श्रीमती अनिता जयंत खाडीलकर
विविधा
☆ खरी श्रीमंती…भाग 2 ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆
………..दुःखी माणसाचे दुःख कमी करणे, श्रीमंताने गरीबांची गरीबी कमी करणे ही श्रीमंती. चांगल्या गोष्टींची योग्य पारख ही श्रीमंती.
भाग-२
अशी श्रीमंती सर्वांना लाभावी असे क्षण आपल्या आयुष्यात यावेत. ते अनुभवायला मिळणे ही श्रीमंती. आपल्या आसपास भरपूर चांगली माणसे असावीत आणि आपण खरच श्रीमंत व्हावे. मनमोकळ हसावं बोलावं म्हणजे खरी श्रीमंती. सुंदर निरोगी आरोग्य ही श्रीमंती आणि अशा श्रीमंतीने मिळणारं समाधान हेच श्रीमंतीचं खरे दुसरे नाव होय. लहान बाळाकडे पाहील्यावर मिळणारा आनंद ही श्रीमंती कशी हे मी ते माझ्या एका कवितेत वर्णन केले आहे.
बाळ
बाळ किती छान
गोरं गोरं पान
गुलाबासारखे गाल
ओठ किती लाल
खोडकर स्वभाव
मिश्कील हसणं
निरागस डोळे हसरे छान
सर्वांना देते आनंदाचे दान
तसेच मनाच्या श्रीमंतीचे/मोठेपणाचेही वर्णन, मनाच्या विशालतेचे वर्णन अनेकांनी केले आहे. ते मीही केले आहे.
मन
मन हे अतीविशाल
त्याचा नाही ठाव
शब्दानाही शक्य नसे
सांगावया त्याचा भाव
वेग त्याचा अपार
तया नसे जराही उसंत
रुप त्याचे अरुप,स्वरूप
ते असे अनादी ,अनंत
असे तया प्रेमक्षुब्धा
परसुखाशी ते झुरते
सौंदर्य मनाचे संस्कारानीच ठरते
विशाल मन हिच खरी श्रीमंती
समाधानी व्रुत्ती हिच खरी श्रीमंती
त्याचप्रमाणे आपल्याला संकटात मदत करणारे मित्र/नातेवाईक हवे व आपल्या आनंदात/यशात त्यांनी सहभागी व्हावे व आपणही त्यांच्या उपयोगी पडावे, आनंदात दुःखात सहभागी व्हावे. मन मोकळ करायला, गावाहून आल्यावर चहा-पाणी विचारणारा, विश्वासाने किल्ली, निरोप, पत्र ठेवून घेऊन आठवणीने देणारा शेजारी मिळणे ही खरी श्रीमंती. यातही वेगळच समाधान मिळते. आपण जन्म दिलेली मुलं चांगली निघणं,शिक्षण घेऊन योग्य मार्गाला लागणे व त्यांनी आईवडिलांना म्हातारपणी नीट वागणूक देणे हीसुद्धा एक श्रीमंतीच मानायला हवी. चांगली सुन मिळणे हीसुद्धा एक श्रीमंती होय.अशा प्रकारची श्रीमंती मिळणे हे पुर्वजन्मीचे पुंण्यच होय.
© श्रीमती अनिता जयंत खाडीलकर
सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली
मो 9689896341
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈