सुश्री आसावरी केळकर-वाईकर
☆ सूर संगत ☆ सूरसंगत (भाग – २५) – ‘चैत मासे’ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆
होळीच्या निमित्तानं ‘होरी’विषयी लिहिताना जे लिहिलं होतं कि, लोकसंगीतातील जे प्रकार शास्त्रीय संगीताच्या आधारे सजवता येऊ शकतील ते अभ्यासू संगीतज्ञांकडून ह्या गायनशैलीच्या प्रवाहात आणताना ‘उपशास्त्रीय’ संगीताची एक धारा आपोआप निर्माण झाली असावी. त्यातच ‘चैती’ हा एक प्रकार येतो. नावांतच दिसून येतं त्यानुसार नुकत्याच सुरू झालेल्या चैत्र महिन्याशीच ह्या गीतप्रकाराचं नातं जोडलेलं आहे. पूर्वीच्या काही लेखांमधे आपण पाहिल्यानुसार विविध प्रकारच्या आवाजांतून विविध भावना व्यक्त करणं ह्या मानवाच्या सहजस्फूर्त आणि निसर्गप्रेरित गोष्टींत संगीताचं मूळ दडलेलं आहे. नंतर त्याला भाषाज्ञान प्राप्त झाल्यानंतर बुद्धिमान मानवाकडून जे सृजन होत राहिलं ते लोकसंगीताचं मूळ! मात्र निसर्गाशी मानवाचं जोडलेलं असणं ह्या सगळ्यातच दिसून येतं.
सर्वच प्रकारच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावत गेल्या तसं आज आपण ‘शास्त्रीय’, ‘उपशास्त्रीय’ ‘सुगम’ इ. संगीतप्रकार, त्यांची नावं, सादरीकरण शैली वगैरे गोष्टी पद्धतशीरपणे शिकू शकतो आहोत, अभ्यासू शकतो आहोत. मात्र जेव्हां ह्याच्या निर्मितीचं मूळ शोधत जातो तेव्हां पुन्हापुन्हा एकच जाणवतं कि, क्षण साजरे करण्याची मानवी मनाची उर्मी आणि निसर्गचक्रात येणाऱ्या बदलांचा मागोवा घेत त्यानुसार मानवी मेंदूनं चतुराईनं आपलं जगणं आणखी सुंदर करत जाणं हेच हाती लागलं.
नवीन वर्षाची सुरुवातच ह्या चैत्र महिन्यानं होते. ह्यावेळी वातावरणात उल्हास जागवणारा वसंत ऋतू अवतरत असतो. त्याच्याच खुणा म्हणजे कोकिळकूजन, वृक्षवेलींना फुटणारी नवी पालवी, फुललेल्या फुलांनी बहरलेले बगिचे, मोहरलेले आम्रतरू… हे सगळं वर्णन आपल्याला चैतीच्या शब्दांमधे आढळून येतं. शिवाय बहुतांशी चैतींमधे ‘हो रामा’ असे शब्दही हमखास आढळतात. अर्थातच हा संदर्भ रामावतारानंतरचा असावा. ह्याचा संदर्भ म्हणजे ह्याच महिन्यात नवमीला असणारी प्रभु रामचंद्रांची जन्मतिथी… रामनवमी! हाही साजरा करण्यासारखा क्षण, त्यामुळंच त्याला संगीतातही सामावून घेतलं गेलं! चैत्र महिन्यातल्या वसंत ऋतूच्या उल्हसित वातावरणाला हे संदर्भ जोडले गेल्यावर ते संगीतातही प्रतिबिंबित झाले, हे चैतीच्या शब्दांतून स्पष्ट दिसतं.
क्वचित काही चैतींच्या शब्दांत कृष्णलीलांचंही वर्णनही आढळून येतं. मात्र मुख्यत्वे चैत्रातलं निसर्गवर्णन हे प्रत्येकवेळीच अंतर्भूत असल्याचं हमखास दिसून येतं. पूर्व-बिहारमधे चैती विशेष प्रचलित असल्याचं आणि ह्यातील काव्य हे मुख्यत्वे ब्रज व अवधी भाषेत असल्याचं आढळून येतं. ह्या एकूणच कालावधीला म्हणजे माघातील शुक्ल पंचमीपासून चैत्रातील वद्यपंचमीपर्यंत वसंतोत्सव मानला जातो. त्यामुळं ह्या कालावधीतील उत्सवांच्या अनुषंगाने येणाऱ्या सर्वच लोकगीतप्रकारात आपल्याला वसंतऋतूचं वर्णन आढळतं. होरी आणि चैत्री ह्या गीतांशिवाय ‘वसंतोत्सवा’वेळी गायले जाणारे आणखी काही लोकगीतप्रकारही आहेत. होळीच्यावेळी बुंदेलखंडात फाग आणि ब्रजमधे रसिया (राधा-कृष्णप्रेमावर आधारित) हे लोकगीतप्रकार आजही गायले जातात.
उत्तर भारतातील ग्रामीण भागांत वसंत व फागगीतांना चॉंचर किंवा चॉंचरी असं म्हणण्याचा प्रघात आहे. त्याचं कारण म्हणजे ह्या प्रकारची बरीचशी गीतं ही ‘चॉंचर’ किंवा ‘चॉंचरी’ तालात गायली जातात. ह्याच तालाचं आणखी एक नांव ‘दीपचंदी’ हे सध्या जास्त प्रचलित आहे. ह्या तालाचा वापर हा विशेषत: वसंत, फाग, होरी, चैती, सावन, सोहर, बधावा, घाटो, पुरबी अशा लोकगीतांमधेच आढळून येतो. पूर्वीच्या काळी चौदा आणि सोळा दोन्ही मात्रांची चॉंचरी किंवा दीपचंदी प्रचलित होती. आता ह्यापैकी चौदा मात्रांचा ताल ‘दीपचंदी’ आणि सोळा मात्रांचा ताल ‘चॉंचर’ म्हणून जास्त प्रचलित आहे. ह्या तालांत आपण बऱ्याचदा ठुमरीही ऐकली असेलच… कारण ठुमरीची उत्पत्तीही लोकसंगीतातूनच तर झाली आहे. ह्या सोळा मात्रांच्या चॉंचर तालालाच आपल्याकडं काही भागात ‘अर्धी धुमाळी’ असंही म्हटलं जातं.
एक रंजक माहिती… चॉंचर किंवा चॉंचरी हा शब्द संस्कृतमधील ‘चर’ धातूपासून उत्पन्न झालेल्या चर्चर ह्या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप चर्चरी किंवा चर्चरिका ह्या शब्दांचा अपभ्रंश म्हणता येईल. चर्चरी किंवा चर्चरिका ह्या शब्दाचे हर्षध्वनी, हर्षक्रीडा, वसंतक्रीडा, अभिनयपद्धती, ताल, छंद, नृत्य इ. अनेक अर्थ होतात. ह्यानुसार एकूण वसंत ऋतूतील उल्हसित, आनंदमय वातावरणाला शोभेल असं हे नांव ह्या कालावधीत गायल्या जाणाऱ्या गीतांसाठी प्रामुख्याने वापरल्या जाणाऱ्या तालासाठीही वापरलं गेलं असावं.
ब्रज भाषेतील कृष्णभक्तीकाव्यांत गीत, नृत्य व ताल ह्या अर्थाने चर्चरी, चॉंचरी किंवा चॉंचर ह्या शब्दांचा सर्रास उल्लेख आढळून येतो. ह्यावरून असं म्हणता येईल कि, ब्रजप्रांतात चर्चरीगायन व नृत्याची परंपरा बऱ्याच जुन्या काळापासून चालत आलेली आहे. ई.स. १४५६ मधे मेवाडच्या महाराणा कुंभाच्या पुढाकाराने संगीतराज हा ग्रंथ पूर्ण केला गेला. त्यातही गीत(प्रबंध), छंद, ताल ह्या अर्थाने चच्चरी(चर्चरी)चा उल्लेख आढळून येतो. त्यापूर्वी चौदाव्या शतकात आंध्रचे महाराज वेम ह्यांनी चर्चरीविषयी चर्चा केलेली दिसून येते. त्याआधी तेराव्या शतकातील शारंगदेवाच्या संगीत रत्नाकर ग्रंथामधेही चच्चरीप्रबंध, चच्चरीताल व चच्चरीछंदाचा उल्लेख आढळून येतो. त्याहीपूर्वी म्हणजे बाराव्या शतकात आचार्य जिनदत्त सूरी ह्यांनी रचलेले ‘चर्चरी काव्य’ ही मध्यकालीन जैन साहित्यातील महत्वाची कलाकृती मानली जाते. अगदी प्राचीन संस्कृतसाहित्यातही चर्चरी नृत्य व गीताचं वर्णन आढळून येते.
क्रमश:….
© आसावरी केळकर-वाईकर
प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत (KM College of Music & Technology, Chennai)
मो 09003290324
ईमेल – [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈