मराठी साहित्य – विविधा ☆ “नाते जुळले…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “नाते जुळले…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट

आपल्याकडे सहसा नातं म्हणजे जन्मापासून रक्ताचं असलेलं वा विवाहानंतर जोडल्या गेलेलं. ह्या संकल्पनेवरच आधारित नाती टिकतात, तीच योग्य असतात ही आपली संस्कृती शिकविते. परंतु विदेशात मात्र ह्या नात्यांइतकच किंबहुना मनाचे मनाशी जुळलेले नातं, पटणारे विचार ह्याला जास्त प्राधान्य दिलं जातं. आपल्या संस्कृतीत वर उल्लेखल्या प्रमाणे आपल्याकडे असणाऱ्या  नात्यांना मान्यता असते.परंतु विदेशात मात्र तसं नसतं तिकडे अजून एक नात ह्या नात्याइतकचं किंबहुना जरा काकणंभरं जास्त सुद्धा  जपल्या जातं, मानल्या जातं. हा भिन्न संस्कृती मधील विचारांचा फरक आहे. अर्थातच प्रत्येकाला आपापले विचार, आपापलं वागणं,आपापली संस्कृती हीच योग्य असं वाटत असते. प्रत्येक भिन्न टोकांच्या गोष्टींमध्ये काही प्लस आणि काही मायनस पाँईंट हे असतातच.

ह्या नात्यांच्या गुंफणीवरुंन मला एक मस्त गोष्ट वाचलेली आठवली. अर्थात गोष्ट आहे विदेशातील. तिकडच्या वहिवाटीप्रमाणे अनोख्या नात्यांमधील एका महत्वाच्या नात्यांनी जोडल्या गेलेली एक जोडगोळी “लव्ह इन रिलेशनशीप” मध्ये एकत्र राहात असते. अर्थातच हा निर्णय घेतांना त्यांचे पटणारे विचार त्यांच्या जुळणा-या आवडी ह्यांना विशेष प्राधान्य देऊन एकमेकांवर भरपूर प्रेम करीत पण एकमेकांची स्पेसही तितकीच महत्वाची हे ओळखून ही जोडगोळी आपल्याच विश्वात दंग होऊन एकत्र गुण्यागोविंदाने, प्रेमानं राहातं होती,आपल्या भाषेत नांदत होती.  ह्यामध्ये  अजून एक गोष्ट सामावली होती,किंबहुना ती गोष्ट होती म्हणूनच ते एकत्र आले होते,राहात होते,ती गोष्ट म्हणजे प्रत्येक बाबतीत परस्परांवर असलेला दृढ विश्वास. हा दृढ विश्वासच त्यांना

त्यांच्या प्रेमाची खात्री पटवून देत होता. दृढ विश्वास ठेवणे आणि अपेक्षांचा अतिरेक न करणे ह्या दोन्ही गोष्टी दोन्हीही कडून काटेकोरपणे पाळल्या मात्र जायलाच हव्यात.

प्रत्येकाच्या जीवनात चढउतार हे असतातच. सगळे दिवस हे सारखे न जाता त्यात विवीधता सामावलेली असते.अर्थात असं असतं म्हणूनच हे जीवनं निरस,सपक न वाटता छान जगण्याची ओढ वाटतं असलेलं आणि आव्हानात्मक हवहवसं वाटतं. ह्या जोडगोळी मधील त्या दोघांची नाव तो “जीम”आणि  ती “मेरी”.

तर जीम आणि मेरी ह्यांची आपापली कामं ,आपापल्या नोक-या ह्या सूरू असतांना त्यात अडचणी पण असतातच परंतु त्यातून मार्ग काढीत ही मंडळी आपल्याला हवा तसा आनंद मिळवत असतं,तो मनापासून स्विकारुन जीवन आनंदात घालवतं होते. नोकरी सुरू असतांना वाढत्या महागाई मुळं जीमला त्याची कमाई ही अपुरी पडायला लागली. नोक-या, महागाई, संकटांना तोंड देणं,त्यातून मार्ग काढणं ह्या गोष्टी तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही राहा ,ह्या  अटळच. जीम ठरवितो आज काहीही झालं तरी पगारवाढीबद्दल बोलायचचं. त्यामुळे

तो जरा सकाळपासूनच नर्व्हस असतो,ही मनातली घालमेलं मेरी ने ओळखलेली असते, नजरेनं सुद्धा टिपलेली असते. ती निघतांना काहीही न बोलता फक्त जीमच्या हातावर थोपटून त्याला दिलासा देते.काय नसतं त्या स्पर्शात, तो स्पर्श असतो भक्कम पाठिंब्याचा, काहीही झालं तरी टिकणा-या दमदार साथसंगतीचा.

बरेचदा आपण एखाद्या गोष्टीचा बाऊ करतो,टेंशन घेतो पण ती  समस्या कधीकधी अनपेक्षितरित्या चुटकीसरशी सुटते.जीमने बाँसला पगारवाढीबद्दल बोलल्यावर बाँस ने जीमचं जीवतोडून कामं करणं आणि वाढती महागाई ओळखून त्याचा पगार जीमच्या अपेक्षेनुसार कुठलीही खळखळ न करता वाढवून दिला. मोठ्या आनंदाने जीम घरी जायला निघाला. त्याच्या येण्याच्या वेळी मेरी जेवणाची जय्यत तयारी करून ठेवते.आज सगळा मेन्यु साग्रसंगीत त्याला आवडणारा करते,त्याला जसं हवं असतं तसं प्रफुल्लित वातावरण तो घरी यायच्या वेळी तयार करते.ती पण तशी टेन्स मध्येच असते आज बाँस जीमला काय म्हणतोय ह्या विचारांनी.पण बेल वाजल्यानंतर मात्र ती आपला चेहऱ्यावरील ताण काढून टाकून प्रसन्न, हसतमुख मुद्रेने जीमचं स्वागत करते. जीम ची मनस्थिती आधीच प्रफुल्लित असतेच आणि आता ह्या विशेष आवडणा-या वातावरण निर्मीतीमुळे तो जास्त आनंदित होतो.मेरी त्याला टेबलवर सगळं त्याच्या आवडीचं सर्व्ह करते आणि मग टेबलवर त्याच्यासाठी स्वतः लिहीलेली चिठ्ठी ठेवते. जणू ती चिठ्ठी त्याची वाटच बघत असते. त्या चिठ्ठीत लिहीलं असत़ं,” मला खात्री होतीच हे यश तुला मिळणारचं .तुझं अभिनंदन आणि हो मी कायम तुझ्याबरोबर आहे.” त्याला खूप आश्चर्य वाटतं मेरीला पगारवाढीबद्दल आधीच कसं काय कळलं?

तो ह्या विचारात असतांना मेरी डेझर्ट आणण्यासाठी आत जातांना तिच्या गाऊन मधील खिशातून दुसरी चिठ्ठी पडते.ती चिठ्ठी उचलून जीम ती वाचतो आणि अतीव प्रेमाने त्याच्या डोळ्यात पाणी तरळतं. त्या दुसऱ्या चिठ्ठीत लिहीलं असतं “जीम काळजी करु नकोस,एकवाट बंद झाली तरी दुसऱ्या नवीन वाटा उघडतात, आपण ह्यातुनही मार्ग हा काढूच,मी कायम तुझ्याबरोबर आहे.” म्हणजेच काय तर मेरी ही कुठल्याही परिस्थीतीत त्याच्या बरोबरच असणार होती.आणि हा दिलासा, विश्वास आयुष्यभरासाठी पुरून उरतो.

खरचं कुठल्याही नात्याचं असं घट्ट बाँडींग असेल नं तर ते नातं तकलादू न राहाता त्याचा पाया हा भक्कमच राहात़ो. एक नक्की समजलं नातं हे कुठलही,कोणतही असो,सख्खं असो वा बंधनातून जुळलेलं त्याचा पाया हा खूप महत्वाचा.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून  ☆ “आठवण” … लेखक : श्री सुधीर रेवणकर ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

? मनमंजुषेतून ?

 ☆ “आठवण” … लेखक : श्री सुधीर रेवणकर ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

“ मी वर जाईन ना… तेव्हा आठवतील माझे शब्द. मग बस रडत……. “

‘ दे वो माय ‘ असा शब्द लहानपणी ऐकू आला की आई बोलायची, “ बघ रे काही असेल. एखादी पोळीभाजी देऊन टाक तिला.”

मी नेहमी कंटाळा करायचो.

“ उठतो का आता ? “ मी तणतण करत जे असेल ते द्यायचो. 

“ असे करू नये. आपल्यातला एक घास दुसऱ्याला दिला, तर देव कोणत्याही रुपात येऊन आपल्या ताटात दोन घास टाकून जातो.”

मी उर्मटपणे बोलायचो… “ आई, दोन पोळ्या दिल्यात भिकारणीला. बघू तुझा गणपती बाप्पा किती पोळ्या टाकतो माझ्या ताटात. “

“ आई म्हणायची, मी जिवंत आहे तोपर्यंत टाक. मी गेल्यावर कूण्णाला ही देऊ नको. मी जाईल ना मग आठवतील माझे शब्द.”

दरवेळी भिकारी दारावर आले की जुनी साडी दे, जुनी चादर दे , स्वेटर दे. मग आमचे वादविवाद. वय होत आले, तसे मी तिच्यावर रागावणे कमी केले. दारावरचे भिकारी पण कमी होत गेले. 

मग एक दिवस आई गेली. मी ठरवले तिच्या आवडत्या तीर्थक्षेत्र आणि नद्यांमध्ये अस्थीविसर्जन करायचे. नाशिक, पंढरपूर झाले आणि मी काशीला पोहचलो. भर पावसाळा चालू. मी सगळे विधी करून परत निघालो. ट्रेन सकाळी दहा ला, पण चार तास लेट. मी प्लॅटफॉर्म वरूनच एक व्हेज पुलावचे पॅकेट घेतले. थोडे केळं घेतलेत आणि जिन्याच्या पायरीवर बसून राहिलो. 

काही वेळाने एक बाई आणि कडेवरचे पोरगं माझ्याजवळ थांबून काही खायला मागू लागले.  मी नकळतच पुलाव पॅकेट, पाणी, चार पाच केळी पण तिला देऊन टाकली. दोघे ही पुढे निघून गेलीत. वाराणसी ते ठाणे दीड दिवसांचा प्रवास. स्टेशनं भरपूर. मनात म्हटले, खाऊ काहीतरी नंतर. पाचच्या आसपास ट्रेन आली. मी ज्या कंम्पार्टमेंट मध्ये होतो, तिथे तरुण नवरा नवरी आणि त्याची म्हातारी आई आमच्या गप्पा सुरु झाल्या. त्यांना शिर्डीला जायचे होते.

मी सगळी माहिती सांगितली. त्यांनी पण हिंदीतून विचारले मी का आलो वाराणसीला. मी पण सांगितले की अस्थिविसर्जित करायला आलो होतो. सात वाजता चहा वाला आला. मी दोन कप घेतले बॅगमधून अर्धा उरलेला पार्ले G खाल्ला. परत एक कप चहा प्यायलो. 

आठ-साडेआठला बोगीत सगळ्यांनी डब्बे उघडून खायला सुरवात केली. मी पार्लेवरच झोपणार होतो. पुढच्या स्टेशनला घेऊ बिस्कीट म्हणून शान्त बसलो. इकडे सुनबाई मुलाने डब्बा काढला, पांढऱ्या केसांच्या आजीला बघून मला आईची आठवण येतच होती. 

सून, मुलगा आणि म्हातारीने एकमेकांना खूण केली . पोरीने चार प्लास्टिकच्या प्लेट वाढल्या. पुरी भाजी, चटणी ,लोणचे एक स्वीट, काही फ्रुट कापून प्लेट मध्ये सजवले आणि मुलाने आवाज दिला, “ अंकल हात धो लिजीए और खाना खाईए .”

मी नको नको म्हंटले तरी त्यांनी जेवायलाच लावले. मी पोटभर जेवलो. अवांतर गप्पा झाल्या. मी  वरच्या बर्थ वर झोपायला गेलो. सगळे झोपायला लागलेत. लाईट बंद झालेत. मी चादरीच्या कोपऱ्यातून हळूच खाली पाहिले. म्हातारी सेम टू सेम..

डोक्याखाली हाताची उशी घेऊन झोपलेली. अगदी माझ्या आईची आवडती सवय. आपण एक घास कोणाला दिला तर देव कोणत्याही रुपात येऊन आपल्या ताटात दोन घास टाकतो. एक छोटे पॅकेट काय त्या मायलेकाला दिले तर आजीबाईने ताट भरून जेवू घातले. 

बाहेर चिक्कार पाऊस आणि गेले दोन महिने आईच्या आठवणींचा मनात रोखलेला पाऊस दोघेही मग डोळ्यावाटे मुसळधार बरसू लागलेत. 

आई नेहमी म्हणायची…. “ मी जाईन ना वर, तेव्हा आठवतील माझे शब्द. मग बस रडत….. “

लेखक : श्री सुधीर रेवणकर

संग्राहक : श्री माधव केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भारतरत्न किताबाचे उपेक्षित मानकरी –  भाग-1 – लेखक : श्री सुभाषचंद्र सोनार☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ भारतरत्न किताबाचे उपेक्षित मानकरी –  भाग-1 – लेखक : श्री सुभाषचंद्र सोनार☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

भारतरत्न किताबाचे उपेक्षित मानकरी : …. नाना जगन्नाथ शंकरशेठ. 

आपण एतद्देशीय लोक जगन्नाथ शंकरशेठ यांचे अत्यंत ऋणी आहोत. कारण ज्ञानाचे बीज पेरण्यात ते अग्रेसर होते; इतकेच नव्हे तर सध्या त्याची जी जोमाने वाढ झाली आहे त्याचे सर्व श्रेय त्यांनाच आहे.

– दादाभाई नौरोजी

आमच्या जातिव्यवस्थेचा डंख, महामानवांनाही चुकला नाही. परिणामी सामान्य माणसासारखी, असामान्य माणसं देखील, जातिव्यवस्थेची बळी ठरली आहेत. आमच्या देशात नावलौकिकासाठी, व्यक्तीचं नुसतं कार्यकर्तृत्व पुरेसं नसतं. तर त्याला जातीच्या प्रमाणपत्राचीही जोड असावी लागते. जातीचं प्रमाणपत्र हे अनेकदा, प्रगतीपत्रकावरही कुरघोडी करतं. तुमच्याकडे प्रस्थापित जातीचं प्रमाणपत्र असेल, तर मग तुमच्या राई एवढ्या कर्तृत्वाचेही पर्वत उभे केले जातील. आणि ते नसेल, तर तुमच्या पर्वता एवढ्या कर्तृत्वाचीही राई राई केली जाईल. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे नाना जगन्नाथ शंकर शेठ!

आज नाना जगन्नाथ शंकर शेठांची २१२ वी जयंती. हे नाना कोण? असा प्रश्न काहींना पडेल, तर काही म्हणतील हे नाव ऐकल्यासारखं वाटतं, पण हे गृहस्थ कोण ते मात्र आठवत नाही. नानांचं योगदान आणि कार्यकर्तृत्वाचा परिचय असणारेही आहेत, पण थोडेच.

मित्रहो, नानांची एका वाक्यात ओळख सांगायची तर, नाना जगन्नाथ शंकर शेठ हे भारतीय रेल्वेचे जनक आहेत, एवढं सांगितलं तरी पुरेसं आहे. पण ते नानांच्या कार्यकर्तृत्वरुपी हिमनगाचं फक्त टोक आहे. एवढं नानांचं योगदान विशाल आहे.

१० फेब्रुवारी १८०३ रोजी मुंबईत, एका धनाढ्य सोनार (दैवज्ञ) परिवारात, नानांचा जन्म झाला. कुशाग्र बुद्धीच्या नानांचं शिक्षण घरीच झालं. तरुणपणी आपला वडीलोपार्जित व्यापाराचा वारसा तर नानांनी समर्थपणे चालवलाच, पण समाजकारण, अर्थकारण, राजकारण, शिक्षण, कला, विज्ञान अशा जीवनाच्या अनेक क्षेत्रात, त्यांच्या अश्वमेधी अश्वाने निर्विघ्न संचार करुन, नानांच्या कार्यकर्तृत्वाची पताका चौफेर फडकवली. त्यामुळेच आचार्य अत्रेंनी ‘मुंबईचा अनभिषिक्त सम्राट’ असं त्यांचं सार्थ वर्णन केलं आहे.

नाना हे फक्त धनाढ्य नव्हते, गुणाढ्यही होते. नाना इतके धनाढ्य होते की, प्रसंगी इंग्रज सरकारलाही ते अर्थसहाय्य पुरवित, आणि नाना इतके गुणाढ्य होते की, अनेक महत्वपूर्ण प्रश्नांवर इंग्रज अधिकारी, नानांशी परामर्श करीत. नाना जणू त्यांचे थिंक टँक होते. धनाचा आणि गुणांचा असा मनोरम आविष्कार क्वचितच पहायला मिळतो.

मुंबई या आपल्या जन्मभूमि आणि कर्मभूमिवर नानांचं निरतिशय प्रेम होतं. भारतात सुरु होणा-या नव्या गोष्टींचा मुळारंभ, हा मुंबईपासूनच झाला पाहिजे, हा नानांचा ध्यास होता. इंग्रजांची भारतातील राजधानी कलकत्ता होती. तरीही या देशात रेल्वेचा मुळारंभ मुंबईपासून झाला, त्याचं सर्व श्रेय नानांना आहे. हे पाहून मला मेहदी हसन यांच्या गजलेतील — 

‘मैंने किस्मत की लकीरों से चुराया है तुझे।’

—- या काव्यपंक्तींचं स्मरण होतं.

आज रेल्वे ही मुंबईची लाईफलाईन (जीवनरेखा) बनली आहे. पण खरोखरच ‘दैवज्ञ’ नानांनी, नियतीच्या हातातली लेखणी काढून घेऊन, स्वहस्ते ती जीवनरेखा मुंबईच्या करतलांवर रेखली आहे. त्यासाठी आपल्या संवादकुशलतेने त्यांनी इंग्रज अधिका-यांचं मन वळवलं. त्यांना सर्वप्रकारच्या सहकार्याचं आश्वासनही दिलं. त्यासाठी १८४३ साली ग्रेट ईस्टर्न रेल्वे कंपनीच्या स्थापनेसाठी पुढाकार घेतला. नुसता पुढाकारच घेतला नाही, तर या कंपनीच्या तीन प्रवर्तकांपैकी एक प्रवर्तक नानाच होते. तसेच रेल्वेच्या कार्यालयासाठी स्वत:च्या घरात जागा उपलब्ध करुन देऊन, नानांनी रेल्वेच्या मार्गातील तोही अडथळा दूर केला. अशाप्रकारे १६ एप्रिल १८५३ रोजी, मुंबई-ठाणे या मार्गावर धावलेली ही रेल्वे, फक्त भारतातील पहिली रेल्वे नव्हती, तर आशिया खंडातील पहिली रेल्वे होती. मुंबई आणि पुणे या दोन महानगरांना जोडणा-या, बोरीबंदर-पुणे या रेल्वेमार्गाचे जनकही, नानाच आहेत. नानांच्या या बहुमोल कार्याचा गौरव इंग्रज सरकारने सोन्याचा पास देऊन केला. त्यायोगे नानांना रेल्वेच्या पहिल्या वर्गातून, प्रवासाची सुविधा सरकारने उपलब्ध करुन दिली.

नानांच्या लोककार्याच्या यज्ञाची सांगता इथेच होत नाही, तर मुंबई विद्यापीठ, ग्रँट मेडिकल कॉलेज, लॉ कॉलेज, जे. जे. स्कूल अॉफ आर्टस, एल्फिन्स्टन कॉलेज या शिक्षणसंस्थांच्या उभारणीत, नानांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. स्रीशिक्षणाचेही नाना पुरस्कर्ते होते. मुलींसाठी त्यांनी स्वखर्चाने स्वत:च्या घरात शाळा सुरु केली. तसेच मुलींसाठी शाळा सुरु करणा-या रेव्हरंड विल्सन यांना शाळेसाठी, गिरगावात जागा उपलब्ध करुन दिली. तत्पूर्वी सन १८४६-४७ मध्ये नानांनी महाराष्ट्रभर हिंडून, शैक्षणिक परिस्थितीची पहाणी करुन, आपले अनुभव बोर्ड अॉफ एज्युकेशनचे अध्यक्ष, सर अर्स्किन पेरी यांना कळविले. त्यातूनच महाराष्ट्रात सार्वत्रिक शिक्षणाचा पाया घातला गेला. त्यामुळेच आचार्य अत्रेंनी म्हटले आहे, “आज मुंबई इलाख्यामध्ये विद्यादानाचा जो विराट वृक्ष पसरलेला दिसतो त्याचे बीजारोपण नाना शंकरशेट यांनी केले आहे हे प्रत्येक महाराष्ट्रीयाने ध्यानात धरावेत. आम्ही हे म्हणतो असे नव्हे तर महर्षि दादाभाई नौरोजींनीच मुळी तसे लिहून ठेवलेले आहे.”

– क्रमशः भाग पहिला  

लेखक : -सुभाषचंद्र सोनार, राजगुरुनगर.

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ साठीची ताकद… — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ साठीची ताकद… — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

साठीची सॉलिड ताकद असते. कसे ते सांगतो तुम्हाला!

कालचीच गोष्ट सांगतो.

मी, आमचा मुलगा, आणि बायको रस्त्याने जात असताना समोरून एक समवयीन जोडपे येताना दिसले.

मी त्यातल्या बाईकडे बिनधास्त एकटक बघत होतो. बायकोच्या देखत. ही आहे साठीची खरी ताकद.

जोडपे जवळ आले.

मी त्या बाईकडे बोट दाखवत तिला तिच्या नवऱ्याच्या देखत थांबविले.

ही आहे साठीची ताकद.

“संगीता ना तू?संगीता शेवडे?” इति मी.ही आहे साठीची ताकद.

ती थोडी थबकली.

आणि तिच्या नवऱ्याच्या देखत मानेला झटका देऊन केसांचा शेपटा पाठीवर झटकून, “अय्या… Sss… भाट्या ना तू?” असे किंचाळतच म्हणाली. भाट्या माझे शाळेतले टोपण नाव.तिची साठीची ताकद.

“कित्ती वर्षांनी दिसतोयस रे! काहीच फरक नाही तुझ्यात”.

मी ढेरी आत घेऊन हसलो.

“पण आता संगीता शेवडे नाही बरं का, मी संगीता फडके… हे माझे मिस्टर.” ती बाजूच्या, तिचा काका वगैरे वाटणाऱ्या माणसाकडे बोट दाखवते.

(“काय पण  टकल्या म्हातारा निवडलाय!” हे बोलण्याची छाती साठीत अजूनही होत नाही. हे मी मनातल्या मनातच म्हणालो.)

मी आपला तोंडदेखलेपणाने देखल्या देवा दंडवत करतो. “नमस्कार.”

त्याच्या कपाळाला मात्र आठ्या! फडकेचा शेजारी किंवा आजोळ बहुधा नेने किंवा लेले असावे.

मग एकमेकांच्या अर्धांगाची सविस्तर ओळख होते.

त्यात मी बायकोला “मी नाही का खूप वेळा सांगत तुला, ती खोपोलीच्या ट्रीप मध्ये,”सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला” गायलो होतो?

तीच ही संगीता!”

ही आहे माझी साठीची ताकद.

“अय्या तुला आठवतं आहे अजून ?” संगीता लाजत म्हणते.

तिची साठीची ताकद…

मी “हो, कसं विसरणार गं?” म्हणतो… परत एकदा माझी साठीची ताकद.

“मला इतकी वर्ष वाटत होते की मी तुला नाही म्हटल्यावर तू त्या सायली बरोबर लग्न केलेस.” परत तिचीही ही साठीची ताकद.

तिच्या नवऱ्याच्या कपाळावर आठ्या वाढतात.

पण तो हताशपणे बघत असतो.

माझ्या शेजारी निद्रिस्त ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत चुळबुळ करताना जाणवतो.

“नाही गं, माझं लग्न उशीरा झालं, सायली लग्न करून कधीच अमेरिकेत गेली होती.”… मी बायकोच्या देखत म्हणतो.आता परत माझी साठीची ताकद.

इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मी तिला हळूच विचारतो “येतेस का Starbucks मध्ये कॉफी प्यायला ?” माझी साठीची ताकद.

माझी बायको भुवया उंचावून बघते.

३५ वर्षांच्या संसारात तिला खात्री आहे,

मी काही Starbucksला जाण्याच्या भानगडीत पडणार नाही.

फार फार तर समोरच्या उडप्याकडेच बसणार… तिची साठीची ताकद.

नुकताच ३० वर्षाचा झालेला आपला पोरगा… “च्यामारी बाप या वयात सगळ्यांसमोर उघड उघड लाईन मारतोय!” असा आश्चर्यचकित चेहरा करून माझ्याकडे बघत होता.

मीही  पोराकडे बघून डोळे मिचकावत म्हणालो “अरे आम्ही पूर्वी पण कॉफीच प्यायचो.नाही का गं संगीता ?” माझी साठीची ताकद.

ती नवऱ्याला सांगते, “मी जरा ह्याच्या बरोबर तास भर गप्पा मारून येते.तू घरी जा आणि टॉमीला खायला घाल.”तिची साठीची ताकद.

तिच्या नवऱ्याच्या चेहऱ्यावर, “तास दोन तास तरी टळली ब्याद” चा आनंद स्पष्ट दिसतोय मला. पण तो लपवण्याचा क्षीण आणि निष्फळ प्रयत्न करतोय बापडा, “अगं, काही हरकत नाही.ये आरामात.” असं म्हणतो. त्याची साठीची ताकद.

“अरे पण तुझ्या बायकोची परवानगी आहे का ?” माझ्या पोटात बोट खुपसून संगीता.

“मला काय दगडाचा फरक पडतोय ?  या कधीही… नाहीतरी घरी येऊन काय दिवे लावणार आहेत कोलंबस ?”आता बायकोची  साठीची ताकद.

“फक्त येताना अर्धा किलो रवा आणि १ किलो साखर आण.” हुकुमी आणि जरबेच्या आवाजात मला.परत एकदा बायकोची साठीची ताकद.

संगीताचा नवरा कधीच गायब झाला.

माझ्या बायकोने दोन पावलं जायला म्हणून पुढे टाकली आणि वळली. “अरे हो.तुझा गोदरेजचा डाय संपलाय वाटतं. हल्ली जरा लवकरच संपतो. तो ही आण! खरे तर केसच कुठं आहेत रंगवायला? मला नेहमी आश्चर्य वाटते कुठे लावतोस कलप? आणि तुझ्या गॅससाठीच्या चघळायच्या गोळ्याही आणि कायम चूर्ण आणायला विसरू नकोस! नाहीतर सकाळी चिंतनघरात बसशील तासाच्या ऐवजी दीड तास आणि हात हलवत बाहेर येशील!” असं संगीताकडे जळजळीत नजरेने बघत तिने सांगितले… परत बायकोची साठीची ताकद.

बायकोचे माहेर कोकणात अडीवऱ्यातले आहे, म्हणजे सदाशिव पेठेतील “सौजन्याची” मर्यादा जिथे संपते तेथे तिथली सुरू होते.

संगीता त्यावर फिदीफिदी हसते.तिची पण साठीची ताकद.

मित्रांनो, अशी सगळी साठी भलतीच ताकदवान असते.

अनुभवलात की कळेलच!

लेखक : अज्ञात

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ — शुद्धलेखन व शुद्ध बोलणे… ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार ☆

सुश्री प्रज्ञा मिरासदार

? विविधा ? 

☆ — शुद्धलेखन व शुद्ध बोलणे… ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार

मागच्या आठवड्यात व्हाट्सअप वर एका लेखिकेची पोस्ट वाचली. तिने बोलीभाषा, प्रमाणभाषा, शुद्ध भाषा याविषयी विचार मांडले होते. त्याविषयी लिहिताना लेखिका म्हणते की,एका साहित्य संमेलनात अनेक जण बोलताना अशुद्ध उच्चार करत होते.( मी ग्रामीण अशुद्ध भाषेविषयी सांगत नाही).

तर ही मराठी साहित्य संमेलनातील भाषा आहे. ती शुद्ध मराठी असावी अशी साहजिकच अपेक्षा असते. पण तिथे न आणि ण यातील उच्चारांची गल्लत केली जात होती. उदा.- अनुभव न म्हणता अणुभव म्हणणे,मन ला मण म्हणणे वगैरे . मराठी साहित्य संमेलना सारख्या ठिकाणी या चुका अक्षम्य मानल्या जायला पाहिजेत.

दर 20 कोसांवर भाषेची बोलण्याची लकब, ढब, लहेजा बदलला जातो ही खरी गोष्ट आहे. पण ण आणि न ही मुळाक्षरे असून त्यांच्या उच्चारात बदल होता कामा नये. ज्यांनी साहित्याचा, भाषेचा अभ्यास केला आहे, त्यांनाच साहित्य संमेलनात भाषण करण्याचा मान मिळतो. किमान त्यांच्याकडून तरी शुद्ध बोलण्याची न ला ण किंवा ण ला न म्हणण्याची अपेक्षा असणारच. न  ण बदल केल्यामुळे काही वेळा अर्थही बदलतो.

जर साहित्य संमेलनात भाषण करणारी व्यक्ती अशुद्ध बोलत असेल तर त्याचे कारण ती व्यक्ती लहानपणापासूनच तसे बोलत असणार. तेच वळण त्यांच्या जिभेला लागलेले असणार. पण साहित्याचा अभ्यास करताना प्रयत्नपूर्वक ते वळण बदलण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला नसावा.

मी सुद्धा एका शहरात पाच वर्षे राहिले तिथे भाषेचे उच्चार बऱ्याच प्रमाणात अशुद्ध असत. उदा. –  “ती यायला लागली होती”. या ऐवजी “ती यायली होती” असे म्हटले जाते. शिकले सवरलेले लोक, कॉलेजमध्ये शिकवणारे प्राध्यापकही असेच बोलत. (अजूनही असेच बोलतात). तेव्हा खरंच आश्चर्य वाटते. माझा धाकटा मुलगा तिथे असताना खूप लहान होता. तिथेच बोलायला शिकला. आजूबाजूच्या भाषेचा त्याच्या बोलण्यावर खूपच प्रभाव होता. नंतर आम्ही आमच्या मूळ गावी आलो तेव्हा काही वर्षांनी त्याच्या बोलण्याची ढब बदलली.

हे झाले बोलण्याविषयी ! पण लिहिणे सुद्धा किती अशुद्ध असावे याला काही सुमारच नसतो. वेलांटी, उकार यांच्या चुका लिखाणात खूप सापडतात. त्यानेही अर्थ फारच बदलतो. उदा.- तिने हा शब्द तीने, तीन, तीनं असा लिहिलेला अनेक वेळा वाचनात आलेला आहे. तो फार तर तिनं असा बरोबर आहे. पण या अनुस्वारांचीही चूक होतेच. नको तिथे तो दिला जातो. पाहिजे तिथे दिला जात नाही. “मी जाणारच नाही” या ऐवजी “मी जाणारंच नाही” किंवा “मी जाणारचं नाही” असं लिहिलं जातं. गंमत म्हणजे या “असं लिहिलं जातं” या वाक्या ऐवजी “अस लिहिल जात” असे वाक्य ही वाचण्यात येते. तिथे कुठेच  अनुस्वार  दिला  जात  नाही. पण तो  देणे आवश्यक असते.

बोलीभाषा बदलते म्हणून लिहिताना भाषा बदलायला नको. आपल्या भाषेचा आपल्याला अभिमानच असायला हवा. पण चुकीचे उच्चार करून, चुकीचे लिहून आपणच आपल्या भाषेचा अपमान करतो आणि हे बोलणाऱ्याच्या, लिहिणाऱ्याच्या लक्षातच येत नाही- ते यायला हवे.

मी एक पोस्ट वाचली त्यात एका रांगोळी प्रदर्शनाला येण्याचे आवाहन केले होते. त्या पोस्टमध्ये इतके चुकीचे शब्द लिहिले गेले होते की मला वाटले त्या बाईला वैयक्तिकरित्या मेसेज करावा आणि तिच्या चुका दाखवून द्याव्यात. “औचित्य” हा शब्द तिने “आवचित्त” असा लिहिला होता. “संपूर्ण” न लिहिता “संपुर्ण” , “पहायला” ऐवजी “पाहायला”,  “रांगोळी रुपात” लिहिताना तिने “रांगोळी रुपातंर”  असे लिहिले होते. “एकत्रित” ऐवजी “एकत्रीक”, “पाहण्याची” ऐवजी पाहन्याची, “प्रोत्साहन” न लिहिता “प्रोच्छाहन”,  “ठिकाण” ऐवजी “ठिकान”, आणि आर्टिस्ट ऐवजी “आर्टिष्ट” असे चुकीचे शब्द लिहिलेले होते.

हे सर्व वाचून मला कसेसेच झाले. आपला समाज भाषेच्या उच्चाराबाबत, लिखाणाबाबत इतका मागास असावा, यावर विश्वास बसत नाही.

हल्ली इंग्रजी बोलता येणे हे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाते. बोला ना! इंग्रजी मध्ये बोलणे, इंग्रजी येणे, तेही आवश्यक आहे. पण आपल्या भाषेबाबत ही सजगता का नाही दाखवली जात?

विचार करण्याजोगी ही गोष्ट आहे, हे नक्कीच ! यात काही जादू तर घडणार नाही, की जेणेकरून भाषेचे उच्चार व लिखाण सुधारेल. तरीही असे वाटते की शुद्ध मराठी भाषेचे पुनरुत्थान आवश्यकच आहे. ती शुद्धच लिहिली गेली पाहिजे. बोलताना प्रमाण भाषेचे भान ठेवून बोलली गेली पाहिजे.  निदान भाषण करताना तरी याचे भान असावे, ही किमान अपेक्षा आहे.

© सुश्री प्रज्ञा मिरासदार

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘कान’ गोष्ट’…. ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

‘’कान’ गोष्ट…☆ सुश्री नीता कुलकर्णी ☆

आपण आपल्या अवयवांबद्दल कुठली ना कुठली विधानं करत असतो. 

पाणीदार डोळे, धारदार नाक, लांबसडक बोटे,गुलाबी गाल वगैरे…

कान हा जो आपला दर्शनी अवयव आहे त्याच्याकडे आपला कानाडोळा  होतो. 

आणि बोललं तरी चांगलं असं काही कोणी बोलत नाही.

…गुपित सांगायचं असेल तर आपण म्हणतो 

“जरा कान इकडे कर ” – आणि हळू आवाजात ते सांगतो.

अर्थात इतकी गुप्त गोष्ट कोणाच्या पोटात राहात नाही …

कधी एकदा ती दुसऱ्याला सांगतो अस त्याला होतं मग तो दुसऱ्याच्या कानाला लागतो….

लहान मुलींच्या वर्गात बाई येतात. अभ्यासाला सुरुवात करायची असते.

 एक मुलगी दुसरीच्या कानाजवळ हाताचा आडोसा करून म्हणते

 “आज बाई किती छान दिसत आहेत.”..

बाई विचारतात 

“काय कान गोष्टी चालल्या आहेत ?” – मुली नुसत्या हसतात…

एखादा आपली साक्ष काढतो म्हणतो..  ” त्या दिवशी काय झालं तुला माहित आहे ना?”

आपण कान झाकून घेत ” मला काही माहीत नाही ” – असं म्हणून त्या प्रसंगातून आपली सुटका करून घेतो… वर त्याला म्हणतो – 

“तसं माझ्या कानावरून गेल आहे, पण कान आणि डोळे यात चार बोटाचे अंतर असतं .. मी प्रत्यक्ष पाहिलेलं नाही .तुला ते शपथेवर काही सांगू शकत नाही.”

…. म्हणजे पुराव्याच्या बाबतीत नुसत्या कानाची साक्ष ग्राह्य धरली जात नाही.

तसंच एखाद्याचं कानफाट्या नाव पडलं की तो कितीही चांगला वागला तरी उपयोग नसतो …

तो कानफाट्याच —

इंग्रजीमध्ये दोन शब्द आहेत

“ लिसन आणि हियर “

हियरचा अर्थ कानावर जे पडले ते नुसते  ऐकणे  असा आहे.आणि लिसनचा अर्थ लक्षपूर्वक ऐकणे असा आहे .– लिसन हे कानातून मेंदूपर्यंत जाते, तेथून ते हृदयापर्यंत पोहोचते आणि योग्य कृती होते.

मैत्रिणीची तरुण मुलगी एखाद्या मुलाबरोबर फिरताना दिसते .आपण मैत्रिणीला फोन करून तिच्या हे कानावर घालतो .— म्हणजे पुढे काय करायचे ते तिने बघावं .लेक चुकत असेल तर मैत्रिणीनी तिचा कान धरावा असं आपल्याला वाटतं.

थोड्या दिवसात एखादीचं महत्त्व वाढलं किंवा जास्त शहाणपणा करायला लागली की आपण म्हणतो “कानामागून आली आणि तिखट झाली…”

काहीवेळा आपलं बोलणं दुसऱ्याच्या कानावर जावं असं वाटत असतं.–  त्यावेळी ती  व्यक्ती आसपास आहे याची खात्री करून आपण मुद्दाम मोठ्यांदा बोलतो आणि आपला उद्देश सफल करून घेतो.

लिहिता लिहिता एक गाणं आठवलं —- 

‘रानात सांग कानात ,आपुले नाते

मी भल्या पहाटे येते ‘

खरं तर भल्या पहाटे त्यांचं बोलणं ऐकायला तिथं कोण येणार आहे? – तरी तो तिला कानातच सांगायला सांगतो ….

तसं ऐकण्यात जवळीक आहे ..  प्रेम आहे .. त्याला स्पर्शाची साथ आहे आणि अजून बरंच  काही आहे…..

कानात सांगितलेलं मनात ठेवायचं असतं .. .प्रेमिकांचं ते गोड गुपीत असतं.

नवीन लग्न झालेली जोडपी बघा .. एकमेकात रमून गेलेली असतात. एकमेकांचं बोलणं कानात प्राण आणून ऐकत असतात..

काही लोक मात्र फार हुशार असतात. त्यांची काम कशी या कानाची त्या कानाला कळत नाहीत.

कानाखाली जाळ काढीन किंवा  कानाखाली आवाज काढीन असं  म्हणतात… पण हा आवाज कुठे आणि कसा काढला जातो हे मात्र मला माहीत नाही. 

पूर्वी आजोबा नातवंडांना सांगायचे — ” मी काय सांगतो ते कान देऊन ऐका.  उगीच कानामागे टाकू नका”

मुलही आजोबांचा ऐकत असत.— कारण त्यावेळी कानाचा उपयोग शिक्षा देण्यासाठी सर्रास केला जात असे .आजोबांच ऐकलं नाही तर ते कान धरतील नाहीतर पीरगाळतील ही भीती असायची.

आजही एखाद्याकडून चूक झाली तर तो म्हणतो 

” वाटलं तर कान पकडून माफी मागतो मग तर झालं…”

म्हणजे अप्रत्यक्षरीत्या शिक्षेसाठी अजूनही प्रतीकात्मक का होईना कान धरला जातो …

वर तो म्हणतो … “आता कानाला खडा…परत अस होणार नाही.”

एखाद्यावेळेस अ ब च्या कानात क विषयी विष ओततो .त्याचे कान भरतो. क जर विचारी असेल तर तो त्याचे ऐकत नाही, पण तसा नसेल आणि अ च्या विचाराने क शी बोलला तर त्याचे नुकसान होते.

— अशा लोकांकडे कानाडोळाच करायला पाहिजे. नाहीतर त्यांची चांगलीच कानउघाडणी केली पाहिजे .हलक्या कानाच्या लोकांपासून सावध राहायला हवं.

एखाद्याचा स्वभाव सारखा तक्रार करण्याचा असतो .त्याचं बोलणं आपण या कानाने ऐकतो आणि त्या कानाने सोडून देतो.

समाजात ‘ बळी तो कान पिळी ‘ असतो. याचं प्रत्यंतर आपल्याला रोजच्या जीवनात येत असते.

कान ही खरं तर मोठी देणगी आहे…पण त्याचं आपल्याला काही विशेष वाटत नाही. 

मुकबधिरांकडे बघितलं की…त्यांच्याबरोबर अर्धा तास जरी थांबलो  तरी —  आपल्याला कान आहेत .. 

ऐकू येत आहे …  हे किती भाग्य आहे हे नीट समजेल…

तर असं  हे कान महात्म्य…

रामदास स्वामींनी लिहिले आहे — 

श्रवणं कीर्तनं विष्णो स्मरणं पादसेवनम्

अर्चनं वंदनं दास्य सख्यमात्मनिवेदनम् – 

म्हणजे नवविधा भक्तीचं वर्णन करताना त्यांनी  श्रवणभक्तीला प्रथम स्थान दिलं आहे.

आपल्याला नको असते ते  पण आपल्या कानावर पडतच असते.–  पण आपण आपल्याला जे योग्य  वाटते ते ऐकावे ….तात्पर्य काय कानाचा चांगला उपयोग केला तर वागणे नीट होते.

 सुदृढ विचार वाढीस लागतात. आपल्या व्यक्तिमत्त्वात बदल होतो…

 कानाचा कसा उपयोग करायचा हे आपल्या हातात आहे.

आपण कसे ऐकावे ते समर्थ दासबोधात सांगतात…

ऐसे हे अवघेची ऐकावे

परंतु सार शोधून घ्यावे

असार ते जाणोनी त्यागावे

या नाव श्रवणभक्ती…

समर्थांचे ऐकू या — शहाणे होऊ या… 

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पारंपारिक  मानसोपचार… ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ पारंपारिक  मानसोपचार… ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

भल्यामोठ्या खलबत्यात ती दणादण दाणे कुटत होती…. बत्ता चांगलाच मजबूत होता.तो उचलायचा म्हणजे ताकदीचं काम होतं ! तोंडाने ती काहीतरी पुटपुटत होती. त्यात संताप जाणवत होता. मधूनच तिच्या आवाजाला धार यायची तेव्हा बत्ता जरा जास्तच जोरात आपटला जायचा. खला तील दाण्याचा पार भुगा होऊन आता त्याला तेल सुटायला लागलं होतं. जेव्हा बत्त्याला तेल लागायला लागलं तशी ती थांबली. पदराने तिने घाम पुसला आणि हुश्श करून पदरानेच थोडं वारं घेतलं.

आता तिचा चेहरा जरा शांत वाटत होता. तिची आणि माझी नजरानजर झाली तशी ती म्हणाली, “ बरं वाटलं बघ ! चांगलं कुटून काढलं बत्त्याने ! “

माझ्या चेहऱ्यावर आश्चर्य!

“ अगं कोणाला? “ 

त्यावर ती म्हणाली…. “ आता मी कोणाला कुटून काढणार? आहे का ती ताकद माझी? कोणापुढे माझं काहीही चालत नाही ! कोणी माझं ऐकत नाही. मग असे छोटे छोटे संताप एकत्र गोळा होऊन त्याचा एक मोठा ढीग होतो बघ एखाद दिवशी ! मग त्या ढिगाचं ओझं मला सहन होत नाही. माझ्याकडून काहीतरी वेडंवाकडं बोललं जाईल याची मला भीती वाटते. अशी भीती वाटली ना की मी दाणे किंवा चटण्या घेते कुटायला,आणि खलबत्त्याच्या आवाजात बडबड करते माझ्या मनाला वाटेल ती ! चटण्याही छान होतात आणि तेल सुटलेला दाण्याचा लाडू ही छान होतो. मग घरातले सगळे म्हणतात…. चटण्या आणि दाण्याचा लाडू खावा तर हिच्याच हातचा ! मग मला गालातल्या गालात हसू येतं बघ.” 

माझ्या चेहऱ्यावर भलं मोठं प्रश्नचिन्ह !” म्हणजे तू नक्की काय करतेस?” 

“अगं डोक्यात फार संताप असला ना की सगळी शक्ती एकवटून कोणाच्यातरी एक थोबाडीत ठेवून द्यावीशी वाटते. हात शिवशिवतात माझे . आणि फाडफाड बोलून समोरच्याला फाडून खावं अशी इच्छा होते. पण हे असं वागणं योग्य नाही हेही पटतं मला. पण मग या त्रासाचं काय करू? तो सगळा राग मी या खलबत्त्यातल्या दाण्यांवर आणि खोबऱ्यावर काढते… जे जे मनात असतं ते बोलून टाकते. त्यामुळे मोकळं वाटतं बघ मला ! मनावरचं ओझं हलकं होतं. अंगातली ताकद सत्कारणी लागते. आणि चटण्या, लाडू सुंदर होतात हा सगळ्यात मोठा फायदा. पुन्हा, घरात वादंग घालून घरातली शांतता नष्ट करा हेही होत नाही… “ …. आणि ती मस्तपैकी हसली ! आणि माझ्या डोक्यात ट्यूब पेटली…… अरे खरंच ! किती छान घरगुती उपाय आहे हा !

पूर्वी बायकांनी घरात फार बोलायची, आपली मतं मांडायची पद्धत नव्हती. लहानपणापासूनच त्यांना सहन करण्याची सवय लावली जायची. पण त्यातही काही बायका मूळच्या बंडखोर वृत्तीच्या असायच्याच. त्यांना मनाविरुद्ध गोष्टी पचवणे जड जायचे. पण घरामध्ये अशा पद्धतीने कामं करता करता त्या मोकळ्या व्हायच्या. जात्यावर गाणी गात दळताना त्या सुरांबरोबर त्यांच्या मनाचे बंध मोकळे व्हायचे. धान्याबरोबर तिच्या मनातील टोचणारे बोचणारे अनेक सल पिठासारखे भुगा होऊन जायचे…. असंच असेल कदाचित .. म्हणूनच पूर्वीच्या बायकांमध्ये सहनशक्ती अधिक होती असे राहून राहून वाटते.

पाट्यावर जोरजोरात वाटणे, दगडावर धुणं आपटणे, आदळ आपट करत भांडी घासणे, किसणीवर खसाखसा खोबरे किसणे, जात्याचा खुंटा ठोकणे, उखळामध्ये मुसळाने कांडणे, या सगळ्या कामांमध्ये बायकांना भरपूर ताकद लागायची. या शारीरिक कष्टांच्या क्रिया करताना त्यांच्या मनातील उद्वेग बाहेर पडायला मदत व्हायची.

आत्ताच्या काळात आपण सगळेच शारीरिक कष्ट करायचे विसरलो आहोत. त्यामुळे आतल्या आत जी घुसमट होते ती बाहेर पडायला वाव मिळत नाही. पूर्वी घरात खूप माणसं असायची. त्यामुळे वातावरणातील ताण कमी असायचा. विविध विषयांवर घरात बोलणं व्हायचं, त्यामुळे एकाच विषयाभोवती संभाषण फिरायचं नाही. त्यामुळे दुःख उगाळत बसण्याची माणसांवर वेळच यायची  नाही.

आपणही जेव्हा काही शारीरिक श्रम करतो तेव्हा शरीराबरोबर आपल्याला एक मानसिक स्वास्थ्य लाभतं. एखादी घाण झालेली गोष्ट आपण स्वतःच्या हाताने घासून पुसून लख्ख करतो तेव्हा ती घासताना मनातील कचरा, धूळ आणि जळमटं बहुधा स्वच्छ होत असावेत. म्हणून प्रत्येकाने आपल्या घरातील एखादे तरी स्वच्छतेचे काम स्वतःहून करावे. त्यामुळे तुमचे मन:स्वास्थ्य चांगले राहायला मदत होईल असे वाटते. प्रत्येकाने शारीरिक श्रमाचा कोणताही मार्ग जो आपल्याला सहज शक्य असेल आणि आवडीचा असेल तो शोधून काढावा ….. पण आपल्या जीवनातील राग, संताप, नैराश्य, आपल्या मनात साचून राहणार नाही याची अवश्य काळजी घ्यावी !

…… 

लेखिका : सुश्री माधुरी राव, पुणे.

माहिती संकलन : सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “वास्तव सत्य…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “वास्तव सत्य…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै ☆

वटारलेले डोळे पाहून दबणारी बायकोच आता  डोळे वटारून पाहू लागली की समजून घ्यावे की ‘पृथ्वीवरील आपले अवतारकार्य शेवटच्या टप्यात आहे.’

कमावत्या मुलांच्या आवाजात कडकपणा आला असेल तर समजून घ्यावे की , आपण आता कौटुंबिक जबाबदारीतून हळूहळू अंग काढून घ्यावे.

“बसल्या बसल्या ह्या  शेंगातील दाणे काढा,”असे जर सुनबाईने म्हटले तर समजून घ्यावे की, बॉस नावाचे पद यांनी खारीज केले आहे.

वय वर्ष 60 नंतर कुणी आपल्याशी चांगले वागेल, ही अपेक्षा ठेवू नका. भाऊबंदकीचे नाते  कुटुंबाचे फाळणीबरोबरच संपुष्टात आले.नातेवाईक पैसे देणे / घेणे वादातून संपले, पत्नीचा ओढा नकळत न टिकणाऱ्या मुलांच्या नात्याकडे वळू लागला , कार्यप्रसंगात नातेवाईक भेटतात, केवळ रामराम होतो ,फारसी चौकशी होत नाही, तुम्ही मात्र मनात उजळणी करत असता , ह्याला मी किती मदत केली होती.

सगळे कटू अनुभव जमा झाले असतील , कुणी नाही कुणाचे हा अनुभव गर्द झाला असेल.

नाती बिघडली, सबंध बिघडले , वाट्याला एकटेपण आले , आता कुणाचे फोन येत नाहीत , दुखावलेले मन ‘कुणाला फोन कर’ असेही म्हणत नाही.

तरीपण एक नातं  टिकून राहते  ते नातं मुलीचं. तितक्यात मुलीचा फोन येतो , ती विचारते— “पप्पा गेले होते का दवाखान्यात ? औषधं घेतलीत का ? काय म्हणाले डॉक्टर ? जेवण झालं काय ?”नाना प्रश्न काळजीचे.आस्थेचं विचारणं, जिव्हाळ्याचं हेच एकमेव नातं.

थोडा पश्चातापही होत असतो.मुलींसाठी काहीतरी करण्यात मी कमी पडलो, त्यांच्यासाठी काहीतरी करायचे राहून गेले.कसे होणार त्यांचे ?

लोक मुलगा झाला की, स्वतःला भाग्यवंत समजतात.मला असे वाटते ,ज्यांना मुली आहेत ते खरे भाग्यवंत होत. एरवी दोन तीन मुले जेव्हा वडिलांना कुणाकडे ठेवण्यावरुन भांडत असतात, तेव्हा झालेली चूक सुधारण्यापलीकडे गेलेली असते. मुलगी म्हणते,” काळजी करू नका मी आहे.”

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती :सौ. राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ डोळस दसरा… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

? विविधा ?

डोळस दसरा…  ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

नऊ महिने नऊ दिवस पूर्ण झाले आणि डोळेझाक करता न येणार्‍या प्रसव वेदना तिला सुरू झाल्या.

डोळयाला डोळा लागत नव्हता . वेदनेने सुलोचना  डोळे घट्ट मिटत होती. अचानक तिच्या डोळ्यांपुढे काजवे पसरले, डोळ्यात पाणी तरळले ज्या क्षणाकडे ती डोळे लावून बसली होती तो क्षण आला आणि एका मोठ्या वेदनेच्या क्षणी ती प्रसूत झाली. वेदनेने तीचे डोळे बंद झाले. पण क्षणात टॅहॅ टॅहॅच्या आवाजाने तिने झटकन डोळे उघडले. जडावलेल्या डोळ्यातही मातृत्वाची वेगळी चमक दिसली आणि सुलोचनाने दसर्‍याच्या मुहूर्तावर जन्मलेल्या आपल्या परीला कुशीत घेत डोळे भरून पाहिले.

जणू शैलपुत्रीचे दर्शन तिला झाले होते. दसर्‍याच्या मुहूर्तावर जन्मली म्हणून तिचे नाव दुर्गा ठेवले.

डोळ्यात तेल घालून ती तिला जपत होती. जरासुद्धा डोळ्याआड तिला होऊ देत नव्हती. जणू काळजीचा तिसरा डोळाच तिला लागला होता. असे ब्रह्मचारिणीचे रूप तिचे १० वर्षाचे डोळ्याचे पाते लवते न लवते तोच संपले होते.

दुर्गा सगळ्य़ात हुषार होती.तिची हुषारी सगळ्यांच्या डोळ्यात येत होती. असे करता करता जणू ही चंद्रघंटा दहावीत प्रथम क्रमांकाने पास झाली होती. तेव्हा तिचे टपोरे डोळे अधिकच पाणीदार भासले होते. काहींच्या डोळ्यावर हे येत होते  डोळ्यात खुपत होते हे न कळायला तिने डोळ्यावर कातडे नव्हते ओढले.  पण ती त्याकडे काणा डोळा करायची.

दुर्गाची दहावी झाली आणि तिने मिल्ट्रीमधे जायचा हट्ट धरला. हे ऐकून सुलोचनाच्या डोळ्यांपुढे अंधेरीच आली .तिच्या डोळ्यातून गंगा जमुना वाहू लागल्या . पण मिल्ट्रीत जायचा निर्धार दुर्गेच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होता. ती दुसर्‍या गावी जाणार म्हणजे दोन डोळे शेजारी पण भेट नाही संसारी अशी अवस्था होणार होती. तरी तेव्हा कुष्मांडासारखी ती धैर्यशील भासत होती.

ट्रेनिंग घेत असतानाच एक मुलगा एका मुलीची छेड काढत असलेला तिच्या डोळ्यांनी पाहिले. डोळ्यात अंगार भरला तिने त्याला पकडला . डोळे वटारून तिने त्याला अपादमस्तक न्याहाळले. खाडकन त्याच्या मुस्कटात लगावून डोळे फडफडवून तिने त्याला समज दिली पुन्हा जर वाईट नजरेने मुलींकडे बघशील तर डोळे काढून गोट्या खेळीन मग तुझ्या डोळ्याच्या खाचा होतील.  त्याच्या डोळ्यात मूर्तीमंत भिती दाटली .डोळे पांढरे झाले. माफी मागून त्याने कशीबशी स्वत:ची सुटका करून घेतली. तिचे ते रूप स्कंदमातेप्रमाणे करारी तरीही क्षमाशील भासले.

हे तिचे रूप शिवाच्या डोळ्यात भरले. ज्या डोळ्यात धाक होता त्याच डोळ्यांना डोळा भिडवला .तिने डोळे आले आहेत या बहाण्याचेही काही चालले  नाही. वेगळा भाव त्यामधे दाटताच तिला डोळा मारला. तिच्या पाणीदार डोळ्यांकडे तो डोळे रोखून पाहू लागला. तिला डोळे फिरवणे शक्यच नाही झाले. क्षणात तिने डोळे झुकवले.  हे तिचे रूप त्याला कांत्यायनी सारखे भासले.

अर्थातच डोळ्यात धूळ फेकणे कोणाला शक्यच नव्हते. डोळ्यात डोळे घालणे चालूच होते. ती मिल्ट्रीमधे रुजू झाली. तो पण कॅप्टन पदावर होता. तरीही दुर्गा त्याला पहाताच नकळत डोळे मोडीत चालायची. दुर्गाला चांगली नोकरी लागावी हे स्वप्न असतानाच चांगला जोडीदार मिळाला पाहून आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे याचा प्रत्यय आला होता.  घरच्यांनी त्यांचा शानदार विवाह लावून दिला. असा सोहळा पाहून डोळ्याचे पारणे फिटले . कौतूक आनंद कोणाच्याच डोळ्यात मावत नव्हते. हे रूप सगळ्यांनाच  महागौरीचे वाटले.

लग्नानंतर तिने तिचे काम चालूच ठेवले होते. अनेक नराधमांचे लागलेले डोळे उखडले होते. त्यांना समज देऊन डोळे उघडले होते. उघड्या डोळ्यांनी जग बघायला शिकवून  डोळे असून आंधळ्यासारखे राहू नये शिकवताना डोळ्यात अंजन घातले होते. हे तिचे रूप कालरात्रीचे भासले.

नंतर मात्र अचानक तिच्या जीवनात एक दुर्घटना घडली. तिच्या सासर्‍यांच्या डोळ्यात फुल पडले . डॉक्टरही कधी कधी डोळ्यात कचरा कानात फुंकर सारखी ट्रिटमेंट देतात याचा अनुभव आला. त्या नादात सासर्‍यांचे डोळे फुटले होते. त्यांचे डोळे निर्विकार झाले होते. तिचे प्रथम कर्तव्य  सासर्‍यांची सेवा करणे असल्याने तिने राजीनामा दिला होता. तिच्या डोळ्यांचा पहारा कायम ती देत होती.

अशातच तिच्या पण तब्येतीच्या तक्रारी सुरू झाल्या आणि चाचणीअंती समजले की तिला आतड्याचा कॅन्सर आहे आणि ती काही दिवसांचीच पाहुणी आहे.  ती दिसायला चांगली होती पण आतून तब्येत बिघडली हे पाहून डोळे व कान यात चार बोटांचे  अंतर असते  हे पटले होते. सासर्‍यांच्या डोळ्यात पडलेल्या फूलाचे कुसळ तिला दिसले होते पण स्वत:च्या डोळ्यात म्ह्मणजे तब्येतीत घुसलेले मुसळ तिला दिसले नव्हते.

सगळ्यांच्याच डोळ्यांपुढे आता पुढे काय हे प्रश्नचिन्ह उभे होते. तर दुर्गेला तिच्या सासर्‍यांबद्दल डोळा हेकणा किधर भी देखणा असे कोणी म्हणू नये असे वाटल्याने डॉक्टर आणि शिवाला सांगून नेत्रदान करण्याचा व डोळे सासर्‍यांना बसवण्याचा निर्धार सांगितला. ती खूप थकली होती. तिचे डोळे किलकिले होत होते. ती मुश्किलीने डोळे उघडे ठेवण्याचा प्रयत्न करीत होती पण तिला ते जमत नव्हते. तिचा डोळा लागला आहे असे वाटत असतानाच तिचे डोळे निवले आहेत आणि तिने कायमचे डोळे मिटले असल्याचे डॉक्टरने सांगितले.

लगबगीने डोळ्यांच्या डॉक्टरांनी तिचे डोळे काढून एक तिच्या सासर्‍यांना आणि एक गरजूला बसवला होता. दोन्ही ऑपरेशनस् यशस्वी झाली होती. आता ती डोळ्यांच्या रुपाने या दुनीयेत शिल्लक होती. तशातही तिचे रूप सिद्धीदात्रीचे भासले

शिवाला तिच्या कार्याचा फार अभिमान होता. आज दसरा होता आणि दुर्गेचा वाढदिवस , प्रथम स्मृतीदिन होता. त्याने दवाखान्यात जाऊन नेत्रदानच नाही तर देहदानाचा फॉर्म भरला होता. खर्‍या अर्थाने एक डोळस दसरा आज साजरा केल्याचे समाधान त्याच्या डोळ्यातून ओसंडत होते.

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ फूल ज़रा आहिस्ता फेको…… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ फूल ज़रा आहिस्ता फेंको… फूल बडे नाजुक होते हैं… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

फुलं आणि मुलं उमलताना सुकोमल असतं… दिसताना तसचं दिसत असतं…ममतेने, प्रेमाने त्यांची काळजी घेणारे हात…मुग्धावस्थेत लालन पालन करणाऱ्यांची असते का त्यांना  साथ… पण हे सगळं प्रत्येकाच्या नशिबात कुठे असते.. भाग्याचा अभंग  खडक परिस्थितीच्या चौकात वाट पाहात असतो त्यांची… अशी दुर्भाग्य पूर्ण बालकांची नि फुलांची… अबोल भावना दोघांच्याही.. एक हाताने चौकात कुठे फुलांची माळ विकावी तेव्हा कुठे मिळणाऱ्या दमडीतून पोटाची खळगी भरावी… फुलांना तरी हट्ट करायला कुठे मिळते स्वातंत्र्य…कधी मूर्तीवर,प्रतिमेवर तर कधी पांढऱ्या शुभ्र वसनातील कलेवर…आजचं फुलणं, सुगंधाची पखरण करणं आणि आणि  संध्यासमयी कोमेजून आपलचं निर्माल्य होणं… काय तर म्हणे निसर्ग चक्र.. आजवरी यात कधी तसुभर बदल झालाय काय?  आणि होईल कसा?… बाल्यावस्थेतील मुलाची निसर्गाच्या नियमाने होत जाणारी वाढ थांबवता येते का?.. परिस्थितीतचा नकाशा मात्र व्यापक नि विस्तृत झालेला… चौकातच जिना और चौकातच मरना अपनी अपनी औकात पहचानना… फुलांच्या माळेने नाकाला सुगंध जाणवतो तो जगणं किती सुंदर असतयं याचा क्षणाचा भास दाखवतो…मला विकुन तुझं पोट भरता येईल… विकत घेणाऱ्याला सुगंधाचा आनंदही देईन माझ्या अंतापर्यंत… पण पण मला काय मिळेल.. चौकातला दगडी कटृटा निर्विकारपणे मुलाला नि फुलाला जवळ बसवून घेत असतो… सिग्नलचा लाल पिवळा हिरवा रंगाचा …थांबा पाहा पुढे जाचा खेळ मांडून बसतो…वाहनांमधले, पदपथावरले माणसांना क्षण दोन आपल्या विश्वातून भानावर या संवेदनशीलता जागरूक ठेवून सजगतेने अवतीभवतचं अवलोकन करा… कुणी गरजु असेल तर त्यास न हिचकिचता मदतीचा हात पुढे करा… हिच खरी मानवता… नाहीतर आहेच आपली कोरडी शुष्क घोषणाबाजी बसवर नि भिंतीवर रंगवलेली.. मुलं म्हणजे देवा घरची फुलं.. झाडं लावा झाडं जगावा… बालकांना शाळेत पाठवा… आणि आणि आणि बालमजुरी करायला लावणं हा समाजाचा शासनाचा नैतिक अध: पात आहे…कायदेशीर गुन्हा आहे…हिरवा सिग्नल लागताच वाहनं बसेस पळू लागतात नि त्यावरील घोषणा पोकळच ठरतात… निर्जीव भिंतीना रंग चोपडून घोषणा गोंदवून घेतात पण त्याकडे माणूस नावाचा प्राणी फक्त बघत नसतो… त्याच्याशी त्याचं काहीच देणं घेणं नसतं… रूपायाचं चाफ्याचं  फुलं मात्र दहाच पैश्यालाच हवं असतं… महागाईला धरबंध काही उरलाच नाही हे तत्त्वज्ञान मात्र चौकात मांडायचं असतं…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares