मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! ☆ सासूचा हॅपी बर्थडे ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? चं म त ग ! 😅

🤣 सासूचा हॅपी बर्थडे ! 😂💃श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

“अगं काय हे सुनबाई ? निदान आज तरी माझ्या चहात साखर घालायलाचीस ! आज काय आहे विसरलीस वाटतं ?”

“माझी अजून तुमच्या सारखी साठी थोडीच झाल्ये विसरायला ?”

“नाही नां, मग ?”

“आई, आज तुमचा एक्सष्टावा  वाढदिवस आहे, हे माझ्या चांगलं लक्षात आहे आणि म्हणून तर रोजच्या अर्ध्या कप चहा ऐवजी तुम्हांला आज चांगला पाऊण कप चहा दिला आहे ! अर्ध्या कप चहावर पाव फ्री ! एंजॉय युअर बर्थ डे !”

“अगं पण सुनबाई मला तर पाव कुठेच दिसत नाही या चहा बरोबर !”

“आई, मला असं म्हणायचंय की रोजच्या अर्धा कप चहावर पाव कप चहा फ्री !”

“पण त्या पाव कप एक्सट्रा चहा ऐवजी, थोडी साखर घातली असतीस आज चहात, तर तुझे हात काय मोडणार होते का गं ?”

“अजिबात नाही आई, पण डायबेटीसमुळे मी तुम्हांला रोज इन्शुलीनच इंजेकशन देते, हे विसरलात वाटतं तुम्ही ?”

“मी बरी विसरेन ! माझ्या सासूबाई होत्या, तेंव्हा मला येता जाता टोचून टोचून बोलायच्या आणि आज माझी सून मला तोंडाने नाही पण इंजेकशनच्या सुईने रोज टोचत्ये ! काय माझं मेलीच नशीब ! मला कोणाला टोचून बोलायचं भाग्यच मिळाल नाही या जन्मात !”

“पण तुम्ही मला अधून मधून जे तीरकस बोलता, ते आणखी काय वेगळं असतं का हॊ आई ?”

“ते जाऊदे, मला सांग निदान आज तरी माझ्या चहात थोडीशी एक दोन चमचे साखर का नाही घातलीस ?

तेवढ्याने का होईना, पण माझ्या आजच्या स्पेशल डेची सुरवात गोड झाली असती !”

” ए sss क  दो sss न चमचे साखर  मी तुमच्या कपात घालायची आणि विलासचा ओरडा खायचा ?”

“अगं त्याला कसं कळेल तू माझ्या  चहात साखर घातल्येस ते ? ती तर विरघळून जाणार नां कपात !”

“ते जरी खरं असलं, तरी माझ्या मनांत ते कसं राहील आई ? आपल्या बायकांची जीभ पोटात कमी आणि ओठात जास्त ठेवते, हे, मी का तुम्हांला सांगायला हवं ?”

“म्हणजे तुला काय म्हणायचं आहे सुनबाई ? माझ्या पोटात काही रहात नाही म्हणून ?”

“मी तुमच्या पोटात असं कुठे म्हटलं ? एकंदरीत बायकांच्या बाबतीत एक जनरल स्टेटमेंट केलं इतकंच !”

“पुरे झालं तुझं पोटात आणि ओठात ! मला सांग आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने काय सरप्राईज देणार आहात तुम्ही सगळे ?”

“बघा, स्वतःच म्हणता सरप्राईज आणि वर विचारता पण कसलं सरप्राईज म्हणून ?”

“अगं सांग गपचूप तू मला ते सरप्राईज. ते मिळाल्यावर मी चकित झाल्याचा अभिनय नक्की करीन, तू अजिबात काळजी करू नकोस !”

“बघा हं, नाहीतर मला तोंडघाशी पाडालं.”

“तू काळजीच करू नकोस सुनबाई, कसा मस्त अभिनय करते बघ संध्याकाळी ! हां आता सांग काय सरप्राईज आहे ते !”

“आजच्या तुमच्या एकसष्टीच्या निमित्त, या वर्षीच्या तुमच्या बर्थडे केकवर ६१ मेणबत्या लावायचं आम्ही ठरवलंय आणि तो केक दरवर्षी सारखा शुगरलेस नसणार ! काय, कसं वाटलं आमचं सरप्राईज ?”

“चुलीत घाला त्या सरप्राईजला !”

“म्हणजे काय आई, आवडलं नाही का  सरप्राईज ?”

“अगं त्यातली एकच गोष्ट बरी आहे म्हणायची !”

“कोणती ?”

“या वेळचा केक शुगरलेस नसणार आहे, ती !”

“मग झालं तर !”

“अगं हॊ, पण त्या केकवरच्या ६१ मेणबत्या फुकर मारून विझवता विझवता माझा म्हातारीचा जीव जाईल त्याच काय ?”

“अहो आई तुम्हीं अजिबात काळजी करू नका त्याची, आम्ही सगळे तुम्हांला मदत करू नां त्या मेणबत्या विझवायला !”

“नकोच ती भानगड सुनबाई ! त्या पेक्षा तुम्हीं या वर्षी माझी तुला करा !”

“हां ही आयडिया पण छान आहे, मी सुचवते विलासला तसं. पण कशानं करायची तुला तुमची ?”

“अगं सोप्प आहे, ६१ किलो वजनाची मिठाई सगळ्या सोसायटीत वाटून टाका, म्हणजे झालं !”

“अहो पण आई, तुला म्हणजे वजन काट्याच्या एका पारड्यात तुम्हीं बसणार आणि दुसऱ्या पारड्यात तुमच्या वजना इतकी मिठाई तोलायची बरोबर नां ?”

“हॊ बरोबर !”

“पण मग ते कसं जमणार आई ?”

“का, न जमायला काय झालं?”

“अहो आई तुमचं वजन आहे ८५ किलोच्या आसपास आणि मिठाई तोलायची ६१ किलो ! हे गणित काही जुळत नाही ! शिवाय एवढा मोठा वजन काटा आपल्याला फक्त लाकडाच्या वाखारीतच मिळेल आणि अशी लाकडाची वखार आता मुंबईत शोधायची म्हणजे…… “

“सुनबाई कळली बरं तुझी अक्कल आणि तुझं गणित पक्क आहे ते !”

“आहेच मुळी! मग आई आता कसं करायच म्हणता तुमच्या वाढदिवसाचं ?”

“काही नाही, माझ्या बाबुला म्हणजे तुझ्या नवऱ्याला फोन कर आणि सांग  या वेळचा केक पण शुगरलेसच आण हॊ आणि त्यावर एकही मेणबत्ती नको म्हणावं !”

© प्रमोद वामन वर्तक

२२-०७-२०२२

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तारा…भाग – 5 आणि 6 ☆ सुश्री मिनाक्षी देशमुख ☆

? विविधा ?

☆ तारा…भाग – 5 आणि 6 ☆ सुश्री मिनाक्षी देशमुख ☆

भाग – ५

वालीचे अन्यायाचे वागणे पाहुन, तारा वालीला म्हणाली, “स्वामी! मतंगऋषींचा शाप आधीच डोक्यावर आहे, त्यात पतिव्रता रुमाचा शाप कां घेता? या मोठ्या पापातून सुटका होऊ शकणारा नाही. हा अविचार सोडून द्या.” पण वालीला ऐकायचे नव्हते, ऐकलेच नाही त्याने. विनाश काले विपरीत बुध्दी..

तारा ही अत्यंत सुंदर, गुणी स्त्री होती. वालीमधील शौर्य, पराक्रम, धाडस अशा त्याच्या अनेक चांगल्या गुणांवर लुब्ध होती. त्याच्यातील गुणांची तिला पारख होती. त्याबद्दल तिला अत्यंत सार्थ अभिमानसुध्दा वाटत असे. परंतु वालीचा आत्यंतिक संतापी, हेकट, अन्यायी, दुर्गुणाकडे कल असणार्याद स्वभावाने तिच्या मनाला सतत काळजी वाटे.  हे सर्व पाहुन तिच्या मनांत विचार आला, ‘सुग्रीवाला अधीक दुःख कशाचं झालं? राज्य गमावल्याचं की, पत्नी गमावल्याचं? रुमाच्या बाबतीत ते घडल! शेवटी दुर्दशा भोगावी लागते स्त्रीजातीलाच ना?

राक्षसांचा सम्राट लंकाधीश रावणाने सर्व  राजांना जिंकण्याच्या महत्वाकांक्षेने प्रत्यक्ष देवराज इंद्रावर स्वारी केली. त्याच्या मुलाने, मेघनादने इंद्राला जिंकले. सर्व राजांना जिंकण्याच्या अभिलाषेने वालीवर देखील आक्रमण केले. पण वालीचा पराक्रम व अतुल ताकद, युध्दकौशल्य एवढे जबरदस्त होते की, रावणाला शस्त्र खाली ठेवुन त्याला शरण जाऊन शस्त्र खाली ठेवावे लागले.

रावणासारख्या बलाढ्य व प्रबळ शत्रुला देखील नमवून आपला पती वालीने त्याला शरण येण्यास भाग पाडले याबद्दल ताराच्या मनांत नितांत, आदर व कौतुक होते आणि म्हणूनच त्याच्या गुणांचे चीज व्हावे, तो सन्मार्गावर यावा यासाठी ती सतत प्रयत्नशील असायची पण यश तिच्यापासुन नेहमीच दूर पळत असे. वाली तिचे कांहीच ऐकत नसे आणि आपल्या हेकट, दुराग्रही स्वभावात बादल करत नसे.

एकदा तारा आपल्या महालांत निवांत बसली असता तिचा पुत्र अंगद येऊन सांगू लागला की, “तो मित्रांसोबत मतंगवनाच्या आजुबाजुला हिंडत असतांना त्रृषमूक पर्वतावर सुग्रीव काका दिसलेत. त्यांच्या मागे वीर हनुमान उभे असुन दोन सुंदर तेजस्वी राजकुमार त्यांच्याशी अत्यंत प्रेमाने गप्पा मारतांना दिसले. गुप्तहेरांकरवी चौकशी केली असतां दोन राजकुमार म्हणजे प्रत्यक्ष अयोध्या नरेश दशरथ यांचे दोन सुपुत्र असल्याचे कळले.       

श्रीरामाची पत्नी सीताचे हरण करुन लंकाधीशपती सम्राट रावणाने तिला लंकेत नेऊन ठेवले आहे.  तिच्या शोधार्थ हे दोन वीर हिंडत हिंडत तिथे आलेत. त्यांची सुग्रीव काकांशी मैत्री होऊन दोघांनी परस्परांना मदत करण्यासाठी अग्निसमोर आणाभाका, शपथ घेऊन वचनबध्द झालेत.

भाग – ६

श्रीराम-सुग्रीवाची युती झाल्याचे वृत्त ताराने ऐकले मात्र ती अतिशय संचित झाली. अंगदला म्हणाली, “अंगदा! तुझ्या वडलांना अनेक वेळा परोपरीने विनवून सांगीतले की, रुमादेवीला सुग्रीवाकडे पाठवुन द्यावे, परस्त्रीचे अपहरण करणे, तिची अभिलाषा धरणे फार मोठे पाप आहे. अशा पापाचे घोर प्रायश्चित्त भोगावेच लागेल. पण हटवादी स्वभावामुळे माझ्या बोलण्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले.”

अंगद म्हणाला, “आई! श्रीराम देवासमान सुंदर, दयाळू, करुणामयी वाटतात.” ती म्हणाली, “श्रीरामाबद्दल सर्व माहित आहे मला.  श्रीराम हे आर्त, दुःखी जणांचे आश्रयदाते आहेत. ते यशस्वी, ज्ञानविज्ञान संपन्न, पित्याच्या आज्ञेत राहणारे आहेत.  हिमालय ज्याप्रमाणे अनेक रत्नांची खाण आहे, त्याप्रमाणे श्रीराम अनेक गुणांची खाण आहेत. असे श्रीराम सुग्रीवाचे झाले तर…. तुझ्या पित्याचा भविष्यकाळ फार गंभीर  आहे. भविष्यातील संकटाची चाहुल लागत आहे.”

तारा अतिशय विकल मनःस्थीतीत अंगदाला म्हणाली, “अंगदा! तुझ्या वडिलांमधे अनेक सद्गुण असून ते फार पराक्रमी, शूर, धाडसी आहेत. ते वानराचे राज्य उत्तम रितीने चालवत आहेत म्हणूनच आज ते सर्व वानरांचे सम्राट आहेत. परंतु त्याचबरोबर त्यांनी कांही नीतिनियम पाळले असते, कांही धर्म मर्यादा मानल्या असत्या, तर त्यांच्यासारखा पुरुषोत्तम दुसरा कुणी नसता आणि माझ्या सारखी भाग्यवान स्त्री  त्रिभुवनात दुसरी कुणी नसती! परंतु  विधिलिखीत कुणाला टळले आहे? मातंग ऋषींचा अपमान व शाप, रुमासारख्या पतिव्रतेचा छळ, तिचा तळतळाट, माझ्या संसारसुखा भोवती एखाद्या काळसर्पाप्रमाणे वेटोळे घालुन बसला आहेसे वाटत आहे…..

सुग्रीवाने आपली अत्यंत करूणामय कर्मकहाणी श्रीरामांना सांगून म्हणाला, “हे प्रभु! तुझी पत्नी रावणाने पळवली आणि माझी पत्नी माझ्या मोठ्या भावाने वालीने! शिवाय राज्यातुन निष्कसित केले. माझी अवस्था दोर तुटलेल्या पतंगासारखी झालेली आहे.” श्रीरामाने सुग्रीवाला आश्वस्त केले. दोघांनी एकमेकांना मदत, सहाय्य करण्याच्या आणाभाका घेऊन आपापल्या समस्या सोडविण्याचे ठरविले.

सुग्रीव रामाला म्हणाला, “वाली भयंकर कोपिष्ट, शिघ्रकोपी, हट्टी व बलाढ्य आहे. त्याचा उच्छेद झाल्याशिवाय माझा मार्ग निष्कंटक होऊ शकणार नाही. तो सुखाने जगू देणार नाही.”

ताराला मिळत असलेल्या भविष्यातील घटनेच्या भाकिताप्रमाणे ती काळरात्र आलीच. रामाने द्वंद्व युध्दासाठी वालीला आव्हान द्यायला सुग्रीवाला सांगीतले. रामाच्या आज्ञेनुसार एका रात्री सुग्रीव किष्किंधेच्या परिसरांत येऊन दंड थोपटून मोठमोठ्याने आरोळ्या ठोकत, सिंहनाद करत वालीला आव्हान देऊ लागला. यावेळी वाली ताराबरोबर अंतःपुरात होता. सुग्रीवाचा आव्हानात्मक आवाज ऐकुन प्रथम तर त्याला अतिशय आश्चर्य वाटले. सुग्रीव सारखी साधी, सालस, व्यक्ती युध्दाचे आव्हान देते, हेच मुळी त्याला खरे वाटत नव्हते. नंतर तो अत्यंत संतप्त होऊन, धडा शिकवण्याच्या निश्चयाने सुग्रीवाचे आव्हान स्विकारण्यासाठी अंतःपुरांतुन बाहेर येऊ लागला.

संकलन – सुश्री मिनाक्षी देशमुख   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अवघा रंग एक झाला – भाग १ – अज्ञात ☆ संग्राहिका: सुश्री प्रतिमा जोशी ☆

? जीवनरंग ❤️

☆ अवघा रंग एक झाला – भाग १ – अज्ञात ☆ संग्राहिका: सुश्री प्रतिमा जोशी ☆

‘माई मी निघते, पोळी भाजी करून ठेवली आहे, दुपारी मावशी येतील, त्यांना वरण भाताचा कुकर लावायला सांगा, रात्रीचं मी बघेन आल्यावर…’

माई मख्ख चेहेऱ्याने अनुजाच्या सुचना ऐकत होत्या. त्यांच्या चेहेऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती, म्हणजे आजपण दिवसभर त्या एकट्याच असणार. नात काय शाळेतून आली की जेवेल आणि क्लासला जाईल. तिथून आली की खेळायला मैत्रिणीकडे पळेल.

अनुजाचं त्यांच्या कडे लक्ष गेलं.

काय झालं माई ? नाराज आहात का ? कसला राग आलाय का ?माझं काही चुकलंय का ?”

‘तुझं काही चुकलं नाहीये ग बाई, माझंच चुकलंय. मीच एक अडगळ होऊन राहिले आहे  तुमच्या घरात…” बोलता बोलता त्यांचा कंठ दाटून आला.

आज काहीतरी वेगळाच नूर दिसतोय माईंचा, त्या सहसा असा त्रागा करत नाहीत. अनुजाने पर्स खाली ठेवली त्यांच्या जवळ बसत तिने विचारलं,

‘काय झालं माई ? मनात काय असेल ते बोलून मोकळ्या व्हा म्हणजे तुम्हाला हलकं वाटेल’.

माईंनी एकदा अनुजाकडे बघितले, तिच्या आवाजात, नजरेत आर्जव होतं, त्यांना एकदम अपराधी वाटलं. खरं तर त्यांना तक्रार करायला काही जागा नव्हती. घरात सगळ्या सोयी होत्या, मुलगा, सून, नात सगळी त्यांच्याशी नीट वागत होती. त्यांचं औषधपाणी, व्यवस्थित होत होतं. फक्त प्रश्न होता तो त्यांच्या समोर अजगरासारख्या पसरलेल्या वेळेचा…

“कंटाळा येतो गं दिवसभर, काही काम न धाम, टिव्ही बघितला की डोकं दुखतं, तुम्ही सगळी आपापल्या व्यापात…. दिवस खायला उठतो बघ… पण हे बघ तुम्हा कोणाची काही चूक नाहीये…. तुम्ही माझं सगळं व्यवस्थित करता… ‘सुख दुखतं’ म्हणतात ना तसं झालंय माझं…

अनुजा जरा विचारात पडली. मग म्हणाली, “तुम्हाला वाती करायला जमतील का ?

“हो… बोटं दुखतात त्याने सुद्धा… पण थांबून थांबून करीन.”

“ठीक आहे, मी कापूस आणून ठेवीन तुम्हाला कंटाळा आला की तुम्ही वाती करत जा.”

अनुजा लहान मुलीची समजूत काढावी तशी बोलत होती. माईंनी मान डोलावली तशी अनुजा म्हणाली,

“निघू मग मी आता ? रात्री लवकर येते….”

अनुजा गेली आणि त्या घरात एकट्याच उरल्या….इतक्यात बेल वाजली….

त्यांनी दार उघडलं…. खालच्या वाण्याच्या दुकानातला मुलगा कापूस घेऊन आला होता.

अनुजाच्या तत्परतेचं त्यांना कौतुक वाटलं… त्यांनी पिशवी टेबलावर ठेवली जेवण झाल्यावर त्यांनी  पिशवीतून कापूस पुढे काढला… तो फुटबॉल एवढा गोळा बघून माईंना हसूच फुटलं… एवढ्या कापसाच्या हजार-दीड हजार वाती होतील… आणि घरात वर्षात एखादं दुसऱ्या वेळी निरांजन लावलं जातं… काय उपयोग इतक्या वाती करून ?

विचार मागे सारत त्यांनी वाती वळायला सुरवात केली. इतक्यात ऋत्विका तिथे आली.    ‘आजी मी पण करू ? नको तुला नाही जमणार.

“तू शिकवं ना मला.”

त्या दाखवतील त्याप्रमाणे ऋत्विका पण प्रयत्न करू लागली आणि विशेष म्हणजे तिला जमायलाही लागल्या

तिने केलेल्या वाती माई थोड्या सुधारून घेत होत्या….पुढचे दहा बारा दिवस माईंना एक उद्योगच झाला. वाती वळण्याचा… पण वेळही चांगला जात होता… वैषम्य एवढंच होतं की, एवढ्या वातींपैकी चार वातीसुद्धा घरात वापरल्या जाणार नव्हत्या…

एवढी कशी अश्रद्ध माणसं ? एकही परंपरा पाळावी असे वाटू नये यांना ?

अनुजा रोज सकाळी बाहेर पडत असे ती संध्याकाळीच परते…. आज तर सात वाजून गेले तरी अनुजाचा पत्ता नव्हता… शेवटी ७.३० ला आली… खूप थकलेली वाटत होती, हातात कसली तरी गुंडाळी होती…आल्या आल्या तिने माईंना हाक मारली…

माई आल्या… अनुजाने गुंडाळी उलगडली… आणि…. माईंच्या अंगावर काटा उभा राहिला… ते विठ्ठलाचे चित्र होते… मूर्तिमंत  पांडुरंग. त्यांच्या कडे फ्रेम होती… अगदी तसाच विठोबा रेखाटला होता… वत्सल, आश्वासक… माईंचे हात जोडले गेले.  स्वतःच्याही नकळत….

कोणी काढलं हे चित्र ? भानावर येत माईंनी विचारलं….

माई तुम्ही ऐकून थक्क व्हाल, हे चित्र करुणा नांवाच्या एका अनाथ, दिव्यांग मुलीने काढलंय… तिला दोन्ही हात नाहीयेत… पायाने काढलंय तिने हे चित्रं… तिलाच चित्र काढायला शिकवायला जात होते पंधरा दिवस…

“अगं किती सुरेख चित्र काढलंय… आपल्याकडे एक तसबीर होती पांडुरंगाची… अगदी हुबेहूब तसंच चित्र आहे.”

“अगदी बरोबर, कारण त्या फ्रेम वरूनच तिने हे चित्र काढलंय… मीच नेली होती तिला दाखवायला…  तिने काढलेल्या ह्या चित्राला स्पर्धेत पाहिलं बक्षीस मिळालं…

“आता ह्या चित्राचं काय करणार ?”

“काही नाही… खास तुम्हाला दाखवायला आणलंय.”

‘मी काय म्हणते हे चित्र आपण सोसायटीच्या लॉबी मध्ये लावूया, बाजूला चित्र कोणी काढलं त्याची माहितीही लिहू… नाहीतरी उद्या एकादशी आहे…’

“अरे वा ही आयडिया माझ्या डोक्यातच नाही आली…..फक्त सेक्रेटरींची परवानगी घेऊ म्हणजे झालं.”

झालं… सगळे कामाला लागले आणि चित्र खाली लागलं… बाजूला करुणाची माहिती… आणि बाजूला एक वही ठेवली… त्यात अभिप्राय लिहायचे होते…

क्रमश:…

लेखक – अज्ञात   

संग्राहिका – सुश्री प्रतिमा जोशी– संवादिनी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तारा…भाग – 4 ☆ सुश्री मिनाक्षी देशमुख ☆

? विविधा ?

☆ तारा…भाग – 4 ☆ सुश्री मिनाक्षी देशमुख ☆

युध्दाचे आव्हान वालीने स्विकारले ती  अपवित्र व अशुभ रात्रीची वेळ! वाली युध्दासाठी निघालेला पाहून तारा समोर येऊन म्हणाली, “स्वामी! ही वेळ युध्दासाठी योग्य व चांगली नाही. ही रात्र मायावी आहे. अशा अशुभवेळी न जाता उद्या सकाळी  युध्दासाठी निघणे योग्य होईल.”

परंतु वालीने  तिचे म्हणणे धुडकावून लावले. संघर्षासाठी तो पेटला असल्यामुळे आता तो थांबू शकत नव्हता. हट्टी वालीला ताराने हरतर्‍हेने खंप समजावले, पण व्यर्थ!

अखेर धाकटा भाऊ सुग्रीवला युध्दासाठी सोबत घेऊन वाली युध्दभूमीकडे निघाला. वाली व राक्षस मायावी यांच्यामध्ये घनघोर तुंबळ युध्द झाले. वालीचे पारडे जड होताहेसे पाहुन तो भिऊन पळुन गेला. वाली व सुग्रीवने त्याचा पाठलाग केला. मायावी राक्षस दूर जंगलांतील एका गुहेत शिरुन नाहीसा झाला

वाली आणि सुग्रीव गुहेजवळ  येऊन गुहेचे निरिक्षण केले. सुग्रीवाला दारावर थांबण्यास सांगुन वाली गुहेत शिरला. सुग्रीव बाहेर अनेक महिने वाट पाहात थांबला. एके दिवशी गुहेतुन मोठमोठे आवाज येऊ लागला. थोड्याच वेळात रक्ताचे पाट वाहत असतांना त्याला दिसले. आपला भाऊ वालीचा वध झाला असावा असे समजुन गुहेचे तोंड बंद करण्यासाठी  गुहेच्या तोंडाशी भली मोठी शिळा ठेवुन गुहेचे दार बंद केले आणि अत्यंत दुःखी अंतःकरणाने सुग्रीव राजधानीत परतला.

सुग्रीवाने तिथे घडलेले सारे वृत्तांत ताराला कथन केल्यावर तिच्यावर तर वज्राघातच झाला. डोक्यावर दुःखाचा डोंगरच कोसळला. तिला अतोनात दुःख झाले.

एके दिवशी अचानक एक घटना घडली. वाली परत आला… वालीने मायावी राक्षसाचा वध करुन गुहेबाहेर येण्यासाठी गुहेजवळ आला असतां, गुहेचे तोंड बंद असल्याचे त्याला आढळले. त्याला वाटले सुग्रीवाने मुद्दाम कपट करुन गुहेचे दार बंद करुन वालीला मरण्यासाठी गुहेत कोंडले. वालीला अतिशय संताप आला. मन उद्गिन्न झाले. खुप प्रयत्न करुन गुहेचे दार  मोकळे केले व तो बाहेर आला. राज्यात आल्यावर पाहतो तो काय…. सुग्रीव राजा झालेला!

जेव्हा सुग्रीवाने येऊन वालीचा वध झाल्याचे सांगीतले, त्यावेळी तर ती दुःखाने वेडी झाली होती, पण ! लवकरच सावध होऊन आपले दुःख बाजुला सारुन, शेवटी ती राज्याची महाराणी होती ना!  राज्याचे हित लक्षात घेऊन व गादी जास्त दिवस रिकामी राहु नये, या उद्देशाने , तारा व सर्व प्रमुख वानर मंत्रीगणांनी मिळुन सुग्रीवास राज्यावर बसविले होते. सुग्रीव वानरांचा राजा व त्याची पत्नि रुमा राणी झाली होती. यांत सुग्रीवाचा कांहीही दोष नव्हता.

परंतु कोपिष्ट व क्रोधी वालीला वाटले, आपले राज्य हडप करण्यासाठीच सुग्रीवाने मुद्दामच  मरण्यासाठी गुहेत बंद करण्याचे कपट केले. अशा आततायी समजुतीने, सुग्रीवाचा काटा काढण्याच्या उद्देशाने त्याला ठार मारण्यासाठी त्याच्या मागे लागला. भयभीत होऊन सुग्रीवाने तिथून पळ काढून, वालीच्या शापाचे मतंगवनच सुग्रीवाने आपले आश्रयस्थान बनवले. वाली शापग्रस्त असल्यामुळे तिथे तो जाऊ शकत नव्हता. शेवटी परत येऊन वालीने राज्याचा ताबा घेतला. आणि सुग्रीव पत्नी रुमाला आपल्या अंतःपुरांत ठेवुन घेतले.

क्रमशः…

संकलन – सुश्री मिनाक्षी देशमुख   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग 26 – परिव्राजक –४. हिमालयाच्या वाटेवर ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग 26 – परिव्राजक –४. हिमालयाच्या वाटेवर ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

आज आपले ओळखपत्र/आय डी प्रुफ, सगळीकडे दाखवावे लागते. ती एक सिक्युरिटी चेक सिस्टिम आहे.यावरून तुम्ही कोण आहात? कुठले आहात? कुठून कुठे चालला आहात? असे कुठे विचारले तर राग यायचे काहीच कारण नाही. आपल्याच देशात आपल्याच सुरक्षिततेसाठी हे आहे. प्रवास करतांना किंवा पर्यटनाला जातांना आधार कार्ड, पासपोर्ट, पॅन कार्ड,ड्रायविंग लायसन्स नाहीतर अगदीच इलेक्ट्रिक बिल्ल इत्यादी आपल्याला दाखवावे लागते. पण अशी पद्धत आजची नवी नाही. स्वामी विवेकानंदांना अमेरिकेत शिकागोला गेले तेंव्हा ही परिचय पत्र न्यावे लागले होते बरोबर आणि ते भारतात सुद्धा फिरले तेंव्हाही व्यवस्थे साठी ज्यांच्या कडे जायचे त्यांना कोणाचे तरी ओळखपत्र घेऊन जावे लागत होते.

हिमालयात भ्रमणासाठी जातांना ते आधी हिमालय ते तिबेट असा प्रवास करणार होते. त्यामुळे नेपाळ मध्ये असलेल्या आपल्या मित्राचे रीतसर परिचय पत्र घेऊन जायचे म्हणजे तिबेट मध्ये प्रवेश मिळण्यात अडचण येणार नाही.कारण अखंडानंदांना तशी एकदा अडचण आली होती. पण काही कारणामुळे हा मार्ग  बदलून त्यांनी अल्मोरा मार्गाने जायचे ठरवले. पहिला मुक्काम भागलपूर मध्ये झाला.  

भागलपुर मध्ये पोहोचल्यावर थकले भागलेले स्वामीजी व अखंडांनंद गंगेच्या काठी उभे होते. शेजारीच राजा शिवचन्द्र यांचे निवास होते. तेजस्वी संन्याशांकडे तिथले एक प्रतिष्ठित कुमार नित्यानंद सिंग यांचे लक्ष गेले. त्यांनी ती रात्र दोघांना घरी ठेऊन घेतले आणि दुसऱ्या दिवशी त्यांना बाबू मन्मथनाथ यांच्याकडे घेऊन गेले. त्यांना वाटले असतील कोणी साधूबैरागी त्यामुळे फार लक्ष दिलं नाही. आणि जेवणं झाल्यावर बौद्ध धर्मावरील इंग्रजीतल पुस्तक वाचत बसले. स्वामीजींनी विचारले की, कोणतं पुस्तक वाचताहात? मन्मथबाबूंनी नाव सांगून विचारलं तुम्हाला इंग्रजी येतं का? स्वामीजी म्हणाले थोडंफार येतं. यानंतर जो संवाद झाला त्यात स्वामीजींनी बौद्ध धर्मावर चर्चा करतांना अनेक इंग्रजी ग्रंथांचे संदर्भ दिले. मन्मथबाबू  चकित झाले. त्यांच्या लक्षात आलं हा तरुण संन्यासी आपल्यापेक्षा हजार पटींनी हुशार आहे.

आणखी एक दिवस, योगसाधनेवर चर्चा झाली. यावर स्वामीजींनी व्यक्त केलेले विचार मन्मथबाबूंनी यापूर्वी आर्य समाजाच्या स्वामी दयानन्द सरस्वतीं कडून ऐकलेल्या विचारांशी मिळतेजुळते होते. पण यावेळी अजूनही नवीन ऐकायला मिळाले त्यांना. त्यानंतर त्यांनी उपनिषदांचा विषय काढला. स्वत:जवळची उपनिषदावरची पुस्तके समोर ठेवली आणि त्यातील एकेक वचने काढून अर्थ विचारू लागले. स्वामीजींनी दिलेल्या उत्तरामुळे मन्मथबाबू चकितच झाले. स्वामीजींची तर याबाबत मोठी तपस्या आणि साधना होती हे त्यांना माहिती नव्हते.

एकदा स्वामीजी असेच गुणगुणत होते. बाबूंनी लगेच विचारलं तुम्हाला गाणं येतं का? स्वामीजी उत्तरले,” अगदी थोडंफार येतं.” बाबूंनी आग्रह केल्यामुळे स्वामीजींनी काही गीतं म्हटली. बाबू आश्चर्याने स्तिमित झाले. अरे या संन्याशाला जितकं गहन शास्त्राचं ज्ञान आहे तितकाच संगीतासारख्या कलेवर सुद्धा त्यांचं प्रभुत्व आहे . झालं दुसऱ्याच दिवशी मन्मथबाबूंनी भागलपुर मधल्या संगीतप्रेमींना घरी बोलवलं. त्यात काही संगीत उस्ताद पण होते. रात्री नऊ पर्यन्त कार्यक्रम संपेल असे त्यांना वाटले. पण संगीत श्रवणाच्या आनंदात कोणाला जेवणाखाण्याचे व वेळेचे भान नव्हते उरले. रात्री दोन वाजता कार्यक्रम संपला. सर्वजण तिथेच थांबले आणि दुसऱ्या दिवशी गेले. केवळ आठ दिवसाच्या वास्तव्यात स्वामीजींचे निरासक्त, निसंग, वैराग्यशीलता ,विनम्रता हे विशेष गुण आणि त्यांचे,चर्चांमधून, प्रतिक्रियातून आणि काही प्रसंगातून विविधरंगी आणि समृद्ध व्यक्तिमत्व आपल्याला दिसतं.

एव्हढ्याशा काळातल्या अनुभवावरून मन्मथबाबूंच्या मनावर स्वामीजींच्या व्यक्तिमत्वाचा खोलवर ठसा उमटला. खरं म्हणजे ते कट्टर ब्राह्मसमाजी होते. पण या काळात ते आतून बाहेरून पूर्ण बदलले आणि पुन्हा हिंदू धर्माचे चाहते झाले. एव्हढे की पुढे आयुष्यभर दोघांचाही खर्च स्वत: करून स्वामीजींच्या सहवासात वृंदावनला कायमचे राहण्यास तयार झाले. पण स्वामीजींनी त्याला नम्रतेने नकार दिला. इथल्या नाथनगरमध्ये असलेल्या जैन मंदिराला स्वामीजींनी भेट दिली. तिथल्या जैन आचार्यांशी जैन तत्वज्ञानवर चर्चा केली. मन्मथबाबूंकडे राहणारे मथुरानाथ सिन्हा म्हणतात की, ” धर्म आणि तत्वज्ञान यावर झालेल्या चर्चेतून ज्ञान आणि अध्यात्मिकता  हे जणू स्वामीजींचे श्वासोच्छवास आहेत आणि त्यांच्या सर्व विवेचनात उत्कट आणि नि:स्वार्थी देशप्रेमाची भावना आहे.

मन्मथबाबू आपल्याला सोडत नाहीत असे पाहून स्वामीजींनी ते घरात नसताना जाण्याचे ठरवले तेंव्हा, बाबू घरी आल्यावर ते पाहून अस्वस्थ झाले आणि लगेच त्यांच्या मागोमाग त्यांना गाठायला निघाले. पण स्वामीजी हिमालयात अल्मोऱ्या पर्यन्त गेले होते. हे ऐकून ते अल्मोऱ्या पर्यन्त गेले तरीही स्वामीजींना ते गाठू शकले नाहीत. शेवटी निराश होऊन मन्मथबाबू भागलपुरला परत आले. स्वामींजीच्या आठवड्याच्या सहवासातून मन्मथबाबूंसारख्या थोडी आध्यात्मिक संवेदनशीलता असलेल्या सुशिक्षित व्यक्तीवर केव्हढा प्रभाव पडला होता याच हे बोलकं उदाहरण आहे. जे स्वामीजींना भेटत ते त्यांचेच होऊन जात.

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तारा…भाग – 3 ☆ सुश्री मिनाक्षी देशमुख ☆

? विविधा ?

☆ तारा…भाग -3 ☆ सुश्री मिनाक्षी देशमुख ☆

तारा आपला पती वालीच्या पराक्रमावर लुब्ध होती. त्याच्या पराक्रमाचा सार्थ अभिमान होता तिला. परंतू त्याच्या  अत्याचारी, आततायी, अत्यंत क्रोधीत असलेल्या स्वभावाबद्दल ती सदैव कुंठीत असायची. त्याच्या अशा स्वभावाला आवर घालण्याचा सतत प्रयत्न करीत असे. परोपरीने, अनेक प्रकारे त्याला समजावीत असे. परंतू तो अहंकार, गर्वाने चूर असल्यामूळे तिचे तळमळीचे सांगणे धुडकावून लावत असे. त्यामुळे ती सतत मनोमन दुःखी राहत असे.

वास्तविक सुषेन राजाची कन्या तारा अत्यंत बुध्दीमान असून तिला अनेक विषयांचे सूक्ष्म ज्ञान होते. निसर्ग व मानवी जीवनांत भविष्यात होणारे अनेक उत्पात, येणारी संकटे याची पूर्व चाहुल तिला नेहमीच लागत असे. तिच्यातील आंतरीक शक्तीच्या या चिन्हांची ओळख ठेवण्यात ती अतिशय निपुण होती. परंतू तिच्यातील या अलौकीक गुणांची वालीने कधीच कदर ठेवली नाही. तो स्वतःच्याच मस्तीत जगत होता. दुसर्‍यांना तुच्छ लेखण्यातच धन्यता मानत होता.

मतंगत्रृषींची शापवाणी ऐकून वालीचे सर्व मित्र त्या आश्रमांतुन भिऊन काष्किंधनगरीत पळून आले. वाली व ताराने भिऊन पळून येण्याचे कारण  विचारल्यावर त्यांनी तिथे घडलेली सर्व सविस्तर हकीकत सांगितली.

वाली चिंतामग्न झाला. तारा तर फारच दुःखी व चिंतामग्न झाली. ती वालीला म्हणाली, “स्वामी! आपण फार मोठा पराक्रम केला खरा! पण अविचाराने ही जी घटना घडली ती अशुभसूचक वाटत आहे. मतंग त्रृषीसारख्या श्रेष्ठ व महान तपस्याकडून हा शाप मिळणे म्हणजे आपल्यावर आलेली फार मोठी इष्टापत्ती आहे.” ताराला दुःख अनिवार होऊन अगदी ओक्साबोक्सी रडू लागली.

ताराच्या सांगण्याचा परिणाम की, भविष्यात घडणार्‍या भिषण घटनेच्या नांदीची कल्पना आली असेल म्हणून असेल, वाली स्वतः मतंगत्रृषीकडे क्षमा मागण्यासाठी गेला.पण त्याचे दैवच फिरले असल्याने की काय, मतंगत्रृषींनी त्याच्याकडे ढुंकुनही न पाहतांच पाठ फिरवून आश्रमाकडे निघून गेले.

वाली हताश होऊन निराश मनाने परतला. तारा मात्र भविष्यात येणार्‍या भीषण, अनिष्ट संकटाच्या भितीने फार उदास झाली.

दुदुंभीचा मुलगा मायावी राक्षस वडीलांच्या वधामुळे सूडाने पेटून उठला. वडीलांचा सूड घेण्यासाठी मायावी एका मध्यरात्री किष्किंधा नगरीच्या दाराशी येऊन मोठमोठ्याने ओरडत वालीला युध्दासाठी आव्हान करु लागला. साहसी व पराक्रमी वालीने मायावीचे आव्हान स्विकारले.

क्रमशः…

संकलन – सुश्री मिनाक्षी देशमुख   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आईचे दूध बाळाच्या हक्काचे ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ आईचे दूध बाळाच्या हक्काचे ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

अनेक संतांनी, जवळ जवळ सर्वच संतांनी म्हटले तरी चालेल, पशुपक्षी, प्राणी, वनस्पती या सर्वांवर प्रेम करायला त्यांनी शिकविले. प्रत्येक प्राण्याला भुके पासून मुक्त करण्याचा संदेश दिला. माणसाची असो वा प्राणी-पक्ष्यांची, आई ही आईच असते. तिची जागा नाही कोणी घेऊ शकत. आपल्या बाळा प्रति कोणत्याही संकटांना सामोरे जायला तयार असते.

सातारा शहरातील घटना. “ॲनिमल राहत” या प्राणी कल्याणकारी संस्थेचे कार्यकर्ते शहरातून फेरफटका मारत असताना त्यांना एक हृदयद्रावक चित्र दिसले. एक गाय आपल्या वासराला दूध पाजण्याचा प्रयत्न करत होती. प्रेमाने पुन्हापुन्हा त्याला चाटत होती. तिला पान्हा फुटला होता. भुकेने वासरू ही दूध पिण्याचा प्रयत्न करत होते. पण  ती त्याला बाजूला सारत होती. वासरू पुन्हापुन्हा आचळ पकडण्यासाठी धडपडत होते. ती त्याला पुन्हा पुन्हा चाटत  होती. पण  ती त्याला बाजूला सारत होती. हा काय प्रकार आहे? म्हणून  “राहत”  चे कार्यकर्ते त्यांच्याजवळ गेले. पहातो तो राग आणि चीड येण्यासारखा प्रकार होता. गाईचे दूध  वासराने पिऊ नये, आपल्यालाच मिळावे म्हणून मालकाने वासराच्या तोंडावर एक टोकदार खिळ्यांनी बनविलेला एक पट्टा बांधल्याचे दिसून आले. वासरू दूध पिण्यासाठी जवळ गेले की त्याच्या तोंडाजवळ बांधलेल्या पट्टया वरचे टोकदार खिळे तिच्या स्तनांना टोचत होते. आणि तिला वेदना होत होत्या. “राहत” च्या कार्यकर्त्यांनी गाईच्या मालकाचा शोध घेतला. आणि त्याची चांगलीच कानउघडणी केली . वासराच्या तोंडावरचा पट्टा काढला. वासरू लगेच आईला जाऊन बिलगले. गाय भुकेल्या बाळाला मायेने चाटत होती. तिला पान्हा फुटला होता. वासरूही चक् चक् करून  स्तनपान करत होते. भूक शमवत होते. किती छान चित्र!

आपण गाय वासराची पूजा करतो. खर तर गाईच्या दुधावर वासराचाच अधिकार ! प्राण्यांना प्रेम देणं, हीच त्यांची खऱ्या अर्थाने पूजा होईल. अशी अन्यायकारक घटना कोठेही दिसली तर, त्याला वाचा फोडणे हे प्रत्येकानेच आपले कर्तव्य म्हणून करायला काय हरकत आहे?

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तारा…भाग -2 ☆ सुश्री मिनाक्षी देशमुख ☆

? विविधा ?

☆ तारा…भाग -2 ☆ सुश्री मिनाक्षी देशमुख ☆

दुदुंभी राक्षसाच्या उत्पातामुळे हिमवान त्रस्त झाले. तरीही शांतब्रम्ह्य अविचल राहिले. त्यांनी मानसिक शांतता ढासळू दिली नाही. निळसर पांढर्‍याशुभ्र ढगांच्या आकारांत प्रसन्नपणे हिमवान त्या राक्षसासमोर येऊन अत्यंत सौम्यपणे विचारले, “हे राक्षसा! कां त्रास देतोस मला..?”

त्यावर दुदुंभी म्हणाला, “मी असे ऐकले की, तुला आपल्या बळाची, सामर्थ्याचे फार घमेंड आहे, म्हणुन तुला युध्दाचे आव्हान देण्यास आलो आहे.”

हिमवान स्मित करीत म्हणाले, “तू चुकीच्या ठिकाणी आला आहे. मी काही युध्दकुशल, युध्दनिपुण नाही, युध्द करणे हा माझा मनोधर्मच नाही. उगीच शिलावर्षाव करुन कां मला त्रस्त करतो आहेस? अरे! मी हिमालय म्हणजे शांतीचे वसतिस्थान. तपस्यांचे माहेर आहे. तपश्चर्येचे निजधाम आहे. इथे पुण्यवंतांचे पुण्य फुलते. तुला एवढीच युध्दाची हौस आली असेल तर किष्किंधा नगरीत महापराक्रमी, महाप्रतापी वानरराज वाली राज्य करीत आहे. तोच तुझ्याशी युध्द करण्यास समर्थ आहे.”

हिमवानाचे भाषण ऐकुन दुदुंभी आणखीनच चढला. हातातील गदा सांभाळीत  किष्किंधा नगरीत प्रविष्ट झाला. जोरजोरांत डरकाळ्या फोडत वालीला युध्दासाठी पुकारु लागला. पराक्रमी वालीने आव्हान स्विकारले. दोघांमधे घनघोर युध्द सुरु झाले. हळुहळू दुदुंभीची शक्ती क्षीण होऊ लागली व  वालीची शक्ती वाढू लागली. अखेर वालीने त्याला ठार केले. अजस्र राक्षस चेतनाहीन होऊन खाली कोसळला.

वाली एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने अविचाराने दुदुंभीचे प्रेत उचलुन गरागरा फिरवले व एक योजनाभर  लांब भिरकावुन दिले.

दूदुंभीचे प्रेत मतंगत्रृषींच्या आश्रमावरुन पलीकडे फेकल्या गेले. त्यावेळी त्याच्या मुखातुन अंगातुन जे रक्ताचे थेंब उडाले ते सबंध आश्रमावर पडले. स्वतः मतंगत्रृषी एका शिलेवर तपश्चर्या करीत असतांना त्यांच्याही अंगावर अंगावर त्या रक्तांचे थेंब पडले.

मतंगत्रृषींची तपश्चर्या भंग पावल्याने त्यांनी डोळे उघडुन पाहिले, तर काय! त्यांच्या सर्वांगावर रक्ताचे थेंब पडले होतेच. शिवाय आश्रमभर सर्वत्र रक्ताचा सडा पडला होता. ते पाहुन त्यांचा अतिशय संताप झाला. त्यांनी सर्वत्र शोध घेतला असतां, आश्रमाच्या पलीकडे त्रृध्यमूक पर्वताच्या पलीकडे एका अवाढव्य असूराचे प्रेत पडलेले दिसले.

त्रृषींनी अंतर्दृष्टीने पाहिले असतां ही सारी करामत वालीची आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्याची सहनशक्ती नष्ट झाली. त्यांनी वालीला शाप दिला, “त्या दुर्बुध्दी वालीने या राक्षसाच्या रक्ताने हा आश्रम अपवित्र केला, हा पर्वत दूषित केला. जर कां त्याने या पर्वतावर पाय ठेवला तर त्याला तात्काळ मरण येईल, त्याचे जे मित्र इथे असतील त्यांनी ताबडतोब हा पर्वत सोडावा, अन्यथा त्यांना मरण पत्करावे लागेल. उद्या जो कोणी वालीचा मित्र इथे दृष्टीस पडला तर त्याचे रूपांतर होईल.”

क्रमशः…

संकलन – सुश्री मिनाक्षी देशमुख   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तारा…भाग -1 ☆ सुश्री मिनाक्षी देशमुख ☆

? विविधा ?

☆ तारा…भाग -1 ☆ सुश्री मिनाक्षी देशमुख ☆

हनुमानाने राम-लक्ष्मणाला त्रृष्यमुख पर्वतावर सुग्रीवाची भेट घालुन दिल्यावर रामाने सुग्रीवाला स्वतःचे राज्य असतांना निर्वासीत कां झालास म्हणुन विचारले असतां, सुग्रीवाने रामाला, आपला भाऊ, वाली आणि त्याच्यात दोघांमध्ये गैरसमजुतीने निर्माण झालेली दुःखद कथा कथन केली.

वालीचा जन्म अरुणी  आणि इंद्रापासुन तर सुग्रीवाचा जन्म अरुणी आणि सुर्यापासुन झाला. दोघांनाही गौतमत्रृषी व अहिल्येकडे ठेवले होते. गौतम अहिल्येला अंजना नांवाची मुलगी होती. अहिल्येला भ्रष्टकरण्याकरिता इंद्र आला ही गोष्ट तिने तिचे वडील गौतमांना सांगीतले म्हणून अहिल्येने तिला वानरी होण्याचा आणि मुलांनी ही बातमी सांगीतली नाही म्हणुन गौतमांनी मुलांना वानर होण्याचा  व अहिल्येला एकांतवासांत पाषाणवत होण्याचा शाप दिला.

गौतमत्रृषींना आईविना पोरक्या  मुलांचे रुपांतर झालेल्या वानरांबद्दल फार वाईट वाटले. एकदा तोंडातुन निघालेली शापवाणी माघारी पण घेता येत नव्हती. म्हणून त्यांनी त्या तिन्ही वानरांना किंष्किंधेच्या निपुत्रीक वानर राज रिक्षवांनाकडे सोपवले. तिथे त्यांचे शिक्षण झाले. विवाहयोग्य झाल्यावर अंजनाचा विवाह केशरीशी, वालीचा विवाह वानरप्रमुख सुषेनची कन्या ताराशी आणि सुग्रीवाचा विवाह रुमाशी झाला.

रिक्षराजांचे मुलांवर निरतिशय प्रेम होते. मृत्यूपूर्वी त्यांनी वाली व सुग्रीवला आपल्या राज्याचे वारस केले. किंष्किंधेत सर्व सुरळीत व कुशल सुरु असतांना दुंदुभी नांवाचा एक राक्षस जो नेहमी रेड्याच्या रुपांत वावरत असे,तो भल्यामोठ्या पर्वतासारखा अवाढव्य दिसत असे. त्याच्या अंगात हत्तीचं बळ होते. त्याला देवाचे वरदान प्राप्त असल्यामुळे अत्यंत उन्मत्त बनला होता.

दुदुंभी राक्षलाला आपल्या शक्तीचा फार गर्व झाला होता. तो फिरत फिरत जलनिधी समुद्राकडे आला असता समुद्राच्या पर्वतासारख्या लाटा एका पाठोपाठ एक अशा उसळत होत्या. लाटांच्या धीरगंभीर आवाजाने सारे अंतराळ भरुन गेले होते. सागराच्या लाटांचा जोर पाहुन व गर्जना ऐकुन दुदुंभी राक्षस संतापला. त्या राक्षसाने मोठमोठ्याने गर्जना करुन सागराला युध्दासाठी आव्हान देऊ लागला. राक्षसाचे आव्हान ऐकुन समुद्र देव पाण्यातुन बाहेर येऊन राक्षसाला म्हणाले, “मी तुझ्याशी युध्द करण्यास असमर्थ आहे. तूं पर्वतराज हिमालयाकडे जाऊन त्याच्याशी युध्द कर! गिरिराज तुझ्याशी युध्द करण्यास समर्थ आहे.”

दुदुंभी राक्षस जास्तच उन्मत्त व गर्विष्ठ बनला. तो हिमालय पर्वताकडे गेला. गिरीराज हिमालय अपल्या पांढर्‍या उंच उंच शिखरांनी तळपत होता. पर्वतांचा परिसरांत शांत, पवित्र वातावरण होते. ती निस्तब्धता, ती शांतता, ते पावित्र्य, मांगल्य पाहुन राक्षसाला खूप संताप, राग आला.त्या शांत वातावरणाचा भंग करण्यासाठीच जणू तो मोठमोठ्या शिळा उचलुन हिमालयाच्या शिखरावर फेकु लागला.

क्रमशः…

संकलन – सुश्री मिनाक्षी देशमुख   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! ☆ सासू, सून आणि DP ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? चं म त ग ! 😅

🤣 सासू, सून आणि DP ! 😂💃श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

“सुनबाई, ऐकत्येस का ?”

“काय आई ?”

“अगं बाबू उठला का गं ?”

“आई बाबू म्हणजे….”

“किती वर्ष झाली गं तुमच्या प्रेमविवाहाला सुनबाई ?”

“इश्श, तुम्हांला जसं काही माहीतच नाही !”

“मला माहित आहे गं, पण तुमच्या या प्रेमविवाहाआधी किती वर्ष फिरत होतात ते माहित नाही नां, म्हणून विचारलं !”

“अहो आई, या डिसेंबरला चौदा वर्ष पुरी होतील !”

“काय गं सुनबाई, तुमचा लग्नाआधी  आम्हांला अज्ञानात ठेवून फिरायचा तुमचा अज्ञातवासातील प्रेमाचा एक वर्षाचा काळ धरून, का…..?”

“नाही आई, ते वर्ष धरलं तर मग पंधरा होतील !”

“सुनबाई, जरी तुमचा एक वर्षाचा अज्ञातवास लग्ना आधीच संपला असला, तरी तुमची सगळी चौदा वर्षाची शिक्षा भोगून झाल्ये आणि तरी तुला बाबू कोण माहित नाही ?”

“अय्या, म्हणजे तुम्ही विलासला बाबू म्हणता आई ?”

“लवकर कळलं माझ्या बबडीला !”

“आता ही बबडी कोण आणलीत मधेच तुम्हीं आई ? विलासची कोणी माझ्या आधी दुसरी मैत्रीण होती का ?”

“कठीण आहे ! अगं मी माझ्या बबडीला म्हटलं नां ? मग ! ते सगळं सोड आणि मला सांग बाबू उठला का नाही अजून, नऊ वाजून गेले !”

“झोपू दे की जरा त्याला आई, आज रविवार तर आहे !”

“अच्छा, आज रविवार म्हणजे सुट्टी म्हणून झोपू दे म्हणतेस, तर मग आज जेवणाला पण सुट्टी वाटतं ?”

“मला सांगा आई, आत्ता पर्यंत किती रविवार मी तुम्हांला उपाशी ठेवलंय हॊ ?”

“तुझी काय बिशाद मला उपाशी ठेवायची !”

“नाही नां ? मग असं बोलवत तरी कसं तुम्हाला आई ?”

“अगं, एवढ्या उशिरा उठायचं मग अकरा साडेअकराला नाष्टा करायचा आणि दोन अडीचला जेवायचं, हे बरं दिसतं का ?”

“अहो आई, पण रोज तुम्हांला एक वाजता जेवायला मिळतंय नां, मग एक दिवस उशीर झाला तर कुठे बिघडत म्हणते मी ?”

“माझं नाही बिघडत गं, तुझा स्वयंपाक बिघडतो त्याच काय ?”

“स्वयंपाक बिघडतो ? म्हणजे काय आई ?”

“अगं काय आहे, आधीच उशीर झालेला असतो जेवायला, मग तू घाईघाईत स्वयंपाक करतेस आणि मग कधी भाजी तिखट तर कधी आमटी खारट होते, खरं नां ?”

“अहो एखाद्या रविवारी झाली असेल चूक, म्हणून काय लगेच नांव ठेवायला नकोयत माझ्या स्वयपाकाला !”

“मग लग्नाच्या बैठकीत, ‘स्वयंपाक येतो का’ असं मी जेंव्हा तुला विचारलं तेंव्हा अगदी तोंड वर करून कशाला म्हणायचं ‘स्वयंपाकाची भयंकर आवड !”

“बापरे ! इतक्या वर्षांनी हे बरं तुमच्या लक्षात आहे ! आणि हॊ, आहेच मला स्वयंपाकाची भयंकर आवड !”

“बरोबर आहे सुनबाई, पण तेंव्हा बोलतांना तुझी वाक्य रचना थोडी चुकली असावी असं मला आत्ता वाटतंय खरं !”

“कशी ?”

“अगं तुला ‘भयंकर स्वयंपाकाची आवड’ असं म्हणायचं असेल तेव्हा, खरं नां ?”

“अजिबात नाही, तुमचीच ऐकण्यात काही चूक झाली असेल आई !”

“असेल असेल, पण दुसरी एक गोष्ट नक्कीच तू आमच्या पासून इतकी वर्ष लपवलीस, त्याच काय ?”

“कुठली गोष्ट आई ?”

“तुझ्या अंगात देवी येते ते !”

“का sss य, काय म्हणालात तुम्ही? माझ्या अंगात देवी येते ?”

“हॊ ssss य ! आणि तू हे आमच्या पासून इतकी वर्ष लपवून ठेवलस, हे सत्य आहे ! बाबुला तरी माहित आहे की नाही कोण जाणे !”

“आई पुरे झालं आता ! ‘भयंकर जेवणापर्यंत’ ठीक होतं, पण आता हे अति होतंय ! कुणी सांगितलं हॊ तुम्हाला माझ्या अंगात…..”

“अगं कोणी सांगायला कशाला हवंय, मी मगाशीच तुझा DP बघितला आपल्या व्हाट्स अपच्या ‘फॅमिली कट्ट्यावर !”

“DP ? कसला DP ?”

“अगं केस मोकळे सोडून काढलेला तुझा DP आज तू टाकलायस नां, तो पाहून माझी खात्रीच पटली, नक्कीच तुझ्या अंगात…..”

“धन्य झाली तुमची आई ! अहो आज मी न्हायल्यावर लगेच सेल्फी काढून तो DP म्हणून ठेवलाय ! कळलं ?”

“कर्म माझं ! अगं मला वाटलं तुझ्या अंगात बिंगात येत की काय !”

“काहीतरीच असतं तुमच आई ! बरं आता जाऊ का नाष्टा बनवायला ?”

“जाशील गं, पण त्याच्या आधी माझं एक छोटंसं काम कर नां !”

“कसलं कामं आई ?”

“मला पण आपल्या ग्रुपवरचा माझा DP बदलायचा आहे ! तेवढा माझा फोटो काढ आणि आपल्या फॅमिली कट्ट्यावर DP म्हणून टाक आणि मग जा नाष्टा करायला !”

“ठीक आहे आहे आई ! या इथे खुर्चीत बसा आरामात, म्हणजे मी…..”

“अगं इथं नको, किचन मध्ये स्वयंपाक करताना काढ !”

“काय ? अहो मी लग्न होऊन या घरी आले तेव्हापासून तुम्ही किचन मधे कधी पाय तरी ठेवला आहे का ?”

“अगं पण DP मधे जे दिसत ते थोडंच  खरं असतं ?”

“म्हणजे ?”

“अगं सुनबाई तुझ्या कुठे अंगात येत, पण मला तसं वाटलं की नाही तुझा DP बघून ? तसंच मी स्वयंपाक करायची नुसती ऍक्शन केली म्हणून कुठे बिघडलं ?”

“नको आई, त्यापेक्षा माझ्या डोक्यात एक भन्नाट पोज आली आहे तुमच्या DP साठी !”

“कुठली गं पोज ?”

“तुमचं जेवणाचं ताट, मी केलेल्या वेगवेगळ्या चमचमित पदार्थांनी भरलं आहे आणि तुम्हीं अगदी समाधानाने त्यावर आडवा हात मारताय ! ही पोज कशी काय वाटते ?”

“चालायला लाग नाष्टा करायला लगेच !”

© प्रमोद वामन वर्तक

१५-०७-२०२२

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares