१० ऑक्टोबर – संपादकीय
आज आपण कबीर सन्मान पुरस्कारा विषयी माहिती घेणार आहोत.
भारतामध्ये साहित्य क्षेत्रासाठी जे विविध सन्मान ठेवले आहेत, त्यामध्ये कबीर पुरस्कार हा महत्वाचा पुरस्कार आहे. हा पुरस्कार अखिल भारतीय पातळीवर प्रदान केला जातो. मध्यप्रदेश शासनाच्या संस्कृतिक विभागामार्फत स्थापन केलेल्या विशेष समितीकडून, भारतीय भाषांमधील कवी, लेखक, समीक्षक आणि साहित्य संस्था यांच्याकडून नामनिर्देश केलेल्या साहित्यिक व्यक्तीची या पुरस्कारासाठी निवड केली जाते. या विशेष समितीमध्ये राष्ट्रीय पातळीवरील साहित्य क्षेत्रातील श्रेष्ठ व्यक्तींचा समावेश केला जातो. कवी, लेखक, समीक्षक आणि साहित्य संस्था यांच्याकडून नामनिर्देश केलेल्या व्यक्तींव्यतिरिक्तही, साहित्यिकांची निवड करण्याचा अधिकार या निवड समितीला आहे. त्यानुसार हा महत्वाचा पुरस्कार देण्यासाठी साहित्यिकाची निवड सर्व साहित्यिक मापदंडांना अनुसरून व नि:पक्षपातीपणे केली जाते.
मराठीत केवळ ३ साहित्यिकांना आत्तापर्यंत हा पुरस्कार मिळाला आहे.
- विंदा करंदीकरांना ९० -९१ चा पुरस्कार मिळालाय.
जातक, ध्रुपद, स्वेदगंगा, अष्टदर्शने, विरुपिका, मृद्गंध इ. त्यांचे कविता संग्रह प्रसिद्धा आहेत.
त्यांच्या बालकविताही प्रसिद्ध आहेत. राणीचा बाग , एकदा काय झालं, एटू लोकांचा देश इ. त्यांचे १२ बालकवितांचे संग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांनी मराठी काव्यमंजुषेत विविध घाटाच्या, रंजक व वैचारिक काव्यलेखनाची भर घातली.
याशिवाय त्यांनी गद्य लेखनही केले आहे. ललित व वैचारिक लेखन त्यांनी केले आहे. स्पर्शपालवी, उद्गार इ. त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणे ते समीक्षकही होते. त्यांनी मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमधून समीक्षा लिहीली आहे.
ते उत्तम अनुवादकही होते. त्यांनी इंग्रजी ग्रंथांची भाषांतरे केली आहेत. विंदा करंदीकरांना वरील पुरस्काराव्यतिरिक्त केशवसूत, जनस्थान, कोणार्क व सगळ्यात महत्वाचा म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कारही मिळाला आहे. त्यांच्या अष्टदर्शने या काव्यसंग्रहाला ज्ञानपीठ पुरस्कारही मिळाला आहे.
- नारायण सुर्वे यांना ९९ – २००० चा कबीर सन्मान पुरस्कार मिळालाय
ऐस गा मी ब्रम्ह, जाहीरनामा, नव्या माणसाचे आगमन, सनद इ. त्यांचे काव्यसंग्रह आहेत.
त्यांच्या कवितेतून कामगारांच्या जिवनाचे, त्यांच्या दु:ख – दैन्याचे आणि त्यांच्या चाळवळीचेही दर्शन घडते.
त्यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा नरसिंह मेहता पुरस्कार, जनस्थान, सोव्हिएट राशीयाचा नेहरू सन्मान इ. सन्मान व पुरस्कार लाभले आहेत. भारत सरकारने त्यांना पद्मश्री दिली आहे.
- मंगेश पाडगावकर यांना २००८-२००९ चा कबीर सन्मान पुरस्कार मिळालाय
पाडगावकरांचे आनंद ऋतु , धारानृत्य , जिप्सी , छोरी, उत्सव हे सारे कविता संग्रह प्रेम भावनेच्या विविध छटा वर्णन करणारे आणि निसर्गाची विविध रूपे साकार करणारे आहेत. ‘सलाम’ पासून त्यांच्या कवितेने आपले वळण बदलले. ती सामाजिक, राजकीय जीवनातले अनुभव व्यक्त करू लागली. त्यांच्या अनेक कवितांची गाणी झाली. त्यांनी बालकविता व बालगीतेही लिहिली आणि ती लोकप्रिय झाली.
ते उत्तम अनुवादक होते. त्यांनी मीरेच्या पदांचे, कबिराच्या दोहयांचे आणि सूरदासाच्या रचनांचे अनुवाद केले आहेत. त्यांनी मेघदूताचाही अनुवाद केलाय . शेक्सपियरच्या तीन नाटकांचाही त्यांनी अनुवाद केला आहे. विविध विषयांवरील २५ हून अधीक पुस्तकांचा त्यांनी अनुवाद केला आहे. २००९-१० सालात त्यांनी बायबलचाही अनुवाद केला. ‘सलाम’ कविता संग्रहासाठी त्यांना साहिती अअॅकॅडमीचा पुरस्कार मिळाला. त्यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पद्मभूषण या पदव्यांनीही सन्मानित केले गेले.
श्रीमती उज्ज्वला केळकर
(ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ)
संदर्भ : कर्हाड शिक्षण मंडळ ‘साहित्य साधना’ दैनंदिनी , गुगल गुरुजी
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈