निलूच्या सूनबाई. मृणाल तिचं नाव. वय वर्षे चाळीस पार – साधारण पंचेचाळीस शेहेचाळीस. स्वतंत्र राहणारी. ” नवराबायको दोघं – चुलीस धरून तिघं ” या म्हणीप्रमाणे संसार सुरू असलेली. तिला एक मुलगा वय वर्षे वीस. एक मुलगी वय वर्षे सतरा.
नवरा खाजगी कंपनीत मोठ्या हुद्द्यावर नोकरीत असलेला. ती स्वतः एका बऱ्या कंपनीत नोकरीला आहे. सासू सासऱ्यांचा “जाच ” नाही. लग्न झाल्याझाल्याच तसं तिनं सांगितलेलं. त्यामुळे निवृत्त शिक्षिका सासूबाई आणि निवृत्त बँक ऑफिसर सासरे साधारण मोठ्या अशा आपल्या “गावी ” राहतात. खेड्यात नव्हे.
मुलं लहान असताना, कधी पाळणाघर, कधी बाई, कधी घरून काम असं तिनं ॲडजस्ट केलं. मुलांची शाळा, संगोपन सांभाळलं. दोन्ही मुलं १० ते ५ शाळेची झाली आणि मृणाल बरीच सुटवंग झाली. त्यांच्याच वेळात ही पण नोकरी करू लागली. सुख सुख ते काय म्हणतात, ते खूपच होतं.
दरवर्षी देश विदेशात कुठेतरी फिरणं होतं. गाडी, मोठासा फ्लॅट, आर्थिक बाजू उत्तम. पण हेच सुख कुठेतरी बोचू लागलं मृणालला. तिची सततची चिडचिड वाढली. उगाचच मुलांवर, नवऱ्यावर ओरडणं वाढलं. कारण कळेचना. समाजमाध्यमे आणि मैत्रिणी यावेळी कामी आल्या. “मेनॉपॉज ” नावाचं एक सत्र तिच्या आयुष्यात सुरू झालं होतं म्हणे. हार्मोन्स कमी जास्त झालेत की, असं होतं म्हणे. यावर उपाय एकच की, घरच्यांनी तिचे मुड्स, सांभाळायचे ! (आता इथे एवढा वेळ कुणाला आहे ?) शिवाय आजवर मी सर्वांसाठी केलं, आता तुम्ही माझ्यासाठी करा.
हे लिहिण्यामागचा हेतू एवढाच आहे की, खरंच मेनॉपॉज आणि मानसिक अवस्था यांचा म्हणावा इतका ” मोठ्ठा ” संबंध आहे का? हे कबूल आहे, की त्यावेळी जरा शारीरिक बदल होतात. पाळी येतानाही आणि जातानाही. मात्र गेल्या काही वर्षात हे ” त्रासाचं ” प्रमाण जरा जास्तच वाढलंय असं वाटतं.
मृणालचीच गोष्ट घेऊन बघू या ! नवरा आता मोठ्या पदावर आहे. त्याच्या जबाबदाऱ्या वाढल्यात. स्त्री – पुरुष असा बराच स्टॉफ त्याच्या हाताखाली आहे. जबाबदाऱ्या आहेत. घरी यायला कधी कधी उशीर होतो. शिवाय “तो अजूनही बरा दिसतो. “
मुलगा इंजिनिअरिंग थर्ड इअरला आहे. त्याचा अभ्यास वाढलाय. मित्रमंडळ वाढलंय. त्यात काही मैत्रिणीही आहेत. कॉलेज ॲक्टिव्हिटीज असल्याने घरात तो कमीच टिकतो. त्यात कॅम्पसची तयारी करतोय. मग त्याला वेळ कुठाय ?
मुलगी वयात आलेली. नुकतीच कॉलेजला जाऊ लागलीय. टीनएजर आहे. तिचं एक भावविश्व तयार झालेलं आहे. काहीही झालं तरी ती कॉलेज ” बुडवत ” नाही. घरी असली की, मैत्रिणींचे फोन असतात. सुटीच्या दिवशी त्यांचा एखादा कार्यक्रम असतो. फोनवर, प्रत्यक्ष हसणं खिदळणं, गप्पा होत असतात. तरीही ती आईला मदत करते. वॉशिंग मशीन लावणे, घरी आल्यावर भांडी आवरणे, अधेमधे चहा करणे. आताशा कूकर लावते, पानं घेते. जमेल तसं काही तरी ती करून बघते. जमेल तशी आईला मदत करते.
मृणाल मात्र आजकाल या प्रत्येकात काहीतरी खुसपट काढते. नवऱ्यावर पहिला आरोप, म्हणजे “त्यांचं माझ्याकडे लक्ष नाही. घरी मुद्दाम उशिरा येतात. ऑफिसमधे सुंदर बायका असतात, तिथेच ते जास्त रमतात. मी आता जुनी झाले, माझ्यातला इंटरेस्ट संपलाय वगैरे वगैरे. शिवाय आगीत तेल टाकायला आजुबाजुच्या सख्या असतातच. मग हा स्ट्रेस अधिक वाढत जातो.
बाळ आधीच्या सारखं आईच्या भोवती भोवती नसतं. त्यांच्यातला संवाद थोडासा कमी झालाय. कारण विषय बदललेत. ” आता माझी त्याला गरजच नाही ” या वाक्यावर नेहमीच तिची गाडी थांबते. त्याचं स्वतंत्र विश्व काही आकार घेतंय, ही गोष्टच तिच्या लक्षात येत नाही. ते बाळ आता हाफचड्डीतलं नाहीय. मोठं झालंय.
मुलीचंही तेच. तिच्या जागी स्वतः ला ती ठेवून बघतच नाही. सतत “आमच्यावेळी ” ची टकळी सुरू असते.
याचा दृश्य परिणाम एकच होत जातो की, ते तिघंही हळूहळू हिला टाळताना दिसतात. ” रोज मरे त्याला कोण रडे ” ही परिथिती येते. कारण कसंही वागलं तरी परिणाम एकच. कितीही समजून घेतलं तरी आई फक्त चिडचिड करते. मग त्याला एक गोंडस नाव मिळतं ” हार्मोन्स इम्बॅलन्स. मेनॉपॉज. “
डॉक्टरी ज्ञानाला हे चॅलेंज नव्हे, हे आधी लक्षात घ्या. पाळी येताना आणि जाताना बाईमधे अनेक बदल होतातच. पण ते ती कशा त-हेने घेते यावर अवलंबून आहे. जसं दुःख, वेदना कोण किती सहन करतं यावर अवलंबून असतं अगदी तसंच !
एक गोष्ट इथे शेअर करते. माझ्या बाळंतपणाच्या वेळी, माझ्या बाजूलाच माझ्या नवऱ्याच्या मित्राची बायको होती. मित्र संबंध म्हणून एकाच खोलीत आम्ही दोघी होतो. तिला पहाटे मुलगा झाला. ती आदली रात्र तिने पूर्ण हॉस्पिटलमधे रडून / ओरडून गोंधळ घालून घालवली. माझीही वेळ येतच होती. पण माझ्या तोंडून क्वचित ” आई गं ” वगैरे शिवाय शब्दच नव्हते. कळा मीही सोसतच होते. माझा लेबर रूममधून माझा ओरडण्याचा काहीच आवाज येत नाही हे बघून, माझी आई घाबरली. खूप घाबरली.. कारण आदली रात्र तिने बघितली होती.
रात्री बारा चाळीसला मला मुलगा झाला. माझं बाळ जास्त वजनाचं हेल्दी होतं. काही अडचणीही होत्या. पण सर्व पार पाडून नॉर्मल बाळंतपण झालं. तेव्हाच लक्षात आलं की, सुख दुःख हे व्यक्तीसापेक्षच असतं.
चाळीस ते पन्नास किंवा पंचावन्न हा वयोगट प्रत्येकच स्त्रीच्या वाट्याला येतो. एखादी विधवा बाई, संयुक्त कुटुंबातील बाई, परित्यक्ता, प्रौढ कुमारिका ते सगळं सहज सहन करून जाते. कारण ” रडण्यासाठी तिला कुणाचा खांदा उपलब्ध नसतो. ” तिला वेदना नसतील का? अडचणी नसतील का? पण ती जर रडत चिडत बसली तर, कसं होणार ? जिथे तुमचं दुःख गोंजारलं जातं, तिथेच दुःखाला वाचा फुटते. अन्यथा बाकिच्यांची दुःखे ही मूक होतात. असो !
हे सर्वच बाबतीत घडत असतं. कारण, परदुःख शीतल असतं. हे वाचून अनेकांचं मत हेच होईल की, ” यांना बोलायला काय जातं ? आम्ही हे अनुभवतोय. ” याला काही अंशी मी सहमत आहे. पण पूर्णपणे नाही. प्रत्येकच नवरा खरंच सुख बाहेर शोधतो का? घरातल्या पुरुषाला सुख बाहेर शोधावे लागू नये, इतकं घरातलं वातावरण नॉर्मल असलं तर तो बाहेर का जाईल ? आपल्या म्हणजे स्त्रियांच्या जशा अनेक अडचणी असतात, तशाच पुरुषांच्याही असतात, हे जर समजून घेतलं तर, वादाच्या ठिणग्या पडणार नाहीत. क्वचित पडल्याच तर तिचा भडका होणार नाही.
पंख फुटल्यावर पाखरंही घरट्याच्या बाहेर जातात, मग मुलांनी याच वयात आपलं करिअर करण्याचा प्रयत्न केला, तर सर्वतोपरी त्यांना मदत करायलाच हवी ना?
मुलींना वेळेतच जागं केलं, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तर मुलगीच तुमची मैत्रिण बनते. जरासं आपणही तिच्या वयात डोकावून बघावं. तिच्या ठिकाणी स्वतःला ठेवून बघावं.
आपली चिडचिड होणं स्वाभाविक आहेच. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, रडून चिडून जर परिस्थिती बदलत असेल, तर खुशाल रडा. पण आहे त्या परिस्थितीशी आपली मनस्थिती जुळवून घेतली तर, आणि तरच घरात संघर्षाची परिस्थिती निर्माण होणार नाही. कारण कपड्याची एखाद्या ठिकाणची शिवण उसवली तर, जसं ज्याला शिवता येईल तसं शिवून टाकावं. अन्यथा तो कपडा कामातून जाईल हे लक्षात असू द्यावं.
यासाठी खूप काही करायला हवंय का? नाही ! आपला भूतकाळ आठवून वर्तमानाशी जुळवून घ्यावं. ” मी तरूण असताना मला माझी आईच तेवढी ग्रेट वाटायची. सासू नव्हे. ” हे आठवावं. बहीण भावाला आणि दीर नणंदांना दिलेले गिफ्ट आठवावे. आपल्या घरात सासर आणि माहेरपैकी कुठली वर्दळ अधिक होती/आहे हे बघावं. त्यानुसार आपल्या नवऱ्याचं वागणं, याचा विचार करावा.
विषय जरा वेगळ्या बाजूला कलतोय, हे कळतंय ! यावर पुढे सविस्तर बोलूच.
पण सध्या एवढंच लक्षात ठेवूया मैत्रिणींनो की, मेनॉपॉज किंवा तत्सम अडचणींवर सहज मात करता येते, त्याचा बाऊ न करता. त्यासाठी फक्त आपली मनस्थिती बदलूया!
☆ माझी जडणघडण… भाग – – ३५ – रेडिओ – भाग दुसरा ☆ सौ राधिका भांडारकर ☆
(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)
रेडिओ – भाग दुसरा
(हे “गीत रामायण” वर्षभर श्रोत्यांनी प्रचंड भावनात्मकतेने, श्रद्धेने आणि अपार आनंदाने ऐकले.)
इथून पुढे —
आज काय रामजन्म होणार…
सीता स्वयंवर ऐकायचे आहे…
राम, सीता, लक्ष्मण वनवासात चालले आहेत..
“माता न तू वैरिणी” म्हणत भरत कैकयीचा तिरस्कार करतोय…
भरत भेटीच्या वेळेस,
।पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा।
या गाण्याने तर कमाल केली होती.
“सेतू बांधा रे” या गाण्याबरोबर श्रोतृवर्ग वानरसेने बरोबर जणू काही लंकेलाच निघाला. घरोघर “सियावर रामचंद्रकी जय” चा गजर व्हायचा.
शेवटचं,
।गा बाळांनो श्री रामायण। या गाण्याने कार्यक्रमाचा जेव्हा समारोप झाला तेव्हा एक अनामिक हुरहूर दाटून आली. खरोखरच या श्रोतृगणात आमची पिढी होती हे आमचं किती भाग्य! या अमर महाकाव्याची जादू आम्ही या रेडिओमुळे प्रत्यक्ष अनुभवली. त्यानंतरच्या काळात गीतरामायणाचे अनेक प्रत्यक्ष कार्यक्रम झाले.. आजही होतात पण रेडियोवर ऐकलेल्या त्या पहिल्या कार्यक्रमाची मजाच और होती! आजही आठवताना, लिहिताना, माझ्या अंगावर काटा फुलतो. कसे आम्ही कुटुंबीय, शेजारी, आजूबाजूचे सारेच हातातली कामे टाकून गीत रामायणातल्या समृद्ध रचना गाणाऱ्या रेडिओ जवळ मग्न होऊन, भान हरपून बसून राहायचे आणि पुढच्या आठवड्याची प्रतीक्षा करायचे.
आज ओठातून सहज उद्गार निघतात, “रेडिओ थोर तुझे उपकार.”
शालेय जीवनातला आणखी एक- रेडिओ सिलोन वरून प्रसारित होणारा अतीव आनंददायी, औत्स्युक्यपूर्ण कार्यक्रम म्हणजे “बिनाका गीतमाला”
“अमीन सयानी”चं बहाररदार निवेदन आणि तत्कालीन हिंदी चित्रपटातील एकाहून एक आवडती गाणी ऐकताना मन फार रमून जायचं. दर बुधवारी रात्री आठ वाजता, रेडिओ सिलोन वरून प्रसारित होणारा हा कार्यक्रम आम्ही न चुकता ऐकायचो. त्यासाठी दुसऱ्या दिवशीचा गृहपाठ पटापट संपवून “बिनाका गीतमाला” ऐकण्यासाठी सज्ज व्हायचे हे ठरलेलेच. आज कुठले गाणे पहिल्या पादानवर येणार यासाठी मैत्रिणींमध्ये पैज लागलेली असायची. तसेच नव्याने पदार्पण करणार्या शेवटच्या पादानवरच्या गाण्याचे ही अंदाज घेतले जायचे. आम्ही अक्षरश: “बिनाका गीतमालाची” डायरी बनवलेली असायची. शेवटच्या पादानपासून पहिल्या पादानपर्यंतची दर बुधवारची गाण्यांची यादी त्यात टिपलेली असायची. मुकेश, रफी, तलत, आशा, लताची ती अप्रतीम गाणी ऐकताना आमचं बालपण, तारुण्य, फुलत गेलं.
जाये तो जाये कहा..
जरा सामने तो आओ छलिया..
है अपना दिल तो आवारा..
जिंदगी भर नही भूलेंगे..
जो वादा किया वो..
बहारो फुल बरसाओ..
बोल राधा बोल..
बिंदिया चमकेगी, कंगना खनकेगी..
वगैरे विविध सुंदर गाण्यांनी मनावर नकळत आनंदाची झूल या कार्यक्रमातून पांघरली होती.
दुसऱ्या दिवशी शाळेतही मधल्या सुट्टीत पटांगणातल्या आंब्याच्या पारावर बसून आम्ही मैत्रिणी ही सारी गाणी सुर पकडून (?) मुक्तपणे गायचो. अमीन सयानीचे विशिष्ट पद्धतीने केलेले सूत्रसंचालन, त्याचा आवाज आम्ही कसे विसरणार? अजूनही हे काही कार्यक्रम चालू आहेत की बंद झालेत हे मला माहीत नाही. असतीलही नव्या संचासहित पण या कार्यक्रमाचा तो काळ आमच्यासाठी मात्र अविस्मरणीय होता हे नक्की.
फौजीभाईंसाठी लागणार्या विविधभारतीनेही आमचा ताबा त्याकाळी घेतला होता.
वनिता मंडळ नावाचा एक महिलांसाठी खास कार्यक्रम रेडिओवरून प्रसारित व्हायचा. तो दुपारी बारा वाजता असायचा. त्यावेळी आम्ही शाळेत असायचो पण आई आणि जिजी मात्र हा कार्यक्रम न चुकता ऐकायच्या. खरं म्हणजे त्या काळातल्या सर्वच गृहिणींसाठी हा कार्यक्रम महत्त्वाचा आणि मनोरंजनाचा ठरला होता. माझा या कार्यक्रमांशी प्रत्यक्ष संबंध आयुष्याच्या थोड्या पुढच्या टप्प्यावर आला. त्यावेळच्या आठवणी माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. अकरावीत असताना
माझे अत्यंत आवडते, इंग्लिश शिकवणारे, खाजगी क्लासमधले “काळे सर” हे जग सोडून गेले तेव्हा मी खूप उदास झाले होते. त्यांच्या स्मृतीसाठी मी एक लेख लिहिला आणि “वनिता मंडळ” या आकाशवाणीच्या कार्यक्रमात तो सादर करण्याची मला संधी मिळाली. त्यावेळी मा. लीलावती भागवत, विमल जोशी संयोजक होत्या. त्यांना लेख आणि माझे सादरीकरण दोन्ही आवडले आणि तिथूनच आकाशवाणी मुंबई केंद्रावर माझ्या कथाकथनाच्या कार्यक्रमाची नांदी झाली. तेवढेच नव्हे तर मी लेखिका होण्याची बीजे या आकाशवाणीच्या माध्यमातूनच रोवली गेली. माननीय लीलावती भागवत या माझ्या पहिल्या लेखन गुरू ठरल्या. रेडिओचे हे अनंत उपकार मी कसे आणि का विसरू?
अगदी अलीकडे “उमा दीक्षित” संयोजक असलेल्या एका महिला कार्यक्रमात कथाकथन करण्यासाठी मी आकाशवाणी मुंबई केंद्रावर गेले होते. पन्नास वर्षात केवढा फरक झाला होता! दूरदर्शनच्या निर्मितीमुळे आकाशवाणीला ही अवकळा आली असेल का असेही वाटले. नभोवाणी केंद्राचे एकेकाळचे वैभव मी अनुभवलेले असल्यामुळे त्या क्षणी मी थोडीशी नाराज, व्यथित झाले होते. फक्त एकच फरक पडला होता. त्या दिवशीच्या माझ्या कार्यक्रमाचा अडीच हजाराचा चेक मला घरपोच मिळाला होता पण त्याकाळचा १५१ रुपयाचा चेक खात्यात जमा करताना मला जो आनंद व्हायचा तो मात्र आता नाही झाला. आनंदाचे क्षण असे पैशात नाही मोजता येत हेच खरं! माझ्या कथाकथनाला अॉडीअन्स मिळेल का हीच शंका त्यावेळी वरचढ होती.
आता अनेक खाजगी रेडिओ केंद्रेही अस्तित्वात आहेत. गाडीतून प्रवास करताना अनेक RJ न्शी ओळख होते. कुठल्याही माध्यमांची तुलना मला करायची नाही पण एक नक्की माझ्या मनातलं नभोवाणी केंद्र… ऑल इंडिया रेडिओ… त्याचे स्थान अढळ आहे आज मी रेडिओ ऐकत नाही हे वास्तव स्वीकारून सुद्धा…
“ताई उठता का आता? चहा ठेवू का तुमचा? साखर नाही घालत.. ”
सरोज माझ्या डोक्यावर हात ठेवून मला उठवत होती…
“अगबाई! इतकं उजाडलं का? उठतेच..
आणि हे बघ तो रेडियो चालूच ठेव. बरं वाटतं गं!ऐकायला”
☆ “कुंभमेळ्याकडे थोडेसे वेगळ्या दृष्टिकोनातून…” – लेखक : श्री मिलिंद साठे ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆
प्रयाग राज कडे जाणाऱ्या सर्वच रस्त्यांवरील व्यवसाय भरभराटीला आले होते. अगदी टायर पंक्चर वाल्यापासून ते स्टार हॉटेल पर्यंत. प्रयाग राज मधल्या सर्वच व्यावसायिकांना दिवसाचे २४ तास सुध्दा कमी पडत होते. कुठलाही उद्दामपणा, मुजोरी न करताही व्यवसाय करता येतो. साधं कपाळावर गंध कुंकू लावणारा हजारात कमाई करत होता. अगदी भिकाऱ्याला सुध्दा कुणी निराश करत नव्हते. सरप्रायजींगली भिकारी खुपच कमी दिसले. आता थोडेसे सरकारी नोकरांबद्दल, तेच कर्मचारी, तेच पोलिस, तेच प्रशासन, पण फक्त जबरदस्त राजकीय इच्छाशक्ती असणाऱ्या नेत्यामुळे काय चमत्कार घडू शकतो त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे हा महाकुंभ. कोण म्हणतं सरकारी नोकर काम करत नाहीत ? एमबीए च्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम वस्तुपाठच होता हा कुंभमेळा. फायनान्स, मार्केटिंग, एचआर, इव्हेंट, डीसास्टर, मॅनपाॅवर काय नव्हतं तिथे ? माझ्या असे वाचनात आले की आर्किटेक्चर च्या विद्यार्थ्यांसाठी यासाठी एक काॅंपिटीशन आयोजित केली होती. नवीन पिढीला सुध्दा कुंभ आयोजनात सहभागी करुन घेण्याचा हा प्रयत्न किती छान. प्रत्येक काॅर्नरवर २४ तास हजर असलेले पोलिस रात्रीच्या थंडीत शेकोटी पेटवून भाविकांची सहाय्यता करत होते. बिजली, पानी, सडक और सफाई सलग २ महिने २४×७ मेंटेन ठेवणे ही खायची गोष्ट नाही. किती महिने किंवा वर्षे आधीपासून तयारी सुरू केली असेल ?
सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या विशिष्ट मानसिकतेतून बाहेर काढून स्वतःच्या घरचे कार्य असल्याप्रमाणे कामाला जुंपणे कसं जमवलं असेल ? यूपी पोलिसांची हिंदी चित्रपटांनी उभी केलेली प्रतिमा आणि कुंभ मधले पोलिस याचा काही ताळमेळ लागत नव्हता. बहुतेक कुंभ संपल्यानंतर ते ही म्हणतील “सौजन्याची ऐशी तैशी”. सफाई कर्मचार्यांबद्दल तर बोलावे तेवढे कमीच आहे. जागोजागी ठेवलेल्या कचरा पेट्या भरून वाहण्यापुर्वीच उचलल्या जात होत्या. रस्ते झाडण्याचे काम अहोरात्र चालू होते. हजारो शौचालयांचे सेप्टिक टॅंक उपसणाऱ्या गाड्या सगळीकडे फिरत होत्या. रात्रंदिवस भाविक नदीमध्ये स्नान करत होते त्यामुळे शेकडो किलोमीटर लांबीचे गंगा यमुना चे काठ जलपोलिसांद्वारे नियंत्रित केले जात होते. हेलिकॉप्टर मधूनही परिस्थिती वर लक्ष ठेवले होते.
आधुनिक तंत्रज्ञान आणि धार्मिकता याचा सुंदर संगम साधला होता. सर्व खोया पाया बुथ एकमेकांशी साॅफ्ट वेअर द्वारे जोडले होते. प्रत्येक दिव्याच्या खांबावर मोठ्या अक्षरात नंबर आणि क्यू आर कोड चे स्टिकर लावलेले होते. ज्या योगे तुम्हाला तुमचे लोकेशन इतरांना कळवणे सोपे जावे. गंगा यमुना दोन्ही नद्यांचा प्रवाह नियंत्रणात ठेवला होता. हिमालयात उगम पावणाऱ्या नद्यांचा पाण्याचा प्रवाह अतिशय बेभरवशी असतो हे विशेष करून लक्षात घेतले पाहिजे. ज्या पाण्यात शेकडो संत महंत, या देशाच्या राष्ट्रपती, पंतप्रधान, परदेशी पाहुणे, मोठमोठे उद्योगपती स्नान करत होते त्या पाण्याची गुणवत्ता नक्कीच चांगली असली पाहिजे. पुण्यातून निघताना बरेच जण म्हणाले “त्या घाण पाण्यात आंघोळ करायची ?” पण ओली वस्त्रे अंगावरच वाळवून देखील आम्हाला काहीही त्रास झाला नाही.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे आखाड्यातल्या नळाला २४ तास येणारे पाणी पिण्यायोग्य होते. रस्त्यावर जागोजागी मोफत आर ओ फाऊंटन लावलेले होते. गर्दीच्या रस्त्यांवरुन स्थानिक तरुण दुचाकीवरून माफक दरात भाविकांना इच्छित स्थळी पोचवत होते. एक प्रचंड मोठी अर्थव्यवस्था काम करत होती. एखाद्या छोट्या राज्याच्या वार्षिक बजेट पेक्षा मोठी उलाढाल ह्या दोन महिन्यांत झाली असेल. हे सर्व लिहीत असतानाच माझ्या बहिणीने मला एक बातमी दाखवली “महा कुंभ मध्ये आजपर्यंत १२ बालकांनी सुखरूप जन्म घेतला” एका परीने हा सृजनाचाही कुंभ म्हणावा लागेल.
मी अजिबात असा दावा करत नाही की जे होते ते सर्वोत्तम होते. पण कुठल्याही गैरसोयी बद्दल कुणीही तक्रार करताना दिसत नव्हते.
ह्या देशातील सर्व सामान्य माणसाने अत्यंत श्रध्देने, संयमाने साजरा केलेला हा जगातील सर्वात मोठा धार्मिक सोहळा अनुभवण्याचे भाग्य आम्हाला लाभले ही आमच्या पुर्वजांची पुण्याई.
Never underestimate the power of common man.
लेखक : श्री मिलिंद साठे
९८२३०९९९५१
प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर
संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो. ८४४६३९५७१३.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “भाजलेल्या शेंगा” – लेखक – अज्ञात☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆
खूप दिवसांनी छान गाढ झोप लागली. जाग आल्यावर हॉस्पिटलमध्ये आहोत, हे लक्षात यायला काही क्षण लागले. बेल वाजवल्यावर रुममध्ये नर्स आल्या.
“गुड ईव्हिनिंग सर. ”
“कोणी भेटायला आलं होत का?”
“नाही. ”
“बराच वेळ झोपलो होतो, म्हणून विचारलं. ” मोबाईलवरसुद्धा एकही मिस्ड कॉल किवा मेसेज नव्हता.
“आता कसं वाटतंय?” नर्स.
प्रचंड बोअर झालंय. ”
“तीन दिवसात ते प्यून काका सोडून तर भेटायला दुसरं कोणीच कसं आलं नाही?”
“सगळे बिझी असतील. ”
“आपलं माणूस म्हणून काळजी आहे की नाही?” नर्स बोलत होत्या, पण मी काहीच उत्तर दिलं नाही.
“सॉरी, मी जरा जास्तच बोलले, ” नर्स.
“जे खरं तेच तर बोललात!”
ब्लडप्रेशर तपासताना दोन-तीन वेळा ‘सॉरी’ म्हणून नर्स निघून गेल्या.
त्यांनी सहजपणे म्हटलेलं खोलवर लागलं. दोन शब्द बोलायला, विचारपूस करायला हक्काचं, प्रेमाचं कोणीच नाही, याचं खूप वाईट वाटलं. एकदम रडायला आलं. भर ओसरल्यावर बाहीने डोळे पुसले. डोक्यात विचारांचा पंखा गरागरा फिरायला लागला. अस्वस्थता वाढली.
आज मला काही कमी नाही. मोठा बंगला, फार्म हाउस, तीन तीन गाड्या, भरपूर बँक बॅलन्स, सोशल स्टेटस सगळं आहे, तरीही मन शांत नाही. कशाची तरी उणीव भासतेय. प्रत्येकजणच स्वार्थी असतो, पण मी पराकोटीचा आहे. प्रचंड हुशार, तल्लख बुद्धी; परंतु तिरसट, हेकेखोर स्वभावामुळे कधीच कोणाचा आवडता नव्हतो. फटकळ बोलण्यामुळे फारसे मित्र नव्हते. जे होते, तेसुद्धा लांब गेले. माझ्या आयुष्यात कधीच कोणाला ढवळाढवळ करू दिली नाही. अगदी बायकोलासुद्धा. तिला नेहमीच ठरावीक अंतरावर ठेवलं. लौकिक अर्थाने सुखाचा संसार असला, तरी आमच्यात दुरावा कायम राहिला. पैशाच्या नादात म्हातारपणी आई-वडिलांना दुखावले. मोठ्या भावाला फसवून वडिलोपार्जित संपत्ती नावावर करून घेतली. एवढं सगळं करून काय मिळवलं, तर अफाट पैसा. सोबत विकृत समाधान आणि टोचणारं एकटेपण. विचारांची वावटळ डोक्यात उठली होती. स्वतःचा खूप राग आला. मन मोकळं करायची इच्छा झाली. बायकोला फोन केला पण “उगीच डिस्टर्ब करू नकोस. काही हवं असेल तर मेसेज कर, “असं सांगत तिनं फोन कट केला. तारुण्याच्या धुंदीतल्या मुलांशी बोलायचा तर प्रश्नच नव्हता.
…… फोन नंबर पाहताना दादाच्या नंबरवर नजर स्थिरावली. पुन्हा आठवणींची गर्दी. दादाचा नंबर डायल केला; पण लगेच कट केला; कारण आमच्यातला अबोला. तीन वर्षांपूर्वी आमच्यात कडाक्याचे भांडण झालं होतं. त्यानंतर पुढाकार घेऊन दादानं समेटाचा प्रयत्न केला; पण माझा ईगो आडवा आला. म्हणूनच आता तोंड उघडायची हिंमत होत नव्हती. तरीपण बोलावसं वाटत होतं. शेवटी धाडस करून नंबर डायल केला आणि डोळे गच्च मिटले.
“हं!” तोच दादाचा आवाज
“दादा, मी बोलतोय. ”
“अजून नंबर डिलीट केलेला नाही. ”
“कसायेस?”
“फोन कशाला केलास?”
“तुझा राग समजू शकतो. खूप चुकीचा वागलो. गोड गोड बोलून तुला फसवले. ” ठरवलं नसताना आपसूकच मनात साठलेलं धाडधाड बोलायला लागलो.
“मुद्द्याचं बोल. उगीच शिळ्या कढीला ऊत आणू नकोस. आपल्यात आता काही शिल्लक राहिलेलं नाही.”
“दादा, इतकं तोडून बोलू नकोस.”
“मी तर फक्त बोलतोय. तू तर….]”
“पैशाच्या नादानं भरकटलो होतो. चुकलो.”
“एकदम फोन का केलास. सगळ्या वाटण्या झाल्यात. आता काहीच शिल्लक नाही. ”
“मला माफ कर, ” म्हणालो पण पलीकडून काहीच उत्तर आलं नाही.
“दादा!!!”
“ऐकतोय, काय काम होतं?”
“माझ्याकडून डोंगराएवढ्या चुका झाल्यात. ”
“मुद्द्याचं बोल. ”
“झालं गेलं विसरून जा. ”
“ठीकय. ”दादा कोरडेपणाने बोलला; परंतु मी मात्र प्रचंड भावूक झालो.
“झालं असेल तर फोन ठेवतो. ”
“आज सगळं काही आहे अन नाहीही. ”
“काय ते स्पष्ट बोल. ”
“हॉस्पिटलमध्ये एकटा पडलोय”
“का, काय झालं?” दादाचा आवाज एकदम कापरा झाला.
“बीपी वाढलंय. चक्कर आली म्हणून भरती झालोय. डॉक्टरांनी आराम करायला सांगितलंय. ”
“सोबत कोण आहे? ”
“कोणीच नाही. दिवसातून दोनदा बायको आणि मुलं व्हिडीओ कॉल करून विचारपूस करायचं कर्तव्य पार पाडतात. ”
“अजबच आहे. ”
“जे पेरलं तेच उगवलं. मी त्यांच्याशी असाच वागलोय. कधीच प्रेमाचे दोन शब्द बोललो नाही. फक्त व्यवहार पाहिला. स्वार्थासाठी नाती वापरली आणि तोडली. आता एकटेपणाने कासावीस झाल्यावर डोळे उघडलेत. ”
कंठ दाटल्याने फोन कट केला. अंधार करून पडून राहिलो.
बऱ्याच वेळानंतर नर्स आल्या. लाईट लावून हातात कागदाचा पुडा दिला. मस्त घमघमाट सुटला होता. घाईघाईने पुडा उघडला, तर त्यात भाजलेल्या शेंगा. प्रचंड आनंद झाला.
“नक्की दादा आलाय. कुठंय????”
“मी इथंच आहे, ” दादा समोर आला.
आम्ही सख्खे भाऊ तीन वर्षानंतर एकमेकांना भेटत होतो. दोघांच्याही मनाची विचित्र अवस्था झाली. फक्त एकमेकांकडे एकटक पाहत होतो. नकळतपणे माझे हात जोडले गेले.
“राग बाजूला ठेवून लगेच भेटायला आलास!”
“काय करणार तुझा फोन आल्यावर राहवलं नाही. जे झालं ते झालं. आता फार विचार करू नकोस. ”
“तुला राग नाही आला?”
“खूप आला. तीन वर्षे तोच कुरवाळत होतो; पण आज तुझ्याशी बोलल्यावर सगळा राग वाहून गेला. तुला आवडणाऱ्या भाजलेल्या शेंगा घेतल्या आणि तडक इथं आलो. ”
“दादा!!!!!…. ”मला पुढे काही बोलता येईना. दादानं डोक्यावरून हात फिरवला. तेव्हा खूप शांत शांत वाटलं.
“राग कधीच नात्यापेक्षा मोठा नसतो. मग ते रक्ताचं असो वा मैत्रीचं. चुका, अपमान काळाच्या ओघात बोथट होतात. जुन्या गोष्टींना चिकटून बसल्याचा त्रास स्वतःलाच जास्त होतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव – आपलं नातं म्हणजे फेविकोल का जोड….. ”
दादा लहानपणी द्यायचा तसचं शेंगा सोलून दाणे मला देत बोलत होता. त्या भाजलेल्या खरपूस दाण्यांची चव अफलातून होती.
सहज कचऱ्याच्या डब्याकडे लक्ष गेलं. त्यात शेगांच्या टरफलांच्या जागी मला माझा इगोच दिसत होता!
लेखक : अज्ञात
प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर
अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
पण ते कधी कसं केव्हा सोबत घेऊन जाणार हे नक्की कळत नाही माणसाला.
त्याची वाट पहातच जगत असतो माणूस मरेपर्यंत.
पण जन्ममरणाच्या मधल्या काळातली उलथापालथ कधी आनंद देते, तर कधी पिळवटून टाकते मना सोबत तनालाही.
तन माणसाचं आवडत ठिकाण, कारण त्यातच त्याचा आत्मा असतो. तो त्याला बाह्यात्कारी सजवण्यातच आयुष्य खर्ची घालतो. कारण मनाचा तसाच हुकूम असतो. मेंदू मनाचा गुलाम पण देहावरचा शासनकर्ता. मग मनाचा आदेश धुडकावून लावण्याची त्याची कुठे हिंमत चालते.
मन मुलखाचेओढाळ, त्याला आवरघालणे महाकठीण. या सगळ्या गुंत्यात मनाचेच फावते. ते सगळ्यांची भंबेरी उडवून देते. आणि जगण्याचाच बट्याबोळ करून टाकते. म्हणूनच आत्मा आणि मन यांचा वितंडवाद मिटवण्यासाठी करगर उपाय शोधून ते अमलात आणावे लागतात. पण हे कामही सोपे नसते. त्यासाठी मनालाच मारावे लागते. खडतर तप साधना करावी लागते. आत्मबल एकवटावे लागते. आणि निर्णय घ्यावे लागतात. तसे केले तरच माणसाला च्यारीत्र्य प्राप्त होते व माणूस इतरांपेक्षा वेगळा ठरतो. वागतो. नाहीतर सामान्य राहूनच निघून जातो जगातून. म्हणूनच मनावर काबू मिळवा आणि जगासमोर चांगला माणूस म्हणून मिरवून निघून जा, शांतपणे. एका माहित नसलेल्या अनोळखी विश्वात.
“आत्मशांती” उपाहारगृह हे खादाडीसाठी एक लोकप्रिय ठिकाण. प्रत्यक्ष उपाहारगृहात बसून खाण्याचा आनंद तर घेता यायचाच, शिवाय कालानुरूप स्विगी, झोमॅटो आदिंवरून घरपोच खाणे मागवण्याची सोयही येथे होतीच. बरेच जण फोनवरून ऑर्डर करून खाणे तयार करून ठेवायला सांगायचे आणि स्वतः येऊन पार्सल घेऊन जायचे.
आजही तशीच एक फोनवर ऑर्डर आली होती. कोण्या संपतशेठचा फोन होता. अर्ध्या तासात येतो म्हणाला. अर्धा तास होऊन गेला, तास होत आला तरी संपतशेठचा पत्ता नाही. मग मॅनेजरने त्याला फोन करून आठवण करण्याचा प्रयत्न केले, दोन चार वेळा पूर्ण रिंग गेली तरी कोणी फोन उचललाच नाही. आणि मग नंतर फोन करायचा प्रयत्न केल्यावर “आत्मशांती”चा फोन ब्लॉक केल्याचं लक्षात आलं. ही ऑर्डर घ्यायला कोणी येणार नाही, संपत नावाने फोन करून कोणीतरी चावटपणा केला आहे हे मॅनेजरच्या लक्षात आलं.
दुसऱ्या दिवशी सकाळी मॅनेजरने संपतच्या फोनवर मेसेज पाठवला आणि समाज माध्यमांमध्ये या पूर्वपीठीकेसह तोच मेसेज प्रसिद्ध केला.
“प्रिय संपत (किंवा जे काही आपले खरे नाव असेल ते),
काल संध्याकाळी तुम्ही आमच्या “आत्मशांती”मध्ये फोन करून जेवणाची ऑर्डर दिली होतीत, परंतु तुम्ही ती ऑर्डर स्वीकारायला आला नाहीत. तुम्हाला फोन केले, तुम्ही ते उचलले नाहीत आणि नंतर तर आमचा फोन ब्लॉकच केलात.
तुम्ही न आल्याने आमच्या शेफची मेहनत आणि साधनसामुग्री फुकट जाणार होती, आमचं आर्थिक नुकसान होणार होतं आणि मुख्य म्हणजे ते अन्न फुकट जाणार होतं, याचं आम्हाला जास्त दुःख होतं.
आपल्या “आत्मशांती”चे ब्रीदवाक्य आहे – उदरभरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म ! आम्ही “आत्मशांती”कडे निव्वळ तुमचे पोट भरण्याचे आणि आमच्यासाठी नफ्याचे साधन म्हणून पाहत नाही, सात्विक अन्नदान ही आमची भूमिका आहे.
आम्ही देवाची प्रार्थना करतो, की तुम्हाला आमची ही भूमिका लक्षात येवो आणि काल तुम्ही जो चावटपणा केलात, अन्नाचा अपमान केलात, तसं तुम्ही पुन्हा केव्हाही कोणाहीबरोबर न करोत.
पण वाईटातून नेहमी चांगले निघते म्हणतात तसं आमच्याबाबतीत काल घडलं. तुमच्या न येण्यामुळे श्री संतोष जगदाळे या मेहनती माणसाला मदत झाली.
तुम्ही घेऊन न गेलेल्या ऑर्डरचे काय करायचे, ती फुकट कशी जाऊ द्यायची नाही या विचारात आम्ही असतानाच श्री संतोष “आत्मशांती”मध्ये आले. साठएक वर्षांचे संतोष एका गोदामावर रखवालदार म्हणून काम करतात. ते, त्यांची सून आणि त्यांची दोन नातवंडं पंधरा दिवसांपूर्वीच या शहरात आले आहेत. यांना नुकतीच नोकरी लागली आहे, पगार अजून व्हायचा आहे, सून लहानमोठी कामं करून दोन पैसे मिळवायची पण कालपासून ती आजारपणामुळे अंथरुणाला खिळून आहे.
आज दिवसभर त्यांना आणि घरच्यांना उपवासच घडला होता, म्हणून एक संधी घ्यावी म्हणून ते आमच्याकडे काही काम आहे का, आणि त्या मोबदल्यात काही अन्न मिळेल का हे विचारायला आले होते.
त्यांची हकीकत ऐकल्यावर आम्ही सर्वप्रथम तुमच्या ऑर्डरचे अन्न त्यांना खायला देऊ केले. संतोष ते अन्न तसंच घरी घेऊन चालले होते, पण आम्ही त्यांना आश्वस्त केलं की घरी घेऊन जायला वेगळे अन्न दिले जाईल.
ते इथेच आमच्याकडे भरपेट जेवले, तृप्त झाले. आमच्या व्यवस्थापनाने त्यांना आठवडाभरासाठी रोज काही पोटभरीचे अन्न देण्याचा वायदा केला आहे.
त्यांच्या सूनबाईंची प्रकृती सुधारल्यावर त्यांना आमच्याकडे काही नोकरी देता येईल का हेही आम्ही प्रयत्न करून पाहणार आहोत.
सून नातवंडांसाठी खाणे घरी घेऊन जाताना संतोषच्या चेहऱ्यावरून ओसंडून जाणारे समाधान पाहताना आम्हाला यज्ञपूर्तीचा आनंद लाभला.
अमळनेर हे माझं सासरगाव. जेव्हा मी अमळनेरला जाते तेव्हा अगदी निवांत असते. देहाने आणि मनानेही. माझी धाकटी जाऊ सरोज, माझा तिथला मुक्काम आरामदायी व्हावा म्हणून अगदी मनापासून प्रयत्नशील असते. ती पहाटे लवकर उठते. प्रभात फेरफटका मारून येते. शांत झोपलेल्या मला- खुडबुडीचे आवाज येऊ नयेत म्हणून माझ्या रूमचा दरवाजा हलकेच ओढून घेते. खरं म्हणजे मी जागीच असते. माझा धाकटा दीर सुहास खराट्याने खरखर अंगण झाडत असतो. सरोज बाहेर गेली, आत आली, मागचा दरवाजा उघडला या सर्वांचे आवाज येत असतात पण तरीही मी उठत नाही. अशी घरी बनवलेल्या, घरच्या कपाशीच्या गादीवर अर्धवट झोपेतली जाग मी मजेत अनुभवत असते.
त्या पहाटेच्या वेळी फिरून आल्यानंतर पहिलं जर काय सरोज करत असेल तर ती तिचा छोटासा रेडिओ लावते. रेडिओवर सकाळची मंगल गाणी, भक्ती गीतं, भगवत् गीतेच्या अध्यायावरचं विवेचन वगैरे एकापाठोपाठ एक चालू असतं. मधून मधून निवेदिकेचा मंजुळ आवाजही येत असतो. सरोज रेडिओ काही कान देऊन ऐकत नसते पण दरम्यान ती चहापाणी, घरातला केरवारा, कपडे, भांडी यासारखी कामे रेडिओच्या तालात सहजपणे आवरत राहते, तेव्हा माझ्या मनात विचार येतो आजच्या दूरदर्शन, संगणक, मोबाईलच्या जमान्यातही सरोजसारखी रेडिओ ऐकणारी माणसं आहेतच की!
“ सकाळचे सहा वाजले आहेत, आम्ही जळगाव आकाशवाणी केंद्रावरून बोलत आहोत. ” या एका वाक्याने मी जवळजवळ ६० वर्षे मागे जाते.
रेडिओ
हा रेडिओ म्हणजे एक महत्त्वाचं स्थान आहे आमच्या बालपणातलं आणि जडघडणीतलंही. एक अखंड नातं त्या ध्वनीलहरींशी जुळलेलं आहे. त्यावेळी घरबसल्या करमणुकीचं रेडिओ हे एकमेव साधन होतं. घराघरात वाजणारा, बोलणारा रेडिओ म्हणजे त्या त्या परिवाराचा एक महत्त्वाचा सदस्य होता.
ऑल इंडिया रेडिओ. AIR.
आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून पहाटेच्या प्रहरी वाजणाऱ्या सिग्नेचर ट्युननेच आम्ही जागे व्हायचो. आजही ती विशिष्ट वाद्यवृंदातील सुरमयी धुन कानात आहे आणि तिच्या आठवणीने अंतःकरणात खूप काहीतरी अनामिक अशा भावनांच्या लाटा उसळतात. बाल्य, कौमार्य आणि तारुण्य सारं काही आकाशवाणीच्या या धूनमधून उलगडत जातं.
रात्री झोपताना दिल्ली आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होणारी संगीतसभाही सोबत असायचीच.
आता टेलिव्हिजन वरच्या अनेक दुष्ट, मतलबी, स्वार्थी, विकृत मानवी भावनांचा अविष्कार घडवणाऱ्या, मनोवृत्ती बिघडवणाऱ्या, वर्षानुवर्षे चालणाऱ्या अनेक दीर्घ मालिका बघताना सहज मनात येते, रेडिओ हे त्यावेळेचे केवळ मनोरंजनाचे साधन नव्हते तर ते साहित्य, संगीत, कलेच्या माध्यमातून सामाजिक संस्कार करण्याचे, समाज घडवण्याचे एक श्राव्य माध्यम होते. आनंदी जीवनाची दिशा दाखवणारं साधन होतं. नि:संशय..
गंमत- जम्मत नावाचा लहान मुलांसाठी एक सुंदर कार्यक्रम आकाशवाणी वरून प्रसारित केला जायचा. त्यातले नानुजी आणि मायाताई मला अजूनही आठवतात. त्यांचे ते प्रेमळ आवाज आजही कानात घुमतात. कितीतरी कथा, बालनाट्ये, बालगीते या कार्यक्रमातून ऐकली. इतिहास, भूगोल, विज्ञान, समाजशास्त्र यांचेही मनोरंजक पद्धतीने ज्ञानार्जन व्हायचे. याच कार्यक्रमातून एखादी ऐतिहासिक किंवा भौगोलिक प्रश्नपत्रिका दिलेली असायची. आम्ही ती उतरवून घ्यायचो आणि त्याची उत्तरे पत्राद्वारे मागवलेली असायची.
द्वारा केंद्राधिकारी, आकाशवाणी मुंबई केंद्र, गंमत जंमत विभाग. मुंबई ४ असा त्यांचा पत्ता असायचा. मी अनेक वेळा या पत्त्यावर प्रश्नपत्रिका सोडवून पत्रं पाठवलेली आहेत आणि पुढच्या कार्यक्रमातून जेव्हा उत्तरे बरोबर असलेल्या अनेक नावांबरोबर माझे नाव घेतले जायचे तेव्हा मला खूप गंमत वाटायची.
माझ्या आजीचे आवडते कार्यक्रम म्हणजे “कामगार सभा” आणि “कीर्तन”. ती रेडियोला कान लावून कीर्तन ऐकायची आणि तिच्याबरोबर आम्ही सुद्धा. या कीर्तनानेही आम्हाला नकळत घडवलेच की! नऊ रसात ओथंबलेले ते कीर्तन ऐकताना आम्ही पुरणकाळात, ऐतिहासिक काळात सहजपणे फेरफटका मारून आलोय. हरिभक्त परायण कीर्तनकाराच्या संगीतातून, गायनातून आम्ही विस्तृत अशा लोक परंपरेच्या हातात हात घालून नाचलो, बागडलो. टाळ चिपळ्यांसोबत गायलेलं “जय जय रामकृष्ण हारी” अजूनही कानात आहे. प्रत्येकवेळी निरुपण संपले की आम्हीही बुवांबरोबर “बोला! पुंडलिक वरदे हरी विठ्ठल।श्री ज्ञानदेव तुकाराम।। असा जयघोष करायचो.
या क्षणी मला रेडिओवरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांच्या वेळा, त्यात सहभागी असणाऱ्या आकाशवाणीच्या प्रत्येक कलाकारांची नावे आठवत नाहीत पण प्रहर आठवतात, आवाज आठवतात. त्या त्या कार्यक्रमाच्या वेळी वाजणारा वाद्यवृंद आठवतो आणि मन पुन्हा पुन्हा त्या काळात झेपावतं.
संध्याकाळी सात वाजता प्रसारित होणाऱ्या मराठी बातम्या, ऑल इंडिया रेडिओ दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आम्ही न चुकता ऐकायचो. सगळ्या घडामोडींचा ताजा आणि निखळपणे घेतलेला मागोवा आम्हाला समाजाबरोबर ठेवायचा. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून बातम्या देणाऱ्या “सुधा नरवणे” यांचा स्पष्ट, मोकळा आवाज आमच्या पिढीतली एकही व्यक्ती विसरू शकणार नाही.
अनेक संगीत नाटकांचं रेडिओवरूनच सुंदर सादरीकरण व्हायचं. कलाकारांच्या संवाद बोलीतूनच डोळ्यासमोर ती पात्रं, ते सीन, वातावरण साकारायचे आणि आभासी असला तरी प्रत्यक्ष रंगभूमीवर नाट्यप्रयोग पाहत असल्याचा आनंद या आकाशवाणीने आम्हाला दिला. गो. नी. दांडेकरांच्या “शितू” या गाजलेल्या कादंबरीचे अभिवाचनही आम्ही रेडिओ जवळ बसून ऐकले. काय आनंद दिला आहे आम्हाला या दर्जेदार कार्यक्रमाने ते कसं सांगू तुम्हाला?
हलक्या- फुलक्या, विनोदी श्रुतिका हे तर मुंबई आकाशवाणीचं खास वैशिष्ट्य. त्या संबंधात मला “प्रपंच” ही श्रुतिका मालिका आठवते. प्रत्येक भाग हा विशेष, हसवणारा आणि मनोरंजक असायचा. त्यातले टेकाडे भाऊजी आणि वहिनी यांच्यात घडणारे खुसखुशीत संवाद आठवले की आताही सहज हसू येतं. “बाळ कुरतडकर”, “नीलम प्रभू”, प्रभाकर (आडनाव आठवत नाही) हे कसलेले कलाकार त्यात सहभागी असायचे. काय जिवंतपणा असायचा त्यांच्या नाट्य सादरीकरणात!
तशी मी लहानच होते पण तरीही १९५५ ते १९५६ हे साल म्हणजे आकाशवाणीच्या इतिहासातले सुवर्णाचे पान म्हणून गाजले ते पक्के लक्षात आहे. पुणे आकाशवाणी केंद्राचे तत्कालीन अधिकारी, भारतीय शास्त्रीय संगीत आणि मराठी नाट्य संगीताचे जाणकार “सीताकांत लाड” यांनी रामायणावर आधारित साप्ताहिक कार्यक्रमाची संकल्पना मांडली. कवी गदिमा आणि संगीतकार, गायक सुधीर फडके यांच्या सहभागाने “गीत रामायण” हे हृदयात राहणारे संगीतमय महाकाव्य अस्तित्वात आले. एक एप्रिल १९५५ रोजी ऑल इंडिया रेडिओ पुणे केंद्रावरून रामनवमीच्या पवित्र प्रसंगी
॥ स्वये श्री रामप्रभू ऐकती कुश लव रामायण गाती ॥
या परमसुंदर, श्रवणीय गीताने गीतरामायण कार्यक्रम सुरू झाला. हा कार्यक्रम वर्षभर चालला. अधिक मासामुळे हे वर्ष ५६ अठवड्यांचं होतं म्हणून ५६ भागात हे “गीत रामायण” वर्षभर श्रोत्यांनी प्रचंड भावनात्मकतेने, श्रद्धेने आणि अपार आनंदाने ऐकले.
भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स या बुच विल्मोर सहकाऱ्यासह तिसऱ्यांदा अवकाशात रवाना झाल्या होत्या. त्यांना घेऊन बोईंग स्टारलाइनर अंतराळयानाद्वारे 5 जून 2024 रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) पोहोचले होते. ही मोहीम फक्त आठ दिवसांची असावी, अशी योजना होती. तथापि, अंतराळयानातील हीलियम वायूची गळती आणि थ्रस्टरच्या बिघाडामुळे अंतराळयानाच्या कार्यात अडथळा निर्माण झाला आणि त्यांचे पृथ्वीवर परतणे लांबले. मिशन सुरू होण्यापूर्वी नासा आणि बोईंग या दोन्ही कंपन्यातील अभियंत्यांना या बिघाडाची माहिती होती. असे असूनही, त्यांनी या गळतीला मिशनसाठी एक किरकोळ धोका मानल्यामुळे नासा आणि बोईंगच्या या निर्णयामुळे सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) अडकले आहेत. स्टारलाइनरच्या माध्यमातून प्रथमच अंतराळवीरांना अंतराळात नेण्यात आले आहे. या मिशनसाठी बोईंगने नासासोबत 4.5 अब्ज डॉलरचा करार केला होता. या कराराशिवाय बोईंगने 1.5 अब्ज डॉलर्सही खर्च केले आहेत.
हीलियम गळतीमुळे इंधन प्रणालीवर परिणाम झाल्यामुळे यानाचे नियंत्रण आणि स्थिरता धोक्यात येते. तर थ्रस्टर बिघाडामुळे यानाच्या दिशा नियंत्रित करण्याची क्षमता कमी झाल्यामुळे सुरक्षित परतीच्या मार्गात धोका निर्माण होतो. नासा आणि बोईंगचे अभियंते या तांत्रिक अडचणींवर मात करण्यासाठी सतत प्रयत्नशील आहेत. सुरक्षित परतीसाठी विविध पर्यायांचा विचार केला जात आहे, ज्यामध्ये स्पेसएक्सच्या क्रू-10 मिशनचा वापर करून अंतराळवीरांना परत आणण्याची शक्यता देखील समाविष्ट आहे. तथापि, या समस्यांचे संपूर्ण निराकरण होईपर्यंत आणि अंतराळयान परतीसाठी सुरक्षित घोषित होईपर्यंत, सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना ISS वरच राहावे लागेल असे दिसतेय. त्याला पर्याय नाही.
खरे पहाता, या दोघांनी बोईंग कंपनीच्या स्टारलाइनर अंतराळयानात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले सदस्य बनून इतिहास रचला. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना घेऊन जाणारे बोईंगचे ‘क्रू फ्लाइट टेस्ट मिशन’ अनेक विलंबानंतर फ्लोरिडामधील केप कॅनाव्हेरल अंतराळ केंद्रावरून निघाले होते. अशा मोहिमेवर उड्डाण करणाऱ्या पहिल्या महिला म्हणूनही विल्यम्स यांनी इतिहास घडवला आहे. तसे पाहिले तर 59 वर्षांच्या सुनीता विल्यम्स यांनी यापूर्वी दोनदा अंतराळ प्रवास केला आहे. याआधी 2006 आणि 2012 मध्ये त्या अंतराळात गेल्या होत्या. नासाच्या म्हणण्यानुसार त्यांनी अंतराळात एकूण 322 दिवस घालवले आहेत. 2006 मध्ये सुनीताने 195 दिवस अंतराळात आणि 2012 मध्ये 127 दिवस अंतराळात घालवले होते. 2012 च्या मिशनची खास गोष्ट म्हणजे सुनीता यांनी तीनदा स्पेस वॉक केला होता. अंतराळवीर स्पेस वॉक दरम्यान स्पेस स्टेशनमधून बाहेर पडतात. पहिल्याच प्रवासात त्यांनी चार वेळा स्पेस वॉक केला. सुनीता विल्यम्स या अंतराळ प्रवास करणाऱ्या भारतीय वंशाच्या दुसऱ्या महिला आहेत. त्यांच्या आधी कल्पना चावला अंतराळात गेल्या होत्या.
मग आता असा प्रश्न पडतो की, त्यांना फक्त आठवड्याभरासाठीच तिथे कार्यरत राहायचे होते आणि त्याप्रमाणे त्यांच्या अन्नाची आणि ऑक्सिजनची सोय केली असेल तर एवढा काळ त्यांना अन्न आणि ऑक्सिजन कसे काय पुरवले गेले आणि कुठून पुरवले गेले? यामागचे इंगीत असे आहे की, सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे ज्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) आहेत, तिथे असा अडचणीचा काळ येऊ शकतो ही शक्यता लक्षात घेऊन दीर्घकाळ राहण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा आधीच उपलब्ध करून ठेवलेल्या आहेत. त्यामुळे स्टारलाइनर यानाच्या अडचणींमुळे त्यांना अन्न, पाणी किंवा ऑक्सिजनच्या तुटवड्याचा धोका नाही. ISS वर ऑक्सीजन जनरेशन सिस्टम (OGS) असल्यामुळे इलेक्ट्रोलिसिसद्वारे पाण्यातील ऑक्सिजन आणि हायड्रोजन वेगळा करता येतो. त्यामुळे ताज्या ऑक्सिजनचा सतत पुरवठा केला जातो. आणीबाणीच्या परिस्थितीत, ऑक्सिजन कॅनिस्टर आणि सोयुझ किंवा ड्रॅगन यानातून आणलेला अतिरिक्त ऑक्सिजन वापरता येतो. त्याचप्रमाणे ISS वर मोठ्या प्रमाणात शून्याच्या खालील तापमानात सुके अन्न साठवून ठेवलेले असते. ते गरजेनुसार नेहमीप्रमाणे खाण्यायोग्य करून वापरले जाते. त्याचबरोबर वॉटर रिक्लेमेशन सिस्टम (WRS) च्या सहाय्याने मूत्र आणि आर्द्रता पुन्हा प्रक्रिया करून प्यायचे पाणी तयार केले जाते. जर समजा या सगळ्या पद्धती वापरूनही तुटवडा निर्माण झालाच तर नियमितपणे स्पेसएक्स ड्रॅगन किंवा अन्य मालवाहू यानांद्वारे अन्न व पाण्याचा पुरवठा केला जातो. ISS ला सौरऊर्जेवर चालणाऱ्या प्रगत प्रणालीद्वारे वीजपुरवठा होतो. तिथे वातावरण नियंत्रित करण्यासाठी कार्बन डायऑक्साइड फिल्टरिंग सिस्टम कार्यरत आहे. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका कमी आहे. अशाप्रकारे ISS हे स्थानक अनेक अंतराळवीरांना वर्षभर राहण्यासाठी सक्षम आणि सुसज्ज केलेले असल्यामुळे सुनीता विल्यम्स आणि विल्मोर ISS वर पूर्ण सुरक्षित आहेत.
एवढा दीर्घकाळ अंतराळात राहिल्यामुळे सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्या शरीरावर काही महत्वाचे परिणाम होऊ शकतात. यामध्ये हाडांची घनता कमी होणे, स्नायू कमकुवत होणे, दृष्टीवर परिणाम आणि इतर आरोग्यविषयक समस्या समाविष्ट आहेत. 8 दिवसाच्या मोहिमेसाठी गेलेल्या या दोघांना आता जवळपास 8 महिने झाले आहेत. तेव्हा त्यांच्या शरीरावर काय परिणाम होतात या सर्व बाबींवर नासा लक्ष ठेवून आहे आणि अंतराळवीरांच्या आरोग्याची काळजी घेत आहे. पण शून्य गुरुत्वाकर्षणाच्या वातावरणात दीर्घकाळ राहिल्याने मानवाच्या शरीरावर अनेक प्रकारचे परिणाम होतात. गुरुत्वाकर्षणाच्या अभावामुळे हाडे कमकुवत होतात आणि त्यांची घनता १% – २% दरमहा कमी होऊ शकते. त्यामुळे परत आल्यावर फ्रॅक्चर किंवा ऑस्टिओपोरोसिससारख्या समस्यांचा धोका वाढतो. असे होऊ नये म्हणून अंतराळवीरांना दररोज व्यायाम करावाच लागतो, पण तरीही परत आल्यावर स्नायू पूर्ववत होण्यासाठी काही आठवडे जातात. गुरुत्वाकर्षणाच्या अभावामुळे हृदय थोडेसे लहान होते आणि रक्ताभिसरणात बदल होतो. त्यामुळे पृथ्वीवर परतल्यावर चक्कर येणे आणि रक्तदाब नियंत्रणात समस्या येऊ शकते. दीर्घकाळ अंतराळात राहिल्यास काही अंतराळवीरांच्या डोळ्यांच्या मागील स्नायूंमध्ये द्रव जमा होऊन दृष्टी धूसर होण्याची समस्या उद्भवू शकते. वेगळेपणाची भावना, एकटेपणा आणि पृथ्वीपासून दूर राहण्याचा दीर्घकाळ याचा परिणाम मानसिक तणाव वाढण्यावर होऊ शकतो. ISS वर असलेल्या सहकाऱ्यांसोबत संवाद आणि पृथ्वीवरील कुटुंबीयांसोबत नियमित संपर्क ठेवल्याने हा परिणाम काही प्रमाणात कमी करता येतो. पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर असल्यामुळे सूर्याच्या आणि अंतराळातील किरणोत्साराचा जास्त धोका असतो. कारण त्यामुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो. या सगळ्या आरोग्यविषयक तक्रारी नियंत्रित ठेवण्यासाठी ISS वर प्रत्येक दिवशी किमान दोन तास नियमित व्यायाम करण्याची सक्ती आहे, त्यामुळे हाडांची मजबुती टिकून राहण्यास मदत होते आणि स्थायूंची कमकुवतता टाळण्यासाठीसुद्धा. त्याचबरोबर हाडांची घनता टिकवण्यास मदत करणारा विशेष आहार आणि औषधोपचारही दिले जातात. परतीनंतर वैद्यकीय तपासण्या आणि पुनर्वसनासाठी ठराविक कालावधी लागतो. या कालावधीत हळूहळू शरीर पुन्हा पृथ्वीच्या वातावरणाशी जुळवून घेऊ शकते. अंतराळात अनपेक्षितरित्या जास्त दिवस लागल्यामुळे सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना काही शारीरिक आणि मानसिक दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे काय यावरही नासा आणि बोईंग यांची वैद्यकीय टीम त्यांच्यावर सातत्याने लक्ष ठेवून आहे. ISS वरील तंत्रज्ञान, व्यायाम आणि आहारामुळे हे परिणाम कमीत कमी होण्याची शक्यता आहे, आणि परत आल्यानंतर काही महिन्यांत त्यांची तब्येत पूर्ववत होईल. सध्या तरी सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर ISS वर सुरक्षित आहेत, आणि त्यांच्या परतीसाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जात आहेत.
आता प्रश्न उरला तो त्यांच्या परतीच्या प्रवासाचा. बोईंग स्टारलाइनर वापरून सुनीता विल्यम्सच्या परतीच्या मोहिमेला पुढे न्यायचे, की स्पेसएक्स वापरून बचाव मोहीम सुरू करायची, यावर नासा विचार करत होती. . नासा स्पेसक्राफ्टचे माजी मिलिटरी स्पेस सिस्टम कमांडर रिडॉल्फी यांच्या सांगण्याप्रमाणे, स्टारलाइनरच्या सेवा मॉड्यूलने सुरक्षित परतीसाठी कॅप्सूल योग्य कोनात ठेवणे आवश्यक होते . यात थोडीही चूक झाली तर त्याचे परिणाम भयंकर होऊ शकतात. रिडॉल्फी यांनी असा इशारा दिला होता, जर कॅप्सूल योग्यरित्या विशिष्ट कोनात नसेल तर, ते पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश करताना जळू शकते. किंवा दुसरा संभाव्य धोका असा की, जर कॅप्सूलने चुकीच्या कोनात पुन्हा प्रवेश केला तर ते वातावरणातून बाहेर पडू शकते आणि परत अवकाशात जाऊ शकते. बोईंग आणि नासा त्यांच्या परतीसाठी स्टारलाइनरच्या दुरुस्तीवर काम करत होते . जर स्टारलाइनर यान वापरणे शक्य नसेल, तर त्यांना स्पेसएक्स क्रू-10 किंवा अन्य यानाद्वारे पृथ्वीवर परत आणता आले असते . त्यामुळे काळजी करण्याचे कारण नव्हते .
– – आणि ही सर्व योजना आता यशस्वीपणे पार पडली आहे. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांची आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून (ISS) परतीची योजना निश्चित करण्यात आली. त्यासाठी स्पेसएक्स क्रू-10 मिशनचे प्रक्षेपण 12 मार्च 2025 रोजी झाले. यानंतर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर 19 मार्च 2025 रोजी पृथ्वीवर परत आले . या परतीच्या प्रक्रियेत, क्रू-10 मिशनचे अंतराळवीर ISS वर पोहोचले आणि सुमारे एक आठवड्याच्या हस्तांतरण कालावधीनंतर, सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर स्पेसएक्सच्या क्रू-ड्रॅगन कॅप्सूलद्वारे पृथ्वीवर परत आले. . अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पेसएक्सचे सीईओ एलोन मस्क यांना या परतीच्या प्रक्रियेची गती वाढवण्याची विनंती केल्यामुळे ही योजना निश्चित करण्यात आली होती . म्हणूनच, सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांची परतीची तारीख निश्चित झाली, आणि आता ते पृथ्वीवर परत आले आहेत. .. अमेरिकन शास्त्रज्ञांच्या तुकडीने अथक प्रयत्न करून शेवटी सुनीता विल्यम्सना 19 तारखेला सुखरूप पृथ्वीवर आणले.
एका बांधकामाच्या साईटवर कामगारांची काही मुले खेळत होती. वाॅचमनचा छोटा पोरगा ( साधारण वय वर्ष आठ) एका कोपर्यात बसून ईतरांचा पकडापकडीचा खेळ बघत होता.
कुणी धडपडले तर टाळ्या वाजवत होता, हसत होता.पण खेळत नव्हता.
मी त्याला विचारले…
“बारक्या ! तू का रे खेळत नाहीस ?”
त्याने खेळावरील नजर न हटवता मला ऊत्तर दिले .
” आय नको म्हनत्या ….”
” आई खेळायला कशाला नको म्हणेल ? तूच काहीतरी आगाऊपणा करत असशील !”
त्याने ऊत्तर देण्याचे टाळले. माझ्याकडे एक कटाक्ष टाकून पुन्हा खेळ बघत बसला.
मलाच त्याला चिडवण्याची खुमखूमी गप्प बसू देईना….
” मला माहीती आहे, आई तूला खेळायला का नको म्हणते !!! अजिबात अभ्यास करत नसशील !!!”
माझा टोमणा त्याला बरोबर बसला असावा. खेळातला खेळकरपणा त्याच्या चेहर्यावरून गायब झाला. त्याने थेट माझ्या नजरेला नजर भिडवली , जगातले विखारी सत्य त्याने मला सांगितले…
“आई म्हनत्या…खेळू नको… खेळून भुक लागल… मग खायला मागशील “
त्याच्या डोळ्यात किंचीत पाणी आले होते. तडातडा ऊठून तो कुठेतरी निघून गेला.
मी अजूनही बेचैन आहे. आणी गेल्या वर्षभरात भुक लागावी, अन्न पचावे म्हणून औषधांवर किती खर्च केला याचा हिशोब करत बसलो
म्हनून अन्न ताटात वाया घालवु नये
पोस्ट आभार: फेसबुक
लेखक: अज्ञात
प्रस्तुती: सुश्री मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈