मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘इमोशनल इंडिपेंडन्स…’ – लेखिका :श्रीमती मृदुल मृदू ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘इमोशनल इंडिपेंडन्स…’ – लेखिका :श्रीमती मृदुल मृदू ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

वयाच्या पंचेचाळीशीनंतर एक स्किल प्रत्येकाने आत्मसात करायला शिकलं पाहिजे ते म्हणजे…. emotional independance… म्हणजेच भावनिक दृष्ट्या समोरच्यावर अवलंबून राहणं हळूहळू सोडलं पाहिजे…

प्रेम द्यावं, care घ्यावी… पण मला कुणी प्रेम द्या, तर मी खूश, मला कुणी काही बोलाल तर मी रडणार, मला कुणी अपमानास्पद बोलाल तर मी ताबा सोडून रागात बोलणार, मला कुणी टाळलं की मी एकटं feel करणार, कुणी नीट बोललं नाही, की माझं मन वरखाली होणार आणि मी विचार करत बसणार की काय झालं असेल?… हे सगळं म्हणजे भावनिक दृष्ट्या आपण इतरांच्या प्रतिक्रियेवर आपलं मन अवलंबून ठेवणं आहे…हे थांबवायला हवं…

आपल्या खूश राहण्याचा आणि इतरांनी काही वागण्याचा अर्थाअर्थी संबंध नसतो … तो आपण लावतो.. बेसिकली, जग इकडचं तिकडे होवो, मी मेंटली स्टेबल राहणार, आनंदी राहणार, स्वतःला manange करत राहणार… हा एक निश्चय असतो, तो करायला शिकलं पाहिजे….

याने काय होईल?

1)लोकांमध्ये लक्ष लावून बसणं कमी होतं.

2) गॉसिप पासून आपण लांब राहतो.

3) आपल्याला खूश करण्यासाठी wrong कंपनी निवडण्यापासून आपण वाचतो.

4) कुणी कसंही वागलं तरी आपली मानसिक स्थिती ठीक राहते.

5) मन ठीक आणि शांत राहिल्याने तब्येत पण ठीक राहते.

6) आपण स्वच्छ चष्म्याने सगळ्यांकडे पाहू शकतो कारण मला कुणाकडून काही नकोय, हे आपण मनातून ठरवतो.

7) यामुळे लबाड नाती आपोआप दूर राहतात, स्वार्थ नसताना जुळलेली नातीच खरी टिकतात.

8) कुणी कसही वागो, ती जबाबदारी त्यांची असते. त्यापायी आपण स्वतःला त्रास करून घेणं थांबवतो.

9)मनाची स्थिरता वाढल्याने आपण जास्त active आणि creative होतो, आनंदी राहून काम करतो.

10)एकटे आलो, एकटेच जाणार आहोत, या अंतिम सत्याला आपलंसं करण्यासाठी आपण एक पाऊल पुढे जातो…        

कुठेतरी आपण आणि दुसरे यात जी सीमा असते ती जाणून घ्यावीच लागते, या वयात ही detachment  जमू शकते कारण संसार निम्मा झालेला असतो(mostly).मुलं मोठी असतात, त्यांना आपापलं एक आयुष्य असतं. त्या पण दृष्टीने आपण त्यांच्यात ढवळाढवळ कमी करावी….

सगळ्यात महत्त्वाचं या वयाला आपली सेकंड इनिंग समजून काही चांगलं करण्यात मन रमवावं.

यासाठी emotionally independent असणं हे फायद्याचं ठरतं…. देवाघरी जाण्याआधी मन साफ करत जावं. ती process या वयात सुरू करावी… आपण स्वतःला माफ करावं, इतरांना माफ करावं आणि स्वतःला उत्तम कामामध्ये गुंतवून घ्यावं…. मदतीला तयार राहावं मात्र आपल्याला शक्यतो मदत घ्यायची नाही असं समजून स्वतःला सदृढ बनवावं मन आणि शरीराने…

याचा फायदा हा की चाळीशीपर्यंत भावनांमुळे आपल्याकडून झालेल्या चुका… किमान त्या नंतर आपण करणार नाही आणि एक stable शांत आणि समाधानी life जगण्यात एक पाऊल पुढे जाईल.

लेखिका :श्रीमती मृदुल मृदू

प्रस्तुती : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ युगंधरा स्त्री शक्ती… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

🌸 जीवनरंग 🌸

☆ युगंधरा स्त्री शक्ती…  ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी 

अनादी, अनंत!

किती युगे,  किती वर्षे लोटली!  तरी मी आजतागायत आहे, तशीच आहे. कीती उन्हाळे,  कीती पावसाळे,  कीती ऋतु किती वर्षे,  माझ्या पद स्पर्शाने तुडवली गेली, ते  मलाच माहीत! पण मी आहे  तशीच आहे,  तिथंच आहे!

परिवर्तने  बरीच झाली,  किती तरी युगे, काळ रात्री शृंगारात  गप्प झाली, पण माझ मूळ रूप  हा स्थायी भाव झाला, आहे आणी तो तसाच राहणार ही काळ्या दगडावरची रेघ!

मी कुठे नाही ? जगात कुठल्याही प्रांतात जा मी असणारच. तिन्ही काळ अष्टौप्रहर माझं अस्तित्व आहेच की. माझ्या शिवाय ह्या जगाचे सुद्धा पान इकडचे तिकडे होणार नाही!

देवादिकांच्या काळापासून माझं अस्तित्व मी पुढे पुढे नेत आहे. संख्याच्या प्रकृती सिद्धांता पासूनच! त्यांच पण सदैव साकडं माझ्या पुढेच! मी त्यांचा बऱ्याच वेळा उद्धार केला. आज पण मी च सर्व मानवाचच नाहीतर, सर्व सृष्टीतील सर्व प्राणी पशु पक्षी जीवजंतु यांचं पण पोषण करतेय! किंबहुना मीच सृष्टी आहे. जगातील  सर्व घटकावर माझीच नजर असते!

मला कोण आदिमाता म्हणतात, तर कोणी मोहमाया, तर कोणी आदिशक्ती, तर कोणी प्रकृती! माझं कार्य हे मी कधीच बदलेल नाही,  बदलणार नाही,  हे त्रिवार सत्य.

मी च ती “त्रिगुणात्मक” सृजनशील शक्ती. मी सृष्टी! मी धरा,

मी मेदिनी मी च पृथा!  “मी माता,”  मी अनेक प्रकारची “माती”  मी स्त्री!, मी प्रजनन करणारी!. पालन,पोषण संगोपन, करणारी! मी जीवसृष्टीची  निर्माती, मी  

“माता ते मी माती”  पुर्णस्वरूप जगत्रय जननी! विश्व दर्शन! देणारी. तमोगुणी असलेतरी, दीप, पणती उजळणारी ज्ञानाची ज्योत!

हो पण माझ्या काही सवयी आहेत,  त्या मी पुर्ण करून घेण्यासाठी सर्व काही क्लुप्त्या वापरते. मी च हट्ट पुरवून घेणार ना ?

कोण नाही हो मी ? ऋतुनुसार माझे रूप पालटले जातात. मी प्रत्येक ऋतूत निराळीच असते. माझं सौंदर्य हेच माझं अस्त्र, माझ्या शिवाय तुमच्या जगण्यात पूर्णत्व येत नाही!

मी साज शृंगारा शिवाय राहू शकत नाही. मी च तर करणार ना  साज शृंगार तो माझा निसर्गदत्त अधिकार!  मी अवखळ  कन्या,  तरुणी, कल्याणी, प्रेमिका, अभिसरीका,  मी भार्या,  मी च ती, सर्व हट्ट पुरवुन घेणारी तो ही अगदी सहज पणे! 

मी साज, मी दागिना, नटणे, लाजणे, मुरडणे, नखरा करणे. मनमुरादपणे हौस करून घेणारी.  स्वर्गातील अप्सरा रंभा मेनका  उर्वशी हे माझेच पूर्वज ना! माझेच रूप ना ?

मी च “सांख्य तत्वाची” प्रकृती!   जड,  अचेतन त्रिगुणात्मक, मोहमयी, गुढ, आगम्य, सर्वव्यापी, बीजस्वरूप कारण, मी सर्वत्र एकच आहे! स्वतंत्र स्वयंभु पण निष्क्रिय!

मी कोण! अस का वाटत तुम्हाला  ?   मी फुलात, पानात, फळात आहेच की. सुगंधच माझी ओळख.

विविध  रंगाच्या  आकाराची,  फुले त्यांचं विविध गंध,  वर्ण त्यांची झळाळी,  हिरव्यागार झाडात वेलीत, त्यांचं मनमोहक रूप, तरीपण निष्क्रिय!   माझे अस्तीत्व मृदुमुलायम स्पर्शात, कोकिळेच्या कंठात, पौर्णिमेच्या शीतल चांदण्यात, गायीच्या हंबरण्यात, मयुर केकात! 

आजचे माझे अस्तित्व, काळानुसार  जरी सुधारले असले तरी, मी सगळीकडे आहेच की, माझा पोशाख माझं राहणीमान माझ्यातल परिवर्तनाचाच भाग आहे.

मुळात माझ्याकडे निसर्गाने जी दैवी शक्ती दिली आहे,  तीच आदिशक्तीचे अधिष्ठान आहे. अधिक जबाबदारी निसर्गाने घालून दिली.

म्हणूनच देवादिकांच्या पासुन ते आजच्या मानवापर्यंत माझी स्तुती चालत आली आहे.

।।  दुर्गे दुर्घटभरी तुझं वीण संसारी

अनाथ नाथे आंबे करुणा विस्तारी ।।

।। वारी वारी जन्म मरणा ते वारी

हरी पडलो आता संकट निवारी ।।

अशी आरती करून तुम्ही माझ्या स्त्रीत्वाचा सत्कार आक्ख जग अजुनी करतच की!

अनादी अनंत चार युगे उलटली!  महिला आहे,  म्हणुनच जग आहे,  हे खरं!  जगाला आजच का सजगता आली, स्त्री केव्हा पासुन पूजनीय वाटु लागली  ? पुर्वी ती पूजनीय नव्हती का ? चाली रूढी परंपरा ही तर भारतीय संस्कृती. विसरलात का!  मग आजच नारीचा नारीशक्तीचा डांगोरा पिटण्यात, कुठला पुरुषार्थ  आला बुवा ?

पाश्चात्य संस्कृतीचे अंध अनुकरण का ? पूर्वी इतकी स्त्री पुज्यनिय आता आहे असं वाटत नाही का ? बिलकुल नाही,पूर्वी जेवढी स्त्री पुजनिय होती, तेवढी आता नाही! होय मी ह्या विधानाचा समर्थन करतोय.

“यात्र  नार्यस्तु पुज्यन्नते रमंते” ह्या विधानात सर्व काही आले, व ते खरे केले. पुरुष प्रधान संस्कृतीच आत्ता ज्यास्त फोफावली आहे हे लक्ष्यात ठेवा. बस म्हटले की बसणारी उठ म्हटले की उठणारी स्त्री म्हणजे  हातातील खेळणं आहे असं वाटत काय ?

हल्ली काळा नुसार सोई सुविधांचा वापर करणे इष्टच, कारण ती गरज आहे, गरज शोधाची जननी! काळ बदलला नारी घरा बाहेर पडली कारण परिस्थितीच तशी चालुन आली. एकाच्या कमाई वर भागात नाही म्हणुन, प्रत्येक क्षेत्रात ती उतरली. व ते साध्य साधन करून दाखवत, ती सामोरा गेली व उभी राहिली. ती साक्षर झाली, मिळवती झाली, अर्थ कारण हा पुरुषर्थ तिने सहज साध्य केला. अस जरी असलं तरी तिच्या मागच  चुल मुलं बाळंतपण पाळणा ह्या गोष्टी परत आल्याच! त्या पण साध्य केल्या, हे त्रिवार सत्य!

पुर्वीच्या काळात ही परिस्थितीला अनुसरून महिलांनी घर खर्चाला आधार कैक पटीने ज्यास्त दिला! आठवा त्या गोष्टी, पिठाची  गिरणी नव्हती हाताने दळणकांडणच काय घरातील जनावरांचा पालन पोषण, गाय म्हैस बकरी इत्यादीच धारा, चारा पाणी, इत्यादी करून दुध दुभत त्या विकुन घरार्थ चालवीत होत्या अजुनी खेड्यात ही प्रथा चालु आहेच. जोडीला शेती कामात पण स्त्रिया मागे नव्हत्याच! आता ही नाहीत.

मथुरा असो की द्वारका तिथं पण हे वरील सर्व व्यवहार सुरळीत चालु होतेच की, नुसतं गौळण श्रीकृष्ण राधा, रासक्रीडा काव्यात जे मांडतो ते, तिथं अस्तित्वात होतच ना ? कपोलकल्पित गोष्टी नाहीतच ह्या. स्त्रीया पुरुषा बरोबरीने अंग मेहनत करत त्या अर्थार्जन करत होत्या!!!

लग्न झालेली नवं वधु तिचे आगमन, तिच्या हाताचे पायाचे कुंकवाचे ठसे, जोडीने केलेली पुजा, असो वा कुलदैवत दर्शन, असो मंगळागौर असो किंवा डोहाळ जेवण इत्यादि गोष्टी ह्या, स्त्री जन्माला आलेला मानपानच होता. गौरवच  सत्कार  होता ना!  प्रत्येक गोष्टीत तिचा पुढाकार हा महिला दिनच होता ना!

सावित्री, रमा, जिजाऊ, कित्तूर राणी चांनाम्मा, झाशीची राणी ह्या सर्व लढाऊ बाण्याची प्रतीक च होती ना ?

काळ बदलला आस्थापना कार्यशैली बदलली. युग नवं परीवर्तन घेऊन आलं. नवं कार्याचा भाग पण बदलला तरी स्त्री आजुनी खम्बीर आहे. कामाचा व्याप क्षेत्र बदलले. पूर्वीपेक्षा अत्याचार बलात्कार गर्भपात मात्र दिवसा गणिक वाढते आहे!  पूर्वी पेक्ष्या नारी सुरक्षित आहे का ?

कारण स्पष्टच,  चित्रपट टेली व्हिजन येणाऱ्या मालिका, चंगळवाद यांनी मनोवृत्ती बिघडली आहे.

महिला दिनाच्या निमित्ताने नारी संघटित होऊ पाहत आहे, पूर्वीही संघटीत होत्या, नाही असे नाही तरीपण आज मात्र ही काळाची गरज आहे! 

तिच्या अस्मितेची लढाई अजून चालू आहे. प्रत्येक क्षेत्रांत स्त्री आहे, घर कुटुंबा पासून ते सैन्य भरती पर्यंत! मजल दरमजल करत ती पुढे पुढे जात आहे अलिकडेच खेडे गावात राहणारी राहीबाई पोपोरे पासून ते कल्पना चावला पर्यंत!  अशी कित्येक उदाहरणे देता येतील. प्रत्येक क्षेत्रात स्वतःच्याअस्मितेवर तिने आघाडी घेतली आहेच. कोणतंही क्षेत्र तिने सोडलं नाही! तरीपण कैक पटीने ती तीच अस्तिव सिद्ध करत आहे. स्त्री जीन पॅन्ट घालो अगर नऊ वारी सहा वारी साडीत असो, मातृत्वाची जबाबदारी खांद्यावर घेतलीच ना ? गरीब असो वा श्रीमंत, घरात असो वा कार्यालयात तिला मुलाप्रति जिव्हाळा हा तसूभरही कमी झाला आहे का ?

साक्षात भगवान शंकरांनीही पर्वतीकडे भिक्षा मागितलीच ना.

।। अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राण वल्लभे ।।

ज्ञान वैराग्य सिद्धर्थम

भिक्ष्यां देही च पार्वती ।।

बघा हं गम्मत साक्षात भगवान शंकर, पार्वती कडे

भिक्षा मागतात!

काय म्हणतात हो ?

अन्नपूर्णे मला ज्ञान आणि वैराग्यासाठी भिक्षा घाल! भुकेसाठी ? हो भूक ही नुसती पोटाची नसते बर का! खर  ज्ञान मिळण्यासाठी! भूक पण अनेक प्रकारची असतेच की! वैराग्य प्राप्तीसाठी पण!  वैराग्य केव्हा प्राप्त होत ?  तर विश्व दर्शन झाल्यावर. ही झाली देवादिकांची कथा त्यापुढे मानवाचे काय ? स्त्री शक्ती ही कालातीत आहे. असे असूनही तिच्यावरचे बलात्कार, स्त्रिभुण हत्या का थांबत नाहीत ?

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ विचार तर कराल ?… ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ विचार तर कराल ? ☆ श्री सुनील देशपांडे

आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही. त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो.त्यामुळे आपण कोण आहोत हे दुसर्यांना सांगण्याची गरज नाही, फक्त चांगले कर्म करत रहा.

वरील मजकूर मला व्हाट्सअप वर आला होता. अशा प्रकारचे सुविचार अनेक येतात.  या सारख्या बऱ्याच गोष्टींबद्दल सविस्तरपणे सांगावेसे वाटते. वस्तुतः चंदनाचे झाड हे लक्षात येत नाही.  गावाकडे आमच्या बागेत काही चंदनाची झाडे उगवली होती. परंतु आम्हाला ती झाडे चंदनाची आहेत हे समजलेच नव्हते. कोणीतरी आम्हाला हे झाड चंदनाचे आहे हे सांगितले तेव्हा समजले. झाडे थोडी मोठी झाल्यावर त्याचा गवगवा होऊन चोरीला जाण्याची शक्यता कोणीतरी व्यक्त केली म्हणून गावाकडच्यांनी ती विकून टाकली. घरात चंदनाचे खोड असेल तर घरात त्याचा सुगंध पसरलेला आम्ही तरी कधी अनुभवला नाही. पूर्वी पूजेसाठी चंदनाचे खोड प्रत्येकाच्या घरी असायचं. चंदनाचे खोड जेव्हा उगाळले जाते तेव्हा त्यातून सुगंध पसरतो त्यामुळे चंदनाला, कुणीतरी हे चंदन आहे हे सांगावेच लागते. आमच्या गावाकडचे घर विकल्यानंतर तेथील सामान देऊन टाकणे व  विकून टाकणे ही प्रोसेस चालू असताना चंदनाचे खोड हे वेस्टेज मध्ये टाकले गेले होते. कोणीतरी हे चंदनाचे खोड आहे म्हणून उचलून आणले.  हिरा सुद्धा पैलू पाडल्याशिवाय हिरा आहे हे कुणालाही समजत नाही. तसे पाहता पैलू पाडल्यानंतर सुद्धा खरा हिरा आणि खोटा हिरा हे कोणाला समजते? 

हिरा ठेविता ऐरणी, वाजे मारिता जो घणी, तोचि मोल पावे खरा, करणीचा होय चुरा. असे तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितले आहे.  त्यामुळे अज्ञानी किंवा फारसा विचार न करणाऱ्या लोकांना एखादा चुकीचा मुद्दा सुद्धा पटवून देण्यासाठी अशा प्रकारच्या चुकीच्या मजकुरांचा किंवा चुकीच्या दृष्टांतांचा उपयोग केला जातो.  लोकांना आपला मुद्दा पटवून देण्यासाठी दृष्टांतांची परंपरा कीर्तनकारांनी फार पूर्वीपासून आपल्या समाजात रुजवली आहे. कीर्तनकाराला स्वतःचा मुद्दा पटवून देण्यासाठी काही दृष्टांत द्यावयाचे असतात. परंतु ते दृष्टांत किती योग्य आहेत याचा विचार केला जात नाही. फारसा विचार न करणाऱ्या लोकांसमोर अशा दृष्टांतांचा उपयोग होतो.‌ सध्या व्हाट्सअप वर असे दृष्टांत देऊन एखादी चुकीची गोष्ट सुद्धा पटवून देण्याची स्पर्धा लागलेली आहे. त्यामुळे कोणतेही उदाहरण किंवा दृष्टांत याबाबत आपण सजग पणे आणि विचारपूर्वक पाहिले पाहिजे. 

कुणीतरी गुड मॉर्निंग साठी असे काहीही सुविचार व्यावसायिकपणे तयार करून पाठवतात. ज्याला खरोखरीचा तर्क लावून तपासून पाहिले तर तो विचार योग्य आहे असे वाटत नाही.  परंतु कट पेस्ट संस्कृती आणि आलेले फॉरवर्ड करा विचार करू नका. या प्रवृत्तीमुळे अनेक चुकीचे नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी आपला उपयोग काही लोक करून घेतात. त्यामुळे अविचाराने फॉरवर्ड करणे किंवा आला मजकूर की कट पेस्ट करणे ही सवय चांगली नाही. या गोष्टी शक्यतो टाळाव्यात जी गोष्ट विचारपूर्वक आपल्याला पटली असेल, विचारपूर्वक म्हणजे खरोखरच त्यावर विचार करून मान्य झाली असेल तरच ती पुढे पाठवावी. ही सवय स्वतःच्या अंगी बाणवण्याचा प्रयत्न मी सुरू केला आहे. आपणही सर्वांनी अशा पद्धतीने करावे आणि दुसऱ्याचा विचार फॉरवर्ड करण्यापेक्षा जे फॉरवर्ड कराल तो तुमचा विचार असला पाहिजे. निदान तुम्हाला सर्वतोपरी विचार करून पटलेला तरी असला पाहिजे.  तो मान्य  असला पाहिजे.  ‘फॉरवर्ड ॲज रिसिव्हड’ अशा पद्धतीने करणे टाळावे, नव्हे, करूच नये!

पहा जमते का? आपण सर्वच हे जमवूया.  अर्थात आपणास विचार करायची सवय असेल तर! नसेल तर लावून घ्यायला काही हरकत आहे का? सुशिक्षित आहात ना? शिक्षित नसला तरी सुविचारी तरी आहात ना? करा करा ..  प्रयत्न करा माझ्याबरोबर ! 

© श्री सुनील देशपांडे.

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ महाप्रतापी… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ महाप्रतापी… ☆ श्री सुनील शिरवाडकर

तो एक लेखक होता.लंडनमध्ये रहायचा. असाच एकदा अमेरिकेत गेला होता. न्युयॉर्कमध्ये.

रस्ता ओलांडत होता..आणि त्याला एका गाडीची धडक बसली.

एका हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमीट केलं.ही बातमी सगळीकडे पसरली.वेगवेगळ्या दैनिकाचे..मॅगझिन्सचे रिपोर्टर हॉस्पिटल बाहेर जमले‌.

पण कोणाशीही बोलण्यास त्याने नकार दिला.आपल्या या अपघातामध्ये बाहेर किती औत्सुक्य आहे हे त्याला उमगलं.त्याने ठरवलं.यावर आपणच लिहायचं.मग त्यानं त्यावर एक लेख तयार केला.’कॉलिअर्स’ या दैनिकाने तो तिथल्या तिथे विकत घेतला.चक्क तीन हजार डॉलर्सला.

ही गोष्ट शंभर वर्षापुर्वीची.त्याचं सगळं आयुष्यच भन्नाट.सुरुवातीच्या काळात लष्करात सेवा बजावल्यानंतर त्यानं ठरवलं.. यापुढे आजन्म उपजीविका करायची ती फक्त लेखनावरच.

लेखनासाठी शांतता लाभावी म्हणून त्यानं चक्क पाचशे एकर जमीन खरेदी केली.त्यात एक गढी उभारली.एक सुसज्ज अभ्यासिका बनवली.

त्याचा दिनक्रम विलक्षणच.सकाळी आठ वाजता उठल्यावर तासभर तो दैनिकांचं वाचन करत असे.त्यानं एक उभं डेस्क बनवलं होतं.तिथे उभं राहून तो तोंडी मजकूर सांगायचा.तो जरी लेखक होता,तरी आयुष्यात त्याने हातात लेखणी धरली नाही.त्यानं सांगितलेला मजकुर दोन टायपिस्ट उतरुन घेत.सकाळी ९ ते दुपारी २ या वेळात साधारण अडीच हजार शब्दांचं लेखन झालं पाहिजे हा त्यांचा दंडक.

दुपारी दोन ही त्याची स्नानाची वेळ.तो एक उत्तम वक्ता देखील होता.स्नानाच्या वेळी तो मोठ्या आवाजात भाषणाचा सराव करत असे.यावेळी कधी त्याला उत्तम वाक्य सुचायची.तो ती मोठ्या आवाजात उच्चारायचा.त्याच्या टायपिस्ट बाहेर उभ्याच असतं.लगेचच त्या ती वाक्ये टिपून घेत.

त्यानंतर मग भोजन.जेवणाच्या आधी आणि जेवण करताना उत्तम मद्याचे प्याले त्याच्या टेबलवर असत.व्यवस्थित तब्बेतीत मद्यपान..साग्रसंगीत भोजन..आणि मग वामकुक्षी.

वामकुक्षीबद्दल त्याचे विचार अफलातून होते. तो म्हणतो… 

“एक तासाच्या शांत वामकुक्षी मुळे आपण एका दिवसाचे दोन प्रसन्न दिवस करु शकतो.डुलकी काढल्यानंतर चित्त कसं टवटवीत होतं.ज्याला आयुष्यात वेळ वाचवुन मोठं काम करायचं आहे..त्यानं वामकुक्षीची सुखद सवय लावून घ्यावी “.

दुपारी चार ते रात्री दहापर्यंत तो लेखनाची संबंध नसलेलं राजकीय काम करत असे.रात्री दहा ते पहाटे तीन ही वेळ लिहीण्याची.. म्हणजे मजकूर सांगण्याची.दोन टायपिस्ट पुन्हा एकदा त्याच्या मुखातून येणारे शब्द टिपुन घेण्यासाठी सरसावुन बसत.

वयाच्या पन्नाशीत असतांना त्याला आपल्यातल्या एका वेगळ्या गुणांचा शोध लागला.आपल्या मुलाला चित्रकला शिकवत होता तो.त्याच्या लक्षात आलं..आपण चित्रही छान काढु शकतो.

मग त्यासाठी एक नवा स्टुडिओ उभा केला.त्याच्या कुंचल्यातून शेकडो रंगीत अप्रतिम चित्रे अवतरली.

साहित्याचं नोबेल पारितोषिक मिळवणारा तो एकमेव राजकीय नेता होता.जगातील सत्तावीस विद्यापिठांनी त्याला सन्माननीय पदव्या अर्पण केल्या.त्याच्या भाषणांच्या रेकॉर्डस् निघाल्या.रॉयल ॲकेडमीचा चित्रकार म्हणून कलावंतांच्या जगातला सर्वोच्च सन्मान त्याला मिळाला.उत्तमोत्तम मद्याचे महासागर त्याच्या घशाखाली उतरले.लाखो चिरुटांची त्यानं राख केली.

पुर्वायुष्यात त्यानं लष्करी शिक्षण घेतलं होतं.एक जिगरबाज योद्धा म्हणुनही त्याची ती कारकीर्द गाजली.सतत साठ वर्षे तो इंग्लंडच्या संसदेत होता.. आणि तरीही नीतीवान होता‌.. काठोकाठ चारित्र्य संपन्न होता.आजन्म त्याने सरस्वतीची साधना केली.

आपल्या कुटुंबावर अपार प्रेम करणारा..लखलखीत जीवन जगणारा तो म्हणजे …. 

इंग्लंडचे महाप्रतापी पंतप्रधान सर विन्स्टन चर्चिल.

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पहिली भारतीय रेल्वे ☆ श्री प्रसाद जोग ☆

श्री प्रसाद जोग

? इंद्रधनुष्य ?

☆ पहिली भारतीय रेल्वे ☆ श्री प्रसाद जोग

१६ एप्रिल,१८५३ रोजी मुंबई ते ठाणे या ३४ किलोमीटर  मार्गावर १४ डब्यांची पहिली रेल्वे गाडी चालवली गेली. आणि भारतीय रेल्वेची प्रवासी वाहतूक सुरवात झाली. 

ही गाडी ओढण्यासाठी साहिब, सिंध आणि सुलतान या नावाची तीन वाफेची इंजिने जोडली होती.या गाडीच्या पहिल्या वहिल्या प्रवासासाठी अख्ख्या भारतातून ४०० मान्यवर मुंबईला आले होते. या गाडीला मानवंदना देण्यासाठी २१ तोफांची सलामी देण्यात आली होती.

सामान्य माणसाला लांब पल्ल्याचा प्रवासासाठी आणि सामानाच्या वाहतुकीसाठी बैलगाडय़ातून प्रवास करावा लागत असे; ही;खडतर बाब ओळखून जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे यांनी देशाला प्रगतीपथावर नेण्याच्या  ध्यासापायी ग्रेट ईस्टर्न कंपनीची स्थापना १८४३ साली केली. या कंपनीचे कार्यालय गिरगावातील नानांच्या वाडय़ात होते. नानांच्या दहा वर्षाच्या अथक प्रयत्नांमुळेच १६ एप्रिल १८५३ दिवशी बोरीबंदर ते ठाणे या लोहमार्गावरून केवळ भारतातलीच नव्हे, तर आशिया खंडातील पहिली रेल्वेगाडी धावली. या उद्घाटन सोहळय़ाला प्रमुख पाहुण्यांचा व त्यामधुन प्रवास करण्याचा मान हा इंग्रजांनी नानांना दिलाच, पण त्याशिवाय प्रथम वर्गाचा सोन्याचा पास देऊन त्यांचा सन्मान देखील केला.तेव्हापासूनच नाना शंकरशेठ यांना भारतीय रेल्वेचे जनक म्हणून ओळखले जाऊ लागले. मध्य रेल्वेच्या मुख्य कार्यालयाच्या (सीएसएमटी) प्रवेशद्वाराच्या भिंतीवरील नानां शंकरशेठांचा पुतळा त्यांची साक्ष देतो.

१६ एप्रिल १८५३ रोजी मुंबईकरांचा गोंधळ उडाला होता. आज ते एक चमत्कार पाहणार होते. साहेबाचे पोर बिनबैलाची गाडी हाकणार होते. या दिवसासाठी मोठमोठे साहेब, स्थानिक लोक उपस्थित होते. १४ डबे आणि तीन महाकाय इंजिन असलेल्या या पहिल्या रेल्वे प्रवासाचा आनंद लोकांना मिळाला. आपापल्या दर्जानुसार लोक गाडीत बसले होते. नामदार यार्डली,जज्ज चार्लस् जॅक्सन तसेच नाना शंकरशेठ ही मंडळी उपस्थित होती.  

आणि दुपारी ३.३० वाजता इतिहास घडला. तोफांची सलामी देण्यात आली. गार्डने शिट्टी वाजवून हिरवा बावटा दाखविल्याबरोबर त्या राक्षसी आकाराच्या तीन इंजिनांनी कर्णभेदी भोंगे वाजवले. त्या इंजिनांच्या धुरांचे लोळ ढगांप्रमाणे दिसत  होते. काळे पोषाख घातलेले खलाशी इंजिनाच्या पोटात,फावड्याने कोळसा आगीत लोटत होते. त्या तीन राक्षसी अजस्र इंजिनांनी चमत्कार घडवला. ती गाडी चक्क पुढे जाऊ लागली. लोक बोलू लागले की, आपण पुराणकाळातल्या अद्भूत चमत्काराच्या गोष्टी नुसत्याच ऐकतो. पण आता कलियुगात इंग्रज त्या प्रत्यक्षात करून दाखवतात. इंग्रज म्हणजे देवाचा अवतार,अशी लोकांची समजूत झाली. परिणामी ते अद्भूत दृश्य पाहून लोकांनी हात जोडून लोटांगण घातले. गाडीचा वेग,शिट्ट्यांचा आवाज याने लोक भयचकित तर झालेच,पण गायी, बैल भेदरले आणि कुत्री पिसाळल्यासारखी  भुंकू लागली .एकीकडे लष्करी बँडही वाजत होता. बैल-घोडयासारख्या जनावराकडून न ओढताच धावू शकणारे हे अजब यंत्र हा लोकांना चमत्कार  वाटत होता.

सामान्य माणसे आगगाडीमध्ये बसायला घाबरायची.त्यांची भीती घालवण्यासाठी सामान्य नागरीकांनी प्रवास करावा म्हणून  प्रवास करणाऱ्याला १ रु. बक्षीस देण्यात येईल हे जाहीर केले आणि लोक रेल्वेप्रवास करू लागले.

बोरीबंदर ते-ठाणे हे अंतर २१ मैलांचे (३४ किमी) आहे. हे अंतर कापायला गाडीने तब्बल १ तास १२ मिनिटे घेतली. यामध्ये गावागावात लोक तिच्या स्वागताला तयार होते. गाडी भायखळ्याजवळ आली तेव्हा तिच्या स्वागतासाठी मोठी गर्दी जमली होती. लोक दाटीवाटीने गच्चीवर ,डोंगरावर उभे राहून या चमत्काराला नमस्कार करत होते आणि दुपारी ४.५८ वाजता गाडी ठाणे स्टेशनावर पोहोचली ,तेव्हा तिच्या स्वागतासाठी ठाण्यात भव्य शामियाना उभारण्यात आला होता. ठाणे रेल्वे स्थानकावरही ही गाडी पाहण्यास लोकांनी गर्दी केली होती. त्या काळी ठाणे स्थानक छोटं आणि कौलारू होतं. सर्व पाहुण्यांना शाही मेजवानी देण्यात आली. तेथे प्रतिष्ठितांची भाषणे होऊन संध्याकाळी ६.३० वाजता ठाणे सोडून बरोबर ५५ मिनिटांनी गाडी पुन्हा बोरिबंदर स्टेशनावर पोहोचली.

असा होता पहिल्या आगगाडीचा प्रवास. कोणत्याही चमत्काराला देवत्व  बहाल करणा-या भारतीयांनी या गाडीचे नामकरण केले, ‘चाक्या म्हसोबा’. पहिल्या रेल्वे गाडीला १४ डबे होते. तिस-या वर्गाचे डबे फारच गैरसोयीचे होते. त्यात बसण्यासाठी बाकेच नव्हती. प्रवाशांना उभं राहूनच प्रवास करावा लागत होता. खिडक्याही इतक्या उंचीवर होत्या की, प्रवाशांना उभे राहिल्यानंतरही खिडकीतून बाहेरचे दृश्य दिसत नसे. त्यामुळे स्वाभाविकपणेच या गाडीला ‘बकरा गाडी’ असे संबोधले जात असे.

काळ बदलला तसे रेल्वेचे रूप बदलत गेले. एका गावाहून दुसऱ्या गावी जाण्याचे साधन असलेल्या रेल्वेने  ऐश आराम  करण्यासाठी सुद्धा रेल्वे सुरु केल्या. सध्या भारतात अश्या ७  खास गाड्या चालवल्या जातात

१) महाराजा एक्सप्रेस

२) पॅलेस ऑन व्हील्स

३) रॉयल राजस्थान ऑन व्हील्स

४) दि  गोल्डन  चॅरिओट

५) डेक्कन ओडिसी  

६.रॉयल ओरियंत ट्रेन

*७.फेयरी क्वीन एक्सप्रेस

स्वप्नवत वाटणारा जम्मू-बारामुल्ला रेल्वेमार्ग  हा भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यात बांधला जात असलेला रेल्वेमार्ग प्रकल्प आहे. याचे अधिकृत नाव जम्मू उधमपूर श्रीनगर बारामुल्ला लोहमार्ग असून ह्याद्वारे काश्मीर खोरे उर्वरित भारतासोबत रेल्वेमार्गाने जोडले जाईल.

आता सुपर फास्ट रेल्वेचा जमाना आला. त्यातूनच राजधानी एक्सप्रेस,शताब्दी एक्सप्रेस या सुपरफास्ट गाड्या सुरु झाल्या. आता वंदे भारत या संपूर्ण भारतीय बनावटीच्या आधुनिक रेल्वे  विविध मार्गावरून धावू लागल्या आहेत. कोलकात्यात हुगळी नदीखालून बोगदा निर्माण करून पाण्याखालून देखील भारतीय रेल्वे धावू लागली आहे. येत्या काही काळात बुलेट ट्रेन देखील सुरु होत आहे.

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु.ल. देशपांडे यांना  देखील या रेल्वेची भुरळ पडली, त्यांचे निरीक्षण देखील अफलातून, त्यातून त्यांनी ‘ काही अप्स आणि काही डाऊन ‘ ही भन्नाट गोष्ट लिहिली.

रेल्वे सुरु झाली आणि त्याची मोहिनी नंतर सुरु झालेल्या चित्रपट सृष्टीला पडली नसती तर नवलच.कितीतरी चित्रपटांच्या कथा रेल्वेला जोडल्या गेल्या. असंख्य गाणी रेल्वेवर लिहिली गेली .

मधू दंडवते यांनी कोकण रेल्वेचे स्वप्न उरी बाळगले होते , त्यासाठी त्याचा पाठपुरावा करत होते आणि शेवटी सगळ्या आडचणींवर मात करत कोकण रेल्वे सुरु झाली आणि या  कोकण गाडीवर गाणे देखील लिहिले गेले.

आली कोकण गाडी दादा, आली कोकण गाडी 

भारतीय रेल्वेने त्यांचे गाणे तयार केले, उदित नारायण आणि कविता कृष्णमूर्ती यांनी ते गायले आहे.

१७० वर्षाच्या इतिहासात दिवसेंदिवस रूप बदलणाऱ्या भारतीय रेल्वेच्या महाकाय जाळ्याला  सलाम ,सलाम,सलाम !!  .

©  श्री प्रसाद जोग

सांगली

मो ९४२२०४११५०   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “चैत्र…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

☆ “चैत्र…” ☆ सौ राधिका भांडारकर 

आंब्याच्या झाडावर कोकीळ पक्षाचे “कुहू” ऐकू येते आणि वसंत ऋतुच्या आगमनाची वर्दी मिळते.   चैत्राची चाहूल जाणवते. नववर्षाची सारीच नवलाई घेऊन सृष्टीही बहरते. 

सूर्य जेव्हा मेष राशीत प्रवेश करतो, त्यावेळी हिंदू पंचांगातल्या शालिवाहन शकानुसार चैत्र महिना सुरू होतो. फाल्गुन पौर्णिमेच्या होळीची बोंबाबोंब आणि रंगपंचमीच्या रंगात नहाल्यानंतर वसंत ऋतु एखाद्या राजासारखा, दिमाखात अवतरतो.  नवा उत्साह, नवी उमेद, चैतन्याचे नजराणे  घेऊन तो कसा ऐटीत येतो.

जुने जाते नवे येते. वृक्ष नव्या, कोवळ्या, हिरव्या रंगाच्या पालवीने बहतात.  गुलमोहराला अपूर्व रक्तीमा चढतो.  पिवळा बहावा फुलतो.  पलाश वृक्षाची अग्नी फुले डोळ्यांना सुखावतात.  मोगऱ्याचा सुगंध दरवळतो. आणि कोकणचा राजा रस गाळतो. उत्तम उत्तम गोष्टींची मनमुराद पखरण करणारा हा वसंत!  ना कशाची वाण  ना कशाची कमतरता.  सारेच साग्रसंगीत, उच्च अभिरुची दर्शवणारे.

।। गंधयुक्त तरीही उष्ण वाटते किती ..।।

आसमंत उष्णतेने भरून जातो.  उन्हाच्या झळा जाणवतात. तप्त वारे वाहतात पण तरीही हे वारे गंधयुक्त असतात.  अनंत आणि मोगऱ्यांचा दरवळ जाणवतो. जंगलात कुठेतरी पिवळी धमक सुरंगीची फुलं उमलतात. आणि त्याचा सुगंध साऱ्या सृष्टीला व्यापून राहतो.

चैत्र महिना— वसंत ऋतु म्हणजे सृजनोत्सव.  चैत्र महिन्याच्या साक्षीने आनंदाचे एक महोत्सवी स्वरूपच प्रकटते.  या मासाचे आपल्या सांस्कृतिक जगण्याशी  उत्कट नाते आहे.

या आनंदोत्सवाचे स्वागत उंच गुढ्या उभारून शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडव्याच्या दिवशी केले जाते.  दृष्टांचा संहार  आणि सुष्टांचा विजय म्हणून हा विजयोत्सवही ठरतो.  या ब्रह्मध्वजाच्या पूजेनेच हिंदू नववर्षाची सुरुवात होते. तोच हा चैत्रमास!  चंद्र, चित्रा नक्षत्राच्या सानिध्यात असतो म्हणून हा चैत्र मास.

संस्कृतीची, धार्मिकतेची, सृजनाची, सौंदर्याची जाण देणारा हा टवटवीत, तजेलदार, तालबद्ध मास— वसंत आत्मा— मधुमास.

चैत्रगौरी पूजनाच्या निमित्ताने आंब्याची डाळ,कैरीचे  पन्हे याचा रसास्वाद घेणे म्हणजे परमानंदच.  अंगणात चैत्रांगण सजते.

या महिन्याला जसे श्रद्धा, भक्तीरसाचे वलय आहे तसेच शृंगार रसात न्हालेल्या  प्रणय भावनेचाही अनुभव आहे.

पक्षी झाडावर घरटी बांधतात.  त्यांची मधुर किलबिल मिलनाची हाक देतात.  मधुप  फुलातल्या परागाशी प्रीतीचे नाते जुळवतात.  तरुण-तरुणींची सलज्ज कुजबुज ऐकू येते.  कवी कल्पनांना प्रणय गीतांचे धुमारे फुटतात.  चाफा फुलतो आणि बोल घुमताँँं

“या विश्वाचे आंगण आम्हा दिले आहे आंदण

उणे करु आपण दोघेजण रे..”

साऱ्यासृष्टीतच या शृंगार रसाची झलक जाणवत असते. निर्मितीच्या, सर्जनशीलतेच्या भावनांना हळुवारपणे गोंजारणारा हा चैत्र महिना, राधा कृष्णाच्या प्रीतीत रमणारा हा चैत्र महिना,  कुणाच्या कवितेत असाही फुलतो..

      सिंगार सिसकता रहा

      बिलखता रहा हिया

      दुहराता रहा गगन से चातक

     पिया पिया …

 

     किंवा,

      ऋतू वसंत से हो गया कैसा ये अनुराग

      काली कोयल गा रही

     भान्ती भान्ती के राग…

तर असा हा नवीनतेचा, प्रेमाचा, उत्पत्तीचा,  चैतन्याचा संदेश घेऊन येणारा,  सुगंधाचा दरवळ पसरवणारा, हसरा बागडणारा,  धुंद करणारा चैत्र मास …किती त्यास वर्णावे?

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सिग्नलला भेटलेली कविता… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ सिग्नलला भेटलेली कविता !… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी

तिन्ही सांजची वेळ… हवेतला उष्मा बराच नरम झाला होता. रस्ताही कधी नव्हे तो निवांत वाटत होता. ना वाहनांची फारशी वर्दळ, ना माणसांची… उन्हाच्या दिवसभराच्या तडाख्यानंतरचा हा हलकासा माहोल खरंतर दिलासा देणारा असाच होता. कधी गाडीच्या खिडकीतून बाहेर कटाक्ष टाकत, तर कधी हातातल्या कवितेच्या पुस्तकातल्या ओळींकडे पाहत माझा प्रवास चालला होता. बाहेरचा प्रवास आणि आतला प्रवास दोघंही बरोबर विरुद्ध दिशेने जात होते त्यामुळे मन काहीसं अस्वस्थ होतं. कवितेतल्या कडव्यांवरून नुसतीच नजर फिरत होती. ना अर्थ पोहोचत होता, ना लय गवसत होती. 

थोडा वेळ डोळे बंद करून मी आतल्या प्रवासाकडे लक्ष द्यायचं ठरवलं. शेजारी बसलेला नवरा मध्येच मला बोलतं करण्याचा प्रयत्न करत होता. पण मला त्याच्या बोलण्यालाही नीट प्रतिसाद देता येत नव्हता. वास्तव-कल्पना यांच्यामध्ये तोल सांभाळणारा लंबक आज जरा भरकटलाच होता. कारण सारं काही यंत्रवत, रुटीनसारखं वाटत होतं. मनाला स्पर्श होणारं, भावणारं, नवं निर्मितीला चालना देणारं असं काही भवतालात घडतंय असं वाटत नव्हतं. लिहायचं तर होतं पण शब्द मध्येच कुठेतरी रुसून बसले होते. काय करावं? 

पुन्हा डोळे उघडले. कवितेच्या ओळींवर नजर फिरवली आणि मनातल्या मनात घोकत पुन्हा डोळे मिटले. असाच थोडा वेळ गेला. अचानक कर्कश्श आवाज यायला लागले. म्हणून डोळे उघडून पाहिलं तर आमची गाडी सिग्नलला थांबली होती. आजूबाजूच्या वातावरणात काहीतरी बदल झाल्यासारखं वाटलं. टिश्यू पेपर विक्रेते, खेळणी विक्रेते, फळवाले, फुलवाले या साऱ्यांना जणू ग्रीन सिग्नल मिळाला होता. जणू त्यांचं थांबलेलं जग सुरू झालं होतं. 

उत्सुकतेनं माझ्या औदासिन्यावर मात केली. मी आजूबाजूला पाहू लागले. इतक्यात रस्त्याच्याकडेला पण मधोमध फुलं घेऊन विकणाऱ्या एका बाईने माझं लक्ष वेधून घेतलं. कमाल सौंदर्य होतं ते… सावळा रंग, अंगावर साधी पण कसंलतरी फुलांचं डिझाईन असलेली साडी,  त्याला अजिबात सूट न होणारा वेगळ्याच रंगाचा ब्लाऊज. चेहरा अगदी चंद्रासारखा गोल, विलक्षण बोलके रेखीव टपोरे डोळे, सरळ टोकदार नाक, त्याला अगदी प्रमाणबद्ध अशी जिवणी आणि मुख्य म्हणजे अत्यंत प्रसन्न, आनंदी चेहरा. रस्त्यावरतीच उभं असलेल्या एकाशी ती बोलत होती. काय बोलत होती हे माहित नाही पण बोलताना तिचा चेहरा प्रसन्न होता. तिच्या पुढ्यात असलेल्या टोपल्यातल्या फुलां इतकीच टवटवीत दिसत होती. बोलता-बोलता तिने मान खाली केली आणि टोपलीतली फुलं काढून आपल्या हातात धरली. तेव्हा तिच्या जाडजूड आणि काळ्याभोर अंबाड्याकडे माझं लक्ष गेलं. त्यावरती तिनं दोन-तीन गजरे मस्त गोलाकार फिरवून माळले होते. सावळ्या हातात अलगद धरलेल्या त्या रंगीबेरंगी फुलांकडे पाहू की तिच्या चेहऱ्याकडे असं मला प्रश्न पडला. फुलवालीला एकूणच नीटनेटकेपणाची आवड होती असं जाणवत होतं.  नक्की काय जास्त सुंदर आहे? असा विचार करत तिचा फोटो टिपावा म्हणून मी माझा मोबाईल काढायला पर्स उघडली… 

इतक्यात एक कोवळा आवाज आला. ‘ताई गजरा घ्या ना मोगऱ्याचा आहे पन्नासला पाच.’ नकळत मी वळून पाहिलं तर एक सात-आठ वर्षाचा मुलगा हातात गजरे घेऊन आमच्या कारच्या खिडकीशी उभा होता. मी नकळतच त्याला नाही म्हटलं. तसं त्याचा चेहरा जरा पडला. ‘निदान एक तरी घ्या’ असं तो म्हणू लागला. तेव्हा मात्र माझं त्याच्या चेहऱ्याकडे व्यवस्थित लक्ष गेलं आणि एकदम चमकायला झालं. फुल विकणाऱ्या त्या बाईचाच तो मुलगा होता हे त्याचा तोंडावळा सांगत होता. त्याचे साधे कपडे, पण नीटनेटकेपणा, चेहऱ्यावरचे शांत भाव, विलक्षण बोलके डोळे… हे सगळं अतिशय सात्विक, निरागस होतं.  

‘घ्या ना ताई एक तरी’ तो पुन्हा म्हणाला. यावेळी त्याच्या डोळ्यात आर्जव दिसलं… ज्या प्रकारे त्यानं गजऱ्यांना हातात जपून धरलं होतं त्यात निरागसता आणि त्या फुलांविषयीची त्याची आपुलकी दिसली. माझ्या मनात आता द्वंद्व सुरू झालं घ्यावं की?? नं घ्यावं?? शेजारी बसलेल्या नवऱ्याने ते अचूक ओळखलं. “अगं घे एखादा तरी, तो एवढं म्हणतोय तर…” तो असं म्हणता क्षणी त्या मुलाचा चेहरा क्षणात आनंदाने चमकला. आणि ते पाहून काय झालं ते मला कळलं नाही मी पटकन म्हटलं, “एक नको मला पन्नासचेच दे!” हे म्हणताच क्षणी तर त्याचा चेहरा आनंदाने फुलून आला होता. मग मी त्याला विचारलं, ‘सुट्टे पैसे आहेत का रे बाळा?’ तेव्हा त्यांनं निराशेनं नाही अशी मान डोलावली. मी म्हणलं, “हरकत नाही थांब! माझ्याकडे असतील मी शोधते.” आता त्याला परत नाराज करणं हे मलाच बरोबर वाटत नव्हतं. मग आम्ही दोघेही आपापल्याकडच्या पैशांमध्ये सुट्टे पैसे शोधू लागलो. नवरा म्हणाला, “सिग्नल संपत आलाय लवकर आटप… ” तो मुलगाही थोडासा बैचेन झाल्यासारखा वाटला. घाई गडबडीत हाताला लागतील ती तीन-चार नाणी गोळा केली आणि त्याच्या हातात पटकन सोपवली. “किती झाले रे?” अंधार पडत असल्यामुळे मला पटकन लक्षात आलं नाही. तो म्हणाला, “पस्तीस रुपये झालेत ताई, अजून पंधरा हवेत.” गडबडीने मग दोघांनी मिळून उरलेले पंधरा रुपये कसेबसे त्याच्या हातात दिले. तोवर सिग्नल सुटला होता. 

गाड्या हळूहळू हॉर्न वाजवत आमच्या पुढून जायला लागल्या होत्या. ‘सांभाळून जा रे बाळा’ असं मी मागं वळून त्याला म्हणत होते. तेव्हा त्याचा फुललेला, आनंदी झालेला चेहरा मला खूप समाधान देऊन गेला. मला वाटलं आता हे पैसे जेव्हा तो त्याच्या आईला देईल तेव्हा तिचा आधीच प्रसन्न आणि आनंदी असलेला चेहरा आणखीन आनंदाने फुलून येईल.  मग दोन चालती बोलती सुगंधी झाडं आनंदाने डवरलेली मला डोळ्यांपुढं दिसू लागली. मघाचची उदासीनता कुठल्या कुठे पळून गेली. सहज वर आकाशात बघितलं तर तिथेही बिनवासाची पण चमचमणारी फुलं हळूहळू उमलत होती. एकदा त्यांच्याकडे पहात आणि एकदा हातातल्या गजऱ्यांचा वास घेत माझा पुढचा प्रवास सुरू झाला. आता कवितेच्या पुस्तकात डोकावण्याची गरज नव्हती कारण सिग्नललाच मला एक जिवंत कविता भेटली होती. 

खरंच काही साध्या घटना किती निरागस आनंद सहजपणे देऊन जातात ना! 

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हृदयस्पर्शी भाग-२ – लेखिका : वर्षा कुवळेकर ☆ प्रस्तुती – डाॅ. शुभा गोखले ☆

डाॅ. शुभा गोखले

? इंद्रधनुष्य ?

☆ हृदयस्पर्शी भाग – २ – लेखिका : वर्षा कुवळेकर ☆ प्रस्तुती – डाॅ. शुभा गोखले 

प्रास्ताविक करताना नर्मदालय काय आहे हे स्वतः भारती ताईंनी सांगितले. सुरुवात कशी झाली, घटनाक्रम कसा होत गेला, आज काय आहे आणि भविष्यातील उद्दिष्टे काय डोळ्यासमोर आहेत हे मितभाषी ताईंनी अगदी नेमक्या शब्दात जरी सांगितले तरी प्रत्यक्ष तिथे असल्यामुळे तो प्रचंड आवाका मला जाणवत गेला. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या या मुलीला आजूबाजूचे लोक पाहत होतेच पण एका नागा साधूने ताईंच्या कामाची विशेष दखल घेतली . स्वतः हुन या साधुबाबा नी आपली पाच गुंठे जमीन दान केली. नवल वाटून ताई म्हणाल्या ,” मला नाही गरज,” तेव्हा साधू म्हणाले ,” तुला नाहीच देत मी जमीन, ज्या छोट्या मुलांसाठी तू काम करते आहेस त्यांच्यासाठी देतोय.” एक महान काम उभे राहायची ती सुरुवात होती. खडबडीत जमिनीवर झोपडीत ही राहणाऱ्या ताईंनी कष्ट सुरू केले. ते पाहून लोकाश्रय मिळाला. आजवर कोणतीही सरकारी मदत न घेणाऱ्या या संस्थेने महान काम करून दाखवले ते केवळ कष्ट, तळमळ, प्रामाणिक व्यवहार या जोरावर. समविचारी लोक मदतीला उभे राहिले. आज चार मोठ्या इमारती उभ्या आहेत, पाचवी तयार होते आहे. शिक्षणाची वेगवेगळी दालने त्यातून सज्ज झाली आहेत. सरकारी अभ्यासक्रम तर आहेच पण स्वावलंबी करणारे शिक्षण प्रामुख्याने दिले जाते आहे. छोट्या छोट्या मुलांची जबाबदारी घेणारी ही एक भगव्या कफनीतील तपस्विनी किती विलक्षण खंबीर आहे हे मला आत कळत गेले. एका जंगलात राहून असंख्य अडचणीला तोंड देणारी, छोट्या मुलांना उराशी कवटाळून त्यांना सुरक्षित आयुष्य देणारी ही स्त्री मनाने किती हळवी आहे हे त्यांचे मनोगत ऐकताना प्रकर्षाने जाणवले. त्यांचा दिग्विजय, गोलू, शंकर, जितेन अशी मुले काय काय करतात हे त्यांच्याच तोंडून ऐकायला मिळाले. लहान लहान सात आठ वर्षांची ही मुले ताईंना मिळाली. आज विशी बाविशितील ही मुले हे चमत्कार आहेत. गोलू तेरा चौदा वर्षाच्या मुलांना मदतीला घेऊन इतक्या मोठ्या प्रमाणावर आलेल्या मंडळींचे नाश्ता, जेवण तयार करत होता. ही मुले गोशाळा सांभाळतात, दैनंदिन व्यवहारात संपूर्ण मदत करतात, छोट्या मुलांची सगळी जबाबदारी पेलतात. एव्हढे काहीच नाही तर नवीन इमारतीतील तेवीस टॉयलेट्स या मुलांनी स्वतः केली. टाइल्स बसवल्या प्लंबिंग पूर्ण केले. . सायन्स मधील वेगवेगळी आव्हाने मुले स्वीकारत आहेत. टाटा, बी ए आर सी , व्ही एन आय टी सारख्या संस्थांनी यांच्या कामाचे कौतुक करून त्यांच्या संस्थेसोबत affiliation आनंदाने दिले आहे. रुरल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट यातून अनेक नवीन प्रशिक्षणे सुरू आहेत. व्यवसायाभिमुख शिक्षण कसं असावं ते ताईंनी प्रत्यक्षात आणले आहे. आज ही मुले निश्चित पायावर खंबीर उभी होत आहेत.

 हे सगळे सांगत असताना गेल्यावर्षी म्हणजे सप्टेंबर 2023 ला आलेल्या पुरात या आठ दहा मुलांनी अतुलनीय साहस दाखवून जे काम केले ते सांगताना भरती ताई सद्गदीत झाल्या. गावकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवणे, त्यांची सर्व व्यवस्था हे झालेच परंतु लेपा पासून आठ दहा किमी वर भट्ट्याण येथे आणखी एक आश्रम शाळा तिथल्या मुलांसाठी सुरू केली आहे. निवासी मुलं नाहीत तिथे तरी जवळपास एकशे सत्तर मुलं शिकायला येतात. ती शाळा नदीच्या पात्रापेक्षा भरपूर उंचीवर असूनही अतिरेकी पावसाने धोक्यात आली. एखादा फूट अजून चारी बाजूंनी माती ढासळली असती तरी शाळा धाराशायी झाली असती. मुलांना तिथे पाठवणे अजिबातच सुरक्षित नव्हते. ही शाळा वाचवण्यासाठी या लहान मुलांनी स्वतः च्या जीवावर उदार होवून पंधरा दिवसरात्र जे काम यशस्वी पणे करून दाखवले त्याबद्दल बोलताना ताईंनी प्रयासाने हुंदका आवरला. हे सारे ऐकताना आधी एका बोटाने डोळ्यातले पाणी थोपवणारे आम्ही अनावर होऊन डोळ्यांना रुमाल लावून बसलो. या मुलांना सर्वांच्या साक्षीने शौर्य पुरस्कार दिले. किती कौतुक करावं हो, शब्द थिटे आहेत.

 कोणताही क्लास, शिकवण्या न लावता 92 @% मार्कस मिळवणाऱ्या मुलांचे कौतुक झाले. धनश्री ताई ऑनलाईन संस्कृत शिकवत होत्या . त्याचे चीज 99 मार्क या विषयात मिळवून मुलांनी करून दाखवले. एक मुलगा तर फक्त संस्कृत विषयात पास झाला.हे ऐकून तर फारच विशेष वाटले. एखादा शिक्षक आवडला तर काय आश्चर्य घडू शकते त्याचे हे द्योतक आहे. मला स्वतः ला एक सत्कार विशेष हृद्य वाटला. एक सातवी मधील मुलगा . त्याला मंचावर बोलावले. ताई म्हणाल्या हा माझा विशेष आवडता मुलगा. एका दूरवरच्या खेडेगावात डोंगरावर याचे एकट्याचे घर आहे. कमालीची गरिबी. ताईंजवळ असतो. अभ्यासात अजिबात गती नाही . तो आपणहून गोशाळेत कामाला पळायचा. दिवस दिवस तिथेच. त्याच्या शिक्षकांवर ताई नाराज झाल्या , की आधीच तो अभ्यासात बरा नाही त्याला कशाला तिकडे पाठवता? ते सगळे म्हणाले आम्ही नाही duty दिली तो आपणच जातो. गोशाळा आणि स्वयंपाकघर ही त्याची आवडीची ठिकाणे . इथेच तो रमतो. हे जाणून ठीक आहे, हे कर तू, पण अभ्यास ही करायला हवास हे ताईंनी ठसविले मनात . आणि यंदा हा मुलगा सर्व विषयात 42/43 % मिळवून पास झाला. बेस्ट स्टुडंट चे पारितोषिक त्याला दिले. त्याच्याकडे बघून वाटले की इतक्या सर्वांसमोर माझा सर्वात आवडता मुलगा असं ताई म्हणाल्या, यापेक्षा इथून पुढे सर्वोत्तम होण्यास बळ मिळायला काय हवे ? 42 टक्के ही सन्मानाचे असू शकतात हा अनुभव श्रोत्यांना ही धडा होता.

 नर्मदालयातील मुले उत्तम गातात, त्यांचा वाद्यवृंद आहे. त्यांनाही सुयोग्य व्यासपीठ मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जीवनाच्या सर्व अंगांना भिडायचे, यश मिळवायचे, आनंद घ्यायचा, द्यायचा किती किती गोष्टी सहज कृतीतून मुलं शिकत आहेत. शाळेतील सर्वात लहान मुले भारती ताईंच्या जवळ राहायला असतात. थोडी मोठी झाली की मोठे भय्या त्यांना सांभाळतात. एकही मूल केविलवाणे नाही. जशी आपली घरातील मुले तशी उत्साहाने निथळणारी, आनंदी मुलं. माझ्या नातवाशी फोनवर बोलायला बोलावले मी जवळ . खूप आनंदाने प्रत्येकाने आपली ओळख करून दिली. नंतर मलाही बिलगली ती . त्यांच्या डोक्यावरून हात फिरवताना इतके छान वाटले. छान तेल लावून भांग पाडलेली, तयार होऊन आली होती. जी ताई, जी ताई करून प्रेमानी आदराने बोलणारी ही मुले आमच्या मुलांनी, नातवंडांनीही पाहायला हवीत असं वाटले.

 त्यांच्या दिग्विजयची दोन छोटी मुलं जन्मापासून तिथे आहेत. धाकटे पिल्लू सुध्दा मीठ वाढायला आले तर भरून आले एकदम. मोठा अभ्युदय ढोलकी वाजवतो. ढोलकी पेक्षा मूर्ती लहान आहे. पण त्या गाणाऱ्या चमूत आहे. सगळे बसलेत, भारती ताई एकेकाशी बोलत आहेत , मध्येच दिग्विजयचे शेंडेफळ जवळून दौडत जाते, सहज ताई प्रेमाने ओढून जवळ, मांडीवर घेतात. तेही पिल्लू आरामात त्यांच्या वक्षावर टेकून हातपाय उडविण्याचा आपला कार्यक्रम सुरू ठेवते हे माझ्या मनावर कोरले गेलेले दृश्य आहे, जे कधीही विस्मरणात जाणार नाही.

– समाप्त –

लेखिका : वर्षा कुवळेकर 

संग्राहिका :  डॉ. शुभा गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ श्रीमंत म्हणून जगा… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ. शशी नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

श्रीमंत म्हणून जगा… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

बरेच ज्येष्ठ नागरिक, श्रीमंत म्हणून मरतात, पण श्रीमंत म्हणून जगत नाहीत!

स्थावर मालमत्तेमध्ये वरिष्ठ नागरिक मनाने गुंतलेले असतात, तसे हल्लीची पिढी करीत नाही. आधुनिक पिढी ही त्या बाबतीत भावनाहीन म्हणजे प्रॅक्टिकल आहे. पूर्वीच्या पिढीने मोठमोठी घरे बांधली, ती मुलांसाठी आणि नातवंडांसाठी देखील! कमावलेला सारा पैसा  बहुतेकांनी आपल्या पुढच्या पिढीचा विचार करतच खर्च केला. ना हे वरिष्ठ कुठे लांब सहलीला गेले, ना त्यांनी कधी परदेशात जाऊन लाखो रुपये खर्च केले. ना आठवड्यातून एकदा पिझ्झा मागवला, ना बर्गर! नाटक- सिनेमा सुद्धा वर्षातून दोन- तीन वेळा! पैसे फक्त मुलांसाठी राखून ठेवायचे, झालेच तर एक दुसरा फ्लॅट घेऊन ठेवायचा, जो स्वतःसाठी काही उपयोगाचा नाही. शहरात राहात असतील तर गावी घर बांधायचे, जमीन विकत घ्यायची, असे उद्योग केले.

परिणाम काय झाले?  तर मुलांना आधुनिक शिक्षण दिले, जे फक्त आणि फक्त नोकरीभिमुख आहे.  कुठलीही शाळा, किमान भारतातील तरी, व्यवसाय वा धंदा किंवा उत्पादनाभिमुख उद्योग कसा करावा हे शिकवित नाही. डॉक्टर होण्यासाठी साधारण एक कोटी रुपये लहानपणापासून खर्च येतो. मग तो वसूल करण्यासाठी, सर्व नसतील तरी बहुतेक सारे नवीन डॉक्टर, डॉक्टरी म्हणजे सेवा व व्यवसाय नसून धंदा या दृष्टीने पाहायला लागलेत. त्यामुळे औषधे व उपचार या दोन्हींमध्ये भ्रष्टाचार व स्कॅम सुरु आहेत. इंजिनियर होऊन दहा हजारातील एक मुलगा  उत्पादनप्रणित उद्योगांकडे वळतो. बाकीचे ९९९९ इंजिनिअर फक्त इतर शहरात किंवा परदेशात मोठ्या पगाराच्या नोकरीच्या मागे असतात. स्थिर होईपर्यंत पाच सात कंपन्या सोडलेल्या असतात. आपल्या मूळ गावी न राहिल्यामुळे, इतर ठिकाणी, दुसऱ्या शहरात वा परदेशात कायम वास्तव्य करायचे ठरवल्याने इथल्या मालमत्तेमध्ये नवीन पिढीला अजिबात रस नसतो! पुढील पिढीला हे घर, जमीनजुमला याकडे पाहायला, त्याची निगा राखायला वेळ नाही. आणि त्यांना त्यात रस नाही, निष्ठा नाही. मग आईवडिलांचे निधन झाल्यावर काही मुले ती जमीन, घर विकून पैसे घेऊन निघून जातात. परदेशात राहाणारी कित्येक मुले मुली, आईवडील जिवंत असताना येत नाहीत, वेळ नाही या सबबीवर! पण ते वर गेल्यावर मात्र त्यांना इथे सारे आर्थिक हिशोब निपटायला एक- दीड महिन्याची रजा मिळते.  हे मी अनुभवले आहे. बँकेत अशा काही मुलांचा, जेष्ठ नागरिकांचा अनुभव आलेला आहे. आश्चर्य म्हणजे मागील पिढीचा मोह, मुलांविषयीच्या अपेक्षा काही कमी होत नाहीत. सगळ्या स्थावर व बँकेतील पैशांना वारस म्हणून आपल्या मुलाला वा मुलीलाच ठेवतात, जे दूर राहून, परदेशी राहून, कधी आईबापाच्या आजारपणातदेखील भेटायला न येणाऱ्या ह्या मुलांना, ते गेल्यावर एक छोटी मोठी लॉटरीच लागते ! हे मी अनुभवांती बोलतोय. कारण मी वीस- पंचवीस वर्षे पब्लिक रिलेशनमध्ये काम केले आहे.

हे वरिष्ठ नागरिक, पूर्वीची पिढी सोन्या चांदीचे दागिनेही आपल्या मुलाबाळांसाठी करून ठेवतात. हल्लीच्या पिढीला जुन्या नक्षीकामाचे दागिने पसंत नाहीत, तर पाश्चात्य लोकांप्रमाणे नव्या डिझाईनचे / खोटे म्हणजे इमिटेशन ज्वेलरी पसंत आहे. म्हणजे त्याचाही हल्ली काही उपयोग नाही.

नवी पिढी पैसे कमावणे आणि पैसे खर्च करणे एवढेच जाणते! पण त्यांना पैसे कमावण्यायोग्य ज्या पिढीने केले, त्यांचे अनुभव, त्यांची आस्था, प्रेम, निष्ठा याच्याशी नवीन पिढीला काहीही कर्तव्य नाही. पूर्वीच्या पिढीने आपल्या कर्तव्यापुढे आपली मौजमजा बाजूला ठेवली. गरजेनुसारच खर्च केला. पण मुलांना अगदी कुठल्याही अडचणींशिवाय, त्रासापासून मुक्त असे वाढविले. जे आपल्याला मिळाले नाही, त्याची वानवा नव्या पिढीला पडू नये, याची काळजी घेऊन उच्च शिक्षण त्यांच्या क्षमतेनुसार दिले. पण बरेच वरिष्ठ आपल्या पुढच्या पिढीला हवे तसे चांगले संस्कार देण्यात कमी पडले , कमी पडत आहेत, असे माझे स्पष्ट मत आहे.

आपले आईवडील आपल्याला परिस्थितीची जाणीव देत असत. आपण गरीब आहोत, की मध्यमवर्गीय, हे मुलांना ठाऊक असे. पैसेवाले देखील आपल्या मुलांचे पाय जमिनीवर राहावेत याची काळजी घेत. पूर्वी अगदी क्वचित कोणी बाईक वा कारने शाळेत येत असे. अन्यथा श्रीमंत मुले फार तर सायकलवर येत. पूर्वीच्या पिढीने खाऊ वाटताना आपला- परका असा मुलांमध्ये भेदभाव केला नाही. हुशार विद्यार्थ्यांना काही श्रीमंतांनी मदत केली पुढे जायला.आता मात्र चित्र बदलले आहे. नवी पिढी बऱ्यापैकी स्वार्थी झाली आहे, अन ह्याला कारण पूर्वीचीच पिढी आहे. नवी पिढी स्वतःच्या सुखाकडे म्हणजे ऐहिक सुखाकडे जास्त लक्ष देत आहे. टी व्ही, फ्रिज, कार, लॅपटॉप, नवनवे मोबाईल, बाईक, स्कुटी आणि घरातील इतर सुखसोयी त्यांना नाते वा संस्कार यापेक्षा जास्त महत्वाच्या वाटतात!

वरिष्ठ आता आपला भार मुलांवर पडू नये, असे शक्यतो पाहातात. पण हल्ली नातवंडांची जबाबदारी देखील, जर एकत्र राहात असतील तर घेतात.

ही जी जबाबदारीची आणि कर्तव्याची जाणीव मागील पिढीला होती व आहे,तीच जाणीव आताच्या पिढीमध्ये कमी होत चालली आहे.

आधीच्या पिढीने आता हे ध्यानात ठेवावे, q की आयुष्यमान वाढते आहे, राहणीमान महाग होते आहे, अशा वेळी तुम्ही स्वतःकडे केव्हा पाहाणार आहात? आपली संपत्ती आपल्या मृत्यूनंतर इथेच राहाणार आहे. पुढील पिढीला ती आयती संपत्ती मिळाल्यावर त्यांना त्या संपत्तीचे मोल असणार नाही. कारण रुपयाचे अवमूल्यन कमी होत आहे. कालचे तुमचे हजार रुपये आज एक रुपया समान आहे. आता तरी पुढील पिढीच्या सुखासाठी आपले सुख बाजूला सारु नका. तुम्ही त्यांना कमावण्यायोग्य बनवले आहे. ते त्यांचे जीवन जगत आहेत. तुम्हीही तुमचे जीवन जगा.

जीवनाचा आनंद घ्यायला आता तरी शिका. बरेच भारतीय आपले जीवन कंजुषपणाने जगतात, काटकसरीने खर्च करतात ते केवळ पुढील पिढीने श्रीमंत व्हावे, त्यांना काही कमी पडू नये म्हणून.पण आता हे बंद करा. स्वतःसाठी जगायला शिका. स्वतःचे छंद, इच्छा यावर खर्च करा. राहिलेल्या इच्छांची एक यादी करा. त्या यादीतील एक एक इच्छा पुरी करण्यासाठी जगा. जुन्या मित्रमैत्रिणींना भेटा!

साठ- पासष्ठ म्हणजे काही मरण्याचे वय नव्हे! आता अजून किती दिवस जगणार आहोत, हा विचार सोडा. समजा, तुम्हाला परमेश्वराने नव्वद ते शंभर वर्षांचे आयुष्य दिले असेल तर अजून तुमच्याकडे वीस- पंचवीस किंवा तीस वर्षे शिल्लक आहेत, जी तुम्ही पूर्णपणे स्वतःसाठी जगू शकाल.पुरे झाले आता इतरांसाठी जगणे. “आता आपले काय राहिलेय..?” हा विचार करीत राहाल तर शेवटची काही वर्षे आजारपणात, इतरांच्या वर अवलंबूनराहत काढावी लागतील, हे लक्षात ठेवा.

दीर्घायुषी व्हा, निरोगी राहा. गरीबीत भले जन्माला आला असाल, श्रीमंत म्हणून फक्त मरू नका, तर श्रीमंतीत जगा! मस्तीत राहा, लहान लहान गोष्टीत आनंद मिळवा!

लेखक :अज्ञात

प्रस्तुती :सौ.शशी नाडकर्णी – नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆  वृद्धावस्था…. एक जबाबदारी — लेखक – श्री अरुण पुराणिक ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

🔅 विविधा 🔅

☆ वृद्धावस्था…. एक जबाबदारी — लेखक – श्री अरुण पुराणिक ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

(आजी आजोबा दिना निमित्त)

मानव जेव्हा जन्माला येतो ती त्याच्या जीवनातली पहिली अवस्था आणि किनाऱ्याला आणते ती वृद्धावस्था. ही अवस्था सर्व अवस्था पार करून आलेली असते, त्यामुळे ती परिपक्व असते, असू शकते, असलीच पाहिजे.

एकेक क्षण मोलाचा

विचार करीत मी निघालो ।

आयुष्य सार्थकी होण्या

घडवीत मी निघालो ।।

माणसाचे कळतेपण वाढीस लागते तेव्हा आपण काय करावयास पाहिजे याचा प्रामाणिक विचार करू शकतो, आणि आणि मग जसजसं वय वाढत जाईल, तसा अनुभव संपन्न होऊन मार्गदर्शन करण्याइतपत येतो आणि तसंच ते झालं ही पाहिजे.

जीवनाचा उत्तरकाळ

मार्ग दाखविला अनुभवांचा ।

त्यातून घडला जीव

सार्थकी तो त्या क्षणांचा ।।

आपल्याकडून अनुभव संपन्न आयुष्याने एखादा उभरता जीव हा योग्य मार्गी होऊन यशोदायी जीवन जगला पाहिजे.

आपल्या अनुभव संपन्नेतून उभरदायी आयुष्य घडतांना, योग्य मार्ग दाखविणं हे वृद्धावस्थेतील महत्त्वाचे कार्य आहे. आपण किनारा गाठलेला असतो आणि त्यांना गाठावयाचा असतो. त्यामुळे त्यांना योग्य मार्ग दाखविणं ही त्यांची गरज असते. ती गरज भागविणं हे वृद्धांचे कार्य आहे.

कोणतेही काम म्हणजे पूजा असते, म्हणून ती विश्वासानेच झाली पाहिजे. जीवनावश्यक वस्तू आपणास लागतात, त्या विकत घ्याव्या लागतात म्हणून आधी खर्च करण्यापूर्वी मिळवायला शिकविले पाहीजे.

आपले विचार दुसऱ्या पर्यंत पोहोचविण्यासाठी लिहावं लागत, म्हणून लिहिण्यापूर्वी आपले विचार हे सुविचार कसे असतील ह्याचं मार्गदर्शन झालं पाहिजे.

आपण काय बोलावं, ते योग्य की अयोग्य? यासाठी अगोदर दुसऱ्याचे बोलणे ऐकावयास शिकले पाहिजे.

“प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेल ही गळे. ” ही म्हण आपणांस माहित आहे. त्यामुळे कोणत्याही गोष्टीत हार न स्विकारता प्रयत्नशील राहता आलं पाहिजे.

आपण जगतो ते कसं असलं पाहिजे, यासाठी मी एक गोष्ट सांगेन…

… समजा, मला कोणी २ रुपये दिले तर मी १ रुपयाचे काही खायला आणेन. ‘जगायचं म्हणून’ आणि दुसऱ्या रुपयाचं फुल आणेन ‘कसं जगावं?’ हे शिकवण्यासाठी.

आपण मनुष्य म्हणून जन्माला आल्यावर सर्वात बुद्धिमान म्हणून विचार करत असतो. तिचा उपयोग करता आला पाहिजे, हे सांगता आलं पाहिजे की, मरण्या अगोदर जगावयास शिका.

चुका करणे हा माणसाचा स्थायीभाव आहे. पण तीच चुक परत करू नका. चुक करतो तो माणूस, चुक सुधारतो तो देव माणूस, याचं ज्ञान दिलं पाहिजे.

“तारूण्य म्हणजे चुका,

प्रौढत्व म्हणजे लढा,

वृद्धत्व म्हणजे पश्चाताप. “

पण वृद्धत्व हा पश्चाताप व्हावा असं नको असेल तर…

… वृद्धावस्थेत मार्गदर्शक व्हा. जीवन आणि जीव घडवा आणि घडवित असतांना आपले शरीर स्वास्थ्य जर सांभाळले व पुरेसा आर्थिक स्तर स्वतःचा ठेवला तर वृद्धत्वाच्या समस्या येणार नाहीत आणि आल्या तरी त्या निवारता येतील.

आपल्या वर्तनानं ज्या गोष्टी शिकविल्या पाहिजेत, त्या म्हणजे “मान, दान आणि ज्ञान. “

मान देता आला पाहिजे, दान निरंतर केले पाहिजे आणि ज्ञान आपल्याकडे आहे ते दुसऱ्यास दिले पाहिजे.

हे सांभाळले तर वृद्धावस्था ही समस्या राहणार नाही आणि त्यामुळे तुम्ही किती जगलात? यापेक्षा कसे जगलात? याला जास्त महत्त्व असेल.

आयुष्यात अशा गोष्टी करू नका की, जेणेकरून झोपेचं कर्ज होईल आपल्यावर कारण त्यामुळे रक्तदाब, मधुमेह यासारखे भयानक त्रास आयुष्य उध्वस्त करतील.

म्हणून वृद्धावस्था ही स्वतःला जपण्याची व जपत असताना दुसऱ्यास अनुभव देणारी एक अवस्था आहे यावर विश्वास असला पाहिजे.

घरातील ज्येष्ठ व्यक्ती या नात्याने वावरत असतांना, ज्ञानाचा सूर्य, प्रेमाचा महासागर आणि शांतीचा हिमाचल असं आपलं स्थान असलं पाहिजे आणि ते आपण निर्माण करून आदराच्या स्थानी दिसलचं पाहिजे.

 House is built by bricks, but Home is built Hearts.

 हे वचन सिद्ध करणे ही ज्येष्ठ व वृद्ध म्हणून कर्तव्य आहे आणि ही वृद्धावस्थेतील सर्वात मोठी जबाबदारी आहे, हे लक्षात असलं पाहिजे. 🙏

लेखक : श्री अरुण पुराणिक

संग्राहक : अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares