ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २८ फेब्रुवारी – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? २८ फेब्रुवारी –  संपादकीय  ? 

आज विज्ञान दिन. मानवी जीवन सुखी व्हावे म्हणून विविध सुविधा निर्माण करणारे शास्त्रज्ञ , वैज्ञानिक, संशोधक यांना शतश: प्रणाम.

गजमल माळी

आज गजमल माळी यांचा जन्म दिन. (३१ मार्च १९३४) मराठी भाषेतील लेखक, कवी , नाटककार आणि चिंतांनापर मानवतावाद या विषयावरील महत्वाचे लेखक म्हणजे गजमल माळी ते मराठवाडा साहित्य परिषदेचे त्याचप्रमाकणे अखिल भारतीय साहित्य परिषदेचे अध्यक्ष होते. शिक्षणतज्ज्ञ होते. तसेच मुद्रण व्यवसायातील आघाडीचे प्रणेते होते. सत्यशोधक समाजाचे ते खंदे कार्यकर्ते होते.

गजमल माळी. औरंगाबाद कॉलेजच्या स्थापनेपासून(१९७१)  कॉलेजचे प्राचार्य होते. तरुण लेखकांना सतत प्रोत्साहन देणारे आणि लिहिते करणारे प्राध्यापक साहित्यिक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांची ३ काव्यसंग्रह, ५ संपादित पुस्तके, लोकसाहित्य शब्दकोशाचे संकलन व सत्यशोधक समाजावरील पुस्तके आहेत. ‘राजकीय सत्तांतर’ या सामाजिक, राजकीय विषयाला वाहिलेल्या साप्ताहिकाचे ते संस्थापक संपादक होते. सत्यशोधक चळवळीतील उपेक्षित व समर्पित कार्यकर्त्यांची त्यांनी आदरपूर्वक दाखल घेतली. 

गजमल माळी यांची पुस्तके –

१.    कल्पद्रूमाची डहाळी – नाटक – मूळ कथालेखक फ्रांन्सिस दिब्रिटो

२.    कामायनी- कादंबरी

३.    गांधवेणा – कविता संग्रह

४.    ज्ञानोबा कृष्णाजी सासणे – चरित्र ग्रंथ

५.    नागफणा आणि सूर्य- खांडकाव्य

संपादित ग्रंथ –

१.    तुकारामाचे निवडक १०० अभंग

२.    म.फुले व चिपळूणकर ( वैचारिक)

३.    म.फुले निवडक विचार ( वैचारिक)

४.    राष्ट्रीय कोंग्रेस आणि सत्यशोधक समाज ( वैचारिक)

५.    वैदिक धर्म परंपरा आणि महात्मा फुले.  ( वैचारिक)

   गजमल माळी यांना मिळालेले पुरस्कार

१.    कल्पद्रूमाची डहाळी या नाटकास उत्कृष्ट नाट्यलेखनाचा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार

२.    ज्ञानोबा कृष्णाजी सासणे या ग्रंथाला मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार

३.    नागफणा आणि सूर्य या पुस्तकाला नागपूऱथील डॉ. दुर्गेश पुरस्कार

४.    म.फुले आणि चिपळूणकर या ग्रंथाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट समीक्षा लेखनाचा पुरस्कार

५.    वैदिक धर्म परंपरा आणि महात्मा फुले या ग्रंथाला मथुराबाई पिंगळे पुरस्कार . 

अशा या बहुआयामी लेखकाचा आज स्मृतिदिन. त्यानिमित्त त्यांच्या लेखनकार्यास मानवंदना.

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २७ फेब्रुवारी – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? २७ फेब्रुवारी – संपादकीय  ?

 

कुसुमाग्रज जयंती आणि मराठी भाषा गौरव दिन.

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी कवी कुसुमाग्रज यांचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान महत्त्वपूर्ण असल्याने त्यांना अभिवादन म्हणून २१ जानेवारी २०१३ रोजी महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार कुसुमाग्रजांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन” म्हणून घोषित करण्यात आले.

१ मे १९६० ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, तेव्हापासून ” १ मे ” दिवस हा मराठी राजभाषा दिन किंवा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ही मराठी.  हा छोटासा फरक सर्व मराठी प्रेमींना माहिती असावा म्हणून मुद्दाम स्पष्ट करावेसे वाटले.

आपण सर्व मराठी प्रेमी, मराठी भाषेचा विकास,संवर्धन आणि प्रसार होण्यासाठी सतत प्रयत्नशील राहूया.मराठीचा सार्वत्रिक वापर जेव्हा जास्तीत जास्त दिसून येईल तेव्हाच मराठी भाषेचा ख-या गौरव होईल.

आज कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस.त्यांचे काव्य,नाटक,लेखन हे लोकप्रिय तर झालेच पण नव साहित्यिकांना स्फुर्तीदायकही ठरले. देशभक्ती,सामाजिक आशय, प्रेम, निसर्ग प्रतिके, किंवा स्फूर्ती देणा-या शब्दांनी फुललेली त्यांची कविता असो किंवा त्याची कथा,कादंबरी,निबंध,ललित लेख ,नाटक यासारखे गद्य लेखन असो,या सर्वातून  मानवतावाद आणि सामाजिक बांधिलकीची जाण  अगदी सहजपणे दिसून येते.कविवर्य वसंत बापटांनी कवी कुलगुरू या शब्दात त्यांना गौरवले आहे.नटसम्राट सारख्या अजरामर नाट्यकृतीमुळे त्यांच्या लोकप्रियतेत आणखीनच भर पडली.साहित्य चळवळ जीवंत ठेवण्यासाठी त्यानी दिलेले योगदानही तितकेच महत्त्वाचे आहे.

आज त्यांचा जन्मदिवस.त्या निमित्त त्यांची एक कविता वाचून आपले मराठी भाषेवरील प्रेम व्यक्त करूया.कविता अर्थातच कवितेचा उत्सव या सदरात.

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ: विकिपीडिया.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २६ फेब्रुवारी – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? २६ फेब्रुवारी – संपादकीय  ?

विनायक दामोदर सावरकर

ग्रंथ प्रकाशित होण्यापूर्वीच ज्याच्यावर बंदी घालण्यात आली असा ग्रंथ निर्माण करणारा एक लेखक मराठीत होऊन गेला हे आपल्याला माहित आहे का?.विनायक दामोदर सावरकर हे त्या लेखकाचे नाव.सावरकर म्हटल्याबरोबर आपोआप स्वातंत्र्यवीर हा शब्द ओठी येतो हे साहजिकच आहे.पण त्याच वेळेला ते एक विज्ञानवादी समाजसुधारक, इतिहासकार, हिंदू धर्माचे डोळस अभ्यासक, लेखक आणि कवी होते हेही तितकेच महत्त्वाचे !इथे इतिहासकार हा शब्द वापरताना दोन अर्थांनी वापरावा लागतो. एक म्हणजे त्यांनी इतिहासाचे लेखन केले आणि दुसरा अर्थ म्हणजे त्यांनी इतिहास निर्माणही केला.मराठीत असा दुसरा साहित्यिक नसेल असे वाटते.राष्ट्रभक्ती ही त्यांच्या रक्तातच असल्यामुळे राष्ट्राचा इतिहास, भविष्यकाळाविषयी चिंतन,सामाजिक सुधारणांचा आग्रह हे सर्व त्यांच्या लेखनात प्रतित होणे अगदी साहजिक आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून केलेले हिंदू धर्म चिंतन आणि त्याच वेळेला भावनाशील कवीचे दर्शनही त्यांच्या काव्यातून  दिसून येते.या शिवाय ज्या भाषेतून आपण लिहीतो त्या भाषेच्या शुद्धीसाठीही ते प्रयत्नशील होते. मातृभाषेचे संवर्धन करत मातृभाषेतील साहित्यात मोलाची भर घालणारा असा मातृभूमीभक्त साहित्यिक अद्वितीयच म्हणावा लागेल.

सावरकरांनी 1857च्या स्वातंत्र्य संग्रामाचा जो संशोधनपूर्ण इतिहास लिहिला त्याचा त्यावेळच्या ब्रिटिश सरकारने एवढा धसका घेतला होता की या ग्रंथावर प्रकाशनपूर्वच बंदी घालण्यात आली होती. पण तरीही त्याच्या इंग्रजी प्रती प्रकाशित झाल्याच, गनिमी काव्याने!. मराठी आवृत्ती स्वातंत्र्यप्राप्ती नंतर प्रकाशित झाली. सावरकरांची देशभक्तीने ओथंबलेली गीते, शिवरायांची आरती, स्वतंत्रतेचे स्तोत्र,सागराला केलेले आवाहन आणि आव्हानही आपल्याला माहित आहेच. पण अंदमानच्या कोठडीत अकरा वर्षे अनन्वीत छळ सोसत असतानाही त्यांची काव्यप्रतिभा फुलत होती आणि महाकाव्य निर्माण होत होते हे साहित्य जगतातले आश्चर्यच नव्हे काय ?

सावरकरांचे  साहित्यिक म्हणून असलेले योगदान एका छोट्या लेखात सांगणे अशक्यच आहे. त्यामुळे थोडक्यात सांगायचे तर त्यांची ग्रंथनिर्मिती अशी:

10,000 पेक्षा जास्त पाने मराठी  भाषेत आणि 1500पेक्षा जास्त पाने इंग्रजी भाषेत मौलिक लेखन.

एकंदर 41पुस्तकांची निर्मिती–

1857चे स्वातंत्र्यसमर

अखंड सावधान असावे

अंदमानच्या अंधेरीतून

अंधश्रद्धा भाग 1 व 2

काळे पाणी

माझी जन्मठेप

मोपल्यांचे बंड

संगीत उत्तरक्रिया नाटक

संगीत उःशाप      नाटक

महाकाव्य कमला

महाकाव्य गोमांतक

भाषा शुद्धी

नागरी लिपीशुद्धीचे आंदोलन

जोसेफ मॅझिनी….इ.इ.इ .

सावरकर यांचे जीवनावर आधारित अनेक ग्रंथांची, नाटक, चित्रपट यांची निर्मिती झाली आहे.अनेक ठिकाणी स्मारके उभी आहेत. त्यांच्या नावे अनेक पुरस्कारही दिले जातात.अशा या बहुआयामी साहित्यिकाने 26 फेब्रुवारी 1966 रोजी देहत्याग केला.आज त्यांचा स्मृतीदिन!

त्यांच्या कार्यकर्तृत्वास शतशः प्रणाम !?!

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ: विकिपीडिया.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २५ फेब्रुवारी – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? २५ फेब्रुवारी –  संपादकीय  ? 

स्त्रीया जेव्हा लिहू लागल्या, तेव्हा सुरुवातीच्या आघाडीच्या फळीतील लेखिका म्हणजे गिरिजाबाई केळकर.  त्या पहिल्या स्त्री नाटककार. त्यांचा जन्म १८८६ चा. त्या पूर्वाश्रमीच्या द्रौपदी श्रीनिवास बर्वे. वडील गुजरातमध्ये स्थायिक असल्याने त्यांचे ५ वी पर्यंतचे शिक्षण गुजराथीत झाले. ६वीत बर्टन फिमेल ट्रेनिंग कॉलेजच्या शाळेत त्या गेल्या. लहानपणी शेजारच्या आजीबाईंना हरीविजय, रमविजय, पांडव प्रताप, या पोथ्या त्या वाचून दाखवत. 

१५ व्या वर्षी लग्न झाल्यावर गिरिजाबाई पुण्यात आल्या. वाचनाच्या आवडीतून त्यांनी उत्तम भाषा अवगत केली. दर शुक्रवारी हळदी कुंकवाच्या निमित्ताने त्या आसपासच्या स्त्रियांना घरी बोलवत आणि वाचायला शिकवत. मासिके, वर्तमानपत्रे वाचून दाखवत. ‘केसरी’ त्या नियमित वाचत. नंतर त्यांनी लेखनाला सुरुवात केली. एक लेख ‘ज्ञानप्रकाश’ला पाठवला. तो छापून आल्यावर त्यांनी नियमित लेखन केले. ‘‘ज्ञानप्रकाश’  आणि ‘आनंद’ मध्ये त्यांचे लेख छापून येत. ‘ज्ञानप्रकाश’ मधील लेखांचे ‘गृहिणी भूषण’ नावाचे पुस्तक पुढे प्रकाशित झाले. त्याला वा. गो. आपटे यांची प्रस्तावना  आहे.

त्यांनी ‘पुरूषांचे बंड’ नावाचे नाटक लिहिले. खाडीलकरांनी लिहिलेल्या ‘बायकांचे बंड’ या नाटकाला सडेतोड उत्तर म्हणून त्यांनी हे नाटक लिहिले. य. ना. टिपणीस यांनी हे नाटक रंगभूमीवर आणले. १९१३ साली हे पुस्तक प्रकाशित झाले.

गिरिजाबाई यांची प्रकाशित पुस्तके – १. मांदोदरी, २.राजकुंवर, ३.हीच मुलीची आई, ४.वरपरीक्षा, ५. सावित्री. ६. आयेषा ही सर्व नाटके आहेत. ‘गृहिणी भूषण’ हा २ भागातला लेखसंग्रह आहे. द्रौपदीची थाळी हे आत्मचरित्र, तर संसारसोपान हे वैचारिक पुस्तक आहे. तसेच स्त्रियांचा वर्ग हे अनुवादीत पुस्तक आहे. स्त्रियानु वर्ग या गुजराती पुस्तकाचा हा अनुवाद आहे.

१९२८मधे मुंबईत भरलेल्या २३ व्या मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. आज त्यांचा स्मृतिदिन ( २५ फेब्रु. ८० ).  त्यांच्या साहित्यिक – नाट्य विषयक कार्याला शतश: प्रणाम ?

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २४ फेब्रुवारी–संपादकीय – सौ. गौरी गाडेकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सौ. गौरी गाडेकर

? २४ फेब्रुवारी –  संपादकीय  ? 

प्रभाकर रामचंद्र दामले

प्रा. डॉ. प्रभाकर रामचंद्र दामले (24 फेब्रुवारी 1905 –  24 फेब्रुवारी 1986)

त्यांनी तत्त्वज्ञान या विषयात 1924मध्ये बी ए व 1927 मध्ये एम ए केले.

ते नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे येथे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक व नंतर विभागप्रमुख होते. इंडियन इन्स्टिटयूट ऑफ फिलॉसॉफी, अमळनेर येथे रिसर्च फेलो  होते. कर्नाटक महाविद्यालय, धारवाड येथे तत्त्वज्ञान व इंग्लिशचे प्राध्यापक होते.

1954 मध्ये तर्कशास्त्र व सद्वस्तुमीमांसा विभाग, भारतीय तत्त्वज्ञान परिषद, सिलोन येथे ते अध्यक्ष होते. नंतर 1955, 1958, 1959 साली अनुक्रमे ऑक्सफर्ड व लीड्स, व्हेनिस व म्हैसूरला भरलेल्या आंतरराष्ट्रीय तत्त्वज्ञान परिषदांमध्ये त्यांनी निबंध सादरीकरण केले.

‘बोधवचने ‘, ‘विचारवडाच्या पारंब्या’, ‘ चिंतन’ व ‘न्यायरत्न महर्षी विनोद यांच्यावर लेख – महर्षी विनोद जीवन दर्शन’ हे त्यांचे मराठी लेखन.

त्यांनी ‘डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन’ व ‘डॉ. आय. टी. रमसे’ या पुस्तकांच्या  इंग्रजी प्रस्तावनाही लिहिल्या.

त्यांच्या निधनानंतर 2 मार्च 1986च्या ‘केसरी’मध्ये त्यांचे सहकारी प्रा. श्रीनिवास रघुनाथ कावळे यांनी लिहिलेला ‘श्रेष्ठ विचारवंत :प्राचार्य प्र. रा. दामले’ हा लेख प्रसिद्ध झाला होता.

24 फेब्रुवारी 1986 ला त्यांचे देहावसान झाले.

☆☆☆☆☆

लक्ष्मीबाई टिळक

लक्ष्मीबाई नारायण टिळक (1 जून 1868 – 24 फेब्रुवारी 1936)

मनकर्णीका गोखले यांचा वयाच्या 11 व्या वर्षी नारायण वामन टिळक या कवीशी विवाह झाला व त्या लक्ष्मीबाई टिळक झाल्या.

तेव्हाच्या प्रथेप्रमाणे लिहितावाचता न येणाऱ्या लक्ष्मीबाईंना त्यांच्या पतीने लिहिणेवाचणे शिकवले. लक्ष्मीबाईंनी लेखिका, कवयित्री, वक्ता बनावे, यासाठी टिळक प्रयत्नशील होते.

लक्ष्मीबाईंनी लिहिलेले ‘स्मृतिचित्रे’ हे आत्मचरित्र अतिशय गाजले.85 वर्षे उलटून गेली, तरी त्याची जादू अजूनही कायम आहे. त्यातील प्रांजलपणा  व निर्भयता याची तुलना आचार्य अत्रेंनी म. गांधींच्या ‘सत्याचे प्रयोग’शी केली.बाईंची तल्लख विनोदबुद्धी, आनंदी, खेळकर स्वभाव, अकृत्रिम,खुमासदार शैली, एवढंच नव्हे तर नितळ, साध्या, अभिनिवेशरहित दृष्टीने आयुष्याकडे पाहत केलेले लेखन मनाला भिडते.

टिळकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यानंतर साडेचार वर्षांनी बाईंनीही विचारपूर्वक धर्मांतर केले.त्यांनी नेहमीच आधी विचार बदलले, मग आचार.

टिळकांनी ‘ख्रिस्तायन’ हे महाकाव्य लिहायला घेतले. पण जेमतेम 10 अध्याय लिहून झाल्यावर त्यांचे निधन झाले.लक्ष्मीबाईंनी पुढचे 64 अध्याय लिहून ते महाकाव्य पूर्ण केले.

त्यांनी अनेक कविताही लिहिल्या आहेत.’भरली घागर ‘हा त्यांचा एक कवितासंग्रह.

24 फेब्रुवारी 1936 रोजी त्यांचा देहांत झाला.

‘स्मृतिचित्रे’सारखे अभिजात अक्षरवाङ्‌मय लिहून लक्ष्मीबाई टिळक मराठी साहित्यात अमर झाल्या आहेत.

प्रा. डॉ. प्रभाकर रामचंद्र दामले  व लक्ष्मीबाई टिळक या दोघांनाही त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त सादर वंदन.  ????

सौ. गौरी गाडेकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : शिक्षण मंडळ, कऱ्हाड : शताब्दी दैनंदिनी.

इंटरनेट. ‘मोठी तिची सावली ‘:वंदना बोकील -कुलकर्णी (चतुरंग, लोकसत्ता 19फेब्रुवारी 2022)

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २२ फेब्रुवारी – संपादकीय (1) – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? २२ फेब्रुवारी –  संपादकीय  ? 

लक्ष्मणराव देशपांडे

लक्ष्मणराव देशपांडे मराठीतील एक बहुरंगी, बहुआयामी लेखक, नाटककार. नाट्यदिग्दर्शक व अभिनेते होते. त्यांनी लिहिलेया, दिग्दर्शित केलेल्या आणि सादर केलेल्या ‘वर्‍हाड चाललंय लंडनला’ या त्यांच्या एकपात्री प्रयोगासाठी त्यांचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ड रेकॉर्डमधे नोंदवलं गेलं आहे. त्यांचा जन्म ५ डिसेंबर१९४३ मधला. लहानपणी गणेशोत्सवात होणार्‍या मेळ्यातून ते काम करायचे. इथेच त्यांच्या कलावंताची जडण-घडण झाली. घराची प्रतिकूल परिस्थिती असूनही त्यांनी एम.ए. एम.एड. (मास्टर ऑफ ड्रॅमॅटिक्स) ही पदवी घेतली. मराठवाड्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विद्यापीठात काम केले. १९८०च्या सुमाराला ते या विभागाचे प्रमुख झाले. याच दरम्यान त्यांनी ‘वर्‍हाड चाललंय लंडनला’ ची निर्मिती केली.या नाटकाने अनेक विक्रम प्रस्थापित केले. हजारांच्या संख्येने लोक कार्यक्रमाला उपस्थित रहात. या नाटकाचा पहिला प्रयोग त्यांनी १९७९ मधे केला. तेव्हापासून या नाटकाचे १९६०पेक्षा जास्त प्रयोग झाले आहेत. ३ तासाच्या या एकपात्री नाटकात ते ५२ रुपे सादर करत. त्यामुळे लोक त्यांना वर्‍हाडकर म्हणू लागले. त्यांच्या या एकपात्री नाटकाचे प्रयोग अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, मस्कत, ऑस्ट्रेलिया, कतार, कुवेत, सिंगापूर, थायलंड, नायजेरिया इ. ठिकाणी झाले.

त्यांनी ‘रेशीमगाठी’ आंणि ‘पैंजण’ या चित्रपटातूनही कामे केली. पर्भणी इथे झालेल्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते.

लक्ष्मणराव देशपांडे यांचे प्रकाशित साहित्य  –

  • ‘वर्‍हाड चाललंय लंडनला’ या नाटकाचे पुस्तक निघाले. 
  • प्रतिकार हे एकांकिकांचे त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले.
  • मौलाना आझाद – पुंनर्मूल्यांकन याचे त्यांनी संपादन केले.
  • महाराष्ट्र शासनातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या ‘अक्षरनाद’चे त्यांनी संपादन केले.

लक्ष्मणराव देशपांडे यांना मिळालेले पुरस्कार

  • महाराष्ट्र शासनाचा कलावंत पुरस्कार
  • .विष्णुदास भावे पुरस्कार
  • अखिल भरातीय नाट्यपरिषदेतर्फे साहित्यसम्राट आचार्य अत्रे पुरस्कार

आज त्यांचा स्मृतीदिन (२२ फेब्रुवारी २००९) . या निमित्त त्यांच्या बहुरंगी प्रतिभेला मानाचा मुजरा.

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २२ फेब्रुवारी – संपादकीय (2) – सौ. गौरी गाडेकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सौ. गौरी गाडेकर

? २२ फेब्रुवारी –  संपादकीय  ? 

विनायक सदाशिव वाळिंबे (वि. स. वाळिंबे) (11ऑगस्ट 1928 – 22 फेब्रुवारी 2000)

वि. स. वाळिंबे या लेखक व पत्रकारांचे शिक्षण पुण्यात झाले. इ. स.1948साली गांधीहत्येनंतर रा. स्व. संघावर घालण्यात आलेल्या बंदीच्या विरोधातील सत्याग्रहात सहभागी झाल्यामुळे त्यांना तीन महिने येरवडा कारागृहात ठेवण्यात आले. त्यामुळे त्यांच्या शिक्षणात खंड पडला.

1962-63मध्ये ते ‘केसरी’ वृत्तपत्रात वृत्तसंपादक म्हणून काम करू लागले. पत्रकारितेच्या प्रशिक्षणासाठी ते  कार्डिफ येथे गेले होते.

त्यांनी विशेषकरून ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिल्या. ‘1857ची संग्रामगाथा’, ‘गरुडझेप’, ‘मध्यरात्रीचा स्वातंत्र्यसूर्य ‘, ‘वॉर्सा ते हिरोशिमा ‘, ‘व्होल्गा जेव्हा लाल होते ‘, ‘श्री शिवराय ‘, ‘सावरकर’, ‘हिटलर’ यासारख्या अनेक ऐतिहासिक कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या.

त्याचप्रमाणे ‘अरुण शोरी : निवडक लेख’, ‘इंदिराजी ‘, ‘इन जेल’, ‘भारत विकणे आहे ‘वगैरे बऱ्याच पुस्तकांचे मराठीत अनुवाद केले.

इतिहास वा तो घडवणारी माणसे यांचे त्यांना आकर्षण होते. तीच त्यांची प्रेरणा होती. इतिहासाचे वस्तुनिष्ठ विश्लेषण असूनही त्यांचे लिखाण क्लिष्ट, कोरडे झाले नाही की इतिहासाला जिवंत करण्याच्या  नादात भावाविवशही झालं नाही.

अभ्यास आणि कष्ट करून त्यांनी निवडून -पारखून घेतलेला तपशील, ते वाचनीयता व रसवत्ता राखून उत्तम रीतीने मांडत असत.

त्यांच्यावर लिहिल्या गेलेल्या साहित्यामध्ये ‘उमदा लेखक, उमदा माणूस ‘ या अरुणा ढेरे संपादित लेखसंग्रहाचा समावेश आहे.

ओघवत्या वा चित्रदर्शी निवेदनशैलीने ऐतिहासिक लेखन करणाऱ्या वि. स.वाळिंबेंना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त ई -अभिव्यक्ती परिवाराकडून नम्र आदरांजली. ????

 

सौ. गौरी गाडेकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : शिक्षण मंडळ कऱ्हाड: शताब्दी दैनंदिनी, इंटरनेट.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २१ फेब्रुवारी – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सौ. गौरी गाडेकर

? २१ फेब्रुवारी –  संपादकीय  ? 

रा. श्री. जोग.

रामचंद्र श्रीपाद जोग (15 मे 1903 – 21फेब्रुवारी 1977)

रा. श्री. जोग यांचा जन्म गडहिंग्लज, कोल्हापूर इथे झाला.

पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून संस्कृत व मराठी घेऊन ते मुंबई विद्यापीठाचे बीए (1923) व एमए (1925) झाले. एमएला त्यांना संस्कृतची भगवानदास पुरुषोत्तम शिष्यवृत्ती मिळाली. 1926 ते 1963 या काळात ते संस्कृत व  मराठीचे प्राध्यापक होते.

‘निशिगंध’ या टोपणनावाने कवी म्हणून त्यांनी साहित्यक्षेत्रात पदार्पण केले.सरल भावाविष्कार हे त्यांच्या कवितांचे वैशिष्ट्य.’ज्योत्स्नागीत’ (1926) व ‘निशागीत'(1928) हे त्यांचे काव्यसंग्रह.

पुढे साहित्यशास्त्र व काव्यसमीक्षा हेच त्यांनी आपले कार्यक्षेत्र मानले.

‘अभिनव काव्यप्रकाश'(1930), ‘सौंदर्यशोध आणि आनंदबोध'(1943), ‘संस्कृत काव्यवाङ्‌मय ‘(1945), ‘अर्वाचीन मराठी काव्य’ (1946),’केशवसुत काव्यदर्शन’ (1947), ‘काव्यविभ्रम'(1951), ‘मराठी वाङ्‌मयरुचीचे विहंगमावलोकन'(1951) हे त्यांचे समीक्षात्मक ग्रंथ.त्याचप्रमाणे ‘चर्वणा'(1960), ‘विचक्षणा’ (1962) व ‘दक्षिणा’ (1967) हे त्यांचे साहित्यविषयक स्फूटलेखांचे संग्रह. तपशिलाविषयी दक्ष असणारे साक्षेपी व समतोल समीक्षक म्हणून त्यांचा लौकिक होता.

मराठी साहित्य परिषदेच्या मराठी वाङ्‌मयेतिहास योजनेतील तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या खंडांचे संपादनही त्यांनी केले.

1960 मध्ये ठाणे येथे भरलेल्या 42व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

21 फेब्रुवारी 1977 रोजी रा. श्री. जोग यांनी या जगाचा निरोप घेतला.

 

डॉ. किशोर शांताबाई काळे

डॉ. किशोर शांताबाई काळे(1970-21फेब्रुवारी 2007)

डॉ. किशोर काळे हे मराठी लेखक व समाजसेवक होते.

त्यांची आई कोल्हाटी तमाशा कलावंत होती.या अनौरस मुलाला तिने आपल्या माहेरी सोडले. आजोळी, शाळा-कॉलेजात त्यांच्या वाटेला फक्त निंदा, हेटाळणीच आली.

कोल्हाटी समाजातील पुरुष स्वतः काहीही कमवत नाहीत व व्यसनग्रस्त असतात.

पण आपले आयुष्य घडवण्याचा निर्धार आणि धैर्य यामुळे किशोर काळे यांनी जिद्दीने अभ्यास  करून ग्रॅण्ट मेडिकल कॉलेजमधून एम  बी बी एस  ही पदवी मिळवली.ते त्यांच्या समाजातील पहिले डॉक्टर झाले.

‘कोल्हाट्याचं पोर’ हे त्यांचे आत्मचरित्र ग्रंथालीने नोव्हेंबर 1994मध्ये प्रकाशित केले. या आत्मचरित्रामुळे साहित्यजगतात चांगलीच खळबळ माजली. त्यातून तमाशाच्या कोल्हाटी समाजाचे वास्तव जगासमोर आले. त्यामुळे त्यांना त्यांच्या समाजाने बहिष्कृत केले. पुढे त्यांच्या पुस्तकावर बंदी आणण्यासाठीही प्रयत्न झाले.

Against all odds हा त्या पुस्तकाचा संध्या पांडे यांनी केलेला अनुवाद पेंग्विन पब्लिकेशनने प्रकाशित केला.

त्यांचे दुसरे पुस्तक ‘मी डॉक्टर झालो’ हे ‘आपलं प्रकाशन’ने प्रकाशित केलं.

त्यांनी लिहिलेली ‘हिजडा, एक मर्द ‘ ही कादंबरीही गाजली. तिच्यावरून लिहिण्यात आलेल्या ‘अंधारयात्रा’ या नाटकात डॉ. काळे यांनी नायकाची भूमिका केली.

आपल्या समाजाची उन्नती करण्यासाठी व वंचितांचा विकास करण्यासाठी त्यांनी तळमळीने काम केले.

पण आपलं नियोजित कार्य पूर्णत्वाला नेण्यापूर्वीच 21 फेब्रुवारी 2007मध्ये एका अपघातामुळे त्यांचे अकाली निधन झाले.

आज 21 फेब्रुवारी. कै.रा. श्री. जोग  व कै.डॉ. किशोर शांताबाई काळे यांचा स्मृतिदिन. त्यांना ई -अभिव्यक्ती परिवारातर्फे विनम्र अभिवादन.

 

सौ. गौरी गाडेकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २० फेब्रुवारी – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? २० फेब्रुवारी – संपादकीय  ?

श्रीकांत ग. माजगावकर :

श्री.ग.माजगावकर, शिरूभाऊ, माणूसकार

श्रीगमा अशा विविध नावांनी परिचित असलेले माजगावकर हे सामाजिक,राजकीय,सांस्कृतिक,अशा सर्व प्रकारचे लेखन करणारे समर्थ लेखक होते.स्वतःच्या लेखनाबरोबरच लेखक घडवण्याचे व त्यांना प्रकाशात आणण्याचे कामही त्यांनी केले.राजहंस ही प्रसिद्ध प्रकाशन संस्था त्यांचीच.माणूस हे मासिककाही त्यांनी 01/06/1961 ला सुरू केले. हे मासिक वाचण्याची लोकांना इतकी ओढ होती की मासिकाचे रूपांतर साप्ताहिकात करावे लागले.’माणूस’ चे वैशिष्ट्य असे यात  की सर्व राजकीय पक्षाच्या लोकांना मते  मांडण्याची मुभा होती.ध्यास असलेले लेखक तयार करण्याचे व्यासपीठ असेच त्याचे वर्णन करावे लागेल.

आणीबाणीच्या काळात याच साप्ताहिकातून जनतेचा आवाज उठवला गेला होता.हे साप्ताहिक नंतर 1986 मध्ये बंद करण्यात आले.

श्री.ग.माजगावकर यांनी निर्माणपर्व , बलसागर आणि श्रीग्रामायन या तीन पुस्तकांचे लेखन केले आहे.याशिवाय वृत्तपत्रीय लेखन, संपादन, नवोदित लेखक, वार्ताहर यांना मार्गदर्शन करून लेखकांची नवी पिढी घडवण्याचे महत्वाचे काम केले आहे.    

त्यांना ॲग्रोफाॅरेस्ट्री व उत्कृष्ट संपादक हे पुरस्कार बहाल करण्यात आले.तसेच त्यांच्या नावे श्रीगमा पुरस्कार 2019 मध्ये सुरू करण्यात आला असून तो त्यांच्या जन्मशताब्दी वर्षापर्यंत म्हणजे  2029 पर्यंत देण्यात येणार आहे.

लेखन आणि संपादन समर्थपणे पेलणा-या श्री.ग. यांचे वयाच्य  68 व्या वर्षी 1997 मध्ये निधन झाले.आज त्यांचा स्मृतीदिन.त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.!

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ: विकिपीडिया, दै.प्रभात.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १९ फेब्रुवारी – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सौ. गौरी गाडेकर

? १९ फेब्रुवारी –  संपादकीय  ? 

नामदार गोपाळ कृष्ण गोखले  (9 मे 1866 – 19फेब्रुवारी 1915)

ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध, कायदेशीर राजकारणाच्या मार्गाने स्वातंत्र्यलढ्याचा पाया घालणारे राजकीय व सामाजिक नेते आणि कुशल राजनीतितज्ज्ञ नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्म रत्नागिरीतील एका खेड्यात झाला.

1884मध्ये ते बी. ए. (गणित) झाले. ते न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक व पुढे फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापक व नंतर प्राचार्यही झाले.

न्या. रानडे यांचे शिष्यत्व पत्करून त्यांनी त्यांच्याकडे अर्थशास्त्र, राज्यशास्त्र इत्यादी विषयांचा अभ्यास केला व ते भारतातील पहिल्या श्रेणीचे अर्थतज्ज्ञ झाले. केंद्रीय विधिमंडळात त्यांनी अर्थसंकल्पावर बारा भाषणे केली.

समाजकार्याच्या बाबतीत ते मवाळवादी होते.

शेतकऱ्यांच्या दुरवस्थेचा सखोल अभ्यास करुन सरकारकडे निवेदन पाठवणे, त्याचा पाठपुरावा करणे वगैरे करून त्या कार्यात त्यांनी शिस्त निर्माण केली. लोकशिक्षण, स्त्रीशिक्षण, अस्पृश्यता, जातिनिर्मूलन वगैरे संदर्भात त्यांनी कार्य केले. इंग्रजी शासकांना समजतील, अशा पद्धतीने समाजसुधारणा मांडून त्यांनी त्या मान्य करुन घेतल्या.1902 साली त्यांची निवड मध्यवर्ती कायदेमंडळात झाली  व ते नामदार झाले. त्यांच्या क्षमतेची दखल घेऊन तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड मिंटो यांनी त्यांना मार्ले मिंटो सुधारणा कायद्याचा मसुदा तयार करण्यास सांगितले.

गोखले यांनी ‘राजकारणाचे आध्यात्मिकरण’ ही संकल्पना मांडली. राजकारण हे साधनशुचितेला महत्त्व देऊन, सेवाभावाने करायचे विशेष कार्य आहे, असे त्यांचे ठाम मत होते.

कोणतीही चळवळ कायद्याच्या चौकटीतून करणे, तसेच स्वदेशीच्या वापरातून आपल्या देशातील उत्पादनास चालना देऊन आर्थिक उद्दिष्टे साध्य करणे, हे गोखले यांचे विचार होते. महात्मा गांधी हे त्यांचे शिष्य होते.

लोकमान्य टिळकांच्या ‘मराठा’ या साप्ताहिकात नियमितपणे लेख लिहून ते लोकांमध्ये देशभक्ती जागृत करीत असत. गोपाळ गणेश आगरकरांनी सुरू केलेल्या ‘सुधारक’च्या इंग्रजी आवृत्तीची जबाबदारी गोखले यांनी काही काळ सांभाळली. पुढे त्यांनी ‘हितवाद’ हे इंग्रजी वृत्तपत्र सुरू केले. ‘सार्वजनिक सभा’, ‘राष्ट्रभाषा समाचार’या वृत्तपत्रांतून लेखन करुन त्यांनी सतत समाजसुधारणांचा पाठपुरावा केला.1887साली ते सार्वजनिक सभेच्या त्रैमासिकाचे संपादक झाले.

‘अंकगणित’ हे त्यांनी अत्यंत पद्धतशीरपणे लिहिलेले पुस्तक शालेय अभ्यासक्रमात होते.

आज नामदार गोखले यांचा स्मृतिदिन आहे. या थोर, बुद्धिमान समाजसेवकाला विनम्र श्रद्धांजली. ????

 

सौ. गौरी गाडेकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print