सौ. उज्ज्वला केळकर
इंद्रधनुष्य
☆ ‘ढालगज भवानी’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती– सौ. उज्ज्वला केळकर ☆
ढाल म्हणजे ढाल आणि गज म्हणजे हत्ती अशी या शब्दाची फोड.
युद्धाच्या मैदानात अगदी पुढे जो ढालीसारखा शत्रूच्या सैन्याला सामना करणारा पहिल्या फळीतला हत्ती हा ढालगज असे.
या हत्तीवर राजचिन्हे, वस्त्रे सजवलेली असत आणि ध्वज घेऊन एक दोन सैनिकांना बसवले जायचे. त्यांचे काम ध्वज फडकवत ठेवणे आणि पुढे पुढे चाल करत राहणे हे असे. , ढालगजावरून ध्वज खाली उतरला कि मागच्या सैनिकांना पराभवाचा संदेश मिळे.
या ढालगजाचे वैशिष्ट्य म्हणजे त्या हत्तीच्या गंडस्थळावर एक मोठी ढाल बांधलेली असायची. पूर्वीच्या काळी किल्ले, राजवाडे यांच्या मुख्य द्वाराला ते कोणी तोडू नयेत म्हणून मोठे अणकुचीदार सुळे लावलेले असत. असे द्वार कपाळाला ढाल बांधलेला ढालगज हत्ती धडका देऊन तोडून टाके आणि किल्ल्याचा विजय सुकर करे. म्हणूनच ढालगज हत्तीला सैन्यात सर्वात जास्त महत्व असे.
जशी युद्धासाठी घोड्यांचे परीक्षण केले जायचे त्याच प्रमाणे ढालगज निवडण्यासाठी हत्तींचेही परीक्षण होत असे. पहिल्या फळीतला ढालगज होणे म्हणजे काही सोपे काम नव्हते. हा हत्ती चपळ, निडर आणि हुशार असायला हवा. तोफेच्या तसेच बंदुकांच्या आवाजाला न घाबरता पुढे चालत राहण्यासाठी त्याला विशिष्ट परीक्षेतून जायला लागायचे.
पूर्वी मराठ्यांनी जेवढी युद्धे जिंकली, त्यात जसे घोडे आणि सैनिकांचे पराक्रम आहेत तसेच या ढालगजांचे देखील आहेत.
मग ढालगज भवानी कोण?
भवानी ही पेशव्यांची ढालगज होती. आणि तिने केलेल्या पराक्रमांवरून तिचे नाव आपल्या बोली भाषेत ‘ भांडणाची खुमखुमी असलेल्या ‘ बायकांसाठी फेमस झाले. इतिहासात नोंद आहे कि भवानी हत्तीणीने पेशव्यांच्या सैन्यात खूप वर्षे ढालगजाचे काम केले आणि तिचा दबदबा खूप होता.
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈