजन आपोआप कमी होईल ही विचारसरणीच किती भयानक आहे. सत्य आहे – आजच्या मनी ओरिएंटेड सोसायटीचे ! दुसरे काय?

‘रोज रोज ताजा नाश्ता बनवणे शक्य नसते हो’, ‘खूप सवय झाली या पदार्थांची, आता मुले ऐकत नाहीत’, ‘असे कसे चालते मार्केटमध्ये, जर एवढे दुष्परिणाम असतील तर?’

 – या सगळ्याला एकच उत्तर आहे, ‘ब्रॅण्डिंग’! 

‘ब्रॅण्डिंग’ची माया जी मला, तुम्हाला,आपल्या मुलांना बरोबर जाळ्यात ओढते. जाहिरात, सुंदर सुंदर मॉडेल आणि भ्रम निर्माण करणारे मोठे मोठे दावे! यात अगदी आयुर्वेदिक, आयुर्वेदिक म्हणून झेंडा फडकवणारे शांतंजली किंवा इतर हर्बल कॉर्न फ्लेक, मुसेलीवाले पण येतात बरं का!

आयुर्वेद वेगळा, स्वदेशी वेगळे, गल्लत नको.

अरे हो हल्ली ‘रेडी टू ईट व मेक’ पोहे, खिचडी, सांजा अशीही पाकीटे  मिळतात बरं का! तेही याच गटातले आहेत, विसरू नका.

अगदी क्वचित कधीतरी, पर्याय नाही, म्हणून हे पदार्थ खाणे समजू शकते.  परंतु अगदी वारंवार, खूप प्रमाणात आणि सगळ्यात महत्वाचे घरातील लहान मुले व वृद्ध व्यक्तीस हे खाण्यास देत असाल तर, नक्की परत विचार करा.

आपल्या आजूबाजू सहज मिळणाऱ्या ज्वारी, बाजरी, नाचणी, राजगिरा, साळीच्या लाह्या ह्या वरील पदार्थाना उत्तम पर्याय ठरू शकतात. बाकी, ताज्या नाश्त्याच्या पदार्थांबाबत मी मागेच एक पोस्ट सविस्तर लिहिली आहे.

आपण राहतो त्या भौगोलिक परिस्थितीला, शरीराला उपकारक व अनुसरून आपले पारंपरिक पदार्थ असतात. आळीपाळीने असे पारंपरिक व ताजे पदार्थ खाण्यात ठेवणे कधीही उत्तम.

ताजे खा, साधे खा, निरोगी राहा.

लेखिका – वैद्य रुपाली पानसे –

मो 9623448798 ईमेल [email protected]

संग्राहिका : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सद्गुरू कशासाठी हवा? ☆ संकलन – श्री मनोज लिंग्रस ☆

? विविधा ?

☆ सद्गुरू कशासाठी हवा? ☆ संकलन – श्री मनोज लिंग्रस ☆

सद्गुरू कशासाठी हवा ?

महाभारतातलीच एक कथा आहे.

द्रौपदी स्वयंवरात सर्व राजे, युवराज आपापलं कौशल्य पणाला लावून मत्स्यभेद करण्याची पराकाष्ठा करीत होते.

पणही विलक्षणच होता!

उंच छताला एक चक्र फिरत राहणार. त्याच्या एका आरीवर लाकडी मासा बांधलेला. ते चक्र फिरत असतांना नेम साधून त्या माशाच्या डोळ्याचा भेद करायचा.

उ:! एवढंच?

नाही! ते तर कुणीही करेल! इथे तर एकाहून एक निष्णात धनुर्धर उपस्थित होते!

अन् स्वयंवर साक्षात याज्ञसेनीचं! सर्वच प्रतिस्पर्धी इरेस पेटलेले!

पऱंतु खरी मेख पुढेच होती!!

नेम सरळ माशाकडे बघून धरायचा नव्हता. खाली भलंमोठं तसराळं पाणी भरून ठेवलं होतं. वर मासा लावलेलं चक्र फिरत असतांना खाली तसराळ्यात बघून नेम धरायचा होता अन् माशाच्या डोळ्याचा वेध घ्यायचा होता!

इथेच सर्वांचा हिरमोड झाला होता. नीट नेम धरणारे भले भले पाण्याच्या तरंगांमुळे चक्क पराभूत झाले होते. एकेक धुरंधर हताश होऊन परतलेत.

लक्ष्यभेद करायला अर्जुन पुढे सरसावला. एक क्षण त्याने कृष्णाकडे बघितलं.

कृष्णानी खूण करून त्याला निकट बोलावलं.

सूचना केली,

“हे बघ, मन शांत ठेव.

नीट वीरासन घाल. धनुष्यावर बाण चढव, प्रत्यंचा ओढल्यावर हात स्थिर ठेव. पापणी सुध्दा लवू देऊ नकोस! नेमक्या क्षणी तीर सोड – बाकी मी पाहून घेईन.”

अर्जुन हासला.

“काय झालं? कां हसलास?”

“कृष्णा, वीरासन मी घालणार, नेम मी धरणार, तीर पण मीच सोडणार. तुला करायला बाकी उरलं काय रे?”

आता स्वत: कृष्ण हसलेत.

“पार्थ, हे सर्व तुलाच करायचंय. मी फक्त तेवढंच करणारे जे तुला नाही जमणार.”

“हु:! अन् ते काय असणारे?”

“सांगू? जमेल तुला?”

“सांग बघु…”

“त्या तसराळ्यातलं पाणी स्थीर ठेवण्याचं काम माझं”

एक क्षण विचार केल्याबरोब्बर अर्जुन शहारला! सावध झाला!

दुस-याच क्षणी डोळे मिटले. मनोमन कृष्णाला वंदन करून पण जिंकायला आत्मविश्वासाने पुढे सरसावला. पुढे काय झालं सर्वांनाच माहितीये!

हरिकृपेचा महिमाच असा असतो! त्याची सोबत होती म्हणुन पाचांच्या केसालाही धक्का लागला नाही. अन् त्याचीच सोबत नव्हती, तर शंभरातला एकही वाचला नाही…………

संकलन – मनोज लिंग्रस

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! ☆ शालन, मालन आणि मोरू ! (भाग 2) ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? चं म त ग ! 😅

😅 शालन, मालन आणि मोरू ! (भाग 2) 😂 श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

तर मंडळी, आपला मोरू पंतांचा बायकोला नवीन साडी घेण्याचा कानमंत्र घेवून, अगदी आनंदाने आपल्या खोलीकडे निघाला. त्या आनंदाच्या भरात समोरून येणाऱ्या दोन तीन चाळकऱ्यांना त्याने धडका पण दिल्या आणि त्या सगळ्यांना सॉरी म्हणत म्हणतच तो आपल्या खोलीकडे मार्गक्रमण करू लागला. कधी एकदा शालनला नवीन साडी घ्यायला जाऊया हे सांगतोय, असं त्याला होऊन गेलं होतं.

तेवढ्यात, आपल्याच विचाराच्या तंद्रित चालत असलेला मोरू आणि समोरून येणाऱ्या लेले काकूंची इतक्या जोरात धडक झाली, की काकूंच्या डोक्यावरची पाण्याची कळशी पूर्ण रिकामी होऊन, मोऱ्याला जेंव्हा नखशिखान्त अंघोळ झाली, तेंव्हा कुठे तो भानावर आला.  “मोऱ्या काय केलंस हे ?” “सॉरी काकू !” असं बोलून तो कपडे झटकत झटकत खोलीकडे जाऊ लागणार तेवढयात लेले काकूंनी त्याच्या बकोटीस धरून, “अरे लक्ष कुठे होतं तुझं? का सकाळी सकाळी श्रावणी सोमवारची भोले नाथाची भांग चढवून आलायस ?” असं रागात विचारलं. “काही तरीच काय काकू ? मी म्हटलं ना तुम्हांला सॉरी” असं म्हणून मोऱ्या परत जायला लागला तेंव्हा लेले काकू त्याला म्हणाल्या, “मोऱ्या गधडया आज श्रवणातला शेवटचा सोमवार.” “बरं मग ?” “अरे मग, काय मग ? आज माझा कडक उपवास असतो आणि मी स्वतः पाच कळशा पाणी डोक्यावर वाहून, आपल्या चाळीतल्या शंकराच्या देवळात त्या भोळ्याला स्नान घालते, गेली कित्येक वर्ष, कळलं ?” “अरे व्वा काकू, छानच करता तुम्ही हे. आता तो भोळा शंकर तुमची ही सेवा मान्य करून तुम्हांला नक्कीच प्रसन्न होऊन, एखादा चांगलासा वर देईल बघा.” असं उपरोधीक स्वरात मोऱ्या लेले काकूंना म्हणाला. पण त्याच्या असल्या बोलण्याकडे काकूंनी काणा डोळा करीत त्याला म्हटलं “अरे तो काय देईल अथवा न देईल यात मला काडीचा इंटरेस्ट नाही.” त्यांच हे बोलणं ऐकून मोऱ्या म्हणाला, “मग बरंच झालं की काकू!  माणसाने असंच निस्वार्थी मनाने आपलं कर्म करीत जावं, फळाची अपेक्षा कधी करू नये.”

काकूंच्या कळशीतल्या थंडगार पाण्यात भिजल्यामुळे मोऱ्याला आता बऱ्यापैकी थंडी वाजू लागली होती. शिवाय शालनला कधी एकदा साडी शॉपिंगची बातमी सांगतोय असं त्याला होऊन गेलं होतं. म्हणून तो धीर करून लेले काकूंना म्हणाला “बरं येतो आता काकू, आधीच उशीर झालाय.” असं म्हणून तो पुन्हा वळणार तोच लेले काकूंनी त्याची वाट परत अडवली !

“आता आणखी काय काकू ? अहो, मी आता हे ओले कपडे बदलले नाहीत ना, तर मला नक्कीच न्यूमोनिया होईल बघा !” “मोऱ्या मला सांग, अंघोळ करतोस तू ?” “म्हणजे काय काकू, रोजच करतो मी अंघोळ.” “मी रोजच विचारत नाहीये, आज केलीस कां अंघोळ ?” असं जरा काकूंनी आवाज चढवून विचारल्यावर मजल्यावरचे शेजारी पाजारी काकूंचा तो सुपरिचित आवाज ऐकून त्या दोघां भोवती लगेच गोळा झाले. चाळकरी गोळा झालेले बघून, नाही म्हटलं तरी मोऱ्या थोडा घाबरला. या चाळकऱ्यांना सक्काळी सक्काळी घरातली कामं नसतात कां ? असा सुद्धा एक प्रश्न त्याच्या मनांत डोकावून गेला. पण तो प्रश्न त्याने लगेच झटकून, आता लेले काकूंच्या तावडीतून आपली लवकरात लवकर सुटका करून घेण्यासाठी, त्याने परत सॉरी म्हणण्यासाठी तोंड उघडले, पण त्याला पुढे बोलू न देता लेले काकू कडाडल्या “मोऱ्या काय विचारत्ये मी ? अरे आज अंघोळ केल्येस कां नाही ?” “नाही काकू, अजून माझी अंघोळ व्हायची आहे. त्याच काय झालं, आपल्या पिकनिक…” त्याला मधेच तोडत लेले काकू म्हणाल्या “मग बरंच झालं !” लेले काकूंच ते बोलणं ऐकून मोऱ्या आश्चर्याने म्हणाला, “काय बरं काय झालं काकू ?”  “अरे तू अजून अंघोळ केली नाहीस ते बरंच झालं असं म्हणत्ये मी !” “कां काकू ?” त्यावर लेले काकू मोऱ्याला समजावणीच्या सुरात म्हणाल्या “मोऱ्या माझ्या डोक्यावरची कळशी तुझ्या डोक्यावर पूर्ण रिकामी झाल्यामुळे आता तुझी अंघोळ झाल्यातच जमा आहे. तेंव्हा आता एक काम कर.” लेले काकूंच्या तोंडातून ‘एक काम कर’ हे शब्द ऐकून मोऱ्याचा चेहरा पडला. त्याने नाईलाजाने काकूंना विचारलं  “कसलं काम काकू ?” “आता या ओल्या कपड्यानिशी मला एक एक करून  नळावरून पाच कळशा पाणी आणून दे, भोळ्या शंकराच्या अभिषेकसाठी. मी तुझी खाली देवळाजवळ वाट बघत्ये, जा पळ लवकर !” असं बोलून मोऱ्याला तोंडातून एक अवाक्षर सुद्धा काढायची संधी न देता, लेले काकूंनी खाली पडलेली आपली कळशी मोऱ्याच्या हातात जबरदस्तीने ठेवली आणि त्या मागे वळून न बघता जिन्याच्या पायऱ्या उतरून तरातरा जाऊ लागल्या.

लेले काकूंच्या या वागण्याचा मोऱ्याला इतका राग आला, पण त्याचा नाईलाज होता. चूक त्याचीच होती. त्याने आजूबाजूला हसणाऱ्या चाळकऱ्यांकडे एकदा रागाने पाहिले आणि तो हातातली कळशी घेवून गपचूप पाणी आणण्यासाठी वळला.

काकूंच्या या पाच कळशा पाणी पाहोचविण्याच्या कामात अडकल्यामुळे आणि नळावर पाणी भरण्यासाठी गर्दी असल्यामुळे, मोऱ्याचे आणखी पुढचे दोन तास खर्ची पडले.  एकदाची मोऱ्याची ती कामगिरी फत्ते झाल्यावर, दमला भागला मोरू आपल्या खोलीकडे वळला आणि खोलीत शिरता शिरता आनंदाने म्हणाला, “अगं ऐकलंस का शालन, आज संध्याकाळी की नाही आपण दोघं….” आणि पुढचे शब्द त्याच्या तोंडातून बाहेरच आले नाहीत मंडळी. तो घरात शिरला आणि त्याच लक्ष चहा पीत खुर्चीवर बसलेल्या एका तरुणीकडे गेलं. शालन तिच्या बाजूला उभी होती आणि त्या दोघींच्या गप्पा अगदी रंगात आल्या होत्या. त्यानं त्या तरुणीला या आधी कधीच पाहिलं नव्हतं, म्हणून त्याने आत येत येत शालनला विचारलं “या कोण शालन ?” “अहो ही माझी शाळेतली मैत्रीण मालन !” असं म्हणून शालन आणि मालन दोघीही हसायला लागल्या. पण शालनच्या तोंडातून ‘मालन’ हे नांव ऐकल्या ऐकल्या मोऱ्याच अवसान पार गळालं.  त्यावर शालन त्याला म्हणते कशी “अहो पंतांनी माझ्या आणि हिच्या नावाची केलेली गफलत परवा बोलता बोलता मी सहज मालनला सांगितली आणि….” शालनला पुढे बोलू न देता मालन मोऱ्याला म्हणाली “अहो भावजी, पंतांच्या या गफलतिचा फायदा घेवून मीच शालनला म्हटलं, आपण जरा भावजींची गंम्मत करू या का ?” “आणि मी सुद्धा या गोष्टीला तयार झाले आणि तुमची जरा…..” आता शालनला थांबवत मोऱ्या म्हणाला, “काय मस्त ऍक्टिंग केलीस गं तू शालन.  मला पिकनिकला जायला आत्ताच्या आत्ता १,५००/- रुपये द्या नाहीतर घटस्फोट द्या. मला अजिबातच संशय आला नाही तुझा, तू ऍक्टिंग करत्येस म्हणून ! बरं पण तुम्ही दोघी मैत्रिणी बसा गप्पा मारत, मी आलोच अंघोळ करून.” असं म्हणून मोऱ्या आत वळला आणि खो खो करून हसतच सुटला.

मंडळी, आता तुम्ही म्हणाल यात मोऱ्याला खो खो हसण्यासारखं काय झालं असेल ? तर त्याच उत्तर असं आहे, की शालन आणि मालनच्या या गंम्मतीच गुपित त्याला आता कळल्यामुळे, तो शालनला घेणार असलेल्या नवीन साडीचे दोन तीन हजार वाचले नाही का ? अहो, तुम्ही पण मोऱ्याच्या जागी असतात तर असेच खूष होऊन हसला असतात नां ? मग !

© प्रमोद वामन वर्तक

२६-०८-२०२२

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शुभास्ते पंथान: सन्तु ! ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ शुभास्ते पंथान: सन्तु ! ☆ श्री अरविंद लिमये ☆

माणूस हा बुद्धिमान प्राणी आहे, विचारशील आहे, हे कितीही खरं असलं तरी प्रत्येक माणूस आपल्या बुद्धीचा आणि विचार शक्तीचा प्रत्येक वेळी योग्य पद्धतीने वापर करत असतोच असे नाही. तो तसा वापर करणे पूर्णतः अपेक्षित असलेली तर्क ही संकल्पना! आपल्या बुद्धीचा आणि विचारशक्तीचा योग्य पद्धतीने कसा उपयोग करायचा याचे विकसित झालेले शास्त्र म्हणजेच ‘तर्कशास्त्र’! इंग्रजीतील ‘लॉजिक’ या शब्दाचे भाषांतर म्हणून तर्कशास्त्र हा शब्द सर्रास वापरला जातो. लॉजिक हा शब्द तसा सुसंगत विचारांच्या सहाय्याने ज्ञाननिर्मिती करु पहाणाऱ्या विविध क्षेत्रांसाठी अतिशय अर्थपूर्ण ठरतो. म्हणूनच फक्त तर्कशास्त्रच नव्हे तर इतर विविध ज्ञाननिर्मिती शाखांच्या नामकरणासाठी सुद्धा लॉजिक हा शब्द प्रत्यय बनून आलेला दिसून येतो. बायॅलॉजी, सोशॉलॉजी, अॅस्ट्रोलॉजी, सायकॉलॉजी अशी अनेक उदाहरणे सांगता येतील.

अर्थात तर्कशास्त्र हा  विचारवंत आणि अभ्यासक यांच्यासाठी एक सखोल अभ्यासाचा विषय असेलही कदाचित पण सर्वसामान्य माणसांसाठी ‘तर्क’ हा फक्त स्वतःकडून नकळत होणाऱ्या एका मानसिक पातळीवरील प्रक्रियेच्या प्रवासापुरताच परिचयाचा असतो.

तर्क म्हणजे अनुमान, कयास, अंदाज असेच बरेच कांही हा सर्वसाधारण समज. तर्क करण्याच्या रूढ पद्धतीचा विचार केला तर ते पूर्णांशाने खरेही आहे. कारण सहसा सर्वसामान्य व्यक्तींकडून अतिशय तर्कशुद्ध पद्धतीने तर्क केला जात नाहीच. ‘असे घडले असेल किंवा असे घडेल’ हा ज्याचा त्याचा अंदाजच असतो आणि त्यालाच सर्रास तर्क असे म्हटले आणि म्हणूनच समजले जाते. म्हणूनच तर्क म्हणजे अंदाज असला तरी प्रत्येक अंदाज ‘तर्क’ असतोच असे नाही. तर्काला वास्तवाचा, सत्यघटनांचा, आपल्या अनुभवांचा आणि सुसंगत विचारांचा आधार आवश्यक असतो. सर्वसाधारणपणे अंदाज मात्र व्यक्तिगत भावना, इच्छा, वासना यांनी प्रभावित झालेले असू शकतात. त्यामुळे बुद्धिनिष्ठ, सुसंगत विचारांच्या आधारे केला केलेला अंदाज आणि त्यातून काढलेले अनुमान हाच तर्क. आणि भावनिक प्रभावाखाली केलेले अंदाज मात्र अशास्त्रीय म्हणूनच कुतर्क, वितर्क, तर्कट ठरण्याची शक्यता अधिक.

सुसंगत विचारांच्या सहाय्याने केलेल्या तर्काचे सर्वांच्या परिचयाचे असे बुद्धिबळाच्या खेळाचे उदाहरण देता येईल. या खेळात प्रतिस्पर्ध्या विरुद्ध डावपेच करतानाच त्याच्या चालीवरून त्याच्या अपेक्षित चालींबद्दलचा तर्कशुद्ध विचार करून स्वतःची पुढची खेळी ठरवली जाते. युद्धात किंवा गनिमी काव्यात तर्कशुद्ध विचाराने घेतलेले निर्णयच अतिशय महत्त्वाचे असतात. गुन्हेगारांचा तपास करतानाही त्यातल्या चाली आणि निर्णयही असेच तर्कसंगत असणे आवश्यक ठरते. एरवी चोर सोडून संन्यासी फासावर लटकतो. राजकारण हासुद्धा तर्काधिष्ठित निर्णयातून आकाराला येणारा बुद्धिबळाचा खेळ असला तरी त्या खेळाला बुद्धिबळासारखे काटेकोर नियम मात्र नसतात. तरीही राजकारणाच्या खेळातही शह आणि काटशहांसाठी तर्कशुद्ध अनुमान, अंदाज महत्त्वाचेच ठरतात. या उलट दैनंदिन व्यवहारातले बरेचसे तर्क हे भावनांनी प्रेरित असल्याने व त्यामध्ये सारासार विचार व बुद्धी चातुर्याचा बऱ्याचदा अभाव असल्याने वितर्कच ठरत असतात.

संतुलित मन आणि तर्कशुद्ध विचार हे अचूक तर्कासाठी अतिशय अत्यावश्यक म्हणूनच महत्त्वाचे ठरतात. अचानक समोर येऊ पहाणाऱ्या संकटाच्यावेळी या दोन्ही गोष्टींचा अभाव असण्याची शक्यता असल्याने तर्कशुद्ध निर्णयांअभावी त्या संकटामुळे झालेल्या नुकसानीची तीव्रता खूप वाढल्याचे बऱ्याचदा अनुभवाला येते. त्यामुळेच अशा कसोटीच्या क्षणी तर्कशुद्ध निर्णयच संकटाची तिव्रता कमी करु शकतात.

यासाठी तर्क हा विचारांचा एक प्रवास आहे हे समजून घ्यायला हवे. योग्य निर्णय हा या प्रवासाचा अखेरचा थांबा. तिथवर सुखरूप पोहोचायचे तर बुद्धी आणि संतुलित मन यांच्या सोबतीनेच हा प्रवास व्हायला हवा. तरच तो न भरकटता अचूक दिशेने होईल. आणि त्यातून आकाराला आलेला तर्कच योग्य निर्णयाच्या थांब्यावर आपल्या स्वागताला हजर असेल!

आपणा सर्वांसाठी यापुढील अथक तर्कप्रवासासाठी ही संवादांची शिदोरी आणि ‘शुभास्ते पंथान: सन्तु’ या शुभेच्छा !!

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ डोळ्यांतले पाणी…भाग 4 ☆ सौ. अमृता देशपांडे ☆

सौ. अमृता देशपांडे

? विविधा ?

☆ डोळ्यांतले पाणी…भाग – 4 ☆ सौ. अमृता देशपांडे  

चिंतन लहानपणापासून हुशार मुलगा. पहिला नंबर कधीच सोडला नाही. मित्रांच्यात प्रिय, शिक्षकांच्यातही लाडका . तो सातच वर्षाचा होता,  तेव्हा त्याचे वडील स्वर्गवासी झाले. आईनं नोकरी करून उपजीविका केली. चिंतन आणि त्याच्या बहिणीनं कधीच आईकडे काही मागितलं नाही,  कसलाच हट्ट केला नाही. शाळा,  अभ्यास,  परीक्षा, स्पर्धा,  आणि क्रिकेट,  बस्स, इतकंच! इतकंच त्याचं जग.दहावी ला 94% मार्क मिळाले,  राज्यात सहावा व शाळेत पहिला आला. आईला झालेला आनंद तिच्या डोळ्यांतून घळाघळा वहाणा-या पाण्यातून ओसंडत होता. पती गेल्याचं दुःख, मुलांना वाढवताना एकटीनं केलेला प्रवास , मुलांच्या भविष्याच्या काळजीने जागून काढलेल्या रात्री या विचारांनी मनात काहूर उठवलं होतं. चिंतन चं यश बघून ती कृतार्थ झाली.  अनेक ठिकाणी अभिनंदनाचे सत्कारसोहळे झाले.त्याच्या शाळेत जेव्हा त्याचा सत्कार झाला तेव्हा त्याचं नाव पुकारताच सर्व शिक्षक आणि मुलांनी उभे राहून त्याच्यासाठी वाजवलेल्या टाळ्या आणि मुख्याध्यापकांनी त्याचं तोंडभरून केलेलं कौतुक बघून आईला तिचे अश्रू कसेच आवरता येत नव्हते. आयुष्याच्या एका महत्वाच्या टप्प्यावर तिला कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं.  त्यामुळे ‘ आसवांचा पूर माझ्या पापण्यांना पेलवेना’ अशी तिची अवस्था झाली.

(क्रमशः… प्रत्येक मंगळवारी)

© सौ. अमृता देशपांडे 

पर्वरी – गोवा

9822176170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग ३१ परिव्राजक ९. मूर्तीपूजा ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग ३१ परिव्राजक ९. मूर्तीपूजा ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

अलवरला राजेसाहेबांचे दिवाण मेजर रामचंद्र यांना स्वामीजींबद्दल कळलं होतं. त्यांनीही स्वामीजींना आपल्या घरी बोलावलं. अलवर संस्थानचे राजे महाराज मंगलसिंग होते. त्यांच्यावर पाश्चात्य संस्कृती आणि तिथले रीतिरिवाज यांचा प्रभाव होता. त्यामुळे दिवाण साहेबांना वाटलं की स्वामीजींची भेट घडवून आणली तर राजेसाहेबांचा दृष्टीकोण थोडा तरी बदलेल. म्हणून त्यांनी महाराजांना चिठ्ठी पाठवली की, उत्तम इंग्रजी जाणणारा एक मोठा साधू इथे आला आहे. तसे दुसर्‍याच दिवशी राजे साहेब दिवाणांच्या घरी स्वामीजींना भेटायला आले. त्यांनी स्वामीजींना पहिलाच प्रश्न विचारला की, “आपण एव्हढे विद्वान आहात, मनात आणले तर महिन्याकाठी कितीतरी पैसा सहज मिळवू शकाल. मग आपण असे भिक्षा मागत का फिरता?”स्वामीजींना हा प्रश्न नवीन नव्हता. हाच प्रश्न रामकृष्ण संघाचं काम सुरू केलं तेंव्हा भिक्षा मागायला गेले असताना अपमान करण्यासाठी विचारला गेला होता. पण आज प्रश्न विचारणारी व्यक्ती  श्रेष्ठत्वाचा अहं असणारी, हातात सत्ता असणारी व्यक्ती होती.

महाराजांच्या प्रश्नाचे उत्तर न देता स्वामीजींनी त्यांना उलट प्रश्न विचारला की, “महाराज आपण सदैव पाश्चात्य व्यक्तींच्या सहवासात वावरता. शिकारीला वगैरे जाण्यात वेळ दवडता. प्रजेविषयीच्या आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करता. हे आपण का करता सांगा बरं?” उपस्थित लोक जवळ जवळ भ्यायलेच.  राजेसाहेबांना असा थेट प्रश्न ? पण राजेसाहेब शांत होते. त्यांनी विचार केला आणि म्हणाले, “का ते मला नेमकं सांगता येणार नाही. पण मला आवडतं म्हणून मी सारं करतो”. स्वामीजी यावर म्हणाले, “याच कारणामुळे मी पण अशी भिक्षावृत्ती स्वीकारून संचार करीत असतो”.

राजेसाहेब हसले. त्यांनी पुढचा प्रश्न विचारला. “स्वामीजी माझा मूर्तिपूजेवर विश्वास नाही. तर माझं काय होईल?” मी धातूची, दगडाची किंवा लाकडाची अशा मूर्तीची पुजा करू शकत नाही. तर मला मरणोत्तर वाईट गती प्राप्त होईल का? या प्रश्नावरून त्यांना पाश्चात्य दृष्टीकोनाचा आणि आधुनिकतेचा अहंकार होता हे स्वामीजींच्या लक्षात आलं होतं. स्वामीजी म्हणाले, “हे पहा, धार्मिक दृष्ट्या ज्याची ज्या मार्गावर श्रद्धा असेल त्याने त्या मार्गाने जावं”.

दिवाण साहेबांच्या घरात राजेसाहेबांचे चित्र भिंतीवर लावलेले होते ते चित्र स्वामीजींनी खाली काढण्यास सांगितलं. सगळे बघत होते की आता स्वामीजी पुढे काय करतात? त्यांना काही केल्या अंदाज येईना. स्वामीजींनी हे चित्र दिवाणसाहेबांच्या समोर धरलं आणि विचारलं, “हे काय आहे?” दिवाण साहेब म्हणाले, “हे महाराजांचे छायाचित्र आहे”. स्वामीजी म्हणाले, “थुंका याच्यावर”. हे ऐकताच, सगळे खूप घाबरले. इतर लोकांकडे वळून स्वामीजी म्हणाले, “तुमच्यापैकी कोणीही यावर थुंका. त्यात काय एव्हढं? तो एक कागद तर आहे”. मग दिवाणसाहेबांना पुन्हा म्हणाले, “थुंका यावर. थुंका यावर”. दिवाणसाहेब न राहवून म्हणाले, “स्वामीजी हे भलतंच काय सांगताय? हे महाराजांचं चित्र आहे. तुम्ही सांगता ते आम्हाला करणं कसं काय शक्य आहे?”           

“ते तर खरच. पण यात प्रत्यक्ष महाराज नाहीत ना. त्यांचं शरीर, अस्थि, मांस, अवयव यातलं काहीही नाही या कागदात. महाराज बोलतात,फिरतात, हिंडतात. तसं काहीच हा कागद करू शकत नाही. पण तरीही तुम्ही त्यावर थुंकण्यास नकार देता. हे तुमचं बरोबर आहे. कारण ते तुमचे महाराज आहेत. त्यावर थुंकणे हा त्यांचा अपमान आहे. असे तुमच्या मनात येते”. महाराजांबद्दल आदरभावनेचा स्वामीजींनी उल्लेख केल्यामुळे उपस्थित लोक जरा मनातून शांत झाले.

मग स्वामीजी महाराजांकडे बघून म्हणाले, “हे पहा महाराज, हा कागद म्हणजे तुम्ही नाहीत. पण दुसर्‍या दृष्टीने पाहिलं तर, त्यात तुम्ही आहात. त्यावर थुंका म्हटलं तर तुमचे विश्वासू सेवक तसं करायला तयार नाहीत. कारण ही तुमची प्रतिकृती पाहिली की, त्यांना तुमची आठवण होते. त्यामुळे ते ज्या आदरभावाने तुमच्याकडे बघतात, त्याच आदरभावनेनं ते या चित्राकडे बघतात. वेगवेगळ्या देवतांच्या धातूच्या, पाषाणाच्या बनवलेल्या मूर्तींची पुजा जे लोक करतात, त्यांची पण हीच दृष्टी असते. ते लोक धातूची किंवा दगडाची पुजा करत नाहीत. ती मूर्ती बघितली की त्यांना परमेश्वराची आठवण होते आणि त्या परमेश्वराची ते पुजा करतात.

मी इतक्या ठिकाणी फिरताना बघितलं की अनेकजण मूर्तिपूजा करताना बघितलंय, पण कोणीही, हे दगडा, मी तुझी पूजा करतो. हे पाषाणा, माझ्यावर दया कर. असं म्हणत नव्हता. त्यांची पुजा किंवा प्रार्थना असते ती त्या मूर्तीच्या रुपानं असलेल्या प्रतिकाच्या मागे उभ्या असलेल्या परमेश्वराची. महाराज आपण लक्षात घ्या, की, प्रत्येक जण प्रार्थना करत असतो ती अखेर त्या विश्वचालक सर्वशक्तिमान प्रभूची. अर्थात हे सारं माझं मत झालं. तुमचं जे काही मत असेल ते तुमचं. त्याबद्दल मी काय बोलू?”

राजे मंगलसिंह अवाक झाले. त्यांनी दोन्ही हात जोडून म्हटले, मूर्तिपूजेकडे कोणत्या दृष्टीने पाहायला हवं याबद्दलचं असं स्पष्टीकरण आजवर मी कधी ऐकलं नव्हतं. आपण माझे डोळे उघडलेत. आपल्या देशावर राज्य गाजवलेलं इंग्लंड, परकीय राज्यकर्ते, त्यांची संस्कृती, त्यांचा ख्रिस्त धर्म याचा त्यावेळच्या सुशिक्षित वर्गावर काय परिणाम होत होता हे स्वामीजींनी कलकत्त्याला असताना अनुभवलं होतं. पण संस्थानिक असलेल्या व्यक्तीवर झालेला परिणाम त्यांना राजे मंगलसिंह यांच्या रूपात पाहायला मिळाला होता.अशा वेगवेगळ्या प्रसंगातून स्वामी विवेकानंदांना अनेक प्रकारची लोकं कळत जात होती. त्यांचा दृष्टिकोन समजत होता. कुठे काय परिस्थिति आहे हे समजत होते. समाज रचनेचा अभ्यास होत होता.

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares