सौ राधिका भांडारकर
☆ “चला बालीला…” – भाग – ७ ☆ सौ राधिका भांडारकर ☆
आज सकाळीच सतीश ने टी टेबलवर एक मस्त एक्सायटिंग घोषणा केली. “आजचा कार्यक्रम आहे बाली हाय क्रुझ. आपण सनसेट डिनर क्रुझ बुक केली आहे.”
वाॅव! बाली आणि समुद्र सफारी शिवाय परतायचे हे केवळ अशक्य!
बाली बेनोवा बंदर (जिथून आमची क्रुझ सुरू होणार होती) आमच्या वास्तव्यापासून एक-दीड तासाच्या अंतरावर होते. आम्हाला बाली हाय क्रुझतर्फे पिक अप आणि ड्रॉप होता. दुपारी साडेतीन वाजता आम्ही निर्गमन करणार होतो त्यामुळे सकाळी आम्ही बरोबर आणलेले थेपले, दशम्या, बेसन वड्या, चिवडा, घारगे असे विविध पदार्थ खाऊन लाईट (?) लंच घेतले. बऱ्याच दिवसांनी पत्ते खेळलो, डॉब्लर्स नावाचा एक लहान मुलांचा पण अतिशय गमतीदार असा मानसिक तत्परता वाढविणारा खेळही खेळलो. OLDAGE IS DOUBLE CHILDHOOD चाच जणू काही अनुभव घेतला म्हणा ना!
बरोबर साडेतीन वाजता आमची सहा जणांची रंगीन टीम मस्त नटून थटून बेनोवा बंदरकडे जायला तयार झाली. आमची पिकअप कार आलेलीच होती. नेहमीप्रमाणेच गणवेशातला रुबाबदार हसतमुख पण नम्र ड्रायव्हर स्वागतास तयार होताच.
रस्त्यावरून जाताना प्रमोदच्या आणि ड्रायव्हरच्या नेहमीप्रमाणेच मस्त गप्पा चालू होत्या. भाषेचा अडसर कसाबसा पार करत गप्पा रंगल्या होत्या. तो सांगत होत, “इंडोनेशियामध्ये ८७% मुस्लिम आहेत पण बाली हे एकमेव असे बेट आहे की इथे ९०% हिंदू धर्मीय आहेत. हिंदू देवदेवतांची पूजा करणारे आहेत आणि हिंदू धर्माचा अभिमान बाळगणारे आहेत. घरोघरी हिंदू रिती परंपरा येथे पाळल्या जातात.”
अशा रितीने गप्पागोष्टी करत, फळाफुलांनी नटलेली वनश्री पहात, चौका-चौकातली शिल्पे आणि वास्तुकलेचे भव्य दर्शन घेत आम्ही बेनोवा बंदर वर पोहोचलो. तिथले वातावरणच पर्यटन पूरक होते. सागर किनाऱ्यावर अनेक लहान-मोठी जहाजे नांगर टाकून उभी होती. आमच्यासारखेच अनेक उत्सुक पर्यटक देशोदेशाहून तिथे आलेले होते.अर्थात सारेच अत्यंत उत्साही आणि आनंदी मूडमध्ये होते. आमची सनसेट डिनर क्रुझ संध्याकाळी साडेपाचला सुटणार होती. जवळजवळ साडेतीन तासाची समुद्रसफर होती आणि डिनरसह संगीत, नृत्य असा भरगच्च कार्यक्रम बोटीवर असणार होता. तत्पूर्वी आम्हाला तिथे एक मधुर, शीतल स्वागत पेय देण्यात आलं. काउंटर वर आम्ही आमची तिकिटे घेतली प्रत्येकी ११ लाख इंडोनेशियन रुपये! जवळजवळ प्रत्येकी साडेसहा हजार भारतीय रुपये. सर्व कारभार अतिशय शिस्तपूर्ण आणि नीटनेटका होता. सगळ्यांना सांभाळून बोटीपर्यंत नेले जात होते. रुबाबदार वातावरण, सुसज्ज रेस्टॉरंट,सागराचं आणि आकाशाचं खुलं दर्शन देणारा मस्त सुरक्षित डेक आणि सोबतीला हलकेच बालीनीज पारंपारिक वाद्य संगीत. एका वेगळ्याच वातावरणात गेल्याचा अनुभव आम्हाला मिळत होता.
ठीक साडेपाच वाजता बोटीने किनारा सोडला आणि त्या हिंदी महासागरातली ती अविस्मरणीय सफर सुरू झाली. निळे व्योम आणि आप या निसर्गतत्त्वांचा किती अनाकलनीय परिणाम मनावर होतो हे प्रत्यक्ष अनुभवत होतो. काही वर्षांपूर्वी आसाम मध्ये ब्रह्मपुत्रा नदीच्या दर्शनाने जी समाधीस्थ अवस्था काही क्षणापुरती का होईना पण जाणवली होती अगदी तशीच या सागर दर्शनाने पुनश्च जाणवत होती.” सागरा प्राण तळमळला.. सागरा…” अगदी नेमके हेच वाटत होते. खरं सांगू ?निसर्ग इतका अथांग, अफाट असतो की आपलं अस्तित्व त्याच्यासमोर फक्त कणभराचंच असल्यासारखं वाटतं! निसर्गासमोर सारं “मी पण” अहंकार, गर्व स्वतःविषयीच्या कल्पना, (गैर) सारं सारं काही क्षणात गळून पडतं. मनाच्या खोल गाभाऱ्यात “कोहम” नाद घुमत राहतो.
आता माथ्यावरील निळ्या आकाशातले रंग बदलू लागले होते. बोट समुद्राच्या मध्यभागी आलेली होती. किनाऱ्यावरची घरे आणि हळूहळू पेटत चाललेले दूरचे दिवे हे सुद्धा खूप आकर्षक भासत होते.पश्चिम दिशेला ढळणार्या सूर्याने आकाशात केशरी, जांभळे रंग, उधळले होते मावळणाऱ्या सूर्यकिरणांतून पाण्यावर हलकेच तरंगणारे ते सोनेरी रंग पाहतांना कुसुमाग्रजांच्या कवितांच्या ओळी आठवल्या.
आवडतो मजला अफाट सागर
अथांग पाणी निळे
निळ्या जांभळ्या जळात केशर
सायंकाळी मिळे..
हवेतला तो गुलाबी गारवा! स्तब्ध होत होतं सारं.. मन, डोळे जणूं अमृत प्राशन केल्यासारखे तृप्त होत होते. हलके हलके काळोखात बुडत चाललेला दिवस जणू काही उद्याचा नवा प्रकाश घेऊन येण्याचं आश्वासन देऊनच परतत होता. थोड्यावेळापूर्वीचा प्रकाशातला तो रोमँटिक निसर्ग कसा नि:शब्दपणे गूढ होत चालला होता.
ठीक साडेसात वाजता क्रुझ वर डिनर सुरू झाले. सोबत मस्त संगीत. आमच्याबरोबरचे युवक— युवतींचे मेळावे अगदी धुंद, उत्तेजित झाले होते. आणि त्यांच्या समवेत त्यांना पाहताना नकळत आम्ही आमच्या गतकाळात जात होतो. कुठेतरी आजच्या आणि कालच्या काळाशी तुलनाही करत होतो. पण त्या क्षणी मात्र त्यांचं हे तारुण्य, जगणं, जीवन साजरं करणं पाहून निश्चितच हरखूनही गेलो होतो. त्यांचा प्रवास आमचा प्रवास निराळा होता. त्यांचं बाली पर्यटन आणि आमचं बाली पर्यटन यात खूप फरक होता. फरक ऊर्जेचा होता, मस्ती, भोगणं इतकच नव्हे तर खाण्यापिण्यातलाही होता. भरभरून जगणं आणि खूप काही जगून झाल्यानंतरच जगणं यातला फरक होता. समान फक्त एकच होतं. अनुभव. आनंदाचा, रिफ्रेश होण्याचा, रिक्रिएशनचा.
भरभरून खायला होतं. गरमागरम, आकर्षक आणि चविष्ट पदार्थांची रेलचेल होती.शौकीनांसाठी जलपानही होते. एकंदरच इंडोनेशियन जेवणाचा थाट औरच होता. उत्सुकतेपोटी आम्ही निरनिराळे पदार्थ चाखून पाहिले. काही आवडले, काही बेचव वाटले. पण एकंदर अन्नसेवनाचा यज्ञ कर्म मजेत पार पडला.
त्यानंतर खास क्रुझ वरील सर्व पाहुण्यांसाठी मनोरंजनाचा कार्यक्रम होता. अर्थातच संगीत आणि नृत्य. मुळातच बालीयन हे कलासक्तच आहेत. संगीत, नृत्य, नाट्य, अभिनय हे त्यांच्या धमन्यातूनच वाहत असावं.
बालीनीज नृत्य पाहण्याची आम्हालाही फार उत्सुकता होती.
बालीनीज नृत्य हे लोक परंपरेचं प्रतीक आहे. शास्त्रोक्त पद्धतीची ती एक अतिशय मनोरम अशी नृत्यकला आहे. बालीनीज नृत्याच्या माध्यमातून नाट्यमयरीत्या हिंदू परंपरा, तसेच रामायण— महाभारतातील कथांची अतिशय मनोहारी मांडणी केली जाते. अनेक वाईट गोष्टींचे, विकारी वृत्तींचे (एव्हिल स्पिरिट्स) दमन हा विषय या नृत्याच्या माध्यमातून अतिशय प्रभावीपणे सादर केला जातो. या संपूर्ण नृत्यात हस्त,पाद, मान, बोटे, डोळे यांच्या कलापूर्ण हालचालीतून प्रेक्षकांसमोर पौराणिक कथा उलगडत जाते. चांगल्या गोष्टींचा वाईट गोष्टींवर, सत्याचा असत्यावर, देववृत्तीचा असुर वृत्ती वर विजय कसा होतो याचं अत्यंत आकर्षक देहबोली आणि मुद्राभिनयातून केलेलं प्रकटीकरण पाहताना प्रेक्षक थक्क होतात.
या बालीनीज नृत्या मागे अनेक वर्षांचा इतिहासही आहे. पंधराव्या शतकापासून बालीनीजची सांस्कृतिक परंपरा काहीशी बदलू लागली आणि हिंदू धर्मीय एक प्रकारच्या या नृत्य कलेतून एकत्र यायला लागले, अधिक जोडले जाऊ लागले.
तसे या शास्त्रोक्त पारंपारिक नृत्याचे अनेक प्रकार आहेत बारोंग, फ्रॉग, जॉग, जेगॉग,लेंगोंग काकॅक वगैरे. आणि प्रत्येक नृत्य प्रकारची वैशिष्ट्ये निराळी आहेत. विषय निराळे आहेत, पोशाख वेगळे आहेत. आमच्यासमोर बोटीवर जे नृत्य सादर होत होते ते बारोंग प्रकारातले होते.यात राधाकृष्णाची प्रेमलीला होती.
पुरुष आणि स्त्रियांचा नृत्य करताना परिधान केलेला पोशाख ही आकर्षक होता. या पोशाखाचे दोन भाग असतात. वरचा व खालचा कमरेपासून पायापर्यंतचा. वरच्या भागाला सॅश म्हणतात व खालच्या भागाला केन म्हणतात. संपूर्ण पोशाखाला साबुक असे म्हणतात. आणि प्रामुख्याने कपड्याचा रंग सोनेरी असतो. डोक्यावर टोपेग नावाचा लाकडी कला कुसरीचा मोठा गोल मुकुट असतो. बाकी गळ्यात, हातात केसात, फुलांच्या,खड्यांच्या माळा घातलेल्या असतातच. नाचताना त्यांच्या हातात कधी पंखे, कधी फुलांच्या कुंड्याही असतात. एकंदर हा डान्स अतिशय नयनरम्य असतो. हे नृत्य बघत असताना मला केरळमधील कथकली, मोहिनीअट्टम किंवा ओडिसी नृत्याची प्रामुख्याने आठवण झाली. देशोदेशीच्या कला कुठेतरी समानतेच्या धाग्याने जोडलेल्या असतात हे नक्कीच.
तर मित्रांनो!अशा रितीने चौफेर आनंदाचा अनुभव घेत आम्ही रात्री अकरा वाजता घरी परत आलो.आमच्या बाली सफरीचा हा समारोपाचा टप्पा होता. दुसऱ्या दिवशी दुपारी एक वाजता आमची परतीची फ्लाईट होती.डेनसपार ते सिंगापूर ते मुंबई.
बाली बेटावरचा अविस्मरणीय आनंदाचा अनुभव घेऊन आता भारतात परतायचे होते. या आठ दिवसात इंडोनेशियातील बाली या निसर्गरम्य बेटाशी आमचं एक आनंददायी आणि भावनिक नातच जुळून आलं होतं. इथला निसर्ग, हिंदी महासागराचे विहंगम नजारे, इथली संस्कृती, परंपरा, कला आणि माणसं यांच्याशी एक रेशीम धागा नकळत जुळला गेला होता.
बाली हे जसं देवांचं बेट तसं बाली हे स्वप्नांचंही बेट आहे. इथे प्रत्येकासाठी काहीतरी आहे. शांतता आणि विश्रांतीच्या शोधात आलेल्या पर्यटकांसाठी समुद्राच्या लाटा पाहणे, सूर्योदय, सूर्यास्त पाहणे, पोहण्याचा मनसोक्त आनंद लुटणे हे सारं काही आहे. तरुणांसाठी इथे आनंददायी नाईट लाईफ आहे, आकर्षक मार्केट्स आहेत! हिरवीगार जंगले आहेत, कायाकिंग,सर्फरायडींग ,स्कुबा डायव्ह पॅरासेलिंग सारख्या साहसी सागरी क्रीडा आहेत. भौतिकता आणि आध्यात्मिकता यांची झालेली एक विलक्षण सरमिसळही इथे पाहायला मिळते.
आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावरची आमची ही बाली सहल आमच्यासाठी नक्कीच आनंदाची ओंजळ ठरली. वयाची आठवण ठेवूनही आम्ही या बेटावरचा प्रत्येक क्षण बेभानपणे जगलो मात्र. आणि जगणं हे किती आनंददायी आहे हा मंत्र घेऊन आणि आता पुढची सहल कुठे असे ठरवतच भारतात परतलो. आमच्या विमानाने बालीची भूमी सोडली आणि उंच आकाशात झेप घेतली. पुन्हा एकदा वरून दिसणाऱ्या अथांग महासागराचे आणि गगनचुंबी गरुड विष्णूच्या शिल्पाचे निरोपाचे दर्शन घेतले आणि भारताच्या दिशेने .,”चला आता आपल्या घरी, आपल्या देशी” या भावनिक ओढीने आणि इतक्या दिवसांच्या मित्र—मैत्रीणीच्या,सहवासाच्या विरहाची हुरहुर बाळगत परतीच्या प्रवासासाठीही आनंदाने तयार झालो.
इथेच बाली सहलीची सफल संपूर्ण कहाणी समाप्त!
— समाप्त —
© सौ. राधिका भांडारकर
ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७
मो. ९४२१५२३६६९
radhikabhandarkar@yahoo.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈