? वाचताना वेचलेले ?

⭐ निर्जीवातील जिवंतपणा… – लेखिका: श्रीमती मानसी चापेकर ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ⭐

“अगं, किती जुनी  झाली आहे ही मीठ ठेवायची बरणी! टाकून दे की आता. छान, नवीन, सुबक अशा कितीतरी काचेच्या  बरण्या आहेत आपल्याकडे. वापर की त्यातली एखादी.”

त्या दिवशी सकाळी-सकाळी ऑफिसला जायच्या आधी मी सगळी कामं पटापट आवरत असताना भाजीत मीठ टाकताना साठवणीची मिठाची बरणी काढली आणि नवरोबांचे नेमके लक्ष त्या मिठाच्या बरणीकडे गेले . खरंतर ती तुटली किंवा रंगही पांढऱ्याचा काळा-बिळा झालाच नव्हता मुळी.पण काय आहे ना, त्याची सवय झाली होती. उगाच काय टाकून द्यायच्या ना वस्तू? नवीन आणलं की जुनं टाकून द्यायचं, हा काय न्याय झाला का?

ह्या पुरुषांना कुठे कळते आमच्या स्त्रियांचे असे वस्तूंमध्ये गुंतणे!

“अरे खराब कुठे झाली आहे, फक्त जुनीच तर झाली आहे, आणि मला हिचा आकार खूप आवडतो.असा कुठे हल्ली मिळतो?”

“अगं, पण आईने जवळजवळ पंचवीस- तीस वर्षं वापरली आणि आता तू वीस एक.बास झालं की. मी आत्ताच काढतो बघ, काचेच्या कपाटातील ती तुझ्या रुखवतातील चिनी मातीची बरणी,” असे म्हणून तो ती काढायला गेलासुद्धा.

ही एक अजून चांगली सवय आम्हा स्त्रियांची(सगळ्याच नाही बरं का !).  मिळालेल्या वस्तू जपून ठेवणं आणि वापरात असेलल्या वस्तूंची काळजी घेणं. म्हणजे हे माणसांसारखेच असते नाही का? म्हणजे आपण माणसं जपतो, त्यांच्या मनाची काळजी घेतो, कधीकधी अगदी भावनाशील होतो, तसंच असतं नाही का वस्तूंबाबतसुद्धा?

सहवासाने प्रेम वाढते म्हणतात, तर वस्तूंवर, जरी त्या सजीव नसल्या तरी जीव जडतोच हो !

आता लग्नाला इतकी वर्ष झाली तरीही रुखवतातील कितीतरी काचेच्या वस्तू कपाटात दिसतील. काढल्याच गेल्या नाहीत. कितीतरी काचेचे सेट असतील, जे फक्त पाहुणे आले की वापरायचे ह्या सदरात मोडतात.

त्या दिवशी नवरा म्हणालाच, “वस्तू आपल्यासाठी असतात, आपण वस्तूंसाठी नाही.ते सगळे काचेचे सेट वापरले आपण, तर काय बिघडणार आहे? पाहुणे येणार महिन्यातून एकदा. आणि काय होईल जास्तीतजास्त? तुटतीलच ना? आणू की परत नवीन, फक्त ‘पाहुणे आल्यावर वापरायचे’ हे काय लॉजिक असतं तुम्हा बायकांचे कळतंच नाही.”

आता त्याला काय सांगणार की रोज ह्या वस्तू वापरायच्या म्हणजे आलं त्यांना जीवापाड जपणं. कामवाल्या मावशी रोजची भांडीच आपटून आपटून घासतात.त्यात ही काचेची भांडी रोज एक फोडतील. म्हणजे काळजीपोटी ही भांडी मी घासणं आलं.म्हणजे वेळ हवा त्याला.त्यात आपल्याच हातून फुटलं की जीव हळहळणार ते वेगळंच.

वस्तू काय, कपडे काय, अगदी घरातील कोपरासुद्धा आपण जपतो मनाच्या कोपऱ्यासारखा. जुने झालेले कितीतरी ड्रेस होत नाहीत,तरीही आठवण म्हणून कपाटात अगदी खालच्या कप्प्यात ठेवले आहेत मी जपून. प्रत्येक ड्रेसची आठवण वेगळी. हा तुला पहिल्यांदा भेटायला आले तेव्हा घातलेला, हा इंटरव्हूला जाताना,  हा नवीन जॉबला पहिल्या दिवशी घातलेला, अशा अनेक आठवणींचा वस्तूंचा खजिना आपण कुठे कुठे जपून ठेवलेला असतो नाही का बायकांनी?

अगदी परवा ओटा पुसायचं फडकंसुद्धा विरल्यावर टाकून देताना वाईट वाटलं, की किती छान टिपला जायचा ओटा ह्याने. आता नवीन फडकं घेणार आपण , आणि ते सवयीचे होईपर्यंत जुन्याची आठवण येणारच . काय आणि कुठे कुठे जीव आणि मन गुंतवून ठेवतो आपण !

त्यात अजून एक चांगलं असतं, वस्तू आपल्याला दगा देत नाहीत माणसांसारखा. काहीवेळा आपण ना वेड्यासारखा जीव लावतो माणसांना आणि अचानक काहीही कारण नसताना ती माणसं आपल्या आयुष्यातून निघून जातात. पण वस्तूंचं तसं मुळीच नसतं. त्या आपल्या असतात , आपल्यापाशीच राहतात , जोवर आपण त्यांना जपत असतो.   

वस्तूची होणारी सवय आणि त्यात गुंतलेल्या भावना ह्यावरून माहेरची एक आठवण सांगते. मी अगदी नववी दहावीत असल्यापासून पोळ्या करायला शिकले. म्हणजे आईने जबरदस्ती वगैरे नाही केली, पण मलाच आवड होती. शेवटच्या दोन पोळ्या लाटता लाटता आईच्या हाताच्या प्रॉब्लेममुळे मी सगळ्याच पोळ्या लाटायला लागले. मी केलेल्या पातळ पोळ्या सगळ्यांनाच आवडायच्या. त्यामुळे कौतुकही व्हायचे.आई सगळी कामे करायची, पण पोळ्या मात्र मीच करायचे , तर ते लाटणं माझ्या इतकं सवयीचं झालं की मी गमतीने म्हणायचे आईला, “आई, मी लग्न झाल्यावर हे लाटणं सोबत घेऊन जाणार.” आई हसूनच म्हणायची, “तुझ्या दोन्ही मोठ्या बहिणी पण हेच म्हणायच्या, पण होते, बाळा, सवय सासरच्या गोष्टींचीसुद्धा”.

खरंच, आपण लग्न झाल्यावर आपला नवीन संसार आहे, नवीन सुरुवात आहे म्हणून अनेक जुन्या गोष्टी केवळ जुन्या झाल्या म्हणून नाही टाकून देत, त्यात आपल्या सासूचे प्रेम, त्यांच्या आठवणी आणि नंतर आपण त्या वस्तूंच्या करून घेतलेल्या सवयीमुळे आपल्याला त्याच गोष्टी वापरायला मनापासून आवडते.

मला वाटतं, हे असं जीव गुंतणं जिवंतपणाचं लक्षण असतं, आणि नुसतं श्वास चालू आहेत म्हणजे आपण जिवंत, हे समीकरण जोडण्यापेक्षा ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या आयुष्याशी निगडित असणं आणि त्याला आपण आपलेपणाची जोड देणं म्हणजे जगणं माझ्या मते तरी.

माणसं काय नी वस्तू काय एकदा जीव गुंतला की दुरावा सहन होतच नाही…..

लेखिका: श्रीमती मानसी चापेकर

प्रस्तुती: सौ. प्रज्ञा गाडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments