मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूर संगत (भाग – १४) – ‘ भावाभिव्यक्ती’ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

सुश्री आसावरी केळकर-वाईकर

☆ सूर संगत (भाग – १४) – ‘भावाभिव्यक्ती’ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆  

मागच्या भागात यमन रागाचं पूर्वीचं नांव ‘एमन’ आणि त्याच्या सुरांतून सहजी प्रकट होणाऱ्या मानवी मनाच्या कोणत्याही भावाभिव्यक्तीशी जोडला गेलेला ह्या नावाचा अर्थ आपण पाहिला. कोणत्याही मनोवस्थेतील भाव चपखलतेने प्रकट करणारा म्हणून जणू आपल्याच मनाशी संवाद साधणारा ह्या अर्थाने ‘ए मन’ असं दिलं गेलेलं नांव म्हणजे मानवानं त्याच्याकडच्या शब्दसंपत्तीचा केलेला चपखल वापर असं म्हणावं लागेल. मात्र काही संशोधकांच्या मते मानवाच्या आयुष्यात शब्दांची भाषा येण्यापूर्वीही संगीत काही प्रमाणात अस्तित्वात होतं. ह्याचाच अर्थ संगीताचा उगम हा आदिमानवासोबतच झाला असं म्हणायला हरकत नाही. पुढं जसजसा मानव उत्क्रांत होत गेला तसतसं संगीतही विकसित होत गेलं असावं.

विचार करता लक्षात येईल कि पूर्वीचा रानटी अवस्थेतील मानव हा निसर्गाच्या सान्निध्यात राहाणारा होता. आपल्या गरजा भागवण्याचे आणि सुख मिळवण्याचे मार्ग त्याने निसर्गातूनच शोधून काढले. अत्यंत बुद्धिमान, कल्पक व प्रगल्भ मेंदू लाभलेल्या मानवाला अन्न, वस्त्र, निवारा ह्या प्रमुख गरजांसोबतच ‘कोणकोणत्या गोष्टींतून आपल्याला सुख मिळतं’ हे लक्षात येत गेलं असावं आणि संगीत हा प्रत्येकच माणसाला सुखी करणाऱ्या सर्वोच्च मार्गांपैकी एक आहे हेही जाणवलं असावं. कारण संगीताचा संबंध थेट मनाशी आहे.

मागे ‘सप्तककथा’ ह्या लेखात आपण पाहिलं होतं कि काही विचारवंतांचं आणि शास्त्रज्ञांचंही मत आहे कि संगीत ही मानवाकडून उत्स्फूर्तपणे निर्माण झालेली गोष्ट आहे, ती माणसाची सहजनिर्मिती आहे. माणूस जसं हसणं, रडणं, बोलणं, चालणं-फिरणं आपोआप शिकतो तसंच मनातले भाव व्यक्त करायलाही आपोआपच शिकतो की! किंबहुना तो शिकतो म्हणण्यापेक्षा ते प्रत्येक माणसाकडून सहजपणेच घडतं. संगीताच्या बाबतीत म्हणायचं झालं तर त्याचं सहज गुणगुणणं हा त्याच्याकडून होत असलेल्या संगीताच्या सहजनिर्मितीचा भरभक्कम पुरावा आहे! म्हणजे संगीत ही एक स्वाभाविक क्रिया आहे.

आदिमानव अन्न ही गरज भागविण्यासाठी जंगलात हिंडून प्राण्यांची शिकार करत असे. त्यावेळी कानांवर पडलेल्या पशु-पक्षांच्या आवाजाची नक्कल करण्याचा तो प्रयत्न करी. हळूहळू त्यानं आत्मसात केलेल्या ह्या नादांचा वापर तो आपल्या मनातील भावना उघडपणे व्यक्त करताना करू लागला असावा आणि हाच संगीताच्या उत्पत्तीचा पहिला अविष्कार असल्याचं मानलं जातं. सप्तककथेमधेच ‘पशु-पक्षांच्या आवाजातून झालेली सप्तकनिर्मिती’ हाही भाग आपण पाहिला. सप्तकनिर्मिती ही संगीतशास्त्र प्रगत होण्याच्या प्रक्रियेतील महत्वाचा भाग आहेच, मात्र त्याचं उगमस्थान हे मानवानं सहजपणे त्या आवाजांची नक्कल करण्याच्या प्रयत्नात दडलेलं आहे असं म्हणाता येईल.
अर्थात ती नक्कल ह्याला संगीत म्हणता येईल का? किंवा संगीत म्हणून मानवाने तो अविष्कार केला असेल का? ह्याचं उत्तर ‘नाही’ असंच येईल. परंतू निसर्गातील ह्या आवाजाची नक्कल करण्याचं उत्क्रांत स्वरूप आदिवासी संगीतात आढळतं. आपण ऐकलेलं एखादं आदिवासी गीत आणि त्यांतल्या हुंकारयुक्त नादांचा अविष्कार आठवून पाहिलात तर ह्या वाक्याचा अर्थ सहजी लक्षात येईल.

खरंतर अवघं चराचर नादमय आहे. अवघ्या निसर्गात लयदार संगीत भरून राहिलेलं आहे. निर्झरांतलं संगीत, धबधब्यांचं ओसंडणं, लाटांचा खळाळ, पक्षांची किलबिल, प्राण्यांचे आवाज, वाऱ्याची झुळूक किंवा घोंघावणंही, पानांची सळसळ हे सगळं निसर्गाचं संगीतच आहे. ह्या सृष्टीचा निर्माता असलेल्या ब्रम्हदेवानं संगीतकलेची निर्मिती केली, त्यांनी ही कला भगवान शंकरांना दिली, शंकरांनी मग ही कला सरस्वती देवीला दिली. पुढं देवी सरस्वतीनं ही कला देवर्षी नारदांना सुपूर्द केली आणि नारदांनी संगीतकलेचं ज्ञान स्वर्गातील गंधर्व (गायन करणारे), किन्नर (वादन करणारे) व अप्सरा (नर्तिका) यांना दिलं. त्यानंतर संगीतकलेत पारंगत झालेले ऋषी नारद, भरत, हनुमान हे भूलोकी ह्या कलेचा प्रसार करण्यासाठी आले, हा संगीतकलेचा इतिहास सर्वज्ञात आहे.

मात्र ह्या सृष्टीचा एक घटक असलेल्या आणि निसर्गाला आपला मित्र मानणाऱ्या किंबहुना आपल्या संस्कृतीचं देणं म्हणून निसर्गाचा अत्यादर करणाऱ्या मानवानं निसर्गात असलेलं हे संगीत कसं शोधून काढलं? सृष्टीनिर्मात्यानं त्याला दिलेल्या बुद्धीचा वापर करून ह्या सहजनिर्मित प्रक्रियेला ज्ञान, विद्या ह्या संज्ञेपर्यंत नेत पुढं संगीतशास्त्र म्हणण्याइतका त्याचा विकास कसा केला? हे जाणून घेताना त्यातला पहिला टप्पा वरती सांगितल्यानुसार निसर्गातील नादांची नक्कल करून पाहाणे हा येतो. पुढं ह्या निरनिराळ्या नादांतून आपल्या विविध भावनांचं प्रकटीकरण होऊ शकतं हे त्याच्या लक्षात आलं… इथं मानवी जीवनाशी संगीताचा थेट संबंध जोडला गेला.

पुढं मानवाला भाषिक ज्ञान प्राप्त झाल्यानंतर, तो शब्दसंपत्तीचा धनी झाल्यानंतर शब्द आणि नाद/स्वर ह्या दोहोंचा वापर तो भावनांच्या व्यक्ततेसाठी करू लागला आणि ज्याला आपण आज लोकसंगीत म्हणतो ते असं शब्द-सुरांच्या संगमातून निर्माण झालं… जे मानवी जीवनातील जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर त्याच्या भावाभिव्यक्तीला पोषक ठरत राहिलं आहे आणि सृष्टीच्या अंतापर्यंत कायम राहील.

पुढील काही लेखांमधे मानवाने निसर्गातून शोधलेलं हे संगीत मानवी जीवनाशी कसं एकरूप होत गेलं ह्याचा म्हणजे लोकसंगीताचा संक्षिप्त धांडोळा आपण घेणार आहोत.

लोकसंगीतावर लिहिण्याची कल्पना मला सुचविल्याबद्दल उज्वलाताईंचे मन:पूर्वक आभार! त्यानिमित्ताने माझ्या कुवतीनुसार आजवर केलेल्या अल्प अभ्यासाचा नेमकेपणी मागोवा घेत त्यावर चिंतन करण्याची सुवर्णसंधी आपोआप मिळेल ह्यात शंका नाही.

© आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆सूर संगीत राग गायन (भाग ७) – राग~ बागेश्री/बागेसरी ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरूणा मुल्हेरकर

☆ सूर संगत ☆ सूर संगीत राग गायन (भाग ७) – राग~ बागेश्री/बागेसरी ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

चतूर सुजन राग कहत

बागेसरी शास्त्र विहीत

खर हर प्रिय मेल जनित

पंचम अति अल्प गहत…….

समवादी खरज रहत

रात त्रितीय प्रहर रमत

म ध संगत चितको हरत…..

शास्त्रकारांनी केलेले हे बागेश्रीचे वर्णन!

अतिशय मधूर स्वरांची ही रागिणी काफी थाटांतून उत्पन्न झालेली,मध्यम आणि   षड् ज वादी व संवादी सूर असून गंधार,धैवत व निषाद कोमल आहेत. आरोहांत पंचम पूर्णपणे वर्ज्य.मप(ध)मप(ग)इतकाच पंचमाचा उपयोग.

आकाशांत पुनवेचा चंद्रमा उगवला आहे,त्याच्या शीतल प्रकाशाने आसमंत न्हाऊन निघाला आहे आणि तुडूंब भरलेल्या सभागृहांत हरीप्रसाद चौरसियांसारख्या दिग्गज कलाकाराने बासरीतून बागेश्रीचे स्वर काढले आहेत,श्रोते देहभान विसरून

म(ध)(नि)सां,(ध)(नि)सां अशा कोमल  सुरांच्या वर्षावात चिंब भिजताहेत, हा सोहळा कसा वर्णावा? कृष्णाच्या बासरीचे सूर ऐकून विरहाने व्याकूळ झालेल्या राधेची झालेली सैरभैर अवस्था, तिच्या मनांतील शंका कुशंका हेच भाव जणू काही या बागेश्रीतून बोलके झाल्यासारखे वाटतात, आणि “मोहे मनावन आये हो, सगरी रतिया किन सौंतन घर जागे” या पारंपारिक बंदीशीची आठवण येते. जयपूर घराण्याच्या गायकीतून ही विरहावस्था चांगलीच जाणवते.

कुमार गंधर्वांनी याच बागेश्रीच्या सुरांतून वेगळा भावाविष्कार दाखविला. “टेसूल बन फूले रंग छाये, भंवर रस ले फिरत मदभरे”

पळसाचे बन फुलले आहे, भ्रमर फुलांतील मधुसेवनाचा आनंद घेत आहेत, हे सांगणारे निसर्गाचे चित्र त्यांनी ह्या बंदीशीतून रेखाटले.

“फेर आयी मौर मेरे अंबूवापे” ह्या बंदीशीत त्यांनी निसर्गचक्र अविरत फिरतच असते हा भाव दाखविला. याचाच अर्थ असा चैतन्य, समृद्धी ही वातावरण निर्मीति बागेश्रीच्या सुरावटींतून केली.

“जा रे बदरा तू जा” ही प्रभा अत्र्यांची बंदीश मनाला भुरळ पाडणारी आहे. नाजूक भावनांची जपणूक करणार्‍या बागेश्रीच्या सुरांवर हळुवार मींड हा अलंकार  चांगलाच खुलतो.

या रागावर आधारित बरीच नाट्यपदे आणि सुगम भावगीते आपल्या परिचयाची आहेत. सौभद्रातील “बहुत दिन नच भेटलो सुंदरीला” हे बागेश्रीतील  गाजलेले पद! तरूण आहे रात्र अजुनी(सुरेश भटांची गझल) आणि(घनु वाजे घुणघुणा वारा वाहे रुणझुणा) हा ज्ञानेश्वरांचा अभंग र्‍हुदयनाथ मंगेशकरांनी बागेश्रीच्या आधारावरच संगीतबद्ध केला. मृदुल करांनी छेडीत तारा, नाम घेता तुझे गोविंद ह्या भक्तीगीतांवरही बागेश्रीचीच छाया आहे. राधा ना बोले ना बोले, आजा रे परदेसी,घडी घडी मेरा दिल धडके, जा जा रे बालमवा ही हिंदी चित्रपटांतील गाजलेली गाणी या बागेश्री रागावर आधारीतच आहेत.

हमे कोई गम नही था (बेगम अख्तर), एक दीवाने को आये है समझाये कही (जगजीत सिंह), चमनमे रंगे बहार उतरा (गुलाम अली) हे गझल आजही रसिकांचे मन लुभावणारे आहेत.

कलाकारांचे व रसिक गणांचे अतिशय प्रेम असलेला हा राग! वागीश्वरी ह्या मूळ शब्दांतून अपभ्रंशित शब्द बागेसरी व त्यानंतर बागेश्री ! सरस्वतीची मधूर, प्रेमळ, भावूक वाणी!

क्रमशः….

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूर संगत (भाग – १३) – ‘ए, मन – यमन’ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

सुश्री आसावरी केळकर-वाईकर

☆ सूर संगत (भाग – १३) – ‘ए, मन – यमन’ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆  

असं म्हणतात कि, पूर्वी `यमन’ रागाचं नाव `एमन’ असं होतं… ज्याची फोड केली असता ‘ए, मन’ असं असल्याचं जाणवेल… म्हणजे स्वत:च्याच मनाशी साधलेला संवाद! पुढे `एमन’ ह्या शब्दाचा अपभ्रंश होत `यमन’ असं नाव रूढ झालं. हा जो काही एकत्रित स्वरसमूह आहे त्यातून स्वत:च्याच मनाशी होणाऱ्या संवादाचा प्रत्येक भावरंग उत्तमप्रकारे प्रकट होतोच, ही किमया संगीतज्ञांनी अनुभवली असेल आणि म्हणून ह्या स्वरसमूहालाच त्यांनी `एमन’ असं नांव दिलं असावं. मराठीत ‘अरे मना’ असा ‘ए,मन’चा अर्थ होईल. म्हणजे आपल्या मनाला उद्देशून काही सांगणं.

ज्यावेळी भावनेचा एखादा रंग आपण पराकोटीच्या पातळीवर अनुभवतो तेव्हांच आपण अंतर्मुख होतो, स्वत:च्या मनाशी संवाद साधतो. हा संवाद नेमकेपणी साधला जाण्यासाठी प्रत्येकवेळी ‘एमन’च्या/यमनच्या सुरांची आळवणी उपयुक्त ठरते ही अनुभूती सूरसाधकांनी घेतली असेल म्हणून रागालाच म्हटलंय ‘ए, मन’… केवढा सार्थ विचार! काही ठिकाणी असाही उल्लेख आढळतो कि, यमन असा अपभ्रंश होण्यापूर्वी त्याचं नांव ‘इमन’ असं होतं. ‘इमन’चा अर्थ पाहायला गेलो तरी ‘इ मन’ म्हणजे ‘हे मन’ असा होईल… इथे दोन प्रकारे विचार करता येईल. ‘इ मन’… म्हणजे पुन्हा ‘अरे मना’ असं मनाला उद्देशून किंवा ‘इ मन’ म्हणजे ‘हे मन’ म्हणजे समोरच्याला जणू सांगणं आत्ता ह्या सुरांतून जे प्रकट होतंय हे माझं मनच आहे… जणू माझं अख्खं मन इथं उतरलं आहे ह्याअर्थी!

ह्या अर्थाचा विचार करताना एक निश्चित जाणवेल कि मनाची अवस्था नेमकेपणी व्यक्त करणारे ते यमनचे सूर आणि म्हणूनच नवरसांपैकी कोणताही भाव यमनच्या सुरांतून उत्तम प्रकारे व्यक्त होऊ शकतो. याआधीही आपण पाहिलं आहे कि, एखाद्या रागाची प्रकृती गंभीर आहे असं म्हटलं जातं तर एखाद्याची चंचल! मात्र यमनचे सूर भावाभिव्यक्तीच्या दृष्टीनं कोणतीही चौकट आपल्याभोवती आखून घेत नाहीत. काहीवेळा, एखाद्या रागाला तो अमुक प्रकारचा रस उत्पन्न करतो असं म्हणणं खूप सापेक्ष वाटतं. बंदिशीतलं साहित्य, त्याचा अर्थ, त्याच्या स्वररचनेची ठेवण आणि रागप्रकटीकरण करत असतानाची कलाकाराची मनोवस्था ह्या सर्वच गोष्टी कलाकृतीतून होणाऱ्या रसोत्पत्तीसाठी कारणीभूत असतात. त्यामुळं काहीवेळा रूढार्थानं केलेलं विधान सार्थ ठरतही नाही.

मात्र ह्याहीवेळी पुन्हा एका मुद्द्यावर येईन कि, मानवाच्या जाणिवा अत्यंत सूक्ष्म रूपातही जागृत असताना प्रयोग करून मांडल्या गेलेल्या मतांना काहीतरी अर्थ नक्कीच असणार. त्यांचा अनमान करायला मन धजत नाही. कदाचित रागाकडे अत्यंत सूक्षमतेनं पाहाण्याचा आवाका असणाऱ्यांना हे अर्थ जास्त नेमकेपणी उमजत असतीलही. माझ्यासारख्या सामान्य कलाकारालाही ढोबळमानानं काही अनुभूती येत असतेच. पण क्वचित कधी दुसऱ्या मताचाही विचार करावा का? असं वाटणारेही क्षण येतातच. मनात येतं, इथं कदाचित रागाच्या अंतरंग आणि बाह्यरंगाची गफलतही आपल्याकडूनच होत असावी. असो, पण यमनच्या बाबतीत मात्र हे द्वंद्व उरत नाही ह्याचं कारण म्हणजे त्याचं सर्वसमावेशक असणं!

ह्याच रागाचं नाव कल्याण असंही आहे आणि म्हणूनच हा कल्याणथाटाचा जनकराग आहे. एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ह्या रागाचं नांव एकतर यमन म्हणावं किंवा कल्याण म्हणावं. मात्र ‘यमनकल्याण’ नावाचा राग मात्र नुसत्या ‘यमन’ किंवा ‘कल्याण’ रागापेक्षा वेगळा आहे. मागे पाहिल्यानुसार कल्याण थाटाचे स्वर म्हणजे म तीव्र आणि बाकीचे सर्व स्वर शुद्ध ह्या रागातही तसेच आहेत. नि रे ग म(तीव्र) ध नि सां असा आरोह तर सां नि ध प म(तीव्र) ग रे सा असा रागाचा अवरोह आहे. उत्तमप्रकारे यमन आळवणाऱ्या कलाकाराने उभ्या केलेल्या रागरूपात ‘ग’ आणि ‘नि’ ह्या त्याच्या वादी-संवादी स्वरांचं चिंब ओलेतं रुपडं अगदी खुलून दिसतं… म्हणजे त्याक्षणी रागातून जी रसोत्पत्ती होत असेल त्यात हे सूर अगदी चिंब भिजून जास्त जास्त खुलून आलेले जाणवतात. अर्थातच त्यांना गुंफत राहाणाऱ्या बाकीच्या स्वराचं त्यांना पोषक असणंही महत्वाचं! रात्रीच्या पहिल्या प्रहरी गायल्या जाणाऱ्या ह्या रागाचे आरोह-अवरोह पाहाता रागाची जाती षाडव-संपूर्ण असल्याचं लक्षात येईल.

‘प्रभाती सूर नभी रंगती’ सारखी रचना असेल, ‘कबिराचे विणतो शेले’, ‘अधिक देखणे तरी निरंजन पाहाणे’, ‘टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संग’, ‘नामाचा गजर गर्जे भीमातीर’ ‘पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती’, ‘प्रथम तुला वंदितो कृपाळा’, ‘राधाधरमधुमिलिंद जयजय’ किंवा ‘समाधिसाधन संजीवन नाम’ सारख्या भक्तिरसातल्या रचना असोत, ‘आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा’, ‘देवाघरचे ज्ञात कुणाला विचित्र नेमानेम’ सारखे जीवनातली सत्य अधोरेखित करणारे शब्द असोत, ‘कशी केलीस माझी दैना, मला तुझ्याबिगर करमेना’, ‘का रे दुरावा का रे अबोला’, ‘भय इथेल संपत नाही’ ‘लागे हृदयी हुरहुर’ सारख्या काळजाची हुरहुर व्यक्त करणाऱ्या रचना असोत, ‘एकला नयनाला विषय तो झाला’, ‘नाथ हा मोही खला’, ‘सुकांत चंद्रानना पातली’ सारखी प्रसंगाला साजेशी नाट्यपदं असोत, ‘जिथे सागरा धरणी मिळते’, ‘जीवनात ही घडी अशीच राहुदे’, ‘तोच चंद्रमा नभात’, ‘धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना’ सारखे प्रीतभावनेने ओथंबलेले शब्द असोत किंवा ‘पिकल्या पानाचा देठ कि हो हिरवा’ ही रांगड्या बाजाची लावणी असो… ह्यातल्या प्रत्येक शब्दाचा भावरंग यमनने केवळ आपल्या अनुपम सौंदर्याने खुलवला नाही तर त्याला पुरेपूर न्यायही दिला आहे.

अर्थातच काही रचनांमधे किंचित इतर सुरांचा वापर आणि पुढे कदाचित एखादं पूर्ण वेगळं वळण असू शकणं हे उपशास्त्रीय किंवा सुगम संगीतात सामावून जाणारं आहे. तर, मनाचा प्रत्येक रंग चपखलपणे उलगडून दाखवणाऱ्या यमनचा आवाका मानवी मनासारखाच प्रचंड व्यापक आणि अथांग आहे.

 

© आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆सूर संगीत राग गायन (भाग ६) – राग बिहाग ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरूणा मुल्हेरकर

☆ सूर संगत ☆ सूर संगीत राग गायन (भाग ६) – राग बिहाग ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

” तेरे सूर और मेरे गीत दोनो मिलकर बनेगी प्रीत” गूंज उठी शहनाई या चित्रपटांतील श्री वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेले,१९५०चा उत्तरार्ध व १९६०च्या दशकाची सुरवात या कालावधीत अत्यंत लोकप्रिय झालेले हे गीत म्हणजेच राग बिहाग! “बीती ना बिताये रैना हेही परिचय सिनेमांतील गाणे बिहागचेच उदाहरण म्हणून घेता येईल. बाल गंधर्वांच्या नाट्य संगीताने भारावलेला मराठी रसिकवर्ग म्हणेल की संगीत स्वयंवरांतील रुख्मिणीच्या तोंडचे “मम आत्मा गमला”हे पद म्हणजेच बिहाग किंवा सुवर्णतुला नाटकांतील अंगणी पारिजात फुलला हे सत्यभामेचे गीत म्हणजे बिहाग! कितीही वेळा ही गाणी ऐकली तरी प्रत्येकवेळी नवीनच वाटावी अशी ही कर्णमधूर स्वररचना!

“कोमल मध्यम तीवर सब चढत री ध त्याग

ग नि वादी संवादी ते जानत राग बिहाग”

राग चंद्रिकासार या पुस्तकांत बिहाग रागाचे असे वर्णन केलेले आढळते.

या ठिकाणी एक गोष्ट स्पष्ट करणे आवश्यक आहे ती म्हणजे हे वर्णन पलुस्करी पद्धतीने केले आहे. शास्त्रीय संगीतात भातखंडे आणि पलुस्कर या दोन सांगितिक भाषा ग्राह्य आहेत.ज्याला  भातखंडे तीव्र म म्हणतात त्याला पलुस्कर कोमल म अशी संज्ञा देतात तर भातखंड्यांच्या शुद्ध स्वरांना पलुस्कर तीव्र स्वर म्हणतात.

बिलावल थाटजन्य असा हा राग, ओडव~ संपूर्ण जातीचा.(आरोहांत पांच स्वर आणि अवरोहांत सात स्वर) शास्त्रानुसार रात्रीच्या दुसर्‍या प्रहरी गायचा हा राग. सा ग म प नी सां/ सां नी धप म ग रेसा असे आरोह ~ अवरोह असलेल्या या रागांत तीव्र मध्यम अतिशय अल्प प्रमाणात घेतला जातो तसेच अवरोही स्वररचनेत रिषभ व धैवत अतिशय दुर्बल स्वरूपांत वावरतांना दिसतात. अल्प तीव्र मध्यमाचा उपयोग अतिशय कौशल्यपूर्ण रीतीने केला जातो. विशेषतः अवरोहांत पंचम लावताना व पंचमावरून खाली येतांना तीव्र मध्यम घेण्याची प्रथा आहे. जसे “सां नी ध म(तीव्र)प म(तीव्र) ग म ग” —— राग ओळखण्याची ही महत्वाची खूण आहे. युवतीने तिच्या लांबसडक केसांत  एखादेच मोहक गुलाबाचे फूल खोचावे व आकर्षकता वाढवावी तसा बिहागमधील हा तीव्र मध्यम राग आकर्षक करतो. या रागाची प्रकृती एकंदरीत गंभीर परंतु लोभस! त्याचा लालित्यपूर्ण स्वरविलास आनंददायी आणि नैराश्य दूर करणारा आहे. “लट उलझी सुलझा जा बालम” ही बंदीश ऐकली की त्यातल्या सुरांचा हळुवारपणा जाणवतो. बिहागच्या स्वरांचा प्रेमळ स्पर्ष अनुभविण्यास मिळतो, तो किशोरी अमोणकर, अश्विनी भिडे यांनी गायिलेल्या “बाजे री मोरी पायल झनन” या विलंबित तीनताल बंदिशितून.

अंतर्‍याचे गमपनीसां हे सूर ऐकले की सासरी निघालेल्या भावविवश मुलीचा चेहेरा  नजरेसमोर येतो नि मग आठवण येते ती कविवर्य भा.रा.तांबे यांच्या “नववधू प्रिया मी बावरते” या कवितेची.

कवी राजा बढे यांनी बिहागाच्या स्वभावाचे वर्णन कसे केले आहे बघा……. ते  म्हणतात,

“लाविलेस तू पिसे मुळी न बोलता

राहू दे असेच मुके मुळी न बोलता

ओठ हे अबोलके तरीही बोलती मुके

बोललो कितीतरी मुळी न बोलता”

बिहागचं देखणं रूप म्हणजेच मारूबिहाग. ह्यांत तीव्र मध्यम म्हणजे ह्याचा प्राण स्वर! “रसिया हो न जावो” ही बडा ख्याल बंदीश आणि ” जागू मै सारी रैना” ही मध्यलय बंदीश अनेक मैफिलींतून गाईली जाते व दोन्ही फार लोकप्रिय आहेत.

उपशास्त्रीय व सुगम संगीत या प्रकारात मारूबिहागला अधिक मानाचे स्थान आहे.सजणा का धरिला परदेस हे ,हे बंध रेशमाचे  या नाटकातील पद ,मारूबिहागातील, बकूळ पंडीत यांनी अजरामर करून ठेवले आहे.

छाया बिहाग, चांदनी बिहाग, नट बिहाग, पट बिहाग, हेम बिहाग, मंजरी बिहाग असे बिहागचे बरेच प्रकार आहेत. एकूणच बिहागचा पसारा विस्तीर्ण आहे.

क्रमशः….

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूर संगत (भाग – १२) – भावविभोर भटियार ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

सुश्री आसावरी केळकर-वाईकर

☆ सूर संगत (भाग – १२) – भावविभोर भटियार ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆  

संगीत जय जय गौरीशंकर नाटकातील विद्याधर गोखल्यांच्या ‘निराकार ओंकार साकार झाला, तये विश्वसंचार हा रंगविला’ ह्या शब्दांतला साकार होणारा ओंकार म्हणजे वसंत देसाईंनी त्यासाठी योजलेली भटियार रागाची धून! ह्या रागाचं रुपडं ‘पूरब से सूर्य उगा, फैला उजियारा’ ह्या शब्दांतही नेमकं जाणवेल. पूर्वी डीडी-नॅशनलवर ‘राष्ट्रीय साक्षरता मिशन’ अधोरेखित करणारं हे सुरेख गीत लागलं कि त्या बालवयातही कान टवकारले जात हातातला उद्योग सोडून डोळे टीव्हीकडं वळायचे ते त्यातील मनाला अक्षरश: खेचून घेणाऱ्या सुरावटीमुळं! पूर्वेला क्षितिजावर साकार होणारं तेजबिंब पियुष पांडेंच्या ह्या शब्दांत उमटलेलं पाहाताना संगीतकार अशोक पत्कींना ते सुरांत सजवताना भटियारची सुरावट आठवावी हे आपल्या भारतीय शास्त्रीय संगीताचं सामर्थ्य! ह्या रागाची शास्त्रनिर्धारित गाण्याची वेळ ही सूर्याचा पहिला किरण पृथीवर पडतानाचीच आहे.

आपण मागच्या भागात पाहिलेल्या संध्याकाळच्या संधिप्रकाशी रागांतल्या सर्वपरिचित मारवा रागाची छटा ह्या सकाळच्या संधिप्रकाशाच्या सीमारेषेवरच्या रागातही शुद्ध धैवत, शुद्ध निषाद व कोमल रिषभाच्या स्वरसंबंधांतून दिसून येतेच… अर्थात भटियारची उत्पत्तीही मारवा थाटातूनच झालेली आहे. मात्र पुढे षड्जावरून वादी असलेल्या शुद्ध मध्यमावरची तेजस्वी झेप व शुद्ध मध्यमावरून पंचमाच्या कुशीत शिरून विसावणं ही गोष्ट आपल्याला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाते. पंचमावरून परतताना गंधारवरचा क्षणभर थांबा आणि त्यानंतर पंचमावरून कोमल रिषभावर ओघळणारी मींड म्हणजे झेप घेताना विहंगम होत चंचलतेकडे झुकणाऱ्या मनाला पुन्हा गांभीर्याने स्थिरावायला मदत करणारं साधन!

‘जगाच्या पाठीवर’ ह्या चित्रपटातील ‘जग हे बंदिशाला, कुणी न येथे भला चांगला, जो तो पथ चुकलेला’ किंवा संगीत मत्स्यगंधा नाटकामधील वसंत कानेटकरांचं ‘अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा’ अशा वरकरणी थोड्याशा हताश, उदास शब्दांनाही ह्या रागाचा रंग शोभून दिसतोच. कारण कुठंतरी अशा हताश क्षणांत होणारे साक्षात्कारच काळरात्र दूर सारत नव्यानं (उगवून)  उभरून, तेजाळून येण्याची चाहूल आणि चेतना घेऊन येतात… म्हणूनच कि काय भटियारमधल्या चैतन्यमय धैवताची ऊर्जा इथेही किमया घडवते.

भटियार रागातील बंदिशी ते रागधूनीवर आधारित सुगम संगीतातील बहुतांशी रचनांमधे उठून दिसणारा शुद्ध धैवत हा मला आजोबांनी नेटकी व साजिरी, देखणी देवपूजा केल्यानंतर समईच्या प्रकाशात उठून दिसणाऱ्या प्रत्येक देवमूर्तीच्या कपाळावरील मधोमध कुंकवाचा ठिपका ल्यायलेल्या नीटस व रेखीव चंदनी टिळ्याची आठवण करून देतो. भटियार रागाची ओळख सांगणाऱ्या जागांपैकी पधनीपधमप हा हिंदोळ फार लडिवाळ आहे… आपल्या मनाला एक सुखदायी झोका देणारा!

आशाबाईंच्या भावगर्भ सुराने सखोल अर्थासहित आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या, वसंत प्रभूंचा स्वरसाज असलेल्या ‘हरी उच्चारणीं अनंत पापराशी, जातील लयासी क्षणमात्रे’ ह्या ज्ञानोबारायांच्या रचनेचं सार्थस्मरणही ‘भटियार’निमित्तानेच! भक्तिभावाने केलेली ‘सुर’संगत किंवा ‘सूर’संगत दोन्हींतूनही हे साधत असावे.

किशोरीताई आमोणकरांनी केलेला ‘बोलाला विठ्ठल’ अभंगाच्या स्वररचनेच्या धृवपदातील भटियारचा प्रयोग आपल्या मनाला भक्तिरसात चिंब भिजवणारा आहे.  पुढे अंतऱ्यांसाठी मात्र त्यांनी वेगळ्या अनोख्या वाटा धुंडाळल्या आहेत. अर्थातच एखादी स्वरधून ही जेव्हा ‘राग’ म्हणून सादर होत नाही त्यावेळी तिला रागाच्या नियमांचे काही बंधन नसते. ‘राग’ म्हणून गाताना वर्ज्य व विवादी असलेले सूर नजाकतीनं रागाच्याच सुरावटीसोबत वापरून तयार झालेल्या कित्येक रोमांचक स्वररचना आपण उपशास्त्रीय व सुगम संगीतात पाहातो. परंतू एकूणच उपशास्त्रीय व सुगम संगीतातील रचनांकडे स्वतंत्र दृष्टिकोनातून पाहायला हवे. एखाद्या रचनेला अमुक एक ‘रागाधारित’ असं आपण म्हणतो कारण ती सुरावट आपल्याला त्या विशिष्ट रागाची आठवण करून देते म्हणून! मात्र केवळ त्या आठवणीपायी त्या रचनांसारखा तो राग आहे असे म्हणणे मात्र संयुक्तिक होणार नाही.

हा विचार मनात ठेवता हिंदी चित्रपटसंगीताला नवे आयाम देणारा संगीतकार ए. आर. रहमानचे ‘वॉटर’ ह्या चित्रपटातील ‘नैना नीर बहाए’ हे गीत आठवल्याशिवाय राहात नाही. पहिली ओळ अगदी भटियारचं चलन घेऊन आलेली, मात्र दुसऱ्या ओळीतली राग ललतची छटा ही अगदीच चपखल आणि सुखद धक्का देणारी! म्हणून सुगम रचनांमधे केलेले रागांचे प्रयोग पाहायला मजा जरूर येते, मात्र शास्त्रदृष्ट्या रागाची व्याख्या पूर्ण वेगळी असते.

प्रभाकर जोगांनी ‘भटियार’वरच बेतलेले यशवंत देवांचे ‘कोटि कोटि रूपे तुझी’ हे शब्द रागाच्या बाबतीतही खरे ठरावेत. एकच सुरावट कुणाला कशी दिसते, कशी उमजते, कशी सजवावीशी वाटते ही गोष्ट ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’इतकी विविधता दर्शविणारी आहे आणि एकाच आरोह-अवरोहाच्या परिघात मुक्त संचार करत खरोखरी श्रेष्ठ अशा विविध संगीतसाधकांनी उभी केलेली एकाच रागाची अनंत रूपं ही किमया म्हणजे ‘त्याची’च विविध रूपं नाहीतर काय म्हणावं!!!

 

© आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆सूर संगीत राग गायन (भाग ५) – अभंग/भजन/भावगीत गायन ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरुणा मुल्हेरकर

☆ सूर संगत ☆ सूर संगीत राग गायन (भाग ५) – अभंग/भजन/भावगीत गायन ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर☆ 

शास्त्रीय संगीतावर लिहीत असतांना भक्तीगीत गायन, भावगीत गायन ह्यावर विचार होणे आवश्यक आहे असे मला वाटते कारण रागदारी संगीताला आपण “Music of class म्हटले तर अभंग, भावगीत गायनाला Music of mass म्हणणे योग्य होईल.

संगीताची आवड नाही असा मनुष्य विरळाच! त्याला गायनाविषयी कसलीही जाण नसली तरी देव माझा विठू सांवळा सारखे एखादे भक्तीगीत किंवा शुक्रतारा सारखे भावगीत कानांवर आले की मनाला कसे प्रसन्न वाटते. श्रोताही ते नकळतपणे गुणगुणु लागतो.

ज्ञानेश्वर महाराज, नामदेव, तुकाराम आदि महाराष्ट्रांतील संत मंडळींनी असंख्य अभंगरचना करून ठेवल्या आहेत आणि त्यांतील कित्येक अभंगांना र्‍हुदयनाथ मंगेशकर, सुधीर फडके, जितेंद्र अभिषेकीसारख्या दिग्गज संगीतकारांनी स्वरबद्ध केल्यामुळे ते अभंग आपल्या ओठांवर रेंगाळत रहातात.

शास्त्रीय संगीताचा आधार असलेली ही एक स्वतंत्र गायन शैली असे आपल्याला अभंग/भजन याविषयी म्हणतां येईल. अभंग एक व्यक्ति गाऊ शकते आणि भजन हे टाळ, झांजा यांच्या गजरांत सामूहिकरित्या सादर केले जाते असा अभंग व भजनांतील फरक! दोन्हीही प्रकार पूर्णतया भक्तीरसांत भिजलेले. यमन, यमनकल्याण, भीमपलास हे अभंग~ गायनाचे अगदी खास राग! समाधी साधन। संजीवन नाम। हा श्री सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेला व गायिलेला अभंग, किंवा माणिकबाईंची कौसल्येचा रामबाई, धननीळा लडिवाळा ही भक्तीगीते ही यमन, यमन कल्याणची उदाहरणे नमूद करता येतील, तसेच मा. कृष्णराव यांनी संगीत दिलेला अवघाची संसार सुखाचा करीन हा ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग भीमपलासीच्या सुरांनी नटलेला आहे. माणिक वर्मांचे अमृताहुनी गोड हे भीमपलासांतील भक्तीगीत तर वर्षानुवर्ष्ये संगीतप्रेमी गात आहेत. याचा अर्थ असा नाही की दुसर्‍या कोणत्या रागांत भक्तिरचना नसतात. अबीर गुलाल उधळीत रंग यांत देसकारचे दर्शन घडते, ओंकार स्वरूपा या एकनाथ महाराजांच्या अभंगाला श्रीधर फडके यांनी बैरागीचा स्वरसाज चढविला आहे. आजि सोनियाचा दिनु हा ज्ञानेशांचा अभंग र्‍हुदयनाथांनी भैरवीच्या स्वरांनी भक्तीरसांत बुडविलेला आहे. कानडा राजा पंढरीचा हा तर मधूर मालकंस, भीमसेन अण्णांनी अजरामर केलेला आणि आता यूट्यूबवरून राहूल देशपांडे आणि महेश काळे ह्या द्वयीॅनी घराघरांत पोहोचविलेला. एकूण रागदारी संगीतावर आधारित हे अभंग गायन!

साथीला एकतारी, टाळ आणि मृदुंग असले की भक्तीचे वातावरण चांगलेच तयार होते आणि पट्टीचा कलावंत समर्थपणे सूर, ताल व लय सांभाळून जेव्हा भक्तीगायनाची कला सादर करतो तेव्हा तो श्रोत्यांच्या ह्रुदयाचा ठाव घेतो.गायकाने अभंग संपवितांना विविध ढंगाने पांडुरंग पांडुरंग किंवा विठ्ठला मायबापा असा नामाचा गजर सुरू केला की आपण गाण्याच्या कुठल्या मैफिलीत नसून प्रत्यक्ष ईश्वरदरबारीच बसलो आहोत अशी मनोधारणा होते. हेच खरे भक्तीगीत/अभंग गायन!

भावगीत गायन हा गाण्याचा अगदी स्वतंत्र आणि वेगळा प्रकार! भावनांचा मेळ दर्शविणारी काव्य रचना~कविता, मग त्या मीलनाच्या असतील,  विरहाच्या असतील,प्रीतीच्या असतील अथवा निसर्गांतील रंगछटांविषयी असतील,त्या त्या भावरूपी शब्दांना चढविलेला स्वरसाज म्हणजे कवितेचे होणारे भावगीत!

शांताबाई शेळके, मंगेश पाडगांवकर,  सुरेश भट आदि काव्य रत्नांच्या कवितांना ह्रुदयनाथ मंगेशकर, यशवंत देव, श्रीनिवास खळे, अरूण दाते वगैरे संगीत कारांनी व गायकांनी कवितांचा हा अनमोल ठेवा भावगीतांच्या स्वरूपांत जनतेला,आम्हा रसिकांना दिला.ह्या भावगीत गायनांत आलापी, तानबाजी यांची जराही अपेक्षा नसते. अमूक एक रागांतच ते असले पाहीजे असेही काही बंधन नाही.मात्र शब्दांतून भावना प्रकट करतांना सुरांच्या श्रृतींवर विशेष लक्ष दिल्यास ते भावगीत श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेते.

कांटा रुते कुणाला, शूर आम्ही सरदार, ऋतु हिरवा ऋतु बरवा, काय बाई सांगू कसं ग सांगू, दिवस तुझे हे फुलायचे,या जन्मावर या जगण्यावर शतदां प्रेम करावे,दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे, मेंदीच्या पानावर,तरूण आहे रात्र अजुनी,श्रावणांत घननीळा बरसला ही व अशी कित्येक भावगीते अवीट गोडीची आहेत नि ती आपल्याला कायम आवडतात,आपल्या ओठांवर गुणगुणली जातात याचे कारण त्यांच्यावर चढविलेले स्वरालंकार हे बनावट नसून अस्सल बावनकशी आहेत. ही अशी गीते ऐकली की मनांत येतं, गाणं कोणतंही असो जे कानाला गोड वाटेल आणि मनांत रेंगाळत राहील तेच खरं संगीत!

क्रमशः….

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूर संगत (भाग – ११) – मारवा ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

सुश्री आसावरी केळकर-वाईकर

☆ सूर संगत (भाग – ११) – मारवा ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆  

‘निरोपाच्या क्षणातही सौख्याचा सहभाग आहे

आत्ता दूर गेलो तरी पुनर्मिलनाची आस आहे’….

असं कधीतरी लिहून गेले होते. तार्किकदृष्ट्या लिहायला सोपं आणि सत्यही, मात्र प्रत्यक्ष असे क्षण निभावणं हे फार कठीण, आतून हलवून सोडणारे! एक काहीतरी जे काही काळ आपल्यासोबत असतं ते मागे सुटत चाललंय ही आर्तता आणि नवीन काहीतरी आपल्याशी जोडलं जाणार असल्याची जाणीव असं काहीतरी पराकोटीच्या वेगळ्या गोष्टींच्या संमिश्रतेत भरून गेलेले हे क्षण… म्हणूनच मन कातर करणारे! निसर्गसुद्धा ह्याला अपवाद नाही… म्हणून तर अशा वेळेला कातरवेळा म्हटलं जातं! आपल्या जाणिवा जागृत असतील तर ‘संधिप्रकाशातील’ ह्या क्षणांत मनाचं आपसूक कातर होणं जाणवतंच! मानवाच्या अशा सूक्ष्म जाणिवांच्या आधारेच रागगायनाच्या शास्त्रनिर्धारित वेळा निश्चित केल्या गेल्या आहेत.

वातावरणातली ही जिवाला वेड लावणारी ‘अपूर्णतेची गोडी’ घेऊनच अवतरणारा ‘मारवा’… कातरवेळचा म्हणजे संध्याकाळचा संधिप्रकाशी राग! षाडव जातीचा हा राग… पंचमवर्जित… नि (रे) ग म(तीव्र) ध नि सां, (रें) नि ध म(तीव्र) ग (रे) सा असे मारव्याचे आरोह-अवरोह आहेत… अर्थातच आपण मारवा थाटाचे सूर पाहिलेत त्यानुसार रे कोमल आणि म तीव्र आहे आणि थाटाचंच नाव रागाला आहे त्यामुळं हा मारवा थाटाचा जनकराग आहे…

ह्या रागाचं वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण रागाचा डोलारा हा रिषभ व धैवत ह्या दोन सुरांच्या आधारे पेलला जातो… रे व ध च्या तुलनेमधे आधारस्वर षड्जालाही कमी महत्व असणारा असा हा राग म्हणूनच अत्यंत आर्तभावना जागृत करतो… म्हणूनच कदाचित मनाची कासाविशी जशीच्या तशी उतरते ती मारव्याच्या सुरांतून! अर्थातच दोनच सुरांनी राग नाही उभा राहू शकत त्यामुळं इतर सुरांना टाळता येत नाहीच, परंतू विशेषत: ह्या रागात इतर सूर हे फक्त रे आणि ध ला जोडण्याइतपतच वापरले जातात म्हटलं तर वावगं ठरणार नाही… थांब्याची जागा ही फक्त रे आणि ध हेच सूर आणि अर्थतच हेच त्याचे अनुक्रमे वादी आणि संवादी सूर आहेत.

सुमन कल्याणापुरांचं ‘शब्द शब्द जपुन ठेव बकुळिच्या फुलापरी’ हे गीत त्यातला नेमका भावार्थ ज्या सुरांतून स्पष्ट होईल त्या मारव्याच्या सुरांतच विश्वनाथ मोरे ह्या संगीतकारांनी बांधलेलं आहे आणि जीवनातलं एक मोठं तत्वज्ञान अधोरेखित करणारं ‘स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला’ हेही हृदयनाथांनी मारव्याच्या सुरांत चपखलपणे सजवलं आहे. ‘मावळत्या दिनकरा’ किंवा ‘मायेविण बाळ क्षणभरी न राहे’ ही गीतं मात्र मारव्याची आठवण करून देतादेता पुढे इतर सुरांना सामावून घेत वेगळा रंग निर्माण करतात.

साज और आवाज ह्या चित्रपटातलं  ‘पायलिया बावरी’ आणि कोतवाल साब मधलं ‘ना फूलों की दुनिया’ ही गीतंही वेगळ्या ढंगानं जवळपास ह्याच सुरांत रंगलेली! साथी रे भूल ना जाना मेरा प्यार हे गाणं मात्र मारव्याच्या सुरावटीतून उमलताना पुढे मात्र इतर सुरांच्या सोबतीने इतकी प्रचंड वेगवेगळी वळणं घेतं कि गायकासाठी ते ‘चॅलेंज’ ठरावं!

सुरवातीच्या भागांमधे चर्चा केल्यानुसार भारतीय शास्त्रीय संगीताची सूक्ष्मतेतून उलगडत जाणारी महानता आपल्याला मारवा, पुरिया आणि सोहनी ह्या तीन रागांमधूनही जाणवेल. तीनही रागांचे आरोह अवरोह अगदी तेच, मात्र प्रत्येक राग संपूर्ण वेगळा दिसतो.

मारव्याचा संपूर्ण डोलारा पेलून धरणारा रे व ध हे पुरियामधे अगदी दुर्बल होऊन जातात, ग वरून सा वर येताना आणि नि वरून म वर येताना अनुक्रमे रे आणि ध ला अलगद स्पर्श करायचा इतकंच त्यांचं स्थान! प्रवासात काही गावांच्या नावाची पाटी दिसते पण आपली गाडी त्या गावाकडे वळून तिथे थांबत नाही, फक्त मधे ते गाव लागतं म्हणून तिथून गाडी न्यावी लागते तसाच हा प्रकार! ग आणि नि हे पुरियाचे वादी संवादी स्वर! थोडक्यात दोंहीतले महत्त्वाचे आणि दुर्बल स्वर हे अगदी विरुद्ध आहेत.

सोहनीचं चलन तर आणखीनच वेगळं! त्याचं केंद्रस्थान हे वरचा म्हणजे तारषड्ज आणि विस्तारक्षेत्रही मुख्यत्वे त्याच्या आसपासच! शिवाय रागाच्या चलनामधेही मारवा व पूरियापेक्षा भिन्नता आहेच. ह्या तीनही रागांचा थाट मारवाच आहे मात्र मारवा व पुरिया हे संध्याकाळचे संधिप्रकाश राग तर सोहनी हा मध्यरात्री नंतरचा राग आहे.

भारतीय शास्त्रीय संगीतातील हे बारकावे अनुभवता आले तर त्याहून मोठा आनंद नाही.

© आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆सूर संगीत राग गायन (भाग ४) – उपशास्त्रीय गायन~ नाट्यसंगीत ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरुणा मुल्हेरकर

☆ सूर संगत ☆ सूर संगीत  राग गायन ( भाग ३ )  – उपशास्त्रीय गायन~ नाट्यसंगीत ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर☆ 

उपशास्त्रीय गायनांत नाट्य~संगीत हा एक स्वतंत्र आणि अतिशय महत्वाचा विषय मानावा लागेल. मराठी माणूस हा संगीत नाटकवेडा! ह्या संगीत नाट्य क्षेत्रांत अण्णासाहेब किर्लोस्कर यांचे नांव फार मोठे आहे.त्यांनी पुण्यांत १८८० साली पारसी नाटके पाहीली आणि त्यांना मराठीत नाटके रचण्याची स्फूर्ती मिळाली. त्यांतूनच संगीत शाकुंतल या नाटकाचा जन्म झाला.”पंचतुंड नररुंड मालधर पार्वतीश आधी नमितो” ह्या मंगलाचरणाने नाटकास सुरवात झाली. संगीत शाकुंतलच्या पहिल्या प्रयोगाने मराठी रंगभूमीवरील संगीत नाटकाचे युग सुरू झाले. त्यावेळचे मंगलाचरण किंवा नमनाचे पद्य हे नंतर नांदी म्हणून ओळखले जावूृ लागले. आजही शाकुंतलातील या नांदीने नाट्यसंगीताच्या मैफीलींना सुरवात होतांना आपण ऐकतोच. १८८२ मध्ये सौभद्र हे दुसरे संगीत नाटक किर्लोस्कर नाटक मंडळींनी रंगभूमीवर आणले. १८८२ ते ९० हा आठ वर्षांचा काळ किर्लोस्कर संगीताचा काळ गणला जातो. त्यांच्या ह्या नाटकांत पदांची रेलचेल होती.

नाटकाच्या अर्थाला आणि कथानकाच्या अनुषंगाने पोषक अशी पदे साकी,दिंडी,कामदा अशा जातिवृत्तांत त्यांनी रचली व सादर केली.त्यावेळच्या लोकप्रिय गीतांच्या आधारावर नाट्यपदांना चाली लावल्या व ती पदे श्रोत्यांच्या विलक्षण लोकप्रियतेस उतरली.सौभद्रांतील नाट्यसंगीत आजतागायत टिकून राहिले ते त्यांतील संगीताचा ताजेपणा,अण्णासाहेबांची सरस,प्रासादिक आणि सुबोध पद्यरचना ह्यामुळेच.सामान्य प्रेक्षकांच्या तोंडी ही गाणी सहज बसली व ती महाराष्ट्रांतील घराघरांत पोहोचली. “नच सुंदरी करू कोपा”, पांडूनृपती जनक जया” यासारख्या पदांच्या चाली मूळ कानडी पदांवरून घेतल्या आहेत.खाडिलकरांच्या मानापमान या नाटकांतील”दे हाता या शरणागता” या पदाची चालही मूळ कानडी पदाचीच! यमन, भूप, ललत, जोगीया, पिलू, आसावरी, भैरवी यासारखे लोकप्रिय राग तर अण्णासाहेबांनी वापरलेच परंतु “वद जाऊ कुणाला शरण ग” किंवा “बलसागर तुम्ही वीरशिरोमणी” अशा पदांना लावणीची चाल देउन लावणीला मराठी कुटुंबांत प्रतीष्ठा मिळवून दिली.

१९०५ साली नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बाल गंधर्व ह्यांनी किर्लोस्कर नाटक मंडळींत प्रवेश केला आणि सतत पन्नास वर्ष्ये त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. गोविंदराव टेंबे त्यांच्याविषयी लिहितात, “जवारीदार सुरेल आवाज,अत्यंत लवचिक गळा, ताल व लय यांचा उपजत पक्केपणा, एकंदरीत गाण्यातील संथपणा आणि संयम त्यांच्याइतका क्वचितच पहावयास मिळेल.” गातांना सर्वसामान्य रागांतील पदांत ते एखादा विसंवादी, अशास्त्रीय स्वर असा काही लावायचे की त्यामुळे त्या रागाला नाही पण चालीला काही नवीनच शोभा येत असे.

गंधर्वांच्या संगीताचा परिपक्व आविष्कार गंधर्व नाटक मंडळीत रसिकांना पहायला मिळाला.बाल गंधर्वांनी कृ.प्र.खाडिलकरांच्या मानापमान नाटकाला यथार्थ न्याय दिला आणि मराठी रंगभूमीवर संगीत नाटकाचे एक नवे युग निर्माण केले.

स्वयंवर नाटकांतील पदांनी उच्चांक गाठला.रागदारी संगीतावर आधारलेली ही पदे गायक नटांसाठी आव्हानच होते. नाट्य संगीताचा दर्जा उंचावला आणि संगीत नाटकाला

नाट्यसंगीताच्या बैठकीचे स्वरूप येऊ लागले.

प्रेक्षकांचे ones more घेतां घेतां रात्रभर नाटके रंगू लागली. भास्कर बुवा बखले आणि वझेबुवा यांच्यासारखे स्वर रचनाकार नाट्यकलेला लाभल्यामुळे महाराष्ट्रीय समाजाला उच्च शास्त्रीय संगीताची ओळख झाली. देसी, खोकर,बरवा असे अनवट राग प्रथमच महाराष्ट्रांत अवतरले.

आजच्या पीढीला बाल गंधर्व अंगाचे गाणे ऐकावयास मिळते ते श्री आनंद भाटे(आनंद गंधर्व) आणि सौ मंजूषा पाटील कुळकर्णी यांच्याकडून.

एक अनोख्या पद्धतीचे नाट्य गायन रंगभूमीवर आणले ते मो.ग.रांगणेकर यांच्या नाट्य निकेतन या संस्थेने. ज्योत्स्नाबाई भोळे यांच्या सुमधूर गळ्यांतून “क्षण आला भाग्याचा”,”मनरमणा मधुसूदना” ही पदे ऐकतांना मन लुब्ध होते.मा.कृष्णरावांच्या या चाली अवीट गोडीच्या आहेत.

साधारण १९६०च्या दशकापासून गंधर्व ढंगांतील गाण्यांत बदल दिसू लागला. छोटा गंधर्व यांनी स्वरबद्ध केलेली”अंगणी पारिजात फुलला”,”रतिहुनी सुंदर मदनमंजीरी,”राम मराठ्यांची “जयोस्तुते उषादेवते,” किंवा “सोsहम् हर डमरू बाजे,”वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेली”नयन तुझे जादुगार,””नारायणा रमा रमणा,” पं.जितेंद्र अभिषेकींची “नको विसरू संकेत मीलनाचा,” “तव भास अंतरा व्हावा,” “तेजोनिधी लोहगोल,” “घेई छंद मकरंद” ही नाट्यपदे ह्या बदलाची उदाहरणे देता येतील.

शास्त्रीय रागांवरील हे नाट्यसंगीत नाटकांतील प्रसंगानुरूप असल्यामुळे अतिशय भावपूर्णही आहे आणि ते श्रोत्यांच्या पूर्ण पसंतीस उतरले आहे.

क्रमशः….

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूर संगत (भाग – १०) – राग व समयचक्र ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

सुश्री आसावरी केळकर-वाईकर

☆ सूर संगत (भाग – १०) – राग व समयचक्र ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆  

मी काम करते त्या कॉलेजमधले माझे एक वयस्कर कलीग त्यांच्या लहानपणीचा एक किस्सा सांगतात. बेंगलोरजवळच्या एका खेडेगावी एक प्रसिद्धीपरान्मुख गायक होते. गुरूंवर नितांत श्रद्धा आणि त्यांनी सांगितल्याबरहुकूम सूरसाधना इतकंच त्यांनी आयुष्यभर केलं. ते अविवाहित असल्यानं कधी गावातलेच कुणीतरी त्यांना पोटाला दोन घास घालायचं. त्यांच्याकडं शिकणाऱ्या शिष्यांकडून मिळालेल्या तुटपुंज्या दक्षिणेतून बाहेर काहीतरी किरकोळ खाऊन ते पोट भरायचे. एकूण परिस्थिती अगदी हालाखीचीच होती.

एके ठिकाणी त्यांना कार्यक्रमाचं आमंत्रण आलं. तिथं गेल्यावर कुणीतरी त्यांना काही अनवट राग गायला सांगितले, जे त्या वेळेनुसार गाण्यायोग्य नव्हते. मात्र काहीजणांना ते राग ऐकून शिकायचे होते कारण बाकी कुणाला ते येते नव्हते. मात्र ‘मी रागसमयाचा भंग करून गाणार नाही. तो माझ्या गुरूंचा अवमान होईल’ असं निक्षून सांगत ते बुजूर्ग गायक स्टेजवरून उठू लागले. तेव्हां काही लोकांनी त्यांना ‘जास्त पैसे देऊ, जेवण देऊ’ असं आमीष दाखवलं तर ते गायक म्हणाले कि, ‘टपरीवर दहा पैशात मिळणाऱ्या चहा-सामोशामधे मी खुश आहे. पैशाची हाव धरून मी असलं पापकृत्य कधीच करणार नाही.’

आजच्या काळानुसार ह्या गोष्टीचा विचार करताना असंख्य प्रश्नचिन्हं मनात उभी राहातात. अलीकडे खूपदा ‘प्रत्येक राग हा निश्चित समयीच गायला जावा’ ह्या परंपरागत प्रघाताविषयी  दुमत असणारे विचार ऐकू येतात आणि ‘थोडीफार लिबर्टी/ कॉन्सेप्च्युअल कॉन्सर्ट्स’ वगैरे लेबलखाली बरीच ‘लिबर्टी’ घेतलीही जाते. आजच्या प्रचंड गतिमान जीवनशैलीत फक्त सुट्टीच्या दिवशी लोकांना मैफिलीला जायला थोडासा वेळ असतो. पूर्वीसारखी चार, सहा तासांच्या मैफिलीची आणि मध्यरात्र, पहाट, सकाळ, दुपार अशी कोणत्याही वेळेची चैन आता परवडण्यासारखी नाही. त्यामुळं क्वचित काही अपवाद वगळता ठराविक वेळांमधेच बहुतांशी मैफिलींचं आयोजन होतं. मग साधारणत: फक्त संध्याकाळी सहा ते आठ ह्या वेळेतलेच राग कलाकाराला गायला/वाजवायला आणि श्रोत्यांना ऐकायला मिळणार का? बाकीचे राग मग कधी गायला/ऐकायला मिळणार? असे प्रश्न निर्माण होतात.

शिवाय दिवसांच्या वेगवेगळ्या प्रहरांमधे वातावरणात आणि माणसाच्या मनोवस्थेत खरंच काही बदल होतात का? त्यानुसार भावणारे राग वेगळे असण्यात खरंच काही तथ्य आहे का? असे सगळेच प्रश्न आजच्या काळाशी सुसंगत जरूर वाटतात, मात्र त्यामागचं कारण आज निसर्गावर अत्याचार केल्याने त्याच्यासोबतच्या जगण्याला वंचित झालेलं आणि बहुतांशी कालावधीसाठी ‘एअर कंडिशन्ड’ असणारं माणसाचं जगणं आहे हे निश्चित… ‘कंडिशन्ड’ मोडमधे निसर्गचक्रानुसार आपसूक बदलत जाणारे वातावरणातील सांगावे आणि त्यानुसार बदलत जाणाऱ्या जिवंत जाणिवा उमजणार कशा!? असं मनात आल्याशिवाय राहात नाही.

ज्या काळी मानवाचं जगणं हे निसर्गाच्या सान्निध्यात, निसर्गाशीच जोडलं गेलेलं, निसर्गाशी अत्यंत जवळीक साधणारं, निसर्गाचा आदर राखणारं होतं त्या काळात एखादी वट, स्वरधून ही एका विशिष्ट वेळेला जास्त प्रभावी वाटते, काळजात जास्त खोलवर रुतते ह्या मानवाच्याच जाणिवेच्या आधारावर प्रत्येक राग गाण्याची वेळ (रागाचा गानसमय) निश्चित केली गेली. सोप्या भाषेत आपण असं म्हणू कि, ‘निसर्गातील बदलाचा मानवी मनावर होणारा परिणाम आणि नेमका तसाच परिणाम साधणारे/गडद करणारे स्वरसमूह’ ह्या परस्परसंबंधातील सूक्ष्म अभ्यासकांच्या मतानुसार ‘काही ठराविक सुरांचं कॉम्बिनेशन हे अमुक एखाद्या वेळी जास्त परिणामकारक ठरतं’ असा विचार पुढं आला आणि त्यावरून रागसंगीतात ‘समयचक्राचा विचार’ (टाईम थिअरी) हे शास्त्र होऊन गेलं.

आपल्या सर्वांच्याच परिचयाची ‘अष्टौप्रहर’ ही संकल्पना आपल्या संस्कृतीशी जोडली गेली आहे. ह्याच आठ प्रहरांचा विचार रागसंगीताबाबतही केला गेला आणि त्यातूनच ‘रागसमय’ संकल्पना मांडली गेली. दिवसाचे एकूण चोवीस तास आणि तीन तासांचा एक प्रहर, त्यामुळे अर्थातच एकूण प्रहर आठ झाले. सकाळी ७ ते १०, सकाळी १० ते दुपारी १, दुपारी एक ते दुपारी चार, दुपारी ४ ते संध्याकाळी ७ याप्रकारे दिवसाचा अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा व चवथा प्रहर मानला गेला आणि ह्याच पद्धतीने संध्याकाळी ७ ते रात्री १०, रात्री १० ते मध्यरात्री १, मध्यरात्री १ ते पहाटे ४ आणि पहाटे ४ ते सकाळी ७ याप्रकारे रात्रीचा अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा व चवथा प्रहर मानला गेला.

थोडक्यात दिवसाचे, दिवस आणि रात्र असे दोन भाग केले गेले (जे नैसर्गिकरीत्याच होतात) आणि त्या प्रत्येक भागाचे चार-चार प्रहर! आता ह्या प्रत्येक भागातील चार प्रहरांपैकी चवथा प्रहर हा ‘संधिप्रकाश’ म्हणून ओळखला जातो. संपूर्ण चोवीस तासांत संधिप्रकाश आपण दोनदा अनुभवतो. दिवस संपून रात्र सुरू होताना आणि रात्र संपून दिवस सुरू होताना… पहाट आणि संध्याकाळ! ही वेळा म्हणजे धड दिवसही नाही आणि रात्रही नाही… हा कालावधीत दिवस व रात्रीचा संधी(व्याकरणीय) होतो. त्यामुळे काहीजण ह्यावेळेत गायल्या जाणऱ्या रागांच्या वेळेचा उल्लेख करताना ‘दिवसाचा/रात्रीचा चवथा प्रहर’ असा करतात. मात्र बहुतांशी लोक एखाद्या रागगायनाची वेळ ‘सकाळचा/संध्याकाळचा संधिप्रकाश’ असे सांगतात व ह्या कालावधीत गायल्या जाणाऱ्या रागांचा ‘संधिप्रकाशी राग’ असाही उल्लेख केला जातो.

दुसरं एक मत असं आहे कि, प्रत्येक राग हा विशिष्ट वेळेतच गायला/वाजवला जावा ह्या नियमाला काहीही अर्थ नाही. उत्तमप्रकारे लावलेले सूर हे कोणत्याही वेळी परिणामकारकच असणार. एका जुन्या ग्रंथात असाही उल्लेख आहे कि, पूर्वीच्या काळी मोठमोठ्या राजांच्या प्रासादांत प्रत्येक प्रहरी गायनाचा/वाद्ये वाजवण्याचा प्रघात होता. मग ‘आता पुढच्या प्रहरी काय गावे/वाजवावे?’ ह्या सततच्या प्रश्नाचे सोपे उत्तर शोधण्यासाठी चतुर संगीत व्यावसायिकांनी एकेका वेळेला एकेक राग/थाट ठरवला आणि पुढे त्यानुसार ‘रागसमय’ निश्चित करण्याची प्रथा पडत गेली असावी.

ही मी माझ्या वाचनात आलेली गोष्ट सांगितली. मात्र संगीतातील ‘टाईम थिअरी’चा नीट अभ्यास केला तर त्यात एक सुसूत्रता, प्रहरानुसार स्वरसमूहांत कसे बदल होत जातात त्याचे काही विशिष्ट नियम स्पष्टपणे जाणवतात. त्यामुळे ते अभ्यांसांती मांडले गेले आहेत म्हणण्यालाच जास्त वाव आहे. फक्त वरती म्हटल्याप्रमाणे आत्ताच्या काळातलं जीवनमान पाहाता समय-मनोवस्था-सूर ह्यातला सूक्ष्म संबंध जाणवण्याइतके भाग्यवान आपण नाही. निसर्गावर कुरघोडी करताकरता आपण आपल्याच जाणिवा हरवून बसल्याचं हे मोठं उदाहरण आहे.

पंडिता किशोरीताई अमोणकरांसारख्या खऱ्या अर्थाने ‘जिनिअस’ व्यक्तीने एका मुलाखतीत म्हटल्याचं आठवतं कि, ‘भरतमुनींनी जे काही लिहिलं असेल ते सहज मनाला आलं म्हणून नक्कीच लिहिलं नसेल. त्यामागं कित्येक प्रयोग, केवढा अभ्यास केला गेला असेल. त्यामुळं मी ते मत मानते. सगळ्यांनीच ते मानावं असंही नाही. मात्र मानायचं नसेल तर ते मत चूक आहे हे कोणत्यातरी ‘कॉंक्रिट’ गोष्टीच्या आधारे अभ्यासांती आधी सिद्ध करून दाखवता आलं पाहिजे. तरच मग ते डावलण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होईल.’ किशोरीताईंचा असल्याने हा विचार निश्चितच महत्वाचा, अनमोल आणि आपल्या विचारांना चालना देणारा आहे.

© आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆सूर संगीत राग गायन ( भाग ३ ) – उपशास्त्रीय गायन~ ठुमरी ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरुणा मुल्हेरकर

☆ सूर संगत ☆ सूर संगीत  राग गायन ( भाग ३ )  – उपशास्त्रीय गायन~ ठुमरी ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर☆ 

उपशास्त्रीय गायनात मुख्यत्वे करून ठुमरी/नाट्य संगीत आणि अभंग/भजन हे तीन प्रकार दिसून येतात.  हे गायन तानसेनांपासून कानसेनांपर्यंत सर्वच वर्गांत लोकप्रिय आहे.  कोणत्याही शास्त्रीय संगीताच्या बैठकीत श्रोत्यांची आता एखादी ठुमरी होऊ द्यावी किंवा नाट्य पद सादर करावे अथवा एखादा अभंग होऊन जावा अशी फरमाईश असतेच!

आजच्या लेखांत म्हणूनच ठुमरीविषयी थोडेसे!

ठुमरी, कजरी, होरी, चैती असे बरेच प्रकार या वर्गांत येतात. भरताच्या नाट्यशास्त्रात उल्लेखिलेल्या धृवगीताशी ठुमरीचे नाते जोडतां येते. त्याचप्रमाणे महाकवी कालिदास यांच्या मालविकाग्नीमित्र या नाटकांतील नायिकेने गायिलेल्या चतुष्पदी या चार पदांच्या गीतात ठुमरीचे मूळ दिसून येते. देवळांत गायल्या जाणार्‍या होरी~धमारांतही ठुमरीची बीजे आढळतात.  औरंगजेबकालीन रागदर्पण या ग्रंथातही ठुमरीचा उल्लेख आहे. यावरून ठुमरी हा गानप्रकार प्राचीनच आहे, परंतु ठुमरी लोकप्रिय झाली एकोणीसाव्या शतकांत!

ठुमक या शब्दावरून ठुमरी हा शब्द आला असावा कारण ठुमरीचे स्वरूप म्हणजे लय आणि भाव हे साज चढवून ठुमकत ठुमकत चालणारी ती ठुमरी! नृत्यगीत, शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीत या सर्वांशी ठुमरीचे अजोड नाते आहे.

ठुमरी गायनांत आकारान्त आलाप आणि तानबाजीची अपेक्षा नसते.  गायन अधिक भावपूर्ण होण्यासाठी शब्दोच्चारांना विशेष महत्व आहे तसेच ठुमरीचे बोल घेऊन वेगवेगळ्या प्रकारच्या आलापाने रंग भरला जातो. “सैंय्या बिन घर सूना” म्हणतांना ही एकच ओळ इतक्या प्रकारे आळविली जाईल की त्या नायिकेचे सूनेपण,  एकटेपणा श्रोत्यांना जाणविल्याशिवाय रहाणार नाही व याच टप्प्यावर कलावंताला ‘वाहवा’ अशी दाद मिळेल.

या शैलीत राग नियम पाळण्याचे मुळीच बंधन नसते.  मूळ पहाडीतील ठुमरी गातां गातां तो अगदी सहजपणे कोमल रिषभ, धैवत घेऊन जोगिया, भैरवीचे रसिकांना दर्शन घडवून पुन्हा मूळ रागांत गायन सुरू करील.  कलावंताचे सुरावरचे हे नियंत्रण जितके पक्के तितके त्याचे गायन प्रभावी.

ठुमरीचा अंतरा गाऊन झाला की ताल बदलून, द्रुत लय घेऊन साधारणतः केरवा तालात ठुमरीचा पुन्हा मुखडा गाण्याची पद्धत आहे, ह्या प्रकाराला गायक व तब्बलजी यांची लग्गी लागणे असे म्हणतात. लग्गी लागतांना श्रोत्यांचे खास मनोरंजन होऊन ते माना डोलवायला लागतातच.

लग्गीमध्येही कलावंत निरनाराळ्या ढंगाने गाऊन आपले कसब दाखवतो आणि तिहाई घेऊन पुन्हा मूळ तालांत व लयीत एकदां मुखडा गाऊन ठुमरी गायन समाप्त होते.

खमाज तिलंग, काफी, मांड, पिलु, देस, तिलककामोद, पहाडी,  झिंझोटी, जोगिया भैरवी, सिंधभैरवी हे ठुमरीचे प्रमूख राग आहेत. कारण हे राग लोकधुनांवर आधारित आहेत. दीपचंदी, दादरा, सूलताल, मत्तताल इत्यादी तालांत प्रामुख्याने ठुमरी निबद्ध असते.

सासू~नणंदेची गार्‍हाणी, प्रियकराची वाट पहाणारी प्रेयसी, सवती सोबत रमलेला पति हे ठुमरीचे विषय.  अष्टनायिकांचे दर्शन, स्त्रीचे समाजांतील उपेक्षित स्थान,

पुरूषप्रधान संस्कृतीने तिच्याकडे भोग्य वस्तू म्हणून पाहिले, त्या काळाचे समाजाचे प्रतिबिंब ठुमरीच्या आशयांत दिसून येते.  राधा कृष्णाचे प्रेम हा ठुमरीचा अगदी लाडका विषय. ” कौन गली गयो श्याम”,  राधे बिन लागे ना मोरा जिया” ह्या गिरिजादेवींच्या ठुमर्‍या प्रसिद्ध आहेत.  ठुमरीच्याच झूला, होरी या प्रकारांमध्ये कृष्ण~गोपी यांच्या क्रीडेची विविध रूपे दिसतात. “झूला धीरेसे झुलावो बनवारी रे सांवरियाॅं”, “झूला झूले नंदकिशोर” हे पारंपारिक झूले आहेत. “छैलवा ना डारो गुलाल”, “बिरजमे होरी कैसे खेलू”, “होरी खेलत है गिरिधारी” ही कवने होरीची उदाहरणे देता येतील.  “पिया तो मानत नाही” ही काफी रागांतील भीमसेनजींची ठुमरी न ऐकलेले रसिक अपवादात्मकच!”का करू सजनी आये ना बालम” ही देस रागांतील प्रसिद्ध ठुमरी बरेच गायक/गायिका गातात.  यावरून लक्षांत येते की ठुमरी म्हणजे शृंगार रसाचा परिपोष; परंतु त्याचबरोबर ठुमरीत भक्ति आणि अध्यात्मही असते हे लक्षात असू द्यावे.  संत कबीराच्या निर्गूण पदावर तिलककामोद रागात असलेल्या ठुमरीचा हा एक नमूना!

“चिलम भरत मोरी जर गयी चुटकिया सैय्या निरमोहीके राज रे”— अर्थात ह्या ऐहिक जीवनात मी होरपळलोय,  मला मोहपाषांतून सोडव. सूरदासांची, मीराबाईंची पदे अनेक सिद्धहस्त गायकांनी ठुमरी शैलीत गायली आहेत.

“सोच समझ नादान” हे पिलू ठुमरीत भीमसेनजींनी गायलेले कबीर भजन किंवा “सांझ भई घर आवो नंदलाल” ही सिद्धेश्वरी देवींनी गायिलेली ठुमरी. या सुरांना अध्यात्मिकतेचा स्पर्ष आहे. ” सांझ भई” म्हणजे माझ्या आयुष्याची संध्याकाळ झाली, तेव्हा हे भगवंता आता तरी मला दर्शन दे असा ह्या ठुमरीचा पारमार्थिक अर्थ सांगितला जातो.

कजरी हा ठुमरीचाच एक प्रकार. श्रावण महिना, वर्षा ऋतु व विरहावस्था हे कजरीचे विषय. ” सावनकी ऋतु आयी रे सजनिया प्रीतम घर नही आये” ही शोभा गुर्टूंची कजरी गाजलेली आहे.

चैती म्हणजे ज्या ठुमरीत चैत्र महिन्याचे वर्णन असते. उदा~अंबूवाके डारीपे कूजे री कोयलिया.

राम जन्माचा सोहळा चैतीत वर्णन केलेला दिसतो.

टप्पा हा गानप्रकार ठुमरीहून थोडा वेगळा आहे.  पंजाबमधील लोकसंगीत हे टप्प्याचे उगमस्थान. तिकडचे उंट हांकणारे सारवान हे गात असत म्हणून ह्या शैलीला टप्पा असे नांव पडले. पंजाबी, अवध, भोजपूरी, व्रज या भाषेत टप्पे लिहिलेले आढळतात. ग्वाल्हेर घराण्याचे गायक टप्पा गायल्याशिवाय आपल्या मैफिलीची सांगता करीत नाहीत.

क्रमशः….

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print