सुश्री अरूणा मुल्हेरकर
विविधा
☆ बंधने… ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆
बंधनात रहाणे कोणाला आवडते? अर्थातच कोणालाच नाही. एखादी गोष्ट करायची नाही असे बंधन आले की तीच गोष्ट करण्याची अगदी आबालवृद्धांची प्रवृत्ती असते. मधुमेह जडण्यापूर्वी माणसाला गोड खाणे आवडतही नसेल कदाचित, परंतु मधुमेहीअवस्था झाली की त्याला गोड खाण्याचीच लालसा होते. कधी कधी तर तो चोरूनही खातो. सांगायचा उद्देश बंधने झुगारणे ही माणसाची मानसिकता आहे. पिंजर्यातला पक्षी फडफड करतो, मग तो पिंजरा सोन्याचा का असेना!साखळीने बांधलेला कुत्रा त्याला सोडविण्यासाठी भुंकून भुंकून त्याच्या धन्याला हैराण करतो. बंध तोडून स्वैर, स्वच्छंद विहार करण्यासाठी प्रत्येकच सजीव आतूर असतो.
ही झाली नाण्याची एक बाजू, परंतु दुसर्या बाजूला जीवन जगताना त्यात शिस्त, नियमन असावेच लागते नाहीतर सर्वत्र सावळा गोंधळ आणि अराजक माजेल.
अगदी पार वेदिक कालात आपण पाहीले तर चातुर्वण्य पद्धतीने समाजाची रचना केली गेली होती. ब्राम्हणांनी यज्ञयाग, जपजाप्य, वेद पठण ह्या गोष्टी करायच्या, क्षत्रियांनी रणांगणावर आपली कामगिरी बजवायची, वैश्यांनी व्यापार करायचा आणि शूद्रांनी नगरात स्वच्छता राखायची. कामांची वाटणी केल्याने समाजात सुख, शांती, समाधान नांदेल हा त्यामागील उद्देश. कोणी उच्च, कोणी नीच ही भावना वर्णाश्रम पद्धति अंमलात आणताना नव्हती.
आजही आपण सर्व आवश्यक ती बंधने पाळून जगत आहोत. विद्यार्थीदशेतील बंधने~वेळेत शाळेत गेले पाहीजे, अभ्यास केला पाहीजे, परीक्षा दिलीच पाहीजे, खेळलेही पाहीजे.
विवाह बंधन, आईमुलांचे नाते, भावंडांतील परस्परांचे नाते, मित्रमंडळींशी नातेही सर्व नाती निभावताना काही ठराविक बंधने पाळणे आवश्यक आहे. लग्नाशिवाय स्त्री~पुरुषाचे एकत्र रहाणे हे आपल्या भारतीय संस्कृतीत बसणारे नाही. संसार हेच कितीतरी मोठे प्रिय बंधन आहे. ही बंधने हसत हसत पाळून आपण कर्तव्य पालन करावे.
वेळेचे बंधन पाळणे ही तर यशाची पहिली पायरी आहे. कोणतेही कार्य करताना नियोजन फार महत्वाचे असते. नियोजन नसेल तर कामात सुसुत्रता निच्छितच रहाणार नाही.
निर्मात्याने मानवाआधी निसर्गनिर्मिती केली. त्या निसर्गाचा आणि आपला फार जवळचा संबंध आहे. निसर्ग आपल्याला आवश्यक असलेला प्राणवायू देतो, अन्न देतो, पाणी देतो, जीवन देतो. निसर्गाचा आणि मानवाचा समतोल त्या विधात्याने राखला आहे. एका आवर्तनाच्या बारा महिन्यात उन्हाळा, पावसाळा आणि हिंवाळा असे तीन मुख्य ऋतू त्या निर्मात्याने तयार केले. किती नियमबद्धता आहे त्यात!माणसाने नंतर त्याचे सहा ऋतू केले. पण वातावरणाचे बंधन पाळल्यामुळेच माणसाचे आरोग्य राखले जाते. त्या विश्वंभराची ही योजना आहे. शिशिरात पानगळ झाली की वसंतात पुन्हा बहर येतो. ऊष्णतेने प्राणीमात्रांची लाही लाही झाली की वर्षा येते आणि सर्वत्र गारवा निर्माण होतो, शुष्क झालेल्या नद्या पुन्हा दुथड्याभरून वाहू लागतात. निसर्गाने माणसाला आयुष्यातले चढउतार दाखवून दिले आहेत.
बंधने जाचक मात्र कधीही नसावीत. आजही रूढी परंपरा याच्या नावाखाली कित्येक स्त्रियांवर अन्याय होताना आपण पहातो. समाजहितासाठी कायदे केले गेले असले तरी त्यांना धाब्यावर बसवून अत्याचार घडत आहेत. हुंडाबळी अजूनही पूर्णपणे थांबलेले नाहीत. स्त्रीभृणहत्येचे प्रमाण कमी झाले असले तरी खेडोपाडी अजूनही त्या होतच आहेत. हे सर्व पूर्णतया थांबावयास हवे.
बंधने हवीतही आणि नकोतही!
© सुश्री अरूणा मुल्हेरकर
डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈