मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

आयुष्य म्हटलं की कष्ट आले, त्रास आला , मनस्ताप आला ,भोग आले आणि जीव जाईपर्यंत काम आलं…मग ते घरचं असो नाहीतर दारचं…. बायकांना तर म्हातारपणापर्यंत कष्ट करावे लागतात…

75 वर्षाच्या म्हातारीने पण भाजी तरी चिरुन द्यावी अशी घरातल्यांची अपेक्षा असते….ही सत्य परिस्थिती आहे…..आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत हे रहाणारच……

त्यामुळे ही जी चार भांडीकुंडी आपण आज नीटनेटकी करतो…ती मरेपर्यंत करावी लागणार…

ज्या किराणाचा हिशोब आपण आज करतो तोच आपल्या सत्तरीतही करावा लागणार….

” मी म्हातारी झाल्यावर ,माझी मुलं खूप शिकल्यावर त्याच्याकडे खूप पैसे येतील .. मग माझे कष्ट कमी होतील ” * ही *खोटी स्वप्न आहेत….

मुलं , मुली कितीही श्रीमंत झाले तरी ..” आई बाकी सगळ्या कामाला बाई लाव पण जेवण तूच बनव..”

असं म्हटलं की झालं… पुन्हा सगळं चक्र चालू ..

आणि त्या चक्रव्युहात आपण सगळ्या अभिमन्यी….,

पण..पण ..जर हे असंच रहाणार असेल… जर परिस्थिती बदलू शकत नसेल तर मग काय रडत बसायचं का ??

तर नाही…..

परिस्थिती बदलणार नसेल तर आपण बदलायला हवं…..

मी हे स्वीकारले आहे …. खुप अंतरंगातून आणि आनंदाने….

माझा रोजचा दिवस म्हणजे नवी सुरुवात असते….. खुप उर्जा आणि उर्मीनी भरलेली……

सकाळी सात वाजता जरी कुणी मला भेटलं तरी मी तेवढ्याच उर्जेनी बोलू शकते आणि रात्री दहा वाजता ही….. आदल्या दिवशी कितीही कष्ट झालेले असू देत….दुसरा दिवस हा नवाच असतो….

काहीच नाही लागत हो… हे सगळं करायला…..

रोज नवा जन्म मिळाल्यासारखं उठा… छान आपल्या छोट्याश्या टेरेसवर डोकावुन थंड हवा घ्या..आपणच प्रेमाने लावलेल्या झाडावरून हात फिरवा….आपल्या लेकीला झोपेतच जवळ घ्या..

इतकं भारी वाटतं ना….

अहाहा…..

सकाळी उठलं की ब्रश करायच्या आधीच रेडिओ लागतो माझा…अभंग ऐकत ऐकत मस्त डोळे बंद करून ब्रश केला….ग्लास भरुन पाणी प्यायलं आणि मस्त…आल्याचा चहा पीतपीत खिडकी बाहेरच्या निर्जन रस्त्याकडे बघितलं ना की भारी वाटतं …..

रोज मस्त तयार व्हा….

आलटुन पालटुन स्वतःवर वेगवेगळे प्रयोग करत रहा ….

कधी हे कानातले ..कधी ते गळ्यातले…..कधी ड्रेस…कधी साडी…. कधी केस मोकळे…कधी बांधलेले….

कधी ही टिकली तर कधी ती…. रोज नवनवीन साड्या … एक दिवसाआड केस मोकळे सोडलेले….स्वत:ला बदला…. जगाशी काय करायचं आहे…दुनीयासे हमे क्या लेना …. तुम्ही कसेही रहा .. जग बोंबलणारच……

सगळं ट्राय करत रहा….नवं नवं नवं नवं….. रोज नवं…..रोज आपण स्वतःला नवीन दिसलो पाहिजे….

स्वतःला बदललं की…. आजूबाजूला आपोआपच सकारात्मक ऊर्जा पसरत जाईल……..तुमच्याही नकळत……आणि तुम्हीच तुम्हाला हव्या हव्याशा वाटू लागाल……

मी तर याच्याही पार पुढची पायरी गाठलेली आहे….

माझ्याबद्दल नकारात्मक कुणी बोलायला लागलं की माझे कान आपोआप बंद होतात….काय माहित काय झालंय त्या कानांना….

आता मी कितीही गर्दीत असले तरी मी माझी एकटी असते…. मनातल्या मनात मस्त टुणटुण उड्या मारत असते…..

जे जसं आहे….ते तसं स्विकारते आणि पुढे चालत रहाते…

कुणी आलाच समोर की..” आलास का बाबा..बरं झालं “..म्हणायचं… पुढे चालायचं….

अजगरासारखी सगळी परिस्थिती गिळंकृत करायची….

माहीत आहे मला… सोपं नाहीये…. पण मी तर स्विकारले आहे….. आणि एकदम खुश आहे….

आणि म्हणूनच रोज म्हणते….

” एकाच या जन्मी जणू .. …फिरुनी नवी जन्मेन मी…

हरवेन मी हरपेन मी…. तरीही मला लाभेन मी…..”

लेखक : अज्ञात 

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “अधिक” देखणे ☆ श्री श्रीनिवास गोडसे ☆

श्री श्रीनिवास गोडसे

? विविधा ?

☆ “अधिक” देखणे ☆ श्री श्रीनिवास गोडसे ☆

(२९ फेब्रुवारी विशेष)

1974-75 चा काळ असावा… मी सात वर्षांचा होतो. संक्रांतीचा दिवस… सगळ्या गल्लीतली मुलं मिळून तिळगुळ वाटायला बाहेर पडली होती… प्रत्येकाच्या घरात तिळगुळ द्यायचा… राम मंदिर, महादेव मंदिर, विठोबा मंदिर, अंबाबाई चे मंदिर… सगळी देवळं… सगळीकडे तिळगुळ वाटला.. ठेवला.. आता शेवट ‘ऐतवडे डॉक्टर!’…  मग झेंडा चौकाकडे मोर्चा वळला… चौकात एका गल्लीत डॉक्टरांचा दवाखाना…

दवाखाना माडीवर…

एका लायनीत उभं राहून डॉक्टरांना तिळगूळ दिला… डॉक्टरांनी पण आम्हाला तिळगूळ दिला अन वर एक चॉकलेट…

कित्ती मज्जाss!…

रावळगाव चॉकलेट…

त्यानंतर मात्र दरवर्षी संक्रांतीला ऐतवडे डॉक्टरांचा दवाखाना ठरलेला… डॉक्टरही नेमाने प्रत्येक वर्षी मुलांना चॉकलेट वाटत राहिले… आणि प्रत्येक मुलांच्या लक्षात राहिले… कायमचे…

आजही कधी कधी झेंडा चौकातल्या त्यांच्या गल्ली जवळून गेलो तरी डॉक्टरांची आठवण नक्की होते… खरंतर ते काही आमचे फॅमिली डॉक्टर न्हवते… मी कधीच त्यांच्याकडे कुठल्याही उपचाराला गेलो नाही… तरीही ऐतवडे डॉक्टर हा शब्द जरी ऐकला तरी तीळगूळ आणि त्यांचे ते चॉकलेट यांची आठवण नक्कीच होते…

डिसेंबर चे दिवस..

लुधियाना ला गेलो होतो… अमृतसर कडे निघालो तेव्हा लुधियाना मध्ये पहाटे एका गुरुद्वारात गेलो होतो… रात्रभर गुरुवाणी चा कार्यक्रम चालू होता… पहाटेची वेळ… डिसेंबरची थंडी… भव्य गुरुद्वारा सजला होता … रोषणाई केली होती… त्या दिवशी काहीतरी विशेष कार्यक्रम असावा… भजन ऐकत भक्तगण बसलेले… चकचकीत वातावरण… ग्रंथसाहेब…

पंजाबी भजनातील बरेच शब्द ओळखीचे… खिशातील मोबाईल काढून समोर ठेवून एका कडेला बसलो… दहा मिनिटे होती पुढे जाण्यासाठी… एक वयस्क पंजाबी स्त्री , पांढरी सलवार-कमीज पंजाबी परिधान,.  चेहऱ्यावरती हास्य… झाडू काढत होती… झाडू काढताना लोक उठत आणि दुसरीकडे बसत… तीही आनंदाने सेवेत मग्न होती… तिची स्वच्छता आमच्यापर्यंत आली आणि मी उठलो… गुरु ग्रंथ साहेबांना प्रणाम करून आमच्या गाडीकडे निघालो… गुरुद्वाराच्या दारात येताच

 ” भैय्या ss!”

अशी हाक ऐकू आली, पाहिले तर ती मगासची स्त्री.. हसत सामोरे आली ,

हातात मोबाईल..!  मला देऊन म्हणाली

“आपका मोबाईल..! भूल गये थे !”

माझ्या आता लक्षात आले मी माझा मोबाइल बसल्या जागीच विसरलो होतो..

 मी वाकून नमस्कार केला… त्या हसल्या… स्वेटरच्या खिशात हात घालून त्यांनी काहीतरी काढले … माझ्या हातात ठेवले…

मी पाहिलं तर दोन चॉकलेट !..

मी पण हसलो…

पुन्हा पुन्हा धन्यवाद मानत बाहेर पडलो…

कोण कुठची ती स्त्री, पण आठवणीत कायमची जागा करून गेली…!  पुढचा सर्व दिवस असाच मजेत गेला … अमृतसरला पोहोचलो.. सर्व अमृतसर फिरलो … सायंकाळी वाघा बॉर्डर पण पाहिली… सांगण्यासारख आणि लिहिण्यासारखे भरपूर घडले त्या दिवशी … पण सकाळी झालेला तो प्रसंग.. झालेली ती छोटी घटना मात्र आज तेजस्वी झाली आहे…

मागच्या महिन्यातली गोष्ट आम्ही दोघ गाडीवरून मुलीच्या पालक मिटींगच्या निमित्ताने कोल्हापूरला गेलो होतो… सगळा कार्यक्रम आणि कोल्हापुरातले काम व्हायला दुपारी दोन वाजून गेले होते…वाटेत काही तरी खाऊ आणि मग पुढे घरी पोहोचू असा विचार करून निघालो… शिरोली ओलांडले अन एका राजस्थानी ढाब्यावर गाडी थांबवली …

 छान स्वच्छ परिसर …

आम्ही बसताच वेटरने पंखा चालू केला.. पाणी आणून दिले… स्वतः मालक उठून आला… आमच्यासमोर मेनू कार्ड ठेवले…  त्याला थाळीची ऑर्डर दिली… छान हसून तो आमची खातरदारी करत राहिला… गरमागरम जेवण वाढत राहिला… चेहऱ्यावरचे हास्य कायम ठेवून… व्यापारी हिशोब, रितरीवाज बाजूला ठेवून… जेवण झाले, पैसे दिले..

“वापस आना जी ss ! “

म्हणून त्याने हसूनच निरोप दिला

ह्या घटना लक्षात राहिल्यात,  त्याचे आश्चर्य वाटते.

थोडा शोध घेतला तेव्हा या तिन्ही घटनांमधील प्रत्येकाने काही जी कृती केली होती त्याचा बोध लक्षात आला… या घटनांमध्ये प्रत्येकाने स्वतःहून आनंदाने काहीतरी जास्तीचे दिले होते… जगनियम हा असा आहे

“जेवढ्यास तेवढे”

पण इथे मात्र सर्वजण स्वतःहून जास्तीचे जगाला देत होते.. अपेक्षे पेक्षा थोड जास्तच.. या गोष्टी करता त्यांनी जास्त मेहनत सुद्धा घेतली नाही…

कुठे चॉकलेट मिळाली…

कुठे आपुलकीचे दोन शब्द…

कुठं चेहऱ्यावरचे निर्मळ हास्य.. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ते त्यांनी सुखासमाधानाने दिले होते.. अपेक्षा नसताना मिळाले होते..

माझी मुंबईची आत्या… अशीच प्रेमळ… मुंबईत एका चाळीत तीच घर… तीनच खोल्या … घरची आठ-दहा माणसे…आणि आला-गेला असायचा. सगळ्यांचे करत राहायची. माणूस निघताना घरातील जे काही असेल ते देत राहायची.  तिला सगळे माई म्हणायचे …किती गोड बोलणे !… तिने गोड बोलणं कधीच सोडलं नाही …

आज ती नाही.. पण तिचा सुहास्य चेहरा जसाच्या तसा फोटो काढल्या सारखा मनासमोर दिसत राहतो …एक प्रसन्न शांतता… एक प्रसन्न सोज्वळपणा याशिवाय काहीही आठवत नाही…

प्रत्येक वाक्यानंतर बऱ्याच वेळा ती होss लावायची

जेव होss!

जाऊन ये होss!

पुन्हा ये हो ss!

असे होss! बोलणे पण मी आजकाल कुठेही बघितले नाही.

प्रत्येकजण अशा गोड शब्दांना भूकावला आहे…

शरीरासाठी आपण बरेच काही करतो… पण मनासाठी काय ? गोड शब्द ही मनाची गरज आहे…

सकारात्मक शब्दांना लोक आसुसले आहेत.

ते मिळाले तर.?..

कुसुमाग्रजांची जन्मतिथी आपण नुकतीच साजरी केली… गेल्या पावसाळ्यात आपण सर्वांनीच महापुराचा कहर अनुभवलाय… लोकांना पैशाची , वस्तूची मदत तर सर्वांनी दिली असेल पण उभारी चे दोन शब्द… ते कुठे मिळतात ?

कुसुमाग्रजांकडे असाच एक जण जातो. आपली कहाणी सांगतो. त्यानंतर जे काही घडले ते त्यांच्या कवितेतच वाचा…!

कणा –

‘ओळखलत का सर मला?’ – पावसात आला कोणी,

कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.

क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून :

‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’.

माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली,

मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.

भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,

प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.

कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे

पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे,

खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला

‘पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला.

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा

पाठीवरती हात ठेउन, फक्‍त लढ म्हणा’!

माणूस आपुलकी पासून पारखा झाला आहे, शब्दांना महाग आहे…

सर्व जगच “Extra” चे वेडे आहे. डिस्काउंट, सेल, अमुक % एक्स्ट्रा, असं म्हटलं की डोळे Extra मोठे होतात. दिल्यापेक्षा आले जास्त तर सगळ्यांनाच पाहिजे असते. आपण जर असे Extra दिले तर सगळे तुमचे नक्की ‘फॅन’ होतील.

मदत असे म्हटले…

दान असे म्हटले की आपल्याला फक्त पैसा आठवतो.. . आपण याच्या पुढचा विचारच करत नाही.

 तेजगुरु सरश्रींच्या पुस्तकात वाचले त्याप्रमाणे आपणाकडे देण्यासारखे बरेच काही आहे. ते आपण देत नाही…

बाकी सगळे जाऊदे पण आपल्या आसपासचे लोकच असे आहेत…

कदाचित तुम्ही स्वतः आहात… ज्याला सकारात्मक शब्द हवे आहेत…

ज्याला कोणाचा तरी प्रेमाचा स्पर्श पाहिजे आहे…

त्याला कोणीतरी फक्त जवळ बसायला पाहिजे आहे…

ज्याला कुणाला तरी आपल्या मनातील सगळं सांगायचं आहे… त्याला श्रमाची मदत पाहिजे आहे… हात पाहिजे आहेत…

पाठीवर थाप पाहिजे आहे…

आपण शोध घेऊया..

मला स्वतः ला कशाची गरज आहे ?

आणि माझ्या आसपासच्या लोकांनाही कशाची गरज आहे?

कुणाला कान पाहिजे आहेत तर कानदान करा

कुणाला पाठीवरती थाप पाहिजे आहे त्यांना शब्ददान करा

कुणाला थोडी श्रमदानाची गरज आहे त्यांना थोडी श्रमाची मदत करा… कुणाला तुमचा वेळ पाहिजे आहे त्यांना तुमच्यातील थोडासा वेळ द्या

कुणाला फक्त तुमचे जवळ असणे पाहिजे आहे फक्त त्यांच्याजवळ फक्त बसून राहा

आपल्याकडे या सर्वात काय जास्त शिल्लक आहे ?

हे थोडेसे “एक्स्ट्रा” आपण देऊ शकतो का?

यशस्वी होण्याचा मंत्र सांगताना असे म्हणतात कि यशाकडे जाण्यासाठी पहिला तर तुमचे नियोजन करा या नियोजनाचे व्यवस्थित तुकडे करा. आपल्याला रोज थोडे थोडे काम करायचे आहे असे ठरवा. काय करायला पाहिजे आहे त्याप्रमाणे करत जा.

जमलं तर ठरवल्या्पेक्षा थोडं जास्तच करा…

‘थेंबे थेंबे तळे साचे’ ही अशीच सकारात्मक म्हण … मोठे काम करायचे असेल तर या म्हणीचा वापर करणे हाच खरा गुरुमंत्र…

आपल्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा फक्त एक पाऊल जास्त पुढे असणे महत्त्वाचे …

रोज आपण आपल्याशी स्पर्धा केली तर?

आपणच आपले प्रतिस्पर्धी झालो तर?…

भगवान गौतम बुद्धांनी त्यांच्या साधनेच्या काळात अनेक गुरूंचा शोध घेतला. त्यांनी सत्याचा शोध घेण्याच्या मार्गात जे जे काही सांगितले त्याप्रमाणे केलेच, पण त्याच्यापेक्षाही थोडं जास्तच केले… थोडी जास्तच साधना केली … तरीही मनाची तळमळ शांत झाली नाही अखेर स्वतः मार्ग चालू लागले आणि एक दिवस अंतिम लक्ष्या पर्यंत पोहोचले…

थोडा विचार केला अन् प्रामाणिकपणाने स्वतःकडे पाहिले तर हे सर्व जण मान्य करतील की ईश्वराने आपल्याला आपल्या लायकी पेक्षाही अनेक पटीने जास्त आपणास दिले आहे… शिवाय तो देत आहे… त्याला आपण एक बीज दिले तर तो अनेकपटीने वाढवून परत देतो… भरपूर देतो… एक्स्ट्रा देतो…

तो फळ देणारा आहे …

बहुफल देणारा आहे.

माणसाने हाव सोडली तर सर्वच भरपूर आहे प्रेम ,पैसा,आनंद…

अनंत हस्ते कमलाकराने, देता किती घेशील दो कराने?

जेव्हा तो नेईल दो कराने सांभाळीशी किती मग दो कराने?

 

गदिमांच्या शब्दात आपण मिसळून जाऊया अन् देवाला मागूया… आपल्या मागण्यापेक्षा

अधिकच मिळेल!

देखणे मिळेल!

याची खात्री ठेवूनच मागूया …

 

पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी

देणार्‍याचे हात हजारो दुबळी माझी झोळी !

 

हवाच तितुका पाडी पाऊस देवा वेळोवेळी

चोचीपुरता देवो दाणा मायमाउली काळी

एक वितीच्या भुकेस पुरते तळहाताची थाळी !

 

महालमाड्या नकोत नाथा माथ्यावर दे छाया

गरजेपुरती देई वसने जतन कराया काया

गोठविणारा नको कडाका नको उन्हाची होळी !

 

सोसे तितके देई याहुन हट्ट नसे गा माझा

सौख्य देई वा दुःख ईश्वरा रंक करी वा राजा

अपुरेपणही नलगे, नलगे पस्तावाची पाळी !

 

29 फेब्रुवारी हा असाच “एक्स्ट्रा” दिवस…

आता हा दिवस चार वर्षातून एकदा येतो, सूर्याच्या भोवती पृथ्वीची सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण होण्यासाठी 365.25 (365•242181) दिवस लागतात तर आपले वर्षाचे 365 दिवस असतात राहिलेला पाव दिवस म्हणजे सहा तास

हे चार वर्षे ×प्रत्येकी सहा तास याप्रमाणे आपण एका दिवसाने वर्ष वाढवतो… त्रुटी पूर्ण करतो या सर्वच गोष्टी आपणास माहिती आहेत पण या 29 फेब्रुवारी च्या निमित्ताने मनन झाले म्हणूनच हा लेखन प्रपंच …

हे मनन आपणास आवडले असेल तर ‘पुढाळायला’ हरकत नाही आणि आपला “एक्स्ट्रा” वेळ खर्च करून प्रतिक्रिया कळवायलाही हरकत नाही… आपल्या प्रतिक्रिया ही ‘लेखकाची’ प्रेरणा आहे.

©  श्री श्रीनिवास गोडसे

इचलकरंजी, मो – 9850434741

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ वृद्धाश्रम नाही… केअर सेंटर… ☆ सुश्री नीता कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ वृद्धाश्रम नाही… केअर सेंटर… ☆ सुश्री नीता कुलकर्णी

अजूनही वृद्धाश्रम म्हटलं की गरीब  बिचारी म्हातारी माणसं…

असंच मनात येतं.

आता केअर सेंटर असे नाव दिले जात  आहे.

आणि तिथे खरंच काळजीपूर्वक वृद्धांना सांभाळलं जातं.

ते आनंदी कसे राहतील हे पण बघीतल जातं.

अशाच एका केअर सेंटरला गेले होते. इथे वृद्ध लोक काही दिवसांसाठी किंवा काही महिन्यांसाठी रहायला येतात.

काही तिथेच रहायला आले आहेत.

तिथे भरपूर झाडं होती ,कुंड्या होत्या. समोर छोट्या टेबलावर गणपतीची मूर्ती होती. हार फुलं घालून पूजा केली होती. समोर मंद दिवा तेवत होता.

 एका ओळखीच्या  आजींचा वाढदिवस होता.  आजींना भेटाव व ईतर लोकांशी बोलाव म्हणून मी थोडी आधीच तिथे गेले .

तिथल्या खोल्या बघितल्या .काॅट, कपाट, टीव्ही, फॅन, या सोयी होत्या.. काॅलेजच्या होस्टेलचीच आठवण आली.

खोल्याखोल्यातुन मी चक्कर मारली.

स्वतःचं घर असावं अशा खोल्या त्यांनी स्वच्छ ठेवल्या होत्या…

सगळे आजी-आजोबा गप्पा मारायला आपली कहाणी सांगायला उत्सुक होते…

एक एकजण सांगत होते.

“अग माझ्या दोन्ही मुली आपापल्या संसारात त्यांच्यात माझी लुडबुड नको ग …..  शिवाय संकोचही वाटतो बघ आणि  हे गेले आता एकटी कशी राहु ?म्हणून मी ईथे आले.”

“मुंबईत घर घेणं कुठे परवडतं…नातवाच लग्न झाल  म्हणून मीच म्हटलं मला इथे ठेवा….”

” मला तर मूलबाळच नाही… भाचे पुतणे करतात पण तेही आता पन्नाशी ..साठीला आले….”

” माझी नात सून नोकरी करते सुनेला तिची मुले सांभाळावी लागतात….माझं अजून एक ओझं  तिच्यावर कुठे घालू ग….”

“माझा मुलगा सून  परदेशी गेले आहेत…..लेकीच  बाळांतपण करायला..  म्हणून  काही महिन्यांसाठी मी इथे….”

एक आजोबा शांतपणे जपमाळ हातात घेऊन जप करत बसले होते.

दुसरे आजोबा सांगायला लागले..

 ” माझी  एकुलती एक मुलगी मला छान संभाळते. पण तिला चार महिन्यांसाठीऑफीसच्या कामासाठी अमेरिकेला जावे लागले म्हणून तोपर्यंत मी इथे “

प्रत्येकाकडे एक एक कारण होते…..इथे येण्याचे… मुख्य म्हणजे कोणाचाच तक्रारीचा सूर अजिबात नव्हता.

इतक्यात एक मुलगा सांगत आला 

” चला … चला खाली  तयारी झाली आहे ….”

एक आजी थोड्या भांबावलेल्या दिसत होत्या. 

“अग या कालच आल्या आहेत ” एकीनी सांगितलं 

दुसऱ्या  आजींनी त्यांचा हात धरला.. म्हणाल्या ” हळूहळू होईल तुम्हाला सवय … चला आता खाली “

असं म्हणून त्यांना घेऊन गेल्या.

खालच्या पार्किंगमध्ये सजावट केली होती .खुर्च्या मांडल्या होत्या. समोरच्या टेबलावर केक ठेवला होता.

छान  जरीची साडी नेसुन आलेल्या आजींनी केक कापला. सगळ्यांनी टाळ्या वाजवून  हॅपी बर्थडे चा गजर केला…

नव्वदीचे चे आजोबा ….  “जीवेत शरद शतम्……” असा आशीर्वाद देत होते.

डिशमध्ये सर्वांना केक वेफर्स आणि बटाटेवडे खायला दिले.

“झालं न खाणपीणं….आता गाणी म्हणायला सुरू करूया..” केअर सेंटरच्या डॉक्टरीण  बाईंनी सांगितले.

एक आजोबा पेटी घेऊन आले. टाळ, चिपळ्या आल्या गाणी सुरू झाली…..एकच घमाल सुरू झाली.

पंच्याऐंशीच्या आजी

“सोळावं वरीस धोक्याचं गं…” ठेक्यात म्हणत होत्या.

” पाऊले चालती पंढरीची वाट ” सुरू झालं ..अभंग म्हणत म्हणत सर्वांनी एक गोल चक्कर मारली.

मी प्रसन्न मुद्रेने हे सगळं बघत होते.

अध्यात्म प्रत्यक्ष आयुष्यात जगणाऱ्या या शहाण्या आजी-आजोबांना मी मनोमन साष्टांग दंडवत केला…

 वानप्रस्थाश्रम संपवून या आधुनिक संन्यासाश्रमात प्रवेश केलेले हे लोक होते…..

खरं सांगू हे वाटतं तितकं सोपं नाही…..मोह ,माया इतकी लगेच सुटत नाही…. भरल्या घरातून इथे यायचं.. फोनद्वारे कनेक्ट राहायचं आणि तरीही अलिप्त रहायचं….

आपल्या मुलांची अडचण ओळखून स्वतःहून हे सगळे  इथे आले होते…..

तरीपण…. यांच्या मनात काय काय चाललं असेल हे मला समजत होते.

फार अवघड आहे… हे सगळं स्वीकारून आनंदात राहणाऱ्या या लोकांकडून मी आज खूप काही शिकले….

वाटलं… येत जावं इथं अधून मधून…आपलेही पाय जमिनीवर राहतील…

घरात राहून आपण  छोट्या मोठ्या तक्रारी करणार नाही….

इतक्यात खणखणीत आवाज ऐकू आला…. गाऊन घातलेल्या आजी…

 ” पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा……आई मला नेसव शालु नवा…” म्हणत होत्या..

माझ्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या. सगळं कसं धूसर धूसर दिसत होतं….

त्या नादमयी वातावरणाला एक कारूण्याची झालर आहे हे आतल्या आत कुठेतरी जाणवत होते…

तरीसुद्धा यांचा उत्साह बघुन म्हटलं..

“वाह क्या बात है…असेच मजेत आनंदात  रहा…. परत येईन भेटायला……..”

© सुश्री नीता कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ फलटणमधील ‘सीतामातेचा डोंगर’… ☆ सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? इंद्रधनुष्य ?

☆ फलटणमधील ‘सीतामातेचा डोंगर’… ☆ सुश्री सुनीला वैशंपायन 

– श्री क्षेत्र सोमनथळी 

फलटणमधील ‘सीतामातेचा डोंगर’

चला आपल्या फलटणबद्दल थोडेसे जाणून घेऊयात

राम रावणाच्या युद्धानंतर जेव्हा राम अयोध्येला परत आले तेव्हा लोकांनी सीतेबद्दल शंका घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे नाईलाजाने रामाला सीतेचा त्याग करावा लागला. त्याने लक्ष्मणाला आज्ञा केली की सीतेला दूर कुठेतरी नेउन सोड. लक्ष्मण सीतेला घेऊन अयोध्येपासून खूप दूर आला. त्याने सीतेला एका ठिकाणी सोडलं आणि तो अयोध्येला निघून गेला…

लक्ष्मणाने सीतेला ज्या ठिकाणी सोडलं होतं ते ठिकाण आपल्या फलटणच्या शेजारी आजही ‘ सीतामातेचा डोंगर ‘ या नावाने प्रसिद्ध आहे. आजही हजारो स्त्रिया संक्रांतीच्या दिवशी या ठिकाणी सीतामातेला वाणवसा घ्यायला जातात…

याच आपल्या पावन भूमीत लव-कुश यांचा जन्म झाला. रामाने ज्यावेळी अश्वमेध यज्ञ केला त्यावेळी या यज्ञाप्रसंगी जो घोडा सोडलेला होता तो लव-कुशने पकडला… त्यानंतर लव-कुश यांच्याबरोबर लक्ष्मण, शत्रुघ्न, भारत, सुग्रीव यांनी युद्ध केलं.. मारुतीही या युद्धाच्यावेळी उपस्थित होते. मात्र त्यांना समजलं की ही दोन्ही मुले रामाचीच आहेत. त्यामुळे त्यांनी युद्धात सहभाग घेतला नाही. लव-कुशने हनुमंताला एका अस्त्राने एका लिंबाच्या झाडाला बांधून टाकलं …

हे युद्ध ज्या ठिकाणी झालं त्या ठिकाणाचा उल्लेख रामायणमध्ये ” फलपठठनपूर ” असा केलेला आहे. ज्याचा अपभ्रंश होऊन आज ते ठिकाण फलटण या नावाने ओळखल जातं … 

रामायणामध्ये असा उल्लेख आहे कि लव-कुशने हनुमंताला ‘सम्स्थलि’ बांधलेले…

‘सम्स्थळ’ म्हणजे समान जागा, जिथे चढ-उतार जास्त नाहीत अशी…

त्या ‘समस्थळचा’ अपभ्रंश होऊन आज ते ठिकाण ‘सोमन्थलि’ या नावाने प्रसिद्ध आहे.

खूप वर्षांपूर्वी या ठिकाणी एका स्त्रीला एका लिंबाच्या झाडाखाली पडलेल्या गाईच्या गोवरीमध्ये हनुमानाचे दर्शन झाले… ती बेशुद्ध होऊन पडली… काही लोक तिला पाहायला गेले तर त्यांनाही हनुमंताचे दर्शन मिळाले. ही वार्ता गावामध्ये वाऱ्यासारखी पसरली… त्या काळच्या एका प्रसिद्ध ब्राह्मणाकडून याबद्दलची माहिती काढण्यात आली. त्यावेळी हे तेच ठिकाण निघालं जेथे हनुमानाला बांधलेलं होत…मग लोकांनी भक्तिभावाने या ठिकाणी हनुमानाचे मंदिर बांधले. या मंदिराच्या पाठीमागे एक लिंबाचे झाड आहे. असे म्हणतात की हे लिंबाचे झाड मोठे होऊन जेव्हा मरून जातं तेव्हा त्याच ठिकाणी नवीन झाड उगवते. मारुतीचे दर्शन घेऊन मंदिराला प्रदक्षिणा घालताना पाठीमागच्या या झाडाला मिठी मारून दर्शन घेण्याची पद्धत आहे. नवसाला पावणारा हा मारुती दक्षिणमुखी आहे….चैत्र शुद्ध पौर्णिमेला सोमंथळी मध्ये मोठी यात्रा भरते… मित्रानो समर्थ रामदासांनी ११ मारुतींची स्थापना केली हे सर्वाना माहित आहे… मात्र हा मारुती स्वयंभू आहे. याची स्थापना केली गेली नाही… सोमंथळी मध्ये तो स्वतः: प्रगट झाला आहे…

” श्री स्वयंभू दक्षिणमुखी मारुती मंदिर, श्री क्षेत्र सोमंथळी ” या नावाने हे मंदिर प्रसिद्ध आहे. गुजरात, बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू याचबरोबर इतरही अनेक राज्यातून लोक येथे दर्शनाला येतात…

मात्र याच मातीतल्या बऱ्याच लोकांना या ठिकाणाची माहिती नाही… कारण आपण रामायणाची पारायणे करतो .. मात्र मनापासून कधी वाचत नाही.

एव्हढा पौराणिक आणि सांस्कृतिक वारसा असणाऱ्या ठिकाणी आपण वावरतोय याचा थोडा तरी अभिमान असू द्या…

|| जय श्री राम ||

|| जय हनुमान ||

माहिती प्रस्तुती : सुश्री सुनीला वैशंपायन 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मराठी भाषादिनाच्या शुभेच्छा… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ मराठी भाषादिनाच्या शुभेच्छा… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

स्वतःची सहीसुद्धा मराठीत नसणाऱ्या, पण मराठीची उगीच तळमळ बाळगणाऱ्या तमाम मराठी बांधवांस थोर थोर शुभेच्छा..

A B C D सहज म्हणू शकणाऱ्या, पण मराठी शाळेत शिकूनसुद्धा अजूनही क ख ग घ पूर्ण म्हणता न येणाऱ्या मायमराठीच्या अडाणी लेकरांना कोपरापासून शुभेच्छा..

मॉलमध्ये गेल्यावर ‘ये कितने का है ?’ किंवा ‘हाऊ मच इट कॉस्टस ?’ असं विचारणा-या तमाम मराठी माणसांना मराठी भाषा दिनाच्या बळेच शुभेच्छा ..

आपली मुले इंग्रजी शाळांत घालून इतरांच्या मुलांना मराठीतून शिकण्याचा आग्रह धरण-या गुणीजनांनाही कोरडया शुभेच्छा..

व्हाट्सऍप वर लिहिताना केवळ ‘कंटाळा येतो म्हणून’ विचित्र मिंग्लिश भाषा वापरणाऱ्या नेटकऱ्यांना धन्य धन्य शुभेच्छा..

फेसबुकवर वाढदिवसाच्या दिवशी एचबीडी लिहिणाऱ्या किंवा टीसी (‘काळजी घे’ चे सूक्ष्म रूप), जीएन, जीएम, जीई, जीए, हाय, हॅलो, बडी, ब्रो, ड्यूड, सिस, हे मॅन, अंकल, आंट, पापा, ममी, मॉम्झ, डॅड असलं अरबट चरबट लिहिणा-या लोकांनाही ओढून ताणून शुभेच्छा…

टॅक्सी, रिक्षा, बस, रेल्वे, विमान, जहाज यातून प्रवास करताना किंवा अगदी पायी चालतानाही आपण मराठीत बोललो तर आपल्या अंगावर झुरळ पालींचा वर्षाव होईल असं समजणा-या भोळ्या भाबड्या मराठीप्रेमींनी काय घोडे मारलेय?.. त्यांनाही आज शुभेच्छा..

सरकारी कार्यालयात, कार्यप्रणालीत, कचे-यांत, बँकेत किंवा इतर स्थळी गेल्यावर समोरील माणूस ज्या भाषेत बोलतो त्याच भाषेत बोलताना, ‘मराठीचा किमान एका संधीसाठीही’ वापर न करणा-या मराठी माणसासही आभाळभर शुभेच्छा…

वर्षभरात एकही मराठी पुस्तक विकत न घेणा-या, कधीही मराठी नाटक – चित्रपट न पाहणा-या, जाणीवपूर्वक मराठी वाहिन्या न पाहता इतर वाहिन्या पाहणा-या, कधीही मराठी गाणं न गुणगुणणा-या, मराठी नियतकालिकाशी संबंध नसणाऱ्या, तमाम मराठी माणसांना मराठी दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..

मराठी मुळाक्षरे, बाराखडी, व्याकरण, गद्य, पद्य याबाबत मनात कमालीची रुक्षता असणा-या, पण इंग्रजी स्पेलिंग तोंडपाठ करणाऱ्या बाळबोध जनतेस मराठी दिनाच्या शुष्क शुभेच्छा..

फक्त मराठी दिनापुरते मराठीचे तुणतुणे वाजवणा-या मराठी माणसास मराठी भाषा दिनाच्या जरतारी शुभेच्छा…

मराठी दिनाचे ढोंग न करता आयुष्यभर मराठीवर प्रेम करणा-या खऱ्याखुऱ्या मराठी माणसास मात्र मराठी दिनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा… 

जीवावर येऊन मराठीत वाचत, बोलत, लिहित नसाल, तरच हा संदेश पुढे पाठवा अन्यथा वाचून सोडून द्या ;पण केवळ औपचारिकता म्हणून किंवा लेखन आवडले म्हणून किंवा आपणही मराठीवर प्रेम करतो हे दाखवून देण्यासाठी, हा शुभेच्छा संदेश पुढे पाठवू नका.

कवी – अज्ञात

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ प्रेम… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

? विविधा ?

☆ प्रेम…  ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

नुकताच म्हणजे १४ फेब्रुवारीला प्रेम दिवस सगळ्या जगभर साजरा झाला. कोणाची संस्कृती असो किंवा नसो पण त्या दिवसाची संकल्पना आवडली असावी म्हणून प्रत्येक देशात हा दिवस साजरा केला नव्हे साजरा केला जातो.

पण प्रेम ही संकल्पना एवढी संकुचित आहे का हो? फक्त प्रियकर प्रेयसी या मधे असलेले नाते किंवा भावना म्हणजे प्रेम? मग आई, वडील -मुले, आजी, आजोबा -नातवंडे, पाळीव प्राणी – घरातील सदस्य, बहीण – भाऊ, मित्र – मित्र /मैत्रीण, किंवा इतर काही कारणाने निर्माण झालेले नातेसंबंध, उदा. मालक -कामगार, ज्येष्ठ -कनिष्ठ, स्त्री -पुरुष ई….

या सगळ्यांमध्ये असणारी भावना त्याने निर्माण झालेले नाते म्हणजे काय? हे प्रेम नाही?

मग कोणी म्हणेल आई, वडील – मुले म्हणजे मातृत्व /पितृत्व किंवा ममत्व/वात्सल्य

आजी, आजोबा – नातवंड म्हणजे जिव्हाळा,

पाळीव प्राणी – घरातील सदस्य म्हणजे लळा

बहीण – भाऊ म्हणजे बंधुत्व,

मित्र – मित्र /मैत्रीण, म्हणजे मैत्री

मालक – कामगार म्हणजे जबाबदारी

ज्येष्ठ -कनिष्ठ म्हणजे कुठे तरी समानत्व मान्य करून फक्त आधी -नंतर केलेला भेद

इतर कोणीही ओळखीचे अनोळखीचे आपल्याला भेटल्यावर त्यांच्याशी केलेला व्यवहार म्हणजे आपुलकी

स्त्री – पुरुष यामधे असलेल्या भावना म्हणजे केवळ शारीरिक आकर्षण? व्याभिचार?

जरा नीट विचार केला तर समजेल की मातृत्व /पितृत्व किंवा ममत्व/वात्सल्य,जिव्हाळा,लळा,बंधुत्व,मैत्री ,जबाबदारी,आपुलकी, दया, उपकार काळजी धाक या सगळ्या नावांच्या इमारती या प्रेमाच्या पायावर उभ्या राहिलेल्या आहेत नावे वेगळी असली तरी हेच प्रेम आहे.

मग या सगळ्यासाठी एक दिवस? नाही नाही या सगळ्या साठी वेगवेगळे दिवस आहेत की असे पटकन सगळे म्हणतील. पण तरी सगळे दिवस जरी साजरे केले तरी फक्त एक एक दिवसच?

दुसरे असे की सगळे म्हणतात ईश्वर एक आहे पण मानवाने त्याच्या सोयीनुसार स्वरूप बदलून अनेक देवांची निर्मिती केली. गम्मत आहे ना ज्या देवाने निर्माण केले त्याच देवांना वेगवेगळे रूप देऊन त्याचे क्रेडिट आपण घेतो. असो तो विषय मोठा आहे.

पण हे जसे घडले ना अगदी तसेच प्रेम ही एकच भावना असताना त्याला वेगवेगळी नावे देऊन त्याला वेगवेगळ्या दिवसात विभागले जात आहे. स्त्री – पुरुष हे विवाहा नंतर दुसऱ्या बरोबर दिसलें तर ते लफडे, व्याभिचर… का ते प्रेम नाही होऊ शकत?

वेगवेगळे दिवस वेगवेगळ्या नावाने केले तरी फक्त त्या एका दिवसापुरतेच त्याचे महत्व? बाकी ३६४ दिवसांचे काय? तेव्हा पण या भावना जागृत असल्याच पाहिजेत ना?

प्रेम हे  त्रैलोक्यातील त्रिकालाबाधित सत्य आहे. ते सर्वत्र सारखेच आहे त्याला वेगवेगळे नाव देऊन विभागून त्याचा अपमान करू नका. प्रेमाला प्रेमच राहू द्या वेगळे नाव नको. आणि सगळ्याच संतांनी सांगितल्या प्रमाणे फक्त आणि फक्त प्रेमकी गंगा बहाते रहो……

एवढेच प्रेमाच्या माणसांना प्रेमाचे सांगणे

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ 3 G.? की दत्तगुरू !… लेखिका : सुश्री अनुजा बर्वे ☆ प्रस्तुती – सौ उज्ज्वला केळकर ☆

सौ उज्ज्वला केळकर

??

☆ 3 G.? की दत्तगुरू !… लेखिका : सुश्री अनुजा बर्वे ☆ प्रस्तुती – सौ उज्ज्वला केळकर ☆

“अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त ” भाजी निवडतांना एकीकडे माझा जप चालू होता, इतक्यात माझ्या नातवाचा, रोहिनचा प्रश्न आला.

‘एव्हरीटाईम हे काय म्हणत असतेस तू आज्जी ?’

‘ही माझ्या जपाची “टॅग लाईन” आहे.’

‘पण हे म्हणत असलीस की तुझं माझ्याकडे लक्षच नसतं’ फुरंगटलेल्या रोहिनची तक्रार.

रोहिनचा रूसवा दूर करण्यासाठी,पटकन संवाद साधला जाण्यासाठी म्हणून त्याच्या स्टाईलच्या मराठीचा आधार घेत मी म्हटलं,

‘बच्चमजी,व्हिडिओ गेम -मोबाईल मध्ये रमलात की आपणही माझ्या प्रश्नाला आन्सर देत नाही. अगदी तश्शीच मी पण “3G”मध्ये रमून जाते.’

‘आज्जी,”हे” म्हणायला यू आल्सो नीड “3G”?’

रोहिनच्या चेहरयावरचं आश्र्चर्य बघून मला हसू आवरलं नाही.त्याला समजवायला म्हटलं,

‘अरे,दत्तात्रय म्हणजे ‘ब्रम्हा -विष्णु -महेश” टुगेदर, म्हणजे “3G”च नाही का ?अर्थात माझ्या आणि हल्ली सगळ्यांची ‘नीड’ असलेल्या “3G” मध्ये एक मेजर फरक आहे.’

‘फरक म्हणजे डिफरन्स,राइट?तो कोणता?’ रोहिनने खात्री करण्यासाठी विचारलं.

‘सांगते! सगळे ज्याचे फॅन झालेत ‘ते “3G” मिळतंय की नाही ,नसेल तर कोणत्या डायरेक्शनला मिळेल हे सर्व चेक करावं लागतं. पण मी नुसतं “दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा” असं म्हटलं तरी इनफ आहे.’

 ‘का ?असं का ?आणि “दिगंबरा” म्हणजे ?’ रोहिनच्या अनेक शंका धडाधड बाहेर आल्या.

‘अरे,”दिगंबरा”चा अर्थ सर्व दिशांना व्यापून राहिलेला म्हणजे स्प्रेड होऊन राहिलेला.”दिगंबरा”

हे दत्ताचं अजून एक नाव आहे.’

या अशा संवादानंतर “3G” ची गोष्ट सांगण्याची रोहिन मागणी करणार याची मला खात्री होती.

‘So श्रीदत्त  म्हणजे 3 in one देव आहे?कसं काय? सांग ना आज्जी ‘ गेममध्ये पाॅझ घेऊन माझ्याजवळ येऊन रोहिननं विचारलं.अशा सुवर्ण संधीचा लाभ सोडून देणं मला शक्यच नव्हतं.मी लगेचच गोष्टीला सुरूवात केली.

‘दत्तात्रय या नावातच त्यांच्या वडिलांचं नाव लपलेलं आहे.पिता अत्रीऋषी आणि माता अनुसूया यांचा सुपुत्र means son म्हणजेच “श्रीदत्तात्रय”!फार पूर्वींची गोष्ट-अत्रीऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी “ब्रम्हा-विष्णु-महेश” या देवांची कठोर आराधना केली.’

‘कठोर आराधना म्हणजे?’ मला मध्येच अडवत रोहिनचा प्रश्न आलाच.

‘म्हणजे “hard worship” ! त्याला मराठी शब्द अर्थासहित समजावणं हे माझं आवडतं काम. मातृभाषेची हसतखेळत ओळख करून द्यायला “गोष्ट” हे एक उत्तम साधन आहे असं मला वाटतं.

‘म्हणजे गेममध्ये वरची लेव्हल क्राॅस करायला मला जसं continuous hard try करायला लागतं….’त्याच्या विश्वातल्या गोष्टींशी अर्थ रिलेट करण्याच्या रोहिनच्या प्रयत्नाची गंमत वाटून मी पुढे सांगायला सुरुवात केली.

‘अत्रीऋषींच्या आराधनेमुळे ब्रम्हा-विष्णु-महेश हे तिन्ही देव प्रसन्न झाले.अत्रीऋषी -अनुसूयेला “त्रिदेव पुत्रप्राप्ती” झाली म्हणजेच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला. दत्तजयंतीच्या दिवशी ” त्रिगुणात्मक त्रैमूर्ति दत्त हा जाणा….” ही आरती आपण म्हटलेली आठवतेय ?’ 

मला मध्येच थांबवत रोहिनची प्रतिक्रिया आली, ‘आरतीमध्ये “त्रैमूर्ति” का म्हटलंय ते आता मला करेक्ट समजलंय आजी. पण दत्ताच्या तसबिरीमध्ये गाय, कुत्रे एटसेट्रा का असतात आज्जी ?’

खरंतर त्याच्या तोंडून ‘तसबीर’ हा शब्द ऐकून मला अगदी गहिवरून आलं. माझे ‘मराठी प्रयत्न’ रूजतांना पाहून छान वाटतं होतं. पण आधीच चमकदार असलेल्या रोहिनच्या डोळ्यातली उत्सुकता अधिक न ताणता मी म्हटलं,

‘पृथ्वी – म्हणजे “मदर अर्थ” कशी एखाद्या आईप्रमाणे सगळ्यांच्या डिमाण्डस् फुलफिल करते. तसबिरीतली गाय हे पृथ्वीचं “प्रतिक” आहे.”प्रतिक” म्हणजे symbol. आता पहा, ते “3G” symbol दिसत असलं की सगळे कसे खूश असतात. त्यामुळेच तर सगळ्यांच्या वेगवेगळ्या मागण्या पूर्ण होतात नं ! ४ कुत्रे हे आपल्या वेदांचं प्रतिक आहे– “ऋग्वेद,यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद” !’

‘वेद म्हणजे काय आजी ?’ रोहिननं अधीरपणे विचारलं.

खरं तर “वेद” म्हणजे काय हे सोप्पं करून सांगणं हे खरोखरच अवघड काम होतं.तरीही मी म्हटलं,

‘काही माहिती हवी असेल, काही क्वेरी असेल, काही अडलं असेल तर हल्ली सर्वजण विकिपिडिया रिफर करतात,राइट ? ‘वेद’ म्हणजे आपल्या अॅन्सेस्टर्सनी जपलेलं “ज्ञानाचं भांडार” आहे.’   त्याला  चटकन समजेल अशा प्रकारे समजावण्याचा मी आपला एक प्रयत्न केला.

‘व्हेरी इंटरेस्टींग. आज्जी अजून सांग नं ‘आता रोहिनला राहवेना.

‘शंख-चक्र हे श्रीविष्णूचे तर त्रिशूल-डमरू हे श्रीशिवाचं प्रतिक आहे. मला आठवतंय ,तू एकदा मोबाईलमधले डमरू आणि चक्र चे सिम्बाॅल दाखवले होतेस,हो नं?’

‘अगदी बरोबर आज्जी,” ब्लूटूथसाठी डमरू आणि जनरल सेटिंग्ज ला चक्र “अशा साइन्स असतात. आज्जी हे थोडंसं ब्राॅड पण व्हाॅटस्अॅपच्या साइन सारखं दिसतंय ते काय आहे ?’

‘अरे त्याला कमंडलू म्हणतात. कमंडलू आणि जपमाला हे श्रीब्रम्हाचं प्रतिक आहे.’

व्हाॅटस्अॅपच्या सिम्बाॅलशी त्याने शोधलेल्या साधर्म्याचं मला मनात कौतुक वाटत होतं. माझ्या गोष्टीचे तपशील त्याला आवडलेत असं लक्षात येत असतानाच पुढचा प्रश्न आला.

‘पण मग आज्जी श्रीदत्तांचा जप करतांना तू “अवधूत चिंतन …..”असं का म्हणतेस ?अवधूत म्हणजे ?’

‘अवधूत हेही श्रीदत्ताचंच नाव आहे. ह्या नावाचं मिनिंग आहे ” नेहमी आनंदात,वर्तमानात रहाणारा “.

म्हणून तर मी म्हटलं की ही माझ्या जपाची “टॅग लाईन” आहे, नेहमी आनंदात ठेवणारी. पहा, आजकाल “3G” चा टॅग स्पष्ट असेल तर असतात की नाही सगळे आनंदात अन् अपडेटेड?

काय?’

रोहिनला मनापासून हसू आलं ,अन् अर्थातच मलाही ! खूपशा मराठी शब्दांची अर्थासहित रोहिनला ओळख करून दिली, एक पौराणिक कथा त्याला आवडेल अशा पध्दतीनं सांगता आली ह्याचा मलाही आनंद वाटला.

सध्याच्या “4 G” च्या जमान्यात मी रोहिनला माझ्या “3G” शी कनेक्ट करू शकले… आणखी काय हवंय माझ्यासारख्या आज्जीला ?

लेखिका : सुश्री अनुजा बर्वे

प्रस्तुती : सौ उज्ज्वला केळकर

संपर्क –17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘अनंत अमुची ध्येयासक्ती’… ☆ माहिती-प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘अनंत अमुची ध्येयासक्ती’ ☆ माहिती-प्रस्तुती :  सौ. गौरी गाडेकर ☆

अवघ्या ६५ वर्षांची विद्यार्थिनी — श्रीमती विनया नागराज 

2018 च्या सप्टेंबर महिन्यात पुण्यातल्या सहकारनगर जवळच्या ICWA चॅप्टर क्लासमध्ये 64 वर्षांच्या एक आज्जीबाई एका वर्गात शिरल्या. तेव्हा वर्ग सुरू झाला होता. आणि समोर 20-21 वर्षांची मुलं त्यांच्या शिक्षिका आणि फळ्याकडे बघत होती. अचानक आज्जी दिसल्यावर पहिल्या बाकावर बसलेल्या मुलीला वाटलं, शिक्षिकेची आई किंवा नातेवाईक आली आहे. त्यांनी शिकवण्यात गुंग झालेल्या शिक्षिकेला तसं सांगितलंही. पण, आज्जीबाई उडालेली गंमत बघत शांतपणे त्या मुलीच्या शेजारी रिक्त असलेल्या बाकावर बसल्या. जमलेल्या 70-80 मुलांप्रमाणेच या आज्जीही ICWA या अवघड समजल्या जाणाऱ्या वाणिज्य अभ्यासक्रमाच्या पहिल्या कोर्सचा धडा गिरवणार होत्या.

आता 65 वर्षांच्या झालेल्या त्या आजी श्रीमती विनया नागराज यांनी काही तासांपूर्वीच मला तो सांगितला. विशेष म्हणजे या आजीनी गेल्याच आठवड्यात ICWAचा अभ्यासक्रम पहिल्या प्रयत्नात पूर्णही करून दाखवला आहे.

या अभ्यासक्रमाची यशस्वीतेची टक्केवारी 15 ते 20 इतकी असते. म्हणजे शंभरामध्ये फक्त 15 ते 20 मुलं परीक्षा पास होतात. सीएच्या खालोखाल कठीण अभ्यासक्रम तो मानला जातो. आणि त्यात विनया नागराज यांनी 59% गुण मिळवून बाजी मारली आहे.

‘मुलं चांगल्या ठिकाणी नोकरीला आहेत. नातू आता समजदार झाला आहे. मग अशावेळी फक्त टीव्ही बघत का वेळ घालवायचा. त्यापेक्षा कॉलेजनंतर जे करता आलं नाही ते स्वप्न का पूर्ण करू नये,’ असं म्हणत विनया यांनी आपला मागच्या दोन वर्षांचा काळ सत्कारणी लावला आहे.

‘मुलगी सीए असेल तर मुलगा मिळणार नाही’

विनया यांचं बालपण आधी कोल्हापूर आणि पुढे मुंबईत विले पार्ल्याला गेलं आहे. माध्यमिक शिक्षणक्रम म्हणजे तेव्हाची अकरावी त्यांनी उपजत हुशारीमुळे 14व्या वर्षीच पूर्ण केली. त्यानंतर बीकॉमही त्या मुंबईच्या डहाणूकर कॉलेजमधून 18 व्या वर्षी झाल्या.

— पण, ते वर्षं होतं 1974 मुंबई सारख्या ठिकाणीही मुली फारशा बाहेर दिसायच्या नाहीत. आणि कॉलेजमध्ये सुद्धा एखादी मुलींची रांग सोडली तर बाकी अख्खा वर्ग मुलांनीच भरलेला असायचा, असं विनया सांगतात. अशा परिस्थितीत मुलीला सीए व्हायचंय ही गोष्ट वडिलांना आणि घरी रुचणारी नव्हती. सीएच नाही तर मुलीने नोकरी करण्यालाही घरून विरोध होता. त्यामुळे विनया यांचं हे स्वप्न तेव्हा अपूर्णच राहिलं. पुढे काही कारणांनी एमकॉमची परीक्षाही त्यांना देता आली नाही.

तेवढ्यात लग्न झालं आणि दोन मुलांबरोबर प्रापंचिक जबाबदाऱ्याही वाढल्या. या धबडग्यात सीए व्हायचंय हे ही विनया विसरून गेल्या. त्यांची त्याबद्दल तक्रारही नव्हती. सासरच्या सहकार्याने त्यांनी बँक ऑफ बडोद्यात नोकरी मात्र मिळवली. आणि घर-संसार सांभाळत स्केल-टू ऑफिसर पर्यंत बढती मिळवली. अर्थात, या सगळ्यांत घरच्या ज्या जबाबदाऱ्या येत होत्या – घरची आजारपणं, कुणाचं दुखणं-खुपणं हीच त्यांच्यासाठी प्राधान्याची गोष्ट होती. अगदी घरातली गरज पाहून 2001 मध्ये त्यांनी या नोकरीतूनही स्वेच्छा निवृत्ती घेतली. बँकेत आणि घरातंही त्यांचं काम चोख होतं. करत असलेल्या कामात त्याही समाधानी होत्या.

पण, 2017 मध्ये त्यांचे पती वारले. दोन्ही मुलं सुमेध आणि सुकृत त्यांच्या त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी आणि संसारात रमली होती. नातू नऊ वर्षांचा म्हणजे जाणत्या वयाचा होता. अशा वेळी निवृत्त माणसाने काय करावं? — असा विचार जेव्हा विनया यांनी केला तेव्हा त्यांना आठवलं, त्यांचं एकेकाळचं स्वप्न सीए होण्याचं. त्यांनी चौकशी केली वयोमर्यादा आणि आणि आताच्या अभ्यासक्रमाची. मग कळलं इतक्या वर्षांनी आर्टिकलशिप शिवाय सीए शक्य होणार नाही. पण, आयसीडब्ल्यूए म्हणजे सीएमए शक्य होईल आणि ते झाल्यावर सीए साठीही अर्ज करता येईल.

…. झालं. 64 व्या वर्षी विनया नागराज यांचं ध्येय निश्चित झालं. सीएमए करायचं.

…. 65 व्या वर्षी अभ्यास आणि ऑनलाईन परीक्षा

अभ्यास आणि त्यासाठी लागणारं व्यवस्थापन हे विनया यांच्या अंगातच आहे. मानसिक तयारीही होती. पण, 1974 मध्ये सोडलेलं शिक्षण 2018मध्ये पुन्हा सुरू करायचं हे थोडीच सोपं होतं. काळ बदलला होता, अभ्यासक्रम बदलला होता, अभ्यासाची तंत्रं बदलली होती बरोबरचे विद्यार्थी बदललेले होते. सगळं नवंच होतं. पण, इच्छा असेल तर मार्ग सापडतो, ही काही फक्त म्हण नाही आहे. ती प्रत्यक्षातही उतरवता येते, असा विश्वास त्यांनी बाळगला.

नवीन अभ्यासक्रमात संगणकाविषयी ज्ञान अत्यावश्यक होतं. एक अख्खा पेपरच त्यावर होता. विनया यांनी बँकेच्या नोकरीतही कधी फारसा संगणक वापरला नव्हता. जो वापरला तो लॅन नेटवर्कवर… लेजर बुकशी त्यांची दोस्ती. म्हणजे आता संगणक शिकणं आलं. आणि मग त्या बरोबरी सगळेच नवीन असलेले विषय प्रत्येक कोर्सला चार याप्रमाणे..

नवीन जगात तरुण मुलं अभ्यासासाठी कुठली साधनं वापरतात, कोणती नवीन पुस्तकं उपलब्ध आहेत, क्लासेस नेमके कसे भरतात, यातल्या कशाचाही गंध नव्हता. पण, प्रयत्न सोडायचे नव्हते.

अभ्यास सुरू केला. आणि आयसीडब्ल्यूए संस्थेकडून पुस्तकंही आली, त्यांच्याकडूनही एक एक माहिती कळत गेली. संगणक कोर्सचं प्रशिक्षणही संस्थेकडूनच आयोजित केलं जातं हे कळलं. अभ्यासक्रमाचे क्लासेस भरतात ही माहिती मिळाली. त्याप्रमाणे संगणक आणि चॅप्टर क्लास दोन्हीची सुरुवात झाली.

सुरुवातीला सांगितलेला प्रसंग म्हणजे त्यांच्या या सीएमए चॅप्टर क्लासचा पहिला दिवस.

क्लासची चौकशी करण्यासाठी त्या आपल्या सात वर्षांच्या नातवाला घेऊन गेल्या होत्या.

कारण, आताही सीएमए करतोय म्हणजे घर चालवण्यापेक्षा वेगळं काहीतरी करतोय, अशा अभिनिवेश नव्हताच त्यांचा. घर सांभाळून अभ्यासाचं वेळापत्रक सांभाळणं जमेल एवढाच त्यांचा आत्मविश्वास होता.

बँकेच्या नोकरीत आणि एरवी चार-चौघात वावरतानाही फारशा न बोलणाऱ्या विनया आता मात्र क्लासमधल्या लहान मुलं आणि शिक्षकांमध्ये चांगल्या बोलू लागल्या होत्या. शंका विचारत होत्या आणि शिक्षकांच्या प्रश्नांना उत्तरंही देत होत्या. मुलं जी गणितं कुलकुलेटर करत तीच त्यांच्याही आधी या तोंडी सोडवत. अभ्यासातही क्लासमधील 20 वर्षांच्या मुलांपेक्षा त्या काकणभर सरसच आहेत ही गोष्ट हळुहळू इतरांच्या लक्षात आली. आणि क्लासमधली सगळी मुलं त्यांची मित्र झाली. संगणक शिकवायला या मुलांची आणि घरी सून दिशा यांची मदत झाली.

सुरुवातीला दर सहामाहीला एकच कोर्स घेणाऱ्या विनया यांनी जानेवारी 2021 मध्ये उर्वरित दोन्ही ग्रुपची परीक्षा एकत्रच दिली. कोव्हिडमुळे 2020 साली परीक्षाच होऊ शकली नव्हती. परीक्षा एकत्र देण्याचा विश्वास त्यांना त्यांचे पुणे चॅप्टर क्लासचे शिक्षक आणि बरोबरच्या विद्यार्थ्यांनी दिला. विशेष म्हणजे सुरुवातील संगणकावर बसायला घाबरणाऱ्या विनया यांनी शेवटची परीक्षा कोव्हिड मुळे ऑनलाईन म्हणजे पूर्णपणे संगणकावर दिली. आणि फायनलला त्यांना 59% गुण मिळाले.

आता त्यांनी सीए साठीही प्रवेश घेतला आहे.

‘अनंत अमुची ध्येयासक्ती’.. 

मानसोपचारतज्ज्ञ शैलेश उमाटे यांना विनया नागराज यांचं उदाहरण समाजात सकारात्मक उर्जा निर्माण करणारं वाटतं. “अनेकदा आयुष्याच्या पूर्वार्धात अपूर्ण राहिलेल्या इच्छांमुळे मनुष्य उत्तरार्धात आसवं तरी गाळतो. किंवा आपलं स्वप्न मुलं पूर्ण करतील असं म्हणत स्वप्न दुसऱ्यांवर लादतो. पण, विनया यांनी निवडलेला मार्ग आगळा वेगळा आहे,” शैलेश उमाटे यांनी सांगितलं.

त्यांनी निवडलेल्या स्वकर्तृत्वाच्या मार्गामुळे विनया यांचं जगणं मानसशास्त्रातल्या परिपूर्णता (MATURITY) किंवा ज्ञानदायी (WISDOM) अवस्थेकडे जातं. आणि या जगण्यातून त्यांना आणि कुटुंबीयांनाही समाधान मिळतं, असं वर्णन उमाटे यांनी केलं आहे.

शिवाय 65व्या वर्षी शिक्षण घेतल्यानंतर आपलं ज्ञान इतरांमध्ये वाटण्याची उर्मीही विनया यांच्याकडे आहे याविषयीही शैलेश उमाटे यांनी बोट दाखवलं आहे.

“स्वत:चं शिक्षण पूर्ण करण्याचं ध्येय त्यांनी बाळगलं. ते पूर्ण केलं. पण, त्याच बरोबरीने इतरांना शिकवण्याची तयारी दाखवून त्यांनी आपलं ध्येयही व्यापक केलं आहे. त्यामुळे त्यांना मिळणारी सकारात्मक उर्जा खूप वरची आहे,” असं उमाटे यांनी बोलून दाखवलं.

माहिती प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘वांग्याचं भरीत’… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘वांग्याचं भरीत‘… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

माझा स्वयंपाक चालू होता. इतक्यात लेक धावत आली, “आई, मधूमावशीचा फोन आलाय”.

मी कणीक मळत होते, लेकीला म्हणाले,” टाक स्पिकरवर.” कामाचं बोलून झाल्यावर गाडी आपोआप जिव्हाळ्याच्या विषयाकडे वळली. “आज स्वयंपाक काय केलास?”

मी म्हणाले, “भरीत.”

मैत्रीण म्हणाली, “मी पण आज भरीतच केलंय आणि श्रुतीकडेपण आज भरीत.”  यावर आम्ही दणदणीत हसलो.

इतका वेळ मुलगी माझा स्पिकरवर टाकलेला फोन हातात घेऊन उभी होती. ती, काय विचित्र बायका आहेत, कशावर पण हसतात, अशा अर्थी चेहरा करून बघत होती. “टाटा, बाय बाय, भेटू, चल ठेवते, चल ठेऊ आता,” असं साडेनऊ वेळा एकमेकींना म्हणून मग तिने फोन ठेवला.

फोन ठेवल्यावर मुलीने अपेक्षित असा चेहरा करून विचारलंच, “आई, तुम्ही कशावर पण हसता का ग? भरीत केलंय, यावर काय इतकं हसायचं?”

“आमचं सिक्रेट आहे ते…”

सिक्रेट म्हणाल्यावर मुलीचे कान  सशाइतके लांब झाले. “सांग, सांग” असा तिचा मंत्र दहा वेळा म्हणून झाल्यावर, “भांडी लाव. मग सांगते”, “जरा कोथिंबीर निवड. मग सांगते” असा तिचा जरा अंत पाहिला.

आता ती माझी मुलगी असली तरी तिच्यात सहन शक्ती कमीच. “नको मला ते सिक्रेट, उगाच सगळी काम करून घेत आहेस माझ्याकडून.” ती सटकून जायला लागली. म्हणून मी पण जरा सबुरीने घेतलं.

“ऐक  ग बायडे, माझी सासू म्हणजे तुझी आज्जी एकदम कमाल बाई. खूप शांत, समजूतदार आणि शांतपणे विचार करणं तर त्यांच्या कडून शिकावं . पण या गुणांच क्रेडिट त्या त्यांच्या सासरे बुवांना देत.

अनेक आघात आजीनी लहान वयात सोसले होते. आई खूप लहान वयात गेली. त्यामुळे मुळात त्या खूप हळव्या होत्या. मग एकत्र कुटुंबात लग्न झालं. घरात वयाने सगळ्यात लहान. त्यामुळे सतत सगळ्यांचे सल्ले ऐकावे लागायचे. घरात मोठ्या जावा, आत्तेसासूबाई, आजेसासूबाई काहीतरी चुका काढून कान उपटायला तयार असायच्या. या वयाने आणि मानाने लहान. त्यामुळे आजकाल तुम्ही मुलं जसं फटाफट बोलता तसं दुरुत्तर करायच्या नाहीत.

मग सगळी कामं झाली की त्या मागच्या अंगणात तुळशीपाशी रडत बसायच्या.

सासरेबुवांनी दोन तीन वेळा हे पाहिलं. एक दिवस त्यांना सासरेबुवांनी खोलीत बोलवून विचारलं, “काही होतंय का? तुम्ही का रडत असता. घरची आठवण येते का… कुणी काही बोलतं का… आमचे चिरंजीव त्रास देतात का?”

पण आज्जी मान खाली घालून उभ्या.सासरे बुवांनी वडिलांच्या मायेने डोक्यावरून हात फिरवला, तेव्हा आजींना एकदम रडू कोसळलं .

“मग आत्तेसासूबाई, मोठ्या जाऊबाई कशा ओरडतात! त्या पण कधी कधी चुका करतात, पण मलाच बोलतात.” हे बालसुलभ भावनेने सांगून टाकलं.

सासरेबुवा हसले आणि म्हणाले, “आज मी सांगतो ते मनापासून ऐका. जपा. खूण गाठ बांधून घ्या. आयुष्यात आनंदी रहाल.

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्याला सगळं कळतं, सगळ येतं, आपण शहाणे, बाकी सगळे पौडावरचे वेडे असाच समज असणारी अनेक माणसे असतात. बरं.ही माणसं वयाने मोठी असतात. जवळच्या नात्याची असतात.त्यामुळे काही बोलायची सोय नसते. कोणताच माणूस परिपूर्ण नसतो. पण अशा अतिशहाण्या लोकांना वाटतं, आपण म्हणजे सर्वगुणसंपन्नतेचा महामेरू आहोत. बरं. ही माणसं चुकली, तर यावर ते स्पष्टीकरण देऊन आपण कसे बरोबरच होतो, समोरचाच चुकला हे पटवून देतात. पण हे स्वारस्य वयाने लहान माणसाला नसते. पण यामुळे नात्यात ताण येतो, मोकळेपणा जाऊन, एक प्रकारे दबून जाऊन नात्यात, वागण्यात अलिप्तता येऊ लागते. ज्याला सतत सल्ले ही माणसं देत असतात, त्याचा आत्मविश्वास डळमळीत होतो. मन हळवं होऊन जातं. भीती वाटत राहते – आपण चुकलो तर? आपल्याला जमले नाही तर?

काय?असंच होतंय का ?” आजीला सासरे बुवांनी विचारलं.

सासूबाईंच्या अगदी मनातलं त्यांच्या सासरेबुवांनी ओळखलं होतं.

“पण मग वागायचं कसं अशावेळी?” तुझ्या आजींनी घाबरत विचारलं.

“हे बघा, खूप त्रास करून घ्यायचा नाही. त्या दिवशी जेवणात सरळ भरीत करायचं.”

आजीला काही उमगलं नाही.

“म्हणजे?… “

“कुणी तरी आपल्याला दुखावलं, आपल्याशी वाईट, चुकीचं वागलं की आपल्या मनाला त्रास होतो.. मनात विचारांचे द्वंद्व सुरू होतं… हे विचार कुणाशी बोलून मन शांत होणार असेल तर ठीक, पण काही वेळा या गोष्टी ऐकतील असे उत्तम कान आणि सुदृढ मन आपल्यापाशी नसतं. या अस्वस्थ विचारांचा निचरा तर व्हायला हवा. हो ना? नाहीतर त्याची मोठी जखम मन सांभाळून ठेवतं .”

आजीचं वय लहान. मग तिला समजेल, असं त्यांना समजवायचं होतं.

“ऐका सूनबाई, हे आपल्या दोघांचं गुपित असेल हा. कुणाला बोलायचं नाही.

एक मोठं वांगं घ्यायचं. ते वांगे म्हणजे असं समजायचं, ज्या माणसांनी तुम्हाला दुखावलं आहे, ती व्यक्ती.त्याला भाजायला ठेवण्याआधी हळुवार तेल लावायचं.हे हळुवार तेल लावणं म्हणजे तुम्ही त्यांची काढलेली समजूत किंवा तुम्ही तुमच्या वागण्याची दिलेली सफाई असं म्हणू.वांग्याचं चुलीवर भाजणं म्हणजे तुम्ही सफाई दिली म्हणून उठलेला फुगाटा (म्हणजे आलेला राग). आता हे भाजलेलं वांग घ्यायचं आणि त्याला सोलून चांगलं रगडून घ्यायचं. मनात आलेला सगळा राग ते वांगे रगडताना काढायचा. बघा. मन आपोआप शांत वाटेल. आणि मग, निर्मळ मनाने भरीत करायचं.कारण जेवणात आपल्या चांगल्या वाईट भावना उतरत असतात. त्यामुळे  भरीत करताना मन शांत, आनंदी ठेवूनच करायचं.”

आजींना ही कल्पना खूप आवडली होती.  पुढे हे सासरेबुवांचं गणित योग्य वेळी वापरलं. त्याचा अतिरेक होऊ दिला नाही.

जेवणात भरीत झालं की सासरेबुवा हळूच हसायचे आज्जी कडे बघून. दोघांचं सिक्रेट होतं ते.

 “एकदा माझ्या सगळ्या  मैत्रिणी आपल्या घरी आल्या होत्या, तेव्हा श्रुती मावशी तिच्या सासूबाईंच्या वागण्यामुळे दुखावली गेली होती. त्या सतत तिच्या चुका काढून तिला बोलायच्या… हे ती आम्हाला सांगताना तुझ्या आजींनी ऐकलं आणि आम्हाला ही भरीत कथा सांगितली.”

आजी लहान होत्या. त्यांचं मन दुखवायचं नव्हतं , घरातलं वातावरण बिघडवायचं नव्हतं आणि आजींच्या मनावर फुंकर पण घालायची होती. हे सगळं आजींच्या सासरेबुवांनी खूप छान समजावलं. त्याला रोजच्या व्यवहारातील गोष्टीची उपमा दिली.

आजींनी ही गोष्ट सांगितल्यावर आम्हीसुद्धा भरीत थेरपीचे फॉलोअर्स झालो.”

“Wow.. हे भारी आहे की”, लेक किंचाळली..

“आई, म्हणजे आत्ता गॅसवर जे वांगे भाजायला ठेवलं आहेस तो बाबांवरचा राग आहे वाटतं? त्याला आता रगडून बाहेर काढायचा आहे?”

“गप ग. पळ तू आता इथून.”

मी मस्त शांत मनाने भरीत केले.. जेवायला वाढले.. तेव्हा लेक आणि तिचा बाबा.. गालातल्या गालात हसत होते.

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ माझी मराठी… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

सौ.वनिता संभाजी जांगळे

🌸 विविधा 🌸

☆ माझी मराठी… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

मराठीचा उगम आणि इतिहास –

पुर्वीच्या काळी मानव जेव्हापासून समुह करून राहू लागला तेंव्हा आपले विचार ,भावना समोरच्या पर्यंत पोहचविण्याकरिता विशिष्ठ हावभाव , कृती, बोली यांचा वापर करू लागला. यातूनच पुढे भाषेचा उगम झाला. अशीच आर्य समाजाची भाषा म्हणजे आपली मुळ मराठी. संस्कृत भाषेच्या प्रभावातून निर्माण झालेल्या प्राकृत भाषेच्या महाराष्ट्र या बोलीभाषेतून मराठी भाषेचा उदय झाला. प्रदेशानुसार संस्कृत भाषेचा अपभ्रंश होऊन नविन भाषांनी जन्म घेतला त्यातील एक म्हणजे आपली मातृभाषा मराठी आहे. तसे पाहता मराठी भाषेचा इतिहास हजारों वर्षापूर्वीचा मानला जातो. संस्कृत भाषेला मराठी भाषेची जननी मानले जाते. मराठी भाषेतील पहिले वाक्य ‘श्रवणबळ येथील शिलालेखावर ‘ सापडले . तसेच ज्ञानेश्वरांना मराठीतील आद्यकवी मानले जातात. त्यांनी भगवदगीता सर्वसामान्य मराठी माणसाला कळावी यासाठी तिचे मराठीत रूपांतर केले. ती ज्ञानेश्वरी म्हणून हजारों लोक आजही वाचतात.

मराठीचा प्रवास –

आपल्या मराठी भाषेला सुसंस्कृत ,समृद्ध  ,आणि श्रीमंत मानले जाते. कितीतरी कोटी लोक आज मराठी भाषा बोलतात. मराठी ही महाराष्ट्रातील संस्कृतीचा जणू मुकूटच आहे.  देशाच्या उत्तरेकडील प्रदेशात अस्तित्वात आलेली ही बोली आज सातपुडा पर्वत ते कावेरी प्रांत आणि दक्षिणेकडील गोवा इथपर्यंत मराठी भाषा बोलली जाते. आणि तिचा विकास झाला आहे. मराठी भाषेत  कोकणी मराठी  ,ऐराणी मराठी ,घाटी मराठी,  पुणेरी मराठी,  विदर्भ- मराठवाड्यात बोलली जाणारी मराठी असे बरेच पोटप्रकार आहेत. म्हणतात ‘ मराठी ही अशी बोली आहे ती प्रत्येक दहा मैलावर बदलते.’ संत ज्ञानेश्वर यांना मराठीतील पहिले आद्यकवी मानले जाते. त्यानंतर चक्रधर स्वामींनी लिळाग्रंथ हा पहिला पद्य चरित्रग्रंथ लिहला. तेथून पुढे पद्य लिखाणास सुरुवात झाली. त्यानंतर संत एकनाथ, संत तुकाराम याच्यापासून ते आतापर्यंतच्या अनेक लेखक आणि कवींनी त्यांचे कितीतरी लिखाण मराठी साहित्याला बहाल केले आहे.संत ज्ञानदेव, संत तुकाराम ,संत एकनाथ त्यानंतर ग.दि.मा.,कुसुमाग्रज  ,पु.ल देशपांडे, प्र.के. अत्रे इत्यादि व आताचे सर्व जेष्ठ साहित्यीक यांनी मराठी भाषेलाअलंकारीक करून अधीक समृद्ध केली आहे. मराठी भाषेचा उत्कर्ष आणि विकास होण्यास या सर्वांचे मोलाचे योगदान आहे.  संतानी आपल्या माय मराठीचे बीज रूजविले . तिचा वटवृक्ष करण्याचे काम ग.दि.मा. ,कुसुमाग्रज ,पु.ल देशपांडे ,प्र. के. अत्रे

बालकवी,वि.स.खांडेकर इत्यादि नामांकित साहित्यीक व आताचे जेष्ठ आणि नवोदित साहित्यीक यांनी केले आहे. या सर्वांनी आपल्या साहित्याचा ठसा मराठी मनात रूजविला आहे. अनेक ग्रंथ  ,कथासंग्रह ,नाट्यसंग्रह ,काव्यसंग्रह यातून  ‘माय मराठीचे ‘बीज रूजविले आहे आणि आजही ते कार्य चालूच आहेत. विशेष म्हणजे अनेक लोकगीते,कोळी गीते ,लावण्या हे तर आपल्या मराठी संस्कृतीचे खास आकर्षण ठरले आहे. सर्वच साहित्यातून मराठी संस्कृतीचे दर्शन , जडण-घडण ,आणि वारसा अखंडितपणे पुढे चालत आहे. काळाप्रमाणे पाहिले तर मराठीचा उगम ते आतापर्यंतचा मराठीचा प्रवास खूपच चांगला चालला आहे. मराठी भाषा ही मराठी माणसाचा अभिमान  आणि ओळख आहे.

माय मराठीची सद्यस्थिती आणि भविष्य

अनेक साहित्यीकांच्या अमुल्य योगदानातून मराठी भाषेची मुळे खुपच खोलवर गेली आहेत. पण येणाऱ्या मराठी भाषिकांच्या आणि नवोदित साहित्यीकांच्या मराठी बद्दलची भावना व प्रेम यातूनच तिची खोलवर गेलेली मुळे तग धरून राहतील. तसे पाहिले तर आज नवोदितांचे लिखाण पण मोठ्या प्रमाणात समोर येत आहे. छोट्या-मोठ्या खेड्यातून सुध्दा  ‘ मराठी साहित्य संमेलन ‘आयोजित केली जात आहेत. मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा मानली जाते. आज सर्वच शाळांतून सुध्दा मराठी भाषा हा सक्तीचा विषय केला जात आहे आणि तो असावाच. त्यामुळे बालवयापासूनच मुलांच्या मनावर मराठी रूजत आहे . मराठी भाषेला अखंडित आणि माय मराठीची ज्योत सदैव तेवत ठेवण्याचे काम हे मराठी साहित्यिक आणि प्रत्येक मराठी माणसाचे आहे. आणि  ‘महाराष्ट्राला अखंडित ठेवण्याचे बळ हे माय मराठी बोलीतच आहे ‘  मराठी भाषा ही भारतात तिसर्‍या क्रमांकावर बोलली जाणारी भाषा आहे.  माय मराठी भाषा महान ,अधिक दर्जेदार व्हावी  हे प्रत्येक मराठी साहित्यीकाचे आद्यकर्तव्य आहे. मराठी वाचकांनी चांगला प्रतिसाद देऊन मराठी भाषा टिकवून ठेवणे ही काळाची गरज आहे. आपल्यानंतर येणाऱ्या प्रत्येक पिढीला मराठी भाषेचे ज्ञान अवगत असावे. आपल्या माय मराठीचा वारसा त्यांनी सहजतेने जपला जावा याकरिता आपण माय मराठीचा जागर सदैव चालू ठेवावा. मराठी भाषेचे मानाचे स्थान सुनिश्चित व चिरकाल टिकून रहावे याकरिता प्रत्येक मराठी माणसाने सदैव प्रयत्नशील रहावे.  ‘आपल्या मराठीच्या वटवृक्षावर बांडगुळ म्हणून वाढणाऱ्या परप्रांतीय भाषांना महत्त्व न देता , मी महाराष्ट्राचा आणि मराठी बोलीचा ‘हेच तत्व अंगीकारावे. आज महाराष्ट्रा बाहेर सुध्दा अनेक मराठी साहित्य संमेलन घडून येतात ही महाराष्ट्रासाठी गौरवास्पद गोष्ट आहे. महाराष्ट्राला अखंडित ठेवण्याकरिता चला मराठी बोलूया  ,चला मराठी गावूया  ,चला मराठी जगूया आणि चला मराठीला जगवूया.

“सह्याद्रीच्या रांगांमधून

नाद घुमावा मराठी बोलीचा

महाराष्ट्राच्या मनामनातून

शब्द रूजावा माय मराठीचा “

© सौ.वनिता संभाजी जांगळे

जांभुळवाडी-पेठ, ता. वाळवा, जि. सांगली, दुरभाष्य क्रमांक-९९२२७३०८१५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares