मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ काही  विचारमोती… ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै. ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ काही  विचारमोती… ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै. ☆

सागराप्रमाणे दुःख असूनही मोत्यांसारख्या सुखासाठी होणारी वाटचाल म्हणजेच आयुष्य असते.

चुका एकांतात सांगाव्यात, आणि कौतुक चार चौघात करावे, म्हणजे नाती जास्त काळ टिकून राहतात.

विरोधक हा शत्रूसारखा समोर असावा, पण आपल्यात बसून आपलीच मापे काढणारा मित्र नसावा.

फोटो लेने के लिये अच्छे कपडे नही, बस मुस्कुराहट अच्छी होनी चाहिये ।

One of the most beautiful things we can do is to help one another, kindness does not cost a thing.

कारणे सांगणारे लोक कधीच यशस्वी होत नाहीत, आणि यशस्वी होणारे लोक कधीच कारणे सांगत नाहीत.

जिंकायची मजा तेव्हाच असते, जेव्हा अनेकजण तुमच्या पराभवाची आतुरतेने वाट पहात असतात.

संग्राहिका :सौ. राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ मी आले, निघाले, सजले फुलले, फुलपाखरू झाले… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ मी आले, निघाले, सजले फुलले, फुलपाखरू झाले… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

… ” अगं ये! ऐकलसं का? आमच्या ऑफिसची पिकनिक निघालीय येत्या शुक्रवारी रात्री लोणावळयाला. आणि रविवारी रात्री उशिरापर्यंत परत येणार आहे, चांगले दोन दिवस मौजमजा करुन. तेव्हा जाताना मला भडंग आणि कांदे मिरच्या बांधून देशील.. आम्ही प्रत्येकाने काय काय खाणं आणायचं तेही वाटून घेतलयं बरं.. तुला उगाच करत बसायला त्रास पडायला नको म्हणून अगदी बिना तसदीचं मी ठरवून घेतले आहे.. थंडी फार असेल वाटते आता तिकडे तेव्हा माझे स्वेटर्स, पांघरूण शिवाय दोन दिवसाचे कपडे देखील बॅगेत भरून देशील..बऱ्याच वर्षांनीं पिकनिक निघतेय. तेव्हा मी न जाऊन चालेल कसे?.. “

“.. हे काय मी एव्हढ्या उत्साहाने तुला सांगतोय आणि तू हाताची घडी घालून डोळे बंद करुन हसत काय बसलीस? कुठल्या स्वप्नात दंग झाली आहेस? मी काय म्हणतोय ते ऐकतेस आहेस ना?.. “

” हो हो डोळे बंद असले तरी कान ऊघडे आहेत बरं! झालं का तुमचं सांगुन? का आणखी काही शिल्लक आहे? नसेल तर मी आता काय सांगते ते ऐका! काय योगायोग आहे बघा! आमची महिला मंडळाची सुद्धा पिकनिक निघालीय याच शुक्रवारी रात्री लोणावळयाला,आणि रविवारी रात्री उशिरापर्यंत परत येणार आहे, चांगले दोन दिवस मौजमजा करुन. बऱ्याच वर्षांनीं पिकनिक निघतेय. तेव्हा मी न जाऊन कसे चालेल ?. आम्हा बायकांना तुम्ही पुरुषांनी संसाराच्या चक्रात बांधून पिळून काढत आलात.. फक्त नोकरी आणि तिच्या नावाखाली आजवर आम्हाला वेठीस धरलंय तुम्ही.. रांधा वाढा घर सांभाळा, आलागेला, पोरबाळं आणि गेलाबाजार सासूरवाडीचा बारदाना झेला.. यातच आमचा जन्म वाया गेला… कधी तरी हौसमोज करायची होती.. मेली काटकसर आमच्या नशीबी पाली सारखी चिकटली ती काही सुटायचं नाव घेईना.. साधं माहेरला चार दिवस जाऊन निवांत राहिन म्हटलं तरीही ते जमेना… या उसाभरीत तो जीव कातावून गेला मग आमच्या महिला मंडळाने हा स्व:ताच पुढाकार घेतला.. आम्ही सगळया झाडून पिकनिकला जातोय म्हटलंय.. अगदी एकेकीने पदार्थ पण वाटून घेतलेत.. तयारीसुद्धा सुरू झाली… मी तुम्हांला सांगणारच होते पण म्हटलं तुम्ही काही शनिवारी रविवारी घर सोडून जाताय कुठे? जायच्या आधी एक दिवस कानावर घालू मग जाऊ.. “

“.. तेव्हा लेडीज फस्ट या न्यायाने मी पिकनिकला जाणार हे नक्की.. तुमची यावेळची पिकनिक पुढे ढकला.. नि मला पिकनिकला जायाला जरा मदत करा… आणि हो एक महत्त्वाचं या पिकनिकच्या दिवसात तुम्ही घर सांभाळणार आहात कुठलीही कुरबुर न करता समजलं.. मला कसे जमेल म्हणायचा आता प्रश्नच येत नाही.. संसाराला आता पंचवीसहून अधिक वर्षे लोटली..आता येथून पुढे संसाराची अर्धी जबाबदारी तुम्हालाही द्यायची ठरली… “

“अहो असं काय बघताय माझ्या कडे डोळे विस्फारून.? मी काही चालली नाही तुम्हाला सोडून.!. आता पन्नास टक्के हक्काचे अधिकार आमचेही आहेत त्याचाच लाभ घेणार.. आमच्या मंडळाने ही जागृती केली.. आणि आणि आम्ही सगळया बायकांनी ती आता अंमलात आणायला सुरुवात केली.. तिचा पहिला उपक्रम हि पिकनिक आहे.. तेव्हा बंच्चमजी तुम्ही इथंच थांबायचं आणि मी एकट्याने पिकनिकला जायचं.. “

मी आले, निघाले, सजले फुलले, फुलपाखरू झाले.. वेग पंखाना आला जसा, आला या लकेरी , घेतली भरारी… 

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गुढीपाडव्याचे महात्म्य… भाग – २ ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ गुढीपाडव्याचे महात्म्य… भाग – २ ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

या दिवशी पूजा करण्याचीही एक विशिष्ट पद्धत आहे. आजच्या पिढीला याची उपयुक्तता सांगणे गरजेचे आहे. आपल्या प्रत्येक रुढी ,परंपरेला शास्त्रीय आधार आहे.या दिवशी अभ्यंगस्नान करून, ब्रह्मदेवाची दवणा ( थंड असतो म्हणून ) वाहून नंतर महा शांती केली जाते. ” नमस्ते बहू रुपाय विष्णवे नमः।” हा मंत्र म्हणून विष्णुची पूजा करतात. इतिहास, पुराणे यांचे ज्ञान देतात. गुढीपाडव्या दिवशी जो वार असेल, त्याच्या देवतेचीही पूजा केली जाते. संवत्सर पूजा केल्याने, आयुष्य वृद्धी होते. शांती लाभते.आरोग्य लाभते. समृद्धी येते.अशी समजूत आहे. प्रत्यक्ष गुढी उभी करतांना, एका उंच वेळूच्या टोकाला ,भरजरी  खण किंवा साडी ,साखरेच्या गाठी, फुलांचा हार, आंब्याची आणि कडुलिंबाची  डहाळी, आणि या सर्वांवर तांब्याचा किंवा चांदीचा कलश  सजवून, गुढी दाराशी किंवा खिडकीशी उभी केली जाते.याला ब्रह्मध्वज असे ही म्हटले जाते. विजयाचे, मांगल्याचे आणि उत्साहाचे प्रतीक म्हणून ही गुढी असते. समोर रांगोळी काढून गुढीची पूजा केली जाते. कडुलिंब आणि आंब्याच्या झाडाच्या पंचांगांचे आयुर्वेद शास्त्रातील महत्त्व ओळखून हा सन्मान त्यांना दिला आहे. ( ते देववृक्ष आहेत. )कलश रुपी सूत्राच्या सहाय्याने वातावरणातील सात्विक लहरी घरात प्रवेश करतात. ( अँटेनाच्या कार्या प्रमाणे. )या दिवशी नववर्षाच्या पंचांगाची पूजा करून, वर्षफल श्रवण केले जाते. जेवणात पक्वान्नं करून, प्रसाद म्हणून ,कडूलिंबाच्या चटणीचा प्रसाद ग्रहण केला जातो. कटू संबंध दूर करून साखरेप्रमाणे एकमेकातले संबंध वाढावेत ,अशी एकमेकांना सदिच्छा देतात. शेतकरी जमीन नांगरणीस सुरुवात करतात. पारंपारिक वेषभुशा करुन, मिरवणूक काढून, आनंद लुटतात. कोणी नवीन खरेदी करतात. किंवा नवीन कामाला सुरवात करतात.

आपल्या प्रत्येक  सणाला शास्त्रीय आधार आहे. तो नवीन पिढीने अभ्यासायला हवा. जाणून घ्यायला हवा. या शुभ दिनानिमित्त येणारे नवीन शुभ कृती संवत्सर, शालिवाहन शके १९४५ हे सर्वांना सुखाचे, आनंदाचे आणि आरोग्यदायी जावो.

– समाप्त – 

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “अथर्वशीर्ष… लंडनमधील मंदिरात…” – लेखिका : सौ.संजीवनी निमोणकर ☆ श्री मोहन निमोणकर  ☆

श्री मोहन निमोणकर 

? मनमंजुषेतून ?

☆ “अथर्वशीर्ष… लंडनमधील मंदिरात…” – लेखिका : सौ.संजीवनी निमोणकर ☆ श्री मोहन निमोणकर ☆

मुलगा-सून व नातू सध्या इंग्लंडमध्ये वास्तव्यास असल्याने त्यांच्याकडे जाण्याचा योग आत्तापर्यंत तीन वेळा आलाय. लंडनच्या दक्षिणेस केंट या काऊंटीत असलेल्या ‘ग्रेव्हज्एंड’ या शहरात ते रहातात. आम्ही जेव्हा त्यांच्याकडे जायचो, तेव्हा वेळात वेळ काढून तिथे जवळपास असणाऱ्या भारतीय मंदिरात आम्ही जात असू. त्यांच्या घराजवळच एक मोठे गुरुव्दारा आहे. एकदा तेथेच आम्हाला एका हिंदू मंदिराबद्दल समजले व आम्ही तेथे जाण्याचे ठरविले.

एका संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आम्ही त्या मंदिरात गेलो होतो. मंदिरात पाऊल ठेवताच खूप प्रसन्न वाटले. राम-सीता, शंकर-पार्वती, गणपती, हनुमान अशा आपल्या देवांच्या अतिशय  सुंदर  संगमरवरी मूर्ती पाहून मन खूपच प्रसन्न झाले. त्या मंदिराच्या जागेच्या मालकीणबाई पंजाबी आहेत व तेथील पुजारी श्री.दुबे हेही मध्यप्रदेशातून आलेले आहेत. त्या दोघांनी आम्हाला मराठी भजनं म्हणण्याचा खूप आग्रह केला. आम्ही त्यांना म्हटले, आज संकष्टी चतुर्थी आहे तर आम्ही गणपतीची आरती म्हणतो. पुजारी श्री.दुबेंना मराठी आरती ‘सुखकर्ता’ माहित होती. ते तर खूप खूष झाले व त्यांनी म्हणायला सांगितली. त्या दोघांनीही आमच्या हातात टाळ दिले व पंजाबी आजी स्वत: मृदुंग वाजवून ठेका देऊ लागल्या. मग आम्ही सुखकर्ता व शेंदूर लाल चढायो ही गुजराथी आरती म्हटली. दोघेही एकदम खूष झाले. दुबेंनी तर त्यांच्या मोबाईलमध्ये व्हिडिओही घेतला व आता आम्ही येथील सर्व मराठी माणसांनाही तो पाठवू असे सांगितले. या सर्वाने आम्ही खूपच आश्चर्यचकित व प्रभावितही झालो.

आरत्यांनंतर आजींनी माईक आमची सून सौ.निवेदिताकडे दिला व पुन: मराठी भजन म्हणण्याचा आग्रह केला ! तिने गणपती अथर्वशीर्ष म्हणताच दोघेही खूप खूष… व आजी मृदुंग व दुबेगुरुजी व्हिडिओ काढण्यात दंग! मुलगा व सून दोघांनीही मनापासून गणपती अथर्वशीर्ष म्हटले. मंदिरात आलेल्या हिंदु-पंजाबी भक्तांमध्ये एक इंग्लिश महिलाही होती. ती नियमित दर सोमवारी तिथे येते असे नंतर समजले. त्या इंग्लिश महिलेने अगदी व्यवस्थित मांडी घालून, शांत चित्ताने आणि एकाग्रतेने, मनापासून आपल्या बाप्पाची आरती आणि अथर्वशीर्ष ऐकल्याचा आम्हाला सुखद धक्का तर बसलाच, आणि त्याहीपेक्षा, आपल्या प्रार्थनेमुळे तिथे त्यावेळी निर्माण झालेल्या भक्तिमय प्रसन्न वातावरणात, आपली भाषाही समजत नसलेली ती इंग्लिश महिला इतकी गुंगून गेलेली पाहून, आपल्या संस्कृतीचा आम्हाला खूप अभिमान व गर्वही वाटला

परदेशातही आपली संस्कृती जोपासली जाते आहे, आणि त्यात आपला मुलगा व सून यांचाही वाटा आहे, हे पाहून आम्हाला खरंच खूपच छान वाटले. एक अनामिक अभिमान वाटला. इंग्लंडमधल्या हिंदू देवळात मराठी आरत्या म्हटल्या गेलेल्या पाहून पंजाबी आजी व दुबे गुरुजी यांच्या चेहे-यावरही आम्हाला खूपच समाधान व आनंद दिसून आला. आम्ही दोघेही त्या वातावरणाने अतिशय भारावून गेलो होतो. नकळत मनाने पुण्याच्या घरी पोहोचलो होतो आणि आपण इंग्लंडमध्ये आहोत हेही क्षणभर विसरून गेलो होतो. तिथून परतलो ते पुढच्या  भेटीतही पुन: इथे यायचेच असा  निश्चय करूनच.

लेखिका : सौ.संजीवनी निमोणकर

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ स्त्री… ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

⭐ स्त्री… ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी⭐

जेव्हा विश्वकर्म्याने ब्रह्मदेवाच्या आज्ञेनुसार स्त्री निर्माण करावयास घेतली, तेव्हा त्याने निगुतीने, शांतपणे काम करायला सुरूवात केली.

ब्रह्मदेवाने विचारणा केली.

“स्त्री निर्मितीसाठी एवढा वेळ का लागतो आहे?”

 

विश्वकर्म्याने उत्तर दिले,  “तिची रचना करण्यासाठी मला पूर्ण करावे लागणारे सर्व तपशील तुम्हाला निवेदन करतो.”

  • तिने सर्व प्रकारच्या परिस्थितींमध्ये कार्य केले पाहिजे.
  • ती एकाच वेळी अनेक मुले सांभाळण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.
  • तिने आलिंगन दिले की दुखापत झालेल्या गुडघ्यापासून, ते तुटलेल्या हृदयापर्यंत ती काहीही बरे करू शकली पाहिजे.
  • तिने हे सर्व फक्त दोन हातांनी केले पाहिजे.
  • ती आजारी असताना स्वत:चे स्वतःला बरे करू शकली पाहिजे. तसेच दिवसाचे १८ तास काम करू शकली पाहिजे.

 

   ब्रह्मदेव प्रभावित झाले. “फक्त दोन हातांनी हे सर्व करणे ….. अशक्य आहे !”

   ब्रह्मदेव जवळ गेले आणि त्या स्त्रीला स्पर्श केला.

   “पण तू तिला खूप मऊ केले आहेस.”

 

   विश्वकर्मा वदले,”ती मऊ आहे, पण मी तिला मजबूत बनवले आहे.  ती काय सहन करू शकते आणि त्यावर मात करू शकते याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही”

   “ती विचार करू शकते का?”  देवाने विचारले…

   विश्वकर्मा  उत्तरले “ती नुसता विचार करू शकत नाही, तर ती तर्क करू शकते आणि वाटाघाटीही करू शकते.”

   देवाने तिच्या गालाला स्पर्श केला….

   “हा भाग गळतोय असं वाटतंय! तू या भागावर खूप ओझं टाकलं आहेस.”

“तिथे गळत नाहीये…

ते डोळ्यातील अश्रू आहेत.” 

विश्वकर्माने देवाला सांगितले …

“ते अश्रू आणि कशासाठी?”

देवाने विचारले……

विश्वकर्मा म्हणाले

“अश्रू हे, तिचे दु:ख, तिच्या शंका, तिचं प्रेम, तिचा आनंद, तिचं एकटेपण आणि तिचा अभिमान व्यक्त करण्याचा मार्ग आहे.”  …

त्याचा देवावर चांगलाच प्रभाव पडला,

“विश्वकर्मा, तू अतिशय प्रतिभावान आहेस.

तू सर्व गोष्टींचा विचार केला आहेस.

खरोखर अद्भुत घडण आहे ही एक स्त्री.”

   ■ तिच्यात पुरुषाला चकित करण्याची ताकद आहे.

   ■ ती संकटे हाताळू शकते आणि जड भार वाहून नेऊ शकते.

   ■ तिला आनंद, प्रेम आणि मते आहेत.

   ■ जेव्हा तिला किंचाळावेसे वाटते, तेव्हा ती हसते.

   ■ जेव्हा तिला रडावेसे वाटते, तेव्हा ती गाते, जेव्हा ती आनंदी असते, तेव्हा रडते आणि जेव्हा ती घाबरते, तेव्हा हसते.

   ■ ती ज्यावर विश्वास ठेवते त्यासाठी ती लढते.

   ■ तिचे प्रेम बिनशर्त आहे.

   ■ “एखादा नातेवाईक किंवा परिचित मरण पावल्यावर तिचे हृदय तुटते, परंतु तिला जगण्याची ताकदही मिळते.”

 

   देवाने विचारले:

“तर मग ती एक परिपूर्ण प्राणी आहे?”

 

विश्वकर्माने उत्तर दिले:

“नाही. यात फक्त एकच त्रुटी आहे. तिचे महत्व किती आणि ती किती मौल्यवान आहे हे ती अनेकदा विसरते.”

      स्त्री असणं अनमोल आहे

तिला स्वतःचा अभिमान वाटावा यासाठी तुमच्या आयुष्यातील प्रत्येक स्त्रीला हे कळू द्या.

संग्राहिका :सुश्री शशी नाडकर्णी-नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गुढीपाडव्याचे महात्म्य… भाग – 1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ गुढीपाडव्याचे महात्म्य… भाग – 1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

नवीन वर्ष सुरू करण्याच्या प्रथा अनेक आणि वेगवेगळ्या आहेत. एक जानेवारीपासून व्यावहारिक वर्ष सुरू होते. एक एप्रिल पासून आर्थिक वर्ष , कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून व्यापारी वर्ष,  एक जून पासून शैक्षणिक वर्ष, त्याचप्रमाणे हिंदू संस्कृतीचे वर्ष हे चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होते. त्यालाच आपण गुढीपाडवा असे म्हणतो.

याला वर्षप्रतिपदा तसेच युगादी तिथी असेही म्हटले जाते. वर्षारंभाचाचे दिवस जरी वेगवेगळे असले तरी एक गोष्ट समान आहे .ती म्हणजे वर्ष हे बारा महिन्यांचेच आहे. ” द्वादश मासौ संवत्सर:। ” असे वेदाने प्रथम सांगितले .आणि जगाने ते मान्य केले आहे. या सर्वांमध्ये चैत्र शुद्ध प्रतिपदा हा वर्षारंभ सर्वात योग्य प्रारंभ दिवस आहे. त्याचे कारणही तितकेच महत्त्वाचे आहे.

नैसर्गिक आणि भौगोलिक—- गुढीपाडव्याच्या आसपासच सूर्य वसंत संपात आवर येतो.( संपात बिंदू, क्रांती वृत्त व विषुववृत्त ही दोन वर्तुळे  ज्या बिंदूत परस्परांना छेदतात, तो बिंदू.) आणि त्यावेळी वसंत ऋतू सुरू होतो. त्यावेळी उत्साहवर्धक आणि समशीतोष्ण असे हवामान असते. झाडांनाही नवीन पालवी येत असल्याने, तीही टवटवीत दिसतात. कधीही नवनिर्मिती ही आनंददायी असते. तेव्हा अशा वातावरणात नवीन वर्षाची सुरुवात करणे योग्य आणि आदर्शही आहे.

गुढीपाडवा या सणाला पौराणिक असाही आधार आहे. प्रभू रामचंद्रांनी वालीचा वध केला. दुष्ट प्रवृत्तींच्या राक्षसांचा आणि रावणाचा वध करून प्रभू रामचंद्र अयोध्येला आले, तो हा दिवस. महाभारताच्या आदिपर्वात उपरीचर राजाने, त्याला  इंद्राने दिलेल्या कळकाची काठी  त्याने जमिनीत रोवली. आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला त्याची पूजा केली. या परंपरेचा आदर म्हणून गुढी पूजन केले जाऊ लागले. एका कथेनुसार, शंकर-पार्वती यांचे लग्न चैत्र शुद्ध प्रतिपदेला ठरले. आणि तृतीयेला झाले .म्हणून या दिवशी आदिशक्ती पार्वतीचीही पूजा करतात.ऐतिहासिक दृष्टीने विचार करता शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने , मातीचे सैन्य केले .आणि त्यावर पाणी शिंपडून, त्याला जीवन  दिले. आणि प्रबळ शत्रूचा पराभव केला. शालिवाहनाने  क्षात्र तेज संपलेल्या समाजात ,आत्मविश्वास निर्माण केला. आणि शत्रूवर विजय मिळविलेला हा दिवस. आणि शालिवाहन शक  तेव्हापासून सुरू झाले.

अध्यात्मिक दृष्ट्या या दिवसाचे महत्व सांगायचे तर ,या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, म्हणजे सत्ययुगाला सुरुवात झाली असे मानतात .त्यामुळे तो हा दिवस. वर्षा. रंभाचा मानला जातो.

व्यावहारिकदृष्ट्या गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तातील एक मानला गेला आहे. या दिवसातील कोणतीही घटिका हि शुभ मुहूर्त असल्याने ,वेगळा मुहूर्त काढावा लागत नाही.” गणेशयामल ” या तंत्र ग्रंथात सांगितले आहे की 27 नक्षत्रां पासून निघालेल्या लहरीं मध्ये सत्वगुण निर्माण करणाऱ्या प्रजापती लहरी,चैत्र महिन्यात आणि विशेषतः चैत्र शुद्ध प्रतिपदेला, सर्वात जास्त असतात. म्हणून तो दिवस वर्षारंभ मानणे योग्य आहे.

क्रमशः…

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “चैत्र”… ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ “चैत्र”… ☆ सौ राधिका भांडारकर 

आंब्याच्या झाडावर कोकीळ पक्षाचे “कुहू” ऐकू येते आणि वसंत ऋतूच्या आगमनाची वर्दी मिळते.   चैत्राची चाहूल जाणवते. नववर्षाची सारीच नवलाई घेऊन सृष्टीही बहरते.

सूर्य जेव्हा मेष राशीत प्रवेश करतो, त्यावेळी हिंदू पंचांगातल्या शालिवाहन शकानुसार चैत्र महिना सुरू होतो. फाल्गुन पौर्णिमेच्या होळीची बोंबाबोंब आणि रंगपंचमीच्या रंगात नहाल्यानंतर वसंत ऋतु एखाद्या राजासारखा, दिमाखात अवतरतो.  नवा उत्साह, नवी उमेद, चैतन्याचे नजराणे  घेऊन तो कसा ऐटीत येतो.

जुने जाते नवे येते. वृक्ष नव्या, कोवळ्या, हिरव्या रंगाच्या पालवीने बहतात.  गुलमोहराला अपूर्व रक्तिमा चढतो.  पिवळा बहावा फुलतो.  पलाश वृक्षाची अग्नी फुले डोळ्यांना सुखावतात.  मोगऱ्याचा सुगंध दरवळतो. आणि कोकणचा राजा रस गाळतो. उत्तम उत्तम गोष्टींची मनमुराद पखरण करणारा हा वसंत!  ना कशाची वाण  ना कशाची कमतरता.  सारेच साग्रसंगीत, उच्च अभिरुची दर्शवणारे.

।। गंधयुक्त तरीही उष्ण वाटते किती ..।।

आसमंत उष्णतेने भरून जातो.  उन्हाच्या झळा जाणवतात. तप्त वारे वाहतात पण तरीही हे वारे गंधयुक्त असतात.  अनंत आणि मोगऱ्याचा दरवळ जाणवतो. जंगलात कुठेतरी पिवळी धमक सुरंगीची फुलं उमलतात. आणि त्याचा सुगंध साऱ्या सृष्टीला व्यापून राहतो.

चैत्र महिना— वसंत ऋतु म्हणजे सृजनोत्सव.  चैत्र महिन्याच्या साक्षीने आनंदाचे एक महोत्सवी स्वरूपच प्रकटते.  या मासाचे आपल्या सांस्कृतिक जगण्याशी  उत्कट नाते आहे.

या आनंदोत्सवाचे स्वागत उंच गुढ्या उभारून शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडव्याच्या दिवशी केले जाते.  दुष्टांचा संहार  आणि सुष्टांचा विजय म्हणून हा विजयोत्सवही ठरतो.  या ब्रह्मध्वजाच्या पूजेनेच हिंदू नववर्षाची सुरुवात होते. तोच हा चैत्रमास!  चंद्र, चित्रा नक्षत्राच्या सानिध्यात असतो म्हणून हा चैत्र मास.

संस्कृतीची, धार्मिकतेची, सृजनाची, सौंदर्याची जाण देणारा हा टवटवीत, तजेलदार, तालबद्ध मास— वसंत आत्मा— मधुमास.

चैत्रगौरी पूजनाच्या निमित्ताने आंब्याची डाळ,कैरीचे  पन्हे याचा रसास्वाद घेणे म्हणजे परमानंदच.  अंगणात चैत्रांगण सजते.

या महिन्याला जसे श्रद्धा, भक्तीरसाचे वलय आहे, तसेच शृंगार रसात न्हालेल्या  प्रणय भावनेचाही अनुभव आहे.

पक्षी झाडावर घरटी बांधतात.  त्यांची मधुर किलबिल मिलनाची हाक देतात.  मधुप  फुलातल्या परागाशी प्रीतीचे नाते जुळवतात.  तरुण-तरुणींची सलज्ज कुजबुज ऐकू येते.  कवी कल्पनांना प्रणय गीतांचे धुमारे फुटतात.  चाफा फुलतो आणि बोल घुमतात,

” हे विश्वाचे आंगण, आम्हा दिले आहे आंदण

उणे करु आपण दोघेजण रे..”

साऱ्या सृष्टीतच या शृंगार रसाची झलक जाणवत असते. निर्मितीच्या, सर्जनशीलतेच्या भावनांना हळुवारपणे गोंजारणारा हा चैत्र महिना, राधा कृष्णाच्या प्रीतीत रमणारा हा चैत्र महिना,  कुणाच्या कवितेत असाही फुलतो..

सिंगार सिसकता रहा

बिलखता रहा हिया

दुहराता रहा गगन से चातक

पिया पिया …

किंवा,

ऋतू वसंत से हो गया कैसा ये अनुराग

काली कोयल गा रही

भांति भांति के राग…

तर असा हा नवीनतेचा, प्रेमाचा, उत्पत्तीचा,  चैतन्याचा संदेश घेऊन येणारा,  सुगंधाचा दरवळ पसरवणारा, हसरा बागडणारा,  धुंद करणारा चैत्र मास …किती त्यास वर्णावे?

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “- १० मार्च — सावित्रीआई फुले यांची पुण्यतिथी -” – लेखक : श्री राजेश खवले ☆ प्रस्तुती – सुश्री वीणा छापखाने ☆

? इंद्रधनुष्य ? 

☆ “- १० मार्च — सावित्रीआई फुले यांची पुण्यतिथी -” – लेखक : श्री राजेश खवले ☆ प्रस्तुती – सुश्री वीणा छापखाने ☆

१० मार्च ! सावित्रीआई फुले यांची पुण्यतिथी! नुकतीच कोरोनाची लाट येऊन गेली. रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी अनेक डॉक्टर, नर्सेस आणि इतर विभागातील कर्मचाऱ्यांनी आपले प्राण पणाला लावून कर्तव्य बजावले. अनेकांनी तर आपले प्राणही गमावले ! त्यांच्या कार्याला शतशः प्रणाम! त्यांचे हे काम सावित्रीआई फुले  यांनी 1896-97 साली पुण्यात प्लेगच्या साथीत केलेल्या कामाची आठवण करून देणारे आहे. आज सावित्रीआई यांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने त्यांचे या क्षेत्रातील कार्य जाणून घेणे औचित्यपूर्ण आहे.

१८९६ मध्ये भारतात आलेला प्लेग हा Bubonic प्लेग होता. चीनच्या पश्चिम यूनान या प्रांतात 1850 साली या प्लेगचा रुग्ण पहिल्यांदा आढळला. चीन ते हॉंगकॉंग आणि तेथून भारत असा या रोगाचा प्रसार झाला. येर्सिनिया पेस्टीस या जिवाणूमुळे हा रोग होत असे. उंदीर किंवा तत्सम प्राण्यांच्या अंगावर वावरणारे पिसू हे या जीवाणूचे वाहक  होते. १८९६ साली या प्लेगची भारतात सुरुवात झाली. पहिला रुग्ण मुंबईमध्ये आढळून आला. लवकरच बंगाल, पंजाब, द युनायटेड प्रोविन्स आणि नंतर ब्रह्म देशातही या प्लेगने धुमाकूळ घातला. केवळ एका महिन्यात पुण्याची 0.६ टक्के जनता प्लेगने बळी गेली होती. पुण्यातील जवळजवळ अर्ध्या लोकांनी गाव सोडले होते. दिवसाला तीनशे ते चारशे लोक प्लेगने मरत असत. काही वर्षातच लाखो लोक या प्लेगच्या आजाराला बळी पडले. सरकारने या आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी ‘ The Epidemic Diseases Act 1897 ‘ पारित केला.

प्रा. ना. ग. पवार सांगतात- १८९७ सालच्या सुरुवातीपासून पुणे व पुण्याच्या ग्रामीण भागात प्लेगने थैमान घातले होते. यशवंत फुले यावेळी अहमदनगरला होते. त्यांना सावित्रीबाईने बोलावून घेतले. वानवडी व घोरपडी यांच्यामध्ये असलेल्या ग्यानोबा ससाने यांच्या माळरानावर आपल्या नोकरीतून सुट्टी काढून आलेल्या डॉक्टर यशवंतने खाजगी इस्पितळाची सेवा उपलब्ध करून दिली.

ग्यानोबा कृष्णाजी ससाणे सांगतात, तात्यासाहेब (म्हणजे महात्मा फुले) सन १८९० साली वारले. तात्या नंतर यशवंतराव डॉक्टरकीची परीक्षा पास झाले व फौजेत नोकर राहिले. यशवंतरावाने १८९३ साली डॉक्टरकीचे शिक्षण पूर्ण केले होते. डॉ. यशवंत यांना डॉक्टर विश्राम रामजी घोले यांचे मार्गदर्शन लाभले होते. विश्राम रामजी घोले हे १८९३ साली व्हाईसरायचे असिस्टंट जनरल सर्जन होते. महात्मा फुले यांना अर्धांगवायूचा आजार झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार डॉक्टर घोले यांनीच केले होते. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर डॉक्टर यशवंत यांनी सैन्यात नोकरी पत्करली होती.दक्षिण आफ्रिकेतून सुट्टी घेऊन ते आले होते.

प्रा. ना.ग. पवार सांगतात, सावित्रीबाईंजवळ पैशाची कमतरता असूनही त्यांनी इतरांच्या आर्थिक मदतीने रुग्णांची यथाशक्ती सेवा केली. प्लेगचा उद्भव झाला आहे किंवा होणार आहे असा संशयाने सुद्धा गोरे सोल्जर्स घराघरात घुसून रुग्णांना बाहेर काढत व धाक दाखवीत. ते सावित्रीबाईंना पाहवले नाही.

मुंढवे या खेडेगावात मागासवर्गीयांची वस्ती होती. झोपडीवजा घरात अस्वच्छता ही भरपूर! तेथे या  प्लेगचा अधिक जोर होता. या सर्व भागात सावित्रीबाई जातीने फिरू लागल्या. सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांनी सावित्रीबाईंना बरीच साथ दिली. सत्यशोधक समाजाचे एक पुढारी नारायण मेघाजी लोखंडे यांची सावित्रीआईंना विशेष साथ लाभली होती.

प्रा. हरी नरके सांगतात, इतक्यात मुंबईत कामगार नेते आणि भारतीय कामगार चळवळीचे जनक रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे हे प्लेगने आजारी असलेल्या कामगारांवर रुग्णांवर उपचार करताना गेल्याची बातमी आली. सावित्रीबाईंना शोक अनावर झाला. जवळचा खंदा कार्यकर्ता गेला पण त्या रडत बसल्या नाहीत. उठल्या नी पुन्हा कामाला लागल्या. यावेळी पुणे शहरातले बहुतेक सगळे पुढारी जिवाच्या भीतीने गावोगावी पांगले होते. प्रा. पवार सांगतात, तीन-चार महिने प्लेगचा फारच जोर होता. माणसे पटापट मरू लागली. औषधोपचार नीट होणे कठीण व शासकीय सेवाही तुटपुंजी अशा अवस्थेत सावित्रीबाईंनी स्वतःचे प्राण पणास लावून प्लेगच्या साथीत दिवस-रात्र एक करून मदत कार्य केले.

प्रा. हरी नरके सांगतात, सावित्रीबाई स्वतः आजारी माणसांना उचलून दवाखान्यात आणीत. त्यांच्यावर उपचार करीत. हा रोग संसर्गजन्य आहे हे माहीत असूनही त्या रुग्णांची सेवाशुश्रूषा करीत होत्या. मुढंवा गावच्या गावकुसाबाहेर  पांडुरंग बाबाजी गायकवाड या मुलाला प्लेगची लागण झाल्याचे कळताच सावित्रीबाई तिकडे धावल्या. मुलाला पाठीवर घेऊन धावत पळत त्या दवाखान्यात पोहोचल्या. त्यातच सावित्रीबाईंना प्लेगची बाधा झाली, आणि दहा मार्च १८९७ रोजी रात्री नऊ वाजता त्यांचे प्लेगमुळे निधन झाले. त्यांच्या मृत्यूची बातमी दिन बंधने शोकाकुल होऊन दिली.

खरे पाहिले तर यावेळी सावित्रीबाईंचे वय हे जवळजवळ ६७ वर्ष होते. म्हणजे त्या सदुसष्ट वर्षाच्या आजीबाई झाल्या होत्या. परंतु समाजकार्य करण्याची उर्मी त्यांच्या अंगामध्ये अगदी ठासून भरलेली होती. मुंढवा ते हडपसरचा ससाणे मळा हे अंतर सुमारे आज सात ते आठ किलोमीटर होते. यावेळी तो पांडुरंग नावाचा मुलगा सुमारे दहा- अकरा वर्षाचा होता. सावित्रीआईंनी त्याला चादरी मध्ये गुंडाळून आपल्या पाठीवर घेतले आणि हा सात ते आठ किलोमीटरचा प्रवास चालत पूर्ण केला. मुलाला 

दवाखान्यामध्ये पोहोचविले. डॉक्टर यशवंत यांनी त्या मुलावर उपचार केले आणि तो मुलगा वाचला सुद्धा!

सावित्रीआईंच्या मृत्युनंतर यशवंतराव पुन्हा सैन्यात गेले. १८९८-९९ मध्ये ते अफगाणिस्तानात क्वेटा येथे लढाईवर गेले होते. अफगाणिस्तानात दोन वर्ष होते. १९०१ साली ते चीनमध्ये लढाईवर गेले होते. ते नंबर १२८ पायनर पलटणीवर डॉक्टर होते. १९०५ साली अहमदनगर मध्ये पुन्हा प्लेगची साथ आली. यशवंतराव प्लेगच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी अहमदनगरला गेले. रुग्णांवर उपचार करताना त्यांनादेखील प्लेग झाला. १३ ऑक्टोंबर १९०५ रोजी त्यांचा प्लेगने मृत्यू झाला.

दहा मार्च ! आजच्याच दिवशी रुग्णांची सेवा करताना सावित्रीआईंनी त्यांचे प्राण गमावले. रुग्णांच्या सेवेकरिता आपले प्राण पणाला लावणाऱ्या सावित्रीआई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त्याने त्यांना विनम्र अभिवादन.

लेखक : श्री राजेश खवले

संग्राहिका : सुश्री वीणा छापखाने

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “या हृदयीचे त्या हृदयी” ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “या हृदयीचे त्या हृदयी” ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

चष्मा साफ करता करता एक वयस्कर काका आपल्या बायकोला म्हणाले : अगं,आपल्या जमान्यात मोबाइल नव्हते.

काकू : हो ना ! पण बरोबर 5 वाजून 55 मिनिटांनी मी पाण्याचा ग्लास घेवून दरवाजात यायची आणि तुम्ही पोहचायचे.

काका : मी तीस वर्षे नोकरी केली पण मला आजपर्यंत हे समजलं नाही की, मी यायचो त्यामुळे तू पाणी आणायचीस की तू पाणी आणायचीस, त्यामुळे मी लवकर यायचो.

काकू : हो. आणि अजून एक आठवतं की तुम्ही रिटायर व्हायच्या आधी तुम्हाला डायबीटीस नव्हता व मी तुमची आवडती खीर बनवायचे, तेव्हा तुम्ही म्हणायचे की, आज दुपारीच वाटलं होतं की आज खीर खायला मिळाली, तर काय मजा येईल.  

काका : हो ना .. अगदी. ऑफिसमधनं निघताना मी जोही विचार करायचो घरी आल्यावर बघतो, तर तू तेच बनवलेलं असायचं.

काकू  : आणि तुम्हाला आठवतं ? पहिल्या डिलीव्हरीच्या वेळी मी माहेरी गेले होते, तेव्हा मला कळा सुरू झाल्या होत्या. मला वाटलं, हे जर माझ्याजवळ असते तर ? आणि काय आश्चर्य, तासाभरात तर स्वप्नवत तुम्ही माझ्या जवळ होतात.

काका  : हो. त्या दिवशी मनात विचार आला होता, की तुला जाऊन जरा बघूयात.

काकू : आणि तुम्ही माझ्या डोळ्यात डोळे घालून कवितेच्या दोन ओळी बोलायचे.

काका : हो आणि तू लाजून पापण्या मिटवायचीस व मी त्या कवितेला तुझा ‘लाइक’ मिळाला असं समजायचो.

बायको  : एकदा दुपारी चहा करताना मला भाजलं होतं. त्याच दिवशी सायंकाळी तुम्ही बर्नोलची ट्यूब अापल्या खिशातनं काढून बोललात,’ही कपाटात ठेव’.

काका : हो..आदल्या दिवशीच मी बघितलं होतं की ट्यूब संपलीय. काय सांगता येतं, कधी गरज पडेल ते? हा विचार करून मी ट्यूब आणली होती.

काकू  : तुम्ही म्हणायचे की आज ऑफिस संपल्यावर तू तिथंच ये. सिनेमा बघूयात आणि जेवण पण बाहेरच करूयात.

काका : आणि जेव्हा तू यायचीस तर मी जो विचार केलेला असायचा तू अगदी तीच साडी नेसून यायचीस.

काका काकूजवळ जावून तिचा हात हातात घेत बोलले : हो, आपल्या जमान्यात मोबाइल नव्हते पण आपण कनेक्टेड होतो.

काकू  : आज मुलगा आणि सून सोबत तर असतात,पण गप्पा नाही, तर व्हाट्सएप असतं. आपुलकी नाही, तर टॅग असतं. केमिस्ट्री नव्हे, तर कॉमेंट असते. लव्ह नाही, तर लाइक असते. गोड थट्टामस्करीच्या ऐवजी अनफ़्रेन्ड असतं. त्यांना मुलं नकोत, तर कैन्डीक्रश सागा, टेम्पल रन आणि सबवे सर्फर्स पाहिजे.

काका : जाऊ दे गं! सोड हे सगळं. आपण आता व्हायब्रेट मोडवर आहोत. आपल्या बॅटरीची पण 1 च लाइन उरली आहे.

अरे ! कुठं चाललीस ?

काकू  : चहा बनवायला.

काका : अरे… मी म्हणणारच होतो की चहा बनव म्हणून.

बायको  : माहिती आहे. मी अजूनही कवरेज क्षेत्रात आहे आणि मेसेजेस पण येतात.

दोघेही हसायला लागले.

काका : बरं झालं,आपल्या जमान्यात मोबाइल नव्हते.

 

मित्रांनो !

खरंच आतापर्यंत बरंच काही निसटून गेलंय व बरंच काही निसटून जाईल.

बहुतेक आपली ही शेवटची पिढी असेल की जिला प्रेम, स्नेह, आपलेपणा ,सदाचार आणि सन्मानाचा प्रसाद वर्तमानपिढीला वाटावा लागेल. गरजेचं पण आहे. 

लेखक : अज्ञात 

संग्राहिका : सौ उज्ज्वला केळकर 

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अवती भवती… ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर ☆

प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर

? विविधा ?

☆ अवती भवती… ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर ☆

सांगलीत जुन्या स्टेशन रोडवरून आमराईकडे जाणाऱ्या रस्त्यावरच LIC ऑफिस लागतं. “जीवन के साथ भी जीवन के बाद भी ” या आशेवर लोकांच्या जीवन विमा पॉलिसीवरचा विश्वास जपणाऱ्या या इमारतीमध्ये दिवसभर लोकांची लाईफ लाईन धावपळ करीत असते.

बऱ्याच वेळा संध्याकाळी सात नंतर सांगलीतून घरी येताना याच LIC ऑफिसच्या गेटच्या बाजूच्या भिंतीवर सिग्नलकडे तोंड करून आरामात बसलेला हा अनामिक कुत्रा दिसायचा. त्याची ऐट मनाला भावून जायची. नकळत त्याची छबी टिपण्याचा मोह आवरायचा नाही.

” बचत भी और सुरक्षा भी – हे ब्रीद उराशी बाळगून ही पॉलिसी घराघरांशी नातं जोडून आहे. स्वतःचं जीवन समृद्ध करणारी माणसं रस्त्यात कुत्रं आडवं आलं की हाड हाड करतात. तोच हा कुत्रा याच माणसांच्या पैशाचं ईमानईतबारे रक्षण करत बसलाय असं याच क्षणी वाटून जायचं.

गेली कित्येक दिवस सायंकाळी हाच एकटा कुत्रा ऐटित, याच जागेवर बसायचा. येता जाता त्याची आणि माझी अशी वारंवार नजर भेट व्हायची….पण काही दिवस झालं तो आता तिथं दिसत नाही. येता जाता मनात हूरहूर वाटत रहायची.

ते ठिकाण आल्यानंतर आजही काही क्षण नजर त्या ठिकाणी जाते. त्याची रिकामी जागा अस्वस्थ करते . त्याचं काय झालं असेल ? त्याचं बरं वाईट तर झालं नसेल ना ?( पुन्हा भीती  रस्त्यावर त्याचं बेवारस चिरडण्याची ). झालं असेल बरं वाईट तर माणसासारखा त्याचा वीमा कोणी काढला असेल का ? असे अनेक प्रश्न घेऊन मी त्याच रस्त्यावरच्या गतिरोधकावरून हळू केलेली गाडी रोजच्याच स्पीडनं पुढं दामटवतो.

मनात मात्र तो कुत्रा, LIC ची ती  “जीवन के साथ भी जीवन के बाद भी ” ची टॅगलाईन आणि माझाच जीव मुठीत घेऊन मी तुमच्यासारखाच धावत असतो….!

© प्रा.अरुण कांबळे बनपुरीकर

मु.पो.बनपुरी ता.आटपाडी जि.सांगली

९४२११२५३५७…

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print