डॉ. ज्योती गोडबोले 

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘ओरडणारी, किंचाळणारी आई…‘ – लेखक : डॉ. अनिल मोकाशी  ☆ प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले 

ओरडणारी, किंचाळणारी आई…

(‘घरोघरी मातीच्याच चुली’ की हो !)

बाईपण दे गा देवा. ओ के आहे. पण आईपणाचा बोजा नको रे बाप्पा! ऐसे कैसे चलेगा! मान्य आहे, सोपं नाही आहे ते. पण घेतला वसा तर निभावायलाच हवा ना. आनंदाने, सुख, समाधानाने संसार तर करायलाच हवा.

१. आईचे ताणतणाव

आईचे व्यक्तिमत्त्व आणि तिच्या वागणुकीचा मुलांच्या मानसिकतेवर आणि भावनिक विकासावर फार मोठा परिणाम होतो. आई जर वारंवार ओरडणारी, किंचाळणारी असेल तर मुलांवर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

२. मुलांमध्ये तणाव आणि चिंता

मुलांना आईकडून हवे असते प्रेम आणि सुरक्षितता. लहान सहान चुकांवर ओरडणारी आई मुलांमध्ये तणाव आणि चिंता निर्माण करू शकते. त्यांच्या आत्मविश्वासाला धक्का देऊ शकते.

३. आत्म-संयम, वर्तणूक आणि सामाजिक कौशल्ये:

आईच्या ओरडण्यामुळे मुलं घाबरु शकतात. भेदरू शकतात. स्तब्ध, होऊ शकतात. कॉम्प्युटर हँग होतो तशी. वर्तणुकीत समस्या निर्माण होतात. आईच्या ओरडण्याला उत्तर म्हणून मुलं उलट उत्तर, आक्रमकता, विरोध किंवा विद्रोह करू शकतात. हे साद प्रतिसादाचे प्रकरण आहे. त्यांचे चुकीचे वागणे त्यांच्या सामाजिक कौशल्यांना बाधा पोचवू शकते. आईने संयम बाळगून वर्तणूक केली तर मुलेही संयम बाळगून वर्तणूक करायला शिकतील.

४. भावनिक विकास:

आईच्या ओरडण्यामुळे मुलांच्या भावनिक विकासावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. मुलं त्यांच्या भावना व्यक्त करण्यात कमी पडू शकतात. त्यांची भावनिक बुद्धिमत्ता कमी होऊ शकते. त्यांना आपल्या भावना दडपून ठेवायला शिकायला लागतं. त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

५. आत्मसन्मान:

वारंवार ओरडण्यामुळे मुलांचा आत्मसन्मान कमी होऊ शकतो. त्यांनी स्वतःबद्दल निगेटिव्ह भावना बाळगायला सुरुवात केली तर त्यांचा आत्मविश्वास खालावतो. “तू तर बॅड बॉयच आहे” हे त्याला वारंवार सांगून पटवून देण्याने काय साधणार? मुलांचा स्वतःचा स्वतःवरच विश्वास नसेल तर शैक्षणिक, सामाजिक जीवनावर परिणाम होऊ शकतो.

६. आईचे मानसशास्त्र:

आईचे वर्तनही तिच्या मानसिक स्थितीवर अवलंबून असते. ताण, चिंता, कौटुंबिक, आर्थिक, वैवाहिक समस्यांमुळे आईचा मूड बिघडू शकतो. आईनी स्वतःची मानसिकता सुधारली तर मुलांचे वर्तणूक सुधारते. मन पावन, पवित्र वातावरणात ठेवा. प्रसन्नतेने मिळवा, परम सुखाचा मेवा. बघायला गेलं तर, यादी मोठी समस्यांची. आवाक्याबाहेरची काळजी कशाला उद्याची. आईचे ताणतणाव पोखरती, तिच्या स्वतःच्या, व मुलाच्या मनाला आणि शरीराला. मनात नकोच जागा, त्यांच्यासाठी उरायला. आईने कायम चिंताग्रस्त राहून, काय साधणार. सशक्त मन, कधीच नाही कोलमडणार.

७. संवाद आणि सामंजस्य:

आई-मुलांमधील संवाद आणि सामंजस्य वाढवणे हे महत्वपूर्ण आहे. आईने आपल्या मुलांशी प्रेमळ, आदराने आणि सहनशीलतेने वागायला शिकायला हवं. जर मुलं चुका करतात, तर त्या चुका सुधारण्यासाठी प्रेमळ मार्गदर्शन करणं आवश्यक आहे. कणभर चुकीला मणभर रागवायला नको. जुन्या चुका आठवून, आठवून रागवायला नको. केल्या चुकीला लगेच रागवायला तर हवेच. पण ते एक दोन वाक्यात असावे. पानभर रागवायला नको.

८. सकारात्मक पालनपोषण:

पॉजिटिव्ह पॅरेंटिंग हवे. प्रेम, आदर, आणि सहनशीलता हवी. मुलांना शिस्त लावण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन हवा. मुलं आत्मविश्वासाने, स्वावलंबी आणि सामर्थ्यवान बनू शकतात.

निष्कर्ष:

ओरडणारी, किंचाळणारी आई मुलांच्या मानसिकतेवर आणि भावनिक विकासावर नकारात्मक परिणाम करू शकते. आईने सकारात्मक पद्धतीने मुलांचे पालनपोषण करणे आवश्यक आहे. त्यानी मुलं सुरक्षित, आत्मविश्वासपूर्ण आणि भावनिकदृष्ट्या स्थिर बनतील. आईने आपल्या मानसिक स्वास्थ्यावरही लक्ष देणे आवश्यक आहे, ज्यामुळे तिच्या वर्तनात सकारात्मक बदल होऊ शकतात. कंट्रोल मॅडम, कंट्रोल.

लेखक : विद्यावाचस्पती डॉ. अनिल मोकाशी

बाल कल्याण केंद्र, मतीमंद, मूकबधिर, पूर्व प्राथमिक, प्राथमिक शाळा. जामदार रोड, काराभारीनगर, कसबा, बारामती, ४१३१०२,

९८२२३०२१३१ —- dranilmokashi@gmail. com

प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments