ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ३१ डिसेंबर – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? ३१ डिसेंबर –  संपादकीय  ?  

.

गत वर्षाच्या

सरत्या क्षणांबरोबरच

विरून जाऊ दे

गूढ, उदास, मलिन धुके

कटु स्मृतींचे

येऊ दे सांगाती

सौरभ सुमधुर स्मृतींचा

जो सेतू होऊन राहील

भूत-भविष्याचा

 

आज २०२१ सालचा शेवटचा दिवस. वर्षभराचा मागोवा घेताना, अनेक बर्‍या वाईट आठवणी उसळून वर येताहेत. भविष्य काळात शांती मिळवायची असेल, तर दु:खद आठवणी विसरायला शिकायला हवं आणि सुखद आठवणी आठवता आठवता त्या जगन्नियंत्याचे आभार मानायला हवे, की त्याने असे सुखद, सुंदर क्षण आपल्या ओंजळीत टाकले.

माझ्या सुखद क्षणांबद्दल बोलायचं झालं, तर , ई-अभिव्यक्तीच्या संपादनाच्या निमित्ताने अनेक लिहिते हात माझ्या परिचयाचे झाले. लिहित्या हातांच्या धन्यांची ओळख झाली. हा अल्प परिचय अधीक दृढ होईल, मैत्रीत रूपांतरित होईल, अशी उमेद बाळगून नवं वर्षात पाऊल टाकायचे आहे. ई-अभिव्यक्तीवरून अधिकाधिक सकस साहित्य कसं देता येईल, याचा शोध, वाचक-लेखकांच्या सहाय्याने घ्यायचा आहे. सर्वांच्या सहाय्याने अधिकाधिक लेखक-वाचक मंडळी ई-अभिव्यक्तीशी जोडून घ्यायचीत. हे झाले, तर याचे श्रेयही आपणा सर्वांचे आहे. नवीन वर्षातला संकल्पच  म्हणा ना हा! आणि असे घडावे, म्हणून मीच मला बेस्ट लक देते आहे.

 ☆☆☆☆☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : इंटरनेट    

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २९ डिसेम्बर–संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? २९ डिसेम्बर –  संपादकीय  ?

मंगेश पाडगावकर:

झोपाळ्यावाचून झुलत झुलत ज्यांनी या जन्मावर शतदा प्रेम केले, ज्यांच्या दारात पहाटे पहाटे केशराचे मोर झुलत असतात आणि ज्यांच्या रात्री चांदण्याचे सुरेल गाणे गात येत असतात, आपल्या लाख चुकांची कबुली देऊनही मनातल्या मोरपिसांची शपथ घालत ते केली पण प्रीती हे ही मनापासून  जाहीर  करतात, शब्दांवाचूनही ज्यांना शब्दांच्या पलिकडलं कळलेलं असतं पण तरी शब्द शब्द जपून वेच असं जे सांगून जातात, अवघ्या जीवनाचे गाणे करून हासत जावे जाताना असा संदेश सहजपणे जे देतात ते कवीवर्य मंगेश पाडगावकर !त्यांचा आज स्मृतीदिन. पण आज स्मृतीदिन असे तरी कसे म्हणावे? कारण त्यांच्या शब्दांची पाखरं रोजच आपल्या आजुबाजूला स्मृती ठेवून जात असतात. त्यांमुळे प्रत्येक दिवस हा त्यांचा स्मृतीदिनच असतो.

सुमारे साठ वर्षे साहित्याची सेवा करणारे मंगेश पाडगावकर हे मूळचे सिंधू दुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ल्याचे. कोकणातील निसर्ग बालमनाने टिपला आणि नंतर काव्यात उतरला. त्यांनी मुंबई विद्यापीठात मराठी व संस्कृत या विषयात एम्.  ए.  पूर्ण केले. काही काळ रूईया महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केले. मात्र त्यांचे लेखन कार्य अखंडपणे चालू होते.  

प्रामुख्याने काव्यनिर्मिती केली असली तरी त्यांनी साहित्याचा अनुवादही विपुल प्रमाणात केला आहे. 1957 साली त्यांनी थाॅमस पेनचे राजनैतिक संबंध हा  निबंध अनुवादित केला. 2009 मध्ये बायबल चा अनुवाद केला. कमला सुब्रह्मण्यम यांच्याा  मूळ इंग्रजी ग्रंथाचा कथारूप महाभारत या नावाने दोन खंडांत अनुवाद केला  आहे. याशिवाय मीरा, कबीर, सूरदास या संत कवींच्या निवडक पदांचाही अनुवाद ही केला आहे. या व्यतिरिक्त विविध विषयांवरील 25   पुस्तकाचा अनुवादही त्यांनी केला आहे.

मराठी साहित्यात कविता हा त्यांचा विशेष आवडीचा प्रांत. त्यांचे काही कविता संग्रह असे: आनंदॠतू, आनंदाचे डोही, उदासबोध उत्सव, कबीर, कविता माणसाच्या माणसांसाठी, काव्यदर्शन, गझल, गिरकी, चांदोमामा, चोरी, जिप्सी, तुझे गीत गाण्यासाठी, तृणपर्वे , त्रिवेणी, धारानृत्य, बोलगाणी, भोलानाथ, भटके पक्षी, सलाम, क्षणिका इत्यादी… त्यांची अनेक काव्ये लयबद्ध, गेय असल्याने त्यांची गीते झाली. शिवाय अनेक भावगीतेही त्यांनी लिहीली आहेत.

त्यांच्या साहित्य सेवेचा  वेळोवेळी गौरवही झाला आहे. 2010 साली झालेल्या मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे व विश्व साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते . सलाम या त्यांच्या कविता संग्रहास 1980 सालचा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. 2008  साली महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे. 2013 साली म. सा. प. चा सन्मान व त्याच वर्षी पद्मभूषण पुरस्कार त्यांना प्राप्त झाला.

मुंबईतील एका चौकाला त्यांचे नाव देण्यात आले आहे त्यांच्या नावाने भाषासंवर्धन पुरस्कारही दिला जातो.

“आयुष्य हे विध्यात्याच्या वहीतलं पान असतं

 रिकामं तर रिकामं , लिहीलं तर छान असतं”  

पाडगावकरांनी म्हटल्याप्रमाणे आयुष्याच्या राहिलेल्या पानावर काहीतरी छान लिहीत जाणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे वाटते.

☆☆☆☆☆

द. पं. जोशी:

द. पं. जोशी हे मूळचे परभणीचे. आपले शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर उच्च शिक्षणासाठी ते हैद्राबादला गेले. तेथे एम. ए. पर्यंत शिक्षण पूर्ण केले. अभ्यासू वृत्ती, कुशाग्र बुद्धी, इतिहास व पूर्वसूरींबद्दल प्रेम यामुळे हैद्राबादेत ते सार्वजनिक कामात गुंतले. अनेक सार्वजनिक संस्था, मराठी साहित्य परिषद व मराठी महाविद्यालयांशी त्यांचा संबंध आला. 1959 ते 1992 या कालावधीत त्यांनी विवेक वर्धिनी महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून काम केले.

त्यांचे स्वतंत्र, संपादित व अनुवादीत असे एकूण 15 ग्रंथ प्रकाशित आहेत. विविध नियतकालिकांमधून 100 हून अधिक लेख प्रकाशित झाले आहेत. शिवाय उर्दू व हिंदी भाषेतील अनेक कथा, लेख यांचा मराठीत अनुवाद त्यानी केला आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ते दोनदा उपाध्यक्ष होते. 1998 साली भरलेल्या परभणीचे जिल्हा साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. मराठी साहित्य परिषद, हैदराबाद या संस्थेचे ते 30 वर्षे कार्यवाह व 8 वर्षे अध्यक्ष होते. या संस्थेच्या पंचधारा या त्रैमासिकाचे त्यांनी अनेक वर्षे संपादन केले होते.

आज त्यांचा स्मृतीदिन! अमराठी प्रदेशात मराठीची सेवा करणा-या द. पं. जोशी याना अभिवादन.

☆☆☆☆☆

 श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ: विकीपीडिया, तुझे गीत गाण्यासाठी

 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २८ डिसेंबर – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? २८ डिसेंबर –  संपादकीय  ?  

महाराष्ट्रातले अव्वल दर्जाचे विचारवंत आणि तत्त्वज्ञ म्हणून ख्यातकीर्त असलेले मे.पुं. रेगे म्हणजेच मेघनाथ पुंडलिक रेगे यांचा जन्म २४ जानेवारी १९२४ साली झाला. मराठी आणि   ङ्ग्रजी या दोन्ही भाषेत त्यांनी विपुल लेखन केले. मराठी भाषकांना त्यांनी पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा परिचय करून दिला. विश्वकोशात पाश्चात्य तत्त्वज्ञानविषयक व तत्त्ववेत्ते यांच्या नोंदी त्यांनी केल्या.भारतीय देशने, ग्रीक-पाश्चात्य तत्त्वज्ञान व इतर आनुषंगिक परंपरांचा व्यासंग ही त्यांची वैशिष्ट्ये.

मार्च १९९६मधे मुंबई महानगर साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. यावेळी त्यांनी मराठी भाषा स्थिती आणि भवितव्य या विषयावर मार्मिक भाष्य केले. ज्ञानभाषा म्हणून प्रस्थापित होण्यात नेमका कोणता अडथळा आहे, यांची उत्तम मीमांसा त्यांच्या भाषणात होती.

मे.पुं. रेगे  तर्कशास्त्री लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यानंतर १९८४ ब्ते २००० मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष झाले. ते नवभारत आणि न्यू क्वेस्ट या मासिकांचे संपादक होते. ‘मराठी तत्वज्ञान महाकोश या प्रकल्पाच्या संपदक मंडळात होते. त्यांनी गुजरात, औरंगाबाद, मुंबई इये. ठिकाणी अध्यापनाचे काम केले‘इंडियन इंस्टिट्यूट ऑफ एज्युकेशन’चे संचालक होते. वाईतील धर्मकोशाचे ते उपाध्यक्ष-अध्यक्ष होते.

१९९५ मधे महाराष्ट्र फाउंडेशनच्या पहिल्या वैचारिक साहित्य पुरस्काराचे ते मानकरी होते.१९९६साली त्यांचा गौरव झाला आणि त्यांना  कोकण साहित्य भूषण म्हणून त्यांचा गौरव झाला आणि त्यांना गौरवचिन्ह दिले गेले. मर्मभेद, आधुनीक महाराष्ट्रातील प्रबोधन पर्व विज्ञान आणि श्रद्धा, स्वातंत्र्य आणि न्याय इ. त्यांनी पुस्तके लिहिली. त्यांनी अनेक भाषांतरित पुस्तकेही लिहिली.

  ☆☆☆☆☆

रमेश सहस्त्रबुद्धे हे विज्ञान कथा लेखक म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचा जन्म १९३८चा. विज्ञानयुग म्हणून प्रसिद्ध होणार्‍या मासिकाच्या सल्लागार समितीवर ते होते. त्या अंकात ते लेखनही करत. दै. प्रभातच्या दिवाळी अंकात ते लेखन करत असत. प्रभातने चालवलेल्या ‘ऑल राऊंडर या उपक्रमातदेखील त्यांचा सहभाग असे. मराठी  विज्ञान परिषदेतर्फे काढल्या जाणार्‍या पत्रिकांसाठी त्यांनी लेखन केले. मासिकाच्या संपादकपदाची धूराही त्यांनी सांभाळली. ते लेखक होते, त्याचप्रमाणे आकाशवाणी आणि दूरदर्शन वरूनही त्यांची व्याख्याने प्रासारीत झाली आहेत. महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे ते पहिले मुख्य जंनसंपर्क आधिकारी होते.

रमेश सहस्त्रबुद्धे यांची ७६ पुस्तके प्रकाशित आहेत. त्यापैकी काही खालील पुस्तके –

  • विज्ञान कुतूहल २.प्राणी-पक्षी निरीक्षण, ३.वैज्ञानिक आणि थोरांचे किस्से, ४.अजब दुनिया, ५. ऐतिहासिक नवलकथा, क्रांतिकारकांच्या कथा या बरोबरच त्यांनी मार्कोनी, जगदीशचंद्र बोस, दसगणू महाराज, राजकपूर, होमी भाभा यांच्यावर त्यांनी चरित्रे लिहिली.
  • टेलिव्हीजन आणि विज्ञान सागरातील दीपस्तंभ या विज्ञानविषयक पुस्तकांना  राज्यापुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या काही लेखांचा पाठ्यपुस्तकात व अभ्यासक्रमात समावेश झाला आहे.
  • रोहा येथे झालेल्या विज्ञानपरिषदेच्या संमेलनात मानपत्र देऊन गौरव झाला आहे.

रमेश सहस्त्रबुद्धे यांचा स्मृतीदिन २८ डिसेंबर२०१६ चा तर मे.पुं. रेगे  यांचा २८ डिसेंबर २०००चा. या दोघाही विचारवंतांना आणि प्रतिभावंतांना सादर अभिवादन. ?

 ☆☆☆☆☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : इंटरनेट    

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २६ डिसेंबर – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? २६ डिसेंबर –  संपादकीय  ?

आज २६ डिसेंबर हा मराठी गीतकार श्री. दत्ता वि. केसकर यांचा स्मृतिदिन. त्यांच्या गीतांबद्दल, किंवा इतर साहित्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध झाली नसली, तरी त्यांची ध्वनिमुद्रित झालेली जी दोनच भावगीते, रसिकांच्या मनात कायमची नोंदली गेलेली आहेत, त्याबद्दल सांगायलाच हवे. 

“घरात हसरे तारे असता, मी पाहू कशाला नभाकडे “, हे त्यातले एक भावगीत, आणि “ प्रतिमा उरी धरोनी , मी प्रीती गीत गाते “ –हे दुसरे भावगीत. लता मंगेशकर यांच्या आवाजातल्या या  दोन्ही भावमधुर गीतांनी मराठी भावगीत-विश्वात कायमचे स्थान मिळवलेले आहे. 

श्री. द. वि. केसकर यांना आदरपूर्वक नमस्कार. 

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

माहितीस्रोत :- इंटरनेट

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २५ डिसेंबर – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? २५ डिसेंबर –  संपादकीय  ?  

आज नाताळ म्हणजेच ख्रिसमस. आज येशू ख्रिस्ताचा जन्म मध्यरात्री झाला म्हणून ख्रिस्ती बांधवांचा आज सण. आपल्याकडे गुढी पाडव्याला गुढ्या उभारणे जसे आवश्यक आणि महत्वाचे मानले जाते, तसेच ख्रिसमसला ख्रिसमस ट्री उभारणे ख्रिस्ती बांधव महत्वाचे मानात. हा ट्री सूचिपर्णी वृक्षाचा असून तो स्वर्गातील ईडन गार्डन बागेचा व येशूच्या क्रूसाचा प्रतीक आहे. आपण दिवाळीला फरळाचे पदार्थ करतो, त्याप्रमाणेच महाराष्ट्रातले ख्रिस्ती बांधव फराळाचे पदार्थ करून एकमेकांना देतात. एकमेकांना भेटी व शुभेच्छा  देतात. लहान मुलांना खाऊ आणि खेळणी सांताक्लॉज देतो, असे मानले जाते.

आज मलाही सांताक्लॉज भेटावा आणि त्याने मला विचारावं, बोल, तुला काय देऊ? आणि मी म्हणावं, ‘मला ‘ओमीक्रॉनवरची लस दे. औषध दे.

? ?️आज नाताळच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा ?️ ?  

मराठी साहित्यातील महान आणि मान्यताप्राप्त लेखक म्हणजे श्री. म. माटे यांचा जन्म विदर्भातील शिरपूर  इथे २प्टेंबर १८८६ साली झाला. प्रथम शाळेत आणि नंतर महाविद्यालयात, इंग्रजी व मराठी विषयाचे त्यांनी अध्यापन केले. ’रोहिणी’ मासिकाचे ते पहिले संपादक होते. ‘ केसरी प्रबोध’, ‘महाराष्ट्राचे सांवत्सरीक ( ३ खंड ) या ग्रंथाचे संपादन करून साहीत्य क्षेत्रात त्यांनी मनाचे स्थान मिळवले. ’विज्ञानबोध’ या त्यांनी संपादित केलेल्या पुस्तकाला त्यांनी २०० पानी प्रस्तावना लिहिली. ती खूप गाजली. वाचकांना विज्ञानयुगाकडे बघण्याचा दृष्टीकोण त्यातून दिला. त्यांनी आयुष्यभर अस्पृश्यता निवारणाचे काम केले. माटे यांचे लेखन प्रासादिक, प्रसन्न, आणि शैलीदार होते. ते शिक्षक होते. कृतीशील सुधारक. होते आणि नितळ-निर्व्याज माणूसही होते. १९३० ते १९५५ या काळात त्यांनी लेखन केले. , संशोधन, संकलन, चरित्रे, वैचारिक, तत्वचिंतनात्मक, इतिहास मंथन, चालू घडामोडी, निबंध, ललित, असा मोठा विस्तृत पट त्यांच्या लेखनाला आहे. पश्चिमेचा वारा ही त्यांची एकमेव कादंबरी. याशिवाय त्यांचे प्रकाशित साहित्य सांगायचे झाले तर  अनामिक,  अस्पृश्यांचा प्रश्न, उपेक्षितांचे अंतरंग, गीतातत्व विमर्श, मी व मला दिसलेले जग, निवडक श्री. म. माटे , भावनांचे पाझर, रसवंतीची जन्मकथा, (भाषेच्या विकासाबद्दलचे पुस्तक), विचार मंथन, विचारा शलाका, संत, पंत आणि तंत (संत, पंत आणि तंत यांच्या काव्याचा परामर्श घेणारे पुस्तक) त्यांचे ‘उपेक्षितांचे अंतरंग’ हे पुस्तक खूप गाजले. ‘कृष्णाकाठचा रामवंशी’, तारखोर्‍यातील पिर्‍या’, ‘मांगवाड्यातील रुमाजीबोवा’, ‘बन्सिधरा आता तू कुठे जाशील?’ या कथा खूप गाजल्या.

अस्पृश्य निवारक मंडळाचे  ते संस्थापक होते. अस्पृश्य वस्तीत जाऊन ते मुलांना शिकवत. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १९४५ साली कल्याण येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे ते अध्यक्ष होते. सांगली येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. ते विचाराने हिंदुवादी होते.

श्री. म. माटे यांचा आज स्मृतीदिन ( २५ डिसेंबर १९५७) त्यानिमित्ता त्यांना विनम्र आदरांजली. ?

 ☆☆☆☆☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : शिक्षण मंडळ कर्हााड: शताब्दी दैनंदिनी, इंटरनेट    

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २४ डिसेम्बर–संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? २४ डिसेम्बर –  संपादकीय  ?

प्रा. दत्तात्रय केशव बर्वे.

श्री. द. के. बर्वे यांनी मराठी विशेष विषयासह बी. ए.  व एम् ए.  पुणे येथे केले. नंतर बेळगाव येथे बी. एड्.  केले. शिक्षक व मराठी भाषेचे व्यासंगी प्राध्यापक म्हणून त्यांनी नाव कमावले. प्राध्यापक काळात त्यांनी ‘ निवडक नवनीत’ हा कविता संग्रह संपादित केला. तसेच वा. म. जोशी यांच्या आश्रमहरिणीच्या समीक्षेचे ‘आश्रमहरिणीचे अंतरंग ‘ हे पुस्तक लिहिले. परंतु त्यांचा खरा पिंड हा सर्जनशील लेखकाचा होता. त्यांनी बालसाहित्य व  कथालेखन विपुल प्रमाणात केले. 1950 साली त्यांचा पहिला कथासंग्रह प्रकाशित झाला. पुट्टी,   पोकळी,  पंचवेडी,  आंबट षोक,   नन्नी,  हे त्यांचे काही कथासंग्रह. बालसाहित्यात गुलछबू,  फुलराणी,  देशासाठी दर्यापार,  बोलका मासा,  चंद्रावर ससा,  डाॅ. पोटफोडे या पुस्तकांचा उल्लेख करता येईल.

महाराष्ट्र शासनाने नवसाक्षर प्रौढांसाठी लेखन करण्यास त्यांना सांगितले. त्यांनी लिहीलेली ‘गणूचा गाव ‘ ही कादंबरी लोकप्रिय ठरली. त्यामुळे त्यांची राष्ट्रीय स्तरावरील लेखक शिबिरासाठी निवड झाली.

1971 साली त्यांनी ‘दिलीपराज प्रकाशन’ या संस्थेची स्थापना केली. या वर्षी त्याला 50 वर्षे पूर्ण होत आहेत.

अन्य लेखनाबरोबरच  त्यांनी बेळगाव येथील उद्योगपती रावसाहेब गोगटे यांचे सागर मेघ हे चरित्र लिहिले. पण दुर्दैव असे की या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या आधी दोन दिवस म्हणजे 24/12/1981 ला ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले.

त्यांच्या स्मृतीस अभिवादन.

☆☆☆☆☆

वसंत सरवटे. 

‘व्यंग चित्रित करते ते व्यंगचित्र’ अशी व्यंगचित्राची सोपी व्याख्या करणारे व्यंगचित्रकार वसंत सरवटे यांचा आज स्मृतीदिन आहे.

ते कोल्हापूरचे. त्या काळात ती कलानगरी होती. पण चित्रकलेकडे व्यावसायिक दृष्टीकोनातून पाहण्याची दृष्टी समाजाकडे नव्हती. त्यामुळे चित्रकलेची आवड असूनही त्यानी सिव्हिल इंजिनिअर चे शिक्षण पूर्ण केले व ए. सी. सी. या कंपनीत नोकरी धरली.    

लहानपणापासून मनात चित्रकलेची आवड होती. दलालांची चित्रे आणि पाश्चात्य  व्यंगचित्रकारांची चित्रे यांच्या प्रभावामुळे ते व्यंगचित्रांकडे वळले. चिंतनशील,  मर्मग्राही व प्रयोगशील रेखाटनशैली ही त्यांच्या कलेची वैशिष्ट्ये आहेत. त्यांनी अनेक पुस्तकांची मुखपृष्ठे,  कथाचित्रे,  व्यंगचित्रमालिका सादर केल्या आहेत. राजकीय व्यंगचित्रांवर त्यांनी भर दिला नाही. त्यांच्या चित्रातून सामाजिक प्रश्न,  सांस्कृतिक बदल मांडलेले दिसतात. माझा संगीत व्यासंग,   खुर्च्या आणि गमती गमतीत या व्यंगचित्रमालिका वैशिष्ट्यपूर्ण ठरल्या . अर्कचित्र म्हणजे कॅरिकेचर हा प्रकार त्यांनी मराठीत रूढ केला. त्यांचे एकूण सहा व्यंगचित्र संग्रह प्रकाशित आहेत. याशिवाय त्यांनी व्यंगचित्र-एक संवाद,  व्यंगकला चित्रकला व सहप्रवासी  ही व्यक्तीचित्रे लिहीली आहेत . त्यांच्या तीन पुस्तकांना राज्य शासनाचा उत्कृष्ट वाङ्मयाचा पुरस्कार मिळाला आहे. तसेच बंगळूरू च्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कार्टूनिस्ट ने जीवन गौरव पुरस्कार प्रदान केला आहे.

जगण्यातील  व्यंगे स्विकारून हसत हसत त्यांच्यावर मात करणे हीच सरवटे यांना योग्य श्रद्धांजली ठरेल.

☆☆☆☆☆

 श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ:  विकीपीडिया, महाराष्ट्रनायक, अक्षरनामा.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २३ डिसेंबर – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? २३ डिसेंबर –  संपादकीय  ?

 आज २३ डिसेंबर — 

कला व नाट्यक्षेत्रातील आस्वादक समीक्षक आणि लेखक म्हणून ख्यातनाम असलेले श्री. ज्ञानेश्वर गणपत नाडकर्णी यांचा आज स्मृतिदिन. (२१/५/१९२८ – २३/१२/२०१०) 

‘उत्कृष्ट कलासमीक्षक ‘ ही श्री. नाडकर्णी यांची महत्वाची ओळख तर होतीच. पण त्याचबरोबर,  साहित्य, चित्रकला, नाटक, चित्रपट, अशा विविध कलाप्रकारांचा मागोवा घेतानाच, त्या काळात येऊ घातलेल्या नवनवीन बदलांची दखल घेणारे लेखन , मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत त्यांनी विपुल प्रमाणात केले. त्यांच्या अशा समीक्षणांना जगभरातले अनेक सन्मान मिळाले होते.—- फ्रांस सरकारचा कलाक्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार, ब्रिटिश सरकारचे गौरवचिन्ह, फ्रेंच सरकारतर्फे ‘अक्षरांचे शिलेदार’ हा किताब, हे त्यापैकी काही विशेष सन्मान. 

मराठी आणि इंग्रजी भाषेतून कलासमीक्षेच्या क्षेत्रात पन्नासपेक्षाही जास्त वर्षे कार्यरत असणारे श्री. नाडकर्णी यांची अनेक पुस्तकेही प्रसिद्ध झालेली आहेत— पाऊस, भरती, प्रस्थान, चिद्धोश, हे कथासंग्रह, – दोन बहिणी, कोंडी, नजरबंदी, वलयांकित, या कादंबऱ्या, – एम.एफ.हुसेन यांच्यावर लिहिलेला ‘ अनवाणी ‘ नावाचा, आणि पिकासो, हिचकॉक, डी .डी .दलाल, गायतोंडे यांच्यावरचे चरित्रग्रंथ,– अश्वत्थाची सळसळ, अभिनय, प्रतिभेच्या पाऊलवाटा, असे समीक्षा ग्रंथ, – ‘ विलायती वारी ‘ हे प्रवासवर्णन, इंग्रजीत लिहिलेले बालगंधर्वांचे चरित्र, अशी त्यांची पुस्तके प्रसिद्ध झालेली होती. 

आजच्या स्मृतिदिनी श्री. नाडकर्णी यांना विनम्र आदरांजली. 

☆☆☆☆☆

सुप्रसिद्ध कवी वसंत सावंत यांचा आज स्मृतीदिन. ( ११/४/१९३५ – २३/१२/१९९६ ) 

“ अर्वाचीन मराठीतील प्रवासवर्णने ( १८०० ते १९६५ ) : प्रवासवर्णन एक वाङ्मयप्रकार “ या एका वेगळ्याच विषयात श्री. सावंत यांनी पी.एच.डी.मिळवली होती. एकीकडे त्यांचे काव्यलेखनही जोमाने चालू होते.  वारकरी संत साहित्य, आणि बा.भ.बोरकर, मंगेश पाडगावकर, यांच्या सौंदर्यवादी कविता, यांच्या संस्कारांमधून आपले वाङ्मयीन व्यक्तिमत्व घडत गेले असे ते प्रांजळपणे म्हणत असत. तरल संवेदनांनी भारलेले त्यांचे कविमन त्यांच्या प्रत्येक कवितेत आपसूकच जाणवत असे. त्यांच्या कवितांमध्ये तळकोंकणातल्या सांस्कृतिक जीवनाचे काव्यात्मक दर्शन, धार्मिक संज्ञांचा आणि प्रतीकांचा अनेकदा केलेला वापर, अव्यक्त दुःखाची नकळतपणे व्यक्त होणारी अनुभूती, हे सगळे जाणवायचे. निसर्गकवितांमधली ईश्वरी रूपाच्या प्रत्ययाची घेतलेली नोंद, हे  सुद्धा त्यांच्या काव्याचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या कवितेतला विविध वृत्त-छंदांचा वापरही मुद्दाम अधोरेखित करावा असाच. 

‘ स्वस्तिक ‘ या पहिल्या काव्यसंग्रहानंतर, उगवाई, देवराई, माझ्या दारातले सोनचाफ्याचे झाड, सागरेश्वर, असे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध झालेले आहेत. ‘ दगड तरे पाण्यावर ‘ ही रामकथेवर आधारित असलेली त्यांची संगीतिका, हा त्यांचा एक वेगळाच काव्याविष्कार. ‘ वसा ‘ हे साडेतीन चरणी ओव्यांचा नियम पाळत त्यांनी रचलेले खंडकाव्य, ही त्यांची विशेष निर्मिती ठरली. आधुनिकतेचे घाव बसू लागल्याने नाश पावत चाललेले कोकणाचे सौंदर्य निदान शब्दरूपात तरी  जपण्याचा ध्यास त्यांना लागला होता, हेच या काव्यातून जाणवते. शापित होऊन भोग भोगावे, तद्वतच बदलत चाललेल्या कोकणाचे हे जणू ‘ प्रदेशचित्र ‘च आहे. ‘ देवराई ‘ मधून कोकण-संस्कृतीची वेगवेगळी रूपे दाखवतांना –

“ अशा लाल मातीत जन्मास यावे, जिचा रंग रक्तास दे चेतना ।

  इथे नांदते संस्कृती भारताची, घरातून दारात वृंदावना ।।

—असे म्हणणारे प्रेमळ कवीमन, ‘ वसा ‘ मध्ये मात्र अतिशय हळवे झाल्याचे जाणवत रहाते. 

श्री. सावंत यांना पुढील पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेले आहे —- “ प्रवासवर्णन- एक वाङ्मयप्रकार “ हा समीक्षाग्रंथ म.रा. साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित करणे हा एक पुरस्कारच म्हणायला हवा. याच मंडळाने दिलेला ‘ कविवर्य केशवसूत ‘ पुरस्कार, संत नामदेव पुरस्कार, यशवंतराव चव्हाण पुरस्कार , ‘ उगवाई ‘ या काव्यसंग्रहाला महा. साहित्य परिषदेचे ‘ह. स. गोखले पारितोषिक. 

श्री. सावंत यांना भावपूर्ण वंदन.   

☆☆☆☆☆

आंबेडकरी साहित्य चळवळीत सक्रीय असणारे मराठी साहित्यिक श्री. वामन होवाळ यांचा आज स्मृतिदिन. ( १९३५ – २३/१२/२०१६ ) 

‘ माणूस ‘ ही त्यांची पहिली प्रसिद्ध झालेली कथा. त्यानंतर बऱ्याच मासिकांमधून त्यांच्या कथा प्रसिद्ध झाल्या. “ अस्मितादर्श “ या नियतकालिकासाठीही त्यांनी नियमित लेखन केले. आवर्जून सांगायचे म्हणजे,  त्यांच्या ‘ मजल्याचे घर ‘, ‘पाऊसपाणी ‘, या कथांचे इंग्लिश आणि फ्रेंच भाषेत अनुवाद झाले आहेत. तसेच इतर काही कथांचे हिंदी,उर्दू आणि कानडी भाषेतही अनुवाद केले गेले आहेत. दलित ग्रामीण विश्वाचे दर्शन, आणि मुंबईतील झोपडपट्टीतील रहिवाश्यांच्या जीवनाचे चित्र रेखाटणाऱ्या आपल्या कथा ‘ कथाकथन ‘ या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणारे प्रमुख कथाकथनकार ही त्यांची विशेष ओळख. 

त्यांचे प्रकाशित साहित्य असे — ऑडिट, बेनवाद, येळकोट, वाटा आडवाटा, वारसदार, हे कथासंग्रह. आंधळ्याची वरात बहिऱ्याच्या घरात, आणि जपून पेरा बेणं, ही लोकनाट्ये, आणि आमची कविता हे त्यांनी संपादित केलेले पुस्तक. 

श्री. होवाळ यांच्या तीन कथासंग्रहांना महाराष्ट्र सरकारचे पुरस्कार मिळालेले आहेत. दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे साहित्य संमेलन, आणि कादरगा ग्रामीण साहित्य संमेलन यांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविलेले होते. 

दलित साहित्यिकांमधील प्रमुख साहित्यिक अशी ख्याती प्राप्त केलेल्या श्री. होवाळ यांना आदरपूर्वक प्रणाम.  

☆☆☆☆☆

आज ज्या आणखी एका लेखकांना त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वंदन करायला हवे, ते म्हणजे श्री. विष्णू सीताराम चितळे. ( १०/३/१९०० – २३/१२/५३ ) 

ह्यांनी रूढार्थाने ललित-साहित्य निर्मिती केली नव्हती. पण इतिहास संशोधन आणि इतिहास-विषयक लेखन करतांना , लहानांबरोबरच मोठ्यांनाही आपल्या देशाचा इतिहास समजला पाहिजे, आणि त्यासाठी मुळात त्यांना तो वाचण्यात रुची निर्माण झाली पाहिजे, म्हणून ते सतत प्रयत्नशील होते. आणि याच तळमळीने त्यांनी कितीतरी चित्रे, नकाशे, आलेख  यांचा समावेश असलेली पुढील पुस्तके लिहिली होती.—– ब्रिटिशांचा इतिहास, हिंदुस्थानचा अभिनव इतिहास, नवभारताच सांस्कृतिक इतिहास, शनिवारवाडा, सिंहगड, इ.– कुणालाही वाचण्यात रस वाटावा अशा या पुस्तकांबरोबर ‘ इतिहास संचार ‘ नावाचा त्यांचा स्फुटलेखांचा संग्रहही प्रसिद्ध झाला होता. ऐतिहासिक वंशावळी तयार करण्याच्या रियासतकार सरदेसाईंच्या मोठ्या कामात श्री. चितळे यांचा मोठा सहभाग होता. 

स्वान्तसुखाय “ लेखन न करता, अखिल भारतीयांचा विचार करत आपल्या शब्दसामर्थ्याचा सार्थ उपयोग करणाऱ्या श्री. चितळे यांना आदरपूर्वक नमस्कार. 

☆☆☆☆☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

माहितीस्रोत :- इंटरनेट

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २२ डिसेंबर – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

?  २२ डिसेंबर –  संपादकीय  ?

मराठी साहित्यातील शाहीरी वाङ्मयात मोलाची भर घाणारे पठ्ठे बापूराव म्हणजेच श्रीधर कृष्ण कुलकर्णी यांचा जन्म ११ नोहेंबर १८६६ ला रेठारे हरणाक्ष इथे ब्राम्हण कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या गावातच झाले. पुढे ते औंघच्या महाराजांनी बोलवल्याने तिकडे गेले. महाराणींनी त्यांना बडोद्याला नेले. तिथे त्यांनी पुढचे शिक्षण घेतले. आई-वडील लवकर गेल्याने ते पुन्हा गावी परतले.

शाळेत गेल्यावर त्यांना कविता करण्याचा छंद  लागला. ग्रामीण भागात गायल्या जाणार्‍या जात्यावरच्या ओव्या ऐकता ऐकता त्यांनी त्यात बादल केले. ‘श्रीधरची गाणी’ म्हणून तीही लोकप्रीय झाली.

गावी घरासमोर असलेल्या वाड्यात तमाशाचा फड चालायचा. त्यांचं मन तिकडे ओढ घ्यायचं. जातीने ब्राम्हण, आणि कुलकर्णी वृत्ती यांनी तिकडे जाताना लाज वाटायची. सुरूवातीला ते चोरून मारून तमाशाला जायचे पण पुढे पुढे तमाशाची ओढ अनिवार झाली आणि शेवटी

‘श्रेष्ठ वर्ण मी ब्राम्हण असूनी    सोवळे ठेवले करूनी घडी

मशाल धरली हाती तमाशाची    लाज लावली देशोधडी

असं म्हणत ते राजरोस तमाशात शिरले. संसार आणि पूर्वापार चालत आलेला आपला व्यवसाय ( कुलकर्णी वृत्ती) सोडून दिला. त्यांनी  इतर तमासागीरांना फडासाठी लावण्या लिहून दिल्या. पुढे स्वत:चा फड काढला. त्यांच्या फडाला विलक्षण लोकप्रियता मिळाली. त्यांच्या फडात पोवळा नावाची लावण्यावती नृत्यांगना होती. बापूरावांची काव्यप्रतिभा पोवळाच्या सहवासात बहरली.  त्यांनी एके ठिकाणी म्हंटले,

‘दोन लक्ष आम्ही केली लावणी   केवढी म्हणावी बात बडी’ अर्थात त्यांच्या सगळ्या लावण्या काही उपलब्ध नाहीत. १९५८ मध्ये त्यांच्या काही लावण्या तीन भागात प्रकाशित झाल्या. त्यांनी गण, गौळण, भेदीक, झगड्यांच्या, रंगाबाजीच्या, वागाच्या इ. विपुल रचना केल्या बापूरावांच्या फडाला अतिशय लोकप्रियता मिळाली. १९०८-१९०९ साली त्यांनी कोल्हापूरच्या शाहू महाराजांसमोर ‘मिठाराणीचा वग’ सादर केला. तोही अतिशय गाजला.   

पुढे पोवळा आणि पठ्ठे बापूराव यांच्यात बेबनाव झाला. त्यांचा फड विस्कटला. या प्रतिभावंताची अखेर अतिशय विपन्नावस्थेत झाली. २२ डिसेंबर १९४५ ला त्यांचे निधन झाले. आज त्यांच्या स्मृतिदिंनानिमित्त त्यांच्या काव्यप्रतिभेला प्रणाम .

 ☆☆☆☆☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : शिक्षण मंडळ कर्हााड: शताब्दी दैनंदिनी, इंटरनेट    

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २१ डिसेम्बर–संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? २१ डिसेम्बर –  संपादकीय  ?

कै. नरहर रघुनाथ फाटक 

विचार प्रवाहाविरूद्ध विचार करणारे व स्वतंत्र प्रज्ञा असणारे ,मराठी संत साहित्याचे समीक्षक,पत्रकार,इतिहास संशोधक,चरित्र लेखक अशा विविध भूमिका बजावून मराठी साहित्यात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणारे न.र.फाटक यांचा आज स्मृतीदिन.(1979)
त्यांचे प्राथमिक शिक्षण भोर,अबू,ग्वाल्हेर,लाहोर असे अनेक ठिकाणी झाले.तत्वज्ञान आणि अर्थशास्त्र या विषयात त्यांनी अलाहाबाद विद्यापीठाची पदवी प्राप्त केली.शिवाय चित्रकल व संगीत या कलाही त्यांना अवगत होत्या.सुरूवातीला त्यांनी सहाय्यक शिक्षक या पदावर काम केले.नंतर विविधज्ञानविस्तार,इंदुप्रकाश,नवाकाळ,इ.
नियतकालिकांत संपादकीय विभागात काम केले.पुढे एस्.एन्.डी.टी. व रूईया काॅलेज मध्ये मराठीचे प्राध्यापक म्हणून काम केले.
त्यांनी अनेक संशोधनात्मक   व चरित्रात्मक पुस्तकांचे लेखन केले आहे.अर्वाचीन महाराष्ट्रातील सहा थोर पुरूष,श्री एकनाथ वाड्मय व कार्य,कलावती कादंबरी,थोरांच्या आठवणी,पानिपतचा संग्राम भाग 1 व 2,भारतीय राष्ट्रवादाचा विकास ही त्यापैकी काही पुस्तके.न्यायमूर्ती म.गो.रानडे यांच्या चरित्राचे लेखन करून त्यानी चरित्र लेखनाला प्रारंभ केला.त्यानंतर कृ.प्र.खाडीलकर,यशवंतराव होळकर,लोकमान्य,श्री समर्थ रामदास, इ.चरित्रे लिहीली.त्यांनी गोपाळ कृष्ण गोखले यांच्या ‘आदर्श भारत सेवक’ या लिहीलेल्या चरित्राला साहित्य अकादमीचा 1970 चा पुरस्कार मिळाला आहे.
कै.फाटक यांचा अनेक संस्थांशी संबंध आलेला आहे.मराठी पत्रकार संघाचे ते पहिले अध्यक्ष होते.भारत इतिहास संशोधन मंडळ ,प्राज्ञ पाठशाला मंडळ,मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय,मुंबई मराठी साहित्य संघ,महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ अशा विविध ठिकाणी त्यांनी सदस्य किंवा पदाधिकारी या नात्याने काम केले आहे.
त्यांच्या या कार्य कर्तृत्वाला आज स्मृतीदिनी शतशः प्रणाम!

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ:  विकिपीडिया, मराठी  विश्वकोश.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २० डिसेंबर – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? २० डिसेंबर –  संपादकीय  ?

आज २० डिसेंबर —श्री अरुण कृष्णाजी कांबळे यांचा स्मृतिदिन. (१४/३/१९५३ – २०/१२/२००९). 

दलित चळवळीचे अग्रणी नेते, आणि “ दलित पँथर्स “ संघटनेचे संस्थापक सदस्य आणि अध्यक्ष म्हणून परिचित असणारे श्री. कांबळे यांची “ मराठी साहित्यातील चिकित्सक लेखक, संशोधक, आणि साहित्याचे गाढे अभ्यासक “ अशीही ठळक ओळख होती. समाजातील विषमता नष्ट होऊन समाज एकजिनसी व्हावा यासाठी कणखर नेतृत्व करत आयुष्य खर्ची घालतांना , त्यांच्यातला  प्रभावी वक्तृत्व गुणही, त्यांच्या प्रभावी लेखनाइतकाच महत्वाचा भाग ठरला होता. अर्थात या लक्षवेधी समाजकार्यात त्यांचा ‘ दुर्दम्य आशावाद ‘ हाही एक महत्वाचा भाग होता. त्यांचे साहित्य याकामी खूप मोलाचे ठरले होते, असे नक्कीच म्हणता येईल. 

सांस्कृतिक संशोधन म्हणावे अशा “ रामायणातील संस्कृतीसंघर्ष “ या त्यांच्या प्रबंधासारख्या पुस्तकामुळे त्यांचे विचार महाराष्ट्रभर पोहोचले, आणि विशेष म्हणजे, या लहानशा पुस्तकातून दिसून आलेल्या त्यांच्या व्यासंगाची मान्यवरांना नोंद घ्यावी लागली. “ या जेमतेम ७५ पानातून कांबळे यांनी आपली विद्वत्ता आणि संशोधनाची तळमळ सिद्ध करत, सत्याचा शोध घेतला आहे,” असे श्री विजय तेंडुलकर यांनी या पुस्तकाबद्दल गौरवाने म्हटलेले होते.

त्यांचे इतर प्रसिद्ध साहित्य म्हणजे —धर्मांतराची भीमगर्जना हे आणखी एक सांस्कृतिक संशोधन म्हणून गाजलेले पुस्तक, वाद-संवाद, आणि युगप्रवर्तक आंबेडकर या नावाने दोन वैचारिक पुस्तके, चिवर हा ललित लेख संग्रह, एक काव्यसंग्रह, आणि, चळवळीचे दिवस हे आत्मकथन. 

सांगलीतून प्रसिद्ध होणाऱ्या ‘ दक्षिण महाराष्ट्र ‘ या साप्ताहिकात ते स्तंभलेखन करत असत. त्यांनी ‘आंबेडकर भारत ‘ हे अनियतकालिक सुरु केले होते. तसेच बाबासाहेबांच्या ‘ जनता ‘ पात्रातील लेखांचे संपादनही कांबळेच करत असत. 

श्री. अरुण कांबळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 

☆☆☆☆☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

माहितीस्रोत :- इंटरनेट

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares