मराठी साहित्य – विविधा ☆ बोलक्या भिंती….भाग 1 ☆ सौ. अमृता देशपांडे ☆

सौ. अमृता देशपांडे

? विविधा ?

☆ बोलक्या भिंती….भाग 1 ☆ सौ. अमृता देशपांडे 

भिंतीला कान असतात.  हो, खरंय! आणि त्या दोन कानांमधला चेहराही असतो. त्यावर नाक, डोळे,  गाल, कपाळ,  ओठ  सर्व असतं. त्यामागे अव्यक्त मनही असतं.

लहानपणी आम्ही वर्षातून एकदा बाबांच्या आजोळी जायचो. मोठ्ठा वाडा होता. पडवीतून पाच सहा पाय-या चढून गेलो की सोपा होता, तिथे  एक मोठा कडीपाटाचा झोपाळा होता. भिंतीवर खुंट्या,  आणि कोनाडे होते. कलाकृतींच्या फ्रेम्स होत्या. बटणांचे बदक आणि कापसाचा ससा.  कुणाची कलाकुसर कोण जाणे! खूप जुनी वाटत होती.

त्याकाळी भिंतीवरच्या खुंट्या हे टोप्या, पगड्या, फेटे,आजोबांच्या काठ्या,  कोट, बंड्या, छत्-या, यांचे निवासस्थान असे. शेतक-याच्या घरात खुंट्यावर टोपल्या, इरली,  कोयते, विळे, चाबूक,  शेतातली गोफण टांगलेली असे. जमीनदारांच्या घरात खुंट्यांवर,  भिंतींवर बंदुका,  घोड्यावरचे जीन, वाघाचे तोंड, हरणाचे कातडे,सांबराची शिंगे अशा वस्तू मालकांच्या शौर्याची व मर्दुमकीची ओळख देत. माजघरातल्या खुंट्यांवर लुगड्यांचे वळे, परकर, पोलक्यांच्या घड्या टांगलेल्या असायच्या. काचेच्या बांगड्या ही असत. परसदारीच्या सोप्याला खुंट्यांवर कोयता, रहाट, विळे  असत. एका खुंटीवर कै-या, चिंचा, पेरू पाडायची लगोरी रहाटाच्या मागे लपवून ठेवलेली असे. पालेभाजीच्या बुट्ट्या ही खुंटीवर असत. स्वयंपाकघरात खुंटाळीवर झारा, उलथने, डाव, चिमटा अडकवून ठेवत.

शहरातल्या घरातून खुंट्या छत्री, रेनकोट,  पिशव्या, मुलांची दप्तरे सांभाळत.

भिंतीतले कोनाडे ही नित्य लागणा-या वस्तू ठेवण्याची जागा. सोप्यातल्या कोनाड्यात चकचकीत पितळेचं तांब्याभांडं गार पाणी भरून ठेवलेलं असे. दुस-या कोनाड्यात पानदाणी,  माजघरातल्या कोनाड्यात फणेरपेटी,  सागरगोटे,  बिट्ट्या,  भातुकलीचा खेळ ठेवले जात.

अशा प्रकारे प्रत्येक वस्तूची जागा ठरलेली असल्याने घरातल्या प्रत्येकाला शिस्तीची सवय असे. कारण, घरातील जेष्ठ आजोबा आणि आज्जी यांची कडक, करारी, तितकीच प्रेमळ नजर सर्वांवर असे.

पूर्वीच्या भिंतींना मातीचा गिलावा असे. त्यामुळे नैसर्गिक रित्या घरात गारवा असे.

अशा शिस्तीच्या,  स्वच्छतेच्या बाबतीत काटेकोर असलेल्या पण तितक्याच एकमेकांच्या सहवासात प्रेमळपणे रहाणा-या अनेक सदस्यांचा परिवार प्रत्येकालाच साहचर्य,  सुखवस्तुपणा, याबरोबरच शारिरीक, मानसिक व भावनिक सुरक्षितता देत असे. जे पुढील काळात दुर्मिळ झाले.

क्रमशः…

© सौ. अमृता देशपांडे 

पर्वरी – गोवा

9822176170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग 24 – परिव्राजक – २. उत्तर भारत ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग 24 – परिव्राजक – २. उत्तर भारत डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

हाथरस इथं स्वामीजी एकटे आले होते. मात्र आता तिथून निघताना बरोबर शरदचंद्र होते. हृषीकेशला जाताना सहारनपूरला उतरून साडेतीनशे किलोमीटर पायी अंतर कापायचे होते. स्वामीजींना सवय होती पण शरदचंद्र यांना हे सर्व परिवर्तन नवीन होते. सवय नव्हती. अंगावर सामान घेऊन पायी चालणे, जागा मिळेल की नाही विश्रांतीसाठी, याची खात्री नाही, मुक्काम कुठे असेल माहिती नाही, अशा अनिश्चित परिस्थितीत मध्ये प्रवास सुरू होता. तो त्यांना झेपत नव्हता. ओझं घेऊन चालू शकत नव्हते, स्वामीजींच्या हे लक्षात आलं आणि ते सामान त्यांनी स्वत:च्या खांद्यावर घेतलं. शरदचंद्रांच्या लक्षात आलं की, हिमालयातील भ्रमणासाठी आपण घेतलेले बूट त्या सामानात आहेत. खूप शरमल्यासारखं झालं त्यांना. आपण ज्यांना गुरु मानतो त्यांच्याच खांद्यावर आपले बूट? पण स्वामीजींना त्याचं काहीही वाटलं नव्हतं.

नदी ओलांडताना तर बरं नसलेल्या शरदचंद्रांना घोड्यावर बसवून स्वत: घोड्याबरोबर पायी चालत गेले. काही वेळा पायी चालताना स्वामीजींनी शरदचंद्रांना खांद्यावर घेऊन प्रवास केला. अशी स्वामीजींनी आपली सेवा केली यामुळे त्यांचा स्वामीजींबद्दलचा आदरभाव आणखीन वाढला. त्या विचाराने मन भरून आलं. माणुसकीच्या दृष्टीकोणातून आपल्या शिष्याची जबाबदारी आणि काळजी घेणं हे स्वामीजींनी आपलं कर्तव्य मानलेलं दिसतं. एकूणच स्वामी सदांनंदांचे मठातले आगमन म्हणजे रामकृष्ण संघाच्या पुढच्या विस्ताराची नांदी ठरली होती.  

स्वामी विवेकानंदांना हे कार्य उभं करतांना सुरुवातीपासूनच अनेक खाचखळग्यातून व प्रसंगातून जावं लागलं. मठांमध्ये वेद वाड:ग्मयाचा अभ्यास झाला पाहिजे असं स्वामीजींचं मत होतं. वेदांच्या अभ्यासाकडे बंगाल मध्ये फार दुर्लक्ष झालं होतं. असं त्यांच्या लक्षात आल होतं. वेदांच्या अभ्यासासाठी एक उत्तम सोय असलेली संस्था उभी करावी असं त्यांना वाटत होतं. ते स्वत: भारतभ्रमण करतांना कोणी संस्कृत व्याकरणाचा पंडित भेटला की त्यांच्याकडून पाणीनीच्या व्याकरणाचे धडे घेत असत. भारतीय संस्कृतीचा वारसा स्पष्ट करत असताना त्यांच्या डोळ्यासमोर नेहमीच वेदातील ज्ञानकांडाचा भाग आणि उपनिषदे असत. कर्मकांडांचा अतिरेक झाल्यामुळेच समाजरचनेत दोष निर्माण झाला आणि त्यामुळेच संस्कृतीचा र्‍हास झाला असे त्यांचे निरीक्षण होते.

स्वामी विवेकानंद असेच बिहार आणि उत्तरेतील भागात खेड्यापाड्यातून पायी फिरले. खूप तीर्थाटन झाल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आचार-विचार, रिती-नीती, यांचा जवळून परिचय झाला. त्यांना दिसलं की जनतेत धर्माबद्दल आस्था आहे पण सामाजिक जीवनात गतीशीलता नाही. दोष धर्माचा नाही पण धर्माचा धंदा झाल्यामुळे समाजजीवन पंगु झालं आहे. अशा अनेक गोष्टी त्यांच्या लक्षात येत होत्या. त्यामुळे पुढे काय योजना करायची याचा विचार सतत त्यांच्या मनात चालू असे. मध्ये मध्ये वराहनगरला मठात पण फेरी व्हायची. सर्व गुरु बंधु एकमेकांना भेटल्यामुळे सर्वजणच आनंदी व्हायचे. पुन्हा आपापल्या ठरलेल्या भ्रमणास निघायचे.

कलकत्याहून ते पुढे गाझीपूरला जाताना मधेच अलाहाबादला महिनाभर थांबले. इथेही बंगाली समाज स्वामीजींचे विचार आणि त्यांचे व्यक्तिमत्व यामुळे भारावून गेला होता. समाजव्यवस्थेतील दोष आणि विषमता यावर स्वामीजींनी इथेही टीका केली होती.

स्वामीजी गाझीपूरला गेले आणि त्यांचा कलकत्त्यातलाच मित्र बाबू सतीशचंद्र मुखर्जी यांच्याकडे राहिले. इथेही अलाहाबादसारखाच बंगाली समाज गोळा झाला. इथे त्यांना वेगळाच अनुभव आला. इथल्या बंगाली समाजावर पाश्चिमात्य सुखवादी संस्कृतीचा मोठाच पगडा आहे असे त्यांनी पहिले. भारतीय संस्कृतीतला त्याग, सेवा, संयम अशा उदात्त असलेल्या जीवन मूल्यांचा पाश्चात्य संस्कृतीच्या झगमगाटामुळे आपल्या देशबांधवांना साफ विसर पडला आहे. याचे स्वामीजींना दु:ख झाले.

हे सगळे पाहता आजही पाश्चिमात्य संस्कृतीचा पगडा आपल्या समाजावर दिसतोच आहे. मुख्य म्हणजे संस्कृती वर प्रभाव पडून काही बदल होत आहेत. आज परिस्थिति तर खूप वेगळी आहे. त्याकाळात इंग्रजांचे राज्य होते त्यामुळे हा प्रभाव होता. आता तर सारं जगच एक खेडं झालं आहे. अंतर खूप असलं तरी तंत्रज्ञानामुळे जग जवळ आलं आहे. पण आज कोरोंना सारख्या साथी नं सर्व जगालाच एका पातळीवर आणून ठेवलं आहे. पण त्याग, सेवा व संयम ही आपली भारतीय मूल्येच आज यातून बाहेर पडायला आपल्याला मदत करताहेत असं दिसतंय.

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्वच्छ मनाने जग बघू या… ☆ सौ. सीमा राजोपाध्ये ☆

? विविधा ?

☆ स्वच्छ मनाने जग बघू या… ☆ सौ. सीमा राजोपाध्ये ☆

सकाळपासून मन थोडं अस्वस्थ आहे  त्याचं कारण असं की सकाळी वर्तमानपत्रात एक बातमी वाचली ..

कुरुंदवाडच्या अपंग चहा वाल्याची मुलगी वेटलिफ्टींग मध्ये मेक्सिको त देशाचं नेतृत्व करणार…

आता तुम्ही म्हणाल ..

ही इतक्या अभिमानाची गोष्ट आहे ..

आनंदाची गोष्ट आहे..

मग मला अस्वस्थ का वाटलं??तर त्याचं कारण असं की.. निश्चितच…..

इतक्या छोट्या गावातून आपल्या देशाचे प्रतिनिधित्व एक मुलगी करते आणि तेही वेट लिफ्टिंग सारख्या प्रकारांमध्ये..

 ही गोष्ट अभिमानाची आहे कौतुकाची आहे..

पण त्या बातमीचा मथळा होता ना..

तो मला अस्वस्थ करून गेला..  कुरुंदवाडच्या अपंग चहा वाल्या ची मुलगी…

ही अशी करूण किनार या बातमीला  लावणे गरजेचे आहे का??

 जे घडले ते अभिमानास्पद आहे .कौतुकास्पद आहे..

त्यामागे त्या मुलीचे कष्ट आहेत मेहनत आहे ..

त्याच बरोबर अपंग असून चहा विकत असून आपल्या अत्यंत गरीब अशा परिस्थितीतून मुलीला अशा प्रकारामध्ये तयार केलं गेलं… त्या वडिलांचं ही खूप कौतुक आहे त्यांच्या घरी  आई मोलमजुरी करते आजीआजोबा भाजीपाला विकतात.

आर्थिक बळ कमीच ..

अशा परिस्थितीत देखील त्या कुटुंबानं आपल्या मुलीसाठी किंवा आपल्या मुलीच्या स्वप्नासाठी लागेल ते सर्व काही केल..

आणि समाजाला सार्थ अभिमान वाटावा असं त्या मुलींना काही करून दाखवलं..

 हे खरोखरच आनंद… अभिमाना  उत्साहाचं असताना अपंग चहा वाल्या ची मुलगी…

असा मथळा  का???

 

जे चांगले आहे त्याचं कौतुक करा ना …त्या चांगल्या मधला कमी पणा दाखवण्यात कसला आलाय मोठेपणा…

ती व्यक्ती अपंग आहे.. चहा विकते..  गरीब आहे. यांत तिचा काय दोष???

तिच्या मनाचा मोठेपणा बघा ना…

आपल्या मुलीसाठी वाट्टेल ते करायची त्याची तयारी बघा ना..  हातीपायी नीटअसलेली.. श्रीमंत माणसं मुलांसाठी मोठी मोठी स्वप्न बघतात.. सर्व काही मुलांना पुरवत असतात..

पण सगळ्यांचीच मुलं काही अभिमानाची कामं करतात च असं नाही ना..

उलट आपण अपंग असताना देखील मान वर करून स्वाभिमानानं ते लोक जीवन जगत आहेत आणि काहीतरी वेगळं  करूनही दाखवले आहे आयुष्यात..

हे कौतुकास्पद आहे .. त्याकडे लक्ष द्या ना…

 

मला काय वाटतं माहितीए का……

शारीरिक अपंगत्वापेक्षा मानसिक अपंग असलेल्या अशा व्यक्ती समाजासाठी घातक आहेत..

 ज्याना कोणत्या गोष्टीतून कसा आणि कोणता संदेश या समाजाला द्यावा हे समजत नाही…

कोणी हाता  पायानं अधू… कोणी डोळ्यांनं कमी..

मूक बधिर ..कर्ण बधिर..  असतात हो समाजात..

त् त्यांना आपला कमीपणा माहीत असतो..पण  तो स्विकारून त्याच्या बरोबर च अशी माणसं ही चांगलं जीवन जगतात… कधी कधी काही वेगळे .. अभिमानास्पद करून दाखवतात…

पण ..

अशा प्रकारच्या बातम्या देताना..मुख्य गोष्ट महत्त्वाची न मानता आशा प्रकारे त्यांची करूण कहाणी च समाजासमोर आणणं..

अशा बातम्या आपल्या चॅनेलवर दाखवून टीआरपी वाढवणे..

खरं तर…

हे असे लोक मानसिक अपंग आहेत.. आणि १००% हे  अयोग्य आहे..

 

वाजपेयी एका कवितेत म्हणतात

तन से हारा तो कुछ नही हारा…

पर..

मन से हारा वो सब कुछ हारा..

अगदी खरे आहे  हे..

आपण सगळीच परमेश्वराची लेकरे..

कुणाला काही जास्त..

कोणाला काही कमी.

देतो परमेश्वर ..

कमी आहे ते स्वीकारून आपण चारचौघांसारखं नाही हे मान्य करून… जर खरोखरच काही आदर्श अशा लोकांनी घालून दिले असतील तर त्याचं कौतुक झालं पाहिजे ना..

तसे करत असताना देखील त्यांची दयनीयता.. त्यांची लाचारी  जास्त ठळकपणे दाखवण्यात खरं मानसिक अपंगत्व  आहे..

 

तर मुद्दा असा की..

जे चांगलं आहे..

कौतुकास्पद आहे ..

त्यापासून समाजाला प्रेरणा मिळू शकते..

काहीतरी नवं करून दाखवायची आवड निर्माण होऊ शकते अशा गोष्टींना प्राधान्य देऊया…

अशा गोष्टी सर्वांसमोर येऊ द्या.. चुकून एखादा छोटा मोठा दोष.. कमीपणा असेल ..

तर  विशेष करून त्याच गोष्टीचं जास्त प्रदर्शन नको..

स्वच्छ मनाने जग बघू या..!!

© सौ.सीमा राजोपाध्ये..

8308684324

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ दुय्यम स्थान… ☆ सुश्री अर्चना अनंत ☆

? विविधा ?

दुय्यम स्थान… ☆ सुश्री अर्चना अनंत ☆

रेवती माझी मैत्रीण घरी नागपूरला आली असं कळलं म्हणून तिला भेटायला निघाले…

दोन वर्षांपासून भेट नव्हती…. दोन वर्षांपूर्वी तिच्या नवऱ्याला हार्ट अटॅक येऊन गेला होता.. त्यामुळे दगदग नको, आणि वेळप्रसंगी कुणी जवळ असो म्हणून नवरा बायको बॅगलोरला मुलाकडे शिफ्ट झाले होते.. कुण्यातरी नातेवाईकांकडे लग्न म्हणून ती आठ दिवसासाठी नागपूरला आली होती…. विचारतच तिचं घर आलं.. मी बेल दाबताच तिने दार उघडलं..

इथल्यापेक्षा छान दिसत होती.मी म्हटलं” रेवती, बॅगलोर मानवलं तुला..एकदम छान दिसतेस”

“हॊ ना.. मस्त वातावरण आहे तिथलं…. बस हं मी चहा ठेवते..”

“चहा बिहा नको.. बस आपण गप्पा मारू…”

आम्ही गप्पा करीत बसलो.. ती मुलाचं, सुनेचं, नातवाचं फार कौतुक करीत होती…

मी म्हटलं,” नशीबवान आहेस तु.. इतकी छान सून मिळाली”

ती हसली आणि थोडं थांबून म्हणाली, “हे बघ, नशीबवान वगैरे काही नसतं..जेव्हा मी तीथे शिफ्ट व्हायचं ठरवलं तेव्हाच आपल्या मनाला बजावलं , “त्या घरात आपलं स्थान दुय्यम.. ते तिचं घर.. त्यामुळे सगळे निर्णय तिचे. अजिबात लुडबुड करायची नाही.लागली ती मदत करायची आणि आनंदी राहायचं “

तीथे सगळ्या कामाला बाई आहे.. स्वयंपाक माझी सून घरी करते.. मी तिला सरळ सांगतिले, “तु सगळा स्वयंपाक कर. पोळ्या मी करणार..तिचं आटोपलं की मी पोळ्या करते आणि ओटा आवरते. तेवढीच तिला मदत आणि स्वयंपाकात लुडबुडही नाही.

तशा तर अनेक गोष्टी मला नाही पटत.. जसं मुलांच्या बाबतीत.. पण त्यांची मुलं. त्यांना ज्या पद्धतीने वागवायची हा त्यांचा प्रश्न…

अगं,तीन वर्षांच्या मुलीला वेगळ्या खोलीत झोपवते.सी सी टी व्ही लावलाय.. मधे मधे उठून तिच्यावर लक्ष ठेवत असते…. मी म्हटलं अगं, तिलाही भीती वाटते आणि तुझी पण नीट झोप होत नाही.. त्यापेक्षा आमच्यासोबत झोपावं तिला…तर नाही म्हणतात.तिला एकटं झोपायची सवय लावयाला हवी म्हणते .

अगं, फक्त रविवारी ती आमच्यासोबत झोपते… इतकी गळ्यात पडते ना.. म्हणते आजी, मला रोजच तुझ्यासोबत झोपायचं.. इतकं वाईट वाटतं ना..पण मनात विचार करते त्यांची मुलगी.. कसे संस्कार करायचे हा त्यांचा प्रश्न…मग मी नातीलाच समजावते.. तुला ब्रेव्ह गर्ल व्हायचं आहे ना? मग आई बाबांचं ऐकायचं…

हे एक उदाहरण झालं..अशा अनेक गोष्टी खटकतात…पण आता मी अजिबात लक्ष देत नाही…

आमच्याशी दोघेही छानच वागतात.सून अगदी आपलेपणाने, प्रेमाने वागते.मग आपल्याला आणखी काय हवं?

खरंय गं.. त्यांचा संसार.. आपल्याला काय करायचं.. असं मी म्हटलं आणि मला रेवतीचे तिचं लग्न झाले तेव्हाचे बोलणे आठवले. ती सासुसासऱ्यांसोबत राहत असे .. तेव्हा असच बोलतांना म्हणाली होती, “या घरात माझं दुय्यम स्थान.. प्रथम स्थान सासूबाईचं..त्यांच्या संसारात मी प्रवेश केला.. त्यांच्या घरात राहते तेव्हा त्यांच्या कलाने घ्यावं लागतं”

माझं लक्ष नाही पाहून रेवती म्हणाली, काय गं, काय झालं?

“काही नाही… हे असं दुय्यम स्थान असणारी आपली शेवटची पिढी असणार….आधी सासू अग्रस्थानी आता सून “

ती हसत म्हणाली, घरातल्या स्थानाचं काय घेऊन बसलीस हृदयातील स्थान अग्रस्थानी असावं. मी सासूबाईच्या हृदयात अग्रस्थानी होते आणि  आता सुनेच्याही हृदयात अग्रस्थानी आहे…. आणखी काय हवे!

खरंच.. रेवती दुय्यम स्थान पण किती आनंदाने एन्जॉय करीत होती.. असं वागणं सगळ्यांच जमलं तर?

© सुश्री अर्चना अनंत 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ एक जुलै – डाक्टर्स डे ☆ डाॅ.ए.पी.कुलकर्णी ☆

? विविधा ?

एक जुलै – डाक्टर्स डे ☆ डाॅ.ए.पी.कुलकर्णी  ☆

वैद्यकीय व्यवसायातील योगदानातील कामगिरीमुळे आदर व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी (भारतात) 1991 पासून 1 जुलै हा दिवस डॉक्टर्स डे म्हणून साजरा करण्यात येतो. प. बंगालचे दुसरे मुख्यमंत्री डॉ. बिधनचंद्र रॉय यांनी वैद्यकीय व्यवसायात केलेल्या अद्वितीय व संस्मरणीय कामगिरीमुळे हा दिवस निवडण्यात आला.

त्यांचा जन्म 1 जुलै व देवाज्ञाही 1 जुलै रोजीच झाली हा मोठा विचित्र योगायोग.

सुमारे पन्नास साठ वर्षापूर्वीचे दिवस आठवले तर अस लक्षात येते की…..

“पडू आजारी मौज वाटे ही भारी”…..वाटत असे किंवा विषमज्वर झालेल्या मुलांच्या  घरातील सारी मंडळी, रात्रीच्या रात्री जागून काढत असत.ताप उतरला की सर्वजण सुटकेचा निश्वास सोडत असत.

त्या साठी नवस, देवऋषी, मंत्र तंत्र, उतारा टाकणं सर्व कांही होत असे.

ही वस्तुस्थिती सर्व खेड्यांमधून असे.

काळ थोडा पुढे गेला.

खेड्यांमधून अधुन मधून डाॅक्टर येत असत पण सर्वांना डाक्टरांनी सुई टोचलीकी बरे वाटलच पाहिजे असा दृढ विश्वास असे.

तर सर्वसाधारणपणे डाक्टर त्यांचे साठी  देव होते.

शहरात परिस्थिती थोडी निराळी होती.हंss चल जीभ दाखव ,पोट तपासून पाहतो व कांही नाही पळ; बरोबरच आतूनच कंपांउंडरला कांहीतरी सांगत.तत्परतेने औषधी पुड्या व बाटलीतून (डोसचे कागदी लेबल डकवलेल्या) गोड गुलाबी पातळ औषध दिवसातून अमूक वेळा घे म्हणून सांगत असत.पैसे लिहून ठेवले जात.

अर्थातच दुखणे कोठल्या कोठे पळून जाई. इथपर्यंत फॕमिली डाक्टरच सर्व आजारांवर औषध तर देत असतच पण घरगुती अडचणींवर सल्लाही देत असत.

नंतर नंतर नवीन स्पेशालीटी निर्माण होत गेल्या .निदानासाठी नवनव्या सोयी उपलब्ध होत गेल्या. औषध देण्याची पध्दत बदलली.वेळेवर झालेल्या निदान व औषधे या मुळे मानवी जीवन अधिक चांगले सुखकर होऊन आयुर्मान वाढले. परंतु उपचारही महाग होत गेले .त्या बरोबर फॕमिली डाक्टर्स  ऐतिहासिक झाले.

रूग्ण व डाक्टर यांचा सुसंवाद होत राहीला पाहीजे.

एक जुलै डाक्टर दिना निमीत्त सर्व *डाकदर बाबूंना * हार्दिक शुभेच्छा

© डाॅ.ए.पी.कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! छत्री आणि फ्लोट ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? चं म त ग ! 😅

🤣 छत्री आणि फ्लोट ! 😅  श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

“नमस्कार पंत !”

“अरे मोऱ्या काय पत्ता काय तुझा ?”

“फातर फेकर चाळ नंबर ६, खोली नंबर…..”

“आता फार काही बोललास तर तोंडाला फेफर येई पर्यंत हा पेपरवेट फेकून मारिन मोऱ्या तुला !”

“हे बरं आहे पंत, आपणच प्रश्न विचारायचा आणि मी उत्तर द्यायला लागलो की….”

“अरे गाढवा तुझा पत्ता काय म्हणजे इतके दिवस कुठे गायब झाला होतास ? असं विचारतोय मी !”

“अस्स होय ! पंत तुम्हीं सुचवलेले अनेक व्यवसाय आता नावा रुपाला आले आहेत आणि ते सांभाळता सांभाळता दिवसाचे २४ तास पुरत नाहीत मला !”

“मग आज कसा काय वेळ मिळाला ?”

“पंत, चांगली पावसाळी हवा आहे, हवेत छान गारवा आहे, अशा वेळेस काकुंच्या हातचा आल्याचा गरमा गरम चहा मिळाला तर मग काय, सोनेपे सुहागा ! म्हणून आलो !”

“मोऱ्या उगाच चहाला जाऊन कप लपवू नकोस !”

“म्हणजे ?”

“म्हणजे आता इतक्या दिवसांनी आला आहेस मोऱ्या, तर तुला चहा मिळणारच आहे, पण मी तुझ्या बारशाच्या घुगऱ्या खाल्ल्या आहेत हे विसरू नकोस ! त्यामुळे पटकन काय ते खरं कारण सांग, म्हणजे हिला सांगून तुझ्या नरड्यात चहा ओतलाच म्हणून समज !”

“पंत तुम्ही खरंच मनकवडे आहात अगदी !”

“आता मला जास्त मस्का न लावता चटचट बोललास तरच तुला लवकर चहा मिळेल मोऱ्या, नाहीतर माझं मन वाकड झालं तर चहाच काय, साध पाणी सुद्धा मिळणार नाही तुला लक्षात ठेवं !”

“सांगतो, सांगतो पंत ! आता पावसाळा जवळ येवून ठेपलाय दारात हे तर तुम्हांला माहित आहेच !”

“बरं मग ?”

“तर पंत या पावसाळ्यात एखादा नवीन उद्योग सुरु करावा असं मनांत आलं आणि म्हणून तुमच्या सुपीक डोक्यात एखादी नवीन आयडिया आली असेल आणि ती जर कळली तर…..”

“अब आया उंट पहाडके नीचे !”

“म्हणजे मी उंट ?”

“नाही रे, तू तर पहाड !”

“मग उंट कोण ?”

“तो तिकडे अरबस्तानात !”

“पण त्याचा इथे काय संबंध पंत ?”

“खरंच कठीण आहे तुमच्या हल्लीच्या पिढीच मोऱ्या !”

“म्हणजे ? मी नाही समजलो पंत!”

“ते सोडून दे मोऱ्या, आता तू तुझ्या येण्याचं खरं खरं कारण सांगितलं आहेस तर मी तुला एक धंद्याची नवीन आयडिया, जी आजच माझ्या सुपीक डोक्यात आली आहे ती सांगतो तुला !”

“म्हणजे तुमच्या डोक्यात ऑलरेडी नवीन आयडिया आलेली आहे ?”

“अरे उंटा…..”

“पण पंत तो तर अरबस्तानात असतो ना ?”

“अरे हॊ खरंच की !”

“मग !”

“सॉरी, सॉरी मोरू ! माझ्या गाढवा, हे कसं वाटतंय ?”

“हां, आता कसं बरं वाटलं कानाला पंत !”

“मला पण बरं वाटलं मोऱ्या ! तर काय सांगत होतो… हां उंट या प्राण्याला वाळवंटातल जहाज म्हणतात हे तुला ठाऊक असेलच !”

“हॊ पंत, शाळेत असतांना शिकलोय!”

“नशीब त्या उंटाच !”

“काय ?”

“काही नाही रे गधडया ! तर तू म्हणतोयस ते बरोबरच आहे, पावसाळा अगदी सुरू झाला आहे आणि तशातच पेपर मधल्या आणि न्यूज चॅनेलच्या बातम्या वाचून आणि ऐकून मला या नवीन उद्योगाची आयडिया सुचली बघ !”

“कुठल्या बातम्या पंत ?”

“मोऱ्या या पावसाळ्यात सुद्धा दरवर्षी प्रमाणे रस्त्यांच्या नद्या होणार आहेत आणि आपले मुंबई बेट दरवर्षी 2 सेंटीमीटर या वेगाने पुढच्या अनेक वर्षात समुद्रात बुडणार आहे !”

“काय सांगता काय पंत ? हे खरं आहे ?”

“पेपरवाले तरी असं ओरडून ओरडून सांगतायत आणि सगळे न्यूज चॅनेल पण त्यांचीच री ओढतायत !”

“मग अशा येवू घातलेल्या आपत्तीत, कुठला नवीन उद्योग करून मी माझ्या संपत्तीत भर घालावी असं वाटतंय तुम्हांला पंत ?”

“अरे व्वा मोऱ्या, अगदी अलंकारिक बोलायला लागलास की !”

“कसचं कसचं पंत, तुमच्या सहवासात राहून थोडं थोडं शिकलोय झालं ! बरं पण तुम्ही धंद्याची नवीन आयडिया सांगणार होतात ती तर सांगा आधी !”

“मोऱ्या या पावसाळ्यात तू लोकांना छत्र्यांचे मोफत वाटप करावेसे असं मला वाटतं !”

“पंत, आत्ताच मी कुठला नवीन धंदा करून माझ्या संपत्तीत भर घालावी असं म्हटलं आणि तुम्ही मला छत्र्या मोफत वाटायला सांगताय ?”

“अरे माझं नीट ऐकून तर घे !”

“बरं पंत, बोला !”

“अरे मी मगाशी तुला म्हटलं ना, या पावसाळ्यात पण मुंबईच्या रस्त्यांच्या नद्या होणार आहेत म्हणून!”

“हॊ, पण हल्ली गेला बाजार प्रत्येकाकडे छत्री असतेच असते आणि नसेल तर रेनकोट तरी असतोच असतो !”

“ते माहित आहे रे मला, पण रस्त्याची नदी झाल्यावर या दोघांचा काही उपयोग आहे का सांग बरं मला मोऱ्या !”

“नाही, पुरुषभर पाण्यात तसा या दोघांचा काडीचा उपयोग नाही हे तुमचं म्हणणं खरं आहे पंत ! “

“हॊ ना, म्हणून तू आता पोहतांना शिकावू स्विमर जसे प्लास्टिकचा हवा भरलेला फ्लोट वापरतात त्याचा बिझनेस सुरु कर आणि एका फ्लोटवर एक छत्री मोफत दे, म्हणजे जोराचा पाऊस असेल तेव्हा लोकं छत्री वापरतील आणि…. “

“रस्त्यांच्या नद्या झाल्या तर फ्लोट वापरून लोकं आपला जीव वाचवतील, हॊ ना पंत ?”

“अगदी बरोबर मोऱ्या !”

“धन्य आहे तुमची पंत !”

© प्रमोद वामन वर्तक

३०-०६-२०२२

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ महिना अखेरचे पान – 6 ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? विविधा ?

महिना अखेरचे पान – 6 ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

ऋतू पावसाचा म्हणजे सृजनाचा, नवनिर्मितीचा!  ग्रीष्मातील मरगळलेल्या वातावरणातून बाहेर पडून पावसाच्या धारा बरसू लागल्या की निसर्गसंगीत कानावर पडू लागतं आणि पुन्हा आलेला हा पाऊस मन ओलचिंब करून टाकतो. याच दरम्यान शाळा सुरू होतात. नव्या वर्षाच्या स्वागताला , नवी पुस्तके, वह्या, दप्तरे सजून बसलेली असतात. बघता बघता पाऊस कोसळणं, मग त्यानं थोडी विश्रांती घेणं, मग पुन्हा बरसणं, हे सगळं कसं ठरल्याप्रमाणे  चालू असतं.

मे च्या अखेर पर्यंत एक दोन पाऊस झाले असले तरी मान्सूनचे वेध लागतात ते जूनच्या पहिल्या आठवड्यातच. जूनच्या म्हणजेच थोड्याफार फरकाने ज्येष्ठाच्या सुरूवातीला आकाशातील पांढरेशुभ्र ढग केव्हा निघून जातील आणि गडद निळे, सावळे मेघ केव्हा अवतरतील याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. नक्षत्रांच्या हिशेबाने आणि हवामान खात्याच्या अंदाजाने, पावसाच्याआगमनाचा मुहूर्त काढला  जातो. पण ब-याच वेळा तो पावसासारखाच बेभरवशाचा ठरतो.  

त्याच वेळेला आणखी एक गोष्ट अपरिहार्यपणे घडत असते. ती म्हणजे वर्षा सहलीची चर्चा. सुट्टीची संधी साधून किंवा मुद्दाम रजा काढून , ‘कुठतरी’  जाऊन यायचं हे तर ठरलेलंच. पण हे कुठतरी म्हणजे नक्की कुठं. ?आता पंचतारांकित

हाॅटेलांना  आणि शहरांना भेट द्यावी अशी कोणाचीही इच्छा नसते. इच्छा असते ती निसर्गरम्य वातावरणात मनसोक्त हिंडण्याची. निळ्याशार आकाशाखाली पसरलेल्या हिरव्यागार पसा-यात हरवून जाण्याची. कोसळणा-या धबधब्याखाली भिजण्याची.

अशा ओल्याचिंब महिन्यात आणखीही काही गोष्टी महत्वाच्या ठरतात. याच ज्येष्ठ किंवा जून महिन्यात महाराणा प्रताप आणि राजर्षी शाहू महाराज यांची जयंती असते. तर, राजमाता जिजाऊ, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची पुण्यतिथि असते. थोर समाजसुधारक आगरकर, पू. साने गुरुजी यांचे स्मृतीदिन आणि संत निवृत्तीनाथ व टेंबेस्वामी यांची अवतारसमाप्तीही याच महिन्यातील. शिवाय छ. शिवरायांचा राज्याभिषेक याच महिन्यात संपन्न झाला.

वटपौर्णिमेचे पारंपारिक व्रत आणि  त्यानिमीत्ताने वृक्षांचे महत्व समजून घेण्याचा आधुनिक दृष्टिकोन , वृक्षपूजनाच्या दिवशी याच महिन्यातील पौर्णिमेला सांगितला जातो. महाराष्ट्राच्या काही भागात बेंदूर म्हणजेच पोळा साजरा केला जातो. त्याला कर्नाटकी बेंदूर असेही म्हणतात. याच ज्येष्ठात पुढच्या महिन्यातीतल आषाढी एकादशीचे वेध लागलेले असतात. संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालख्यांनी प्रस्थान ठेवलेले असते. अवघा पालखी मार्ग विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमून जातो.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील काही महत्त्वाचे दिवस या जून महिन्यातही असतात. एक जून हा दिवस आंतरराष्ट्रीय पालक दिन म्हणून साजरा केला जातो . पालकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 1994पासून युनोने हा उपक्रम  सुरू केला.

तीन जून हा दिवस 2018 पासून आंतरराष्ट्रीय सायकल दिन म्हणून घोषित झाला आहे. व्यायामाचे महत्व पटवून देतानाच प्रदूषण टाळण्यासाठी जागृती करणे हा यामागचा उद्देश आहे. पर्यावरण रक्षण, संवर्धन याचे महत्व पटवून देण्यासाठी 1973पासून पाच जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. सात जून हा दिवस जागतिक अन्नसुरक्षा दिन म्हणून घोषित झाला आहे. प्रत्येक टप्प्यावर अन्न सुरक्षित राहीले पाहीजे. सुरक्षित अन्न म्हणजेच उत्तम आरोग्य. हे लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने हा उपक्रम हाती घेतला आहे. तसेच या संघटनेने दहा जून हा दिवस नेत्रदान दिन म्हणून जाहीर केला आहे. दृष्टीदोष व अंधत्व याविषयी जागृती करून दृष्टीहिनांना दृष्टी प्राप्त करून देणे यासाठी हा दिवस साजरा होतो.

आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने 2002पासून बारा जून हा दिवस आंतरराष्ट्रीय बालकामगार निषेध दिन म्हणून पाळण्यास सुरवात केली आहे. चौदा वर्षांखालील कामगार मुलामुलींना  बालकामगार म्हटले जाते. त्यांचे शोषण थांबवून ही प्रथा बंद व्हावी यासाठी लक्ष वेधून घेणे महत्वाचे आहे.

मातेप्रमाणेच आपल्या आयुष्यात पित्याचे असलेले महत्त्व लक्षात घेऊन पित्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पितृदिन साजरा होतो. भारतीय संस्कृतीत आपण माता पिता देवासमान वंदनीय मानतोच. पण पित्याविषयीची ही भावना सार्वत्रिकपणे व्यक्त करण्याची पद्धत प्रथम अमेरिकेत 1910पासून सुरू झाली. जून महिन्यातील तिसरा रविवार हा पितृदिन असतो.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविधतेने नटलेला असा हा जून (ज्येष्ठ)महिना. सृजनाशक्तीचा आविष्कार घडवणारा, पुन्हा नव्याने जगण्याची उमेद देणारा.

‘नेमेची येतो मग पावसाळा ‘ हे खरे आहेच. पण तो खर्या अर्थाने समृद्धी घेऊन येऊ दे एवढीच सदिच्छा !

© सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आषाढस्य प्रथम दिवसे ! ☆ श्री मिलिंद रतकंठीवार ☆

? विविधा ?

आषाढस्य प्रथम दिवसे ! ☆ श्री मिलिंद रतकंठीवार ☆

अगदी परवा, परवापर्यन्त, आमच्या बंगलीच्या टेरेसवरुन, हाताच्या अंतरावर ही आमच्या आवारातील, विविध झाडांच्या, हिरव्या रंगाच्या विविध छटा दर्शविणारी हिरवाई मला दिसत होती.

बांबूच्या झाडाच्या त्या फांद्यांना स्पर्श करावे, म्हटले तरी, अगदी पाय उंचावून उभे राहून देखील, त्या फांद्या मला स्पर्श करू देत नव्हत्या, वाऱ्याच्या हलक्याश्या झोताने, जवळ येऊन, वाकुल्या दाखवीत त्या पुन्हा दूर पळून जात होत्या. कितीतरी कधीही न बघितलेले, रंगबिरंगी पक्षी , मधूरगुज करीत होते. ते देखील, ह्या खोडीचा आनंद लुटत असावेत. नव्हे, नव्हे ते आनंदित होत होतेच.

पण आज….आज मी पाठमोरा उभा असताना, त्या बांबूच्या एका फांदीची धारदार, इवलीशी, लवलवती पाती वाऱ्याच्या हलक्याशा गार झोताने आपणहून जवळ येऊन, मस्त मस्त, डोलत डोलत, माझ्या मानेला,पाठीला अन् खांद्याला करवती सारखा क्षणिक, खरखरीत स्पर्श करून पट्कन माघारी जात होती.

अशी माझी खोडी काढून ती पाने माझे लक्ष वेधू इच्छीत होती कां?

बांबूची ती तरारणारी, थरथरणारी, धारदार पाती, अंगाला, थरथरत, थरथरत बोचरा स्पर्श करून काही सुचवू इच्छीत होती कां?

त्या बरोबरच, जांभुळाची ती गर्द हिरवी, आकाराने लहान चमकदार, लकाकणारी दाट पाने, मला आज शांत, संयमी, धीरोदात्त अशीच भासत होती.

त्यातच, दोन्ही झाडांच्या फांद्यात, तो गुंतून, तजेलदार पानापानांतून, फुलणारा टप्पोरा पांढरा शुभ्र चाफा, सर्वांच्या अध्ये मध्ये, फांद्या फांद्यांच्या गर्दीत, गुंतत अन् गुंफत आपला हर्षोल्लास अभिव्यक्त करीत, आपली सुखद उपस्थिती नोंदवून, आपले अस्तित्त्व दर्शवीत होता. एखाद्या लहान खेळकर, खोडकर, मुलाने , फोटो काढताना जसे मध्ये मध्ये, उड्या मारीत, माझा पण, माझा पण, असा हट्ट करावा अगदी तस्साच..उनाड !

आणि, ….आणि आमच्या आवारातील, ह्या तिघांच्या, बरोबरीने एका कडेला उभा असलेला तो एकाकी शांत, धीरोदात्त, नारळाचा वृक्ष… श्री वृक्ष.! कडेवर अनेक श्री फलांचे ओझे सहजी घेत तो लेकुरवाळा निर्विकार उभा होता. हत्तीच्या कानाच्या, मंद हालचालीप्रमाणे, त्या श्री वृक्षाच्या मोठ्ठाल्ल्या झावळ्या, हळू हळू, डुलत होत्या. अन् तो, तटस्थपणे ध्यानस्थ होऊ पाहणारा, मौन, शांत, तृप्त, अन् पोक्त तपस्वी श्रीवृक्ष ,अध्यात्मिक अनुभूती दाखवीत होता .

अचानकच काही दिवसातच झालेला हा बदल मी उत्सुकतेने न्याहाळीत होतो.

अन् लाजत, मुरडत, चाहूल न जाणवू देत, ती संध्याकाळ आली. पक्षी थव्या थव्याने पश्चिम दिशेला परतीला जाऊ लागले. मावळतीला जाणाऱ्या त्या, तेजोगोलाची सुवर्णमय किरणे, इमारती, इमारतीवर, हिरवाई, हिरवाईवर अंकित होत, होत पसार होवू लागली, त्या बरोबरच पित प्रकाशाने न्यालेली पाने, हळूहळू कडेकडेने स्वर्णांकित होत, उर्ध्व दिशेने वेगाने जाऊ लागली. आवारातील चारही झाडांच्या फांद्या एकमेकांना स्पर्शून, जणू खांद्याला खांदा लावून, लयबद्ध, डोलत डोलत, गात गात एकमेकांच्या भावनांना मम् म्हणत होत्या.

हे एक त्यांचे समूह गानच असावे, नाही ? की ती एक सामूहिक सरगम असेल ? कारण, मी बघितले, सर्वच भवताल आनंदाने डोलत होता. सर्वच परिवेश उल्हासित होत होता. दृष्टी क्षेपातील, सभोवतालची सर्वच हिरवाई जणू पाय स्थिर ठेऊन ,शरीर, मनाने डोलत होती. तन्मयतेने नृत्य करीत होती. मनोमन मी ही न डोलतो तर नवल !
पण मग हा अधिरपणा कां? कशासाठी ? कशाची वार्ता? कुणाच्या स्वागताची तयारी?

पण, दुजोरा दिला…

त्या येणाऱ्या पश्चिमेच्या गार वाऱ्याने, अस्मानातील त्या ढगांच्या हालचालींनी, दूरवर वाजणाऱ्या त्या नगाऱ्याने… वार्ता दिली..

हो ! त्या आषाढाची, नेमेची येणारी पहिली सर झेलण्यासाठी होता तर एवढा खटाटोप ?

ती समर्पिता, तप्त धरित्री ग्रीष्म ऋतुचा एवढा ताप झेलल्यानंतर, एक दिलासा मिळविण्यासाठी, एक दिलासा देण्यासाठी, मृद्गंध प्रसृत करण्यासाठी, ती हिरण्मयी देखील आतुर झालेली आहे. हे त्या हिरवाईच्या स्पर्शा स्पर्शातून, चर्ये,चर्येतून सुचवीत होती.

हो, त्या सरींच्या आगमनाची प्रतीक्षा आहे तर,,!

त्या पहिल्या वहिल्या सरीची सर कशालाच नाही. ती पायाला नुपूर बांधून थुई थूई नाचणारी, पहिली सर! त्यात भिजून नाचणारे ते शैशव ! ती शब्दात व्यक्त न झालेली, पहिल्या वहिल्या कोवळ्या प्रेमाची अनुभूती अन् अभिव्यक्ती !

त्या मृण्मयीचा, तो सर्वत्र दरवळणारा हिरण्मयी मृद्गंध !

त्या सरीची, त्या क्षणाची आतुरतेने सर्व वाट बघत आहेत.

आम्ही देखील…

© श्री मिलिंद रतकंठीवार

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ निसर्गायन – कावळा आणि कोकीळ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

? विविधा ?

☆ निसर्गायन – कावळा आणि कोकीळ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

कोकिळेचा आवाज कोणाला आवडत नाही ? मला संगीतातलं ज्ञान नाही. पण असं म्हणतात की कोकिळा पंचम स्वरात गाते . मग निसर्गातील हा कोकिळास्वर ऐकून संगीतातही पंचम स्वर निर्माण झाला असावा. वसंत ऋतूत आणि पावसाळ्याच्या आरंभी कोकिळेची मधुर तान आपले मन मोहून घेते. मराठी आणि हिंदी चित्रपटात कोकिळेवर कितीतरी गीते आहेत. कितीतरी कविता आहेत. सुवर्ण सुंदरी या चित्रपटात लता मंगेशकर आणि मो. रफी यांनी गायिलेले ‘ कुहू कुहू बोले कोयलिया..’ हे गीत राग यमन, राग बहार, राग जौनपुरी आणि राग सोहनी या रागामंध्ये बद्ध आहे. १९५७ मध्ये आलेल्या सुवर्ण सुंदरी या चित्रपटातले हे गीत आजही ताजे टवटवीत वाटते. 

पण मंडळी, खरंच कोकिळा गाते  ? नाही. खरं म्हणजे गातो तो कोकीळ पक्षी. पण लहानपणापासून आपण कोकिळा गाते असं ऐकत आलो, त्यामुळे आपला तो समज दृढ होऊन बसतो.  तुम्ही कदाचित हेही कधी ऐकलं असेल की कोकिळा हा अत्यंत आळशी पक्षी आहे. तो म्हणजे ती आपली अंडी कधीही स्वतः उबवत नाही. ती आपली अंडी कावळ्याच्या घरट्यात ठेवून येते. पण ही एक गमतीदार कथाच आहे. साधारणपणे पावसाळ्याच्या सुरुवातीला कावळे आणि कोकीळ यांचा विणीचा हंगाम सुरु होतो. याच काळात कोकिळा आणि कावळीण सुद्धा अंडी प्रसवतात. कोकीळ आणि कावळे हे तसे एकमेकांचे शत्रू. पण निसर्गाची किमया बघा. कावळीण आपल्या शत्रूच्या पिलांची अंडी तिच्या घरट्यात मोठ्या प्रेमाने उबवते. कसं घडतं हे ? 

कावळे आणि कोकीळ यांचा निवास हा साधारणपणे बागा , उद्याने अशा नागरी वस्तींजवळ असलेल्या ठिकाणी असतो. आमराईमध्ये असतो किंवा तशाच झाडांमध्ये असतो.  जेव्हा कोकीळ पक्षी गाऊ लागतो, तेव्हा कावळ्यांना ते सहन होत नाही. आणि ते गाणाऱ्या कोकीळ पक्ष्याला सगळे मिळून हुसकावून लावतात. कोकिळा मोठी हुशार. या कालावधीत कावळ्यांच्या घरट्यात कोणी नाही असे पाहून ती आपले अंडे तेथे ठेवून देते. आणि कावळिणीला  शंका येऊ नये म्हणून तिची काही अंडी खाली ढकलून देते. कोकीळ पक्ष्याला हुसकावून लावून परत आलेल्या कावळा आणि कावळिणीच्या लक्षात ही गोष्ट येत नाही. आणि ती दोघं मोठ्या प्रेमाने ती अंडी उबवतात. आता ही अंडी उबवताना निसर्ग कशी किमया करतो ते बघा. जे कोकीळ पक्ष्याचे गाणे सुरुवातीला कावळा आणि कावळिणीला नकोसे होते, तेच गाणे आता अंडी उबवताना त्यांना हवेहवेसे वाटते. आणि तो कोकीळ पक्ष्याचा मंजुळ स्वर ऐकत त्यांची अंडी उबवण्याची क्रिया छान रमतगमत पार पडते. 

अंडी उबवताना कावळा आणि कावळीण एकमेकांना सहकार्य करतात. जेव्हा कावळीण अंडी उबवत असेल तेव्हा,  कावळा जवळ बसून अंडी आणि पिलांचे रक्षण करतो. कधी कधी कावळीण चारा आणण्यासाठी किंवा अन्नाच्या शोधात बाहेर जाते, तेव्हा कावळा घरट्यात बसून ती अंडी उबवतो.  अशा रीतीने अंड्यांमधून पिलं बाहेर येईपर्यंत दोघांचं एकमेकांना सहकार्य असते. एकदा पिलं मोठी झाली की कावळा आणि कावळीण ते घरटं सोडून निघून जातात. माणूस जसा शेवटपर्यंत आपल्या घरातच राहतो, तसे पक्षी कायम स्वरूपी आपल्या घरट्यात राहत नाहीत. इतर वेळी झाडांवर, डोंगरांच्या कडेकपारीत त्यांची वस्ती असते. आपण लहानपणी गोष्टीत किंवा गाण्यात ऐकलेलं असतं की सकाळी पक्षी चरण्यासाठी बाहेर पडतात आणि संध्याकाळ झाली की आपल्या घरट्याकडे परत फिरतात. ‘ या चिमण्यांनो परत फिरा रे, तिन्ही सांजा जाहल्या ‘  हे गाणे आपल्याला माहिती आहे. पण हे अर्धसत्य असते. जोपर्यंत पिलं घरट्यात असतात, तोपर्यंत ते घरट्याकडे परततात. नाहीतर त्यांची वस्ती झाडांच्या फांद्यावर, ढोलीत, फांद्यांच्या बेचक्यात असते. 

निसर्गात सर्व घटकांचे एकमेकांना कसे सहकार्य असते, ते पाहण्यासारखे आहे. वास्तविक कावळे आणि कोकीळ हे एकमेकांचे शत्रू असलेले  पक्षी. पण निसर्ग त्यांच्याकडून आपले काम करून घेतो.  कावळीण आणि कोकिळा या दोन्ही मादी पक्षी. दोन्हीही आईच्या भूमिकेत असतात. कोकिळा  जरी अंडी देते आणि ती उबवत नसली, तरी तिला आपल्या पिलांची काळजी असतेच. म्हणूनच ती आपली अंडी कावळिणीच्या घरट्यात गुपचूप ठेवून येते. ती असे का करते ? तिची अंडी स्वतः का उबवत नाही ? तर ही तिची नैसर्गिक प्रेरणा असते. आणि कावळीण सुद्धा आईच. ती सुद्धा मोठ्या प्रेमाने आपल्या घरट्यातील अंडी उबवते. आपल्या अंड्यांमध्ये काही अंडी कोकिळेची आहेत, हे कदाचित तिला लक्षात येत नसावे, पण सगळीच अंडी ती मायेने उबवते. पिलांना भरवते. हे करताना तिच्यामध्ये आपलेपणा अथवा परकेपणा नसतो. म्हणजे पिलांमध्ये ती भेदभाव करीत नाही. 

आपल्याला कोकिळा आवडते. कावळा आणि कावळीण आपले नावडते प्राणी. कोकिळा म्हणजे कोकीळ पक्षी आपल्याला का आवडतो, कारण तो मधुर गातो म्हणून. पण कावळा काय आणि कोकिळा काय हे दोघेही निसर्गाचे घटकच . त्यांची प्रत्येकाची भूमिका निसर्गचक्रात महत्वाची असते. कावळा हा पर्यावरण स्वच्छ ठेवणारा पक्षी.

पण आपण औद्योगिक प्रगती, वाढणारी शहरे, नष्ट होणारी जंगले, पक्ष्यांचा नष्ट होणारा नैसर्गिक निवास इ मुळे आता कावळ्यांची संख्या कमालीची कमी झाली आहे. या निसर्गाच्या सफाई कामगाराला आपण हद्दपार केले आहे. लहान मुलांना गोष्ट सांगताना आपण चिमणीचं घर होतं मेणाचं आणि कावळ्याचं घर होतं शेणाचं इ सांगून लहान मुलांच्या मनात या अत्यंत उपयोगी प्राण्याबद्दल आपण अढीच निर्माण करतो, नाही का ?  कावळ्याच्या काळ्या रंगात आणि कोकिळेच्या काळ्या रंगात सुद्धा तेवढेच सौंदर्य आहे, की जेवढे मोर, बगळा आणि इतर पक्ष्यांच्या रंगात आहे हे आपण मुलांना कधी शिकवणार ? पौर्णिमेची रात्र जेवढी सुंदर असते, तेवढीच सुंदर अमावास्येची रात्र सुद्धा असते. तुमच्याकडे सौंदर्य शोधण्याची नजर हवी. आणि ती नजर आपण विकसित करायला हवी. सौंदर्य फक्त गोरेपणा किंवा काळेपणात नसते. ते पाहणाऱ्याच्या नजरेत असते. पण लहानपणापासून चुकीच्या कल्पना मनावर बिंबवल्या जातात. सगळे रंग निसर्गानेच निर्माण केले आहेत. हे जर आपण निसर्गातून शिकणार नसू, तर आपल्या शिक्षणाचा काय उपयोग ? आपण निसर्गाला जेव्हा समजून घेऊ तेव्हा तो केवळ रंगांचे सौंदर्याच आपल्याला शिकवील असं नाही, तर तो विचारांचंही सौंदर्य आपल्याला प्रदान करील. आणि आपल्याला तेच हवं आहे. 

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग 23 – १. केल्याने देशाटण .. ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग 23 – परिव्राजक –१. केल्याने देशाटण .. ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

तीर्थंभ्रमणाला निघायच्या आधी पण नरेंद्रनाथ आंटपूर, वैद्यनाथ, शिमूलतला इथे कित्येकदा आले होते. उजाडल्यानंतर सूर्य किरणे सर्व दिशांना पसरतात हे सांगायची गरज नसते. तसे स्वामीजी जिथे जिथे जातील तिथे तिथे प्रभाव पाडत असत. असाच अनुभव ते फिरलेल्या प्रत्येक प्रांतात दिसतो. बिहार प्रांत फिरत फिरत ते हिंदू भारतभूमीचं हृदय समजल्या जाणार्‍या काशीला आले. इथे ते संस्कृत भाषेचे पंडित आणि साहित्य व वेदांत पारंगत असलेले सद्गृहस्थ श्री प्रमदादास मित्र यांच्याकडे राहिले. स्वामीजींना त्यांच्या विद्वत्तेबद्दल आदरभाव वाटू लागला. पुढे पुढे तर ते वैदिक धर्म आणि तत्वज्ञान याबद्दल काही शंका असली की ते प्रमदादास यांना पत्र लिहून विचारात असत. आपले आजोबा दुर्गाप्रसाद हे संन्यास घेतल्यावर काशीत आले होते. श्रीरामकृष्ण पण इथे येऊन गेले होते. तिथे मद्रासी, पंजाबी, बंगाली, गुजराथी, मराठी हिंदुस्तानी अशी प्रभृती सर्वजण, आचारांची भिन्नता असूनही एकाच उद्देशाने विश्वेश्वराच्या मंदिरात एकत्र येत असत. यात नरेंद्रनाथांना या विविध लोकांमधला ऐक्याचा विशेष गुण भावला. म्हणूनच त्यांना सगळीकडे फिरून भारत जाणून घ्यावसा वाटला होता.

शिवाय इंग्रजांची सत्ता, गुलामी असताना वर्तमान अवस्थेत, देशातील आध्यात्मिक संस्कृती कशी आहे, सामान्य लोक कसे जगताहेत? शिक्षणाची काय परिस्थिति आहे? सनातन धर्म सगळीकडे कसा आहे? याची सगळीकडे हिंडून माहिती करून घ्यावीशी वाटली. त्यासाठी ते इथून निघून कन्याकुमारी पर्यन्त शहरे, खेडी, विविध लोक, शेतकरी, गरीब, दीन दुबळे, राजे रजवाडे, संस्थानिक आणि जे जे आवश्यक त्यांच्या भेटी घेत अवलोकन करता करता भ्रमण करत होते.

उत्तरेत फिरून झाल्यावर ते शरयू तीरावरच्या अयोध्येला येऊन पोहोचले. काशी आणि अयोध्या ही धर्मक्षेत्र होती. त्यामुळे स्वामीजींचे आध्यात्मिक मन तिथे रमले. ‘अयोध्या’ जिच्या मातीशी सूर्यवंशी राजांच्या गौरवाची स्मृती जोडलेली आहे. शरयू नदीच्या तीरावरून आणि घाटावरील विविध मंदिरातून फिरतांना त्यांच्या डोळ्यासमोर प्रभू श्रीरामचंद्रांचे चरित्रच उभे राहिले. आदर्श राजा, आदर्श पुत्र, आदर्श पती, आदर्श भाऊ, अशा प्रभू श्रीरामचंद्राच्या अयोध्येत आल्याबरोबरच त्यांना लहानपणची रामसीतेची भक्ती, रामायण प्रेम, वीरभक्त श्री हनुमानवरची गाढ श्रद्धा आणि आईच्या तोंडून ऐकलेल्या रामाच्या कथा सारे सारे आठवले असणारच. काही दिवस इथे त्यांनी रामायत संन्याशांच्या समवेत श्रीरामनामसंकीर्तनात घालवून पुढे ते ऑगस्ट१८८८ मध्ये लखनौ- आगरा मार्गाने पायी पायी चालत वृंदावनच्या दिशेने निघाले.    

लखनौला त्यांनी बागा, मशिदी, नबाबाचे प्रासाद बघितले. आग्र्याला आल्यावर तिथल्या शिल्प सौंदर्याचा जगप्रसिद्ध नमुना ‘ताजमहाल’ मोगलकालीन इमारती, किल्ले पहिले.  मोगल साम्राज्याचा इतिहास त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहिला. लखनौ आणि आग्रा या ऐतिहासिक स्थळं सुद्धा  त्यांच्या मनात भरली. कारण ती भारताच्या इतिहासाच्या पर्वाची महत्वाची खूण होती आणि स्वामीजी त्याबद्दल पण जागरूक होते. म्हणून एक वैभवशाली साम्राज्याची स्मृती म्हणून ते पाहत होते.

शिवाची काशी पाहिली, श्रीरामची अयोध्या पाहिली आता भगवान श्री कृष्णाच्या वृंदावनला स्वामीजी  पोहोचले. राधा कृष्णाची लीलाभूमी असलेल्या वृंदावनात, मर्यादित परिसरात असलेले विविध प्रकारचे, भिन्न काळात बांधले गेलेले वास्तूकलेचे, अनेक मंदिरांचे नमुने त्यांना पाहायला मिळाले. वृंदावनला ते बलराम बसुंच्या पूर्वजांनी बांधलेल्या कुंजामध्ये राहिले. तिथे यमुनेच्या वळवंटात असो की भोवताल च्या परीसरात असो सगळीकडेच, श्रीकृष्णाच्या बासरीचा मधुर ध्वनी येतोय असे वाटावे अशा काव्यात्मक आणि भक्तिपूर्ण वातावरण त्यांनी अनुभवले. गोवर्धन पर्वताला त्यांनी प्रदक्षिणा घातली. तेंव्हाच त्यांनी मनाशी संकल्प केला की, कोणाकडेही भिक्षा मागायची नाही. कोणी आपणहून आणून दिले तरच त्या अन्नाचा स्वीकार करायचा. हे बिकट व्रत त्यांनी घेतले. एकदा तर त्यांना पाच दिवस उपाशी राहावे लागले होते. पण इथे त्यांनी दोन वेळा परमेश्वर भक्तीचा ईश्वरी अनुभव घेतला आणि श्रीकृष्णाची भक्ती आणखीनच दृढ झाली.

पुढे ते हरिद्वारला गेले. वाटेत जाता जाता ते हाथरस च्या स्थानकावर बसले असताना, त्यांना थकलेल्या अवस्थेत स्थानकाचे उपप्रमुख असलेले शरदचंद्र गुप्त यांनी पाहिले. आणि, “स्वामीजी आपल्याला भूक लागलेली दिसते आपण माझ्या घरी चलावे” अशी विनंती केली. स्वामीजींनी लगेच हो म्हटले आणि त्यांच्या घरी गेले. स्वामीजींचे व्यक्तिमत्व बघून शरदचंद्र गुप्त आकर्षित झाले होते , त्यांनी स्वामीजींना काही दिवस इथे राहावे असा आग्रह केल्याने ते खरच तिथे राहिले. सर्व बंगाली लोक संध्याकाळी एकत्र जमत. आपला धर्म आणि समाज यावरील सद्यस्थितीबद्दल  स्वामीजी बोलत. आपल्या मधुर आवाजात गीतं म्हणत. येणारे सर्व बंगाली मोहित होऊन जात. त्यांच्यातील भांडणे जाऊन एकोपा निर्माण झाला. 

एकदा चिंतेत असताना शरदचंद्रांनी स्वामीजींना पाहिलं आणि विचारलं, “आपण एव्हढे कसल्या विचारात आहात?” स्वामीजी म्हणाले, “मला खूप काम करायचं आहे. पण माझी शक्ती कमी. काम मोठं आहे. मातृभूमीचं पुनरुत्थान घडवून आणायच आहे. तीचं आध्यात्मिक सामर्थ्य क्षीण झालं आहे. सगळा समाज भुकेकंगाल आहे. भारत चैतन्यशाली झाला पाहिजे. अध्यात्मिकतेच्या बळावर त्यानं सारं जग जिंकलं पाहिजे”. अशा प्रकारचे संवाद होत होते. चर्चा होत होत्या. काही दिवसांनी  स्वामीजी तिथून निघतो म्हटल्यावर, शरदचंद्र जाऊ नका म्हणून विनवणी करू लागले आणि ‘मला आपला शिष्य करून घ्या’ असेही म्हणू लागले. तुम्ही जिथं जाल तिथं मी तुमच्या मागोमाग येईन हा त्यांचा दृढ निश्चय ऐकून, “शेवटी तुम्ही माझ्याबरोबर येण्याचा आग्रहच धरता आहात तर घ्या हे भिक्षा पात्र आणि स्थानकातले जे हमाल आहेत त्यांच्या दरात जाऊन भिक्षा मागून आणा” असे स्वामीजी म्हटल्याबरोबर, शरदचंद्र तडक उठले आणि भिक्षा पात्र घेऊन सर्वांकडून भिक्षा मागून आणली. स्वामीजी अत्यंत खुश झाले. त्यांनी शरदचंद्रांचा शिष्य म्हणून स्वीकार केला. असे शरदचंद्र गुप्त हे स्वामीजींचे पहिले शिष्य झाले, आणि मातापित्यांचा आशीर्वाद घेऊन, नोकरीचा राजीनामा देऊन, स्वामीजीं बरोबर ते हाथरस सोडून हृषीकेशला आले. त्यांचे नाव स्वामी सदानंद असे ठेवण्यात आले. असा सुरू होता स्वामीजींचा प्रवास .

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares