विविधा
☆ तारा…भाग – 4 ☆ सुश्री मिनाक्षी देशमुख ☆
युध्दाचे आव्हान वालीने स्विकारले ती अपवित्र व अशुभ रात्रीची वेळ! वाली युध्दासाठी निघालेला पाहून तारा समोर येऊन म्हणाली, “स्वामी! ही वेळ युध्दासाठी योग्य व चांगली नाही. ही रात्र मायावी आहे. अशा अशुभवेळी न जाता उद्या सकाळी युध्दासाठी निघणे योग्य होईल.”
परंतु वालीने तिचे म्हणणे धुडकावून लावले. संघर्षासाठी तो पेटला असल्यामुळे आता तो थांबू शकत नव्हता. हट्टी वालीला ताराने हरतर्हेने खंप समजावले, पण व्यर्थ!
अखेर धाकटा भाऊ सुग्रीवला युध्दासाठी सोबत घेऊन वाली युध्दभूमीकडे निघाला. वाली व राक्षस मायावी यांच्यामध्ये घनघोर तुंबळ युध्द झाले. वालीचे पारडे जड होताहेसे पाहुन तो भिऊन पळुन गेला. वाली व सुग्रीवने त्याचा पाठलाग केला. मायावी राक्षस दूर जंगलांतील एका गुहेत शिरुन नाहीसा झाला
वाली आणि सुग्रीव गुहेजवळ येऊन गुहेचे निरिक्षण केले. सुग्रीवाला दारावर थांबण्यास सांगुन वाली गुहेत शिरला. सुग्रीव बाहेर अनेक महिने वाट पाहात थांबला. एके दिवशी गुहेतुन मोठमोठे आवाज येऊ लागला. थोड्याच वेळात रक्ताचे पाट वाहत असतांना त्याला दिसले. आपला भाऊ वालीचा वध झाला असावा असे समजुन गुहेचे तोंड बंद करण्यासाठी गुहेच्या तोंडाशी भली मोठी शिळा ठेवुन गुहेचे दार बंद केले आणि अत्यंत दुःखी अंतःकरणाने सुग्रीव राजधानीत परतला.
सुग्रीवाने तिथे घडलेले सारे वृत्तांत ताराला कथन केल्यावर तिच्यावर तर वज्राघातच झाला. डोक्यावर दुःखाचा डोंगरच कोसळला. तिला अतोनात दुःख झाले.
एके दिवशी अचानक एक घटना घडली. वाली परत आला… वालीने मायावी राक्षसाचा वध करुन गुहेबाहेर येण्यासाठी गुहेजवळ आला असतां, गुहेचे तोंड बंद असल्याचे त्याला आढळले. त्याला वाटले सुग्रीवाने मुद्दाम कपट करुन गुहेचे दार बंद करुन वालीला मरण्यासाठी गुहेत कोंडले. वालीला अतिशय संताप आला. मन उद्गिन्न झाले. खुप प्रयत्न करुन गुहेचे दार मोकळे केले व तो बाहेर आला. राज्यात आल्यावर पाहतो तो काय…. सुग्रीव राजा झालेला!
जेव्हा सुग्रीवाने येऊन वालीचा वध झाल्याचे सांगीतले, त्यावेळी तर ती दुःखाने वेडी झाली होती, पण ! लवकरच सावध होऊन आपले दुःख बाजुला सारुन, शेवटी ती राज्याची महाराणी होती ना! राज्याचे हित लक्षात घेऊन व गादी जास्त दिवस रिकामी राहु नये, या उद्देशाने , तारा व सर्व प्रमुख वानर मंत्रीगणांनी मिळुन सुग्रीवास राज्यावर बसविले होते. सुग्रीव वानरांचा राजा व त्याची पत्नि रुमा राणी झाली होती. यांत सुग्रीवाचा कांहीही दोष नव्हता.
परंतु कोपिष्ट व क्रोधी वालीला वाटले, आपले राज्य हडप करण्यासाठीच सुग्रीवाने मुद्दामच मरण्यासाठी गुहेत बंद करण्याचे कपट केले. अशा आततायी समजुतीने, सुग्रीवाचा काटा काढण्याच्या उद्देशाने त्याला ठार मारण्यासाठी त्याच्या मागे लागला. भयभीत होऊन सुग्रीवाने तिथून पळ काढून, वालीच्या शापाचे मतंगवनच सुग्रीवाने आपले आश्रयस्थान बनवले. वाली शापग्रस्त असल्यामुळे तिथे तो जाऊ शकत नव्हता. शेवटी परत येऊन वालीने राज्याचा ताबा घेतला. आणि सुग्रीव पत्नी रुमाला आपल्या अंतःपुरांत ठेवुन घेतले.
क्रमशः…
संकलन – सुश्री मिनाक्षी देशमुख
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈