मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ तुझे येणे… ☆ सौ. मुक्ता महेश अभ्यंकर ☆

सौ. मुक्ता महेश अभ्यंकर

??

☆ तुझे येणे… ☆ सौ. मुक्ता महेश अभ्यंकर ☆

तुझे असे येणे .. जणू आनंदाचे गाणे

गत काळातील आठवणीत मन सुन्न सुन्न होणे

एकत्र घालवलेल्या क्षणांची जणू जत्राच भरून येणे

 

तुझे असे येणे जणू आनंदाचे गाणे

 

क्षण क्षण टिपून घेता सुख ओसंडून जाणे

शब्दांचा ही जणू आत्ता गोंधळ उडणे 

 

तुझे असे येणे जणू आनंदाचे गाणे

 

भेटीच्या  सुखद क्षणांची गुंफण करत जाणे

मैत्रीच्या ह्या नात्याला मनातल्या सिंहासनावर बसवणे

 

तुझे असे येणे जणू आनंदाचे गाणे

 

परतण्याची वेळ येता मन सुन्न सुन्न होणे

आठवणींचा आयुष्यात  कवडसा होवून जाणे 

 

तुझे असे येणे जणू आनंदाचे गाणे

 

© सौ. मुक्ता महेश अभ्यंकर

साहाय्यक प्राध्यापिका, श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ फार्मसी , कोंढवा पुणे

संपर्क :  सन युनिव्हर्स फेज २, एम ५०३, नवले ब्रिज जवळ, नऱ्हे, पुणे.

फोन   : ७५०६२४३०५०

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ बहिणाबाई चौधरी – अहिराणी-मराठी कवयित्री… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? इंद्रधनुष्य ? 

बहिणाबाई चौधरी – अहिराणी-मराठी कवयित्री... – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

स्मृती दिन ३ डिसेंबर,१९५१

बहिणाबाई नथुजी चौधरी यांचा जन्म असोदे (जळगाव जिल्हा ) ह्या गावी झाला. हे गाव खानदेशातील जळगावापासून अंदाजे ६ कि.मी. अंतरावर आहे. जन्म नागपंचमीच्या दिवशी २४ ऑगस्ट १८८० रोजी महाजनांच्या घरी झाला.

१८९३ साली वयाच्या तेराव्या वर्षी जळगावचे खंडेराव चौधरी यांचे पुत्र नथुजी चौधरी यांच्याशी बहिणाबाईंचा विवाह झाला.बहिणाबाईंना तीन मूळ होती  ओंकार, सोपान आणि काशी. वयाच्या तिसाव्या वर्षी  बहिणाबाईंना वैधव्य आले.

बहिणाबाईंना लिहिता येत नव्हते, त्यामुळे त्यांनी केलेल्या अनेक कविता कुणी लिहून न ठेवल्यामुळे काळाच्या ओघात नष्ट झाल्या. काही रचना पुत्र सोपानदेव चौधरी यांनी व काही त्यांच्या मावसभावाने टिपून ठेवल्या.

त्या निरक्षर होत्या; तरिही त्यांच्यापाशी जिवंत काव्यरचनेची प्रतिभा होती. ज्यात त्यांचे सारे आयुष्य गेले, ते शेतकाम आणि घरकाम करता करता उत्स्फूर्तपणे त्या ओव्या रचून गात असत. छापील मजकुराविषयीची ही असोशी अनक्षर बहिणाबाईंनी या कवितेत उतरवली आहे. 

मंमई बाजारावाटे

चाले धडाड-दनाना

असा जयगावामधी

नानाजीचा छापखाना… 

नानाजीचा छापखाना

त्यात मोठे मोठे पुठ्ठे

तसे शाईचे दराम

आन कागदाचे गठ्ठे… 

किती शिशाच्या चमट्या

ठसे काढले त्यावर

कसे निंघती कागद

छापीसनी भरभर…

चाले ‘छाप्याचं यंतर’

जीव आठे बी रमतो

टाकीसनी रे मंतर

जसा भगत घुमतो… 

मानसापरी माणूस

राहतो रे येडजाना

अरे होतो छापीसनी

कोरा कागद शहाना…

सोपानदेव चौधरी आणि त्यांचे मावस भाऊ ह्यांनी जमेल तेव्हा त्या वेळोवेळी तेथल्या तेथे उतरून घेतल्या आणि जपल्या.

पुत्र सोपानदेव चौधरी यांनी बहिणाबाईंच्या मृत्यूनंतर लिहून घेतलेल्या कविता सोपानदेवांनी आचार्य अत्रे ह्यांना दाखविल्या. अत्रे म्हणाले,

‘ हे तर बावनकशी सोनं आहे! हे महाराष्ट्रापासून लपवून ठेवणं हा गुन्हा आहे’

आणि अत्र्यांनी त्या कविता प्रकाशित करण्यात पुढाकार घेतला. अत्रे ह्यांच्या विस्तृत प्रस्तावनेसह बहिणाबाईंची गाणी १९५२ मध्ये प्रकाशित झाली.

‘जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असे बावनकशी सोन्याप्रमाणे बहिणाबाईंचे काव्य आहे, हा तर मोहोरांचा हंडा आहे’, अशा शब्दांत आचार्य अत्रे यांनी बहिणाबाईंच्या काव्याविषयी अभिप्राय दिला होता.बहिणाबाईंचे हे अमोल काव्य जगासमोर आणायला आचार्य अत्रे कारणीभूत ठरले.आणि ‘धरत्रीच्या आरशामधी सरग’ (स्वर्ग) पाहणाऱ्या ह्या कवयित्रीची ओळख  महाराष्ट्राला आणि जगभर पसरलेल्या माताही माणसाला झाली.ह्या काव्यसंग्रहात बहिणाबाईंच्या फक्त ३५ कविता आहेत; परंतु कवित्वाची कोणतीच जाणीव मनात न ठेवता, केवळ सहजधर्म म्हणून रचिलेली त्यांची बरीचशी कविता लिहून न ठेवल्यामुळे  त्यांच्याबरोबरच नष्ट झाली आणि माय मराठीचे अतोनात नुकसान झाले.

बहिणाबाईंच्या कविता वऱ्हाडी-खानदेशीत, त्यांच्या मातृबोलीत, रचल्या आहेत .त्यांच्या कवितांचे विषय माहेर, संसार; शेतीची साधने, कापणी, मळणी इ. कृषिजीवनातील विविध प्रसंग; अक्षय्य तृतीया, पोळा, पाडवा इ.सणसोहळे; काही ओळखीची माणसे,असे आहेत.

अहिराणी (खानदेशी) भाषेतून; अतिशय सोप्या शब्दांत जीवनाचे तत्त्वज्ञान व्यक्त करणारे.खानदेशातील आसोद हे बहिणाईंचे जन्मगाव. तिथला परिसर, तिथे बोलली जाणारी खानदेशी/अहिराणी भाषा त्यांच्या काव्यातून जिवंत होते. त्या स्वत: शेतकरी जीवन जगत असल्याने शेती, जमीन, शेतकऱ्यांची सुख-दु:खे, त्यातले चढउतार, झाडे, प्राणी, निसर्ग – या साऱ्यांबद्दल त्यांच्या मनात विलक्षण आत्मीयता होती असे त्यांच्या काव्यातून दिसून येते.

उदा. ‘असा राजा शेतकरी चालला रे आलवानी (अनवाणी) देखा त्याच्या पायाखाले, काटे गेले वाकीसनी.

तल्लख स्मरणशक्ती, सूक्ष्म निरीक्षण, उपजत विनोदबुद्धी, जीवनातील सुखदुःखांकडे समभावाने पाहू शकणारे शहाणपण आणि जगण्यातून कळलेले तत्त्वज्ञान ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये होती. ‘आला सास, गेला सास, जीवा तुझं रे तंतर, अरे जगनं-मरनं एका सासाचं अंतर’ किंवा ‘लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते’ अशा कमीत कमी शब्दात अर्थाची कमाल त्या करत असत.

‘अरे संसार संसार – जसा तवा चुल्यावर आधी हाताले चटके – तव्हा मीयते (मिळते) भाकर’ किंवा ‘देव कुठे देव कुठे – आभायाच्या आरपार देव कुठे देव कुठे – तुझ्या बुबुयामझार’. एखाद्या मोठ्या ग्रंथाचा विषय असणारे जीवनाचे तत्त्वज्ञान त्या साध्या, सोप्या, (आणि कमी) शब्दांत सहजपणे सांगून गेल्या आहेत.बहिणाबाईंच्या काव्याचा शैक्षणिक अभ्यासक्रमात समावेश असतो.

बहिणाबाईंच्या काव्यरचनांवर आधारित “खानदेशचा मळा आणि मराठवाड्याचा गळा” हा सांस्कृतिक कार्यक्रम मराठवाड्यातील गायकांच्या आवाजात सादर केला जातो. बहिणाबाई चौधरींच्या कवितांवर आधारित व हा कार्यक्रम दत्ता चौगुले आणि माधुरी आशिरगडे यांनी संगीतबद्ध केला आहे.

दूरदर्शनने बहिणाबाईंवर लघुपट काढला होता. त्यात भक्ती बर्वे यांनी बहिणाबाई साकारली होती. उत्तरा केळकर यांनी त्यामधली गाणी .ओव्या म्हटली आहेत त्यानंतर दिग्दर्शक अतुल पेठे यांनी बहिणाबाईंच्या कवितांच्या प्रेरणांवर आधारित ‘बहिणाई’ नावाच्या लघुपटाची निर्मिती केली.

बहिणाबाईंच्या काव्याचा इंग्रजी अनुवाद ’फ्रॅग्रन्स ऑफ दि अर्थ’ या कवितासंग्रहाच्या रूपाने प्रकाशित झाला आहे. अनुवादक माधुरी शानभाग आहेत. बहिणाबाईंचे अल्पचरित्र, आचार्य अत्रे, बा.भ. बोरकर, पु.ल. देशपांडे, इंदिरा संत यांनी लिहिलेली स्फुटे आणि मालतीबाई किर्लोस्कर आणि प्रभा गणोरकर यांनी केलेली समीक्षा देखील या पुस्तकात समाविष्ट केली आहे.

यापूर्वी प्रा. के.ज. पुरोहित यांनी बहिणाबाईंच्या निवडक कवितांचा इंग्रजी अनुवाद केला होता.

बहिणाबाईंच्या स्मृतीस विनम्र अभिवादन

लेखक : अज्ञात 

संग्राहक – सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अचूक चुकीची वेळ… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

अचूक चुकीची वेळ… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

दोन दिवसापूर्वी एक वाक्य ऐकले आणि लगेच त्याचा प्रत्यय पण आला. ते वाक्य एका गाण्याच्या कार्यक्रमात ऐकले. ज्या वेळी प्रत्यक्ष कार्यक्रम म्हणजे लाईव्ह प्रोग्रॅम बघतो त्या वेळी असे अनुभव येतात. त्या कार्यक्रमात तबलजी इतका निष्णात होता. की त्याने लावणी पूर्वीची ढोलकी तबल्यावर वाजवली. ऐकायला फारच अप्रतिम! डोळे बंद  केल्यावर तर हा तबला आहे यावर विश्वास ठेवणे अवघड होते. त्यातील निवेदकाने आधीच एक वाक्य वापरले होते, ते म्हणजे वेळेवर शिट्टी येऊ द्या. आणि ते वाक्य ऐकून हसू आले. कारण माझीच कायम अशी फजिती होते. लावणीला शिट्टी मारायची तयारी केली तर ती पुढच्या भक्तिगीताला तरी वाजते किंवा एखाद्या दुःखी गाण्यात तरी वाजते. मग असे होऊ नये म्हणून मी तो नादच सोडला आहे.

अजून एक प्रसंग आठवला एका अंत्य यात्रेत कोणाचा तरी फोन वाजला आणि रिंगटोन वर गाणे वाजले अकेले अकेले कहा जा रहे हो सोबतच्या लोकांना मोठाच पेच पडला, हसावे की रागवावे?

काही प्रसंग तर असे घडतात की आपण विचारात पडतो. एका लग्नात बँडवर गाणे वाजत होते छोड गये बालम आणि दिल का खिलौना टूट गया किंवा परदेसियो से ना आंखिया मिलाना ही तर जणू लग्नात वाजवण्याची फेवरेट गाणी.

आणि पूर्वीच्या लग्नाच्या पंक्तीत कायम शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे श्लोक ऐकू यायचा. पूर्वी लग्न लागल्या नंतर नवरी वरपक्षाच्या खोलीत जायची. तिथे सगळे कौतुकाने तिच्याकडे बघत असायचे. कोणी चेष्टा करायचे,तिच्याशी बोलायचा प्रयत्न करायचे. अशाच एका प्रसंगाची नेहेमी आठवण येते. अशाच एका लग्नात त्या वधूला गाणे म्हणण्याचा आग्रह झाला. आणि तीने गाणे म्हंटले न जाओ सैया हे ऐकून काय प्रतिक्रिया आली असेल, कल्पनाच करु शकत नाही.

अशा गमती जमती पावलो पावली अनुभवायला मिळतात. मुले तर फार मजेशीर असतात. मुलांच्या व शाळेत अनुभवलेल्या गमती जमती पुन्हा केव्हातरी.

अशी गंमत फजिती कायम अनुभवायला येते. आणि काय प्रतिक्रिया व्यक्त करावी हेच कळत नाही.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

हिलिंग, मेडिटेशन मास्टर, समुपदेशक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून  ☆ पेपर तसा सोपा होता ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

डॉ. जयंत गुजराती

??

पेपर तसा सोपा होता ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

लहानपणी आईने अ, आ, ई शिकवलं. अवघडच होते ते गिरवणं. पाटीवर पेन्सिल टेकवून लिहायचं. वेडंवाकडं निघायचं. कधी कधी आई रागवायची मात्र बऱ्याचवेळा हाताला हात धरून वळण लावायची. मग पाटीवर अक्षरे निघू लागली वळणदार. तरीही मी अक्षरांबाबतीत तसा कच्चाच राहिलो. आजपर्यंत ते सुधरलंच नाही. माझं अक्षर वाईट याचं वैषम्य अधूनमधून वाटत राहतं. पण ते सुधरवून घेण्याच्या भानगडीत मी पडत नाही. असं सांगतात की ज्याचं अक्षर चांगलं तो चांगला चित्रकारही होऊ शकतो. मात्र असंही आढळून आलंय की बडी बडी माणसं जी असतात त्यांचं अक्षर हस्ताक्षर वाईटच असतं. मी दुसऱ्या कॅटेगरीतला अशी साधीभोळी समजूत मी स्वतःला घालत असतो. 

आईचं गिरवून झाल्यावर पाठीशी लागली ती शाळा. शाळा कुणाला चुकलीय. असं तर बऱ्याचदा ऐकिवात आलंय की चौथी वा सातवी आठवीला शाळा सोडून माणसं मोठमोठे उद्योगपती, खेळाडू, थोर नेते बनलेत. माझ्या नशिबी तो योग नव्हता. शाळा काही सुटली नाही. पाटी काही फुटली नाही. मात्र शालेय जीवन होय जीवनच मस्तपैकी जगलो. गळ्यात गळा घालणारे मित्र मिळाले. हातावर छडी देणारे मास्तरही भेटले. पोटात चिमटा काढणे वा कान उपटणे, उठाबशा काढायला लावणे हा तर त्यांचा जन्मसिद्ध अधिकार असल्यासारखं असायचं. ते मारायचे व माया ही करायचे. त्यातून मात्र घडत गेलो. बाबा ही शाळेत शिक्षक होते त्यामुळे निदान माझी शिक्षा द्विगुणित व्हायची. वरच्या कक्षांमधे गेलो तसे चुका कमी व्हायला लागल्या. शिक्षणाची गोडी लागली. मग शाळेचे दिवस, रम्य ते दिवस होऊ लागले. मास्तरही आवडायला लागले. शिकणं झालं, खेळणं झालं, गेदरिंगमधे नाट्य नाटिका केल्या. जास्तीतजास्त मार्कं मिळवण्याची चढाओढ ही केली. वार्षिक परिक्षेचा रिझल्ट लागण्याचा दिवस अतिमोलाचा ठरू लागला. पहिला दुसरा नंबर आला तर कोण आनंद व्हायचा. जरी पहिल्या पाचामधे आलो तरी आनंद व्हायचा. मग सर्वांना रिझल्ट दाखवायची खुमखुमी यायची. नववीत असताना सायन्सच्या पेपरला तेरा सप्लिमेंट जोडल्या होत्या. सर्वात जास्त मार्क मिळाले. त्यापेक्षाही आमच्या शिक्षिकेने माझी संपूर्ण उत्तरपत्रिका नोटिसबॉर्डावर लावली होती. आदर्श उत्तरे कशी लिहावीत याचं प्रात्यक्षिक म्हणून. बरेच दिवस कॉलर टाईट होती. अकरावीची परिक्षा आली अन् गेली. त्या अगोदर सेंडॉफ झालेला. शाळा सुटल्याचं दुःख अपरिमित. काहीजण तर चक्क रडलेच. 

शाळा सोडून कॉलेजचे दिवस सुरू झाले. ते मोरपंखी का काय ते !! खरंतर ती गद्धेपंचविशीच होती. अभ्यासापेक्षा इतर उद्योगच जास्त व्हायला लागले. कविता काय, कथा काय भलतं भलतंच सुचू लागलं. त्यात कॉलेजच्या पहिल्या वर्षीच आंतरमहाविद्यालयीन दिवाळी अंक कथास्पर्धेत बक्षिस मिळालं तसं आमचा रथ दोन बोटं वरच धावू लागला. परिक्षा आली की अभ्यासाला लागायचं तेव्हढ्यापुरतं जमिनीवर. आणखीन मित्र भेटत गेले. धमाली घडू लागल्या. सहली घडू लागल्या. अरेतुरेची लज्जत यायला लागली. सगळं काही घडत होतं. नासिक काय पुणे काय, पुणे येथे तर काय उणे. सांस्कृतिक राजधानीच. उधाण न आलं तरच नवल. मन भरून जगलो ते दिवस, मन लावून अभ्यासही केला.  चारवर्षात डिग्रीधारक झालो. सगळ्या परिक्षा पास झालो. 

आता खरी परिक्षा सुरू झाली आयुष्याची. मध्यंतरी लग्न झालं हे ओळखलंच असेल बहुतेकांनी. काही दिवसांपूर्वी नातेवाईकाच्या मुलाचा साखरपुडा होता. त्याला शुभेच्छा देताना बेस्ट ऑफ लक ही म्हटले. वरतून म्हटलं, परिक्षेच्या अगोदर बेस्ट ऑफ लक म्हणतात ना तसं!! तर तो दोन मिनिटं माझ्यासमोर पहातच राहिला. मग त्याला समजवलं, त्याचं  असं असतं की प्रश्नपत्रिकेत जसं सांगतात ना की, एका ओळीत उत्तर द्या, आन्सर इन वन सेन्टेन्स, थोडक्यात लिहा, बी ब्रीफ, कोण कोणाला काय म्हणाले हू सेड टु हूम. जोड्या जुळवा, मॅच द पेअर, समानार्थी शब्द द्या, हे प्रकरण तसं अवघड, विरुद्धार्थी शब्द द्या, हे तसं सोपं. वरतून पत्रलेखन, निबंध, आत्मचरित्र, हे जसं परिक्षेत असतं तसं सगळं आयुष्यात ही असतं. तेव्हा तयार रहा, बी प्रीपेर्ड. तो होतकरू मुलगा खो खो हसायला लागला. मीही. खरंतर हे माझे अनुभवाचे बोल. 

किती परिक्षा दिल्यात? तसं तर पदोपदी परिक्षाच. एक पेपर सोडवून झाला की दुसरा हजर. रसायन शास्त्रासारखे इक्वेशन्स, इतिहासात असतात तशा लढाया त्या रक्तरंजित नसतात तरी जीवघेण्या नक्कीच. समाजशास्त्र मात्र इथे वेगळंच. सर्वात अवघड गणिताचाच पेपर आयुष्यातही. सोपे गणित लवकर सुटतं. कूटप्रश्न मात्र अनुत्तरित राहणारे. सोडूनच द्यावी लागतात. इथे हुशारी फारशी चालत नाही. कस लागतो तो समंजसपणाचा.  सुपरवायझर वरती बसलेला. अनेक जटिल प्रश्न व समस्या नव्या कोऱ्या प्रश्नपत्रिकेसारख्या. त्यातून तावूनसुलाखून बाहेर पडलो की हुश्श वाटणारं. अधिक मार्कांचा अट्टाहास इथे चालत नाही.  बऱ्याचवेळा स्वतःला हरवत इतरांना जिंकू देत पास होता येते आयुष्याची परिक्षा. पण एकूणच पाहिलं तर वाटतं आतापर्यंतचं जगणं पाहून, पेपर तसा सोपा होता. 

© डॉ. जयंत गुजराती

नासिक

मो. ९८२२८५८९७५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ खरे “Indian Idol” – डॉ.पी.वीरमुथुवेल… लेखक : श्री संपत गायकवाड ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

?इंद्रधनुष्य?

 ☆  खरे “Indian Idol” – डॉ.पी.वीरमुथुवेल… लेखक : श्री संपत गायकवाड ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

फ्लॅटचे ७२ लाख कर्ज असताना बक्षीस मिळालेले २५ लाख दान करणारे अवलिया वैज्ञानिक. चांद्रयान-३ पूर्वतयारी सुरू असल्याने चार वर्षात एकही रजा घेतली नाही. 

इस्रोचे वैज्ञानिक,  चांद्रयान- ३ मोहिमेचे संचालक डॉ.पी.वीरमुथुवेल यांनी बक्षीस मिळालेले २५ लाख रुपये विविध शिक्षण संस्थांना दान केले त्यांचे वडील रेल्वेत तंत्रज्ञ होते. गरिबीत जीवन जगले व वडिलांचे संस्कार म्हणून बक्षिसाची रक्कम दान केली. एक लाख पगारातून कर्जाचे हप्ते फेडत सामान्य नोकरदाराप्रमाणे हे ISRO चे वैज्ञानिक संसार चालवत आहेत.

२३ ऑगस्ट २०२३ रोजी लॅडिंग झालेल्या चांद्रयान-३ मोहिमेचे ISRO चे प्रकल्प संचालक डॉ.पी.वीरमुथुवेल यांच्यासह ८ वैज्ञानिकांना तामिळनाडू सरकारने प्रत्येकी २५/२५ लाख रुपये बक्षीस दिले होते.

डॉ.वीरमुथुवेल यांनी बक्षीस मला मिळाले असले तरी यावर अनेकांचा हक्क आहे, म्हणून स्वतः ला मिळालेले २५ लाख रुपये सगळेच्या सगळे, ज्या शैक्षणिक संस्थांनी वैज्ञानिक घडवले त्या संस्थांना दान करण्याचा निर्णय घेतला.

डॉ.पी.वीरमुथुवेल यांनी भारतीय स्टेट बँकेकडून ७२ लाख रुपये कर्ज घेऊन फ्लॅट घेतला आहे. दरमहा १ लाख रुपये पगारातून हप्ता जातो. स्वत:वर कर्ज असूनही बक्षीसाची २५ लाख रक्कम एलुमलाई पॉलिटेक्निक कॉलेज वेस्ट तांबरम, चेन्नई माजी विद्यार्थी संघटना, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NIT), तिरुचिरापल्ली श्रीसाईराम अभियांत्रिकी महाविद्यालय आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था IIT मद्रास यांना दान केली.

ISRO ही संस्था देशाची शान आहे. राष्ट्रीय विकासात योगदानासाठी समृद्ध वातावरण इस्त्रो संस्था देत आहे त्यामुळे आम्ही समाधानी आहोत. २०१९ ते २०२३ या कालावधीत चांद्रयान-३ मोहिमेचे काम सुरू असल्याने एकही रजा डॉ.पी.वीरमुथुवेल यांनी घेतली नाही.

देशाचे खरेखुरे Idol, खरेखुरे हिरो आपल्या देशातील वैज्ञानिक आहेत.

डॉक्टर पी.वीरमुथुवेल यांच्या दातृत्वास व निष्काम सेवेसाठी साष्टांग नमस्कार. इस्रोच्या सर्वच वैज्ञानिकांना आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभू दे ही परमेश्वराचे चरणी मनोमन प्रार्थना. 

लेखक : श्री संपत गायकवाड (माजी सहायक शिक्षण संचालक)

संग्राहक : श्री माधव केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “थँक्स गिव्हिंग डेज…” – लेखिका :सौ. प्रतिभा कुलकर्णी ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “थँक्स गिव्हिंग डेज…” – लेखिका :सौ. प्रतिभा कुलकर्णी ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

डिसेंबर महिन्यातील पहिला  आठवडा हा thanks giving days म्हणून साजरा होतो. ह्या आठवड्यात सगळ्या Near and Dear ones ना काही चुकले असेल तर साॅरी म्हणून, त्यांचे आभार आणि प्रेम व्यक्त करतात आणि त्यांचे आपल्या आयुष्यातील महत्त्व अधोरेखित करतात….

पण खरं सांगू,

मला हे केवळ परकीयांचे अंधानुकरण वाटते.

हे म्हणजे कसं झालं ना, वर्षभर केलेल्या चुका सुधारण्यासाठी एखादा सत्यनारायण किंवा होम करायचा आणि परमेश्वराकडे क्षमा मागायची आणि पुन्हा त्याच चुका करण्याचा परवानाच घ्यायचा. त्यापेक्षा नित्य नेमाने सद्वर्तन करावे आणि परमेश्वराचे मनोभावे आभार मानावेत ना.

मला आठवतं आमच्या लहानपणी आम्ही रुसून बसलो की भूक नाही असे सांगत असू. मग माझी आई तिचा हुक्मी एक्का काढायची, ” तू जेवली नाहीस तर मी पण जेवणार नाही. ” आता काय बिशाद होती आमची न जेवण्याची आणि आई वर रागावण्याची? पण हे राग रुसवे किती गोड होते.

माझी मुलंही खूप गुणी आणि समजूतदार होती. पण तरीही मुलंच ती.काहीतरी चुकणारच. अशा वेळेस माझी एकमेव शिक्षा म्हणजे” अबोला”!पण तीच त्यांना त्यांची चूक कळायला पुरेशी असायची. काही वेळातच,”आई तू मला रागव, पण अशी गप्प नको ना राहूस….”  असं  म्हणत त्यांनी मारलेली मिठी मला विरघळायला पुरेशी असायची.

शाळेत मैत्रिणीशी  भांडण झाले की आईला काहीतरी छान, तिच्या आवडीचा डबा करायला सांगायचा आणि मधल्या सुट्टीत गाल फुगवूनच तिच्यापुढे तो डबा चक्क आपटायचा, की कट्टीची बट्टी झालीच पाहिजे.

अगदी पती- पत्नीच्या नात्यातलीही रुसव्याफुगव्याची गंमत लज्जतच आणते की.सकाळीच ऑफिसला जाताना झालेले भांडण एखाद्या गजऱ्याने किंवा तिच्या आवडत्या कचोरीने चहाच्या कपातील वादळच ठरते.  त्यासाठी बायकोनेही कन्सेशन घेऊन  तासभर आधी येऊन त्याच्या आवडीचा केलेला झणझणीत वडापावचा बेत घरातील वातावरणातला जिवंतपणा कायम  ठेवतो.

इतकंच काय ,अगदी जवळची, जिवाभावाची सखी असो किंवा फेसबुकवरील तुमच्यासारखे कधीही न भेटलेले तरीही एक अनोखे नाते निर्माण झालेले मित्र मैत्रीणीही, काही दिवस आले नाही तर विचारतात, “काय गं,काही झालंय का ? बरी आहेस ना? ” त्यावेळी ही  जी ओढ, काळजी असते तिची जाणीवही खूप सुखावणारी असते.

एकंदरीत काय तर ,असे रुसवेफुगवे..त्यानंतरचे मनवणे ( अगदी आमच्या सारख्या सिनियर सिटीझनसमध्येही, बरं   का!)  आहे तोपर्यंतच आयुष्यातील खुमारी आहे. सुग्रास जेवणात जसे झणझणीत लोणचे अथवा चटणी हवीच .तसेच आयुष्यातही अशी हक्काने रागावणारी आणि तितक्याच मायेने मनवणारी नाती हवीतच.

त्यांना असे एका दिवसात थॅन्क्स म्हणून किंवा माफी मागून परके करू नये, असे मला वाटते.

म्हणूनच मला  इकडच्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना अजिबात थॅन्क्स अथवा साॅरी न म्हणता त्यांच्या ॠणातच रहाणे आवडेल.

लेखिका: सौ. प्रतिभा कुळकर्णी.

प्रस्तुती : सौ. शामला पालेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चरैवती चरैवती… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

☆ चरैवती चरैवती…  ☆ श्री विश्वास देशपांडे

तसे आमचे संस्कृत लहानपणापासून कच्चे. आता अर्थात ते सुधारण्याचा संभव कमीच ! संस्कृतमध्ये काही काही शब्द वेगळ्या अर्थाने येतात. आपल्या मराठीत आणि त्यांच्या मूळ अर्थात फरक असतो. पण आम्हाला हे सांगतो कोण ? लहानपणी रामरक्षा म्हणायचो. अर्थ कळायचा नाही. रामरक्षा म्हणताना ‘ रामम रमेशम भजे ‘ असे शब्द यायचे. लहानपणी ‘ भजे ‘ म्हणजे भजणे किंवा आळवणे  हा अर्थ माहितीच नव्हता.  पुढे तो केव्हा तरी कळला. तोपर्यंत देवासमोर बसून रामरक्षा म्हणताना हे शब्द आले की आम्हाला भजेच आठवायचे. कधी कधी रामरक्षा म्हणताना समोर डिशमध्ये गरमागरम भजी ठेवली आहेत, आणि ते स्तोत्र म्हणत असताना ती अधूनमधून तोंडात टाकतो आहोत अशी कल्पनाही यायची.

तसेच कधीतरी ‘ चरैवती चरैवती ‘ हे शब्द कानावर पडले होते. मूळ अर्थ माहित असण्याचे काही कारणच नव्हते. लहानपण एका अगदी छोट्याशा खेड्यात गेले. आमच्याकडे शेती असल्याने गाई, बैल वगैरे असायचेच. सकाळी गाई चरायला जायच्या. बैल रिकामे असले तर शेतात चरायला सोडले जायचे. बकऱ्या देखील चरून यायच्या. घरात सुद्धा आम्ही स्वयंपाकघरातील डबे उचकून काही खायला मिळते का हे पाहत असायचो. तेव्हा घरातल्या कोणाचे तरी बोल कानावर पडायचे, ‘ सारखा चरत असतोस ‘ त्यामुळे चरणे म्हणजे सतत खाणे हा अर्थ आमच्या मनात अगदी फिट्ट बसला होता. म्हणून जेव्हा ‘ चरैवती चरैवती ‘ शब्द कानावर पडले तेव्हा त्यांचा या चरण्याशी म्हणजेच खाण्याशी संबंध असावा असे आमच्या बालबुद्धीस वाटून गेले असल्यास नवल नाही ! त्यामुळे ऋग्वेदात सुद्धा आपल्याला आवडणारी काहीतरी गोष्ट सांगितली आहे हे लक्षात येऊन आम्हाला अतिशय आनंद झाला होता.

नंतर कधीतरी महर्षी चार्वाकांचा पुढील ‘श्लोक कानी पडला होता. त्यात म्हटलं होतं

यावज्जीवेत सुखं जीवेद ऋणं कृत्वा घृतं पिवेत, भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः॥’

यात ते म्हणतात जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत ते सुखाने जगून घ्या. हवं तर कर्ज काढून दूध तूप खा प्या. ( कर्ज घ्यावे की नाही, ते फिटेल की नाही याची चिंता करू नका) अहो, जोपर्यंत शरीर आहे, तोपर्यंत मौजमजा करून घ्या. एकदा शरीर नष्ट झाले की संपले सगळे. खरं तर भौतिक गोष्टींचा मोह धरणे ही चांगली गोष्ट नाही. अध्यात्मात तर हे सगळं नश्वर म्हणजे नष्ट होणारं आहे. ब्रह्म सत्य, जग मिथ्या. वगैरे आमच्या कानावर पडत होतं. पण ते पटायला पाहिजे ना ! त्यामुळे त्याच्या बरोबर विरुद्ध  सांगणारा चार्वाक आम्हाला जवळचा वाटू लागला. पुढे विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी यासारख्या काही लोकांनी बँकांकडून कर्जे घेऊन चार्वाकांचा उपदेश अमलात आणला.

पण पुढे काळाच्या ओघात अस्मादिकांचे जसजसे शिक्षण वगैरे होत गेले, तसतसे मनावर संस्कार की काय म्हणतात ते झाले असावेत आणि चार्वाक, चरैवती चरैवती वगैरे आम्ही साफ विसरलो. खायचं ते जगण्यासाठी. खाण्यासाठी जगायचं नाही वगैरे गोष्टी लक्षात आल्या. जीवनाचं ध्येय महत्वाचं वगैरे वगैरे यासारख्या मोठमोठ्या शब्दांचा पगडा मनावर बसला. आणि पुढे दोन तीन दीक्षितांनी आमच्या मनावर प्रभाव टाकला. त्यापैकी एक माधुरी दीक्षित होती. पण तिचे केवळ चित्रपट पाहण्यातच आम्ही धन्यता मानली. पुढे जे दोन दीक्षित आले त्यात एक होते स्वदेशीचा पुरस्कार करणारे राजीव दीक्षित आणि दुसरे जगन्नाथ दीक्षित. या मंडळींनी तर आरोग्यासंबंधी अशा काही गंभीर गोष्टी सांगितल्या की आम्ही आहारावर नियंत्रणच आणून टाकले. फक्त दोन वेळा खायचे. मध्ये मध्ये काही वाटले तरी खायचे ( चरायचे ) नाही. आणि त्या मार्गावरच वाटचाल सुरु होती. तसे आमच्या किरकोळ शरीरयष्टीकडे पाहून काही लोक सांगत होते की तुम्हाला हे करायची आवश्यकता नाही. पण आमच्यावर दीक्षितांचा प्रभाव पडला होता. त्यामुळे आम्ही सकाळी आणि चार वाजताच चहा फक्त घ्यायचो. तेवढ्या बाबतीत दीक्षितांनी आम्हाला आमच्याकडे पाहून माफ केलेच असते. पण तसे व्हायचे नव्हते.

झाले असे की परवा आम्ही जरा लांबचा प्रवास करून आलो. पण प्रवासात कशाने तरी तब्येत बिघडली. तुम्ही म्हणाल खाण्यापिण्यात काही तरी गडबड झाली असावी. पण नाही हो, आम्ही काळजी घेत होतो. दीक्षितांचे म्हणणे जरी कटाक्षाने पाळले नाही तरी खाताना त्यांची आठवण करून खात होतो. आणि पिण्याचे म्हणाल तर आम्ही पाण्याशिवाय आणि चहाशिवाय दुसरे काही पीत नाही. त्यामुळे प्रवासात बाटलीबंद पाणीच प्यायलो. आयुष्यात बाटलीला हात लावला असेल तर तो पाण्यासाठीच ! असो. पण व्हायचे ते झाले. सर्दी, ताप वगैरेंनी त्रस्त होऊन शेवटी डॉक्टरांना शरण गेलो. त्या डॉक्टरांनी गोळ्या औषधे तर दिलीच पण जो काही सल्ला दिला तो फार आवडला. ते म्हणाले, ‘ दिवसातून चार पाच वेळा थोडे थोडे खात जा . ( आपल्या भाषेत ‘ चरत जा ‘ ) म्हणजे पोट व्यवस्थित भरेल. आणि तब्येतीच्या तक्रारी राहणार नाहीत. ‘ बरं ज्यांनी हा सल्ला दिला ते डॉक्टर पुण्याचे आणि अनुभवी. त्यामुळे त्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष थोडेच करता येणार ? तरी त्यांना मी भीत भीतच माझ्या मनातील शंका विचारली. ‘ डॉक्टर, पण ते दीक्षित तर दोनपेक्षा जास्त वेळा खाऊ नका म्हणतात. ‘ यावर डॉक्टर फक्त हसले. ( बहुधा मनातल्या मनात असं म्हणत असतील की काय मूर्ख माणूस आहे हा ! मी सांगतो यावर याचा विश्वास दिसत नाही. ) मग ते म्हणाले,’ अहो, सर्वांसाठी तसं आवश्यक नाही. तुम्ही त्याचा विचार करू नका. ‘

मग काय पुन्हा ‘ चरैवती चरैवती ‘ आठवलं. खरं तर चरैवती चरैवती म्हणजे चालत राहा. चालणं आरोग्यासाठी खूप महत्वाचं आहे. आम्ही ते दोन्ही अर्थानं घेतलं इतकंच. आता बघू या. डॉक्टरांचा सल्ला पाळतो आहे. त्याप्रमाणे चालत राहू.

लेखक – श्री विश्वास देशपांडे,

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डायरी माझी सखी… ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ डायरी माझी सखी…  ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

डिसेंबर संपत आला की नवीन वर्षाचे वेध लागतात .नवीन वर्ष म्हटलं की आठवते ती डायरी…..

दरवर्षी कोणीतरी मला डायरी देतं. त्या डायरीत सटर फटर  असं मी काहीतरी लिहायची.

वर्ष संपत आलं की थोडीशी पानं भरलेली असायची बाकीची  डायरी कोरीच असायची ….

त्या कोऱ्या पानांचा काय करायच हे कळायचं नाही. ठेऊन तरी काय करू…

असा विचार करून मी जुनी डायरी  फेकून द्यायची …

नवीन वर्ष नवीन डायरी …असं माझं वर्षानुवर्ष चाललं होतं…

काही वर्षांपूर्वी आकाराने जरा मोठी अशी एक सुरेख डायरी मला मिळाली. मनात आलं या डायरीचा आपण काहीतरी वेगळा उपयोग करावा… काय करावं ते मात्र सुचत नव्हतं. जानेवारी संपत आला तरी डायरी कोरी होती.

आयुष्याच्या संध्याकाळी कुसुमाग्रजांना कायमसाठी साथ करणाऱ्या कवितांसाठी त्यांनी  ‘ सखे….’

ही फार सुरेख कविता लिहिली आहे. ती माझ्या वाचनात आली. 

मनात आलं ही आपल्याला परत वाचावीशी वाटली तर लिहिलेली असावी….ते म्हणतात..

सखे..

तू दिलेलं चांदणं  

माझ्या पडशीमध्ये तुडुंब आहे….. 

आपल्यालाही अमाप आनंद कुसुमाग्रजांनी दिलेला आहे….. 

… आणि त्या दिवशी डायरीचा श्री गणेशा झाला.

आपल्याला जे आवडेल ते डायरीत लिहायचं असं ठरवलं..

वाटलं असं साहित्य आपल्याला कुठे मिळणार?

नंतर गंमत अशी झाली की डायरीत लिहावं असं सतत कुठे ना कुठे वाचायला मिळालं.

मासिकात ,पुस्तकात ,एवढेच काय अगदी रोजच्या वर्तमानपत्रात सुद्धा…

मग ते मी डायरीत लिहायला सुरुवात केली…

एकदा वाटलं आपण जे वाचतोय तेच डायरीत लिहितोय ..नंतर परत ते वाचण्यात काय गंमत वाटणार?

…  जरा विचार केल्यानंतर लक्षात आले की  कित्येक गोष्टी जुन्या होत नाहीत. काही वाचल्यावर लगेच समजत नाहीत. परत शांतपणे वाचल्यावर त्यातला गर्भित अर्थ समजतो..

काही गोष्टी चांगल्या असूनही आठवणीत राहत नाहीत ..त्यामुळे पुन: प्रत्ययात त्याचा आनंद निश्चित मिळेल.

हा नाद लागल्यावर डायरीत काही काही लिहीत गेले…..  बघता बघता डायरी भरली.

माझंच मला खरं वाटेना.  हातात घेऊन चाळायला लागले ..

डायरीत सलग असं काही लिहिलेलं नव्हतं .कुठेही काहीही होतं.

सहज  म्हणून सुरुवात केली होती आणि आता डायरीत खूप काही जमा झालं होतं.

अनेक कविता डायरीत लिहिल्या आहेत. वाचून वाचून पाठ  झाल्या आहेत .

एकदा मैत्रिणी घरी आल्या तेव्हा  त्यातल्या काही कविता वाचल्या. मैत्रिणींना काही कविता आठवल्या. त्या डायरीत लिहून घेतल्या….  तो दिवस कवितांचा झाला अनपेक्षितपणे खूप आनंद देऊन गेला.

हिणाबाई एका कवितेत म्हणतात …. 

माझं सुख माझं सुख 

हंड्या झुंबर टांगलं 

माझं दुःख माझं दुःख

तयघरात कोंडलं ….. 

त्यानंतर खूप दिवसानंतरच्या एका पानावर होत …. 

“ माय जॉय इस पब्लिक प्राॅपर्टी बिटवीन मॅन अँड मॅन 

माय पेन इज प्रायव्हेट प्रॉपर्टी 

बिटवीन गाॅड अॅन्ड मी …. “

या ओळी कोणाच्या आहेत  हे मी  लिहिलेलं नाही .कुठून पाहून लिहिल्या हेही मला आठवत नाही.

पण जगाच्या दोन टोकाला राहणाऱ्या लेखकांच्या  विचारांमधला आशय किती मिळता जुळता आहे हे वाचून आश्चर्य वाटलं. 

आपल्या साध्या सुध्या बहिणाबाई विषयी आदर दाटून आला…

“ हु मुव्हड माय चीज “ ह्या पुस्तकाचं मराठीतील थोडंसं स्वैर भाषांतर मध्यंतरी मी वाचले होते. त्यातली काही वाक्य डायरीतल्या एका पानावर आहेत.

बदल घडतात

बदलाचा अंदाज घ्या 

बदलावर लक्ष ठेवा 

बदलाचा आनंद  घ्या

बदलाला तयार व्हा

हे वाचताना मी विचार करायला लागले… त्या पुस्तकातले अजून काही काही मला आठवायला लागले.

मनात आले रोजच्या जीवनात हे किती उपयुक्त आहे.

जे कृष्णमूर्ती, वामनराव पै, गोंदवलेकर महाराज, विनोबा भावे, निसर्ग दत्त महाराज यांची व अजूनही बऱ्याच जणांची सुंदर सुंदर वचने डायरीत मी कुठे कुठे लिहिली आहेत.

.. मनाला आधार देणारी उभारी देणारी अशी कित्येक वाक्य या डायरीमुळे आज हाताशी आहेत.

ही एकदा वाचून उपयोग नाही. ती वारंवार वाचली तरच मनात खोल शिरून तिचा परिणाम होईल .

अशी अर्थगर्भ अशी ती वाक्य आहेत…  अर्थात त्याचा रोजच्या  व्यवहारात उपयोग करून घेतला पाहिजे हे  पण समजते आहे.

डायरीत काही अभंग ,गौळणी, गाणी आहेत … 

पावनेर मायेला करू…. .  

सुखी नांदते संसारी बाई 

नाही मागणं आणि काही

काळी पोत ही जन्माची देई

तूच सांभाळ आई लेकरू…

या ओळी वाचताना डोळे भरून येतात… मन कातर हळवं होतं..

एके दिवशी गंमत झाली होती.  मी त्या दिवशी रागवले होते ..रुसले होते… कुणाला काही सांगावं कुणाशी काही बोलावं असं वाटत नव्हतं.

…  नंतर मीच माझ्याशी बोलले होते.. स्वसंवाद साधला होता .स्वतःची समजूत काढून सावरले होते. आज डायरी चाळताना ते मला आठवले… त्या दिवशी डायरीत होतं . 

चालायचंच 

जाऊ दे 

सोडून दे ना

टेक ईट ईझी 

….  आज हे वाचताना मस्त वाटलं…

सांकेतिक पण मला कळणारी अशी बरीच वाक्य डायरीत आहेत.. एका पानावर होतं

‘मी शहाणी कधी होईन..’ 

त्या दिवशी मी केलेला वेडेपणा

अहं..नाही हं तो नाही सांगणार…

त्या दिवशी खरंच माझ्या हातून चूक झाली होती. ती मला कळली होती त्यातून मी धडा घेणार होते. शिकणार होते . ती चूक  परत होऊ नये म्हणून दक्षता घेणार होते.

पुढे लिहिलं होतं …. 

भले बुरे जे घडून गेले

विसरून जाऊ सारे क्षणभर

जरा विसावू या वळणावर….

या क्षणी डायरी वाचताना मीही क्षणभर थांबले…

वर्षभर जसं वागले त्याचा थोडाफार ताळेबंद या डायरीत आहे .डायरीमुळे मी माझ्या मागच्या दिवसांकडे वळून बघू शकते आहे.

डायरी वाचताना आठवली ती खूप वर्षापूर्वीची कॉलेजची रंगीबेरंगी डायरी …त्यात शेर शायरी, हिंदी  मराठी गाणी, कादंबरीतले उतारे आणि बरंच काही होतं …

शेवटच्या पानावर तर काय काय होतं…

बहरण्याचे ..खुळावण्याचे… फुलण्याचे… ते दिवस होते….  ती डायरी वेगळीच होती. लग्नानंतर ती माहेरी राहिली… परत कधीतरी आणली आणि वाढणाऱ्या संसाराच्या पसाऱ्यात कधी आणि कुठे हरवली कळलच नाही ….

संसारात मी पण पार बुडून गेले. आता आयुष्याला थोडा निवांतपणा आला आहे.म्हणून डायरी लिहायला वेळ मिळत आहे. 

नंतर पुढच्या डायऱ्या थोड्या प्रौढ प्रगल्भ झाल्या आहेत… माझ्यासारख्या कदाचित…

नंतरच्या एका डायरीत असं लिहिलं आहे की..

“तुम्हाला असं मनात कितीदा वाटलं की मी फक्त एवढे बोललो असतो तर…….

हो हो  सगळे पटते.. पण पटतही नाही … असं कसं होऊ शकतं…  चलता है…

ही वाक्य आत्मनिरीक्षण करायला लावणारी आहेत. सहज सोपी शिकवण देणारी आहेत.

तर सांगायचं तात्पर्य म्हणजे…

डायरीत खूप काही जमा झालं आहे. दोन-चार मैत्रिणींनाही हा नाद लागला आहे..

माझे  काय ..  तुझ्याजवळ काय याची चौकशी होत आहे..

एकमेकींना नवीन काही वाचून दाखवलं जात आहे..

तुमचं काय…

 तुम्हाला हा प्रयोग करावासा वाटतोय का ?

करून बघा ना …. काय हरकत आहे…

कदाचित तुमची डायरी पुढच्या वर्षी तुम्ही मला दाखवाल …

तुम्ही माझ्यापेक्षा वेगळं लिहिलं असेल… 

आपल्या दुसऱ्या मैत्रिणींनी अजून काही लिहिलं असेल..

 सगळ्यांचा मिळून एक  छानसा खजिना तयार होईल ..

घ्यायचा आहे का नवीन अनुभव.. करायची का सुरुवात..

आजकाल आपण हाताने फार  कमीच लिहितो…. मोबाईलवरपण बोलून टाईप होत…

लिहायला विसरत चाललो आहोत का?

पण एक सांगू का .. लिहून बघा.

आपण स्वतः लिहिले की शब्द लक्षात राहतात… आणि त्याचे अर्थ पण…

हे लिहिणं निखळ आनंद देतं…. असं लिखाण आपलं आपल्याला समृद्ध करतं …शहाणं करतं..

ही डायरी आता नुसती डायरी नाही राहिली… ती माझं विसाव्याचं विरंगुळ्याचं ठिकाण झालंय…

तिच्याशी मी कधीही बोलू शकते…..  जिला मी मनातलं काही सांगू शकते …  अगदी कधीही ..

अशी ही डायरी माझी सखी झाली आहे… मैत्रीण झाली आहे…

बघा प्रयोग करून ….. तुम्हालाही तुमच्यातलं काहीतरी नवीन गवसेल….

आयुष्यभर पुरणारं ….साथ देणारं….

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अनोळखी लोक… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे ☆

डाॅ.भारती माटे

? इंद्रधनुष्य ?

☆ अनोळखी लोक… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे 

रेल्वे स्टेशनवर ज्या सूचना पुकारल्या जातात, त्यासाठी वेगळा एक माणूस नेमलेला असतो, जो प्रसंगी रेग्युलर रेकाॅर्डिंग न वाजवता स्वतः माईकवरून सूचना देत असतो. असेच एक ‘अनाऊन्सर’ श्री. विष्णू झेंडे ड्युटीवर असताना रात्री दहाच्या आसपासची वेळ होती.

मुंबईतील मोठ्या स्टेशन्सपैकी एक असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेशनवर त्यांची ड्युटी कायमप्रमाणे चालू होती. आणि अचानकपणे कुठेतरी सुतळी बाँब फुटल्यासारखा आवाज यायला लागला. ‘कुठे छोटा-मोठा स्फोट झाला की काय’, असा विचार झेंडेंच्या डोक्यात येऊन गेला. त्यांनी तात्काळ ‘आरपीएफ’ला फोनवर झालेली गोष्ट कळवली, आणि योग्य माहिती घेण्यास सांगितले.

पण असे अनेक आवाज परत परत ऐकू यायला लागले, 

आणि त्यांना दोन व्यक्ती मोठ्या assault रायफल्स घेऊन प्लॅटफॉर्मवर दिसल्या. ते कसलेही साधे स्फोट वगैरे नव्हते, तर त्या रायफलीतून फायर केले जाणारे राऊंड आणि हँड ग्रेनेड होते, हे एव्हाना स्पष्ट झाले होते.

श्री. झेंडे ज्या ठिकाणी बसून रेल्वेच्या सूचना द्यायचे, तिथून सगळ्या प्लॅटफॉर्मवरच्या हालचाली बऱ्यापैकी स्पष्ट दिसायच्या. त्यांना हे दोन्ही रायफलधारी स्पष्ट दिसले होते. त्यातील एक ‘अजमल आमिर कसाब’ आणि दुसरा ‘अबू डेरा इस्माईल खान’ आहे, हे त्यांना त्याक्षणी माहीत नव्हतं, किंवा माहीत असण्याचं कारणही नव्हतं. परंतु हा काही साधासुधा प्रसंग नसून आतंकवादी हल्ला आहे, हे त्यांच्या पटकन लक्षात आलेलं.

असल्या प्रसंगांना सामोरं जाण्याची सवय नसते, तेव्हा भीतीनं गाळण उडणं स्वाभाविक आहे. झेंडेंच्या बाबतीतदेखील वेगळं काय अपेक्षित होतं..? परंतु त्यावेळी त्यांनी ज्याप्रकारे अचानक उद्भवलेल्या परीस्थितीला जे तोंड दिलं, ते अद्भुत होतं.

बुडत्याला काडीचा आधार असतो. इथं तर त्यांच्याजवळ स्टेशनचा पूर्ण आराखडा मेंदूत फिट होता, आणि स्टेशनवर प्रत्येक ठिकाणी स्पीकरशी जोडलेला माईक जवळ होता. आहे त्या परिस्थितीत घाबरून न जाता जे काही करता येईल ते करायचं, असं ठरवून त्यांनी माईक हातात घेतला, 

आणि लोकांना सावध करायला, सूचना द्यायला सुरुवात केली. मराठी आणि हिंदीमधून ते लोकांना स्टेशनच्या दुसऱ्या मार्गाकडे जाण्यासाठी सूचना करत होते. हे दोन आतंकवादी जिथं होते, तिथून दूर जाण्यासाठी सूचना करत होते.

लोकांवर बेछूट गोळीबार आणि हँड ग्रेनेड्सचा हल्ला चालूच होता, परंतु शेकडो लोक झेंडेंच्या सूचनेनुसार विरुद्ध दिशेला पळून जात होते, संकटापासून वाचत होते.

साहजिकच, त्या दोघांच्या लक्षात आलं, की कुणीतरी लोकांना सावध करतंय, त्यांना सुटकेचा रस्ता दाखवतंय. मग ते या अनाऊन्सरला शोधू लागले.

झेंडेंच्या बाबतीत  गोष्ट चांगली होती, की त्यांचा आवाज कुठून येतोय, हे कळत नव्हतं, परंतु झेंडे पहिल्या मजल्यावर बसलेले असल्याने दोन्ही आतंकवादी मात्र त्यांच्या नजरेच्या टप्प्यात होते. त्यामुळे त्या दोघांना आपल्यापर्यंत पोहोचायला वेळ लागेल, हे त्यांना माहीत होतं. 

त्यामुळे त्यांनी जितका वेळ शक्य आहे तोवर खिंड लढवायची ठरवली.

नंतरचा अर्धा तास ते माईकवरून लोकांना सूचना देत राहिले. अर्ध्या तासाने जवळजवळ पूर्ण स्टेशन रिकामे झाले होते. तोवर आतंकवाद्यांना देखील ‘ह्या सूचना कुठून येतायत’ ह्याचा सुगावा लागला होता. आता त्यांनी रेल्वे स्टाफच्या लोकांकडे विशेष मोर्चा वळवला,आणि त्यांच्यावर गोळीबार करू लागले. 

त्यावेळी त्यांनी जिथे झेंडे बसले होते त्या केबिन रूमवर देखील गोळीबार चालू केला. त्या गोळीपासून ते बचावले, परन्तु हळूहळू गोळ्यांचा आवाज जवळ जवळ येऊ लागला, तेव्हा त्यांनी काही क्षणांसाठी आपल्या जीवाची आशा सोडलेली. पण स्टेशनवरची गर्दी आता पूर्णपणे कमी झाल्याचं त्यांना समाधान होतं, 

आणि आता जे होईल त्याला सामोरं जाण्याची मानसिक तयारी केली होती. त्यांचं कर्तव्य त्यांनी दोन पाऊले पूढे जाऊन चोख बजावलं होतं, याचा त्यांना आनंद होता, समाधान होतं.

सुदैवाने ते सुरक्षित ठिकाणी लपले, आणि सुखरूप राहिले.

त्या स्टेशनवर कायम जवळपास हजारो लोक कोणत्याही क्षणी असतात. त्यादिवशी सीएसटी स्टेशनवरच्या हल्ल्यात जवळपास  ५२ लोकांनी प्राण गमावले. झेंडे यांनी दाखवलेल्या प्रसंगावधाना मुळे हा आकडा शेकडोंनी कमी झाला होता. 

एवढ्यावर त्यांचं योगदान संपलं नाही, तर नंतर खटल्यादरम्यान त्यांनी कसाब विरोधात कोर्टात साक्षदेखील दिली, आणि त्याला शिक्षा मिळवून देण्यातसुद्धा महत्त्वाची भूमिका बजावली.

अगदी दुसऱ्या-तिसऱ्या दिवसापासून सी.एस.एम.टी स्टेशनवरील वातावरण निवळून परत नव्याने सगळं सुरू झालं. लोकल्स भरून भरून पहिल्यासारख्या वाहू लागल्या. परंतु श्री. झेंडे यांचं २६-११ पूर्वीचं आणि नंतरचं जीवन यात प्रचंड बदल घडला असेल. त्या दिवसाच्या आठवणींमधून इतर अनेक प्रभावित लोकांप्रमाणे ते देखील बाहेर पडले नसतील.

आर्मीतील सैनिक आणि पोलीस यांच्याविषयी सदैव अपार आदर आहेच. परंतु श्री. विष्णू झेंडे यांच्याकडे पाहिलं, तरी देखील मला देशप्रेमाचे भरते तेवढ्याच तीव्रतेने येईल, जेवढे एका सैनिकाकडे पाहून येईल.

श्री झेंडे हे देखील सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या इतकेच महान देशप्रेमी आहेत, त्यांची समयसूचकता आणि धैर्याला नमस्कार.

प्रेषक :  चारुचंद्र करमरकर, नासिक 

संग्रहिका : डॉ. भारती माटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ क्षण आनंदाचे – लेखिका : सुश्री माधुरी संजीव कामत ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ क्षण आनंदाचे – लेखिका : सुश्री माधुरी संजीव कामत ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

थंडी सुरु होऊन तापमान २१..२२..२३ असं रूंजी घालू लागलं की बाजारात हिरव्यागार भाज्यांचे दर्शन व्हायला लागतं. ताज्या ताज्या पालेभाज्या तर दिसतातच, पण रसरशीत फळभाज्यांचे पण ढीग दिसू लागतात… या ढिगांवरून फक्त नजर जरी फिरली ना तरीही मनाला शांती मिळते.

आणि

नेहमीच्या फळभाज्या तर मिळतातच पण अनेक प्रकारच्या हंगामी भाज्या जसे की वेगवेगळ्या प्रकारचे घेवडा, वालपापडी,डबल बिन्स.

अगदी हिरव्या हिरव्या गार रूपात आपल्याला दिसतात.

आज आमच्या घरी हंगामाची पहिली डबल बिन्स आणली आणि सोलायला सुरुवात केली. सुंदर गुलाबी रंग पाहून डोळे निवले. मनाला तरतरी आली.

आणि

एका शेंगे मधून “ती” सळसळत बाहेर आली.

एक क्षण दचकायला झालं.पण “तिचा” उत्साह बघून थक्क व्हायला झालं.

“तिचं” नजाकतीने चालणं, नव्हे नव्हे, वळवळणं.एकदम लाजवाब.

मी पहातच राहिले. दोन क्षण.

भानावर येताच लक्षात आलं की “ती” टेबलाच्या टोकाला पोचली आहे.

पटकन दोन पानं आणली आणि “तिला” आसन करून दिलं.

आता “ती” छान आसनस्थ झाली.

नवीन आसनाचा अदमास घेऊ लागली.

आणि लगेचच तिथे रूळली पण !

आनंदाने पानं खाऊ लागली.

“तिचा” आनंद मी डोळे भरून पहात होते.

आणि

मनात आलं.

खरंतर “तिचा” आनंद क्षणभंगुरही ठरला असता. कारण तो आनंद माझ्या हातात होता.

तरीही आनंदाचे क्षण किती, हा विचार न करता आनंद आहे, हा विचार करून “तिने” पानं खायला सुरुवात केली होती.

आणि

मी “तिच्या”कडे पाहतच बसले.

आपण आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर यायला केवढा वेळ लावतो. किंबहुना बाहेर यायला उत्सुक नसतोच.

आणि

अगदी बाहेर आलो तरी नवीन ठिकाणी,नवीन परिस्थितीत रुजायला कित्येक दिवस,महिने लागतात. नाही का ?

“ती” एवढीशी “अळी” मला जीवनाचं तत्त्वज्ञान देऊन गेली.

कुठल्याही परिस्थितीत आनंदी रहा ग.न कुरकुरता.

आनंद किती मोठा आहे, याचा विचार न करता, आनंद मिळाला आहे, याचा विचार करून तो मस्त उपभोगून घे.

आणि

कुठल्याही परिस्थितीत सगळीच दुःखं नसतात. त्या दुःखाच्या पलीकडे असलेल्या चिमूटभर सुखाला शोधायचा प्रयत्न कर.

बघ कसा आनंद मिळतो ते.

लेखिका : सुश्री  माधुरी संजीव कामत

संग्रहिका : सौ. स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares