मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आयुष्यात रिटेक नाही… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ आयुष्यात रिटेक नाही… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ⭐

विरहानं प्रेम वाढतं हे खरं असलं, तरी

ते प्रेम व्यक्त करायला पुन्हा भेटायची संधी जर मिळाली तरच अर्थ आहे ना?

पण विरहाचं रुपांतर वियोगातच झालं तर?

नाती, माणसं असतात, तोवर किती निष्काळजी आणि बेफिकीर असतो ना आपण!

जेव्हा परतायच्या वाटाच बंद होतात, तेव्हा कळते त्याची किंमत.

पण तोवर काळानं पान उलटलेलं असतं आणि… आणि

आपल्या हातात फक्त आठवणींच्या जखमांचं दान असते….

म्हणूनच, या जन्माचा प्रत्येक क्षण आसुसून जगायला हवा. पूर्णविरामाचा क्षण, कुणास ठाऊक कधी राहील उभा!

सकाळी उठताना कंटाळा येतो? मग करून बघा विचार, सगळ्यांच्याच नशिबात कुठे असा सूर्य? कुणी बिचारा झोपेतच जगाचा निरोप घेतो. मग बिछाना सोडून ताडकन उठावंसं वाटेल. आळसाला रामराम ठोकावासा वाटेल.

नोकरीवर जायचा कंटाळा आला तर जरूर आठवा ती बेरोजगारांची रांग…

स्वयंपाकाचा कंटाळा आला तर आठवावी खपाटीला गेलेली पोटं…

अभ्यासाचा कंटाळा आला तर डोळ्यासमोर आणावी ती अर्धनग्न कळकट मुलं, ज्यांना भीक मागण्यासाठी हात पसरावे लागतात सतत… त्यांच्या हातात कुठून येणार पाटी? मिळत असून नाकारणारी, कंटाळणारी आपणच कपाळकरंटी…

भूतकाळ माझा नाही. भविष्यावर अधिकार नाही. पण वर्तमानातला प्रत्येक क्षण फक्त माझ्यासाठीच आहे. म्हणून तर वर्तमानाला इंग्लिशमध्ये प्रेझेंट म्हणतात. हे प्रेझेंट, हे बक्षीस, आपण सर्वार्थानं उपभोगायला हवं. सजगतेनं जगायला हवं.

सुदृढ शरीराचा लाभ न घेता व्यसनाधीन होऊन छातीचं खोकं आणि किडनीची चाळणी करणारी मंडळी पाहिली की, अस्वस्थ व्हायला होतं.

एकत्र कुटुंबाला भाऊबंदकीची कीड लागते, तेव्हा वाईट वाटतं.

आपला सगळा राग मुलांवर काढणारे पालक दिसले की, विचारावंसं वाटतं, मुलं नसण्याचं दु:ख पदरी नाही, याचा आनंद मानायचा सोडून, असलेल्या सुखावर हात कसा उगारता तुम्ही?

अरसिक नवरा किंवा बायको पाहिले की त्यांना लग्नासाठी झुरणारी मंडळी दाखवावीशी वाटतात.

आई-वडिलांना दुखावणाऱ्यांना अनाथालयात न्यावंसं वाटतं.

सतत रडवेला मुखडा घेऊन जगणाऱ्यांना हॉस्पिटलला व्हिजिट द्यायला पाठवावंसं वाटतं.

जगण्याचा कंटाळा आलाय असं म्हणत, इतरांना कंटाळा आणणाऱ्यांना कॅन्सरशी झुंजणाऱ्या पेशंटना भेटवावंसं वाटतं.

श्रीमंतांच्या श्रीमंतीचा हेवा करत कुढणाऱ्यांना, इस्टेटीच्या वादावरून झालेला रक्तरंजित इतिहास वाचून दाखवावासा वाटतो.

अपूर्ण इच्छांच्या पूर्ततेची हमी दशक्रिया विधीच्या वेळी देऊन पिंडाला कावळा शिवावा म्हणून प्रार्थना करण्यापेक्षा ती व्यक्ती जिवंत असतानाच तो आपलेपणा आणि विश्वास दिला गेला असेल तर ?

शूटिंगमध्ये शॉट चांगला झाला नाही तर रिटेक करतात. म्हणजेच पुन्हा तोच सीन करतात. पण आयुष्यात असे रिटेक घेता येत नसतात. म्हणूनच प्रत्येक क्षणी, वन टेक ओके व्हावा इतकं प्रसन्न जगलं तर ?

खररंच आयुष्य किती सुंदर होईल!

लेखक : अज्ञात 

संग्राहिका : सौ. प्रज्ञा गाडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वसंत वैभव ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

वसंत वैभव ☆ सौ कल्याणी केळकर बापट

फेब्रुवारी महिना हा घरातील लग्नकार्यामुळे खुप जास्त गडबडीत गेला आणि आता मार्च महिना तर कायमच आम्हा बँकर लोकांसाठी धावपळीचाच. मात्र फेब्रुवारी महिना आणि मार्च महिन्याची सुरवात ही भ्रमंती साठी एकदम बेस्ट. ह्या दिवसात गारठा तर कमी होतो पण उन्हाची काहीली सुध्दा सुरू झालेली नसते. त्यामुळे हा मोसम फिरण्यासाठी खासच.

तसही ह्या मोसमामध्ये जरा शहराबाहेर भटकंती करण्याची मजा काही ओरच.मस्त सगळीकडे पळस फुललेला असतो.पळस म्हणजे अफलातून सौंदर्याचे काँम्बीनेशन.त्याचा तो मखमली केशरी रंग, त्या केशरीरंगाला साजेसा शेवाळी हिरवा पर्णसांभार,आणि ह्या सगळ्यांनी बनलेला त्याचा लफ्फेदार तुरा,खरचं वेडं लावतो अक्षरशः. एखादा ह्या फुलांचा गुच्छ खूप सुंदर भासावा आणि लगेच दुस-या गुच्छाकडे नजर टाकावी तो दुसरा त्याहुनही सुंदर भासावा,अशी ही सौंदर्याची मुक्त हस्ते उधळण करणारा हा पळसाच्या फुलो-याचा आपला फेब्रुवारी, मार्च महिना हा खासच. अमरावती जवळ पोहो-याच्या जंगलात टिमटाळ्याला ह्या केशरी फुलांचे विस्तीर्ण पसरलेले जणू पठारच आहे असे म्हणतात. त्या सौंदर्य स्थळालाही एक दिवस निश्चितच भेट देईनच.पळसाचे नानाविध रंग असतात असे म्हणतात पण ज्याप्रमाणे नानारंगाच्या पैठण्या असल्या तरी पैठणी म्हंटली की डोळ्यासमोर ती जांभळट रंगाची टिपीकल पैठणीच उभी राहते त्याचप्रमाणे पळसाचे फुलं म्हंटले की ते मखमली केशरीच.

अजून जरा गावाबाहेर शेतांच्या बाजूला भटकंती वळवली तर अगदी इटुकल्या पिटुकल्या बाळकै-या झाडांना लटकून हवेच्या झोताबरोबर हिंदोळे देत आपल्याला खुणावत असतात.बाळकै-या बघितल्या की खूप द्विधा मनस्थिती होते.त्यांचं ते अजून पूर्ण विकसित न झालेलं,पिल्लासारखं, अवखळ रुप आपल्याला त्याला तोडण्यासाठी हात लावण्यापासून दूर खेचतं,तर त्याची किंचीत तुरट,आंबट चव ही जिभेवर रेंगाळायला मोहात टाकते डेरेदार लटपट लागलेल्या आंबट चिंचानी लदलदलेले झाड बघून अगदी दिवसभरलेली पहिलटकरीण वा लेकुरवाळी माहेरवाशीण घरी आल्याचा फील येतो.

खरचं कारमध्ये ड्रायव्हिंग सिटच्या बाजूला बसून, खिडकी उघडी करून अलवार मंद हवेच्या झुळुका अंगावर झेलतं,वा-यामुळे डोळ्यांवर येणाऱ्या अवखळ केसांच्या बटांना दूर सारतं फुललेल्या केशरी पळसाच्या सौंदर्याचे मनमुराद निरीक्षण करणे ह्यासारखा दुसरा आनंद नाही हे त्याक्षणी तरी वाटतं.

ह्या सौंदर्याच्या बरोबरीनेच वसंत ऋतू हा प्रेमाचे प्रतीक. कोणाचा व्हँलेटाईन तर कोणाला भारुन टाकणारी वसंतपंचमी ह्याच महिन्यातील.फेब्रुवारी महिना हा आम्हां नोकरदारांसाठी पण जरा आवडता महिना.अठ्ठावीस एकोणतीस दिवसाचा हा महिना का कोण जाणे पण लौकर आला आणि लौकर गेला असा भासणारा हा मास.  ह्या आवडत्या फेब्रुवारी मासाचा,पळसाच्या सौंदर्याचे आणि प्रेमाच्या वसंतपंचमी चे काहीतरी अनोखे नाते मात्र असते.ह्या निमित्ताने मी मागेच केलेली एक रचना खालीलप्रमाणे…

सुरु आहे सध्या फेब्रुवारी मास,

प्रेमीजीवां साठी पर्वणी खास ,

आसमंतात दरवळे प्रेमाचा सुवास,

खरेच असेल प्रेम की निव्वळ आभास?।।।

 

काहीवेळा जाणवे विरहातही गहिरे प्रेम,

कधी उपभोगापेक्षा  त्यागातही भासे प्रेम,

कधी अंतरातील दूरी घालवे हे प्रेम,

स्वच्छ नजरेने अनुभवले तरच कळेल हे पारदर्शी प्रेम।

 

प्रेमात असे ताकद, प्रेमात अनोखी शक्ती,

न्यारी असे राधेची श्रीकृष्णावरील भक्ती,

ना चाले ह्यात कधीच कुणाची सक्ती,

खरचं प्रेम ही नितांतसुंदर अनुभूती ।।।

 

प्रेमात सगळंच आपलं असतं ,

तुझं माझं काही नसतं,

पाडगावकर म्हणालेच ना हे  सेम टू सेम असतं,

सगळ्यांचचं सेम टू सेम असतं ।।।।।

 

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ साठवणीतल्या आठवणी– ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘साठवणीतल्या आठवणी–’ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र असते आणि प्रत्येकाचं आयुष्य म्हणजे फक्त त्याचीच मालमत्ता असु शकते व त्यात कडू गोड आठवणींचा भरगच्च  खजिना असतो. कडू आठवणी मनाच्या तळाशी दाबल्या की मग वर येतो तो सुंदर आनंदी आठवणींचा    साठा. मग त्या आठवणींचा ठेवा दुसऱ्यांना वाटावासा वाटतो. अगदी तसंच झालं आहे माझं.   

महाशिवरात्र आली की वडीलधाऱ्यांच्या आठवणी उफाळून येतात. वडीलधारी काळाच्या पडद्याआड जातात आणि आपण पोरकं होतो. अकाली पोक्तपणा येतो.

प्रियकर आपल्या प्रेयसीला म्हणतो ‘तुझ्यापेक्षा मला तुझ्या आठवणीच जवळच्या वाटतात, कारण त्या सतत माझ्याजवळ राहतात.’ अशीच एक माझ्या आई -वडिलांची सुखद आठवण आठवली.

माझे मेव्हणे श्री. दत्तात्रय पंडित, पंजाबच्या गव्हर्नरांचे, श्री काकासाहेब गाडगीळ यांचे  P. A. होते. त्यांच्यामुळे पुणे ते चंदीगड अशा लांबच्या प्रवासाचा योग आला. त्यावेळी सोयीस्कर गाड्या नव्हत्या. प्रवासात दोन-चार दिवस जात असत.

माझे वडील ति. नाना, दत्तोपंत स. माजगावकर कट्टर शिवभक्त होते. रोज सोवळं नेसून त्यांनी केलेल्या पार्थिव पूजेचा सोहळा अवर्णनीय असायचा. दंडाला कपाळाला भस्माचे पट्टे लावून स्पष्ट मंत्रोच्चारांनी केलेल्या मंत्रध्वनीने शंखनिनादाने आमची प्रभात, सुप्रभात व्हायची. रोज महादेवाची सुबक पिंड तयार करून यथासांग पूजा करण्यावर त्यांचा कटाक्ष होता. 

तर काय सांगत होते! आमचा प्रवास सुरू झाला. पळणाऱ्या झाडांमधून सूर्याची सोनेरी किरणे आत आली तर कापराचा सुगंध नाकात शिरला. किलकीले डोळे विस्फारले गेले, कारण धावत्या गाडीत मांडी घालून प्रवासातही नेम न मोडता  नानांची पूजा चालू होती. शिवभक्त मंडळी सरळ मार्गी असतात. वाकडी वाट करून नेम मोडणं त्यांच्या तत्वात बसत नाही.

प्रवासातही आई -नाना पूजेच्या तयारीनिशी आले होते. नानांच्या पुण्यकर्माला आईची साथ होती. त्यावेळी लकडी पुलावर नदीकाठी काळीशार माती भरपूर असायची. आई अवघड लकडी पूल उतरून, नदी काठावरची काळी माती पिशवी भरून, खांद्यावरून आणायची. ती चाळणीने मऊशार चाळायची आणि देवघराच्या फडताळ्यात डब्यात भरून ठेवायची. देवाची तांब्याची उपकरणी लख्ख करण्याचं काम आम्हा मुलींकडे असायचं आणि त्याबद्दल आम्हांला बक्षीस काय मिळायचं माहित आहे? श्रीखंडाची गोळी. पण ती चघळतांना आमची ब्रह्मानंदी टाळी लागायची. आजकालची कॅडबरी पण त्याच्यापुढे नक्कीच फिक्की ठरेल.

तर त्या चंदीगड प्रवासात आईने काळ्या मातीचे बोचकंही बरोबर आठवणीने घेतलं होतं. आणि हो! काळीमाती भिजवायला पुरेसं घरचं पाणी फिरकीच्या तांब्यातून घ्यायला आई विसरली नव्हती. तेव्हा पितळीचे छान कडी असलेले तांबे प्रवासात सगळेजण वापरायचे. थर्मास चा शोध तेव्हां लागला नव्हता आणि प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटल्या तर अस्तित्वातच नव्हत्या.

ति. नानांनी महादेवाची पिंड इतकी सुबक, इतकी सुबक बनवली की, रेल्वेच्या जनरल बोगीतली लोकं महादेवाची पिंड बघायला गोळा झाले. पार्थिव पूजा, मंत्र जागर, उत्तर पूजा पण गाडीतच झाली. सगळ्यांना इतकी अपूर्वाई वाटली. नानांच्या भोवती ही गर्दी झाली.

त्यावेळी रेल्वे डब्याच्या खिडक्यांना गज नव्हते. इतकी गर्दी झाली की एका पंजाबी ‘टीसी’ नें ही बातमी स्टेशन मास्तरला पुरवली. प्लॅटफॉर्मवर नानांची पूजा बघायला हा घोळका झाला.

योगायोग असा की कुणालातरी जवळच असलेलं बेलाचं झाड दिसलं.. गाडी सुटायला अवकाश होता. वयस्करांनी तरुणांना पिटाळलं. पटापट गाडीतून माकडा सारख्या उड्या मारून पोरांनी बेलाची पाने तोडली. भाविकांनी पिंडीवर मनोभावे वाहिली. भाविकांच्या श्रद्धेने छोटीशी पिंड हां हां म्हणता बेलाच्या पानाने झाकली गेली. 

रेल्वे डब्यात आपण चहा नाश्ता करतो ना त्या छोटेखाली टेबलावर ही पूजा झाली होती. गाडीच्या त्या जनरल बोगीला मंदिराचं स्वरूप आलं होतं. असा आमचा एरवी कंटाळवाणा वाटणारा प्रवास मजेशीर झाला. नंतर तर लोक नानांच्याही आणि जोडीने  आईच्या पण पाया पडायला लागले.   आई नाना अवघडले, संकोचले. आम्ही मात्र तोंडावर हात ठेवून हा सोहळा बघतच राह्यलो. खरं सांगु, तेव्हा तर माझे आई-वडिल मला शंकर-पार्वतीच भासले.

तर मंडळी, अशी ही भावभक्तीने भारलेल्या शिवभक्ताची ही आठवण कथा.

शिवशंभो  महादेवा तुला त्रिवार दंडवत. 

माझी सासरेही महा पुण्यवान  शिवभक्त होते. कारण महाशिवरात्रीलाच ते जीवा शिवाच्या भेटीला गेले. अशा या थोर वडीलधाऱ्यांच्या पूर्वपुण्याई मुळेच आपण सुखात आहोत नाही कां?

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘मालती जोशी… आमच्या गुरू’ ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘मालती जोशी… आमच्या गुरू…’ ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

पूर्वी सत्यनारायण पूजा, सप्तशतीचा पाठ, लघुरुद्र, हे सर्व  पुरुष करत असत. 1975 साली थत्ते मामांनी स्त्रियांनी हे शिकायला हरकत नाही असा विचार मांडला. त्यावर बऱ्याच उलट सुलट प्रतिक्रिया उमटल्या. अर्थातच तेव्हाच्या समाज रचनेनुसार हे स्वाभाविक होते. तरीसुद्धा मामांनी उद्यान प्रसाद पुणे येथे खास स्त्रियांसाठी हे वर्ग सुरू केले.

स्वाभाविकच स्त्रियांचा प्रतिसाद अल्प होता. स्त्रियांच्या मनातील भीती, घरातून विरोध, वेळ कसा काढायचा, शिवाय संस्कृत भाषा…. इत्यादी अनेक अडचणी समोर दिसत होत्या. मात्र काही स्त्रियांना घरातून परवानगी मिळाली आणि त्या वर्गाला आल्या.

पहिली बॅच सुरू झाली. त्यात आमच्या गुरु मालती जोशी होत्या. सदाशिव पेठेत अनाथ विद्यार्थी गृहासमोर असलेले नरसिंहाचे देऊळ बाईंचे आहे.  त्या तिथेच राहत आहेत. मुळातच हुशार असल्याने त्या भराभर शिकत गेल्या.

थत्ते मामांनी सर्वांना प्रार्थने पासून सर्व  शिकवले. संसाराची  जबाबदारी सांभाळून हे सर्व तोंड पाठ करायचे होते. त्यासाठी अपार मेहनत घ्यावी लागली .

आठ दहा बायका हे शिकल्या.थत्ते मामांना अतिशय आनंद झाला. जोशीबाई अनेक वर्ष  थत्तेमामांबरोबर   पुजा पाठ करायला जात होत्या.

काही वर्षानंतर त्यांनी स्वतःचे वर्ग त्यांच्या घरी सुरू केले. अत्यंत अल्पशा फी मध्ये त्या  शिकवत असत.

बाईंचा एक अलिखित नियम होता..

की जे शिकवलं असेल ते पुढच्या वेळी म्हणून दाखवायचे .आम्ही 55 ते 60 वर्षाच्या होतो. खूप वर्षांनी पुस्तकं अभ्यासासाठी हातात घेतली होती. पाठ असलं तरी बाईंच्या समोर म्हणून  दाखवताना  चुका व्हायच्या.

बाई गप्पा मारायच्या, चहा करायच्या, लाडू खायला द्यायच्या पण पाठांतर केलेच पाहिजे हा त्यांचा आग्रह असायचा. कडक शिस्त असायची.चुकलं तर परत म्हणावे लागे.

बाईंची आम्हाला भिती वाटायची. नंतर त्यात गोडी वाटायला लागली. पाठांतराची सवय झाली….प्रेरणा द्यायला बाई होत्याच…

अनेक जणी बाईंच्या कडे शिकून तयार झाल्या . बाईंच्या बरोबर आम्ही पुण्यात आणि बाहेरगावी कार्यक्रम केले.  त्यातल्या काहीजणी आता इतरांना शिकवत आहेत.

महाशिवरात्रीच्या आधी  मृत्युंजयेश्वर मंदिरात आम्ही रुद्र म्हणायला जातो. गणेश जयंतीच्या उत्सवात एके दिवशी सारसबाग गणपती समोर ब्रह्मणस्पती म्हणायला जातो.  बाईंच्या बरोबर देवीच्या देवळात सप्तशतीचे पाठ  करायला जातो हे सर्व सेवा म्हणून करतो.हे  बाईंच्या मुळे शक्य झाले आहे.

आज शांतपणे घरी बसून श्री सूक्त, पुरुष सूक्त ,त्रिसुपर्ण, विष्णुसहस्त्रनाम, शीव महिम्न  म्हणताना   अपार आनंद होतो … बाईंनी आम्हाला हा बहुमूल्य ठेवा दिलेला आहे.

पन्नास वर्षांपूर्वी थत्ते मामांनी बायकांच्यावर विश्वास ठेवला. आणि  त्या पण हे करू शकतात हे सिद्ध करून दाखवले. आज त्यांची पण आठवण येत आहे. थत्ते मामांना माझा विनम्र नमस्कार.

त्यांनी लावलेले हे झाड आज बहरलेले आहे .आज अनेक स्त्रिया पौरोहित्य करत आहेत .

याचे श्रेय मामांना जाते.

खरं तर घरं संसार, मुलं बाळं, आला गेला ..हे सगळं सांभाळून बाईंनी हे शिकवायला सुरुवात केली हे किती विशेष वाटते.

शिवाय त्याचा कुठेही गर्व अभिमान नाही शांतपणे प्रेमाने त्या शिकवत  राहिल्या.

बाईंच्या 95 व्या वर्षाच्या वाढदिवसाच्या दिवशी 17 जानेवारीला आम्ही सर्वांनी परत एकदा बाईंचा घरी सगळ्यांनी जमुन  वर्ग भरवला .

स्तोत्र, अथर्वशीर्ष म्हंटले. बाई आमच्याबरोबर म्हणत होत्या.

शेवटी बाईंनी आशीर्वाद मंत्र म्हटला तेव्हा डोळे भरून आले होते. ..

अशा गुरू लाभल्या हे आमचे परमभाग्य.

त्या माझ्या बाईंना माझा त्रिवार साष्टांग नमस्कार.

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “भांडणाच बदलत रुप…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “भांडणाच बदलत रुप…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

घरात भांडण असत का? होत का? हा वेगळा प्रश्न आहे. भांडण नकोच. पण सध्याच्या धकाधकीच्या जीवनात भांडण झालं, तर त्याच स्वरूप सुध्दा बदललं आहे. याला कारण असणारा आणि मिळणारा वेळ.

आजकाल क्रिकेटच्या खेळात जसं टी २०, वन डे, किंवा टेस्ट मॅच असते. तसंच भांडणाचही झाल आहे.

क्रिकेट मॅच कशा वेगवेगळ्या कारणांनी असतात, अगदी एखाद्या स्थानिक नेत्याच्या वाढदिवसापासून वर्ल्ड कप पर्यंत. तसंच करावसं वाटलं, तर भांडणाला कोणतही कारण चालतं, पण वेळेचं बंधन मात्र असत. कारण दोघांनाही कामावर वेळेवर जायचं असतं.

देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय असे सामने असतात. तशीच भांडणाची कारणं सुध्दा घरगुती, आणि बाहेरची अशी असू शकतात.

आता कारण काय….. अगदी सकाळी दुध ऊतू गेल्यापासून रात्री बाथरुमचा लाईट तसाच राहिला या पर्यंत, किंवा जागा सोडून ठेवलेली टुथपेस्ट, शेव्हिंग क्रीम, व आंघोळीनंतर हाॅलमध्ये अस्ताव्यस्त पडलेल्या टाॅवेल पासून, रात्री पसरवून ठेवलेला पेपर. किंवा जागा दिसेल तिथे ठेवलेला रिमोट. किंवा वागण्यावरून, आपलं वय किती? मुलं मोठी झाली आहेत. चार लोकांत कसं राहिलं पाहिजे? या सारखं कोणतही, छोटं मोठ कारण पण चालतं. कारण कोणतं, आणि आपल्याला वेळ किती, यावर भांडण करायचं का? आणि कसं करायचं? हे ठरतं.

आणि वेळेनुसार हे भांडण टी २०, वन डे, किंवा टेस्ट मॅच सारखं स्वरूप धारण करतं.

सकाळचं भांडण हे टी २० सारखं असतं. थोडक्यात आटपायच. ती डबा करण्याच्या गडबडीत असेल तर माझ्या दृष्टीने तो पावर प्ले असतो. कारण पावर प्ले मध्ये जसं एका ठराविक कक्षेच्या आतच बरेच खेळाडू लागतात. तसंच या काळात ती स्वयंपाक घराच्या कक्षेतच असते. अगदी मनात आलं तरी ती वेळेअभावी स्वयंपाक घराच्या कक्षेबाहेर येत नाही. या काळात मी थोडी रिस्क घेऊन (तोंडाने) फटकेबाजी करुन घेतो. आणि तिची डब्याची तयारी झाली असेल, आणि मी दाढी करत असेल तर…… तर मात्र तिचा पावर प्ले असतो. कारण मी आरशासमोरच्या कक्षेत असतो. आणि ती मनसोक्त फटके मारण्याचा प्रयत्न करते, अगदी क्रिज सोडून बाहेर येत फटके मारतात, तस ती स्वयंपाक घर सोडून बाहेर येत फटकारते. आणि बऱ्याचदा यशस्वी पण होते‌.

संध्याकाळच असेल तर मात्र वन डे स्टाईल त्यातही डे नाईट असतं. म्हणजे वेळेनुसार संध्याकाळी सुरू झालेलं हे रात्री झोपण्याच्या वेळी पर्यंत चालतं. यात जेवणाच्या वेळी ब्रेक असतो. मग जेऊन ताजेतवाने होऊन परत आपला मोर्चा सांभाळतात.

पण विकेंड, किंवा त्याला जोडून सुट्टी आली तर मात्र ते टेस्ट मॅच सारखं लांबत जात. यात मग काही वेळा कोणीतरी वरचढ ठरल्यामुळे लिड सुध्दा घेतं, मग आपली पडती बाजू पाहून दुसऱ्याला सावध पवित्रा घेत मॅच निर्णायक होण्याऐवजी बरोबरीत सोडवण्याचा प्रयत्न होतो.

मॅचमध्ये जसे काही उत्साही प्रेक्षक वाजवण्याची साधनं आणतात आणि वाजवत बसतात. तसे प्रेक्षक प्रत्यक्ष भांडणाच्या वेळी नसले तरी आवाजाची भर मिळेल त्या साधनाने पूर्ण करतो. मग यात सोयीनुसार भांड्यांचा आवाज, कटाची दारं वाजवीपेक्षा जोरात लाऊन येणारा आवाज, पाॅलीशची डबी, किंवा ब्रश हे मुद्दाम पाडून केलेला आवाज, मी लावलेल्या रेडिओ चा आवाज यांनी ती थोडीफार भरून निघते.

मॅचमध्ये थर्ड अंपायर असतो. तो निरीक्षण करून कोणाच्या तरी एकाच्या बाजूने निर्णय देतो. पण या अशा आपल्या भांडणात मात्र असा अंपायर नसावा असं दोघांनाही वाटतं. (किती समजूतदार पणा…..)

अस आहे हे भांडणाच बदलतं रूप……

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ घटा घटाचे रूप आगळे… ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

डॉ. जयंत गुजराती

??

☆ घटा घटाचे रूप आगळे… ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

एकदा सकाळ सकाळीसच गोरटेली गोल गरगरीत बाई दवाखान्यात आली. प्रस्थ श्रीमंतांकडचं दिसत होतं. गळा दागिन्यांनी भरलेला. गळाच काय जिथे जिथे दागिने असायला हवेत तिथे तिथे ते विराजमान असलेले. आल्या आल्या ती सरळ वजन काट्यावरच उभी राहिली. वजनकाटा नव्वदच्या वर सरकला, तशी ती किंचाळलीच. “अग्गो बाई नव्वदच्या वर गेलं की हो! बरेच दिवस अठ्ठ्यांशीवर रोखून धरले होते. डॉक्टर काहीतरी करा, मला वजन कमी करायचेय, त्यासाठी मी तुमच्याकडे आलीय.”  मी तिला पुन्हा आपादमस्तक न्याहाळलं. मग सहजच बोललो, “यात दोन किलो वजन तुमच्या दागिन्यांचंच असेल.”  तिला नेमकं ते वर्मावर बोट ठेवल्यासारखं वाटलं. आपले दागिने ठीकठाक करत, टेबलावर ठेवलेली पर्स पुन्हा ताब्यात घेत समोर खुर्चीवर बसली पसरट फैलावून, व म्हणाली, “नाही हो डॉक्टर, माझं वजन इतकं काही नाहीये. आमच्या घरी कुणीही काट्यावर उभं राहिलं की काटा शंभरी पार जातो. सगळ्यांच्या तब्येती मस्त, हे एक वजनाचं सोडलं तर! ” मग तिने अख्ख्या खानदानाचा वजनी लेखाजोखाच मांडला. 

आता त्याचं (किंवा तिचं) असं होतं की ती पंजाबी होती. मेदस्वी असणं हे वंशपरंपरागत. त्यातही फॅमिली बिझनेस आलिशान दारूचं दुकान. सगळी उच्चकोटीची गिऱ्हाईकं. बिझनेस करता करता त्यांच्या बरोबर पिणं ही आलंच व आपसूक खाणंही. तेही प्रमाणाबाहेर. पुन्हा ते पंजाबी खाणं. मक्के की रोटी सरसों का साग, तेलतर्री व पनीरचा बोलबाला. शिवाय लस्सीचा मारा, मलई मार के. प्रकरण तसं गंभीरच होतं. म्हणजे वजन कमी करण्याबाबत. “मला हे सुटलेलं शरीर नकोसं झालंय. मी विशीत जशी शिडशिडीत होते तसं मला पुन्हा व्हायचंय.”  चाळिशीची असूनही नव्वदीला टेकलेल्या स्थूलदेहधारिणीने निक्षून सांगितले. 

“तुम्ही योग्य वेळी व योग्य ठिकाणी आलात. काळजी करू नका. मात्र तुमचा विशीतला एखादा फोटो असेल तर अवश्य दाखवा, म्हणजे शिडशिडीत असण्याची तुमची व्याख्या तरी कळेल!! ” असं मी म्हणताच तिने लागलीच मोबाईल काढून, दोन मिनिटे स्क्रोल करून एका सुंदर तरूणीचा फोटो मला दाखवला. कुणीही तिच्या प्रेमात पडावं असा!! मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना, तरीही विचारून घेतलं, “या तुम्हीच का?” यावर, “म्हणजे काय?” म्हणत, गोड लाजत तिने मान हलवली. आता आव्हान माझ्यापुढे होतं. गोल गरगरीत असण्यापेक्षा सुडौल असणं ही तिची प्रबळ इच्छा होती. वय फारसं उलटलेलं नव्हतं, तेव्हा तिला आश्वस्त करणं भाग होतं. तिची थोडक्यात हिस्ट्री घेतली तर तिने आयुष्याचा पटच रंगवला. नाशिक हे तिचं माहेर, इंदोर हे सासर. माहेराकडून मिळालेला वजनी वारसा सासरीही निभावला गेला. “खाना कंट्रोल ही नहीं होता हे पालुपद तिने कितीतरी वेळा उच्चारलेले. संयुक्त कुटुंबाचा गोतावळा, घरी पैपाहुण्यांचा राबता. खाणंपिणं याची रेलचेल. तरी “एवढ्यात पिणं मी कमी केलंय, वजन वाढत गेलं तसं, पण तेही थोडंफार सवयीचंच झालंय.” निर्विकारपणे तिने सांगितलं. “ ते अगोदर बंद करावं लागेल!” असं मी म्हटलं रे म्हटलं तिचा चेहेरा पडला. तरीही स्वतःला सावरत ती विशालकाय निश्चयाने उद्गारली, “ मैं कुछ भी करूंगी, मलाच हे ओझं सहन होत नाही. इतर तंदुरुस्त बायका पाहिल्या की माझा जळफळाट होतो, त्यांची डौलदार चाल, त्यांचे नखरे, फिगर मेंटेन केल्याचा अभिमान पाहून मी कष्टी होतेच होते. माझं वय काही फार नाही. इतक्या लवकर मी जाडगेलेसी कशी काय झाली याचं मलाच नवल वाटतं, तेव्हा इतर बायकांच्या बरोबरीने नव्हे पण त्यातल्यात्यात चांगलं दिसावं ही माझी तळमळ, मळमळ काय म्हणायचं असेल ते म्हणा, पण आहे.”  तिने तिचा न्यूनगंड उघड केला. सहानुभूती वाटावी अशीच तिची जटिल समस्या! खरंतर तिचा विशीतला फोटो डोळ्यासमोरून हलत नव्हता. तसं असलं तर कुणीही सहज स्टेटस म्हणून ठेवला असता मोबाईलमधे. सिनेतारकांपेक्षाही ती उजवीच होती तेव्हा. तेव्हा तिला पुनश्च तिचं वैभव मिळवून द्यायचं याचा विडा मी उचललाच! 

तिचा न्यूनगंड घालवणं आवश्यक होतं. मी म्हटलं, “देखो, गोल गरगरीत असणं हा काही गुन्हा नाही. राऊंड हाही एक शेपच आहे. त्यात बदल करणं एकदम सोपं नाही, तसेच अवघडही नाही. वेळ लागेल, काही तपासण्या, काही पथ्यपाणी, व्यायाम शिवाय औषधं याने तुम्ही बरंच काही मिळवू शकाल, आयमीन घालवू शकाल! तेव्हा काळजी करू नका. ” 

आतापर्यंत चेहेऱ्यावर ताण घेऊन बसलेली ती एकेकाळची सौंदर्यवती आता थोडीफार प्रफुल्लित दिसायला लागली. वजन कमी होऊ शकतं असं म्हणणारा जणू मीच पहिला भेटलो असावा या आविर्भावात तिने सांगितलं, “माझा नवरा सहा महिन्यांसाठी कॅनेडात गेलाय, तो परत यायला आठ महिनेही लागू शकतील. मुलं ही बोर्डिंग स्कुलला शिकतात. तेव्हा सर्वांना सरप्राईज द्यायचा माझा इरादा आहे. तुम्ही सांगाल ते पथ्यपाणी, गोळ्या औषधं सगळं करेन पण मला पुन्हा पूर्वीसारखं व्हायचंय! ”

एक डॉक्टर म्हणून मला तिच्या कटात सामील होण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. तिचा विशीतला फोटो नजरे समोर ठेऊन !! 

(४/३/२०२४ रोजी झालेल्या ‘ वर्ल्ड ओबेसिटी डे ‘ निमित्त.) 

© डॉ. जयंत गुजराती

नासिक

मो. ९८२२८५८९७५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सुरक्षा सप्ताह ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ मराठी चित्रपटांचा ‘दादा ‘ ☆ सौ कल्याणी केळकर बापट

14 मार्च !  विनोदी चित्रपटांतील बेताज बादशाह दादा कोंडके ह्यांचा स्मृतिदिन.

चित्रपट हे बहुतांश लोकांना आवडत असले तरी त्यामध्ये आवडीनिवडी ह्या भिन्न असतात. काहींना भावनाप्रधान चित्रपट आवडतात तर काहींना वास्तविकता असलेले. काहींना शांत संथ चित्रपट आवडतात तर काहींना दे दणादण हाणामारीचे, काहीं कथेला जास्त महत्त्व देतात  तर काहीं गाणे संगीत ह्यांना. तसचं काही लोक कलाकार बघून चित्रपट बघतात तर काही दिग्दर्शक बघून.

मात्र सगळ्यांना आवडतं असलेले चित्रपट कोणते तर एकमताने उत्तर येईल विनोदी चित्रपट. एकतर ह्या चित्रपटांनी मनावरचा ताण नाहीसा होतो,समजून घ्यायला फारशी बुद्धी वापरावी लागत नाही. अर्थातच विनोदी चित्रपटांमध्येही खूप विवीधता आढळते विनोद हा वेगवेगळ्या रसांनी दर्शविता येतो.

14 मार्च  ही   तारीख तर जणू नियतीने आपल्या कला साहित्य ह्या क्षेत्रावर चांगला घाला घालण्यासाठीच जणू राखीव ठेवली असावी. आजच्या तारखेला ज्ञानपीठ  पुरस्कार प्राप्त विंदा करंदीकर, मराठी गझलचे बादशहा सुरेश भट व वेगळ्या धर्तीच्या विनोदी चित्रपटाचे बादशहा दादा कोंडके ह्यांचा स्मृतीदिन.

दादा कोंडके हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. दादा म्हंटले की डोळ्यासमोर येते ती त्यांची लांब नाडा लोंबणारी हापपँन्ट,बंडीवजा ढगळा शर्ट, ती बावळट हसरी मुद्रा. आणि हाच अभिनय आणि वेषभूषा कठीण असूनही बाजी मात्र मारुन जायची. पांढरपेशा वर्गाला दादांच्या जरा अश्लीलते कडे झुकणा-या विनोदांनी त्यांच्या सिनेमांपासून दूरच ठेवले. पण खास आवडीवाल्या प्रेक्षकांनी त्यांना जे डोक्यावर उचलून घेतले त्यानेच त्यांची कारकीर्द यशस्वी करवली. द्विअर्थी विनोदाकडे झुकणारे संवाद, चित्रपटातल्या तारिकेशी पडद्यावरची नको तितकी घसट व ह्या सर्वामुळे सतत सेन्सॉर बोर्डाशी उडणारे खटके ह्यांनी त्यांच्या चित्रपटांना सतत निगेटिव्ह प्रसिद्धी मिळत राहिली.अर्थातच त्यांच्या खास  प्रेक्षकांना ह्या सर्वाशी काहीच देणे घेणे नव्हते. दादांचा प्रेक्षक वर्ग ठरलेला होता.

दूरदर्शन अस्तित्वात नसलेल्या काळात – दिवसभर घाम गाळून विरंगुळ्याच्या चार क्षणांसाठी सिनेमागृहात  शिट्या वाजवत खास चवीने चित्रपट बघत ,त्यावर  चर्चा करणारा वर्ग हा त्यांच्या चित्रपटांचा ‘मायबाप’ होता.

८ ऑगस्ट १९३२ ला जन्मलेल्या दादा कोंडकेंचे खरे नांव कृष्णा कोंडके होते. बॅंड पथकातून सुरुवात करून हळूहळू वगनाट्ये, नाटके ह्यांनी सुरुवात केलेल्या दादांचे चित्रपट जीवन मेहनतीने साकारले गेले. नाटकांच्या निमित्ताने केलेल्या राज्यभराच्या दौऱ्यांनी दादांना सर्वसामान्यांसाठी करमणुकीचे महत्त्व व कोसा-कोसांवर बदलत जाणारी रसिकता कळली व हेच पुढे त्यांच्या यशाचे गमक सिद्ध झाले.मिलमजुराच्या घरात जन्मलेले मूल ते दादांच चित्रपट क्षेत्रातील योगदान हा प्रवास थक्क करणारा होता.

कलेची सेवा बॅंड पथकाच्या मार्फत करणाऱ्या दादांनी मग ‘सेवा दलात’ प्रवेश केला. तेथून सांस्कृतिक कार्यक्रम व नंतर नाटके असा त्यांचा प्रवास सुरू झाला. दादा कोंडके यांनी ’दादा कोंडके आणि पार्टी’’ नावाचे एक कला पथकही काढले. प्रख्यात लेखक वसंत सबनिसांशी ते ह्याच संदर्भातून जोडले गेले. स्वतःची नाटक कंपनी उघडून त्यांनी वसंत सबनिसांना नाटकासाठी लेखन करावयास विनंती केली. तोवर वसंत सबनिसांना त्यांच्या “खणखणपूरचा राजा” ह्या नाटकातल्या भूमिकेने प्रभावित केलेलेच होते. हसरे व खेळकर व्यक्तिमत्त्व लाभलेल्या दादा कोंडकेंसाठी सबनिसांनी मदतीचा हात पुढे केला. सबनिसांनी लिहिलेल्या “विच्छा माझी पुरी करा” ह्या नाटकाने दादांना सुपरस्टार रंगकर्मी बनवले. १५०० च्या वर प्रयोग झालेल्या ह्या नाटकामुळे दादांना भालजींच्या चित्रपटात काम करण्याची संधी प्राप्त झाली. आशा भोसले ‘विच्छा माझी पुरी करा ह्या नाटकाचा ‘  मुंबईतला एकही प्रयोग सोडीत नसत. त्यांनीच दादांना भालजींकडे पाठवले. दादांचे शब्दोच्चार एके ५६ रायफलमधून सुटणाऱ्या गोळ्यांसारखे सुसाट असायचे, पण नेमक्या ठिकाणी द्विअर्थी शब्द वापरून मग जरासा पॉज घेतल्याने प्रेक्षक अख्खे थिएटर (मग ते नाटकाचे असो की सिनेमाचे) डोक्यावर घ्यायचे.

…१९६९ साली भालजी पेंढारकरांच्या “तांबडी माती” ह्या चित्रपटातून पदार्पण केलेल्या दादांनी मग मागे वळून बघितले नाही. तांबडी माती पाठोपाठ आलेल्या “सोंगाड्या ” ने दादांचे आयुष्य बदलून टाकले. ‘सोंगाड्या’ ही त्यांची प्रथम निर्मिती. वसंत सबनिसांनी लिहिलेल्या ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन गोविंद कुळकर्णींनी केले होते. बॉक्स ऑफिस वर सुपर डुपर हिट ठरलेल्या ह्या चित्रपटानंतर एकामागोमाग एक हिट चित्रपटांची लाईन लावून दिली. स्वतःच्या “कामाक्षी प्रॉडक्शन” ह्या चित्रपट निर्मिती कंपनीतर्फे १६ चित्रपट प्रकाशित करणाऱ्या दादांनी ४ हिंदी व १ गुजराती चित्रपट प्रदर्शित केले.

त्यांचे गाजलेले चित्रपट पुढीलप्रमाणे ,एकटा जीव सदाशिव, आंधळा मारतो डोळा,  पांडू हवालदार,  तुमचं आमचं जमलं,  राम राम गंगाराम, बोटं लावीन तेथे गुदगुल्या,  ह्योच नवरा पाहिजे, आली अंगावर,  मुका घ्या मुका, पळवा पळवी, येऊ का घरात व सासरचे धोतर. हे चित्रपट त्यांच्या कामाक्षी प्रॉडक्शन ने प्रकाशित केले.

…एखाद्याला आपलं मानलं की मग पूर्ण विश्वास त्याच्यावर कसा टाकावा हे दादांकडून शिकावे.त्यामुळेच कामाक्षी प्रॉडक्शनची टीम वर्षानुवर्षे कायम राहिली.त्यात उषा चव्हाण ही अभिनेत्री, राम लक्ष्मण ह्यांचे संगीत, महेंद्र कपूर व उषा मंगेशकर – पार्श्वगायनासाठी तर ‘बाळ मोहिते’ प्रमुख दिग्दर्शन साहाय्यक ही माणसं वर्षोनुवर्षे जुळल्या गेली होती.

लागोपाठ ९ मराठी चित्रपटांच्या रौप्यमहोत्सवी आठवड्यांचे ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ त्यांनी केले.

त्यांचे हिंदी चित्रपट पुढीलप्रमाणे, तेरे मेरे बीच में ; अंधेरी रात में दिया तेरे हात में , खोल दे मेरी जुबान , आगे की सोच .

सोंगाड्या चित्रपटात त्यांनी नाम्याची भूमिका केली व तीच त्यांच्या जीवनाचा ‘टर्निंग पॉंईंट’ ठरला. नाम्या कलावतीच्या तमाशाला जातो व त्याला तमाशाची चटक लागते हे त्याच्या ‘आये’ ला आवडत नाही. ती त्याला घराबाहेर काढते व तो कलावतीच्या आश्रयाला जातो व तेथे तो तमाशात नावांरूपाला येतो असे हे कथानक आहे. ह्या भोळ्या ‘नाम्या’ ने दादांना एका रात्रीत यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले.

१९७२ साली ‘एकटा जीव सदाशिव’ प्रदर्शित झाला. या चित्रपटाचा बोलबाला इतका झाला होता, की खुद्द राज कपूरने ऋषीकपूर ला  लॉंच करताना चित्रपटाची तारीख पुढे ढकलली, आणि ‘बॉबी’ पाच महिने उशिरा प्रदर्शित झाला. असे म्हणतात की बॉबी प्रदर्शित करताना राज कपूरला सिनेमागृहांना ‘एकटा जीव सदाशिव’ उतरवण्याची विनंती करायला लागली होती. बॉबी गाजलाच, पण त्यामागोमाग आलेल्या ‘आंधळा मारतो डोळा’ने लाईम-लाईट पुन्हा दादा कोंडकेंवर आणला.

१९७५ मध्ये पांडू हवालदारच्या रुपात दादा पुन्हा पडद्यावर आले. ‘पांडू हवालदार’मध्ये दादांनी ‘अशोक सराफ’ या उमद्या कलावंताला संधी दिली. यातूनच दादांची दूरदृष्टी दिसून येते.

परत एकदा करंदीकर, सुरेश भट व दादा कोंडके  ह्या कला,साहित्य क्षेत्रातील उत्तुंग कामगिरी करणा-या ह्या कोहिनूर हि-यांना विनम्र आदरांजली.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ तात्या गेले… – लेखक : आचार्य अत्रे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? इंद्रधनुष्य ? 

☆ तात्या गेले… – लेखक : आचार्य अत्रे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

(स्वातंत्र्यवीरांच्या चोपन्नाव्या पुण्यतिथीनिमित्त ) 

अखेर आज तात्या गेले ; आमचे तात्या सावरकर गेले ! मृत्यूशी जवळ जवळ ऐंशी दिवस प्राणपणाने झुंज देतां देतां शेवटी तात्या कामास आले. मृत्यूची अन तात्यांची झुंज गेली साठ वर्षे चाललेली होती. दहा साली तात्यांनी आपले मृत्यूपत्र लिहिले, तेव्हां त्यांनी स्पष्टच सांगितले की ,

                                 की, घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने

                                 लब्ध प्रकाश इतिहास – निसर्ग माने,

                                 जे दिव्य, दाहक म्हणून असावयाचे,

                                 बुध्याची वाण धरिले करी  हे सतीचे !

तात्या सावरकर कोण आहेत हे पुष्कळांना माहीत नाही. तात्या हे कवि आहेत, कादंबरीकार आहेत, नाटककार आहेत, लघुकथाकार आहेत. निबंधकार आहेत. मराठी प्रमाणे इंग्रजी भाषा त्यांच्या पायाचे तीर्थ घेते. त्यांच्या लेखनाचे एकंदर आठ खंड असून त्यांची साडेपांच हजार पाने होतात. मराठी भाषेत विपुल लेखन करणारे पुष्कळ लेखक होऊन गेले आहेत. हरि नारायण आपटे, विठ्ठल सीताराम गुर्जर, नाथ माधव इत्यादी. पण तात्या सावरकरांएवढे प्रचंड लेखन करणारा एकही लेखक मराठी भाषेत आजपर्यंत होऊन गेलेला नाही. तात्यांची गम्मत ही कीं ते नुसते क्रांतीकारक नव्हते,ते केवळ कवी आणि कादंबरीकार नव्हते . ते निबंधकार आणि नाटककार नव्हते. ते भारतीय इतिहासांतील एक चमत्कार होते. इंग्रजांनी हा देश जिंकून निःशस्त्र केल्यानंतर पौरुष्याची नि पराक्रमाची राखरांगोळी झाली. ती राख पुन्हा पेटवून तिच्यातून स्वातंत्र्य प्रीतीचा आणि देशभक्तीचा अंगार ज्यांनी बाहेर भडकविला , त्या ज्वलजहाल क्रांतिकारकांचे वीर सावरकर हे नि:संशय कुल पुरुष आहेत. भारतीय शौर्याचा आणि पराक्रमाचा तेजस्वी वारसा घेऊन सावरकर जन्माला आले.इतिहासाच्या धगधगत्या कुंडामधून त्यांचा पिंड आणि प्रद्न्य तावून सुलाखून निघाली.

सत्तावनच्या स्वातंत्र्यसमराची धग देशातून नष्ट झालेली नव्हती. किंबहूना वासुदेव बळवंत फडक्यांच्या आत्मयज्ञाच्या वातावरणामध्येच सावरकरांचा जन्म झाला. चाफेकर बंधूनी दोन जुलमी इंग्रज अधिकाऱ्यांचे क्रांतिदेवतेच्या चरणी बलिदान केले. त्यांच्या प्राणज्योतीने चेतविलेलें यज्ञकूंड भडकवीत ठेवणे हे आपले कर्तव्य आहे असा सावरकरांना साक्षात्कार झाला. घरातल्या अष्टभुज्या देवीपुढे त्यांनी शपथ घेतली कीं, ” देशाचे स्वातंत्र्य परत मिळवण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मी मरता मरता मरतो झुंजेन !” वयाच्या चौदाव्या वर्षी मृत्यूला आव्हान देण्याची प्रतिज्ञा सावरकरांनी केली, आणि ती विलक्षण रीतीने खरी करून दाखविली. सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने जाण्याची केवळ प्रतिज्ञा करूनच सावरकर स्वस्थ बसले नाहीत तर त्यासाठी त्यांनी क्रांतिकारकांच्या गुप्तमंडळाची  स्थापना करून श्री शिवजयंतीच्या आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने क्रांतिकारकांची त्यांनी संघटना निर्माण केली. अग्निरसाच्या कारंज्याप्रमाणे स्वातंत्र्याची pज्वलज्जहाल काव्ये सावरकरांच्या अलौकिक प्रतिभेमधून उचंबळू लागली. स्वातंत्र्यलक्षुमीला ‘ अधिरुधिराचे स्नान घातल्यावाचून ती प्रसन्न होणार नाही ह्या मंत्राची जाहीर दीक्षा देशातील तरुणांना देऊन सशस्त्र क्रांतीची मुहूर्तमेढ सावरकरांनी ह्या शतकाच्या प्रारंभी रोवली ही गोष्ट महाराष्ट्र विसरू शकत नाही ! सात सालच्या अखेरीपासून देशांत बाॅम्बचे आणि पिस्तूलाचे आवाज ऐकू यावयाला लागले. बाॅम्बचे पहीले दोन बळी आठ सालच्या प्रारंभी खुदिराम बोस ह्या अठरा वर्ष्यांच्या क्रांतिकारक तरूणाने मुझफरपूर येथे घेऊन सशस्त्र क्रांतीचा मुहूर्त केला. सत्तावनी क्रांतीयुद्धात अमर झालेल्या हुतात्म्यांची शपथ घालून सावरकरांनी भारतामधल्या क्रांतीकारकांना त्यावेळी बजावले की , ‘ १० मे १८५७ रोजी सुरु झालेला संग्राम अद्याप संपलेला नाही. सौंदर्य संपन्न भारताच्या डोक्यावर विजयाचा देदीपयमान मुगुट जेव्हां चढेल, तेंव्हाच हा स्वातंत्र्य संग्राम संपेल. ! ‘ अश्या रीतीने वयाच्या अवघ्या पंचविसाव्या वर्षी सावरकर हे भारतातल्या सशस्त्र क्रांतीचे सूत्रधार बनले. आठ सालच्या जुलै महिन्यात लोकमान्य टिळकांना सहा वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा झाली. त्यानंतर विलायतेमधील भारत मंत्र्यांचे सहाय्यक सर कर्झन वायली ह्यांना एका मेजवानीच्या प्रसंगी मदनलाल धिंग्रा ह्या पंचवीस वर्षांच्या तरुणाने गोळ्या घालून ठार केले. नाशिकचे कलेक्टर जॅक्सन ह्यांना भर नाटक गृहांत अनंत कान्हेरे नि त्याचे दोन सहकारी ह्यांनी गोळ्या घालून ठार केले. त्यानंतर लंडनमध्ये आपले क्रांतिकार्य निर्वेधपणे करणे सावरकरांना शक्यंच नव्हते.

अडीच  महिन्यानंतर त्यांना पकडून ‘ मोरिया ‘ बोटीतून स्वदेशी पाठविण्यात आले असताना त्यांनी मार्सेल्स बंदरात एका पहाटे पोलिसांचा पहारा चुकवून बोटींमधून समुद्रांत उडी मारली. ही उडी म्हणजे वीर सावरकरांच्या पराक्रमाचा सुवर्ण कळसच होय. ही त्यांची उडी त्रीखंडात गाजली. त्यानंतर ब्रिटिश सरकारने सावरकरांवर खटला भरून त्यांना दोन जन्मठेपेच्या शिक्षा दिल्या. त्यावेळी सावरकर अवघे अठ्ठावीस वर्षांचे होते. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाला आंतरराष्ट्रीय स्वरूप देणारे सावरकर हे पहिले क्रांतिकारक होते. म्हणूनच ‘ भारतीय क्रांतिकारकांचे मुकुटमणी ‘ असे त्यांना म्हटले जाते. क्रांतिकारक सावरकरांचे अवतारकार्य येथे समाप्त झाले. पहिल्या महायुद्धाच्या वेळी जर सावरकर युरोपमध्ये मोकळे असते, तर ” आझाद हिंद “चा झेंडा त्यांनी सुभाषबाबूंच्या आधी तेथे फडकविला असता ह्यात काय संशय ? म्हणून आम्ही म्हणतो की भारताच्या सशस्त्र क्रांतीचा सावरकर हे ‘ पाया ‘ आणि सुभाषचंद्र हे ‘ कळस ‘ आहेत ! भारतात गेल्या दीडशे वर्षात अनेक क्रांतिकारक होऊन गेले. पण स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखा क्रांतिकारक आजपर्यंत केवळ भारतातंच नव्हें , पण जगात झालेला नाही. वीर सावरकरांनी हजारो पाने लिहिली. उत्कृष्ट लिहिली. तुरुंगामध्ये दहा हजार ओळी तोंडपाठ करून एका आचाऱ्याच्या मार्फत त्या भारतात पाठवल्या.

मानवी जीवनात असा एकही विषय नाही, ज्यावर सावरकरांनी लिहिलेले नाही. त्र्याऐंशी वर्षांचे जीवन ते जगले. त्यांना आता जीवनांत रस म्हणून राहिला नाही. आत्मार्पण करण्याचे विचार त्यांच्या मनांत येऊ लागले. आजपर्यंत महापुरुषांनी आणि साधुसंतांनी जे केले त्याच मार्गाने जाण्याचा त्यांनी निर्धार केला. कुमारील भट्टाने अग्निदिव्य केले. आद्य शंकराचार्यांनी गुहाप्रवेश केला. वैष्णवाचार्य गौरांग प्रभूंनी जगन्नाथपुरीच्या शामल सागरांत ‘ हे कृष्ण, हे श्याम ‘ असा आक्रोश करीत प्रवेश करून जलसमाधी घेतली. ज्ञानेश्वरांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी आळंदीला समाधी घेतली. समर्थ रामदासांनी शिवरायांच्या मृत्यूनंतर अन्नत्याग करून रामनामाच्या गजरात आत्मार्पण केले. एकनाथांनी गंगेमध्ये समाधी घेतली.

तुकोबा  ‘ आम्ही जातो आमच्या गावा ! आमुचा रामराम घ्यावा ! ‘ असे म्हणत वैकूंठाला गेले. त्याच प्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांनी प्रायोपवेशन करून आत्मार्पंण करविण्याचे ठरविले. कारण, त्यांना ह्या आयुष्यांत इतिकर्तव्य म्हणून कांहीच उरले नाही.

                                 धन्यो ऽ हम । धन्यो ऽ हम ।

                                 कर्तव्यं मे न विद्यते किंचीत

                                 धन्यो ऽ हम । धन्यो ऽ हम ।

                                 प्राप्तव्यम सर्वमद्य संपन्नम

लेखक :   आचार्य अत्रे.

दैनिक मराठा : दिनांक २७ मार्च १९६६.

प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ टिंकूकाका आणि काकू – लेखक : डॉ. श्यामराव महाजन ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ टिंकूकाका आणि काकू – लेखक : डॉ. श्यामराव महाजन ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय

“बाहेर घाटपांडे आले आहेत,” कंपाउंडरने वर्दी दिली.

घाटपांडे म्हणजे शेजारच्या बिल्डिंगमधलं वृद्ध कपल.

गेली 10-12वर्षे त्यांची दोन्ही मुलं आपल्या बायकामुलांसह अमेरिकेत राहतात.

इथे प्रशस्त घरी म्हातारा म्हातारी दोघेच. अधूनमधून दोघेही तिकडे जाऊन येतात, Skype वर रोज गप्पाही होतात.

पण म्हाता-यांचा जीव मुलांना मिठीत घेण्यासाठी, नातवंडांना मांडीवर घेऊन चिऊकाऊचे घास भरवण्यासाठी तहानलेला असतो.

मग डोकेदुखी, चिडचिड, छातीत धडधड, चक्कर असे नसलेले आजार घेऊन दवाखान्यात यांची नियमाने भेट असते.

पण दोन तीन महिन्यात त्यांची फेरी झाली नव्हती. दार उघडून दोघेही आत आले अन् मी तोंड वासून पाहतच राहिलो. अंगभर पदर घेऊन चापूनचोपून साडी नेसण्या-या काकू आज चक्क ट्रँकपँट आणि टी शर्ट मधे! काकाही तसेच.

“तोंड मिटा डॉक्टर, मी तुमची घाटपांडे काकूच आहे. डायरेक्ट जॉगिंग करून येतोय म्हणून हा ड्रेस.”

“वा! व्यायाम सुरू केला वाटतं ? “

गेले कितीतरी दिवस ‘Morning walk ला जात जा, नाना नानी पार्क मध्ये जा’, म्हणून मी यांच्या मागे लागलो होतो आता यांनी मनावर घेतलेलं दिसतंय. दोघांच्याही चेह-यावर, डोळ्यांमधे तजेला दिसत होता. फरक निश्चित होता.

“नाना नानी पार्क चांगलंच मानवलेलं दिसतंय तुम्हाला.” मी म्हटलं

“कसलं नाना नानी पार्क? जेमतेम आठ दिवस गेलो आम्ही तिथं. आता शेजारच्या मैदानात जातो आम्ही morning walk साठी.

तिथेच हा ‘टिंकू’ धडपडला. पायाला खरचटलंय थोडं , काही injection वगैरे लागतंय का बघा जरा.”

“कुठे आहे टिंकू?” मी विचारलं.

कुणीतरी गुदगुल्या करीत असल्यासारखे घाटपांडे हसायला लागले.

“आजकाल ही मला टिंकू च म्हणते. माझं शाळेपासूनचं टोपणनाव! “

या वेळी माझे वासलेले तोंड बंद करायला मला बरेच परिश्रम पडले. त्र्यंबकराव घाटपांडेंना काकूनी कधी नावानेसुद्धा हाक मारली नसेल अन् आज एकदम टिंकू?

“याला गेली चाळीस वर्षे मी अहो, अहो ऐकलंत का? म्हणून हाक मारायची. याचचं उत्तर एकतर गुरकावणं किंवा खेकसणं ! वाघ म्हणाले तरी खातो, वाघोबा म्हणाले तरी खातो. मग सरळ एक दिवस याला टिंकू म्हणायला लागले.”

“मलाही मस्त वाटतं , पुन्हा शाळेत गेल्या सारखं! “

काकांच्या जखमेवर मलमपट्टी करता करता मी विचारलं “पण नाना नानी पार्क का बंद केलंत? “

“वाटलं होतं, तिथे सारे समवयस्क भेटतील, छान गप्पागोष्टी, हास्यविनोद, आध्यात्मिक चर्चा होतील. पण कसचं काय! माझं दुःख तुझ्यापेक्षा कसं जास्त आहे, हे सांगण्याची चढाओढ असते तिथे. आपली दुःख कुरवाळत बसण्यातच त्यांना आनंद असतो. तिथून निघाल्यावर जास्तीच depress झाल्यासारखं वाटायचं.. “

“हो ना, “काकू म्हणाल्या, “म्हणून एक दिवस तिकडे जायचं बंद केलं . संध्याकाळी हे जॉगिंगचे कपडे आणले आणि सकाळपासून शेजारच्या मैदानात जायला लागलो morning walk साठी. तिथे तरुणाईचा नुसता बगिचा फुललेला असतो. सुरवातीला साडीऐवजी हा ड्रेस घालायला जरा अवघड वाटलं , पण आता सवय झाली. “

“आणि तिथं फिरण्यात, त्या पोरांशी गप्पा मारण्यात 2-3तास कसे गेले कळतच नाही. “

तरुण पोरांशी 2-3तास गप्पा! हे जरा आश्चर्यकारकच वाटलं. घरोघरी तरुण पोरं वृद्धांशी कशी वागतात, बोलतात हे मी पाहतोच आहे.     म्हाता-यांजवळ बसून गप्पा मारायला कुणाकडे वेळही नसतो आणि कुणी उत्सुकही नसतो.

“पण ती पोरं बरी गप्पा मारतात तुमच्याशी? “

“अहो हा मोबाईल! “

“म्हणजे? “

“हा स्मार्ट फोन म्हणजे आजकाल प्रत्येकाचा जिवाभावाचा अन् आवडता दोस्त आहे. आणि आमच्याकडे तर मुलांनी पाठवलेला latest फोन आहे. आम्हाला येतं तरी गेल्या दोन महिन्यांत 15-20जणांकडून selfie काढायला, what’s app वर मेसेज पाठवायला शिकलो आम्ही. मग ती पोरंही उत्साहाने मदत करतात. त्यातूनच ओळख होते. “

मोबाईलचा हा उपयोग माझ्यासाठी नवीनच होता.

“त्यांच्या पळण्याचं , स्टँमिनाचं , sports shoesचं कौतुक करतो. पोर खूश असतात. “

“आणि हो, आम्ही दोघांनीही एक पथ्य पाळलंय, त्यांची एखादी गोष्ट आवडली नाही तरी नाकं मुरडायची नाहीत, नावं ठेवायची नाहीत आणि विचारल्याशिवाय कुणालाही सल्ला द्यायचा नाही. “

“वा! छान! “मी आपलं काही तरी बोलायचं म्हणून बोललो. “पण या मुलांशी गप्पा तरी काय मारता? “

“काहीही. पण विशेषतः आमच्या वेळचं कॉलेज, फुटबॉल, क्रिकेट गाणी. रोज त्या serials सोडून Sports Channels बघतो. “

“अजूनही ही कधीकधी धोनीला गोलकीपर म्हणते किंवा मेस्सीला off side ऐवजी run out म्हणते. पण पोरं तेही enjoy करतात.”

“या पोरांना नवीन गाण्यांबरोबर आपल्या वेळची जुनी गाणीदेखील तेवढीच आवडतात. “

“आता आमचा 10-12जणांचा W.A.चा ग्रुपही झाला आहे. पोर नवीन नवीन vdo गाणी, jokes पाठवत असतात. मजा येते. “

“गेल्या आठवड्यात हिच्या वाढदिवसाला पोरं केक घेऊन आली होती! अंताक्षरी, दमशिराज, जेवण, मस्त मजा आली! “

“हो, आणि दुस-या दिवशी यांच्या बहिणीचा फोनही आला, ‘काय चाललय तुझं? या वयात मुलांबरोबर पार्ट्या करणं शोभतं का तुला? आपल्या वयाचा तरी विचार करायचा!’ पण मी चक्क दुर्लक्ष केलं . आता स्वतःला आनंद मिळवण्यासाठी आणखी कुठल्या वयाची वाट बघायची? टिंकूचाही मला पूर्ण support आहे. “

“हो ना! आता हे फिरणं, गप्पागोष्टी, देवपूजा, मेडिटेशन, sports, whats app या मधे वेळ कसा गेला समजतच नाही. रात्री शांत झोप लागते. आमच्या B.P.च्या गोळी खेरीज गेल्या दोन महिन्यात दुसरी गोळीही घ्यावी लागली नाही. इतके दिवस आम्ही दुस-यांना बदलण्याचा प्रयत्न करत होतो. पण या वयात स्वतःला बदलण्याची, जीवनात आनंद मिळवण्याची बुद्धी दिली, म्हणून मी देवाचा अत्यंत आभारी आहे. “

काही क्षण मी दोघांकडे नुसताच पहात राहिलो अन् मग न रहावून दवाखान्यातल्या सर्व पेशंट समोर मी टिंकूकाका आणि काकूना पायाला हात लावून नमस्कार केला.

लेखक :डॉ. श्यामराज महाजन

प्रस्तुती : श्रीमती प्रफुल्ला शेणॉय

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ माझ्या मातीचे गायन… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

☆ माझ्या मातीचे गायन… ☆ श्री विश्वास देशपांडे

काल पेपर वाचत असताना एका लेखाने माझे लक्ष वेधून घेतले. दै. पुण्यनगरीत आलेल्या या लेखाचे शीर्षक होते ‘ इस्रायल हृदयात; पण मराठी रक्तात .’ हा लेख चंद्रशेखर बर्वे यांचा आहे. या लेखात त्यांनी सुरुवातीला असे म्हटले आहे की मराठीला संजीवनी देणारे दोन निर्णय जागतिक पातळीवर घेण्यात आले आहेत. पहिला महत्वाचा निर्णय घेतला तो महाराष्ट्र सरकारने. दहावीपर्यंत मराठी सक्तीची करून. आणि दुसरा निर्णय घेतला गेला तो इस्रायलमध्ये. मराठी भाषा आपल्या व्यवहारात सदैव राहावी याची काळजी महाराष्ट्रापेक्षा जास्त बेने इस्रायल यांना वाटते.

खरं म्हणजे या बातमीवर माझा विश्वास बसला नाही. पेपरमध्ये काहीतरी चुकीचे छापले गेले असावे किंवा वाचताना आपलीच काहीतरी चूक होत असावी असे मला वाटले. पण मग मी काळजीपूर्वक तो लेख वाचत गेलो. आणि जसजसा तो लेख वाचत गेलो, तसतसा आपण भारतीय असल्याचा, त्यातही महाराष्ट्रीयन असल्याचा आणि आपली मातृभाषा मराठी असल्याचा अभिमान वाटला . तो आनंद तुमच्यासोबत वाटून घ्यावा म्हणून या लेखाचे प्रयोजन.

इस्रायल हे एक चिमुकले राष्ट्र. पण राष्ट्रभक्ती, शौर्य, जाज्वल्य देशाभिमान इथल्या लोकांच्या नसानसात भिनलेला. तसा या राष्ट्राला चार साडेचार हजार वर्षांचा इतिहास आहे. पण दुसऱ्या महायुद्धानंतर १९४८ मध्ये इस्रायल स्वतंत्र देश म्हणून खऱ्या अर्थाने आकारास आला. जगाच्या पाठीवरील हा एकमेव ज्यू लोकांचा देश. जेरुसलेम ही या देशाची राजधानी. ज्यू, ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मीयांसाठी सुद्धा पवित्र असे हे ठिकाण. होली लँड . या देशातल्या लोकांनी वंशविच्छेदाच्या आणि नरसंहाराच्या भयानक कळा सोसल्या. वंशाने किंवा जन्माने ज्यू म्हणजेच यहुदी असणे हाच काय तो एकमेव या लोकांचा अपराध. इंग्लंड, जर्मनी आणि अरब राष्ट्रांनी या लोकांची ना घरका ना घाटका अशी स्थिती केली होती. डेव्हिड बेन गुरियन या बुद्धिमान, लढवय्या आणि दूरदृष्टी नेत्यामुळे हा भूभाग एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून अभिमानाने उभा राहिला

यानंतर जगभरातून हजारो ज्यू आपल्या देशात म्हणजे इस्रायलमध्ये परतू लागले. भारतातून इस्रायलमध्ये परतणाऱ्यांची संख्या लक्षणीय होती. भारतातून कोचीन, कलकत्ता, गुजरात आदी ठिकाणांहून हे लोक परतले. त्यातही सर्वाधिक संख्या आहे ती महाराष्ट्रातून गेलेल्या लोकांची. या लोकांना तिकडे जाऊन आता जवळपास सात दशके झाली. पण मराठी मातीशी असलेली त्यांची नाळ तुटली नाही. मराठी संस्कृती आणि भारतीय संस्कृती या लोकांनी टिकवून ठेवली आहे. महाराष्ट्रीयन आणि भारतीय खाद्यपदार्थ त्यांच्या रोजच्या जेवणात असतात. महिला साडी नेसतात. जे महाराष्ट्रातून तिकडे गेले आहेत, त्यांच्या घरात मराठी बोलली जाते. ‘ मायबोली ‘ नावाचे मराठी मासिक तेथे गेल्या ३५ वर्षांपासून चालवले जात आहे. तेथील मुलांचे शिक्षण हिब्रू भाषेत होत असल्याने ते हिब्रू भाषा चांगल्या प्रकारे लिहू, वाचू आणि बोलू शकतात. मराठी बोलणे आणि वाचणे त्यांना कठीण जाते. म्हणून या मासिकात हिब्रू भाषेतील सुद्धा काही साहित्य अंतर्भूत करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. याचा उद्देश हा की हिब्रू वाचता वाचता त्या मुलांचे लक्ष मराठीकडे जावे. मराठी साहित्याचे त्यांनी वाचन करावे, मराठीची गोडी त्यांच्यात निर्माण व्हावी.

५० च्या दशकात तेथे गेलेल्या काही ज्यूंनी तेथे चांगली वागणूक मिळत नसल्याने भारतात परत येण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा तत्कालीन पंतप्रधान पं नेहरूंनी लगेच विमान पाठवून शेकडो ज्यूंना भारतात परत आणले. हे लोक आज भारतीय संस्कृतीचा एक भाग झाले आहेत. त्यांची आडनांवेही अस्सल भारतीय आहेत. त्यांचं हे भारतावरचं प्रेम आणि भारतीय संस्कृतीशी असलेली नाळ कदापिही तुटणे शक्य नाही. सिनेगॉग हे त्यांचे प्रार्थनास्थळ. दिल्लीतील सिनेगॉगचे धर्मगुरू इझिकल इसहाक मळेकर म्हणतात. ” इस्रायल आमच्या हृदयात आहे ; पण मराठी आमच्या रक्तात आहे. या जगाच्या पाठीवर भारतासारखा दुसरा देश नाही. सहनशीलता, वसुधैव कुटुंबकम , अतिथी देवो भव आणि विश्वची माझे घर असं मानणारा कोणता देश या पृथ्वीतलावर असेल तर तो फक्त भारत होय. ” ( संदर्भ दै पुण्यनगरी दि २/३/२०२० )

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares