☆ ‘‘माझा व्यायाम शाळेतील पहिला (आणि बहुधा शेवटचा) दिवस !!’’ ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆
(…नुकताच जागतिक योग दिन साजरा झाला .. त्यानिमित्त….एक सुरम्य आठवण …)
आधीच मला व्यायामाचे वेड! (?) त्यात वेळ न मिळाल्याचे कौतुक! त्यामुळे गेली कित्येक वर्षं सर्वांनी सांगून, समजावूनही, मला व्यायाम किंवा ‘योग’ नावाची गोष्ट, मुद्दामहून कधीच करायचा योग आला नव्हता! शिवाजी पार्कला राहत असताना, घरासमोरच्या समर्थ व्यायामशाळेत रोज सकाळ-संध्याकाळ, शेकडो मुलं झरझर मल्लखांब करताना, व्यायाम करताना पाहून मला खूप कौतुक वाटे. आपणही असेच सुटसुटीत असावं, असं वाटे!
अलीकडेच मी व्यायामशाळेचे प्रमुख, शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित असलेल्या श्री. उदय देशपांडे सरांनी केलेल्या विनंतीमुळे , व्यायामशाळेची विश्वस्त आणि आजीव सभासदही झाले. मी विचार केला, ‘चला, आपणही हातपाय हलवून पाहूया’, आणि मला कोण स्फूर्ती आली!!
तो सुदिन म्हणजे ७ जुलै…. माझा वाढदिवस! प्रत्येक वाढदिवसाचा निश्चय, हा नव्या वर्षातल्या पहिल्याच दिवशी करतात, तशा संकल्पासारखा – मोडणाऱ्या मनोऱ्यांसारखाच असतो, हे मला ठाऊक असूनही, मी पहाटे ६ वाजता व्यायाम शाळेत हजर झाले. तिथली उत्साही मंडळी उशा, चादरी घेऊन आली होती , तसे मी काहीच नेले नव्हते. प्रशिक्षक मॅडमनी ‘शवासना’पासून सुरुवात केली….. आणि इथेच तर खरा गोंधळ झाला…!
सर्वांनी शरीरे जमिनीवर झोपून सैल सोडली. मॅडमच्या सांगण्यानुसार, पायाच्या बोटापासून प्रत्येक जण डोळे मिटून, लक्ष केंद्रित करत होता. नंतर बराच वेळ काय चालले होते, हे मला कळलंच नाही. काही वेळाने मी दचकून डोळे उघडले, आणि पाहते तो काय?…. आजूबाजूला रंगीबेरंगी कपड्यातले बरेच पाय….. हवेत लटकताना दिसले!! मी तर पुढच्या कुठल्याही सूचना ऐकण्यापूर्वीच कुंभकर्णासारखी ठार झोपले होते तर!! नेहमीप्रमाणे ताबडतोब स्वप्नही सुरू झाले होते… कुठे दगडावरही मेली छाऽऽन झोप लागण्याची ही माझी जुनीच सवय! माझा हा अवतार पाहून, प्रशिक्षक मॅडम मला शेवटी म्हणाल्या, “अहो, सॉरी हं.. तुम्ही इतक्या छान झोपी गेलात ते पाहून आणि सेलेब्रिटी म्हणून तुम्हाला कसं उठवू? असं झालं मला!” हे ऐकून तर मला वरमल्यासारखंच झालं. पण गालातल्या गालात हसूही फुटलं!
त्यामुळे ‘शवासन’, हा माझ्यासाठी एकमेव सर्वांगसुंदर व्यायामाचा आणि परमेश्वरी कृपाप्रसादाचा प्रकार आहे, असं मी आजवर मानत आलेय!!!
सावित्री आहे भारतीय स्त्रीच्या प्रखर आत्मभानाचे,भारतीय युवतीच्या अपार संघर्षशील वृत्तीचे प्रतीक.
सावित्री आहे आपल्या इतिहासातील एक लखलखती तेजस्विनी,जी स्वतःच्या ईप्सितापासून तसूभरही ढळली नाही.सावित्री माणसाच्या मनातली ती तीव्र अभीप्सा आहे जी आपले उच्च ध्येय प्राप्त करण्याकरता मृत्यूवरही मात करते.
मानवजातीच्या कल्याणाकरता पित्याने केलेली तपश्चर्या, त्याचे तेजस्वी फलित असलेल्या कन्येचे डोळस संगोपन, तिच्या मनात त्याच उदात्त ध्येयाची रुजवण आणि तिच्याकडून त्याला मिळालेला उत्कट प्रतिसाद म्हणजे सावित्री.
सावित्री दैवी गुणसंपदेचा अविष्कार.
सावित्री स्वयंनिर्णयाचा अधिकार.
सावित्री स्वातंत्र्याचा उद्गार.
सावित्री ईश्वरदत्त प्रेमाचा स्वीकार.
सावित्री क्रूर नियतीचा अस्वीकार.
सावित्री तडजोडीला नकार.
सावित्री कठोर कर्माचा आचार.
सावित्री अतूट निष्ठेचा व्यवहार.
सावित्री योगाचा ओंकार.
सावित्री मानवी प्रगतीचा विचार.
सावित्री साहचर्याचा उच्चार.
सावित्री निसर्गस्नेहाचा प्रचार.
सावित्री मानवी पूर्णतेला होकार.
सावित्री आदिमायेचा अवतार.
सावित्री उत्क्रांतीचा आधार.
भारतातील प्रगत विचारांचा पुरावा आहे सावित्री.कन्येला पुत्राप्रमाणेच सुशिक्षित करून,तिला वर निवडीचे स्वातंत्र्य देऊन एकटीला वर संशोधनाला पाठवणारे मातापिता..
तिच्या निवडीचे आयुष्य केवळ एक वर्ष आहे हे कळल्यावरही तिच्या निर्णयाच्या पाठीशी उभे राहणारे..
तिच्या वनात रहाण्याला आक्षेप न घेता,ढवळाढवळ न करता तिच्या संघर्षाला दुरून पाठबळ देणारे.
सावित्रीच्या मनातही काही केवळ सुस्वरूप तरुणाशी विवाह करून सुखाने राहण्याची मर्यादित इच्छा नव्हती.तिच्या मनात होते एक भव्य,अमर्याद स्वप्न. ते साकार करण्यात तिला साह्य करेल असा जोडीदार तिने डोळसपणे निवडला. त्याचे भविष्य समजल्यानंतरही तिने प्रत्यक्ष नियतीशी लढायचे ठरवले
आणि ती जिंकली !
काय केलं तिनं त्यासाठी?
तिनं जे केलं ते पतिसेवा,व्रतवैकल्ये, उपासतापास, वडाखालचा ऑक्सिजन याच्यापार पलीकडचं आहे.
Women empowerment,
liberal thoughts,
manifestation,
law of attraction,
goal setting,
parenting…… अशा अनेक आधुनिक संकल्पनांच्या पार पुढे गेली आहे सावित्री.
मानवाकरता तिनं दीर्घायुष्याचं वरदान मिळवलं यमाकडून.आणि त्याकरता यमाकडून मानवजातीकरता आणला योग..महायोगी श्रीअरविंद यांना या कथेतील दिव्यत्व जाणवले आणि त्यांनी या कथेला एका उच्च आध्यात्मिक दृष्टीने आपल्या सावित्री या इंग्रजी महाकाव्यातून मांडले.
ही नवी दृष्टी स्त्रियांनाच नव्हे समस्त मानवजातीला आत्मभान देणारी आहे.
☆ शिवकालीन चमत्कार, ‘ विषपरीक्षा दीप ‘! — लेखक : श्री मकरंद करंदीकर ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆
तीनशे वर्षे महाराष्ट्र आणि पूर्ण हिंदुस्तान, सर्व प्रकारचे जुलूम,अत्याचार,अन्याय सहन करीत होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने या राष्ट्राला एक मोठाच आधार लाभला. शत्रूच्या अत्याचाराविरुद्ध त्याच्याच भाषेत,सज्जड उत्तर देऊ शकणारा एक महान अवतार जन्माला आला. शिवाजी महाराजांचा एकेक पराक्रम म्हणजे शत्रूला धडकी भरवणारा, शत्रूच्या कुटीलपणाच्या चिंध्या उडवणारा आणि इथल्या माणसांना न्याय देणारा होता.
अशा या महापराक्रमी राजाच्या राज्याभिषेकाला येत्या ६ जून २०२४ ( २० जूनला शिवशक ) रोजी ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. आपल्या आयुष्यामध्ये आलेला हा एक सुवर्णामृत योगच म्हणायचा ! माझा यानिमित्ताने शिवराज्यमहोत्सव@३५० या विशेष लेखमालिकेमध्ये, शिवचरित्र आणि कर्तृत्व, किल्ले, वस्तू, वास्तू इत्यादींसंबंधी काही विशेष, वेगळे लेख देण्याचा प्रयत्न आहे. त्यातील हे पहिले पुष्प !
महाराजांच्या कित्येक मोहिमा, लढाया, शिष्टाई, योजना, त्यांची विचारातील अद्भुतता, अभिनवता यावर खरे तर अनेक प्रबंध लिहिला येतील. त्यांची तलवार, शिरस्त्राण, वाघनखे, आग्र्याहून निसटताना वापरलेले पेटारे, अनेक वेगळी शस्त्रे हे सारेच अद्भुत होते. अनेक गोष्टी कालौघामध्ये नष्ट झाल्या, काही फक्त कागदोपत्री उरल्या.तर कांही देशविदेशातील संग्रहालयात आढळतात.
असाच एक आजही अस्तित्वात असलेला आणि कल्पनेत सुद्धा खरा वाटणार नाही असा एक शिवकालीन दिवा म्हणजे विषपरीक्षा दीप ! पूर्वी कुठल्याही राजाला अन्नातून विषप्रयोग करून मारण्याचा सतत धोका असे. असे म्हणतात की मुगल राजे आपले अन्न खाण्याआधी ते एखाद्या नोकराला खायला लावीत असत. नोकराला काही झाले नाही तर मगच तो राजा ते अन्न खात असे. पण हा विषपरीक्षा दीप किंवा जहर मोहरा, हा दिवा खासच आहे. राजाला द्यायच्या अन्नाचा थोडा भाग आधी या दिव्यावर धरला जात असे. अन्नात जर विष असेल तर दिव्याचा आणि ज्योतीचा रंग पालटत असे. ज्योतीच्या बदललेल्या रंगावरून अन्नात कुठले विष मिसळले आहे हे देखील कळत असे.
माझ्या मते हा दिवा जेड या दगडापासून बनलेला असावा. जेडचा दगड काही प्रमाणात विष शोषून घेतो. काही रसायनांच्या संपर्कात आल्यामुळे त्याचा रंग पालटतो. पूर्वी युरोपातील सम्राट याच जेडच्या पेल्यामधून मद्यपान करीत असत. त्यांचे हे पेले विविध वस्तू संग्रहालयातून जपून ठेवलेले आढळतात. मद्यात दगाफ़टक्याने विष मिसळले गेले असले तर ते जेड मध्ये शोषले जात असे.
एखाद्या रसायनाची परीक्षा करण्यासाठी हल्ली प्लॅटिनम वायर फ्लेम टेस्ट केली जाते. रसायनात बुडविलेली प्लॅटिनमची तार, ज्योतीवर धरल्यास ज्योतीचा रंग पालटतो. पालटलेल्या रंगावरून ते रसायन ओळखता येते. विषपरीक्षा दीपाची ज्योत हा याचाच पूर्वीचा अवतार असावा. दिव्याच्या जेड या दगडाचा बदललेला रंगही, अन्नातील विषाचे अस्तित्व सिद्ध करते. माझा असाही कयास आहे की मीराबाईला दिले गेलेले विष हे एखाद्या इमानदार आणि माहितगार सेवकाने या जेडच्या पेल्यातून दिले असावे. जेडच्या गुणधर्मामुळे विष, पेल्यामध्ये शोषले गेले आणि श्रीकृष्णाचे नाव घेत घेत मीराबाई वाचली असावी.
छत्रपती शिवाजी महाराज व श्रीमंत पेशवे यांच्यापाशी असा विषपरीक्षा दीप होता असे म्हटले जाते. मी इतिहास संशोधक बाबासाहेब पुरंदरे यांना या दिव्याबद्दल विचारले. त्यांनी सांगितले की हा दिवा शिवकालीन आहे हे खरे आहे. पण हा दिवा छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरल्याचा कुठेही उल्लेख किंवा पुरावा नाही. याचे कारण महाराजांचे सेवक हे इतके विश्वासू होते की महाराजांवर दगाफटक्याने विषप्रयोग केला जाण्याची शक्यताच नव्हती. राजासाठी इमानदार सैनिक एक वेळ आपला जीव देईल पण महाराजांच्या जीवाला काही होऊ देणार नाही.
आपले सुदैव असे की दंतकथा वाटावी असा हा दीप आजही पुण्याच्या राजा दिनकर केळकर वस्तुसंग्रहालयात मूळ अस्सल स्वरूपात पाहायला मिळतो. या मूळ दिव्याचा मधला खांब अनेक ठिकाणी तुटल्यामुळे तो तारेने एकत्र बांधलेला दिसतो. मी या अस्सल दिव्यापुढे अनेकदा बसून या दिव्याचे चित्र तयार केले. यासाठी अनेकदा मुंबई – पुणे – मुंबई केले. त्याची मापे मोजली. नंतर या चित्रानुरूप हुबेहूब तसाच दिवा बनवून घेतला. ( सोबतचे छायाचित्र पाहावे ). ही एक दुर्मीळ वस्तू माझ्या संग्रहात समाविष्ट झाली.
लेखक : मकरंद करंदीकर.
(महत्वाची सूचना – यातील दिव्याचा फोटो खूपच दुर्मीळ आहे. फोटो पाहण्याची प्रत्येकाला उत्सुकता असते. म्हणून कृपया आपण हा लेख फॉरवर्ड केल्यास यातील फोटोही जरूर फॉरवर्ड करावा. फोटो व्हॉट्स ॲपवर पाठविताना प्रथम आपल्या फोनवर डाऊनलोड किंवा सेव्ह केल्याशिवाय फॉरवर्ड होत नाहीत.)
प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “माझी पहिली देवी…” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆
अन्नपूर्णेमध्ये पहिली देवी आपली आई!
आज जेव्हा आपण वयस्कर व्हायला लागलो, तेव्हा कळतं की आईने आपल्याला बिनतक्रार, किती कष्ट करून, रांधून खाऊ घातलं! घरात माणसं भरपूर. एकत्र कुटुंबपद्धती. येणारा पैसा तुटपुंजा. पण त्याही परिस्थितीत तिने सगळ्याची सांगड घालून आपल्याला चटणी, कोशिंबीर, भाजी, आमटी, भाकरी- पोळी असे रोजचे सुग्रास जेवण दिले. त्याकाळी इडली- वडे नव्हते. पण त्यातल्या त्यात जे नवनवीन करता येईल ,—-कधी सांजा, कधी उपीट, कधी गोडाचा शिरा, कधी थालीपीठ, धपाटी, डाळफळ, उपवासाची खिचडी भात, तांदळाची खिचडी, पोह्याचे पापड, उडदाचे पापड, तांदळाचे पापड, भरली मिरची, लोणच्याचे अनेक प्रकार, चिवडा, लाडू, साध्या पिठाचे लाडू….. किती सुंदर करत होती ते!
कोणतीही गोष्ट तिने वाया घालविली नाही. दुधाचे साईचे पातेले स्वच्छ धुऊन ते कणकेत मिसळले. बेरी काढून, त्यातच कणीक भाजून, साखर घालून त्याचे लाडू केले. भाकरीच्या उरलेल्या छोट्याशा पिठात थोडेसे डाळीचे पीठ घालून शेवटचे धिरडे म्हणजे पर्वणी असायची. त्याशिवाय सणावाराला होणारे वेगवेगळे पदार्थ, चारीठाव स्वयंपाक, गरमागरम पुरणपोळ्या, आटीव बासुंदी, श्रीखंड– घरच्या चक्क्याचे–, खरवसाच्या वड्या–, कणसाची उसळ, वाटल्या डाळीची उसळ…. आपण केलेल्या भोंडल्यासाठी केलेले दहा दिवसाचे विविध प्रसादाचे पदार्थ… हे सगळं करताना तिच्याजवळ श्रीमंती नव्हती. पण कोंड्याचा मांडा करण्याची युक्ती मात्र होती आणि मनामध्ये इच्छाशक्ती होती. कोणताही पदार्थ बाहेरून मागवल्याचे कधी आठवत नाही. कारळ, जवस, शेंगदाणे यांच्या चटण्या सदैव डबा भरून घरात असत.भरली मिरची, कांद्याचे सांडगे, कोंड्याच्या पापड्या… किती पदार्थाने घरातले डबे भरलेले असायचे!
खरंच या सर्व माउलींनी आपलं सगळं आयुष्य घराला जपण्यात घालवलं. त्या सगळ्या अन्नपूर्णांना आज साष्टांग दंडवत ! त्यामुळे आपण सुदृढ, उत्तम विचारांचे, बळकट मनाचे झालो. अगदी टोपलीभर भांडी आणि बादलीभर धुणं पडलं तरी चिंता न करता खसाखसा घासून मोकळे होणारी, कधीही कुठेही न अडू देणारी सुदृढ पिढी झालो, ही त्या माऊलींची पुण्याई आहे!
अन्नपूर्णांनो, तुम्ही होतात, म्हणून आम्ही अंतर्बाह्य सुदृढ झालो. तुम्हाला पुन्हा एकदा साष्टांग दंडवत!
लेखिका :अज्ञात
संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ उगवतीचे रंग – लॉरेन्सबाई, तुमचे चुकलेच..! ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
परवा पेपरमध्ये ( संदर्भ – महाराष्ट्र टाइम्स २४ जून २०२४ ) एक बातमी वाचली. प्रथम वाटलं आपलीच तर वाचण्यात काही चूक होत नाही ना ? म्हणून ही बातमी दोनदा वाचली. पण ती खरीच होती. माझीच समजून घेण्यात काहीतरी चूक होत होती. बातमी अशी होती, ‘ पूर्ण पगार देऊन काम न दिल्याने खटला. ‘ आता बातमीचं हे शीर्षक तुम्ही वाचलं तरी तुमचीही माझ्यासारखीच अवस्था होईल. कारण आपल्याकडे असा खटला कोणी भरण्याची सुतराम शक्यता नाही. बातमी अशी आहे. ‘ फ्रान्समधील एका महिलेने कंपनीला कोर्टात खेचले. सलग वीस वर्षे कोणतेही काम न देता पूर्ण पगार देऊन बसवून ठेवल्याबद्दल एका दिव्यांग महिलेने फ्रेंच टेलिकॉम कंपनी ‘ ऑरेंज’ विरोधात खटला दाखल केला आहे. या महिलेचं नाव आहे ‘ लॉरेन्स व्हॅन वॅसेनहॉव. ‘ ( याविरोधात कंपनीचं म्हणणं आहे की त्यांच्या सततच्या आजारपणामुळे आणि रजा घेण्यामुळे त्यांना काम देता आले नाही तर लॉरेन्सबाई म्हणतात की कंपनीने काही काम न दिल्याने त्यांची व्यावसायिक प्रगती खुंटली. आता यात न्यायालय काय निकाल द्यायचा तो देईल. आपल्याला त्याचा फारसा विचार करण्याची गरज नाही. )
आता मला सांगा लॉरेन्स बाईंचे हे चुकले नाही का ? कंपनीने काम नाही दिले म्हणून काय झाले ? पूर्ण पगार तर दिला ना ! त्यातही या बाई दिव्यांग ! तरी त्यांनी असे म्हणावे ? आपल्याकडे तर काही मंडळी काम नको म्हणून दिव्यांग असल्याचा दाखला मिळवतात असेही ऐकिवात आहे. खरं म्हणजे ‘ असा दिव्यांग दाखला ‘ मिळवताना त्यांना केवढा त्रास होत असेल, संबंधितांना कदाचित काही पैसेही द्यावेही लागत असतील. पण त्या बिचाऱ्यांचा विचार आपल्याकडे केला जात नाही.
आपल्याकडील नोकरी करणाऱ्या महिलांना जर लॉरेन्सबाई भेटल्या तर काही महिला त्यांचा हेवा करतील. त्यांना म्हणतील, ‘ तुमचे मागील जन्मातील काहीतरी मोठे पुण्य असावे हो. नाहीतरी अशी नोकरी ( काम न करता पूर्ण पगार देणारी ) कोणाला मिळते का ?
योगायोगाने याच मी महिन्यात युरोप ट्रीपसाठी गेलो होतो. त्या दौऱ्यात फ्रान्सचा समावेश होता. पण मला या लॉरेन्सबाईंची ही बातमी आताच इथे आल्यावर कळली. तिथे कळली असती तर या बाईंचा पत्ता शोधून मी त्यांना भेटायला गेलो असतो. त्यांना तुम्ही चुकता आहात अशी जाणीव करून दिली असती आणि त्या कंपनीविरुद्धचा खटला मागे घ्यायला लावला असता. पण एवढे महान कार्य आमच्या हातून होणे नव्हते. मला तर या काम न देता पगार देणाऱ्या कंपनीचा जाहीर सत्कार करावा असे वाटते. अशा कंपन्या भारतात येतील तर आमची केवढी सोय होईल ! बेकारी दूर व्हायला मदत तर होईलच पण आमच्याकडील सज्जन आणि प्रामाणिक माणसे अशा कंपनीला कोर्टात अजिबात खेचणार नाहीत. उलट आमच्याकडील माणसांसाठी ही सुवर्णसंधी ठरेल.
अरे कंपनीत काम नसले म्हणून काय झाले ? त्या ठिकाणी आम्हाला आमच्या मनाने पुष्कळ काही करता येईल. पूर्वी महिला देवळात कीर्तन प्रवचन वगैरे ऐकायला जायच्या. त्यावेळी त्या ते प्रवचन ऐकता ऐकता वाती वळत असत असे ऐकले आहे. आता आजच्या जमान्यात वाती वगैरे वळण्याचे काम राहिलेले नाही. पण ऑफिसमध्ये बसून विणकाम करणे, नवनवीन पदार्थांच्या रेसिपी शिकणे, मैत्रिणींशी फोनवर गप्पा किंवा चॅट करणे आम्ही सहज करू शकतो. त्या काळात आम्ही नवीन काही शिकू शकतो. अर्थात नवीन काही शिकलंच पाहिजे असं काही कंपनीचं बंधन असणार नाही. फक्त वेळेत येणं आणि वेळेत जाणं एवढंच आम्हाला करावं लागेल. ते आम्ही आनंदानं करू. अर्थात या सगळ्यांना गोष्टींना काही मोजके अपवाद असतीलही. त्यांना असं काम न करता पगार घेतलेला आवडणार नाही. पण आपण त्यांचा विचार कशाला करायचा ! लोकशाहीत बहुमत फार महत्वाचे !
तेव्हा तुम्हाला म्हणून सांगतोकी ही लॉरेंसबाई जर यदाकदाचित भारतात आलीच तर ते आम्हाला मुळीच आवडणार नाही. अरे, पूर्ण पगार देऊनही तक्रार करते म्हणजे काय ? शिवाय कोणतेही काम न करता. स्वातंत्र्यपूर्व काळात वसाहतींमध्ये सुधारणा सुचवण्यासाठी सायमन कमिशन भारतात आले होते. त्यांना भारतीयांच्या रोषाला सामोरे जावे लागले. लोकांनी ‘ सायमन गो बॅक ‘ अशा घोषणा दिल्या. तसेच काहीसे या लॉरेन्सबाई भारतात आल्या तर होऊ शकेल. ‘ लॉरेन्स गो बॅक ‘ असे फलक चौकाचौकात लागतील.
मागे अशीच एक बातमी मी पेपरमध्ये वाचली होती. जपानचा राजा वृद्ध झाल्याने त्याने निवृत्तीची घोषणा केली. जपानमध्ये आता राजेशाही नसली तरी राजघराण्यातील व्यक्तींना मान दिला जातो. अगदी इंग्लंडप्रमाणेच. तर त्या जपानच्या राजाने निवृत्तीची घोषणा केली. आता मला सांगा वय झाले तरी हाती असलेली सत्ता सहजासहजी सोडून कोणी असे निवृत्त होतो का ? आपल्याकडे तर निवृत्तीच्या वयात जरा जास्तच उत्साहाने कार्यरत राहणारी मंडळी पाहिली की मन कसे अभिमानाने भरून येते. त्यांना निवृत्त होण्याचा सल्ला देणारांना ते वेड्यात काढतात. संगीत शारदा नाटकातल्या प्रमाणे ‘ म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान..’ त्या काळात पाऊणशे म्हणजे पंचाहत्तर वर्षे वय असले तरी ती व्यक्ती नवरदेव म्हणून लग्नासाठी तयार असायची. आता लग्नाचं जाऊ द्या हो पण राजकारणात तरी वयाचं ऐशीवं दशक ओलांडलं तरी सत्ता सोडण्याची आमची इच्छा नसते. तेव्हा त्या जपानच्या राजाला काय म्हणावं ? बरं, खरी गंमत पुढेच आहे. त्या राजाचा मुलगा त्याचा वारस म्हणून त्याच्या गादीवर बसला. या आनंदाप्रीत्यर्थ जपान सरकारने लोकांना चक्क दहा दिवसांची सुटी जाहीर केली होती.
आपल्याकडे तर अशा निर्णयाचं मधुकर तोरडमलांच्या भाषेत सांगायचं तर मोठं हे केलं असतं, मोठा हा केला असती आणि मोठी ही केली असती. मोठं स्वागत केलं असतं, मोठा आनंद साजरा केला असता, मोठी मजा केली असती. फटाके फोडून स्वागत झाले असते. पर्यटनस्थळे फुल्ल झाली असती. त्याला जोडून लोकांनी अजून एकदोन आठवड्यांच्या सुट्ट्या घेतल्या असत्या. पण हे जपानी लोक सुद्धा त्या फ्रान्समधल्या लॉरेन्सबाईसारखे. त्यांना जपान सरकारचा हा निर्णय अजिबात आवडला नाही. या दहा दिवसात करायचे काय असा वेडगळ प्रश्न त्यांना पडला. या काळात उद्योग ठप्प होतील, उत्पादन बंद पडेल, देशाचे आर्थिक नुकसान होईल असा विचार त्यांच्या मनात आला. त्या सुटीऐवजी त्यांना ज्यादा काम करून तो आनंद साजरा करायला आवडले असते असेही काही जण म्हणाले. आपल्याकडे अशा लोकांना आपण मुर्खांच्या गणतीत काढू. चांगली दहा दिवस सुटी मिळाली. मस्त फिरायला जायचे किंवा आराम करायचा. मनसोक्त खायचे प्यायचे आणि एन्जॉय करायचे. काम तर नेहमी असतेच ना !काही लोकांना असे वाटते की फ्रान्स, जपान यासारख्या देशांची प्रगती लोकांच्या अशा दीर्घोद्योगी वृत्तीमुळेच झाली आहे. पण केवळ सुधारणा, प्रगती, देशहित यांचा सततच विचार किती करीत राहायचा ? आम्हाला आमचे काही वैयक्तिक आयुष्य आहे की नाही ? आम्ही हौसमौज तरी केव्हा आणि कशी करायची ? छे ! छे ! लॉरेन्सबाई तुमचे आणि जपानी नागरिकांचे हे चुकलेच !
सौरभ तुझं कौतुक करावं तेव्हढं थोडं आहे. नव्हे नव्हे ते शब्दातीत आहे हेच खरं. जगाच्या भुकेला भाकरी देणाऱ्या त्या टोपी करांच्या अमेरिकन देशात शिक्षण घेऊन पुढील नोकरी व्यवसायात भक्कमपणे पाय रोवून राहिलास… आपली बुद्धिमत्ता नि कौशल्य दाखवून त्या गोऱ्या सायेबाला भारतीय काय चीज असते हे दाखवून दिलास.. जिथं शिष्टाचार चा धर्म नि घड्याळाचा पायबंद असतो अशी व्यावसायिकतेच्या मानसिकतेचा आपदधर्म मानला जातो आणि कर्तव्यापुढे बाकी सारी गोष्टी फिजूल मानल्या जातात या तत्त्वनिष्ठेची विचारसरणीचा लोकमानस..अश्या ठिकाणी तू आपल्या कर्मनिष्ठेला एका उंचीवर नेऊन ठेवलसं… हे किती प्रशंसनीय आहे.. तू भारतीय त्यात मुंबई कर असल्याने आमचा उर अधिक अभिमानाने भरून येतो… या शिवाय तुझा क्रिकेट खेळाची आवड मनापासून जपली नाहीस तर त्यासाठी वेळ देऊन सराव केलास.. जीव तोडून मेहनत घेतलीस… त्या युएसए च्या क्रिकेट संघात प्रमुख गोलंदाज म्हणून निवड झाली.. ती निवड किती सार्थ होती हे त्या ट्वेंटी२० च्या विश्वचषक 2024च्या पहिल्या प्राथमिक सामन्यात दाखवून दिलसं.. बलाढ्य नि चिवट असलेल्या पाकिस्तानी संघाला धूळ चारलीस.. भारतीय संघातले दोन दिग्गज मोठ्या फलंदाजानां पहिल्या दोन षटकातच तंबूचा रस्ता दाखविलास… तुझी हि देदीप्यमान कामगिरी पाहून आपल्या देशातील क्रिकेट नियामक मंडळाला खेळात राजकारण आणल्याने किती घोडचूक होऊन बसते याचा न दिसणारा पश्चताप जाणवून गेला…तसा तुमचा युएसए चा संघ सरमिसळ खेळाडूंचा असला तरीही त्यात जबरदस्त बाॅंन्डींग आहे हे दिसून येत होतं…युएसए मधे आजवर क्रिकेट खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर होत नसे पण तोच आता तुमच्या या संघाची विजयी घौडदौड पाहता हा खेळ लवकरच या देशाच्या मातीवर बहरणार यात शंका नको… सौरभ तुला व्यतिश: आणि तुझ्या संघाला माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा… तूझी खेळातली प्रगतीची कमान चढती राहो… एक मराठी माणूस केवळ आपल्याच भुमीत राहून नव्हे तर साता समुद्राच्या पलीकडे जरी गेला तरी आपल्या कर्तबगारीचा झेंडा फडकवत असतो.. हेच यातून दिसून येतं.. किती लिहू नि किती नको असं वाटून गेलयं.. आमचीच दृष्ट लागू नये म्हणून हा लेखप्रपंच इथेच थांबवतो…
जाता जाता सौरभ आणखी एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा राहून गेला. तो म्हणजे तू ज्या ऑर्गनायझेशन मधे सेवा देत आहेस तिथल्या तुझे सगळ्या बाॅस ना माझा मानाचा मुजरा सांग बरं… त्यांनी तूझ्या खेळात यत्किंचितही आडकाठी उभी केली नाही.. उलट जसं जसे संघाची एकापाठोपाठ एक विजयी घोडदौड सुरू झाली आणि त्यांनी तुला चक्क हि स्पर्धा पूर्ण होईपर्यंत विशेष रजेची सुट दिली…तिथेच व्यवस्थापन नि एम्पाॅलई यांचं सुंदर निकोप नातं दिसून आलं.. देशाचं नावं, कंपनीचं नावं नि खेळाडूचं नावं याला त्या ऑर्गनायझेशनने प्राधान्य दिलं… नाहीतर आपल्या इकडे साहेब नावाचा खडूस नमुना कायमस्वरूपी एम्पाॅलईजच्या मानगुटीवर बसलेला दशमग्रह… साधी गरजेसाठी घ्यावी लागणारी किरकोळ रजा नामंजूर करण्यात ज्याला आसुरी आनंद घेण्यासाठीच जन्माला आलेला असतो ,तो काय खेळाच्या सरावासाठी अर्ध्या दिवसाची सवलत, सामने खेळायला विशेष रजेची मंजुरी किंवा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा, सामने असले नि आपलाच एम्पाॅलई त्यात एक खेळाडू सहभागी आहे याचं थोडंतरी कौतुक, खिलाडूवृत्ती दाखविण्याची सुतराम शक्यता नाहीच… सांगायचं इतकंच प्रगतीपथावर असलेल्या आमच्या देशाला अजून बऱ्याच गोष्टी प्रगतीशील देशाकडून शिकण्यासाठी बराच वाव आहे… बरं झालं तू युएसए मध्ये आहेस आणि त्यांच्या संघातून खेळतोस… इथं असतास तर … सौरभ नेत्रावळकर एक इंजिनियर एव्हढीच माफक पुसटशी ओळख मिळाली असती….
एका केअर सेंटरला…..म्हणजे वृद्धाश्रमाला भेट द्यायला गेले होते. त्या दिवशी तिथे दोन मुली येऊन खुर्चीवर बसून ..करायचे हातापायाचे व्यायाम शिकवणार होत्या. मी इकडे तिकडे फिरत आश्रम बघत होते.
एक सावळा हसतमुख मुलगा पायाने थोडा लंगडणारा त्याची गप्पा मारत लगबग चालू होती. तो तिथला मदतनीस असावा.
” ए आजी तुला रोज गाऊन मध्ये बघतो आज साडी नेसलीस तर छान दिसते आहेस . इतकी कशाला नटली आहेस? ….काय दाखवायचा कार्यक्रम आहे का ? “
” हो आता 75 व्या वर्षी करते परत लग्न “ती हसत हसत बोलली.
” ए आजी चल आटप… तुझे ते दोन घास राहिले आहेत ते खाऊन घे”
” अगं आजे झालं उन्हात बसून… चल आता आत ये .. चक्कर येईल नाहीतर”
ए आजी ….ए आजे…असं म्हणत तो सगळ्यांशी गप्पा मारत होता. इतक्यात एका आजींनी त्याला हाक मारली ..
” बरं बाबा तुझ्या लक्षात येतं नाही तर माझ्या बीपीचं काही खरं नव्हतं बघ….”
” चला चला आज व्यायाम शिकायचा आहे ना”..
अस म्हणून त्यानी सगळ्यांना बाहेर आणून खुर्चीवर बसवायला सुरुवात केली.
एका आजीची ओढणी त्यांच्या पायात येत होती …. “कशाला घेतलीस ती ओढणी? पायात अडकून तूच पडशील बघ.. कोण बघतय तुला ? ” .. अस म्हणून त्यानीच ती काढून आत कॉटवर नेऊन ठेवली.
सगळ्याजणी येऊन बसल्यावर त्या मुली शिकवायला लागल्या .
तो त्यांचा व्हिडिओ काढायला लागला.
” अरे सगळे इतके गंभीर का? जरा हसा की…. ओ ताई तुम्ही त्यांना हसत हसत करायला सांगा बरं…”
मग त्यानीच हात वर केले की हा.. हा.. हा …म्हणून हसायला सांगितलं.
वातावरणच बदललं .त्या मुलींना पण शिकवायला गंमत वाटायला लागली.
इतरांना हसवणाऱ्या त्या मुलाकडे मी बघत होते. त्या लेकराच्या जीवनात कसला आनंद होता? तरी तो इतरांना आनंदी ठेवत होता …
सगळ्यांचा तो लाडका होता.. ते पण आपुलकीने ,मायेने त्याच्याशी बोलत होते .आज माझे लक्ष त्याच्याकडेच होते.
“इतका वेळ बसलीस तर पाठ दुखेल तुझी “
असं म्हणून एका आजींना आधार देऊन तो रूममध्ये घेऊन जायला लागला.
मी त्याच्याकडे बघत होते .सहजपणे आपुलकीने तो वागत होता.तो तिथेच रहात होता…ह्या वयस्कर लोकांची सेवा करत होता.
आजकाल अस कोणाला बघीतलं की डोळे आपोआप भरून येतात. शिकत राहते त्यांच्याकडून….
… माझ्याही जीवनात अमलात आणायचा प्रयत्न करते..
त्या दोन मुली शिकवत होत्या .
अर्ध्या तासानी जेवायची वेळ होणार होती. तो सगळ्यांच्या रूममध्ये जाऊन जगमध्ये पाणी भरायला लागला होता.
…. प्रत्यक्ष पांडुरंग एकनाथांच्या घरी श्रीखंड्या बनुन पाणी भरत होता…….
त्याचीच आठवण आली…
मला आज त्या मुलामध्ये पांडुरंग दिसला .
सोन्याचे दागिने ,झगमग कपडे, हार फुलं नसलेले हेच साधे भोळे लोक साक्षात देव असतात …..
आपल्याच आसपास….. नीट बघितलं की दिसतात…
एक विनवणी करते रे ……
आता त्यांच्यातच तुला बघायची दृष्टी दे रे पांडुरंगा…
☆ इथे खरोखरंच ओशाळला मृत्यू !… – लेखक : विद्याधर गणेश आठवले ☆ प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे ☆
दोन वर्ष पूर्ण व्हायच्या आतच आमच्या स्क्वाड्रनला पुन्हा हलवण्याचा निर्णय झाला. आम्ही सगळा मांडलेला पसारा आवरून जामनगरला आलो. अजूनही आमच्याकडे तीच जुनीपुराणी हंटर विमानं होती आणि नवीन विमानं मिळण्याची शक्यता दुरापास्त असल्यामुळे आम्ही याचा पार्ट त्याला, त्याचा पार्ट याला करत करत शिळ्या कढीला ऊत आणण्यासाठी झटत होतो !
जामनगरला पठाणकोट सारखंच प्रचंड मोठं एअर फोर्स स्टेशन होतं. खूप मोठा टेक्निकल एरिया, खूप मोठा डोमेस्टिक एरिया, सिनेमा थिएटर, स्विमिंग पूल, रिक्रिएशन सेंटर, डार्क रूमसह सर्व सुविधा युक्त हौशी फोटो क्लब, अशा नागरी सुविधा होत्या! सुकाॅय ७, मिग २१ आणि मि ८ हेलिकॉप्टर तसंच बेल हेलिकॉप्टरच्या स्क्वाॅड्रन होत्या. त्यात आता आमच्या हंटरची भर पडली !
सगळ्यात अभिमानाची गोष्ट म्हणजे पासष्ट आणि एकाहत्तरच्या युद्धातील वाॅर हिरो, किलर ब्रदर्स पैकी, ग्रुप कॅप्टन डी किलर जामनगरला आमचे स्टेशन कमांडर होते ! साक्षात किलर सरांना प्रत्यक्ष भेटण्याच्या कल्पनेनेच मी हरखून गेलो होतो ! किलर सर, जठार सर हे म्हणजे साक्षात ‘काळ ‘ असं बरंच काही ऐकलेलं असल्यामुळे त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची उत्कंठा शिगेला पोहोचली होती!
किलर सरांनी आणि जठार सरांनी युद्धांमधे पाकिस्तानी एअर फोर्सच्या धावपट्या उखडून, चहूबाजूंनी गोळ्या लागून चाळण झालेली, पेटती विमानं आणून आपल्या रनवेवर उतरवली होती! या असामान्य कामगिरी बद्दल त्याना शौर्य पदकं मिळाली होती! कोणत्या मटेरियलचं काळीज बनवलं असेल परमेश्वराने या माणसांचं ! !
विमानाला गोळ्या लागून आग लागलेली असताना, आपला जीव वाचविण्यासाठी, विमान सोडून ‘बेल आऊट’ न करता, त्या विमानाचे काही ना काही पार्टस् वापरता येतील आणि आपल्या देशाचं काही फाॅरेन एक्सचेंज वाचेल या उदात्त हेतूने, स्वतःच्या जीवावर उदार होऊन ते विमान आणून आपल्या विमानतळावर उतरवण्यासाठी आपलं सर्व कौशल्य पणाला लावणारे योद्धे ज्या देशाकडे असतील त्यांना जगातलं कोणतंही आणि कितीही शक्तिमान राष्ट्र पराभूत करू शकणार नाही, प्रत्यक्षात किलर सरांना पाहिल्यावर माझा भलताच भ्रमनिरास झाला! नावच किलर असलेला माणूस भयंकर उग्र व्यक्तिमत्वाचा असणार अशी माझी कल्पना होती!
हा लाल गोरा अँग्लो इंडियन माणूस अतिशय प्रसन्न आणि गोड चेहर्याचा होता! अत्यंत प्रेमळ स्वभाव! सगळ्यांना सांभाळून घेण्याची कामाची आश्वासक पद्धत! सगळ्या सोशल ॲक्टिव्हिटीज मधे उत्साहाने सहभागी व्हायची हौस! उतरंडीतल्या शेवटच्या पायरीवरच्या माणसाच्या सुद्धा खांद्यावर हात टाकून, त्याची समस्या स्वतः समजून घेऊन त्यावर उपाय करण्याची धडपड! देवाने हे एक वेगळंच रसायन घडवलं होतं!
आकाशात जीवघेण्या भराऱ्या मारणाऱ्या, या उत्तुंग व्यक्तिमत्व असलेल्या माणसाकडून मी जमिनीवर रहाणं किती महत्वाचं असतं ते शिकून घेतलं! ‘तुमच्या सहकार्यांच्या कोंदणात तुम्ही किती घट्ट बसला आहात त्यावर तुमचं पद, तुमची प्रतिष्ठा किती अधिकाधिक उजळून निघणार हे अवलंबून असतं ‘ हा एक खूप महत्वाचा धडा, किलर सरांचं प्रशासकीय कौशल्य जवळून निरखताना आपोआप मिळाला, ज्याचा मी पुढे उच्च पदावर काम करताना मला खूप फायदा झाला! यशाची गुरुकिल्लीच किलर सरांनी नकळत माझ्या हाती सोपविली!
एका रोमहर्षक प्रसंगात ‘किलर’ म्हणजे काय ते प्रत्यक्षच पहायला मिळालं ! एका मिग- २१ चं टेस्ट फ्लाईंग करण्यासाठी किलर सरांनी टेक ऑफ घेतला. आकाशात झेपावल्या क्षणीच, विमानाची कॅनाॅपी (फायटर विमानात पायलटला बाहेरचं पहाता यावं म्हणून ठेवलेलं फायबरचं पारदर्शक कवच) उडून गेली ! हा अत्यंत गंभीर स्वरुपाचा अपघात होता! आता कल्पना करा की, डोळ्यावर शील्ड नसली तर ऐंशी किलो मीटर वेगाने मोटर सायकल सुद्धा चालवता येत नाही! हा माणूस बाराशे नॉटिकल माईल्स वेगाने टेक ऑफ घेत असताना याच्या डोळ्यासमोरची विंड शिल्ड नाहीशी झाली! काय करावं या माणसाने?
विमान सोडून तात्काळ इजेक्ट करायला हवं होतं! नियंत्रण कक्षातून तशा सूचनाही दिल्या होत्या, पण नवं कोरं विमान सोडून देणाऱ्या माणसाचं नांव किलर असूच शकत नाही! त्यांनी नियंत्रण कक्षाला उलट सांगितलं, “क्रॅश लँडिंगची तयारी करा! मी विमान उतरवतोय!”
क्षणात अनेक सिग्नल्सची देवाण घेवाण झाली. किलर सरांच्या वरिष्ठांनी कळकळीची विनंती केली, ” ‘किलर’ या देशासाठी विमानापेक्षा किंमती आहे! विमान सोड!” किलर सरांनी बहुदा सांगितलं असावं, “Don’t worry Sir, you will have both!”
रनवेवर क्रॅश लँडिंगची तयारी झाली. प्रत्येक जण आपापलं कर्तव्य करण्यासाठी सज्ज झालेला होता आणि मनात, “देवा, किलर सरांना वाचव.” अशी तळमळीने प्रार्थना करत होता. डोळ्यांना काहीही दिसत नसताना, केवळ इच्छाशक्ती आणि अनुभवाच्या जोरावर सर्किट मधे फिरून त्यांनी फ्युएल संपवलं आणि आपण लँडिंग करत असल्याची सूचना दिली! नियंत्रण कक्षाकडून आपण परफेक्ट लँडिंग लाईनवर आहोत याची खात्री करून घेतली आणि त्या ऐतिहासिक क्षणाकडे सरकायला सुरुवात झाली. प्रत्येक जण श्वास रोखून, काळजावर दगड ठेवून, आता पुढे काय वाढून ठेवलंय त्याची प्रतिक्षा करत होता!
विमानाचं अंडर कॅरेज सुरक्षितपणे उघडलं! तीनही चाकं व्यवस्थित बाहेर पडली! विमान उंची कमी करत करत योग्य दिशेने रनवेकडे येऊ लागलं! विमान इतक्या परफेक्ट लाईनवर होतं की पायलटला काही दिसत नाहीये हे खरंच वाटत नव्हतं! प्रत्यक्षात नियंत्रण कक्षातून मिळणाऱ्या फक्त सूचनांच्या बळावर विमान उतरत होतं!
सर्व काही सुरळीत होत आहे असं वाटत असतानाच विमान एका बाजूने कलंडल्या सारखं झालं आणि विमानाच्या मागच्या दोन चाकांपैकी एक चाक बॅरियरच्या सिमेंट पोलला टच झाल्यामुळे तुटून गेलं. आता मागचं एकच चाक उरलं होतं, ते टेकून नीट बॅलन्स झाला तर पुढचं टेकणार! गती आणखी कमी करण्यासाठी, चाक तुटताच किलरसरांनी टेलशूट (मागे उघडणारं पॅराशूट) ओपन केलं होतं !
शेवटी विमान एका बाजूला घसरून बाॅडी घासल्यामुळे आग लागणार, हे आता सगळ्यांना कळून चुकलं होतं! क्रॅश व्यवस्थापन पुढच्या भयंकर प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी अति सज्ज झालं होतं !
अति समिप….सावधान….
विमानाची गती संपता संपता ते तिरकं तिरकं जात असताना काँक्रिटच्या रनवेवर बाॅडी टेकणार नाही असं दोन चाकांवर बॅलन्स करत ते रनवे सोडून बाजूच्या मातीवर आल्याची खात्री पटल्यावरच किलर सरांनी इंजिन स्विच ऑफ केलं आणि विमानाला आग लागण्यापासूनही वाचवलं!
डाॅक्टरनी किलर सर कसे आहेत ते पहाण्यासाठी काॅकपिटकडे धाव घेतली. त्यांच्या चेहऱ्यापासून संपूर्ण शरीर इतकं सुजलं होतं की सेफ्टी बेल्ट कापून काढल्यानंतर सुद्धा त्याना काॅकपिटमधून बाहेर काढणं अवघड झालं होतं! चेहर्यावर ना नाक दिसत होतं ना डोळे! बेल्ट कापता कापताच ते बेशुद्ध झाले! कसंबसं काॅकपिटमधून बाहेर काढून त्याना आय एन एस वलसुरा ला नेव्हीच्या हाॅस्पिटलमधे दाखल केलं, तेव्हा ते कोमात गेले होते!
सतरा दिवस मृत्यूशी झुंज देऊन ह्या महारथीने अचाट पराक्रम करून देशाचं एक विमान आणि एक जिगरबाज पायलट वाचवला आणि पुन्हा आकाशात झेप घ्यायला सज्ज झाला !
इथे खरोखरंच ओशाळला मृत्यू !
लेखक : श्री विद्याधर गणेश आठवले.
प्रस्तुती – मेघःशाम सोनवणे
मो 9325927222
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(पूर्वसूत्र- प्रवासाला जाण्यापूर्वी दादरच्या घराला कुलूप लावलं होतं त्याच दिवशी हे पत्र इथं येऊन पडलं होतं. म्हणजे साधारण आठवडा उलटून गेला होता.पण ते आमच्या हातात पडायला मात्र बराच उशीर झाला होता.कारण रिटन-टेस्टची तारीख आदल्या दिवशीची म्हणजेच शनिवारची होती आणि वेळ दुपारी ११ची. अर्थातच रिटन-टेस्टची तारीख उलटून गेली होती.हातातोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा हिरावला गेला होता!
मग कोंदट अंधाराने भरून गेलेलं असतानाच पुढचे तीन साडेतीन तास असे झंझावातासारखे आले की अपेक्षितपणे आकारलेल्या सकारात्मक घटनांनी त्या अंधारल्या मनात पुन्हा आशेची ज्योत पल्लवित केली..!)
युनियन बँकेकडून आलेलं ते रिटन टेस्टचं काॅल-लेटर टेस्टची तारीख उलटून गेल्यामुळे आता मुदत उलटून गेलेल्या चेकसारखं माझ्यासाठी कांहीही उपयोग नसलेला कागदाचा एक तुकडाच होतं फक्त.तेच काॅल लेटर वाचून विचारात पडलेले मेहुणे एखाद्या गूढ विचारात गढल्यासारखे स्वतःतच हरवलेले होते. दुसऱ्याच क्षणी काहीतरी गवसल्याच्या उत्साहात ते झपकन् पुढे आले. ते कॉल लेटर माझ्या हातात देऊन घाईघाईने त्यांनी चप्पल पायात सरकवल्या आणि तडक बाहेर पडले. मी कांहीशा गोंधळल्या अवस्थेत दाराकडे धाव घेतली.
“क..काय झालं? कुठे निघालात?” न रहावून मी विचारलं.
“येतो लगेच.आलोच.
तू थांब..” मागे वळूनही न बघता ते दिसेनासे झाले.
ते परत येईपर्यंतची पंधरा मिनिटं मला तिथंच गोठून गेल्यासारखी वाटत राहिली. सरता न सरणारी!
मला अपराध्यासारखं वाटू लागलं. खरंतर आम्ही घरी येताना वाटेतच ठरवल्यानुसार घरी सामान ठेवून,फ्रेश होऊन लगेच जेवायला बाहेर पडणार होतो. एक तर ते एवढ्या लांबच्या प्रवासातून दमून आलेले होते. त्यांना कडकडून भूकही लागलेली होती. असं असताना हे असं अचानक सगळं विचित्रच घडू लागलंय.कुठे गेलेयत हे?
पंधरा एक मिनिटांनी ते घाईघाईने परत आले.
“हे बघ आता जेवण राहू दे. जेवत बसलो तर फार उशीर होईल. मी प्रवासातच थोडी केळी घेतलेली आहेत.तुझ्या आईनं थोडे लाडूही दिलेत. दोघंही तेच घासभर खाऊन घेऊ न् लगेच बाहेर पडू. आपल्याला आत्ताच्या आत्ता ठाण्याला जायचंय?”
हे सगळं त्या क्षणी माझ्यासाठी अनपेक्षित आणि अनाकलनीयच होतं.
“आत्ता..?इतक्या रात्री..?”
“हो..”
“कशासाठी..?”
“जे करायचं ते फार वेळ न दवडता आजच्या आजच करायला हवं म्हणून.हे बघ,मी वरच्या मजल्यावरच्या गोगटे आजोबांच्या घरुन माझ्या ठाण्याच्या मावसबहिणीला फोन करायला गेलो होतो.मी बोललोय तिच्याशी. तिचा इंजिनीयर झालेला धाकटा दीर नुकताच टेक्निकल ऑफिसर म्हणून युनियन बँकेत लागल्याचं मी ऐकून होतो. ते सर्वजण एकत्रच रहातायत.मी ‘त्यांना मला तातडीनं भेटायचंय.महत्त्वाचं काम आहे.लगेच येऊ का?’असं फोनवर बहिणीला विचारलंय. ती ‘ये’ म्हणालीय. आपण आत्ता त्यांना भेटायला जातोय. त्यांच्या ओळखीनं काहीतरी मार्ग निघेल.”
त्यांचा आशावाद जबरदस्त होता. सगळं माझ्यासाठीच तर सुरू होतं. मी ‘नाही-नको’ म्हणायचा प्रश्नच नव्हता.पण तरीही….?
“तुम्ही प्रवासातून दमून आला आहात ना? उद्या सकाळी लवकर गेलो तर नाही का चालणार?”
“कदाचित उशीर होईल. ती ‘ये’ म्हणालीय तर आत्ताच जाऊ. चल. आवर लौकर..”
ठाण्याला जाऊन आम्ही त्यांच्या बहिणीच्या घराची बेल वाजवली तेव्हा रात्रीचे अकरा वाजून गेले होते.मन आशा निराशेच्या हिंदोळ्यावर हेलकावे घेत होतं. अनिश्चिततेच्या भावनेनं ते कातर झालेलं होतं.
“बराच उशीर झालाय पण अगदी नाईलाज म्हणून तुला त्रास द्यावा लागतोय बघ.”
मेहुणे त्यांच्या मावस बहिणीला.. म्हणजेच मिसेस साठेना म्हणाले.
“त्रास कसलाअरे? मी निरंजन भाऊजींना कल्पना देऊन ठेवलीय.त्यांना बोलावते. तू सांग त्यांना सगळं. तुमच्या गप्पा होईपर्यंत मी गरम काॅफी करते पटकन्.आलेच.”
इथे येताना माझ्या मनात असणारा संकोच या मनमोकळ्या स्वागतानं विरून गेला.
“नमस्कार..”
हसतमुखाने नमस्कार करीत निरंजन साठे आमच्यासमोर उभे होते. त्यांना पाहिलं आणि मन निश्चिंतच झालं एकदम. तो त्यांच्या प्रसन्न,देखण्या,रुबाबदार आणि मुख्य म्हणजे निगर्वी व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव होता की माझ्या मनाला मिळालेला अकल्पित संकेत होता कुणास ठाऊक पण मन निश्चिंत झालं होतं एवढं खरं.
मेहुण्यांनी नेमकी अडचण थोडक्यात सांगितली. मी सोबत आणलेलं कॉल-लेटर संदर्भासाठी त्यांच्या पुढे केलं. त्यांनी ते वाचलं. त्याची अलगद घडी घालून ते मला परत दिलं.
“एक काम करूया. उद्या सकाळी बरोबर दहा वाजता तू चर्नीरोडवरील युनियन बँकेच्या ‘मेहता-महाल’ मधल्या ऑफिसमधे ये. हे माझं कार्ड. लिफ्टने आठव्या मजल्यावर येऊन माझ्या केबिनमधे यायचं.आपण शेजारच्या ‘मेहता चेंबर्स’ बिल्डिंगमधे ग्राउंड फ्लोअरलाच बॅंकेचं रिक्रुटमेंट सेल आहे तिथे जाऊ.तिथेच ही सगळी रिक्रूटमेंट प्रोसेस सुरू आहे. डाॅ.विष्णू कर्डक तिथले सुपरिंटेंडंट आहेत. दोन महिन्यांपूर्वीच माझा इंटरव्यूही त्यांनीच घेतला होता. त्यामुळे ते बहुधा मला ओळखतील. आपण त्यांना भेटून सांगू सगळं.बघू काय होतं ते.एन.आय.बी.एम.च्या सहकार्याने बँकेतर्फे आठएक दिवसांचे रेक्रूटमेंट प्रोसेस सुरू आहे हे मी ऐकून होतो. तुझी रिटन टेस्ट हा त्याचाच एक भाग असणार आहे. टेस्ट-प्रोग्रॅम शनिवारी संपला असेल तर मात्र प्रॉब्लेम येईल.एरवी काहीतरी मार्ग निघू शकेल”
निरंजन साठे यांनी सर्व परिस्थिती नेमक्या शब्दात समजून सांगितली.आशेचा एक अंधूक किरण दिसू लागला. आम्हाला इथे यायची बुद्धी झाली, प्रयत्नांची दिशा का होईना पण नेमकी सापडली हा दिलासा असला तरी अनिश्चितताही होतीच.
कॉफी घेऊन त्यांचे आभार मानून आम्ही बाहेर पडलो तेव्हा मध्यरात्र उलटून गेलेली होती!