मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ दिसते तसे नसते… – लेखक – श्री मिलिंद घारपुरे ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

दिसते तसे नसते… – लेखक – श्री मिलिंद घारपुरे ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

अगदी आजचीच सकाळ ची गोष्ट…. 10 ते सव्वा 10 चा सुमार..

गोडवा.’ .. .. प्रसिद्ध मराठी फूड जॉईन्ट.

 

मी मला हवे असलेले पदार्थ  मागवले तेवढ्यात एक वयोवृद्ध जोडपं माझ्या अगदी समोर येऊन बसले.

पुरुष चांगल्या शर्ट पॅन्टमध्ये तर  बाई साडी नेसलेल्या sleeveless ब्लऊज … बॉबकट केलेल्या 

दोघे जवळपास 75 ते 80 पार केलेले..

 

तो सदगृहस्थ अगदी शांतपणे सगळे करत होता. त्यांची बायको सारखी त्याच्यावर करवादत होती 

साधे पाणी प्या… थंड नको.  काय मागवू ? “ 

त्याने सरळ मेनू कार्ड बायकोच्या हवाली केले 

मिसळ…. झणझणीत त्यांनी हळूच…’ 

काही नको तिखट ..  मग त्रास मला होतो तुम्हाला काय…”

बर मग बटाटे वडा….”

काही नको… साधा उपमा दे रे कमी तिखट आणि पातळसर….. आणि नंतर 2 कॉफी without sugar “.  

त्या बायकोने ऑर्डर सोडली…

बिचारे… मला त्या सदगृहस्थाची दया आली.. बायकोसमोर बिचारा अगदी गलित गात्र… झाला होता 

काहीच बोलू शकत नव्हता.  

त्यांचा उपमा आला… नंतर कॉफी आली… दोघे हळू हळू सावकाश खात होते 

इतक्यात घो घो करत दोन पोलीस van आणि एक जीप त्या ‘ गोडवा ‘ समोर थांबल्या 

धडा धड… तिन्हीमधून कडक ड्रेस घातलेले कितीतरी पोलीस ऑफिसर्स उतरले.  

त्या सदगृहस्थाच्या टेबलं वर येऊन… “ सर कधी आलात आम्हाला सांगायचे नाहीत का ? तुम्हाला कुठे जायचे आम्ही सोडतो… कसे आहात सर…” 

खटाखट पाय जुळवत सॅल्यूट केले गेले… आता ते सदगृहस्थ खडकन उभे राहिले 

त्यांची पत्नी म्हणू लागली… “ चालेल… आम्हाला …  “ 

त्यांनी हात वर केला. बायकोला एका क्षणात गप्प केलं. ठामपणे म्हणाले “ मी जाईन ऑटोने thanks “

…. सिंह परत नखें आणि आयाळीसह परतला होता 

 

काय 5 मिनिटात विलक्षण बदल झाला होता. त्यांनी झाडून सगळ्यांची तपशीलवार चौकशी केली 

आता चौकीवर कोण अधिकारी आहेत ते विचारले … ड्युटी… पेट्रोलिंग.. राऊंड…रायटर आता कोण आहे….. सगळ्यांना पटपट आदेश दिले.  

 

एक इन्स्पेक्टर बिल द्यायला पुढे झाला, त्याला सांगितलं … “ नो इन्स्पेक्टर… I will pay..” 

सगळ्यांना 10 मिनिटात रवाना केले. पैसे दिले. 

..  आता सगळेच त्यांचे हे आगळे रूप पाहून हतबुद्ध झाले होते. कितीतरी जणांनी खाणे तसेच सोडले होते 

वेटरने ऑर्डर घेणे थांबवले होते … घडलेली घटनाच अशी होती 

अर्ध्या तासापूर्वी दिन पतित गरीब वाटणारा…सगळ्यांचा बाप निघाला होता…

 

कोण होते ते माहिती आहे ??… ते नंतर सगळ्यांना समजले 

ते होते महाराष्ट्र राज्याचे “ पोलीस महासंचालक रमाकांत कुलकर्णी “ 

…. आणि त्यांच्या सोबत होत्या त्यांच्या पत्नी सौ. श्वेता रमाकांत कुलकर्णी.

 

निशब्द….

लेखक :  श्री मिलिंद घारपुरे

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ लुप्त होत असलेल्या व्यक्ती – शेजार… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

?  विविधा ?

लुप्त होत असलेल्या व्यक्ती – शेजार… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

जाता जाता सहज एक संवाद कानावर पडला. बागेत फिरायला आलेल्या व्यक्तींची ओळख झाली आणि बोलता बोलता त्यांना समजले आपण शेजारी आहोत. त्या दोन शेजारी राहणाऱ्या शेजाऱ्यांची ओळख बागेत झाली. किती जग पुढे गेले आहे ना (?) 

त्या मानाने आमची पिढी फारच मागास म्हणावी लागेल. कारण आम्ही म्हणजे घरातली भाजी आवडली नाही म्हणून हक्काने शेजारी जाऊन जेवत होतो. आपल्या घरात काय चालले आहे याची माहिती शेजाऱ्यांना असायची. लग्नाच्या मुलीला बघायला पाहुणे येणार असतील तर तिचे आवरणे (मेकअप) शेजारच्या घरात होत होता. आणि जास्त पाहुणे आले तर शेजारी त्यातील काही पाहुणे स्वतःच्या घरी नेत होते. आणि त्यांचा व्यवस्थित पाहुणचार करत होते. हे सर्व वाडा किंवा चाळ संस्कृतीत होत होते. अगदी वाटीभर साखर, चार लसूण पाकळ्या, दोन मिरच्या, दोन कोथिंबीरीच्या काड्या यांची हक्काने देवाण घेवाण चालायची आणि गरम पोहे, भाजी आपुलकीने घरात यायची. सगळी मुले सगळी घरे आपलीच असल्या प्रमाणे वावरत होते. आणि शेजारी हक्काने प्रेम व शिक्षा दोन्ही करत होते. आणि त्यावर कोणाची काहीच हरकत नव्हती. ठराविक वेळेत घराचे दार उघडले नाही तर शेजारी चौकशी करत होते. जर उशिरा उठायचे असेल तर आदल्या दिवशी शेजारी सांगावे लागत होते.

सामान आणायला गेल्यावर दुकानदार हक्काने कोणताही पाढा किंवा कविता म्हणायला लावायचा. आणि काही चुकले तर घरी रिपोर्ट जायचा. आमच्या घरा जवळचे एक दुकानदार दुकानात येणाऱ्या मुलांना पाढे म्हणायला लावायचे आणि पाढा आला नाही तर वस्तू द्यायचे नाहीत. मग त्यांच्याकडे तो पाढा पाठ करून जावे लागत होते. अशी समाजाकडून प्रगती होत होती.

त्यामुळे बाहेर वावरताना एक धाक होता. आपले काम सोडून कोणी मूल इतरत्र दिसले तर शेजारी हक्काने कान पकडून घरी आणत होते. आणि घरातील व्यक्ती म्हणायच्या असेच लक्ष असू द्या. त्यामुळे मुले बिघडण्याचे प्रमाण खूप कमी होते. प्रत्येक घरात संध्यादीप लागले की शुभंकरोती म्हटले जात होते. सर्व मुले एकत्रित पाढे, कविता म्हणत होते. आणि एखाद्या मुलाला घरी यायला उशीर झाला तर सगळे शेजारी त्याला शोधायला बाहेर पडत होते.

अगदी लग्न ठरवताना वधू किंवा वर यांची चौकशी समाजातील किराणा दुकानदार, न्हावी, शिंपी यांच्याकडे केली जात होती. कारण ती चर्चेची ठिकाणे होती. आणि त्यांनी वधू किंवा वर यांची वर्तणूक चांगली आहे असे सांगितले की, ते लग्न निश्चित ठरायचे. अशा खूप आठवणी आहेत.

पण माणसे प्रगत झाली. शेजारचे जवळचे नेबर झाले. घरे फ्लॅट झाली. शेजारचे काका अंकल झाले. ज्यांची ओळख आपोआप होत होती त्यांची ओळख बागेत होऊ लागली. शेजाऱ्यांच्या घरातील वावर कमी झाला. शेजारी फोन करून घरी आहात का? येऊ का? असे विचारु लागले. दोन घरात एकच भिंत असून मनात दुरावा वाढला. तुम्हाला काय करायचे आहे? किंवा आपल्याला काय करायचे? अशी भूमिका दोन शेजाऱ्यांच्या मनात निर्माण झाली. आणि सर्वांनाच अपेक्षित पण घातक स्वातंत्र्य मिळाले. सध्याच्या काही मुलांच्या बाबतीतल्या घटना बघितल्या की वाईट वाटते. आणि कुठेतरी हे ओढवून घेतलेले स्वातंत्र्य याला कारण असावे असे वाटते. आपुलकीचा शेजार असेल तर नकळत संस्कार होतात. मुलांना थोडा धाक असतो. हल्ली पालक वारेमाप पैसा मिळवतात. आणि मुलांना पुरवतात. कोणाचाच धाक नाही. आम्ही काहीही करु तुम्ही कोण विचारणारे? असे विचार वाढत आहेत. याला कोणते स्वातंत्र्य म्हणायचे हेच कळत नाही.

माझ्या सारख्या शेजाऱ्यांच्या प्रेमात व धाकात वाढलेल्या ( सध्या याला मागासलेले म्हणतील ) व्यक्तीला हे अती स्वातंत्र्य खुपते आणि चिंता वाटते. सगळे माझ्या मताशी सहमत असतील असे नाही. पण मला लुप्त होत असलेले शेजारी आठवतात. आणि आवश्यक वाटतात

लेखक : अज्ञात 

संग्राहक :श्री. अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, 

kelkaramol.blogspot.com  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘‘मी गतीचे गीत गाई…’’ ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

? मनमंजुषेतून ?

☆ ‘‘मी गतीचे गीत गाई…’’ ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

श्रद्धेय बाबा आमटे आणि संपूर्ण परिवाराचं कार्य अतुलनीय आहे. जिद्दीचा अंगार पेटवलेल्या बाबांनी वंचितांच्या सुखदुःखाशी, आंतरिक वेदनेनं जोडलं जात असताना, खडकाळ, ओसाड, जमिनीतून आनंदवन नावाचं नंदनवन फुलवलं. यात तपस्वीनी साधनाताईंचे हात बळकट तर होतेच. त्यांची पुढली पिढीही… सर्व आदरणीय.. डॉ. विकासदादा, डॉ. भारतीताई तसंच, डॉ. प्रकाशदादा, डॉ. मंदाताई आणि त्यापुढील पिढीही आनंदाने या कार्यात सामील झाली, हे ईश्वराने मानवाला दिलेलं वरदानच आहे! विकासदादा आणि या कुणाच्याही बाबतीत त्यांच्या कार्याचा गौरव करणं, म्हणजे सूर्याला पणती दाखवणे होय ! मी आज विकासदादांबद्दल एक छोटीशी, पण अविस्मरणीय आठवण सांगणार आहे.

साधारण १५ एक वर्षांपूर्वी, ठाण्याच्या गडकरी रंगायतन सभागृहात विकासदादांचा ‘स्वरानंदवन’ हा संगीत रजनीचा कार्यक्रम होता. त्यानिमित्ताने मी स्वतः गाडी चालवत दादरहून ठाण्याला गेले होते.

कार्यक्रम अतिशय रंगला. विकासदादांसह सर्वच जण एकसे एक सुंदर गायले. आश्चर्याने तोंडात बोटे घालावी असे प्रत्येक जण सहजसुंदर गात होते. त्यांचं दैवी गाणं ऐकल्यावर त्यांना ‘differently abled’ कोण म्हणणार? विकासदादांनी संगीताच्या क्षेत्रातही, ही अजोड अशीच कामगिरी केलीय ! विकासदादा स्वतः ही खूप सुंदर गायले. सर्वांचंच मला खूप कौतुक वाटत होतं. ते पाहून त्यांनी मला थोडं गायला आणि भाषण करायलाही सांगितलं.

 कार्यक्रम संपल्यानंतर विकासदादांना माझ्या घरी शिवाजी पार्कला, नव्या घरी येऊन, पायधूळ झाडण्याची मी विनंती केली. सुनीलनेही फोन करून अगत्याने घरी यायचे निमंत्रण दिले. कुठेही आढेवेढे न घेता ते सहजतेनं ‘हो’ म्हणाले आणि माझ्या गाडीत बसले. त्या क्षणी मला काय धन्य धन्य वाटले म्हणून सांगू!

आधीच सर्वांच्या गाठीभेटी घेत उशीर झाला होता. त्यामुळे मी नेहमीप्रमाणे गाडी झूम झूम मजेत हाकली. विकासदादांनीही मोकळ्या रस्त्यावर “पद्मजा, काय सुसाट चालवतेस” म्हणून कौतुक केले. पण काय झाले कोण जाणे ! गाडी सायनजवळ आली आणि अचानक बंद पडली ! त्या मिट्ट अंधारात रस्त्यावर कोणीही मदतीसाठी दिसेना. मोठी पंचाईत झाली ! इतक्या महान व्यक्तीला मी आदराने गाडीत बसवले खरे, पण कधीही बंद न पडणारी गाडी बंद पडली…. आणि माझ्या डोळ्यांसमोर अंधारीच आली ! 

इतक्यात विकासदादा गाडीतून उतरले आणि, ” पद्मजा, काही काळजी करू नकोस, ” असं म्हणत त्यांनी गाडी ढकलायला सुरुवात केली. मी गचके देत गाडी सुरू केली… परत गाडी बंद… परत धक्का देणे… असे करत करत पाचव्या मिनिटाला गाडी सुरू झाली, आणि आम्ही सुखरुप घरी आलो. सुनील वाट पाहतच होता. मी विकासदादांचं औक्षण केलं. त्यांनी माझ्या घरी पायधूळ झाडल्याने, माझं घर आनंदाने न्हाऊन निघालं !….. त्याआधी त्यांना गाडीसाठीही पायधूळ झाडावी लागली याची मला खंत आणि लाजही वाटत होती. परंतु त्रासाचा, कटकटीचा किंवा क्लेषाचा लवलेशही विकास दादांच्या चेहर्‍यावर नव्हता. कित्ती सहजपणाचे हे वागणे !

… बाबांसारख्या महान योगी, तपस्व्याचे कार्य पुढे नेणाऱ्या, त्यांच्या आणि साधनाताईंच्या मुशीत घडलेल्या या अत्यंत साध्या, निगर्वी आणि कर्तृत्ववान अशा विकासदादांचे औक्षण करताना बाबांच्याच ओळी मला आठवत होत्या… 

शृंखला पायी असू दे

मी गतीचे गीत गाई…

दुःख उधळायास आता

आसवांना वेळ नाही…

©  पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य –  मनमंजुषेतून ☆ – पांडुरंगाची सावली … माझी रखुमाई ! – ☆ सौ. अलका ओमप्रकाश माळी ☆

सौ. अलका ओमप्रकाश माळी

? मनमंजुषेतून ?

☆ – पांडुरंगाची सावली … माझी रखुमाई ! – ☆ सौ. अलका ओमप्रकाश माळी ☆

आज एकादशी त्यामुळे मला दोन तीन वर्षापूर्वी घेतलेलं विठुरायाचे दर्शन आठवले.. तोबा गर्दी मध्ये सुध्दा मिळालेलं vip दर्शन आणि त्या सभा मंडपात बसून विठुराया सोबत मारलेल्या गप्पा आठवल्या.. पांडुरंगाची ती शांत मूर्ती डोळ्यात साठवत किती तरी मनीची गुपित त्याला सांगितली होती.. आणि माझ्या प्रत्येक वाक्यावर त्या मूर्तीच्या चेहऱ्यावर भाव बदलत आहेत असा होणारा भास सुखावत होता..

आजही बऱ्याचदा मला ते तासभर घेतलेलं दर्शन, त्या गप्पा आणि ती मूर्ती कित्येकदा डोळ्यासमोर येते आणि नकळत डोळे पाणावतात.. मला विठ्ठल भेटला तर ? हा प्रश्नच कधी डोक्यात आला नव्हता.. कारण माझ्यापुरता तो सावळा मला रोज वेगवेगळ्या रूपात भेटतो ह्याची अगदी खात्री आहे.. कधी बागेत फुलणाऱ्या फुलांमध्ये, कधी बरसणाऱ्या सरींमध्ये, कधी वाऱ्याची मंद झुळूक बनून, तर कधी वाहणाऱ्या नदीच्या पात्रामध्ये तो असतोच.. कधी मन उदास असेल तर, कधी आनंदाने नाचत असेल तर तो माझ्या सोबत असतोच असतो.. आमच्याकडच्या देव्हाऱ्यात तो आहेच पण त्याहून सुंदर असं रूप माझ्या मनात आहे असं मला सतत जाणवतं राहतं..

पण तो जर कधी अगदी पांडुरंग रुपात तो माझ्यासमोर उभा राहिलाच तर मात्र मी त्याला सांगणार आहे हो.. बाबा रे त्या रखुमाईला अशी एकटीच उभी नको करुस हो.. तिचा रुसवा काढून तिला मनव आणि तुझ्या सोबत तिला घे, तुझ्या बाजूलाच ती जास्त शोभून दिसते.. आणि खरं सांगू का पांडुरंगाची ती एकटी मूर्ती मला नाही पाहवत.. ती अगदीच केविलवाणी वाटते.. पण तेच रखुमाई सोबत असताना त्या विठूरायाचे मुखकमल अगदी उजळून निघालेलं असतं.. तो रखुमाईसोबत जास्त आनंदी वाटतो.. तेंव्हा जर तो सावळा मला कधी भेटलाच तर हे एक मागणं मात्र नक्की मागणार आहे मी.. कृष्ण जसा राधेशिवाय अपूर्ण वाटतो तसचं विठ्ठलासोबत रखुमाई हवीच हवी.. तिच्याशिवाय तो अपूर्णच भासतो मला..

आता तुम्ही म्हणाल हे काय नवीन.. तर तुम्ही काहीही म्हणालात तरी मला ते दोघे सोबतच हवेत असं वाटतं.. येवढं एकच मागणं त्या पांडुरंगाकडे मागेन.. आणि त्याला ही ते पूर्ण करावंच लागेल.. स्वतः साठी किंवा अजून कोणासाठी काहीही मागायच नाहीय मला, कारण तो न मागताच बरंच काही देऊन जातो.. कधी कधी तर पात्रता नसतानाही इतकं काही देतो की माझी झोळी अपुरी पडते.. तेंव्हा ‘ हे पांडुरंगा जर कधी भेटीचा योग आलाच तर माझ्या रखुमाईला ही सोबत घेऊनच ये हो.. ‘ 

*

पांडुरंगाची सावली माझी रखुमाई..

तिच्या शिवाय नाही कसलीच अपूर्वाई..

*

साऱ्या जगाची तू माऊली..

पण तुझी सखी मात्र एकटीच राहिली..

*

घे तिलाही सोबत तुझ्या विटेवरी..

सावळ्या नको अंत पाहू आता धाव घे सत्वरी..

*

© सौ. अलका ओमप्रकाश माळी

मोब. 8149121976

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘ऋणानुबंधाच्या गाठी…’ भाग – १ ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘ऋणानुबंधाच्या गाठी…’ भाग – १ ☆ प्रस्तुती– सौ. उज्ज्वला केळकर

‘आण्णा, आज संध्याकाळी येताना आंबे घेऊन येते बरं का ! ‘ उज्ज्वला घड्याळाचा पट्टा बांधून, टेबलावरची पर्स उचलत, पायात चपला सरकवता सरकवता म्हणाली. नकारार्थी मान हलवत हाताने आण्णांनी `नको’ अशी खूण केली. याचा अर्थ `आंबे नकोत’, असा नसतो. `तू एवढा त्रास घेऊ नकोस’, असा असतो. गेल्या पंध्रा-वीस वर्षांच्या परिचयाने, सहवासाने, त्यांच्या नकारामागील मतितार्थ पुष्पाला नेमका कळतो. ती म्हणते,

`आण्णा मला कसला आलाय त्रास? आज काही शाळा नाही. आज मी घरून निघेन आणि मंडईत उतरेन. आंबे आले असले, तर घेईन, आणि तिथेच कॉलनीची बस करीन. ‘

आण्णांनी `ठीक आहे. ‘ अशा अर्थाने मान हलवली. कुणाही अपरिचिताला वाटेल, की हा संवाद, जो एका बाजूने शाब्दिक आणि दुसर्‍या बाजूने खाणा-खुणांच्या सहाय्याने चाललाय, तो बाप-लेकीतला, किंवा भावा-बहिणीत चालू असणार. किंवा निदान काका –पुतणी, मामा-भाची अशा अगदी जवळच्या नात्यातल्या व्यक्तींमध्ये चालू असणार. प्रत्यक्षात हा संवाद चालू असतो, गुरु-शिष्यामध्ये.

कधी काळी गुरूच्या आश्रमात गुरूची सेवा करत विद्यार्थी विद्या संपादन करत असत, असं आपण सगळ्यांनी वाचलय. आज एकविसाव्या शतकात गुरुजनंविषयी अलिप्ततेने, इतकेच नव्हे, तर तुच्छतेने, हेटाळणीने बोललं जाणार्‍या जमान्यात, गुरूविषयीच्या कृतज्ञतेने त्याच्या शारीरिकदृष्ट्या आपत्काळात, मुलगी, बहीण, आई होऊन त्यांची सेवा करणारी उज्ज्वला ही जगावेगळीच म्हणायला हवी. विशेषत: आयुष्यात दु:ख, कष्टच वाट्याला आल्यानंतर, विद्याभ्यास पूर्ण झाल्यानंतर, सुखाचे चार घास आता कुठे निवांतपणे खाण्याची शक्यता असताना आपला सुखाचा जीव सेवाव्रताच्या तप:साधनेत व्यतीत करणार्‍या उज्ज्वलाबद्दल बोलावं तेवढं थोडंच!

आण्णांनी आपल्या आयुष्यातील ४७ वर्षे शिक्षण क्षेत्रात काढली. आण्णा म्हणजे गो. प्र. सोहोनी. पुण्यातील कॅम्प विभागातील कॅम्प एज्यु. सोसायटी व त्याच संस्थेच्या सर राजा धनराज गिरजी हायस्कूल या दोन शाळांमधून त्यांनी अध्यापन केले. दोन्ही शाळा तशा तळा- गाळातल्या म्हणाव्या आशा. या शाळांमधून त्यांनी जवळ जवळ 35 वर्षे मुख्याध्यापक पदाची धुरा सांभाळली. निवृत्तीनंतर 5 वर्षे फलटण येथील मुधोजी हायस्कूलमध्ये त्यांना बोलवण्यात आले. त्यानंतर सरकारच्या विनंतीवरून सासवड येथे कंडेन्स कोर्ससाठी ते सासवडला गेले. स्वत: उत्कृष्ट शिक्षक होते, पण उत्कृष्ट अध्यापन एवढीच त्यांची खासियत नव्हती. ते आदर्श शिक्षक होते. आपल्या विद्यार्थ्यांवर वर मुलाप्रमाणे प्रेम करणारे होते. सेवानिवृत्तीनंतर सरकारच्या विनंतीवरून त्यांनी सासवड येथील कस्तुरबा विद्यालयाचा कारभार पाच वर्षे सांभाळला. इथे बहुतेक सर्व विषयांचे अध्यापन ते करीत. मुख्याध्यापक आणि वसतिगृहाचे रेक्टर याही जबाबर्‍या त्यांच्यावर होत्या. रुढार्थाने आपल्याला परिचित असलेल्या शाळांसारखी ती शाळा नव्हती. शालांत परीक्षेपर्यंत ज्यांचं शिक्षण पूर्ण झालेलं नाही, अशा असहाय्य, परित्यक्ता, विधवा स्त्रियांसाठी सरकारने हा अभ्यासक्रम सुरू केला होता. शाळा कोणत्याही इयत्तेत सोडलेली असली, तरी इथे दोन वर्षात दहावी-अकरावीचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेतला जाई. आणि दुसर्‍या वर्षी शालांत परीक्षेला बसवलं जाई. अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके, प्रश्नपत्रिका अन्य शालेय विद्यार्थ्यांच्याप्रमाणेच असत. विद्यार्थिनींसाठी वसतिगृहाची सोय होती. विद्यार्थिनींच्या राहण्या-जेवण्याचा सारा खर्च सरकार करत असे. आण्णा सुपरिंटेंडेंट म्हणून काम पाहत असत. त्यांची सहकुटुंब राहण्याची सोयही तिथेच केलेली होती. आण्णा आणि वहिनींच्या रुपाने शाळेत शिक्षण घेणार्‍या आणि वसतिगृहात राहणार्‍या विद्यार्थिनींना आई-वडलांचे छत्र लाभले होते. आर्थिक भार सरकारने उचलला असला, तरी मानसिक आधार, उमेद, उत्साह आण्णा-वहिनींनी त्या वेळच्या विद्यार्थिनींमधे वाटला.

आर्थिक कारणाने सरकारने सासवड येथे चालवलेली ही शाळा ७२ साली बंद केली. मग आण्णा-वहिनी पुण्याला त्यांच्या घरी आले. त्यानंतर त्यांच्या सासवडच्या किती तरी विद्यार्थिनी, कधी मुला-बाळांना घेऊन, कधी नवर्‍याला घेऊन आण्णांकडे यायच्या. उज्ज्वलाचे वडीलही पुण्यालाच राह्यचे. त्यामुळे एस. एस. सी. ची परीक्षा झाल्यावर, तीदेखील पुण्याला आली. उज्ज्वला काळे पुण्यातच होती. त्यामुळे तिचे येणे वारंवार घडू लागले. कधी मुलांना घेऊन, कधी वडलांना, कधी भावाला. असं होता होता, उज्ज्वला आणि तिचा परिवार आण्णांच्या गोतावळ्यात कधी मिसळून गेला, कुणालाच कळलं नाही.

आण्णा तिला एकदा म्हणाले, ‘नुसता एस. एस. सी. चा काय उपयोग? तू डी. एड. हो. ‘ नुसती सूचनाच नाही. तिच्या मागे लागून तिला डी. एड. ला प्रवेश घ्यायला लावला. तिचा अभ्यास करून घेतला. मग यथावकाश प्राथमिक शाळेत नोकरी, कायम होणं, हे सारं घडून गेलं. उज्ज्वलाचा संसार मार्गी लागला. हे सारं होईपर्यंत एखाद्या डोंगरासारखे आण्णा तिच्या मागे उभे राहिले. आण्णांचे हे ऋण उज्ज्वला नेहमीच मानते. ती म्हणते, `आण्णा नसते, तर लोकांच्या घरी धुणं-भांडी करून मला मुलांना वाढवावं लागलं असतं. ‘

उज्ज्वला मराठा समाजातली. वडील चांगले पदवीधर. पण समाजाची म्हणून एक रीत-भात असते. चाकोरी असते. तिचं लग्नं लवकरच, म्हणजे बाराव्या-तेराव्या वर्षी झालं. दोन मुले झाली आणि पठोपाठ वैधव्याच्या दु:खाला सामोरे जायची वेळ आली. आपघर उध्वस्त झाल्यावर बापघर जवळ करणं आलं. तिथे आसरा, तात्पुरता आधारही मिळाला. पण कुटुंब मोठं. मिळवता एकटा. आसरा मिळाला तरी आपल्या पिलांच्या चारा-पाण्याची व्यवस्था तरी आपल्याला बघायला हवी. त्यासाठी शिक्षण हवे. आईने मुलांना संभाळायचे मान्य केले आणि उज्ज्वला सासवडला राहिली. दोन वर्षात शालांत परीक्षा ती उत्तीर्ण झाली.

बुद्धिमान माणसे आपल्या कर्तृत्वावर पुढे जातात. सामान्य वकुब व कुवत असलेल्या व्यक्तींमध्ये चैतन्याची, जिद्दीची ज्योत पेटवावी लागते. `तू ही गोष्ट निश्चितपणे करू शकशील, असा आत्मविश्वास जागवावा लागतो. ‘ आण्णांनी उज्ज्वलाच्या बाबतीत नेमके हेच केले. उज्ज्वला सामान्य बुद्धीची मुलगी असली, तरी कष्टाळू होती. `परीक्षेत पास होणे मुळीच अवघड नाही’ असा विश्वास त्यांनी तिच्यात निर्माण केला. तिचा अभ्यास घेतला. तिला मार्गदर्शन केले. म्हणूनच ती म्हणते, `आण्णांमुळेच मी आज शिक्षिका म्हणून उभी आहे. एरवी मला इतरांच्या घरची धुणं-भांडी करून मुलांना वाढवावं लागलं असतं.

१९७७मध्ये आण्णांना अर्धांगाचा झटका आला. महिना-दीड महिना हॉस्पिटलमध्ये काढल्यावर आण्णा घरी आले. आपण कुणावर भार होऊ नये, असं आण्णांना सारखं वाटायचं. उजव्या हाताला पकड नव्हती आणि गिळण्याची क्रिया जवळ जवळ थांबली होती. पण प्रयत्नपूर्वक जेवणाच्या व्यतिरिक्त सर्व गोष्टी ते स्वत:च्या स्वत:च करू लागले. हा आघात त्यांची वाणी आणि त्यांची लेखणीही घेऊन गेला. उजव्या हाताची शक्तीच नाहीशी झाली. `महाराष्ट्र एज्युकेशन जर्नल’ या इंग्रजीतून प्रकाशित होणार्‍या नियतकालिकाच्या संपादनाचे काम ते गेले २५ वर्षे करत होते. इतकंच नव्हे, तर त्यातील लेखनही बव्हंशी ते एकटाकी करत होते. आता उजव्या हातांनी लेखन करणे अशक्य झाल्यावर त्यांनी आपल्या संपादकत्वाचा राजिनामा दिला.

 – क्रमशः भाग पहिला 

©  सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “एका टिंबामुळे पडणारा फरक…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

 

📚 वाचतांना वेचलेले 📚

☆ “एका टिंबामुळे पडणारा फरक…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

एका टिंबामुळे पडणारा फरक – –

आवरण आवरणं / साधणं सांधणं / शीळ शिळं / यात्रिक यांत्रिक / संख्या सख्या / निश्चित निश्चिंत / 

खाण खाणं / मेल मेळ मेलं / भाग भांग / हरण हरणं / देणं देण / वार. वारं / दगा दंगा / हंस ह्स / 

कस कसं / जात जातं जाते / सध्या संध्या / नागर नांगर / याच याचं / जंगले जगले / मंद मद / तळ तळं / एकात एकांत / संख्या सख्या सख्ख्या / जाळ जाळं / खोटं खोट / साग सांग / वदन वंदन / सार सारं / 

भाग भांग / पांडू पाडू /जून जुनं / शिक शिंक / भरत भरतं / खात खाते खातं / कस कसं / कडं कडे / बाधणे बांधणे / आयत आयतं / गड गंड / माडी मांडी / साधे सांधे / अशात अशांत / कायमच कायमचं / दुसऱ्याच ( दिवशी ) दुसऱ्याचं / सार सारं / डाबर डांबर / त्याच त्याचं त्याचे / स्वतःच स्वतःचं / ढंग ढग /

रग रंग / याच याचं / डाव डावं / कळत कळतं / जाण ( समज ) जाणं / होत होतं होते / बाधा बांधा / भांडं भाडं / बेबी बेंबी / नकोस नकोसं / संबंध सबंध / मंजूर मजूर / वश वंश / कोंबी कोबी

आडनावं = शेडगे शेंडगे, पागे पांगे, गावडे गावंडे

आहे की नाही गम्मत…….

लेखक : अज्ञात 

संग्रहिका : सौ. अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “नावात काय आहे?” ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? विविधा ?

☆ “नावात काय आहे?…” ☆ श्री सुनील शिरवाडकर

काही जणांना एक सवय असते. चित्रपट सुरु झाला.. टायटल्स संपले की मग आत.. म्हणजे थिएटर मध्ये जायचे. टायटल्स काय बघायचे असा त्यांचा समज असतो.

पण टायटल्स बघणंही बर्याच वेळा खुप इंटरेस्टिंग असतं. उदाहरणार्थ.. शोले. त्याची टायटल्स.. त्यावेळचं आरडीचं म्युझिक.. सगळंच अफलातुन होतं.

पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्यातुन बरीच वेगळी, रंजक माहिती आपल्याला मिळत असते. नवकेतन फिल्मस् ही देव आनंद, विजय आनंद यांची निर्मिती संस्था. त्यांच्या काही चित्रपटाच्या टायटल्स मध्ये.. उदा. गाईड.. ज्वेलथीफच्या टायटल्स मध्ये निर्मिती व्यवस्थापक म्हणून नाव येते यश जोहर यांचे.

काही काळाने मग याच यश जोहर यांचे टायटल्स मध्ये नाव झळकते ते ‘निर्माता’ म्हणून. आणि तो चित्रपट असतो.. दोस्ताना.

असेच एक निर्माते.. बोनी कपुर. त्यांचा चित्रपट सुरु होण्याआधी.. टायटल्सच्याही आधी स्क्रीनवर फोटो येतो.. गीताबालीचा. बोनी कपुर, अनिल कपुर यांचे वडील म्हणजे सुरींदर कपुर. फार पुर्वी ते या क्षेत्रात नवीन असताना गीताबालीचे सेक्रेटरी म्हणून काम करत. त्यावेळी गीताबालीने त्यांना खुप मदत केली होती. त्याची जाण ठेवून त्यांच्या प्रत्येक चित्रपटाची सुरवात होते ती गीताबालीच्या प्रतिमेपासुन.

अमिताभ बच्चन आणि विनोद खन्ना यांनी अनेक चित्रपटातुन एकत्र कामे केली. त्यावेळी विनोद खन्नाचा आग्रह असे.. टायटल्स मध्ये अमिताभ पुर्वी त्याचे नाव यावे.. कारण तो सिनिअर होता. पण कधी त्याचे ऐकले जायचे.. कधी नाही.

संगीतकार कल्याणजी आनंदजी यांच्याकडे सहाय्यक म्हणून लक्ष्मीकांत प्यारेलाल काम करायचे.. अगदी सुरुवातीच्या काळात. त्यावेळी टायटल्स मध्ये लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या नावालाच स्वतंत्र फ्रेम मिळावी असा कल्याणजी आनंदजी यांचा आग्रह.. आणि मोठेपणाही. नावात महत्त्व मिळाल्याने उमेद मिळते.. विश्वास वाढतो असं त्यांना वाटे.

आपल्या मुलाला.. म्हणजे कुमार गौरवला लॉंच करण्यासाठी राजेंद्र कुमारने चित्रपट बनवला.. लवस्टोरी नावाचा. त्याचा दिग्दर्शक होता.. राहुल रवैल. चित्रपट पुर्ण होत असतानाच निर्माता या नात्याने.. आणि वडील याही नात्याने राजेंद्र कुमारने काही बदल सुचवले. पण राहुल रवैलनै त्याला स्पष्ट नकार दिला. त्याचा राग मनात धरुन मग राजेंद्र कुमारने टायटल्स मधुन त्याचे नावच कट केले. ‘लवस्टोरी’ पडद्यावर झळकला.. पण दिग्दर्शकाच्या नावाविनाच.

‘नावात काय आहे?’ असं म्हणतात सगळेजणंच.. पण नावात खुप काही आहे.. किंबहुना नावातच सर्व काही आहे हेही सगळेजण जाणतात.

आणि हे जाणुन होता काशिनाथ घाणेकर. आपल्या नाटकाच्या श्रेयनामावलीत.. आणि थिएटरमध्ये होणाऱ्या अनाउंन्समेंटमध्ये आपले नाव सर्वात शेवटी यावे हा आग्रह त्याने शेवटपर्यंत ठेवला. थिएटरमधील अनाउन्समेंट मध्ये तर आपले नाव ऐकण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता.. आतुरता पहाण्यासाठी तो स्वतः आतुर असे. सर्व कलाकारांची नावे सांगुन झाल्यावर.. शेवटी मग नाव येई..

“… आणि डॉ. काशिनाथ घाणेकर. “

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ झोका… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? विविधा ?

☆ झोका… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

“ताई गुणाची माझी छकुली,

झोका दे दादा म्हणून लागली! ‌‌

सांभाळ ताई फांदी वाकली,

दोन्ही दोऱ्यांना गच्च आवळी! “

माझा मोठा मुलगा लहान असताना दोनच वर्षांनी झालेल्या त्याच्या धाकट्या बहिणीला झोका देताना हे गाणं म्हणत असे! त्याचे ते गोड, थोडेसे बोबडे शब्द ऐकताना मला खूप छान वाटत असे!

प्रत्येक लहान मुलाला झोक्याचं खूप आकर्षण असतं. अगदी छोटं असताना पाळण्यात झोपलेल्या बाळाला झोके देताना मनामध्ये उठणारे वात्सल्याचे तरंग बाईला अनुभवता येतात! झोक्याच्या तालावरती गाणं म्हणताना, अंगाई गीत गाताना आईला होणारा आनंद अवर्णनीयच असतो. हा तर मोठेपणचा अनुभव!

पण आपल्या प्रत्येकाचं बालपण हे असं झोक्याशी बांधलेलं असतं! प्रथम पाळणा, नंतर झुला, झोपाळा 

यावर झुलता झुलता आपण कसं मोठं होतो कळतच नाही! माझ्या आठवणीतलं अजूनही आजोळी गेल्यावर माजघरात बांधलेला झोपाळा हे माझं आवडतं ठिकाण होतं! मामाच्या मांडीवर डोकं ठेवून झोपाळ्याचे झोके किती वर्ष घेतले असतील हे आठवलं की अजूनही वाटतं तो बालपणीचा झोपाळा आपला खरा सवंगडी आहे! सुदैवाने अजूनही वयस्कर असलेला माझा मामा आजोळी गेले की हे लाड पुरवतो!

… आपल्या मनाची स्पंदनं म्हणजे एक लयबद्ध झोका असतो. मनात उमटणारे विचार तरंग एखाद्या झोक्याप्रमाणे लयबद्धपणे मागेपुढे होत राहतात. आणि आपोआपच मूड चांगला येतो… आणि लिखाण होते. माझ्या बाल्कनीत बांधलेला झोका हा माझा खूप आवडता आहे. तिथून दिसणारे मोठे ग्राउंड, तिथे असणारी गुलमोहराची झाडे तसेच बहाव्याची आणि इतरही मोठी झाडे, त्यावर बसणारे पक्षी, वरचेवर होणारे भारद्वाजाचे दर्शन हे सर्व माझे झोक्यावरून दिसणारे साथीदार आहेत….

“खोप्यामध्ये खोपाबाई सुगरणीचा चांगला… ” या गीतात बहिणाबाई सुगरणीच्या खोप्याचं वर्णन करतात आणि तो झाडाला टांगलेला कसा असतो तो आपल्या नजरेसमोर उभा राहतो. अशी झुलणारी त्यांची घरं पाहिली की खरोखरच तो झाडाला टांगलेला बंगलाच वाटतो!

फार पूर्वी प्रत्येक घराला एक झोपाळा असेच असे. दुपारच्या वेळी घरातील एखादे आजी आजोबा त्या झोपाळ्यावर विश्रांती घेत असत, तर संध्याकाळच्या वेळी घरातील बालगोपाळांना झोक्यावर बसून परवचा, पाढे, शुभंकरोती म्हणण्यासाठी जोर येई! झोक्याच्या तालावर आणि वेगावर मोठमोठ्याने पाढे म्हणण्यात खूप मजा येत असे.. हळूहळू घरं लहान झाली आणि हा माजघरातला झोपाळा दिसेनासा झाला!

मग कुठे लहान बाळासाठी दाराला बांधलेला छोटासा झोका दिसे किंवा झोळी बांधलेली असे… हे आपलं दुधाची तहान ताकावर भागवल्यासारखं वाटे!

पूर्वीच्या काळी मोठ्या वाड्यातून पितळी कडी असलेला सागवानी झोपाळा म्हणजे घराचे वैभव असे.

घरात मोठी माणसं नसली की स्त्रिया झोपाळ्याचा आनंद घेत. एरवी झोपाळा म्हणजे घरातील मोठ्या माणसांचे विरंगुळ्याचे ठिकाण आणि ते नसतील तेव्हा लहान मुलांचे बागडायचे हक्काचं स्थान!

मनामध्ये येणाऱ्या विचारांचं वर खाली येणं हा तर मनाचा झोका! त्याची आवर्तन किती उंच जातील सांगता येत नाही. ‘आता होता भुईवर, भेटे आभाळाला’असं त्याचं अस्तित्व!

“एक झोका… एक झोका.. चुके काळजाचा ठोका, एक झोका…. “

“.. चौकट राजा” या सिनेमात स्मिता तळवलकर यांनी या झोक्याचा कथेसाठी फार सुंदर उपयोग करून घेतलेला आहे!

एखाद्या छोट्या अपघातामुळे एखाद्याचे आयुष्य कसे बदलून गेले, ही गोष्ट त्या सिनेमांमध्ये इतकी आर्ततेने दाखवली आहे की संपूर्ण चित्रपट भर ती झोक्याची आंदोलनं मनामध्ये फिरत राहतात! अजूनही आठवणीतल्या सिनेमांमध्ये हा दिलीप प्रभावळकर आणि स्मिता तळवलकर यांचा झोका रुतलेला आहे…

नागपंचमीचा झोका हा पूर्वीपासूनच मुलींच्या खेळाचे आवडते ठिकाण असे. अजूनही लहान गावातून खेड्यापाड्यातून झाडाला मोठे-मोठे झोके बांधून झोके खेळले जातात, त्यामुळे मनाला तर आनंद मिळतोच पण आपली शारीरिक क्षमता ही वाढवली जाते! नागपंचमी च्या 

निमित्ताने माझा मनाचा झोका ही मस्त झोके घेऊ लागला आणि एकेका झोक्याबरोबर आठवणी ही मनात झुलू लागल्या…

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-८ ☆ सौ राधिका-माजगावकर-पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-८ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

मनातलं शब्दात..

असलेली नाती जपणं माणसं जोडणं, केव्हां कुणाची गरज लागेल सांगता येत नाही या धोरणांनी मैत्री वाढवणं, ही भावना मनांत जपणारी अशी ती पिढी होती. सहकार्याची वृत्ती असल्यामुळे आपआपसांतलं प्रेम वाढत होत. प्रिय मित्र आपल्या बरोबरीने चालत राहून, सगळ्या परिस्थितीत आपल्याला साथ देतात. तीच खरी मैत्री असते हो ना ?अशा आदर्श मैत्रीची जोडी आमच्या आईची आणि शांतामावशिची होती. खेरवाडीला चौथीपासून सुरू झालेली त्यांची मैत्री ऐंशी वर्षापर्यंत टिकली. म्हणजे सातव्या वर्षापासूनची मैत्री अतूट पणे 80 वर्षापर्यंत त्यांनी टिकवली. दोऱ्यात ओवलेलं साध मणी मंगळसूत्र आईच्या गळ्यात असायचं तर, शांतामावशी नखशिखांत सोन्याने मढलेली असायची. लष्करमधलं तिचं राजेशाही घर आमचं आकर्षण होत. ‘भरपूर चाला आणि फिट राहा ‘ हा कानमंत्र आईनानांनी आमच्या मनांत बालपणापासूनच रुजवला. बसचे दहा पैसे वाचवून लष्करला जाताना आई आमच्या हातात हरबऱ्याची गड्डी ठेवायची आणि म्हणायची, “हरबरा खात खात पायी जायचय बरं का आपल्याला.! ” लष्कर’ ह्या नावातच एक थ्रिल होतं ते ‘कॅम्प’ या शब्दाला येणार नाही. आत्ताच्या कॅम्प मध्ये जाताना अरुंद रस्ते, गर्दी, प्रदूषणामुळे होणारी गुदमर, जीव गुदमरून टाकणारा रस्ता, नक्को वाटतो. आता लोकं कायम ‘कॅम्प ‘ मध्ये खरेदी करायला दोन पायाची, दोन चाकी नाही वापरत, तर कारची चारचाकी वापरल्याशिवाय पुढे सरकत नाहीत.

तर काय सांगत होते हरबऱ्याची गड्डी घेऊन पोपटसर रंगाचे कोवळे दाणे अलगद जिभेवर ठेवून, खातांना तोंड चालायचे, दाणे सोलताना हात आणि चालताना पाय चालायचे. असा सहजसुंदर व्यायाम व्हायचा. आणि रस्ता मजेत सरसर सरायचा. जोगेश्वरी पासून सुरू झालेली आमची पावलं शिरीन टॉकीज अपोलो टॉकीजपाशी रंगीत पाट्या बघायला रेंगाळायची. पुढचं आकर्षण होतं, भोपळे चौकातल्या हेss भल्या मोठ्या लाकडी भोपळ्याचं. कवेत मावणार नाही असा भला मोठा भोपळा चौकांत कायम ठाण मांडून असायचा, ‘मेन स्ट्रीट’ वरून पळणाऱ्या चकचकीत गाड्या, मोठमोठे रस्ते आणि काउंटरवर गल्ला खुळखुळवत रुबाबात बसलेले गुलाबी, गोरे पारशी आणि त्यांच्या समोरच्या चॉकलेट, गोळ्या, क्रीमरोलने भरगच्च भरलेल्या बरण्या आमचं लक्ष वेधून घ्यायच्या. आई म्हणायची ” वेंधळ्यासारखे इकडे तिकडे बघत चालू नका. समोरून बर्फाची बैलगाडी येतीय, बैलांना द्या उरलेली हरभऱ्याची गड्डी. स्वच्छ रस्त्यावर असा कुठेही कचरा टाकायचा नसतो बरं का! . हं हे बघा! आलं आता मावशीच घर. ” … चढतांना आम्ही आरोळी ठोकायचो, “मावशी आम्ही आलो ग! “आणि मग दिलखुलास हसणारी मायसारखी माया करणारी ती माउली आम्हाला कुशीत घ्यायची. शांतामावशी आमची सख्खी मावशी नाही, आईची बालमैत्रीण आहे हे कुणाला सांगूनही खरं वाटायचं नाही. अशी माणसं, अशी निर्मळ, कृष्ण सुदाम्यासारखी मैत्री शोधूनही सापडणार नाही. ही मावशी नवरात्रात कार मधून, नऊ दिवस नित्यनेमाने जोगेश्वरीला यायची. मारुतीच्या शेपटासारखी लांबलचक, अगदी गणपती चौकापर्यंत पोहोचलेल्या, बायकांच्या रांगेत नथीचा आकडा सांभाळत, ओटीचं ताट सावरत उभी असलेली गोरीपान शांतामावशी उन्हाने लालेलाल व्हायची, खिडकीतून डोकावणाऱ्या आईचा जीव मैत्रिणीचा चेहरा बघून कासाविस व्हायचा. माठातल्या थंडगार पाण्याचा तांब्या आणि जिभेवर विरघळणारी आलेपाक वडी आई आमच्या हातून शांतीकडे पाठवायची. गौरी गणपतीच्या वेळेला तर त्यांच्या प्रेमाला उत्साहाला भलतच ‘ ‘भरतं ‘ यायचं. आमच्याकडच्या सवाष्णीला पुरणावरणाचा स्वयंपाक करून, जेवायला घालून, आई सवाष्ण म्हणून लष्कर मध्ये जायची आईचा पदर धरून आमच शेपूट बरोबर असायचचं. तेव्हा मात्र जाताना आई टांगा करायची. टकॉक.. टकॉक घोड्याच्या टापावर चालणारा टांगा आमच्यासाठी महारथ असायचा. आईसाठी पण ‘लष्कर’ मध्ये जाणं म्हणजे आनंदाची पर्वणी होती. सगळ्यांना पोटभर जेवायला घालून शांतामावशी आईची तिला चौरंगावर बसवून घसघशीत ओटी भरून, साडी चोळी देऊन मैत्रिणीला माहेरवाशिणीचा मान द्यायची. काही वेळा सख्ख्या नात्यापेक्षाही मानलेली नाती श्रेष्ठ ठरतात, नाही का?..

80 व्या वर्षांपर्यंत ही मैत्री अखंड चालू होती. दुर्दैवाने आमची आई आधी गेली. शांतामावशी म्हणाली, “माझी काठीच गेली आता मी कशाला जगु ? आणि खरंच भुतलावर तुटलेला धागा पुन्हा जोडण्यासाठी, मावशी पण आईच्या पाठोपाठ लगेचचं देवाघरी गेली. आणि आम्ही खऱ्या अर्थाने पोरक्या झालो. आई आम्हाला सोडून गेली, मावशी पण गेली. मनाला समजवावं लागतय, आता आई जोगेश्वरी हाच आपला आधारवड आहे. तिच्या चरणावर माथा टेकवून मी प्रार्थना करते…. “जय अंबे आई जोगेश्वरी तुझ्या मायेची पाखर सतत आम्हाला मिळू दे”.

– क्रमशः भाग आठवा

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “आईची आठवण.. आणि राजा केळकर म्युझियम…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “आईची आठवण.. आणि राजा केळकर म्युझियम” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

माझी आई सौ. कमल पुरुषोत्तम कुलकर्णी ही कलाकार होती.

ती कापडाच्या बाहुल्या करत असे त्यात मणीपुरी, शेतकरीण, नववधु, भरतनाट्यम् करणारी नर्तकी असे विविध प्रकार होते. अनेक ठिकाणी प्रदर्शनात तिला बक्षीसं मिळाली होती.

ती केप्रच्या कागदाची फुले करुन त्याच्या वेण्या करत असे व तुळशीबागेतल्या दुकानात विकायला ठेवत असे. सिंधुताई जोशी यांच्या कामायनी या मतिमंद मुलांच्या शाळेत ती मुलांना अनेक वस्तू शिकवायला जात असे. आई भरतकाम आणि क्रोशाचे काम फार सुरेख करत असे. तिनी क्रोशानी फुलं विणून, त्याला कडेनी जाड लाल कापड लावून वेगळाच सुरेख पडदा केला होता. दुसरा एक पडदा होता. त्यावर तिने पॅचवर्कनी एक कोळीण केली होती. तो पण अप्रतिम होता. दोन्ही पडदे वेगळेच होते.

बरेच दिवस ते पडदे माहेरी होते. नंतर भावानी ते मला दिले.

मैत्रिणींना आल्या गेलेल्यांना ते दाखवले. नंतर ते कपाटात ठेऊन दिले. इतकी मेहनत घेऊन आईनी केलेल्या ह्या सुरेख पडद्याचे काय करावे हे समजत नव्हते.

एके दिवशी मनात विचार आला की हे म्युझियममध्ये दिले तर….

…. ते पडदे घेऊन मी राजा केळकर म्युझियमला गेले.

त्यांनी ते पाहिले.

ते म्हणाले

“आमची कमिटी असते. त्या कमिटीची मिटींग होते. ते ठरवतात की हे त्या योग्यतेचे आहेत की नाहीत. तुम्ही हे ठेऊन जा “

“हो चालेल.. “अस म्हणून पडदे त्यांना देऊन मी घरी आले.

आणि काही दिवसांनी मला त्यांचा फोन आला.

” तुमच्या आईचे पडदे आम्ही स्वीकारले आहेत. ” तसे पत्रही त्यांनी मला पाठवले.

मला फार फार आनंद झाला.

आज ते पडदे राजा केळकर. म्युझियममध्ये काचेच्या शोकेस मध्ये दिमाखात लावले आहेत.

टेक्सटाइल विभागात जाऊन तुम्ही जरुर पहा.

राजा केळकर म्युझियम खूप छान आहे. एकदा अवश्य पाहुन या.

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print