मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ हाताचे ठसे… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती :सौ. रेखा जांबवडेकर ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ हाताचे ठसे… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती :सौ. रेखा जांबवडेकर 

बाबा भिंतीला धरून (भिंतीला हात लावून )चालत रहायचे .ते जसे जसे भिंतीला हात लावत, त्या त्या ठिकाणाचे रंग पुसट होत जात व मळकट होत.

ते पाहून माझ्या बायकोच्या  चेहऱ्यावरचे भाव बदलत असताना मी बघत होतो .

त्या दिवशी बाबांचं डोकं दुखत होतं की कोण जाणे त्यांनी डोक्याला तेल लावले होते  आणि त्याच हाताने भिंतीला धरून चालत राहिल्याने  हाताचे ठसे भिंतीवर उमटले असावेत .आणि ते पाहून माझी बायको माझ्यावर जाम भडकली .मला पण काय झालं होतं, कुणास  ठाऊक!  मी तडक  बाबांच्या रूममध्ये जाऊन म्हणलो, “बाबा, तुम्ही भिंतीला हात न लावता चालण्याचा प्रयत्नच करणार नाही का ?” माझा आवाज जरा उंचच झाल्यासारखं मला वाटलं .८०वर्षाचे  माझे बाबा. त्यांनी माझ्याकडे बघितले . एखादा लहान मुलगा आपली चूक झाली असावी, असा चेहरा करतो, तसा बाबांचा झाला होता . मान खाली घालून ते गप्प बसले .

‘छे!हे मी काय केलं?मी असं म्हणायला नको होतं,’

असं मलाच वाटायला लागलं .

माझे स्वाभिमानी बाबा तेव्हापासून मौन  झाले आणि त्यांनी भिंतीला हात लावून चालणं सोडून दिले .

पुढे दोन-चार दिवसांनी ते असेच चालत असताना तोल जाऊन पडले .आणि  त्यांनी अंथरुणच धरलं .पुढे दोन दिवसांनी त्यांनी आपली इहलोक यात्रा संपवली .

भिंतीवरच्या त्या हाताचे ठसे पाहून मला माझ्या छातीत काही तरी अडकल्यासारखं वाटत राहिलं.

दिवस ,दिवस पुढे उलटत राहिले .माझ्या बायकोला भिंती रंगवून घ्यावे, असे वाटू लागले .

रंगविणारे आलेसुद्धा.

आमच्या जितूला आपले आजोबा म्हणजे प्राण प्रिय .भिंती रंगविताना आजोबांच्या हाताच्या ठशांना सोडून रंगविण्याचा हट्टच धरला .

शेवटी ते रंगकाम करणारे म्हणाले, “सर, तुम्ही काही काळजी करू नका  त्या ठशाच्या भोवतीने गोल करून छान पैकी डिझाईन करून देतो .ते तुम्हालाही आवडेल .शेवटी मुलाच्या हट्टापुढे काही चालले नाही.

पेंटरने व्यवस्थित ठसे तसेच ठेवून भोवतीने सुंदर डिझाईन करून दिलं.

पेंटरची  आयडिया सर्वांनाच आवडली .घरी येणारे पाहुणे , मित्रमंडळींना पण आवडली. ते या कल्पनेची खूप स्तुती करू लागले. आणि पुढे जेव्हा जेव्हा भिंती रंगवण्याचे काम होत गेले, तेव्हा तेव्हा त्या हाताच्या ठशाभोवती डिझाईन बनविलं जाऊ लागलं.

सुरुवातीला मुलाच्या हट्टापायी हे जरी करत राहिलो, तरी आमचाही व्यामोह वाढत गेला .

दिवस , महिने, वर्ष पुढे सरकत चालले .जितू मोठा झाला.त्याचं लग्न झालं.  तसं मी माझ्या बाबांच्या स्थानावर येऊन पोहोचलो .बाबांच्या एवढा नसलो, तरी सत्तरीला येऊ लागलो होतो .

मलाही तेव्हा भिंतीला धरून चालावं, असं होऊ लागलं.

पण मला तेव्हाचं आठवलं. किती चिडून बोललो होतो बाबांना! म्हणून चालताना भिंतीपासून थोडं अंतर ठेवूनच चालत राहिलो .

त्या दिवशी रूममधून बाहेर पडत असताना थोडासा तोल गेल्यासारखं झाल्याने आधार घेण्यासाठी भिंतीकडे हात पसरणार, तोच मी माझ्या मुलाच्या बाहूमध्ये असल्याचे जाणवलं.”अहो बाबा, बाहेर येताना भिंतीला धरून यायचं ना ? आता तुम्ही पडता पडता थोडक्यात वाचला. ” मुलाचे वाक्य कानावर पडले .

मी  जितूच्या मुखाकडे पाहत राहिलो . त्याच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती. पण द्वेष नव्हता .

तिथेच जवळच्या भिंतीत बाबांचे हात मला दिसले .

माझ्या डोळ्यांसमोर बाबांचं चित्र उभं राहिलं.

त्या दिवशी मी  ओरडून बोललो  नसतो, तर बाबा अजून जगले असते, असं वाटू लागलं .आपोआप डोळ्यात पाणी साचू लागलं.तेवढ्यात तिथेच जवळ थांबलेली 8 वर्षाची नात  श्रिया धावत आली.

“आजोबा , आजोबा, तुम्ही माझ्या खांद्यावर हात ठेवून चला,”म्हणत हसत हसत माझे हात आपल्या खांद्यावर घेऊन निघाली .

हॉलमधील सोफ्यावर बसलो .लगेच नातीने आपलं ड्रॉईंग बुक दाखवलं , “आजोबा, आज माझ्या क्लासमध्ये ड्रॉईंग परीक्षा झाली.मला फर्स्ट प्राईझ मिळालं.” 

“हो का ? अरे व्वा!  दाखव बघू. कोणतं ड्रॉईंग आहे ते?”म्हटल्यावर तिने ड्रॉइंगचं पेज उघडून दाखविलं.

आमच्या भिंतीवरच्या बाबांच्या हाताचे चित्र आहे, तसंच काढून भोवतीने सुंदर नक्षी काढली होती.

आणि म्हणाली ,”टीचरनी विचारलं,हे काय आहे ? म्हणून. मी सांगितले, हे माझ्या बाबांच्या आजोबांच्या हाताचे चित्र आहे.आमच्या घरच्या भिंतीवर हे चित्र कायमचं कोरून ठेवलंय .

टीचर म्हणाल्या , मुले लहान असताना असे भिंतीवर चित्र काढत असतात. भिंतभर रेघोटे,हाता पायाचे चित्र काढत राहतात .मुलांच्या आईवडलांना त्यांचं कौतुक वाटतं .त्यामुळे मुलांवर त्यांचं प्रेमही वाढत राहतं .टीचर आणखी म्हणाल्या आपण पण आपल्या वयस्क आई- वडिलांवर ,आजी- आजोबावर असेच प्रेम करत राहायला पाहिजे . मला व्हेरी गुड श्रिया असे म्हणून त्यांनी माझं कौतुक केलं

असं श्रिया गोड गोड बोलत राहिली.  तेव्हा  मला माझ्या नातीपुढे मी किती लहान आहे, असं वाटू लागलं .

मी माझ्या रूममध्ये आलो .दरवाजा बंद केला आणि बाबांच्या फोटोपुढे येऊन “मला क्षमा करा. बाबा, मला क्षमा करा,” असं म्हणत मन हलकं होईपर्यंत रडून  घेतलं  आणि वरचेवर असंच रडून बाबांची क्षमा मागत राहिलो.

लेखक :अज्ञात

प्रस्तुती :सौ. रेखा जांबवडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ संकल्पाचा दिवस… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

संकल्पाचा दिवस☆ सौ कल्याणी केळकर बापट

खरंतरं नववर्षाच्या दिवसाचे वेध हे दोनतीन दिवसा आधीपासूनच लागतात आणि त्याची साग्रसंगीत तयारी सुद्धा करावी लागते.कारण  हा  दिवसच मुळी खूप महत्वाचा, आनंदाचा आणि मांगल्याचा.

चैत्र शुद्ध प्रतिपदा.गुढीपाडवा. हिंदू नववर्षाची सुरवात. वर्षाचा  पहिलाच दिवस. येते वर्ष आपणा सगळ्यांना निरामय आरोग्याचे, सुखाचे आणि भरभराटीचे जावो हीच श्रीराम चरणी प्रार्थना.

आमच्याकडे खेड्यावर श्रीरामाचं नवरात्र असतं.गावी बापटांचं श्रीराममंदिर आहे.ह्या दिवशी सकाळपासूनच मंगलमय,प्रसन्न असं वातावरण असतं.अगदी भल्या पहाटे पाच वाजता रांगोळ्या रेखाटून, तोरणं लावून गुढीचे स्वागत करायला सगळा गाव सज्ज होतो.गुढी उभारणीचा मुहूर्त अगदी सुर्योदयाचा.गुढीला ल्यायला काठापदराचे नवीन वस्त्र, हार,बत्तासे गाठ्या,कडुलिंबाच्या डहाळ्या,आंब्याची पाने इ. नी गुढी सजवायची.त्यावर कलश पालथा घालून गुढी सजवून ती उंच उभारायची.

गुढी म्हणजे सौख्याचे,मांगल्याचे प्रतीक. खरचं असे सणवार आपण साग्रसंगीत घरी केलेत तरच हा वसा पुढील पिढीपर्यंत पोहोचेल.

आजकाल बहुतांश गावांमध्ये होणारा एक दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम” पाडवापहाट “बघण्यास जाण्याचा योग ह्या घरच्या पुजेमुळे येत नाही. कारण सगळ्यात जास्त आपल्या घरची गुढी उभारणं, तिचं व्यवस्थित पूजन करुन नैवेद्य दाखविणं. आणि हा चांगला वसा जर पुढील पिढीपर्यंत संक्रमित करायचा असेल तर आधी तो आपण जपून दाखविला पाहिजे.

मागे दोन वर्षांपासून कोरोनामुळे सगळे सामुहिक धार्मिक कार्यक्रम, एकत्रितपणे साजरे केल्या जाणारे सणसमारंभ ह्यावर जरा अंकुशच आला होता. आता जरा मोकळं झाल्यासारखं वाटतं.

आता गुढीपाडवा ,नववर्षाचा पहिला दिवस,निदान ह्या दिवसाची सुरवात अगदी स्वतःबद्दलची एकतरी खरीखुरी गोष्ट सांगुन करावी ह्या उद्देशाने सांगते गुढीपाडवा हा माझ्यासाठी  आणखी एका कारणासाठी खूप महत्त्वाचा दिवस. असे कित्येक गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मी काही तरी स्वतःमध्ये चांगले बदल,स्वतःला चांगल्या सवयी लावून करते पण खरी गोम अशी की हे संकल्प रामनवमी पर्यंत सुरळीत बिनबोभाट कटाक्षाने नियमित सुरू राहतात आणि मग एकदा का रामनवमी झाली की परत ये रे माझ्या मागल्या नुसार माझी संकल्पांची एस. टी. गचके खात थांबते.पण एक नक्की दर गुढीपाडव्याला संकल्प ठरवायचा आणि तो काही दिवस सुरू ठेवायचा हा शिरस्ता काही माझ्याकडून कधीच मोडला जात नाही हे पण खरे.

पोस्टची ची सांगता माझ्याच एका जुन्या रचनेने पुढीलप्रमाणे

*

वसंतऋतूच्या आगमनाने तरवरतोय,

अवनीवरील कण न कण,

त्यानेच प्रफुल्लित झाले मन,

कारण हिंदू वर्षातील आज पहिलाच सण ।।

*

गुढीपाडवा म्हणजे अनुपम सोहळा,

सुरू होतयं आनंदाचं  सत्र,

कारण ह्याच दिवसापासून सुरू होतयं,

आमच्या रामराजाच़ नवरात्र, ।।

*

आमच्या ह्या सणाचा आनंद

काही औरच आणि निराळा,

सुर्योदयावेळी गुढी उभारणे ,

हा एक अनुपम सोहळा  ।।    

*

रावणाविरुध्ज विजयश्री मिळविली रामाने

धरुन सत्याचे शस्त्र,

मांगल्याची गुढी सजली,

लेवून कोरे करकरीत वस्त्र,

गुढीचे सौंदर्य खुलते गाठीबत्तासे व

कडूलिंबाच्या तोरणाने,

निरामय आरोग्याची सुरवात होते.

ह्या सगळ्याच्या सेवनाने ।।।

*

गुढीपाडव्याचा कलश असतो,

प्रतीक मांगल्याचे,

ह्या सणाच्या आगमनाने

लाभतात क्षण सौख्याचे,

असा हा सण न्यारा गुढीपाडवा,

रामनामातच एकवटलाय सारा गोडवा ।।

*

चैत्रशुद्धप्रतिपदेच्या म्हणजेच  

गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा ।।।

नवीन वर्ष आनंदाचे,सौख्याचे, निरामय आरोग्याचे,भरभराटीचे जावो हीच रामराया जवळ प्रार्थना.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कलाकार… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

??

☆ कलाकार… ☆ श्री सुनील शिरवाडकर

लहानपणीची गोष्ट.घरच्यांसोबत दर गुरुवारी दत्ताच्या देवळात जाणं व्हायचं.मंदिराच्या बाहेर प्रशस्त फुटपाथ होता.त्या फुटपाथवर एक दत्ताचं चित्र काढलेलं असायचं. रंगीत खडुंनी रंगवलेल्या त्या चित्रावर असंख्य नोटा.. नाणी असायच्या. आणि त्यांची राखण करत एक काळासावळा मुलगा बसलेला असायचा. प्रत्येक गुरुवारी चित्र असायचं दत्ताचचं.. पण त्यातील रंगसंगती बदललेली असायची. त्यामुळे नेहमी ते नवीनच वाटायचं.

मला एक खुप उत्सुकता होती. ते चित्र काढताना बघायची.मग एकदा मी सकाळी लवकरच त्या मंदिरात गेलो.बाहेर फुटपाथवर तोच तो काळा सावळा मुलगा उभा होता. शर्टची बटणं काढत होता. त्याने शर्ट काढला. तो हातात धरला.. आणि फुटपाथ झटकायला सुरुवात केली. त्याच्या द्रुष्टीने फुटपाथ एकदम क्लीन झाला.. मग जवळच्या पिशवीतुन त्यानं कोळसा काढला.

त्या कोळश्यानं त्यानं एक चौकोनी आऊटलाईन काढली.. चित्राच्या आकाराची.मग निरनिराळ्या रंगांचे खडू घेऊन त्यांचं चित्र काढणं सुरु झालं.कधी कुठं चुकलं की सरळ त्या भागावर थुंकायचा… आणि तो भाग दुरुस्त करायचा.त्याबद्दल त्याला काहीच वाटायचं नाही.

चित्र काढुन झाल्यावर त्यानं खिशातुन काही नोटा काढल्या.त्या दत्ताच्या चित्रावर ठेवल्या.काही नाणी विखरुन ठेवली.त्याच्या द्रुष्टीने सगळं चित्र पुर्ण झालं होतं.आता तो दिवसभर त्या चित्राशेजारी बसुन लोकांची वाट पहाणार होता.

नंतर मला त्या चित्रकार मुलाबद्दल बरीच माहिती मिळाली.दत्तु त्यांचं नाव.तो जसा गुरुवारी दत्ताचं चित्र काढतो..तसाच शुक्रवारी देवीच्या मंदिरासमोर देवीचं चित्र काढतो.. सोमवारी शंकराच्या मंदिराबाहेर चित्र काढतो.त्याचा बापही पुर्वी मंदिराबाहेर बसायचा.देवादिकांची चित्रे.. पुस्तके विकायचा.लहानगा दत्तु बापाजवळ बसलेला असायचा.मग बाप त्याला वेगवेगळ्या गोष्टी सांगे.एकदा कधीतरी पुस्तकात बघून दत्तुनं चित्र काढलं..तिथेच.. रस्त्यावर.एवढ्याश्या मुलानं काढलेलं ते चित्र बघुन चार लोकांनी त्यावर पैसे टाकले.आणि मग त्याला तो नादच लागला.

कुठलंही कलेचं शिक्षण न घेतलेले हे कलाकार.त्यांच्यात उपजतच हा एक सुप्त गुण असतो.कितीतरी कलाकार असतात असे.अगदी डोंबाऱ्याचे खेळ करणारे पहा.उंचावर दोरी बांधलेली असते.त्यावरुन तोल सावरत जाणं सोपं तर नक्कीच नसतं.हातात आडव्या धरलेल्या काठीने ते शरीराचा तोल सावरत जीवघेणा खेळ करत असतात.

काही जणांकडे एक अगदी छोटी लोखंडी रिंग असते.एका बाजुने त्यात घुसायचे.. आणि दुसर्या बाजुनं बाहेर यायचं.शरीराचं अगदी छोटं मुटकुळं करुन हा खेळ करताना किती कसरत करावी लागत असेल.

रस्त्यावर गाणी म्हणत फिरणारा वासुदेव हाही खरंतर कलावंतच.मी एकदा अश्याच एका वासुदेवाला तयार होताना पाहिलंय.पहाटे साडेचार वाजताच तो उठला होता. स्नान करुन शुचिर्भूत झाला. अगदी छोटंसं घर होतं त्याचं.लाकडी फडताळातुन त्यानं अंगरखा काढला.हा अंगरखा म्हणजे एक बाराबंदीच होती. धोतर नेसलेलं होतंच. त्यावर तो बाराबंदीच सारखा अंगरखा चढवला.एका बाजुला असलेल्या नाड्या खेचुन तो घट्ट बांधला.

एका पिशवीतुन काही माळा काढल्या. त्यात कवड्यांची माळ होती.. एक मोठ्या टपोर्या मोत्यांची माळ होती.. पिवळ्या मण्यांचे सर होते. ते परिधान केले. मग मेकअप. कपाटातुन काढलेल्या झोळीत एक छोटा आरसा होता. त्यात बघुन वासुदेवानं कपाळावर सुरेख गंध रेखलं. त्या उभ्या गंधाच्या मधोमध बुक्क्याचा टिळा काढला. हातात चिपळ्या घेतल्या.. आणि दान पावलं..दान पावलं..म्हणत पहाटेच्या सुमारास बाहेर पडला.

बहुरुपी हाही कलावंतच.पूर्णपणे पोलिसाच्या गणवेशात तो दुकानात येऊन उभा रहायचा.दारात पोलिस आल्यावर जरा दचकायला व्हायचे.त्याच्या हातात वही पेन.

“चला निघा दुकानातुन.. तुमच्या नावाचं वॉरंट आणलंय”

असं एकदम दरडावून बोलायचं.सुरुवातीला खरंच घाबरून जायचो.. हे काय आपल्यामगे लागलंय म्हणून भीती वाटायची. पण मग लक्षात यायचं.. अरे हा तर बहुरुपी. जराशी हुज्जत घालुन दहा वीस रुपये मग त्याला द्यायचो.

आणि तो त्याचा अधिकार असायचा.. असं आत्ता वाटतं.हातावर पोट असणारी ही माणसं.वर्षातले आठ महिने शेती करणं..ती नसेल तर कोणाच्या तरी शेतावर राबणं.. अगदी काहीच नाही तर बिगारी काम करणं. आणि हे करत आपली कला दाखवत चार पैसे मागणं हेच यांचं आयुष्य.

याचना करणे म्हणजे भीक मागणे. देवळाबाहेर बसुन.. हात पसरुन जे मिळेल त्यात भागवणारे वेगळे. त्यांना भिकारी म्हणणं एकवेळ ठीक.. पण हे भिकारी नसतात. ते लोकांपुढे हात पसरतात..पण त्याआधी ते आपली कोणती तरी कला सादर करतात. म्हणुनच ते असतात.. ‘ कलाकार.’ 

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘ती‘…. सुश्री उषा चौमार – लेखिका : सुश्री राधा गर्दे ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘ती‘…. सुश्री उषा चौमार – लेखिका : सुश्री राधा गर्दे ☆ श्री आशिष बिवलकर ☆

सुश्री उषा चौमार

२०२० चे साल. राष्ट्रपती भवनाच्या मोठ्या हॉलमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविद हे मंचावर पद्मश्री, पद्मविभूषण इत्यादी पुरस्कार प्रदान करत होते.एकेक व्यक्ती भरल्या मनाने, सन्मानाने ते पुरस्कार ग्रहण करत होती. एकानंतर एक नावांची घोषणा होत होती आणि पुरस्कार प्रदान केले जात होते. प्रकाश झोतात, फोटोग्राफी चालू होती. 

… त्यातच एका नावाची घोषणा झाली..उषा चौमार.

घोषणा होताच ती  जागेवरून उठून मंचाकडे चालू लागली आणि आठवणींच्या वाटेवर थबकली.

राजस्थानच्या अलवर इथे जन्मास आलेली सात वर्षांची चिमुकली उषा एक दिवस  आई बरोबर संडासाची घाण (मल/ मैला) कशी स्वच्छ करावी हे बघायला गेली आणि ट्रेनिंग घेऊन  एक परात आणि गोलाकार मोठ्या पळीसारखं भांडं हातात घेऊन घरोघरी संडासाची घाण स्वच्छ करण्याचं काम करू लागली. तिची आई तिला काम नीट करता यावं म्हणून  हे  शिकवत होती. ज्या वयात पोरं खेळण्यात रमतात त्या काळात ऊषा घाण स्वच्छ करण्याचं काम करत असायची. त्यातून  दहा पंधरा रुपयांची प्राप्ती होत असे. कुणाकडे पाहुणे आले की अर्थातच संडासाची घाण जास्त व्हायची आणि त्याचे थोडे ज्यादा पैसे मिळायचे.कामावरून एक दिवस ही सुट्टी मिळत नसे. आजारपण आलंच तर दुसऱ्याला पाठवावं लागायचं आपल्यातले  पैसे ही तिला द्यावे लागायचे.

वयाच्या दहाव्या वर्षी उषाचे लग्न झाले पण तिच्या सासरी ही हेच काम पूर्वापार चालत आल्याने तिथे ही हेच काम ती करत असायची‌. अनेकदा घरी आल्यावर किती ही स्वतः ला स्वच्छ केले तरी जेवण जायचे नाही. लोक  दूरूनच नाक मुरडायचे. हे काम करण्यासाठी त्यांचा रस्ता/वाट दुसरी असायची ज्यावरून इतर कोणी कधीच जात नसायचं.

रात्रीचं शिळं अन्न प्लास्टिकच्या पिशवीत बांधून दूर फेकायचे आणि ते ती उचलून घरी आणायची.देवळाच्या पायरीवर ही तिला कोणी बसू देत नव्हतं.

एकदा असंच डोक्यावर ती घाण घेऊन चार पाच बायका चालल्या होत्या ठराविक ठिकाणी त्यांनी ती घाण टाकली आणि परत येताना त्यांच्या बाजूला एक गाडी येऊन थांबली. त्यातून एक व्यक्ती बाहेर येऊन त्यांच्याशी बोलू लागली,

“ मला तुमच्याशी काही बोलायचं आहे.काही सांगायचं  आहे,काही विचारायचं आहे‌. ते घूंघट आधी वर करा.”

सगळ्यांच्या मनात विचार आला,

“ हा माणूस मार खाणार. आम्ही आपल्या दिरा समोर ही घूंघट उघडत नाही तिथे हा कोण लागून गेला.”

पण त्याने त्यांची वाट अडवत विचारलं,

“ तुम्ही हे काम सोडून दुसरं काम करायला तयार आहात का? पूर्वापार चालत आलंय म्हणून हे काम करताय हे खरं असलं तरी तुम्हाला दुसरं चांगलं काम करण्याची संधी मिळू शकते.”

ती व्यक्ती होती‌ बिंदेश्वरी पाठक,सुलभ इंटरनेशनलचे  कर्तेधर्ते.

त्यांनी सगळ्यांना दिल्लीला घेऊन जायचे ठरवले. दिल्ली म्हणजे त्या बायकांसाठी अमेरिकाच होती.सासूबाई म्हणाल्या,

“ अंशी नव्वद वर्षं झाली ह्या कामातून सुटका नाही आता मिळणार आहे होय?”

पण उषाच्या नवऱ्याने साथ दिली आणि ती दिल्लीला आली.पहिल्यांदा कारमध्ये बसली.  दिल्लीला सुलभ कार्यालयात तिथल्या शिक्षिकांनी आणि मुलींनी फुलांचा हार घालून स्वागत केले आणि तिने जन्मात पहिल्यांदा फुलांचा हार घातला. लग्नात ही तिच्या नवऱ्याने तिला फुलांचा‌ हार घातला नव्हता. त्यावेळेस उषाचं मन आणि डोळे दोन्ही भरून आले होते.

मोठ्या हॉटेलमध्ये आवडीचं जेवायचा पहिला प्रसंग फक्त पाठकजीं मुळे तिला अनुभवायला मिळाला. मिठाई आणि दोनशे रुपये बिदागी घेऊन ती तीन दिवसाने अलवरला परतली आणि ज्यांच्याकडे काम करायला जायची त्यांनी बोलायला सुरुवात केली,

“आता काय म्हणे हे काम करणार नाही मग काय महाराणी बनून रहाणार? बघू घर कसं चालतंय ते.”

नंतर अलवरला “ नई दिशा” म्हणून वर्ग सुरु झाला. तिथे टी.व्ही लावला गेला.साफसफाई शिकवताना जन्मात पहिल्यांदा सकाळी आंघोळ केल्यावर तिला वेगळाच अनुभव मिळाला कारण घाण स्वच्छ करताना सकाळी आंघोळ करण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. रोज आंघोळ करून, स्वच्छ कपडे घालून घरातून बाहेर पडताना वेगळाच अवर्णनीय आनंद मिळायला लागला.त्या घाण वासा ऐवजी उद् बत्तीचा सुगंध दरवळायला लागला.वर्गात, लोणची,पापड करणे, कापडी पिशव्या बनवणं वगैरे बरंच काही शिकवलं जाऊ लागलं.

“आमच्या हाताचा हा माल कोण विकत घेणार?” हे विचारल्यावर उत्तर मिळालं,

“सुलभ इंटरनेशनल”

बिंदेश्वरी पाठक ह्यांनी सुलभ इंटरनेशनलची सुरुवात “आरा” पासून केली. संडासाची घाण उचलणाऱ्यांना काय वाटत असेल हे जाणून घेण्यासाठी त्यांनी दोन दिवस हे काम केलं आणि त्यांची मनोव्यथा जाणली. किती वेदना,किती पीडा आणि किती लाचारी ह्या कामात आहे हे त्यांनी प्रत्यक्ष जाणले.

आणि ह्या “नई दिशाने” ऊषाचे जीवन आमूलाग्र बदलून टाकलं.आता तिच्या पंखात बळ आलं होतं. एक सुंदर आकाश हात पसरून तिला कवेत घेण्यासाठी आतुर झालं होतं. आता उषाने जनजागृतीचे काम सुलभ इंटरनेशनलच्या सोबत सुरू केलं होतं. इतर शिक्षणा बरोबर तिने इंग्लिश भाषा शिकून आत्मसात केली. हा तिचा प्रवास २००३ पासून सुरू झाला आणि २००७ मध्ये ऊषा सुलभ इंटरनेशनलची प्रेसिडेंट झाली.

उषाने  अमेरिका,साऊथ आफ्रिका, इंग्लंड,फ्रांस ह्या देशाचे दौरे केले तिथे अनेक भाषणं दिली. गंमत म्हणजे तिने अमेरिकेत एका फैशन शोमध्ये  साडी घालून कॅटवॉक ही केला.

जिच्या डोक्यावर घाणीची टोपली/ परात असायची तिच्या डोक्यावर मानाची पगडी विराजमान होऊ लागली होती. तिच्या पासून लांब पळणारी लोक तिला सन्मानाने घरी बोलवून लागले. तिच्या कामाची दखल श्री. राजनाथ सिंह ह्यांनी घेतली. नंतर पंतप्रधान मोदींची ही भेट झाली. हे सगळं घडत होतं पण ऊषाकडे कधीच साधं वरण म्हणजे पिवळं वरण बनलं नाही. कारण म्हणजे,

“ते वरण मला वेगळीच आठवण करून देतं त्यामुळे मी हे वरण शिजवत ही नाही आणि खात ही नाही.”

तिच्या मनावर खोलवर झालेल्या यातनांची ही परिसीमा आहे. 

टाळ्यांचा गडगडाट झाला आणि ऊषा चौमार वर्तमानात परतली. आज हा सन्मान तिचा नव्हे तर सबंध त्या स्त्री जातीचा सन्मान होता ज्या परिस्थितीला हार न जाता आलेल्या प्रत्येक संधीचा सोनं करतात.सुलभ शौचालय आणि सुलभ इंटरनेशनलमुळे घाण उचलण्याचा प्रकार जवळपास संपुष्टात आला होता म्हणून अनेक लोकांचे आशीर्वादाचे हात ही डोक्यावर होते.

लेखिका : सुश्री राधा गर्दे

कोल्हापूर

संग्राहक : श्री आशिष  बिवलकर

बदलापूर – मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ थांबणे… लेखक : श्री सुभाष अवचट ☆ प्रस्तुती डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ थांबणे… लेखक : श्री सुभाष अवचट ☆ प्रस्तुती डॉ. ज्योती गोडबोले 

कुठे..?

केव्हा..?

कसे थांबावे..?

ही एक कला आहे.

ती सर्व कलांमध्ये लागू होते..!

कविता, कथा, कादंबरी, चित्र, शिल्पात कुठे थांबायचे याला संयम आणि विवेक लागतो. अन्यथा आशय भरकटत जातो. तसे जीवनातही घडते.

माझ्याभोवती तरुणपणी अलौकिक माणसे होती. त्यांच्यामुळेच ही जाणीव मला होत गेली. विंदा करंदीकर माझे शेजारी आणि प्रतिभावंत कवी. एकदा त्यांनी ठणकावले की, आता मी लिखाण बंद करतो आहे. आणि त्यांनी शब्द पाळला.

स्वत:शी प्रामाणिक राहून या निर्णयापर्यंत यावयास धारिष्ट्य तर लागतेच; पण विसर्जनाची बूजही लागते. तसेच तात्या माडगूळकरही होते. तेही माझे मित्र होते. आयुष्याच्या उताराला लागले तेव्हा या उमद्या लेखक, चित्रकार, शिकारी आणि प्रवासी माणसाने हाच मार्ग अवलंबला. ते म्हणायचे, ‘गड्या, जगण्याची आतून उमेद राहिली नाही…!’

विंदा शेवटपर्यंत प्रसन्न राहिले. भाजी, मासे आणायला आम्ही सोबतीने जात असू. मासेवाल्या बाईशी घासाघीस करायला त्यांना मजा येत असे. तेव्हा त्यांच्यातला कवी बहुदा त्यांच्या पिशवीत त्यांनी लपवून ठेवलेला असे. तितक्याच आत्मीयतेने ते संगीतात रमत. तसेच तात्या होते. संध्याकाळी आम्ही गप्पा मारीत फेरफटका मारीत असू. तेव्हा त्यांच्यातल्या अद्भुत लेखकाची सावली कुठेही त्यांच्याबरोबर चालत नसे. उरलेले जीवन एखाद्या कवितेसारखे गुणगुणत ही माणसे कुठलेही आविर्भाव न घेता जगले.

पु. ल. देशपांडे यांनीही वेळेनुसार आवराआवर केली. देणग्या देऊन, पुस्तके/ पुस्तकांचे हक्क त्यांनी वाटून टाकून ते मुक्त झाले आणि उरलेले आयुष्य एक गिफ्ट मिळाल्यासारखे हसत जगले.

‘जोपर्यंत लोकांना वाटते आपण अजून खेळावे, तीच थांबण्याची योग्य वेळ असते…!,’ हे सुनील गावस्करचे वाक्य तंतोतंत यात बसते. कोठे थांबावे हाच संयम त्यात आहे.

विद्वान तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणजे आमचे आबा. त्यांचा व्यासंग, प्रभुत्व, त्यांची जाण, अभ्यास, समाज सुधारण्यासाठीचे त्यांचे दीर्घ कार्य सर्वानाच ठाऊक आहे. त्यांच्या सहवासात मला हेच जाणवते. या प्रचंड ज्ञानाच्या ग्रंथसंग्रहालयातून ते अचानक जुन्या महाबळेश्वरच्या घरी गेले. ड्रायव्हरला सांगितले, ‘सकाळी काही घाई नाही.’ ड्रायव्हर जेव्हा आत आला तेव्हा छातीवर हात ठेवून आबांचे विसर्जन झाले होते.

ज्ञानी आणि भक्कम जीवनाचा अर्थ कळलेले हे ऋषीच म्हणावे लागतील. साहित्य सहवासात संध्याकाळी फिरताना गंगाधर गाडगीळ एकदा भेटले. गाडगीळ हे ब्रिटिश शिस्तीतले होते. सगळं नीटनेटके, वेळेवर असायचे, जसे त्यांचे वाड:मय आणि आयुष्य होते. त्या संध्याकाळी त्यांचा ड्रेसदेखील इस्त्री केलेला, तंतोतंत होता. त्यांच्या मदतीला बरोबर नोकरही होता. मला त्यांनी थांबवले आणि म्हणाले, ‘मिस्टर अवचट, बरे झाले आत्ताच भेट झाली…! आता पुढे भेट शक्य नाही.’

‘परदेशी चाललाय का…?’ मी विचारले. ‘नाही. आत्ता सारे थांबवले आहे. लिखाण आणि इतर गोष्टी व्यवस्थित आवरल्या आहेत. औषधे बंद केली आहेत. आता एकेक मित्रांना भेटतो आहे. थँक्यू, तुमचा सहवास लाभला…!’

ते शांतपणे नोकराबरोबर फाटकापाशी चालत गेले. त्याच आठवड्यात ते गेल्याचा निरोप आला. या लोकांनी हे विसर्जन किती समजूतदार आणि अलिप्तपणे स्वीकारले होते.

ओशोंनीही अत्यंत वेगळ्या संदर्भाने विसर्जनावर लिहिले आहे. Abandoning करणे, सोडून देणे अशी सारी अंगे या विसर्जनात येतात. ओशोंनी शेवटी सांगितले, माझ्या गळ्यात घातलेल्या माळा फेकून द्या. संन्याशी भगवे कपडे काढून टाका. स्वत:चा संन्यास स्वत: शोधा. जे मौनात विसर्जित होते तेच चांगले संगीत…! त्यांच्या या वाक्यातच जीवनाच्या संगीताचे अर्थ सामावले आहेत.

जगण्याच्या या शर्यतीत प्रत्येक जण निराळे मार्ग शोधतो. बहुतेकांना ते आयते हवे असतात. कोणाच्या तरी खांद्याची, दैवताची डोके ठेवण्याची त्यांची गरज असते. पण विसर्जन हा तुमच्या बौद्धिक पातळीचा, मनाचा एक भाग आतल्या आत असतो; जो भाग एखादा गुरू प्रसाद म्हणून तुमच्या हातात देत नाही.

वयाप्रमाणे जीवनाशी सामील होणे यातच खरी ग्रेस आहे. अंगणात उन्हात तांदूळ निवडत बसलेल्या, साईसारखी त्वचा झालेल्या प्रेमळ आजीमध्ये ती ग्रेस असते.

कोऱ्या हॅण्डमेड पेपरवर रंगाचा पहिला ठिपका टाकल्यावर तो हळुवार पसरत जातो. पुन्हा अनेक रंगांत तो मिसळत जातो. त्याच्या कंट्रोल्ड ओघळांनी किंवा छटांनी एक चित्र बनते. कधी ते देखणे दिसते, कधी जमत नाही. हे महत्त्वाचे नाही. ती प्रोसेसच दैवी असते. त्या कागदावरच्या रंगाच्या प्रत्येक ठिपक्यात पारदर्शक विसर्जनाचे क्षण तरंगत असतात.. बदलत राहतात. विघटन हे अलौकिक अ‍ॅबस्ट्रॅक्ट नॅचरल चराचरातील मौनच असते.

समतया वसुवृष्टि विसर्जनै

जंगलात, ऋतुचक्रात हे सामावलेले असते. हत्तीला कळते आपले दिवस संपायला आलेत. कळपातून तो अपरात्री गुपचूप पाय न वाजवता निघतो आणि पूर्वीच शोधलेल्या गुप्त ठिकाणाकडे तो चालत राहतो. तो तेथे पोहोचतो आणि स्थिर उभा राहतो. त्याचा एवढा प्रचंड बलवान देह हळूहळू काही दिवसांत संपतो आणि मातीशी एकरूप होतो…

हे विसर्जन…!!!

झाडाचे पिकले पिवळे पान फांदीवरून निसटते. हवेत तरंगत मौनाच्या प्रार्थनेसारखे जमिनीवर अलगद टेकते आणि विसर्जित होते. अगदी  हळुवारपणे. विसर्जन ही मौलिक गिफ्ट आहे.

आजकाल लोकाना कुठे थांबावे हेच समजत नाही. जीव संपला तरी हावरटपणा जात नाही. छाती फुटेपर्यंत लोक धावत असतात मागे वळून बघत नाही. स्वत:ची पर्वा नसते का..? तर जेवढे कमवता येईल तवढे पदरात पाडून घ्यायचे पण एक दिवस सर्व असुनही सर्व संपल्यासारखे दिवस येतात तेव्हा हातात फक्त निराशा आणि अंधारच दिसतो.ऐश्वर्य येते पण ते भोगायची मनस्थिती नसते. मग जीवनभर एवढे पळून काय उपयोग झाला. शेवटी हे सगळे मायाजाल न संपणारे आहेत. त्यातून आपणच ठरवून विरक्त होणे केव्हाही चांगलेच…!!!

विचार करण्यासारखी गोष्ट आहे पण तेवढा पण वेळ आपल्याला नाही…!!!!

संग्रहिका : डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ इंद्रधनुष्य – गमती जमती ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

?  विविधा ?

इंद्रधनुष्य – गमती जमती ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

पाऊस पडून गेला कि सगळी सृष्टी आनंदी होते. धरती हिरवीगार होते, रंगीबेरंगी फुलं माळते. रंग आणि गंध यांची मुक्त उधळण करते. रंगीबेरंगी फुलापाखरं फुलांवर रुंजी घालतात.पक्षी, गाणी गात स्वछंद विहार करतात. या सगळ्या आनंदात आकाश कां मागे राहील. त्याला तर ढगांच्या जोखडातून मुक्त झाल्याचा केवढा आनंद होतो, मग तो ही इंद्रधनुची सप्तरंगी कमान उभी करतो. हे सारं पहायला मिळणार म्हणून तर आपण आज हा सूर्याचा दाह मुकाट सहन करतोय. होय नां!

आज अर्थात आपला पाऊस हा विषय नाही. आज इंद्रधनुष्य, ही जी निसर्गाची किमया आहे त्याबद्दलच्या काही गमती पहायच्या आहेत. खरं म्हणजे ह्या गमती निर्माण करण्यात निसर्गाचा जेवढा वाटा आहे तेवढाच आपल्या ज्ञान – चक्षुंचा आहे. म्हणजे डोळ्यांना काय पहायचं, कसं पहायचं, ह्याचं ज्ञान देणारा  मेंदूचा भाग. जसं  आकाश नावाची वस्तू कुणी वर अंथरलेली नाही, की त्याला कुणी निळा रंग दिलेला नाही. तसंच इंद्रधनुष्य म्हणजे कुणी कमान उभी केलेली नाही कि रंगाचे पट्टे मारलेले नाहीत. हे सगळे आपल्या डोळ्यांनी निर्माण केलेले आभास आहेत. आणि ते खरे मानून आपण त्यात रमतो. म्हणजे कल्पनेत रमण्याची मक्तेदारी कांही फक्त कवींची नाही, आपली पण आहे.

त्या सप्तरंगी कमानीला इंद्रधनुष्य म्हणतात कारण ती कमान धनुष्याच्या आकाराची आहे. त्या कमानीवरून मधल्या उंच टोकावर गेलं कि स्वर्गाचं दार दिसतं. आपल्या नशीबानं जर ते उघडलं तर इंद्राचा दरबार दिसतो, म्हणून इंद्राकडे म्हणजेच स्वर्गाकडे जायचा मार्ग सोपा करणारं म्हणून इंदधनुष्य ! फक्त आपल्या कडंच नाही हं, सगळ्या देशात अशा इंद्रधनुष्याशी संबधित गमतीदार कथा आहेत.

पुढच्या गमती पहाण्यासाठी अगदी प्राथमिक शास्त्रीय माहिती घेऊया. पाऊस पडून गेल्यावर हवेत असणाऱ्या पाण्याच्या थेंबातून जर 42 अंशाचा कोन करून प्रकाश किरण गेला तर त्या किरणाचे थेंबात जाताना व बाहेर पडताना असे दोनदा अपवर्तन होते. किरणाची दिशा बदलते व त्याचे सात रंगात पृथ:करण होते. ही क्रिया एकाच वेळी करोडो थेंबात होते कारण तेथे प्रकाश किरण सुद्धा करोडो असतात.थेंब गोल आकाराचे असल्यामुळे गोल आकाराचा रंगीत पट्टा म्हणजे गोल इंद्रधनुष्य तयार होते. खरं तर त्या पट्यात लाखो रंग असतात, पण आपले डोळे प्रमुख सात रंगच पाहू शकतात. चीनी लोक तर पाचच रंग असतात असे अजून मानतात. क्षितिजामुळे आपल्याला फक्त वरचा अर्धा भाग दिसतो. उंचावरून किंवा विमानातून पाहिल्यास गोल इंद्रधनुष्य दिसू शकते. समुद्रावर इंद्रधनुष्य पडले असेल तर तिथे अर्ध्यापेक्षा थोड़े जास्त दिसते. किरणांचा 42 अंशाचा कोन तयार होण्यासाठी किरण तिरपे यावे लागतात, त्यामुळे सकाळी किंवा संध्याकाळी इंद्रधनुष्य दिसते व ते ज्या क्षितिजावर सूर्य असेल त्याच्या विरुद्ध क्षितिजावर दिसते.

अशाप्रकारे तयार होणाऱ्या इंद्रधनुष्याला प्राथमिक इंद्रधनुष्य म्हणतात. याचा बाहेरचा रंग लाल तर आतला रंग जांभळा असतो. जर प्रकाश किरणाचे थेंबाच्या आत दोनदा, तीनदा, अनेकदा परावर्तन व अपवर्तन झाले तर एकावर एक अशी दोन, तीन, अनेक इंद्रधनुष्ये तयार होतात, त्यांना दुय्यम इंद्रधनुष्ये म्हणतात. फक्त वरच्याचा रंगक्रम खालच्या च्या उलट असतो, म्हणजे दुसरं जे तयार होतं त्याचा बाहेरचा जांभळा व आतला रंग लाल असतो. दुय्यम इंद्रधनुष्ये फारशी दिसत नाहीत कारण प्रकाश किरणाचे वारंवार परावर्तन झाल्यामुळे किरणाची तीव्रता कमी होते. त्यामुळे इंद्रधनुष्ये इतकी फिकट होत जातात की डोळ्यांना दिसू शकत नाहीत. शास्त्रज्ञांनी प्रयोग शाळेत एकाचवेळी दोनशे इंद्रधनुष्ये तयार करण्यात यश मिळवले आहे.

इंद्रधनुष्य तयार होण्यासाठी पावसाचेच थेंब लागतात असे नाही, दव, धुके, पाण्याचा फवारा, धबधबा अशा ठिकाणी ही इंद्रधनुष्य तयार होते. धबधब्याच्या ठिकाणी पूर्ण गोल इंद्रधनुष्य दिसू शकते. ब्राझील व अर्जेंटिना यांच्या सीमेवरील इग्वाझू व पराना या दोन नद्यांच्या

संगमातून 240 पेक्षा जास्त धबधबे तयार झाले आहेत. मीना प्रभू यांच्या ‘दक्षिण रंग’ मधे त्यांनी इथल्या गोलाकार इंद्रधनुष्यांचे  फार सुंदर वर्णन केले आहे. बर्फाच्या कणातून सुद्धा असा रंगीत पट्टा तयार होतो, फक्त त्याचा आकार, रंग वेगळे असतात. त्याला Fire bow म्हणतात.

अशाच प्रकारे चंद्राच्या प्रकाश किरणापासून सुद्धा इंद्रधनुष्य तयार होऊ शकते . फक्त प्रकाशकिरण तेवढे तीव्र असायला हवेत. जगाच्या कांही भागात हे moon bow दिसते.

आता अशी एक गोष्ट सांगणार आहे कि ती तर तुम्हाला खरीच वाटणार नाही. प्रत्येकाला दिसणारं त्याचं त्याचं इंद्रधनुष्य वेगळं असतं. कारण प्रत्येकाचे क्षितिज वेगवेगळे असते . कवी कल्पना वाटती आहे नं! सूर्याकडे आपली पाठ असते. समोर इंद्रधनुष्य असतं. बघणाऱ्याच्या डोक्यावरून, डोक्याच्या सावलीच्या दिशेने 42 अंशाचा कोन करणारे प्रकाश किरण पाण्याच्या थेंबात प्रवेश करतात. तेवढया जागेत सुद्धा अनंत थेंब व अनंत प्रकाशकिरण असतात. त्याच किरणांचे  पृथःकरण होऊन रंगीत इंदधनुष्य बघणाऱ्याच्या डोळ्यासमोर तयार होते. दुसऱ्या माणसा समोर दुसरे किरण व दुसरे थेंब असणार म्हणजे त्याला दिसणारे इंदधनुष्य पण वेगळे असणार. तसेच बघणाऱ्याच्या डोळ्यात शिरणारे साती रंगांचे किरण एकाच थेंबात तयार झालेले येत नाहीत. वेगवेगळया अपवर्तनाच्या कोनामुळे वेगवेगळ्या थेंबातून वेगवेगळ्या रंगाचे किरण येऊन आपले इंद्रधनुष्य बनते. त्याहून पुढची गंमत, जर हे इंद्रधनुष्य गोल असेल तर त्याच्या मध्यभागी

बघणाऱ्याच्या चेहऱ्याचे प्रतिबिंब ही दिसते. म्हणून असं इंद्रधनुष्य दिसणे आपण भाग्याचे मानतो. अशा गोल इंद्रधनुष्याला इंद्रवज्र म्हणतात.

जरी शास्त्रीय खुलासे कळायला अवघड वाटले तरी होणारे परिणाम वाचून गंमत वाटली असेल नं!आपले डोळे सुद्धा काय काय भास निर्माण करतात!!

ही साठा उत्तराची कहाणी पाचाऊत्तरी सुफळ संपूर्ण!!!

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “दृष्टिकोन” शिकायचा मात्र राहूनच गेला… ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ दृष्टिकोन” शिकायचा मात्र राहूनच गेला… ☆ डॉ अभिजीत सोनवणे

बघता बघता अख्खा मार्च महिना सुद्धा संपला की राव … ! 

मला आठवतं… लहानपणी मार्च महिना म्हणजे एकतर परीक्षा किंवा पुढील महिन्यातील परीक्षेचे टेन्शन….! 

डॉक्टर झाल्यानंतर असं वाटलं…. चला परीक्षांचे टेन्शन कायमचं संपलं…. 

पण खऱ्या परीक्षा तिथूनच पुढे सुरू झाल्या… त्या आजपर्यंत सुरूच आहेत…. ! 

एकूण काय ? आयुष्यातल्या परीक्षा कधीच संपत नाहीत…! 

पूर्वी मला वाटायचं, परीक्षेत जास्त “मार्क” पाडले म्हणजे मी जिंकलो…. 

खरंतर दर दिवशी… दरवर्षी तुमच्यातले “गुण” किती वाढले हे जास्त महत्त्वाचं असतं, मार्क हा फक्त आकडा असतो…. पण दुर्दैवाने चार भिंतीतली शाळा आम्हाला ते शिकवू शकली नाही… !

मला आठवून सांगा, आज पर्यंत तुम्हाला आठवी, नववी, दहावी, अकरावी, बारावीचे मार्क कोणी विचारलेत… ? मी छातीठोकपणे सांगतो; तुम्हाला आजपर्यंत ते कोणीही विचारलेले नाहीत…!

आपण काटकोन -त्रिकोण -लघुकोन -चौकोन सर्व कोन शिकलो …. एक “दृष्टिकोन” शिकायचा मात्र राहूनच गेला…!!! खरं आहे ना ??? 

माकडापासून आपण माणूस झालो…..! .. खरंच झालो का …. ??? हा वादाचा विषय आहे…! 

साइन कॉस थिटा बीटा…. अल्फा गॅमा लॉगरिदम…  यात मला कधीही रस नव्हता… जन्मल्यापासून ते आत्तापर्यंत मला या गोष्टीचा काहीही उपयोग झाला नाही…! इंजिनीयरिंगला या बाबी कदाचित उपयोगी असतील…! 

मला मात्र लहानपणापासून कायम हृदयाची धप धप आवडायची…. आमच्या मेडिकलच्या भाषेत याला Lub Dub असं म्हणतात…. ! .. नाव काहीही द्या हो…. शेवटी जगवते ती हृदयातली धडधड …! 

यानिमित्तानं एक प्रसंग आठवला…

लहानपणी शाळेत त्यावेळी, डब्यात वयानुसार एक पोळी आणि भाजी सोबत लोणचं असणं, हि आमची श्रीमंती होती… दिवसा शाळा आणि रात्री एसटी स्टँडवर हमाली काम करणारा आमच्यासोबत त्यावेळी शाळेत एक मुलगा होता… खिशात तो त्यावेळी एक गुळाचा खडा आणायचा… आम्ही मिटक्या मारत; पोळी भाजी लोणचं खात असताना तो आमच्याकडे बघत, हसत गुळाचा खडा चघळायचा आणि शाळेतल्या नळाशी, ओंजळ धरून घुटुक  घुटुक पाणी प्यायचा… वरून मस्त हसायचा…! 

… पण ते हसू कारुण्यपूर्ण होतं हे आज कळतंय…आम्ही वॉटर बॅग मधून पाणी प्यायचो….उपाशी राहून तो तृप्त होता…. पोटभर खाऊन आम्ही मात्र अतृप्त होतो…. ! 

का नाही मी कधीच बोलावलं त्याला माझी भाजी पोळी खायला… ? 

का नाही काढून घेतला मी तेव्हा त्याच्याकडून गुळाचा तो खडा…. ? 

माझा डबा त्यावेळी त्याला खायला देऊन, माझी वॉटर बॅग त्याच्यापुढे धरून, त्याच्या खिशातला गुळाचा खडा काढून, चघळत चघळत शाळेतल्या नळाला ओंजळ धरून मी सुद्धा घुटुक  घुटुक पाणी प्यायलो असतो एखाद वेळी तर ??? … तर… मी सुद्धा माणूस झालो असतो…!!

पोटार्थी मी…. एक चपाती, थोडी भाजी आणि नखभर लोणचं माझ्याकडून सोडवलं गेलं नाही तेव्हा…. 

मात्र गुळाचा तो खडा मी हरवून बसलो कायमचा … !!! 

कारण…. कारण , “गाढवाला गुळाची चव काय”… ? 

मराठीत हा वाक्प्रचार सुद्धा माझ्याच मुळे रूढ झाला असावा…. आता कुठेही गुळ बघितला, की मला त्याचं ते कारूण्यपूर्ण हसू डोळ्यासमोर येतं… आणि मग गुळ पाहून सुद्धा माझा चेहरा कडवट होतो…! 

आज तो कुठे असेल … ? असेल तरी का ???

तो नक्कीच असेल; आणि कुठेतरी चमकतच असेल, कारण आयुष्यामध्ये असे संघर्ष करणारेच नेहमी यशस्वी होतात…!  तो जिंकला नसेलही कदाचित, परंतु यशस्वी मात्र नक्की असेल…

जिंकणं आणि यशस्वी असणं यात फरक आहे… ! जिंकलेला प्रत्येक जण यशस्वी असतो असं नाही….  परंतु यशस्वी असलेला प्रत्येक जण जिंकलेला असतो….! 

जिंकणं म्हणजे शर्यतीत दरवेळी पहिलं येणं नव्हे ….  शर्यतीत धावताना, वाटेत आलेल्या काट्याकुट्या दगड धोंड्यांना तुडवत त्यांना पार करणं… धावताना छाती फुटायची वेळ येते, त्यावेळी स्वतःला सावरत, आपल्या सोबत पळणाऱ्याला धीर देणं म्हणजे शर्यत जिंकणं….!  यावेळी तो जिंकेल न जिंकेल…. परंतु तो यशस्वी असतो…. हे कोणत्याही शाळा कॉलेजात शिकवत नाहीत….!!! 

आपल्या सोबत धावणारा एखादा प्रतिस्पर्धी पायात पाय अडकून पडला, तर त्याला उठवून पुन्हा धावायला प्रवृत्त करणं,  म्हणजे शर्यत जिंकणं…. यावेळीही तो जिंकेल न जिंकेल…. परंतु तो यशस्वी असतो…. हे पण कोणत्याही शाळा कॉलेजात शिकवत नाहीत….!!! 

नाती जोडता जोडता नेमकं कुठं हरायचं ते कळणं, म्हणजे शर्यत जिंकणं…

यावेळी तो जिंकेल न जिंकेल…. परंतु तो यशस्वी असतो…. हे सुद्धा कोणत्याही शाळा कॉलेजात शिकवत नाहीत….!!! 

पडणं म्हणजे हरणं नव्हे…. पडल्यानंतर उठून उभंच न राहणं म्हणजे हरणं, हे समजणं….म्हणजे शर्यत जिंकणं….! … दुर्दैवानं…. हे सुद्धा कोणत्याही शाळा कॉलेजात शिकवत नाहीत….!!! 

असो, विषय लांबत जाईल… मुळ मुद्द्यावर येतो…. 

तर, अशाच पडणाऱ्या आणि पडून उठणाऱ्या अनेक लोकांना कोणत्या ना कोणत्या माध्यमातून, आपण सर्वांनी मदत केली आहे…. आणि म्हणूनच, मार्च महिन्यातील हा गोषवारा …. आपणासमोर सविनय सादर… ! 

*(आमच्या कामाचा मूळ गाभा फक्त वैद्यकीय सेवा देणे नसून, वैद्यकीय सेवा देता देता, त्यांचा विश्वास संपादन करणे, त्यांच्याशी चांगले नाते निर्माण करणे, भिक मागण्याची कारणे शोधणे, त्यांच्यामधील गुणदोष शोधून त्यांना व्यवसाय करण्यास प्रवृत्त करणे आणि त्यांना झेपेल तो व्यवसाय टाकून देणे…. जेणेकरून ते भिक्षेकरी म्हणून नाही, तर कष्ट करायला लागून, गावकरी होऊन ते सन्मानाने जगतील… कुणीही कुणापुढे हात पसरून लाचार होऊ नये, जगात कोणीही भिकारी असू नये, हा आमच्या कामाचा मूळ गाभा आहे, वैद्यकीय सेवा देणे हा त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही फक्त मार्ग म्हणून निवडला आहे)*

भिक्षेकरी ते कष्टकरी आणि कष्टकरी ते गावकरी

– श्री बाकले सर यांनी शेकडो नवीन शर्ट (पॅकिंग आणि प्राईस टॅग सुद्धा न काढलेले) आम्हाला दिले. 

हे सर्व शर्ट आम्ही 6 अपंग लोकांना विक्रीसाठी दिले.       “आयुष्यात अंधार असेलही; परंतु मनातला प्रकाश विझलेला नाही, आम्हाला भीक नको, आमच्याकडून वस्तू विकत घ्या” अशा आशयाची पाटी, व्यवसाय करताना त्यांच्या जवळ दिसेल अशा पद्धतीने ठेवली आहे…. एक रुपया …. दोन रुपये भिक द्या हो…. म्हणून लाचार होणारे हे लोक, आज दर दिवशी कमीत कमी 800 ते 1000 रुपयांचा व्यवसाय करत आहेत…! आज ते भिक्षेकरी नाहीत, कष्टकरी झाले आहेत…! 

एका महिन्यात 6 दिव्यांग लोक स्वतःच्या पायावर उभे राहिले याचे सर्व श्रेय मी समाजाला देतो. 

मला जर कोणी पाच मूठ गहू दिले, तर मी ते तसेच कोणाला वाटणार नाही … 

मी गहु जमिनीत रुजवेन, खत पाणी घालेन आणि मग जेव्हा पाच पोती धान्य होईल, तेव्हा ते माझ्या लोकांना मी विकायला लावून व्यवसाय करायला लावेन… यातल्या पाच मुठी पुन्हा बाजूला काढून त्यांनाही त्या जमिनीत पेरायला लावेन…! 

आपण अशा पाच मुठी नाही…. हजारो मुठी आम्हाला दिल्या आहेत आणि म्हणूनच आम्ही आपल्यासमोर नतमस्तक आहोत… ! 

वैद्यकीय सेवा, अन्नपूर्णा प्रकल्प, खराटा पलटण  हे सर्व इतर उपक्रमही नियमितपणे सुरु आहेत. 

शैक्षणिक

भीक मागणाऱ्या पालकांच्या अनेक मुलांना आपण दत्तक घेतलं आहे. हे सर्व खर्च आता माझ्या अंगावर साधारण मे महिना अखेर किंवा जून महिन्याच्या सुरुवातीला पडतील. 

माझ्या वैयक्तिक आयुष्यावर आणि आलेल्या अनुभवांवर आधारित जे पुस्तक लिहिले आहे, त्याच्या विक्रीच्या पैशातून या सर्व मुलांचा खर्च भागवण्याचा प्रयत्न करत आहे. 

माझं पुस्तक आपण विकत घेत आहात… पुस्तक आवडो न आवडो माझं कौतुक करत आहात… मुलगा म्हणून स्वीकारून; आई बापाच्या प्रेमळ नजरेने पाठीवर हात ठेवत आहात… आपण माझ्या सोबत आहात याचा काही वेळा मलाच माझा हेवा वाटतो…!

आपल्या एका मुलीला कलेक्टर व्हायचे आहे, तिची स्वप्नं खूप मोठी आहेत…. काही वेळा बाप म्हणून मी हतबल होऊन जातो… पण तुम्ही सोबत आहात; याची आठवण झाली की मी पुन्हा निर्धास्त होतो…! 

मनातलं काही …

  1. Zee Yuva TV यांनी”सामाजिक” या कॅटेगरीमध्ये मला आणि मनीषाला एक मोठा पुरस्कार दिला.

अगदी खरं सांगायचं तर या पुरस्कारावर आमचा हक्क नाही, तुम्हा सर्वांचा हक्क आहे….! 

अगदी मनापासून बोलतोय मी हे…. कारण तुम्ही सर्वजण काहीतरी देत आहात;  आम्ही फक्त ते तळागाळात पोचवत आहोत… 

रेल्वे स्टेशनवर एखादी बॅग हमालाने डोक्यावर घेतली म्हणून तो त्याचा मालक होत नाही…. मालक कुणीतरी वेगळा असतो….! आमच्याही बाबतीत तेच आहे…. आपण दिलेली जबाबदारी; आम्ही फक्त आमच्या डोक्यावर घेतली आहे, आम्ही मालक नाही…. आम्ही फक्त भारवाहक आहोत…. मालक आपण सर्वजण आहात….!!! 

  1. माझे आजोबा कै. नामदेवराव व्हटकर ! (माझ्या आईचे वडील)… कवी, लेखक, गीतकार, संगीतकार, अभिनेता असं चतुरस्त्र व्यक्तिमत्व….!ते आदरणीय बाबासाहेब आंबेडकर यांचे निस्सीम भक्त होते. 

आदरणीय बाबासाहेब अनंतात विलीन झाल्यानंतर, आजोबांनी स्वतःचे घर आणि छापखाना विकून बाबासाहेबांची अंतिम यात्रा चित्रबद्ध करून ठेवली आहे…. या एका चित्रफिती शिवाय, बाबासाहेबांची अंतिम यात्रेची चित्रफीत जगामध्ये इतरत्र कुठेही नाही… 

जवळची व्यक्ती गेल्यानंतर प्रत्येकाची धडपड असते, आपल्या त्या प्रिय व्यक्तीचे शेवटचे दर्शन घ्यावे. 

आदरणीय बाबासाहेबांना आई किंवा वडीलच मानणाऱ्या करोडो कुटुंबीयांना मात्र या अंतिम दर्शनाचे भाग्य मिळाले नाही… 

माझ्या आजोबांनी तयार केलेल्या, जगात एकमेव असणाऱ्या, या चित्रफितीमुळे आदरणीय बाबासाहेबांच्या समस्त भारतीय कुटुंबीयांना आता आदरणीय बाबासाहेबांचे शेवटचे दर्शन घेता येईल. 

आदरणीय बाबासाहेबांच्या चरित्रावर आधारित महापरिनिर्वाण या नावाने एक सिनेमा नुकताच येऊ घातला आहे. या चित्रपटामध्ये आदरणीय बाबासाहेबांच्या अंतिम यात्रेचे दर्शन सर्वांना नक्की घडेल…! 

या चित्रपटामध्ये माझ्या आजोबांचाही जीवनपट ओघाओघाने आला आहे…. 

माझ्या आजोबांची भूमिका करत आहेत, सुप्रसिद्ध अभिनेता श्री प्रसाद ओक..! 

हि चित्रफीत बनवून माझ्या आजोबांनी समस्त भारतीयांवर उपकार केले आहेत…. असं माझं प्रांजळ मत आहे….!

असो, भाषेची गरज फक्त बोलण्यासाठी असते, समजून घेण्यासाठी भावना पुरेशा असतात….! 

मनातील सर्व भावना आज आपल्या पायाशी ठेवत आहे…. !!! 

प्रणाम  !!!

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जातांनाचे शब्द — लेखक : जीवन आनंदगावकर ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

☆ जातांनाचे शब्द — लेखक : जीवन आनंदगावकर ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

“मी असा काय गुन्हा केला ?” 

हे शब्द प्रमोद महाजन यांनी, गोपीनाथ मुंडे यांच्याजवळ, अंतसमयी उच्चारले होते. आपल्या सख्या भावानेच गोळ्या घातल्यावर विचारांच्या कल्लोळातून त्यांना असे व्यक्त व्हावेसे वाटले होते. “अरे, हे काय करताय ?” 

असे इंदिराजींनी अतिशय अविश्वासाने आपल्या मारेक-यांना विचारले होते. महात्मा गांधीजींचे जातानाचे शब्द होते, “हे राम” तर चाफेकर बंधू ,भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी “वंदे मातरम” म्हणत मृत्यूचे स्वागत केले होते. तर मी या स्वार्थी जगात आता राहू शकत नाही असे म्हणून साने गुरुजींनी जीवनयात्रा संपवली आणि सात भाऊ असते तरी मातृभूमीसाठी दिले असते. 

आता माझे काम संपले असे ठामपणे सांगून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी प्रायोपवेशन केले. 

एखाद्याचे जातानाचे शब्द नेमके काय असतात याची आपल्याला अतिशय उत्सुकता असते. एखादे वयोवृद्ध गेल्यावर जेव्हा नातेवाईक भेटायला येतात तेव्हा “काय म्हणाले हो ते जाताना ?” असे हमखास विचारले जाते. 

अगदी बोलायला यायला लागल्यापासून आपण अगणित वाक्ये बोलतो पण आयुष्याच्या अंतकाळी जे बोलतो ते खरेखुरे असते. त्यात खोटेपणाचा, दांभिकपणाचा, मीपणाचा लवलेश सुद्धा नसतो. ब-याचवेळा आयुष्यातल्या चुकांची किंवा पापांची कबुलीही असू शकते. 

शेवटच्या आजारपणात माझ्या पत्नीला ॲटॅक आला तेव्हा कार पळवित मी हॅास्पिटलला गेलो. 

तिला उचलून स्ट्रेचरवर ठेवताना ती एवढेच म्हणाली की,”उशीर झाला”. तेचं तिचे शेवटचे शब्द ठरले.

जगणे आणि मरणे यात फार मोठा वैचारिक खंदक असतो. तो पार करण्याची इच्छा फार कमी जणांची असते. आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकाला त्या खंदकापर्यंत जाऊच नये असे वाटत असते. कारण जगण्याची आसक्ती प्रत्येकालाच, तिथे मृत्यूचे स्वागत कोण आणि कसे करणार ? 

सगळी कल्पना असते आयुष्यात मी आणि माझे करत इतकी संपत्ती आणि इतक्या वस्तू गोळा केल्यात. 

पण यातली एकही वस्तू मृत्यूबरोबर घेऊन जाता येणार नाही. वेगवेगळ्या फ़ॅशनचे कितीही महागडे कपडे घातले तरी जन्माला येताना नागवे आलोय आणि मरतांनाही तसेच जायचंय. येताना दोघांमुळे आलोय आणि मेल्यावर चौघांच्या खांद्यांवरून जायचंय. आपण एकटे काहीच करू शकत नाही पण तरीही प्रत्येक हाव काही सुटत नाही. हे माझे, ते माझे, माझेही माझे आणि त्याचेही माझेच अशी आपली नेहमी भावना असते. मृत्यू समोर दिसायला लागतो तेंव्हा ही भावना बोथट होते. 

प्रत्येक चर्चमध्ये जशी कन्फेशन बॉक्स असते तशी काल्पनिक बॉक्स मृत्यूच्या जाणिवेने तयार होते. आयुष्यात जे बेफामपणे वागलो, बोललो ते आठवू लागते. आयुष्यावर चढलेली खोटेपणाची आणि दांभिकतेची पुटे ढासळू लागतात. लहान बाळाची निरागसता मनात येऊ लागते. रागलोभाच्या आहारी जाऊन विस्कटून टाकलेली नाती पुन्हा गोळा करून आणाविशी वाटतात. खरे तर तोपर्यंत फार उशीर झालेला असतो. जेंव्हा जगायचे असते तेंव्हा आपण जगलेलोच नसतो. आणि जगावेसे वाटू लागते तेंव्हा मृत्यू समोर येऊन उभा ठाकलेला असतो. 

भाऊसाहेब पाटणकर यांचा सुरेख शेर आहे …. 

दोस्तहो, दुनियेस धोका, मेलो तरी आम्ही दिला ।

जाऊनी नरकात, पत्ता स्वर्गाचा आम्ही दिला ।।

हाय रे दुर्दैव माझे, सर्वास कळले शेवटी ।

सारे सन्मित्र माझे, तेथेच आले शेवटी ।।

आपल्यासारख्या सर्व पापी माणसांचा सर्वात शेवटचा मुक्काम नरक आहे हे त्यांनी नर्मविनोदाने मोजक्या शब्दात पटवून दिले आहे. 

पण काहीकाही माणसे खरोखरच वेगळी असतात. त्यांना जगण्याचीही आसक्ती नसते आणि मरण्याचीही भीती वाटत नाही. ही माणसे ख-या अर्थाने जीवन जगतात आणि हस-या चेह-याने मृत्यूला सामोरे जातात. 

सामाजिक कार्यकर्ते ग प्र प्रधान यांनी मृत्यू हसत हसत स्वीकारला. आपला काळ जवळ आला आहे हे कळल्यावर त्यांनी आपला पुण्यातील राहता वाडा साधना ट्रस्ट या संस्थेला फुकट देऊन टाकला. आपल्या एका डॉक्टर विद्यार्थ्याच्या हॉस्पिटलच्या सर्वात वरच्या मजल्यावरच्या खोली भाड्याने घेतली आणि स्वतः डाळभात बनवून मृत्यू येईपर्यंत जगत राहिले. खरे तर तो वाडा विकला असता तर त्यांना करोडो रुपये मिळाले असते. पण आयुष्यभर एक तत्वज्ञान उराशी बाळगून जगलेल्या प्रधान मास्तरांनी निस्वार्थीपणे त्यावर पाणी सोडले. 

पु लं नी तर आयुष्यात मिळालेल्या सर्व संपत्तीचा ट्रस्ट केला आणि समाजाकडून मिळालेली सर्व संपत्ती समाजाला परत देऊन टाकली. एक आदर्श जगणे यापेक्षा वेगळे काय असते ? 

सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहून एकविसाव्या वर्षी जिवंत समाधी घेणारे ज्ञानेश्वर माऊली म्हणजे विरक्तीचे टोक ! त्यांच्या जीवनाचाही सोहळा होता आणि अजीवन समाधीचाही ! जीवनमृत्यूची व्याख्या त्यापलीकडे ती काय करायची ? 

सुप्रसिद्ध अभिनेते बलराज सहानी यांना स्ट्रेचरवरुन ऑपरेशन थिएटरमध्ये नेत असताना त्यांनी नर्सकडून एक कागद मागून घेतला आणि त्यावर लिहिले,”आयुष्यात सगळं मिळालं, कोणतीही इच्छा शिल्लक नाही”. तोच त्यांचा शेवटचा संदेश होता.

“आनंद” चित्रपटात राजेश खन्नाला कॅन्सर दाखवला आहे. प्रत्यक्ष जीवनात तो कॅन्सरनेच गेला. त्याचे मरतानाचे शब्द होते,”पॅक अप”.

शेवटच्या आजारपणात मी वडिलांना भेटायला गावी गेलो. मी परत निघताना फक्त एवढंच म्हणाले, “लवकरच माझ्यासाठी तुला दीर्घ रजा घ्यावी लागेल”. पुढे  पंधरा दिवसांनी ते गेले.मी त्यांचे ऐकलेले तेच दोन शब्द!

माझा मुलगा अभिजित अलिकडेच पणजी येथे विषारी जेली फिशचा दंश होऊन गेला. मेडिकल हॅास्पिटलमध्ये त्याला ऑपरेशनसाठी नेताना मी त्याच्यासोबत होतो. तो मला म्हणाला,”सगळं संपलय”! तेचं त्यांचे शेवटचे शब्द ठरले. तो पुन्हा शुद्धीवर आला नाही.

अर्थात काही सामान्य माणसेसुद्धा असामान्य पद्धतीने जगतात आणि मृत्यूने आदर्श निर्माण करतात. मुंबईत राहणा-या वसंत त्र्यंबक निकुंभ यांनी पंधरा वर्षांपूर्वी दोन्ही हात पसरून मृत्यूचे स्वागत केले होते. आयुर्वेदाचा गाढा अभ्यास असलेले निकुंभ एखाद्या योग्यासारखे ८३ वर्षे जगले. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे त्यांची रोजची दिनचर्या होती. त्यामुळे त्यांच्या नखात रोग नव्हता. पण एके दिवशी त्यांनी विचार केला की आयुष्यातल्या सर्व जबाबदा-या पूर्ण झाल्या आहेत, लेकी, सुना नातवंडे सारे सुखी आहेत. मग आता जगून काय करायचे ? त्यांनी इच्छामरण घ्यायचे ठरवले. पत्नी जिवंत असताना हा असा निर्णय घेणे म्हणजे आक्रीतच ! 

व्यवस्थित नियोजन करून एप्रिल महिन्यापासून हळूहळू एकेक खाद्यपदार्थाचा त्याग करत करत चार महिन्यांनी मृत्यूला त्यांनी बोलावून घेतले. या त्यांच्या निर्णयापासून परावृत्त करण्याचा सर्व नातेवाईकांनी खूप प्रयत्न केला पण ते आपल्या विचारांपासून ढळले नाहीत. तोंडी सांगून ऐकत नाहीत हे लक्षात आल्यावर सर्वांनी त्यांना पत्रे लिहिली आणि तुम्ही आम्हाला हवे अहात असे सांगितले तर त्या प्रत्येकाला स्वहस्ताक्षरात त्यांनी लिहिलेली उत्तरे तत्वज्ञानाने भरलेली होती. ती आजही वाचायला मिळतात. 

ज्याने आयुष्य आणि मृत्यू यांच्यातली सीमारेषाच पूर्णपणे पुसून टाकली आहे त्या माणसाचे तत्वज्ञान वाचत राहावेसे वाटते. जग हे मिथ्या आहे हे संतांनीच सांगितले पाहिजे असे नव्हे तर आपले आपल्यालाही ते कळू शकते हे वसंत त्र्यंबक निकुंभ यांच्या पत्रावरून आपल्याला कळते. 

माझ्या आवडत्या शिक्षकांना व त्यांच्या पत्नीला दोघांनाही कर्करोगाचे निदान झाले आणि त्या दिवसापासून  दोघांनीही औषधोपचार थांबवला. दीक्षितसर सेवानिवृत्त शिक्षक होते. त्यांनी आपल्या मुलांना सांगितले की कर्करोगावर औषध नाही हे मी मुलांना शिकवायचो. मग मीच औषधोपचारावर तुम्हाला खर्च करायला का लावू ? ते पैसे तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी वापरा. आम्ही तृप्त आहोत, आम्हाला जाऊ द्या ! आणि खरोखरच त्या दाम्पत्याने कर्करोगाच्या वेदना शांतपणे सहन करत धीरोदात्तपणे जगाचा निरोप घेतला. 

ज्याला जन्म आहे त्याला मृत्यूसुद्धा आहेच ! जेवढ्या आनंदाने आपण जगण्याचा आनंद घेतो तेवढ्याच आनंदात मृत्यूचेसुद्धा स्वागत करायला हवे. आणि आयुष्यभर असे जगायला हवे की मृत्यूसमयी अपराधीपणाची भावना फिरकता कामा नये.

लेखक : जीवन आनंदगावकर, सेवानिवृत्त न्यायाधीश

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ समजूतदार आग्रह… – लेखक : श्री प्रवीण दवणे ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ समजूतदार आग्रह… – लेखक : श्री प्रवीण दवणे ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

आपण जेवत असतानाच कुणी पाहुणा आला की, हातात ताट घेऊन आत पळत जायची पद्धत तेव्हा आली नव्हती. जे आपल्या पानात, ती चटणी-भाकरी चटकन वाढली जायची आणि भूक असो वा नसो, दोन घास मायेचे स्वीकारून अतिथी तृप्त व्हायचा. आता मनात असूनही बदलत्या जीवनशैलीनं आपले आग्रहही समजूतदार झाले; पण आता समजून घ्यायचं म्हणजे नेमकं किती समजून घ्यायचं, हेच समजण्याची पंचाईत झालेय. अशीच पंचाईत माझी अलीकडं झाली.

अनेक दिवसांचा आग्रह आता दूर लोटणं अवघड झाल्यानं शेवटी श्रीकांत अन्‌ मृदुलाला मी कळवलंच ः “येतो येत्या शनिवारी जेवायला.’

त्यांना झालेला आनंद मला फोनवरही जाणवत होता. केवळ आपण एखाद्याकडं “जेवायला येतोय’ म्हटल्यावर समोरच्या माणसाला एवढा आनंद होतो, ही गोष्टच केवढी सुखद आहे.

तासभर आधीच गेलो. थोड्या गप्पा होतील; मग सावकाशीनं जेवण. खरं तर जेवण हे केवळ गप्पांसाठीचं निमित्त. एकमेकांचा मैत्रभाव साधणारा एक रुचकर दुवा! पाच-दहा मिनिटं गप्पा झाल्यावर उत्साहानं श्रीकांत म्हणाला, “तुम्हीच सांगा, कुठलं हॉटेल “प्रीफर’ कराल? “स्वीकार’ गार्डन रेस्टॉरंट आहे, “अतिथी’तलं फूड मस्तच!, “सुरभि’मध्ये कॉंटिनेंटल डिशेस..! चॉईस इज युवर्स! अगदी न संकोचता सांगा…’ 

संकोचायलाही पुरेसा वेळ नव्हता. जे मला कळत होतं, ते खरं होतं की जे खरं होतं ते मला समजत नव्हतं, कुणास ठाऊक! बागेत फिरायला निघालेला माणूस पाय घसरून तलावात पडावा, तसं काहीसं.

“हे बघा श्रीकांत, तुम्हीच ठरवा.’

“अस्सं कस्सं? तुम्हा आमच्या घरी आलायत नं जेवायला?’

तोच धागा शिताफीनं पकडून मी म्हटलं, “अहो, मग घरीच जेवू या नं. अगदी साधी मुगाच्या डाळीची खिचडीही चालेल; पण घरी जेवू या. घरात जेवायची गंमत वेगळी आहे.’

श्रीकांत-मृदुलाची बोलकी दृष्टभेट टिपायला वेगळ्या कॅमेऱ्याची गरज नव्हती. एकदम स्मार्ट टिचकी वाजवून मृदुला म्हणाली, “वॉव! ही तर बेस्ट आयडिया! घरीच जेवू या. खूप गप्पा होतील. तुम्ही बोलत बसलात की ऐकावंसं वाटतं. बाहेर काय, लगेच उठावं लागतं!’

चला! मी सुटकेचा निःश्‍वास सोडला. खूप आग्रह करून घरी जेवायला बोलावणाऱ्या चाहत्यांच्या घरात मला चक्क “घरचं’ जेवायला मिळणार होतं. वेगळ्या हातचं – मनापासूनचं!

ड्रॉवर उघडून मेनूकार्ड काढून तेवढ्यात दोघंही ठरवू लागले : “हे बघ श्री, सुरवातीला हराभरा कबाब असू दे. व्हेज मखनी, रुमाली रोटी, मग पनीर फ्राईड राईस…’

फोनवर ऑर्डर दिली गेली. माझी मुगाची खिचडी मूग गिळून बसली! 

श्रीकांत म्हणाला, “”आत्ता अर्ध्या तासात पार्सल येईल. हां, इथल्या “सागर’मधलं फूड बाकी…’ 

दोघांच्या आतिथ्यात कमतरता नव्हती; पण लिफ्टनं पायउतार होताना मन समाधानानं भरलं नव्हतं. वेळ, प्रवास न्‌ खर्च करून गेलेला माणूस एखाद्याच्या घरी फक्त “पार्सल’चं खाद्य खायला जात नसतो; अगदी साधं; पण ज्यात गृहिणीचं मन मिसळलंय, अशा गोष्टीनं आतिथ्य होतं. अशा मनपरंपरेत वाढलेल्या मला पार्सलपरंपरेशी जुळवून घेताना थकायला होत होतं. एवढा कंटाळा, एवढा औपचारिकपणा असेल तर केवळ पैसे मोजून आतिथ्याचा हव्यास तरी ओढवून घ्यायचा कशाला, या प्रश्‍नाचं उत्तर सापडत नव्हतं. आता कशालाही “व्वा!’ म्हणावं तर लगोलग उत्तर येतं – “हे श्रेय माझं नाही. “अन्नपूर्णा’तून आणलंय!’

दिवस “पार्सल’नं सुरू होतो; “पार्सल’नं संपतो. ऑफिसला जाताना निघण्याची तारांबळ म्हणून “चार पोळ्या, 200 ग्रॅम भाजी’ पार्सल, तर रात्री घरी जाताना “आता कुठं स्वयंपाकाचा कुटाणा; जातानाच नेऊ या पाव-भाजी पार्सल!’ 

आजारपण, वार्धक्‍य, एकाकीपण, अचानक, अनपेक्षित आलेले खूप पाहुणे आणि आणखीही काही असे क्षण असतील की जिथं “रेडीमेड पार्सल’ आणणं गरजेचं आहे. तिथं ती गोष्ट सुविधा ठरते; पण रग्गड पैसा, भरपूर आळस, लाडावलेलं सुखवस्तूपण, फक्त कंटाळा, चट्टू खाण्याची चटक अशा ठिय्या मारून रुतलेल्या असंख्य घरांतल्या वृत्ती-प्रवृत्तीनं आता नव्या समस्यांची पाळणाघरे सुरू केली आहेत!

घरातलं स्वयंपाकघर म्हणजे फक्त पार्सलचं गोडाऊन झालं तर तिथल्या मुलांचं पालन सुखरूप होईल; पण पोषण मात्र होणार नाही. पालन पदार्थांनी होतं; पोषण भावनांनी! आई-बाबा दोघांचाही ध्यास जेव्हा मिसळतो; तेव्हा ताटातल्या पदार्थांना येणारा सुवास कुठल्याही बिलानं चुकता होणारा नसतो. अगदी घरातलं साधं खिमट लोणचं असेल, फोडणीचा भात असेल, गूळ-चपातीचा लाडू असेल…पदार्थ अगदी साधे! पाच मिनिटांहून वेळ लागणार नाही; पण त्यात एक घर मिसळलेलं असतं. चव त्या घराची असते!

कुणी म्हणेल; सांगायला काय जातं? हल्लीची मुलं खातात का हे असलं? हल्ली चायनीज हक्का नूडल्सवर हक्कानं ताव मारणारी मुलं आहेत. तुमचं सांगणं कालबाह्य आहे! मजा म्हणून खाण्याचे पदार्थ हेच जर रोजचे खाण्याचे झाले तर घर न्‌ हॉटेल यात वेगळेपण काय उरलं? आणि अन्नपदार्थांतलं सत्त्व फक्त चवीत असतं? की त्याच्या पोषणमूल्यांत? एकत्र मायेनं गुंफून साधं-सात्त्विक जेवण्यात? आता गंमत म्हणून, फॉर अ चेंज म्हणून “घरी’ जेवू या, असं म्हणणारी घरं वाढत आहेत. सगळेच काही इतके गर्क नाहीत; पण बटण दाबल्यावर सुख दारात हजर, हा आभास नको त्या दिशेनं घेऊन चालला आहे. अनेक लोक हे ऐकण्याच्याही मनःस्थितीत नाहीत; इतकी रेडीमेड सुखाची सवय पटकन्‌ बेफाम वेगानं वाढत आहे. या सर्व सोईंनी वेळ वाचतो, हे खरंच आहे; पण त्या वाचलेल्या वेळेचं काय करायचं, हे स्वतःपुरतं ठरवायला हवं.

जाहिरातीतले स्टार्च इस्त्रीतले पप्पा-मम्मा न्‌ घरातले आई-बाबा यातला फरक अधोरेखित होतो, छोट्या छोट्या गोष्टींतील आपल्या गुंतवणुकीतून. एखाद्‌ वेळची “सोय’ जर “कायमची व्यवस्था’ होत असेल तर नातीही पार्सलचीच ठरतील! त्याला फक्त लेबल्स असतील; पण त्यात तिन्हीसांजेच्या आठवणींची ऊर्मी नसेल.

आज जी आळशी, सुखवस्तू घरं पार्सलसंस्कृतीच्या पायावर उभी आहेत, त्यांच्या हाती पार्सलनंच पुष्पगुच्छ येणार! पार्सलनंच केक येणार आणि हॅप्पी बर्थ डेचं एक स्वतःची सहीसुद्धा नसलेलं ग्रीटिंग! त्या वेळी जरा वळून पाहताना, आपण आपलं वात्सल्यही पार्सलनंच पाठवलं होतं, या वस्तुस्थितीची जाणीव असायला हरकत नाही. कृती स्वीकारायची ती परिणामासकट!

आधुनिकता, व्यग्रता कितीही असो; नाती एकमेकांशी वा समाजाशी जोडताना थोडी तोशीस पडतेच. प्रसंगी अडचण, चिडचीड, वैतागही उद्भवतोच. तारांबळ-गोंधळ-श्रमही होतात; पण घर नावाच्या समाजात न्‌ समाज नावाच्या घरात एकमेकांना गुंफताना अनेकदा इतकी सावध अलिप्तता नाही चालत. सिमेंटची अलिप्तता घराच्या पायरीसाठी ठीक; पण सिमेंटमध्ये बीज रुजणार नाही. पहिल्या पावसानं टणक ढेकूळ विरल्यावर त्याची मऊ माती होते. पुढं तेच मातीचं मऊपण बीजांकुरांनी हिरवळून येतं. अनेकदा आयुष्यातही रुक्ष अलिप्तता सोडावीच लागते; नाती एकमेकांत दरवळताना एकमेकांसाठी राबायची तयारी लागते.

आजच्या यंत्रयुगाला विसाव्याचे क्षण परवडणारे नाहीत; हे सगळ्यांनाच कळतं; पण तरीही ओढीनं जमवलेले विसाव्याचे क्षण पुन्हा यंत्राच्या स्वाधीन करणं हे केव्हाही समर्थनीय नाही. एकमेकांतील निरपेक्ष सहजता ओसरली तर “शब्द’सुद्धा “पार्सल’मधून आल्यासारखे उमटतील; पण प्रकटणार नाहीत. 

श्रीकांत न्‌ मृदुलानं ओढीनं जे अगत्य केलं, ते त्यांच्या माहिती व तंत्रयुगाच्या संदर्भांना धरून अगदी योग्यच आहे; पण त्या हद्दीपलीकडं भावनांचाही एक सुकोमल प्रदेश असतो. जिथं “मन’ व्यक्त करताना मनाचाच आधार घेतला की, एक अपार आनंद असतो, हेही त्यांना समजायला हवं!

दोघांनी खूप सारे पैसे खर्च करून “पार्सल’ने घरचं अगत्य केलं; पण त्याहीपेक्षा घरातला साधा “माझ्यासाठी’ केलेला चहा मला अधिक उबदार वाटला असता!

लेखक : श्री प्रवीण दवणे.

संग्राहक  : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ संधीप्रकाश… कवी: डाॅ.निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ. ज्योत्स्ना तानवडे

? काव्यानंद ?

☆ संधीप्रकाश… – कवी: डाॅ.निशिकांत श्रोत्री  ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे  ☆ 

 डाॅ. निशिकांत श्रोत्री

निवृत्ती हा आयुष्यातील अवघड कालखंड असतो. शरीराने ज्येष्ठत्वाकडे झुकलेला पण मनाने अजूनही कार्यक्षम अशा अवस्थेत मनाची कुतरओढ होते. डॉ. निशिकांत श्रोत्री यांनी त्यांच्या “संधीप्रकाश” या कवितेत याच अवस्थेतील मनस्थिती मांडली आहे. आपण या कवितेचा आता रसास्वाद घेणार आहोत.

☆ संधीप्रकाश ☆

घेरून टाकलं अचानक मला

मनाला मरगळ आणणाऱ्या

त्या अंधूक संधीप्रकाशांनं 

अन् बावरून गेलो मी एकदम

*

ना त्यावेळी पुरेसा सूर्यप्रकाश

तर विजेच्या दिव्यांचा पिवळा उजेड कुचकामाचा

सारी दृष्टीच होऊ लागली होती

भेसूरपणे धूसर

*

गर्क झालो होतो इतका

माझ्या यशोमार्गक्रमणात

उमगलंच नाही मला

त्या संधीप्रकाशाचं स्वरूप …..

पहाटेचा की कातरवेळेचा ….. ?

*

ते काही नाही !

टाळलाच पाहिजे

हा मळभ वाढविणारा

धूसर संधीप्रकाश

धावलंच पाहिजे प्रकाशाकडे;

अन्  मग काय …..

सुटलो धावत

जीवाच्या आकांताने

मागे टाकायला

त्या अशुभ संधीप्रकाशाला

*

धावतोय धावतोय केव्हाचा

लाज वाटली असती सुवर्णकन्येला

इतका धावलो ….. इतका धावलो

पण संधीप्रकाश काही मागे पडेच ना

*

 मनावरचं मळभ दाटतच होतं

भेसूरता वाढवतच होतं

कसं टाकावं मागे

सिंदबादच्या मानगुटीवर बसलेल्या म्हाताऱ्यासारख्या

लोचट संधीप्रकाशाला

काहीच उमगत नव्हतं

किती जोरात धावू अजून ?

छातीचा भाता फुटेल ना !

*

अन् अचानक लख्ख विजेसारखा

प्रकाश चमकला

माझ्या धूसर मनात …..

भेदरवणाऱ्या शंकेच्या स्वरूपात …..

धावत तर नाही मी

या संधीप्रकाशाबरोबरच …..

नेमकं उलट्या दिशेने ?

©️ डॉ‌. निशिकांत श्रोत्री

९८९०११७७५४

घेरून टाकलं अचानक मला

मनाला मरगळ आणणाऱ्या

त्या अंधूक संधीप्रकाशानं

अन् बावरून गेलो मी एकदम

पूर्ण रूपकात्मक असणारी ही कविता मुक्तछंदातील प्रथम पुरुषी एकवचनातील आहे. आयुष्यातील एका महत्त्वाच्या वळणावर पोहोचल्यावर प्राप्त परिस्थितीने गांगरलेला कवी आपली मनोव्यथा सांगतो आहे. अखंड कार्यरत असणारा कवी कालपरत्वे निवृत्तीच्या वयावर येऊन ठेपला. वय विसरून काम करताना अचानक सामोऱ्या आलेल्या निवृत्तीने तो कावराबावरा होतो. मनाला एक प्रकारची मरगळ आल्याने गोंधळून जातो.

इथे संधीप्रकाश हे निवृत्तीसाठी योजलेले रूपक आहे. त्यावेळी उजेड मंदावतो. एक विचित्र उदासी मनाला घेरून टाकते. इथे तशीच अवस्था निवृत्त होण्याच्या विचाराने कवीची झालेली आहे.

ना त्यावेळी पुरेसा सूर्यप्रकाश

तर विजेच्या दिव्यांचा पिवळा उजेड कुचकामाचा

सारी दृष्टी होऊ लागली होती

भेसूरपणे धूसर

इथे कवीने सूर्यप्रकाश, दिव्यांचा पिवळा उजेड ही रूपके वापरली आहेत ती उमेद म्हणजे जोम असणे आणि क्षमता कमी होणे यासाठी. तरुणपणात अंगात जोम असतो, मनात उमेद असते. आता वाढत्या वयाबरोबर तेवढी क्षमता राहिलेली नाही. आता आपली ताकद कमी पडेल अशी जाणीव व्हायला लागल्याने कवी बावचळून जातो आणि आता कसे होणार ही भीती त्याला सतावू लागते.

गर्क झालो होतो इतका

माझ्या यशोमार्गक्रमणात

उमगलंच नाही मला

त्या संधीप्रकाशाचं स्वरूप…..

पहाटेचा की कातरवेळचा…….?

कवी आपल्या कामकाजात इतका गढून गेलेला होता, यशोमार्गावर चालण्यासाठी अगदी झोकून देऊन कार्यरत होता की त्याला संधीप्रकाश दाटून आलेला कळलेच नाही आणि म्हणूनच क्षणभर त्याला हे लक्षातच येईना की हा संधीप्रकाश पहाटेचा आहे का संध्याकाळचा ?

पहाटे आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला संधीप्रकाश पसरतो. पहाटेच्या संधीप्रकाशा नंतर लख्ख सूर्यप्रकाश पसरतो आणि आपण मोठ्या उमेदीने कामाला लागतो. तेच संध्याकाळच्या संधीप्रकाशाने हळूहळू उजेड कमी होत जाऊन अंधार वेढून येतो आणि आपोआप काम थंडावते. नेमकी अशीच अवस्था वाढत्या वयाच्या निवृत्तीमुळे होते. पण कामाच्या तंद्रीत ही गोष्ट कवीला वेळेवर लक्षात येत नाही.

ते काही नाही !

टाळलाच पाहिजे

हा मळभ वाढविणारा

धूसर संधीप्रकाश

धावलंच पाहिजे प्रकाशाकडे ;

अन् मग काय…..

सुटलो धावत

जीवाच्या आकांताने

मागे टाकायला

त्या अशुभ संधीप्रकाशाला

 

धावतोय धावतोय केव्हाचा

लाज वाटली असती सुवर्णकन्येला

इतका धावलो….. इतका धावलो

पण संधीप्रकाश काही मागे पडेच ना

अजून सकाळ आहे, अजून खूप काम करायचं आहे असं मनात असतानाच संध्याकाळ झालेली जाणवल्यामुळे कवीची दोलायमान अवस्था होते. मग तो ही निवृत्ती, हा संधीप्रकाश पुढे ढकलण्यासाठी जीवतोड मेहनत करायच्या मागे लागतो. जिद्दीने काम करून निवृत्ती टाळायचा प्रयत्न करू लागतो. पण त्यामुळे आणखीन आणखीनच थकू लागतो. इथे सुवर्णकन्या हे मेहनती तरुणांचे रूपक आहे.

कवी सुध्दा तरूणांना लाजवेल इतकी मेहनत घेतो. पण त्यामुळे त्याची ताकद आणखी कमी होऊ लागते. वयाचा आणि कामाचा मेळच बसत नाही. कारण मनाची उभारी अजून शाबूत आहे पण शरीरच त्याला साथ देत नाही ही अवस्था म्हणजेच संधीप्रकाश. त्यामुळे कितीही जरी प्रयत्न केले तरी ही निवृत्ती कवीला किंवा कुणालाच टाळता येत नाही हेच सत्य आहे.

मनावरचं मळभ दाटतच होतं

भेसूरता वाढवतच होतं

कसं टाकावं मागे

सिंदबादच्या मानगुटीवर बसलेल्या म्हाताऱ्यासारख्या

लोचट संधीप्रकाशाला

काहीच उमगत नव्हतं

किती जोरात धावू अजून

छातीचा भाता फुटेल ना !

कवीने कितीही प्रयत्न केला तरी तो पूर्वीच्या जोमाने काम करू शकत नव्हता‌. निवृत्तिचा संधीप्रकाश टाळू शकत नव्हता. त्यामुळे आता नेमके काय करावे हा त्याला प्रश्न पडला होता. सिंदबादच्या मानगुटीवरचा म्हातारा जसा खाली उतरत नाही, चिकटूनच बसतो. तशीच ही निवृत्ती पण आता लोचटासारखी कवीच्या मानगुटीवरच बसली आहे. कितीही झटकली तरी ती खाली उतरत नाही, दूर होत नाही. त्यामुळे कवी भांबावून गेला आहे. अती धावाधाव केल्याने त्याची पूरती दमछाक झाली आहे. या नादात काही विपरीत घडू नये अशी त्याला आशा आहे.

सिंदबादच्या मानगुटीवरचा म्हातारा ही उपमा या निवृत्तीला चपखल लागू पडते आहे.  कितीही प्रयत्न केला तरी कवीची त्यापासून सुटका होत नाही.

अन् अचानक लख्ख विजेसारखा

प्रकाश चमकला

माझ्या धूसर मनात

भेदरवणाऱ्या शंकेच्या स्वरूपात

धावत तर नाही मी

या संधीप्रकाशा बरोबरच…..

नेमकं उलट्या दिशेने ?

बेसावध कवीला निवृत्तीने गाठले. त्याचे मन ते स्वीकारायला तयार नाही. मग तो जास्ती जोमाने राहिलेली कामे करायला लागतो आणि जास्तच थकून जातो. हे पाहिल्यावर तो सावध होतो आणि त्याला आपली चूक लक्षात येते. ‘आपल्या या आततायी वागण्याने निवृत्ती पासून दूर जायच्या ऐवजी आपण जास्त कमजोर बनत निवृत्तीच्या बाजूला धावतो आहोत ‘ हे पाहून मनाने ठरविलेल्या मार्गाच्या उलट आपण धावतोय हे त्याच्या लक्षात येते.

सर्वसामान्यपणे आपण योग्य वयात आपल्या कामधंद्याला लागतो. संसार सुरू होतो. असंख्य जबाबदाऱ्या, योजना, ध्येयं, उद्दिष्टे साध्य करण्यात आपण पूर्णपणे गढून जातो. पण पुढे जाणारा काळ त्याचे काम करीत असतो. यथावकाश आपले वय वाढत जाते. कार्यक्षमता कमी होत जाते आणि एक दिवस या कामातून आता निवृत्त व्हायला हवे असा क्षण येऊन ठेपतो. कामाच्या नादात आपल्या कार्यकाळाची संध्याकाळ समोर दाटून आली आहे हे आपल्या लक्षातच येत नाही.

अजून कितीतरी गोष्टी करायचे बेत आखलेले असतात. काही कामे अर्धवट असतात. मनातली उभारी अजून तशीच असते पण शरीर पूर्वीसारखे आता नीट साथ देत नाही ही वस्तुस्थिती असते. कामे अजून व्हायचीत अन हाताशी वेळ कमी आहे या परिस्थितीत मनाची ओढाताण होते आणि अट्टाहासाने मन पुन्हा नेटाने काम करायला लागते. पण त्यामुळे निवृत्ती पुढे जायच्या ऐवजी आपली आणखी दमछाक होते. शरीर आणखीनच थकल्याने उलट निवृत्तीला आपणच जवळ ओढल्यासारखे होते. आयुष्यभर उत्तम रीतीने कार्यरत असणाऱ्यांची ही सर्व घालमेल कवीने इथे अतिशय समर्पक शब्दात मांडली आहे.

कवितेची सौंदर्यस्थळे :– ही कविता पूर्ण रूपकात्मक आहे. आयुष्याच्या संध्याकाळी येणारी निवृत्ती म्हणजे मळभ दाटवणारा संधीप्रकाश हे रूपक त्या वेळची परिस्थिती अचूकपणे स्पष्ट करते. ‘सूर्यप्रकाश ‘हे रूपक तरुणवयातला जोम, उमेद तर ‘दिव्यांचा पिवळा प्रकाश’ हे क्षमता कमी होण्याची स्थिती उलगडतात.

‘सुवर्णकन्या’ हे अव्याहतपणे ध्येयासाठी कार्यरत तरुणांचे रूपक आहे. कितीही प्रयत्न केला तरी लोचटासारखी चिकटलेली निवृत्ती कितीही झटकली तरी दूर होत नाही. यासाठी ‘सिंदबादच्या मानगुटीवरचा म्हातारा’ ही उपमा अगदी अचूक ठरते. ‘धूसर मन’ म्हणजे नीट दिसत नाही अशी बावचळलेली मनाची अवस्था.

ही सर्व रूपके, उपमा प्रत्येकाच्या आयुष्यातील या महत्त्वाच्या टप्प्याचे अचूक वर्णन करत त्या अनुभवाचा पुन:प्रत्यय देतात.

प्रत्येकाच्या आयुष्यातील निवृत्तीचा काळ म्हणजे जेव्हा मनाची उभारी अजून पूर्वीसारखीच आहे पण त्याला वाढत्या वयातील शरीर तेवढी साथ देत नाही‌ तो कालखंड. अशावेळी अजून बरीच स्वप्नं खुणावत असतात पण ती पूर्ण होतील की नाही या शंकेने उलघाल होते. वाढत्या वयाचा आणि कामाचा ताळमेळ न बसण्याची ही कातरवेळेची अवस्था कवी डॉ. निशिकांत श्रोत्री यांनी त्यांच्या ‘संधीप्रकाश’ या कवितेत अतिशय सुंदर समर्पक शब्दांत सांगितलेली आहे.

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

१०/०८/२०२३

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares