मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आयुष्य – एक नाटक ? .. की एक खेळ ? – भाग-२ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आयुष्य – एक नाटक ? .. की एक खेळ ? – भाग-२ ☆ डॉ अभिजीत सोनवणे

वैद्यकीय

  1. रस्त्यावरच भिक्षेकर्‍यांना वैद्यकीय सेवा देऊन त्यांच्या विविध तपासण्या करत आहोत, वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये गंभीर रुग्णांना ऍडमिट करून त्यांच्यावर उपचार करत आहोत. पाय कापणे, छातीतून/ पोटातून पाणी काढणे, डोकं फुटणे, चेहऱ्यावर ब्लेड मारून गाल कापला जाणे, डोळ्यांचे /कानाचे ऑपरेशन करणे… वगैरे वगैरे….आता याविषयी फार चर्चा करत नाही… मी याविषयी एकही फोटो कधीही शेअर केला नाही….कारण ते वाचुन, फोटो पाहून, अनेक जणांना चक्कर येते, मळमळ होते….!

—- असो, तर अशांना बरं झाल्यानंतर आपण छोटा व्यवसाय टाकून देत आहोत; अर्थातच तुमच्या मदतीतून….हा मूळ मुद्दा… !  यातून बरं झाल्यानंतर आपण अशा लोकांना त्यांच्या मूळ गावी परत पाठवतो. जाण्याचा खर्च, तसंच तिथे सुरुवातीला राहण्याचा आणि व्यवसाय सुरू करण्याचा खर्च आपण करता….आपण म्हणजे “आपण”….मी नव्हे….!!! – करता आपणच….मी फक्त “सांगकाम्या”….!!!

एखाद्याकडून घेतलेली गोष्ट, दुसरीकडे पोचवायला काय अक्कल लागते….???

  1. अपंग असणाऱ्या माझ्या एका बंधूला व्हीलचेअर हवी होती….मी मग एक मेसेज टाकला आणि 223 व्हीलचेअरच्या मला ऑफर आल्या….

एक अपंग आजी….जिचे पती अपंग होते आणि नुकतेच ते गेले, त्यांच्या स्मरणार्थ त्या आजीने मला त्या बाबांची व्हील चेअर देऊ केली…

या आजीची भावना समजून घेऊन, त्यांच्याकडून आपण व्हीलचेअर घेतली आणि इतर सर्वांना नम्रपणे सांगितले की पुढे कधी लागली तर तुमच्याकडून घेतो…

काय म्हणू मी समाजाच्या दातृत्वाला ? 

दरवेळी आम्ही समाजाच्या पायावर कपाळ टेकतो….पण तरीही ते कमीच आहे… ! 

शैक्षणिक

भीक मागणाऱ्या पालकांच्या ५२ मुलांचे आपण शैक्षणिक पालकत्व घेतलं आहे.

….मला सांगायला आनंद होतो की आपल्या सर्वांच्या मदतीमधून, ज्या मुलांचे आपण पालकत्व स्वीकारले आहे, अशी सर्व मुलं यावर्षी उत्तम गुणांनी पास झाली आहेत….मुद्दाम मी काही गुणपत्रिका इथे शेअर करत आहे,..! 

माझ्या एका मुलीला नववी मध्ये तर 92% मार्क पडले आहेत….पहिलीपासून दहावीपर्यंतची माझ्या मार्कांची टोटल केली तरी ती 92 भरत नाही….! 

(तुम्ही घरातले म्हणून सांगतोय, बाहेर कोणाला सांगू नका….अर्थात माझ्या पुस्तकात ते सर्व जाहीर झालंच आहे म्हणा….)

असो, मी जे माझ्या आयुष्यावर आणि आलेल्या अनुभवांवर पुस्तक लिहिलं आहे, त्याच्या विक्रीतून या सर्व मुलांचा शैक्षणिक खर्च भागवत आहे….! या सर्व मुलांच्या फीया जमेल तशा भरत आहोत.

आपण अनेक मंडळी भीक मागणाऱ्या मुलांना शैक्षणिक मदत व्हावी, या एकाच हेतूने, माझ्याकडून माझं पुस्तक विकत घेत आहेत; (आवडो न आवडो ) – मी आपल्यासमोर नतमस्तक आहे….! 

भीक मागणाऱ्या व्यक्तींना भीक द्यायची ? की मदत करायची ? भीक आणि मदत यात फरक काय ?  त्यांच्याशी कसं वागायचं ? बिस्किट, पाणी, अन्नदान द्यायचं का नाही ? ते खरंच गरजू आहेत की धंदा म्हणून भीक मागत आहेत… ?  गरजू आणि धंदेवाईक भीक मागणाऱ्या लोकांना आम्ही कसं ओळखायचं ? वगैरे   वगैरे याविषयी मी माझ्या पुस्तकात सविस्तर लिहिलं आहे…..

हा मेसेज सर्वदूर पोहोचावा यासाठी मी ग्रंथालयांना मोफत पुस्तक देत आहे….! 

आपल्या माहिती मधील ग्रंथालयांना जर पुस्तक हवी असतील तर मला कळवावे, मी ती मोफत स्वखर्चाने पाठवायला तयार आहे… ! 

अन्नपूर्णा

रस्त्यावर जगत असलेल्या आई बाबा, भाऊ बहिण यांना किंवा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असणाऱ्या किमान २०० गरजु गोरगरीबांना, दररोज जेवणाचे डबे हातात देत आहोत. (रस्त्यात दिसेल त्याला सरसकट डबे आम्ही वाटत नाही)

दिव्यांग कुटुंबाला आम्ही हे डबे तयार करण्याचे काम दिले आहे..It’s our win-win situationz

इकडे एका कुटुंबाला उत्पन्न मिळाले, जगण्यासाठी सहाय्य मिळाले आणि तिकडे भुकेने तडफडणाऱ्या लोकांना अन्न मिळाले.

मागच्या पंधरा दिवसांपूर्वी एक आजी भेटली….तिने हाताला धरून खाली बसवलं आणि म्हणाली माझ्याबरोबर जेव….छान चपाती होती, त्यावर हिरव्यागार मिरचीचा खर्डा आणि बाजूला लालेलाल लोणचं….सोबत थंडगार पाणी… !  जेवून तृप्त झालो….यानंतर तिने एका पूरचुंडीत बांधलेल्या….तिला कोणीतरी भिकेत दिलेल्या चकल्या मला खायला दिल्या….! 

प्रत्यक्ष अन्नपूर्णा भेटली… मी तिच्यासमोर नतमस्तक झालो… रोज अशा अन्नपूर्णा दरिद्री नारायणाच्या रूपात मला भेटतात… आणि रोज मी तृप्त होतो….

खराटा पलटण

खराटा पलटण म्हणजेच Community Cleanliness Team ! 

अंगात व्यवसाय किंवा नोकरीचे कोणतेही कौशल्य नसणाऱ्या प्रौढ / वृध्द महिलांची एक मोळी बांधून, त्यांच्याकडून पुण्यातील अस्वच्छ भाग स्वच्छ करून घेत आहोत, त्या बदल्यात त्यांना पगार किंवा किराणा माल देत आहोत.

या महिन्यातही खराटा पलटणाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी स्वच्छता केली आहे आणि त्या बदल्यात टीममधील प्रत्येकाला पंधरा दिवस पुरेल इतका कोरडा शिधा दिला आहे.

मनातलं काही – – 

  1. आजचं वर्तमानपत्र उद्या रद्दी असतं….तसंच उमेदीत असलेल्या आई-बापांना वापरून घेतलं, की त्यांची मुलंबाळ, नातवंडे, वृद्धापकाळात अशा लोकांना रद्दी समजतात आणि बाहेर फेकून देतात. माझे मित्र श्री केतन मराठे, यांच्या लहान मुलाने घरोघरी फिरून रद्दी गोळा केली आणि त्याचे 1400 रुपये आले, ते त्याने मला दिले.

… रद्दी झालेल्या लोकांसाठी, रद्दी विकून निधी गोळा करणे हा योगायोग म्हणू ?  की श्री मराठे यांनी त्यांच्या मुलावर केलेला संस्कार म्हणू ?? की इतका लहान मुलगा आता खूप मोठा झाला आहे असं म्हणू… ???

  1. कोणीही प्लास्टिक बॅग वापरू नये, त्याऐवजी कापडी पिशव्या वापराव्या, यासाठी मी आणि माझे भिक्षेकरी लोक आम्ही प्रयत्न करत आहोत.

यासाठी पुणेरी टोमण्यांचे बोर्ड तयार केले आहेत. आम्ही आमच्या भिक्षेकर्‍यांच्या गळ्यात ते अडकवणार आहोत….. प्लास्टिक पिशव्या वापरू नये, कपडे पिशव्या वापरा असा गमतीशीर, पुणेरी सल्ला माझे हे लोक समाजाला देतील.

याच सोबत ज्यांच्या अंगात शिवणकला आहे, अशा सर्व लोकांना नवीन शिलाई मशीन घेऊन दिली आहे. पूर्वी भीक मागणाऱ्या अशा लोकांकडून आपण पिशव्या शिवून घेणार आहोत. जे लोक कापडी पिशव्या शिवतील किंवा विकतील अशा सर्वांना आपण दिलेल्या निधीमधून आपण पगार देणार आहोत.

स्वार्थातून परमार्थ….!!! 

जे लोक पिशव्या शिवतील त्यांना त्या दिवसाचा पगार मिळेल, जे लोक पिशव्या विकतील त्यांनाही त्या दिवसाचा पगार मिळेल आणि त्याहून सर्वात महत्त्वाचं म्हणजे हळूहळू का होईना, परंतु प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी होईल आणि त्या जागी त्यांच्या हातात कापडी पिशव्या असतील…

तथाकथित भिक मागणारे लोक समाजाला प्लास्टिकच्या पिशव्या वापरू नका म्हणतील….कापडी पिशव्यांचा प्रसार करतील….पुढील पिढी वाचवण्याचा प्रयत्न करतील जगातील आपला हा पहिला प्रकल्प असेल… ! 

पुणेरी टोमण्यांचे बोर्ड मी आपल्या माहितीसाठी मुद्दाम पाठवले आहेत.

  1. मागच्या आठवड्यात एक मुलगी भेटली, जवळ येऊन लाजत म्हणाली, सर माझं लग्न ठरलंय….पोरगा तुमच्या वळकीचाच हाय… इतकं म्हणूस्तोवर पोरगा पुढे आला… या दोघांनाही पूर्वी आपण व्यवसाय टाकून दिला होता.

..छुपे रुस्तम म्हणत मी दोघांच्याही गालावर चापटी मारली. तितक्यात मुलगी म्हणाली, ‘सर सोलापूरला आमच्या मूळ गावात लग्न ठीवलंय, इतक्या लांब तुमी येणार नाही माहित आहे, म्हणून आहेर घेऊन आलोय… !’ यानंतर अक्षरशः टॉवेल, टोपी आणि पॅन्ट पीस असा भररस्त्यात मला त्यांनी आहेर केला. अशा आहेराला “भर आहेर” का म्हणत असावेत हे आज मला कळलं.

मला खूप आनंद झाला….तरी मी रागावून त्यांना म्हटलं हा असला फालतू खर्च करायचा कशाला….? 

यावरती रडत पायाशी बिलगत ती म्हणाली, ‘सर तुमाला तर म्हाईत आहे, मला वडील नाहीत, वडिल म्हणून पयला आहेर तुमाला….! 

……यार, पोरी कधी मोठ्या होतात बापाला कळत नाही….कळतच नाही राव….! 

लेख खूपच लांबलाय….! मी तर काय करू ? सासरहून मुलगी जेव्हा माहेरी येते त्यावेळी, आई बापाला काय सांगू आणि काय नको ? असं होतं….आज माझं सुद्धा तसंच झालंय… ! 

तुम्हीच माझे आई आणि बाप आहात….आता तुमच्याजवळ मन नको मोकळं करू….तर आणखी कुणा जवळ करू….? 

प्रणाम  !!!

– समाप्त – 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ उगवत्या सूर्याचे तेज लाभलेला वैराग्यवान योद्धा ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ उगवत्या सूर्याचे तेज लाभलेला वैराग्यवान योद्धा ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

 

लेफ्ट्नंट जनरल हनुतसिंग साहेब!

धर्मासाठी संसाराचा त्याग केलेल्या बैराग्यांनी धर्मासाठी, मातृभूमीसाठी शस्त्रे हाती घेऊन प्रसंगी प्राणांची बलिदाने दिल्याची उदाहरणे आपल्या इतिहासात निश्चितपणे आढळतात. नजीकच्या इतिहासात डोकावू जाता एकाच लढाईत थोड्याथोडक्या नव्हे तर तब्बल दोन हजार साधुंनी लढता लढता प्राणार्पण केल्याची नोंद आहे.

राजस्थानात चौदाव्या शतकात एक विवाहीत संतयोद्धा होऊन गेले….रावल मल्लिनाथ त्यांचे नाव. यांच्याच वंशात विसाव्या शतकात त्यांच्यासम कीर्ती प्राप्त करणारे एक योद्धे जन्मले. सैनिकी जीवनात युद्धभूमीवर आणि आध्यात्मिक जीवनात एक कठोर वैराग्यवान संत म्हणून त्यांची कामगिरी अजोड म्हणावी अशीच आहे. त्यांचं नाव होतं हनुत. हनुत म्हणजे उगवत्या सूर्यासमान तेजस्वी! हेच आपले लेफ्टनंट जनरल हनुतसिंग राठौर साहेब. १९७१ मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धातले एक महानायक.

लेफ्टनंट कर्नल अर्जुनसिंग यांच्या पोटी ६ जुलै, १९३३ रोजी जन्म घेतलेल्या हनुत सिंग यांनी वडीलांच्या पावलावर पाऊल टाकत १९५२ मध्ये भारतीय सैन्याच्या १७, हॉर्स अर्थात पुना हॉर्स रेजिमेंट मध्ये अधिकारी म्हणून दिमाखात प्रवेश केला. याच रेजिमेंटच्या सर्वोच्च नेतेपदापर्यंत त्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या बळावर मजल मारली!  द पुना हॉर्स नावामागेही एक रंजक इतिहास दडलेला आहे. दुसरे बाजीराव पेशवे आणि लॉर्ड हॅस्टिंग यांच्यात १३ जून १८१७ या दिवशी एक लष्करी करार झाला होता. यानुसार दी पूना इररेग्युलर हॉर्स नावाचे अश्वदल उभारले गेले. या दलाचा सर्व खर्च दुस-या बाजीराव पेशव्यांनी करायचा आणि हे दल आणि हे दल पेशव्यांच्याच इलाख्यात राहील असे ठरले. पुण्यात करार झाल्याने या रेजिमेंटला पुणे हे नाव चिकटले. या रेजिमेंटमध्ये प्रामुख्याने उत्तम प्रजातींच्या अश्वांचा समावेश असे. पुढे काळानुसार स्वयंचलित वाहने, रणगाडे इत्यादी आधुनिक साधनांचा समावेश केला गेला. मात्र नाव तेच ठेवले गेले हॉर्स रेजिमेंट.

जमिनीवरच्या युद्धात रणगाड्यांचं महत्त्व आजही अपार मानले जाते. विशेषत: पाकिस्तानी सीमेला लागून असलेल्या राजस्थान सारख्या सपाट, वालुकामय प्रदेशातून पुढे मुसंडी मारायाची असेल तर रणगाड्यांना पर्याय नाही. म्हणूनच आजवर झालेल्या युद्धांत दोन्ही बाजूंनी रणगाड्यांचा वापर केला गेल्याचे दिसते. हे रणगाडे म्हणजे मरूभूमीवरचे अश्वच म्हणावेत! १९६५ च्या भारत-पाक युद्धापासून पुना हॉर्सकडे सेंचुरियन नावाचे रणगाडे होते. या युद्धात लेफ्ट्नंट कर्नल ए. बी. तारापोर यांनी प्रचंड कामगिरी करून पाकिसानचे ६० रणगाडे उध्वस्त केले होते. पण दुर्दैवाने तारापोर साहेबांच्या रणगाड्यावर तोफगोळा आदळून साहेब वीरगतीस प्राप्त झाले. त्यांना परमवीर चक्र मरणोत्तर दिले गेले. याच रेजिमेंटमध्ये हनुतसिंग साहेब पुढे सहभागी झाले होते.

१९७१ मध्ये पाकिस्तानशी युद्ध कधीही सुरू होईल अशी चिन्हे होती. आणि तत्कालीन सेनाप्रमुख फिल्ड मार्शल सॅम माणेकशा यांनी काळाची पावले ओळखून रणगाड्यांची व्युहरचना आधीच निश्चित करून सरावही सुरु केला होता….याला म्हणतात लष्करी नेतृत्व! आणि ही जबाबदारी पेलली होती हनुत सिंग साहेबांनी. पुढे सैन्य इतिहासात अमर झालेली बसंतरची लढाई होणार होती आणि या लढाईचे नायक असणार होते लेफ्टनंट कर्नल हनुतसिंग साहेब.

पाकिस्तानने आगळीक केल्यानंतर भारतानेही प्रतिआक्रमण केले. इंडियन फर्स्ट कोअरचे कमांडींग ऑफिसर लेफ्टनंट जनरल के. के. सिंग साहेबांनी पाकिस्तानी क्षेत्रात जोरदार मुसंडी मारली. त्यांच्यासोबत ५४वी इन्फंट्री डिवीजन, १६वी आर्मर्ड ब्रिगेड होती. परंतू त्यांना पाकिस्तानच्या जोरदार प्रतिकाराला तोंड द्यावे लागले. विशेषत: शत्रूने युद्धक्षेत्रात हजारो भूसुरुंग पेरून ठेवलेले होते. भूसुरुंग निकामी करून रस्ता सुरक्षित केला गेल्यावरच सैन्याला पुढे सरकता येत होते आणि यात वेळ लागत होता. आणि युद्धात तर प्रत्येक क्षण मोलाचा!  

इकडे रस्त्यात भूसुरुंग आणि पाकिस्तान्यांचा बेफाम बॉम्बवर्षाव… परिस्थिती नाजूक होती. एका नदीच्या पुलाजवळ वेगाने पोहोचता आले तर रणगाडे आणि सैन्य पुढे जाऊ शकणार होते. आणि सुमारे सहाशे मीटर्समधील रस्त्यातले सुरुंग निकामी करण्याचे काम शिल्लक होते.

इथे हनुतसिंग साहेबांनी एक अत्यंत धाडसी निर्णय घेतला. यात धोका तर प्रचंड होता. जमिनीखाली मृत्यू टपून बसला होता. सरावाने आणि मनोबलाने पाकिस्तानच्याही पुढे दोन पावले असणा-या हनुत सिंग साहेबांच्या सैनिकांनी साहेबांचा शब्द खाली पडू दिला नाही. त्यांनी आपले रणगाडे त्या रस्त्यावरून पुढे हाकारले. कोणत्याही क्षणी सुरुंग फुटू शकला असता आणि रणगाड्याच्या चिथड्या उडाल्या असत्या. पण त्यादिवशी रणदेवता हनुत सिंग साहेबांवर प्रसन्न असावी. कर्तव्यावर असताना मनातल्या मनात अध्यात्मिक उपासना आणि फुरसतीच्या वेळी प्रत्यक्ष उपासना करणा-या हनुत सिंग साहेबांच्या पुण्याचे फळ म्हणावे हवं तर पण त्या दिवशी या रणगाड्यांच्या रस्त्यात एकही सुरुंग फुटला नाही. संपूर्ण दल नदीपर्यंत सुखरूप पोहोचले… एका महाधाडसी निर्णयाला दैवानेच आशीर्वाद दिला होता! दुस-याच दिवशी याच मार्गाने गेलेली आपली दोन लष्करी वाहने भुसुरुंगात नष्ट झाली. याला हनुतसिंग साहेबांनी देवाचा आशीर्वादाचा हात मानले. योगायोगाने पुना हॉर्सच्या मानचिन्हात उंचावलेल्या हाताची प्रतिमा आहे….हाच तो दैवी आशीर्वादाचा हात असावा! 

या कारवाईदरम्यान पाकिस्तान प्रचंड प्रमाणावर बॉम्बवर्षाव, गोळीबार करत होता. परंतू मरण वर्षावातूनही हनुत सिंग साहेब युद्धक्षेत्रात एका जागेवरून दुस-या जागेवर नीडरपणे आणि अतिशय चपळाईने फिरत होते. त्यांनी प्रशिक्षित केलेला प्रत्येक टॅंक कमांडर अर्थात रणगाडा प्रमुख त्यांना वैय्यक्तिकरीत्या माहित होता. प्रत्येक रणगाडा त्यांच्या जणू हाता खालून गेलेला होता. युद्धपूर्व काळात त्यांनी आपल्या रेजिमेंटमध्ये अतीव धैर्य, उत्साह आणि साहस जणू पेरून ठेवले होते… जसा एखादा निष्णात शेतकरी पावसाच्या आधी उत्तम बियाणे पेरून ठेवतो तसा. आणि इथे तर हे बियाणे उगवण्यास आणि फोफावण्यास अगदी उतावीळ होते. या रेजिमेंटमधील कुणालाही उन्हाची, धुळीची आणि जीवाची पर्वा नव्हती. शांतता काळात त्यांनी सरावात गाळलेले घामाचे थेंब युद्धात मोत्यांसारखे शोभून मातृभूमीच्या कंठात विजयमालेत शोभून दिसणार होते.

पुढे गेलेला रणगाडा एक इंचही मागे सरकता कामा नये असा हनुतसिंग साहेबांचा स्पष्ट आदेश होता. एखादा रणगाडा मागे फिरला म्हणजे आपला पराभव होतो आहे, असे सैन्याला वाटून मनोबल खालावू शकते, असा साहेबांचा विचार होता आणि तो योग्यही होता. निशाण पडले की सैन्याची पावलं डगमगू शकतात असा इतिहासही आहेच. अर्थात भारतीय सैनिक असे काहीही होऊ देणार नव्हते. त्यांनी पाकिस्तानी रणगाड्यांना मागे रेटीत रेटीत नेले आणि आपण ती लढाई जिंकलो. यात पाकिस्तानच्या अत्यंत शक्तिशाली १३, लान्सर्स ही रणगाडा दल तुकडी पुरती नेस्तनाबूत झाली होती. त्यांच्याकडे अमेरिकेतून आयात केलेले शक्तीशाली पॅटन रणगाडे होते. पण शस्त्रांमागची मनगटे आणि मने बलवान असावी लागतात. आणि भारतीयांची तशी असतातच हे सिद्ध झाले. खुद्द पाकिस्तानी सैन्याने आपल्या या पुना हॉर्स रेजिमेंटला ‘फक्र-ए-हिंद अर्थात ‘हिंदुस्थानचा अभिमान’ म्हणून गौरवले! 

हनुत सिंग साहेब अंगाने सडपातळ आणि उजळ वर्णाचे. नाक टोकदार. डोळे पाणीदार. रेजिमेंटमधील सर्वसामान्य सैनिकांसाठी भावाप्रमाणे, पित्याप्रमाणे वागणारे. पण शिस्तीत अतिशय नेमके आणि कडक. रेजिमेंटमधील कोणतीही गोष्ट त्यांच्या नजरतून सुटत नसे. आणि महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही अनावश्यक गोष्टीत त्यांना जराही रस नव्हता. मूर्खांसाठी त्यांच्याकडे वेळ नसे. सैन्यात कागदोपत्री कामेही भरपूर आणि महत्त्वाची असतात. पण या कामांमुळे मूळच्या कर्तव्याला पुरेसा वेळ देता येत नसेल तर त्याला काहीही अर्थ नाही, असे ते स्पष्टपणे बजावत असत. सैनिक कागदांत गुंडाळला गेला तर शस्त्रं कधी चालवणार असा त्यांचा खडा सवाल असे. स्वत: साहेबांनी १९५८ मध्ये इंग्लंड येथे सेंन्च्युरीयन रणगाडा अभ्यासक्रम विशेष श्रेणीत उत्तीर्ण केला होता. आणि यामुळेच त्यांना आपल्या महाराष्ट्रातील नगर येथील आर्मर्ड कोअर सेंटर अ‍ॅन्ड स्कूल येथे प्रशिक्षक म्हणून नेमले गेले होते. पायदळ ज्या तत्वावर युद्ध लढते ती तत्वे आणि स्वयंचलित वाहनांच्या साहाय्याने जी लढाई लढली जाते त्यात बराच फरक असतो हे त्यांनी ताडले. स्वयंचलित वाहनांचा लढाईत वापर जर्मनांनी खूप परिणामकारक रितीने केला होता. त्यांच्या पॅन्झर रणगाड्यांच्या व्युव्हरचनेचा हनुतसिंग साहेबांनी खूप बारकाईने अभ्यास केला. आणि भारतीय सैन्याच्या दृष्टीकोनातून मार्गदर्शक साहित्य तयार केले. इथून हनुतसिंग साहेबांनी अनेक जबाबदारीच्या पदांवर नेमले गेले. १९७० मध्ये साहेबांना पुन्हा नगर मध्ये नेमले गेले. १९५८ मध्ये केलेल्या नोंदी त्यांनी जपून ठेवल्या होत्या. त्यांच्या साहाय्याने साहेबांनी पुन्हा नवे लेखी साहित्य तयार केले. त्यावर आधारीत युद्धाभ्यास करवून घेतला. मुख्य म्हणजे सैनिकांत नवा जोश भरला. १९७० मध्ये साहेबांना पुना हॉर्समध्ये नेमले गेले. १९७१ च्या युद्धात भारतीय रणगाड्यांनी आणि ते हाकणा-या बहाद्दरांनी जी कामगिरी बजावली ती जगजाहीर आहे. या लढाईत स्वर्गीय अरूण खेत्रपाल यांनी बजावलेली कामगिरी हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. त्याबद्दल पुढील लेखात लिहीनच.

एक वीर योद्धा, सैनिक प्रशासक, प्रशिक्षक म्हणून ख्यातकीर्त असलेल्या या महान व्यक्तीची दुसरी बाजू सुद्धा तितकीच वेगळी आहे. संसाराच्या जबाबदा-या सैनिक कर्तव्यात बाधा आणतील म्हणून हनुत सिंग साहेबांनी लग्न केले नाही. १९६८ मध्येच त्यांनी शिवबालयोगी नावाच्या विरक्त संतांचे अनुयायीत्व स्विकारले होते. आणि सैन्यजीवनातही अध्यात्मिक साधना सुरूच ठेवली होती. निवृत्तीनंतरच्या आयुष्यात स्वत:ला अध्यात्मिक चिंतनात अधिक रममाण करून घेतले. एका सैन्याधिका-याच्या अंगावर आता साधुची वस्त्रे आली होती. आणि याही क्षेत्रात ते अभ्यासू, कडक शिस्तीचे आणि कठोर योगी म्हणून नावारूपास आले. सैनिक तो योगी हा त्यांचा प्रवास अनोखा आणि वंदनीय आहे. १० एप्रिल, २०१५ या दिवशी संत हनुतसिंग साहेबांनी समाधी घेऊन आपले जीवीतकार्य संपवले. समाधी अवस्थेत गेल्यानंतर तिस-या दिवशी त्यांचे प्राण पंचत्वात विलीन झाले. या तिन्ही दिवसांत त्यांचा देह, मुख अत्यंत तेजस्वी दिसत होते….. त्यांच्या नावाला साजेसे… हनुत म्हणजे उगवणा-या सुर्याचे तेज! 

भारतमातेच्या या सुपुत्रास साष्टांग दंडवत आणि श्रद्धांजली.

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मदत… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ मदत… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम

एखाद्याला मदत करण्याची कृती आपण स्वतः करतो की ती आपल्याकडून करवून घेतली जाते?

दोन्ही प्रश्नाचे उत्तर’ हो’ असेच असेल, नाही का?   तर मदतीच्या कृतीबाबतचा एक किस्सा असा….

आर्ट ऑफ लिविंगचा बेसिक कोर्स करत असताना एकदा आम्हाला सांगितले की ‘आता पुढची 15 मिनिटं या हॉलच्या बाहेर जा आणि कुणाला तरी मदत करून या. ‘  वेळ सुरू झाला आणि आम्ही बाहेर पडलो.

आमची मदत घेण्यासाठी कोणी दिसते का, शोधू लागलो. रस्ता रहदारीचा होता. एक आजी हातात जड पिशवी घेऊन चालत होत्या. आमच्यापैकी एक जण धावतच तिथे गेला आणि अगदी विनयाने म्हणाला, ‘आजी कुठे जायचे तुम्हाला? थोडे अंतर मी पिशवी घेतो. ‘ त्याच्या या बोलण्यावर आजी संशयाने बाजूला झाल्या आणि चढ्या आवाजात म्हणाल्या, ‘बाजूला हो. आला मोठा मदत करणारा’. एक प्रयत्न तर फसला.

वेळ आता दहाच मिनिटं उरला होता. पुन्हा शोधाशोध सुरू. रस्त्याच्या कडेला मळकटलेल्या कपड्यातली एक गरीब मुलगी दिसली. आम्ही तिकडे धावलो. शेजारीच वडापावचा गाडा होता. तिला म्हणालो, ‘चल. तुला वडापाव खायला देतो. ‘ त्यावर ती  आमच्याकडे संशयाने पाहू लागली. ‘नको नको’ म्हणत दूर पळून गेली.

आता पाच मिनिटे राहिली. शेवटी वडे तळणाऱ्या बाईंना आमच्या टास्कबद्दल सांगितले. आणि ‘तुम्हाला काही मदत करू का’ असे विचारले. त्यावर त्यांनीही नकार दिला, ‘माझे वडे बिघडवून ठेवाल, ‘ असे म्हणाली. वेळ संपला आणि कुणालाही मदत न करता आम्ही परत आलो.

आल्यावर सरांना सर्व वृत्तांत सांगितला. त्यावर ते म्हणाले, “आता तुमच्या लक्षात आले असेल. मदत करण्यासाठी तुमची निवड व्हावी लागते. कुणीही मदत करू शकत नाही, मदत तीच व्यक्ती करते जिची परमेश्वराने निवड केलेली असते. त्यामुळे इथून पुढे आयुष्यात जर कुणाला तुमच्या माध्यमातून मदत झाली तर ‘मी केली’असे म्हणू नका. ती परमेश्वराने केलेली असते. पण कृतीचे माध्यम म्हणून तुम्हाला निवडले आहे, हे विसरू नका. आणि त्याच्या  इच्छेशिवाय हे शक्य नाही, हे ध्यानात ठेवा. “

ही शिकवण त्यानंतरच्या प्रत्येक मदतीच्या कृतीवेळी मला आठवत राहिली. आणि आपण फक्त माध्यम आहोत, हे सतत जाणवत राहिले. यामुळे ‘अहंकाराचा वारा’ काही प्रमाणात का असेना थोडा दूर रहातो हे मात्र नक्की.

लेखक :अज्ञात

संग्राहिका : सौ. दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पाहिल्याने प्रदर्शन… ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ पाहिल्याने प्रदर्शन… ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

बालपण ही देवाने दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. बालपणीचा काळ हा जीवनातला अत्यंत आनंदाचा, नवीन गोष्टी शिकण्याचा आणि संस्कार करण्याचा महत्वाचा काळ. ‘बालपण’ जगातल्या सर्व देशात, सर्व काळात आहे. म्हणूनच लहान मुलांच्या करमणूकीसाठी रंगीबेरंगी साधने व उपकरणे जगात सर्वत्र आढळतात. अगदी अश्मयुगापासून ती तयार होत असल्याचे अनेक पुरावे उत्खननात सापडले आहेत. ही साधने म्हणजेच खेळणी, त्या त्या युगाची संस्कृती सांगतात. या खेळण्यांतून लोकजीवन कळते.

विटी-दांडू, सागरगोटे, गोट्यां, ठीक-या, लगोरी आणि भातुकली हे आपले पारंपारिक खेळ. लहान मुलींची बाहुली त्यात आलीच. ‘बाहुली’ हे जगभरातलं समान खेळणं. मोहेंजोदडो-हडप्पा संस्कृतीत, शृंगकाळात, कुशाणकाळात व गुप्त काळातल्याही बाहुल्या होत्या. भारतात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थान, मध्यप्रदेश या प्रांतात मुली भातुकली मांडून बाहुला-बाहुलीचं लग्न लावतात. शिवाय काही ठिकाणी तर मुलीच्या लग्नात  बाहुल्या, भातुकलीची भांडी अशा वस्तू आंदण म्हणून देण्याची प्रथा आहे. जेणे करून मुलामुलींनी प्रत्यक्ष संसाराला लागण्यापुर्वी ती भांडी हाताळावीत, अनुभवावीत.म्हणजे भविष्य काळात किचन कसे हाताळायचे याची ही रिहर्सल असायची. प्रत्येक राज्यातल्या बाहुलीचं नाव वेगळं. बंगालची असते कालीचंडिका, राजस्थानची गंगावती तर महाराष्ट्राची आपली ठकी. या बाहुल्या नुसताच एक खेळ नसून या बाहुल्यांवरून त्या त्या प्रांताची परंपरा, पोषाख, संस्कृती यांचा इतिहास कळतो.           

दिल्ली येथे ४,नेहरू हाउस, बहादूरशहा जफरमार्ग,दिल्ली,११०००२. (वेळ-स.१०ते सायं ६) येथील शंकर्स इंटरन्याशनल डॉल्स म्युझिअम मध्ये जगातल्या सुमारे ८५ देशातल्या ६५०० बाहुल्या पाहायला मिळतात. भारतीय पोशाखातील १५० प्रकारच्या बाहुल्या, भारतीय नृत्यप्रकार कथ्थकलीच्या संपूर्ण कोस्च्युम्ससहित बाहुल्या. जपान मध्ये मुले आणि मुलींसाठी वापरणा-या बाहुल्या, इंग्लंडच्या राणीच्या संग्रहातील रेप्लीका डॉल, हंगेरीच्या मेपोल, जपानच्या सामुराई डॉल, थायलंडचा वूमेन ऑर्केस्ट्रा अशी जगाच्या कानाकोप-यातून आणलेल्या आणि भेट म्हणून मिळालेल्या बाहुल्यांची विविध रूपे आहेत.

१९६५ मध्ये राजकीय व्यंगचित्रकार के.शंकर पिल्लई(१९०२-१९८९) यांच्या कलेक्शन मधून भारतातले हे खूप मोठे प्रदर्शन उभे राहिले आहे.यात हाताने बनवलेल्या विविध पेहरावातल्या असंख्य प्रकारच्या बाहुल्या लहान मुलांचे बालपण तर दाखवितातच परंतु विविध देशांमधील विविध काळातील संस्कृती, डिझाईनचे नमुने, दाग-दागिने, अशी अभ्यासपूर्ण कलाकुसर पाहायला मिळते. युरोपिअन देश, एशियन देश, मध्य पूर्व देश, अफ्रिका आणि भारत या प्रांतातल्या सुंदर बाहुल्या इथे पहायला मिळतात. अशा प्रकारची प्रदर्शने खूप माहिती देत असतात. असंच दुसरं महाराष्ट्रातील भातुकलीच फिरतं प्रदर्शन आपल्या मागील पिढ्यांचा वारसा सांगतं.

भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य म्हणजे इथली कुटुंबपद्धती, परंपरा चालीरीती इत्यादी होत, त्यामुळे आपल्या संस्कृतीचा पाया भक्कम. ‘भातुकली’ या चिमुकल्या संसारात या सर्व संस्कृतीचं प्रतिबिंब  पाहायला मिळतं. भातुकलीचा खेळ बाजारात कुठेही मिळतो. पण, आज भातुकली खेळायला मित्रांची, भावंडांची कंपनीच नाही आणि मुलांना व पालकांना वेळही नाही.  काळाच्या ओघात चौसोपी वाडे जाऊन घरे झाली, घरे जाऊन आज इमारती उभ्या राहिल्या. त्यामुळे वन बीएचके, टू बीएचके मध्ये जागाही कमी झाली. प्लास्टिकचा जमाना. युज अॅंड थ्रो पद्धत, शिवाय गरजाही बदलल्या. त्यामुळे जुनी, पारंपारिक भांडी, वस्तू जपून ठेवायला जागाच नाही. मुलांच्या खेळण्यांना तर थाराच नाही. आमच्या वेळचा भातुकलीचा संसार आम्ही सांभाळून ठेवू शकलो नाही ही खंत आज वाटते. मला वाटतं ही सर्वांचीच खंत असणार. पण आपल्या आजच्या पिढीला, पुढच्या पिढीला ही संस्कृती, हा वारसा, परंपरा, इतिहास समजावा म्हणून काही छंद जोपासणारे ,संग्राहक अशा वस्तूंचा संग्रह करतात. पुण्याच्या विलास करंदीकर यांचा भातुकलीच्या संग्रहाचा खटाटोप आहे.

ही संस्कृती, हे संस्कार जपले जावेत, तुमच्या आमच्या घरातल्या काळाच्या पडद्याआड गेलेल्या वस्तूंची माहीती व्हावी, परंपरेची ओळख व्हावी या उद्देशाने करंदीकर आपल्या भातुकलीचं प्रदर्शन भरवतात. ‘भातुकली म्हणजे करंदीकरच’ हे समीकरण पुणेकरांना ठाऊक आहे. कारण झाडून सर्व पुणेकर इतिहासप्रेमी, परंपरा व वारसा जतन करणारे. योगायोगाची गोष्ट म्हणजे करंदीकरांच्या पुढच्याच गल्लीत राजा केळकर हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचं संग्रहालय आहे. जे कै. दिनकर केळकर यांच्या वैयक्तिक छंदातूनच निर्माण झालेलं आहे. विलास करंदीकरांचं ‘भातुकली’ प्रदर्शन हेदेखील वैयक्तिक छंदातूनच साकारलंय. परंतु मुख्य फरक आहे ‘भातुकली’ हे प्रदर्शन फिरतं, चालतं बोलतं आहे आणि या संग्रहातल्या पारंपारिक वस्तूंशी आपला थेट संबंध आहे. ते पाहताना अरे ही तर आपण खेळलेली भांडीकुंडी, चूल बोळकी आहेत. मग आपण मुलामुलींना, भाच्या पुतण्यांना, नातवंडांना “आमच्यावेळी हे असं होतं” हे सांगताना, त्या वस्तू प्रत्यक्ष दाखविताना, केवढा आनंद होतो. अशा या भातुकली प्रदर्शनातील भांड्यांच्या इतिहासाचे साक्षीदार आपण स्वतःच असतो.

करंदीकर यांच्या या चिमुकल्या संसारात ३००० भांडी आहेत. ती पितळी, स्टील, तांबे, लाकूड, दगड, सिमेंट, कापड, माती आणि चांदीची सुद्धा आहेत. भांड्यांच्या छोट्या प्रतिकृती अगदी हुबेहूब. छोटी असूनही प्रत्यक्ष वापरता येणारी भांडी आहेत. यातला तांब्याचा छोटा बंब पेटवून पाणी गरम होतं, स्टोव्ह पेटवून चहा करता येतो, चकलीच्या सोऱ्यातून चकली करता येते. हापशीतून धो-धो पाणी पडते.या संग्रहात वसुदेव प्याला, संपूट, दिव्याच्या समया, गंगेचे भांडे,  तिर्थोटी, आड-रहात, दगडी डोणी, अग्नीहोत्र पाट, बंब, दूधदूभत्याचं  कपाट, चुली व शेगड्यांचे,  भांड्याचे  अनेक प्रकार, भाताच्या भत्त्या,  वेड्भांडे,  शकुंतला भांडे,  रुबवटा,  ठेचणी या घरातून  हद्दपार झालेल्या वस्तूंबरोबरच मोक्षपट,  गंजीफा, सारीपाट, सागरगोटे, गुंजा असे पारंपारिक  खेळही आहेत. तसेच  देवपूजेची भांडी, प्रवासाची साधने यांचाही इतिहास कळतो. या प्रदर्शनात भर पडली ती चांदीच्या भातुकलीची. 

१९९० मध्ये जुन्या वाड्याच्या नूतनी करणा पासून हा संग्रह सुरु झाला.हळू हळू २६८ भांडी झाली.त्याचं पाहिलं प्रदर्शन पुण्याच्या बालगंधर्व कलादालनात मे १९९८ मध्ये भरलं.आता पर्यंत महाराष्ट्रात व बाहेर  १५० च्या वर प्रदर्शने झाली.प्रत्येक वेळी त्यांच्या संग्रहात नवी भर पडत आहे. प्रदर्शन बघायला ९१ वर्षांच्या आजी, त्यांची ६६ वर्षांची मुलगी, तिची ३५ वर्षांची सून व तिची ६ वर्षांची मुलगी अशा चार पिढ्या एकाच वेळी येतात तेव्हा त्या आजींना त्यांचं  बालपण आठवतं ,तर पणतीला पणजीच्या वेळच्या भांड्यांच कौतुक वाटतं.

अशी ही भातुकली. म्हटलं तर लहान मुलांचाच खेळ. पण त्यांच्या जीवनातील हा महत्वाचा टप्पा. खेळ त्यांच्या मानसिक वाढीला पोषक असतात. खेळणी मुलांची नुसतीच करमणूक करत नाहीत. त्यांच्यात जिज्ञासा निर्माण करतात. त्यांची कलात्मक प्रवृत्ती वाढवितात. या खेळातून त्यांना एकमेकांबद्दल प्रेम, ओढ, मन जपण्याची, सहकार्याची, कर्तव्याची अशा मानवी नातेसंबंधातल्या भावभावनांची, जीवनातल्या मूल्यांची शिकवण मिळत असते. खेळ म्हणजे बिनभिंतींची शाळाच असते. 

लुटूपूटूच्या संसारात ही मुले कधी आई-बाबा होतात, कधी डॉक्टर, तर क्षणात शाळाशाळा खेळतात. क्षणात भूक लागते. दुसऱ्याच क्षणाला विद्यार्थी झालेली ही मुलगी आई होऊन स्वयंपाक करते. सर्वांना समाधानाने जेवू घालते. असं हे बालविश्व.  या आपल्या आठवणींना हे प्रदर्शन उजाळा देतं. अशी संग्रहालये आणि प्रदर्शने मनोरंजना बरोबरच ज्ञान देतात. पालकांनी आणि शिक्षकांनी अशांची दखल घेतली पाहिजे. ती मुलांना आवर्जून दाखवली पाहिजेत. कित्येकदा आपल्याच शहरातलं एखादं संग्रहालय सुद्धा आपल्याला माहिती नसतं किंवा ते महत्वाचही वाटत नसतं. पालकांच्याच मानसिकतेवर मुलांची मानसिकता अवलंबून असते. तेव्हा ही दोन्ही प्रदर्शने मुलांना जमेल तशी, जमेल तेंव्हा अवश्य दाखवा. पर्यटन किंवा सहलीला गेलात तर तिथल्या म्युझियमला नक्की भेट द्या.    

© डॉ. नयना कासखेडीकर.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आयुष्य – एक नाटक ? .. की एक खेळ ? – भाग-१ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आयुष्य – एक नाटक ? .. की एक खेळ ? – भाग-१ ☆ डॉ अभिजीत सोनवणे

कुणीतरी म्हटलंय, आयुष्य हे एक रंगमंचावरचं नाटक आहे… 

पण मला वाटतं, आयुष्य हा एक खेळ आहे. या खेळात हरणं – जिंकणं, आनंद – दुःख, आशा – निराशा, मोह – स्वार्थ – त्याग – तिरस्कार, जिद्द, उपेक्षा, तगमग, तळमळ… पुस्तकात लिहिलेल्या या सर्व भावना प्रत्येक खेळात प्रत्यक्ष अनुभवाला येतात. आयुष्य यापेक्षा काय वेगळं आहे ? 

खेळामध्ये मात्र एक नियम असतो, आपल्या टीम मधल्या / कुटुंबातल्या सदस्याला आपण त्रास द्यायचा नाही, हरवायचं नाही, हरू द्यायचं नाही… मग हा खेळ क्रिकेट असो की कबड्डी…!! 

दुर्दैवाने आयुष्याच्या खेळात मात्र हा नियम पाळला जात नाही…! 

अनेकदा आपलेच लोक, आपल्याच माणसांचे पाय ओढून, त्याला रिंगणा बाहेर फेकून देतात, कायमचं आऊट करतात… ! 

ज्या लोकांना असं रिंगणाबाहेर टाकलं जातं, त्या लोकांच्या काही चुका असतीलही, मान्य … पण ज्या पानावर चूक आहे, फक्त ते पान फाडायचं ?  की आख्ख पुस्तकच फाडायचं….??? 

चुका होणं हि प्रकृती…. चूक मान्य करणं हि संस्कृती…. आणि चुका सुधारणं हि प्रगती…! 

पण एखाद्या चुकीसाठी एखाद्याला कायमचं आउट करणं ही मात्र विकृती…!!! 

एकदा ही माणसं आयुष्यातून आउट झाली… बाद झाली की लवकर सावरत नाहीत….बरोबर आहे, पाडणारे आपलेच असतील, तर सावरायला वेळ लागतोच..!!!  असो…

उन्हाळा खूप वाढलाय असं सारखं कानावर येतं… 

घरात पंख्याखाली सुद्धा अंगाची लाही लाही होते…      मी तर उन्हात डांबरी रस्त्यावर एखाद्या गटार /उकिरड्याशेजारी किंवा इतर मिळेल त्या जागी बसलेलो असतो. (मला लोक त्यांच्या घरासमोर किंवा दुकानासमोर किंवा इतर चांगल्या जागी बसु देत नाहीत, त्यांच्या मते हे घाणेरडे लोक आमच्या नजरेसमोर नकोत)

तर…. रस्त्यावर बसल्यावर, खालून चटके आणि वरूनही चटके…!!! 

रस्त्यावर भर उन्हात दिवसभर शे दिडशे किलोच्या बॅगा सांभाळत असतानाही, उन्हाळ्याचा त्रास मला मात्र जाणवत नाही…. 

रणरणत्या उन्हात, मी बसलेलो असताना, दोन तीन भिक्षेकरी माझ्यामागे नुसतेच उभे असतात…. मागे उभे का रे ?  असे पुढे या… असं मी दटावलं तरी माझं ते ऐकत नाहीत…. दोन तासाने माझं काम संपतं …मी बॅग आवरायला घेतो आणि मग ते पुढे येतात… ते पुढे आल्या आल्या मला उन्हाची तीव्रता जाणवू लागते… मी पुन्हा दटावून विचारतो … असे वेड्यासारखे माझ्या मागे मागे काय घुटमळत होता रे ? त्यातला एक जण मग चाचरत म्हणतो, ‘डाक्टर तूमाला उन्हाचा लय चटका बसत हुता… आमी म्हागं हुबं राहून तुमच्यावर सावली धरली हुती ओ…!!! 

.. .. दोन तास स्वतः उन्हात उभे राहून यांनी माझ्यावर सावली धरली होती…. भर उन्हातही मग डोळ्यामधून पूर येतो..! 

स्वतः चटका सहन करून दुसऱ्यावर सावली धरणारा फक्त एक बापच असू शकतो… 

ही प्रेमळ माणसं, बाप होऊन, माझ्या वाटेवरची झाडं होतात… डोक्यावर सावली धरतात… मग माझ्यासारख्या वाटसरूला ऊन कसं लागेल ? 

मला उन्हाळा जाणवतच नाही…. कोण म्हणतं उन्हाळा वाढलाय म्हणून…? 

भर उन्हाळ्यात रस्त्यावर मी बसतो तेव्हा माझ्या आज्ज्या, आया, मावश्या माझ्या डोक्यावर पदर धरतात, कुणीतरी उकिरड्यातला एखादा पुठ्ठा घेऊन येतं आणि बाजूला बसून वारा घालतं… मध्येच कुणीतरी पदरानं घाम पुसतं…. तर मध्येच कोणीतरी थंडगार पाण्याची बाटली आणून देतं…. भिकेतून मिळालेल्या पैशातून कोणी ताक विकत आणतं….तर कुणी लस्सी…. तर कुणी उसाचा रस…. 

प्रेमाच्या आणि मायेच्या इतक्या शितल वातावरणात मी बसलेला असतो, की मला उन्हाळा जाणवतच नाही….. उन्हाची प्रत्येक लाट, माझ्यासाठी थंडगार वाऱ्याची झुळूक बनून येते… मला मग उन्हाळा जाणवतच नाही…. कोण म्हणतं उन्हाळा वाढलाय म्हणून…? 

मी आहे साधा भीक मागणाऱ्या लोकांचा डॉक्टर, पण त्यांच्यात गेलो की ते मला एखाद्या देशाचा राजा असल्याचा फील देतात…

काही तासातच ते मला जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती बनवतात… रोज – रोज आणि रोजच…!

दुसऱ्याला श्रीमंत बनवणाऱ्या, आयुष्याच्या खेळात कायमस्वरूपी आऊट झालेल्या आणि रिंगणाबाहेर बसलेल्या या व्यक्तींच्या जखमांवर तुम्हा सर्वांच्याच सहकार्याने फुंकर घालत आहे आणि म्हणून या महिन्याचा लेखाजोखा आपणास सविनय सादर ! 

*(आमच्या कामाचा मूळ गाभा फक्त वैद्यकीय सेवा देणे नसून, वैद्यकीय सेवा देता देता, त्यांचा विश्वास संपादन करणे, त्यांच्याशी चांगले नाते निर्माण करणे, भिक मागण्याची कारणे शोधणे, त्यांच्यामधील गुणदोष शोधून त्यांना व्यवसाय करण्यास प्रवृत्त करणे आणि त्यांना झेपेल तो व्यवसाय टाकून देणे…. जेणेकरून ते भिक्षेकरी म्हणून नाही, तर कष्ट करायला लागून, गावकरी होऊन ते सन्मानाने जगतील… कुणीही कुणापुढे हात पसरून लाचार होऊ नये, जगात कोणीही भिकारी असू नये, हा आमच्या कामाचा मूळ गाभा आहे, वैद्यकीय सेवा देणे हा त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही फक्त मार्ग म्हणून निवडला आहे)*

भिक्षेकरी ते कष्टकरी आणि कष्टकरी ते गावकरी

दारुड्या नवरा – मतिमंद मूल आणि अपंग आई… कंटाळून तीने शेवटी घर सोडलं; म्हणण्यापेक्षा नवऱ्यानेच तीला घराबाहेर हाकलून दिलं…!

पुण्यात आली… या तीनही पिढ्या, सातारा रोड येथील एका मंदिराबाहेर भिक मागू लागल्या… 

ताई खमकी आहे पण त्यापेक्षा सुद्धा जास्त संवेदनशील…

मला भेटली आणि आपोआप भाऊ बहिणीचं नातं प्रस्थापित झालं…

तिला यानंतर नात्याचा उपयोग करून काही बाही विकण्याचा व्यवसाय रस्त्यावर टाकून दिला…. ती तो प्रामाणिकपणे करत होती… ! 

 

तिची आई पूर्णतः बहिरी आहे… ताईचा बारा वर्षांचा मुलगा मतिमंद…. दरवेळी मी मुलाला चॉकलेट घेऊन जातो… तिच्या आईला म्हणजेच आजीला मी खूप चिडवतो…. “ए बहीरे म्हातारे” म्हटल्यावर तिला खूप राग येतो (बरोबर हे तीला कसं ऐकू जातं हे मला अजून कळलं नाही)

.. ही आजी मला दाद्या म्हणते…  तीच्या मुलीचा ती मला मोठा भाऊ समजत असावी कदाचित… ! बऱ्याच वेळा हक्कानं शिव्याही देते…

 

तर, हीच बहिरी आजी तासनतास माझ्या डोक्यावर छत्री घेऊन उभी असते…. मी तीला प्रेमाने म्हणतो, ‘म्हातारे बस की आता थकली असशील…’ 

तिला मात्र, ‘ बहिरे, मर की आता थकली असशील…’  का कोण जाणे पण, असं ऐकू येतं… मी का मरू ?  असं म्हणत, यानंतर ती छत्री घेऊन मला मारण्यासाठी माझ्या पाठी लागते… !

 

अशा सगळ्या गंमती जमती…  जे ऐकायला यायला हवं तेच ऐकायला येत नाही….

तर ही ताई आता याच मोठ्या मंदिराच्या बाहेर सिक्युरिटी गार्ड म्हणून कामाला लागली आहे. 

अत्यंत ओंगळवाण्या, दीनवाण्या अवतारात हिला पाहिली होती… आता जेव्हा हिला रुबाबदार युनिफॉर्म मध्ये पाहतो, तेव्हा मला काय वाटतं… ? मी शब्दात सांगू शकत नाही…! 

 

एके दिवशी म्हातारी आली आणि माझ्या कानात ओरडून म्हणाली, ‘दाद्या आता मी मरायला मोकळी झाले…’ 

मी पण तेवढ्याच प्रेमानं तीला कानात ओरडून सांगितलं, ‘म्हातारे मरू नको इतक्या लवकर…’ 

बहुतेक तीला “म्हातारे मला मारू नको” असं ऐकू आलं असावं…. ती माझ्या गालाचे, हाताचे मुके घेत म्हणाली, ‘भयनीचं इतकं करतुस दाद्या, आता मी तुला न्हायी मारणार… न्हायी मारणार…! 

.. .. असं म्हणत ती माऊली अश्रूंचा अभिषेक माझ्या हातावर करते… मी तीला कानात ओरडून म्हणतो, ‘ म्हातारे, काळजी करू नकोस,  तीला मी बहीण म्हणून स्वीकारलं आहे…. तीचा हात मी कधीच नाही सोडणार.. तुज्या शप्पत…’

– ही संपूर्ण वाक्ये मात्र जशीच्या तशी बहिऱ्या म्हातारीला ऐकू जातात… शेवटी आईच ती….! 

‘ न्हायी सोडणार ना भयनीचा हात….? न्हायी सोडणार ना भयनीचा हात….?? ‘ माझ्या पाठीवरून खरबरीत हात फिरवत ती दहा वेळा माझ्याकडून वदवून घेते… मला तिच्या चेहऱ्यावर माय दिसते…. डोळ्यात गाय दिसते….! 

– क्रमशः भाग पहिला  

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆– ‘स्क्रेपरबोर्ड’ चित्रकार —श्री. शंकरराव फेणाणी – ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

? मनमंजुषेतून ?

☆ – ‘स्क्रेपरबोर्ड’ चित्रकार —श्री. शंकरराव फेणाणी – ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

30 एप्रिल 2024….. भारतातील ‘स्क्रेपरबोर्ड चित्रकला’ या अत्यंत कठीण विषयातील अग्रगण्य मानले जाणारे चित्रकार – श्री. शंकरराव फेणाणी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या कार्याचा रंजक माहितीपट अवश्य पहावा असाच आहे. 

जवळपास ५५ वर्षांपूर्वी वृत्तपत्रांमधील फोटो व जाहिराती उत्तमरित्या छापून येण्यासाठी फोटोग्राफीचे तंत्रज्ञान फारसे विकसित न झाल्याने, ‘स्क्रेपर बोर्ड’ ही अत्यंत कठीण, ब्रिटिश शैलीची चित्रकला वापरली जाऊ लागली. 

एका पुठ्ठ्यावर प्लास्टर ऑफ पॅरिसचा जाड लेप देऊन, त्यावर काळी पेलिकन शाई ओतून ती वाळल्यावर, एका अत्यंत सूक्ष्म टोकाच्या ‘निब’ने, उभ्या – आडव्या रेषा कमीजास्त वजनाने कोरून, त्या तयार झालेल्या टिंबांच्या सहाय्याने चित्र निर्माण करत असत . शिल्प तयार करताना जसा दगडातील नको तो भाग काढून टाकतात त्याप्रमाणे अत्यंत ‘सूक्ष्मतम’ असे हे काम असे. एखादे टिंब जरी चुकले, तरी संपूर्ण चित्र वाया जाण्याची शक्यता असल्याने, लक्ष पूर्णपणे केंद्रित करून, काटेकोरपणे, अचूक चित्र त्यातून निर्माण करावे लागे. छापताना हे चित्र उलटे छापले जाणार, हे लक्षात ठेवून, बारकाईने लक्ष ठेवून हे अत्यंत कठीण काम तासन् तास म्हणजे सलग जवळपास 18…20 तास करावे लागे. यात माझे बाबा शंकरराव फेणाणी यांचा हातखंडा होता. त्यांचे नेमके काम पहायचे असेल तर … प्रत्येक फोटो मोठा करून पाहिल्यास प्रत्येक बिंदूची कल्पना येईल. आणि ही चित्रे काढणे हे किती अवघड, किचकट आणि वेळखाऊ काम आहे याचीही जराशी कल्पना येईल.

भारतातील अगदी तुरळक आणि उत्तम ‘ स्क्रेपरबोर्ड आर्टिस्ट’ पैकी ते अग्रगण्य मानले जात. 

माझे वडील म्हणून तर मला ते सदैव वंदनीय आहेतच. आज एक उत्तम आणि दुर्मिळ कलाकार म्हणूनही त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त माझे त्यांना शतश:प्रणाम. 

©  सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एकोणतीस प्राण…दोन रक्षक ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ एकोणतीस प्राण…दोन रक्षक ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

… कॅप्टन अमित भारद्वाज आणि हवालदार राजवीर सिंग ! 

“आई,नको हट्ट धरूस माझा चेहरा पाहण्याचा ! मला चेहरा असा उरलाच नाही गेल्या सत्तावन्न दिवसांत. कुडीतून प्राणांचं पाखरू उडून गेलं की पिंजराही चैतन्य गमावून बसतो. मातीतून जन्मलेला हा देह माती पुन्हा आपलासा करू लागते…अगदी पहिल्या क्षणापासून. आणि सत्तावन्न दिवस तसा मोठा कालावधी आहे ना! माती होत चाललेलं माझं शरीर तुझ्यातल्या मातेला पाहवणार नाही गं! तु माझा तो लहानपणीचा गोंडस, तुला मोहवणारा चेहरा आठव आणि तोच ध्यानात ठेव अखेर पर्यंत! ऐकशील माझं? आणि हो…माझ्या वस्तू,माझा युनिफॉर्म आणि आपला तिरंगा देतीलच की तुझ्या ताब्यात! त्या रूपात मी असेनच तुझ्या अवतीभोवती…सतत! 

तु,पपा,दीदी….मला पाहू शकत नव्हतात….पण मी मात्र तुमच्या अवतीभवतीच घोटाळत होतो…इतके दिवस! आता तुमच्या सर्वांच्या देखत माझा देह अग्नित पवित्र होईल…तेंव्हा निघून जाईन मी माझ्या मार्गानं….स्वर्गात!   

दीदीला मात्र मानलं पाहिजे हं…खरी शूर पोरगी आहे. तिला सर्व माहित होतं, पण तुम्हांला त्रास होऊ नये म्हणून ती तुम्हांला खोटा धीर देत राहिली… दादा, आहे… येईल… असं सांगत. तुम्ही दोघंही मग सांत्वनासाठी येणा-यांना छातीठोकपणे सांगत राहिलात….लढाई सुरू आहे…अमित जिंकून येईल! मी जिंकूनच आलो आहे… ममी… पपा! 

१९९७ मध्ये ४,जाट रेजिमेंटमध्ये लेफ्टनंट म्हणून सीमेवर कर्तव्यावर रुजू झालो तेंव्हा सर्व वरीष्ठांना ‘सर !’ म्हणून सल्यूट बजवावा लागायचा. आणि त्याची सवयही झाली होती दीड वर्षांत. १९९९…आता मी कॅप्टन झालो होतो. 

एके दिवशी तो आला आणि मला “ लेफ्ट्नंट सौरभ कालिया,रिपोर्टींग,सर!” म्हणत त्याने कडक सल्यूट ठोकला. मला ‘सर’ म्हणणारं कुणीतरी आलं होतं याचा मला आनंद वाटला. माझ्यापेक्षा दीड दोन वर्षांनी धाकटा असणारा तो तरूण मला पाहताक्षणीच भावला. चारच महिन्यांपूर्वी माझ्या पलटणीत रुजू झाला होता. तो आता माझ्या हाताखाली असणार होता. मी त्याला या पलटणीच्या परंपरा,इतिहासाबद्दल शिकवू लागलो होतो. मी त्याला ‘बच्चा’ म्हणू शकत होतो…प्रेमानं. 

१९९९ चा मे महिना होता. आणि एकेदिवशी खबर आली की आपल्या सीमेत काही घुसघोर आढळून आले आहेत. बर्फाच्या मोसमात इथे जीवघेणे हवामान असते…जगणे अवघड करून टाकणारे. म्हणून परस्पर सामंजस्य करारानुसार दोन्ही देशांच्या अतिउंचावरील सैनिकी-चौक्या रिकाम्या केल्या जातात. आणि बर्फ वितळताच पुन्हा दोन्ही देशांचे सैनिक आपापल्या चौक्यांमध्ये परततात. पण यावेळी पाकिस्तानने आपल्या लष्कराला टोळीवाल्यांच्या वेशात बर्फ वितळण्यापूर्वीच या चौक्यांमध्ये पोहोचवले होते. आणि त्यातून भारताच्या चौक्यांवर ताबा घ्यायला लावले होते. शत्रू भारतीय सैनिकांची वाटच पहात लपून बसला होता.  भारताला याची खबर खूप उशीरा लागली,दुर्दैवाने! खरी परिस्थिती काय आहे हे पहायला चौक्यांपर्यंत एक पाहणी पथक पाठवायचं ठरलं. एक अधिकारी आणि चार जवानांची पेट्रोलींग पार्टी. तिथली भयावह परिस्थितीच माहित नव्हती. त्यामुळे मोठी कारवाई करण्याचा विचार झाला नाही. फक्त पाहून यायचं होतं माघारी….रिपोर्ट द्यायचा होता.माझा ‘बच्चा’ मोठ्या उत्साहात पुढे आला आणि म्हणाला….सर,मी जातो! आणि पेट्रोल पार्टी निघाली. सोबत नेहमी असतात तेव्हढी शस्त्रं होती….त्यादिवशी बरेच बर्फ पडत होतं. १५ मे, १९९९ चा दिवस होता हा. सौरभ फार तर १६ तारखेला परतायला हवा होता. पण त्याला बजरंग पोस्टजवळ पोहोचायला दुसरा दिवस उजाडला. “जयहिंद सर,बजरंग पोस्टवर मोठ्या संख्येने पाकिस्तानी आक्रमण झालं आहे…आमच्यावर गोळीबार होतो आहे…आमच्याकडे गोळाबारूद पुरेसा नाहीये…पण आम्ही सर्वजण लढू…तुमची मदत पोहोचेपर्यंत..ओव्हर अ‍ॅन्ड आऊट! आणि यानंतर सौरभचा काहीही पत्ता नाही. १६ मेची रात्र सरली. मग मात्र आम्ही सर्वच जण अस्वस्थ झालो. १७ तारखेला लवकरच मी ३० जवान घेऊन निघालो. यावेळेस दारूगोळा पुरेसा घेतला…..दिवसभर चढाई करीत बजरंग पोस्टच्या जवळ पोहोचतो न पोहोचतो तोच पहाडावरून आमच्या पार्टीवर जोरदार गोळीबार,तोफांचा मारा सुरू झाला. पाहतो तर, आमच्यापेक्षा कित्येक पट संख्येने शत्रू वर निवांतपणे लपून आमच्यावर सहज नेम धरून हल्ला चढवतो आहे. सोबतच्या ३० माणसांचे प्राण आता संकटात होते. माघारी फिरणं युद्धशास्त्राला धरून होतं….मी सोबत्यांना पीछे हटो,निकल जाओ, असा आदेश दिला. वरून गोळीबार सुरूच होता. त्यांच्यावर कुणीतरी सतत गोळीबार करीत राहणं गरजेचं होतं..जेणेकरून माघारी जाणारे त्यांच्या गोळीबाराच्या टप्प्यात येणार नाहीत. ही ‘कव्हरींग फायर’ची जबाबदारी मी स्विकरली…मी त्यांचा नेता होतो! एक वगळता बाकी सारे जवान हळूहळू मागे सरकत सरकत सुरक्षित ठिकाणी पोहोचायला निघाले. पण माझा ‘बडी’ ‘सहकारी’ हवालदार राजवीर सिंग यांनी जणू माझा आदेश ऐकूच गेला नाही,असा अभिनय करीत दुश्मनांवर गोळीबार सुरु ठेवला. ‘पीछे जाईये, राजवीर जी!” मी पुन्हा ओरडलो. “नहीं,साहबजी. हम आपको यहां पर अकेला छोड के नहीं जायेंगे!” राजवीर सिंग यांनी हट्ट धरला. “यहां से जिंदा लौट जाना नामुमकीन है! आप बाल बच्चे वाले इन्सान हो! मेरी तो अभी शादी भी नहीं हुई है! निकल जाईये! 

“नहीं,साहब !” राजवीर म्हणाले..त्यांची नजर दुश्मनावर आणि बोटं रायफलच्या ट्रिगरवर…तुफान गोळीबारानं पहाड हादरून जात होते. 

“यह मेरा हुक्म है,हवालदार राजवीर !” मी ओरडलो. त्यावर तो ज्येष्ठ सैनिक म्हणतो कसा…”यहां से जिंदा लौटेंगे तो आप मेरा कोर्ट मार्शल कर सकते हैं,साहब !” आणि असं म्हणत त्यांनी अंगावर गोळ्या झेलायला प्रारंभ केला. माझा नाईलाज झाला….मी नेम धरायला सुरूवात केली….दोघांनी मिळून किमान दहा दुश्मन तरी नष्ट केले असतील…पण त्यांची संख्याच प्रचंड होती. आमच्यावर आता एकत्रितच गोळीबार होऊ लागला…आडोसा कमी पडू लागला…त्यांचे नेम अचूक होते….राजवीर माझ्या आधी शहीद झाले…माझ्याही डोक्याचा दोनदा वेध घेतला दुश्मनांच्या गोळ्यांनी. आमच्या हातांची बोटं ट्रिगरवरच होती…आमचे प्राण निघून गेले होते तरी! 

मग सुरु झाला खरा रणसंग्राम. या धुमश्चक्रीत आमचे देहही आपल्या सैन्याला तब्बल छपन्न दिवस ताब्यात घेता आले नाहीत. पण आमच्या देहांच्या साक्षीने आपल्या सैन्यानं पाकिस्तान्यांना धूळ चारली. आणि मोठ्या सन्मानाने माझा आणि राजवीर यांचा उरलासुरला देह ताब्यात घेतला. सन्मानपूर्वक आदरांजली वाहिली सर्वांनी. राजवीर त्यांच्या घरी आणि मी आपल्या घरी आलो आहे….अखेरचा निरोप घ्यायला! 

ह्या जन्मीचं मातृभूमीप्रती असलेलं माझं कर्तव्य तर पूर्ण झालं आहे…तुझे ऋण फेडायला फिरूनी नवा जन्मेन मी ! जय हिंद ! “

( जुलै, २०२४ मध्ये भारत-पाकिस्तान दरम्यान कारगील येथे झालेल्या सशस्त्र संघर्षाला पंचवीस वर्षे पूर्ण होताहेत. या संघर्षातले पहिले हुतात्मा ठरले ते कॅप्टन सौरभ कालिया आणि त्यांच्यासोबतचे पाच जवान. कालिया साहेबांचा शोध घेण्यास गेलेल्या कॅप्टन अमित भारद्वाज साहेब आणि त्यांच्या सोबतच्या हवालदार राजवीर सिंग यांना १७ मे रोजी हौतात्म्य प्राप्त झाले. कॅप्टन भारद्वाज साहेबांची ही शौर्यगाथा त्यांच्याच भूमिकेत जाऊन लिहिली आहे… त्यांच्या बलिदानाचं स्मरण करून देण्यासाठी. कॅप्टन भारद्वाज साहेबांनी लेफ्टनंट ( पुढे कॅप्टन झालेल्या) सौरभ कालियासाहेबांचे स्वागत करणारी एक हस्तलिखित चिठ्ठी छायाचित्र स्वरूपात इथे दिली आहे. जय हिंद !)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ खरी श्रीमंती – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ खरी श्रीमंती – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

आमच्या लहानपणी इंग्रजीचं फॅड अजिबात नव्हतं.

ABCD …….XYZ याचा संबंध फक्त शाळेत गेल्यावर , ते ही इंग्रजीच्या तासालाच !

आणि आता

ABP माझा, CID, MRI, X-ray, Z-TV विचारूच नका .

आमच्या लहानपणी ,

This is Gopal . अन That is Seeta .ही दोन वाक्यं पाचवीत गेल्यावर वाचता आली,तरी जबरदस्त कौतुक व्हायचं !

आई लाडानं जवळ घ्यायची आणि मायेनं मुका घ्यायची. आई लेकराकडे इतक्या कौतुकाने पहायची की त्या पोराला एकदम कंडक्टर झाल्या सारखंच वाटायचं !

 

अहो, कंडक्टर याच्यामुळे की …..आमच्या लहानपणी एखाद्या पोराला मोठ्या माणसाने ,

“हं! काय रे बाळ मोठेपणी तू काय होणार ?” असा प्रश्न विचारला की ते पोट्टं हमखास म्हणायचं …..

“मी मोठेपणी कंडक्टर होणार किंवा पोलीस होणार !”

तुम्हाला खोटं वाटेल, मॅट्रिकचा निकाल लागल्यावर तुला किती परसेंटेज मिळालं,असा प्रश्न कोणीही कुणाला विचारत नव्हतं.

फक्त एवढंच विचारायचे ….

“पहिल्या झटक्यात पास झालास ना ?”

आणि आपण “हो” म्हणताच अख्ख्या गावाला आनंद व्हायचा !

म्हणजे पहा सुखाच्या , आनंदाच्या , मोठं होण्याच्या कल्पना किती छोट्या होत्या !

लक्षात घ्या. ज्या ज्या गोष्टीचा विस्तार होतो , त्या त्या गोष्टीतून दुःखच होतं .

तुम्ही बघा. पूर्वी गाव

 छोटं , घर छोटं , घरात वस्तू कमी , पगार कमी , त्याच्यामुळे शेवटचा आठवडा हमखास तंगी.

उसनंपासनं केल्याशिवाय प्रपंच होऊच शकत नव्हता. तरीही मजा खूप होती!

 

तुम्ही आठवून पहा. गल्लीतली एकही बाई किंवा माणूस हिरमुसलेलं किंवा आंबट चेहऱ्याचं नव्हतं !

उसनंपासनं करावंच लागायचं.

साखऱ्या , पत्ती , गोडेतेल , कणिक या गोष्टी गल्लीत एकमेकांना उसन्या मागणे हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्कच होता.

त्यामुळे कोणाकडे ‘हात पसरणे’ म्हणजे काहीतरी गैर आहे, असं आम्हाला कधी वाटलंच नाही .

उलट या गोष्टींची इतकी सवय होती की कोणत्याच गोष्टीचा कमीपणा वाटत नव्हता.

डोकं दुखल्यावर शेजाऱ्याकडे अमृत अंजनचं एक बोट उसनं मागायलासुद्धा अजिबात लाज वाटली नाही .

घरातल्या वडील माणसासाठी 10 पैश्याच्या तीन मजूर बिड्या किंवा 15 पैशाचा सूरज छाप तंबाखूचा तोटा आणतानाही मान कशी ताठ असायची !

 

कोणतीच गोष्ट कोणापासून लपून रहातही नव्हती आणि तसा प्रयत्नही फारसा कुणी करत नव्हतं !

गल्लीत एखाद्या पोरीला पाहुणे पहायला येणार, ही बातमी लपून राहूच शकत नव्हती.कारण शेजाऱ्या-पाजाऱ्याकडून पोह्याच्या प्लेट , चमचे , बेडशीट ,

 तक्के , उशा , दांडी असलेले कपं आदी साहित्य मागून आणल्याशिवाय ‘पोरगी दाखवायचा  कार्यक्रम ‘ होऊच शकत नव्हता !

आणि मित्र हो हीच खरी श्रीमंती होती , ते आत्ता कळतंय !

आणि हल्ली शेजाऱ्याच्या मुलीचं लग्न होऊन जातं, तरीही कळत नाही !

जेंव्हा Status वर डान्सचा व्हिडीओ येतो तेव्हा कळतं , अरे लग्न झालं वाटतं !

 

हे सगळं लिहिण्यामागचा एकच उद्देश आहे –

भेटत रहा , बोलत रहा , जाणे-येणे ठेवा , विचारपूस करा .

जेवलास का ?

झोपलास का ?

सुकलास का ?

काही दुखतंय का ? असे प्रश्न विचारताना लागलेला मायेचा , काळजीचा , आपुलकीचा कोमल     स्वरच जगण्याचं बळ देत असतो !

माणसाशिवाय ,    गाठीभेटीशिवाय , संवादाशिवाय काssssही खरं नाही !

कवी :अज्ञात

प्रस्तुती : सौ. सुचिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्त्री सक्षमीकरणाचे उदाहरण….!!! ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

🔅 विविधा 🔅

स्त्री सक्षमीकरणाचे उदाहरण….!!! सुश्री शीला पतकी 

वीस बावीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे मी सेवासदन शाळेमध्ये कार्यरत होते साधारण जून महिन्याच्या आसपास एक मध्यमवयीन महिला माझ्याकडे आली आणि म्हणाल्या बाई माझा मुलगा आपल्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करत होता तो दोन महिन्यापूर्वी वारला मला जरा धक्काच बसला कारण मुलगा अगदी तरुण होता 23 24 वर्षांचा त्यावर त्या बाई म्हणाल्या त्याची बायको वीस वर्षाची आहे तिचे काय करावे मला समजत नाही मी म्हटलं किती शिकली आहे ?त्या म्हणाल्या आठवी नापास झालीय… कारण घरामध्ये सावत्र आईचा त्रास होता त्यामुळे शाळेत जाऊ शकत नव्हती मग भावाची मुलगी म्हणून मी माझ्या मुलाला करून घेतली पण दुर्दैवाने एका वर्षातच हे असे घडले पोरगी देखणी आहे वयाने लहान आहे मी कामाला जाते घरात माझा तरूण मुलगा आहे म्हणजे तिचा दीरआहे मला काही सुचत नाही मी काय करू मी म्हणाले बाई शिकवा मुलीला शिक्षण द्या शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही धुणेभांडे करत ही मुलगी गेली तर तिच्यावर अनेक आपत्ती येऊ शकतात… मुलगी खरोखरच दिसायला खूप सुंदर होती. गोरा पान रंग बोलके डोळे लांब केस छान उंची बांधा हे सगळं सौंदर्य आता बाधक ठरणार होते .मी म्हणाले हिला शिकवा त्या म्हणाल्या आता कुठे शाळेत पाठवणार …मी म्हणाले माझ्या शाळेत पाठवा..

नापास मुलांच्या ..तिथे तिला आपण दहावी करून घेऊ आणि मग पुढचा मार्ग हुडकू….. त्यावेळेला आठ हजार रुपये फी होती मी त्यांना सांगितले 8000 रुपये फी भरावी लागेल त्या म्हणाल्या माझ्याकडे एवढे पैसे नाहीत मी म्हणाले फुकट शिक्षणाची किंमत नसते मी तुम्हाला एक मार्ग सुचवते… त्यावेळेला माझ्याकडे बालवाडीला सेविका हवीच होती मी त्यांना एक मार्ग सांगितला की सकाळी  8 ते 11 बालवाडीला सेविका म्हणून तीने काम करावे साडेअकराला शाळेत बसावे साडेपाचला शाळा सुटते जाताना परत साफसफाई करून तिने घरी जावे मी महिना तिला पाचशे रुपये देईन आणि हे पाचशे रुपये फी म्हणून ते कट केले जातील याप्रमाणे तिची काही रक्कम होईल त्यामध्ये मी थोडीशी भर घालून तिची ही भरेन फॉर्म फी मात्र तुम्हाला भरावी लागेल त्यांना ते पटलं पण आठवी नापास झालेली मुलगी चार वर्षानंतर दहावी पास होईल याबद्दल मात्र त्या साशंक होत्या मी त्यांना दिलासा दिला ही माझी जबाबदारी आहे तुम्ही काळजी करू नका त्या म्हणाल्या.. तुमच्या पदरात लेक म्हणून टाकते आहे तुम्ही सांभाळा मी म्हणाले हरकत नाही आता ती माझी जबाबदारी आहे याप्रमाणे कार्यवाही सुरू झाली मुलगी हुशार होती कामाला चपळ होती एकही दिवस शाळा बुडवायची नाही ठरलेलं होतं त्यामुळे शाळेला सुट्टी नाही काम उत्तम व नेटके करत होती अभ्यासाची गोडी वाढली अनेक शिक्षकांनी  आमच्या तिला प्रोत्साहन दिले त्यामुळे मुळात ती संस्थेत रमली थोडा वेळ मिळाला तरी अभ्यास करत बसायची परिस्थितीची जाणीव तिला उत्तम झाली होती या पद्धतीने तिचा अभ्यास सुरू झाला. पहिल्या चाचणीत तिला उत्तम गुण पडले तिचा उत्साह वाढला मुलगी खरंच हुशार होती पण खेडेगावात संधी मिळाली नव्हती हे सगळं ठरत असताना त्या बाईंनी मला सांगितले होते की हिच्या नवऱ्याचे दर महा मासिक घातलं जाते त्या दिवशी मात्र तिला दुपारच्या शाळेसाठी दोन तासाची सुट्टी द्यावी आणि ते कार्य दुपारी बाराला असते याप्रमाणे तिच्या नवऱ्याच्या मासिक घालण्याच्या दिवशी ती फक्त दोन तास उशिरा येत असे तिला पाहिल्यानंतर आमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक हळहळ असायची.. तिला काहीच कळत नव्हते संसार म्हणजे काय कळण्यापूर्वीच तिच्यावर हा घाला झाला होता त्यामुळे सगळेजण तिच्याशी प्रेमाने वागत होते आणि त्या प्रेमाच्या ताकतीनेच तिला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन मिळाले साधारण डिसेंबर महिन्यात तिची सासू माझ्याकडे आली जी तिची आत्या होती म्हणाली बाई एक विचार तुमच्याशी बोलायचाय.. मी म्हणाले बोला त्या म्हणाल्या माझ्या मुलाची एक लाखाची पॉलिसी होती ती हिच्या नावावर केलेले आहेत पण एवढ्याने तिचे आयुष्य संपणार नाही तेंव्हा तिचे दुसरे लग्न करण्याचा आम्ही विचार केला तर अन्य कुठला मुलगा बघून द्यावा तर पुन्हा त्यांच्या घरात काही प्रॉब्लेम निर्माण झाले तर पोरगी घरीयेईल  काही झालं तरी भावाची मुलगी आहे हो म्हणून ..अगदी खरे आहे मग काय विचार केलात त्या म्हणाल्या माझ्या धाकट्या मुलाला तिला करून घ्यावी म्हणते …खरंतर मला तिच्या या विचाराचे कौतुकच वाटले होते पण तरीही आईच्या सावध पणाने मी त्यांना म्हटलं का एक लाख रुपये आपल्या घरात राहावेत आणि तुमचा थोडासा अपंग असलेल्या मुलाला चांगली मुलगी मिळावी हा हेतू ठेवून हे लग्न करताय का त्या म्हणाल्या नाही हो बाई पोरीला सावत्र आई आहे बाप कुठवर बघणार माझ्या घरात तरी काय वेगळं आहे माझा नवरा आजारी पोरगा अपंग तिचा तो मुलगा झाडावरून पडून त्याचा हात आणि एक पाय याच्यामध्ये थोडास अपंगत्व आलं होतं बाकी मुलगा चांगला होता निर्व्यसनी होता एका दुकानात काम करत होता बाईच स्वतःचा घर अगदी भर पेठेत  होतं जुन्या चाळीत राहत असलेल्या घरालाच मालकाने त्यांना मालकी हक्क दिले होते त्यामुळे दोन खोल्यांच छप्पर डोक्यावर होतं बहिणीचा शेतीतला वाटा म्हणून भाऊ शेताचा माल आणून टाकत होता आता मुलीचा वाटा म्हणूनही थोडे अधिक देऊ शकला असता या सर्व दृष्टीने विचार करता अन्न वस्त्र निवारा आणि सुरक्षितता या सगळ्याच बाबतीत स्थळ वरचढ होतेच मी म्हणलं मुलीच्या वडिलांना बोलवून घ्या आमच्या संस्थेत ते मला भेटायला आले बरोबर त्यांच्या नात्यातले चार माणसही आली बोला चाली झाल्या लग्न ठरले पण मी त्यांना एकचअट घातली की लग्न रविवारी करायचं मुलगी शाळा बुडवणार नाही एका दिवसात फार खर्च न करता देवळात लग्न करायचे ठरले त्यांच्या गावाकडे म्हणजे त्यांचा जो देव होता तिथे जाऊन लग्न करायचे ठरले मग मुलीलाही चार गोष्टी समजून सांगितल्या अर्थात हे सगळे तिला एकटीला घेऊन समजून सांगितले तिला विचारले हे तुला चालणार आहे का दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तू त्याच घरात राहणार आहेस तुझी आणि नवऱ्याची बेडरूम जी होती तिथेच तुझी आणि तुझ्या दिराची बेडरूम असणार आहे त्याच घरात तुला वावरावयाचे आहे हे सर्व तुला नव्याने जमवता येईल का? तिची मानसिक तयारी चांगली झाली होती ती म्हणाली हो मी हे करेन तो दीर सुद्धा चांगला आहे आणि सासू तर माझी आत्याचा आहे आणि ती माझी आई पण आहे तरीही आई आणि बाई या नात्याने मी तिला दोन सूचना दिल्याचं मी तिला सांगितले तुझा पहिला नवरा तुझ्या या नवऱ्याचा भाऊ असला तरी त्याच्याबद्दल कुठलीही गोष्ट त्याच्याशी बोलू नकोस पुरुषांना हे आवडत नसते त्याची थोडी पडती बाजू आहे म्हणून त्याने तुला स्वीकारले आहे पण त्याचा अहंभाव दुखावेल असे पहिल्या नवऱ्याबद्दलचे काहीही शब्द तू त्याच्याकडे बोलू नकोस आठवणी सांगू नकोस हे पथ्यपाळ म्हणजे तुझा संसार सुखाचा होईल हे खरंतर खूप अवघड होते पण तिला निभावणे भाग होते झाले मग काय लग्न झाले सोमवारी नवी नवरी जावई पाया पडायला आले शाळा सुरू झाली जेमतेम दोन महिने राहिले होते परीक्षेला त्यानंतर आमची अभ्यासिका परीक्षा सराव परीक्षा हे सगळं पार पडलं आणि मुलगी 75 टक्के गुणांनी पास झाली ….मग पुढचा विचार सुरू झाला तिच्या नवऱ्याला आणि सासूला मी बोलवून घेतले आणि सांगितल की आता हिच्या पायावर उभे राहील असेच काही शिक्षणाला दिले पाहिजे ते दोघेही माझ्या शब्द बाहेर नव्हते लगेचच मी आमच्या इथे असलेल्या मुळे हॉस्पिटल मधील नर्सिंग कोर्सला तिला प्रवेश घ्यायला सांगितला गुण उत्तम असल्यामुळे तिला तीन वर्षाच्या नर्सिंग कोर्स प्रवेश मिळाला आता या तिन्ही वर्षात मुल होण्याचा अडथळा येता कामा नये याची दक्षता घ्या इतके मी त्यांना सांगितले खरं तर इतक्या बारीक गोष्टी होत्या पण काय करणार इलाज नव्हता आणि त्यांनी हे सगळं वेळोवेळी ऐकल…अतिशय सद्भावनेने! त्यानंतर ती त्याही परीक्षेमध्ये अव्वल गुणाने पास झाली आणि लगेचच तिला तिची सासू ज्या हॉस्पिटलमध्ये काम करत होती त्याच डॉक्टर महिलेने तिला आपल्याकडे जॉईन करून घेतले नोकरीतल्या सुरक्षिततेचा प्रश्न संपला नोकरी घराजवळच होती आणि मंडळी अत्यंत विश्वासू आणि खूप चांगली होती आज ती तिथे उत्तम काम करीत आहे दहा हजारहून चांगली प्राप्ती आहे दोन गोंडस मुले झाली आहेत संसार सुखाचा चालला आहे स्त्री सक्षमीकरणाचे उदाहरण यापेक्षा काय वेगळे असेल…! मी असा हात अनेकांना देण्याचे ठरवले तरी श्रद्धा ठेवून यांच्याकडून आपले काही भले होईल अशा विश्वासाने काही चार गोष्टी ऐकल्या तर खूप चांगले घडू शकते याचे हे उदाहरण आहे आज कधीतरी ती आपल्या मुलांना घेऊन माझ्या भेटीला येते तिच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आणि संसारामध्ये असलेले सुख समाधान हे मला वाचता येते आणि लक्षात येतं की हे केवळ शिक्षणाने घडले आहे दहावी परीक्षा पास होणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण त्यानंतर तुम्हाला अनेक वाटा मिळू शकतात ज्या वाटांवर तुम्ही स्वतःचा उदरनिर्वाह करू शकाल अशा गोष्टी तुम्हाला सापडतात लक्षात ठेवा शिक्षणाशिवाय पर्याय नसतो न शिकलेली मोठी झालेली माणसंही आहेतच पण ते वेगळे शिक्षणाने येणारे सामंजस्य आणि विचार यांनी माणूस नुसता मोठा होत नाही तर सुखी होतो म्हणून माझे सगळ्यांना सांगणे आहे शिका आपल्या आसपास असणार्या व्यक्तींना शिकायला प्रोत्साहन द्या जमलं तर एखाद्याला लिहायला वाचायला शिकवा आणि त्याच्या आयुष्यात आनंद निर्माण करा शिक्षणाने माणूस स्वतःच्या आयुष्याचा काही वेगळा विचार करू शकतो आणि सक्षम होऊ शकतो याचे हे सुंदर उदाहरण आहे…! मग काय करा सुरुवात जून मध्ये एखाद्या मुलीला शाळेत घालण्यासाठी मदत करा शिक्षणापासून वंचित असणाराना शिक्षणाची गोडी लावा त्याला प्रवाहात आणा इतके तरी आपण करू शकतो ना…….!

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ खजिना… ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ खजिना… ☆ सौ राधिका भांडारकर ☆

मी स्वतःला नेहमीच भाग्यवान समजते. त्याला तशी अनेक कारणे आहेत पण त्यातलं मुख्य कारण म्हणजे मला खूप मित्र आणि मैत्रिणी आजही आहेत.  मी जिथे जाते तिथे माझी कोणाशी ना कोणाशी मैत्री होतेच आणि ती सहजपणे घट्ट होत जाते.

आयुष्याच्या टप्प्याटप्प्यावर माणसं भेटतात.  काही कालपरत्वे  स्मृतीआड होतात तर काही मात्र आपल्याबरोबर आयुष्यभर सोबत राहतात.  घट्ट मैत्रीच्या रूपात. अगदी जीवाला जीव देणारे वाटावेत  इतके जवळचे असतात ते!

मैत्रीचा पहिला टप्पा असतो तो बालपणीचा, शालेय जीवनातला.

अशी एक सर्वसाधारण भावना,समजूत आहे की बालपणी जी मैत्री होते तशी आयुष्याच्या पुढील जाणत्या टप्प्यात ती कुणाशीही  होऊ शकत नाही. खोटं नसेल, खरंही असेल पण माझा मात्र अनुभव असा नाही.  सत्तरीनंतर माझी अनेक  परिवाराशी अॉनलाईन मैत्री झाली आणि काय सांगू? किती नावं घेऊ? प्रत्येक जण माझ्यासाठी जिवलग आहे. माझ्या हाकेला ‘ओ’ देणारी अनमोल रत्ना सारखी  माणसं मला इथे भेटली आणि याची जाणीवच मला खूप सुखद वाटते.

पण तरीही भूतकाळात रमताना अनेक चेहरे माझ्यावर आजही माया पाखडताना मला जाणवतात.  पुरुषांच्या बाबतीत ‘लंगोटीयार’ असा घट्ट मैत्रीच्या बाबतीत वापरला जाणारा शब्द आहे.  स्त्रियांच्या बाबतीत मी मैत्रीविषयी माझा स्वतःचाच  शब्द योजिते. ‘चिंचाबोरांची मैत्री.’ या रिंगणातल्या माझ्या सख्यांनी तर माझा बालपणीचा काळ अधिक रम्य केला आहे.

कुठलीही  समस्या त्यावेळी गंभीरच असते ना? त्यावेळी गृहपाठ केला नाही म्हणून बाई रागावल्या, शाळेच्या पटांगणात खेळताना दाणकन्  पडून जखमी झाले,  कधी कुठल्यातरी कार्यक्रमातून डावललं  गेलं, एखादं खूप कठीण गणित सुटलं नाही, परीक्षेच्या वेळी आजारी पडले, शालेय सहलीला जाण्यासाठी घरून परवानगी मिळाली नाही, स्पर्धेत नंबर आला नाही अशा आणि अशा तऱ्हेच्या अनेक भावनिक प्रसंगी माझ्या जिवलग सख्या माझ्यासोबत सदैव राहिल्या आहेत.  खरं म्हणजे आता भेटीगाठी होत नाहीत. आयुष्याच्या वाटेवर मैत्रिणींची खूप पांगापांग  झाली पण मनात जपून ठेवलेली मैत्री मात्र तशीच उरली.  आता या वयात कधीतरी कुणाकडून तरी,

“ती गेली” अशा बातम्या कानावर  येतात पुन्हा ती चिंचाबोरं,  त्या लंगड्या,  फुगड्या, कट्टी—बट्टी आठवते. आयुष्यात सगळं काही धरून ठेवता का येत नाही याची खंत वाटते.

त्यादिवशी वेस्टएन्ड मॉलमध्ये मी फिरत होते आणि दुरून एक हाक आली. “बिंबाsss”

या नावाने इथे मला हाक मारणारं  कोण असेल? मी मागे वळून पाहिले आणि मीही तितक्याच आनंदाने चक्क आरोळी ठोकली.

“भारतीsss”

दुसऱ्या क्षणाला आम्ही एकमेकींच्या गळ्यात. हातातल्या पिशव्या, भोवतालची माणसं, आवाज, गोंगट कशाचेही  भान आम्हाला राहिले नाही.  वयाचेही नाही.

“किती वर्षांनी भेटतोय गं आपण आणि तुझ्यात काहीही बदल नाही..!”

यालाच म्हणतात का जीवाभावाची मैत्री? मग पुढचे काही तास त्या रम्य भूतकाळात विहरत राहिले.

मी बँकेत नोकरी करत असताना माझा एक दोस्त होता. त्याला मी ‘मिस्टर दोस्त’ म्हणत असे. संसार सांभाळून नोकरी करणं हे कधीच सोप्पं नव्हतं. कालही नव्हतं  आणि आजही नाही पण या माझ्या दोस्ताने मला त्या काळात,  प्रत्येक आघाडीवर जी मदत केली ती मी कधीही विसरू शकणार नाही.  एकदा तर मी कंटाळून माझा राजीनामाही तयार केला होता.  त्या दिवशी याच माझ्या दोस्ताने मला जो मानसिक आधार दिला त्यामुळेच माझी नोकरी टिकून राहिली असे मी नक्कीच म्हणेन. कुठल्याही समस्येच्या वेळी त्याच्या नजरेत हेच निर्मळ भाव असायचे,

“मै हूँ ना!”

माझ्या या मित्र परिवाराच्या यादीत डॉक्टर सतीशचे नाव खूप ठळक आहे. दैनंदिन जीवनात येणाऱ्या अनेक मानसिक, शारीरिक, आर्थिक, कौटुंबिक समस्येत तो माझ्याबरोबर असायचाच पण एका प्रसंगामुळे  ‘मला सतीश सारखा मित्र मिळाला’ याचे खूप समाधान वाटले होते.

कठीण समय येता कोण कामास येतो? अथवा फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इंडीड किंवा अमित्रस्य कुत: सुखम्  यासारख्या उक्त्या आपण वाचतच असतो पण प्रत्यक्षात जेव्हा जीवनात त्याचा अनुभव येतो,  तो क्षण असतो खरा भाग्याचा! अमेरिकेहून भारतात परत येण्याच्या काही दिवस अगोदरच मला किडनी स्टोनचा भयंकर मोठा अॅटॅक आला होता. सतीशला,  माझ्या मिस्टरांनी कळवले. ते कळताक्षणी त्याने सांगितले, “तुम्ही ताबडतोब भारतात या. आपण इथेच ट्रीटमेंट घेऊ, सर्जरी करू. मी सगळी व्यवस्था करतो. काही काळजी करू नकोस.”

जळगाव स्टेशनवर पहाटे तीन वाजता माझा मित्र आम्हाला घ्यायला आला होता. वास्तविक तो गाडी आणि ड्रायव्हर पाठवू शकत होता पण तो स्वतः आला. जळगाव शहरातला अत्यंत व्यस्त आणि नामांकित सर्जन अशी ख्याती असलेला हा माझा मित्र स्वतःच्या प्रतिमेचा विचार न करता केवळ मनातल्या तळमळीने,काळजीने,  मैत्रीसाठी आम्हाला स्टेशनवर घ्यायला आला होता. तेही अशा अडनेड्या वेळी. गाडीतून उतरताच त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि त्या प्रेमळ स्पर्शाने माझा आजारी चेहरा क्षणात खुलला.”आता मी बरी होईन” असा दिलासा मला मिळाला.

जीवाभावाचे मित्र मैत्रिणी यांचा विचार जेव्हा माझ्या मनात येतो तेव्हा आणि माझ्या आयुष्यात पुन्हा एकदा डोकावून बघताना जाणवते की बाल्याचा उंबरठा ओलांडतानाच आई ही कधी मैत्रीण झाली ते कळलंच नाही आणि वडील तर फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड  होतेच. हे सारे संस्कार मित्र!  यांचे आयुष्यातले स्थान ते नसतानाही आबाधित आहे आणि खरं सांगू का? बाहेरच्या जगात तर खूप मोठा मित्रपरिवार होताच पण घरात आमचा पाच बहिणींचा समूह होता. आजही आम्ही तितक्याच घट्ट मैत्रिणी आहोत. बहिणींपेक्षा जास्त मैत्रिणी. जीवाला जीव देणाऱ्या.  कुणाच्या आयुष्यात थोडं जरी खुट्टं  झालं की आमचा मजबूत वेढा असतो एकमेकींसाठी.

माझ्या घरात बारा वर्षे काम करणारी माझी बाई माझ्यासाठी कधी मैत्रीण झाली ते कळलंच नाही. तिला मी मैत्रीण का म्हणू नये? कामाव्यतिरिक्त आम्ही दोघी एकमेकींच्या जीवन कहाण्या एकमेकींना कित्येकदा सांगत असू. आमच्यामध्ये एक निराळाच बंध विणला गेला होता. तो स्त्रीत्वाचा होता. मी तर तिला माझी कामवाली म्हणण्यापेक्षा मैत्रीणच म्हणेन.

तशी तोंडावर गोड बोलणारी,’ओठात एक पोटात एक’ असणारी अनेक माणसं भेटली. ज्यांच्याशी मैत्री होऊ शकली नाही त्यांना मित्र/मैत्रीण तरी का म्हणायचे? ते मात्र फक्त संबधित होते.

माझ्यासाठी जीवाभावाच्या मैत्रीची आणखी एक व्याख्या आहे, नेहमीच काही संकटात मैत्रीची परीक्षा होत नाही. खरी मैत्री जी असते, ज्या व्यक्तीबरोबर आपण कम्फर्टेबल असतो, ज्या व्यक्तीबरोबर आपल्याला न्यूनगंड जाणवत नाही, सगळी बाह्य, ऐहिक  अंतरे सहज पार होतात, जिला आपण अगदी मनाच्या तळातलं विश्वासाने सांगू शकतो आणि जिला आपलं ऐकून घ्यायचं असतं.  भले तिच्याकडे आपल्या प्रश्नांची उत्तरे नसतील पण तिच्या खांद्यावर आपण डोकं टेकवू शकतो.

मी भाग्यवान आहे. मला असे मित्र-मैत्रिणी आजही आहेत आणि तोच माझा खजिना आहे, आनंदाचा ठेवा आहे.

हा विषय इतका व्यापक आहे की माझाच कागद अपुरा आहे.

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares