श्रीमती उज्ज्वला केळकर
वाचताना वेचलेले
☆ अप्रूप पाखरे – 19 – रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
[९३]
हळूच फुलं फुलवते रात्र
आणि
खुशाल घेऊ देते
श्रेयांचे नजराणे
दिवसाला.
[९४]
ओसरून…. सरून गेलेलं यौवन
त्याचीच स्वप्नं
सळसळत रहावीत
तशी ही पावसाची सरसर
गडद अंधारातून
[९५]
माझ्या मनातली
गहन नीरवता
झांजर… झांजर… झाली
आणि
ध्वनींचा संधीप्रकाश
हलकेच हेलावत जावा
तसे गुणगुणत राहिले
रातकिडे
[९६]
जुईच्या थरथर पाकळीशी
पावसाचा थेंब
हलकेच रिमझिमला,
‘रहायचं आहे ग मला
तुझ्याच जवळ
अगदी सदैव…’
सुस्कारली जुई
आणि
गळून पडली भूईवर
मूळ रचना – स्व. रविंद्रनाथ टैगोर
मराठी अनुवाद – रेणू देशपांडे (माधुरी द्रवीड)
प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर
176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈