श्री सुहास रघुनाथ पंडित
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १४ मार्च -संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी)
सुरेश भट
मी कसे थोपवू शब्द माझे?
हिंडती सूर आसपास किती.
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
गंजल्या ओठास माझ्या धार वज्राची मिळू दे
पूर्तता माझ्या व्यथेची माझिया मृत्यूत व्हावी
भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले
माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी
सांभाळतात सारे आपापली दुकाने
मल्मली तारूण्य माझे तू पहाटे पांघरावे
जीवना,तू तसा,मी असा
खेळलो खेळ झाला तसा
लाभू दे लाचार छाया मोठमोठ्याना परंतु
तापल्या मातीत माझ्या
घाम मानाने गळू दे
असेच हे कसेबसे
कसेतरी जगायचे
कुठेतरी—कधीतरी
असायचे–नसायचे
करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची
रणात आहेत झुंजणारे अजून काही
किती काव्यपंक्तींचा उल्लेख करावा ? काही ओळखीच्या,काही अनोळखी.एखाद्या झंझावाताने झपाटून टाकावे तशा कविता आणि नंतर झालेली त्यांची गीते.शब्दांच्या काफिल्याचा रंगच वेगळा.एकदा एल्गार पुकारल्यावर रसवंतीने मुजरा करावा अशा या सप्तरंगी कवितांचे जनक श्री.सुरेश भट यांचा आज स्मृतीदिन.त्यांचे काव्य हीच त्यांची खरी ओळख.संगीताची आवड बालपणा पासून असलेल्या सुरेश भटांनी आपल्या अपंगत्वावर मात करण्यासाठी स्वतःचे शरीर मजबूत बनवले.कोमल ,रसिक मन आणि प्रतिकूलतेवर मात करण्याची वृत्ती यामुळेच की काय त्यांची कविताही कोमल आणि तितकीच सशक्त झाली.मराठीत गझल लेखनामध्ये स्वतःचे स्थान निर्माण करून मराठी साहित्यात गझल लोकप्रिय करण्यात त्यांनी दिलेल्या योगदानामुळेच त्यांना ‘गझलसम्राट’ही पदवी मिळाली.गडचिरोली येथे झालेल्या एकोणचाळीसाव्या विदर्भ साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते .
हिंडणारा सूर्य या गद्य लेखना व्यतिरिक्त त्यांनी लिहिलेल्या कवितांचे संग्रह असे:
एल्गार, काफला, झंझावात, रंग माझा वेगळा, रसवंतीचा मुजरा, रूपगंधा, सप्तरंग आणि सुरेश भट यांच्या निवडक कविता.
‘मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते’ असे त्यांनी लिहिले असले तरी त्यांच्याच शब्दात सांगायचे तर’अजुनी सुगंध येई दुलईस मोग-याचा’ प्रमाणे त्यांच्या काव्य दरवळचा आस्वाद घेत त्यांच्या स्मृती जपूया.
गोविंद विनायक तथा विंदा करंदीकर:
काव्य वाचनाचे कार्यक्रम करून मराठी कविता गावोगावी पोचवून लोकप्रिय करणरे तीन कवी म्हणजे कविवर्य वसंत बापट,मंगेश पाडगावकर आणि विंदा करंदीकर.
आज विंदांची पुण्यतिथी. कोकणातील देवगड जवळील खेड्यात जन्मलेल्या या कवी लेखकाने ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करून मराठीला पुन्हा एकदा सन्मान मिळवून दिला. विंदा हे कवी तर होतेच पण अनुवादक, समीक्षक आणि बालसाहित्यिकही होते.वास्तववाद आणि प्रयोगशिलता हे त्यांच्या साहित्याचे वैशिष्ट्य होते.त्यांचे बालसाहित्य वाचताना त्यांच्यातील खट्याळ स्वभावाचे दर्शन होते.’माझ्या मना बन दगड’ असे म्हणणारा हाच का तो कवी असा प्रश्न पडावा इतक्या मनोरंजनात्मक बालकविता त्यांनी लिहील्या आहेत.
‘माणसाला शोभणारे युद्ध एकच या जगी
त्याने स्वतःला जिंकणे,एवढे लक्षात ठेवा’
‘मग्रूर प्राक्तनाचा मी फाडला नकाशा
विझले तिथेच सारे,ते मागचे इशारे’
‘असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये
आयुष्याला द्यावे उत्तर’ किंवा
देणा-याने देत जावे, तेच ते अन् तेच ते, सब घोडे बारा टक्के,
यासारख्या कविता त्यांच्या प्रतिभेचे पैलू दाखवतात. राणीचा बाग, सशाचे कान, एकदा काय झाले, परी ग परी अशा बाल कविता थोरांनाही बालपणात घेऊन जातात.
कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या मते करंदीकरांची कविता प्रयोगशील आहे,शैली वक्तृत्वपूर्ण आहे पण भाषणबाजी नाही.तर कविवर्य शंकर वैद्य म्हणतात की विंदांची जीवनविषयक दृष्टी ही कठोर बुद्धीवादी,पूर्णपणे वास्तवशील आणि नितांत ऐहिक स्वरूपाची आहे.
विंदांची साहित्यसंपदा:
काव्य – धृपद,विरूपिका, स्वेदगंगा,जातक,अष्टदर्शने,मृद्गंध
संकलित काव्य – आदिमाया,संहिता विंदांच्या समग्र कविता.
प्राप्त पुरस्कार:
कबीर पुरस्कार, कवी कुसुमाग्रज, केशवसुत, कुमारन् आसन, कोणार्क, जनस्थान, महाराष्ट्र फौंडेशन, म.सा.प,डाॅ. लाभसेटवार,सोविएट लॅन्ड नेहरू लिटररी पुरस्कार आणि अष्टदर्शन ला ज्ञानपीठ पुरस्कार.
ज्ञानपीठ पुरस्काराची रक्कम त्यांनी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाला अर्पण केली व अमराठी साहित्य मराठीत अनुवादीत करण्यासाठी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव पुरस्कार सुरू केला.
अनेक विद्यापीठांनी त्यांना डी.लीट.ही पदवी बहाल केली आहे.
“वाचकांचे अनेक थर आहेत.यातला कोणताही थर वंचित ठेवणे हे पाप आहे.”असे मानणा- या विंदाना आदरपूर्वक प्रणाम.
इंदुमती शेवडे
इंदुमती शेवडे या विदर्भातील पत्रकार व लेखिका.तसेच त्या उत्तम चित्रकारही होत्या.मराठी कथेचा उद्गम आणि विकास या विषयावर त्यांनी पी.एच्.डी. केले होते. जी. डी. आर्टस् ही कलापदवी प्राप्त केली होती.
तरूण भारत, नागपूर या दैनिकात पत्रकारिता करून ‘महिलांचे मनोगत’ हे सदर अनेक वर्षे चालवले होते. आकाशवाणी,नागपूर येथे सहायक कार्यक्रम निर्माता (मराठी भाषण) या पदावरही काम केले. बी.बी.सी.च्या प्रशिक्षण वर्गात त्यांचा सहभाग होता.नंतर त्यांना दिल्ली येथील यु.पी.एस्.सी. च्या मराठी विभागात काम करण्याची संधी मिळाली. तेथे त्यांनी नॅशनल बुक ट्रस्ट तर्फे प्रकाशित इंग्रजी पुस्तकांचा मराठीत अनुवाद केला.तसेच मिर्झा गालीब यांचेविषयी माहिती घेऊन त्यांच्या जीवनावर कादंबरी लिहीली. चौथे विदर्भ लेखिका साहित्य संमेलन त्यांचे हस्ते पार पडले.
साहित्य निर्मिती:
इथे साहिबाचिये नगरी(प्रवासवर्णन)
पु.य.देशपांडे(चरित्र)
संत कवयित्री: पाच संत कवयित्रींचा वेगळ्या पद्धतीने विचार.
कथा एका शायराची (मिर्झा गालीब कादंबरी)
विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवणा-या इंदुमती शेवडे यांना वंदन.
☆☆☆☆☆
श्री सुहास रघुनाथ पंडित
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ :विकिपीडिया व संबंधित कवींचे काव्यसंग्रह.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈