मराठी साहित्य – मनमंजुषेतून  ☆ माझी कामाठीपुर्‍यातली भिक्षुकी – मी धूपार्तीचा भिक्षुक.. ! – भाग – १  – लेखक : श्री तात्या अभ्यंकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

??

☆ माझी कामाठीपुर्‍यातली भिक्षुकी – मी धूपार्तीचा भिक्षुक.. ! – भाग – १  – लेखक : श्री तात्या अभ्यंकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

१९९१-९२चा सुमार. मी तेव्हा नौकरी करत होतो.. फोरासरोडवरील झमझम नावाच्या सरकारमान्य देशी दारूच्या बारमध्ये.. कॅशियर कम मॅनेजर होतो मी.. आजूबाजूला सारी वेश्यावस्ती, दारुवाले, मटकेवाले, पोलिस, गुंड.. यांचंच सारं राज्य.. आयुष्यात एके से एक अनुभव आले त्या दुनियेत. कधी सुखावणारे, कधी दुखावणारे, कधी विचार करायला लावणारे, काही चित्र, काही विचित्र, काही नैसर्गिक, काही अनैसर्गिक.. अस्वस्थ करणारे.. आजूबाजूला अनेक प्रसंग रोजच्या रोज घडत होते.. स्वाभाविक, अस्वाभाविक.. पण प्रत्येक प्रसंग एक अनुभव देऊन गेला..

बारमध्ये असंख्य प्रकारची माणसं येत.. रोजचे नियमित-अनियमित बेवडे हजेरी लावायचेच.. त्याशिवाय रोज एखादी ‘काय अभ्यंकर, सगळं ठीक ना? काय लफडा नाय ना?” असं विचारणारी नागपाडा पोलिस स्टेशनच्या कदम हवालदाराची किंवा त्याच्या सायबाची फेरी.. मग कुठे बरणी उघडून फुकट चकली खा, चा पी असं चालायचं.. कधी हलकट मन्सूर किंवा अल्लाजान वेश्यांकरता भूर्जी, आम्लेट, मटन सुका, खिमपाव असं काहीबाही पार्सल न्यायला यायचे.. कधी अफूबाज, चरसी डब्बल ढक्कन यायचा.. कधी बोलबोलता सहज सुरा-वस्तरा चालवणारे हसनभाय, ठाकूरशेठ सारखे गुंड चक्कर काटून जायचे.. “क्यो बे तात्या, गांडू आज गल्ला भोत जमा हो गया है तेरा.. साला आजकल बंबैकी पब्लिकभी भोत बेवडा हो गएली है.. साला, एक हज्जार रुप्या उधार दे ना. ” असं म्हणून मला दमात घ्यायचे..

कधी त्या वस्तीत धंदा करणारे हिजडे यायचे.. उगीच कुठे ठंडा, किंवा अंडापाव, असंच काहीबाही पर्सल न्यायला यायचे.. ‘ए तात्या… म्येरा पार्सल द्येव ना जल्दि.. कितना मोटा है तू.. ‘ अश्या काहितरी कॉमेन्टस करत माझ्या गल्ल्याशी घुटमळत.. मी त्रासाने हाकलून द्यायला लागलो की काडकन टाळी वाजवून ‘सौ किलो.. !’ असं मला मिश्किलपणे चिडवायचे! अक्षरश: नाना प्रकरची मंडळी यायची त्या झमझम बारमध्ये आणि केन्द्रस्थानी तात्या अभ्यंकर!

गणपतीचे दिवस होते.. रस्ता क्रॉस केल्यावर आमच्या बारच्या समोरच्याच कामाठीपुर्‍यातल्या कोणत्याश्या (११ व्या की १२ व्या? गल्ली नंबर आता आठवत नाही.. ) गल्लीत हिजड्यांचाही गणपती बसायचा. हो, हिजड्यांचा गणपती! वाचकांपैकी बर्‍याच वाचकांना कदाचित ही गोष्ट माहीत नसेल. परंतु मुंबैच्या कामाठीपुर्‍यात अगदी हिजड्यांचाही गणपती बसतो.. साग्रसंगीत त्याची पूजा केली जाते.. कामाठीपुर्‍यात काही तेलुगू, मल्लू भाषा बोलणारे, तर काही उत्तरप्रदेशी हिजडे आहेत ते दरसाल गणपती बसवतात.. बरेचसे मुस्लिम हिजडेही त्यात आवर्जून सहभाग घेतात..

झमझम बारचा म्यॅनेजर म्हणून मला आणि आमच्या बारच्या सार्‍या नौकर मंडळींना त्या हिजड्यांचं सन्मानपूर्वक बोलावणं असायचं.. ‘तात्यासेठ, गनेशजीको बिठाया है.. ‘दरसन देखने आनेका.. खाना खाने आनेका.. ‘ असं आग्रहाचं बोलावणं असायचं.. ! अल्लाजान मला घेऊन जायचा त्या गणेशोत्सवात..

संध्याकाळचे सात वाजले असतील.. मी गल्ल्यावर होतो.. पूजाबत्ती करत होतो. तेवढ्यात अल्लाजान मला बोलवायला आला.. “गनेशके दरसन को चलनेका ना तात्यासेठ?”

मी दिवाबत्ती केली.. अर्जून वेटरला गल्ल्याकडे लक्ष द्यायला सांगितलं आणि हिजड्यांच्या गणपतीच्या दर्शनाला अल्लाजानसोबत निघालो. कामाठीपुर्‍याच्या त्या गल्लीत गेलो.. खास दक्षिणेकडची वाटावी अशी गणेशमूर्ती होती.. नानाविध फुलं, मिठाई, फळफळावळ, थोडे भडक परंतु सुंदर डेकोरेशन केलेला हिजड्यांचा नानाविध अलंकारांनी नटलेला ‘अय्यप्पा-गणेश’ स्थानापन्न झाला होता.. एका म्हातार्‍या, स्थूल व टक्कल पडलेल्या हिजड्यानं माझं स्वागत केलं.. तो त्यांचा म्होरक्या होता. बसायला खुर्ची दिली.. झमझम बारचा म्यॅनेजर तात्याशेठ! म्हणून मोठ्या ऐटीत माझी उठबस त्या मंडळींनी केली.. अगदी अगत्याने, आपुलकीने.. !

हिजड्यांबद्दल काय काय समज असतात आपले? परंतु ती देखील तुमच्याआमच्यासारखी माणसंच असतात.. आपल्यासारख्याच भावभावना, आवडीनिवडी, रागलोभ असतात त्यांचे.. ते हिजडे कोण, कुठले, या चर्चेत मला शिरायचं नाही. ते धंदा करतात एवढं मला माहित्ये. चक्क शरीरविक्रयाचा धंदा.. पोटाची खळगी भरणे हा मुख्य उद्देश. आणि असतातच की त्यांच्याकडेही जाणारी आणि आपली वासना शांत करणारी गिहाईकं! कोण चूक, कोण बरोबर हे ठरवणारे आपण कोण?

मला सांगा – एखाद्या सिने कलाकाराने म्हणा, किंवा अन्य कुणा सेलिब्रिटीने म्हणा, दगडूशेठला किंवा लालबागच्या राजाला भेट दिल्यानंतर त्याचं होणारं आगतस्वागत आणि कामाठीपुर्‍यातल्या हिजड्यांच्या गणेशोत्सवाला तिथल्याच एका देशीदारूच्या बारच्या तात्या अभ्यंकराने भेट दिल्यावर हिजड्यांनी त्याच आपुलकीनं त्याचं केलेलं आगतस्वागत, यात डावंउजवं कसं ठरवायचं?

लौकरच एक अतिशय स्वच्छ प्लेट आली माझ्या पुढ्यात. वेफर्स, उतम मिठाई, केळी, चिकू, सफरचंद इत्यादी फळांच्या कापलेल्या फोडी, दोनचार उत्तम मावा-बर्फी, काजुकतलीचे तुकडे.. ! 

तो म्हातारा हिजडा मोठ्या आपुलकीनं आणि प्रेमानं मला म्हणाला..

“मालिक, थोडा नाष्टा करो.. “

“बादमे तुम्हे हमारा गणेशका पूजा करना है. और बादमे खाना भी खानेका.. !”

बापरे.. ! ‘मला यांच्या गणपतीची पुजा करायच्ये?’ मला काही खुलासा होईना.. ‘बघू नंतर काय होईल ते होईल, आपण आपली पुढ्यातली ही डिश खाऊन काहितरी कारण सांगून सटकू इकडनं.. ‘ अस ठरवून मी समोरच्या बर्फीचा एक तुकडा तोंडात टाकला.. सुरेखच होती बर्फी.. अगदी ताजी!

समोरच्या डिशमधलं थोडंफार खाल्लं मी. जरा वेळ तसाच तिथे बसून राहिलो. ‘आता दर्शन घ्यायचं आणि निघायचं’ असा मनाशी विचार केला आणि उठलो.. तोच तो मगासचा टकल्या हिजडा आणि इतर दोघेचौघे हिजडे पुढे सरसावले. त्यापैकी एकाच्या हातात मोठासा स्वच्छ नॅपकीन!

“आओ तात्यासेठ, अब न्हानेका और पूजा करनेका.. !”

न्हानेका और पूजा करनेका? मला काहीच समजेना. अल्लाजान होताच माझ्यासोबत. तो त्यांच्यातलाच.. त्याच्याशी बोलताना मला कळलं की आज मी त्यांचा पेश्शल पाहुणा आहे आणि मला पूजा करायच्ये किंवा सांगायच्ये!

ही कुठली पद्धत? कुणाला विचारून? मला क्षणभर काय करावं ते कळेचना! ‘सगळं झुगारून निघून जावं का इथून?’ हा विचार माझ्या मनात सारखा येत होता. पण माझ्या आजुबाजूला जमलेल्या, माझी इज्जत करणार्‍या त्या हिजड्यांच्या चेहर्‍यावर मला खूप आनंद दिसत होता, उत्साह दिसत होता..

‘देखे क्या होता है.. जो भी होगा, देख लेंगे.. ‘ या माझ्या नेहमीच्या स्वभावानुसार मी ती मंडळी म्हणतील ते करायचं ठरवलं. अधिक माहिती विचारता अल्लाजानकडून मला असं समजलं की मी एक पांढरपेशा उच्चभ्रू आहे असा त्यांचा समज आहे आणि माझ्या हातून आज त्यांच्या गणपतीची पूजा व्हावी अशी त्या मंडळातल्या हिजड्यांची इच्छा आहे आणि तशी पद्धतही आहे.. !

साला, मी एक पांढरपेशा उच्चभ्रू? जाऊ दे, तो चर्चेचा विषय आहे! झमझम बारमध्ये महिन्याकाठी सताठशे रुपये पगार मिळणारा मी उच्चभ्रू?!

— क्रमशः भाग पहिला 

लेखक : श्री तात्या अभ्यंकर 

प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ येतो… ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

??

☆ येतो…  ☆ श्री मंगेश मधुकर

आपल्याकडं “जातो” असं म्हणत नाही …. म्हणूनच “येतो” म्हटलं.

नमस्कार !! 

मी २०२४ …. निरोप घ्यायला आलोय, पुन्हा भेट नाही. आता ‘मी’ फक्त आठवणीत,

अवघ्या वर्षभराची आपली सोबत. तरीही ऋणानुबंध बनले. वर्षभरातल्या सुख-दु:ख, चांगल्या-वाईट

घटनांचा ‘मी’ साक्षीदार… 

कोणासाठी खूप आनंद, कोणासाठी अतीव दु:ख, कोणासाठी लकी तर कोणासाठी दरिद्री.

.. कोणासाठी दोन्हीही….. या निरोपाच्या वेळी हितगुज करावसं वाटलं म्हणून हा लेखन प्रपंच.

 

नवीन वर्ष सुरू होत असलं तरी आपलं आयुष्य मात्र तेच ते आहे.

नेटवर्क, टेंशन्स आणि ट्राफिक हे आता अन्न, वस्त्र, निवाऱ्या इतकेच जगण्याचा भाग आहेत.

तुम्ही म्हणाल की, , जातोयेस तर गप जा. उगीच उपदेश कशाला?’

– – बरोबर आहे. आजकाल कोणाला शिकवलेलं आवडत नाही. पुढच्यास ठेच अन मागचा शहाणा या म्हणीला आता काही अर्थ उरलेला नाहीये….. सगळं कळत असूनही लोकं ठेचा खातात. त्याच त्याच चुका करतात. काही वेळीच शहाणे होतात. अनेकजण दुर्लक्ष करतात… पुन्हा पुन्हा ठेचकळत राहतात.

असो..

 

अनुभवावरुन सांगतो, आज जगण्यातल्या वाटा निसरड्या आहेत. आयुष्य असुरक्षित झालयं.

कधी, कुठं, काय होईल याचा नेम नाही. व्यवहाराला अतोनात महत्व आल्यानं, प्रेम, आपुलकी यावर ‘तात्पुरतेपणाचा’ गंज चढलाय. सर्व काही असूनही अस्वस्थता आहे. माणसं एकटी आहेत….

जो तो आपापल्या कोषात राहतोय. नात्यातलं अंतर वाढतयं. गॅझेटस कितीही अडव्हान्स झाली तरी भावनिक आधार देत नाही. मायेचा, विश्वासाचा, प्रेमाच्या स्पर्शासाठी माणसाचीच गरज पडते.

– – नेमकं हेच विसरलं गेलंय.

 

 

एक विनंती,

माझ्याकडं नको असलेल्या, बिनकामाच्या वस्तूंचे भलं मोठं गाठोडं आहे…..

तुम्ही वर्षानुवर्षे सांभाळलेले, अपमान, राग, द्वेष, मत्सर, असूया, अहंकार, ईगो, मीपणा.. त्या गाठोड्यात टाका. मी सगळं घेऊन जातो. मनावरचा ताण हलका होईल. प्रसन्न वाटेल.

 

 

अजून एक,

नवीन वर्षात संकल्प वैगरेच्या भागडीत पडू नका.

जे येईल त्याला सामोरे जा. तुमच्यामुळे जर कोणी आनंदी होत असेल तर तुमच्याइतका श्रीमंत दुसरा नाही.

ही संधी सोडू नका कारण आनंद वाटला की वाढतो……

2025 मध्ये तुमचा आनंद सदैव वाढता राहो हीच शुभेच्छा !!

“येतो…”

तुमचाच,

२०२४ 

(ता. क. ते गाठोडयाचं लक्षात ठेवा.) 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘रामरसाची महती…’ – ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘रामरसाची महती…’ – ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव

नमस्कार मंडळी ! 

सर्वप्रथम आपण सर्वांना नववर्षाच्या आरोग्यवर्धिनी शुभेच्छा!

सरत्या वर्षाच्या निरोपाचे आणि नववर्षाच्या स्वागताचे कार्यक्रम अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपले आहेत ! तेव्हां मी देखील आपल्या दवा-खान्याच्या मार्गावर असतांनाच आडमार्गावरील एक वेगळी मार्गिका शोधायचं ठरवलं. नवविचारांची नौका दोलायमान स्थितीत असतांनाच केबीसीचा एक भाग अचानक नजरेसमोर आला. बालकदिनानिमित्य बालकांतीलच (यांची अचाट बुद्धी बघतांना ‘बाळबुद्धी’ हा शब्द अगदीच ‘आऊट ऑफ सिल्याबस’ वाटत होता!) एका बाळराजाचे किचनमधील कवतिक बघतांना त्याच्या इच्छेखातर त्याचे दैवत असलेले साक्षात रसोईकिंग संजीव कपूर त्याच्या भेटीस ऑनलाईन स्क्रीनवर अवतरले. या बाळाने त्यांना जो प्रश्न विचारला तो किचनमध्ये प्रथम प्रवेश करणाऱ्या तमाम नुकत्याच लगीन झालेल्या नवख्या महाराण्यांना पडत असतो. त्याने कपूर महाशयांना विचारले, “एखाद्या पदार्थात स्वादानुसार मीठ घालणे म्हणजे नेमके किती?” हा यक्षप्रश्न मला माझ्या किचनच्या प्रारंभिक कारकिर्दीत हैराण करीत असे. ‘चमचा’ नामक वस्तूचे परिमाण (पदार्थ खारट होण्याचे परिणाम भोगल्यानंतर) या बाबतीत कुचकामी आहे हे लक्षात आले. याचे विश्लेषण करतांना मला एक विनोद म्हणून कुणीतरी छापलेला सिरीयस मुद्दा आठवला.

….. मैत्रांनो, डॉक्टर पेशंटला एका गोळीचा डोस समजावून सांगतोय. “एक एक गोळी दिवसाला दोन वेळा अशी १० दिवस घ्यायची. ” 

हा संदेश ऐकल्यावर वेगवेगळ्या पेशंटची तीन प्रकारची प्रतिक्रिया (मन की बातच्या रूपात) असते.

नंबर एक- “आता हे असे १० दिवस गुंतून राहण्यापेक्षा एक गोळी दिवसाला ४ वेळा घेऊन ५ दिवसात ही कटकट संपवतो”

नंबर दोन- “याला माझ्या शरीराचे प्रॉब्लेम काय कळणार? या गोळ्या लय गरम असतात. मी आपला दिवसाला एकच गोळी घेणार. “

नंबर तीन- “डॉक्टरांनी सांगितलंय ते लक्षात ठेवणे माझे काम आहे. पूर्ण डोज व्यवस्थित घेईन तेव्हांच पूर्णपणे वेळेत बरा होईन”

(आपणच ठरवा, आपण कुठल्या क्रमांकावर असावे! हे उदाहरण औषधांच्या बाबतीत दिले. मला औषधे सोडून इतर कांही दिसत नाही हे माझ्या व्यवसायाचे हे साईड इफेक्ट समजा मंडळी!)

आता सांगा, दोन वेळचे मीठ (रामरस) एकाच वेळच्या भाजीत घातले तर? किंवा एक चिमूटभर टाकायचे ते अर्धी चिमूट टाकले तर? एक वेळ भाजी अळणी असेल तर वरून मीठ घ्यायची सोय आहे, पण खारट भाजी असेल तर? अथवा गॅसच्या दोन शेगड्यांवर दोन जणांच्या फर्माईशनुसार वेगवेगळ्या भाज्या शिजवतांना एका भाजीत डबल मीठ अन दुसऱ्या भाजीत कांहीच नाही असे झाले तर? (हे अनुभव गाठीशी आहेत म्हणून तर उदाहरण देतेय!) मंडळी, ‘अळणी भाजी’ रांधणारी दुसरी तिसरी कुणी नसून अजरामर झालेली ‘शामची आई’ आठवतेय कां? बरं, इंग्रजीत देखील उदाहरण आहे ते प्रसिद्ध साहित्यिक शेक्सपियर यांच्या जगप्रसिद्ध नाटकातील किंग लियरच्या धाकट्या कन्येचे. बापाला अळणी जेवण खायला देत ती “बाबा, माझे तुमच्यावर मिठाइतकेच प्रेम आहे!” असे सांगत स्वतःचे अनन्यसाधारण प्रेम पटवून देते.

आपण दर नववर्षी कांही संकल्पना मनाशी ठरवतो. (कांही मंडळी त्याच संकल्पना दर वर्षी राबवतात!) वरील मॅटर वाचून आपल्याला याची जाणीव झाली असेलच की प्रमाणबद्ध शरीरासारखेच प्रमाणशीर मीठ आपल्या आरोग्यासाठी अतिशय मोलाचे आहे. त्यासाठी ‘एक चुटकीभर नमक की कीमत’ आपण नव्याने करावी असे नाही. स्वातंत्र्यलढ्याचा मानबिंदू असलेला जाज्वल्य ‘मीठ सत्याग्रह’ आपल्याला माहीत आहेच. मिठाचा अतिरेक उच्च रक्तदाब, हृदयविकार, मूत्रपिंडाचे विकार, आम्ल-आम्लारि असमतोल, शरीरावरील सूज इत्यादी विकारांना जन्म देतो. मैत्रांनो, आपल्या रोजच्या भाजीतील मिठाव्यतिरिक्त लोणची, पापड, चटण्या, विविध जंक फूड, प्रक्रिया केलेले पदार्थ इत्यादीत मिठाचे प्रमाण जास्त असते, कारण इथे ते पदार्थाचे संरक्षक कवच म्हणून उपयोगात आणल्या जाते. याखेरीज पानाच्या डाव्या बाजूला शुद्ध मीठ वाढण्याची परंपरा आहे. या सर्वांतील मिठाचे प्रमाण कमी करता येईल कां? याचा विचार नव्या वर्षाच्या संकल्पनेत जोडावा असे मी आपण सर्वांना आवाहन करते.

घरच्या गृहिणीच्या हातात पाळण्याची दोरी असतेच, पण त्याशिवाय घरच्या मंडळींकरता सकस आणि पौष्टिक अन्न रांधायची देखील महत्वाची जबाबदारी असते. तिने मनांत आणले तर अतिरिक्त मीठ सेवन करण्याला बऱ्याच अंशी आळा बसू शकतो. मिठाचे प्रमाण ‘उलीसे’ कमी झाल्यावर घरची मंडळी प्रारंभी कुरकुरत पण नंतर त्याचीच सवय लागून कमी मिठाचे जेवण खायला लागतील. पानाच्या डावीकडील अधिक मीठ असणारे पदार्थ देखील कमीत कमी खावेत. मिठाचा संपूर्ण त्याग करण्याचे कुणीही मनांत आणू नये. त्याचे देखील वाईट परिणाम होतात. कारण शरीरातील पेशींच्या कार्यात मिठाचे कार्य मोलाचे आहे. म्हणूनच या मिठाला संतमंडळी ‘रामरस’ असे संबोधतात. किती सुंदर कल्पना आहे ही! जसे रामरसाशिवाय जेवण रसहीन आहे तसेच रामनामाविना जीवन देखील रसहीन आहे हा त्यातील संदेश आहे.

निर्जलीकरण (डिहायड्रेशन) करता ओ. आर. एस अत्यंत उपयोगी आहे, परंतु ते लगेच उपलब्ध नसेल तर जागतिक आरोग्य संघटनेने सोपा फॉर्म्युला दिला आहे. घरगुती मीठ ३/४ चमचा, खाण्याचा सोडा १ चमचा, एका संत्र्याचा रस (नसल्यास कोणतेही लिंबूवर्गीय फळ) हे सर्व एक लिटर (उकळून घेऊन थंड केलेल्या) पाण्यात मिसळून बाधित व्यक्तीला द्यावे. प्राकृतिकरित्या आपल्याला क्षार आणि आम्ल पुरवणारे नारळ पाणी तर खरेखुरे अमृततुल्य ऊर्जावर्धक द्रव. आमच्या लहानपणी आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत नागपूरला घरापासून जवळपास १. ५ मैल दूर अशा निसर्गरम्य अंबाझरी तलावाच्या काठच्या बागेत फिरायला पहाटे पहाटे जात असू. परत येतांना रस्त्याच्या किनारी माठात संचय केलेली अगदी स्वस्त अशी थंडगार ‘नीरा’ विकणारी माणसे भेटायची. आमच्यासारख्या कित्येक थकल्या भागल्या जीवांसाठी ती कूल कूल नीरा पिण्याचे परमसुख कांही वेगळेच असायचे. (‘नीर’ आणि ‘नीरा’ या शब्दांत किंचितच फरक असला तरी त्यांचे घटक वेगळे आहेत. ) ही ‘नीरा’ पहाटेच प्यावी कारण सूर्यप्रकाशाद्वारे नीरेचे रूपांतर ताडीत होते. कुठल्याशा प्रक्रियेद्वारे असा बदल टाळल्या जाऊ शकतो असे वाचल्याचे स्मरते. हे मात्र नक्की की आरोग्यदायी घटकांचा विचार केल्यास बहुगुणी नीरा नारळ पाण्यापेक्षा उजवी आहे.

नीरेसंबंधी आपल्याला अभिमानास्पद अशी माहिती देते. आपल्या देशातील प्रथम स्त्री जीवरसायनशास्त्रज्ञ डॉ. कमलाबाई सोहोनी (१८ जून १९११ – २८ जून १९९८) या भारतातील पहिल्या विद्यावाचस्पती (पीएच. डी. ) पदवीधारक शास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध पावल्या. त्यांनी १९३७ साली मुंबई येथून एम. एससी आणि इंग्लंडच्या प्रसिद्ध केंब्रिज विद्यापीठातून १९३९ साली पीएच. डी केले. त्यांच्या संशोधनाचा आवाका खूप मोठा आहे. आपल्या देशातील कित्येक अन्नघटकांच्या विस्तृत संशोधनासोबतच त्यांनी ‘नीरा या उत्कृष्ट पेयातील उपयुक्त घटक आणि त्यांचे माणसांवर परिणाम’ याचे संशोधन केले. भारताचे तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या सूचनेवरून कमला यांनी ‘नीरा’ (ताडीच्या विविध प्रजातींच्या फुलांपासून काढलेला रस) या पेयावर काम सुरू केले. त्यांना या पेयामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि लोहाचे लक्षणीय प्रमाण आढळले. यानंतर याच संशोधन क्षेत्र पुढे जाऊन केलेल्या विस्तृत अभ्यासातून त्यांना असे दिसून आले की कुपोषित किशोरवयीन मुले आणि आदिवासी भागातील गर्भवती महिलांच्या आहारात नीराचा समावेश स्वस्त पूरक आहार म्हणून केल्याने त्यांच्या आरोग्यात लक्षणीय सुधारणा झाली. याकरता त्यांना त्या वर्षीच्या सर्वोत्कृष्ट संशोधनाचे राष्ट्रपती पारितोषिक मिळाले. अशा या ‘नीरेची’ मला कधी तरी सय येते. पण आजकाल ती सहजासहजी दिसत नाही. मात्र त्यासाठी सूर्योदयापूर्वीचे फिरस्ते असणे आवश्यक! 

प्रिय मैत्रांनो, मी मागील वर्षाच्या डायरीतील पूर्वीच्या संकल्पांची पाने ओलांडून नवे ऊर्जावर्धक संकल्प लिहिण्यास प्रारंभ केलाय, अन तुम्ही?

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ प्रियतमा – लेखिका –  डॉ तारा भवाळकर ☆ संकलन – सौ.मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

? वाचताना वेचलेले ?

☆ प्रियतमा – लेखिका –  डॉ तारा भवाळकर ☆ संकलन – सौ.मंजिरी येडूरकर ☆

गडकर्‍यांच्या अंतर्मनाला ज्या प्रियतमेची ओढ आहे, ती प्रिया उत्कट प्रियकराचे रूप घेऊन कवितेत येते आणि तिचेच दुसरे रूप नाटकातून समर्पित पतिव्रता म्हणून सामोरे येते. मात्र नाटकात पतिव्रतेचे रूप अवतरत असता पिढ्यान् पिढ्या घडलेला समाज मनाच्या मान्या- मान्यतेचा संस्कार नकळत त्यावर होतो. तिचा गाभा मात्र ‘माझ्याच साठी तू’ असलेल्या आंतरिक ओढीचा असतो. ‘माझ्याचसाठी तू’ या ओढीला मिळते जुळते असे समाज मान्य रूप पतिव्रतेच्या धारणेत प्रतिबिंबित होते, पण त्याच वेळेला ‘तुझ्याचसाठी मी’ ( स्त्रीसाठी असलेला पुरुष) हरवलेला असतो. पतिव्रतेच्या संकल्पनेत तो बसतच नाही, कारण ‘तो ‘कसाही असला तरी ‘ति’ची निष्ठा अव्यभिचारिणी असावी, अशीच तिथे अपेक्षा असते. म्हणून नाटकातून दिसणारी स्त्रीची पतिव्रता ही प्रतिमा या कलावंताच्या मनातील स्त्री-पुरुष प्रीतीच्या आदर्शाचा एक अद्वितीय अंशच आहे.

तात्पर्य, राम गणेश गडकरी या कलावंताच्या मनात ‘तुझ्याचसाठी मी आणि माझ्याचसाठी तू’ अशी आदर्श प्रीतीची एक पूर्ण प्रतिमा आहे. प्रत्यक्षात ती मूर्त व्हावी, ही ओढ आहे. परस्परांसाठीच असलेले आपण – मी आणि तू आदिम ओढीतून एकत्र येणार. तिथे वैश्विक कामभावही सनातन ओढीतूनच येणार, म्हणून चुंबनालिंगनाची महापूजा तिथे अपरिहार्य आहे. प्रत्यक्षात ही आस अधुरीच राहते. त्यामुळे कवितेत ‘तुझ्यासाठी मी’ हा त्या ओढीचा अर्धा भाग कलारूप घेऊन येतो, तर ‘माझ्यासाठी तू’ हा दुसरा अर्धा भाग नाटकातल्या पतिव्रतेच्या रूपात अवतरतो. स्वप्न आणि सत्य यांची सरमिसळ होत होत असे व्यामिश्र रूप त्याच्या कलाकृतीला येते. ‘ईड’ची आदीम प्रेरणा आणि ‘इगो’ (संस्कारीत मन) ची त्याच्यावर कुरघोडी ही तर मानवी मनाची सततच ओढाताण असते. कलावंताच्या कलाकृतीत ती व्यक्त होताना निरनिराळे विभ्रम करते. त्याच्या मनाचे खंडितत्त्व इथे- तिथे विखुरले जाते. वरवर पाहता त्याच्या खंडित व्यक्तिमत्त्वाचे (स्प्लिट पर्सनॅलिटी चे) हे अविष्कार असंबद्ध, परस्पर विसंगत, परस्परविरोधी वाटतात. पण त्यांच्यातही एक आंतरिक सुसंगती असते. त्याच्या खंडित मनाचे तुकड्या तुकड्यांनी होणारे हे अविष्कार माणूस म्हणून जगताना त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे एका परीने सलगपण टिकवीत असतात, त्यात सुसंगती आणीत असतात.

कलाकृती ही कलावंताच्या मनाची स्वप्नपूर्तीच असते. अपुऱ्या इच्छांना जसा स्वप्नातून पूर्णत्व देण्याचा प्रयत्न अभावितपणे होत असतो, तसेच कलावंताच्या आंतरमनाचे स्वप्न त्याच्या कलाकृतीत पूर्ण होते. स्वप्नांचा अर्थ लावणे दुर्घटच असते. कारण ती वर वर पाहता विस्कळीत असतात कारण ती अनेकदा प्रतीकेच असतात. तीच गोष्ट कलावंताच्या कलाकृतीची. कलेचा मूर्त अविष्कार म्हणजे कलावंताचे सुप्त मनच! मूर्ततेतून अमूर्ताचा शोध घेण्याचा प्रयत्न म्हणजे समोर असलेल्या कलाकृतीतून कलावंताच्या मनाचे आदिरूप शोधण्याचा प्रयत्न असतो.

नाटककार राम गणेश गडकरी आणि कवी गोविंदाग्रज यांच्या कलाकृतींतून अनुक्रमे नाटकातून आणि कवितेतून जी स्त्री रूपे प्रकट झाली आहेत, त्यांचे स्वरूप सकृत्

दर्शनी परस्पर विरोधी असले तरी त्याच्यामागचे कलावंताचे मन मात्र आपल्या सर्व कलाकृतींतून एक ‘संवाद ‘ साधण्याचा प्रयत्न करते. हा ‘संवाद’ अनेक अर्थांनी संवाद आहे. रसिक आणि कलावंत यांच्यामधला जसा हा संवाद आहे, तसाच एकाच कलावंताने अंगिकारलेल्या निरनिराळ्या वाङ्मय प्रकारातल्या अविष्कारातलाही हा संवाद आहे आणि कलावंताच्या मनाची प्राकृतिक ओढ आणि परिसरजन्य वास्तव यांच्या विरोधी ताणांतूनही संवाद साधण्याचा हा प्रयत्न आहे. कलावंत अर्थातच हे सगळे जाणून बुजून, समजून उमजून घडवीत नाही. आपातत: ते तसे घडत जाते. गडकर्‍यांच्या नाटक- कवितेतून ते आपातत: घडले आहे. त्याचा शोध घेण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे, इतकेच!

नाटककार राम गणेश गडकरी, कवी गोविंदाग्रज आणि विनोदकार बाळकराम या त्रिविध भूमिकांतून स्वतःला अविष्कृत करणाऱ्या या असाधारण प्रतिभेच्या कलावंतांचे मन स्वभावतः स्त्री पुजकाचे मन होते. प्रियतमेच्या ओढीने झपाटलेले, व्याकुळलेले मन होते, याचा प्रत्यय प्रत्येक प्रेमधर्मी संवेदनशील वाचकाला सहज यावा, एवढी ती ओढ अनावर पणे प्रकट झालेली आहे. या प्रत्ययाला अडसर ठरणारा वाचकांचा पूर्वग्रह दूर करण्यासाठीच माझा हा शब्द प्रपंच आहे.

‘प्रियतमा’ वरून

संकलन – मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ताराबाई नावाचं लोकगारूड… ☆ श्री महेश कराडकर ☆

श्री महेश कराडकर

?  विविधा ?

☆ ताराबाई नावाचं लोकगारूड… ☆ श्री महेश कराडकर ☆

कपाळावर भलं मोठं कुंकू. रेखीव चेहरा. त्यावर पेरलेलं एक मार्दवशील, कणखरपणाची झाक असलेलं आणि सौम्य असं हसू. आवाज हळुवार पण भाषा ठाम. संवाद म्हणजे एकाच वेळी समोरच्यांशी आणि त्यांनी जाणिवेने अभ्यासलेल्या जोपासलेल्या लोकसंस्कृतीच्या संदर्भांशी चाललेलं ऐकतच राहावं असं हितगुज. अनेक विचार प्रवाह, चळवळी, मत-मतांतरं यामध्ये भांबावून गेलेल्या आजच्या आमच्या पिढीला कुठलाही अट्टाहास न करता विवेकवाद पेरणार सांगणं. त्यांच्या साधेपणात, त्यांच्या व्यासंगात, त्यांच्या ठामपणात, त्यांच्या सहवासात भेटणार्‍या प्रत्येकाला एक वेगळीच अनुभूती येते. हजारो वर्षं सोसत आलेल्या स्त्रीमनाचं सुसंस्कृत, तितकच पुरोगामी आणि प्रगल्भ अशा विचारांचं अलौकिक शिल्पच जिवंत झाल्याची ती अनुभूती असते. त्यातही दुधात साखर मिसळावी तशी सर्वांच्या हृदयात आपलं आईपण जिव्हाळ्यानं नोंदवणारी आपुलकीही असते.

… बाईंबद्दल असा विचार करायची फुरसत कधीच मिळाली नाही. जशी आपल्याला आईबद्दल विचार करायला सवड नसते, तशी! इतका जवळचा त्यांचा सहवास त्यांच्या शेजारी म्हणजे एक घर पलीकडेच राहत असल्याने मला गेली ३५-४० वर्ष मिळालाय… आणि माझ्या इतकाच तो साहित्य, नाटक, लोककला, शिक्षण, प्रबोधन अशा अनेक क्षेत्रात चळवळेपणानं काम करत असलेल्या आजूबाजूच्याच नव्हे, तर कोसो योजने दूर असणाऱ्या अनेक सृजनशील स्नेहीजनांनाही त्यांनी जाणीवा जपत दिला आहे.

मराठी मुलखातूनच नव्हे तर राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पातळीवरून सांगलीत येणारी अशी ही मंडळी पंढरपुरात पांडुरंगाच्या दर्शनाला एखाद्या वारकऱ्यांनं ज्या श्रद्धा भावनेनं जावं; त्या आचेनंच नाट्यपंढरी, सहकारपंढरी, संगीतपंढरी, आरोग्यपंढरी अशा अनेक नामाभिदानांनी सालंकृत झालेल्या सांगली मिरजेत आली, की डॉ. तारा भवाळकरांना भेटायला हमखास येतात. अशी माणसे कधी सांगून येतात. तर कधी अगंतुकपणे येतात. तेव्हा त्यांची ओळख करून देण्यासाठी… त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी बाईंचा हमखास,

‘लगेच ये!’, म्हणून मला आणि माझ्या पत्नीला आशाला एक घर पलीकडून फोन येतो. आणि आपलं गणगोत भेटल्याचा पुनःप्रत्यय आपलेपणानं समृद्ध करून जातो.

लोकसाहित्य आणि लोकसंस्कृती यांचा आयुष्यभर मागोवा घेत आलेल्या बाईंच्या साहित्य क्षेत्रातील अनमोल कामगिरीची दखल आजवर अनेक संस्थांनी घेतली आहे. मात्र त्यांना अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद मिळावं असं गेली अनेक वर्ष मराठी साहित्यप्रेमींना आवर्जून वाटत आलेलं आहे.

परवा मराठी भाषेचं आणि तिच्या भाषाभगिनींचं विश्व व्यापणाऱ्या; कर्मयोगाने सांगलीच्या, जन्मानं नाशिकच्या आणि बालपण व किशोरवयातील वास्तव्याने काही काळासाठी पुण्याच्या असलेल्या ताराबाईंना ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद मिळालं. आणि अवघं मराठमोळं जग हरखून गेले. गेला आठवडाभर त्यांचा मोबाईल, घरातला फोन शुभेच्छांचा फुलगंध घेऊन आनंद आणि उत्साहाने अविरतपणे खणखणतो आहे. साहित्य-संस्कृतीच्या क्षेत्रातील दिग्गज मंडळी आणि कार्यकर्त्यांबरोबरच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री, विधानसभेच्या अध्यक्षा, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, विविध प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, विविध क्षेत्रातील संघटना व संस्थांतील माणसांची त्यांच्या छोट्याशा निवासस्थानी रीघ लागलेली आहे.

सतत गजबजलेल्या डॉ. आंबेडकर रोडवरच्या ताराबाईंच्या घरासमोर २५-३० छोट्यामोठ्या व्यावसायिकांच्या दुकानांची एक रांग आहे. या व्यावसायिक मित्रांना देखील ताराबाई अखिल भारतीय संमेलनाच्या अध्यक्ष झाल्या या गोष्टीचा आनंद झाला. या साध्यासुध्या माणसांनीदेखील त्यांना भेटून त्यांचं अभिनंदन केलं. हे मराठी भाषेवरचं त्यांचं प्रेम खरंतर मराठीला अभिजाततेचा दर्जा देण्याइतकंच मोलाचं नाही काय?

 

© श्री महेश कराडकर

मो. ९४२३०३६००७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ लोक यात्री – तारा भवाळकर… ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

?  विविधा ?

लोक यात्री – तारा भवाळकर ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

यावत् जीवेत् तावत् शिक्षेत |

या वचनाला खरा अर्थ देणाऱ्या, तारा भवाळकर, मराठीतील ख्यातनाम लेखिका!लोकसाहित्यापासून नाट्यशास्त्रापर्यंतचा सेतुवेधक संदर्भकोश, मार्क्सवाद ते गांधीवाद यांच्या सूक्ष्म अभ्यासक, भारतीय संस्कृती पासून आधुनिक स्त्रीवादी चळवळीच्या नामवंत अभ्यासक, मराठीच्या ख्यातनाम प्राध्यापिका, कसदार वक्त्या अशी त्यांची विविध अंगी ओळख महाराष्ट्राला आहे.

तारा भवाळकर यांना स्त्री रचित लोकसाहित्यात करुणेने वेदनेत आयुष्य कंठणारी स्त्री दिसली तर जात्यावरच्या ओव्यातून विद्रोह करणारी, स्पष्ट मत मांडणारी स्त्री दिसली. त्या अभ्यासातून त्यांनी एक कार्यक्रम ‘एक ओवी, एक कथा, एक प्रथा ‘ असा सादर केला आहे. ही तेरा भागांची मालिका यू ट्यूब वर उपलब्ध आहे. त्यांच्या ओघवत्या शैलीत त्या आपल्याला एक ओवी सांगतात आणि मग त्या ओवीमागे एक कथा असते ती सांगतात. त्या कथेच्या अनुषंगाने कोणत्या प्रथा निर्माण झाल्या असतील त्यांचेही त्या अंदाज बांधतात. त्यामुळे कोणत्या मानसिकतेतून ती ओवी रचली गेली असेल याचेही रसभरीत वर्णन ऐकायला मिळते. त्या म्हणतात “ओवी ही पोटातून येते कारण ते सुखदुःखाचे गाणे असते. ओवी हे शुद्ध काव्य आहे. ते कधी रूपकाच्या माध्यमातून तर कधी इतर माध्यमातून येते. विद्रोही ओव्या, बंडखोर ओव्या यांच्या बरोबर सामान्य स्त्रीच्या ओव्यात घरच्यांचे, सगळ्या नात्यांचे कौतुक असते, श्रमाची प्रतिष्ठा असते, माहेरच्या आठवणी असतात. ” या कथांमधून, ओव्यांमधून समाजशास्त्र, मानव वंश शास्त्र, संस्कृतीकरण व काळानुसार संस्कृतीत होणारे बदल या सगळ्याचा अभ्यास करण्याची त्यांची पद्धत आपल्यालाही विचार प्रवृत्त करणारी आहे.

त्यापैकी काही ओव्या व त्यांच्या कथा व प्रथा यांचा उहापोह करण्याचा माझा हा अल्पसा प्रयत्न आहे.

कारंडे यल्लुबई एका पुरुषाची करी नारी

तुझे सत्व मला दाव, माझं संकट तुझ्यावरी

स्त्री प्रधान संस्कृतीत देवतांचे प्रस्थ असल्यामुळे त्यांची देवळे होती. पण शेजारी पुरुष सहचर नव्हता. देवीची उपासना करायची असेल तर पुरुषाला स्त्री रूप घेऊन यावे लागे. यातूनच पोतराजाची प्रथा सुरू झाली. त्या देवता पुरुष देवांचा उपयोग फक्त अपत्य प्राप्ती पुरताच करून घेत. यातून निर्माण झालेली प्रथा म्हणजेच श्री तिरुपती कडून दर वर्षी कोल्हापूरच्या अंबाबाईला साडी येणे. अर्थात हळू हळू जशी पुरुष प्रधान संस्कृती निर्माण झाली तसे प्रथांमध्ये सुद्धा बदल होत गेले.

जन्मामाजी जन्म केळी बाईचा चांगला

भरतारावाचून गर्भ नारीला राहिला

किंवा

श्रेष्ठ पतिव्रता केळी बाई म्हणू तुला

विना भोग गर्भ मरणाचा ग सोहळा

यामध्ये एक विरोबाची कथा आहे, ज्याचीआई सुरवंता वारुळतून जन्माला आली. तिने शंकराची आराधना करून पुरूषाविना विरोबा या पुत्राला जन्म दिला. यातूनच कालांतराने पतिव्रता या प्रथेचा जन्म झाला. पुरुष अनेक स्त्रियांशी संबंध ठेवू शकतो पण स्त्री मात्र अगदी विधवा झाली तरी दुसऱ्या पुरुषाचा विचार सुध्दा मनात आणू शकत नाही. याची कथा म्हणजे रेणुकेची कथा आहे. यक्ष युगुलाच्या जलक्रीडा पाहून तिचे मन विचलित झाले. त्याची शिक्षा म्हणून परशुरामांनी तिचा शिरच्छेद केला. नंतर तिला जमदग्नी ऋषिनी पुन्हा जिवंत केले पण मातंगिणीचे शिर देऊन. त्यामुळे रेणुका मातंगिण देवता झाली. यातूनच देवाच्या नावाने वेश्या व्यवसाय करणाऱ्या सुमंगलांचा जन्म झाला. मग ही,

घरची अस्तुरी जसा कर्दळीचा गाभा

पराया नारीसाठी चोर गल्लीमध्ये उभा

ओवी जन्माला आली.

रुक्मिणी रुसली गेली दिंडिर बनाला

अबीर बुक्क्याची गर्दी तिला सोसना

किंवा

दळता दळता म्हाळसा दमली, म्हणून देवाने बाणाईला आणली

किंवा

 रुसली रुक्मिणी, ती कां दिंडीर बना गेली

राधा – कृष्णाच्या मांडीवर तिने मंदिर देखली

 अशा विठ्ठलाशी संबंधित ओव्या आहेत. देवाने कितीही स्त्रियांना आसरा दिला तरी त्याचं देवत्व कमी होणार नाही याची काळजी घेणाऱ्या गोष्टी आहेत. त्यातली एक वृंदेची. ही विवाहित असूनही देव तिचा स्विकार करतो. पण लोकांनी केलेल्या आरोपांमुळे तिने धरणीचा आश्रय घेतला. ते पाहून देव धावले, तिला बाहेर काढण्याच्या प्रयत्नात तिचे फक्त केस हातात आले. हीच तुळस, देवाला प्रिय असणारी. त्यामुळे वारकरी डोक्यावर तुळस घेऊन विठ्ठला कडे जातात. तसेच तुळशीचे

लग्न देवाशी लावतात. या प्रथा निर्माण झाल्या. विठ्ठलाच्या कपाळावर पिंड आहे, त्यामुळे तो शैवांचा देव आहे, तो विष्णूचा अवतार मानला गेला त्यामुळे वैष्णवांचा ही आहे. असे हरिहर विठ्ठलामध्ये आहेत.

अशा अनेक ओव्या, कथा व प्रथा आपल्याला या तेरा भागांमध्ये ऐकायला मिळतात. गोष्ट सांगणे ही सुध्दा एक कला आहे. ती तारा भवाळकर यांना चांगली अवगत आहे. गोष्ट सांगताना त्या त्यातले बारकावे सांगतात. अशा प्रथा का पडल्या, याचे विवेचन ही करतात. संस्कृतीत कसे बदल होत गेले, स्त्री प्रधान संस्कृती मधून पुरुष प्रधान संस्कृती कशी जन्माला आली, हे ही जाताजाता स्पष्ट करतात. ओघवती भाषा, प्रत्येक गोष्टीला दाखले देण्याची सवय, गोष्ट ज्या काळातील आहे, त्या काळाचे, परिसराचे, सामाजिक परिस्थितीचे, स्त्रियांच्या भूमिकेचे स्पष्टीकरण यामुळे प्रत्येक भाग श्रवणीय झाला आहे.

बघा, तुम्हीही ऐका. ज्ञान व मनोरंजन दोन्हींचा मिलाफ असणारा मेवा आहे.

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “सर, एक अवघड काम आहे…” ☆ श्री संजय जगन्नाथ पाटील ☆

श्री संजय जगन्नाथ पाटील 

??

“सर, एक अवघड काम आहे… ☆ श्री संजय जगन्नाथ पाटील 

“सर, एक अवघड काम आहे.. “

तरुण भारत चे ज्येष्ठ पत्रकार शिवराज काटकर यांचा फोन..

म्हटलं.. ” काय झालं ? “

” कृष्णाकाठ दिवाळी अंकासाठी तारा भवाळकर यांचा लेख हवाय.. त्यांच्यापुढं जायची भीती वाटते.. दडपण येतं.. जरा मिळवून द्या की तेवढा लेख.. “

शिवराजचा स्वतःचा दिवाळी अंक आहे कृष्णाकाठ नावाचा..

ही घटना सहा सात वर्षांपूर्वीची..

(हा फोटो.. सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित झालेल्या मायवाटेचा मागोवा.. या सिरीयलच्या रेकॉर्डिंग वेळचा.)

वयोमानानुसार ताराबाईंना लिहीताना त्रास होतो. त्यामुळं त्या लिहिण्याचं काही अंगावर घेत नाहीत हे ठाऊक होतं.. त्या काळात लिहिणं आणि प्रकृती मुळं बाहेरचे कार्यक्रम घेणं त्यांनी बऱ्यापैकी कमी केलेलं..

मग हे लेखाचं जमावं तरी कसं.. ?

प्रयत्न करून बघतो म्हणालो..

पण फारशी आशा नव्हती..

ताराबाईंशी बोललो.. अशानअसं म्हणून सांगितलं..

” सगळं तुझं ठीक रे.. पण मला आता सलग लिहिणं जमत नाही.. हात भरून येतात.. “

बाईंचं खरंच होतं..

लोकसाहित्यावर निगुतीनं काम करणाऱ्या सरोजिनीआक्का बाबर आणि तारा भवाळकर यांच्या विषयी मला आदरयुक्त गुढ आकर्षण होतंच.. सरोजिनी आक्कांचं लोक वाङ्मयाचं प्रचंड संकलन, त्यावरचं कृष्णामाईच्या तीरावरच्या तोंड भरून बोलल्या जाणाऱ्या साजीवंत शैलीतलं स्मरण रंजनात्मक लेखन.. याची भुरळ पहिल्यापासून..

तर याबरोबरच लोकसाहित्याची सूत्रबद्धपणे मांडणी करून लोक संस्कृतीचे अंतर्गत अदृश्य ताणेबाणे दागिन्यांच्या घडणावळीप्रमाणे उलगडून वस्तूनिष्ठपणे समोर मांडणाऱ्या लखलखीत ताराबाई..

या ना त्या अर्थानं दोघीही सांगलीच्याच..

इथल्या मातीचा गुण त्यांच्या अंगी भिनलेला.. अगदी ऐसपैस.. दोघीही लोक साहित्याच्या प्रांतातल्या जुळ्या बहिणीच…

कोणत्याही निमित्तानं त्यांच्याशी बोलणं हा साक्षात्काराचाच योग…

बोलणं म्हणण्यापेक्षा त्यांचं ऐकणं हेच अचंबित करणारं… ओघंवतं आणि रसाळ.. विषयाचे पापुद्रे अलगद उलगडत आतल्या गाभ्या पर्यंत कसे पोहोचलो ते ऐकणाऱ्याला समजणार सुद्धा नाही..

मी आकाशवाणीतून स्वेच्छा निवृत्ती घेऊन बाहेर पडल्यावर एक छोटा रेकॉर्डर विकत घेतलेला.. त्याला माईक जोडून थोडंसं जुगाड करून आवडीचं काही दिसलं की रेकॉर्डिंग करायचो.. तशी ही जुळणी होतीच.. मी ताराबाईंना सुचवलं.. “तुम्ही बोलत रहा.. विषयानुरूप.. मी त्याचं ध्वनिमुद्रण करून घेतो.. ते ऐकून नंतर लिहून काढू..”

हा उपाय त्यांना आवडला..

सीतेसंबंधीच्या निरनिराळ्या प्रांतातल्या काही पारंपारिक रचनांचा मागोवा घेत सजग नितळ तर्काधिष्टित सम्यक नजरेने सितेकडं पाहूया असं त्यांचं म्हणणं पडलं..

ही आमच्या रेकॉर्डिंग ची पहिली सुरुवात..

ताराबाई, मी आणि शिवराज..

हा लेख दिवाळी अंकात छापून आला.. पुढं ताराबाईंना वाटू लागलं की या लेखातून व्यक्त झालंय त्याहूनही बरंच काही सांगता येण्यासारखं शिल्लक आहे.. तत्पूर्वी त्यांनी या विषयावर थोडं फार कुठंकुठं लिहिलंही होतं..

म्हटलं आहे डोकीत तर जसं जमेल तसं ध्वनिमुद्रण करत राहू..

मग पुढचं ध्वनिमुद्रण ठरलं.. पुढच्या एक दोन रेकॉर्डिंग ला आम्ही दोघंच.. त्या बोलायच्या आणि मी ऐकत बसायचो..

अधिकाधिक सहजता येण्यासाठी ताराबाईंच्या साहित्यावर प्रेम करणाऱ्या काही मंडळींना बोलावून त्यांच्यासमोर सीता अख्यान लावलं तर आणखी मजा येईल असं वाटत होतं.. कारण समोर श्रोते असले की बाई अधिक खुलतात हे ठाऊक होतं..

मंडळी जमत गेली.. सगळ्यांचीच विषयातली गोडी वाढत गेली.. प्रा. अविनाश सप्रे, प्रतिमा सप्रे, नीलम माणगावे, आशा कराडकर, उज्वला परांजपे, प्रतिभा जगदाळे, सुनीता बोर्डे असा दरबारच भरू लागला, सीता समजून घेण्यासाठी…. एक वेगळाच भारून जाण्यासारखा माहोल तयार झालेला.. ध्वनिमुद्रण झालं की नंतर या विषयावर सगळ्यांच्या चर्चा रंगायच्या.. शंका निघायच्या आणि बाई उत्तरं द्यायच्या.. पुण्याच्या प्रतिभा गुडी यांनी संपूर्ण ध्वनिमुद्रण ऐकून त्याची संहिता तयार केली..

आज ते पुस्तक ‘सीतायन ; वेदना विद्रोहाचे रसायन.. ‘ या नावानं प्रकाशित झालंय.. सध्या हे बहुचर्चित पुस्तक जाणकारांच्या नजरेत आहे..

ताराबाईंनी मनोगतात लिहिलंय…

” कोरोना महासाथीच्या जागतिक आणि अनेकांच्या आयुष्यातील वैयक्तिक पडझडीच्या काळानंतर लगेच सीतायनातील प्रमुख कथाकथन मी सर्वांसमोर केलं होतं.. या सर्जक कामामुळे आम्ही सगळे सावरलो.. विशेषतः मला आयुष्याच्या उत्तरायणात या सीतायनाने खूप आधार दिला… “

या ध्वनीमुद्रणाच्या निमित्तानं सगळे एका प्रचंड ताणातून मोकळे झाले.. सीतेच्या वेदनांच्या कहाण्या ऐकताना आमची दुःखं छोटी वाटू लागली..

हे ध्वनिमुद्रण झालं आणि पुन्हा पूर्ववत पोकळी जाणवू लागली.. ताराबाई सतत अभ्यासात मग्न असल्या आणि त्यांच्या मेंदूत सतत काही उलथापालथ चालू असेल तर त्या ठणठणीत असतात हे आम्हाला जाणवलेलं.. त्यातूनच त्यांना रिकामं ठेवायचं नाही हे ठरवून वेगवेगळे विषय त्यांच्यासमोर काढत गेलो.. त्यातून बरीच ध्वनीमुद्रणं झाली..

जुन्या तरी नव्या कथा’ या नावानं त्यांनी काही कथा कथन केल्या.. जुन्यापुराण्या सांगीवांगीच्या कथांना नव्या आशयानं अभिव्यक्त करण्याचा एक वेगळा प्रयत्न त्यांनी केला.. त्याचंही पुस्तक झालं.. नंतर, “एक ओवी, एक कथा, एक प्रथा “ या नावानं बरंच ध्वनिमुद्रण केलं.. पारंपरिक ओवीच्या अनुषंगानं त्याच्या मागचं कथासूत्र शोधणं आणि इथल्या परंपरेचे त्यांचे अंत:संबंध उलगडणं असा एक वेगळाच आकृतीबंध ताराबाईंनी शोधला.. हा एक वेगळाच प्रयोग होता.. यात गीत होतं, कथा होती आणि सजगपणे सर्जकतेनं बुद्धीनिष्ठपणे या गोष्टीकडं पाहण्याची एक दृष्टी होती..

आकाशवाणी सांगलीनं ताराबाईंची पूर्वी एक प्रदीर्घ मुलाखत घेतली होती.. त्यांचा लोकसाहित्याचं संशोधन, त्यांनी लिहिलेल्या कथा, अनुवाद, एकांकिका आणि नाटक याचं लेखन, नाट्यविषयक लेखन असे बाईंचे अनेक अभ्यासाचे विषय आहेत.. त्याच धर्तीवर या सर्व अभ्यासाची एक सारभूत मुलाखत ध्वनिमुद्रित करायची तयारी केली.. अविनाश सप्रे यांनी त्यांची मुलाखत घेतली.. जवळजवळ सात ते आठ तासाचं अभ्यासपूर्ण ध्वनिमुद्रण हाताला लागलं.. यावेळी सदानंद कदम या प्रक्रियेत सामील झाला.. त्याने याची व्हिडिओ केली.. या अभ्यासपूर्ण मुलाखतीचं पुस्तक लवकरच आता भेटीला येईल..

नंतरच्या काळातील ताराबाईंचे वेगवेगळ्या विषयांवरचे लेख, त्यांनी इतरांच्या पुस्तकांना दिलेल्या प्रस्तावना, परिसंवाद, विविध विषयांवरचं त्यांचं लेखन, भाषणं, मनोगतं असं अनेक प्रकारचं मौलिक ध्वनिमुद्रण जमत गेलं.. सोयीसाठी ते सदानंदकडं एकत्रित ठेवलं आहे…

साधारण तीन साडेतीन वर्षांपूर्वी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या कल्पक कार्यक्रम अधिकारी उमा दीक्षित यांची आकाशवाणीकडून दूरदर्शनकडे बदली झाली.. उमा दिक्षित यांनी त्याआधी आकाशवाणी मुंबईसाठी ताराबाईंची तीन भागात मुलाखत घेतलेली.. त्यावेळी त्यांचा माझा परिचय गडद झालेला..

दूरदर्शन आणि आकाशवाणीचं खातं एक असलं तरी माध्यम नवं..

दूरदर्शनला आल्याआल्या एखादा मोठा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरुवातीलाच हाती घ्यावा असं उमा ताईंच्या संवादातून ठरलं.. पाऊल धाडसाचं होतं.. त्याचाच एक भाग म्हणून तेरा भागात लोक साहित्य संबंधातली ताराबाईंची समग्र मुलाखत घ्यायचं ठरलं.. अडीच तीन महिने या विषयावर चर्चा झाल्या.. विषय ठरले.. मुकुंद कुळे यांनी मुलाखत घ्यावी असा विचार केलेला.. माय वाटेचा मागोवा’ ही अभ्यासपूर्ण मालिका दूरदर्शन साठी रेकॉर्ड झाली.. बाई अखंडपणे रोज पाच पाच सहा सहा तास हातात कागदाचा चिटोराही न घेता बोलत राहिल्या.. हे विस्मयकारक होतं.. ताराबाईंच्या जीवनभरातल्या अभ्यासाचा प्रदीर्घ अनुभव चित्रीत झाला.. एक महत्त्वाचा दस्तऐवजच दूरदर्शनच्या प्रयत्नानं आकाराला आला.. लोकसहित्याचं सगळं संचित दृकश्राव्य माध्यमात जपलं गेलं.. त्यासाठी उमा दिक्षित यांची संपूर्ण टीम सांगली जवळच्या बुरुंगवाडी या गावात पाच दिवसाच्या मुक्कामाला आली.. तिथल्या निसर्गरम्य परिसरात रमली. बुरुंगवाडी चे विजय जाधव आणि ग्रामस्थांचं लाख मोलाचं सहकार्य लाभलं.. अगदी कमी वेळात अथक प्रयत्न करत मोलाचं काम केलं गेलं.. लोक संस्कृतीच्या अभ्यासातलं सार लोकांसाठी, पुढच्या पिढींसाठी टिपून ठेवलं गेलं..

बघता बघता, आज जवळजवळ 40 ते 50 जीबी इतका डाटा तोही mp3 ऑडिओ फॉर्मेट मध्ये आमच्याकडे संकलित झाला आहे.. बाकी इतर माध्यमांकडं असलेला संग्रह वेगळाच..

कृष्णाकाठ मधल्या एका लेखासाठी हा छोटा प्रवाह उगम पावला.. हळूहळू या कामाचं स्वरूप इतकं वाढत जाईल असं वाटलं ही नव्हतं..

ताराबाईंच्या या प्रचंड अभ्यासानं त्यांच्या कार्यानं दिपून जायला होतं.. 85 वय होऊन गेलं तरी अजूनही त्या नव्या उमेदीनं कार्यमग्न असतात.. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निमित्तानं चक्रधर ज्ञानेश्वर तुकाराम, सगन, होनाजी, पठ्ठे बापूराव, ते वाडीवस्तीतल्या, तुमच्या माझ्या घराघरातल्या माय माऊलींच्या तोंडची लोकभाषा त्यांनी मराठी सरस्वताच्या मखरात मानानं मिरवली आहे.. असंच काहीसं वाटतं आहे.

आपणाला त्या सोबत घेत आहेत यानंच हुरळून जायला होतं…

****

© श्री संजय जगन्नाथ पाटील
9422374848

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्नेह ताराबाईंचा… ☆ सुश्री उमा वि. कुलकर्णी ☆

सुश्री उमा वि. कुलकर्णी

??

स्नेह ताराबाईंचा… ☆ सुश्री उमा वि. कुलकर्णी 

बर्‍याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे. सुमारे तीसपेक्षा जास्त वर्षं झाली असतील. त्या वेळी नियमीतपणे रेडिओ ऐकला जायचा. तसा रेडीओ ऐकत असताना वेगळ्या विषयावरचं ते व्याख्यान ऐकलं. लोकसाहित्यातून दिसणार्‍या स्त्री-मनाचा आढावा घेणारं ते व्याख्यान होतं. त्यावेळी व्याख्यानातून काही लोकगीतांचेही संदर्भ सांगितले गेले होते. संपूर्ण भाषण लक्ष देऊन ऐकल्यावर व्याख्यातीचं नावही समजलं, सांगलीच्या प्रा. तारा भवाळकर. त्या संपूर्ण संदर्भानिशी ते नाव तेव्हा डोक्यात पक्कं कोरलं गेलं. कायमचं.

याच सुमारास कमल देसाई यांच्याशी ओळख झाली आणि बघता बघता स्नेह वाढला. कधीतरी त्यांच्या तोंडून ताराबाईंचा `तारी.. ‘ असा उल्लेख ऐकला होता, पण तेव्हाही त्यांच्याशी कधीकाळी मैत्री होईल असं वाटलं नव्हतं.

पुढे एका व्याख्यानाच्या निमित्तानं सांगलीला जायचा प्रसंग आला. कदाचित तेव्हा माझं नाव ताराबाईंनी सुचवलं असावं. तेव्हा ताराबाईंची प्रत्यक्ष भेट झाली. त्यांच्या घरी गेले. तिथे उषाताईही भेटल्या. ताराबाई काही वेळासाठी कॉलेजमध्ये गेल्या होत्या. तेव्हा उषाताईंची सैपाकघरात काम करायची पद्धत आणि त्यांचा कामाचा उरकही पाहिला. कमलताईंकडून नावं ऐकल्यामुळे मला तरी काहीही अवघडल्यासारखं वाटलं नाही. ही लक्षात राहाण्यासारखी पहिली भेट होती.

अतिशय तरतरीत आणि भरपूर उंचीचं हे व्यक्तीमत्व तेव्हा कायमचं नजरेत आणि मनात भरलं. त्यांचं रंगभूमीशी असलेलं नातं त्या वेळी तरी मला माहीत नव्हतं. पण त्यांचं व्यक्तीमत्व मात्र ठसठशीत असल्याचं त्याच वेळी जाणवलं होतं.

तेव्हा ताराबाई अजूनही नोकरीत होत्या. बहुधा तेव्हा त्या प्रिन्सिपॉलही होत्या. नोकरीतली शेवटची काही वर्षं राहिल्याचं त्यांनी सांगितल्याचंही आठवतं. त्यामुळे त्यांचा तिथला तरी वेळ अतिशय महत्वाचा होता. पण तरीही वेळ काढून मी पुण्याला निघायच्या वेळी त्या घरी आल्या, स्टँडपर्यंत पोचवायला आल्या आणि, अजूनही आठवतं, त्यांनी खास सांगलीचे पेढेही आणून दिले होते (हे त्यांचं आतिथ्य अजूनही कायम आहे). त्याच वेळी त्यांनी अतितच्या बसस्टँडवर मिळणार्‍या खास भजी आणि बटाटेवड्यांविषयीही सांगितलं होतं. त्या क्षणी मला त्यांच्या त्या जिंदादिलाचं अपरुप वाटलं होतं. त्यांची आज्ञा पाळून परतीच्या प्रवासात मीही ते विकत घेऊन चवीनं खाल्ले होते.

कमल देसाईशी आमचं नातं आणि स्नेहही जुळला होता. दत्ता देसाई हा तर विरूपाक्षांचा सख्खा आतेभाऊ. त्याच्याकडूनही ताराबाईंचं नाव ऐकलं होतं. कमलताईंची भावंडं मिरज-सांगलीत असल्यामुळे त्या दोघींचा खूप पूर्वीपासून स्नेह होता. एकमेकीला `तारी.. ‘- `कमळी.. ‘ म्हणण्याइतकी जवळीक होती. कमलताई जेव्हा पुण्यात असत तेव्हा सांगलीच्या आठवणी निघाल्या की त्यात ताराबाईंची आठवण निश्चितच असे. त्यामुळे ताराबाईंच्या भेटी वरचेवर होत नसल्या तरी नाव सतत परिचयाचं होऊन राहिलं होतं.

नंतरच्या एकदोन भेटी कमलताईंमुळे झालेल्या आठवतात. त्याहीवेळी ताराबाईंकडून पेढे न चुकता मिळायचेच. कमलताईंचा पंचाहत्तराव्वा वाढदिवस सांगलीकरांनी मोठ्या थाटात साजरा केला होता. मुंबई-पुणे-बेळगाव आणि इतर गावांमधून कमलताईंचे चाहते आले होते. विद्या बाळ, सुमित्रा भावे, पुष्पा भावे, अशोक शहाणे असे मोठमोठे लेखक-विचारवंत त्यासाठी हजर होते. त्या सगळ्यांशी आस्थेनं वावरणार्‍या ताराबाई मला आजही आठवतात.

त्या नंतरही कुठल्याही निमित्तानं सांगलीला गेले तरी ताराबाईंची भेटही ठरलेलीच. एक मात्र मला आठवतंय तसं कमलताईंच्या वाढदिवसांनंतर आमच्यामधला औपचारिकतेचा बुरखा गळून पडला आणि नात्यात मोकळेपणा आला.

कमलताई वारल्या, आणि मी आणि ताराबाई जास्त जवळ आलो. त्याच सुमारास फोन करणंही सुकर होत चाललं. बोलायला मुबलक विषयही मिळत गेले. लोकसाहित्य हा माझ्याही आस्थेचा विषय होता आणि आहे. तसंच कर्नाटक आणि कन्नड संस्कृतीविषयी ताराबाईंनाही आस्था असल्यामुळे विषयांना अजिबात वानवा नव्हती. त्यांनी लोकसाहित्याच्या निमित्तानं संबंधित कर्नाटक पालथा घातलेला असल्यामुळे आमच्या गप्पा कधीच एका बाजूनं राहिल्या नाहीत. माझं कुतुहल, त्यातून निघालेले प्रश्न आणि ताराबाईंचा व्यासंग यामुळे गप्पांना रंगत जायला वेळ लागााायचा नाही. मला काही कन्नड लोककथा आढळल्या की मी त्यांना हमखास फोन करे. त्याही तशाच प्रकारची मराठीत एखादी कथा माहीत असेल तर सांगत. ऐकताना मात्र एखाद्या लहान मुलीचं कुतुहल त्यांच्यामध्ये असे.

अनेकदा गिरीश कार्नाडांच्या नाटकांमागील लोककथेवरून विषय सुरू होई आणि भारतभरच्या तशा प्रकारचा धांडोळा घेण्यात अक्षरश: तासच्या तास निघून जात. तसंच चंद्रशेखर कंबारांच्या जोकुमारस्वामी सारख्या नाटकाचा विषय निघाला तर त्या ती प्रथा मानणार्‍या काहीजणींना भेटून, त्याचा आणखी तपशिल गोळा करून मला सुपूर्द करत. त्यातूनच त्यांची `जोकुमारस्वामी’ या नाटकाची प्रस्तावना तयार झाली.

डॉ तारा बाई व सुश्री उमा कुलकर्णी

ताराबाईंचा सांगलीकरांनी केलेला वाढदिवस मला आजही आठवतो. ज्या स्नेहभावानं सगळ्यानी कार्यक्रम योजला होता, साजरा केला होता त्यातून त्यांचं ममत्व स्पष्ट दिसत होतं. पुण्यासारख्या गावात माझं साहित्यजीवन गेल्यामुळे मला तेव्हा त्याचं खूपच अपरूप वाटलं होतं. त्याच बरोबर ताराबाईंनी संपूर्ण गावातल्या जीवनाशी कसं स्वत:ला आत्मियतेनं जोडून घेतलंय हेही जाणवलं होतं. ते मी सार्वजनिकरित्या त्या वेळी बोलूनही दाखवलं होतं.

आता ताराबाईंची अखिल भारतीय मराठी साहित्य संम्मेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यावर या परिसरात जो आनंदाचा जल्लोष उसळला, त्याचं मला अजिबात नवल वाटत नाही.

या कार्यक्रमात सहभागी करून घेताना त्यांनी माझ्याविषयी जो विश्वास आणि स्नेह दाखवला, त्याला मी लायक होते की नाही, या विषयी मी तेव्हाही साशंक होते, आताही आहे.

असाच संकोच वाटण्यासारखा आणखी एक प्रसंग ताराबाईंनी आमच्यावर आणला. एका कार्यक्रमासाठी आम्ही दोघेही सांगलीला गेलो असताना तिथल्या आकाशवाणीवर `आर्काईज’साठी त्यांनी आम्हा दोघांची, म्हणजे मी आणि विरुपाक्ष, मुलाखत घेतली. मुलाखत खूपच मोठी होती. विरूपाक्षांचा पंचाहत्तरावा वाढदिवस होता तेव्हा त्यांनी `साधना’च्या विनोद शिरसाटांशी बोलून त्या आठवड्याच्या अंकात प्रकाशित केली आणि आम्हाला आनंदाचा धक्काच दिला. पुढे तीच मुलाखत एका ग्रंथात रा. चिं. ढेरें, कमलताई आणि त्या स्वत: यांच्या मुलाखतीच्या सोबत प्रकाशितही केली! एवढ्या मोठ्या संशोधकांच्या मांदियाळीत समाविष्ट व्हायची आमची खरोखरच लायकी आहे काय, हा प्रश्न मला तेव्हाही पडला होता आणि आजही पडतो.

०००

कोरोना आला आणि आम्हा दोघींच्याही जीवनात उलथापालथ करून गेला. सुपारे पन्नास वर्षांच्या सहवासानंतर उषाताईं कोरोनामध्ये वारल्या. त्यांच्या जाण्यानं ताराबाईंच्या जीवनातही एक मोठी पोकळी निर्माण झाली होती. सांगलीतला त्यांचा मित्रपरिवार त्यांची मोठ्या प्रमाणात काळजी घेत असला तरी काही व्याकूळ क्षण पेलण्यासाठी आम्हा दोघींनाही एकमेकीची गरज लागत होती. त्यामुळे निरुद्देश आणि काहीही कारण नसताना केवळ भावनिक विसाव्यासाठी अक्षरश: केव्हाही एकमेकींना फोन करणं सुरू झालं. त्या वेळी तर रात्री अकरा-बारा वाजताही आम्ही एकमेकीना फोन करत एकमेकीना आधार देत-घेत होतो. या वेळी सामोर्‍या येणार्‍या विविध व्यावहारीक आणि मानसिक अडचणींविषयी आम्ही सतत बोलत होतो. त्या नाशिकला गेल्या तरी आमच्या बोलण्यात खंड पडत नव्हता. अशाच मनस्थितीत एकदा आमची सांगलीला त्यांच्या घरीही भेट झाली. तेव्हाची गळाभेट दोघींनाही शांतवणारी होती.  

ताराबाईंच्या पुण्यातल्या कार्यक्रमांना न चुकता हजेरी लावणे ही माझ्या दृष्टीनं पर्वणीच होती. मग पुणे विद्यापिठाचा असो, साहित्य अकादमीचा असो किंवा महाराष्ट्र फौंडेशनचा मोठा पुरस्कार-समारंभ असो. आधी किंवा नंतर त्यांना भेटून विशेष गप्पा मारणं ही दोघींच्या दृष्टीनंही पर्वणीच! अशाच गप्पांमधून त्यांच्या हरीवंशराय बच्चन यांच्या `मधुशाला’च्या अनुवादाची माहिती कळाली. पाठोपाठ त्यांनी अनेक अनुवाद म्हणूनही दाखवले.

करोनाच्या काळात त्या काही कथांचं रेकॉर्डिंग करून पाठवायच्या. त्यातल्या काही कथा इतक्या उत्तम होत्या की मी त्यांना लिहिलं, `तुम्ही उत्तम कथाकार आहात. तुम्हाला केवळ लोककथाच्या अभ्यासक या सदरात का टाकलं जातं? मला तर काही कथा अनंतमूर्तींच्या तोडीच्या वाटतात.. ‘

त्यांचं `सीतायन’ आलं. त्या सुमारास त्या पुण्यात माझ्याकडे होत्या. पुस्तकाचा झालेला आनंद व्यक्त करण्यासाठी आम्ही एक छोटा कार्यक्रम केला. माझ्या घरासमोर राहाणार्‍या रवी परांजपे यांच्या घरासमोरच्या जागेत कार्यक्रम घ्यायला स्मिताताई परांजपेंनी परवानगी दिली आणि मुकुंद कुळे यांनी ताराबाईंची मुलाखत घेतली. अत्यल्प वेळात केलेल्या पब्लिसिटीला प्रतिसाद देत बरीच माणसे जमली आणि सगळ्यांनीच त्या मुलाखतीचा आनंद घेतला. मुलाखत आवडल्याचे नंतरही कितीतरी दिवस फोन येत होते.

इथे माझं एक निरिक्षण मला नोंदवलंच पाहिजे. साहित्य-जीवनात आम्हाला बर्‍याच जणांचा स्नेह मिळाला. त्यातल्या प्रत्येकाची विचारधारा वेगवेगळी होती. सगळेच एकमेकाच्या विचारधारेचा सन्मान करत असल्यामुळे, कुणाचाही कल कुठेही असला तरी आम्ही कडवे बनलो नाही. विविध विचारप्रवाह समजून घेऊन समृद्ध होत जायचं, या आमच्या मानसिकतेला कुणीच अटकाव केला नाही. उलट ती ती विचारधारा सामावून घेत आम्हाला अधिकाधिक श्रीमंत करत गेले.

त्यातलंच एक महत्वाचं नाव तारा भवाळकर हे आहे. मग त्यांचं ऋण नको का मानायला?

००००० 

© सुश्री उमा वि. कुलकर्णी 

मो. ९४२३५७२५५०

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ नवी ओळख…. ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

? इंद्रधनुष्य ?

☆ नवी ओळख…. ☆ श्री अरविंद लिमये 

कार्य’ आणि कर्तृत्त्व या दोन्ही शब्दांचा अतिशय सार्थ मिलाफ असलेलं एक उत्साही आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्व’ ही आमच्या पहिल्या भेटीतच माझ्या मनात निर्माण झालेली ज्यांची प्रतिमा पुढे त्यांच्याच या कार्यकर्तृत्त्वाची प्रत्येकवेळी नव्याने ओळख होत गेली तसतशी अधिकच ठळक होत गेली त्या डाॅ. तारा भवाळकर म्हणजे माझ्यासारख्या साहित्यप्रेमींसाठी एक आदर्श व्यक्तिमत्त्व आहेत!

आज त्यांच्याबद्दल लिहिताना त्यांना मिळालेल्या विविध पुरस्कार आणि मानसन्मानांचा उल्लेख मला आवर्जून करावासा वाटला तरीही त्यांना मिळालेले हे यश, ही प्रतिष्ठा, हा अधिकार हे कोणत्याही फलाची अपेक्षा न करता एका आंतरिक ओढीने त्यांनी केलेल्या शोध वाटेवरील अथक प्रवासाची परिणती आहे हे आवर्जून सांगावेसे वाटते. मला उत्सुकता असायची ती त्यांना हे कां करावेसे वाटले असेल, त्यांनी ते कसे केले असेल याची. माझ्या मनातली ही उत्सुकता कांही प्रमाणात शमलीय ती त्यांच्याच मुलाखती आणि विविध व्यासपीठावरील त्यांची भाषणे व प्रासंगिक लेखन यातून ऐकायवाचायल्या मिळालेल्या त्या संदर्भातल्या अनेक घटना प्रसंगांच्या उल्लेखांमुळे! हे सगळे उल्लेख त्यांनी सहज बोलण्याच्या ओघात केलेले असले तरी तेच माझ्या मनातल्या प्रश्नांना परस्पर उत्तरे देऊन जायचे आणि तीच प्रत्येकवेळी मला होत गेलेली त्यांची ‘नवी ओळख’ असायची!

दिल्ली येथे फेब्रुवारी-२०२५ मधे संपन्न होणाऱ्या ‘९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची झालेली निवड आणि अलिकडेच त्यांना मिळालेला ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार’ या दोन घटनांमुळे त्यांचे कार्य आणि कर्तृत्त्व नव्याने प्रकाशझोतात आलेले आहे. हा खऱ्या अर्थाने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचाच सन्मान आहे! याबद्दलची त्यांच्या मनातली भावना समजून घेतली कीं त्यांच्याबद्दलचा आदर अधिकच दृढ होतो !

‘माझे अध्यापन क्षेत्र, मी केलेले संशोधन यात माझ्या आधी आणि नंतरही अनेकजणांनी भरीव कार्य केलेले आहे. कांही अजूनही करीत आहेत. मला मिळालेला आजचा हा सन्मान माझ्या एकटीचा, वैयक्तिक सन्मान नसून तो या सर्वांचाच सन्मान आहे असेच मला वाटते ‘ त्यांनी व्यक्त केलेली ही भावना त्यांच्या नम्रतेइतकीच या कामाबद्दल त्यांच्या मनात असणारी आदराची भावना व्यक्त करते तसेच या संशोधनाच्या कामांमधील व्याप्तीची त्यांना असणारी जाणिवही!

डॉ. तारा भवाळकर

डाॅ. तारा भवाळकर यांचा जन्म १ एप्रिल १९३९ चा. जन्म आणि बालपण पुणे येथे. त्यानंतर वडिलांच्या नोकरीमुळे नाशिक येथे पुढील वास्तव्य. इ. स. १९५८ मधे त्या मात्र नोकरीनिमित्ताने सांगलीस आल्या. तेव्हापासून सांगलीकर झाल्या.

‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार’ स्वीकारल्यानंतर आपलं मनोगत व्यक्त करताना त्यांनी स्वतः सांगितलं होतं की.. ‘लेखन आणि संशोधन’ क्षेत्रातील कामाबद्दल हा सन्मान मला दिला जात असला तरी माझ्या कामाची सुरुवात नाटकापासून झालेली आहे हे मला आवर्जून सांगावेसे वाटते. ‘

‘नाटकापासून झालेली सुरुवात’ नेमकी कशी हे आजच्या तरुण नाट्यकर्मींनी आवर्जून समजून घ्यावे असेच आहे.

सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध अशा नाशिकमधील वातावरणामुळे कलेची आवड त्यांच्या संस्कारक्षम मनात लहानपणापासूनच रुजलेली होती. माध्यमिक शाळेतील अध्यापनाच्या निमित्ताने सांगलीत आल्यानंतर नृत्य नाट्य गीत विषयक अविष्कार शालेय विद्यार्थिनींकडून करून घेणे, त्यांच्यासाठी छोट्या नाटिका स्वतः लिहून, त्या बसवून, त्यांचे प्रयोग सादर करणे यात त्यांचा पुढाकार असे. त्याच दरम्यान शिक्षणविषयक अभ्यासक्रमासाठी ‘मराठी रंगभूमीची/नाटकाची वाटचाल’ या विषयावर त्यांनी केलेले लघुप्रबंधात्मक लेखन हे त्यांच्या नंतरच्या नाट्यविषयक लेखन व संशोधनाच्या वाटेवरचं पहिलं पाऊल ठरणार आहे याची तेव्हा मात्र त्यांना कल्पनाही नव्हती!

इतर हौशी रंगकर्मींना एकत्र करुन या नाट्यपंढरीत त्यांनी उभे केलेले हौशी मराठी रंगभूमीसाठीचे काम आज जवळजवळ पन्नास वर्षांनंतरही आदर्शवत ठरेल असेच आहे. सर्वांना सोबत घेऊन केलेली ‘अमॅच्युअर ड्रॅमॅटीक असोसिएशन’ची स्थापना, त्या

संस्थेतर्फे सांगली व परिसरातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एकांकिका स्पर्धांचे सलग १५ वर्षे यशस्वी आयोजन, नाटक व एकांकिका लेखनास विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्याची योजना, विद्यार्थी व हौशी रंगकर्मींसाठी नाट्य विषयक शिबिरांचे आयोजन, नाटक व एकांकिकांच्या स्पर्धापरीक्षकांसाठी खास चर्चासत्रांचे आयोजन यांसारख्या उपक्रमांमधील कल्पकता, वैविध्य आणि सातत्य विशेष कौतुकास्पद आहे असे मला वाटते. हे करीत असतानाच संस्थेतील कलाकारांसाठीचा राज्य नाट्य स्पर्धेतील सातत्यपूर्ण सहभाग व यश हेही संस्थेचा नावलौकिक वाढवणारे ठरले होते.

या सर्व उपक्रमांमधे डाॅ. तारा भवाळकरांचा लेखन, दिग्दर्शन व अभिनय याद्वारे असणारा सक्रिय सहभागही महत्त्वाचा ठरला. त्यांच्या ‘माझे घरटे माझी पिले’, ‘एक होती राणी’, ‘रातराणी’ या नाटकांतील प्रमुख भूमिका अतिशय गाजल्या. आणि या भूमिकांसाठी त्यांना अभिनयाची बक्षिसेही मिळाली. ‘शांतता कोर्ट चालू आहे’ या नाटकातील ‘लिला बेणारे’च्या भूमिकेसाठी त्यांना राज्य नाट्य स्पर्धेत अभिनयाचे रौप्यपदकही मिळाले होते. १९६७ ते १९८० या दरम्यान राज्य नाट्य स्पर्धा व कामगार कल्याण मंडळाच्या नाट्यस्पर्धांसाठी त्यांनी परीक्षक म्हणूनही काम केलेले आहे. त्यांच्या लोककला व नाटक या क्षेत्रातील संशोधनात्मक कामाची सुरुवात झाली ती यानंतर! त्यांचे हौशी आणि प्रायोगिक रंगभूमीसाठीचे हे योगदान ही आजच्या पिढीतील रंगकर्मींसाठी त्यांची एक वेगळी, नवी ओळखच असेल!

लोककला, संतसाहित्य, लोकसंस्कृती यांचा अतिशय सखोल, व्यापक अभ्यास आणि संशोधन आणि त्यातून आकाराला आलेले विपुल लेखन यामुळे त्यांचे नाव प्रसिद्धीच्या झोतात आले. या संशोधनातील निष्कर्षांची अतिशय समर्पक शब्दांत स्त्रीवादी दृष्टिकोनातून केलेली मांडणी हे त्यांच्या संशोधनात्मक लेखनाचे वैशिष्ट्य ठरले. अलीकडेच प्रसिद्ध झालेले त्यांचे ‘सीतायन-वेदना आणि विद्रोहाचे रसायन’ ही साहित्यकृती या दृष्टीने आवर्जून वाचावी अशी आहे. ‘प्रियतमा’, ‘महामाया’, ‘लोकसाहित्यातील स्त्री’, ‘ स्त्रीमुक्तीचा आत्मस्वर’, ‘लोकसंचिताचे देणे’, ‘मातीची रूपे’, ‘महाक्रांतीकारक विष्णुदास भावे’, ‘संस्कृतीची शोधयात्रा’, ‘स्नेहरंग’, माझिया जातीच्या’, ‘मनातले जनात’ ही त्यांच्या साहित्यकृतींची शीर्षकेच त्यांच्या संशोधनाचे आणि लेखनाचे वेगळेपण ठळकपणे अधोरेखित करणारी आहेत.

स्वतःची अध्यापन क्षेत्रातील नोकरी सांभाळून हौशी आणि प्रायोगिक रंगभूमीवर सक्रिय असतानाच त्यांनी रंगभूमीविषयक अधिक अभ्यासाची पूर्वतयारीही सुरू केलेली होती. त्यासाठी विविध ठिकाणी स्वतः जाऊन कोकण, (दशावतार, नमन खेळ), गोवा (दशावतार व अन्य लोकाविष्कार), कर्नाटक(यक्ष गान), केरळ(कथकली) अशा त्या त्या प्रांतातील लोककलांचा त्यांनी सखोल अभ्यास केला. तंजावरच्या सरकोजी राजे यांच्या सरस्वती महाल ग्रंथालयात तंजावरी नाटकांच्या मूळ हस्तलिखितांचा तिथे महिनाभर मुक्काम करून बारकाईने अभ्यास केला आणि त्या सर्व नाटकांची अधिकृत सूची प्रथमच सिद्ध केली. विशेष म्हणजे ती सूची पुढे डाॅ. म. वा. धोंड संपादित मराठी ग्रंथकोशामधे प्रथम प्रसिद्ध झाली आणि नंतर त्यांनी तंजावरी नाटकांवर एक विस्तृत लेखही लिहून प्रसिद्ध केला.

हे नाट्य संशोधन व लेखन सुरू असतानाच मराठी रंगभूमीच्या आद्य स्त्रोतांचा संशोधनात्मक अभ्यास करीत त्या पीएचडीच्या प्रबंधाची तयारीही करीत होत्याच. त्यातून आकाराला आलेल्या ‘मराठी पौराणिक नाटकांची जडणघडण (प्रारंभ ते इ. स. १९२०) या त्यांच्या शोधनिबंधाला पुणे विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट प्रबंधासाठीचा पुरस्कारही मिळाला.

यानंतरही त्यांनी नाट्यविषयक संशोधन व समीक्षापर अनेक ग्रंथ लिहिले. त्यांना विविध पुरस्कारही मिळाले. त्या सगळ्याचा विस्तृत आढावा एका वेगळ्या स्वतंत्र प्रदीर्घ लेखाचाच विषय आहे!

त्यांनी केलेले हे सर्व संशोधनात्मक कार्य कोणत्याही सरकारी अनुदानासाठी स्वत:चा मौल्यवान वेळ व शक्ती वाया न घालवता स्वत:ची पदरमोड करुन केलेले आहे हे मला आवर्जून नमूद करावेसे वाटते. आजच्या काळात तरी नि:स्पृहतेचे असे उदाहरण दुर्मिळच म्हणायला हवे. डाॅ. तारा भवाळकरांच्या व्यक्तिमत्त्वाचा हा अनोखा पैलू ही त्यांची एक वेगळी ओळख ठरावी!

अगदी बालवयातही साध्या साध्या गोष्टीसुध्दा सहजपणे न स्वीकारता मनात आलेले ‘का?, कशासाठी?’ असे प्रश्न सातत्याने विचारीत त्या घरातील मोठ्या माणसांना भंडावून सोडत असत. त्यांच्या पुढच्या वाटचालीतही प्रत्येक बाबतीतले त्यांच्या मनातले ‘कां?आणि कशासाठी?’ हे प्रश्न सतत स्वत:लाच विचारत स्वतःच त्यांची उत्तरेही शोधत राहिल्या. या शोधातूनच आकाराला येत गेलेलं त्याचं प्रचंड कार्य आणि त्यातून सिध्द झालेलं त्यांचं कर्तृत्त्व हीच त्यांची नवी ओळख विविध सन्मानांनी आज अलंकृत होत त्यांचा सक्रिय वानप्रस्थ खऱ्या अर्थाने कृतार्थ करीत आहे!!

© श्री अरविंद लिमये

सांगली

मो ९८२३७३८२८८

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नवं वर्ष -नवी स्वप्नं ☆ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

?  विविधा ?

☆ नवं वर्ष -नवी स्वप्नं ☆ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) 

— वा-यानं फडफडणार कॅलेंडर वार शांत होताच जरा स्थिरावल.डिसेबर २०२४

नजरेला पडल.मनांत आलं.. बघतां बघतां वर्ष सरलं कि.!

कुणा जवळच्याला निरोप द्यावा तसं मनं खंतावलं.

डोळेही ओलावले.

खरं तर कॅलेंडरच शेवटचं पानं म्हणजे नेहमीच नवीन वर्षाच्या चाहुलीचं.!

तसा नववर्षाच्या स्वागतासाठी तरुणाईचा जल्लोष सुरू झाला आहे.त्यादिवसाचे बेत उत्साहाने ठरवून झाले आहेत.

आता नवं वर्षाचे नविन कॅलेंडर भिंतीवर लागेल.तसंही

जुन्याच्या जागी नवीन येत असतंच. !. एका कॅलेंडरच जाणं आणि नव्या कॅलेंडरच येणं एवढाच,याचा सहज सोपा अन् मर्यादित अर्थ आहे का? या कॅलेंडरच्या पानांवर असलेल्या प्रत्येक तारखेसोबत,आपली गती, कार्यक्रमाच्या नोंदी जोडलेल्या आहेत.मागील वर्षाला निरोप देतांना हेही लक्षांत येत अगदीं ठरवलेल्या काही गोष्टी करायच्याच राहून गेल्यात. प्रगतीचे-समाधानाचे ,आनंदाचे जे हवेसे क्षणं मिळाले त्या बरोबरच मनं अस्वस्थ, उद्विग्न करणारे ,डोळ्यांत पाणी येणारे नकोसे क्षणंही आज आपल्या बरोबर आहेत.यातील नकोशा क्षणांच जगतांना झालेलं ओझं मागे ठेवून, आपल्याला हवं ते शुभंकर असं बरोबर घेऊयात. २४ सालचं कॅलेंडर पुन्हा एकदा चाळतांना प्रत्येक तारीख, दिवस यातून स्वतःच स्वतःला वाचूयात.रोजचं जगणं , स्पर्धा, परीक्षा यातून प्रत्येक पानाबरोबर वाटचाल करतांना,धांवतांना मुठीतली कांही स्वप्नं घरंगळून गेली असतील.तर ती, या नवीन वर्षात एक एक गोळा करुयात.काहीवेळा अगदी अनपेक्षितपणे आपलं स्वत:च असं जग,जगणं नव्या वळणावर येऊं लागलंय याचा अनुभव येतो.अशावेळी मनं असंख्य प्रश्नांत भिरभिरत असेल तर प्रश्नांचा पसारा आवरुन सकारात्मकतेने त्याकडे पाहूयात.तसेच आपल्या व समोरच्या कडून कळत न कळत झालेल्या चुका ‘ साॅरी ‘ या शब्दाने दुरावा नाहिसा करतात,याचा
प्रत्यय घेऊयात.जुन्या बरोबर नवी नाती निर्माण करुयात.

ज्यांच्यामुळे आपलं जगणं आत्तापर्यंत वळणदार, समाधानी,सुखावह झालं, त्यांच्या बद्दल वयाचा विचार नकरता कृतज्ञता व्यक्त करुयात. मनांत येत.. आता नवीन कॅलेंडर भिंतीवर लागेल अन् पहिल्या पानावरचा पहिला दिवस हा नुसता उगवणार नाही तर प्रत्येकाच्या मनांतील नव्या स्वप्नांना जागवेल. नव्या संकल्पांसाठी, नव्या उर्मीला साद देईल.!

नव्या वर्षातल पहिलं पाऊलं नव्याचा आरंभ करतांना पहिल्या दिवसालाच चिकटून राहणार नाही याची काळजी घेऊयात.मागील वर्षातील ताणे-बाणे, कडवटपणा, सारं विसरून आनंद, समाधान देत-घेत नवीन वर्षाच स्वागत करुयात. मानसिक, शारीरिक आरोग्यपूर्ण जीवन, समाधान.

यासाठी सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!💐

©  शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे.३८.

   मो.९५९५५५७९०८ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares