डॉ. माधुरी जोशी
विविधा
☆ आनंदाचे घर… ☆ डॉ. माधुरी जोशी ☆
☆
कुटुंब प्रमुख “सा”
मैफल सांगतेकडे आलेली. रात्र रात्र गायन वादनानी भारलेला मांडव…. स्वरांचंच साम्राज्यच पसरलेलं…. आताही रंगमंचावर ते चार तानपुरे… सारेच आत्यंतिक सुरेल… दोन काळे.. खूप साऱ्या नक्षीनं, मीनाकारीनं सजलेले… दोन अगदी नीतळ, साधे… पण चौघांची भाषा एकंच… गुंजारव ही तोच…. “सा”… “षडज्”…. फक्त तोच मांडवभर पसरलेला… कानाकोपऱ्यात… कनातीच्या रंगीत झुलत्या कापडात… मंदशा अगणित दिव्यांच्या प्रकाशात…. फक्त “सा”…. अजून गाणं सुरूच नाही झालेलं…. पण ते जुळलेले तानपुरे, तो षड्जाचा गुंजारवही अनुभूती देतो वेगळीच…. ते जव्हारदार, घुमारदार, मधुर, निषादात बोलणारे तानपुरे भारावून टाकतात…. उमटतं राहतात षड्जाची आवर्तनं…. लाटा… ती पहाट वेळा… कोवळी किरणं अजून क्षितीजाच्या किनाऱ्याकडे…. मंडपाजवळच्या मंदिरातून काकड आरतीची अस्पष्ट घंटा… तरंगत येणारा उदबत्तीचा मंद दरवळ…. आणि मांडवात फक्त “सा” भरुन राहिलेला… आधार स्वर… साऱ्या स्वरांचं मूळ.. उगमस्थान.. सा.. “साधार “…. तो “साकार”करतो राग चित्र… तो “सामर्थ्य” सप्तकाचं… तो सारांश.. स्वरार्थ… संगीतार्थ
“सा” महत्वाचाच…. इथूनच निर्माण होणार प्रत्येक स्वरांचा आत्मा.. या “सा” चं सर्व स्वरांशी घट्ट नातं, दृढ भावनिक मैत्री…. आणि साऱ्या स्वरांनाही याचीच ओढ.. साऱ्या श्रुती, स्वर… साऱ्यांचे इथेच समर्पण…. आणि त्या अथांग स्वरसागराला सामावून घेणारा “सा”…. शांत…. मंद्र, मध्य, तार सगळीकडे तसाच….
“सा” ला माहिती आहे प्रत्येक स्वर कुठे आहे… कसा आहे… किती आहे… कधी भेटणार आहे…. ते सारे स्वर एकमेकांच्या संगतीनं सजतात.. राग घडतो.. फुलतो… सजतो…
दरवळतो…. सारं सतत “सा “मधे विलीन होत राहतं… खरंतर हा अचल… योग्यासारखा… मास्टर दिनानाथ म्हणंत तसे साधुपुरूष… स्थिर आपल्या जागी… तो मूलभूत आधार संगीताचा… ठाम… निश्चल…
पण तो स्वरांचा, रागांचा भाव जाणतो. प्रत्येक रागाच्या स्वरांना हवं असेल तसा वागतो. ना तो कोमल.. ना तो तीव्र… पण तो कधी हळवा होतो कधी लख्ख ठाम…. राग रूपाच्या भावनेत, रागाच्या लयीत, स्वरवाक्यांच्या वजनात अगदी एकरूप होत राहतो. आपलं अटल स्थान राखंत स्वरांचा सन्मान करतो. रागरुप जपत मंद्र, मध्य, तार सर्व सप्तकात राहतो.
“सा” सात स्वरांचा जनक… पु ल म्हणतात शारदेचं वस्त्र धवल आहे ते रंगहीन म्हणून नाही तर सात रंगांचा मिलाफ होऊन होणारा शुभ्र आहे तो. एका थेंबातून सात रंगांचे किरण फुटतात आणि परत धवल रंगात विलीन होतात… तसंच आहे ना सप्तकाचं…. सा आधार सप्तकाचा… स्वरनिर्माता.. पण त्याला अहं नाही. तो असणारच असतो पण सतत समोर येऊन दाखवत रहात नाही… स्वरांना सजू देतो… रमू देतो.. रंगू देतो कारण त्याला माहिती आहे ते सारे त्याच्यापाशीच परत येणार आहेत. तो त्यांच्या सहज सोबत असतो अदृश्यपणे…. कोमल, शुद्ध, तीव्र साऱ्यांच्या भावनांसोबत असतोच तो… कधी कधी तर राग रचनेत, चालीत कुणी स्वर वर्ज्यही असतात… पण म्हणून नातं तुटतं नाही. सुटत नाही “सा” चं… ते तेवढ्यापुरते दुरावतात आणि दुसऱ्या वेळी प्रधानही होतात. हे सारं “सा” मनात जाणतो. ते सोबत असोत नसोत हा सदैव संगतीला असतोच… ते नसले तरी इतर स्वरांची नाती जपतो…. “सा” शांतपणे सारं ऐकतो, पाहतो, जपतो, सांभाळतो… त्याला दृढ विश्वास आहे सारे भाव, रस, रंग, श्रुती कितीही सजले तरी त्यांना ओढ आहे त्या अचल “सा” ची…. जिथून प्रवास सुरू तिथेच समर्पण आहे… तो समजुतदार “सा” सर्वांना आपल्या मायेच्या दुलईत घेतो….
प्रत्येक स्वर वेगवेगळे भाव भेटवतो… राग सजवतो… “सा” आपल्या जागेवरून सारं न्याहाळतो…. कल्याणच्या गंधार तीव्र म निषादाची मैत्री.. बिहागच्या दोन मध्यमांचं अद्वैत आणि गंधाराचा सुवास… बागेश्रीच्या कोमल गंधार निषादावर धैवताची मध्यमाची सत्ता, त्याच कोमल निषादाशी रागेश्रीतलं शुद्ध ग चं जुळलेलं सूत… रात्रीकडे अलगद पाऊल टाकणारा मारव्याचा कोमल रिषभ पहाटे भैरवाच्या सूर्याला अर्ध्य देतो. करूण रहात नाही तर उदात्त होतो… ऊन्ह तापतात… माध्यान्हीला शुद्ध सारंगचा चढा पण काहिसा करूण तीव्र म शुद्ध मध्यमाच्या प्रभावात वावरतो…. तिलककामोदचे स्वर गंधाराची आर्जवं करतात… जणू काही ग जवळ भेटू असं ठरलंय सगळ्यांचं… अगदी “सां प”ही मींड देखील… किती रागांचे किती खेळ… काही स्वरांना खूप महत्व… तर काही फक्त रागात असतात. ते नसून चालंत नाही आणि आहेत म्हणून फार सन्मान ही नाही. पंचम किंवा मध्यम तर काही वेळा हात सोडून दूर जातात. साsssरं “सा” पाहतो. पण तो सर्व रागरूपात समयचक्रात, सदैव, सतत असतोच. तो आहे म्हणून तर स्वर निवांत रंगतात, खेळतात आणि या आनंदाच्या घरी परततात… समाधानानं
… तृप्तीनं…
“सा” चा आग्रहंच नाही की मी पाया… मूळ स्वर… आधार… सतत माझा सन्मान करा… पण तो अटळ… आहेच… असणारच आहे…. सजणाऱ्या सर्व रंगांबरोबर… रसांबरोबर…
श्रुतींबरोबर…. “सा” सगळं जाणतो.. अगदी सहज स्वतःचा पोतही बदलतो… कधी स्पष्ट कधी लख्ख कधी अंधुक होतो. पण प्रत्येक “कहन ” चा तो “पूर्णविराम” असतो. शांत, तृप्त… त्याला माहिती आहे स्वर कितीही सप्तकात हिंडले, कितीही लयीत खेळले तरी अखेर “सा ” च्या तेजाशीच एकरूप होणार.. मिसळून जाणार… समर्पित होणार… तेच तर त्यांचं मूळ, कूळ, गोत्र…. आणि तिथे ते छान एकरूप झाले तरंच हे पक्कं होईल की ते काही तरी चांगलं, अचूक, सुरेल, रंगवून, सजवून आलेत. स्वर, लय, शब्द सारी अंग… घराणं, राग, ताल कोणतंही असो…. लोकगीत, भावगीत, दादरा, ठुमरी, नाट्य, चित्रपट कोणती का गायकी असेना हा सर्वत्र……
अचल!! अटल!! ठाम!!
तो भारदस्त, अचूक, स्थिर, गोल, गोड, भावपूर्ण असा लागला तरंच रंग भरणार…. आनंदाचं घर रस भावानी लयदार सजणार. बेहेलावे, मुरकी, खटका, मींडची तोरणं डोलणार…. राग, स्वर, शब्दांच्या रंगभऱ्या रांगोळ्या सजणार…… अशा सुंदर गायकीचा पत्ता सांगू?…..
आनंदाचं घर🏡
कुटुंब प्रमुख “सा”🎼
कुटुंबातले सदस्य “१२”🎼
आणि महत्वाची सहज सापडणारी खूण म्हणजे.. सभोवती अगणित स्वर, भाव, रंग गंधांची फुललेली फुलबाग…
☆
© डॉ. माधुरी रानडे जोशी.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈