सुश्री त्रिशला शहा
विविधा
☆ पोस्टमनदादा… ☆ सुश्री त्रिशला शहा ☆
(अलिकडे मोबाईल आणि इंटरनेटच्या जमान्यात लोकांंच्या जिव्हाळ्याचे असलेले ‘ पोस्टखाते ‘बरचं मागे पडलंय,त्यामुळे पोस्टमनची फारशी कुणाला आठवणचं येत नाही.याचसाठी हा लेख)
नमस्कार पोस्टमनदादा,
एकेकाळी पोस्ट,पत्र आणि जनता यांच्यामधे तुमच्यामुळे एक भावनिक अनुबंध गुंफला गेला होता.अत्यंत जिव्हाळ्याच नातं तुमच्यामार्फत येणाऱ्या पत्रामुळे आमच्याशी जोडलं गेल होत.आपल्या माणसाच एखाद पत्र येणार असेल तर आम्ही तुमची आतुरतेने वाट पहायचो.तुमचा तो युनिफॉर्म, खाकी शर्ट-पँट,डोक्यावर टोपी,हातात पत्रांचा गठ्ठा आणि खांद्यावर शबनम बँग,अशा तुमच्या वेगळेपणामुळे तुम्ही लांबूनही ओळखायचात.तुम्ही दिसलात की इतका आनंद व्हायचा! ज्या पत्राची आम्ही वाट पहात असायचो,ते तुम्ही नक्की आणले असणार असं वाटायचं.तुमच्यामुळेच तर आम्हाला परगावी असणाऱ्या नातेवाईकांची खुशाली कळायची.आनंद,सुख-दुःख अशा सगळ्या बातम्या तुमच्यामुळेच तर कळायच्या.तुम्हालाही एखादी लग्नपत्रिका, आनंदाचे,खुशालीचे पत्र आम्हाला देताना आनंद व्हायचा.शाळेचा निकाल,नोकरीचा काँल,शहरातून आलेली एखादी मनीआँर्डर तुम्ही प्रसन्न मनाने आमच्याकडे सुपूर्द करायचात.नवविवाहित जोडपं,प्रेमीजन तर तुमची आतुरतेने वाट पहायचे.
पण एखाद्या दुःखद घटनेचे पोस्टकार्ड, तार देताना तुम्हीही तितकेच हळवे व्हायचात.तार आली म्हणजे तर घरातले सारे घाबरुनच जायचे.अशावेळी तुम्हीच ती तार वाचून दाखवायचात.ती वाचताना नकळत तुमचेही डोळे ओले व्हायचे.याच तुमच्या स्वभावाने लोकांशी आपुलकीचे नाते तयार व्हायचे.सासरी गेलेल्या मुलीची खुशाली,मुलीला माहेरची खुशाली या गोष्टी तुमच्यामुळेच कळायच्या.अशावेळी तुम्ही त्यांना एक देवदूतच वाटत होता.त्यामुळे दिवाळीची खुशी देताना तुमचाही नंबर त्यात असायचा.
पत्राची वाट पहाणं आणि त्यानंतर पत्र येण यातला हुरहुरीचा काळचं आता संपल्यासारख झालयं.या इंटरनेट,व्हाटस्अँपच्या जमान्यात तुमची कुणाला गरजच उरली नाही. किती बदललं जग सार! इथे वाट पहायला कुणाला वेळच नाही.फँक्स,ई-मेल,व्हाटस्अँपमुळे सारे जगचं जवळ आल्यासारखे झाले आहे.पाच मिनीटात साता समुद्रापार मेसेज पोहोचतोय.त्यामुळे पोस्ट आणि पोस्टमन या गोष्टी विस्मृतीत गेल्यासारख झालय.हुरहुरीतला आनंद संपलाय.आलेली पत्रे पुन्हापुन्हा वाचण्यातली गोडीच नाहीशी झालीये.जुनी तारकेटमधे घातलेली पत्रे पहाताना नकळत त्या पूर्वीच्या दिवसांची आठवण होते.हे काहीच उरले नाही.आता फक्त मेसेज वाचणे आणि डिलीट करणे एवढचं उरलय.नाही म्हणायला ठराविक पार्सल सेवेसाठी, राखी पाठविण्यासाठी मात्र पोस्टाचा नक्कीच उपयोग होतो.पोस्टामधे पैसेही सुरक्षितपणे साठविता येतात.पण तो तेवढाच संबंध आता पोस्टाशी उरलाय हेही खरेचं
असो,कालाय तस्मै नमः इथेच थांबते. 🙏
© सुश्री त्रिशला शहा
मिरज
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈