मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अशीही एक अनोखी आदरांजली… – लेखक : श्री अभिषेक ढिले ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ अशीही एक अनोखी आदरांजली… – लेखक : श्री अभिषेक ढिले ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित

– – कथाकथनाचा एक मंच आहे. मंचावर एक लाकडी पोडियम आहे. पोडीयमच्याच मागे लाकडी स्टूलावर पाण्याचे तांब्या – भांडे ठेवले आहे…

… सगळ्याचा आनंद घेत माझ्यासारखे भक्तरूपी श्रोते कथाकथनाचा आस्वाद घेत आहेत… कार्यक्रम पुण्यात असून सगळे वेळेवर पोहोचले आहेत… याचं कारण म्हणजे तारमास्तरांनी बहुदा दिलाचा तगादा कुणाचाही पत्ता न चुकवता पाठवला असावा…

गाडी लेट झाल्याने मधु मनुष्टे आणि सुबक ठेंगणी मागच्या लाइनीत जोडीनं बसले आहेत. त्यांच्याच बाजूला उस्मान शेठ आपल्या फॅमिलीसोबत आम्लेट खात आहेत. बसायला जागा न मिळाल्यामुळे आपले बिस्तरे थिएटराच्या नैऋत्येला अंथरून बगू नाना, झंप्या आणि अनुभवी मंडळी यांची चार तासांची निश्चिंती झाली आहे. मास्तर आत येतानाच टॅनिक युक्त चहा घेऊन आले आहेत…

मधेच कुठूनतरी रावसाहेबांचं साताच्या वर हासू ऐकू येऊन त्यावर “हाण तुझ्या xxx” अशी जोरदार दाद देखील येत आहे.

अंतुबरवा तर आज स्वतःहून तिकीट काढून आले आहेत. एव्हाना त्यांच्या दाताचा संपूर्ण अण्णू गोगट्या झाला असला तरी त्यांच्या येण्याने त्यांच्याकडचा गंगेचा गडू शाबूत असल्याची खात्री झाली आहे…

श्री अभिषेक ढिले

कोणी एक कुळकर्णी दिवाळी अंकातल्या बाईचं चित्रं पहावं तसं समोर बघत आहे आणि विनोद ऐकताच “पाताळविजयम” नाटकातल्या राक्षसासारखा हसत आहे. शेजारच्या गटण्याला तर तो माणूस कम शैतान वाटत असल्याने गटणे त्याच्याकडे केवळ भूतदयेने बघत आहे.

गटणे आता साहित्याशी आणि जीवनाशी पूर्णपणे एकनिष्ठ झाला असावा. कारण, कार्यक्रमाला तो सहकुटुंब उपस्थित आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले पुढारीसाहेब मधूनच उठून सर्वांना नमस्कार (कुणाचे लक्ष असो वा नसो) करून दुसऱ्या कार्यक्रमाला जाण्याकरता निघाले आहेत. त्याच वेळेस दारातून गडबडीत असणारा नारायण लग्नाची खरेदी उरकून सगळ्या माम्यांना घेऊन आत शिरत, कोपऱ्यातल्या राखीव जागेत ‘आणि मंडळीं’मध्ये जाऊन बसला आहे…

आज चक्क चक्क पोस्टमास्तर पहिल्या रांगेत अखंड दिसत आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव स्पष्ट दिसत आहेत. डिलीव्हरीच्या चिंतेतल्या माणसाला हसताना पहायचा हाच तो योग…

कधी नव्हे तर पुणेकर, मुंबईकर, नागपूरकर चक्क शेजारी बसले आहेत. एवढचं काय तर प्राध्यापक भांबुर्डेकर, प्रा. येरकुंडकरांसोबत सलगी करत आहेत. चितळे मास्तर जणू हरिवंश ऐकल्यासारखं कथाकथन ऐकत आहेत… मध्येच पेस्तनकाका नाकात तपकिर घालत आहेत. असल्या नल्ल्या हरकतीमुळे पेस्तनकाकी हळूच पेस्तनकाकांना चिमटा काढत आहेत.

थिएटरच्या बाहेरच्या गेटवर बसलेला कावळा येणाऱ्या जाणाऱ्याला “काय झालं का जेवण, काव काव” असं विचारत आहे.

देव गाभाऱ्यातून बाहेर यावा, तसा चौकातला पानवाला सुद्धा ठेला बंद करून आला आहे.

… आणि…

… आणि या सगळ्यांच्यासमोर आमचं पु. ल. दैवत निष्काम कर्मयोगाने कथाकथन सादर करत आहेत…

“अरे देवव्रत, तुला पुराव्याने शाबित करुन सांगतो. देवळात गेल्यावर मनाला एक प्रकारची प्रसन्नता, भव्यता, दिव्यता वैगरे काय काय वाटतं ना तसचं वाटतं होतं. आम्हाला साक्षात कृष्णाच्या तोंडून डायरेक्ट गीता ऐकल्यासारखं वाटतं होतं. “

… आम्हाला सांगत होते ना हरितात्या… पुरूषोत्तमबद्दल…

लेखक : श्री अभिषेक ढिले (देवव्रत) 

प्रस्तुती:सौ. स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बघा,.. पटतंय का ?… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

☆ बघा,.. पटतंय का ?… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

मी जन्माने ब्राह्मण असलो तरी कोणत्याही जातीचा कधीही द्वेष केल्याचे मला स्मरत नाही. तसेच परिस्थिती गरिबीची असूनही कधीही सरकारने आरक्षण देऊन माझी उन्नती करावी असे मला वाटले नाही. मध्यंतरी सरकारने खुल्या वर्गातील लोकांसाठी काही सवलती देऊ केल्या होत्या, त्याचाही लाभ मी घेतला नाही.

मी कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य नाही, तसेच मी कोणत्याही जातीच्या किंवा त्यांना मिळणाऱ्या सवलतीच्या विरोधात नाही. ज्यांना कोणाला आरक्षण हवे आहे असे वाटते त्यांनी आरक्षण मागावे आणि सनदशीर मार्गाने मिळवावे. पण त्यासाठी अमुक एका जातीच्या व्यक्तीला किंवा समाजाला शिव्या द्याव्यात याच्या मी विरोधात आहे. किंबहुना अशा अनेक घटना घडल्याचे विविध वृत्तपत्रातून वाचनात आले आहे. यातून अशा लोकांची विकृत मानसिकता कळून येते.

अमुक एका जातीच्या लोकांना होलपटण्याचा प्रयत्न म्हणा किंवा कृती म्हणा, अनेक वेळा झालेली आहे. विविध राजकीय पक्षांनी याचा उपयोग आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी केलेला आढळतो.

समाजाने आता जागृत व्हावे, स्वावलंबी व्हावे आणि स्वत:च्या पायावर उभे रहावे असे माझे वैयक्तिक मत आहे.

या देशाच्या जडणघडणीत प्रत्येक जातीचा मोलाचा सहभाग आहे. ब्रिटिशांनी आपली जातीत विभागणी केली आणि आम्ही आज सुध्दा तसेच भांडत आहोत, आणि स्वतःचे नुकसान करीत आहोत, हे ज्या दिवशी हिंदू समाजाच्या लक्षात येईल, त्यादिवशी आपल्या प्रगतीला खरी सुरुवात होईल असे वाटते.

राजकीय पक्षाचे नेते भांडतात, वैर धरतात आणि नंतर एकमेकांच्या राजकीय फायद्यासाठी युती आणि आघाडी करतात आणि सामान्य माणसे राजकीय अभिनिवेष बाळगून आपल्या जवळच्या माणसांत वैर धरतात. मागील पाच वर्षात खास करून महाराष्ट्रात विविध राजकीय पक्षांनी आपल्या राजकीय भूमिका, त्यांच्या त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी कशा बदलल्या हे आपण पाहीले आहे. त्यामुळे आता जनतेने सूज्ञ होऊन (कोणत्याही अफवा, सामाजिक माध्यमे किंवा प्रलोभनांना बळी न पडता) उचित पर्याय निवडला पाहिजे. आपल्याकडे काही लोकं प्रलोभनांना बळी पडतात आणि त्यामुळे संपूर्ण समाजाचे नुकसान होत असते. त्यासाठी लोकशाही व्यवस्थेमध्ये एकच उपाय आहे – – तो म्हणजे १००% मतदान.

आपण सर्वांनी तसा प्रयत्न करू म्हणजे महाराष्ट्र खऱ्या महा राष्ट्र होईल.

 १००% मतदान करून बहुमताचे सरकार आणू.. म्हणजे पक्षीय फोडाफोडी होणार नाही.

— —बघा, पटतंय का ?

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – १७ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – १७  ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

त्या चार ओळी… 

उषाच्या स्टडी टेबलावरचा पसारा मी आवरत होते. मनात म्हणत होते, “किती हा पसारा! या पसार्‍यात हिला सुचतं तरी कसं? शिवाय तो आवरून ठेवण्याचीही तिला जरूरी वाटत नाही. ”

 इतक्यात टेबलावरच्या एका उघड्या पडलेल्या वहीवर अगदी ठळक आणि मोठ्या अक्षरात लिहिलेल्या ओळींकडे सहज माझं लक्ष गेलं तेव्हा प्रथम माझ्या नजरेनं वेचलं ते तिचं सुरेख अक्षर, दोन शब्दांमधलं सारखं अंतर आणि अगदी प्रमाणबद्ध काना मात्रा वेलांट्या. उषाचं अक्षर आणि उषाचा पसारा या दोन बाबी किती भिन्न आणि विरोधाभासी होत्या !

तिने लिहिलं होतं,” मला छुंदा खूप आवडते. ती कशी जवळची वाटते ! मला आणि निशाला अगदी सांभाळून घेते. अभ्यासातल्या अडचणी ती किती प्रेमाने समजावून सोडवून देते ! कधीच रागवत नाही.

ताई बद्दल काय म्हणू? एक तर वयातल्या अंतरामुळे तिच्या मोठेपणाचं तसं दडपण येतंच. शिवाय ती भाईंकडे (आजोबांकडे) राहते, शनिवारी येते, सोमवारी जाते. त्यामुळे या घरातली ती पाहुणीच वाटते. का कोण जाणे पण ती थोडी दूरची वाटते आणि बिंबा (म्हणजे मी) मला मुळीच आवडत नाही. तिचा प्रचंड राग येतो. सतत आम्हाला रागावते. मोठी असली म्हणून काय झालं? तिची दादागिरी का सहन करायची? तिला कधी काही प्रश्नाचे उत्तर विचारले तर सुरुवातीलाच ती ढीगभर बोलून घेते. प्रश्न मात्र देते सोडवून. तसं तिला सगळं येत असतं पण सांगताना, ” तुला इतकं साधं कसं कळत नाही? कसं येत नाही?” असा तिचा माझ्याविषयीचा जो भाव असतो ना तो मला मुळीच आवडत नाही. समजते काय ती स्वतःला?”

बापरे!!

हे जेव्हा मी वाचलं तेव्हा माझ्या मनाची नेमकी काय स्थिती झाली असेल? खूप मोठा धक्काच होता तो! क्षणभर वाटलं आत्ता तिच्यापुढे ही वही घेऊन जावं आणि तिच्या या लेखनाचा जाब विचारावा पण दुसऱ्या क्षणी मी काहीशी सुन्न झाले. उदासही झाले आणि किंचित स्थिर झाले. माझ्याबद्दल तिच्या मनात असे विचार असावेत? राग, चीड आणि दुःख या संमिश्र भावनांनी माझं अंतर्मन उकळत होतं. शिवाय उषा—निशा या जुळ्या बहिणी असल्यामुळे जरी उषाने हे स्वतःपुरतं लिहिलेलं असलं तरी तिच्या या भावना प्रवाहात निशाचेही माझ्याबद्दल तेच विचार वाहत असणार. याचा अर्थ या दोघी माझ्याविषयी माझ्यामागे हेच बोलत असतील. त्या क्षणी मला जितका राग आला, जितकं वाईट वाटलं त्यापेक्षाही एक मोठी बहीण म्हणून मला “माझं मोठेपण हरलं” ही भावना स्पर्शून गेली. त्यांच्या जन्मापासून ते आतापर्यंत मी मनोमन त्यांना किती जपलं, किती प्रेम केलं यांच्यावर, यांनी चांगलं दिसावं, चांगलं असावं, चांगलं व्हावं म्हणून जी कळकळ माझ्या मनात सदैव दाटलेली होती त्याचा असा विपर्यास का व्हावा? आत्मपरीक्षण अथवा आत्मचिंतनासारख्या थीअरीज अभ्यासाव्यात असं वाटण्याइतकं माझंही ते वय नव्हतं. माझ्याही विचारांमध्ये परिपूर्णता अथवा परिपक्वता नक्कीच नव्हती. बुद्धीने मी इतकी प्रगल्भ नव्हते की या क्षणी मी तटस्थ राहून काही रचनात्मक विचार करू शकत होते. मी अत्यंत बेचैन आणि डिस्टर्ब्ड मात्र झाले होते हेच खरं. माझ्या या बेचैनीमागे कदाचित ही कारणे असतील. पहिलं म्हणजे उषा— निशांना माझं सांगणं दादागिरीचं वाटू शकतं हा विचार माझ्या मनात कधी आला नाही. त्यावेळी वाटायचं,” मी जे बोलते, मी जे सांगते ते त्यांच्यासाठी हिताचे आहे. ” असे वाटायचे. नकळतच एक मोठ्या बहिणीच्या अधिकाराने त्यांच्यावर सुसंस्कार करण्याचा तो माझा प्रयत्न होता आणि या वैचारिकतेवर मी तेव्हाही ठाम होते. शिवाय मी डॉमिनेट करते असं त्यांना वाटू शकते याचा मी कधी विचारच केला नाही. माझ्या मनात फक्त बहिणींचं जपून ठेवलेलं एक गोड नातं होतं पण त्या नात्यात आलेला हा विस्कळीतपणा जेव्हा माझ्या ध्यानात आला तेव्हा मी एखाद्या जखमी हरिणीसारखी घायाळ मात्र झाले. ज्या घरात आई, वडील, आजी आहेत त्या घरात बहीण या नात्याने काही वेगळे संस्कार, विचार बिंबवण्याचा माझा अधिकार किती नगण्य आहे याची मला जाणीव झाली. शिवाय कुठेतरी माझं वागणं अतिरिक्तच आहे असे पुसटसे वाटूही लागले होते.

वास्तविक छुंदालाही मी खूप वेळा माझा हाच बाणा दाखवला होता.

एकदा गणिताचा पेपर देऊन ती घरी आल्यानंतर मी जेव्हा तिला पेपरातल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर विचारले तेव्हा जवळजवळ तिची सगळीच गणितं चुकलेली होती हे समजलं. माझा पारा इतका चढला की मी तिला म्हटले,” शून्य मार्क मिळतील तुला या पेपरात. एक भलामोठा भोपळा घेऊन ये आता. शाळेत जाण्याचीही तुझी लायकी नाही. ”

केवळ धांदरटपणामुळे तिची प्रत्येक उदाहरणातली शेवटची स्टेप चुकली होती. पण शाळेत तिची गुणवत्ता इतकी मान्य होती की शिक्षकाने तिचे पेपरातले गुण कापले नाहीत म्हणून ती सुरक्षित राहिली पण त्याही वेळेला मी छुंदाला म्हटले होते.. “ या पेपरात तुला शून्यच मार्क आहेत हे कायम लक्षात ठेव. ” ती काही बोलली नाही पण त्यानंतर मात्र तिला गणितात नेहमीच पैकीच्या पैकी गुण मिळत गेले अगदी इंजीनियरिंगच्या शेवटच्या वर्षीही ती शंभर टक्क्यात होती. त्याचं श्रेय फक्त तिच्या मेहनतीला आणि जिद्दीलाच अर्थात.

पण त्यादिवशी जेव्हा उषाने लिहिलेल्या त्या प्रखर ओळी वाचल्या तेव्हा माझ्या मनावर आघात झाला आणि एक लक्षात आले किंवा असे म्हणा ना एक धडा मी शिकले की एकच मात्रा सर्वांना लागू होत नाही हेच खरे. आणि आपल्या बोलण्याचा परिणाम हा चांगला ते अत्यंत वाईट या रेंजमध्ये कसाही होऊ शकतो. तिथे आपले अंदाज चुकतात. मुळातच कुणाला गृहित धरणं हेच चुकीचं.

काही दिवस तो विषय माझ्या मनात खुटखुटत राहिला. सर्व बहिणींच्याबाबतीत मला या चौघी एकीकडे आणि मी एकीकडे ही भावनाही डाचत राहिली. एकाच घरात राहून मला एक विचित्र एकटेपणाची भावना घुसळत होती. काही दिवसांनी घरात कोणालाही न जाणवलेलं माझ्या मनातलं हे वादळ हळूहळू शांतही झालं याचा अर्थ बदल झाले —माझ्यात किंवा उषा निशांच्यात असेही नाही पण रक्ताच्या नात्यांचे धागे किती चिवट असतात याची वेळोवेळी प्रचिती मात्र येत गेली. मतभेदातूनही आम्ही टिकून राहिलो. तुटलो नाही. आमच्या घरात खर्‍या अर्थाने लोकशाही होती. तसेच वाढे भांडून ममता याचाही अनुभव होता.

एक दिवस पप्पांना घरी यायला खूप उशीर झाला होता. पप्पांची जाण्याची आणि परतण्याची वेळ सहसा कधीच चुकली नाही पण त्यादिवशी मात्र घड्याळाच्या काट्यांची टिकटिक संपूर्ण घराला अस्वस्थ करून गेली मात्र. का उशीर झाला असेल? त्यावेळी मोबाईल्स नव्हते, संपर्क यंत्रणा अतिशय कमजोर होत्या. फारफार तर कुणाकडून निरोप वगैरे मिळू शकत होता. बाकी सारे अधांतरीच होते. चिंतेचा सुरुवातीचा काळ थोडा सौम्य असतो. संभाव्य विचारात जातो. ऐनवेळी काही काम निघाले असेल, पप्पांची नेहमीची लोकल कदाचित चुकली असेल किंवा उशिरा धावत असेल. व्हीटी टू ठाणे या एका तासाच्या प्रवासात काय काय विघ्नं येऊ शकतात याचाही विचार झाला. त्यावेळी आतंगवाद, बाँबस्फोट वगैरे नव्हते पण अपघात मात्र तितकेच होत असत आणि अपघाताचा जेव्हा विचार मनात आला तेव्हा मात्र आमचं घर हादरलं. अशा कठीण, भावनिक प्रसंगी जिजी माझ्यापुढे तिची तर्जनी आणि मधलं बोट एकमेकांना चिकटवून समोर धरायची आणि म्हणायची,” यातलं एक बोट धर. पटकन मी तिचं कुठलंही बोट ओढायची मग ती म्हणायची,” सारं सुरक्षित आहे. बाबा येईलच आता. ” तिची काय सांकेतिक भाषा होती कोण जाणे! मला तर संशयच होता की “हीचं कुठलंही बोट धरलं तरीही ती हेच म्हणेल पण गल्लीच्या कोपऱ्यावर पप्पांची सायकलची घंटा नेहमीच्या सुरात वाजली आणि आम्हा साऱ्यांचे धरून ठेवलेले श्वास मोकळे झाले. ” पप्पा आले. ”

त्या क्षणी फक्त एकच वाटलं की जगातल्या साऱ्या चिंता मिटल्या आता. प्रतीक्षा, हुरहुर, “मन चिंती ते वैरी न चिंती” या वाटेवरचा प्रवास ज्या क्षणी संपतो ना तो क्षण कसा कापसासारखा हलका असतो आणि त्याचा अनुभव किती आनंददायी असतो हे फक्त ज्याचे त्यालाच कळते.

त्यादिवशी रात्री झोपताना उषा माझ्या कुशीत शिरली आणि चटकन म्हणाली, “काय ग आम्ही अजून किती लहान आहोत नाही का? तुमचं तर बरंच काही झालं की…. शिक्षणही संपेल आता. आई पप्पांना मध्येच काही झालं तर आमचं कसं होईल?” ती खूप घाबरली होती की काल्पनिक काळजीत होती नकळे पण तिच्या मनातली भीती मला कळली. मी तिला जवळ घेतलं, थोपटलं आणि म्हटलं,” झोप आता. असं काहीही होणार नाही. ”

आज जेव्हा मी वयाच्या एका संथ किनाऱ्यावर उभी राहून साक्षी भावांनी या सर्व घटनांचा विचार करते तेव्हा जाणवते की घरात लहान भावंडांचे जरा जास्तच लाड होत असतात. त्यांच्यासाठी आई-वडील आपल्याला लागू असलेले अनेक नियम सहजपणे मोडतात. या तक्रारींच्या भावनेबरोबर एक असेही वाटते की लहान भावंडं मोठी होईपर्यंत आई-वडीलही थकलेले असतात का? त्यांच्याही मनात “जाऊ दे आता” असे सोडून देण्याचे विचार सहजपणे निर्माण होतात का आणि त्याचवेळी थकत चाललेल्या आई-वडिलांना पाहताना धाकट्यांच्या मनात असुरक्षिततेची एक भावना निर्माण होत असेल का? त्यादिवशी नकळत उषाने तिच्या मनातली हीच असुरक्षिततेची भावना व्यक्त केली आणि पुढे तिच्या आयुष्यात घडलेल्या अनेक घटनांना बेपर्वाईने कुणाकुणाला दोषी ठरवताना, तिच्यात हीच असुरक्षिततेची भावना असेल का?

असेल कदाचित …

— क्रमश:भाग १७

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ रांगोळी आणि मेंदूचा विकास…  लेखिका : डॉ. ईशा खासनीस☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

? इंद्रधनुष्य ?

रघुनायका, मागणे हेचि आता☆ श्री अनिल वामोरकर ☆

 

 ५ ) इंद्रधनुष्य — 

 “ रांगोळी आणि मेंदूचा विकास “

 लेखिका : डॉ. ईशा खासनीस

 प्रस्तुती : अनिल वामोरकर 

बुचकळ्यात पडलात ना.. रांगोळी आणि मेंदुचा विकास ह्यांचा दूरदूरपर्यंत तरी काही संबंध असू शकेल का ? एक फक्त डेकोरेशनचा विषय आणि दुसरा चक्क न्यूरोलॅाजी सारखे क्लिष्टसायन्स — पटत नाहीये ? 

एक सांगू का ? सनातन हा धर्म नसून एक विशिष्ट जीवन प्रणाली, एक विचार प्रणाली आहे. आणि आपल्याला लावून दिलेल्या ह्या सगळ्या गोष्टींमागे खूप गर्भित अर्थ आहे. शास्त्र आहे. मेंदूचा विकास होताना त्यातील दोन न्यूरॉन्स मधील कनेक्शन्स तयार होऊन विकास होत असतो. जितके जास्त हे मज्जातंतूचे जाळे तीव्र व गुंतागुंतीचे होत जाईल तितका जास्त मेंदूचा विकास होत जातो. ज्याला interneuronal connections असे म्हणतात. पण हे conncections वाढतात कुठल्या कुठल्या गोष्टीने ? तर जितका मेंदू तुमचा ऍक्टिव्हली एंगेज राहील. म्हणजे TV, mobile, screen, reels बघताना तुमचा मेंदू passively एंगेज असतो. ज्याने मेंदूचा विकास तर सोडाच पण मेंदू थकतो. परंतु जितके लहान मुल वेगवेगळ्या परिस्थितींना expose होईल तितके हे neuronal connections वाढत जातात आणि मेंदूचा विकास होत जातो.

—- पण मग जसे जसे वय वाढत जाते तसे तसे age related brain atrophy नावाचा प्रकार सुरु होतो. म्हणजे वृद्धापकाळामुळे मेंदू सुकणे किंवा आकार कमी होणे. त्यामुळे विसरायला होणे, गोंधळ वाढणे, आत्मविश्वास कमी होणे, काहि काळापुरते एकदम सगळं ब्लँक वाटू लागणे अशा समस्या उद्भवतात. हे होऊ नये असे वाटत असेल तर मेंदूला चालना देणारे काम सतत करत राहिले पाहिजे नाहीतर स्मृतिनाश झपाट्याने सुरू होतो.

 

आता ह्या सगळ्याशी रांगोळीचा संबंध काय ? खरे तर ज्याने कुणी ह्या पारंपरिक रांगोळीचा शोध लावला तो मोठा सायंटिस्ट म्हणावा लागेल. (अर्थात आपले ऋषी मुनी हे सायंटिस्टच होते आजच्या परिभाषेत सांगायचे तर ) 

 

पारंपरिक रांगोळ्या बघा – ठिपक्यांच्या, कासव, षट्कोनी, त्रिकोणी, ठिपके वाढवत जाणे कमी करत जाणे, दक्षिणेकडे तर कोलम प्रकारातल्या कठीण रांगोळ्या,             ज्ञानकमळासारख्या क्लिष्ट रांगोळ्या.

१. जेव्हा ते ठिपके, त्या रचना काढायला तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला एकाग्रता लागते, 

२. तसेच ते विशिष्ट प्रकारे कसे काढावे ह्यास आकलन शक्ती लागते,

३. कुठून कुठे ठिपके जोडावे ? ह्यात ते लक्षात ठेवणे – ह्यास स्मरण शक्ती लागते.

४. रंगसंगती, वेगळ्यावेगळ्या रचना कशा तयार करता येतील यास कल्पनाशक्ती लागते.

म्हणजेच एकाग्रता, स्मरणशक्ती, आकलनशक्ती, कल्पकता वाढीस लागणे हे सगळे होणे म्हणजे तुमच्या CEREBRUM (मोठ्या मेंदूचा ) विकास होय 

ठिपके सरळ रेषेत काढणे, रेष बारीक आणि सरळ काढणे ह्या सगळ्यात तुमचे motor skills तयार होतात हे म्हणजे तुमच्या छोट्या मेंदूचा (cerebellum ) चा विकास होय.

आणि ह्या सगळ्याचे प्रशिक्षण लहानपणापासून मुलांना घरातूनच मिळावे म्हणून घरासमोर रोज आईने रांगोळी काढण्याची प्रथा.. त्यात मुलाचा विकास आणि ह्या सवयीने नंतरही अगदी उतार वयातही मेंदूला चालना कायम मिळत राहणार. म्हणजे अल्झायमर सारख्या स्मृतिभ्रंशाच्या आजाराला निमंत्रण नाही.

दाक्षिणात्य कोलम आणि ज्ञानकमळासारख्या रांगोळ्या तुम्ही खरंच काढून बघा, “it’s a brain game ” हे जाणवेल तुम्हाला. मी नुकतंच माझ्या मुलीला ज्ञानकमलाची रांगोळी शिकवली ती म्हणाली “आई हे खूप challenging आहे आणि interesting सुद्धा. अर्थात लहान असल्याने तिला एकदा शिकवताच लगेच काढता आली. परंतु ही रांगोळी परंपरा खूप शास्त्रीय आहे आणि brainstorming सुद्धा हे मात्र खरे. माझ्या एका अमेरिकन डॅाक्टर मित्राने एकदा मला विचारले कि “This your rangoli art is very beautiful but why to waste so much so colour and material daily and also the daily hard work of making designs & rubbing it next day? Instead, why don’t you make the paintings which are permanent. ” I replied,”Dr. Eric, as You are a doctor, you are a science person, you can definitely understand it, it’s not waste, it’s investment in your brain health ” हे ऐकल्यावर त्यानी खूप आश्चर्याने विचारले “But how? ” मग अर्थातच पुढचे स्पष्टीकरण ऐकल्यानंतर त्यांना ते मनोमन पटले “It’s amazing then”!

लेखिका : डॉ. इशा खासनीस, MD 

बंगलोर

प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “एक प्लेट दोस्ती”… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

 

📚 वाचतांना वेचलेले 📚

☆ “एक प्लेट दोस्ती”… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

आज प्रथमच मी ‘ हॉटेल मैत्री ‘ मध्ये एकटी जेवायला गेले. खरं तर घरात जेवण तयार होते पण एकटे जेवायचा कंटाळा आला होता. … उगाssच.. विशेष काही नाही.

मी नेहमी कॉर्नरचे टेबल पकडते, एकतर दुसरे काय ऑर्डर करतात हे कळते आणि मी किती हादडून खाते हे कुणाला दिसत नाही. नेहमीचा वेटर पाणी टेबलावर ठेवून म्हणाला, ” काय मॅडमआज एकट्याच? “ त्याने मेनू कार्ड हातात दिले.

(थोड्या वेळाने) वेटर, ” मॅडम ऑर्डर ?? ”

पाणी पिता पिता कुठेतरी त्याचा प्रश्न डोक्यात होताच.

“आज एकट्याच !!? ” वेटर नेहमीचाच आणि आमच्या मैत्रिणींचा अड्डा बर्‍याच वेळा इथे जमतो त्यामुळे तो मला बर्‍यापैकी ओळखत असे.

मेनू कार्ड त्याच्या हातात देवून म्हणाले, “ एक प्लेट दोस्ती “ … मी थोडे खोचकपणे सांगितले

” नक्की मॅडम ? “.. त्याने मात्र मिश्किलपणे हसत उत्तर दिले..

थोड्या वेळाने हातात मोठी स्पेशल महाराजा थाळी घेऊन तो आला म्हणाला,

“ मॅडम, घ्या.. “मैत्री स्पेशल”…. ह्या थाळीच्या साम्राज्यात आपले दोस्त नक्कीच आहेत … पदार्थ आणि पक्वान्नच्या स्वरुपात. ”

‘ मीठ??? ‘

माझ्या चेहर्‍यावरचा प्रश्न त्याने लगेच हेरला

” मॅडम असे दोस्त नसले तर आयुष्य बेचव, पण अश्यांबरोबर प्रमाणापेक्षा जास्त दोस्ती कधी BP वाढवतील सांगता येत नाही. बरोबर ना मॅडम ? ”

मला हसू यायला लागले

*लिंबू* … कितीही म्हणा.. वयाच्या प्रतेक टप्यात एक आंबट मित्र /मैत्रीण ही असतेच. पण ती छोट्या लिंबाच्या फोडीइतकीच ठीक.. नाहीतर कधी तुमची विकेट उडवेल सांगता येत नाही. (स्वानुभव )

मॅडम, *चटणी * …. एखादी स्पष्ट बोलणारी मैत्रीण भली झणझणीत असते. मैत्री म्हणजे नेहमीच ” तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा ” नाही. ‘ तुला अक्कल नाही. मूर्ख,,’, असं वेळप्रसंगी म्हणणारी…. पण दिसते तशी असते. कपट कुठे नाही… खरे आहे ना?

*कोशिंबीर* … ह्या मैत्रिणी सतत अलिप्त. स्वतः ला सांभाळून नेहमी कोपर्‍यात. WHAT’S APP ग्रुप च्या मूक सदस्या.

*पापड* … बापरे … या डेलीकेट डार्लिंग मैत्रिणीला मी स्वतः फार लांब ठेवते. अहो अति emotinal. पटकन तुटतात. पसारा सांभाळेपर्यंत नाके नऊ येतो.

….. मी पानातून बाहेर काढला … सांगितले, “ नको रे बाबा पापड पसारा. ”

मॅडम, *भजी* घ्या,….. अगदी सुटसुटीत. स्वतः च्या मस्तीत मस्त असणार्‍या मैत्रिणी. बेफिकिर पण सगळ्यांच्या आवडत्या.

*लोणचे*.. कधी आंबट कधी गोड, पण त्यांची जित्याची ती खोड, पण जरूरी असते एखादी *फोड * खरं आहे ना??

*चपाती किंवा भाकरी* … अतिशय मेहनती, सोशिक, पण बरेच काही बोध देतात. अतिशय साध्या, कुठे ही भपका नाही. मी बरे की माझी राहणी बरी. प्रकृतीला उत्तम. आयुष्यभर आपल्याला ह्यांची गरज … आणि त्यांना, तुमची काळजी असते पण गरज नसते.

*भाजी*.. रूपे भरपूर बदलेल पण तुमची साथ कधी नाही सोडणार. कधी *फतफते’ ल देखील पण तुमच्या आजूबाजूला नक्की घुटमळणारा हमखास पदार्थ.

*आमटी*.. ज्या वाटीत पडेल त्या वाटीचा आकार घेणारी… प्रत्येक प्रसंगाला आपले रूप बदलणारी पण प्रसंग सांभाळून नेणारी.

*गोड पदार्थ* …. अश्या मैत्रिणी तुम्हाला कधी एकट्या सोडत नाहीत. अगदी दुःखाच्या प्रसंगी देखील. कधी लाडवाच्या रुपात कधी खिरीच्या स्वरुपात.

*ताक किंवा सोलकढी* … अशासारखी मैत्रीण फारशी महत्वाची नसते, पण नसून ही चालते कधी कधी आयुष्यात अपचन फार झालं की शेवटी ह्याच उपयोग पडतात. प्रत्येक प्रसंगाची यथेच्छ चहाडी आणि उलटी यांच्याकडे करू शकतो. (थोडक्यात मन आणि पोट दोन्ही साफ)

*वरण भात.. दही भात* …. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत साथ देणार्‍या मैत्रिणी. त्या आपली भूमिका मस्त पार पाडतात. तुमच्या आयुष्यातील गोळा बेरीज याचा त्यांच्याशी काही संबंध नाही.

*मसालेभात.. साखरभात* …. अश्या मैत्रिणी ह्या एखाद्या कार्यक्रमाला किंवा प्रसंगाला हजेरी लावणार. पण त्या वेळी. आपली झलक दाखवून मनावर ठसा उमटवून जातात… पण नंतर आपल्याच लक्षात येईल की अश्या मैत्रिणी ह्या तेवढ्यापुरत्याच बर्‍या. दररोज अशांची मैत्री खुद्द आपल्याला परवडणार नाही.

….. स्वतःशीच हासत माझ्या मैत्रीच्या साम्राज्यात अगदी मग्न होते. इतक्यात वेटर भाजीचा चौफुला घेऊन आला……

“ मॅडम, थोडी उसळ? ”

मी, “अरे उसळ तर थाळीमध्ये नव्हतीच. “

“ मॅडम, प्रवासात किंवा सहज मार्केटमध्ये अचानक दोस्ती होते. ” … पण भाजीसारख्या मैत्रिणीची जागा कोणी घेऊ शकत नाही. उसळ ती शेवटी उसळच.

आयुष्याचे ताट गोड, आंबट, तिखट मैत्रिणींमुळे अगदी चविष्ट झाले होते.

“ मॅडम “ … seasonal स्वीट, आमरसाची वाटी घेऊन वेटर उभा

” नको असे दोस्त, स्वतः च्या सोयी प्रमाणे आयुष्यात येणारे.. ”

“ मॅडम, त्यांची देखील काही मजबूरी असू शकते. “.

” इतकी मजबुरी? ना दुःखात.. ना सुखात … फक्त स्वतः च्या सोई प्रमाणे? ”

*जिलेबी* सारख्या भल्या वेड्या वाकड्या असतील, गुलाबजामसारख्या भले रंगाने काळ्या असतील, पण रसगुल्लासारख्या अगदी सफेद स्वभावाच्या मैत्रिणी आहेत या थाळीत. नको असे seasonsl स्वीट दोस्त. ”.

वेटर …. ” मॅडम, त्यांचे महत्व पटले तुम्हाला ते ह्या seasonal आमरस मुळे ना. ? नाही म्हणू नका एखादी वाटी घ्याच. सोबत पुरी देखील आहे. ”

….. ह्म्म,,, हे असे दोस्त नेहमी इम्प्रेशन मारण्यासाठी एखादी चमची घेऊन फिरत असतात.

जेवण पूर्ण झाले. मस्त कालवून भुरका मारून सर्व मित्र मैत्रिणींची आठवण करून थाळीचा आस्वाद घेतला.

पण ताटाच्या बाहेर असलेले *काटे आणि चमचे?? *…. टोचून बोलणार्‍या आणि उगाच ढवळाढवळ करणार्‍यांना मैत्रीण ना.. थाळीतील दोस्तापासून दूर ठेवते. नाही म्हटलं तरी त्यांच्यात देखील एखादा चांगला गुण असतो. तितकाच पहायचा बाकी दुर्लक्षित करणे.

हात धुवून पेल्यातून पाणी प्यायले. असेही काही दोस्त असतात ज्यांची नावे माझ्या ओठावर सतत असतात. अगदी पाण्यासारखी निर्मळ मैत्री.

… आज मस्त पोटभर जेवले बघा…  तुम्हाला कशी वाटली ही माझ्या दोस्तीची चविष्ट थाळी?

बडीशेप, पान खाल्ले ?

मssssग… भरा बिल आता।

अहो किती काय ? …

… ह्या दोस्तीच्या थाळीची किंमत…??? … ” अमूल्य “.

लेखक : अज्ञात 

संग्रहिका : सौ. अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ धूळभेट… ☆ सुश्री सुलभा तेरणीकर ☆

सुश्री सुलभा तेरणीकर

🔅 विविधा 🔅

☆ धूळभेट… ☆ सुश्री सुलभा तेरणीकर 

शुभंकरोती, रामरक्षा, पाढे म्हणून झाल्यानंतर गोष्ट ऐकत आमची निवांत संध्याकाळ हलकेच, निःशब्द अशा रात्रीत विरघळून जात असे. रस्ते निर्मनुष्य होत. त्या काळातली ही आठवण आहे. हिरण्यकश्यपू, प्रल्हाद आणि नरसिंहाची गोष्ट आजी इतकी तपशिलातून रंगवून सांगत असे, की वाटे- हिने हे सारे प्रत्यक्ष घडत असताना पाहिले असले पाहिजे. मोठेपणी ही गोष्ट जाऊन त्यातून तिचे माहेर नीरा-नृसिंहपूर उदित होऊ लागले. कथेचे संदर्भ जुळले. नीरा-भीमेचा संगम, नरसिंहाचे हेमाडपंथी देऊळ, त्याची वालुकामय मूर्ती, तिचा भला मोठा वाडा, नदीकाठची शेती, दूधदुभते, नोकर, आईवडील, भावंडं, त्यांच्या मालकीची भली मोठी नाव….. हे सारे तपशील येऊ लागले. काही काळानंतर तिचे सर्व आयुष्य तुकड्या-तुकड्यांतून समजू लागले…..

वयाच्या बाराव्या वर्षीच हे तिचे गाव, घर तिने सोडले होते- लग्न होऊन ती कामाच्या रहाटगाडग्याला जुंपलेली होती. तेव्हापासून नीरा-नृसिंहपूरचे सूक्ष्म रेखाचित्र माझ्यासमोर असे. त्यातली तिची तानूमावशी म्हणे, एकदा पहाट झाली म्हणून मध्यरात्रीच उठून नदीवर अंघोळीला गेली. परतताना घाटावर एक माणूस उंचावर बसलेला पाहिला. त्याचा पाय एवढामोठा लांबलचक होता… थेट नदीत बुडलेला. मग घाबरलेल्या तानूमावशीने दोन महिने अंथरूण धरले होते. भीमेच्या बाजूच्या घाटावर तिचे भले मोठे घर होते. पूर आल्यावर कोळ्यांच्या कुटुंबांना वाड्यात थारा मिळे. तिची आई, मावशी त्यांना जेवण रांधून घालीत. त्या वाड्यात गुप्तधन होते. झोपाळ्याच्या कड्या करकरत, बिजागऱ्या सुटत, असे भास त्यांना होत. मग तिच्या वडिलांनी प्रार्थना करून आपल्या कुटुंबीयांना त्रास न देण्याबद्दल विनवले होते. या रेखाचित्रात ती मला अस्पष्ट असे. हे तपशील मात्र ठळक होते. आम्हाला तिचे गाव पाहायची ओढ लागली; पण ती मात्र फारशी उत्सुक नसे. तिच्या लग्नानंतर लवकरच वडील गेले. भावाच्या राज्यात तिचे माहेरपण हरवले. या अशा घटनाक्रमाचा मालिकेतली साखळी तीच तटकन तोडून टाकत असे; पण नरसिंहाचे नाव मात्र ओठी असे. त्याचे देऊळ तिच्या स्मरणात नित्य असे. पुढे मलादेखील त्या हेमाडपंथी देवळाची ओढ लागली; पण जायचा योग मात्र आला नाही. ज्या शतकात ती जन्मली आणि गेली, तेही संपले, तेव्हा पंच्याहत्तर ते साठ वयोगटातील तिच्या मुलांनाच घेऊन जायचे ठरवले. — – नीरा- नरसिंहपूरच्या त्यांच्या स्मृती अंधुक होत्या. अस्पष्ट होत्या. आता साठ-पासष्ट वर्षांनंतर त्या गावी जायचे झाले, तर काय आठवणार म्हणा !

आम्ही पुण्याच्या आग्नेय दिशेस एकशे पासष्ट किलोमीटरचे अंतर पार करून आलो होतो. नीरेचे विशाल पात्र डोळ्यांत मावत नव्हते. उंच बेलाग डोंगरकडे भयचकित करीत होते. पलीकडच्या तीरावरचे एखाद्या किल्ल्यासारखी तटबंदी असलेले नरसिंहाचे मंदिर, मंदिराचे उंच शिखर, नीरेचा विस्तीर्ण घाट पाहून मन निवले. प्रथेप्रमाणे धूळभेट घ्यायची होती. वेशीतून आत आल्यावर विंचूरकरांच्या वाड्यासमोर पश्चिम दरवाजा उभा ठाकला. उंच, चिरेबंदी तेहतीस पायऱ्या चढता-चढता दमछाक झाली. प्रवेशद्वारात सोंड वर करून दगडी हत्तींनी स्वागत केले, तेव्हा माझ्या पंच्याहत्तर वर्षे वयाच्या मामाला आपल्या वयोमानाचा विसर पडला… सहा-सात दशके गळून पडली. बालपणीचा मित्रच जणू त्याला भेटला…

मुख्य देवालयाचा गाभारा, सभामंडप, छतावरच्या मूर्ती, वेलबुट्टी, नक्षीकाम पाहताना मी हरवून गेले. भक्त प्रल्हादाच्या उपासनेतील वीरासनातली वाळूची मूर्ती पाहताच आठवण झाली ती त्याचे नाव सदैव घेणाऱ्या या गावच्या माहेरवाशिणीची.

अरगडे व अत्रे या लेखकद्वयींनी लिहिलेल्या पुस्तकाच्या आधाराने मी सर्वांना क्षेत्रमाहात्म्य सांगून चांगलेच चकवले होते.. जणू मी इथे नेहमी येत असल्यासारखी…

इतिहासातल्या पुराणांच्या कथा सांगून साऱ्यांची भरपूर करमणूक केली. दर्शन आणि प्रसाद घ्यायचे आणि परतायचे…

त्यापूर्वी नीरा-भीमा संगमात सारे उतरले. त्यांच्या पाण्याला भिणाऱ्या आईची आठवण निघालीच. ‘पाणी म्हणजे ओली आग’ असे म्हणायची ती.

त्यानंतर तिचा वाडा पाहायचा होता. ग्रामस्थांना विचारीत सारे जण पोहोचलो. वाडा जागेवर नव्हताच. दगड, विटा, लाकडे यांचा खच पडलेला. नांदत्या घराची एवढीसुद्धा खूण नव्हती. गुप्तधनासारखे सर्वच भूमिगत झाले काय? झोपाळा, माजघर, ओटी, गोठा… तिच्या लवकर हरवून गेलेल्या बालपणासारखे हरवून गेले होते… शेराची-निवडुंगांची झाडे, शेणाचा दर्प, गावातला दारिद्र्याचा सूक्ष्मपणे जाणवणारा गंध, भणाणणारा वारा, डोक्यावर तापलेले ऊन, उजाड आजोळघरात तिची प्रौढ लेकरे गप्प होऊन उभी होती. असे कसे झाले… असे काहीसे म्हणत होती. परतताना पाय जड झाले होते. देवालयात पुन्हा आल्यावर गाभाऱ्यातल्या काळोखाने मन निवल्यासारखे झाले. राक्षसासाठी उग्र रूप धारण केलेल्या नरसिंहाचे डोळे कनवाळू झाले ते भक्तांसाठी. देवापाशी काय मागावे ते आठवेना, सुचेना. मागायचे नव्हते-सांगायचे होते; तेही साधेना… प्रसादाचे जेवण घशाखाली उतरेना.

महर्षी नारदाची तपोभूमी असलेले नीरा-नरसिंहपूर, एकेकाळी वैभवशाली नगर होते. वेदपाठशाळा, पुष्पवाटिका यांनी गजबजलेले होते. नगर म्हणून उदयाला आले होते. समर्थ रामदासांनी, तुकारामांनी गौरविले होते. साधक, योद्धे, राज्यकर्ते यांना प्रिय होते. कालचक्राच्या आवर्तनात, महापुराच्या तडाख्यात, दुष्काळाच्या वणव्यात, कलहाच्या भोवऱ्यात, उदासीनतेच्या अंधारात ते हेलपाटले; हरवले; उध्वस्त झाले. हा वाचलेला इतिहास सर्वांना सांगितला, तरी आजोळघराची भूक डोळ्यांत काचत होती, खुपत होती…

उग्र वीरं महाविष्णुं ज्वलन्तं सर्वतोमुखम् 

नृसिंह भीषणं भद्रं मृत्युमृत्यूं नमाम्यहम्।।

… या गावची ती माहेरवाशीण असे काही म्हणायची… त्याला संकटात हाक मारायची… कडक दैवत म्हणून भ्यायचीसुद्धा…

आता मात्र सारे निमाले होते. तिच्या घरातला झोपाळा थांबला होता. नावही उरली नव्हती. नीरा-भीमेची गळामिठी मात्र तशीच होती. खीर-खिचडीचा नैवेद्य रोजचा; आजही चुकला नव्हता. इतिहासावर धूळ होती आणि या धुळीचाही इतिहास होता. उग्रमूर्ती नरसिंहाचे डोळे गाभाऱ्यातल्या अंधाराला भेदून तिच्या लेकरांसाठी निरोपाचे पाणी लेऊन सांगत होते- पुन्हा या… धूळभेटीला पुन्हा या…

©  सुश्री सुलभा तेरणीकर

मो. 8007853288 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ एका हुंदक्याची सकाळ — ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

डॉ.सोनिया कस्तुरे

??

☆ एका हुंदक्याची सकाळ…  डॉ.सोनिया कस्तुरे ☆

मी अगदी दबकतच तिच्या जवळ गेले आणि नम्र स्वरात म्हणाले, “Can I help you ma’am? 

बाकावर जागा करुन देत ती म्हणाली … 

“Yess.. Sure ma’am, Please!”

तिने Please म्हटल्यावर मला थोडे बरे वाटले.

उगीचच एखाद्याच्या व्यक्तिगत आयुष्यात शिरायला मला आवडत नाही. त्यातूनही पूर्ण अनोळखी आणि दूसऱ्या गावी, मुंबईसारख्या ठिकाणी. पण तिची घालमेल, तिची अवस्था बघून मला राहवत नव्हते.

सकाळचे पावणे सात- सात वाजले असावेत, के. ई. एम हॉस्पिटलजवळच्या प्रताप घोगडे उद्यानातील ट्रॅकवर मी चालत होते. दूसऱ्या राऊंडलाच ती मला दिसली होती. निराशाजनक चेहरा. डोळे निस्तेज. हुंदका कोंडून ठेवल्यासारखी अस्वस्थता. तिला रडायचे नव्हते पण रडणे थांबवता येत नव्हते. चौथ्या राऊंडला जेव्हा माझी नजर तिच्याकडे गेली, तेव्हा तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिच्या मनात खूप काही खदखदत होते, हे तिच्या चेहऱ्यावरुन जाणवत होते. तरी मी तिला काही न बोलता पुढे गेले. तिला विचारावे की नको? आपण तिला मदत करु शकतो हे तिला सांगणे योग्य होईल का? असा विचार करत करत मी चौथा राऊंड पूर्ण केला.

माझ्या मनात अनेक विचार येऊ लागले. समजा मी तिचे मन मोकळे व्हायला मदत केली तर.. ? बरं होईल ना.. ? पण तिच्या एकांताला धक्का तर मी लावत नाही ना? माझ्यामुळे तिची प्रायव्हसी भंग झाली तर.. ? तर मग काय.. ! It’s none of your business / “इटस् नन ऑफ युवर बिझनेस”. असे म्हणेल. त्यात काय एवढं! पण समजा मी तिच्याशी काहीच संवाद न साधता इथून निघून गेले तर दिवसभर मला स्वतःला दोषी असल्यासारखे वाटेल. या सगळ्या द्वद्वांतून बाहेर पडून मी तिच्याजवळ गेले होते.

“Myself Dr. Soniya Kasture, if you don’t mind, you can share your problems with me, I think I can help you.

“हा मॅम, आईये, इधर बैठीये !” ती हिंदी बोलते हे ऐकून मला बरे वाटले.

“I am from sangli, मेरी बेटी यहाँ केईएम हाॅस्पीटल में एमबीबीएस करती है, दो दिन के लिए मैं यहाँ आयी हूॅं !” हे ऐकून ती चक्क मराठीत, मोकळ्या मनाने बोलू लागली.

ती साधारण पंचवीस, सव्वीस वर्षाची मुलगी, M. com करत होती. तिच्या relationship मध्ये अडचणी होत्या. हल्ली सकाळी प्रेम होते आणि संध्याकाळी म्हणा किंवा दोन चार दिवसात breakup होते. याला अनेक कारणे असतील पण असे आहे. हे ही समजून घ्यायला हवे. तर नवी पिढीला समजून घेणे शक्य होईल.

आईचे आणि तिचे अजिबात पटत नव्हते. तिच्या आईच्या बोलण्याचा, वागण्याचा तिला खूप त्रास होत होता. आईने गोड बोलावे, प्रेमाने जवळ घ्यावे. तिला काय हवे, काय नको हे समजून घ्यावे. खरे तर हे सगळ्याच पालकांचे हे कर्तव्य आहे. पण तिची इतकी अपेक्षा नव्हती. आईने तिला दुखवू नये. टाकून बोलू नये. अपमानास्पद वागणूक देऊ नये ही तिची अपेक्षा होती. प्रत्येक बारीक सारीक गोष्टीवरुन आई तिला टोचून बोलत असते.

“अगदी साधं वारा यावा म्हणून खिडकी उघडली तरी मॅम, तिला प्रॉब्लेम असतो. मी काहीही करु दे, तिला त्या गोष्टीची अडचणच होते. तिला माझी कोणतीच गोष्ट आवडत नाही मॅम.” असे ती सांगत होती.

तिच्या भोवतालच्या परिस्थितीचा, तिच्या वाट्याला आलेल्या गोष्टींचा तिला त्रास होत असावा. ती जेवढे सांगते तेवढेच मी ऐकून घेतले. अशावेळी सल्ला न देता ऐकून घेणारे कुणीतरी हवे असे वाटत असते. मी खूप खोलात गेले नाही. तिला स्वतःला सावरण्यासाठी काही मूलभूत गोष्टी सांगितल्या.

“तू ज्या बागेत बसली आहेस ना, तिथे बघ किती सुंदर झाडी आहेत. फूलं आहेत. आजूबाजूला खूप कचरा आहे. घाण आहे. तरी ते आपलं फुलणं सोडत नाहीत. माणसानं असंच असायला हवं. तुझी सोबत तू स्वतः आहेस. पहिला स्वतःला समजून घे म्हणजे तुला तुझा भावनिक कल्लोळ सावरता येईल. तुझी आई सुद्धा विशिष्ट तणावाखाली असेल. म्हणून कदाचित अशी वागत असावी. दोघी एकमेकीशी एकदा शांत बसून, अतिशय मोकळ्या मनाने मनातलं बोलून बघा. यातून नक्की तुमच्या नात्यातली अडचण दूर होईल.”

मी सांगते ते तिला पटत होते हे तिच्या बोलण्यातून मला समजत होते. पण ती खूपच depression मध्ये दिसत होती. म्हणून तिला Psychiatrist ची मदत घ्यायला सांगितले. तिच्या मित्रमैत्रिणी पण दूरावल्या होत्या. ज्याला अडचण असते अशा व्यक्तीसोबत वेळ द्यायला हल्ली कुणाला नको असते. कारण प्रत्येकाला धावायचे आहे. काहीतरी गाठायचे आहे. प्रत्येकाला व्यक्तीगत स्वतःचे, आणि कुटुंबातील काही अडचणींना तोंड द्यावे लागत असते. शिवाय जिथे आईवडील वेळ देऊ शकत नाहीत तर दूसरे कोण वेळ काढणार ? शिवाय मनाने अडचणीत असणारी व्यक्ती सतत नकारात्मक बोलत असते. त्यामुळे सोबत असणाऱ्याचा हिरमोड होतो. अशावेळी सगळे सल्ला देवून कटवायला टपलेले असतात. अवस्था समजून घ्यावी, एवढे शहाणपण माणसांत अजून रुजले नाही. मन मोकळे करायला आपले ऐकून घेतले जाईन हा विश्वास वाटल्या शिवाय ते बोलत नाहीत. आपण सांगितल्याची मागे चर्चा होऊ नये असेही त्यांना वाटत असते. अशा साच्यात बसणारी मैत्री अद्वितीयच म्हणावी लागेल. पण काही मित्रमैत्रिणी खरेच खूप समजदार असतात. सगळ्यांना एकाच तराजूत तोलणे बरोबर नाही. पण त्या अशा व्यक्तीच्या वाट्याला यावी लागतात.

तिने मला सांगितले की, KEM Hospital मध्ये आई सोबत एकदा ती गेली होती. तिला पाहताच क्षणी डाॅक्टरांनी त्ती sever depression मध्ये आहे असे जाणवते म्हणून काही Psychological टेस्ट करायला सांगितल्या. त्या लगेच तिथे केल्या गेल्या. पण नंतर आईला वेळ न मिळाल्याने ती तिला परत त्या college hospital मध्ये गेली नाही. आणि टेस्टचा रिझल्ट आणि ट्रीटमेंट चालू होऊ शकले नाही. जेव्हा माणूस मनाने विस्कटला असतो तेव्हा तो सकारात्मक विचार करु शकत नसतो. अशा परिस्थितीत पालकांनी गांभीर्याने घेऊन मुलांसाठी वेळ काढावा लागतो. पण पालकच मनाने विस्कटलेले असतील तर.. ! हा खूप मोठा विषय आहे.. असो.. तिला मी तिच्या कॉलेजच्या कौन्सिलरची मदत घेऊन स्वतःला एकटीला हॉस्पिटलमध्ये जायला सांगितले.

“तू शिकली आहेस. शहाणी दिसतेस. तू अडचणीत आहेस हे तुला समजते तर आई तुझ्या सोबत येऊ शकत नसली तरी तू तुझी ट्रीटमेंट व्यवस्थित रित्या चालू ठेव. तू स्वतःच, स्वतःचा आधार हो. ” मी असे म्हणाल्यावर तिला बरे वाटले असेल. माझ्याच समोर तिने तिच्या कौन्सिलरला फोन केला. मला हायसे वाटले. आता मी तिथून जायला मोकळी झाले असे मला वाटले आणि मी “ Take care, All the best.. !” असे म्हणून निघाले..

तरुण वयातील मुलांच्या मनामध्ये खूप गोंधळ असतो. मनात अनेक विचार थैमान घालत असतात. त्यात मुलींच्या मनामध्ये तर अनेक असुरक्षिततेच्या भावना असतात. करियर संबंधिचा, रिलेशनशिपचा, मित्र-मैत्रिणीपासून बाजूला गेल्याचा गोंधळ. हातात पैसे नसतात. नोकरीच्या अनेक अडचणी असतात. काम मिळत नसते. स्वतःचे काही विचार ठाम होत असतात पण त्याचवेळी 24-25 वर्षे वय झाले तरी अजून पालकांच्या वर अवलंबून राहावे लागते, याची कुठेतरी खंत वाटत असते. तरुण मन म्हणजे जंगलातून चालताना वाट हरवलेल्या पण वाट शोधण्याचा प्रयत्न करणारी मनोवस्था असते असे म्हणायला हरकत नाही. यातून सगळेच कमी जास्त प्रमाणात जात असतात. प्रत्येकाला भावनिक समतोल साधता येईल असे नसते. आपण पालकही त्यातून गेलेलो असतो. विचार, भावना आणि वर्तन यांच्यातला समतोल खूप महत्त्वाचा.

इकडे 50-60 वय गाठलेले पालक मुलांच्या बाबतीतल्या एका कल्पनेत वावरत असतात. अमुक वय झाले की नोकरी, अमुक वय झाले की लग्न. अमुक वय झाले की मुलंबाळ. या पारंपारिक चक्राच्या पलीकडे मुलांची मानसिक अवस्था आहे हे कुठेतरी पालक म्हणून समजून घ्यायला हवे. त्यांना त्यांच्या विचारांनी जगू द्यावे. त्यांना समजून घेताना आपल्याला व्यक्त होण्यासाठी मिळालेल्या बोलणे या कौशल्याचा, भाषेचा योग्य उपयोग करावा. समजून सांगताना अशी भाषा वापरावी की त्यांना तो सल्ला किंवा उपदेश वाटू नये. काळ खूप वेगाने बदलत असतो. “आमच्यावेळी असं नव्हतं ! असं म्हणून तसा उपयोग होईल असे नाही. पालकांनी स्वतःच्या कष्टाची जाणीव मुलांना जरुर करुन द्यावी पण खूप सहजपणे. संवाद कसा साधावा ही पण एक कला आहे. प्रत्येक घर वेगळे प्रत्येक पालक वेगळे प्रत्येक मूल वेगळे. या वयातल्या पालकांना मात्र जुनी पिढी, नवी पिढी आणि स्वतःचे जगणे यांचा मेळ घालताना तारेवरची कसरत होणारच आहे. पण तरुणांना हे कळेलच असे नाही. हे समजून उमजून आरडा- ओरडा, आकांडतांडव न करता वाक्ये जपून वापरावीत. त्रागा न करता, आवाज न वाढवता संवाद साधला तर इतरांना इजा होणार नाही याची काळजी घेता येईल. सहज सुलभ संवादाने जाणिवा जाग्या करुन देता येऊ शकते. पैसा कमी जास्त असू शकेल पण प्रेम व्यक्त करता आले पाहिजे. ती नितांत गरज असते. आपलं मुलांच्यावर प्रेम आहे हे कृतीतून दाखवता आलं पाहिजे. अर्थात मुलांनीही पालकांना समजून घेणे आलेच. पण त्यांचे वय आणि अनुभव विचारात घेता, पालकांची भूमिका महत्त्वाची. शिवाय कुणी कुणाला गृहीत धरु नये ही हे आलेच. म्हणजेच संवाद किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला समजून येईल. ‘शब्दांवाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले’ असे नेहमीच घडेल असे नाही.

माझी आजी म्हणायची समजा एका मळकट घाणेरड्या चिंधीत सोने बांधून टाकले तर आपण त्याला तुडवून पुढे जातो. पण त्याच चिंधींवर सोने पडलेले दिसले तर चिंधी बाजूला सारुन सोने हातात घेतो. ताणतणावाच्या ओझ्यात प्रेम बांधून ठेवू नका. प्रेम मनात ठेवण्या पेक्षा व्यक्त केले तर आनंद उत्साह निर्माण होईल. प्रेम व्यक्त करायला मोठमोठ्या भेट वस्तूची गरज असतेच असं नाही. दोन शब्द कौतुकाचे बोलून प्रेम व्यक्त करता येते.

आणखी एक गोष्ट आवर्जून लक्षात आली. घरात खूप कोंडल्यासारखे वाटल्यास माणसाला बाहेर जावेसे वाटते. तो रस्त्यावर फिरु शकतो. एकांतांत बसावेसे वाटले तर मग कुठे जाणार? अशा वेळी सार्वजनिक बागा बगिचे कामाला येतात. देऊळ, मंदिर, विहार, चर्च, नदीकाठ, समुद्रकिनारा या ठिकाणी माणूस जाऊ शकतो. पण मुलींसाठी ही ठिकाणं सुरक्षित असायला हवीत. ही काळजी सर्व स्तरावर, व्यवस्थेने आणि लोकांनी घ्यायला हवी.

© डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ लखलखता हिरा.. अर्जुन देशपांडे – लेखिका : सुश्री मुक्ता आंग्रे ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

? इंद्रधनुष्य ?

☆ लखलखता हिरा.. अर्जुन देशपांडे – लेखिका : सुश्री मुक्ता आंग्रे ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

एक सोळा वर्षाचा मुलगा मेडिकलच्या दुकानात जातो. तिथे एक आजोबा कॅन्सरसाठीची औषधे घेत असतात. खरंतर त्यांना ती महागडी औषधे परवडत नसतात पण त्यांच्या पत्नीला कॅन्सर झालेला असल्याने ते कशीबशी पैशांची सोय करून औषधे घ्यायला आलेले असतात. तो मुलगा हे सगळे पहात असतो आणि न राहवून तो आजोबांना त्यांच्याबद्दल विचारतो. सत्य कळल्यावर तो खूप विचारात पडतो की असे हजारो, लाखो लोक या देशात आहेत की त्यांना ही महागडी औषधे परवडत नाहीत. पण तरीही काहीच पर्याय नसल्याने ते इतकी महाग औषधे खरेदी करतात. तो मुलगा आता यावर पर्यायांचा विचार करायला लागतो. यातूनच त्याच्या भावी उद्योगाचा पाया रचला जातो.

हा मुलगा म्हणजे ठाण्यातील वय वर्ष फक्त २२ असलेला ‘अर्जुन देशपांडे’ जो जगातील सर्वात तरुण उद्योजक आहे. त्याने स्थापन केलेल्या ‘जेनेरिक आधार’ या कंपनीचा टर्नओव्हर आहे मात्र पंधराशे कोटी रुपये !

१६ वर्षाच्या अगदी कोवळ्या वयात अर्जुनने ‘जेनेरिक आधार’ कंपनी स्थापन केली. कंपनीचा मूळ उद्देश हाच होता की गरजू आणि गरीब लोकांना अतिशय स्वस्तात औषधे उपलब्ध व्हावीत. त्यासाठी त्यांनी औषधे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना गाठले. तेथून स्वस्तात औषधे खरेदी करून ‘जेनेरिक आधार’ नामक मेडिकलच्या दुकानातून त्याची विक्री सुरू केली. जी औषधे उत्पादकांकडून विकत घेऊन मोठ्या मोठ्या फार्मा कंपन्या स्वतःचे लेबल लावून अतिशय महाग विकतात तीच औषधे जेनेरिक आधार मध्ये अतिशय स्वस्त दरात मिळतात. मध्ये कुठलेही दलाल आणि इतर खर्च नसल्याने ते ही औषधे इतक्या कमी किमती विकू शकतात.

आजच्या घडीला देशभरात ‘जेनेरिक आधार’ ची तीन हजार मेडिकलची दुकाने आहेत. जिथून औषधे खरेदी करून लोकांचे हजारो लाखो रुपये वाचत आहेत.

तसेच अर्जुनने आज दहा हजार पेक्षा जास्त लोकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे रोजगार देऊ केला आहे.

त्याच्या या कर्तुत्वाची दखल रतन टाटा सारख्या दिग्गज व्यक्तीनेही घेतली. रतन टाटांनी त्याला भेटायला बोलवून केवळ प्रोत्साहनच नाही तर त्याच्या कंपनीमध्ये गुंतवणूकही केली. याचे कारण सांगताना अर्जुन सांगतो कि आपल्या देशातील अगदी दुर्गम खेड्यातही औषधे उपलब्ध व्हावीत अशी अर्जुनप्रमाणे रतन टाटांचीही इच्छा आहे. आज पर्यंत अर्जुनला अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत. वय वर्षे केवळ २२ असलेल्या अर्जुनला आयआयटी मुंबई, आयआयटी दिल्ली तसेच जपान सारख्या अतिप्रगत देशात मानाने बोलवले जाते. त्याचे व्याख्यान ऐकायला लोक गर्दी करतात. जपानने तर त्याला अतिशय स्वस्त दरात मोठे कर्ज दिले आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी तसेच आपल्या देशाच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांनीही अर्जुनला भेटायला बोलवून त्याची प्रशंसा केली. द्रौपदी मुर्मुशी तर त्याचे आता आपुलकीचे नाते निर्माण झाले आहे.

सध्याच्या चंगळवादी तरुणाई मध्ये अर्जुन देशपांडे हा एखाद्या लखलखत्या हिऱ्यासारखा चमकतो आहे. ज्याला आपल्या देशाचा अतिशय अभिमान आहे. त्याला आपल्या भारत देशाला अमेरिका अथवा इंग्लंड न बनवता अभिमानास्पद भारतच बनवायचा आहे.

अशा या लखलखत्या हि-याला, अर्जुनला मानाचा मुजरा !

लेखिका : सुश्री मुक्ता आंग्रे

प्रस्तुती : सुश्री स्नेहलता गाडगीळ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “फक्त सेल्फी काढण्यापूरते हासरे चेहरे ठेऊ नका !”….लेखक : श्री विजय पोहनेरकर ☆ प्रस्तुती – सौ.अस्मिता इनामदार ☆

सौ.अस्मिता इनामदार

? वाचताना वेचलेले ?

☆ “फक्त सेल्फी काढण्यापूरते हासरे चेहरे ठेऊ नका !”….लेखक : श्री विजय पोहनेरकर ☆ प्रस्तुती – सौ.अस्मिता इनामदार ☆ 

आपल्या आयुष्यातील आनंद, सुख, समाधान हे प्रामुख्याने कशावर अवलंबून असतं ? 

तुम्ही अवतीभवतीची नाती कशी जपता, नाती कशी टिकवता यावरच सारं काही अवलंबून आहे.

दैनंदिन जीवन जगतांना दोन्ही प्रकारची नाती जपता आली पाहिजेत … 

दोन्ही प्रकारची नाती म्हणजे – – रक्ताची नाती आणि परिचिताची नाती. ( म्हणजे रक्ताची नसलेली. )

समोरची व्यक्ती जर आपल्या मनासारखं वागत असेल तर ते नातं सहज जपल्या जातं, ते नात फुलतं आणि टिकतं. परंतु प्रत्येक नात्याच्या बाबतीत असं होत नसतं. म्हणजे समोरची व्यक्ती आपल्या मनासारखं वागत नसली तरीही नातं टिकवता आलं पाहिजे !

 

म्हणजे नाती जपण्यासाठीचा Common minimum प्रोग्राम राबवता आला पाहिजे, तरचं नातं टिकत असतं ! – – समोरच्या व्यक्तीच्या मनासारखं, 100 टक्के जरी वागता आलं नाही, तरी किमान 50 / 60 टक्के तरी मनासारखं वागण्याचा दोन्ही बाजूंनी प्रयत्न व्हायला पाहिजे !

 

नवरा-बायको, भाऊ-भाऊ, बहीण-भाऊ, सासू-सून, नणंद-भावजय अशी सर्वच नाती टिकवण्यासाठी आपल्याला तडजोडी कराव्या लागतात आणि त्या करता आल्या पाहिजेत. ( याचा अर्थ समोरचा कसाही वागत असेल तरीही adjust करा, असा मुळीच नाही. )

 

कोणाकडूनच काहीही अपेक्षा ठेऊ नये….. हे वाक्य बोलण्यापुरते ठीक आहे, पण प्रत्यक्षात असं होत असतं का ? 

या प्रश्नाचं खरं उत्तर ” नाही ” हेच आहे ! आणि असा जर कुणी आपल्या पहाण्यात असेल तर तो देवमाणूस समजावा. आपल्या अवतीभवतीच्या कोणत्याच नात्याकडून काहीच अपेक्षा न ठेवणं ही कला साधण्यासाठी प्रत्येकाने प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजेत ….. आणि या बरोबरच अजून एक कला आपल्याला आली पाहिजे, ती कला म्हणजे थोडं फार का असेना, समोरच्या व्यक्तीच्या मनासारखं जगण्याची, त्याचं मन जपण्याची कला ! 

 

आपण कोणासाठी काही केलं तर ती व्यक्ती आपल्यासाठी काही तरी करेल, हे अगदी साधं equation आहे ! पण highly qualified असणाऱ्या व्यक्तींनासुद्धा ही गोष्ट जमत नाही, हे समाजातले वास्तव आहे.

 

नवरा-बायको, भाऊ-भाऊ, सासू-सून यांच्यामध्ये का बरं धुसफूस असावी ? या नात्यामध्ये भांडणं, अबोला, मतभेद असलेच पाहिजेत का ?

सासूने माझ्यासाठी काय केलं ? आई-वडिलांनी आमच्यासाठी काय केलं ? असे प्रश्न विचारतांना सासूसाठी सून म्हणून आपण काय केलं ? मुलगा म्हणून आपण आई-वडिलांसाठी काय केलं, हे ही प्रश्न स्वतःच्या मनाला विचारले पाहिजेत !

 

एकतर्फी प्रेमातून कोणतंच नातं फुलतही नसतं आणि टिकतही नसतं !

– – लक्षात घ्या फक्त सेल्फी काढण्यापुरते हसरे चेहरे ठेऊ नका. असे वागणे म्हणजे स्वतःची आणि इतरांची फसवणूक करण्यासारखे आहे.

…. सुनेने सासूचा तिरस्कारच केला पाहिजे का ?

…. भावा-भावा मध्ये आणि जावा-जावा मध्ये भांडणं असलेच पाहिजे का ?

…. Busy पणाच्या नावाखाली किंवा परिस्थिती गरीब आहे म्हणून बहिणीकडे जाणे येणे सोडूनच द्यायचे का ? 

…. एखाद्या वेळेस मित्र चुकीचा वागला म्हणून काय मैत्रीच तोडून टाकायची का ?

 

व्यवस्थित बोलून, सुसंवाद साधून नाती टिकवता येतात, ही गोष्ट सर्वांनीच लक्षात घेतली पाहिजे.

चला तर मग…..

…. एकमेकांचं मन जपण्याचा प्रयत्न करूया….

…. प्रत्येकाशी मन मोकळं बोलू या

…. आणि आपल्यासाठी खूप काही करणाऱ्यासाठी आपणंही काहीतरी करू या, किमान कुणी काही केलं याची नोंद तरी ठेऊ या !

लेखक : प्रा. विजय पोहनेरकर

छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद)

 94 20 92 93 89

प्रस्तुती : सौ.अस्मिता इनामदार

पत्ता – युनिटी हाईटस, फ्लॅट नं १०२, हळदभवन जवळ,  वखारभाग, सांगली – ४१६ ४१६

मोबा. – 9764773842

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ कथा : पांघरूण… ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

📚 क्षण सृजनाचा 📚

☆ कथा : पांघरूण सौ. उज्ज्वला केळकर ☆ 

मी डी. एड. कॉलेजला होते, तेव्हाची गोष्ट. मला बर्‍याचदा ‘समाजसेवा’ हा विषय शिकवायला असे. या विषयांतर्गत एक उपक्रम होता, समाजसेवी संस्थांना भेटी. यात अनाथाश्रम, वृद्धाश्रम, रिमांड होम, मूक-बधीर मुलांची शाळा, गतिमंद मुलांची शाळा अशा अनेक संस्था असत.

एका वर्षी मला कळलं, कॉलेजपासून पायी वीस मिनिटांच्या अंतरावर एक चर्च आहे. त्या चर्चने एक क्रेश चालवलं आहे. क्रेश म्हणजे संगोपन गृह. या क्रेशची माहिती घेण्यासाठी मी माझ्या विद्यार्थिनींना घेऊन तिथे गेले. क्रेशला आर्थिक मदत जर्मन मिशनची होती. इथे आस-पासच्या वस्तीतली आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणार्‍यांची मुले येत. सकाळी ८ वाजता मुले येत. तिथे त्यांना दूध, नाश्ता दिला जाई. शिक्षण, दुपारचे जेवण, पुन्हा शिक्षण, खेळ, गाणी, चित्रे काढणे, सगळं तिथे करायला मिळे. दुपारी बिस्किटे, फळे वगैरे दिली जात. संध्याकाळी ६ वाजता मुले आपआपल्या घरी जात.

तिथल्या मदतनीस क्रेशबद्दलची माहिती सांगत होत्या. ‘ इथल्या मुलांना जर्मनीतील काही लोकांनी दत्तक घेतले आहे. त्यांचा खर्च ते करतात. तिथल्या मुलांना खेळणी पाठवतात. चित्रे पाठवतात. ग्रीटिंग्ज पाठवतात. आम्ही ते सगळं मुलांना देतो.. पण इथे खेळायला. बघायला. त्यांना खेळणी वगैरे घरी नेऊ देत नाही. आपल्या घराचे फोटोही मुलांचे दत्तक पालक पाठवतात. पत्रे पाठवतात. आम्ही या मुलांच्या आयांना नेहमी

सांगतो, ‘तुम्ही पण त्यांना पत्र लिहा. काय लिहायचे, ते सांगा. आम्ही इंग्रजीत लिहून त्यांना पाठवू. ’ पण आम्हाला फारसा प्रतिसाद मिळत नाही. ’

त्यांनी मग आम्हाला अशी काही पत्रे, खेळणी, ग्रीटिंग्ज दाखवली. कुठली कोण माहीत नसलेली मुले.. पण चर्चच्या सांगण्यावरून ते परदेशी, या मुलांचा खर्च करत होते. सामाजिक बांधिलकीचा केवढा व्यापक विचार. चर्चचा आदेश म्हणजे त्यांच्यासाठी जणू प्रभू येशूचा आदेश होता.

त्या दिवशी त्या क्रेशमध्ये आणखी एक कार्यक्रम होता. थंडीचे दिवस होते. त्यामुळे तिथे मुलांसाठी त्या दिवशी चादरी वाटण्यात येणार होत्या. प्रमुख व्यवस्थापिका रेमंड मॅडमनी त्या दिवशी मुलांच्या आयांना बोलावून घेतले होते. हॉलमध्ये सगळे जमले. दोघे शिपाई सोलापुरी चादरींचे गठ्ठे घेऊन आले.

प्रार्थना, सर्व उपस्थितांचे स्वागत झाले. प्रभू येशूची शिकवण, तो सगळ्यांकडे कसा कनवाळू दृष्टीने बघतो, असं सगळं बोलून झालं. मुलांच्या परदेशातील पालकांनी चादरीचे पैसे दिल्याचे सांगितले गेले. ‘ त्यांचे आभार मानणारे पत्र आमच्याकडे लिहून द्या. आम्ही तिकडे ते पाठवू, ’ असंही तिथे सांगण्यात आलं.

तिथे चादरी वाटप सुरू झाले आणि माझ्या मनात एक कथा साकारू लागली. तिथल्याच शाळेतील एक मुलगा. — त्याचं नाव मी ठेवलं सर्जा आणि त्या क्रेशचं बारसं केलं ‘करूणानिकेतन क्रेश. ’

हिंडेनबुर्गमधील एका मोठ्या नामांकित चर्चची इथल्या चर्चला आणि क्रेशला मदत होती, ही तिथे मिळालेली माहिती. त्या चर्चने त्यांच्या देशातील सुखवस्तू सज्जनांना, इथल्या एकेका मुलाला दत्तक घ्यायला सांगितले होते. क्रेशमध्ये सध्या अशी ५० मुले होती. त्यांचे ५० दत्तक पालक, त्यांचा रोजचा खर्च करणारे. क्रेशच्या माध्यमातून त्यांना ती मिळत होती. हे अर्थातच तिथे कळलेले वास्तव.

कथेतल्या सर्जालाही तिथल्या एका कुटुंबाने दत्तक घेतलय. ते कुटुंब मात्र माझ्या कल्पनेतलं.

ज्यो पप्पा, मेरी मम्मी, अग्नेस, मार्था, डेव्हीड हे त्याचं दत्तक कुटुंब. त्यापैकी डेव्हीड त्याच्या साधारण बरोबरीचा. पप्पांचं, डेव्हीडचं त्याला पत्र येत असे. पण त्याला ते वाचता येत नसे. मॅडम पत्र वाचून दाखवत. मराठी भाषांतर करून सांगत. पत्र वाचता आलं नाही, तरी सर्जा किती तरी वेळ त्या गुळगुळीत कागदावरून हात फिरवत राही. पत्र नाकाजवळ नेऊन त्याचा सुगंध घेत राही. अशा अनेक कल्पित

प्रसंगांची मालिका मी कथेत गुंफली आहे. त्यातून सर्जाचं साधं, भोळं, निरागस व्यक्तिमत्व आणि त्याच्या बालमनातले विचार, भावना कल्पना प्रगट करण्याचा मी प्रयत्न केला आहे.

डेव्हीड एकदा सर्जाला पत्र पाठवतो. त्याबरोबरच तो आपल्या लाडक्या कुत्र्याचा- जिमीचा फोटो पाठवतो. पत्रात तो लिहितो, ‘तुझा म्हणून मी रोज जिमीचा स्वतंत्र कीस घेतो. ’ मग सर्जा फोटोतल्या जिमीच्या अंगावरून हात फरवतो आणि फोटोतल्या जिमीची पप्पी घेतो.

डेव्हीड सर्जाला, ’ तू तुझ्या घराचे फोटो पाठव, ’ असं पत्रातून लिहीत असे. सर्जाला वाटे, कसलं आपलं घर… घाणेरडं, कळकट. आपली भावंडे, शेंबडी, केस पिंजारलेली. फाटक्या लुगड्यातली आई, खोकून खोकून बेजार झालेली आजी… यांचे कसले फोटो काढून पाठवायचे आणि काढणार तरी कोण? सर्जाच्या मनात तुलना सुरू व्हायची. — फोटोत बघितलेलं ज्यो बाबांचं घर कसं – मॅडम गोष्टी सांगत, त्यातल्या राजाच्या

महालासारखं. घरातली सगळी माणसं कशी छान दिसणारी. झकपक कपड्यातली. आणि सर्जाचं घर–

सर्जाचं घर, मी, तळागाळातलं कुठलंही प्रातिनिधिक घर असेल, तसं रंगवलं. त्याची आई विड्या वळून संसार चालवणारी. म्हातारी, दमेकरी सासू, दोन भावंड–दिवसभर उनाडणारी, बाप रिक्षा चालवायचा पण सगळा पैसा बाई-बाटलीत उडवायचा. मनात येईल, तेव्हा बायकोच्या तोंडावर काही नोटा फेकायचा. तेवढंच त्याचं आपल्या संसाराबाबतचे कर्तव्य. ‘साल्या, भडव्या, रांडेचा ’ शिवाय बोलणं नाही. आई देखील सदा कारवादलेली.

सर्जावर झालेले स्वछतेचे संस्कार तो आपल्या भावंडांवर करू शकत नाही, याचे त्याला दु:ख आहे. नुकताच तो शाळेत येऊ लागला होता, त्यावेळचा प्रसंग… एकदा त्याने नाश्त्याच्या वेळी प्लेटमधले पोहे आपल्या भावंडांना देण्यासाठी शर्टाच्या खिशात भरले. खिशाला तेलकट, पिवळट डाग पडले. मॅडमनी चोरी पकडली. सर्जाला वाटले, आता आपल्याला मार बसणार. मॅडमनी त्याला मारलं नाही पण त्या रागावल्या. ‘चोरी करणं पाप आहे’ म्हणाल्या. त्यांनी त्याला येशूच्या फोटोपुढे गुडघे टेकून बसायला सांगितलं. प्रार्थना करायला सांगितली. क्षमा मागायला सांगितली. मग त्या म्हणाल्या, ‘लेकराच्या

हातून चूक झाली. तू त्याला माफ कर. तुझं अंत:करण विशाल आहे. तू आमचा वाटाड्या आहेस. आम्हाला क्षमा कर. ’

– – हा प्रसंग लिहिताना, म्हणजे मॅडमबद्दल लिहिताना, कुठे इकडे तिकडे काही पाहिलेलं, ऐकलेलं, मनात रुजून गेलेलं आठवलं. त्याचा उपयोग मी त्या प्रसंगात केला. त्यानंतर सर्जाने असं पाप पुन्हा केलं नाही. त्याच्या धाकट्या भावंडांना उचलेगिरीची सवय होती. सर्जा त्यांना म्हणे, ‘प्रभू येशू म्हणतो, असं करणं पाप आहे. ’ त्यावर आई म्हणे, ‘तुला रं मुडदया रोज चांगलं चुंगलं गिळाया मिळतय, तवा हे पाप हाय, सुचतं.

कधी भावा-बहिणीसाठी येवढं- तेवढं काय-बाय आणलंस का?’ आणावसं वाटे, पण तो आणू शकत नव्हता. त्याची तगमग होई.

त्याला या शाळेत त्याच्या मामानं आणलं होतं. त्याने ठरवलं होतं, खूप अभ्यास करायचा. खूप शिकायचं आणि नंतर पुढच्या शिक्षणासाठी जर्मनीला ज्यो पप्पांकडे जायचं. ज्यो पप्पा त्याला पत्रातून नेहमी असंच लिहीत.

त्या दिवशी क्रेशमध्ये चादरी वाटपांचा कार्यक्रम झाला. चादरी वाटायला व्यवस्थापिका रेमंड बाई स्वत: आल्या होत्या. चर्चचे प्रमुख फादर फिलीप यांच्या हस्ते चादरींचे वाटप होणार होते. सुरूवातीला डोळे मिटून प्रभू येशूची प्रार्थना झाली.

– – मी माझ्या कथेत प्रार्थना घेतली – – 

‘ मेंढपाळ हा प्रभू कधी ने हिरव्या कुरणी मला

कधी मनोहर जलाशयावर घेऊनी मज चालला. ’

– – ही प्रार्थना, मी डी. एड. कॉलेजमध्ये लागल्यानंतर आमच्या विद्यार्थिनींनी म्हणताना

ऐकली होती. तिचा उपयोग या कथेसाठी मी केला.

त्यानंतर मॅडम रेमंडनी सर्वांचं स्वागत केलं. येशूच्या उपदेशाबद्दल सांगितलं आणि

चादरी वाटप सुरू झालं. माझ्या कल्पनेने मात्र त्या चादरींची ब्लॅंकेट्स् केली. निळ्या, हिरव्या, लाल,

गुलाबी, सोनेरी रंगांची ब्लॅंकेट्स् मोहक. आकर्षक डिझाईन असलेली ब्लॅंकेट्स्.

आपल्याला कोणतं ब्लॅंकेट मिळेल, याचा सर्जा विचार करतोय. कधी त्याला वाटतं आपल्याला निळं, निळं, आभाळासारखं ब्लॅंकेट मिळावं, कधी सोनेरी, कधी हिरवं. त्याला लाल ब्लॅंकेट मिळतं. मग त्याला आठवतं डेव्हीडच्या खोलीतल्या बेडवर याच रंगाचं ब्लॅंकेट आहे. ज्यो बाबांनी डेव्हीडसारखंच ब्लॅंकेट आपल्यालाही पाठवलं, म्हणून तो खूश होऊन जातो.

कार्यक्रम संपला. बायका आपआपल्या चादरी घेऊन आपआपल्या घरी निघाल्या. माझं मन कथेतल्या सर्जाच्या आई पाठोपाठ त्याच्या घरी निघालं. काय घडलं पुढे?

– – सर्जा भयंकर उत्तेजित झाला होता. त्याला आज जेवण-खाण काही सुचत नव्हतं. तो घरी आल्या आल्या आपल्या भावंडांना बोलावतो आणि सगळे ते ऊबदार ब्लॅंकेट पांघरून झोपून टाकतात.

सर्जाचा बाप दारू पिऊन घरी येतो आज त्याच्या खिशात दमड्या नसल्यामुळे त्याला बाईकडे जाता आलेलं नाहीये. तो अस्वस्थ आहे. घरी येताच त्याचा पाय त्या नव्या ब्लॅंकेटमध्ये अडकतो. तो खाली पडतो. उठता उठता त्याचे लक्ष एकदम त्या आकर्षक ब्लॅंकेटकडे जाते. त्याच्या डोक्यात वीज चमकते… ‘ हे ब्लॅंकेटच आज तिला द्यावं. ती एकदम खूश होऊन जाईल… अशी चिकटेल, लई मजा येईल. ’

तो सर्जाच्या अंगावरचे ब्लॅंकेट ओढू लागतो. ब्लॅंकेट दे म्हणतो. सर्जा म्हणतो, ‘ माझ्या जर्मनीतल्या

बापाने माझ्यासाठी पाठवले आहे. मी देणार नाही. ’

‘ तुझ्या जर्मनीतल्या बापाकडेच निघून जा, ‘ असं म्हणत सर्जाचा बाप ते ब्लॅंकेट हिसकावून निघून जातो. पाठीमागच्या सीटवर ब्लॅंकेट ठेवून तो रिक्षा सुरू करतो.

सर्जा रडत राहतो. त्याच्या अश्रूभरल्या डोळ्यासमोर येते, ते फोटोतल्या ज्यो बाबांचे उबदार घर. त्याला अधिकच उघड्यावर पडल्यासारखं वाटतं. रडत रडत तो आपल्या आईच्या मांडीवर डोकं ठेवतो. आई आपल्या फाटक्या धडुत्याचा पदर त्याच्या अंगावर सरकवते.

‘पांघरूण’ या माझ्या कथेची ही जन्मकथा. साधारण १९८२- ८४ च्या दरम्यान ही कथा मी लिहीली. त्या काळात दर्जेदार समजल्या जाणार्‍या किर्लोस्करमध्ये ती प्रकाशित झाली. अनेक वाचकांची कथा आवडल्याची खुषीपत्रे मला आली. पुढे या कथेचा हिंदीमध्येही अनुवाद झाला. तो ‘प्राची’सारख्या प्रतिष्ठित मासिकात प्रकाशित झाला.

“ पांघरूण “ ही कथा वास्तवाच्या पायावर उभी राहिलेली आहे. कथेमधले अनेक तुकडेही वास्तव आहेत. त्याच्या विविध प्रसंगांच्या भिंती, त्याला मिळालेलं भाव-भावनांचं रंगकाम, पात्रांच्या मनातील विचारांचं नक्षीकाम आणि एकंदर घराच्या अंतर्भागातील सजावट कल्पनेने सजवली आहे.

– – मला नेहमीच वाटतं, त्या दिवशी त्या क्रेशला आम्ही भेट दिली नसती, वा त्याच दिवशी तिथे चादरी वाटपाचा कार्यक्रम झाला नसता, तर इतकी चांगली कथा मला सुचली नसती.

© सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print