मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ५ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ५ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र – “नाही वहिनी. आम्ही आणि डॉक्टरांनी काहीच केलेले नाही. आम्ही फक्त निमित्त होतो. बाळ वाचलंच नाहीय फक्त तर ते ‘वर’ जाऊन परत आलंय.” लेले काका सांगत होते,”आत्ता पहाटे आम्ही इथे आलो ते मनावर दगड ठेवून पुढचं सगळं अभद्र निस्तरण्याच्या तयारीनेच आणि इथे येऊन पहातो तर हे आक्रित! दादा, तुम्हा दोघांच्या महाराजांवरील अतूट श्रद्धेमुळेच या चमत्कार घडलाय.बाळ परत आलंय.”

या आणि अशा अनेक अनुभवांचे मनावर उमटलेले अमिट ठसे बरोबर घेऊनच मी लहानाचा मोठा झालोय.सोबत ‘तो’ होताच…!)

पुढे तीन वर्षांनी बाबांची कुरुंदवाडहून किर्लोस्करवाडीला बदली झाली ते १९५९ साल होतं. कुरुंदवाड सोडण्यापूर्वी आई न् बाबा दोघेही नृसिंहवाडीला दर्शनासाठी गेले.आता नित्य दर्शनाला येणं यापुढे जमणार नाही याची रुखरुख दोघांच्याही मनात होतीच. आईने दर पौर्णिमेला  वाडीला दर्शनाला येण्याचा संकल्प मनोमन सोडून ‘माझ्या हातून सेवा घडू दे’ अशी प्रार्थना केली आणि प्रस्थान ठेवलं!

किर्लोस्करवाडीला पोस्टातल्या कामाचं ओझं कुरुंदवाडपेक्षाही कितीतरी पटीने जास्त होतं.पूर्वी घरोघरी फोन नसायचे.त्यामुळे ‘फोन’ व ‘तार’ सेवा पोस्टखात्यामार्फत २४ तास पुरवली जायची.त्यासाठी पोस्टलस्टाफला दैनंदिन कामांव्यतिरिक्त जादा

रात्रपाळीच्या ड्युटीजनाही जावे लागायचे. त्याचे किरकोळ कां असेनात पण जास्तीचे पैसे मिळायचे खरे, पण ती बिले पास होऊन पैसे हातात पडायला मधे तीन-चार महिने तरी जायचेच. इथे येऊन बाबा अशा प्रचंड कामाच्या दुष्टचक्रात अडकून पडले.त्यांना शांतपणे वेळेवर दोन घास खाण्याइतकीही उसंत नसायची. दर पौर्णिमेला नृसिंहवाडीला दत्तदर्शनासाठी जायचा आईचा नेम प्रत्येकवेळी तिची कसोटी बघत सुरू राहिला होता एवढंच काय ते समाधान. पण तरीही मनोमन जुळलेलं अनुसंधान अशा व्यस्ततेतही बाबांनी त्यांच्यापध्दतीने मनापासून जपलं होतं. किर्लोस्करवाडीजवळच असलेल्या रामानंदनगरच्या आपटे मळ्यातल्या दत्तमंदिरातले नित्य दर्शन आणि सततचे नामस्मरण हा त्यांचा नित्यनेम.कधीकधी घरी परत यायला कितीही उशीर झाला तरी त्यांनी यात कधीही खंड पडून दिला नव्हता!

मात्र बाबांच्या व्यस्ततेमुळे घरची देवपूजा मात्र रोज आईच करायची. माझा धाकटा भाऊ अजून लहान असला तरी त्याच्यावरच्या आम्हा दोन्ही मोठ्या भावांच्या मुंजी नुकत्याच झालेल्या होत्या. पण तरीही आईने पूजाअर्चा वगैरे बाबीत आम्हा मुलांना अडकवलेलं नव्हतं. या पार्श्वभूमीवरचा एक प्रसंग…

पोस्टलस्टाफला किर्लोस्कर कॉलनीत रहायला क्वार्टर्स असायच्या. आमचं घर बैठं,कौलारू व सर्व सोयींनी युक्त असं होतं. मागंपुढं अंगण, फुलाफळांची भरपूर झाडं, असं खऱ्या ऐश्वर्यानं परिपूर्ण! आम्ही तिथे रहायला गेलो तेव्हा घरात अर्थातच साधी जमिनच होती. पण कंपनीतर्फे अशा सर्वच घरांमधे शहाबादी फरशा बसवायचं काम लवकरच सुरू होणार होतं. त्यानुसार आमच्याही अंगणात भिंतीना टेकवून शहाबादी फरशांच्या रांगा रचल्या गेल्या.

त्याच दिवशी देवपूजा करताना आईच्या लक्षात आलं की आज पूजेत नेहमीच्या दत्ताच्या पादुका दिसत नाहीत. देवघरात बोटांच्या पेराएवढ्या दोन चांदीच्या पादुका होत्या आणि आज त्या अशा अचानक गायब झालेल्या!आई चरकली.अशा जातील कुठ़ न् कशा?तिला कांहीं सुचेचना.ती अस्वस्थ झाली. तिने कशीबशी पूजा आवरली. पुढची स्वयंपाकाची सगळी कामंही सवयीने करीत राहिली पण त्या कुठल्याच कामात तिचं मन नव्हतंच. मनात विचार होते फक्त हरवलेल्या पादुकांचे!

खरंतर घरी इतक्या आतपर्यंत बाहेरच्या कुणाची कधीच ये-जा नसायची. पूर्वीच्या सामान्य कुटुंबात कामाला बायका कुठून असणार?

धुण्याभांड्यांसकट सगळीच कामं आईच करायची. त्यामुळे बाहेरचं कुणी घरात आतपर्यंत यायचा प्रश्नच नव्हता. आईने इथं तिथं खूप शोधलं पण पादुका मिळाल्याच नाहीत.

बाबा पोस्टातून दुपारी घरी जेवायला आले. त्यांचं जेवण पूर्ण होईपर्यंत आई गप्पगप्पच होती. नंतर मात्र तिने लगेच ही गोष्ट बाबांच्या कानावर घातली.ऐकून बाबांनाही आश्चर्य वाटलं.

“अशा कशा हरवतील?”

“तेच तर”

“सगळीकडे नीट शोधलंस का?”

“हो..पण नाही मिळाल्या”

आई रडवेली होऊन गेली.

“नशीब, अजून फरशा बसवायला गवंडीमाणसं आलेली नाहीत.”

“त्यांचं काय..?”

“एरवी त्या गरीब माणसांवरही आपल्या मनात कां होईना पण आपण संशय घेतलाच असता..”

त्या अस्वस्थ मनस्थितीतही बाबांच्या मनात हा विचार यावा याचं त्या बालवयात मला काहीच वाटलं नव्हतं,पण आज मात्र या गोष्टीचं खूप अप्रूप वाटतंय!

नेमके त्याच दिवशी गवंडी आणि मजूर घरी आले. पूर्वतयारी म्हणून त्यांनी जमीन उकरायला सुरुवात केली. त्यानिमित्ताने घरातले सगळे कानेकोपरेही उकलले गेले. पण तिथेही कुठेच पादुका सापडल्या नाहीत. पूजा झाल्यानंतर आई ताम्हणातलं तीर्थ रोज समोरच्या अंगणातल्या फुलझाडांना घालायची. ताम्हणात चुकून राहिल्या असतील तर त्या पादुका त्या पाण्याबरोबर झाडात गेल्या असायची शक्यता गृहीत धरून त्या फुलझाडांच्या भोवतालची माती खोलवर उकरून तिथेही शोध घेतला गेला पण पादुका मिळाल्याच नाहीत.

मग मात्र आईसारखेच बाबाही अस्वस्थ झाले. नेहमीप्रमाणं रोजचं रुटीन सुरू झालं तरी बाबांच्या मनाला स्वस्थता नव्हतीच.कुणाकडूनतरी  बाबांना समजलं की जवळच असणाऱ्या पलूस या गावातील सावकार परांजपे यांच्या कुटु़ंबातले एक गृहस्थ आहेत जे पूर्णपणे दृष्टीहीन आहेत.ते केवळ अंत:प्रेरणेने हरवलेल्या वस्तूंचा माग अचूक सांगतात अशी त्यांची ख्याती आहे म्हणे.बाबांच्या दृष्टीने हा एकमेव आशेचा किरण होता! बाबा स्वत: त्यांनाही जाऊन भेटले. आपलं गाऱ्हाणं आणि मनातली रूखरूख त्यांच्या कानावर घातली. त्यांनीही आपुलकीने सगळं ऐकून घेतलं. काहीवेळ अंतर्मुख होऊन बसून राहिले.तोवरच्या त्यांच्या चेहऱ्यावरच्या शांतपणाची  जागा हळूहळू काहीशा अस्वस्थपणानं घेतलीय असं बाबांना जाणवलं. त्यांची अंध,अधूदृष्टी क्षणभर समोर शून्यात स्थिरावली आणि ते अचानक बोलू लागले.बोलले मोजकेच पण अगदी नेमके शब्द!

“घरी देवपूजा कोण करतं?” त्यांनी विचारलं.

“आमची मंडळीच करतात”

बाबांनी खरं ते सांगून टाकलं.

” तरीच..”

“म्हणजे?”

” संन्याशाची पाद्यपूजा स्त्रियांनी करून कसं चालेल?”

“हो पण.., म्हणून..”

” हे पहा ” त्यांनी बाबांना मधेच थांबवलं.” मनी विषाद नको, आणि यापुढे हरवलेल्या त्या पादुकांचा शोधही नको. त्या कधीच परत मिळणार नाहीत.”

” म्हणजे..?”

” त्या हरवलेल्या नाहीयत. त्या गाणगापूरच्या पादुकांमध्ये विलीन झालेल्या आहेत.”

बाबांच्या मनातली अस्वस्थता अधिकच वाढली.कामात मनच लागेना ‘घडलेल्या अपराधाची एवढी मोठी शिक्षा नको’ असं आई-बाबा हात जोडून रोज प्रार्थना करीत विनवत राहिले.भोवतालच्या मिट्ट काळोखातही मनातला श्रध्देचा धागा बाबांनी घट्ट धरुन ठेवला होता. कांहीही करून हरवलेल्या त्या पादुका घरी परत याव्यात एवढीच त्यांची इच्छा होती पण ती फरुद्रूप होण्यासाठी कांहीतरी चमत्कार होणं आवश्यक होतं!आणि एक दिवस अचानक……?

क्रमश: दर गुरुवारी

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डिटॅचमेंट… भाग – 2 ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

? मनमंजुषेतून ?

☆ डिटॅचमेंट… भाग – 2 ☆ डॉ. शैलजा करोडे 

‘तदेव लग्नं सुदिनं तदेव । ताराबलं चंद्रबलं तदेव ।’ ……. म्हटल्याबरोबर माझं घर दुरावलं . मी परकी झाले . पाहुणी झाले . आयुष्याच्या या वळणावरील ही डिटॅचमेंट मला खूप हळवी करणारी होती .पण दुरावलेल्या या माया बंधनांची हुरहुर मनी असली तरी नवीन नात्यांची गुंफणही मनाला दिलासा देत होती .सून , वहिनी , जाऊ , पत्नी या नात्यांनी तर समृद्ध  केलंच होतं  पण एक सर्वोच्च नातं माझ्या कुशीत आलं होतं .मला मातृत्व पद बहाल केलं होतं.माझी छकुली , माझी सावली , माझा काळीज तुकडा , त्रिभुवनाचं सुख मला यापुढे थिटं वाटू लागलं आणि मुली माहेर सोडून सासरी का येतात या प्रश्नाचं गमक मला कळालं.

निसर्गकन्या बहिणाबाईंनी आपल्या योगी आणि सासुरवाशीण कवितेत हेच तर मांडलं.

” देरे देरे योग्या ध्यान

ऐक काय मी सांगते

लेकीच्या माहेरासाठी

माय सासरी नांदते “

या डिटॅममेंटला अशी ही गोड अँटॅचमेंट होती .

पुढे आयुष्यात असेही वळण आले आणि एकएक करत आई बाबांनी इहलोकीची यात्रा संपविली . हा माझ्यावर कुठाराघात होता .माझी मायेची माणसं , माझं हळवंपण जाणणारी आई , माझ्यावर अतोनात प्रेम करणारे बाबा निघून गेले , मला पोरकं करुन गेले . उत्तरकार्य संपल्यावर मी माझ्या घरी निघाले तेव्हा माझा भाऊ गळ्यात पडून रडला होता . ” ताई , आई बाबा गेले म्हणजे माहेर संपलं असं समजू नकोस . हा तुझा भाऊ आहे अजून , केव्हाही हक्काने येऊन राहात जा .मला भेटत जा . आईनंतर आता तूच माझी आई आहेस ग . तुझ्या मायेची पखरण होऊ देत जा माझ्यावरही .आणि लाभू दे तुझ्या प्रेमाची श्रीमंती मलाही .” या डिॅचमेंटलाही किती सुंदर अँटॅचमेंट होती . ” आई , तू रडत आहेस ” माझी छकुली मला विचारत होती , ” नाही बाळा “, मी तिला कुशीत घेतलं . आई गेल्याचं दुःख तर होतंच पण मी सुद्धा कोणाची आई आहे हे विसरुन चालणारं नव्हतं .

छकुली आणि तिच्यानंतर आलेला चिंटू . चौकोनी कुटुंबात विसावलेली मी . मुलांचं संगोपन शाळा , शिक्षण , काळ द्रुतगतीनं कधी पुढे सरकला कळलेही नाही . मुलांना पंख फुटले , भरारी घेण्यास सज्ज झाले ,आणि माझे मन कातर झाले .छकुलीचं कन्यादान करतांना मला माझं लग्न आठवलं आणि आयुष्यातलं एक वर्तुळ आज पूर्ण झालं होतं .

चिंटूने खूप प्रगती केली व एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या द्वारे अमेरिकेला गेला आणि पुढे तिथलाच झाला . ” चिंटूसाठी मी स्थळं शोधू लागले . निदान मुलगी भारतीय असावी , आपले संस्कार येणार्‍या पिढीवर व्हावे ही  माझी भोळी आशा . मी चिंटूला म्हणाले पुढच्या महिन्यात येतोच आहेस तर मुलगी पाहाण्याचा कार्यक्रम उरकवून टाकू या “.

” आई तुला हा त्रास कशाला , मी शोधलीय तुझी सून . नॅन्सी खूप गुणी मुलगी आहे .” 

माझं स्वप्न भंगलं , पण मुलाच्या स्वप्नाला महत्व देणं गरजेचं असल्यानं मी हा दुःखावेगही सोसला .

मुलं घरट्यात विसावली , उरलो आम्ही दोघेच.सुधीरची साथ असल्याने मला जीवन जगणं सोप झालं .

” अगं , सुनीता जेवायचं नाही काय आज ?. चल मलाही वाढून दे आणि तुझंही वाढून घे . चल लवकर , जाम भूक लागलीय मला ” ” होय चला , जेवण करून घेऊ या . “

सुनीता रिलॅक्स , अगं वाटेल दोन चार दिवस मनाला रुखरुख  , रोजचं जीवनचक्र बदललं कि होतो हा त्रास. सेवानिवृत्त झालं म्हणजे आपण निकामी झालो असं नाही . उलट आता आपला हा वेळ स्वतः साठी ठेवायचा .स्वतःसाठी जगायचं .आपल्या इच्छा पूर्ण करायच्या , आपले छंद जोपासायचे “Life begins at sixty my dear “.

दुपारच्या वामकुक्षीसाठी मी विसावले . झोप येत नव्हती म्हणून टी. व्ही . लावला . कोणत्यातरी चॅनेलवर आध्यात्मिक प्रवचन सुरू होते ” हा संसार मोह मायेने व्यापलेला आहे .या मायाजालातच माणूस फसत जातो व हे माझं , हे माझं ची वीण घट्ट होत जाते . माणसानं प्रेम करावं किंबहुना हे जग प्रेमानंच जिंकता येतं पण प्रसंगी कठोर निर्णयही घ्यावे लागतात . जवळकीतूनच दुरावा निर्माण होतो . म्हणून कोठे थांबायचं हा निर्णय घेता आला पाहिजे . साधं पक्ष्यांचंच उदाहरण बघा ना , पिल्लं मोठी झाली , भरारी घेतली कि स्वतंत्र होतात .तसंच माणसांचंही आहे . वानप्रस्थाश्रम ही संकल्पना हेच तर सुचविते .

नवीन पिढीला त्यांचं स्वातंत्र्य मिळायलाच हवं . वृद्धांनीही आपली मते त्यांना द्यावीत पण लादू नयेत.नवीन बदल , नवीन विचारांना संमती आनंदाने द्यावी.निसर्गाचं चक्रही हेच सांगतं . शिशिरात पानगळ होणारचं . जर पानगळ झालीच नाही तर नवपल्लवी फुटणार कशी ? माणूसही यापेक्षा वेगळा नाही .वृद्ध , जर्जर शरीर जीर्ण पानासारखं गळून पडणारचं. पंच तत्वानं भरलेलं हे शरीर शेवटी पंचतत्वात सामावून मोक्षाला जाणारचं .वेळीच ही अलिप्तता ज्याला कळली तो भाग्यवानच ,.कारण मायेच्या , मोहाच्या जाळ्याला त्यानं भेदलेलं असतं .सर्व येथे सोडून वैकुंठागमन करणं सोपं होतं मग “

“होय आता आपणही अलिप्त झालं पाहिजे .निरोगी तनाबरोबरच निरोगी मनासाठी हलकासा व्यायाम , निसर्गात रमणं , आपले छंद जोपासणं आणि संवाद साधत माणसं जोडणं कितीतरी गोष्टी आहेत करण्यासारख्या या जगात .” नकळत माझ्या ओठांवर हास्य आलं होतं . आरशात डोकावले तर चेहरा प्रफुल्लित झाला होता . चित्तवृत्ती फुलल्या होत्या .

— समाप्त — 

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈



मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पालकांचा गृहपाठ — संकलन : श्री भार्गव पवार ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ पालकांचा गृहपाठ — संकलन : श्री भार्गव पवार ☆ श्री सुनील देशपांडे

**  आपली मुले चांगली घडावीत ही सर्वांचीच इच्छा असते.  पण काय करावे हे उमजत नाही.  चला तर त्या साठी शाळेने पालकांना एक गृहपाठ दिला आहे *****

(सूज्ञ पालकांकडून याची अपेक्षा आपल्या आपल्यासाठीच बर का !) 

चेन्नईतील एका शाळेने आपल्या मुलांना दिलेली सुट्टी जगभर व्हायरल होत आहे.

याचे कारण इतकेच आहे की त्याची रचना अतिशय विचारपूर्वक केली गेली आहे. हे वाचून लक्षात येते की आपण प्रत्यक्षात कुठे पोहोचलो आहोत आणि आपण आपल्या मुलांना काय देत आहोत? अन्नाई व्हायलेट मॅट्रिक्युलेशन आणि उच्च माध्यमिक विद्यालयाने मुलांसाठी नाही तर पालकांसाठी गृहपाठ दिला आहे,जो प्रत्येक पालकाने वाचला पाहिजे.

त्यांनी लिहिले-

गेल्या 10 महिन्यांपासून तुमच्या मुलांची काळजी घेण्यात आम्हाला आनंद झाला. त्यांना शाळेत यायला आवडते हे तुमच्या लक्षात आलेच असेल. पुढील दोन महिने त्यांच्या नैसर्गिकह संरक्षक म्हणजेच तुमच्यासोबत घालवले जातील. आम्ही तुम्हाला काही टिप्स देत आहोत जेणेकरून हा काळ त्यांच्यासाठी उपयुक्त आणि आनंदी ठरेल.

– मुलांसोबत किमान दोन वेळा जेवण करा. त्यांना शेतकऱ्यांचे महत्त्व आणि त्यांच्या मेहनतीबद्दल सांगा. आणि त्यांना अन्न वाया घालवू नका असे सांगा.

– जेवल्यानंतर त्यांना स्वतःची ताटं धुवू द्या. अशा कामांतून मुलांना मेहनतीची किंमत कळेल.

– त्यांना तुमच्याबरोबर स्वयंपाक करण्यासाठी मदत करू द्या. त्यांना भाज्या किंवा सॅलड तयार करू द्या.

– तीन शेजाऱ्यांच्या घरी जा. त्यांच्याबद्दल अधिक जाणून घ्या आणि जवळ व्हा.

– आजी-आजोबांच्या घरी जा आणि त्यांना मुलांमध्ये मिसळू द्या. त्यांचे प्रेम आणि भावनिक आधार तुमच्या मुलांसाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यांच्यासोबत फोटो काढा.

– त्यांना तुमच्या कामाच्या ठिकाणी घेऊन जा जेणेकरून तुम्ही कुटुंबासाठी किती मेहनत करता हे त्यांना समजेल.

– कोणताही स्थानिक सण किंवा स्थानिक बाजारपेठ चुकवू नका.

– किचन गार्डन तयार करण्यासाठी तुमच्या मुलांना बिया पेरण्यास प्रवृत्त करा. आपल्या मुलाच्या विकासासाठी झाडे आणि वनस्पतींबद्दल जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे.

– मुलांना तुमचे बालपण आणि कौटुंबिक इतिहास सांगा.

– तुमच्या मुलांना बाहेर जाऊन खेळू द्या, त्यांना दुखापत होऊ द्या, त्यांना घाण होऊ द्या. अधूनमधून पडणे आणि वेदना सहन करणे त्यांच्यासाठी चांगले आहे. सोफा कुशनसारखे आरामदायी जीवन तुमच्या मुलांना आळशी बनवेल.

– त्यांना कुत्रा, मांजर, पक्षी किंवा मासे असे कोणतेही पाळीव प्राणी ठेवू द्या.

– त्यांना काही लोकगीते वाजवा.

– तुमच्या मुलांसाठी रंगीबेरंगी चित्रांसह काही कथा पुस्तके आणा.

– तुमच्या मुलांना टीव्ही, मोबाईल फोन, कॉम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सपासून दूर ठेवा. या सगळ्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य वेचले आहे.

– त्यांना चॉकलेट, जेली, क्रीम केक, चिप्स, एरेटेड पेये आणि बेकरी उत्पादने जसे पफह आणि तळलेले पदार्थ जसे समोसे देणे टाळा.

– तुमच्या मुलांच्याह डोळ्यात पहा आणि तुम्हाला अशी अद्भुत भेट दिल्याबद्दल निसर्गाचे आभार माना. आतापासून येत्या काही वर्षांत, ते नवीन उंचीवर असतील.

पालक म्हणून तुम्ही तुमचा वेळ तुमच्या मुलांना देणे महत्त्वाचे आहे.

तुम्ही पालक असाल तर हे वाचून तुमचे डोळे नक्कीच ओलावले असतील. आणि जर तुमचे डोळे ओले असतील तर कारण स्पष्ट आहे की तुमची मुले खरोखरच या सर्व गोष्टींपासून दूर आहेत. या असाइनमेंटमध्ये लिहिलेला प्रत्येक शब्द आपल्याला सांगतो की जेव्हा आपण लहान होतो तेव्हा या सर्व गोष्टी आपल्या जीवनशैलीचा एक भाग होत्या ज्याने आपण मोठे झालो, परंतु आज आपली मुले या सर्व गोष्टींपासून दूर आहेत…!

म्हणून हा प्रयत्न…

संकलन : श्री भार्गव पवार 

© श्री सुनील देशपांडे

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ I am in control – एक व्यसनयात्रा ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

🌈 इंद्रधनुष्य 🌈

I am in control  एक व्यसनयात्रा ☆  श्री मकरंद पिंपुटकर

I am in control  एक व्यसनयात्रा

रमेश हा एक almost आदर्श नागरिक होता. त्याची जुनी बजाज चेतक चालवताना तो कधी गाडी बेफाम पळवायचा नाही, नेहमी स्पीड लिमिटचे पालन करायचा. लाल काय, नियमानुसार तो कधी पिवळा सिग्नलही तोडायचा नाही. कधीही wrong साईडने गाडी चालवायचा नाही. 

म्हणजे एकंदरीत इतक्या सज्जनपणे गाडी चालवायचा, की अगदी शुक्रवार – शनिवार रात्री किंवा सणासुदीलासुद्धा पोलीस त्याला संशयावरून बाजूला घ्यायचे नाहीत. 

आणि ते तसे त्याला बाजूला घ्यायचे नाहीत म्हणून बरं होतं, कारण रमेश हा नेहमीच तर्र अवस्थेत असायचा. “मला दारूचं व्यसन नाही रे. दारू काय आपण केव्हापण सोडू शकतो. आपण नेहमी full control मध्ये असतो.” हातातला देशी दारूचा ग्लास रिचवताना तो त्याचं तत्त्वज्ञान सांगायचा. 

त्याचं लग्न झालं होतं, दोन मुली होत्या. दिवसा तर त्या शाळेत गेलेल्या असायच्या. रात्री जेवताना रमेश, लेकी आणि रमेशची बायको एकत्र असायचे. टीचभर स्वयंपाकघरात बायकोची लगबग चाललेली असायची, मुली दोन घास पोटात ढकलत असायच्या आणि रमेश नेहमीप्रमाणे कोणाशी काही न बोलता, आपल्याच धुंदीत (आपल्याच नशेत, खरं तर) उन्मनी अवस्थेत बसलेला असायचा. 

मला तर वाटतं की खाण्यापेक्षा त्याचा जास्त भर पिण्यावरच होता.  दारूच्या नशेत बायकोला – मुलींना मारहाण करायचा नाही हेच काय ते नशीब. 

त्याला चांगली नोकरी होती. आम्ही दोघं एकाच कारखान्यात काम करायचो. पण या व्यसनापायी त्याला अनेकदा warning मिळाल्या आणि मग, नाईलाजाने, शेवटी एके दिवशी कामावरून डच्चूही मिळाला. 

रमेशला काहीच फरक पडला नाही. ना त्याने दारू सोडली, ना त्याने नवीन नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न केले. उलट आता त्याला दारू पिण्यासाठी आणखी वेळ आणि मोकळेपणा मिळाला.

याची नोकरी गेल्यावर बायकोने महिनाभर आस लावली, तिला वाटलं – नवरा नोकरीसाठी प्रयत्न करेल. महिन्याभरात पुन्हा एकदा भ्रमनिरास झाल्यावर त्या माऊलीने धुण्याभांड्याची चार कामं आणखी वाढवली. 

रमेश पूर्ण वेळ full time घरकोंबडा झाला. 

याचं दारू ढोसणं चालूच होतं. कर्जाचा आणि खर्चाचा डोंगर वाढतच होता. परिस्थिती खूपच हाताबाहेर गेल्यावर बायकोने शेवटी ज्या घरात ते रहात होते ते तिच्या वडिलांच्या मालकीचं घर विकलं, सर्व कर्जं बऱ्यापैकी फेडली. 

आता ते एका झोपडपट्टीवजा इलाख्यात भाड्याने राहत होते. रमेश अजूनही नोकरीसाठी प्रयत्नही करत नव्हता. “आपण दारूबाज नाही रे. आपण एकदम control मध्ये असतो.” हे त्याचं घोषवाक्य अजूनही कायम होतं. 

मुलींची शिक्षणं जेमतेम दहावी बारावीपर्यंत झाली, आलेल्या स्थळांबरोबर बायकोने मुलींची लग्नं लावून दिली, निदान त्या दोघींची तरी सुटका झाली. 

आयुष्य मागच्या पानावरून तसंच नीरसपणे पुढे सुरू होतं. 

आणि एका रात्री त्याच्या किंचाळ्यांनी बायकोला जाग आली. त्याच्या तोंडातून आणि शौचाद्वारे रक्त येत होतं. 

“ब्लड हॅमरेज,” सरकारी दवाखान्यातल्या डॉक्टरांनी सांगितलं. म्हणजे नेमकं काय हे त्या बिचाऱ्या बायकोला कळलं नाही. मग डॉक्टरच तिला समजावून सांगू लागले. 

हाताने यकृताची जागा दाखवत ते म्हणाले, “या इथे liver असते. किडन्यांप्रमाणे liver सुद्धा रक्तातील अशुद्ध भाग काढून टाकते. सारखी दारू पिण्याने तुमच्या नवऱ्याची liver निकामी झाली आहे. जेमतेम १०% काम करत आहे. 

दारूनं त्याची जठर, आतडी या सगळ्या सगळ्यांची आवरणं पार खराब झाली आहेत, त्यांत अल्सर झाले आहेत. त्यातला कुठलातरी एक अल्सर आज फुटला, म्हणून आज हे असं झालं.”

डॉक्टर कमालीच्या यांत्रिकपणे, कोणत्याही भावभावनेशिवाय हे सगळं सांगत होते. आणि त्यात आश्चर्य नव्हतं. जवळपास रोज एखादीतरी अशी केस यायचीच. काही महिन्यांनंतर तेही निर्ढावले होते. 

“आता आम्ही याचं नाव लिव्हर ट्रान्सप्लांट लिस्टमध्ये टाकू. ते ऑपरेशन महाग असतं,” डॉक्टरांनी खर्चाचा आकडा सांगितल्यावर बायको मटकन खालीच बसली. “पण लिव्हर कधी मिळेल काहीच सांगता येत नाही. शिवाय लिव्हर उपलब्ध झालीच तर एखाद्या दारुड्यापेक्षा दारू न पिणाऱ्या पेशंटला लिव्हर दिलेले जास्त चांगलं असतं, कारण व्यसनाधीन माणूस पथ्यपाणी करत नाही आणि मिळालेली नवी लिव्हरही नासवतो.

आज तुम्ही धावपळ करून त्याला वेळेवर हॉस्पिटलला आणलंत, आणि आज आम्ही त्याला वाचवू शकलो. कदाचित पुढच्या वेळी जर तुम्हाला उशीर झाला, किंवा आम्ही हा रक्तस्त्राव थांबवू शकलो नाही तर …”

निर्विकारपणे सांगताना अचानक डॉक्टरांचं लक्ष तिच्या चेहऱ्याकडे गेलं, त्यावरची प्रेतकळा पाहून तेही वरमले, चरकले, थांबले. 

पण त्यामुळे त्यांनी वर्तवलेला भविष्यात फरक पडला नाही. रमेश मृत्यू पावला – कणाकणाने, क्षणाक्षणाने, वेदनादायी मरण आलं त्याला. 

व्यसनापायी सर्व पैसा उधळवून टाकला होता त्याने, आयुष्यही उधळून टाकलं.

“आपल्याला व्यसन नाही रे दारूचं. I am in full control,” हे ध्रुपद घेऊन सुरू झालेली व्यसनयात्रा त्याचा प्राण घेऊनच संपली.

रमेशसारखेच एकदम full control मध्ये असणारे तुमच्या आजूबाजूलाही अनेक जण असतील. ते वेळीच सावरोत, ही सदिच्छा.

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – विविधा ☆ निर्माल्य! ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

निर्माल्य! ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

बाजारात अनेक फुले होती. मोगरा होता, गुलाब होता, जाई होती, जुई होती, सोनचाफा होता. शेवंती होती, झेंडू होता, सायली होती, मखमल होती,अनेक फुलं होती. सर्व लोकं ही फुले घेण्यास उत्सुक होती. प्रत्येक फुलाची ऐट वेगळीच. प्रत्येकाचे मूल्य वेगवेगळे आणि सुगंधाप्रमाणे वाढत जाणारे.

मी तगर!! कुठेही सापडणारे, सहज उपलब्ध असलेले नि त्यामानाने ‘नगण्य’ मूल्य असलेले सामान्य फुल. मला मनमोहक ‘गंध’ नाही, रूप नाही, रंग ही सामान्य (पांढरा). मला कोण देवाच्या पायी वाहणार ? परमेश्वराच्या मंगल आणि पावन चरणांना स्पर्श करण्याचे भाग्य मला कसे लाभणार ?

मनात असलेली, ध्यास लागलेली गोष्ट यथावकाश घडतेच असे म्हटले जाते. मलाही त्याची अनुभूती आली. भगवंताच्या रूपाने एक साधू महाराज आले, त्यांनी मला ‘खुडून’ घेतले आणि भगवंताच्या चरणावर अर्पण केले. माझी सुप्त इच्छा पूर्ण झाली. मला मूल्य नाही मिळाले, किंमत मिळाली नाही, सुगंध मिळाला नाही, पण एक गोष्ट मिळाली की ज्यामुळे मी कृतकृत्य झालो. कोमेजताना निर्माल्य होण्याचे भाग्य मला मिळाले यापेक्षा पुण्य काय असू शकते ? भगवंताच्या सहवासात माझे ‘निर्माल्य’ झाले. निर्माल्य!

मनुष्याचे जीवन फुलासारखे तर असते. नाना तऱ्हेची फुले तशी नाना तऱ्हेची माणसे. फक्त निर्माल्य होणे गरजेचे. किमान तसा प्रयत्न आपण करायला हवा.

© श्री संदीप रामचंद्र सुंकले

थळ, अलिबाग. मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डिटॅचमेंट… भाग – 1 ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

? मनमंजुषेतून ?

☆ डिटॅचमेंट… भाग – 1 ☆ डॉ. शैलजा करोडे 

रोजचाच दिवस, रोजचीच सकाळ,  तीच धावपळ, तोच दिनक्रम . पण माझ्यासाठी आजचा दिवस वेगळाच होता . अडोतीस वर्षांपूर्वीही तो दिवस खास होता . पण तो  माझ्या आयुष्यातील एका नव्या पर्वाचा आरंभ होता .जीवनाची खर्‍या अर्थानं सुरूवात होती ..माझ्या शिक्षणाचं , मी केलेल्या कष्टांचं जणू ते फळ होतं . रोज उठून रोजगाराच्या जाहिराती पाहणं , अर्ज करणं व प्रतिसादाची वाट पाहाणं हा प्रवास आजच्या दिवशी संपला होता . अर्ज , लेखी परीक्षा नंतरचे मुलाखतीचे सोपस्कर आटोपल्यावर आजच्या दिवशी अडोतीस वर्षापूर्वी बँकिंग सर्व्हीस रिक्रूटमेंट बोर्डाकडून ( BSRB ) मला अपाइंटमेंट लेटर मिळून एका राष्ट्रीयकृत बँकेत मला हजर व्हायचे होते

स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा आनंद काही वेगळाचं असतो , तो आनंद मला मिळाला होता .बँकेत लेटर घेऊन जाणे , अधिकार्‍यांनी सगळ्या पूर्तता झाल्यावर  कामावर रूजू करवून घेऊन मला काम सोपविणे , सगळं अद्भूत होतं माझ्यासाठी . आणि आज इतकी वर्षे इमाने इतबारे सर्व्हिस केल्यावर सेवानिवृत्तीचा दिवस आला होता .

इतकी वर्षे या इन्स्टिस्टूटशी जोडलेली मी डिटॅच होणार होते .

आज रोजच्याप्रमाणे मी आॅफीसला जायला निघाले पण मनात एक वेगळीच हुरहुर होती . उद्यापासून हा दिनक्रम थांबणार होता . रोज घड्याळाच्या तालावर नाचणार्‍या मला एकदम रितेपण जाणवणार होतं .दिवसातील दहा दहा तास कामाच्या चक्रात फिरणारी मी आता या वेळेत काय करणार , या वेळेचं नियोजन कसं करणार .? या प्रश्नांनी वेढली होते .

“मॅडम आता कोठे घेऊ गाडी, मला रस्ता सांगा ” मी तंद्रीतून बाहेर आले . “उजवीकडे घ्या ” . रोज नवनवीन आव्हानांना सामोरी जाणारी मी , आजही नवीन आव्हान समोर आलं . आँटोरिक्षा , टॅक्सीवाल्याँचा आज संप होता . बँकेत वेळेवर पोहोचणं , डे बेगीन करणं , कॅश व सुरक्षा जमा कक्ष उघडणं , वेळेवर होणं गरजेचं होतं . रस्त्यावरून जाणार्‍या एका फोर व्हीलरला थांबवून त्या व्यक्तिला मी विनंती केली व त्याने मला इच्छितस्थळी पोहोचविले .

सेवानिवृत्ती नंतर मनसोक्त झोपायचं , आरामात उठायचं , वर्तमान पेपर वाचतांना चहाचा एकएक घोट घ्यायचा . आरामात आंघोळीला जायचं . किती किती छोटी स्वप्न असतात आपली नाही का ?. पण रोजच्या धावपळीत , दगदगीत ती सुद्धा पूर्ण होत नाही . सेवानिवृत्तीनंतर आपण हे सगळं करूया , मी मनाशी खूणगांठ बांधलेली .आज ती वेळ आली होती , पण हे काय ? पक्ष्यांच्या चिवचिवाटासोबत मी पण उठून बसले , ते ही नेहमीपेक्षा लवकर . वर्तुळात फिरण्याची इतक्या वर्षांची सवय. हातही भराभर कामे करू लागलीत .स्वयंपाक आटोपला आणि सवयीने डबा भरायला घेतला , ” अगं काय करतेस ? डबा काय भरतेस ? रिटायर झालीस ना तू काल ” यांच्या बोलण्याने मी भानावर आले . डब्यातलं अन्न पुन्हा पातेल्यांमध्ये काढलं . ” इतकी वर्ष सोबत निभावलीस . माझ्यासोबत तू ही रिटायर झालास . तू ही अलिप्त झालास . डिटॅच झालास ” मी हातातील डबा न्याहाळत होते .डबा सिंकमध्ये ठेवला आणि मी गॅलरीत आले .तुळशी चांगली बहरली होती . असं निवांतपणे मी तुळशीला कधी न्याहाळलंच नव्हतं . तुळशीने मंजिर्‍या खूप धरल्या होत्या . ” मंजिरी वाढली म्हणजे तुळशीचं लाईफ कमी होतं . म्हणून मंजिर्‍या वरचेवर खुडाव्यात , तुळशी पुन्हा बहरायला मदत होते ” आईचे बोल आठवले व मी तुळशीच्या मंजिर्‍या खुडू लागले .देवघरात जाऊन श्रीकृष्णाच्या मूर्तीवर मंजिर्‍या वाहिल्या .

दुपारचा एक वाजला आणि आॅफीसमधील लंचब्रेक मला आठवला .आज मला हे काय होतंय .? सेवानिवृत्तीपूर्वी माझी तीन महिने शिल्लक असलेली रजा मी एंजाॅय करत होते , तेव्हा मला अशी हुरहुर कधीच वाटली नाही . हो त्याला कारणंही तसंच होतं म्हणा , मी अजून त्यांच्याशी जोडलेली होते .

हा काय पहिला बदल होता का आयुष्यातला ? नाही ना . प्रत्येक वेळी जुळवलंच ना आपण . प्राथमिक शिक्षण झालं आणि हायस्कूलला प्रवेश घेतला . जुनी शाळा , मैत्रिणी , शिक्षकवर्ग सगळ्यांचा निरोप घेतांना डोळ्यात अश्रूंनी दाटी केलेली .आम्ही मैत्रिणी एकमेकींना भेटवस्तू देत , पुनःपुन्हा भेटीचं आश्वासन देत डिटॅच झालो .पण नवीन शाळा , नवीन मैत्रिणी आणि पुढे शिकण्याची जिद्द , यांनी नवऊर्जा दिलीच की .

हाच परीपाठ हायस्कूल सोडतांना , पुढे महाविद्यालय सोडतांना , मनाला हुरहुर लावणारा घडत गेला . एकीकडे डिटॅच होतांना दुसरीकडे अँटचही होत गेलेलो आम्ही . पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर काही ना काही शिकत होतो . नवी उमेद , नवी आशा आणि जुन्याने दिलेल्या असंख्य आठवणींचा खजिना सोबतीला घेऊन मार्गक्रमण होतंच राहिलं .

आठवणींच्या या चलचित्रात मला आठवलं माझं सगळ्यात मोठं डिटॅचमेंट . माझं लग्न . ज्या घरात माझा जन्म झाला , मी लहानाची शहाणी झाले . आई वडिलांच्या छायेत वावरले , भावंडांच्या सोबतीने खेळले , कधी भांडले , रूसवे फुगवे धरले , यांना सगळ्यांना सोडून नव्या घरी , नवीन माणसांसोबत राहाणं , तेथील रितीरिवाज , घरातील प्रत्येकांचे स्वभावदोष जाणून त्यांच्याशी जुळवून घेत , त्यांची मर्जी राखणं , सासूचा तोरा , दीर जावांचा हेवादावा ,नणंदेचे टोमणे सहन करत संसारगाडी हाकायची , अजबच होतं . माहेर सुटलं , अगदी ”

— क्रमशः भाग पहिला 

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈



मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अण्णासाहेब किर्लोस्कर ☆ श्री प्रसाद जोग ☆

श्री प्रसाद जोग

? इंद्रधनुष्य ?

☆ अण्णासाहेब किर्लोस्कर ☆ श्री प्रसाद जोग

अण्णासाहेब किर्लोस्कर

( जन्मदिन ३१ मार्च,१८४३ — स्मृतीदिन २ नोव्हेंबर,१८८५ ) 

मराठी जनमानसात संगीत नाटकाचे प्रेम, खर्‍या अर्थाने रुजवण्याचे श्रेय  बलवंत पांडुरंग अर्थात अण्णासाहेब किर्लोस्करांकडेच जाते.

१८७३ साली अण्णासाहेबांनी ‘शांकरदिग्विजय’ या नावाचे एक गद्य नाटक प्रसिद्ध केले. १८८० साली पुणे मुक्कामी किर्लोस्करांनी ‘इंद्रसभा’ नावाचे पारसी नाटक – उर्दू भाषेतील – पाहिले आणि तशा प्रकारचे नाटक मराठी रंगभूमीवर का होऊ शकत नाही, या ईर्ष्येने एकटाकी एका बैठकीत  ‘संगीत शाकुंतल’ या नाटकाचा पहिला अंक लिहून काढला.

१३ ऑक्टोबर १८८० रोजी पुण्याच्या तंबाखू आळीत दसर्‍याच्या मुहूर्तावर ‘शाकुंतला’च्या पहिल्या तीन अंकांची रंगीत तालीम झाली. आणि रविवार ३१ ऑक्टोबर १८८० रोजी बुधवार पेठेतील भांग्या मारुतीसमोरच्या तांबेकरांच्या वाड्यात असलेल्या आनंदोद्भव नाटकगृहाच्या गच्च भरलेल्या तिन्ही मजल्यांसमोर शाकुंतलाचा पहिला प्रयोग झाला. व्यावसायिक मराठी संगीत नाटकाची मुहूर्तमेढ इथे रोवली गेली.

भारतीय नाट्यशास्त्राचा पाया भरतमुनींनी लिहिलेल्या नाट्यशास्त्राच्या ग्रंथात सापडतो. रंगमंचावरील नेपथ्य, संगीत, नृत्य, वेषभूषा, रंगभूषा, अभिनय, दिग्दर्शन इथपासून रंगमंच जिथे असतो त्या रंगमंदिराचे बांधकाम कसे करावे, त्यासाठी भूमीची निवड, बांधकाम साहित्य, आकारमान इथपर्यंत नाटकाचे संपूर्ण नियम, पथ्ये भरताच्या नाट्यशास्त्रात सापडतात. त्यामुळेच नाट्यशास्त्राला पाचवा वेद मानलं जातं.

भरताच्या नाट्यशास्त्राप्रमाणे जेव्हा इतिहासकाळात नाटके होत असत, तेव्हा वातावरणनिर्मितीसाठी सुरुवातीला धृवागीतं वाजवली जात असत – ती वाद्यांवर वाजवली जात.जेणेकरून लोकांना कळावे, की आज इथे काहीतरी नाटक आहे. त्यालाच आपण आज नांदी म्हणतो .

नाट्यशास्त्राप्रमाणे नांदी हा एक पडद्यामागे होणारा विधी असे. त्यानुसार ‘संगीत शाकुंतल’ नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगाला स्वतः अण्णासाहेब सूत्रधार, बाळकोबा नाटेकर, मोरोबा वाघोलीकर आणि शेवडे या पारिपार्श्वकांसह पडद्यामागे नांदी म्हणण्याकरता सज्ज झाले. ‘पंचतुंड नररुंडमालधर’ ही नांदी म्हणण्यास सुरुवात करणार, तोवर जणू पडदा ओढणार्‍यास तेवढाही विलंब सहन न होऊन त्याने एकदम पडदा वर उचलला. आणि पडद्यामागे नांदी म्हणून नटेश्वराला फुले अर्पण करून नाट्यप्रयोगाला सुरुवात करण्याचा संकेत अचानकपणे बदलून गेला.

संगीत, नृत्य, नाट्य यांच्या अपूर्व संगमातून निर्माण झालेली संस्कृती म्हणजे रंगभूमी. याच रंगभूमीचं तेजस्वी रुप म्हणजे आपली मराठी संगीत नाट्य परंपरा. रंगमंदिरातील निःशब्द शांतता, भारावून टाकणारं वातावरण, मंद होत जाणारे दिवे, मखमली पडदा, धुपाचा गंध आणि ऑर्गनच्या साथीनं येणारे नांदीचे सूर. सगळच भव्यदिव्य.बळवंत पांडुरंग तथा अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी ‘संगीत शाकुंतल’ या नाटकाद्वारे ही देदीप्यमान परंपरा सुरू केली.

पंचतुंड नररुंडमाल घर, पार्वतीश आधी नमितो।

विघ्नवर्ग नग भग्न कराया,विघ्नेश्वर गणपती मग तो॥

 

कालिदास कवी काव्य रचित हे गानी शाकुंतल रचितो I

जाणूनिया अवसान नसोनी हे महत्कृत्यभर शिरी घेतो II

 

ईशवराचा लेश मिळे तरी  मूढयत्न शेवटी जातो I

या न्याय बलत्कवि निज वाकपुष्पी रसिकार्चन करितो II

नांदी आणि नाटकातील इतरही पदे निरनिराळ्या राग-रागिण्यांवर आधारित असत. यमन, भूप, ललत, जोगिया, पिलू, आसावरी, भैरवी यांसारखे प्रचलित आणि लोकप्रिय राग तर वापरले गेले.

शाकुंतल नाटकांमधील पदे आजही आवडीने ऐकली जातात त्या पैकी थोडी

१)मना तळमळसी ,

२)लाविली थंड उटी

संगीत सौभद्र मधल्या पदांची यादी फारच मोठी आहे म्हणून नमुन्या दाखल काही गाणी .

१) नच सुंदरी करू कोपा

२) नभ मेघांनी आक्रमिले

३) पाण्डुनृपती जनक जया

४) राधाधर मधू मिलिंद

५) लग्नाला जातो मी

६) प्रिये पहा ( पूर्वीच्या काळी ह्या गाण्याच्या वेळी खरोखर पहाट होत असे)

१५० वर्षांपूर्वी लोकरंजन करण्यासाठी पाऊल उचलणाऱ्या अण्णासाहेब किर्लोस्करांच्या स्मृतीला  विनम्र अभिवादन.

©  श्री प्रसाद जोग

सांगली

मो ९४२२०४११५०   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘शिवथर घळ’ … लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘शिवथर घळ’ … लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

एकदा सहज म्हणून शिवथर घळीत गेलो होतो. राहायला नेहेमी मिळते तशी मोफत खोली मिळाली… आज फारसे भाविक नसल्याने व्यवस्थापकांनी अजून कुणाला तरी माझ्याच खोलीत विनंती करून राहावयास पाठविले. एक चांगली जाडजूड वजनदार सॅक घेऊन एक चाळिशीच्या पुढचे गृहस्थ आत आले ! “हाय ! मी भोपळे !” ओळख करून दिली गेली. मनुष्य पेहेरावावरून मॉडर्न वाटत होता… इतक्यात त्यांनी पँटच्या खिशातून खचाखच भरलेल्या  काही इक्विपमेंट्स काढून टेबलावर मांडली… माझी उत्कंठा ताणली गेली.. “हे काय आहे ?” “ही जीपीएस मशीन्स आहेत … डू यू नो व्हॉट जीपीएस इज ?” 

माझ्यातला सुप्त शास्त्रज्ञ जागा होऊ लागला ! “येस, आय नो… पण आपण इतकी सारी जीपीएस यंत्रे का वापरता ?” हसत हसत ते म्हणाले “मी जीपीएस व्हेंडर आहे. माझा तो व्यवसायच आहे ” असे म्हणत त्यांनी माझ्या उत्कंठित चेहर्‍यावरचे भाव ओळखत लॅपटॉप बाहेर काढला आणि म्हणाले – “हे जे प्रेझेंटेशन आहे जे मी आता तुम्हाला दाखविणार आहे याचे मी बाहेर किमान ५-५० हजार रुपये घेतो ! पण तुम्ही समर्थ भक्त आहात म्हणून तुम्हाला हे ज्ञान मोफत !” असे म्हणत त्यांनी सुमारे एक तास अतिशय सखोलपणे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम अर्थात जीपीएसची इत्थंभूत माहिती मला सांगितली … ज्ञानात चांगलीच भर पडली ! आता तुम्ही म्हणाल याचा आणि शिवथर घळीचा काय संबंध ? मलाही तोच प्रश्न पडला ! पण खरी गंमत तर पुढे आहे ! वाचत रहा !

भोपळे म्हणाले “चलो यंग मॅन, आता थियरी खूप झाली, आता थोडे प्रॅक्टिकल करूयात…” असे म्हणत ती सर्व यंत्रे घेऊन आम्ही बाहेर आलो… उघड्या आकाशाखाली…  कारण जीपीएसला ओपन स्काय अर्थात खुले आकाश लागते ! त्या आकाशातील उपग्रह या आपल्या हातातील यंत्राला त्याची पोझिशन, स्थान सांगत असतात ! आता माझी परीक्षा सुरु झाली !

भोपळे : बरं, वर पहा, किती डिग्री आकाश खुले आहे ?

मी : “९० तरी असेल.”

भोपळे : “गुड.. मग मला सांगा आता या स्पेस मध्ये साधारण किती सॅटेलाईट्स असतील ?”

मी : “तुम्ही मघाशी सांगितलेत त्याप्रमाणे ३० एक तरी असावेत.”

भोपळे: “करेक्ट! लेट्स व्हेरीफाय !”

असे म्हणत त्यांनी जमिनीवर मांडलेली सर्व यंत्रे एक एक करत सुरू केली. कुणी २० उपग्रह पकडले (उपग्रहांची रेंज पकडली), कुणी २४, कुणी २८… नियमानुसार २४ उपग्रह असतील तर एक मीटरपर्यंत अचूक स्थान सांगता येते तसे त्या यंत्रांनी सांगितलेही !

भोपळे :” मी जगभरातील अनेक देश फिरलोय… सगळीकडे या यंत्रांचे असेच बिहेवियर असते”. आता मात्र मला रहावेना. मी म्हणालो – “भोपळे सर, आपण इतके उच्चशिक्षित आणि शास्त्रसंपन्न आहात तर या इथे खबदाडात, खनाळात कसे काय वाट चुकलात ?”

“तीच तर गंमत आहे!” भोपळे हसत हसत म्हणाले – “इथे रायगड पोलीस स्टेशनच्या वायरलेसचे काम करायला आलो होतो. म्हणजे सर्वेक्षणच होते .. आणि अचानक एक चमत्कार गवसला !”

मी अति उत्सुकतेने ऐकत होतो !

“डू यू वाँट टू विटनेस इट ? या माझ्या सोबत !” असे म्हणत ते मला शिवथर घळीच्या तोंडापाशी घेऊन गेले. 

भोपळे : “वर पहा, किती आकाश आहे ?”

मी :” ७० अंश तरी आहेच आहे.”

भोपळे :” मग किती उपग्रह दिसावेत ?”

मी : निदान २०-२५ ?

भोपळे : “करेक्ट, नाऊ लेट्स चेक…” असे म्हणत त्यांनी पुन्हा सर्व यंत्रे खुल्या आकाशाखाली मांडून सुरू केली … आणि काय आश्चर्य ! जर्मन, चायनीज, जपानी, अमेरिकन, ब्रिटिश, कोरियन अशा सर्व बनावटीच्या एकाही यंत्राला एकाही उपग्रहाची रेंज येईना ! चमत्कारच हा ! उपग्रह नजरेच्या टप्प्यात होते ! पण यंत्रांना मात्र सापडत नव्हते. म्हणजे त्या घळीभोवती असे काहीतरी क्षेत्र होते जे उपग्रहांच्या फ्रिक्वेन्सीज खाली पोहोचूच देत नव्हते !

भोपळे म्हणाले “पूर्ण जग फिरलो परंतु absolutely frequency less अशी केवळ हीच एक जागा पाहिली !” …. आणि मग मला समर्थांच्या शिवथर घळीचे वर्णन करणा-या ओळी झर्रकन स्मरल्या !

…. ‘ विश्रांती वाटते येथे। यावया पुण्य पाहिजे !! ‘                                      

विश्रांती ! शांतता ! कंपनरहित अवस्था ! निर्विचार स्थिती ! अशा स्थितीत केवळ आपल्याच मनातले विचार ऐकू येणार ! त्यात भेसळ होणे नाही ! आणि म्हणूनच समर्थांनी दासबोध लिहायला ही जागा निवडली असणार ! …. म्हणूनच हा ग्रंथ शुद्ध समर्थांचाच आहे !

अंगावर काटा उभा राहिला, डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या… भोपळेंचे मनापासून आभार मानत घळीत पाय ठेवला… समर्थांच्या पायावर लोटांगण घातले… आज तिथे भासणारी शांतता अधिक खोल होती… अधिक गंभीर होती… अधिक शांत होती ! भ्रांत मनास विश्रांती खरोखरीच वाटत होती !

आधुनिक विज्ञानास जे गवसले ते माझ्या या माऊलीला ४०० वर्षांपूर्वीच केवळ अंतःस्थ जाणीवेने समजले होते !

दासबोधाचे जन्मस्थान म्हणजे रायगडाजवळील शिवथरची घळ हे समीकरण आता सर्वांनाच माहिती आहे ! परंतु ही अद्भुत घळ आपण प्रत्यक्षात पाहिली आहे का हो ? नसेल … तर अगदी अवश्य पहा ! आणि सर्वांना सांगा !

!! जय जय रघुवीर समर्थ !! 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : अमोल केळकर 

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈



मराठी साहित्य – विविधा ☆ २२ एप्रिल – वसुंधरा दिनानिमित्त – “वसुंधरा दिन…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

☆ २२ एप्रिल – वसुंधरा दिनानिमित्त – “वसुंधरा दिन…” ☆ सौ राधिका भांडारकर 

वसुंधरा दिनाची संकल्पना अमेरिकेतील गेलार्ड नेल्सन मंडेला यांनी मांडली. त्यांनी पर्यावरणाच्या समस्यांबाबत जागृती केली. प्रदूषण आणि वन्यजीवांचा ऱ्हास या मुद्द्यांवर तेथील सर्व थरातील लोकांनी आवाज उठवला. हवा, पाणी वने, आणि वन्यजीव निसर्ग यांच्या संरक्षणासाठी तेथे राजकीय दबाव निर्माण झाला. आणि १९७० सालापासून अर्थ डे म्हणजेच वसुंधरा दिन २२ एप्रिल रोजी जगभर साजरा केला जातो.

वाढते प्रदूषण, विकासाच्या अवास्तव कल्पना, अयोग्य जीवनशैली हेच पृथ्वीच्या सद्यस्थिती मागील मुख्य कारण आहे. अवकाळी पाऊस, वाढते तापमान अकल्पित नैसर्गिक वादळे, भूकंप जंगलातले वणवे,भूजल पातळी खालावणे,  या सगळ्यांचं मूळ कारण म्हणजे पर्यावरणाचा न साधलेला समतोल.

माणसाची प्रत्येक गरज पृथ्वी पूर्ण करू शकते पण लोभ नसावा अशा अर्थाचे महात्मा गांधींचे एक वचन आहे. विकासाच्या भ्रामक कल्पनांपायी पृथ्वीवरच्या नैसर्गिक साधन संपत्तीचा अविचारी वापर केल्याने वाढत्या प्रदूषणाचे परिणाम दिसत आहेत आणि हे असेच चालू राहिले तर मानवी जीवनाचे भविष्य अंधकारमय आहे हे निश्चित. याबाबत प्रबोधन करण्यासाठी २२ एप्रिल हा वसुंधरा दिन मानला जाऊ लागला.

पृथ्वीचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे याचे स्मरण करून देणे हे या वसुंधरा दिना मागचे उद्दिष्ट आहे. पृथ्वीवरील पर्यावरणाचा समतोल राखण्यात सर्वात मोठी भूमिका आहे ती जंगलची. मधल्या काही वर्षांमध्ये वाढती लोकसंख्या, वाढत्या गरजा, रस्ते, दळणवळण यानिमित्ताने प्रचंड वृक्षतोड झाली.  रानेच्या राने उद्ध्वस्त झाली. वन्य जीवांच्या वसाहती असुरक्षित झाल्या, पर्जन्यमान विस्कटले आणि सारा नैसर्गिक तोलच ढासळला. आता गरज आहे ती याविषयी अत्यंत सावध राहण्याची. पर्यावरण जागृती हा पृथ्वीवरच्या प्रत्येकाचा महामंत्र बनला पाहिजे.

 भरपूर झाडे लावा, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मार्गाने जंगलतोड वाचवा, पर्वत नद्या यांचा पर्यावरणातला सहभाग लक्षात घ्या, आणि त्यानुसार योग्य जीवनशैली राखून सर्वांगीण जागृती व प्रसार करणे ही या वसुंधरा दिन साजरा करण्यामागची खरी संकल्पना आहे.

प्लास्टिक आणि ई कचरा या सध्याच्या जागतिक समस्या आहेत. ज्यामुळे प्रदूषणाची पातळी वाढत आहे. माऊस, कीबोर्ड, मोबाईलचे खराब झालेले स्पेअर पार्ट्स, किंवा सध्याच्या स्थितीत न चालणारी उपकरणे ही या ई कचरा प्रकारात येतात. जुन्या डिझाईनचे कम्प्युटर, मोबाईल फोन, टेलिव्हिजन, इलेक्ट्रॉनिक खेळणी, क्षमता संपलेले सेल आणि अन्य उपकरणे हा सुद्धा ई-कचराच आहे. हा कचरा जाळल्यास यातून निघणाऱ्या घातक वायूमुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होतो.  शिवाय मानवी आरोग्यासाठीही हे धोकादायक आहे.

प्लास्टिक हे सर्वात घातक असे प्रदूषक आहे. विसाव्या शतकाच्या अखेरीस माऊंट एव्हरेस्ट पासून समुद्राच्या तळापर्यंत अनेक पर्यावरणीय कोनाड्यांचे प्लास्टिकने प्रदूषण केले आहे. प्राण्यांच्या अन्नामधून त्यांच्या पोटात प्लास्टिक जाणे अथवा ड्रेनेज सिस्टीम मध्ये अडकून सखलभागात पूर येणे, जागोजाग साचलेल्या प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे परिसरातील सौंदर्य नष्ट होणे वगैरे अशा कितीतरी बाबींचा जाणीवपूर्वक आणि पर्यावरण पूरक अभ्यास हा झालाच पाहिजे आणि त्यावर उपाय यंत्रणा उभारली पाहिजे. वसुंधरा दिनाच्या निमित्ताने या महत्त्वाच्या समस्येवर प्रकाश टाकला जावा ही अपेक्षा.

हरितगृह वायू म्हणजे कार्बन डाय-ऑक्साइड, नायट्रस ऑक्साईड, ओझोन व पाण्याची वाफ.  मात्र यांचे संतुलन राखणे अत्यंत आवश्यक आहे. यांचे वातावरणातले वाढते प्रमाण ही सध्याची ज्वलंत समस्या आहे. औद्योगिक क्रांती झाली, मात्र या हरितवायूंचा समतोल ढासळून पृथ्वीचे पर्यावरण धोक्यात आले आहे. जीवाश्म इंधन, (पेट्रोल डिझेल वगैरे) कोळसा, तेल, जंगलतोड, जमीन वापरातील बदल, मातीची धूप, शेती, पशुधन, घनकचरा, सांडपाणी या द्वारे मानववंशिक वायूंचे उत्सर्जन होते. पृथ्वीच्या वातावरणात होणारा बदल आणि उपरोक्त घटक यांचा समन्वय योग्य रीतीने साधला गेला पाहिजे.नुकतीच दुबईत झालेली ढगफुटी आणि प्रचंड पाऊस हा याचाच परिणाम असू शकतो. कृत्रिम पाऊस पाडण्याच्या आणि पर्यायाने निसर्गनियमाच्या विरोधात केलेल्या खटाटोपाचाही हा परिणाम असू शकतो.

साऱ्या जगाचे डोळे आता उघडले आहेत. अनेक जागतिक परिषदा घडत असतात, उपाययोजनांचे आराखडे आखले जातात पण सारे फक्त कागदावर राहते. वसुंधरा दिनानिमित्त यावर प्रत्यक्ष ठोसपणे पाऊले उचलणे जरुरीचे आहे.

त्यासाठी आपण बरेच काही करू शकतो सर्व प्रसार माध्यमातून समाज जागृती करणे, पर्यावरण मित्र  गट बनवून प्रदर्शने, स्पर्धा, चित्रपटांच्या माध्यमातून प्रबोधन करणे, शक्यतो नैसर्गिक जीवनशैलीचा अवलंब करणे, पर्यावरण संरक्षण संबंधित अभ्यासक्रम बनवणे आणि त्याची अंमलबजावणी करणे, वृक्ष लागवडीचे महत्त्व पटवणे वेळ पडल्यास सक्ती करणे.. अशा अनेक माध्यमातून प्रयत्न व्हायला हवेत.वसुंधरा दिनाच्या निमित्ताने निसर्ग संवर्धन व्हावे हीच अपेक्षा आणि एक महत्त्वाचं.. हे चरितचर्वण फक्त एका दिवसापुरताच मर्यादित नसावं तर ती मानवाची आचार संहिता ठरावी हा दुर्दम्य आशावाद बाळगूया.

वसुंधरा दिनाच्या पृथ्वीवासीयांना लाख लाख शुभेच्छा!

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆– साधुसंत येती घरा… – ☆ सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

? मनमंजुषेतून ?

☆ – साधुसंत येती घरा… – ☆ सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

पद्मभूषण सुमित्राताई महाजन यांना त्यांच्या जन्मदिनानिमित्त अनेकोत्तम शुभेच्छा 

(आदरणीय सुमित्राताई माझ्या शिवाजी पार्कच्या घरी प्रथम आल्यावेळी, आनंदाचं शिंपण करून गेल्या, त्यावेळची माझी भावना…)

पुण्यश्लोक अहल्याबाई होळकरांचा वारसा चालवणारी, त्यांची परंपरा जागवणारी आणि स्वतःही ती जगणारी; माझ्या नि अनेकींच्या आयुष्यातली – स्वाभिमानाने, व्रतस्थपणे कसं जगावं हे शिकवणारी, एक आदर्श, सोज्वळ, तेजस्वी, कर्तृत्ववान स्त्री….. ज्यांचं भाषण म्हणजे सदैव रंगलेली मैफल ! भारतातील राजकारणाचा, झाशीच्या राणीसारखा कणखर, करारी तरीही मृदु मुलायम आवाज….. लोकसभेच्या ‘स्पीकर’….  म्हणजेच ज्या आवाजाने भल्याभल्यांना “कृपया शांति रखिए…” असं म्हणत गप्प केलंय ! आणि जो हळवा, कोमल, आर्जवी आवाज, ज्यांच्यावर भारतरत्न आदरणीय अटलजींनी, मुलीप्रमाणे प्रेमाचा वर्षाव केला, ज्यांचा सहवास नेहमीच हवाहवासा वाटतो, अशा सर्वांच्याच ताई….. आज माझ्या घरी येऊन आनंदाचं शिंपण करून गेल्या… ज्यांच्या जिव्हेवर सरस्वती वसली आहे, त्याचं प्रतिरूप म्हणजेच सुमित्राताई! यामुळेच मी ताईंना सुप्रसिध्द शिल्पकार आनंद देवधरांकडे घडलेली सरस्वतीची प्रसन्न आणि सुंदर मूर्ती भेट दिली! 

“ताई, तुम्ही माझ्या घरी स्मिताकाकूबरोबर प्रेमाने आलात, मनमोकळ्या गप्पा मारल्यात आणि प्रत्येक गोष्टीचा मनसोक्त आस्वाद घेतलात, याचा मला खूप आनंद आणि अभिमान वाटतोय, जो शब्दांत वर्णन करणं शक्यच नाही. म्हणून म्हणावसं वाटतं, 

“साधुसंत येती घरा, तोचि दिवाळी दसरा!”

©  सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈