घरभर फिरली भिरभिरत्या पंखाने. अक्षरशः नाचतच होती इथून तिथे. पाय म्हणून, ठरतच नव्हते. जणू सगळं घाईचंच होऊन बसलं होतं. सांगावंसं वाटलं, अगं जरा हळू चाल…. पण ती काही ऐकणार नव्हती. तिचं आपलं निरीक्षण चालू होतं दिवसभर बस्तान कुठे बसवायचं ते. तिच्या चिवचिवाटाने कान कावले होते. मधूनच ती गायब होई. पुन्हा काहीवेळात खिडकीच्या गजावर दिसे. मग हॉलभर फिरे. किचनमधे उडे, व्हरांड्यातून तर सारखी येजा. बेडरूममधे ही चक्कर मारून आली. कधी ट्युबलाईट वर विसावे तर कधी पंख्यावर विसावे. कधी कपाटावरचा कोपरा धुंडाळे तर कधी खोल्यांमधल्या दारांवरून सूर मारे. शेवटी वैतागून मीच तिच्याकडे दुर्लक्ष करण्याचे ठरवलं.
दुसऱ्या दिवशी सकाळीस ती लगबगीत असलेली इटुकली दिसेना म्हणून मीच अस्वस्थ झालो. बायको म्हणाली, ‘येईल पुन्हा, ’ मी वर्तमानपत्र हातात घेऊन स्वस्थ होण्याच्या प्रयत्नात. पण थोडंफार वाचून झाल्यावर, वर्तमानपत्र हलकेच खाली सरकलं जाई, मग माझी नजरच भिरभिरायला लागे. ती कुठेच दिसेना तर पुन्हा डोकं वर्तमानात खुपसलं. तसाच ऑफिसला गेलो. मनात प्रश्नचिन्ह घेऊन, ‘ कुठे गेली असेल? ’ दिवसभर मीच ‘चिवचिव’ला अधीर. संध्याकाळी घरी आलो तरीही घरभर शांतताच. अगदी अचानक आलेली पाहुणी अलोप व्हावी याची रूखरूख मनात.
सकाळीस जाग आली ती घागर हिंदकळावी खळखळून तसं हिचं माझे दोन्ही बाहू धरून उठवणं चालू होतं. काय? माझा प्रश्नचिन्ह असलेला चेहेरा पाहून ती बोलली. चला वरती हे बघा पोटमाळ्यात काय आहे ते!! धडकीच भरली. असं काय असेल सकाळी सकाळी पोटमाळ्यावर? मी तडक पाहिलं तर पोटमाळ्यावर एक कोनाडा रिकामा सुटलेला होता त्यात लगबगीनं ती इटुकली व तो पिटुकला वरच्या कौलांतून व पोटमाळ्याच्या त्रिकोणी खिडकीतून वाट काढत गवताच्या काड्या व काटक्या गोळा करून आणून टाकत होते. बस्तान बसवायला जागा सापडली तर मी मनात खुश होऊन पुटपुटलो. खाली येताच छानशी शीळही घातली मी. तसं आल्याचा चहा हातात देत बायकोने कोपरखळी मारलीच. ‘ आली ना परत पाहुणी!! झाला ना मनासारखा शेजार!! ’ मीही चहाचा घोट घेत फिरकी टाकलीच, ‘ सखी शेजारिणी!! ’ तसं दोघं हसत सुटलो.
दोन तीन दिवसात हॉल कम बेडरूम कम सबकुछ छानसं घरटं उभं राहिलं. त्यात कुठूनतरी कापूसही आणून टाकला होता बहुतेक पिटुकल्याने. बोर्ड लावायचं का? हिचं तुणतुणं चालूच. डोळ्यात मिश्कीली. तर माझ्यात पुन्हा प्रश्नचिन्ह. तिनंच खुलासा केला, ‘ छोटंसं बॅनर, नांदा सौख्यभरे! ’ आता माझ्यापेक्षा हीच जास्त गुंतत गेली. मातीचं खापर आणलं बाजारातून त्यात पाणी भरून ठेवलं. रोज वाटीभर मऊसूत भातही पोटमाळ्यावर पोहोचायला लागला. “ आणखी काय काय आवडतं हो खायला त्यांना, मी करत जाईन तेवढं!! ” मला तसं म्हटलं तर पाखरांबद्दलचं ज्ञान अगाधच!! पोपट असता तर हिरवी मिरची, पिकलेला पेरू वगैरे सांगून तरी टाकलं असतं. मग हिनेच शक्कल लढवत, शिजवलेले तेही वाफाळलेले हिरवे मूग, वाफाळलेलेच मिठातले शेंगदाणे, लालचुटूक डाळिंबाचे दाणे अन् काय काय सुरू केलं!! मी आपला प्रश्नकर्ता नेहेमीचाच…. “ अगं इतकं सगळं लागतं का त्यांना? ” हिनं मान डोलावत चपखल उत्तर दिलं. “ तुम्हाला नाही कळायचं, डोहाळे लागले की लागतंच सगळं!! ” प्रश्नचिन्हा ऐवजी माझे डोळे विस्फारलेले. “ तुला कसं कळलं शुभवर्तमान? ” “ बघाच तुम्ही, मी म्हणतेय ते खरं की नाही? ’ तसं हीचं काहीच चुकत नाही. काही दिवसांतच सहा अंडी प्रकट जाहली मऊसूत कापसावर.
मग काय इटुकली ठाण मांडून कोनाड्यात तर पिटुकल्याची येजा वाढली आतबाहेर. घरात कोवळे जीव वाढणार याचा कोण आनंद आम्हा दोघांना, त्या दोघांसह. चैनच पडेना. सारखी उत्सुकता. ऑफिसमधूनही हिला विचारणं व्हायचं, “ एनी प्रोग्रेस? ” दिवसातून दोन तीनदा पोटमाळ्यावर चढणं. काही हालचाल दिसतेय का? हे पाहणं! अजून काहीच कसं नाही? हा प्रश्न खांबासारखा उभाच. “ सगळं निसर्गनियमा सारखं होईल, धीर धरा. ” हिचा मोलाचा सल्ला. तरीही आतून आमचाच जीव वरखाली!! खरंतर आमचे अगोदर कावलेले कान आतुरलेले कोवळी चिवचिव ऐकण्यासाठी.
माझ्या बाल्कनीतल्या झोक्यावर संध्याकाळी बसले की मन असे स्वैरपणे फिरत असते. तीन-चार वर्षांपूर्वी लॉकडाऊनच्या काळात बाहेर फिरता तर येत नसे, पण या झोक्यावर बसून मन मात्र भरपूर फिरून येई. दिवसभराच्या उन्हाच्या काहिली नंतर येणारी संध्याकाळची वाऱ्याची झुळूक तन आणि मन दोन्ही शांतवून टाकते. थंडी किंवा पावसाळ्यात या झुळूकेचे तितके महत्त्व नाही ,पण उन्हाळ्यात ही झुळूक खूपच छान वाटते! दु:खानंतर येणार सुख जसं जास्त आनंद देते तसेच आहे हे!
सतत सुखाच्या झुल्यावर झुलणाऱ्याला ती झुळूक कशी आहे हे फारसे जाणवणार नाही, पण खूप काही कष्ट सोसल्यानंतर येणारे सुखाचे क्षण मात्र मनाला गार वाऱ्याच्या झुळूकीचा आनंद देतात!हीच झुळूक कधी आनंदाची असते,
कधी मायेची असते. एखाद्याला घरात जे प्रेम मिळत नाही पण दुसऱ्या कुणा कडून तरी, अगदी जवळच्या नात्यातून, शेजारातून किंवा मित्र-मैत्रिणींकडून मिळते तेव्हा तो प्रेमाचा सुखद ओलावा ही त्याच्या मनाला मिळालेली आनंदाची झुळूक असते!
कधी कधी साध्या साध्या गोष्टीतूनही आपण आनंद घेतो. गर्दीने भरलेल्या बसमध्ये कशीबशी जागा मिळून बस जेव्हा सुटते, तेव्हा खिडकीतून येणारी वाऱ्याची झुळूक आपल्याला’ हुश्श’ करायला लावते. कधी अशी झुळूक एखाद्या बातमी तून मिळते. अपेक्षा नसताना एखादी चांगली गोष्ट घडली तर ती सुखद झुळुकीसारखीच असते. माणसाचे आयुष्य सतत बदलत असते. कधी एकापाठोपाठ एक इतकी संकटे येतात की त्या सर्वांना कसे तोंड द्यावे कळतच नाही! पण अशावेळी अचानकपणे एखादी चांगली गोष्ट घडते की, त्यामुळे आयुष्याला कलाटणी मिळते!
माझ्या परिचित एका मैत्रिणीची गोष्ट. तिच्या नवऱ्याचा एक्सीडेंट झाला. जीव वाचला पण हॉस्पिटलमध्ये दोन महिने पडून राहावे लागले. दोन लहान मुली होत्या तिला. नवऱ्याचा व्यवसाय बंद पडलेला.. राहायला घर होते पण बाकी उत्पन्नाचे साधन नव्हते. पण अचानकपणे तिने अर्ज केलेल्या नोकरीचा कॉल आला. ट्रेनिंग साठी एक महिना जावं लागणार होतं, मुलींना आपल्या नातेवाईकांजवळ सोपवून ती ट्रेनिंग पूर्ण करून आली.आणि नोकरी कायमस्वरूपी झाली आणि आयुष्यात सुखाची झुळूक आली.
वादळ वाऱ्यात झाडं ,घरं, माणसं सारीच कोलमडतात.. वादळ अंगावर घेण्याची कुवत प्रत्येकात असतेच असे नाही. पण ‘झुळूक’ ही सौम्य असते. ती मनाला शांती देते.
लहानपणी अशी झुळूक परीक्षेनंतर मिळायची. भरपूर जागरणे, कष्ट करून अभ्यास करायचा आणि मग पेपर्स चांगले गेले की मिळणारा आनंद असाच झुळूकीसारखा वाटायचा! रिझल्ट ऐकला की मन अगदी हलकं फुलकं पीस व्हायचं आणि वाऱ्यावर तरंगायला लागायचं! अशावेळी कृतकृत्यतेची झुळूक अनुभवायला मिळायची!
वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या रूपात ही झुळूक आपल्याला साथ देते. कधी कधी आपण संकटाच्या कल्पनेने ही टेन्शन घेतो. प्रत्यक्ष संकट राहत दूर ,पण आपलं मन मात्र जड झालेलं असतं! अचानक कोणीतरी सहाय्य करते , आणि संकट दूर होते. एका आगळ्या झुळुकेचा अनुभव मनाला येतो.
कोरोनाच्या काळात आपण अशाच कठीण परिस्थितीतून जात होतो. मन अस्थिर झालं होतं. जीविताची काळजी, भविष्याची काळजी दिसून येत होती. प्रकृती आणि नियती दोन्ही आपल्या हातात नाहीत! पण तेच कोरोनाचं संकट जसं दूर झालं, तशी मनामध्ये समाधानाची झुळूक येऊन गेली! काही काळातच रोगाचे उच्चाटन झालं आणि निसर्गाने हिरावून घेतलेले आपले स्वातंत्र्य पुन्हा आपल्याला मिळाले! ती ‘सुखाची झुळूक’ अशीच सौम्य आनंद देणारी होती. सोसाट्याचा वारा आणि वादळ माणसाला सोसत नाही, त्याचप्रमाणे संकटांचा माराही झेलताना माणसाला कठीण जाते! पण थोडंसं जरी सुख मिळालं तर ती ‘सुखाची झुळूक’ माणसाला आनंद देऊन जाते.
संकटाच्या काळावर मात करताना कुठून तरी आशाताई स्वर येतात, “दिस येतील, दिस जातील…” या गाण्याचे! कोणत्याही संकटाला कुठेतरी शेवट असतोच, जेव्हा एखादं वादळ परमोच्च क्षमतेवर असतं तेव्हा कधीतरी ते लयाला जाणारच असतं! ते वादळ जाऊन शांत झुळूक येणारच असते.पण तोपर्यंत त्या वादळाला धीराने, संयमाने तोंड देत वाट पहावी लागते ! ….
… तेव्हाच त्या वादळाचे झुळुकीत रूपांतर झालेले आपल्याला अनुभवायला मिळते !
☆ एआय – मदतनीस की स्पर्धक… भाग – 1 ☆ श्री श्रीकांत कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆
इंजिनिअर या नात्याने मी गेली ४० वर्षे ऑटोमेशन क्षेत्रात काम करतो आहे. या वाटचालीत मी ऑटोमेशन क्षेत्रातली प्रगती जवळून बघितली. त्या वाटचालीतला काही अंशी वाटा उचलला आहे. या चाळीस वर्षात अगदी साध्या manual मशीन पासून ते आजच्या ए-आयपर्यंतचा काल मी बघतोय. कमीतकमी मानवी श्रमामध्ये क्षमतेपेक्षा जास्त काम करून घेणे हे ऑटोमेशनचे सुरवातीचे उद्देश. पुढे केवळ मानवी श्रम कमी करणे हा उद्देश राहिला नाही तर या ऑटोमेशनच्या माध्यमातून कमीतकमी वेळात आणि श्रमात जास्तीत जास्त उत्पादन घेणे हे शक्य झाले आणि मशीन्स त्या उद्देशाने डिझाईन होऊ लागली. टकळी चरखा वापरून सुत काढणे यापेक्षा इलेक्ट्रिक मोटारवर चालणारी मोठमोठी स्पिनिंग मशीन हे सुत काढू लागली आणि कापडाचे उत्पादन प्रचंड वाढले. मी म्हणेन की ऑटोमेशनने कापड स्वस्त केले आणि चांगल्या गुणवत्तेचे कापड सामान्य माणसाच्या आवाक्यात आले. महात्मा गांधींचा चरखा-माग वापरून जर इतक्या लोकसंख्येला कापड पुरवायचे म्हणले तर निम्मा देश आज गांधींसारखा उघडा राहिला असता आणि एक चतुर्थांश देश जाडेभरडे हरक आणि मांजरपाट कापड वापरत असता. या कापडाचे प्रकार आजच्या पिढीला माहित देखील नाहीत. जसजसा काळ गेला ऑटोमेशनचा उत्पादन क्षमता वाढवणे या पलीकडे आता वस्तूची गुणवत्ता आणि अचूकता वाढवणे हा झाला. कारण मानवाला अशक्य जमणारी गुणवत्ता आणि अचूकता मशीन सहज देऊ लागली. वर मी कपड्यांचे उदाहरण दिले. पण इतर अनेक क्षेत्रात ऑटोमेटेड मशीनने प्रवेश केला. जसे की, प्लास्टिक, घातु प्रक्रिया, शेती आणि एक ना अनेक. आज कोणतेही क्षेत्र ऑटोमेशन शिवाय नाही. ऑटोमेशनमुळे मोठ्या प्रमाणावर उत्पादकता, अचूकता आणि गुणवत्ता देऊन मानवी जीवन सुकर करण्याऱ्या वस्तू सामान्य माणसाच्या आर्थिक आवाक्यात आणून दिल्या. यात अगदी गृहिणींच्या स्वयंपाकघरातील वस्तूंपासून वाहनापर्यंत अनेक गोष्टी सामन्यांच्या आवाक्यात आल्या. ऑटोमेशनमुळे आलेली गुणवत्ता ठीक आहे पण उत्पादकता आता राक्षसी होऊ लागली आहे. उत्पादकता वाढली तशी कॉस्ट कमी होऊ लागली आणि किंमती सामन्यांच्या आवाक्यात आल्या हे जरी खरे असले. उत्पादकता मानवी मर्यादेच्या पलीकडे जाऊ लागली तसा याचा परिणाम निसर्गावर होऊ लागला. जास्त उत्पादन करण्यासाठी लागणारे रॉ मटेरीअल निसर्गातून मिळवणे अपरिहार्य असल्याने निसर्ग ओरबाडला जाऊ लागला. नवीन तयार होणारा माल बाजारात प्रचंड प्रमाणात येऊ लागल्याने यातून use and throwवृत्ती वाढली आणि प्रचंड प्रमाणात कचरा निर्मिती होऊ लागली. मानवाने निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट ही कचरा निर्मितीचे पाहिले पाउल ठरू लागले. वस्तू गरजेतून घेण्यापेक्षा स्टेट्स सिम्बॉल म्हणून घेण्याची वृत्ती वाढू लागली. ऑटोमेशनच्या पुढच्या टप्प्यात जसे इलेक्ट्रॉनिक कंट्रोल आणि software आधारित वस्तू आल्या तसे एकाच वस्तूंचे नवनवीन प्रकार (versions) आणि वैशिष्ठ्य (features) बाजारात येऊ लागले तसे वस्तूचे आपल्याकडील असलेले व्हर्जन जुने वाटू लागले. जुने टाकून नावे घ्या ही होड सुरु झाली. वस्तू टाकून देण्यासाठी ती निकामी होण्याची गरज राहिली नाही version जुने झाले out dated (obsolescence ) झाले, old fashioned झाले, हे वस्तू टाकून देण्याचे महत्वाचे कारण होऊ लागले. दर २ वर्षांनी बदलता मोबाईल, तीन वर्षांनी बदलती कार हे अभिमानाचे विषय होऊ लागले. हे घड्याळ माझ्या वडिलांनी १० वर्षे वापरले मग मी १५ वर्षे वापरले किंवा मी स्कूटर गेली १५ वर्षे उत्तम मेंटेन करून अजून वापरतोय असे अभिमानाने सांगणारी माणसे हास्यास्पद ठरू लागली.
ही सगळी प्रस्तावना करायचे कारण म्हणजे आता ए-आय येऊ घातले आहे नव्हे दारात उभे आहे. आजपर्यंत जे ऑटोमेशन घडत होते ते वस्तू उत्पादकता, वस्तू गुणवत्ता आणि अचूकता यासाठी घडत होते. मी या क्षेत्रात काम करताना उत्पादकता,गुणवत्ता आणि अचूकता या कारणांबरोबर एक सुप्त पण महत्वाचे आणि जास्त जाहीर चर्चा न केलेले कारण म्हणजे मनुष्यबळ कमी करणे हे हमखास असायचेच. एखादे ऑटोमेशन करण्याचे ठरवताना किती माणसे ते काम करत आहेत त्यातील किती कामगार कमी करता येतील किंवा दुसऱ्या कामावर वळवता येतील हा विचार करून ऑटोमेशन बजेट आणि आमचे कोटेशन मंजूर केले जाई. मनुष्यातले काही स्वभावतः असणारे दुर्गुण, भावनिक मूडवर असलेले अवलंबित्व आणि बदलती परिस्थिती यातून हे ऑटोमेशन वाढत गेले. जिथे माणूस काम करणे शक्य आहे अशी कामे देखील यंत्रे करू लागली. वाढती मनुष्यबळ कॉस्ट, सततच्या आर्थिक मागण्या, कामचुकारपणा, अनाठायी सुट्ट्या घेणे, काही अवास्तव कामगार कायदे इत्यादीमुळे उत्पादन प्रक्रियेतील मनुष्यबळ काढून तिथे automated machine ने काम करून घेण्याकडे व्यवस्थापनाचा कल वाढू लागला. यातून NC/CNC/VMCमशीन्स, रोबोट, SPMs हे सर्रास येऊ लागले या मशीन्सची उत्पादकता मानवापेक्षा जास्त होतीच पण अचूकता आणि गुणवत्ता हा मोठा फायदा व्यवस्थापनाला आणि पर्यायाने ग्राहकाला मिळू लागला. उत्पादन क्षेत्रात ऑटोमेशन वाढले तसे softwareने ऑफिस ऑटोमेशन क्षेत्रात अचूकता, वेळेची बचत आणली. वेगवेगळ्या व्यवसायात घडणाऱ्या प्रत्येक activity चे dataस्वरुपात documentation होऊ लागल्याने प्रचंड data तयार होऊ लागला. हा data व्यवसायाची पुढील दिशा (Strategy) ठरवण्यास उपयुक्त ठरू लागला. निर्णय प्रक्रियेतला महत्वाचा घटक झाला. मानवी अनुभवला फारशी किंमत उरली नाही. त्यामुळे केवळ वयाच्या आणिअनुभवाच्या जोरावर प्रमोशन देणे. १९८४ साली मी फिलिप्स कंपनीत असताना word processorनावाचे electronic टायपिंग मशीन फिलिप्सच्या डायरेक्टरच्या केबिनमध्ये आले. ते फक्त डायरेक्टर आणि त्यांची सेक्रेटरी वापरत असे. साधे पत्र लिहिण्याचे मशीन पण आम्हाला ते वापरण्याची परवानगी नसल्याने त्याचे फार अप्रूप. हे मशीन वापरणारी त्यांची सेक्रेटरी लई भाव खायची याचा आमच्या मनात मत्सर होता. आता कॉम्पुटर ऑफिस ऑटोमेशनचा भाग झाल्याने सेक्रेटरीच्या भाव खाण्याचे आणि आमच्या जळण्याचे हसू येते. फिलिप्सच्या प्रत्येक मॅनेजरच्या केबिन बाहेर त्याची सेक्रेटरीचे टेबल आणि टाईप रायटर असे. आता कॉम्प्युटरमुळे मॅनेजरच राहिले नाहीत.
मशीन ऑटोमेशनमुळे उत्पादकता वाढली त्यामुळे काही कामातील मनुष्यबळ कमी झाले असले तरी बेकारी फारशी वाढली नाही कारण या वाढत्या उत्पाद्कतेमुळे नवी क्षेत्रे तयार होत होती आणि मनुष्यबळ तिकडे वळवले गेले. आर्थिक व्यवहार प्रचंड वाढले. या वाढीव आर्थिक व्यवहारांना सहजपणे तोंड देईल अशी बँकिंग प्रणाली विकसित झाली.
सखा म्हणजे जवळचा. जवळचा म्हणजे ज्याला आपण कधीही, केव्हाही, काहीही सांगू शकतो.
त्याला आपलं म्हणावं,
त्याला सख्खं म्हणावं !
सध्याच्या कलियुगात, आपण काय करतोय, हे सख्ख्या नातेवाईकांच्या कानावर पण पडता कामा नये, इतकी खबरदारी घेतली जाते.तिथे सख्य नसते, पथ्य असते.
ज्याच्या जवळ आपण मनातलं सारं काही सांगू शकतो, मोठ्ठ्याने हसू शकतो किंवा काळजातलं दुःख सांगून स्फुंदून स्फुंदून रडूही शकतो, त्याला सख्खं म्हणावं, त्याला आपलं म्हणावं !
ज्याच्याकडे गेल्यानंतर, आपलं स्वागत होणारच असतं. आपल्याला पाहून त्याला हसू येणारच असतं.
अपमानाची तर गोष्टच नसते.’फोन करून का आला नाहीस’ अशी तक्रारही नसते !
पंढरपूरला गेल्यावर
विठ्ठल म्हणतो का,
“या या फार बरं झालं !”
माहूर वरून रेणुका मातेचा किंवा कोल्हापूर वरून महालक्ष्मीचा किंवा तिरुपतीहून गिरी बालाजीचा आपल्याला काही Whatsapp call आलेला असतो का ? या म्हणून !
मग आपण का जातो ?
कारण भक्ती असते, शक्ती मिळते आणि संकट मुक्तीची आशा वाटते ….म्हणून !
हापण एक प्रकारचा ‘आपलेपणाच’ !
लौकिक अर्थाने, वस्तूंच्या स्वरूपात देव आपल्याला कुठे काय देतो ?
किंवा आपण नेलेले तो काय घेतो ?
काहीच नाही.
रुक्मिणी काय पाठीवरून हात फिरवून म्हणते का,
“किती रोड झालीस ?
कशी आहेस ?
सुकलेला दिसतोस,
काय झालं ?”
नाही म्हणत ना.
मग दर्शन घेऊन निघताना वाईट का वाटतं ?
पुन्हा एकदा मागे वळून का पहावंसं वाटतं ?
प्रेम, माया, आपुलकी, विश्वास म्हणजेच ‘आपलेपणा’!
हा आपलेपणा काय असतो ?
आपलेपणा म्हणजे भेटण्याची ओढ.
भेटल्या नंतर बोलण्याची ओढ.
बोलल्या नंतर ऐकण्याची ओढ.
निरोप घेण्या आधी पुन्हा
भेटण्याची ओढ !
ज्याला न बोलताही आपलं दुःख कळतं त्याला आपलं म्हणावं.
आणि चुलत,मावस असलं तरी
सख्खं म्हणावं !
मी त्याचा आहे आणि तो माझा आहे ही भावना दोघांच्याही मनात सारखीच असणे
म्हणजेच ‘आपलेपणा’ !
एक शब्दही न बोलता ज्याला पाहिल्या पहिल्या डोळे भरून येतात आणि निःसंकोचपणे गालावरून अश्रू ओघळू लागतात, तो आपला असतो, तो सख्खा असतो !
लक्षात ठेवा,
ज्याला दुसऱ्या साठी ‘सख्खं’ होता येतं त्यालाच कुणीतरी सख्खं असतं,
बाकी फक्त परिचितांची यादी असते,
नको असलेल्या माणसांची गर्दी असते !
तुम्हीच सांगा…..
फक्त आईची कूस एक आहे म्हणून सख्खं म्हणायचं का ?
ज्याला तुमच्या दु:खाची जाणीवच नाही त्याला सख्खं म्हणायचं का ?
आता एक काम करा..
करा यादी तुम्हाला असणाऱ्या सख्ख्या नातेवाईकांची..
झालं न धस्सकन..
होतंय न धडधड..
नको वाटतंय न यादी करायला ….
रडू नका, पुसून टाका डोळ्यातलं पाणी..
आणि मानायला लागा सर्वांना आपलं.कोणी कितीही झिडकारलं तरी
कारण …..
राग राग आणि तिरस्कार करून काहीच हाती लागत नाही.
जग फक्त प्रेमानेच जिंकता येतं… वादाने, मत्सर हेवा करून तर नक्कीच नाही…
लेखक :अज्ञात
संग्राहिका :सौ. शशी नाडकर्णी-नाईक
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
विसावा या शब्दाच्या उच्चारातच निवांतपणा जाणवतो. विसावा म्हणजे विश्रांती. अर्थात विश्रांती म्हणजे समाप्ती नव्हे, अंमळ थांबणं. “आता थोडं थांबूया” हा आदेश विसावा शब्द सहजपणे देतो. अधिक विस्तृतपणे सांगायचं तर विसावा म्हणजे एक ब्रेक, एक इंटरव्हल. असाही अर्थ होतो. मात्र विसावा घेण्याची पद्धत व्यक्तीसापेक्ष आहे. कोणी निवांतपणे, डोळे मिटून राहील, कुणी एखादी वामकुक्षी घेईल, कुणी सततची कामे थांबवून एखाद्या कलेत मन रमवेल. पण ही झाली छोटी विश्रांती. विसावा याचा आणखी पुढे जाऊन अर्थ शोधला तर विसावा म्हणजे रिटायरमेंट. निवृत्ती. आणि आयुष्याच्या उतरणीवर अथवा आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यावर घ्यावासा वाटणारा विसावा. हाही व्यक्तीसापेक्षच असतो. पण कवयित्री अरुणा मुल्हेरकर यांची विसावा ही याच आशयाची सुरेख गझल नुकतीच वाचण्यात आली आणि त्यातले एकेक शेर किती अर्थपूर्ण आणि रसमय आहेत हे जाणवले.
☆ विसावा ☆
मिळतो मला तुझ्या रे नामात या विसावा
घेते जरा तुझ्या रे भजनात या विसावा
*
असते तुझ्या सख्या रे मी संगतीत जेव्हा
शांती मनास लाभे श्वासात या विसावा
*
भेटीत आपुल्या रे आहे अती जिव्हाळा
वृक्षा समान आहे किरणात या विसावा
*
गेले निघून गेले सोन्यापरी दिवस ते
आता तुझ्याच ठायी स्मरणात या विसावा
*
आधार घेत आहे पाहून मी रुपाला
मन शांत होत आहे प्रेमात या विसावा
*
– अरूणा मुल्हेरकर
ही संपूर्ण गझल वाचल्यानंतर प्रकर्षाने एक जाणवते ते कवयित्रीचं उतार वय. आयुष्य जगून झालेलं आहे, सुखदुःखाच्या पार पलीकडे मन गेलं आहे आणि आता मनात फक्त एकच आस उरलेली आहे आणि ती व्यक्त करताना मतल्या मध्ये त्या म्हणतात
मिळतो मला तुझ्या रे नामात या विसावा
घेते जरा तुझ्या रे भजनात या विसावा
कसं असतं, जीवन जगत असताना जीवनातली अनेक ध्येयं, स्वप्नं, जबाबदाऱ्या पार पाडत असताना भगवंताच्या आठवणींसाठी सुद्धा उसंत नसते. पण जसा काळ उलटतो, वय उलटते तशी आपसूकच माणसाला अध्यात्माची गोडी वाटू लागते. ईश्वराकडे मन धावतं, म्हणूनच कवयित्री म्हणतात,
आता देवा! मला तुझ्या नामस्मरणातच खरा विसावा वाटतो. तुझ्या भजनातच माझे मन खरोखरच रमते आणि निवांत होते.
असते तुझ्या सख्या रे संगतीत जेव्हा
शांती मनास लाभे श्वासात या विसावा
मनाने,पूजाअर्चा या विधी निमित्ताने जेव्हा जेव्हा मी तुझ्या संगतीत असते तेव्हा माझ्या मनाला शांती लाभते माझ्या प्रत्येक श्वासात तुझ्या नामाच्या अस्तित्वाने मला विसावल्यासारखे वाटते
या शेरात सख्या हा शब्द थोडा विचार करायला लावतो. भगवंत सखाच असतो. त्यामुळे सख्या हे देवासाठी केलेले संबोधन नक्कीच आवडले, परंतु या दोन ओळी वाचताना आणि सख्या या शब्दाची फोड करताना मनात ओझरतं असंही येतं की या उतार वयात न जाणो कवयित्रीला जितका ईश्वराचा सहवास शांत करतो तितकाच जोडीदाराच्या आठवणीत रमण्यातही शांतता लाभते का? सख्या हे संबोधन त्यांनी जोडीदारासाठी योजलेले आहे का?
भेटीत आपुल्या रे आहे किती जिव्हाळा
वृक्षासमान आहे किरणात या विसावा
भेटी लागे जीवा लागलीसे आस याच भावाने कवयित्री सांगतात जसा वृक्षाच्या सावलीत विसावा मिळतो तसाच तुझ्या जिव्हाळापूर्वक स्मरण भेटीत भासणारी, जाणवणारी अदृश्य किरणे ही मला शांती देतात. या ओळी वाचताना जाणवते ती एक मनस्वी, ध्यानस्थ स्थिती. या स्थितीत संपूर्ण मन कुणा दैवी शक्तीच्या प्रभावाखाली स्थिर आहे.
गेले निघून गेले सोन्या परी दिवस ते
आता तुझ्याच ठायी स्मरणात या विसावा
आयुष्य तर सरलं. गेलेल्या आयुष्याबद्दल मी नक्कीच म्हणेन की अतिशय सुखा समाधानाचं, सुवर्णवत आयुष्य माझ्या वाटेला आले. त्याबद्दल मी तुझी आभारीच आहे पण आता मात्र माझं चित्त्त फक्त तुझ्याच ठायी एकवटू दे. तुझ्या नामस्मरणातला आनंद हाच माझा विसावा आहे.
हाही शेर वाचताना माझ्या मनात सहज येऊन गेले की कवयित्रीला याही ठिकाणी त्यांच्या जोडीदाराचीच आठवण होत आहे. सहजीवनातले वेचलेले अनंत सोनेरी क्षण त्यांना नक्कीच सुखावतात. निघून गेलेल्या त्या दिवसांसाठी त्यांच्या मनात खरोखरच तृप्तता आहे आणि आता केवळ जोडीदाराच्या सुखद स्मृतींत त्या विसावा शोधत आहेत का?
वास्तविक कवीच्या मनापर्यंत काव्य प्रवाहातून पोहोचणं हे तसं काहीसं अवघडच असतं. म्हणूनच ही गझल वाचताना भक्ती आणि प्रीती या दोन्ही किनाऱ्यांवर मी माझ्या अर्थ शोधणाऱ्या नावेला घेउन जात आहे.
आधार घेत आहे पाहून मी रुपाला
मन शांत होत आहे प्रेमात या विसावा
देवा! तुझे सुंदर ते ध्यान सुंदर ते रूप! तुझ्या राजस रूपाला पाहून माझे मन आपोआपच शांत होते. तुझ्या.अपार मायेतच मला ऊब जाणवते, स्थैर्य लाभते, मनोधैर्य मिळते.
याही शेरात कुठेतरी पुन्हा लपलेला प्रेम भाव जाणवतो.
पुष्कळ वेळा काव्य वाचताना काव्यात नसलेले किंवा अदृश्य असलेले शब्दही वाचकाच्या मनाजवळ हळूच येतात. या शेरात लिखित नसलेले शब्द जे मी वाचले ते असे असावेत,
“ तू तर आता या जगात नाहीस, शरीराने आपण अंतरलो आहोत पण सख्या रात्रंदिवस मी तुझी छबी न्याहाळते कधी चर्मचचक्षुंनी तर कधी अंतर्नेत्रांतून आणि तुझे माझ्यावर किती निस्सीम प्रेम होते या भावनेतच मला अगाध शांतता प्राप्त होते.
तसंही गझल हा एक संवादात्मक काव्य प्रकार आहे.आणि गझलेत विषयाचं बंधन नसतं आणि विषय असलाच तरी एकाच विषयावर वेगवेगळ्या भावरसातली गझलीयत असू शकते.
अशी ही श्लेषार्थी अरुणाताईंची सुंदर गझल. यात भक्तीरस आणि शृंगार रसाचीही उत्पत्ती जाणवते.
गझल म्हटलं म्हणजे ती शृंगारिकच असा समज आहे पण अनेक नवीन गझलकारांनी वेगवेगळ्या रसयुक्त गझलांची निर्मिती केलेलीच आहे. त्यामुळे भक्तीरसातली गझलही स्वीकृत आहे. नेमका हाच अनुभव अरुणाताईंची ही गझल वाचताना मला आला.
आनंदकंद या वृत्तातील आणि, गागालगा, लगागा गागालगा लगागा अशी लगावली असलेली ही गझल काटेकोरपणे नियमबद्ध अशीच आहे.
यातील नामात भजनात श्वासात किरणात स्मरणात हे काफिया खूप लयबद्ध आहेत. मतला आणि शेर वाचताना गझलेतील खयालत विलक्षण अर्थवेधी आहे. प्रत्येक शेरातला राबता सुस्पष्ट आहे आणि रसपूर्ण आहे.
थोडक्यात विसावा एक छान आणि परिपूर्ण, अर्थपूर्ण गझल असे मी म्हणेन.
☆ “गाव बदलाचा ‘पाडोळी’ प्रयोग…” ☆ श्री संदीप काळे ☆
धाराशिवमध्ये ‘फॅमिली गाईड’च्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम संपवून मी आता लातूरकडे निघत होतो. तितक्यात ज्येष्ठ पत्रकार, माझे मित्र योगेंद्र दोरकर (नाना) आले. सकाळपासून मी नाना यांची वाट पाहत होतो. चहापान झाल्यावर नाना मला म्हणाले, ‘‘मी मुंबईवरून माझे मित्र शेषराव रावसाहेब टेकाळे यांनी सुरू केलेला प्रोजेक्ट बघायला आलोय. महावितरणमध्ये ते इंजिनिअर होते. आता ते सेवानिवृत्त झालेत. त्यांनी त्यांच्या गावी सुरू केलेल्या ‘मागे वळून पाहताना’ या उपक्रमाला खास भेट देण्यासाठी मी आलोय. तो उपक्रम समजून घेऊन मलाही माझ्या गावात तसा उपक्रम सुरू करायचा आहे.’’
टेकाळे यांनी सुरू केलेला तो उपक्रम नेमका काय आहे? तो कशासाठी सुरू केला? त्याचे स्वरूप नेमके काय आहे, हे सगळे मी दोरकर नाना यांच्याकडून समजून घेत होतो. खरं तर मलाही तो उपक्रम पाहण्याची उत्सुकता लागली होती. आम्ही रस्त्याने निघालो. काही वेळामध्येच लातूर-बार्शी रोडवर असलेल्या ‘पाडोळी’ या गावात आम्ही पोहोचलो.
टेकाळे आमची वाटच पाहत होते. त्या उपक्रमाच्या ठिकाणी खूप प्रसन्न वाटत होते. लहान मुलांसाठी इंग्रजी शाळा, मुलांना कुस्ती, शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण वर्ग, तरुणांची स्पर्धा परीक्षा, महिला बचत गटाचे प्रशिक्षण हे सारे काही तिथे सुरू होते. समोर भारत मातेचे मंदिर होते. टेकाळे म्हणाले, ‘‘चला अगोदर भारत मातेचे पूजन करू या. मग तुम्हाला मी सर्व प्रोजेक्ट दाखवतो.’’
दर्शन घेऊन आम्ही तो सारा प्रोजेक्ट पाहत होतो. ती कल्पना जबरदस्त होती, तिथे होणारी सेवा अगदी निःस्वार्थपणे होती. ते पाहताना वाटत होते, आपण हे सर्व आपल्या गावी करावे. लहान मुले, महिला, तरुण, शेतकरी, वृद्ध माणसांसाठी एकाच ठिकाणी सर्वकाही शिकण्यासाठी, मनोरंजनासाठी, माहितीसाठी, नवीन स्वप्न पाहण्यासाठी जे जे लागणार होते, ते ते सर्व काही तेथे होते.
ही संकल्पना, हा उपक्रम नेमका काय आहे. हे सारे आम्ही टेकाळे यांच्याकडून समजून घेतले. जे गावाशी संबंधित आहेत, ज्यांनी गाव सोडून बाहेर आपल्या मेहनतीमधून साम्राज्य उभे केले, त्या, गावाशी नाळ जोडलेली असणाऱ्या प्रत्येकाला कुठे ना कुठे वाटत असते की आपण आता खूप मोठे झालो. आता आपण आपल्या गावासाठी, आपल्या माणसांसाठी, आपल्या मातीसाठी काहीतरी केले पाहिजे. त्या प्रत्येकासाठी हा प्रोजेक्ट म्हणजे एक उतम उदाहरण होते. तो प्रोजेक्ट पाहण्यासाठी दोरकर नाना यांच्यासारखे अनेक जण आले होते.
आम्ही प्रोजेक्ट पाहत होतो. तितक्यात आमची भेट विजय पाठक यांच्याशी झाली. पाठक रत्नागिरी जिल्ह्यातील होते. पाठक डीवायएसपी म्हणून नुकतेच सेवानिवृत्त झाले होते. त्यांना त्यांच्या गावासाठी काहीतरी करायचे होते. यासाठी त्यांनी टेकाळे बंधू यांच्या पाडोळी येथील ‘मागे वळून पहा’ या उपक्रमास भेट दिली. भेटीमध्ये पाठक म्हणाले, ‘‘माझ्या वडिलांनी आयुष्यभर गावाची पूजेच्या माध्यमातून सेवा केली. त्यांचीही इच्छा होती, गावासाठी काहीतरी करावे. आता हा उपक्रम मी माझ्या गावात सुरू करणार आहे.’’
मी ‘व्हिजिटर बुक’ पाहत होतो. तिथे रोज हा उपक्रम पाहण्यासाठी येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. मी, दोरकर नाना, टेकाळे, त्यांचे भाऊ अशी आमची गप्पांची मैफल रंगली. ज्याला आपल्या माणसांविषयी, मातीविषयी आत्मियता असते. तेच या स्वरूपाचा उपक्रम राबवू शकतात हे दिसत होते.
पाडोळी जेमतेम दोन-अडीच हजार लोकसंख्या असलेले गाव. पाडोळीच्या आसपास अशीच छोटी-छोटी बारा-पंधरा गावे असतील. पाडोळी, पिंपरीसह ही सर्व गावे या प्रोजेक्टचा भाग होती. राज्यातल्या कानाकोपऱ्यामधून या उपक्रमाला आपलेसे करणाऱ्यांची संख्याही खूप होती.
वेगवेगळ्या क्षेत्रांत प्रचंड प्रगती करणाऱ्या पाच भावांनी ठरवले, आपण आपल्या गावासाठी चिरंतन टिकणारे काहीतरी करायचे त्यांनी मनाशी हा चंग बांधला होता. जनक टेकाळे हे जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून काम करायचे. तरुणाईला नेमके काय द्यायचे म्हणजे ते बुद्धीने मोठे होतील हे ठरवून त्याप्रमाणे त्यांनी काम सुरू केले.
सूर्यकांत टेकाळे, रमाकांत टेकाळे, जनक टेकाळे, शेषराव टेकाळे, शशिकांत टेकाळे हे पाच भाऊ, या पाच भावांमध्ये जनक आणि शेषराव हे दोघेजण शासकीय नोकरीच्या निमित्ताने बाहेर असायचे. या दोघांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप मोठे नाव कमावले. आई-वडिलांना अपेक्षित असणाऱ्या कुटुंबासाठीचे कर्तव्यही पार पाडले.
आपल्या गावासह पंचक्रोशीत असणाऱ्या सर्व गावांसाठी आपण पाठीराखा बनून काम करायचे या भावनेतून त्यांनी ‘किसान प्रतिष्ठान’ची स्थापना केली. ‘किसान प्रतिष्ठान’च्या माध्यमातून त्यांनी शहर आणि गावामधली पूर्णतः दरी कमी करायचे काम केले. कोणाची मदत न घेता पदरमोड करून या कामामधून हजारो शेतकरी आधुनिक शेतीकडे वळवले. युवक गावातून शहराकडे जाण्यासाठी स्वप्न पाहू लागले. सरकारी मानसिकतेमध्ये अडकलेली अनेक कामे तातडीने मार्गी लागू लागली.
या प्रोजेक्टच्या कामाची १९९७ ला सुरुवात झाली. पिंपरीला टेकाळे बंधूंच्या आई केवळाबाईंच्या नावाने जमीन होती. ती जमीन या उपक्रमासाठी कामाला आली. तिथे भारत मातेचे मंदिर उभारले गेले. ज्या भारत मातेसमोर प्रत्येक जाती धर्मातला माणूस येऊन हात जोडत नतमस्तक व्हायचा. तिथे सावित्रीबाई फुले यांच्या नावाने वाचनालय सुरू झाले. आज त्या वाचनालयात चार हजार पुस्तके आहेत.
लोकांसाठी काहीतरी करायचे एवढ्यापुरते आता हे काम मर्यादित राहिलेले नव्हते, तर बेसिक लागणाऱ्या इंग्रजी मीडियमच्या शाळेपासून ते यूपीएससीच्या शिकवणीपर्यंतचा सगळा मेळ एकाच ठिकाणी बसवला गेला. ‘एव्हरेस्ट’ इंग्रजी स्कूलमध्ये शिकणारा प्रत्येक मुलगा इंग्रजी भाषेची कास धरू लागला. ध्यानगृह, शिशुगृह, घोड्यावर बसण्यापासून ते गाडी चालवण्यापर्यंत सगळे विषय एकाच ठिकाणी शिकवणे सुरू होते.
स्वच्छता अभियानामध्ये पाडोळी गाव पहिले आले. असे अनेक सुखद धक्के या उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या अनेक गावांना मिळू लागले. पाहता पाहता पंचक्रोशीत, जिल्हा आणि राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये या उपक्रमाची माहिती पोहोचली. लोक पाहायला येऊ लागले. ‘मी माझ्या गावासाठी मागे वळून पाहिले पाहिजे’ मी माझ्या गावातल्या लोकांसाठी काहीतरी केले पाहिजे, ही मनामध्ये असलेली छोटीशी इच्छा हा प्रयोग जाऊन पाहिल्यावर विशाल रूप धारण करू लागते.
आम्ही प्रोजेक्टवर सगळीकडे फेरफटका मारत होतो. टेकाळे यांच्या आई केवळाबाई वय वर्षे ९२. त्यांच्या मुलाविषयी, तिथे झालेल्या कामाविषयी अभिमानाने सांगत होत्या. “गावकुसात असणाऱ्या बाईच्या आयुष्यात चूल आणि मूल या पलीकडे काहीही नसते. पण माझ्या मुलांनी दाखवून दिले, गावातली मुलगी, महिला जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जाऊन तिचे कौशल्य दाखवू शकते. अभ्यासामध्ये हुशार असलेली मुलगी परदेशात जाऊन करिअर करू शकते. ज्या महिलेला घरच्या घरी चटणी बनवता येते ती जगातल्या बाजारपेठेत तिची चटणी विकू शकते. हे सगळे पाहायला पोराचा बाप पाहिजे होता, तो बिचारा खूप लवकर गेला,” असे म्हणत टेकाळे यांच्या आई चष्मा काढून अश्रूने भरलेले डोळे पुसत होत्या.
जनक आणि शेषराव या दोन भावांनी मिळून या कामाला प्रचंड गती दिली होती. हे दोघे जण शासकीय अधिकारी होते. आता सेवानिवृत्तीनंतर या दोघांनाही प्रचंड वेळ मिळतो, ज्या वेळेमध्ये त्यांनी तिथल्या कामाला अधिक गती दिली आहे.
जनक मला सांगत होते, प्रत्येकाला सतत वाटत असते, आपण आपल्या गावासाठी काहीतरी केले पाहिजे. सुरुवात काय करायची आणि सुरुवात केल्यानंतर त्याला गती कशी द्यायची, हा विषय होताच होता. आम्ही सुरुवातही केली आणि त्याला गतीही मिळवून प्रशिक्षणाच्या माध्यमातून शेकडो शेतकरी आणि उद्योगाच्या प्रशिक्षणातून जेव्हा शेकडो युवक कामाला लागले. तेव्हा कळले की आपले काम किती मोठे झाले.
शेषराव टेकाळे (9594935546) म्हणाले, ‘‘आमच्या वडिलांना सामाजिक आस्था जबरदस्त होती. लोकसेवा करायची तर त्याचा इतिहास झाला पाहिजे, हे ते सातत्याने सांगायचे. त्यातून मग आम्हाला प्रेरणा मिळाली.’’
मी, दोरकर नाना, टेकाळे बंधू, त्यांची आई, आम्ही सगळेजण गप्पा मारत बसलो होतो. तिथल्या अनेक उपक्रमांमध्ये सहभागी झालेल्या मुलांशी, महिलांशी, माणसांशी आम्ही बोलत होतो, ती माणसे त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून खूप समृद्ध झाल्याचे जाणवत होते. बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या स्वयंपाकाचा मेनू आमच्यासमोर आला. जेवण झाले. आम्ही सर्वांचाच निरोप घेऊन निघालो. आईने माझ्या गालावर हात फिरवून कडकड बोट मोडले. “पुन्हा लवकर या भेटायला”, असा आग्रहही धरला.
आम्ही रस्त्याला लागलो. मी, दोरकर नाना गाडीमध्ये चर्चा करत होतो. जिथे आत्मियता आणि निःस्वार्थीपणा असतो तिथल्या कामाला चार चांद लागतात. असेच काम टेकाळे बंधूंनी त्यांच्या गावामध्ये उभे केले होते. केवळ पाडोळी, पिंपरी ही दोन गावे नाही तर शेकडो गावं या कामाचा आदर्श घेऊन कामाला लागले होते. जे हात गावातल्या मातीमध्ये मिसळून सुगंधित झाले, त्यांनी शहरांमध्ये त्या सुगंधातून कीर्ती मिळवली. अशा प्रत्येक हातालाही गावाच्या मातीची ओढ अजून निश्चितपणे आहे. आता खूप झाले, आपण ते मागे वळून पाहू. चांगले काम करण्यासाठी पुढाकार घेऊ.
तुम्हालाही तुमच्या गावाची ओढ निश्चित असेल. तुम्हालाही वाटत असेल, आपण आपल्या गावासाठी ‘मागे वळून पाहिले पाहिजे’, पण सुरुवात कशी करायची हे पाहायला एकदा तुम्हाला पाडोळीला नक्की जावे लागेल. बरोबर ना…!
(आमचे दातार बाबा आता 94 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत त्यानिमित्त त्यांना अनंत शुभेच्छा…)
१४ जानेवारीची संध्याकाळ. मी आणि सुनील नुकतीच मैत्री झालेल्या आमच्या एका मैत्रिणीच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा द्यायला स्कूटरवरून, अंधेरीला चाललो होतो. त्यादिवशी मुंबईत प्रथमच इतकं झोंबरं गार वारं वाहत असेल. गार गार वारं खात, शिवाजी पार्कहून अंधेरीला पोहोचेस्तोवर आमचाच बर्फ होऊन गेला होता!
माझी मैत्रीण अनिताने (वाकलकर) अत्यंत प्रेमानं आमचं स्वागत केलं आणि आम्हाला घराच्या गच्चीत नेलं. तिथं ए.सी.पी. श्री.व सौ.लोखंडे, जयकर काका, अनेक कार्यक्रमांचे आयोजक, अनिताचे आईवडील, बहीण अशी काही मंडळी जमली होती. गप्पाटप्पा झाल्यावर लोखंडेंनी बेंजो वाजवून आणि काही इंग्लिश गाणी गाऊन पार्टीत साजेल अशी धमाल आणली! जयकर काकाही नेहमीप्रमाणे या आनंदात सामील झाले होते. आता माझीही गाण्याची वेळ येणार, हे मी जाणून होते.
काळा फ्रिलवाला फ्रॉक घातल्याने आधीच पाय गारठून गेले होते. त्यात गावं लागणार, या विचाराने आणखी थंडी वाढत गेली. मित्रमंडळींची धमाल संपल्यावर, मला सर्वांनी गायला सांगितलं. अगदी घरगुती समारंभ असल्याने, मीही लगेच मानेनं होकार दिला. जयकर काकांनी फर्माईश केलेलं ‘मैं मंगल दीप जलाऊँ’ हे भजन मी गायलं. थंडीमुळे हरकतीही सरास्सर येत होत्या! गाणं नेहमीप्रमाणे झालं.
तिथं जमलेल्या मंडळींपैकी, साठीच्या आसपासचे एक सदृहस्थ मला येऊन भेटले. “अहो, तुम्ही गाणं छान म्हटलंत, पण याची कॅसेट मिळू शकेल काय? मी आत्ताच त्याचे पैसे देतो.” मला मनातून खूप हसू आलं, पण चेहऱ्यावर मी दाखवलं नाही. मराठी माणूस आणि ताबडतोब पैसे देऊन कॅसेट घ्यायची स्पष्ट तयारी? मी मनात म्हटलं, ‘असेल बुवा…. !’ आणि त्यांना सांगितलं, “माझी ‘मंगलदीप’ नावाची कॅसेट मी तुम्हाला देऊ शकते. ते म्हणाले, “उद्या सकाळी मी माझ्या माणसाला पाठवतो.”
त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी त्यांचा ड्रायव्हर दोन्ही हातात लालकंच, टचटचीत स्ट्रॉबेरीची दोन प्युनेट्स घेऊन आला. “आमच्या दातार साहेबांच्या शेतावरची हायेत.” तो म्हणाला. “दातार साहेबांनी कॅसेट मागितली व त्याचे हे शंभर रुपये!” मी त्यांना कॅसेट दिली व पैसे नकोत म्हणून खुणेनंच सांगितलं. मला खूपच गंमत वाटली. कितीतरी वेळ मी त्या स्ट्रॉबेरीकडे पाहात होते आणि मनातल्या मनात हसत होते. मला स्ट्रॉबेरी आवडते म्हणून नाही – तर कॅसेट दिली म्हणून स्ट्रॉबेरी दिली त्यांनी? असो. पण छान झालं म्हणून मी तो विषय तिथंच सोडला.
३१ जानेवारी १९९४. माझ्या स्वतंत्र कार्यक्रमाला ‘मंगलदीप’ नावाने अधिष्ठान लाभलं आणि तो दिवस दोन्ही अर्थांनी माझ्या आयुष्याला सुरेल वळण देणारा, सुंदर कलाटणी देणारा ठरला. हा ‘तेजाचा मंगलदीप’ माझ्या आयुष्याला उजाळा देणाराही ठरला. ती माझ्या आयुष्यातली ‘सोनेरी संक्रांत’ होती!
तो कार्यक्रम गोरेगांवच्या अभिनव कला केंद्रातर्फे त्यांच्या शाळेच्या हॉलमध्ये होता. हॉल गच्च भरला होता. राजेश दाभोळकरांची सिस्टिम असल्याने माइक टेस्टिंग करतानाच आज कार्यक्रम सुंदर होणार, रंगणार, हे माझ्या लक्षात आलं. ‘मैं मंगलदीप जलाऊँ, ‘केव्हा तरी पहाटे’, ‘काय सांगू शेजीबाई’, ‘लव लव करी पातं’, अशी अनेक गाणी झाली. दातारसाहेब, अनिताच्या वडिलांबरोबर माझ्यासाठी फुलांचा सुंदर गुच्छ घेऊन आले होते. जयकर काकांनीही छान गुच्छ आणला होता. मला आपल्या ओळखीच्या लोकांनी कौतुक केलेलं पाहून खूप बरं वाटलं. कार्यक्रम खूपच रंगला, तसा दुसर्या दिवशी सर्वांचा फोनही आला. आणि आश्चर्य म्हणजे, मला न सांगता, गुपचूप दातार साहेबांनी या कार्यक्रमाची ऑडिओ कॅसेट मोठ्या हिकमती करून मिळवली! हे त्यांनी आमच्या पुढच्याच भेटीत प्रांजळपणे सांगितलंही!
असे हे नाशिकचे संपूर्ण दातार कुटुंबीय माझ्या गाण्यांचे चाहते! दातार साहेबांची पत्नी निर्मला, ही माझ्या ‘निवडुंग’ चित्रपटातील ‘केव्हातरी पहाटे’ आणि ‘लवलव करी पातं’ या गाण्यांच्या जबरदस्त प्रेमात! ‘ही छोटी पद्मजा संगीताच्या क्षेत्रात आणखी पुढे कशी जाईल? त्यासाठी आपल्याला काय करता येईल?’ असा विचार नेहमी निर्मलाकाकूंच्या मनात असे.
३१ जानेवारी १९९४ च्या रात्री उशीरा नाशिकला घरी पोहोचल्यानंतर, दातार साहेबांचा मुलगा राजन, सून शोभना, आणि नात स्नेहा यांना ती कॅसेट त्यांनी ऐकवली. त्यावर तत्काल या सर्वांच्या प्रतिक्रिया मला देण्यासाठी दुसऱ्या दिवशी फोन केला आणि म्हणाले, “स्नेहा केवळ दहा वर्षांची आहे. तुम्ही सादर केलेल्या ‘मैं मंगलदीप जलाऊँ’ या पहिल्याच गाण्यामध्ये ‘तू प्रेम का सागर बन जा, मैं लहर लहर खो जाऊँ’ या ओळी स्नेहाने ऐकल्या. ते सूर तिच्यापर्यंत पोहोचले आणि त्यात ती हरवून गेली. एका दहा वर्षांच्या मुलीला खिळवून ठेवणारी सुरांमधली ती ताकद बघून, आम्हां सर्व कुटुंबियांचा तुमची काही गाणी रेकॉर्ड करण्याचा निर्णय त्याक्षणी पक्का झाला.”
दातार परिवाराच्या या स्नेह आणि आशीर्वादातून ‘ही शुभ्र फुलांची ज्वाला’, ‘रंग बावरा श्रावण’, ‘घर नाचले नाचले’, ‘गीत नया गाता हूँ’, या ध्वनीफितींचा, तसंच अनेक उर्दू गझला, अभंग, गीते यांचा जन्म झाला. ही फेणाणी-जोगळेकर आणि संपूर्ण दातार परिवारासाठीही परम आनंदाची गोष्ट आहे! या सगळ्या ध्वनीफितींच्या रेकॉर्डिंग दरम्यान आम्हां दोन्ही कुटुंबियांच्या गाठी भेटी वाढल्या, आणि हे दातारसाहेब आमच्या संपूर्ण कुटुंबियांचे ‘दातारबाबा’ कधी झाले, ते कळलंच नाही!
अशा ह्या तीर्थरूप दातारबाबांनी मला वैयक्तिक, सांस्कृतिक, सांगितिकदृष्ट्या सर्वार्थाने घडवलं, त्यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त मी काय गाऊ, काय बोलू, असा प्रश्न मनात असतानाच, नाशिकचं आणि साहित्यातलं आपलं सगळ्याचं दैवत म्हणजे आदरणीय कुसुमाग्रज, अगदी श्रीकृष्णासारखे माझ्या मदतीला स्वप्नात धावून आले आणि कानात कुजबुजले, ‘पद्मजा, ज्यांच्यासाठी संगीत, साहित्य, कला, हाच परमोच्च आनंद आहे, परमेश्वर आहे आणि जीवनाचं हेच वैभव आहे, त्या आपल्या बाबांना तू एकच सांग…’
‘तुझेच अवघे जीवित वैभव काय तुला देऊ?
काय तुला वाहू मी काय तुला वाहू?…’
आज मला आठवते, ती १४ जानेवारी १९९४ची माझी आणि सुनीलची, बाबांशी झालेली पहिली भेट! मकरसंक्रांतीचा दिवस! त्यादिवशी एकदाच त्यांना, “तिळगूळ घ्या आणि गोड बोला” म्हणायची संधी मिळाली. कारण त्यानंतर त्यांच्यासारख्या स्पष्टवक्त्या माणसाला, गोड बोला म्हणणं, फार कठीण होतं! कधी कधी संगीतावरून, कवितेवरून आणि अनेक गोष्टींवरून आम्ही कैकवेळा अगदी कचाकचा भांडलो. अगदी जन्माचे वैरी असल्यासारखे! पाहणाऱ्याला वाटेल की झालं, आता सारं संपलं! पण त्यानंतर फक्त १० मिनिटांतच बाबांचा फोन येतो, “अगं, पद्मजा, आज वृत्तपत्रात वाचलेल्या एका लेखात, पत्रकार टेंबे काकांच्या लेखात इंदिरा संतांच्या कित्ती सुंदर ओळी आल्यात पहा…. अगदी चित्ररूप आहेत !”
“येऊ देत माझ्या घरी किरणांचे झोत .. तेजस्वी पित्याचे ते वात्सल्याचे हात”….
असे वात्सल्याचे हात अगदी थेट, कधी आईच्या तर कधी वडिलांच्या मायेने आम्हां सर्वांच्या पाठीवरून कौतुकाने फिरले.
जगावं कसं? वागावं कसं? शब्दोच्चार स्पष्ट कसे म्हणावेत? कागदावरील शब्द ‘जिवंत’ करून ‘अर्थपूर्णरित्या’ कागदातून बाहेर कसे काढावेत, याचं भान मला बाबांनीच दिलं. सुरुवातीला वाटायचं दगड, माती, सिमेंट, धोंडे यात बुडालेला बिल्डर मला काय सांगणार? मी हट्टी! कलावंत ना! माझा हेका मी सोडत नव्हते, परंतु हळूहळू लक्षात आलं, या नाशिकच्या मातीत, काश्मीरसारखं जसं प्रत्यक्ष केशर फुलवून त्यांनी यश खेचून आणलं, तसंच माझ्या गाण्यातही, ही जाण वाढवून केशराचा सुगंध पेरला!
‘ही शुभ्र फुलांची ज्वाला’ रेकॉर्ड करत असताना, कवितेचा प्रत्येक शब्द न् शब्द स्पष्ट नि भावपूर्ण आला पाहिजे, याकडे त्यांचा आवर्जून कटाक्ष असे. सर्वस्व तुजला वाहुनी’ या गझलेतील ‘हुंदका’ हा शब्द, मला हुंदका फुटेस्तोवर माझ्याकडून गावून घेतला. ही गझल जेव्हा कुसुमाग्रजांनी माझ्याकडून पहिल्यांदा ऐकली, तेव्हा विंदांच्या शब्दांच्या ताकदीमुळे तात्यांचे (कुसुमाग्रजांचे) पाणावलेले, तरीही तृप्त डोळे मला आजही आठवतात.
कोणतीही कविता गाण्यापूर्वी, बाबा त्या कवितेतील प्रत्येक शब्दाच्या अर्थाचा, उच्चारांचा माझ्याकडून अभ्यास करवून घेत. ‘गीत नया गाता हूँ’ या माजी पंतप्रधान अटलजींच्या कविता ऐकून दुसरे माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांनी, त्यांच्या कविता स्वरबद्ध करायला दिल्या. यातील काही कविता तीन ओळींच्या तर काही साडेसात ओळींच्या…… त्या भावपूर्ण होतील, अशा पद्धतीने बाबांनी मला जोडून दिल्या. इंडस्ट्रीतील सर्वोत्तम सर्व कलाकार, उत्कृष्ट रेकॉर्डिंग स्टुडिओत रेकॉर्ड करून तासन्तास बाबा त्यात रस घेऊन संगीताचा, रेकॉर्डिंगचा अभ्यास करायचे, तेही न थकता अत्यंत उत्साहाने! संगीत हे त्यांच्यासाठी कायम ‘S’ Vitamin चं ठरलं.
माझा मुलगा आदित्यशी, त्याच्याच वयाचा होऊन क्रिकेट खेळणारे, त्याला आईच्या तक्रारी बिनदिक्कत सांगायला हक्काचं स्थान असलेले आजोबा दातारबाबा! सुनीलला, माझा भाऊ विनायकला, महत्त्वाच्या प्रसंगी योग्य मार्गदर्शन करणारे, उषाताईला, अटलजींचे पोर्ट्रेट करताना प्रोत्साहन देणारे बाबा, नाईक, खरे, धारप, सुभेदार इत्यादी सर्व मित्रांशी गप्पा मारताना सात मजली गडगडाटी हास्य करणारे, ‘गीत नया…’ कॅसेटचा सोहळा दहा दिवसांत करा, असा, पी.एम. हाऊसमधून फोन आला असताना, कधीही न घाबरणारे, पण दहा दिवसांत थाटात सर्व काही झालं पाहिजे, या विचाराने थरकापणारे, पण निश्चयाचा महामेरू असणारे, नात स्नेहाचे नृत्य डोळ्यातून प्रेम ओसंडून पहातानाचे बाबा, दगड, विटा, माती, धोंडे यांनी घेरलेले बिल्डर बाबा, त्यातून मला कवितेचे विविध रंग समजावणारे बाबा, लेक राजनच्या अफाट बुद्धिमत्तेविषयी, प्रगतीविषयी ऊर भरून कौतुक करणारे, सून शोभनाचेही कौतुक करणारे, पत्नी निर्मलाने त्यांना कसे विविध विषयांत घडवले, हे अभिमानाने सांगणारे बाबा, तसंच आमच्या सर्वांचा ‘उंच उंच माझा झोका’ पाहताना उचंबळून येणारे, सर्वांवर प्रेमाचा अतिवर्षाव करणारे बाबा, अशी ही बाबांची अनेक वेगवेगळी रूपं मला वेळोवेळी दिसतात म्हणून म्हणावंसं वाटतं,
जगभरात २० मार्च हा दिवस ‘ चिमणी वाचवा दिवस ‘ म्हणून साजरा केला जातो.
चिमणी आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग. अगदी जन्माला आल्यावर आई आपल्याला भरवते तेंव्हा सुद्धा ती एक घास चिऊचा म्हणून देते आणि त्या चिमणीची आठवण काढत आपण जेवतो. जरा मोठं झालं की झोपण्यापूर्वी एक गोष्ट सांग हा लहान मुलांचा लकडा असतो ,तेंव्हा सुद्धा चिऊताई हजर असायची आणि मग कावळेदादा येऊन म्हणायचा “चिऊताई चिऊताई दार उघड” , पुढची गोष्ट आपण साऱ्यांनी लहानपणापासून ऐकली आहेच.
जंगले निर्माण करण्यामध्ये चिमण्यांचे मोठे योगदान आहे.त्यांनी खाल्लेल्या वेगवेगळ्या बिया त्याच्या विष्ठेमधून पुन्हा जमिनीत रुजतात आणि त्यातून वृक्ष निर्माण होत असतात.मानवाने शहरीकरण झपाट्याने वाढवले त्या मुळे जंगले नष्ट होऊ लागली आणि आहे त्या शेतीत जादा पीक घेण्याच्या हव्यासापायी कीटक नाशकांचा वापर अवाच्या सव्वा वाढला आणि तोच या चिमण्यांच्या जीवावर देखील उठला. कीटक नाशके फवारल्यावर ते धान्य खाऊन चिमण्या मरून जाऊ लागल्या.रोज अंगणात बागडणाऱ्या चिमण्या हळू हळू दिसेनाशा होऊ लागल्या आहेत. चिमण्यांची प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे,याच चिमण्या पिकावरील कीड/ आळ्या खाऊन टाकतात व शेतातले पीक वाचवतात.
दिवसेंदिवस पर्यावरणाचा तोल देखील ढासळायला लागला आहे,उष्णता वाढायला लागली आहे ,ही उष्णता ही गर्मी चिमण्यांना असह्य होते, त्यावर इलाज म्हणजे पसरट मातीच्या भांडयांमधे थोडे पाणी भरून ठेवा मग पहा भर दुपारी चिमण्या त्या मध्ये डुंबतील, पाणी पितील,जवळ ठेवलेले अन्नाचे कण खाऊन तृप्त होतील, तेंव्हा आपल्याला मिळणारे समाधान लाखमोलाचे असेल. अशी हजारो वर्षे मानवाला सोबत करणाऱ्या या चिमण्यांना वाचवायची जबाबदारी आपलीच आहे .त्या साठी फार काही करायची सुद्धा गरज नाही.
अशी ही चिमणी सकाळ झाली की किलबिलाट करून आपल्याला जागे करत असते.तिच्यासाठी जर शक्य असेल तर बागेमध्ये पुठ्ठयाचे किंवा लाकडी घरटे टांगून ठेवा. मोठ्या शहरामध्ये रहात असाल तर फ्लॅटच्या गॅलरीमध्ये रोजच्यारोज थाळीमध्ये पाणी ठेवा अगदी चार दाणे जरी तिला खाऊ घातले तरी मला खात्री आहे सगळ्यांना मोठा आनंद होईल.
तुम्ही शिक्षिका असाल, तर तुमचं सौंदर्य फळ्यावर नीटपणे लिहिलेल्या अक्षरात असेल. विषयाचं आकलन झाल्यावर दिसणारे विद्यार्थ्यांचे आनंदी चेहरे, ही तुमचीच सुंदरता आहे…
सौंदर्य कपड्यात नाही,
कामात आहे….
सौंदर्य नटण्यात नाही,
विचारांमधे आहे…
सौंदर्य भपक्यात नाही,
साधेपणांत आहे…
सौंदर्य बाहेर कशात नाही,
तर मनांत आहे…!
आपण करत असलेलं प्रत्येक काम
म्हणजे सौंदर्याचंच सादरीकरण असतं…!
आपल्याला आपल्या कृतीतून
सौंदर्याची निर्मिती करता आली पाहीजे…
प्रेमानं बोलणं..
म्हणजे सुंदरता…!
आपलं मत योग्य रीतीनं
व्यक्त करता येणं..
म्हणजे सुंदरता…!
नको असलेल्या गोष्टीला
ठाम नकार देण्याची हिंमत
म्हणजे सुंदरता…!
दुसर्याला समजावून घेणं
म्हणजे सुंदरता…!
आपल्या वर्तनातून, विचारातून
आपलं सौंदर्य बाहेर आलं पाहिजे.
हाती आलेला प्रत्येक क्षण
रसरशीतपणे जगण्यात
खरी सुंदरता आहे…!
आपण करीत असलेल्या कामात कौशल्य प्राप्त झालं, की आपोआपच आत्मविश्वास वाढतो, आत्मसन्मानाची जाणीव येते…
अशी आत्मविश्वासानं जगणारी स्त्री आपोआप सुंदर होते, हा माझा स्वानुभव आहे…
इंदिरा गांधींचं सौंदर्य
कणखर निर्णयक्षमतेत होतं,
मेरी कोमचं सौंदर्य
तिच्या ठोशात आहे…
बहिणाबाईंचं सौदर्य
त्यांच्या असामान्य प्रतिभेत होतं..
लतादीदींचं सौंदर्य
त्यांच्या अप्रतिम, दैवी
आवाजात आहे…
वेळ प्रसंगी या सर्वजणींची आठवणच आपलं जगणं सुंदर करायला मदत करेल..
आपण जशा जन्माला आलो आहोत, तशा सुंदरच आहोत, ही खूणगाठ मनाशी बांधून टाकली, की सौंदर्याकरता दुसर्या कुणाच्या पावतीची गरज पडत नाही आणि अवघं विश्व सुंदर भासतं…!
☆
लेखिका :सौ. सुधा मूर्ती
संग्राहिका – सौ उज्ज्वला केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈