☆ अर्जुनाचे बाण आणि बीजगणित — माहिती संग्राहक : श्री चंद्रकांत बर्वे ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆
भास्कराचार्य (ई. सन १११४ ते ११८५) मध्ययुगीन भारतातील एक महान गणितज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म कर्नाटक राज्यात झाला. गणितातील वेगवेगळ्या गणना (Differential Calculus) शोधून काढणाऱ्या गणितीय शास्त्रज्ञांचे ते पूर्वाधिकारी होते, अगदी न्यूटन आणि लीबनीझ यांच्याही पूर्वी ५०० वर्षे.
भास्कराचार्य यांनी गणितावर आधारित संस्कृत भाषेत ४ ग्रंथ लिहिले. त्यातील एकाचे नाव आहे लीलावती, ज्याच्यात गणितासंबंधित काही कोडी आहेत, गहन प्रश्न आहेत, ज्यावर अनेक विद्वानानी संशोधन करून उत्तर मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. हे कोड्यांसारखे प्रश्न श्लोकांच्या रूपात आहेत व त्यामुळे ते समजून घेणे सुद्धा कठीण वाटते. ह्या कोडीस्वरूप प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी ह्या श्लोकांचा व्यवस्थित अर्थ समजून घेणे अत्यावश्यक आहे.
चिच्छेदास्य शिरः शरेण कति ते यानर्जुनः संदधे || ७६ ||
ह्या श्लोकाचा सरळ अर्थ म्हणजे जणू काही खाली दिलेला प्रश्नच आहे,
अर्जुन आणि कर्ण यांच्यातील महाभारत युद्धामध्येअर्जुनाने काही बाण सोडले, सोडलेल्या काही बाणांपैकी
अर्धे बाण कर्णाने मारलेले बाण थांबविण्यासाठी खर्ची पडले.
एकूण बाणांच्या वर्गमूळाच्या ४ पट बाण, कर्णाच्या रथाच्या घोड्यांना नियंत्रणात आणण्यासाठी वापरले गेले.
६ बाण कर्णाचा सारथी शल्य याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरले गेले. (शल्य हा नकुल आणि सहदेव यांचा मामा होता)
कर्णाच्या रथावरील छत्र व झेंडा, तसेच कर्णाचे धनुष्य, यावर ३ बाण मारले गेले.
शेवटी एका बाणाने कर्णाचा वध करण्यात आला.
तर मग ह्या युद्धात अर्जुनाने किती बाण सोडले?
योग्य समीकरणाने ह्या प्रश्नातील गणिताचे उत्तर नक्कीच मिळू शकेल.
एकूण बाणांची संख्या X आहे असे धरून चालूया
बाणांसंबंधी जी काही विधाने वर केलेली आहेत त्यांना गणितरूपात असे मांडता येईल
X = X/2 + 4√X + 6 + 3 + 1
वरील गणित सोडवले तर अर्जुनाने सोडलेल्या एकूण बाणांची संख्या X = १०० अशी येते.
परंतु असे उत्तर काढल्यावर प्रश्न इथेच थांबत नाही. ह्या श्लोकात बरीच काही गुप्त माहिती आहे. आपण जर खोलात जाऊन विचार केला तर बरीच काही गुप्त माहिती आपण शोधू शकतो.
कर्णावर मात करण्यासाठी अर्जुनासारख्या अतिरथी योद्ध्याला ५० बाण वापरावे लागले. यावरून आपल्याला कर्णाच्या युद्ध कौशल्याची महती कळते.
रथ चालविणाऱ्या घोड्यांना थांबविण्यासाठी ४० बाण वापरावे लागले, यावरून त्या घोड्यांना रणभूमीवर लढण्यासाठी किती प्रशिक्षण दिले असेल हे आपल्या लक्षात येते.
घोड्यांसाठी ४० बाण खर्च झाले, पण शल्य (रथाचा सारथी) फक्त ६ बाणांनी शरण आला, यावरून आपल्याला कळते की शल्य हा अर्जुनाच्या बाजूनेच होता.
कर्णाचा रथ आणि धनुष्य नियंत्रणात आणण्यासाठी फक्त ३ बाण लागले, यावरून कर्ण किती हतबल असहाय्य होता हे कळते.
आणि एकदा सर्व काही नियंत्रणात आले की शत्रूला नेस्तनाबूत करायला एकच बाण पुरेसा होता हे लक्षात येते.
तर अशी लढाई जिंकण्यासाठी आवश्यक असलेले नियम व कौशल्ये यांची कार्यप्रणाली असे सांगते की सर्वप्रथम शत्रूची लढाऊशक्ती संपवा, दुसरे म्हणजे शत्रूची वाहन साधने, उदाहरणार्थ रथ घोडे वगैरेंची हालचाल थांबवा आणि तिसरे म्हणजे त्याचा रथ, त्याची वाहतुकीची साधने नष्ट करून, नादुरुस्त करून, त्याला असहाय्य करा व अशातऱ्हेने सरते शेवटी शत्रूचा निःपात करा
आपण हाच श्लोक जर अध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिला तर
संपूर्ण मुक्ती मिळविण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपल्यातील कामना आसक्ती यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. हे जरा कठीण आहे व म्हणून याला ५० बाण वापरावे लागतील.
त्यानंतर पंचज्ञानेंद्रिये, तसेच पाच घोड्यांनी सूचित केलेले पंचविषय किंवा पंचतन्मात्रा नियंत्रणात आणा, याला लागणारे ४० बाण सुचवतात की हे सुद्धा कठीण आहे.
पंचज्ञानेंद्रियांवर नियंत्रण आणल्यावर आत्मतत्त्वाने सूचित केलेल्या मन बुद्धी चित्त आणि अहंकार यावर नियंत्रण आणण्याच्या दिशेने वाटचाल सुरु होईल.
कामना आसक्ती वगैरेचा त्याग केलात, जुने सगळे विसरलात, तर मोक्षप्राप्ती सहजसुलभ होऊ शकेल.
ही आपल्याला पूर्वजांनी दिलेली सनातन धर्मातील देणगी आहे. मूल्यांसहित विद्या – एका श्लोकात किती गहन अर्थ भरला आहे.
माहिती संग्राहक : चंद्रकांत बर्वे
प्रस्तुती : श्री सुहास सोहोनी
मो ९४०३०९८११०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ अभिजात म्हणजे ? अजिबात माहित नाही… – लेखक – श्री अविनाश सी. कुलकर्णी☆ श्री सुहास रघुनाथ पंडित☆
पूर्वी पुण्यामध्ये काही टपर्यांवरती पाट्या पाहिल्या की वाचून हसू यायचं. यात लिहिलेल असायचं शिव्या द्या पण मराठीत. आपल्या भाषेविषयी प्रेम व्यक्त करणार्यांनी घेतलेली ही एक भूमिका म्हणता येईल. मराठीवर प्रेम असणारा महाराष्ट्रात माणूस नाही असं होणार नाही. माझा मराठीची बोलू कौतुके, परि अमृताते ही पैजा जिंके, असेही मराठी विषयी आदर व्यक्त करताना म्हटलं जातं. अलीकडेच आपण ऐकलं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. केंद्र सरकारने याबाबतची घोषणा नुकतीच केली. मराठी बरोबरच पाली, प्राकृत, असामी आणि बंगाली या 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला असल्याचे सांगण्यात आलं. याआधी तमिळ भाषेला सर्वप्रथम 2004 मध्ये अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. देशात आता एकूण 11 अभिजात भाषा झाल्या आहेत. महाराष्ट्रातील मराठी साहित्यिक, मराठी प्रेमी मंडळी गेली अनेक वर्ष मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी प्रयत्नशील होते. केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा अनेक राजकीय पक्षांनीही केला होता. आता हा दर्जा मिळाला आहे पण म्हणजे नक्की काय? हे अनेकांना ज्ञात नाही. मराठीला काहीतरी सन्मान मिळाला आहे आणि हा एक आनंद व्यक्त करण्याचा मुद्दा आहे असं अनेकांना ज्ञात आहे. अनेक मराठी साहित्यिकांनीही आपल्या परीने या अभिजात भाषा प्रकरणाचे विश्लेषण केलं आहे. अभिजात भाषा कशी ठरवावी याविषयी 2004 साली नियम तयार केले गेले. त्या भाषेतील ग्रंथांची पुरातनता आणि हजार वर्षाच्या इतिहासाच्या नोंदी असणं आवश्यक असल्याचं म्हटलं होतं. प्राचीन साहित्य ज्याला मौल्यवान वारसा म्हणून गणलं जाईल त्याचबरोबर साहित्य, परंपरा मूळ असली पाहिजे. ती दुसर्या भाषेतून घेतलेली नसावी वगैरे. तमिळ भाषेला अभिजात भाषा म्हणून ग्राह्य धरले गेलं. संस्कृतलाही हा दर्जा मिळाला. आता तब्बल वीस वर्षांनी मराठी भाषेला अभिजात भाषा ठरवली गेली. गेले काही दिवस हा विषय अजिबात चर्चेत नव्हता. अभिजात हा उच्चारही आपल्यापैकी अनेकांना अजून जमत नाही. बरेच जण अजिबात, अभिताजी वगैरे वगैरे म्हणतात. जाणीवपूर्वक कोणी मराठीची अवहेलना करत नाही पण आपल्याकडे गावनिहाय मराठी भाषा वेगवेगळ्या पद्धतीने बोलली जाते. प्रत्येक गावचं, शहराचं एक भाषा वैशिष्ट्य आहे. पण हे सारे मराठमोळे आपण एकत्रित आहोत. मराठीचा उच्चारही म्हराठी, मरहठ्ठी वगैरे करणारे आहेतच. पुण्यामध्ये मराठीमध्ये वेगवेगळ्या सूचना, पाट्या हे आपण सोशल मीडियामध्ये पाहतो. अनेक मराठी शिकवणारी मंडळी आहेत ते अधिकाधिक मराठी वापरण्याचा प्रयत्न करतात तेव्हा आपल्या हिंग्लिश, हिंदी, उर्दू याचा प्रभाव असणार मराठी असल्याचं दिसतं. हल्ली तर विविध दूरचित्रवाण्यांवर मराठीचं पार पोस्टमार्टम करून टाकलं आहे. आता पहा शवविच्छेदन असा शब्द आपण वापरला असता तर हा शब्द अनेकांना रुजूलाही नसता. रेल्वेला अग्नीरथ म्हणणार्यांकडे आपण ग्रामीण भागातून आला की काय अशा नजरेतून पाहतो. जगातील अकरा कोटी लोकांची मराठी भाषा असून जागतिक क्रमवारीत मराठी 15 व्या स्थानावर येते. जवळपास अडीच हजार वर्ष मराठी भाषा जुनी असल्याचं सांगितलं जातं. 2012 साली प्रा. रंगनाथ पाठारे यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. भाषा ही संपर्काचं साधन आहे. एकमेकांचे विचार आपल्याला ज्या बोली भाषेमध्ये पटतात ते आपण ऐकले पाहिजेत. भाषेचा अभिमान असायला हरकत नाही. तिचा आदर केला पाहिजे पण इतरांचा अनादर करण्यासाठी याचा वापर होता कामा नये. मराठी भाषा ही अत्यंत सुंदर आहे. अनेकदा मराठी भाषेमधील शब्दांचे अनेक अर्थ निघतात. अगदी उपरोधित भाषा म्हणूनही अनेक जण मराठीचा उल्लेख करतात. महाराष्ट्रात शिवसेनेने मुंबईमध्ये त्याकाळी मराठी विषयी आग्रही भूमिका घेतली. आज आपल्या प्रचलित जीवनामध्ये शुद्ध मराठी वापरणारे कमीच आहेत. अनेकदा आपण वापरण्याचा प्रयत्न केला तरी समोरच्याला ती समजेल असं नाही. इंग्रजी, हिंदीमधील शब्द आपण मराठीमध्ये प्राधान्याने वापरतो. इंग्रजी येत नाही याचा न्यूनगंड बाळगणारे आहेतच. आज जगभरातील अकरा कोटी लोक सोडले तर इतरांना मराठी येते कुठे? असा प्रश्न आपण मनाला विचारला पाहिजे. मराठी येत नाही म्हणून त्यांचं काही अडत नाही तसे इंग्रजी येत नाही म्हणूनही आपलंही कधी काही अडलं नाही. मराठी भाषा विपुल आहे. आपलं म्हणणं दुसर्याला पटतयं, संवाद साधला जातोय, जवळकी येतेय मग हि भाषा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. या भाषेबद्दल आदर व्यक्त करण्याचा प्रयत्न अभिजात दर्जा मिळाल्यानं मिळालाय.
लेखक : अविनाश सी. कुलकर्णी
संकलन व प्रस्तुती : सुहास पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
मीरेच्या प्रेमाचं भजन गात गात वारा मंद वाहत होता. रात्रभर सुरू असलेली पावसाची रिमझिम थकून हळुवार झालेली असल्यामुळे गारवा गुलाबी झाला होता. पहाटेचं तांबडं आज फुटलेलं नव्हतं तर नटलेलं होतं. वर्षा ऋतुने मातीवर हात फिरवून अंगाई गायल्यामुळे माती चिखल झालेली होती. नव्या अंकुराला जन्माला घालण्यासाठी तिची तयारी सुरू होती. मी झोंबनाऱ्या वाऱ्याचा हात धरून नदीच्या किनारी पोहचलो होतो. संथ वाहणारी नदी आज माहेरवाशीनी सारखी लंगडी घालत पळत होती. तिचे दोन्ही किनारे झिम्मा खेळत असल्यासारखं जाणवत होतं. मी नदीत पाहता पाहता नदीचा केव्हा झालो कळलेच नाही.
नदीच्या पात्रातून बाहेर आलेली वाळू माझ्या तळपायाला कुरवाळत होती. काळजावर मोर पिस फिरतय असं वाटत होतं. वाऱ्याने जरा हलकासा वेग वाढवला. तसे गर्दी करून थांबलेले ढग वाट दिसेल तिकडं पळू लागले. मधून मधून एखादी चांदणी मला खुणावत होती. मी वर ढगात बघता बघता माझ्या डोळ्यात ढग कधी दाटले कळलेच नाही. कारण खुणावत राहणारी माझी चांदणी अजून आलेली नव्हती.
पाखरांचा किलबिलाट जाणवू लागला. तांबड्या रंगात घारी उडताना दिसल्या. कोकिळेने सूर लावायला सुरवात केली. तिच्या पैंजनांचा आवाज नदीकिनारी वाजू लागला. नदीची सळसळ त्या संगीतात हरवून गेली. तिच्या पावलांचा आवाज माझ्या कानावर आदळू लागला. श्वास गरम झाले. मी मागे वळणार तेवढ्यात तिने मागूनच मला गच्च मिठी मारली. तिचे दोन्ही हात माझ्या छातीवर विसावले. वाऱ्याने त्या हातांना गोंजारायला सुरवात केली. झटकन मी मागे वळलो. आणि तिच्या मिठीत विसावलो. नाकावर नाक अतिक्रमण करू लागलं. तिच्या डोळ्यात माहेरवाशीण झालेली नदी उसळताना दिसू लागली. तिच्या ओठावर पावसाळा तुडुंब भरलेला होता. त्या पावसाळ्यात माझे दुष्काळी ओठ मिसळून माझा दुष्काळ संपवायची हीच वेळ होती. मी ओठांना तयार केलं. तिने डोळे बंद केले. श्वासांनी जाळ काढायला सुरवात केली. मिरेच्या भजनात कृष्णाची नोंद झालेली वाऱ्याने कबुली दिली. पायावर पाय कधी आले कळलेच नाही. तिने टाच उचलली. आणि ओठ पुढे केले.
एवढ्यात आमच्या गल्लीत बोंबाटा झाला. पाणी आलं, पाणी आलं, मी पालथा पडून उशी आवळून धरलेली होती. आईने पाटीवर बुक्की हाणली. भजन गाणारा वारा डीजे वर नाचू लागला. उशी टाकून मी नळाकडे पळालो. एखादं मूल मुतावं तस नळातून पाणी येत होतं. आणि त्याच्याखाली हंड्यावर हांडे आदळत होते. अजून झिंज्या धरून युद्धाला सुरवात व्हायची होती. प्रत्येकीची पिपाणी सुरू झाली होती. मी मात्र त्या नळातून गळणाऱ्या पाण्याकडे पाहत आतल्या आत पाझरत होतो.
भजन गाणारा वारा, लंगडी खेळणारी नदी, पळणारे ढग, आणि माझी ती…इश्श आणि तिची मिठी…सगळं आईच्या बुक्कीने काच फुटावी तसं फुटून गेलेलं होतं. तिचे पावसाळी ओठ आठवत आठवत माझी जीभ कधी मिशिवर रेंगाळू लागली कळलंच नाही. एवढ्यात आमची आय बोंबलून म्हणली, कडू नंबरातच थांब. कुणाला मधी घुसू देऊ नकोस…मी सैनिकासारखा ताठ झालो. हातातली कळशी गच्च आवळून धरली. कुठून तरी एक कोंबडं बांग देऊ लागलं. त्याच्या तालावर कवायत करत मी त्या नळापर्यंत जाण्याचा जीवघेणा प्रवास सुरु केला. तेवढ्यात झिंज्या धरून जो कालवा सुरू झाला त्या गोंधळात माझं गुलाबी स्वप्न मिसरी लावून थुकावं तसं कुणीतरी थुकून टाकत होतं.
☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-९ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆
.. आई जोगेश्वरी ची सेवा…
आईने नानांच्या पिठाला मीठ जोडण्यासाठी केलेल्या अनेक उद्योगांपैकी आणखी एक उद्योग म्हणजे पाळणाघर. शेजारच्या दोन मुली आणि रुबी हॉस्पिटलला एक सिस्टर होत्या, योगेशच्या आई म्हणतो आम्ही त्यांना. त्यांची दोन मुलं आणखी एक शेजारचे तान्हे बाळ पण होते. योगेशच्या आईंची शिफ्ट ड्युटी असायची. त्यांच्या वेळेप्रमाणे आईने मुलं अगदी नातवंडा सारखी सांभाळली. आई अगदी बांधली गेली होती. ही बाळं मोठी झाली त्यांनाही बाळं झाली, तरी त्या मुलांनी आणि त्यांच्या आयांनी जाणीव ठेवली. जोगेश्वरीचे दर्शन घेऊन त्या आमच्याकडे यायच्या आणि म्हणायच्या, “माजगावकर काकू जोगेश्वरी नंतर दर्शनाचा मान तुमचा आहे. देवी नंतर दर्शन घ्यावं तर ते तुमचचं.
“ज्योत से ज्योत जगाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो, ” हे आईचं ब्रीदवाक्य होतं. सेवाभावी वृत्तीमुळे तिने माणसं जोडली, ती म्हणायची कात्रीसारखी माणसं तोडू नका, ‘ सुई’ होऊन माणसे जोडा. ’ पै न पै वाचवून खूप कष्ट करून सुखाचा संसार केला तिने. आईची बँक मजेशीर होती. नाणी जमवून ती एका डब्यात हळदीकुंकू वाहून पूजा करून देव्हाऱ्यात ठेवायची. आईचं रोज लक्ष्मीपूजन व्हायचं. आम्ही म्हणायचो “आई तुझी रोजच दिवाळी असते का गं ? रोज लक्ष्मीपूजन करतेस मग रोज लाडू कां नाही गं करत दिवाळीतल्या सारखे? “ आता कळतंय कशी करणार होती आई लाडू? रेशनची साखर रोजच्यालाच पुरत नव्हती. गुरविणबाई आईला नेहमी त्यांच्या घरी बोलवायच्या. त्यावेळी देवीपुढे नाणी खूप जमायची, इतकी की नाणी वेगवेगळी करण्यासाठी खूप वेळ जायचा, मान पाठ एक व्हायची. पण देवीची सेवा म्हणून आई ते पण काम करायची. गुरव श्री. भाऊ बेंद्रे हुशार होते. त्यांनी रविवार पेठेतून बोहरी आळीतून तीन-चार मोठ्या भोकाच्या चाळण्या आणल्या. आईचं बरचसं काम सोप्प झाल. भोकं बरोब्बर त्या त्या नाण्यांच्या आकाराची असायची त्यामुळे पाच, दहा, 25 पैसे, अशी नाणी त्या चाळणीतून खाली पडायची. घरी पैसे वाचवणारी आई देवीपुढची ती नाणी मोजताना अगदी निरपेक्ष प्रामाणिक असायची. गरिबी फार फार वाईट असते. गुरविणबाई आईकडे सुरुवातीला लक्ष ठेऊन असायच्या. विश्वासाने आईने त्यांचं मन जिंकलं.. दहा पैसे सुद्धा तिने इकडचे तिकडे केले नाही. चाळून झाल्यानंतर पैसे मोजणी व्हायची वेगवेगळी गाठोडी करून आकडा कागदावर लिहून त्या गाठोड्याची गाठ पक्की व्हायची.
देवळातल्या मिळकतीचा आणि त्या गाठोड्यातील पैशांचा गुरव बाईंना अभिमान होता. त्या श्रीमंत होत्या. तितक्याच लहरी पण होत्या. पण आईने त्यांची मर्जी संभाळली. मूड असला तर त्या सोबत म्हणून आईला सिनेमाला घेऊन जायच्या. आणि कधी कधी मुठी मुठीने नाणी पण द्यायच्या. जोगेश्वरीपुढे साड्यांचा ढीग पडायचा. मनात आलं तर त्या नारळ पेढे, तांदूळ, फुटाणे आणि साडीची घडी आईच्या हातात ठेवायच्या. देवीचा प्रसाद म्हणून अपार श्रद्धेने आई ती साडी घ्यायची, आणि दुसऱ्या दिवशी नेसायची तेव्हा आई आम्हाला साक्षात जोगेश्वरीच भासायची. कधीकधी गुरवबाई भरभरून एकत्र झालेले देवी पुढचे तांदूळ गहू पण आम्हाला द्यायच्या. आई त्याची सुरेख धिरडी करायची. तिची चटणी आणि बटाट्याची भाजी इतकी लाजवाब असायची की समोरच्या उडपी हॉटेलचा मसाला डोसा पण त्याच्यापुढे फिक्का पडायचा. हा जेवणातला सुरेख बदल आणि चविष्टपणा चाखून माझे वडील आईला गंमतीने म्हणायचे, ” इंदिराबाई मनात आलं तर देऊळसुद्धा गुरवीण बाई तुमच्या नावावर करून देतील. “.. “काहीतरीच तुमचं! “असं म्हणून आई गालातल्या गालात हसायची.
आईनानांच्या गरीबीच्या संसाराला विनोदाची अशी फोडणी असायची. खिडकीतून दिसणाऱ्या जोगेश्वरीच्या कळसाला हात जोडून आई म्हणायची, ” आई जगदंबे देऊळ नको मला, आई अंबे तू मात्र आमच्याजवळ हवीस. आईने मनापासून केलेली प्रार्थना फळाला आली आणि रोड वाइंडिंगमध्ये आमची जागा गेल्याने आम्हाला तिथेच (पोटभरे) मोरोबा दादांच्या पेशवेकालीन वाड्यात आम्हाला जागा मिळाली. तेही दिवस आमचे मजेत गेले. धन्यवाद त्या मोरोबादादांच्या वाड्याला आणि तुम्हालापण..
“करंजीच्या सारणात थोडी कणिक भाजून घालावी. म्हणजे मग सारण नीट मिळून येतं. नाहीतर करंजीचा खुळखुळा होतो. ”
लहानपणी आईकडून हमखास ही टीप मिळायची. पण कणीकच का? तांदळाचे पीठ का नाही? तर त्यावर “अग गव्हाच्या पिठाच्या अंगी सगळ्यांना धरून ठेवण्याचा गुणधर्म असतो. तसं तांदळाच्या पिठाचे नाही. ते अगदी सरसरीत असतं”. “मग आपण खव्याच्या किंवा मटार च्या करंजीत का नाही घालत हे गव्हाचे पीठ?” माझा अजून एक आगाऊ प्रश्न तर त्यावर “अगं मटार किंवा खव्याच्या सारणात मूळचा ओलावा असतो. त्याला मिळून आणण्यासाठी दुसऱ्या घटकाची आवश्यकता नसते” तितकेच शांत पण तत्पर उत्तर.
अगदी सहजपणे माझ्या आईने जीवनातल्या दोन गोष्टी मला समाजवल्या.
अंगी ओलावा असेल तर गोष्टी मिळून येतात.
ओलावा कमी असेल तर मिळून आणणारा घटक आवश्यक ठरतो.
नंतर लग्न झाल्यावर वडे, कटलेट इत्यादि रेसिपी करताना binding factor चे महत्व पटत गेले.
आणि आज दिवाळीसाठी करंज्या करत असताना एक गोष्ट लख्ख जाणवली.
नात्यांचंही असंच आहे.
प्रत्येक नातेवाइकांच्या गोतावळ्यात असा एखादा binding factor असतो, जो सर्वाना धरून ठेवतो.
मग ते एखादे असे मित्र/ मैत्रीण असतील जे कारणपरत्वे दुरावलेल्या सगळ्यांना बर्याच वर्षांनंतर एकत्र आणतात, whatsApp ग्रुप बनवतात आणि “contact मध्ये रहायचं हं” अशी प्रेमळ दमदाटीही करतात.
कधीकधी असा binding factor आपल्या नात्यातील एखादी बुजुर्ग व्यक्ती असते, तर कधी आपल्या शेजारी पाजारीही अशी व्यक्ती सापडून जाते.
आजच्या virtual जगात सुद्धा असे binding factor दिसतात. आपण त्याना अनेकदा भेटलेलोही नसतो… पण ते मात्र आपली चौकशी करतात… काळजीही करतात.
अशा सगळ्या binding factors ना माझा मानाचा मुजरा. ते आहेत म्हणून समाजातील माणूसपण टिकून आहे,
अन्यथा समाजाचाही खुळखुळा व्हायला वेळ लागणार नाही.
लेखक : अज्ञात
संग्राहिका : सौ.बिल्वा शुभम् अकोलकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
.. तो रस्त्यावरचा भटका कुत्रा नेहमी रात्रभर तिच्या घराच्या दाराशी जागा असायचा. एकप्रकारे तिचं संरक्षण करण्याचं व्रतच त्याने घेतलं होतं..
तिच्या मनी त्याच्याप्रती भूतदया जागृत झाल्याने, त्याला सकाळ संध्याकाळ नेमाने ब्रेड बटर प्रेमाने खाऊ घालायची.
प्रेमाने केलेल्या क्षुधाशांतीच्या तृप्ततेने तो आनंदाने आपली शेपटी हलवत सतत तिच्या आजूबाजूला, घराजवळ घुटमळत राहायचा..
तिच्या नवऱ्याला कुत्र्यांबद्दल तिडीक असल्याने तो तिच्यावर सारखा चिडायचा ; कुत्र्याला हडतूड करायचा. आणि एका रात्री…
मुसळधार पाऊस झोडपत असताना तिच्या नवऱ्याने कडाक्याच्या भांडणातून तिला घरातूनच कायमचे हाकलून दिले; त्यावेळी तो भटका कुत्रा तिच्याजवळ येऊन ,तिची ओढणी ओढत ओढत तेथून आपल्या बरोबर घेऊन जाऊ लागला, जणूकाही इथून पुढे इथं राहून अधिक मानहानी करण्यात काही मतलब नाही हेच तो सुचवत होता..
आजवरचं मालकिणीचं खाल्लेलं मीठ नि तिनं दिलेलं प्रेम या जाणीवेला तो भटका असला तरी आता त्याच्या इमानीपणाला जागणारं होता..
(पूर्वसूत्र- पगार होईपर्यंत पुरेल एवढंच मोजकं सामान आणून दिल्यानंतर खिशात राहिली होती फक्त शंभर रुपयांची एक नोट. त्या एका नोटेतच पुढे घडणाऱ्या आक्रिताचे धागेदोरे लपलेले होते. )
“हे काय? एवढंच सामान?” रात्री जेवणाची तयारी करून ठेवल्यानंतर मी आणलेलं सामान आवरताना आई म्हणालीच.
” होय अगं. अगदी निकडीचं आहे तेवढंच आणलंय. नंतर चांगल्या दुकानातून महिन्याचं सर्व सामान आणूया”
“आणि चहा पावडर?ती नाही आणलीस?”
“अगदीच संपली नाहीय ना?”
“आज घरमालकीण बाई येऊन भेटून गेल्या. संध्याकाळी कुलकर्णी आजी आणि वहिनीही आल्या होत्या. त्या सगळ्यांना चहा केला होता रे. त्यानंतर आता जेमतेम आपल्या दोघांच्या सकाळच्या चहापुरती शिल्लक असेल बघ. “
ही कुलकर्णी मंडळी शेजारच्याच पोस्टल काॅलनीत रहायची. प्रमोद कुलकर्णी आमच्याच बँकेच्या इथल्या दुसऱ्या ब्रॅंचमधे हेडकॅशिअर होता. त्याने माझी ओळख करून घेतली, आमचे विचार जुळले तसे मग ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले होते. दोघांच्याही आपापल्या व्यापांमुळं रोज खूप वेळ भेटणं-बोलणं व्हायचं नाही पण रोज रात्री जेवण झाल्यावर आम्ही दोघं कोपऱ्यापर्यंत पाय मोकळे करायला मात्र नियमित जायचो.
“आज प्रमोद आणि मी रात्री फिरायला जाऊ तेव्हा एखादं दुकान उघडं असेल तर घेऊन मयेईन. नाहीतर मग उद्या नक्की”
मी चहा-पावडरीच्या विषयाला असा पूर्णविराम दिला खरा पण काही झालं तरी आज मी चहाची पावडर आणणार नव्हतोच. कारण प्रमोद बरोबर असताना त्याच्यासमोर फक्त शंभर ग्रॅम चहापूड कशी मागायची हा प्रश्न होता. त्यापेक्षा उद्या दुपारी घरी जेवायला येताना आणता येईल असा विचार मी केला होता. पण झालं भलतंच. रात्री जेवण आवरून मी हात धुवत होतो तोवर प्रमोदची हांक आलीच.
“आई, मी जाऊन येतो गं” म्हणत मी बाहेर पडलो तेवढ्यांत घाईघाईने आई दारापर्यंत आली.
“लवकर ये रे. आणि येताना चहापावडर आण आठवणीनं ” प्रमोदपुढंच तिनं सांगितलं. “हो आणतो” म्हणून मी कशीबशी वेळ मारुन नेली.
आम्ही नेहमीप्रमाणे गप्पा मारत कोपऱ्यापर्यंत जाताच मी परतीसाठी वळणार तेवढ्यात प्रमोदने मला थांबवलं.
“अहो, चहा पावडर घ्यायचीय ना? आई म्हणाल्या नव्हत्या का?ते बघा. त्या दुकानात मिळेल. ”
ला ‘नको’ म्हणता येईना. विरोध न करता अगदी मनाविरुध्द मी मुकाट्याने प्रमोदच्या मागे गेलो.
” किती.. ?पाव किलो?” त्यानेच पुढाकार घेत मला विचारलं..
“चालेल. ” मी नाईलाजाने म्हणालो. खिशातली ती एकमेव शंभर रुपयांची नोट दुकानदाराला देऊ लागलो. त्याने ती घेतलीच नाही.
“मोड नाहीये. २५ रुपये सुटे द्या” दुकानदार शांतपणे म्हणाला. ते माझ्या पथ्यावरच पडलं होतं.
“ठीक आहे. राहू दे ” म्हणत मी विषय संपवला पण तिकडे लक्ष न देता प्रमोदने माझ्या हातातली ती नोट वरच्यावर काढून घेतली.
“सर, ती समोरची टपरी माझ्या मित्राचीच आहे. तिथे मोड मिळेल. थांबा. मी आलोच. ” तो घाईघाईने म्हणाला आणि रोड क्रॉस करून त्या टपरीच्या दिशेने गेलासुध्दा. तिथेही त्याला मोड मिळूच नये असा सोयीस्कर विचार मी करत होतो तेवढ्यात तो आलाच. मुठीत धरलेल्या पैशांमधील २५ रुपये परस्पर त्याने दुकानदाराला दिले आणि चहाचा पुडा घेऊन तो माझ्याकडे देत हातातली बाकीच्या नोटांची घडीही त्याने माझ्याकडे सुपूर्त केली. ते पैसे मी तसेच खिशात ठेवले आणि आम्ही परतीची वाट धरली.
हा खरं तर किती साधा प्रसंग. पण तो इतका सविस्तर सांगण्याचं एक खास प्रयोजन मात्र आहे. तसं पाहिलं तर कांही दिवसांपूर्वी घडून गेलेल्या त्या ‘लिटिल् फ्लाॅवर’ च्या एपिसोडशी या अगदी सरळसाध्या प्रसंगाचा अर्थाअर्थी कांहीतरी संबंध असणे शक्य तरी आहे कां? पण तसा तो होता हे नंतर चार दिवस उलटून गेल्यावर अगदी अचानक माझ्या लक्षात येणार आहे याची पुसटशी जाणिवही मला त्याक्षणी झालेली नव्हती!
पुढे चारच दिवसांनी पौर्णिमा होती. शनिवारी कामं आवरून मी निघणार होतो. शुक्रवारी रात्री झोपण्यापूर्वीच मी माझी बॅग भरून ठेवत असतानाच…..
” पहाटे तुला किती वाजता उठवायचं रे ?” आईनं विचारलं.
” पाच वाजता. ”
सकाळी लवकर बँकेत जाऊन तातडीची कामं पूर्ण करायची तर पाचला उठणं आवश्यकच होतं. अंथरुणाला पाठ टेकताच मला गाढ झोप लागली. अचानक कुणाची तरी चाहूल लागली आणि मी एकदम जागा झालो.
” कोण आहे?” मी अंदाज घेत विचारलं.
ती आईच होती.
“पेपर आलाय रे. इथं टीपॉयवर ठेवतेय. ऊठ बरं”
“पेपर इतक्या पहाटे?” मला आश्चर्य वाटलं.
मी लाईट लावला. पेपर घेऊन सहज चाळू लागलो. माझी नजर एका पानावर अचानक स्थिरावली. मी झपकन् उठलो. कपाट उघडून पॅंटच्या खिशातलं मिनी-लॉटरीचं तिकीट बाहेर काढलं. पेपरमधल्या त्या पानावरच्या मिनी लॉटरीच्या रिझल्टनेच माझं लक्ष वेधून घेतलं होतं! हातातल्या तिकिटावरचा नंबर मी पडताळून पाहू लागलो. माझ्या तिकिटावरचे शेवटचे तीन आकडे ४७५ असे होते ज्याला एक हजार रुपयांचं बक्षीस लागलेलं होतं! माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. अनपेक्षित अशा आनंदाच्या लहरींनी मी उत्तेजित झालो. कधी एकदा हे आईला सांगतोय असं होऊन गेलं आणि मी तिला हांका मारू लागलो. पण माझ्या हाकांचा तो आवाज आईपर्यंत पोहोचतच नाहीये… दूरवर जाऊन प्रतिध्वनींमधे परावर्तित झाल्यासारख्या माझ्याच आवाजातल्या त्या हांका मलाच ऐकू येतायत असं मला वाटत राहिलं. मी अस्वस्थ झालो. कुणीतरी मला हलवून उठवतंय असा भास झाला न् मी दचकून जागा झालो.
“पाच वाजलेत रे.. उठतोयस ना?” आई जवळ येऊन मलाच उठवत होती..
.. म्हणजे मी पाहिलं ते स्वप्नच होतं हे मला जाणवलं. खरंतर पहाटे पडलेलं स्वप्न म्हणजे शुभ शकूनच! पण त्याचा आनंद क्षणभरच टिकला. कारण मी कधीच लाॅटरीचं तिकीट काढत नाही. ‘जे लॉटरीचं तिकीट मी काढलेलंच नाहीय त्याला बक्षीस लागेलच कसं?’ या मनात उमटलेल्या प्रश्नाचं मलाच हसू आलं. ‘मनी वसे ते स्वप्नी दिसे’ म्हणावं तर झोपताना मी पहाटे लवकर उठून आवरायच्याच विचारात तर होतो. लॉटरीबिटरीचा विचार ओझरताही मनात असायचा तर प्रश्नच नव्हता. आणि तरीही… ?
या अशा स्वप्नांना कांही अर्थ नसतो असं वाटलं, पण अर्थ होताच! ते सूचक असा शुभसंकेत देणारं स्वप्न होतं!!
त्यादिवशी कामं आवरून घरी जेवायला यायलाच दुपारचे दोन वाजून गेले होते. लगेचच तीनची बस पकडायची होती. तशी काल रात्रीच मी बॅग भरून ठेवली होती म्हणून बरं. कसंबसं जेवण आवरून कपाटातला समोरचा हाताला येईल तो हँगर ओढला. घाईघाईने कपडे बदलले आणि बॅग घेऊन बाहेर पडलो.
बस सुटता सुटताच कशीबशी मिळाली. बसायला जागा नव्हतीच. हातातली बॅग वरच्या रॅकवर ठेवण्यापूर्वीच कंडक्टर तिकिटासाठी गडबड करू लागला. खिसे चाचपून पैसे बाहेर काढले. नोटांच्या घडीतली वरची ५० रुपयांची नोट कंडक्टरला दिली. तिकीट घ्यायच्या गडबडीत हातातल्या नोटा खाली पडल्या. त्या उचलायला वाकलो आणि माझ्या लक्षात आलं त्या नोटांच्या घड्यांमधे कसल्यातरी कागदाची छोटी घडी दिसतेय. बसच्या हादऱ्यांमुळे धड उभं रहाताही येत नव्हतं त्यामुळे तो कसला कागद हे न बघता नोटांबरोबर तो कागदही पॅंटच्या खिशात तसाच सरकवला आणि तोल सावरत उभा राहिलो.
नृ. वाडीला गेल्यावर प्रसादाच्या नारळ-खडीसाखरेचे पैसे देण्यासाठी खिशातून बाहेर काढले तेव्हा ती कागदाची घडी म्हणजे ५० पैशांचं मिनी-लाॅटरीचं एक तिकिट आहे हे लक्षात आलं. ‘हे इथं आलं कुठून?’ हा विचार मनात येत असतानाच माझी आश्चर्यचकित नजर त्या तिकीटावरच खिळलेली होती. त्या नजरेलाच जाणवलं कीं या तिकिटावरचे शेवटचे तीन आकडेही ४७५ हेच आहेत… !
, मनात आश्चर्य होतं, हुरहूर होती, उत्सुकता होती आनंदही! त्याच मनोवस्थेत दर्शन घेऊन मी वर आलो. वाटेतल्या लॉटरी स्टॉलवर ते तिकीट दाखवलं.
” एक हजार रुपयाचं बक्षीस लागलंय” स्टॉलवाला म्हणाला. हे अपेक्षितच होतं तरीही मनातल्या मनात झिरपणारा आनंद मी लपवू शकलो नाही.
” तिकीटं देऊ?”
“नको. पैसेच द्या” मी बोलून गेलो.
“दीडशे रुपये कमिशन कापून घ्यावे लागेल. “
” चालेल. ” मी म्हटलं.
त्याने कमिशन वजा जाता राहिलेले ८५० रुपये मला दिले आणि मी शहारलो. नेमके आठशे पन्नास रुपये? कितीतरी वेळ हे स्वप्नच असेल असंच वाटत राहिलं.
मन स्थिर झालं तेव्हा मात्र ‘मी कधीच न काढलेलं ते लॉटरीचं तिकीट माझ्या खिशात आलंच कसं?’ हा प्रश्न माझ्या मनाला टोचत राहिला. त्याचा थांग लागला तो मी सोलापूरला परत आल्यानंतर प्रमोद कुलकर्णी मला भेटला तेव्हा!
चहाचा पुडा घेण्यासाठी माझ्या हातातली शंभर रुपयांची नोट घेऊन मोड आणायला तो समोरच्या टपरीकडे धावला होता. त्याला मोड मिळाली होतीही पण ती देताना त्याचा तो टपरीवरचा मित्र त्याला सहज चेष्टेने ‘काहीतरी घेतल्याशिवाय मोड मिळणार नाही’ असं हसत म्हणाला तेव्हा प्रमोदलाही आपल्या मित्राची गंमत करायची लहर आली. ती टपरी म्हणजे त्या मित्राचा लाॅटरीचा स्टाॅल होता. त्यावरचे फक्त ५० पैशांचे एक मिनी लॉटरीचे तिकीट काढून घेत प्रमोद म्हणाला, “काहीतरी घ्यायचंय ना? हे मिनी लाॅटरीचं एक तिकीट घेतलंय बघ. “
मित्रही मजेत हसला. त्याने सुट्टे पैसे परत दिलेन. प्रमोदने त्यातले पंचवीस रुपये दुकानदाराला देऊन मला दिलेले बाकीचे पैसे मी न बघताच खिशात ठेवून दिले होते आणि त्या नोटांच्या घडीतच हे लाॅटरीचं तिकिटही होतंच!
हे सगळं कसं घडलं याचं तर्काला पटणारं उत्तर माझ्याजवळ आजही नाहीय. पण दोन्ही प्रसंगांमधले एकमेकात गुंतलेले धागेदोरे आणि त्यांच्यातली वीण इतकी घट्ट होती की त्यात लपून बसलेलं कालातीत सत्य मला त्याक्षणी जाणवलं नव्हतं पण त्याच दिशेने सुरु असलेल्या विचारांमधूनच जेव्हा ते जाणवलं ते मात्र अगदी लख्खपणे…!!
दैनंदिन आयुष्यात सहज घडणाऱ्या साध्यासाध्या घटना- प्रसंगांच्या क्रमांमधेही कुणीतरी पेरून ठेवलेला एक विशिष्ठ असा कार्यकारणभाव असतोच. ते नेमकं तसंच आणि त्याक्रमानेच कां, कसं घडतं? याचा फारसं खोलात जाऊन सहसा आपण कधी विचार करत नाही. पण असा एखादा गूढ अनुभव मात्र त्याचा तळ शोधायला आपल्याला नकळत प्रवृत्त करतोच. हे सगळं कसं घडतं, कोण घडवतं ते समजून घेणं आणि ‘त्या’ ‘कुणीतरी’ पुढे नतमस्तक होणं एवढंच आपण करायचं असतं!
चहापावडर आणायची आठवण आईने प्रमोदसमोरच मला करून देणे, स्वत: पुढाकार घेऊन प्रमोदने मला त्या दुकानात माझ्या मनात नसतानाही घेऊन जाणे, तिथे मोड नाहीय हे समजताच समोरच्या टपरीवरून सुटे पैसे आणायला त्याचे प्रवृत्त होणे, तिथे अगदी न ठरवताही सहजपणे लाॅटरीचे तिकीट विकत घेणे, नोटांच्या घड्यांमधे त्याने ठेवलेले ते तिकीट अलगद माझ्या खिशात पुढे चार-पाच दिवस असे सुरक्षित रहाणे या सगळ्या घटनाक्रमांमागे विशिष्ट अशा कार्यकारणभाव होताच होता आणि त्याचा थेट संबंध माझी कसोटी पहाणाऱ्या त्या ‘लिटिल् फ्लॉवर’ एपिसोडशीच तर होता! म्हणूनच “माय गॉड वुईल रिइंबर्स माय लाॅस इन वन वे आॅर आदर.. ” हे सहजपणे बोलले गेलेले माझे शब्द असे शब्दशः खरे ठरलेले होते! याच्याइतकेच ते घडणार असल्याची सूचक कल्पना अकल्पितपणे माझ्या मनात त्या पहाटेच्या स्वप्नाद्वारे मला ध्वनीत होणे हेही अलौकिक आणि म्हणूनच खूप महत्त्वाचे आहे आणि तेवढेच आश्चर्यकारकही !!
आज इतक्या वर्षांनंतर सुद्धा ते स्वप्न माझ्या मनात अजूनही टवटवीत आहे. हे घडल्यानंतर माझ्या अंतर्मनाचा कण न् कण शुचिर्भूत झाला असल्याची भावना त्या क्षणी मला अलौकिक असा आनंद देऊन गेली होती! त्या आनंदाचा ठसा आजही माझ्या मनावर आपल्या हळुवार स्पर्शाचं मोरपीस फिरवतो आहे!!
माझ्या आईचं, शैलजा फेणाणीचं सर्वांत लाडकं दैवत म्हणजे ‘महालक्ष्मी’ ! म्हणून तर तिनं तिच्या मंगळसूत्रामध्ये सुंदर, सुबक, नाजूक, रंगीत मीनाकाम चितारलेल्या आणि कमळात उभ्या असलेल्या ‘लक्ष्मी’चं लॉकेट दिमाखात घातलं होतं!
माझे बाबा, शंकरराव फेणाणी हे भारतातील ‘स्क्रेपर बोर्ड’ या ब्रिटिश चित्रकलेतील मोठे तज्ज्ञ म्हणून गणले जायचे. ते उत्कृष्ट चित्रकार होते. लहानपणी ते कारवारला असताना, त्यांना ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स’मध्ये शिकण्यासाठी आणि चित्रकलेतून उदरनिर्वाह करण्यासाठी मुंबईला यायची फार इच्छा होती. परंतु चित्रं काढून कोणी पोट भरू शकतं का? यावर त्याकाळच्या उच्चशिक्षित (संस्कृत आणि गणितात तज्ञ असलेल्या) माझ्या आजोबांना यावर विश्वास नव्हता. लग्नापूर्वी अत्यंत कठीण परिस्थितीतही, चित्रकलेच्या माध्यामातून उदरनिर्वाह करण्याची बाबांची जिद्दच, त्यांना मुंबईला घेऊन आली.
बाबा मुंबईला आल्यावर त्यांच्या आयुष्यात, शैलजाच्या पावलांनी मात्र ‘लक्ष्मी’ घरी आली! त्यावेळी घरात केवळ एक खाट आणि कांबळ होती. परंतु दोघांच्या अत्यंत प्रामाणिकपणे केलेल्या कष्टाच्या कमाईने, लक्ष्मीच्या हातांनी घर हळूहळू सजू लागलं. जसजसा संसार फुलू लागला, तसतसं आईचं ‘महालक्ष्मी’ मंदिराशीही नातं जुळू लागलं, आणि अधिकाधिक दृढही होऊ लागलं! आई जेव्हा महालक्ष्मीची पूजा करत असे, त्यावेळी तर तिच्या चेहर्यावर विलक्षण तेज, सोज्ज्वळता, सात्त्विकता याची प्रचिती येई! एका क्षणात् त्या ‘देवत्वाशी’ ती एकरूप होई! तिच्या महालक्ष्मीवरील जबरदस्त श्रद्धेमुळेच माझ्या जन्माआधी, दर शुक्रवारी ती नवचंडिकेची यथासांग पूजा करून, कुमारिकांना बोलावून, सन्मानपूर्वक, भेटवस्तू देऊन, जेवण घालीत असे.
गणेशोत्सवातील हरितालिकेच्या (पार्वतीच्या – शैलजाच्या) पूजेच्या दिवशी आणि गणपती आगमनाच्या दिवशीसुद्धा दोन्ही दिवस, ती निराहार, उपवास करून, ताजे, खमंग आणि स्वादिष्ट असे अनेक तिखटा-गोडाचे पदार्थ करुन शंभरएक नातेवाईक आणि भक्त मंडळींना घरी जेवू घालत असे. पाण्याचा एक थेंबही न घेता, ही ताकद तिला कुठून येत असेल बरं? याचं आम्हां सर्वांना कोडंच पडत असे. नक्कीच तिला तिची ‘महालक्ष्मी’ उदंड ऊर्जा देत असावी!
माझ्या आईचं माहेरचं नाव ‘कमल’. माझ्या जन्मानंतर ‘नवचंडीचा प्रसाद’ म्हणून आणि कमळात जन्मलेली – (पद्मात् जायते इति) म्हणून, आमच्या भाई काकांच्या (म्हणजे सर्वांचे लाडके सुप्रसिद्ध लेखक पु. ल. देशपांडे यांच्या) आईनं, “हिचं नाव ‘पद्मजा’च ठेवा, ” असं सांगितलं. ‘नवचंडिकेच्या वरदानाने ही ‘चंडिका’च माझ्या पोटी जन्मली!’ असं कधीकधी आई गंमतीने माझी चेष्टा करत म्हणायची! त्यानंतर दिवसेंदिवस आईची भक्ती पाहून, मीही देवीची भक्त झाले.
बारावीनंतर माझी अॅडमिशन मायक्रोबायोलॉजी हा विषय असलेल्या ‘सोफाया’ कॉलेजमध्ये झाली. आणि योगायोग म्हणजे हे कॉलेज ‘महालक्ष्मी’ मंदिराकडून, पायी अगदी दहा मिनिटांच्या अंतरावर होतं. जणू महालक्ष्मीनेच मला जवळ बोलावून घेतलं होतं! त्यामुळे मीही दर शुक्रवारी महालक्ष्मीच्या मंदिरात दर्शनासाठी जात असे; आणि देवीसमोर, माझे गुरू ‘पद्मविभूषण’ पंडित जसराजजींनी मला शिकवलेलं ‘माता कालिका’ हे सुंदर भजन आणि इतर देवीची भजनंही मी गात असे. ते गाताना देवीची तिन्ही रूपं पाहून मन खूप प्रसन्न होई. तिथली पुजारी मंडळीही माझी दर शुक्रवारी आतुरतेने वाट पाहत, आणि माझ्या गाण्याचा आनंद घेत. त्यानंतर मला ते पेढे, नारळ, हार, फुलं असा भरपूर प्रसाद देत. अशा वेळी मी देवीसाठी गायले म्हणून हा प्रसाद तिनं ‘माझ्यासाठीच’ पाठवला आहे, असं मला वाटे आणि मोठ्या आनंदाने माझी आई त्याचा स्वीकारही करी.
नित्यनियमाप्रमाणे असेच एकदा मी कॉलेजमधून परतताना शुक्रवारी ‘महालक्ष्मी’ला दर्शनाला गेल्यावेळी, तिच्यासमोर मी ‘माता कालिका’ डोळे मिटून अत्यंत भावपूर्णपणे गायले. मी गात असताना शेजारीच कुणीतरी मुसमुसून रडण्याचा मला आवाज आला. मी दचकून पाहिले… तर एक मध्यमवयीन दाक्षिणात्य स्त्री रडत असल्याचं मला दिसलं. माझं भजन संपल्यावर मी तिला, ‘काय झालं? तुम्हाला काही त्रास आहे का?’ असं विचारल्यावर तिनं मला काय सांगावं?… ती टिपिकल दाक्षिणात्य टोनमध्ये म्हणाली, “आपका गाना सुनकर अमको इतना अच्चा लगता ऐ, तो बगवाऽऽऽन को कितना अच्चा लगता ओगा!” हे ऐकून मला गालातल्या गालात हसू आवरेना! असे अविस्मरणीय प्रसंग नेहमी परमेश्वराची आठवण करून देत त्याच्या ‘अस्तित्वाचीही’ साक्ष देतात!…
साधारणपणे ४२-४३ वर्षांपूर्वी, याच महालक्ष्मीचा प्रसाद घेऊन, मी माझे गुरू, ‘पद्मश्री’ पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्याकडे जात असे.
‘भारतरत्न’ लतादीदींना खास भेटून मी हा प्रसाद देत असे. असंच एकदा दीदींना भेटल्यावर हा प्रसाद देत मी म्हटलं, “आज मला दोन महालक्ष्मींचं सुंदर दर्शन झालं.. !” हे ऐकल्यावर दीदी जोरात, खळखळून हसल्या आणि म्हणाल्या, “मी महालक्ष्मी नाही काही… , मी ‘कडकलक्ष्मी’ आहे!” दीदींची विनोदबुद्धी अफाट होती! तशीच महालक्ष्मीवरील श्रद्धाही!
विशाल अरबी समुद्राच्या एका छोट्याश्या काठावर वसलेल्या या मंदिरात गाताना, मला अपार आनंद मिळे! साथीला समुद्राच्या लाटांचा तानपुऱ्यासारखा ‘लयबद्ध नाद’ मला साथ करीतसे. देवीची महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती अशी तिन्ही सुंदर रूपं, मी हृदयात साठवत असे!
एकदा तिथल्या पुजार्यांनी, पूजा केलेला तिन्ही देवींचा एकत्र फोटो, माझं गाणं ऐकून मला दिला होता, जो आजही आईच्या देव्हाऱ्यात पूजला जात आहे.
आई मला बालपणापासून सांगे की, ‘या महालक्ष्मी, महाकाली, आणि महासरस्वतीचा मिलाप म्हणजेच स्त्री शक्ती! स्त्रीमध्ये ही तीनही रूपं सामावलेली आहेत. ’
यातली महालक्ष्मी म्हणजे सुखसंपत्ती आणि वैभवाचं रूप आहे. ही अतिशय शांत, प्रसन्न, प्रेमळ आणि नेहमीच ऊर्जा देणारी आहे.
दुसरी महाकाली – हे समाजाला अत्यंत उपयुक्त असं रूप आहे. ही महाकाली समाजकंटक, गुंडप्रवृत्ती आणि दुष्टांचा नायनाट करणारी महिषासुरमर्दिनी आहे, जी स्त्रियांविरुद्धच्या अन्यायाला चिरडून टाकते. तिच्यातील रौद्ररूप आणि त्वेष आपल्याला मदत करतात. ती शक्तीशाली, बलशाली आणि कणखरही आहे. चांगलं काम करण्याससुद्धा ती प्रवृत्त करणारी आहे.
आणि तिसरी म्हणजे महासरस्वती – ही तर आम्हां कला – सारस्वताचं सुंदर रूप आहे, आमचं दैवतच आहे. तिची अमृतवाणी मोहिनी घालणारी आहे. ही वीणापुस्तकधारिणी आहे. त्या पुस्तकातलं ज्ञान आणि विद्या देणारी आहे. तिचं रूप मोहक आणि लोभसवाणं आहे.
संगीत हा आम्हां कलाकारांना परमेश्वराशी जोडले जाण्याचा सोपा मार्ग आहे. तो सर्वांत जवळचा दुवा आहे. ते एक प्रकारचं मेडिटेशन आहे.
माझ्या आयुष्यातल्या तीन महत्त्वाच्या स्त्रिया, ज्यांनी मला खऱ्या अर्थाने घडवलं, त्या म्हणजे – थोर विदुषी स्वातंत्र्य सेनानी दुर्गाबाई भागवत! त्यांनी मला संगीतकार बनवलं. त्यांचं – माझं नातं म्हणजे आजी नातीचंच जणू! अत्यंत प्रेमळ असलेल्या या दुर्गा आजीचं आणीबाणीच्या काळात, अन्यायाविरुद्ध लढणार्या दुर्गा देवीचंच, कणखर रूप पाहायला मिळालं. अशा महान स्त्रीचा सहवास घडणं हे माझं सद्भाग्यच!
दुसरी स्त्री महासरस्वती – म्हणजे लतादीदी! माझ्या सांगीतिक कारकीर्दीच्या सुरुवातीलाच, अमेरिकेतील पत्रकारांनी लतादीदींना ‘Is there any other voice ranking alongside you?’ असं विचारल्यावर, लतादीदींनी क्षणाचाही विलंब न करता, “Padmaja is extremely talented with an outstanding voice and she is my hope!” असं स्वच्छ सांगून, त्यांनी माझ्याकडून ‘निवडुंग’ चित्रपटासाठी ‘केव्हातरी पहाटे’ आणि लवलव करी पातं’ सारखी आव्हानात्मक गाणी गाऊन घेऊन, माझ्या पंखांत गरूडभरारीचं बळच भरलं! हेही माझं भाग्यच!
आणि तिसरी स्त्री म्हणजे माझी आई – शैलजा – महालक्ष्मीचं रूप! जिच्यामुळे आयुष्यभर मी संगीतातूनच सरस्वतीची आणि महालक्ष्मीची पूजा करत आहे, साधना करत आहे. आत्म्याच्या निकट असणारी एकमेव गोष्ट म्हणजे बुद्धी! ही बुद्धिदेवता- महालक्ष्मी आपल्याला संस्कार आणि समृद्धी देते!
जिनं माझं आयुष्य संस्कारमय आणि सुखसमृद्धीमय केलं, मला घडवलं, त्या माझ्या आई शैलजाप्रमाणेच, ही महालक्ष्मीही, माझ्या ‘आई’चंच रूप आहे!
गणपतीला शूर्पकर्ण का म्हणतात माहिती आहे का? तर त्याचे कान सूपासारखे आहेत म्हणून आणि डोळे का बरं बारीक? सगळं बारकाईने पहाता यावे म्हणून. माणसानेही नेहमी कमी बोलावं जास्त ऐकावं बारकाईने पहावं आणि सगळं डोक्यात ठेवावं. प्रवचन चालू होते आणि अचानक कानठळ्या बसणार्या आवाजाने तिकडे कान टवकारले गेले.
बाहेर येऊन पाहिले तर काय अंगणात एका मुलाने दुसर्याच्या कानाखाली आवाज काढला म्हणून दुसर्यानेही पहिल्याच्या कानशिलात वाजवली होती.
कारण काय जाणून घ्यायच्या आतच त्यांचा आवाज ऐकू येत होता.
रागाने कानातून धूर निघत होता. आणि पहिला विचारत होता या कानाचे त्या कानाला कळू न द्यायची गोष्ट कानोकानी खबर लागत दूरवर गेलीच कशी?
अरे भिंतीला कान असतात रे बाबा. तर तर म्हणे भिंतीला कान असतात तूच लावत असशील भिंतीला कान. त्यावर दुसर्याने कानावर हात ठेवले. * म्हणाला तुझेच कोणीतरी *कान फुंकलेले दिसताहेत. आता नीट कान देऊन म्हण किंवा कान उघडे ठेऊन ऐक •••
कितीही कानी कपाळी ओरडले तरी कानामागून यायचे आणि तिखट व्हायचे जगाचा नियमच आहे.
तेवढ्यात आई तेथे आली आणि म्हणाली माझ्या कानावर आले ते खरे आहे तर! तुमचे कान फुटले नाहीत हे मला माहित आहे. म्हणून दोघांचीही कानउघाडणी करणार आहे. काहीही झालं तरी मारामारीवर उतरायचं नाही. समजलं? वाईट सगळे या कानाने ऐकून त्या कानाने सोडून द्यायचे असते हा कानमंत्र म्हणून काळजावर कोरायचा असतो. हे कान पिरगळून सांगितले. परत मारामारी केली तर कान लांब करीन बरका म्हणून धमकी दिली. शिक्षा म्हणून कान धरायला सांगितले. आईनेच कान टोचलेले दोघांच्याही ध्यानात रहाणार होते.
शेवटी आई ती आईच! ती कान उपटू शकते, कानाखाली जाळही काढू शकते आणि कानात तेलही घालू शकते हे मुलांना कळल्यामुळे मुलांनी लगेच कान धरून माफी मागितली आणि त्यांचे परत सुत जुळले.