मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘समाजासाठी काहीतरी…’ ☆ सुश्री त्रिशला शहा ☆

सुश्री त्रिशला शहा

? मनमंजुषेतून ?

☆ ‘समाजासाठी काहीतरी…’ ☆ सुश्री त्रिशला शहा 

समाजात सध्या अतिशय चर्चेत असलेला विषय म्हणजे अयोध्यामधील राममुर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा.या सोहळ्यानिमित्त अनेक राजकीय लोकांनी आपापल्या भागात मंदिराची तात्पुरत्या स्वरुपाची प्रतिक्रुती बनवून कोट्यावधी रुपये खर्च केले.पण याचवेळी एका लहान गावात मुस्लिम समाजाच्या उर्दू शाळेसाठी स्वखर्चाने इमारत बांधून गावच्या सरपंचाने  हिंदू मुस्लिम ऐक्य साधून समाजापुढे आदर्श ठेवला.

ही घटना आहे,कर्नाटकातील जमखंडी तालुक्यातील गलगली या लहान गावातील.गलगली या गावी माझ्या बहिणीच्या मुलीचे,तनुजाचे सासर आहे.तनुजाचे पती श्री. राहुलकुमार गुजर म्हणजेच आमच्या घरचे जावयी.स्वतःची शेती,आँटोमोबाईलचे दुकान आणि गावचे सरपंचपद सांभाळून समाजासाठी सतत काहीतरी करत रहाण्याची त्यांची मनोवृत्ती.गावातील कौटुंबिक कलह मिटवणे, लग्न जमवणे,शिक्षणासाठी गरजू मुलांना मदत करणे,गावात काही सुधारणा करणे अशी कामे ते नेहमीच करत असतात.

कोरोना काळात 2020 मध्ये अचानक लाँकडाऊन झाले त्याआधी दोन दिवस काही घरगुती कामानिमित्त राहुल आपल्या आईसमवेत दौंड,जि. पुणे येथे आपल्या बहिणीकडे गेले होते,दोन दिवसांनी अचानक लाँकडाऊन चालू झाले आणि ते तिथेच अडकून राहिले.परतीचा मार्गच बंद झाला.त्यातून महाराष्ट्रातून कर्नाटक मध्ये जाण्यासाठी परवानगी मिळत नव्हती. एक महिन्याने बऱ्याच प्रयत्नातून गावी यायला परवानगी मिळाली पण गावात आल्यावर त्यांना सात दिवस क्वारंटाईन म्हणून गलगली येथील एका उर्दू शाळेत रहावे लागले.या सात दिवसाच्या वास्तव्यात शाळेची दुरावस्था राहुल यांच्या लक्षात आली.त्यातच याकाळात त्यांना मुस्लीम समाजाकडून अतिशय मोलाचे सहकार्य ही मिळाले.यातूनच या शाळेसाठी आपण काहीतरी केले पाहिजे असा विचार राहुल यांच्या मनी आला.पुढे कोरोना संपल्यानंतर या शाळेचे बांधकाम आपण स्वखर्चाने करण्याचे त्यांनी ठरविले.त्यासाठी शाळेतील शिक्षकांशी चर्चा करुन त्यांनी हा विषय मांडला आणि कामाला सुरवात करण्यास सांगितले. आर्थिक बाजू मी सांभाळेन असे आश्वासन ही दिले. त्याप्रमाणे या शाळेचे बांधकाम चालू झाले. काम अंतिम टप्प्यात आले असतानाच राहुलना अपघात होऊन तीन महिने सक्तीची विश्रांती घ्यायला लागली.त्यामुळे कामात थोडा खंड पडला. शारीरिक द्रुष्ट्या व्यवस्थित झाल्यावर काम परत जोमाने सुरु झाले आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात काम पुर्ण झाले. शाळेच्या या सुंदर वास्तुचा लोकार्पण सोहळा 26  जानेवारी 2024 रोजी उत्साहात साजरा केला गेला. गावातील सर्व मुस्लिम बांधवांनी अतिशय क्रुतज्ञतेने राहुलकुमार यांचा गौरव केलाच शिवाय त्यांच्या आईंचाही सन्मान त्यांच्या घरी जाऊन केला.

विशेष म्हणजे चांगले काम करीत असताना कुणीही मोडत घालू नये आणि ते व्यवस्थित पार पडावे म्हणूनच की काय या समाजोपयोगी कामाची वाच्यता काम पुर्ण होईपर्यंत राहुलकुमारनी कुठेही केली नाही,अगदी आपल्या आई व पत्नीलाही याबद्दल सांगितले नव्हते.10 वर्षांपूर्वी राहुल यांच्या पिताजींचे निधन झाले,त्यांची स्मृती म्हणून शिक्षकांनी त्यांचे नाव शाळेला दिले.कोरोना काळात हरवलेल्या माणुसकीचे दर्शन हिंदू- मुस्लिम एकतेतून घडले.

© सुश्री त्रिशला शहा

मिरज 

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हिरव्या हास्याचा कोलाज आणि गौतम राजर्षी – क्रमश – भाग १ ☆ सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ हिरव्या हास्याचा कोलाज आणि गौतम राजर्षी – क्रमश – भाग १ ☆ सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

अगदी अलीकडे एक अतिशय सुरेख असा हिन्दी कथासंग्रह वाचनात आला. पुस्तकाचं नाव ‘हरी मूस्कराहटों वाला कोलाज’ आणि त्याचे लेखक आहेत, गौतम राजऋषि. वेगळ्या वळणाचं पुस्तकाचं नाव वाचून आतील कथांविषयी कुतूहल निर्माण झालंच होतं. कथा वाचता वाचता जाणवलं, कथा सुरेख आहेत. मार्मिक आहेत पुस्तकाचं नाव सार्थ ठरवणार्‍या आहेत. पुस्तक वाचलं आणि मनात आलं, या पुस्तकाचा अनुवाद करायलाच हवा आणि ‘हिरव्या हास्याचा कोलाज या नावाने मी तो केलाही. 

कोलाज म्हणजे विविध रंगी-बेरंगी तुकड्यांची आकर्षक रचना करून निर्माण केलेली देखणी, मनोहर कलाकृती. मराठीत शीर्षकाचा अनुवाद करायचा झाला, तर ‘हिरव्या हास्याचा कोलाज’ म्हणता येईल. यातला हिरवा हा शब्द प्रतिकात्मक आहे. भारतीय सैनिकांची, फौजींची वर्दी म्हणजे गणवेश, हिरवा असतो.  या हिरवी वर्दी धारण करणार्‍या फौजींच्या जीवनावर आधारलेल्या या कथा आहेत. त्यांचे हर्ष-विषाद, विचार-भावना, त्यांच्या एकूण जगण्याचेच काही तुकडे मांडणार्‍या या कथा.  

या  कथांचे लेखक गौतम राजऋषि, भारतीय सेनेत कर्नल आहेत. त्यांचं पोस्टिंग बर्‍याच वेळा काश्मीरच्या आतंकग्रस्त इलाख्यात आणि बर्फाळ अशा उंच पहाडी भागात ‘लाईन ऑफ कंट्रोल’वर झाले आहे. शत्रूबरोबर झालेल्या अनेक चकमकींचा त्यांनी दृढपणे सामना केला आहे. एकदा तर ते गंभीरपणे जखमी झाले होते. कर्नल गौतम राजऋषि हे ‘शौर्य पदक’ आणि ‘सेना मेडल’चे मानकरी आहेत.

त्यांच्या हातातील रायफलीइतकीच त्यांच्या हातातील लेखणीही प्रभावी आहे. जेव्हा ते आपल्या ड्यूटीवर तैनात असतात, तेव्हा तिथे, जेव्हा जेव्हा वेळ होईल, तेव्हा तेव्हा ते लेखणी हाती घेतात. सैनिकी जीवनातील आव्हाने त्यांनी जवळून बघितली आहेत आणि समर्थपणे पेलली आहेत. या दरम्यान घडलेल्या अशा काही घटना आणि व्यक्ती त्यांना भेटल्या नि त्या त्यांच्या कायम स्मरणात राहिल्या. ते अनुभव आणि त्या स्मृतींच्या मग कथा झाल्या. या कथांमधून फौजी जीवनाचे जे दर्शन घडते, ते सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनापेक्षा खूप वेगळे आहे.

त्यांच्या शब्दांचे बोट धरून आपण पोचतो, सुंदर, मनोहर काश्मीर घाटीमध्ये.  भारतातील नंदनवन. काश्मीर. या सुंदर प्रदेशावर सध्या पसरून राहिलेलं आहे दहशतवादाचं अशुभ सावट …. या प्रदेशाचं आणि आपल्या सीमेचं रक्षण करण्यासाठी, इथल्याच बर्फाळ पहाडांवर उभारलेली सैन्याची ठाणी…चौक्या…गस्त घालण्यासाठी नेमलेल्या सैन्याच्या तुकड्या, हिरव्या वर्दीतील सौनिकांचं कष्टमय जीवन, त्यांची सुख-दु:खे, चिंता-काळज्या, विरंगुळ्याचे, हास्या-विनोदाचे दुर्मिळ क्षण, या सार्‍यांचा सुरेख कोलाज म्हणजे ‘हरी मूस्कराहटों वाला कोलाज’.  सैनिकांचा, अधिकार्‍यांचा स्थानिक लोकांशी येणारा संबंध, त्यातून त्यांना जाणवलेले त्यांचे प्रश्न, त्यांची मानसिकता याचे चित्रमय दर्शन, म्हणजे ‘हरी मूस्कराहटों वाला कोलाज.’ हे दर्शन कधी थेट कथेतून घडते, तर कधी कथेचा बाज घेऊन आलेल्या आठवणी, प्रसंग वर्णन, वार्तांकन या स्वरुयात आपल्यापुढे येते आणि शब्दांचं बोट धरून आपण प्रत्यक्षच पाहू लागतो… ‘हरी मूस्कराहटों वाला कोलाज’

‘हरी मुस्कुराहटों वाला कोलाज’ ही यातली शीर्षक कथा. कथेचा सारांश असा- पीर-पंजालची बर्फाळ शिखरं पार करत सैनिकांना घेऊन चाललेलं विमान एका  दाट हवेच्या पोकळीत सापडून लडखडतं. मृत्यूचा त्या क्षणिक जाणीवेने सगळ्याच्या सगळ्या सैनिकांच्या तोंडून बाहेर पडणारी किंकाळी, बाहेर पडता पडता थांबते. त्या क्षणीही आपल्या वर्दीच्या प्रतिष्ठेची, गौरवाची जाणीव त्यांना होते.

  विमान श्रीनगर हवाई अड्ड्यावर सुखरूप उतरतं. यावेळी सगळ्या सैनिकांचे डोळे आपल्या घरी सोडून आलेल्या प्रियजनांच्या आठवणींचा एक मिळता जुळता कोलाज बनवत आहेत. मेजर मोहित सक्सेनाही आपल्या सव्वा वर्षाच्या मुलीच्या, खुशीच्या आठवणींचा कोलाज त्याला चिकटवू बघतो. तो यंदा दुसर्‍यांदा काश्मीर घाटीत येत आहे.

एअर पोर्टच्या मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर पडताना, समोर शहीद सोमनाथ शर्माचा भव्य पुतळा आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर पाकिस्तानकडून येणार्‍या घूसखोरांच्या टोळ्यांनी केलेल्या गोळीबाराचा वर्षाव त्याने एकट्याने आपल्या छातीवर झेलला होता आणि एअर पोर्टचं रक्षण केलं होतं. स्वतंत्र भारताच्या परमवीर चक्राचा तो पहिला मानकरी. सगळे सैनिक त्या पुतळ्याला सॅल्यूट करून पुढे जातात.

पुढे फौजींची निवासाची सोय असलेल्या कॅंपचं वर्णन येतं. हे वर्णन इतकं प्रत्ययकारी आहे की शब्दांवरून डोळे फिरताना आपण त्या कॅंपच्या परिसरात फिरतो आहोत, असं वाटतं.

मोहितला इथे, बर्फाळ पहाडावर वसलेल्या एका छोट्या पण अतिशय महत्वाच्या पोस्टची जबाबदारी सांभाळायची आहे. एकांडी चौकी. सरहद्द पार करून येणार्‍या घुसखोरांवर नजर ठेवणे आणि पोस्टखालून जाणार्‍या महत्वाच्या रस्त्याची सुरक्षा, ही त्याची जबाबदारी.

कर्तव्यदक्ष, ड्यूटीवर जराही ढिलाई खपवून न घेणारा, कठोर मोहित इथे ‘कसाई  मोहित’ म्हणून प्रसिद्ध(?) आहे. मेजर आशीषशी बोलताना त्या मागचं कारणही उलगडतं. मोहित म्हणतो, ‘तीन वर्षापूर्वी मी जेव्हा काश्मीर घाटीत होतो, तेव्हा एकदा आत्मघाती आतंकवाद्यांनी हल्ला केला होता. त्यात आपले दोन जवान शहीद झाले होते. मागून कळलं की ड्यूटीच्या वेळी एक जवान झोपला होता. त्याचा फायदा घेऊन हल्ला झाला होता. त्यानंतर माझा मी राहिलो नाही. ड्यूटीवर जराही ढिलाई दिसली, तरी माझ्यातला ज्वालामुखी उसळतो.’

ड्यूटीचा पहिला दिवस. प्रचंड थंडी. डोळ्यापुढे जर्मन मेड शक्तीशाली दुर्बीण घेऊन तो खालच्या रस्त्याच्या सुरक्षेसाठी उभ्या असलेल्या जवानांचं निरीक्षण करतोय. सगळे अगदी योग्य पद्धतीने उभे आहेत. रायफलवर मजबूत पकड आहे. पण एका ठिकाणी दुर्बीण थबकते. लांस नायक पूरण चंद शिथील दिसतोय. झाडाला टेकलेला. रायफलचा पट्टा ओघळलेला. त्याच्या चेहर्‍यावर एक मधुर हसू आहे. मोहित संतापतो. ड्रायव्हरला जीप काढायला सांगतो. वाटेत त्याला काळतं, तो लग्नं करून नुकताच ड्यूटीवर परत आलाय.

जीप पूरणजवळ थांबते. मोहितला वाटतं, पूरणला त्याच्या नव्या-नवेल्या बायकोच्या स्वप्नातून जागं करणं क्रूरपणाचं होईल, पण ते आवश्यकच आहे. केवळ कर्तव्यपरायणतेच्याच दृष्टीने नव्हे, तर त्याच्या बायकोच्या भविष्याच्या दृष्टीनेसुद्धा. तिचा भांग कायम भरलेला राहायला हवा. त्यासाठी पूरणला स्वप्नातून जागं करायलाच हवं. मेजरला पाहून पूरण कडक सॅल्यूट ठोकत, योग्य पोझिशनमध्ये येतो. चोरी पकडली गेल्याचे चेहर्‍यावर भाव. मोहित त्याच्या ख्याली-खुशालीची चौकशी करतो. लग्नाची मिठाई मागतो. ’ड्यूटीवर ढिलाई नको’, अशी सूचना देत मोहित निघतो. मेजर साहेबांचा हा बदलेला अवतार बघून, पूरण चकित. एक स्मितहास्य त्याच्या ओठांवर तरळतं. ड्यूटीचा आणखी एक दिवस सुरक्षित पार पडतो आणि मेजर मोहित सक्सेनाच्या कोलाजमध्ये पूरणचं हिरवं हास्य जोडलं जातं. चौकीकडे परतताना तो गुणगुणू लागतो,

हरी है ये जमीं कि हम तो इश्क बोते है

हमीं से हँसी सारी, हमीं पलके भिगोते है

धरा सजती मुहब्बत से, गगन सजता मुहब्बत से

मुहब्बत से ही , खुशबू, फूल, सूरज, चाँद होते है     

– क्रमश: भाग १

© सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “अकेला हूॅं मैं…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

“अकेला हूॅं मैं…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

होय मी तुला या किनाऱ्यावर आणून सोडलंय!… आता येथून पुढे तुझा तुला एकट्यानेच प्रवास करायचा बरं!… काही साधनं , सोबती मिळतीलही जर तुझ्या भाग्यात तसा योगायोग असेल तर.. नाही तर कुणाचीच वाट न पाहता, कुणी येईल याच्या भ्रामक अपेक्षेत न राहता पुढे पुढे चालत राहणे हेच तुला श्रेयस्कर ठरणार आहे… जसा मी बघ ना जोवर तू सागराच्या जलातून ऐलतीरावरून पैलतीरी जाण्यासाठी  आलो तुझ्या सोबतीला मदतीला… आणि या किनाऱ्यावर तुला उतरवून दिले… मलाही मर्यादा असतात त्याच्या पलीकडे मला जाता यायचं नाही.. जाता यायचं नाही म्हणण्यापेक्षा जमिनीवर माझा काहीच उपयोग नसतो… हतबल असतो..मनात असलं अगदी शेवटपर्यंत साथ द्यावी पण पण तसं तर कधीच घडणार नसतं मुळी… आता आपल्या त्या प्रवासात किती प्रचंड वादळं येऊन गेलेली आपण पाहिली की.. खवळलेला समुद्र, त्याच्या महाप्रचंड काळ धावून आल्यासारख्या प्रलयंकारी अजस्त्र लाटांचे मृत्यूतांडवाशी केलेला संघर्ष…तो माझ्या तशाच तुझ्याही जिवनाचा अटळ भाग होता… आणि तसं म्हणशील तर जीवन म्हणजे तरी काय संघर्ष असतो कधी आपला आपल्याशी नाही तर दुसऱ्याशी केलेला… साध्य, यश तेव्हाच मिळते.. विना संघर्ष काही मिळत नसते… मग सोबतीला कुणी असतात तर कुणी नसतातही… एकट्याने लढावा लागतो हा अटळ संघर्ष…अंतिम क्षणापर्यंत… आभाळाएव्हढी स्वप्नं दिसतील तुला या तुझ्या जीवन प्रवासात… जी हाती पूर्ण आली तेव्हा म्हणशील याच साठी केला होता हा अट्टाहास..तेव्हा आपसूकच ओठांवर हास्य येते आपल्या… आणि आणि दूर कुठेतरी संगीताची धुन वाजत असलेली कानी पडते… अकेला हूॅं मैं. इस दुनिया में… कोई साथी है तो…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ व्हाट्सअप… वरदान की शाप ☆ -सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ. शशी नाडकर्णी-नाईक

? मनमंजुषेतून ?

व्हाट्सअप… वरदान की शाप ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

व्हाट्सअँप हा प्रकार जितका उपयुक्त आहे तितकाच कंटाळवाणा सुद्धा आहे.

व्हाट्सअँपमुळे आपल्याला बऱ्याच गोष्टी कळतात.पण तितकच काही चुकीचे ज्ञान पण खात्रीपूर्वक खरे असल्यासारखे

बोकाळते, पसरते.लोक शहानिशा केल्याशिवाय फॉरवर्ड करतात.आणि करणारी लोक आपल्या  विश्वासाची असल्यामुळे त्या गोष्टींवर  विश्वास ठेवायचा की नाही ह्याबद्दल मन सांशक होते.

ग्रुपवर एखाद्याचा वाढदिवस असला की पूर्ण दिवस सदिच्छांचा भडीमार,केक्स फुलांचे गुच्छ वगैरे चे फोटो अगदी रात्री १२ वाजल्यापासून पाठवायची चढाओढ.सगळ्यांनी पाठवले आणि आपले पाठवायचे राहून गेले तर!

बरं वाढदिवसाचे एकवेळ ठीक त्या व्यक्ती पर्यंत पोहोचून तिला त्यामुळे आनंद मिळेल पण कोणाचे निधन झाले की श्रद्धांजली,rip ची लाईनच लागते.आता सांगा श्रद्धांजली त्या व्यक्तीला समजणार का?आपले समाधान.एरवी ती व्यक्ती जिवंत असताना तिला भेटले असते तर  तिच्या बरोबर दोन घटका वेळ घालवला  असता तर तिला किती समाधान मिळाले असते?जर ती व्यक्ती आजारी असताना तिची विचारपूस केली असती शक्य झाल्यास सेवा केली असती तर खरं.गेल्यावर श्रद्धांजलीचा देखावा कशाला आणि कोणासाठी?

तसेच सकाळी उठल्यावर गुड मॉर्निंग,रात्री गुड नाईट ती फुले,निसर्ग त्यांचे फोटो कशाला ?जसं काही गुड मॉर्निंग गुड नाईट विश नाही केले तर त्याची सकाळ, रात्र चांगली जाणार नाही.पण ह्या सदिच्छामुळे मोबाईल जाम होतो.पुढील जरुरीचे मेसेज,फोटो यायला रोड जाम होतो.मग सगळे डिलिट करा.

देवाधिकांचे फोटो,त्याचा तर भडीमार.परत डिलिट करायला जिवावर येत.पण नाईलाज 

काही लोकं ह्या जपाची साखळी करा.१०लोकांना पाठवा वगैरे पाठवतात  त्याच्यात पण काही अर्थ नसतो.पण समोरच्याला धर्मसंकट.पुढे साखळी चालू नाही ठेवली तरी पंचाईत पाठवयाचे तर मनाला पटत नाही.

गुड मॉर्निंग,गुड नाईट ह्या मेसेजचा उपयोग एकटी व्यक्ती राहात असेल तर तिची खुशाली रोजच्यारोज इतर नातेवाईकांना समजायला उपयोग होतो.ज्या दिवशी गुड मॉर्निंग मेसेज आला नाही म्हणजे त्या व्यक्तीला काही प्रॉब्लेम आहे हे समजून त्याच्या मदतीला जाऊ शकतो.हा व्हाट्सअँपचा मोठा उपयोग आहे.

एखाद्या ठिकाणी लग्न ,मुंजी सारखा प्रसंग आहे एखादी व्यक्ती हजर राहू शकत नाही तर जगभरातून विडिओ कॉल करुन पाहू शकते .जणू काही ती व्यक्ती तिकडे हजर आहे आणि कार्याचा लाभ घेऊ शकते.मुलगा मुलगी जगभर कुठेही असली तरी आई वडिलांना विडिओ कॉल करुन भेटू शकतात.

वर्क फ्रॉम होम करुन करोनाच्या काळात,भरपूर पाऊस असताना घरबसल्या माणसे कामे करू शकली.मुले शाळेत न जाता घरच्या अभ्यास करू शकली.

व्हाट्सअँपचा एक मोठा फायदा ज्या व्यक्तीला ऐकू कमी येते कानाचा प्रॉब्लेम असतो ती व्यक्ती

व्हाट्सअँप वर वाचून,लिहून आपला वेळ आनंदात घालवू शकते बाहेरच्या नातेवाईकांशी मनमोकळे पणांनी टाईप करुन.संपर्कात राहू शकते.

एखाद्या फक्शनचे आमंत्रण एकाच वेळी सगळ्यांना देऊ शकतो.कार्ड काढा त्यावर पत्ते लिहा कॉरिअरने पाठवा तो खर्च,वेळ वाचतो.अपव्यय होत नाही.

शेवटी काय प्रत्येक नाण्याला दोन बाजू  फायदा,त्याच्या बरोबर तोटा हा असणारच.कसा आणि किती त्या व्हाट्सअपचा उपयोग करुन घ्यायचा हे ज्याचं त्यांनी ठरवायचं.

© सौ. शशी नाडकर्णी-नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “रोझ डे…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “रोझ डे…🌹” ☆ सौ कल्याणी केळकर बापट

कोणत्याही दोन पिढ्यांमध्ये उत्सव साजरा करण्याच्या पद्धतीत फरक हा आपोआपच पडत जातो. त्यालाच आपण “जनरेशन गँप”असं म्हणतो. प्रत्येक पिढीतील लोकांना आपल्या पुढील पिढी जास्त सुखी, स्वतंत्र आहे असं वाटतं असतं.प्रत्येक व्यक्तीचे आपल्या स्वतःच्या पिढीला खूप सोसावं लागलं हे ठाम मतं असतं.आपल्याला पुढील पिढीपेक्षा खूप जास्त तडजोडी कराव्या लागतात असं प्रत्येकालाच वाटतं असतं हे विशेष.

फेब्रुवारी महिन्याची सुरवातच मुळी कडाक्याची थंडी संपलेली असते आणि उन्हाळ्याची काहीली अद्याप सुरवात झालेली नसते ,असा तो हा हवाहवासा, गुलाबी, प्लिझंट वाटणारा काळ.त्यातच फेब्रुवारी सात पासून ते चौदा फेब्रुवारी पर्यंत व्हँलेंटाईन वीक,प्रेमाचा साक्षात्कारी सप्ताह, व्हँलेंटाईन बाबाचा उत्सवच जणू.त्यामुळे हा आठवडा नव्या तरुणाई साठी वा कायम मनाने तरुणाई जपून असणाऱ्या व्यक्तींसाठी पर्वणीच.

ह्या आठवड्यातील पहिला दिवस म्हणजे “रोझ डे”. पिढीपिढीत खूप झपाट्याने फरक पडत चाललाय.आमच्या पिढीपर्यंत तरी काँलेजमधे वा तरुणपणात मुलंमुली एकमेकांशी बोलले तर नक्कीच काहीतरी शिजतयं हे समजण्याचा काळ.त्यामुळे हे व्हँलेंटाईन वगैरे तर आमच्या कल्पनेच्या पार पलीकडले.त्यामुळे ह्या रोझ डे ची संकल्पनाच मुळी प्रत्येक पिढीत वेगळी. देवपूजेसाठी का होईना पण आजोबा परडी भरून गुलाबाची फुलं तोडून आणतं हाच आजीचा रोझ डे. एखादं झाडावरचं फूल हळूच बाबा फ्लावरपाँटमध्ये वा टेबलवर ठेवायचे,अर्थातच बाकी कुणाला नाही कळले तरी आईला फक्त कळायचे किंवा गुलकंदासाठी आणलीयं फुलं असं दाखवायचे तोच आईचा रोझ डे. पुढे खूपच हिम्मत असली तरी काँलेजमध्ये ती यायच्या आत तिच्या बेंचवर गुलाबाचे फूल वा फुलाचे ग्रिटींग कार्ड लपून ठेवून जायचे हा आमच्या पिढीचा रोझ डे किंवा जास्तीत जास्त एखादा गुलाब हस्तेपरहस्ते तिच्यापर्यंत पोहोचविणारा आमच्या पिढीचा रोझ डे.आणि गुलाबाचा वापर केवळ बुके आणि रोझ डे साठीच हा विचार मानणारी हल्लीची पिढी.

ह्या आठवड्यातील सात फेब्रुवारी हा पहिला दिवस,” रोझ डे “.हा दिवस ह्या पिढीतील तरुणाईच्या जगतातील महत्त्वाचा दिवस तर आधीच्या पिढीच्या मते दिखाऊ प्रेम दर्शविणारी नसती थेऱ असल्याचा दिवस.

जर रोझ डे साजरा करण्याची संकल्पना सरसकट आपल्यात असती तर वेगवेगळ्या वयोगटातील, पिढीतील लोकांच्या मनात रोझ डे बद्दलचे निरनिराळे विचार काय असते वा आजच्या भाषेत हा “इव्हेंट”आपण कसा साजरा केला असता ह्या कल्पनाविलासाची एक झलक पुढीलप्रमाणे.

1…..शाळकरी रोझ डे

गुलाब दिला किंवा मिळाला तरच खूप प्रेम असतं हे मानण्याचं हे अल्लड वयं.

2…..महाविद्यालयीन रोझ डे

जगातील सगळ्यात चांगले आणि खरे प्रेम आपल्याच वाट्याला आले, त्याच्याकडूनच गुलाब मिळाला वा त्यालाच गुलाब दिला असं मानणारं हे वयं आणि प्रेम.

3…..नवविवाहितांचा रोझ डे

गुलाब आणला नाही तर फुरगटून बसायचे आणि आणला तर ह्याची चांगली प्रँक्टीस आहे वाटतं ,हे ओळखणारं प्रेम.

4…..चाळीशीतील रोझ डे

गुलाब आणल्यानंतर वरवर हे आपलं वय राहिलं का असे म्हणणारे पण मनातून,आतून मात्र खूप सुखावणारे प्रेम.

5…..पन्नाशीतील रोझ डे

आणलेला गुलाब बघून ,बरं झालं देवाला वहायला फूल झालं हे मानणारं वयं वा प्रेमं.

6…..साठीतील रोझ डे

त्या गुलाबाच्या थेरापेक्षा जर्रा बर वागायला लागा,मग रोझ डे पावेल हे मानणारं वयं वा प्रेम.

7…..सत्तरीतील रोझ डे

नुसत्या नजरेतूनच गुलाबजल छिडकून ख-या गुलाबाची गरजही न भासणारं हे वयं किंवा प्रेम.

8…..नंतरचा शेवटपर्यंतचा रोझ डे

आता च्यवनप्राश आणि त्याबरोबर ह्या गुलाबाचा गुलकंद करुन खायला घातला पाहिजे, जरातरी डोकं थंड राहायला मदतच होईल हे मानणारं वयं आणि प्रेम.

तर अशा ह्या व्हँलेंटाईन वीकमधील पहिल्या दिवसाच्या रोझ डे ला भरभरून शुभेच्छा.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ संघर्षातून यशाकडे… ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

? मनमंजुषेतून ?

☆ संघर्षातून यशाकडे… ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆ 

मोबाईल शाप की वरदान हा ऐरणीवरचा प्रश्न आहे. अतिरेक झाला तर तो शाप ठरतो .पण सदूपयोग केला तर ते वरदानच असतं. नाशिकचे माजी सैनिक श्री. मेघश्याम सोनवणे सर, ह्यांच्या उत्तम उपक्रमाच्या कथा -विश्वात माझं पाऊल पडलं आणि व्हाट्सअपतर्फे अनेक हितचिंतकांच्या  ओळखी झाल्या. माणसे जोडण्याच्या छंदाला बळकटी आली. आणि माझ्यासाठी मोबाईल वरदानच ठरलं. माझ्या धाकट्या मुलानी  चि.प्रसादनी   मला  वाढदिवसाचा मोबाईल भेट दिला आणि माझ्यापुढे एक नवीन विश्व उभ केलं. ह्या विश्वात खूप चांगली माणसं मला भेटली.आणि मैत्रीचं नातं घट्ट झालं .

त्यातूनच भेट झाली रमेश साळुंखेची. माझ्या कथांवर त्याचं अभिप्रायाचं,प्रतिक्रियांचं आदान-प्रदान झालं. आणि एक दिवस त्याचा फोन आला ” ताई मला तुमच्याशी मोकळेपणी बोलावसं वाटतंय .तुम्ही बोलाल का माझ्याशी?” शब्दातला प्रामाणिकपणा, वाक्यातलं   आर्जव  आणि आवाजातलं मार्दव मनाला भिडल.कां कोण जाणे मनांत आलं काहीतरी संघर्षमय आहे, ह्या वयानी लहान असलेल्या  मुलांत . अशा ह्या आशावादी विचारांनी सम्राट असलेल्या तरुणाची आत्मकथा नक्कीच आदर्शवादी असेल असं मला वाटलं मी म्हणाले “रमेश अगदी खुल्या दिल्याने बोल.काही प्रॉब्लेम आहे का तुला?त्या स्वाभिमानी तरुणाचं रमेशचं  लगेच उत्तर आलं, ” नाही ताई प्रॉब्लेम होता. पण परमेश्वर, माझी आई सुभद्राई, माझे बाबा शिवाजीराव, माझे बंधू विक्रम आणि हितचिंतक यांच्यामुळे मी संघर्षाच्या परीक्षेत पास झालो.”  

त्याच्या बोलण्याने माझी उत्कंठा  शिगेला पोहोचली. आणि मी विचारलं, “आयुष्याच्या कुठल्या परीक्षेत  तु पास झालास? सविस्तर आणि खुल्या दिल्याने सांगशील का मला तु तुझी कहाणी ?   तुझा आदर्श मी नक्कीच जगापुढे मांडीन. मग निराश  तरुणांनाही  आशेचा किरण सापडेल. आणि तुझ्यामुळे त्यांना स्फूर्ती  मिळेल “…..  रमेशच्या आवाजात मोकळेपणा आला. त्याची कहाणी ऐकून मी  स्तंभित  झाले. परिस्थितीशी लढण्याचे सामर्थ्य ह्या इतक्या लहान वयातल्या मुलामध्ये आलं कुठून ? त्यानीच सांगितलेली त्याची ही कहाणी काळजाला हात घालणारी आहे.

ता. खटाव जि.सातारा गिरीजाशंकरवाडी येथे रमेशचं बालपण गेलं. बालपण कसलं !  हसा खेळायच्या दिवसातच त्याला लढाई द्यावी लागली . कारण तो म्हणाला,” मी अपंग आहे “ 

खटाव तालुक्यातील पश्चिमेकडच शेवटच्या डोंगर माथ्यावर वसलेलं गांव म्हणजे रमेशचं जन्मगांव. चौथीपर्यंतचं शिक्षण गावातच झालं.  वडील शिवाजीराव त्याचे  सारथी झाले. दैवाला दोष न देता रमेशच्या आई-वडिलांनी हे अवघड शिवधनुष्य पेललं.   शिवाजीरावांनी आणि त्या माऊलीने परिस्थितीवर मात करून आपल्या बाळाला वाढवलं. वडील रोज खांद्यावर बसवून आपल्या लेकराला शाळेत पोहोचवायचे. परिस्थितीशी सामना करण्याचं आयुष्याच्या शाळेतलं असे हे प्राथमिक शिक्षण घरातूनच रमेशला मिळालं होत. त्याच्या ह्या घरच्या  गुरूंना सादर प्रणाम.

रमेश पुढे म्हणाला,” मी चौथी पास झालो  खरा.,पण आता पुढे काय? पुढचं शिक्षण कसं घ्यायचं? हायस्कूल सहा कि. मी. लांब. रोज डोंगरावरून उतरून खाली  यायचं. पुन्हा डोंगर चढून घरचा परतीच्या प्रवास . पण तो करणार कसा? अक्राळ विक्राळ प्रश्नचिन्ह आ वासून समोर उभं होतं. शिक्षणाला पूर्णविराम द्यायची वेळ आली .. “ पण हा वाघाचा बच्चा लहान असूनही डगमगला नाही. मनात एकच विचार  शिक्षणाशिवाय आपल्याला गती नाही. आता थांबणे नाही. रमेशला त्रास होऊ नये म्हणून घरचे  कासाविस होऊन  त्याला विरोध करीत होते. पण म्हणतात ना, ‘आंधळ्याच्या गाई देव राखतो ‘ अगदी खरं आहे हे. कारण गावात सकाळी सातला दुधाची गाडी यायची . गाडीतली माणसं देवासारखी  मदतीला धावली. आणि त्यांच्या मदतीने रमेशचा हायस्कूल  प्रवास सुरू झाला.  रमेशच्या विस्तृत विचारांची कक्षा पाहून मी डोळे  विस्फारले.   

तो म्हणाला ” मला अपंगावर  मात करून पुढे जायचं होतं. त्यासाठी मनातल्या आशेची पावलं पुढे आणि पुढेच पडत होती. आई-वडिलांनी व इतरांनी पण खूप केलं माझ्यासाठी.  त्यांना त्रास न देता मला स्वावलंबनाचा मार्ग शोधायचा होता.  प्रयत्नांच्या अंतापर्यंतचा  आणि मनाच्या गाभाऱ्यात वसलेला परमेश्वर,मला प्रेरणा देत होता. आणि म्हणत होता ‘मी आहे  ना तुझ्या पाठीशी ! मी चालवीन तुला, आणि तुझ्या जिद्दीला, पुढे अन पुढे जाण्यासाठी.” आणि ह्या जिद्दीने दहावी ते  B. A. मुक्तविद्यापीठातून रमेश पास झाला. आणि मग  काय त्याच्या आशेला धुमारेच फुटले की हो !

भूतकाळात  डोकावतांना रमेश सांगू लागला, ” हायस्कूलच्या गावी जाताना दूध गाडीच्या लोकांचे माझ्यावर खूप खूप उपकार झाले आहेत. सकाळी सात वाजता दूध गाडी यायची. ते लोक मला गाडीत बसवायचे.  हायस्कूलची वेळ तर ११ ते ५:३० होती. पण  बरं का,राधिका ताई   माझी शाळा  मात्र सकाळी सात ते रात्री साडेनऊ पर्यंत असायची. कारण सकाळी माझ्या गावाकडून मला आणणारी गाडी सातला सुटायची .आणि रात्री साडेनऊला परतायची. शाळा सुटल्यावर संध्याकाळी साडेपाच ते साडेनऊ पर्यंत मी गाडीची प्रतीक्षा कऱीत बसून राहायचो. वाचन, होमवर्क, नोट्स काढणे यात वेळ  काढायचो. बसचा आवाज आला रे आला की आवराआवरीची धांदल उडायची माझी.” रमेश ची मिस्कील वृत्ती मला आवडली.

सत्कर्म करणाऱ्याला सत्पुरुष भेटतातच. माणसं मदतीला धावायची आणि बसमध्ये बसवायची. फार मोठ्ठ शिवधनुष्य पेललंय त्यानी. आणि तो दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाला. पुढील शिक्षणाची मशाल त्याच्या मनात धगधगत होतीच. पण आता तर पुढे आणखी खरी सत्वपरीक्षा होती. पुढची पायरी गाठण्यासाठी  25 की. मी.कराड गावी जाणं भाग होतं. हा तर मोठा संघर्ष ! पण डोंगराएवढे आव्हान त्याला तिळाएवढं वाटलं. ‘कुणालाही त्रास न देता आयुष्य जगायचय मला.  आनंदाने आहे त्या परिस्थितीत आनंद मानूनच जगायचं’  हे सूत्र, आणि ही उमेदच त्याचं अंतिम ध्येय होतं.आणि आजही आहे .आणि ते त्यानी जिद्दीने चिकाटीने गाठलं. 

आज रमेश साळुंखे, महाराष्ट्रात एकमेव असलेल्या अशा शास्त्रीय महाविद्यालयात कराड कॉलेजमध्ये नोकरीला आहे. गेली आठ वर्षे प्रामाणिकपणे तो आपली ड्युटी बजावतोय. .   कुठल्याही परिस्थितीत समाधान मानण्याचे बाळकडू आई-वडिलांनी त्याला लहानपणीच पाजलय. आणि आहे त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचं कसब रमेशच्याही अंगात आहे. ह्याचे सगळे श्रेय, वडील शिवाजीराव आणि आई सुभद्रा यांनाच तो देतो. सुभद्रा नाव ऐकल्यावर, मला  महाभारतातील अर्जुन पत्नी व श्रीकृष्ण भगिनी,सुभद्रा आठवली. तिचा पुत्र अभिमन्यू चक्रव्यूहविद्या आईच्या गर्भातच शिकला. तसंच ह्या सुभद्रापुत्राने संघर्षातून उत्कर्ष गाठण्याची कला आईकडून, जन्माआधीच शिकून घेतली असावी नाही का? 

भावनाप्रधान रमेश म्हणतो, ” मला अभिमान नक्कीच आहे की, असे आई-वडील मला लाभले.. माझे ध्येय गाठण्यासाठी प्रत्यक्ष परमेश्वराने आपले पाय आणि मदतीचे हात मला पुरवलेत. रमेश गर्वाने सांगतोय, “आज मी घडलो आहे ते माझ्या घरच्यांमुळेच माझे वडील श्री शिवाजीराव  माझी आई सौ.सुभद्रा आणि भाऊ विक्रम यांचा माझ्या यशात सिंहाचा वाटा आहे. त्यांनी मला वाढवलं. पुढील शिक्षणाचा त्यांचा नकार मायेपोटी  होता. मला त्रास होऊ नये म्हणून त्यांची तडफड,आणि माझ्यामुळे त्यांना म्हातारपणी त्रास होऊ नये म्हणून माझी धडपड.. या मायेतूनच मला प्रेरणा मिळाली. आणि आज मी इथपर्यंत येऊन पोहोचलो. त्यांच्यापुढे मी कायम नतमस्तक आहे, आयुष्याच्या या लढाईत अनेक हितचिंतक मला मिळाले. त्यांचे आभार . जीवाला जीव देणारे  परममित्र श्री.गोरख रा, थोरवे, श्री सचिन भि.शेडगे ,आणि सागर भि शेडगे यांच्यासारखे अजूनही साथ देणारे जिवलग मित्र मला लाभले, या सगळ्यांच्या मी कायम ऋणात आहे.”

रमेश मनापासून बोलत होता.

तर मंडळी अशी आहे ही खंबीर  रमेश साळुंखे याची कथा. तुमच्या दृष्टीनेही ती स्फूर्तीदायक ठरेल.अशी आशा आहे.  सांगायला मला अतिशय आनंद वाटतोय की, रमेशने यशाची परिसीमा आणि सुखाचा कळस गाठलाय . कारण त्याच्या आयुष्यात एका सौ.तेजस्वी नावाच्या गुणी मुलीने प्रवेश केला आहे.अर्थात                16 – 2 -2023  या शुभ दिनी त्याचे शुभमंगल झाले आहे .

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे.  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “वृद्धत्व आणि पाय…” – लेखक : डॉ. डी. जी. लवेकर ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “वृद्धत्व आणि पाय…” – लेखक : डॉ. डी. जी. लवेकर ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

वृद्धत्व पायापासून वरच्या दिशेने सुरू होते ! पाय सक्रिय आणि मजबूत ठेवा !!

जसे वर्षे घालवतो तसे रोज म्हातारा होत असतो,पाय नेहमी सक्रिय आणि मजबूत असले पाहिजेत.

जसजसे सतत म्हातारे होत असतो/वृद्ध होत असतो,तस तसे केस राखाडी होण्याची/ त्वचा निस्तेज/ चेहऱ्यावर सुरकुत्या पडण्याची भीती बाळगू नये.

दीर्घायुष्य प्रदीर्घ तंदुरुस्त आयुष्याच्या लक्षणांपैकी काही, लोकप्रिय यूएस मॅगझिन”प्रिव्हेन्शन” द्वारे सारांशित केले आहे, पायां चे मजबूत स्नायू सर्वात महत्त्वाचे आणि आवश्यक म्हणून शीर्षस्थानी सूचीबद्ध आहेत. कृपया दररोज चालत जा.

जर फक्त २ आठवडे पाय हलवले नाही तर पायाची खरी ताकद १० वर्षांनी कमी होईल.

फक्त चाला

डेन्मार्कमधील कोपनहेगन विद्यापीठाच्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की वृद्ध,तरुण २ आठवड्यांच्या निष्क्रियता दरम्यान,पायां च्या स्नायूंची ताकद एक तृतीयांश कमकुवत होऊ शकते* जे २०-३० वर्षांच्या वृद्धत्वाच्या समतुल्य आहे !!

म्हणून फक्त चाला

पायाचे स्नायू कमकुवत झाल्यामुळे नंतर पुनर्वसन व व्यायाम केले तरीही ते बरे होण्यास बराच वेळ लागेल.

म्हणून चालण्यासारखा नियमित व्यायाम खूप महत्त्वाचा आहे

संपूर्ण शरीराचे वजन/भार शिल्लक राहून पायांवर विश्रांती घ्या.

पाय हे १ प्रकारचे खांब आहेत,जे मानवी शरीराचे संपूर्ण भार सहन करतात.

रोज चाला.

मजेची गोष्ट म्हणजे,माणसाची ५०% हाडे, ५०% स्नायू २ पायांत असतात.चालत जा

मानवी शरीरातील सर्वात मोठे व मजबूत सांधे,हाडे देखील पायांमध्ये असतात.

10K पावले/दिवस

मजबूत हाडे,मजबूत स्नायू, लवचिक सांधे लोह त्रिकोण बनवतात जो सर्वात महत्वाचा भार वाहतो म्हणजेच मानवी शरीर”

७०% मानवी क्रियाकलाप व व्यक्तीच्या जीवनातील ऊर्जा बर्न दोन पायांनी केली जाते.

हे माहीत आहे का?जेव्हा एखादी व्यक्ती तरुण असते तेव्हा तिच्या मांडीत ८०० किलो वजनाची छोटी गाडी उचलण्याइतकी ताकद असते

पाय हे शरीराच्या हालचाली चे केंद्र आहे

दोन्ही पायांना मिळून मानवी शरीराच्या ५०% नसा, ५०% रक्तवाहिन्या आणि ५०% रक्त त्यामधून वाहत असते.

हे शरीराला जोडणारे सर्वात मोठे रक्ताभिसरण नेटवर्क आहे. म्हणून रोज चाला

फक्त जेव्हा पाय निरोगी असतात तेव्हाच रक्ताचा प्रवाह सुरळीत होतो,त्यामुळे ज्यांच्या पायाचे स्नायू मजबूत असतात त्यांचे हृदय नक्कीच मजबूत असते.* चाला.*. 

वृद्धत्व पायापासून वरच्या दिशेने सुरू होते

एखादी व्यक्ती मोठी होते, मेंदू,पाय यांच्यातील सूचनांच्या प्रसारणाची अचूकता व गती कमी होते,ती व्यक्ती तरुण असताना कमी होते.कृपया चालत जा

याशिवाय,तथाकथित हाडां चे खत कॅल्शियम कालांतराने लवकर/नंतर नष्ट होते,ज्यामुळे वृद्धांना हाडे फ्रॅक्चर होण्याची अधिक शक्यता असते.वृद्धां मध्ये हाडांचे फ्रॅक्चर सहजपणे अनेक गुंतागुंत निर्माण करू शकतात. विशेषत: मेंदूच्या थ्रोम्बोसिससारखे घातक रोग.

हे माहीत आहे का ? साधारणपणे १५% वृद्ध रूग्ण जास्तीत जास्त मरतात. १ वर्षा च्या आत मांडीचे हाड फ्रॅक्चर ! रोज न चुकता चाला

पायांचा व्यायाम,वयाच्या ६० वर्षानंतरही कधीही उशीर होत नाही

पाय कालांतराने हळूहळू म्हातारे होत असले तरी,पाय/पायांचा व्यायाम करणे हे आयुष्यभराचे काम आहे.

10,000 पावले चाला

केवळ नियमितपणे पाय बळकट केल्याने पुढील वृद्धत्व टाळता येते/कमी करता येते. ३६५ दिवस चाला

पायांना पुरेसा व्यायाम मिळावा,पायाचे स्नायू निरोगी राहतील याची खात्री करण्यासाठी कृपया रोज किमान ३०- ४० मिनिटे चाला.

तुम्ही ही महत्त्वाची माहिती तुमच्या 40+ मित्र आणि कुटुंबातील सदस्यांसोबत शेअर केली पाहिजे, कारण प्रत्येकजण दररोज वृद्ध होत आहे

आयुषचे माजी महासंचालक डॉ.जी.डी.लवेकर यांनी पाठवले आहे.

लेखक : डॉ. डी. जी. लवेकर

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘पहा देव कसे काम करतो…’ लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘पहा देव कसे काम करतो…’ लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर

गोव्याला गेली होती आणि घरात मी एकटाच होतो. माझ्या कारचा चालकही एव्हाना त्याच्या घरी रवाना झालेला होता. बाहेर श्रावणसरी बरसायला सुरुवात झालेली होती.

औषधाचे दुकान फारसे दूर नव्हते. मला पायी सुद्धा जात आले असते. पण पावसामुळे रिक्षाने जाणेच उचित आहे असा विचार करून औषध घेण्यासाठी मी घरातून बाहेर पडलो. घराशेजारीच असलेल्या राम मंदिराचे कांही बांधकाम सुरु होते. मंदिरातील मूर्तीसमोर हात जोडून एक रिक्षेवाला देवाची प्रार्थना करीत होता. 

मी त्या रिक्षेवाल्याला विचारलं, “काय रे, खाली आहे कां तुझी रिक्षा?” तो “हो” म्हणाला. मग मी त्याला विचारलं मला नेशील कां सवारी म्हणून?”

तो हो म्हणाला तसा मी त्याच्या रिक्षात बसलो. तो रिक्षावाला बराच आजारी असावा असं माझ्या लक्षात आलं. त्याच्या डोळ्यांमधून पाणी येत होतं. मग माझ्या कडून राहवलं नाही. मी त्याला विचारलं, “काय रे बाबा, काय होतंय तुला? आणि तू रडतोयस कशाला? तुझी तब्येतही ठीक दिसत नाहीये?”

ह्यावर तो उत्तरला, “सतत सुरु असलेल्या ह्या पावसाने मागील तीन दिवसांपासून भाडं मिळालेलं नाहीय, त्यामुळे रोजगार नाही, म्हणून पोटात तीन दिवसांपासून अन्नाचा कणही गेलेला नाहीय. आज तर अंगही दुखतंय. आताच देवाला प्रार्थना करीत होतो की देवा, आज तरी मला जेवण मिळू दे, आज तरी मला एखादी सवारी मिळू दे.” 

कांहीही न बोलता मी रिक्षा थांबवला आणि समोरच्या मेडिकल शॉपमध्ये गेलो. तिथे माझ्या मनात विचार आला की देवानेच तर मला ह्या रिक्षेवाल्याच्या मदतीला मुद्दामहून पाठविलं नसेल? कारण असं बघा की मला सुरु झालेला हा ऍलर्जीचा त्रास जर अर्धा तास आधी सुरु झाला असता तर मी माझ्या ड्रायव्हरकडून मला हवी असलेली औषधे आणवून घेतली असती. मला बाहेर पडण्याची जरुरी भासली नसती, आणि हा पाऊस नसता तर मग मी रिक्षेत सुद्धा कशाला बसलो असतो? 

मनातल्या मनातच माझ्या त्या मनातल्या देवाला मी विचारलं, “देवा, मला सांगा, तुम्ही त्या रिक्षेवाल्याच्याच मदतीसाठी माझी योजना केली आहे ना?” मला मनातल्या मनातच उत्तर मिळालं, ‘हो.’ 

देवाचे आभार मानत मी माझ्या औषधांसोबतच त्या रिक्षेवाल्यासाठीही औषधं विकत घेतली. जवळच्याच हॉटेलातून छोले पुऱ्या पॅक करून घेतल्या आणि रिक्षात येऊन बसलो. 

ज्या मंदिरापासून मी रिक्षा केला होता त्याच मंदिरापाशी परतल्यानंतर मी रिक्षेवाल्याला रिक्षा थांबवायला सांगितली, त्याच्या हाती रिक्षेचं भाडं म्हणून ३० रुपये ठेवले, गरम गरम छोले-पुरीचा पूड आणि त्याच्यासाठी घेतलेली औषधे त्याच्या हाती ठेवत त्याला म्हटलं, “हे बघ, छोले-पूरी खाणं झाल्यानंतर लगेच ह्या दोन गोळ्या घेऊन घे आणि उरलेल्या दोन गोळ्या सकाळच्या नाश्त्यानंतर घे आणि त्यानंतर मला येऊन तुझी तब्येत दाखवून दे.”

रिक्षेवाल्याचा डोळ्यांना पुन्हा पाणी आलं. रडत रडतच तो बोलला, “साहेबजी, देवाला तर मी केवळ दोन घास पोटांत पडू दे म्हणून प्रार्थना केली होती, पण त्याने तर माझ्यासाठी छोले-पुरी पाठवली. कित्येक महिन्यापासून आपण छोले-पुरी खावी अशी इच्छा मनांत होती, आज देवाने माझी ती इच्छा पूर्ण केली. मंदिराजवळ राहणाऱ्या त्याच्या भक्ताची त्याने यासाठी योजना केली आणि त्याच्याकडून हे कार्य करवून घेतले अशी माझी समजूत आहे.” तो आणखी बरंच कांही बोलत होता, भरभरून. पण माझं त्याकडे लक्षच नव्हतं.

घरी आल्यानंतर माझ्या मनांत आलं, ‘त्या हॉटेलमध्ये खाण्याचे बरेच पदार्थ होते, रिक्षेवाल्यासाठी मी कांहीही घेऊ शकत होतो, सामोसे, भाजी किंवा जेवणाची थाळी, कांहीही. पण मी नेमकं छोले पुरीच कां घ्यावी? रिक्षेवाला म्हणाला ते खरंच तसं आहेकां? देवानंच तर मला आपल्या भक्ताच्या मदतीसाठी पाठवलं नसेल? माझं ऍसिडिटी वाढणं, त्यावेळेस ड्रायव्हर घरी नसणं, नेमका त्याच वेळेस पाऊस पडणं  आणि मी रिक्षा करणं ही, तो रिक्षेवाला म्हणतो त्या प्रमाणे दैवी योजना तर नसेल ना?’  

आपण जेव्हा योग्य वेळी कुणाच्या साहाय्यासाठी धावून जातो तेव्हा त्याचा अर्थ इतकाच की आपण ज्याला मदत करण्यास उद्युक्त होतो त्याची प्रार्थना देवानं ऐकली आणि आपल्याला त्याचा (देवाचा) प्रतिनिधी म्हणून किंवा देवदूत म्हणून संबंधित व्यक्तीकडे पाठवलं. म्हणून आपल्या हातून घडलेलं चांगलं कार्य हे देवाने आपल्याकडून करवून घेतलं असं समजावं म्हणजे सत्कृत्याचा वृथा अभिमान होत नाही.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री अनंत केळकर.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अखेरचा हा तुला दंडवत…! ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

☆ अखेरचा हा तुला दंडवत…! ☆ श्री विश्वास देशपांडे

उगवतीचे रंग

अखेरचा हा तुला दंडवत…!

रविवार दि ६फेब्रुवारी २०२२ चा दिवस उजाडला आणि सकाळी सकाळी अघटित अशी बातमी कानावर पडली. गानसम्राज्ञी लतादीदी गेल्या.  अवघा देश शोकसागरात बुडाला. जे स्वर ऐकत सकाळ व्हायची त्या स्वरांची संध्याकाळ झाला होती. गानसूर्य अस्ताला गेला. जणू दिवसातले, नव्हे जगण्यातलेच चैतन्य कोणीतरी काढून घेतले होते. संपूर्ण दिवसच उदासवाणा झाला होता. दिनकर मावळला आणि लतादीदी पंचत्वात विलीन झाल्या. सूर निमाले.

कविवर्य भा रा तांबेंचं एक गीत लतादीदींनी गाऊन अजरामर केलं आहे. ‘ मावळत्या दिनकरा, अर्घ्य तुज जोडून दोन्ही करा…’ दीदींच्या रूपाने हा गानसूर्य मावळला होता. याच गाण्यात सुंदर ओळी आहेत

जो तो वंदन करी उगवत्या

जो तो पाठ फिरवी मावळत्या

रीत जगाची ही रे सवित्या

स्वार्थपरायणपरा.

उगवत्या सूर्याला वंदन करणे आणि मावळत्या सूर्याकडे पाठ फिरवणे ही जगाची रीतच आहे. पण हा गानसूर्य अस्ताला गेल्यावर जगाने आपली ही रीत बदलली. या मावळत्या दिनकराला डोळे भरून बघण्यासाठी माणसांनी दाटी केली. घराघरात टीव्हीसमोर बसून या मावळत्या दिनकराचे अनेकांनी दर्शन घेतले. मुंबईत लोकांची दाटी आणि घराघरातील लोकांच्या डोळ्यात अश्रूंची दाटी. प्रत्येकाला जणू आपल्याच घरातील कोणीतरी गेल्यासारखे वाटले. गानसम्राज्ञी, गानसरस्वती, गानकोकिळा यासारखी कितीही विशेषणे तुम्ही लावा, ‘ लता ‘ याच नावाने प्रत्येकाच्या हृदयात घर केले होते. ही ‘ लता ‘ प्रत्येकाच्या मनात अशी रुजली होती की ‘ तिचा वेलू गेला गगनावरी…’ स्वर्गापर्यंत हा वेलू जाऊन पोहोचला. बहुधा स्वर्गलोकीच्या देवांनी, गंधर्वांनी तिला सांगितलं असावं की आता बस झालं पृथीवर लोकांना रिझवणं. खूप प्रतीक्षा करायला लावलीस आम्हाला. आता आम्हालाही तू हवी आहेस.

त्या सुरांची जादूच अशी अनोखी होती. सोन्याच्या तारेसारखा लवचिक, मुलायम आवाज ! खरं तर या आवाजाला उपमाच नाही. दीदी दिसायला तुमच्या आमच्यासारख्याच. पण जेव्हा त्या गायला लागत तेव्हा त्या गळ्यातून गंधार बाहेर पडे. सरस्वतीची वीणा झंकारत असे, श्रीकृष्णाची बासरी स्वरांचे रूप घेऊन प्रकट होई. सकाळी भूपाळी, भजन, भक्तिगीतं म्हणून हा आवाज उठवायचा, संकटात आधार होऊन धीर द्यायचा, ‘ ऐ मेरे वतन के लोगो…’ म्हणत राष्ट्रभक्ती जागवायचा. ‘ सागरा प्राण तळमळला… ‘ या शब्दांनी अंगावर रोमांच उभे करायचा. ‘ मोगरा फुलला ‘, ‘ आनंदवनभुवनी ‘ यासारख्या गीतांनी एका वेगळ्याच आनंदरसाची बरसात करायचा. श्रीरामचंद्र कृपालू, बाजे रे मुरलीया बाजे सारखी गाणी वेगळ्या विश्वात घेऊन जायची. रात्रीच्या वेळी हा आवाज अंगाई गाऊन निजवायचा. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर ‘ जेथे जातो तेथे तू माझा सांगाती…’ असलेला हा आवाज होता. ( उगवतीचे रंग )

एक मुलगी नऊ दहा वर्षांची असल्यापासून श्रोत्यांसमोर गायला सुरुवात करते. पितृछत्र हरपल्यावर हीच चौदा पंधरा वर्षांची कोवळी पोर मोठी होऊन आपल्या घराची, भावंडांची काळजी घेते. दैवी सूर तर तिच्या गळ्यात असतोच. पण आपल्या मेहनतीने ती त्या सुरांना सौंदर्य प्राप्त करून देते. मिळेल तिथून शिकत जाते. शाळेत फारसे न गेलेली ही मुलगी पुढे स्वतःच्या बळावर शिकत जाते. पुस्तके वाचते तशीच माणसे वाचते. त्या सगळ्यातून जीवनाचे धडे घेते. स्वतःची तत्वे, नैतिक अधिष्ठान या गोष्टींशी कधीही तडजोड करत नाही. मिळेल त्या संगीतकाराकडून शिकत जाते. पण आयुष्यात आलेल्या या सगळ्या संकटांनी ती करपून जात नाही. तिचं आयुष्य म्हणजे जणू आनंदयात्री ! संगीत, प्रवास, क्रिकेट, खाणं आणि खाऊ घालणं, नर्म विनोद, नकला या सगळ्या सगळ्या गोष्टींचा आनंद तिने लुटला. लोकांनाही भरभरून दिला. तिच्या सुरांचं झाड अखेरपर्यंत बहरतच राहिलं. साडेसात दशकं हे झाड गात होतं, बहरत होतं आणि ‘ आता विसाव्याचे क्षण…’ उपभोगत होतं !

संत कबीर म्हणतात

कबीरा जब हम पैदा हुए जग हंसे हं रोये

ऐसी करनी कर चलो, हम हंसे जग रोये ।।

दीदी अशीच करणी करून गेल्या. अवघं जग हळहळलं. राष्ट्रध्वज अर्ध्यावर आले. एका भारतरत्नाला अखेरचं वंदन करण्यासाठी पंतप्रधान आणि अवघे मान्यवर अंत्यदर्शनाला आले. ‘ जीवन कृतार्थ होणं ‘ ते अजून वेगळं काय असतं ! जगावं तर असं जगावं आणि मरावं तर असं मरावं !

आता दीदी देहानं आपल्यात नाहीत. पण त्यांचे सूर चिरंतन आहेत. ते सदैव आपली साथ करत राहतील. ‘ नाम गम जायेगा, चेहरा ये बदल जायेगा, मेरी आवाज ही पहचान हैं , गर याद रहे. ‘ तेव्हा दीदी ‘ अखेरचा हा तुला दंडवत…! ‘

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ साक्षात्कार… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? मनमंजुषेतून ?

☆ साक्षात्कार… ☆ श्री मकरंद पिंपुटकर

मी आणि बायको, आमच्या अनुक्रमे ५ आणि ३ वर्ष वयाच्या लेकरांना घेऊन, सामानाने गच्च भरलेली ट्रॉली ढकलत तेवढ्याच गच्च भरलेल्या मॉलमध्ये बिलिंग काऊंटरकडे मार्गक्रमण करत होतो, आणि ते मगाचचे आजोबा परत आमच्याशी बोलायला आले होते.

तशी आजच्या संध्याकाळची सुरुवात काही फारशी चांगली झाली नव्हती. 

आज शुक्रवार होता. दिवसभर ऑफिसमध्ये काम करताना लोकांच्या डोळ्यासमोर संध्याकाळी सुरू होणाऱ्या वीकएंडची रम्य दृश्यं तरळत होती, मला मात्र सोमवारी एक अर्जंट प्रेझेन्टेशन होतं, घरी गेल्यावरही तेच काम घेऊन बसायला लागणार होतं हे जाणवत होतं. मुलांना मॉलमध्ये नेण्याचं प्रॉमिस केलं होतं, पण त्यांना काहीतरी थाप मारून टाळायचं, हेही ठरवलं होतं.  

पण घरी पोचलो आणि कळलं की माझ्या सासूबाईंची प्रकृती थोडी बिघडली होती, nothing serious, पण त्या आणि माझे सासरे उद्या इथे आमच्या घरी येणार होत्या. त्यांना घेऊन हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांना दाखवणं, तपासण्या करून घेणं अशी कामं होती.

सासू सासरे येणार म्हणून आणि बाकीचीही वाणसामान आदि खरेदी होती, बायकोला एकटीला ते सगळं सामान आणणं जमलं नसतं. त्यामुळे न सुटके मला आल्यापावली परत बाहेर पडावं लागलं. या घटनेला दोन तास होऊन गेले होते, आणि आत्ता आम्ही खरेदी संपवून मॉलमधून निघण्याच्या मार्गावर होतो. 

आमची खरेदी चालू असताना एक t shirt, बर्म्युडा घातलेले मॉडर्न आजोबा लेकरांना बघून आमच्याजवळ आले. त्यांची नातवंडं अमेरिकेत असतात, या दोघांना बघून त्यांना त्यांची आठवण आली, म्हणून ते आवर्जून या दोघांशी गप्पा मारायला आले. 

आज आमच्या मुलांचा सौजन्य-सप्ताह चालू होता बहुतेक. या नव्या आजोबांशी त्या दोघांनी छान गप्पा मारल्या, त्यांच्याबरोबर हसले – खेळले, enjoy केलं. मुलांना टाटा करून आजोबा त्यांच्या खरेदीला निघून गेले. 

आणि आत्ता आम्ही निघत असताना ते परत आले होते. 

” यंग मॅन, हे सोनेरी दिवस पुन्हा येणार नाहीत,” ते माझ्याशी बोलत होते, ” मला कल्पना आहे की तुमच्या करीअरच्या दृष्टीने ही महत्त्वाची वर्षे आहेत, खूप कामं असतील, पण या लेकरांची ही वयं पुन्हा गवसणार नाहीत. मी पण कॉर्पोरेट कल्चरमध्ये काम केलं आहे, ती धावपळ – ती रॅट रेस काय असते हे मीही अनुभवलं आहे….. एकदा माझ्या मुलीला तिच्या बाहुल्यांसाठी डॉल हाऊस बनवायचं होतं. शाळेचा प्रोजेक्ट वगैरे नव्हता, तिलाच तिच्यासाठी हे करायचं होतं. मला नेहमीप्रमाणे काहीतरी deadline होतीच. 

तिनं माझ्याकडे डॉल हाऊस करायला मदत करायचा हट्ट धरला. माझ्या कामाच्या व्यापात आणि घाई गडबडीत मी तिला ठाम नकार दिला, आत्ता काही अर्जंट नाहीये, नंतर करू, मी बिझी आहे वगैरे सांगितलं आणि जायला निघालो…. निघालो खरा, पण तिचा तो बिच्चारा चेहरा नजरेसमोरून हलेना. काहीतरी तुटलं आतमध्ये. आणि मी परत फिरलो…. तास दोन तासांचंच काम होतं, डॉल हाऊस पूर्ण झालं. त्याक्षणीचा तिचा तो उत्फुल्ल चेहरा आजही आठवतो. त्या दिवशी काय deadline होती, ते आठवतही नाही, पण ते डॉल हाऊस आता माझ्या मुलीच्या मुलीकडे अजूनही थाटात दिमाखात उभं आहे…. लक्षात ठेव, म्हातारपणी – निवृत्तीनंतर, ऑफिसचं अमुक काम करायचं राहिलं, तमुक काम करायचं राहिलं ही रुखरुख नसेल, पण लेकरांचं बालपण निसटून गेलं ही रुखरुख मात्र नक्की असेल.”

आजोबा निघून गेले, बायको माझ्याकडे सहेतुक पहात होती.

भगवान बुद्धांना पिंपळाच्या झाडाखाली साक्षात्कार झाला, मला गच्च भरलेल्या मॉलमध्ये, गच्च भरलेली ट्रॉली ढकलताना साक्षात्कार झाला. मी काय गमावून बसणार होतो हे ध्यानात आलं. तसं होऊ देता कामा नये हा पक्का निर्धार झाला. आणि मुलांचे हात हातात धरून त्याच निर्धाराने मी पुढे निघालो.

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares