मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कुसुमाग्रज आणि ज्ञानपीठ पुरस्कार.. ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ कुसुमाग्रज आणि ज्ञानपीठ पुरस्कार… ☆ श्री सुनील शिरवाडकर

१७ सप्टेंबर १९८८.. सकाळचे कार्यक्रम नुकतेच आटोपले होते. तात्यासाहेब आपल्या आरामखुर्चीत बसुन वर्तमान पत्र चाळत होते.बाईंच्या तसबिरी समोर लावलेल्या उदबत्तीचा खोलीत मंद दरवळ पसरला होता..मुखाने नेहमीप्रमाणे ‘श्रीराम‌..’असं सुरु होतं.

तोच जिल्हाधिकारी कार्यालयातुन एक कर्मचारी आला.. आणि साहेब येत आहेत.. आपण घरीच आहात ना..हे पहायला मला पाठवलं होतं.. तात्यांनी मान डोलावली..

थोड्या वेळात जिल्हाधिकारी सारंगी साहेब.. आणि कमिशनर अजय दुआ आले.

“अभिनंदन.. आपले नाव ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निश्चित करण्यात आले आहे..”

आणि मग १८ सप्टेंबरच्या सर्वच वर्तमान पत्रात ही बातमी अग्रभागी छापली गेली.तात्यासाहेबांवर अभिनंदनाचा वर्षाव झाला.

☆ ☆ ☆ ☆

ज्ञानपीठ कुणाला मिळतं?

ते ठरवण्यासाठी प्रत्येक भाषेतील तीन जणांची एक समिती असते.तिला L.A.C.म्हणतात.म्हणजे लॅंग्वेज ॲडव्हायजरी कमिटी.ही कमिटी आपापल्या भाषेतील एका लेखकाची शिफारस करते.. ज्ञानपीठ साठी.

मराठी साठी असलेल्या या कमिटीतील तिघे जण होते..बाळ गाडगीळ,म‌.द.हातकणंगलेकर, आणि प्रा.सरोजिनी वैद्य‌. या कमिटीने कुसुमाग्रजांच्या नावाची कधीच शिफारस केली नाही.आलटुन पालटुन त्याच त्या तीन नावांची शिफारस करत होती.ती तीन नांवें म्हणजे..पु.ल..विंदा..आणि गंगाधर गाडगीळ.

तर त्या वेळी केंद्रीय मंत्री पी.व्ही‌.नरसिंहराव हे ज्ञानपीठचे अध्यक्ष होते.महाराष्ट्र टाईम्स चे अशोक जैन त्यावेळी दिल्लीत होते.एका भेटीत ते नरसिंह राव यांना म्हणाले..

“जरा आमच्या मराठीकडे बघा एकदा. ‌कितीतरी वर्षात ज्ञानपीठ मराठीकडे आलं नाही.या सन्मानाला योग्य असे कुसुमाग्रज आहेत आमच्या कडे.”

हे ऐकून नरसिंह राव चकीत झाले.त्यांनी विचारलं..

“अहो, पण कुसुमाग्रज तर केंव्हाच वारले ना?”

अशोक जैन तर थक्कच झाले.म्हणाले..

“नाही हो.. कुसुमाग्रज छानपैकी जिवंत आहेत नाशकात.”

त्यानंतर साधारण दोन महिन्यांनी लेखक रवींद्र पिंगे दिल्लीत गेले होते.तिथे त्यांना डॉ.प्रभाकर माचवे भेटले.पिंग्यांना ते म्हणाले..

“अनायासे नरसिंह राव ज्ञानपीठचे अध्यक्ष आहेत.ते मराठी उत्तम जाणतात.तुम्ही सर्वांनी त्यांच्यावर तारांचा भडीमार करा.. आम्ही दिल्लीतली बाजु सांभाळतो.मी स्वतः नरसिंहरावांशी बोललोय.डॉ.निशिकांत मिरजकरांनी कुसुमाग्रजांची थोरवी वर्णन करणारा इंग्रजी लेख लिहीला आहे.आपली पण लॉबी झाली पाहिजे.आपण प्रयत्न केले पाहिजे.. प्रत्येक वेळी आपले कुसुमाग्रज उपेक्षित रहातात.”

त्यानंतर एकदा L.A.C.चे प्रमुख बाळ गाडगीळ यांची आणि नरसिंह राव यांची दिल्लीत एका भोजन प्रसंगी भेट झाली.गाडगीळांनी ज्ञानपीठाचा विषय काढला.नरसिंह राव म्हणाले..

“ज्ञानपीठ मराठी कडे यावं असं तुम्हाला खरंच वाटत ना !मग तुम्ही एक ठराव लिहून द्या.त्यात कवी कुसुमाग्रज यांच्या नावाची शिफारस करा”

बाळ गाडगीळ पेचात पडले.कारण त्यांच्या कमिटीने कुसुमाग्रज यांच्या नावाचा कधी विचारच केला नव्हता.ते नाव कधीही कुणी सुचवलं नव्हतं.तसं त्यांनी नरसिंह राव यांना सांगितलं.शांत पण घट्ट स्वरात नरसिंह राव म्हणाले..

“ज्ञानपीठ सन्मान मराठीलाच मिळावा असं तुम्हाला खरंच वाटलं ना?मग आत्ताच्या आत्ता मला लिहून द्या..

L.A.C. कुसुमाग्रज यांच्या नावाची एकमुखाने शिफारस ज्ञानपीठ कडे करीत आहे.”

बाळ गाडगीळ यांनी तत्परतेने तसं लिहुन दिलं.लागलीच नरसिंह राव यांनी पत्रकार परिषद बोलावली.अक्षरश: पाचच मिनिटांत नरसिंह रावांनी जाहीर केलं..

यंदाचा ज्ञानपीठ सन्मान कवी कुसुमाग्रज यांना जाहीर होत आहे.

आणि मग जिथं जिथं मराठी माणूस आहे तिथं तिथं दिपोत्सव सुरु झाला.तात्यासाहेबांना जितका आनंद झाला.. त्यापेक्षाही अधिक आनंद समस्त मराठी बांधवांना झाला.. आपल्या घरातच तो सन्मान आला हीच भावना प्रत्येकाची होती.

तात्यांचे एकामागून एक सत्कार समारंभ सुरु झाले. मुंबईत ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान समारंभ पण झाला.बाकी होता तो नाशिककरांकडुन होणारा सत्कार.तात्यांनी सुरुवातीला तर नकारच दिला.अखेर कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या प्रस्थापनेची घोषणा करण्यासाठी म्हणून एक समारंभ आयोजित केला गेला.या देखण्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते..प्रा.वसंत कानेटकर.

या घरच्या सत्काराला उत्तर देताना तात्यासाहेब म्हणाले..

“ज्ञानपीठाच्या अनुषंगाने सर्व महाराष्ट्रातुन हजारो रसिकांच्या प्रेमाची बरसात माझ्यावर झाली,ती मला खरोखरच महत्वाची वाटते.ज्ञानपीठालाही कवेत घेणारा प्रेमपीठाचा हा जो पुरस्कार मला मिळाला,यात माझ्या जीवनाची सार्थक झालं असं मला खरोखर वाटतं आणि आजचा हा समारंभ म्हणजे या सत्कारपर्वाचा कलशाध्याय आहे.”

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘मराठी भाषेचे सौंदर्य ::: पाऊल व पाय’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘मराठी भाषेचे सौंदर्य ::: पाऊल व पाय‘… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

पाऊल व पाय दोन्ही शब्द चटकन् बघितलं तर ऐकायला व दिसायला एकच वाटतात; पण त्यांचे संदर्भ खूप वेगळे असू शकतात..

पाऊल नाजूक ..व मुलायम..  तर पाय भक्कम अन् मजबूत असावा लागतो..!

पाऊलखुणा उमटतात तर पायांचे ठसे …!!

पाऊलवाटेवर कोणाची साथ मिळेलच याची खात्री नसते; पण पायवाट ही अनेकांच्या चालण्यामुळे बनते..!

पाऊल जपून टाकायचे असते; पण पाय हा रोवायचा असतो.. !!

काय कमाल आहे बघा..

नावडत्या व्यक्तीच्या घरी ” कधी पाऊलसुद्धा टाकणार नाही ” असे म्हणतो; पण आवडत्या माणसाच्या घरातून मात्र आपला पाय लवकर निघत नाही..!!

नको त्या ठिकाणी  पाऊल घसरते तर बहारदार संगीत मैफिलीत पाय रेंगाळत राहतो !

पाऊल वाकडे पडले तर पायांचा मार्ग व दिशा चुकते !

जीवनात किंवा  व्यवसायात टाकलेले पहिले पाऊल हा एक कौतुकाचा विषय बनतो तर येणार्‍या अनुभवांमुळे आयुष्यभर कधी स्वतःसाठी वा इतरांसाठी केलेली पायपीट ही अटळ व गरजेची असते… …!

बऱ्याचदा विरोधी अर्थाने हे दोन्ही शब्द आपण वापरत असलो तरीही……..

जन्माला येताना स्वतःच्या पावलांनी न येणारे आपण ,…परत जातानादेखील आपल्या पायांनी मात्र जात नाही एवढंच काय ते दोघांत साम्य आहे…!

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “नियम व अटी…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “नियम व अटी…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

हा प्रसंग महाभारताच्या युध्दासारखा होता असं नाही. पण आपल्याच माणसांविरुध्द युद्ध करायचं हे अर्जुनाला पटत नव्हतं. आणि माझंही तसंच झालं होतं. विजय मिळणार याची खात्री अर्जुनाला होती. तरीही तो खूष नव्हता. आणि आपल्याला विजय मिळवणार नाही याची खात्री मला होती. म्हणूनही कदाचित मी नाखूष असेन. कारण… कारण समोर लढायला बायकोच होती. आणि तिच मला तु जिंकशील फक्त लढायला तयार हो असा सल्ला देत होती. शत्रु दिलदार असावा, हे बायकोकडे बघितल्यावर समजतं. खरंच ती दिलदार (शत्रु) असते.

लढायचं होतं ते बायकोने घातलेल्या नियम आणि अटिंविरुध्द. आता मी अटी मान्य केल्याशिवाय ती नियम सांगणार नव्हती. आणि नियम सांगितलेच तर ते पाळायची अट होती. इकडे आड आणि तिकडे विहीर…… या पध्दतीने मी इकडे नियम आणि तिकडे अटी या मध्ये अडकलो होतो. अटीतटीची परिस्थिती होती.

मी युद्ध न करता हार मानली तरीही काही नियम व अटी मान्य करण्याचा तह मला करावा लागणार होता. आणि हा तह कदाचित तहहयात सुरू राहिला असता.

माझा आळस झटकण्यासाठी, व वाढलेले पोट आटोक्यात आणण्यासाठी आहेत असा मुलामा त्या नियम व अटींना लावण्यात आला होता.

नियम पहिला… रोज सकाळी न चुकता सहा वाजता उठायचच. अट अशी होती की मी उठल्यावर सुध्दा बायकोला मात्र उठवायचं नाही.

नियम दुसरा… सकाळी उठल्यावर जिना उतरून खाली जायचं आणि दुध आणायचं. (कशाला हौसेने आठव्या मजल्यावर फ्लॅट घेतला असं वाटलं) लिफ्ट ने जायचं नाही. येतांना लिफ्ट वापरली तर चालेल. (कदाचित माझ्या व्यवस्थित पणामुळे दुधाची पिशवी पडून फुटेल का? असा विचार असावा) अट आपलं दुध आपणच आणायचं. पाचव्या मजल्यापर्यंत जाऊन अरे येतांना माझंही घेऊन ये असं मित्राला सांगायचं नाही.  त्यांच्याकडे सुध्दा असेच नियम व अटी आहेत, त्यामुळे ते भेटू शकतात.

नियम तिसरा… कोणीही पहिल्यांदा उठलं तरी (नियमानुसार मीच पहिल्यांदा उठणं अपेक्षित होतं) चहा मात्र मीच करायचा. अट अशी की बायको उठल्याशिवाय चहा करायचा नाही. कारण तिला ताजा, आणि गरम चहा लागतो. नंतर गरम केलेल्या चहाला ताज्या चहाची चव नसते. आणि तो प्यायल्याचं समाधान पण नसतं. असं तिचं म्हणणं.

आता चहा मी करणार याचंच काय ते तिला समाधान. बाकी पदरी पडलं पवित्र झालं हिच भावना. कारण चहाची चव. असो.

स्वयंपाक घरातली अगणित आणि न संपणारी कामं तिला असतात म्हणून चहा माझ्याकडे. (तो प्यायल्यावर काम करायला उत्साह वाटला पाहिजे हि अट (कळ) होतीच.)

जीना उतरायचं, चालत जाऊन भाजी आणायचं समजू शकतो. पण मी चहा करण्याचा आणि पोट कमी होण्याचा काय संबंध? माझा (हळू आवाजात) प्रश्न.

चहा साखरेच्या डब्यांची आणि भांड्यांची जागा बदलली आहे. खाली वाकल्याशिवाय डबे आणि टाचा व हात उंच केल्याशिवाय भांड हाताला लागणार नाही. कपबशांच्या जागेचा विचार सुरू आहे. थोडक्यात समर्पक उत्तर.

सगळा गनिमी कावा ठरल्यामुळे भांडणात काही अर्थ नव्हता.

नियम चौथा… आठवड्याची भाजी आणून ठेवायची नाही. रोज एक आणि ताजी भाजी कोपऱ्यापर्यंत चालत जाऊन आणायची. अट फक्त भाजी आणायची मधे सुटे पैसे घेण्याच्या कारणाने पानाच्या दुकानात थांबायची गरज नाही. भाजीवाले देखील सुटे पैसे ठेवतात.

नियम पाचवा… स्वयंपाक घरात विनाकारण लुडबुड करायची नाही. तुम्ही आणलेली भाजीच घरात होते. काय केलं आहेस हे विचारायच नाही हा नियम. आणि अट अशी की घरातली भाजी आनंदाने खायची.

चेहरा वाकडा करुन काही बदलत नसतं हे लक्षात ठेवा. माझा अनुभव आहे. नाहीतर कधीच आणि बरंच काही बदललं असतं. पण आता ते कधीच बदलणार नाही. (हे सत्य परिस्थितीवर केलेलं दमदार भाष्य ऐकून माझा चेहरा पाहण्यासारखा झाला असावा.) पुढे मी मुद्दाम वाकड्यात शिरलो नाही.

नियम सहावा… बाहेर जाण्यासाठी कपाटातून कारण नसतांना दोन चार ड्रेस बाहेर काढायचे नाहीत. आणि अट बाहेर काढलेल्या ड्रेस पैकीच एक बऱ्यापैकी असणारा (मॅचिंग पाहून. उगाच खाली पॅंट आणि वर शर्ट असं घातलं की झालं हि वृत्ती नको) घालावा. नाहीतर कपाटातून दोन चार ड्रेस काढायचे, पण घालायचा मात्र दारामागे लटकवलेला. हे चालणार नाही. नंतर आवराआवरी करायला तुम्ही येत नाही. आणि आता माझ्याकडून ही जास्तीची कामं होणार नाही.

नियम सातवा… भाजी, दुध आणतांना गुडघेदुखी ची तक्रार वारंवार बोलून दाखवायची नाही. अट जर तक्रार करायचीच असेल तर गुडघ्याबरोबरच आम्हाला डोकंपण दिलं आहे हे लक्षात ठेवा. ते दोन्ही दुखतात. तुमचा सुर कायम तुमच्या गुडघेदुखी बद्दल असतो. (यावेळी डोक्याचा उल्लेख जाणिवपूर्वक टाळला होता.) त्यामुळे भान ठेऊन आमच्या पण तक्रारी तक्रार न करता ऐकाव्या लागतील. आम्हाला काही सोळावं लागलेलं नाही. (कितवं लागलं आहे आहे?…… हे विचारण्याच्या मोह मी आवरला…….)

लग्नात सप्तपदी वेळी काही वचनं असतात. त्यावेळी कदाचित विधीचा एक भाग म्हणून ती दिली असतील. पण आता या सप्तपदी सारख्याच सात नियम व अटी होत्या. आणि पावला पावलावर त्या वचनाप्रमाणे वदवून घेतल्या जात होत्या. यालाच विधिलिखित म्हणावं का……

अजूनही आहेत. पण नंतरचा नियम असा आहे, की बातम्यांसारखे नियम सांगत बसायचे नाहीत. ते गोपनीय आहेत. आणि गोपनीयतेची अट पाळायची आहे.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “स्त्री – एक उत्तम व्यवस्थापिका” ☆ सौ. अंजोर चाफेकर ☆

सौ. अंजोर चाफेकर

??

☆ “स्त्री : एक उत्तम व्यवस्थापिका…” ☆ सौ. अंजोर चाफेकर

स्त्रीला आचार्य अत्रे यांनी इस्त्रीची उपमा दिली कारण ती नवऱ्याच्या विस्कटलेल्या जीवनाला इस्त्री करते.

स्त्री एकाच वेळी अनेक भूमिका सफाईदारपणे बजावू शकते. माता, पत्नी, सून, मुलगी, बहिण, भावजय, नणंद आणि सखी, कधी दूर्गा, कधी सरस्वती तर कधी लक्ष्मी.

तिला उपजतच व्यवस्थापन कला, मल्टी टास्कींग, टाईम मॅनेजमेंट जमते.

घरातल्या सर्वांच्या वेळा सांभाळणे,सर्वांना समजून घेणे,नोकर माणसांकडून कामे करवून घेणे, त्यांच्या गैरहजेरीत ती कामे स्वतः उरकणे,सकाळी दूध गरम करण्यापासून ते रात्री झोपताना ओटा आवरेपर्यंत तिची मॅनेजमेंट चालूच असते.

हेच तिचे उपजत कौशल्य ती जेव्हा उद्योजक बनते तेव्हा तिला उपयोगी पडते.

माझ्या स्वतःच्या अनुभवावरून मी काही टिपा देत आहे.

मनाचा कणखरपणा वाढविणे…

शांता शेळके म्हणतात,स्त्री, काळोखात हळूच डोळे पुसणारी. 

ती मनाने हळवी असल्यामुळे, सासूबाई रागे भरल्या, नवरा तिच्यावर क्षुल्लक कारणासाठी चिडला तरी तिचे डोळे झरू लागतात. पण अश्रू हे दुर्बलता दर्शवितात.

व्यवसायात रोजचाच दिवस एक आव्हान असते. कधी कुठले संकट समोर येईल हे सांगता येत नाही.

अगदी छोट्या गोष्टी, कधी फॅक्टरीत ब्रेकडाऊन, कधी डिलीव्हरी अर्जंट असते आणि नेमकी वीज जाते.

कधी टेम्पोचा संप असतो. कधी कुणी कामगार नेमका गैरहजर असतो. कधी कच्चा माल वेळेवर पोहचत नाही. कधी कस्टममधे माल अडकतो व डॅमेरेज चढत जाते. कधी ग्राहकांच्या तक्रारी, तर कधी सरकारची शुक्लकाष्ठे, …. मारुतीच्या शेपटासारखी ही यादी संपणारी नाही.

अशावेळी रडून चालत नाही. संकटाशी सामना करायला शिकले पाहिजे.

मी माझ्या एका मोठ्या ग्राहकाकडे पेमेंट मागण्यासाठी गेले होते. मोठी रक्कम होती म्हणून स्वतः गेले होते.

त्याने मला बराच वेळ बाहेर बसवून ठेवले. त्याची कंपनी लाॅसमधे होती म्हणून तो कुणाचेच पेमेंट करत नव्हता असे समजले. कारण माझ्यासारखेच बरेच जण बाहेर ताटकळत बसले होते.

मी त्याच्या केबिनमधे गेल्यावर तो वसकन् मला म्हणाला, “ मी तुमचे पेमेंट देणार नाही, गेट आऊट प्लीज.”  

मी बाहेर आले. पण माझे इतके पैसे बुडतात समजल्यावर,आणि माझा इतका अपमान त्याने केल्यावर मला रडू आले. लिफ्टमधून खाली उतरेपर्यंत, गाडीत बसेपर्यंत माझे डोळे झरत होते.

माझा सेल्स मॅनेजर म्हणाला, “ मॅडम तुमच्यासारख्या देवीचा त्याने अपमान केला.”

तीन दिवसांनी त्याचा पेपरमधे फोटो आला. त्याने केलेल्या स्कॅममुळे त्याला अटक झाली होती.

तेव्हापासून ठरवले ,आपण रडायचे नाही. आपले अश्रू इतके स्वस्त नाहीत.

संवाद साधण्याची कला 

स्त्री ही मूळातच मृदू भाषिणी असते.याचा उपयोग तिने मार्केटिंग मधे करावा. आपली विकायची वस्तू  ग्राहकाला आवडली पाहिजे. त्याची किंमत त्याला पटली पाहिजे.आणि ती वस्तू त्याने आपल्याकडूनच विकत घ्यावी असे त्याला वाटले पाहिजे यासाठी ग्राहकांबरोबर सुसंवाद साधण्याचे कौशल्य तिने वाढवावे.

तसेच आपल्या हाताखालच्या माणसांना सूचना देताना, दूरच्या साईटवर असणाऱ्यांना सुद्धा सूचना देताना त्या त्यांना नीट समजतील, संदिग्धता राहणार नाही याची काळजी घ्यावी.आपल्याला नेमके काय पाहिजे हे कम्यूनिकेट करता येणे फार महत्वाचे असते.

व्यवसायात आपल्याला कच्चा माल पुरवणारे सप्लायर्स, फायनान्स करणारी बॅन्क, ग्राहक,कामगार,पदोपदी वेगवेगळ्या पातळीवरच्या माणसांशी संबंध येणार. यांच्याशी परस्पर सुसंवाद साधता आला तर बरीच कामे सोपी होतात.

सुसंवाद म्हणजे नेमके काय?

समोरच्या व्यक्तीला न दुखावता,त्याच्या इगोला ठेच न पोहचवता, त्याची बाजू नीट ऐकून घेऊन,त्याला सन्मान देऊन बोलता येणे. तसेच पत्रव्यवहार करताना पत्रातील भाषा फार सांभाळून लिहीली पाहिजे. बोलताना एखादा शब्द इकडे तिकडे झाला तरी चालतो परंतु लिहिताना नेटके व मोजकेच लिहावे.

मलाही या गोष्टी शिकाव्या लागल्या.

आज व्यवसाय सुरू करून ४५वर्षे झाली. माझे जुने व नवे ग्राहक, आमचे संबंध सलोख्याचे आहेत.

जुने कामगार रिटायर व्हायला मागत नाहीत. 

कायद्याचे ज्ञान…

उद्योजकाला प्रत्येक कायदा माहीत असतो असे नाही. परंतु माहिती जरूर करून घ्यावी.

उदा. दरवर्षी डिसेंबर महीन्यात फॅक्टरी लायसन्स रिन्यू करायचे असते. पहिल्या वर्षी मी विसरले.

जानेवारी महिन्यात रिन्यू करायला गेले तर ७०००रूपये दंड भरावा लागला.

मी अमेरिकेतून जाॅगिंग मशीन मागवली होती. कंपनीने मला मशीनसोबत एक बेल्ट फुकट पाठविला होता.म्हणून बिलात बेल्टची किंमत शून्य लिहिली होती. मी जेव्हा ड्यूटी भरायला गेले तेव्हा माझ्यावर अंडर इन्वाॅइसचा गुन्हा ठोकला. केवळ अज्ञानामुळे आपण कायद्याच्या कचाट्यात सापडू शकतो. छोट्या चुका सुद्धा महाग पडतात.

म्हणून कुठलीही गोष्ट करताना हे पडताळून पहावे

‘Is it legally right?’

स्वतःची उन्नती….

व्यवसायात प्रगती साधायची असेल तर प्रथम स्वतःला उन्नत करणे जरूरी आहे.

आपली कार्यक्षमता वाढवायची, आपली पोटेन्शियलस वाढवायची. स्वतःला अपग्रेड करत रहायचे.

वाचन, प्रवास व विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संपर्क साधायचा. स्वतःच्या चुका सुधारायच्या. 

चांगल्या गोष्टींचे अनुकरण, इतर व्यक्तींचे चांगले गुण टिपायचे.

मी माझ्या वडीलांचे निरीक्षण करून बऱ्याच गोष्टी शिकले. त्यांची फोनवर बोलायची पद्धत,डिक्टेशन द्यायची पद्धत, फायलिंग कसे करायचे, बिझिनेस पत्रे कशी लिहायची, दिलेली वेळ कशी पाळायची, नोट्स कशा लिहायच्या — अशा खूप गोष्टी…. ते माझे आदर्श होते.

ते म्हणायचे कुठलाही निर्णय घेताना आधी स्वतःच्या मनाशी संवाद साधायचा. स्वतःला अपराधीपणाची भावना असेल, स्वतःच्या नजरेतून आपण उतरणार असू तर तो निर्णय  कितीही  फायद्याचा असला तरी तो चुकीचाच.

शेवटी निर्मितीचा आनंद हाच खरा नफा…

©  सौ.अंजोर चाफेकर, मुंबई.

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ माझे आवडते साहित्यिक… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

?इंद्रधनुष्य? 

☆ माझे आवडते साहित्यिक ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

साहित्यिक प्रेमी,  बंधू भागिनींनो 27 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे लाडके कवी , ” विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज” यांचा जन्मदिवस . त्यांची स्मृती म्हणून आजच्या मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येतो . कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम पण केले . 

देश पातळीवर मराठीचा झेंडा फडकवण्यासाठी अनेक नामवंत  संतापासून , पंतापर्यंत आणि पंतापासून तंतापर्यंत, तसेच अनेक नामवंत साहित्यिकानी यात मोलाची भर घातली . अनेक दिग्गज साहित्यिक होऊन गेलेत. त्यांनी पण मराठी भाषा समृध्द केलीच .

पण मला अलीकडच्या काळातील, पुण्यातील प्रसिद्ध साहित्यिक ,स्त्रीरोगतज्ज्ञ “प्रा. डॉ. निशिकांत श्रोत्री “यांच्या बद्दल आज  तुम्हाला सांगायला आवडेल . व मराठी भाषेचा गौरव दिन , खऱ्या अर्थाने साजरा होईल असेच वाटते . हो ! पण माझी अवस्था आज काजव्याने सूर्याला ओवळण्या सारखी झाली आहे ! ! 

।। क्व च सूर्य वंश , क्व च अल्पा विषयामती ।।

मुळातच डॉ श्रोत्री यांचा जन्म पुण्यात पुण्य नगरीत झाला .  सुसंस्कारीत , ऋजु आणि बुद्धिमान घराण्यात , श्रोत्री कुटुंबियांत 1945  ला   झाला . जन्मजात कलेचा वारसा ज्यांना लाभला , ते डॉ निशिकांत श्रोत्री सर , साहित्य ,कला आणि नाट्य क्षेत्रात आपले नाव गाजवलेच . वैद्यकीय क्षेत्रातही त्यांनी जोरदार मुसंडी मारली . वैद्यकीय क्षेत्रात दुर्लक्ष नको म्हणून ह्या नाट्य क्षेत्रातील अभिनेत्याने , रंगभूमीवरून रजा घेतली ! 

कला क्षेत्राशी फारकत घेणे त्यांना रुचले नसावे . म्हणूनच आकाशवाणीवर नाटके , भावगीते रचना याद्वारे त्यांनी आपली चुणूक दाखवून दिली . प्रसिध्द संगीतकार श्री गजानन वाटावे यांनी , डॉ श्रोत्री सरांच्या भावगीताना चाली लावल्या . त्यांचे बालपणीचे किस्से पण असेच नवल वाटावे असे आहेत .

लहानपणीच त्यांचे पाय पाळण्यात दिसू लागले असे म्हटल्यास वावगे ठरू नये . मोंट्सरित असतानाच त्यांनी आपली बडबड गीत स्वतः रचून म्हणण्यास सुरुवात केली होतीच . घरीं त्यांचे आजोबा दादा भट ह्यांचे मार्गदर्शन पण होतेच . दादा भट हे कडक शिस्तीचे ! त्यांचा अभ्यास , व्यायाम , अन परवचा संस्कृत पाठांतर हे अगदी ठराविक वेळेत होत होते . एक शिस्तबद्ध वळण अन मुळात डॉ श्रोत्री हे अभ्यासू अन हुशार व्यक्तिमत्व आजोबांच्या देखरेखीखाली तावून सुलाखून निघालं . इयत्ता पाचवी मध्ये त्यांनी “कार्तिकस्वामीच लग्न ” ही विनोदी कथा लिहली . अन तेथूनच त्यांच्या काव्य साहित्याचा प्रवास सुरु झाला तो आजतागायत ! त्यांच्या सिध्द हस्त लेखणीला माता सरस्वतीचा वरद हस्त लाभला होता.

त्यांनी मेरिटमध्ये बी जे मेडिकल  कॉलेज पुणे येथे प्रवेश मिळाला , अन त्यांचं साहित्य तसेच नाट्य क्षेत्र पण बहरून आलं . पु ल देशपांडे यांचे “तुझं आहे तुझपाशीं ” ह्या नाटकात श्यामची भूमिका केली . अशी पाखरे येती , वाजे पाउल आपले अश्या अनेक नाटकात भूमिका केल्या . अन येथेच पु ल देशपांडे ह्यांच्याशी ओळख झाली . नाटकानिमित्त डॉ श्रोत्री यांचे पु ल च्या घरी येणें जाणे सुरू झाले . काही नाटक पुणे रेडिओ स्टेशनवर पण प्रसारित झाली . बी जे आर्ट सर्कल हे त्यावेळी पुण्यातील सांस्कृतिक माहेरघर मिळाले खरे , पण डॉ श्रोत्री यांनी आपलं शैक्षणिक प्रगती सुध्दा उंचीवर नेऊन ठेवली .ते सतत विध्यापिठात प्रथम स्थान घेत , साहित्य क्रांती पण केली . 

एम डी गायनाकोलोजी मध्ये त्यांनी सर्व विध्यापिठात सुध्दा प्रथम श्रेणी घेतली . पदवी उत्तर शिक्षणातच त्यांचा डॉ  देशपांडे यांच्याशी ओळख झाली, ओळखीचे रूपांतर विवाहात कधी जाहले ते कळलं पण नाही . 

त्यांची ग्रंथ संपदा पण तोंडात बोट घालणारी आहे . 

कथा संग्रह , कथाकथन , काव्य संग्रह , लेख , ललीतलेख , कादंबऱ्या ह्या वाचनीय , सहज सुलभ प्रतिभेला गवसणी घालणाऱ्या वाटतात . हे सर्व कमी म्हणून की काय , त्यांनी संपूर्ण भगवद्गीता ह्यांचे काव्यमय भाषांतर तर केलेच त्याशिवाय , ऋग्वेद सारखा कठीण प्राय वेद सुध्दा काव्यमय भाषांतर करून प्रसिध्द गायका कडून गाऊन घेतला . ह्या सर्व ऋचांचे त्यांनी यु ट्यूब वर पण प्रक्षेपण केलं . विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे,रुक्ष अन क्लिष्ट अश्या  वैद्यकीय क्षेत्रात राहून 

जे कार्य केले ते खचितच , वखण्याण्यासारखे आहेच . शिवाय आचम्बीत करणारे आहे एवढे खरे . ऋजु स्वभावाचे असणारे डॉ . श्रोत्री ह्यांच्या प्रतिभेची गगन भरारी त्यांच्या काव्यातच नव्हेतर कथा , कथा सादरीकरण , कादंबरीत स्पष्टपणे दिसून येते . त्यांची ग्रंथ संपदा खाली दिलेली आहेच . त्यावर नुसता दृष्टी क्षेप टाकला तरी कल्पना येते . एवढी ग्रंथ संपदा असूनही ते आज पण साहित्य क्षेत्रात कार्यरत आहेत . साहित्यात नवनवीन प्रयोग पण करीत आहेत . त्यांच्या कार्याला माझा त्रिवार मुजरा तर आहेच . त्यांना दीर्घकाळ आयुआरोग्य मिळो व त्यांच्या हातून आणखी साहित्य सेवा घडो अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करून मी आपली रजा घेत आहे . खऱ्या अर्थाने मराठी भाषा गौरवंदिन साजरा केल्याचा आंनद आज मला मिळतो आहे हे पण नसे थोडके .

डॉ निशिकांत श्रोत्री सरांची ग्रंथ संपदा 

कादंबरी

 

अनिता   

दीड दिवस 

 ड्युशने

स्वप्नातल्या कळ्यानो

 सिद्धयोगी

वाटचाल

निवडुंगाचे फुल

हकनाक

सुवर्ण सिध्दी

शीतल छाया बाभळीची

अनोळखी

सौदामिनी

कर्मभूमी 

शिखंडी

पिसाट

कुंचले घेऊन हाती

महायोगी

राखेतील ठिणगी

उपासना 

शांतीवन

पद्मसंभव

साडेसाती 

शिर्डी ते पुटपार्थी

नादब्रह्म 

संरक्षीता

 

कथा संग्रह 

——–

ब्रह्मास्त्र

सुवर्ण पुष्कराज

डायग्नोसी

 

काव्य संग्रह 

——–

मनाची पिल्लं

साई अभंगवाणी

शब्दांची वादळ

अर्चना

गीतसत्य साई 

श्री साईनाथ चरित्र

निशिगंध

मुक्तायन

 

वैद्यकीय

——-

कुटुंबनियोजन आणि वैद्यकीय गर्भपात

स्त्री आणि आरोग्य

एड्स सेक्स सेक्सउल प्रशिक्षण

यौवनावस्था म्हणजे काय

सुरक्षित प्रसूती

हेल्थ डायरी

Surgical Principles in

Obstetrics & Gyaaecology

ध्वनिफीत 

——–

भजनांजली

सर्वधर्म परमेश्वर

मुलगी का मुलगा

नव्या युगाचा वसा

 

आकाशवाणी व दूरदर्शन

मान्यताप्राप्त अभिनेता

© प्रा डॉ. जी आर (प्रवीण) जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

नसलापुर  बेळगाव

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ भेट एका वाढदिवसाची… लेखक – अज्ञात ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆

सुश्री सुनिता गद्रे

? वाचताना वेचलेले ?

 ☆ भेट एका वाढदिवसाची… लेखक – अज्ञात ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆ 

मी सुचेता. आज माझा वाढदिवस. सचिन सकाळीच म्हणाला, “आज काही करू नकोस, मी लंचला बाहेर घेऊन जातोय तुला एक वेगळीच ट्रीट आहे.”

लग्नाला दहा वर्षे झालीत, सचिनला मी चांगलीच ओळखते. काहीतरी जगावेगळे अनुभव देण्यात किंवा मजेशीर प्रसंग उभे करण्यात तो माहीर होता. मुले चार वाजल्यानंतर शाळेतून येणार म्हणजे आमची लंच फक्त दोघांचीच असणार होती.

दोघेही बारा वाजता बाहेर पडलो. सचिनने गाडी भरधाव सोडली होती. मधेच विचारात मग्न झाला की गाडी स्लो होत होती. मी मनात समजून गेले की हा आज एक वेगळाच अनुभव किंवा रोमांचक प्रसंग घडवणार.

गाडी एका नवीन मॉलच्या पार्कींग मधे उभी करून आम्ही लिफ्टमधे शिरलो. सचिनने पाचव्या मजल्याचे बटण दाबलेले मी पाहीले. एकदम वरचा मजला.. तिथे तर मल्टीप्लेक्स असणार, क्वीक बाईट्सचे स्टॉल असणार. तिथे काय वाढदिवस करायचा.. एवढ्यात पाचवा मजला आला. खाण्यापिण्याचे वेगवेगळे स्टॉल दोन्ही बाजूनी सजले होते. सचिन कुठेही न पहाता भरभर चालत होता. शेवटी एका बंद दारासमोर आलो वर पाटी होती, “Dialogue in the dark”  आश्चर्यात पडले. अंधारातील संभाषण?   खाण्याच्या स्टॉलचे नाव विचित्र वाटले. दार उघडून आत गेलो तर फक्त एक काऊंटर व त्या मागे टाय सूट मधला एक माणूस. टेबल खुर्च्या वगेरे कांहीच दिसत नव्हते आम्हाला पहाताच तो लगबगीने पुढे आला, “वेलकम सचिन सर, हॅप्पी बर्थ डे टू यू मॅडम” याचा अर्थ सचिन अगोदरच याला भेटून सर्व ठरवून आला होता.  “सर, मॅडम यु आर अवर स्पेशल गेस्टस टुडे काय घेणार ते ठरवा.” त्याने काऊंटर वर नेत आमच्या समोर मेनू कार्ड ठेवले. सचिनने ते माझ्याकडे सरकवले.

मी गोंधळले होते. टेबलवर बसण्या आधीच ऑर्डर द्यायची प्रथा पहिल्यांदाच अनुभवत होते. काहीतरी विचित्र वाटत होते. हसऱ्या मुद्रेने सचिन माझी मजा पहात होता. मी ऑर्डर दिली आणि तो माणूस आम्हाला घेऊन निघाला. एक दरवाजा उघडला समोर एक छोटासा बोळकंडी सारखा रस्ता दिसला. दोघे किंवा तिघेच जातील एवढाच रुंद. आम्ही त्याच्या मागोमाग निघालो. पहिले वळण आले आणि बाहेरून येणारा उजेड खूपच कमी झाला. त्या पॅसेजमधे दिवे अजिबात नव्हते. आणखी एक दोन वळणांनंतर अंधार खूपच वाढला. मी सचिनचा हात घट्ट पकडून दुसऱ्या हाताने भिंतीला स्पर्शत चाचपडत चालले होते. सचिन माझ्या हातावर थोपटत मला धीर देत होता. पुढच्या वळणानंतर डोळ्यात बोट घातले तरी दिसणार नाही असा मिट्ट काळोख होता पण हवा मोकळी व थंड येवू लागली होती. बहुदा आम्ही एका हॉल मधे पोचलो होतो.

“संपत” त्या माणसाने हाक मारली.

“येस सर,” अंधारातच उत्तर आले. कुणीतरी जवळ आल्याची चाहूल लागली.

“हे आपले आजचे स्पेशल गेस्ट, मॅडमचा बर्थडे आहे. गीव्ह देम स्पेशल ट्रीट. ऑर्डर मी घेतलीच आहे. त्याना टेबलवर ने.”

“येस सर,” अंधारातच आवाज आला. आता संपत आमचे हात धरून त्या अंधारातून नेत होता. खुर्ची ओढल्याचा आवाज आला त्याने माझा हात खुर्चीच्या पाठीवर ठेवला. तसाच सचिनचाही ठेवला असावा. आम्ही बसलो. मी समोरच्या टेबलवर हात फिरवून अंदाज घेतला. या मिट्ट काळोखात जेवण दिसणार कसे आम्ही जेवणार कसे ही कसली सचिनची जगावेगळी पार्टी असे कितीतरी प्रश्नांचे काहूर मनात उठले होते. असा कधी बर्थडे असतो का?

पण त्याच्यावर माझा विश्वास होता. काहीतरी निश्चित वेगळेपणा जाणवणार व मला अतिशय आश्चर्यात तो टाकणार याची खात्री वाटत होती.

पुढ्यात प्लेटस् मांडल्याचे आवाजावरून समजले. वेटर्सचे येणे जाणे चाहुलीने समजत होते. संपतने हात पकडून दोन्ही डिश कुठे आहेत ते दाखवले. चमचा हातात दिला. एवढ्यात मागवलेले पदार्थ आल्याचे त्यांच्या घमघमाटाने माहीत पडले. “वाढतो” म्हणत संपत एक एक पदार्थ डिश मधे वाढू लागला. सर्व झाल्यावर म्हणाला  “मी वाढले आहे. आपल्याला कांही दिसणार नाही पण वास आणि स्पर्शाचा उपयोग करून जेवायची एक वेगळीच मजा येईल व तुम्हाला आनंद देईल याची खात्री देतो.”

त्या अंधारात मी चाचपडत रोटी तोडली, अंदाजाने एका भाजीत हात घातला पहिला घास तोंडात गेला. मग चार पाच घास असेच अंदाज घेण्यात गेले. डाव्या हाताने मी प्लेट पकडली होती. त्यामुळे प्रत्येक पदार्थाची जागा उजव्या हाताला समजू लागली होती. आणि अहो आश्चर्यम् आता त्या अंधारात देखील जेवण मी सहज जेवू शकत होते. हा आगळा अनुभव पदार्थांची मजा तर देतच होता पण या खेळाचा आगळा आनंद आम्ही दोघे पुरेपूर अनुभवत होतो. सचिन कोणत्या पदार्थाचा घास घेतोय हे मी विचारले की तोही विचारायचा. केंव्हा केंहा आमचे उत्तर एकच असायचे केव्हा वेगळे असायचे हा खेळ खरच जाम मजा देत होता. त्या मिट्ट काळोखात स्पर्श, वास आणि आवाज हेच काम करत होते. मधुनच संपत भाज्या वाढत होता. आम्हाला त्या संपल्या की आहेत हे समजत नव्हते पण त्याला दिव्य दृष्टी असल्या सारखा तो आमची बडदास्त ठेवत होता,

शेवटी स्वीटडिश आली ती मात्र त्याने आमच्या हातात दिली. माझा वाढदिवस, अंधारातील जेवणाचा, तो ही मजा देऊन गेला. कदाचित कँडल लाईट डिनर पेक्षाही मजा आली होती.

“आपण जाणार असाल तेव्हा सांगा, मी आपल्याला बाहेर घेऊन जाईन.” संपतने सांगीतले तसा सचिन म्हणाला, “अरे बिल तर बाहेरच द्यावे लागणार, चल निघू आपण.”

संपतने माझी खुर्ची हळुवार सरकवली. माझा हात पकडला. तसाच सचिनचाही पकडला असावा. तो आम्हाला घेऊन सराईता सारखा तो काळोख कापत बाहेर निघाला. पॅसेजमधे आल्याचे सहज समजले. हात आपोआप पॅसेजच्या भिंतीवर गेला. दोन वळणानंतर अंधुक प्रकाश दिसू लागला आणि संपतचा हात सोडून आता आम्ही चालू शकत होतो.

काउंटरच्या दालनात पोचलो. सचिन बिल देण्यासाठी गेला. आमची काळजी घेणाऱ्या संपतचे आभार मानण्या साठी पाठमोऱ्या संपतला मी हाक मारली. संपत वळला. त्याच्याकडे पहाताच मी जागच्या जागीच थिजले. संपतच्या डोळ्यांच्या जागी फक्त खाचा होत्या. तो ठार आंधळा होता.

“येस मॅडम,” काय बोलू तेच समजेना. पण सहानभूतीने भरलेले शब्द निघालेच, “संपत या स्थितीतही तू छान आदरातिथ्य केलेस. कायम लक्षात राहील.”

“मॅडम तुम्ही जो अंधार आज अनुभवलात तो आम्हाला रोजचाच आहे. पण आम्ही त्याच्यावर विजय मिळवलाय We are not disabled, we are differently able people. We can lead our life without any problem with all joy and happiness as you enjoy.”

माझ्या सहानुभूतीने भरलेल्या बोलण्याची मलाच लाज वाटली. सहानभुतीची गरज नसलेला एक सशक्त माणूस मला सचिनने भेटवला होता. असा वाढदिवस होणे नाही. सचिन तुझा मला अभिमान वाटतो.

सचिन बिल देऊन माझ्याकडे आला. बिल माझ्या हातात दिले. नेहमी सचिनच्या खर्चावर पाळत ठेवणारी मी बिल पहायला गेले तो तळटिपेवर लक्ष गेले.

We do not accept tips, Please think of donating your eyes, which will bring light to somebody’s life.

लेखक : अज्ञात 

संग्राहिका – सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ छोड आये हम वो गलियाँ… ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

?  विविधा ?

☆ छोड आये हम वो गलियाँ ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

गुलजार! शब्दांचा बादशहा, कल्पनातीत कल्पनांचा जादूगार, हरएक रंगांचे गुलाब फुलवून त्यांची बागच शारदेच्या पायी वाहण्याची मनिषा बाळगणारा – गुलजार! त्यांनी किती समर्पक नांव निवडलंय स्वतःसाठी! त्यांचं खरं नांव संपूर्णसिंह कालरा. पंजाब मधील दीना या गावी १८ऑगस्ट १९३६ मध्ये त्यांचा जन्म झाला. हा भाग आता पाकिस्तान मध्ये आहे. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब अमृतसरला स्थायिक झाले. काम शोधण्यासाठी प्रथम त्यांचा मोठा भाऊ मुंबईला आला. नंतर त्याने गुलजार यांना बोलावून घेतले. ते लहान मोठी कामे करू लागले. कविता लिहिण्याची, वाचनाची आवड होतीच. एका गॅरेज मध्ये मेकॅनिक म्हणून काम करीत असताना सचिन देव बर्मन आपली गाडी घेऊन आले होते. त्यावेळी त्यांना हा मेकॅनिक शायर भेटला. त्याने आपल्या कविता बिमल रॉय, हृषिकेश मुखर्जी यांना वाचून दाखवल्या. आणि बिमल रॉय यांनी ‘ बंदिनी ‘ या चित्रपटासाठी गाणे लिहायला सांगितले. ‘ मोरा गोरा अंग लै ले, मोहे शाम रंग दै दे ‘ हे त्यांचं पहिलं गाणं सगळ्यांना खूप आवडलं आणि ते बिमल रॉय यांचे सहाय्यक म्हणून काम करू लागले, मग त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. हा कल्पनांचा झरा गेली ६-७ दशके अव्याहत वाहतो आहे.

अध्यात्मापासून प्रणय गीतांपर्यंत सर्व विषयांना हात घालणारे रवींद्रनाथ टागोर, शायरी हा आत्मा असणारा गालिब, मीरेची पदे, गीतकार शैलेंद्र आणि पंचमदांचे हास्याचे फुलोरे या सर्वांनी गुलजार यांना भुरळ घातली आणि सारे त्यांचे गुरू बनले. हिंदी व उर्दू वर प्रभुत्व असणाऱ्या या कवीचे प्रेम मात्र बंगालीवर होते, त्याशिवाय खडी बोली, ब्रज भाषा, मारवाडी, हरियाणवी या भाषांतही त्यांनी लिखाण केले आहे. त्यांचे कित्येक कविता संग्रह, कथा संग्रह प्रकाशित झाले आहेत. ‘रावीपार ‘  हा त्यांचा कथासंग्रह खूप गाजला. कुसुमाग्रज यांच्या मराठी कवितांचे व टागोरांच्या बंगाली कवितांचे हिंदीत भाषांतर त्यांनी केले. त्यांची मुलगी मेघना १३ वर्षांची होईपर्यंत दर वाढदिवसाला तिच्यासाठी गोष्टी, कविता लिहून त्याचे पुस्तक भेट देत होते.त्यांचे ‘चड्डी पेहेनके फूल खिला हैं ‘ गाणं माहीतच आहे. याशिवाय त्यांनी कित्येक चित्रपटांच्या पटकथा, संवाद लिहिले आहेत, जसे आनंद, गुड्डी, बावर्ची, कोशिश, आँधी, मासूम, रुदाली एकापेक्षा एक सरस!गाणी पण  काय, तुझसे नाराज नाही, चिठ्ठी आयी है, इस मोडसे जाते हैं, मेरा कुछ सामान अशी कित्येक गाणी आहेत की त्यातल्या कल्पना भन्नाट आहेत. हळुवार व संवेदनशील कथा, अर्थपूर्ण व आशयघन गाणी हे त्यांचं वैशिष्ट्य ! ‘ मेरे अपने ‘ या चित्रपटापासून ‘ हू तू तू ‘ पर्यंत बऱ्याच चित्रपटांचं दिग्दर्शन, किताबें झांकती हैं बंद अलमारीके  शीशोंसे, दिलमें ऐसें ठहर गये हैं गम, आदमी बुलबुला हैं पानीका अशी भावनाप्रधान शायरी! किती आणि काय काय!

कवितांतून ते कधी ईश्र्वराशी गुजगोष्टी करतात, कधी  त्याला निरक्षर म्हणतात, कधी त्याचे अस्तित्व नाकारतात. विषय दाहक असो वा कोमल, अतिशय संयमित शब्दात आशय पोहचविण्याचे काम त्यांची कविता करते. आज नव्वदीत सुध्दा त्यांच्या कविता, शायरी तरुणांनाही भावते. कुणीतरी असं म्हटलंय की गुलजार शब्दांच्या चिमटीत काळाला धरून ठेवतात, त्यामुळे त्यांची कोणतीही कविता आजची, कालची व उद्याचीही असते. ते कवितेत प्राण फुंकतात.

नुकताच गुलजार यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला, आणि प्रत्येक भारतीयाला मनापासून आनंद झाला. त्यांच्याबद्दल काय आणि किती लिहायचं असं झालंय. थोडं लिहून कौतुक संपेल असं हे कामच नाही. पण प्रत्येकाला काही लिहावं असं वाटतंय.त्यांना मिळणारा हा सर्वोच्च पुरस्कार असला तरी त्यांना मिळालेल्या पुरस्कारांची यादीही मोठी आहे.२००२ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार,२००४ मधे पद्मभूषण, २०१३ मधे दादासाहेब फाळके पुरस्कार, साधारण २० वेळा फिल्म फेअर, २००९ मधे स्लमडॉग मिलेनियम या चित्रपटातील ‘ जय हो ‘ या गीत लेखनासाठी सर्वश्रेष्ठ ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. इतके पुरस्कार मिळून सुध्दा पाय जमिनीवर असणारा हा अवलिया प्रसिध्दी व ग्लॅमर या पासून कायमच दूर राहिला. स्वतःच्या तत्वांवर जगला. कुणीतरी ऑस्कर घेण्यासाठी कां गेला नाहीत असे विचारल्यावर

मिस्किलपणे म्हणतात, त्यांचा ड्रेस कोड असणारा काळा कोट माझ्याकडे नाही आणि मला काळा कोट देईल असा कोणी माझा वकील मित्रही नाही. जन्माने शीख असणारे गुलजार, लग्न हिंदू स्त्री बरोबर करतात, मीनाकुमारी आजारी पडल्यावर तिचे रोजे करतात. सहज न समजणारा माणूस! कदाचित त्यांच्या तरुणपणी त्यांनी देशाची फाळणी अनुभवली, त्यानंतरचा नरसंहार, कुटुंबाची फरफट डोळ्यांनी पाहिली. नंतर त्यांनी पाकिस्तानला जाऊन त्यांचं जुनं घर, ती गल्ली पाहिली म्हणे. त्यांच्या कवितांमधूनही तो ‘ दर्द ‘ डोकावतो. कदाचित त्यामुळेच त्यांच्या मनातले हे दुःख  शब्दात आले असावे –

‘छोड आये हम वो गलियाँ’

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “कविता आणि मी…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ “कविता आणि मी…” ☆ सौ राधिका भांडारकर 

कळत नकळत आपल्या जीवनाची जडणघडण होत असताना कुणाकुणाच्या आपल्या आयुष्यातील जागा  ठळकपणे ठरत जातात. आपले कुटुंबीय, आपले गुरुजन, आपले सखे सोबती,अफाट निसर्ग, इतकेच नव्हे तर आपले प्रतिस्पर्धी, विरोधक यांना सुद्धा आपल्या जीवनात कोणते ना कोणते स्थान असतेच.

माझेही जीवन  यापेक्षा वेगळे नाही. पण जेव्हा जेव्हा मी सखोलपणे माझ्या वर्तमान आणि गतायुष्याचा विचार करते तेव्हा मला जाणवतं की  मला आयुष्यात खूप काही मिळालं ते भाषिक साहित्यातून. कथा, कादंबऱ्या, कविता,चरित्रं, ललित साहित्याचा हात धरूनच मी वाढले आणि गद्य आयुष्य जगत असताना पद्यांनी माझ्या भोवती सदैव एक हिरवळ जपून ठेवली.

या माझ्या जीवनात कवितांचे स्थान काय याचा विचार करत असताना मनात आलं ही कविता तर माझ्यासोबत जन्मानंतरच नव्हे तर जन्मापूर्वीही होतीच की! मातेच्या उदरात वाढत असताना

। ये ग ये ग विठाबाई।

। दहीभाताची उंडी घालीन तुझ्या तोंडी।

 ।कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम।

हले हा नंदाघरी पाळणा।। 

किंवा 

कन्हैया बजाव बजाव मुरली।  

…. अशी अनेक गाणी माझ्या आईने तिच्या उदरात वाढणाऱ्या गर्भाला गोंजारून म्हटलीच असणार आणि ते नाद ते शब्द माझ्यात, गर्भात असतानाच झिरपले नाही का?

त्याच माझ्या मातेने मांडीवर थोपटत “निज निज रे लडिवाळा” किंवा “ये ग गाई गोठ्यामध्ये बाळाला दूध दे वाटीमध्ये”  “आडगूळ मडगुळ सोन्याचं कडगुळं” अशी कितीतरी बडबड गीतं गाऊन मला जोजवलं, वाढवलं.

“ उठा उठा चिऊताई सारीकडे उजाडले डोळे तरी मिटलेले अजूनही”

असेच म्हणत मला झोपेतून जागं केलं. त्यावेळच्या या बाल कवितेने जीवनातला केवढा तरी मोठा आशय नंतर दाखवलाही.

जेवू घालताना तिने

“ चांदोमामा चांदोमामा भागलास का?” म्हणत माझ्या मुखी अमृततुल्य वरण भाताचे घास भरवले.

कधी रडले, कधी रुसले तर,

“ रुसु बाई रुसु कोपऱ्यात बसू तिकडून आला बाई कोणीतरी खुदकन हसू” शिवाय “लहान माझी बाहुली मोठी तिची सावली”

“ पाऊस आला मोठ्ठा पैसा झाला खोटा”

“ ये ग ये ग सरी माझे मडके भरी” अशा अनेक गीतांनी माझं बालपण बहरलं. मला सदैव हसवलं, आनंदी ठेवलं आणि संस्कारितही केलं.

केव्हातरी रात्र उलटून गेली…  बालपण सरलं  पण कवितांनी कधीच सोबत सोडली नाही. त्यावेळी अंकुरलेल्या   कोवळ्या प्रीतीच्या भावना जाणवणारे उद्गार मीही कागदावर  उतरवले असतील.त्या कविता मात्र फक्त माझ्या आणि माझ्या अंतर्मनात घुमणारी स्पंदने होती.

त्यावेळी 

“जेथे सागरा धरणी मिळते तेथे तुझी मी वाट पाहते” या काव्य शब्दांनी माझ्याही मनातली अव्यक्त, अनामिक हुरहुर जाणवून दिली होती.

आयुष्याचे कितीतरी टप्पे ओलांडले. तळपत्या उन्हात रस्त्यावरचे वृक्ष जसे सावली देतात ना तशी शितल छाया मला केशवसुत, पाडगावकर, विंदा, बोरकर, ग्रेस, वसंत बापट, शांताबाई, बहिणाबाई, इंदिरा संत आणि कितीतरी…. यांच्या कवितांनी दिली.

 विमनस्कपणे स्वपदे उचलीत

 रस्त्यातुन मी होतो हिंडत 

एका खिडकीतून सूर तदा पडले 

दिड दा दिड दा दिड दा…

केशवसुतांच्या या सतारीच्या बोलांनी तर कित्येक वेळा माझ्या आयुष्यात दाटलेला काळोख दूर केलेला आहे.

“मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा

पाठीवर हात ठेवून नुसते लढ म्हणा..”

या काव्यांने तर जादूच केली म्हणा ना! सकारात्मक जीवन जगण्यासाठी जणूं काही मजबूत दरवाजे उघडून दिले..

 झाकळूनी जळ गोड काळीमा पसरे

 लाटांवर

 पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर 

किंवा 

हिरवे हिरवे गार गालिचे 

हरित तृणांच्या मखमलीचे 

त्या सुंदर मखमाली वरती 

फुलराणी खेळत होती…

बालकवींच्या या कवितांनी तर निसर्गाशी मैत्रीच घडवली. वृक्षवेलींशी संवाद साधला.

 “लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते”

या बहिणाबाईंच्या रसाळ काव्यपंक्तींतून तर जीवनातल्या तत्त्वज्ञानाचे कोडे अगदी सहजपणे सोडवले. काळ्या मातीशी नातं जोडलं.

कवी ग्रेस संपूर्णपणे नाही उमगले. पण

 “ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता

 मेघात अडकली किरणे हा सूर्य सोडवत होता…”

 या ओळींनी मन अक्षरशः घनव्याकुळ झाले.

 हा रस्ता अटळ आहे 

अन्नाशिवाय कपड्याशिवाय 

ज्ञानाशिवाय मानाशिवाय

 कुडकुडणारे हे जीव 

पाहू नको, डोळे शिव!

 नको पाहू जिणे भकास

 ऐन रात्री होतील भास 

छातीमध्ये अडेल श्वास

 विसर यांना, दाब कढ

 माझ्या मना बन दगड…

 विंदांनी तर खिळे ठोकावे तसे शब्द आणि विचार मनावर अक्षरशः ठोकले. आणि दमदारपणे जगण्याची कणखर प्रेरणा दिली.

 “माझी मैना गावाकडे राहिली

 माझ्या जीवाची होतीया काहिली” शाहीर अण्णाभाऊंच्या या कवितांनी तर अनेक वेदनांना उघडं केलं.

 “होऊ दे जरा उशीर सोडतोस काय धीर रात संपता पहाट होई रे पुन्हा

 देवाक काळजी रे माझ्या देवाक काळजी रे …

गुरु ठाकूर यांचे हे गीत खरोखरच मनातले अंधारलेले कप्पे क्षणात उजळून टाकतात. आधार देतात.

अशा कितीतरी कविता …

आयुष्यात उचललेल्या प्रत्येक पावला सोबत येत गेल्या. कविता माझ्या जीवनात सदैव सावली सारख्या सोबत असतात. 

“तेरी आवाज मे कोई ना आये

 तो फिर चल अकेला रे, 

यदि सभी मुख मोड रहे सब डरा करे 

 तब डरे बिना ओ तू मुक्तकंठ

 अपनी बात बोल अकेला रे

 तेरे आवाज पे कोई ना आये तो फिर चल अकेला रे 

रवींद्रनाथ टागोरांच्या या कवितेने जीवन वाटेवरचे काटे अगदी सहजपणे वेचायला शिकवले, नव्हे त्या काट्यांनाच बोथट केले.

कवितांचे आपल्या जीवनात  स्थान काय याविषयी काही भाष्य करताना मी वर्ड्सवर्थच्याच  शब्दात म्हणेन

FOR OFT WHEN ON MY COUCH I LIE

IN VACCANT OR IN PENSIVE MOOD 

THEY FLASH UPON THAT INWARD EYE

WHICH IS THE BLISS OF MY SOLITUDE

AND THEN MY HEART WITH PLEASURE FILLS

AND DANCES WITH THE DAFFODILS….

जेव्हां मी एकटी असते, उदास लेटलेली असते तेव्हां खरोखरच —रेताड, रुक्ष  वाळवंटात ठिकठिकाणी उगवलेली सोनेरी डॅफोडील ची फुले जशी मनाला प्रसन्न करतात तसं कवितांनी माझं मन टवटवीत ठेवलं.

 अंगणात प्राजक्ताचा सडा बरसावा  तसे कवितांनी माझ्या आयुष्यात आनंदाचे शिंपण केले.

 कवितांच्या अथांग सागराने माझी जीवन नौका  डुबु  दिली नाही. तिला पैल तीरावर सांभाळून नेले.

 जोडीदाराच्या हातात हात घालून पैल तीर गाठतानाही सुहास पंडितांच्या या काव्यपंक्तीच मनावर रेंगाळतात.

धकाधकीच्या जीवनातले 

क्षण शांतीचे वेचून घेऊ 

तुडुंब भरले कुंभ सुखाचे

 हासत पुढच्या हाती देऊ

 खूप जाहले खपणे आता

 जपणे आता परस्परांना

खूप जाहला प्रवास आता

 गाठू विश्रांतीचा पार जुना….

मातीतून मातीकडे जाताना, मातीत पेरलेल्या या  महान कवींच्या कवितांनी आयुष्यभर दीपस्तंभ सारखी सोबत केली. बेडा पार किया..

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “एका अल्पपरिचित इतिहास अभ्यासकाची जयंती !” – लेखक : श्री नंदन वांद्रे ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलु साबणेजोशी 

?इंद्रधनुष्य? 

☆ “एका अल्पपरिचित इतिहास अभ्यासकाची जयंती !” – लेखक : श्री नंदन वांद्रे ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी

एका अल्पपरिचित इतिहास अभ्यासकाची जयंती !

कै. काशिनाथ नरसिंह तथा बापू केळकर.

सन १९३७ !! फिलीप फॉक्स नामक ब्रिटीशाने झाशीच्या राणी लक्ष्मीबाई महाराज साहेबांबद्दल अपमानकारक लेखन केलेलं होतं. ते लिखाण वाचून एका तरूणाचं मन बंड करून उठलं. या विषयावर अभ्यास करुन, त्यावर लेखन करुन, ‘ सत्य काय ’ ते जनमानसापर्यंत पोचवण्यासाठी त्याने असंख्य ऐतिहासिक कागदपत्रं धुंडाळली. दुर्दैवाने त्या वेळच्या ब्रिटीश अंमलाखाली अनेक साधनं आधीच नष्ट झालेली होती. त्याच वर्षी त्याने झाशी, कानपूर, ग्वाल्हेर, ब्रह्मावर्तासारख्या अनेक ऐतिहासिक ठिकाणांना भेट देऊन त्यांचा सूक्ष्म अभ्यास केला. कागदपत्रं शोधून अभ्यासली, तपासली. १८५७ च्या पहिल्या भारतीय स्वातंत्र्यसमरानंतर कित्येक दशकांचा काळ उलटून गेलेला होता. १८५७ चे बंड व त्या काळचा इतिहास समजणं दुरापास्त झालेलं होतं. लॉर्ड जॉर्ज कॉनवेल या ब्रिटीशाने लिहिलं होतं – ” १८५७ चा खरा इतिहास या पुढे कधी बाहेर येईल किंवा कोणाला समजेल ही आशा व्यर्थ आहे “. अशा प्रतिकूल परिस्थितीतही भरपूर अभ्यास करुन झाशीच्या राणी साहेब आणि १८५८ विषयाबद्दलची जास्तीतजास्त योग्य ती माहिती ‘ केसरी ’ मध्ये लेखमाला लिहून जनमानसापर्यंत पोचवायचं काम केलेलं अजोड अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणजे कै. काशिनाथ नरसिंह तथा बापू केळकर.

धर्मशास्त्र, इतिहास, राजकारण, चित्रकला, ज्योतिषविद्या अशा वैविध्यपूर्ण विषयांचा व्यासंग असलेल्या व नंतर वकील झालेल्या काशिनाथ यांचा जन्म २५ फेब्रुवारी १९०० साली तात्यासाहेब म्हणजे श्री. न. चिं. केळकर यांच्या घरी झाला. काशिनाथ हे तात्यासाहेबांचे जेष्ठ चिरंजीव. स्वभावाने थोडे अबोल, मितभाषी पण जुन्या काळात मनस्वी रमणारे काशिनाथ इतिहासाबद्दल रूची बाळगून होते. त्यांचा ‘ १८५७ ’ व  ‘ नेपोलियन ’ या दोन विषयांवरचा अभ्यास थक्क करून टाकणारा होता. बी.ए. व वकिलीसारखा क्लिष्ट अभ्यासक्रम पार पाडतानाही त्यांनी हा इतिहासाचा अभ्यास केला, त्यात संशोधन केलं, हे खरोखर विशेष!! ॲडव्होकेट होत असतानाच त्यांनी ‘ज्योतिर्भूषण’ ही पदवीदेखील मिळवलेली होती ज्याचा त्यांना सार्थ अभिमान होता.

अतिशय पितृभक्त असलेल्या काशिनाथ केळकरांनी वडिलांचा लेखनवारसा पुढे चालवत ‘केसरी’ वृत्तपत्रामधून विपुल लिखाण केलं. त्यांनी केलेली वाङ्मय सेवा व साहित्य निर्मिती बहुत दखलपात्र आहे. “ आपल्या वडिलांचे लेखणीशिवाय आपण दुसऱ्या कोणासही गुरू मानले नाही ” असं त्यांनी आपल्या आत्मचरित्रात, ” वाळवंटातील पाऊले ” मध्ये नमूद केलेलं आहे. जाज्वल्य पितृभक्तीचा झळाळता अभिमान त्यांनी आयुष्यभर बाळगल्याचे अशा वाक्यांतून सतत दिसत राहते. त्यांच्या जन्मपत्रिकेतला माणसाला प्रसिद्धी बहाल करणारा ग्रह मात्र अयोग्य घरात पडलेला होता. प्रसिद्धी मिळाली नाही तरीही या नादिष्ट लेखकानं केसरी पाठोपाठ ‘ सह्याद्री ’मध्येही पुष्कळ लेखन केलं.

स्वतःच्या लिखाण कामाखेरीज त्यांनी आपल्या वडिलांच्या हजारो पृष्ठांच्या अप्रकाशित साहित्याचे सहा ग्रंथ प्रकाशित केले. काशिनाथ केळकरांची ही कामगिरी अतिशय बहुमूल्य स्वरूपाची आहे. ” केळकर निबंधमाला ” या साक्षेपाने संपादित व प्रकाशित केलेला त्यांचा हा ग्रंथ ‘ केळकर अभ्यासकांना ’ न डावलता येण्याजोगा आहे. श्री. न. चिं. केळकर यांनी आपल्या सर्व प्रकाशित व अप्रकाशित साहित्याचे हक्क काशिनाथांकडे दिलेले होते. पूर्वपरवानगी शिवाय त्या साहित्याचा वापर करणाऱ्यांना ॲडव्होकेट काशिनाथांनी स्वतःच्या वकिली ज्ञानाची चुणूकही चांगलीच दाखवलेली होती.

घरी ते अनेकांच्या जन्म कुंडल्या तयार करून भविष्यकथन करीत. जर्मनीचा हुकुमशहा हिटलरच्या अंताचं त्यांनी वर्तवलेलं भविष्य तंतोतंत खरं ठरलं होतं. लेखन व इतर सर्व जबाबदाऱ्यांसोबत ते उत्तम चित्रही काढायचे. स्वतःच्या वडिलांचं व नेपोलियनचंही त्यांनी चित्र काढलं होतं. हे एक विशेषच म्हणावं लागेल. ऐतिहासिक लेखनामध्येही त्यांनी जुनी चित्रं शोधून आपल्या वाचकांसाठी ती उपलब्ध करुन दिलेली आहेत. नानासाहेब पेशव्यांचं चित्र हे त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणता येईल.

बापूंच्या आत्मचरित्राखेरीज महत्त्वाच्या इतर वाचनीय पुस्तकांची यादी खाली देत आहे:-

रामायणावरील काही विचार (१९२८)

शेतीवाडीची आर्थिक परीक्षा (१९३५)

हिंदुव्यवहार धर्मशास्त्र (१९३२)

नेपोलियन व हिटलर (१९४६)

नेपोलियन व्यक्तीदर्शन (१९४६)

शमीपूजन (१९४७)

‘दोन घटका मनोरंजन’ हा त्यांचा निवडक लेख संग्रहही खूप मनोरंजक आहे. 

‘नेपोलियन’ व ‘१८५७’ या दोन विषयांवर बापू तासन्-तास बोलत. इतर कोणी नेपोलियनवर अभ्यास वा लिखाण केलं तर ते वाचून आवर्जून प्रतिक्रिया देत. थोर इतिहास अभ्यासक कै. म. श्री. दिक्षित यांच्या संग्रहामध्ये बापूंनी पाठवलेलं असंच एक ‘ शाबासकी पत्र ’ दिसून येतं.

श्री. न. चिं. केळकर यांचे अनेक गुण त्यांच्या दोन्ही सुपुत्रांनी, काशिनाथ व यशवंत यांनी, अंगी बाणवले. वडिलांनी बांधलेलं घर त्यांनी जिवापाड सांभाळलं. बापू वयाच्या ८२व्या वर्षी १० एप्रिल १९८२ रोजी देवाघरी गेले.

आज २५ फेब्रुवारी! बापूंचा १२४ वा जन्मदिवस!!

अतिशय विपुल काम, संशोधन आणि लेखन केलेले, वडिलांची किर्ती आपल्या कामांमधून वृद्धिंगत करणारे कै. काशिनाथ नरसिंह केळकर हे विस्मृतीत गेलेले इतिहास अभ्यासक आज आपणा सर्वांसमोर आणत आहे. माझ्या अल्पशा लेखनसेवेतून या निमित्ताने त्यांच्या पवित्र स्मृतींना आदरांजली अर्पण करतो.

गेल्या अनेक वर्षांच्या अथक परिश्रमातून बापूंचा जुना दुर्मिळ फोटो मिळवू शकलो आणि सर्वांचा समोर आणू शकलो हा आनंद शब्दात व्यक्त करता येणार नाही मला.

लेखक : श्री  नंदन वांद्रे

पुणे

संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी

मो – 9421053591

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आई मला जरा आराम हवा आहे – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? वाचताना वेचलेले ?

☆ आई मला जरा आराम हवा आहे… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी

शाळेत जाणारी मुलगी अभ्यास, शाळा, क्लास करून थकून आईला म्हणाली.

“अगं चांगला अभ्यास कर, नंतर आरामच करायचा आहे..”

मुलगी उठली, अभ्यासाला लागली आणि आराम करायचा राहून गेला.

“आई थोडा वेळ दे आरामाला, ऑफिसच्या कामातून थकून गेल्येय मी पार..”

“अगं लग्न करून सेटल हो एकदाची, मग आरामच करायचा आहे..”

मुलगी लग्नासाठी तयार झाली आणि आराम करायचा राहून गेला.

“अहो इतकी काय घाई आहे, एखादा वर्ष थांबू ना जरा..”

“अगं मुलं होऊन गेली वेळेवर की टेन्शन नाही, नंतर आरामच करायचा आहे..”

मुलगी आई बनली आणि आराम करायचा राहून गेला..

“अगं तुलाच जागरण करावं लागेल, मला ऑफिस आहे उद्या..थोडेच दिवस फक्त. मुलं मोठी झाली की आरामच करायचा आहे..”

ती बाळासाठी रात्रभर जागी राहिली आणि आराम करायचा राहून गेला.

“अहो मुलं आता शाळेत जायला लागली, जरा निवांत बसू द्या की मला..”

“मुलांकडे नीट लक्ष दे, त्यांचा अभ्यास घे, नंतर आरामच करायचा आहे..”

ती मुलांचा प्रोजेक्ट करायला बसली आणि आराम करायचा राहून गेला..

“आता मुलं स्वतःच्या पायावर उभी राहिली, आता जरा निवांत झाले मी..”

“आता यांच्या लग्नाचं पाहावं लागेल. ती एक जबाबदारी पार पाडली की मग आरामच करायचा आहे..”

तिने कंबर कसून सगळा कार्यक्रम आटोपला आणि आराम करायचा राहून गेला..

“मुलं संसाराला लागली, आता मी आराम करणार..”

“अगं आपल्या सुधाला दिवस गेले आहेत ना. मुलीचं बाळंतपण माहेरी करायचंय असतं ना..”

मुलीचं बाळंतपण आवरलं आणि आराम करायचा राहून गेला..

“चला, ही पण जबाबदारी पार पडली, आता मात्र आराम.”

मुलांचंही लग्न झालं. घरात नातू आला.

“सासूबाई मला नोकरी परत जॉईन करायची आहे..अथर्वला सांभाळाल का?”

नातवाच्या मागे दमली आणि आराम करायचा राहून गेला..

“चला नातू मोठा झाला, आता सगळ्या जबाबदाऱ्या संपल्या.. आता मी आराम करणार..”

“अगं ऐकलंस कां, गुडघे दुखताय माझे, उठून उभं रहायला जमत नाही..Bp वाढलाय वाटतं, डायबिटीस पण आहे..डॉक्टरने वेळेवर पथ्यपाणी करायला सांगितलंय बरं का..”

नवऱ्याची सेवा करत करत उरलं सुरलं आयुष्य गेलं..आणि आराम करायचा राहूनच गेला..

एक दिवशी देवच आला खाली, आराम करायचाय ना तुला? तिने हात जोडले आणि देव तिला  घेऊन गेला..अखेर तिला आराम मिळाला. चिरंतन आराम !!

सर्व स्त्रियांना समर्पित.

स्त्री दिनाच्या मनापासून शुभेच्छा…

लेखक : अज्ञात 

संग्राहक – सुहास सोहोनी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares