सुश्री आसावरी केळकर-वाईकर
☆ सूर संगत (भाग – ४) – भाग्यद बिभास २ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆
(कालच्या भागापासून पुढे चालू….)
पूर्वी उत्तर हिंदुस्थानी संगीतपद्धतीत थाटसंख्या बत्तीस होती. मात्र एकूणात ‘थाट’ ही संकल्पना मुख्यत्वे ‘थिअरॉटिकल’ असल्याने पं. विष्णु नारायण भातखंडेंनी ती जास्त सोपी करत थाटसंख्या दहावर आणली. आता वरती उल्लेखिलेले रागांचे थाट वेगवेगळे कसे हे पाहायचे तर पटकन दहा थाट म्हणजे कोणते स्वरसमूह आहेत हे पाहून घेऊ म्हणजे सगळेच सोपे होऊन जाईल. स्वर लिहीत असताना टायपिंगच्या मर्यादेमुळे प्रचलित नोटेशन सिस्टिम्सनुसार कोमल-तीव्र सुरांच्या खुणा करणे शक्य होत नाहीये. फक्त ह्या लेखापुरती सोय म्हणून असे करूया, ज्या स्वराभोवती कंस असेल तो कोमल व ‘म’च्या बाबतीत तीव्र समजावा. शुद्ध स्वरासाठी काहीच चिन्ह नाही.
१) बिलावल थाट – सा, रे, ग, म, प, ध, नि
२) खमाज थाट – सा, रे, ग, म, प, ध, (नि)
३) काफी थाट – सा, रे, (ग), म, प, ध, (नि)
४) आसावरी थाट – सा, रे, (ग), म, प, (ध), (नि)
५) भैरवी थाट – सा, (रे), (ग), म, प, (ध), (नि)
६) भैरव थाट – सा, (रे), ग, म, प, (ध), नि
७) कल्याण थाट – सा, रे, ग, (म), प, ध, नि
८) मारवा थाट – सा, (रे), ग, (म), प, ध, नि
९) पूर्वी थाट – सा, (रे), ग, (म), प, (ध), नि
१०) तोडी थाट – सा, (रे), (ग), (म), प, (ध), नि
वरचे दहा स्वरसमूह नीट पाहिले कि लक्षात येईल कि भूप हा कल्याण थाटामधील मधील म आणि नि हे दोन स्वर वगळून(वर्ज्य करून) तयार झाला आहे.
देशकार हा बिलावल थाटातील म आणि नि हे दोन स्वर वगळून तयार झाला आहे.
आता भूपाचा थाट कल्याणच का व देशकाराचा बिलावलच का(कल्याण का नाही) हे समजून घेण्यासाठी रागस्वरूपातील फरकाचा सूक्ष्म अभ्यास करणे आवश्यक आहे.
बिभास हा राग भैरव थाटातील म आणि नि हे स्वर वगळून तयार झाला आहे आणि शुद्ध धैवताचा बिभास हा मारवा थाटातून म व नि हे स्वर वगळून तयार झाला आहे.
थोडक्यात ‘इनग्रेडियन्ट्स’च्या सेटमधील एखादा किंवा एकाहून जास्त पदार्थ बदलले तर तयार होणाऱ्या रेसिपीचा स्वादही त्यानुसार बदलेल. त्याचप्रकारे थाटानुसार(वापरल्या गेलेल्या स्वर-समूहानुसार) रागाची प्रकृती बदलत जाते.
गीतरामायणातील ‘चला राघवा चला’ हे गीतही ह्याच रागावर आधारित! ‘सांझ ढले गगन तले’आणि ‘नीलम के नभ छाई’ ही ‘उत्सव’ ह्या एकाच हिंदी चित्रपटातली दोन्ही गीतं रे व ध दोन्ही कोमल असणाऱ्या बिभासावर बेतलेली आहेत. खरंतर, रागशास्त्रानुसार बिभास गाण्याची वेळ सकाळची आहे, परंतू ‘सांझ ढले’मधेही त्याचं असणं मनोहर वाटतं.
आणखी एक गोष्ट म्हणजे रे, ध कोमल असलेल्या बिभासाचेच आरोह-अवरोह असलेला ‘रेवा’ नावाचा राग हा संध्याकाळी गायला जातो. अगदी भूप-देशकाराप्रमाणेच वादी-संवादीमधे असलेला फरक व त्यानुसार बदललेले रागाचे चलन हाच फरक बिभास व रेवा ह्या दोन रागांमधे आहे. ‘बिभास’ चे वादी-संवादी अनुक्रमे ध आणि ग असून तो उत्तरांगप्रधान राग आहे. तर बरोबर सप्तकाच्या पूर्वांगातला ‘ग’ हा स्वर वादी असल्याने ‘रेवा’ हा पूर्वांगप्रधान राग आहे. बिभास भैरव थाटातला तर रेवा पूर्वी थाटातला!
मारवा थाटातल्या शुद्ध धैवताच्या बिभासाचा विचार करताना मला पटकन एक सुप्रसिद्ध नाट्यपद आठवालं संत कान्होपात्रा नाटकातलं ‘जोहार मायबाप जोहार’! ह्यातील पहिल्या व शेवटच्या दोन-दोन ओळी बिभासातल्या आणि मधल्या दोन ओळींमधे मात्र इतर स्वरांचा वापर झाला आहे. दुसरे एक पूर्वी रेडिओवर लागणारे सर्वांनीच ऐकले असेल असे भक्तिगीत ‘धागा धागा अखंड विणूया, विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणूया’ ही शुद्ध धैवताच्या बिभासावर बेतलेलं आहे.
सहज नमूद करावेसे वाटले म्हणून लिहितेय, आणखी एक पूर्वी थाटातला बिभास सुद्धा आहे. त्याचे आरोह-अवरोह मात्र वरती आपण माहीत करून घेतलेल्या दोन्ही बिभासांहून पूर्ण वेगळे आहेत. मात्र तो अप्रचलितच म्हणायला हरकत नाही.
आता एक मजेदार गोष्ट पाहूया… ‘अबीर गुलाल उधळीत रंग’ हे गीत भूपाची आठवण करून देतं तरीही पूर्ण भूपातलं नाही. कारण पहिल्या दोन्ही कडव्यांतल्या दुसऱ्या ओळीत पं. जितेंद्र अभिषेकींनी ओळीच्या शेवटी कोमल रिषभाचा खुबीने वापर केला आहे. त्यामुळे भूपात रमलेल्या श्रोत्यांना एक सुखद धक्का मिळतो. ह्या चमत्कृतीमुळे त्या ओळीसोबत शुद्ध धैवताच्या बिभासाच्या अंगाने विस्तार करता येतो आणि फक्त एकच स्वर बदलून परत तिसऱ्या ओळीत भूपावर येणे गाणाऱ्यालाही फार कठीण जात नाही. मात्र ही खुबीदार स्वरयोजना पं. अभिषेकीबुवांनी रागसंगीताच्या ज्ञानाच्या आधारेच केली असणार हे निश्चित आणि त्या ज्ञानामुळेच गाताना त्यात वेगळी ‘रंगत’ आणण्याची किमया ते साधू शकत होते! आज मुद्दाम तो अभंग ऐकून पाहावा आणि पहिल्या दोन कडव्यांच्या दुसऱ्या ओळीच्या शेवटी एकदम काही वेगळेपण ‘जाणवतंय’ का हे जरूर शोधावं! अशाचप्रकारे जाणीवपूर्वक कान देताना, संगीताचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले नसेल तरीही आपल्याला रागांचे वेगळेपण ‘जाणवायला’ लागेल ह्यात शंका नाही!
© आसावरी केळकर-वाईकर
प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत (KM College of Music & Technology, Chennai)
मो 09003290324
ईमेल – [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈