आपण सध्या पाहतच आहोत की रस्त्यावर रहदारी प्रचंड वाढली आहे. मुळात रस्ते जसे आणि जेवढे आहेत तेवढेच आहेत. मात्र वाहनांची संख्या मात्र भरमसाठ वाढतच आहे. त्यामुळे अपघातांचा आलेख चढत्या दिशेने नोंदवला जात आहे..
कदाचित जेवढे लोक एखादया देशात युद्धात मरण पावत असतील त्यापेक्षा जास्त आपल्या देशात रस्ते अपघातात मरण पावतात. अपघातात अंशतः किंवा पूर्णतः अपंगत्व येणाऱ्यांची संख्याही खूप मोठी आहे. त्यामुळे अशा कुटुंबांवर फार मोठा आघात होतो.
एका वृत्तपत्रातील बातमीनुसार गेल्या वर्षभरात आपल्या देशात रस्ते अपघातामुळे 1,68,491 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
रस्ते अपघातांच्या कारणांमध्ये खूप विविधता आहे. पण मुख्य कारण अतिशय वेगाने व बेदरकार गाडी चालविणे यामुळे जास्तीत जास्त अपघात होत असतात. चुकीच्या दिशेने गाडी चालवल्यामुळे, मद्यपान करून गाडी चालवल्यामुळे, गाडी चालविताना मोबाईल फोनचा वापर केल्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळते. काहीजण अचानक मुख्य रस्त्यावर येतात. वाहन वळवताना हाताने इशारा न करणे किंवा इंडिकेटरचा वापर न करणे,रस्त्यात वाहतुकीस अडथळा होईल अशी गाडी उभी करून ठेवणे वा गप्पा मारत उभे राहणे.
रात्री गाडी चालवताना एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे मोठ्या गाड्यांचे लाईट्स. एकतर आता नवीन गाड्यांना एल.ई.डी. लॅम्प आहेत. त्यात बऱ्याच वाहन चालकांकडून अप्पर आणि डिपर लाईटचा योग्य पद्धतीने वापर केला जात नाही.
आणि तीव्र प्रकाशझोत वाहन चालकाच्या डोळ्यावर पडून अपघात घडतात.
खरंतर अलीकडील काळात वाहतूकीचे नियम अधिक कडक करण्यात आलेआहेत. दंडाच्या रकमेत व शिक्षेच्या तरतुदीत वाढ करण्यात आली आहे. मात्र अनेक पालक आपल्या अल्पवयीन पाल्यास गाडी चालवायला देतात. (काही हौस म्हणून, मोठेपणा मिरवण्यासाठी, तर काही गरज म्हणून) तेही अतिशय धोकादायक आहे.
अशी बरीच कारणे या अपघात आणि त्यातून घडणारे मृत्यू किंवा अपंगत्व यामागे आहेत.
रस्त्यावरून जात असताना आपणच निरीक्षण केले तर आपणाला असे दिसून येईल की, बरेच टु व्हिलर वा फोर व्हीलर मधील गाडी चालवणारी मंडळी सर्रास व सराईत पणे मोबाईल वर बोलत गाडी ड्राईव्ह करत असतात. काही तर असे महामानव आपणाला पहायला मिळतात की, जे मोबाईल वर टाईप करत करत चॅटिंग करत करत गाडी चालवतात. कळत नसेल का हो यांना? कळतंय पण वळत नाही. गांभीर्य नाही.
त्यात भरीस भर म्हणून आता सध्या साखर कारखाने सुरू झाले आहेत. त्यामुळे तर रहदारी मध्ये प्रचंड वाढ तर झाली आहेच पण या ऊसाच्या गाड्यांमुळे रस्ताच आक्रसून गेला आहे. त्यातही आपणाला व्हरायटी पाहायला मिळते. काही गाडीवान अगदी व्यवस्थित शिस्तबद्ध गाडी चालवताना दिसतात. तर काही ऊस ओव्हरलोड घेऊन जाताना दिसतात, तर काही ऊस खच्चून भरुनही अतिशय वेगाने वाकडी तिकडी गाडी चालवत जाताना दिसतात. काही एवढा प्रचंड ऊस घेऊन जात असूनही दुसऱ्या ट्रॅक्टर ला ओव्हरटेक करताना दिसतात.
त्यामुळे शक्य असल्यासच आपण जरा सावकाशीने यांना ओव्हरटेक करायला हवे अन्यथा सुरक्षित अंतर ठेवून मार्गक्रमण केलेले बरे. नाही का?
मुळात या लेखाचा उद्देश तुम्हा मंडळींना घाबरवण्याचा नाही. तर आपण सर्वच जण सजगतेने आणि सुरक्षिततेने रस्त्यावर प्रवास करूया. तुमच्या कुटुंबीयांसाठी तर तुम्ही मौल्यवान आहातच तसेच भारतवर्षासाठीही तुम्ही मौल्यवान आहात.
☆ आली माझ्या घरी ही दिवाळी… ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी) ☆
बेडरूमच्या खिडकीचं तोरण निसटलं म्हणून ती लावत असताना त्याने खोडकरपणा करत आपल्या हातांचा विळखा तिच्या कमरेला घातला,… तशी ती डोळे वटारून म्हणाली, ” नेहमी सारखे राजराणी नाही आपण घरात,… दिवाळीचं माणसांनी घर गच्च भरलंय माझं,…” तो म्हणाला, “तुलाच हौस होती सगळयांनी एकत्र दिवाळी करण्याची,…” ती लाडात म्हणाली, ” हम्म मग एकटी असते तर तू तर अभ्यंग स्नानही घालशील मला,”…
तिला अलगद कड्यावर घेत त्याने खाली उतरवलं आणि तिच्या डोळ्यात बघत म्हणाला,
“खूप thanku,… माझ्या खेड्यातल्या आई बाबांना आणि भाऊ, वहिनीला इतकं मानाने आणि प्रेमाने बोलवलं तू दिवाळीला,… खरंच मला खुप आनंद वाटतोय ग अगदी खरी दिवळी झगमगली आहे मनात,…”
ती म्हणाली, “अरे thanku काय त्यात,…? सून म्हणून मला माझीही कर्तव्य करायलाच पाहिजे ना,…एरवी आपण दोघेच तर असतो ह्या एवढ्या मोठ्या घरात,… आणि आज तू जे काही मोठ्या पदावर आहेस ते तुझ्या आई वडिलांमुळे,… त्यांना विसरून कसं चालेल,…? असले जरी खेड्यातले तरी खुप मायाळू आहेत रे,… खुप प्रेमाने वागतात आणि नाही वागले तरी मलाही सहन करता आलं पाहिजे ना,… कारण वर्षात काही दिवस तर येतात,… आणि तू खुश तर मग खरा संसार आणि खरी दिवाळी नाही का आयुष्याची,…?”
तेवढयात सासुबाई आल्या,.. दोघे उगाच खोकल्यासारखं करून दूर झाले,… तेव्हा सासुबाईच हसून म्हणाल्या, ” अरे मीच चुकीच्या वेळी आले वाटतं,.. पण मी फक्त एवढंच सांगायला आले,.. अरे आज पाडवा सूनबाईला काहीतरी छान भेट घेऊन ये,… लवकर जाऊन या मी स्वयंपाक करून ठेवते,… आपली ताई पण येईलच उद्याच्या भाऊबीजेला,…”
दोघे बाहेर पडले. तिने मात्र स्वतःला सोडून सगळ्यांसाठी छान साड्या घेतल्या,… भाचे,पुतण्या सगळ्यांसाठी गिफ्ट घेतले,… तो म्हणाला आणि तुला काय घ्यायचं,… ती म्हणाली, ” इतकं भरलं घर दिलंस मला,… अरे शिक्षण नोकरी असली तरी शेवटी अनाथाश्रमात वाढलेली मी ह्या माणसांच्या सुखासाठी फार तरसली आहे रे,… ते सुख तुझ्यामुळे मिळालंय मला,.. आता काही नको,… नेहमी अशीच आनंदी दिवाळी राहू दे आयुष्यात,…”
संध्याकाळी औक्षणात त्याने आईलाही साडी दिली,… सासुबाई म्हणाल्या, ” सुनबाई चांगली जादू केली माझ्या मुलावर अग आजपर्यंत त्याने काही घेतलं नाही मला,.. मला तशी अपेक्षा नव्हती ग,… पण आपल्या लोकांसाठी असं मनातून घ्यावं वाटलं पाहिजे,… प्रेम त्या वस्तूवर नसतं ग,… पण ज्याच्यासाठी घ्यायचं त्या व्यक्ती विषयी असतं,… आणि ह्या क्षणांच्या ह्या आठवणी असतात,… खरंतर त्या वस्तूशी निगडित नसल्या तरी त्या वस्तूसोबत आलेल्या भावनेत असतात ना,… खेड्यात रहात असल्या तरी विचाराने किती प्रगल्भ आहेत ह्याचं तिला कौतुक वाटलं,…
तिने त्याला औक्षण केलं,… खिशातील 100 रु ची नोट त्याने ताटात टाकली,… तेवढ्यात सासरेबुवानी एक पॅकेट त्याच्या हातात दिलं,… हे दे सुनबाईला आणि म्हणाले…” अरे ह्या सासु सुना सारख्याच असतील माहीत होतं मला,… तुझ्या आईने पण पहिल्या दिवाळीला असंच सगळ्या साठी घेतलं स्वतःला नाही,… मग माझ्या वडिलांनी असंच खोक ठेवलं होतं हातात,… सुनबाई बघा भेट आवडते का,…?”
तिने हसत ते उघडलं,… गिफ्ट बघून तिला आश्चर्यच वाटलं,… तिला आवडलेला तो मोत्याचा तन्मणी,…” अय्या बाबा,तुम्हाला कसं कळलं मला हेच पाहिजे होत,…?” बाबा मघाशी आलेल्या ताईकडे म्हणजे तिच्या नणंदेकडे बघून हसले,… नणंद म्हणाली, ” अग तू ऑनलाइन ज्या ग्रुपवर तन्मणीची चौकशी केलीस त्या ग्रुपवर मी पण आहे,… मग ठरलं माझं आणि बाबांचं,…”
तिचे डोळेच भरून आले,… गळ्यातला तन्मणी अजूनच खुलून दिसत होता,… माणसं जपायची तिची दिवाळी सुरुवात छानच झाली होती,… भरल्या घरातुन,…. सगळे तोंडभरून आशीर्वाद देऊन गेले,… दिवाळीही गेली. तरीपण हिचं गाणं गुणगुणणं सुरूच होतं,… ” सप्त रंगात न्हाऊन आली आली माझ्या घरी ही दिवाळी,…”
☆ शब्द-गप्पा-पुस्तकं आणि बरंच काही… ☆ श्री मनोज मेहता☆
शब्द हे माणसांसाठीच आहेत,माणसं एकमेकांना भेटली पाहिजेत. हल्ली माणसं माणसांना भेटताना सुध्दा मनात किंतु ठेवतात. हा किंतु वगळून भेटल्यास चांगला समाज निर्माण होईल. ही सहज सोप्या शब्दात माणसाची आणि गप्पांची ओढ व्यक्त केली आहे ज्येष्ठ साहीत्यिक शन्ना नवरे यांनी.
छायाचित्रकार मनोज मेहता आणि शन्ना नवरे यांच्या मैत्रीला ४० वर्षे पूर्ण झाल्याचा “(१० ऑक्टॉबर २०१२)” छोटेखानी कार्यक्रम नुकताच शन्नांच्या घरी झाला. या कार्यक्रमात छायाचित्रकार मनोज मेहता आणि शन्ना नवरे यांच्या मैत्रीचे बंध उलगडले आणि विचारांच्या धाग्यांनी अधिक घट्टही झाले. हल्ली माणसं एकमेकांना भेटत नाहीत, त्यांना भेटण्यासाठी, बोलण्यासाठी वेळ नसतो. रस्त्यात आपण कोणाला भेटलो तरी तोंडभरून हास्य येत नाही, कोणी फोन करून आपल्याकडे येणार असेल तर तो कशासाठी येतोय ? असा विचार मनांत येतो, यातून भावनिक गुंतवणूक कमी झाली आहे.
या गप्पांच्या ओघात त्यांनी त्यांच्या अनेक स्नेह्यांच्या आठवणी सांगितल्या. यामध्ये कवयित्री लेखिका शांत शेळके यांच्या आठवणी सांगितल्या. त्यांचे वाचन आणि शब्दांचा अर्थ शोधण्याची हातोटी,जिद्द सांगितली. भाषा लिहिताना ती शुध्द हवी असेही स्पष्ट केले. तसेच लिहिताना आणि वाचतानाही अनेक अशुध्द शब्द सहज वाचतो याबद्दल खंत व्यक्त केली.
या मैत्रीच्या वातावरणात शन्नांनी पुस्तकाबरोबर मैत्री कशी करावी? कुठलेही नवंकोरं पुस्तक हाती आल्यावर त्याला कव्हर घालावं तेही चांगलं, त्यानंतर पुस्तकात बुकमार्क घालावे, पुस्तकाची पाने दुमडू नयेत अशामुळे पुस्तक आपलेसे होते आणि अधिक काळ आपल्याकडे राहते.
छोटेखानी कार्यक्रमाची सांगता छायाचित्रकार मनोज मेहता यांनी करत शन्ना म्हणजे ” वेळेच्या बाबतीत ब्रिटीश, कामाच्या बाबतीत जपानी आणि संस्कार संस्कृतीचे पक्के भारतीय ” असा गौरव केला. नवरात्राच्या आठव्या माळेला हा कार्यक्रम नवरे रंगात डुंबून गेला अन मैत्रीची माळ अधिकच घट्ट झाली.
☆ मोती साबणाचा जन्म… – माहिती संकलक : आशिष फाटक ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
तेलात स्थिरावल्यावर टाटांनी साबणाकडे लक्ष द्यायचे ठरवलं. तोपर्यंत भारतात आपापल्या घरी बनवलेल्या साबणापासून म्हणजे बेसनपीठ व दुधाच्या मिश्रणातून अंघोळी व्हायच्या. अंगणात विहीरीकाठी अंघोळ करणारे कधीकधी पाठ घासायला नारळाची शेंडी वापरत होते. साबण म्हणून असे काही असते हे माहिती नव्हते. वास्तविक १८७९च्या काळात उत्तरेत मीरतच्या आसपास पहिला साबण बनल्याची नोंद सापडते. पण तो प्रसिध्द झाला नाही.
अंघोळीची अशी तऱ्हा होती तर कपड्यांच्या साबणाचाही काही विषय नव्हता. १८९५ ला कलकत्ता येथील बंदरात इंग्लंडहून पहिला साबणसाठा आपल्याकडे आला, ‘सनलाईट सोप’ नावाचा. त्यावर लिहिलं होतं,
‘मेड इन इंग्लंड बाय लीव्हर ब्रदर्स ‘. हा सनलाईट फार लोकप्रिय झाला आणि ती कंपनीही. लीव्हर ब्रदर्स म्हणजे आताची हिन्दुस्थान लीव्हर, ही कंपनी भारतात आली सनलाईट या साबणावर स्वार होऊन !
या लीव्हर कंपनीने नंतर डालडा आणला – वनस्पती तूप आणि भारतात ऐसपैस हातपाय पसरले. टाटांनी जेंव्हा भारतीय बनावटीचा साबण बाजारात आणायचे ठरवले तेव्हा लीव्हर कंपनीने त्यांना कडवा विरोध केला. एक तर तो काळ स्वदेशीचा होता. टाटा आपल्या जातिवंत उद्यमशीलतेनं नवनवी आव्हानं पेलत होते. वीज आली होती, पोलाद निर्मितीसाठी शोध चालू होते. पहिले पंचतारांकित हाॅटेल ताजच्या रुपाने उभे होते. नागपुरात एम्प्रेस मिल होती तर मुंबईत स्वदेशी जोरात सुरु होती.
आता साबणातही टाटा उतरले तर आपले नुकसान होणार हा अंदाज त्यांना आला होता. टाटा दर्जाच्या बाबतीत तडजोड करणार नाही हेही ठाऊक होते. टाटांना आव्हान द्यायचे असेल तर ते फक्त किंमतीच्या पातळीवरच देता येईल हे ते जाणून होते. टाटांनाही याची कल्पना होती. त्यामुळं टाटांनी आपला साबण बाजारात आणला तो लीव्हरच्या किंमतीत.. १० रुपयांना १०० वड्या !
नावही ठरलं.. ‘५०१ बार’ ! या नावामागेही एक कथा आहे. टाटांना स्पर्धा होती लीव्हरची. लीव्हर ही कंपनी मूळची नेदरलँडसची. ती झाली ब्रिटिश. टाटांना आपल्या साबणात ब्रिटिश काहीच नको होतं. लीव्हरची स्पर्धा होती, फ्रान्समध्ये तयार होणाऱ्या साबणाची. आणि त्या फ्रेंच साबणाचं नाव होतं ‘५००’. ते कळाल्यावर कंपनीचे प्रमुख जाल नवरोजी म्हणाले… मग आपल्या साबणाचे नाव ५०१ ! कारण त्यांच्या रक्तातच स्वदेशी होतं, त्यांचे आजोबा होते दादाभाई नवरोजी…!
बाजारात आल्यापासून या साबणाचा चांगला बोलबाला झाला. त्यामुळे लिव्हरने सनलाईटची किंमत ६ रुपयांना १०० अशी कमी केली ! त्यात त्यांचा तेलाचा खर्चही निघत नव्हता. टाटांच्या साबणाला अपशकुन करण्यासाठी त्यांची ही चाल होती. टाटा बधले नाहीत, किंमत कमी केली नाही, तीन महिन्यांनी लीव्हरने परत सनलाईटची किंमत पहिल्यासारखी केली. टाटा या स्पर्धेत तरले. या कंपनीने पुढे अंघोळीसाठी ‘हमाम’ … तर दिवाळीसाठी जो आजही मोठ्या उत्साहानं वापरला जातो… त्या ‘मोती’ साबणाची निर्मिती केली.. !
इतिहास विषय नावडीचा असला तरी देशाभिमान महत्वाचा , म्हणून दिवाळी निमित्त करून ही पोस्ट महत्त्वाची.. !!
माहिती संकलक :श्री आशिष फाटक
संग्राहक : श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ परतीचा फराळ – लेखक :अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆
परतीचा पाऊस असतो, तसा परतीचा फराळही असतो. आठवणी देऊन जाणारा आणि जाताजाता हुरहूर लावणारा …!
घराघरात कुशल गृहिणी आता डब्यांची अदलाबदल करुन संपूर्ण घराला कन्फ्युज करायला सुरुवात करतात. मोठ्या डब्यांमधला फराळ लहान डब्यात शिफ्ट होतो. निवडणुका संपल्यावर नेतेमंडळी दिसत नाहीत, तसा कालपर्यंत समोर असलेला फराळ आता शोधावा लागतो.
ओल्या नारळाच्या करंज्या एखाद्या सौंदर्यसाम्राज्ञीने आलिशान कारमधे बसून नीट दर्शनही न देता वेगानं निघून जावं, तशा केल्या आणि संपल्यासुध्दा अशा गायब होतात.
चकलीच्या डब्यावर सगळयांचाच डोळा असतो. पण शेवटची चकली खाताना होणारा आनंद प्रचंड असतो. ती खाल्ल्यावर डबा घासायला न टाकता झाकण लावून तो तसाच ठेवणाऱ्याला, फसवणे आणि अपेक्षाभंग करणे या गुन्ह्याची शिक्षा मिळायला हवी, असं माझं मत आहे.
पाहुण्यांसाठी मागच्या रांगेत लाडवाचा डबा लपवला जातो. कारण लहानपणापासून दिवाळी झाल्यानंतर महत्त्वाचे फराळाचे पदार्थ संपल्याचे कळताच येणारे पाहुणे हा एक खास वर्ग आहे हे पटलंय.
प्रत्येक फराळाच्या पदार्थाची एक एक्सपायरी डेट असते ती गृहिणींना अचूक माहीत असते. इतके दिवस विचारावे लागणारे चकलीच्या डब्यासारखे मौल्यवान डबे सहज उपलब्ध होत समोर दिसू लागले की भोळीभाबडी जनता उगाच आनंदून जाते. पण त्यामागे एक्सपायरी डेटचं राजकारण असतं.
डब्यात तळाला गेलेल्या शंकरपाळयांचा डबा चहा केल्यावर मुद्दाम समोर ठेवला जातो. कारण त्याचीही एक्सपायरी डेट जवळ येत असते.
जास्त मीठ मसाला तळाशी असलेला दाणे संपत चाललेला चिवडा कांदा- टाॅमेटो -कोथिंबीरीचा मेकअप करुन समोर येतो. मिसळीचा बेत आखला जातो.
शेव हा प्रकार कधी संपवावा लागत नाही. तो संपतो. पोहे उपमा करुन त्यावर सजावटीसाठी वापरली जात ती संपते.
असा हा ‘परतीचा फराळ’ दिवाळीच्या आठवणींचा… रिकाम्या कुपीतल्या अत्तराच्या सुगंधासारखा…जिभेवर रेंगाळणाऱ्या चवीचा… जाताजाता पुढच्या वर्षी पुन्हा एकत्र धमाल करु म्हणत एकमेकांचा निरोप घेत डब्यातून बाहेर पडणारा… गृहिणीला केल्याचं समाधान- कौतुक देणारा…आणि शेवटी शेवटी संपत जाताना आणखी चविष्ट होत जाणारा … परतीचा फराळ.
प्रस्तुती : सौ. सुचिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈
या वाक्यात आता नवीन काही नाही. निर्णय काय घ्यावा? हो… कि नाही… किंवा समोर असलेल्या पर्यायांपैकी कोणता चांगला. आणि कोणता निवडावा. असा प्रश्न पडला की हे वाक्य ऐकायला मिळत.
बऱ्याचदा विचारशक्ती वाढण्यासाठी, निर्णयक्षमता येण्यासाठी, गरज असल्यास थोडी जोखीम पत्कर काही लागल, चुकल तर मी आहे असा धीर देण्यासाठी वडीलधारी या वाक्याचा आधार घेतात. पण…
सध्या घरात जेव्हा मला काही विचारल जात, आणि मी हे वाक्य म्हणतो, तेव्हा माझ्या निर्णयाची फक्त औपचारिकता असते. बाकी जवळपास त्यांचं सगळ ठरलेल असत. डिसिजन जवळपास झालेला असतो.
जसं… जेव्हा मला विचारल जात, मी काय म्हणते… मुलं विचारतात की संध्याकाळी खायला ऑनलाईन काय मागवायच?…
यात मागवायच का? हो का नाही हा प्रश्न नसतो. मागवायच हे ठरलेल असत.
यात मुलांना घरातल काही नकोय. आणि बायकोला देखील आपणच काही करण्याची इच्छा नसते. म्हणजे यात घरातल नकोच हा निर्णय त्यांचा झालेला असतो.
यातही ऑनलाईन अस विचारल्यावर आपण कुठेही जायच नाही. आवडणाऱ्या ठिकाणाहून घरीच मागावयच आणि आरामात खायच. हे सुध्दा ठरलेल असत. माझ्या निर्णयाची गरज नसते. फक्त मला विचारल जात. मग मी म्हणतो… टेक युवर ओन डिसिजन. यात माझाही गाडी चालवायचा आणि पार्किंग साठी जागा शोधायचा त्रास वाचणार असतो.
तसं नाही… पिझ्झा मागवायचा कि बर्गर…?
म्हणजे पदार्थ सुध्दा त्यांचे ठरलेले असतात. त्या दोन व्यतिरिक्त तीसरा नसतोच. कदाचित त्याचा नंबर पुढे नजीकच्या काळात येणार असावा. किंवा आज या दोन पदार्थांवर त्यांच्या भाषेत जम्बो डिस्काउंट असावा. आता त्यांच्या निर्णयात मी डिस क्वालीफाय सारखा डिस काउंट असतो. पण मला विचारतात. मी परत म्हणतो. टेक युवर ओन डिसिजन.
हे झालं खाण्याच. दुसऱ्या गोष्टी सुध्दा याच पद्धतीने विचारल्या जातात.
मला वाटतं… या दिवाळीत कपड्यांऐवजी एखादा दागिना घ्यावा. नाही छोटासा असला तरी चालेल. यात छोटासा म्हणताना हाताची चिमटी जेवढी लहान करता येईल तेवढी लहान करता करता आवाज वाढवता येईल तेवढा वाढवला जातो. पण आवाजात गोडवा आणि नाजूकपणा असेल याची काळजी घेतली जाते.
आता दागिना छोटासा म्हटला तरी कमीतकमी आठ ते दहा ग्रॅम पासून सुरुवात. परत यांच्या तब्येतीला तो शोभून दिसला पाहिजे. थोडक्यात ठसठशीत हवा. सांगा कपडे आणि दागिना यांच बजेट जवळपास कुठे जमत का?
परत पुढे वाक्य असतच. मागे आम्ही एक पाहून आलो आहे. छान आहे. आणि डिझाईन पण नवीन आहे. हां… थोडीफार भर मीपण घालीन की. यांच भर घालणं म्हणजे दागिना घ्यायला भरीस घालण असत. थोडक्यात वस्तू पाहून झालेली असते. निर्णय झालेला असतो. आपल्याला विचारण्याची औपचारिकता असते. मग म्हणावच लागत. टेक युवर ओन डिसिजन…
माझ्या कपड्यांच्या बाबतीत सुद्धा तेच होत. नेहमी नेहमी पॅन्ट शर्ट हेच असत. कामावर तेच बरे असतात. पण झब्बा लेंगा कमीवेळा घेतला जातो. तो सुटसुटीत सुध्दा असतो. यावेळी झब्बा लेंगा पहा… असं मला वाटत. तुम्हाला त्याची सवय नाही. पण अगदीच काही वाइट दिसणार नाही. (हे वाक्य माझ्यासाठी असत का झब्बा लेंगा याच्यासाठी हा डिसिजन मात्र मी घ्यायचा असतो. ) पण पुढे तेच मला म्हणतात. टेक युवर ओन डिसिजन…
दिवाळीच्या फराळाचही आता तसच होणार… घरी काय करायच आणि बाहेरुन काय घ्यायच, किंवा करून घ्यायच हे जवळपास निश्चित नक्की झालेल असत. पण सुरुवात अशीच होईल.
ऑफिसमुळे सगळ्या गोष्टी घरी करण शक्य होणार नाही. काही पदार्थ घरी करू आणि काही तयार आणू. लाडू घरचेच आवडतात मुलांना. ते घरीच करु. आणि बाहेरुन काय आणायच त्याची यादी मी देते. त्या प्रमाणे तुम्ही घेऊन या. तयार पदार्थांसाठी ऑर्डर मी देईन. चालेल ना? तुम्हाला काय वाटतं… म्हणजे कुठे ऑर्डर द्यायची ते सुद्धा त्यांच ठरलेलं असतं किंवा तेच ठरवणार असतात. मी म्हणतो.
टेक युवर ओन डिसिजन…
पण ऑफिस किंवा इतर गोष्टी सांभाळून घरच सगळ व्यवस्थित आणि वेळच्या वेळी करण्याचा त्यांचा जो आटापिटा असतो त्या त्यांच्या डिसिजन ला मात्र सलाम… तेच करु जाणे… तिथे मी म्हणतो, तुझ्या निर्णयाला आणि कामाला सलाम…
☆ – किती रे तुझे रंग… – ☆ सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆
एक उत्तम संगीतकार, कवी, गायक, विडंबनकार, लेखक, गुरू, इत्यादी विविध पैलू, विविध रंग, व्यक्तिमत्वात असलेल्या देवकाकांना प्रथम स्मृतिदिनानिमित्त आणि पाठोपाठच असलेल्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या शब्दांत मी आदरांजली वाहतेय –
“किती रे तुझे रंग किती रे तुझ्या छाया
दोनच डोळे माझे उत्सव जातो वाया (उतू जाणे)”
१९९५ च्या दरम्यान नाशिकच्या दातार परिवाराने निर्मिलेल्या माझ्या पहिल्या ‘ही शुभ्र फुलांची ज्वाला’ या cd साठी जेव्हा शशी – उषा मेहता (ज्येष्ठ कवयित्री) या दाम्पत्याने काव्यनिवडीसाठी मदत केली. उत्तम दर्जेदार काव्य नि दर्जेदार संगीत असलेल्या कविता माझ्या आवडीने निवडल्या गेल्या. त्यावेळी विंदांची ‘सर्वस्व तुजला वाहुनी’, ‘मागू नको सख्या’, ‘अर्धीच रात्र वेडी’, सुरेश भटांची ‘एवढे तरी करून जा’, ग्रेस यांची ‘पाऊस कधीचा पडतो, ‘ शांताबाई शेळकेंची ‘प्रीती जडली तुझ्यावरी’…. अशा एक से एक सुंदर रचना निवडल्या गेल्या. गंमत म्हणजे सगळ्यांचे संगीतकार – यशवंत देवच होते. या अलिबाबाच्या गुहेतल्या, रत्नांचा हार परिधान करायचे भाग्य मला मिळाले. वेस्टर्न आऊटडोअर सारख्या अप्रतिम स्टुडिओत ही रेकॉर्डिंग्जस व्हायची. ‘सर्वस्व तुजला वाहूनी… गाताना सॅक्सोफोन वादक मनोरीदा, सरोद वादक झरीनबाई दारुवाला अशा दिग्गजांचे प्रत्यक्ष भावपूर्ण सूर कानावर पडल्याने लाइव्ह गाणे गाताना गाणे ही तसेच प्रकट होत असे… प्रत्येक टेक फर्स्ट टेक असे. टेक झाल्यावर मी गाणे ऐकण्यासाठी रेकॉर्डिंग रूम मध्ये गेले… देव साहेबांच्या अश्रुधारा वहात होत्या. त्यांनी मला पाठ थोपटून शाबासकी दिली आणि डोळे पुसत ते म्हणाले, “अत्यंत सुंदर आणि हृदयापासून गायलात पद्मजाबाई!” माझ्यासाठी हे मोठं बक्षीस होतं. शब्दप्रधान गायकीत कुठे काय कसे गावे याचे, त्यांनी पुस्तक लिहून अगदी नवोदितांसाठी सुद्धा वस्तुपाठ रचला. गाणे प्रथम मेंदूतून व नंतर गळ्यातून गायले जाते मगच ते सहज उमटते, ही गुरुकिल्ली त्यांनी मला दिली. त्यांची भाषणे ऐकायला आम्ही उत्सुक असू. त्यांची देववाणी प्रासादिक होती. विनोदबुद्धी शेवटपर्यंत तल्लख होती. कायम ते हशा आणि टाळ्या घेत. शेवटपर्यंत ते कार्यरत होते. शेवटी मात्र आजारपणात त्यांनी परमेश्वराला त्यांच्याच शब्दांत अशीच हाक घातली असेल…
॥ चांगली कर्म करणारा प्रत्येक माणूस हा देवच असतो, चांगल्या कर्मातच देव आहे ॥
“देव बीव सगळं झूठ आहे. थोतांड आहे. ‘मेडिकल सायन्स’ हाच खरा परमेश्वर आहे. गेल्या ५० वर्षांत मेडिकल सायन्समुळे जेवढे प्राण वाचले असतील, तेवढे देवाने लाखो वर्षात कुणाचे वाचवले नाहीत. मला कीव करावीशी वाटते त्या लोकांची जे ‘ऑपरेशन थिएटरच्या बाहेरही देवाची प्रार्थना आणि स्तोत्र म्हणत बसतात.” — डॉक्टर कामेरकरांच्या ह्या वाक्यावर, सभागृहात एकच हशा उठला. डॉक्टर कामेरकर एका ‘मेडिकल कॉन्फरन्स’ मध्ये बोलत होते… डॉक्टर कामेरकर शहरातले निष्णात डॉक्टर. त्यांना भेटायला पेशंट्सच्या रांगाच्या रांगा लागत असत.
कॉन्फरन्स संपली आणि डॉक्टर घरी आले. वाटेतच त्यांच्या ‘मिसेस’ चा मेसेज होता की ” मी आज पार्टीला जातेय. मुलं सुद्धा बाहेर गेली आहेत. जेवण डायनिंग टेबलवर काढून ठेवलंय. घरी गेलात की
जेवा “. डॉक्टर घरी आले. हात-पाय तोंड धुवून जेवायला बसले. जेवण आटोपल्यावर लक्षात आलं, की बरचस जेवण उरलय. आता जेवण फुकट घालवण्यापेक्षा कुणाला तरी दिलेलं बरं. म्हणून उरलं सुरलेलं सगळं जेवण डॉक्टरांनी एका पिशवीत बांधल आणि कुणातरी भुकेलेल्याला ते द्यावं म्हणून आपल्या बिल्डिंगच्या खाली उतरले.
लिफ्टमध्ये असताना, त्यांचंच भाषण त्यांच्या कानात घुमत होतं. ” देव बीव सगळं झूठ आहे ” हे वाक्य त्यांच्या भाषणातलं सगळ्यात आवडतं वाक्य होतं. डॉक्टर कामेरकर हे पक्के नास्तिक, देव अशी कुठलीही गोष्ट, व्यक्ती, शक्ती जगात नाही ह्यावर ठाम. ‘ जगात एकच सत्य. ‘मेडिकल सायन्स’… बाकी सब झूठ है ‘
डॉक्टर स्वतःच्याच विचारात बिल्डिंगच्या खाली आले. जरा इकडे-तिकडे बघितल्यावर रस्त्यात थोड्याच अंतरावर कुणीतरी बसलेलं दिसलं. ते त्या दिशेने चालू लागले. जवळ आले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की एक मध्यम वयाची बाई, आपल्या एका १०-१२ वर्षांच्या मुलाला कवटाळून बसली आहे. ते पोर त्याच्या आईच्या कुशीत पडून होतं. ती बाई देखील रोगट आणि कित्येक दिवसांची उपाशी वाटत होती. डॉक्टरांनी ती जेवणाची पिशवी, त्या बाईच्या हातात टेकवली आणि तिथून निघणार, इतक्यात ती बाई तिच्या मुलाला म्हणाली “बघ बाळा. तुला सांगितलं होतं ना. आज आपल्याला जेवायला मिळेल. देवावर विश्वास ठेव. हे बघ. देव-बाप्पाने आपल्यासाठी जेवण धाडलय”. हे ऐकल्यावर डॉक्टरांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. ते त्या बाईवर कडाडले, “ओह शट-अप. देव वगैरे सगळं खोट आहे. हे जेवण तुझ्यासाठी मी घेऊन आलोय. देव नाही. हे जेवण मी फेकूनही देऊ शकलो असतो. पण मी ते खाली उतरून घेऊन आलोय. काय देव देव लावलयस. नॉन – सेन्स. “
“साहेब. ! हे जेवण तुम्ही माझ्यासाठी आणलत ह्यासाठी मी तुमची आभारी आहे. पण साहेब. देव हा माणसातच असतो ना ? आपणच त्याला उगीच चार हात आणि मुकुट चढवून त्याला फोटोत बसवतो. माझ्यासाठी तर प्रत्येक चांगलं कर्म करणारा माणूस, हा देवच आहे. आपण त्याला फक्त चुकीच्या ठिकाणी आणि चुकीच्या पद्धतीने शोधायला जातो एवढंच. माझ्यासाठी तुम्ही ‘देव’ च आहात साहेब. आज माझ्या लेकराच तुम्ही पोट भरलंत. तुमचं सगळं चांगलं होईल. हा एका आईचा आशिर्वाद आहे तुम्हाला. “
डॉक्टर कामेरकर त्या बाईचं बोलणं ऐकून सुन्न झाले. एक रोगट भुकेलेली बाई त्यांना केवढं मोठं तत्वज्ञान शिकवून गेली होती आणि ते ह्याच विचारात दंग झाले की ही गोष्ट आपल्या कधीच डोक्यात कशी काय आली नाही ? चांगली कर्म करणारा प्रत्येक माणूस हा देवच असतो. चांगल्या कर्मातच परमेश्वर आहे. चांगल्या माणसात देव आहे. प्रत्येक ‘सतकृत्यात’ देव आहे हे आपल्या कधीच का लक्षात आलं नाही ? आपण ‘देवावर विश्वास’ ठेवा म्हणतो म्हणजे नक्की काय ? तर आपल्याला चांगली माणसं भेटतील, चांगली परिस्थिती निर्माण होईल ह्यावरच तो विश्वास असतो. डॉक्टरांनी एकदाच त्या बाईकडे वळून बघितलं. आपल्या भुकेल्या लेकराला ती माऊली भरवत होती. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून डॉक्टरांच्या डोळ्यांत पाणी आलं होतं. एक कणखर, डॉक्टर त्या दोन अश्रूत त्याचा इगो विरघळला होता. डोळे मिटून, ओघळत्या अश्रूंनी, डॉक्टरांचे हात नकळत जोडले गेले होते…
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : सुश्री माधुरी परांजपे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
परवा श्रीकृष्ण मालिका पाहत असतानाचा एक प्रसंग आठवला. कंसाच्या आमंत्रणावरून श्रीकृष्ण मथुरा नगरीत येतो. मथुरेत फेरफटका करीत असताना, श्रीकृष्ण आणि बलराम यांच्या दृष्टीस एक कुबड असलेली आणि त्यामुळे अत्यंत वाकून चाललेली स्त्री दृष्टीस पडते. ती कंसासाठी तयार केलेला एक सुगंधी लेप घेऊन जात असते. श्रीकृष्ण तिला थांबवून म्हणतो, ‘ हे सुंदरी, तुझ्याजवळ सुगंधी अशी कोणती वस्तू आहे आणि तू ती घेऊन कुठे जात आहेस ? ‘ तेव्हा ती म्हणते, ‘ मी कुब्जा आहे. मी कुरूप असल्यामुळे सगळे लोक मला कुब्जा म्हणतात. एक वेळ मला कुब्जा म्हटले असतेस, तर चालले असते. पण तू मला सुंदरी म्हणून माझा उपहास केला आहेस. त्यामुळे मी व्यथित झाले आहे. ” त्यावेळेस श्रीकुष्ण तिला जे सांगतो, ते मला खूप आवडले. तो म्हणतो, ‘ कुरूपता ही शरीराची असू शकते. पण तुझ्याजवळ मनाचे सौंदर्य आहे. आत्म्याचे सौंदर्य आहे. म्हणूनच मी तुला सुंदरी असे म्हटले. ‘
आपण सर्वसामान्य माणसे. वरवरचे सौंदर्य पाहण्याची सवय आपल्याला लागलेली असते. पण वरवर दिसणाऱ्या सौंदर्यापलीकडे किंवा कुरुपतेपलीकडे सुद्धा सौंदर्य असू शकते, याचा अंदाज आपल्याला येत नाही. कधी कधी मला असे वाटते की सौंदर्य आणि कुरूपता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्या सापेक्ष गोष्टी आहेत. असं म्हणतात की वस्तूत, व्यक्तीत सौंदर्य नसते. सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या नजरेत असते. जी गोष्ट एखाद्या व्यक्तीला सुंदर वाटेल, तीच गोष्ट दुसऱ्याला तितकी आकर्षक वाटणार नाही. एखाद्या व्यक्तीला अगदी साधारण वाटणाऱ्या गोष्टीतही सौंदर्याचा साक्षात्कार होतो. गवतफुलासारखी सामान्य गोष्ट. पण एखाद्या कवीला त्यातही सौंदर्य दिसते आणि तो सहज म्हणून जातो
रंगरंगुल्या, सानसानुल्या गवतफुला रे गवतफुला
असा कसा रे सांग लागला, सांग तुझा रे तुझा लळा.
कुरुपतेतूनही सौंदर्य जन्म घेते. काट्यांवर गुलाब फुलतात. चिखलात कमळ उगवते. ओबडधोबड अशा दगडातून सुंदर मूर्ती तयार होते. सुंदर घरांची निर्मिती होते. आंतरिक ओढ कशाची आहे ते महत्वाचे. कमळाला आतूनच फुलण्याची ओढ असते. काट्यांवर असला तरी खेद न मानता गुलाबाला फुलायचे असते. आणि ज्याला फुलायचे असते, आपले सौंदर्य जगापुढे आणायचे असते, त्याला कोणी रोखू शकत नाही. कारण ती तुमची आंतरिक ओढ असते. मग परिस्थिती कशीही असो. चिखल असो वा काटे. चिखलात फुलणारे कमळ , काट्यांवर फुलणारा गुलाब जणू आपल्याला संदेश देतात, की बघ, मी कसा प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा पूर्णांशाने फ़ुललो आहे. माझे सौंदर्य जराही कमी होऊ दिले नाही. ओबडधोबड दगडातून सुंदर मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारात सुद्धा अंतरात सौंदर्याची ओढ असते. म्हणूनच अशी सुंदर कलाकृती जन्म घेते.
फुलपाखरांचा जन्म कसा होतो माहितीये ? कुरूप अशा दिसणाऱ्या अळ्यांमधून फुलपाखरे जन्म घेतात. इतक्या कुरूप अळ्यांमधून इतकी सुंदर मन मोहून टाकणारी फुलपाखरे जन्माची हा निसर्गाचा एक चमत्कारच नाही का ?
मग त्यांना जन्म देणाऱ्या अळ्यांना कुरूप तरी कसे म्हणावे ? आकाशात दिसणारे पांढरे मेघ छान दिसतात. पण त्यांचा काहीच उपयोग नसतो. काळे ढग कदाचित दिसायला सुंदर नसतील, पण आपल्या जलवर्षावाने ते अवघ्या सृष्टीला नवसंजीवनी देतात, म्हणून त्यांचे बाह्य रूप न विचारात घेता, आंतरिक सौंदर्य विचारात घ्यायला हवे. जे सौंदर्य इतरांना आनंद देते, इतरांच्या उपयोगी पडते, ते खरे सौंदर्य. इतरांसाठी जे स्वतःचं सर्वस्व झोकून देऊन काम करतात, त्यांच्या कार्याचा कीर्तिसुंगंध आपोआपच पसरतो. नुसते सुंदर दिसण्यापेक्षा सुंदर असणे महत्वाचे आहे. ही सुंदरता विचारांची आहे. कृतीची आहे.
आपल्या देवादिकांचे फोटो पाहिले तर त्यांच्या पाठीमागे एक तेजोवलय आपल्याला दिसते. त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे तेज, एक प्रकारची आभा दिसते. ते जे सौंदर्य आहे ते सत्याचे प्रतीक आहे. तेच शिव आहे आणि तेच सुंदर आहे. इंग्रजी कवी किट्स म्हणतो, ‘ Truth is beauty and beauty is truth . ‘ त्याचा अर्थ हाच आहे. आणि त्याचे आणखी एक वाक्य प्रसिद्ध आहे ‘ A thing of beauty is joy forever .’ जी गोष्ट सुंदर असते, ती नेहमीच आनंद देते. कृत्रिम सौंदर्य फार काळ आनंद देऊ शकत नाही. सौंदर्य प्रसाधने, पोशाख इ च्या साहाय्याने आपण आपले सौंदर्य खुलवण्याचा प्रयत्न करतो. पण जी गोष्ट मुळचीच सुंदर असते, तिला दिखाव्याची गरज असत नाही. चेहऱ्यावरचे निर्मळ आणि नैसर्गिक हास्य, आपले काम करताना भाळावर येणारे घामाचे मोती या गोष्टी सुंदरच दिसतात. आपले आरोग्य चांगले असेल, विचार चांगले असतील आणि मन प्रसन्न असेल, तर सौंदर्य तुमच्या व्यक्तिमत्त्वातून आपोआपच प्रकट होईल. त्यासाठी मेकअप किंवा दिखाव्याची गरज भासणार नाही.
‘एका तळ्यात होती बदके पिले सुरेख …’ हे गाणं आपल्या सगळ्यांना माहिती असेल. त्या तळ्यात बदकांसमवेत एक राजहंस वाढत असतो. त्याला आपल्या सौंदर्याची जाणीव नसते. बदकांची पिले तो वेगळा असल्याने त्याला कुरूप समजतात. म्हणून तोही दुःखी असतो. पण एके दिवशी त्याला उमजते की आपण बदक नसून राजहंस आहोत, तेव्हा त्याचे भय, वेड सगळे पळून जाते. कारण त्याने त्याच्यातील ‘ स्व ‘ ला ओळखले असते. असाच आपल्या प्रत्येकामध्ये सुद्धा राजहंस दडलेला असतो. फक्त आपल्याला त्याला ओळखता आले पाहिजे, जागे करता आले पाहिजे.
लेखक – श्री विश्वास देशपांडे,
चाळीसगाव
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
नांवः डॉ. शैलजा शंकर करोडे (साहित्य भूषण), दलितमित्र, कामगार भूषण, गुणवंत कामगार — महाराष्ट्र शासन
शिक्षणः एम.ए. (अर्थशास्र)
व्यवसायः पंजाब नॅशनल बँकेतून Dy Manager पदी सेवानिवृत्त
प्रकाशित पुस्तकेः कथासंग्रहः आठ, कवितासंग्रहः तीन, चारोळी संग्रह :दोन, कृपाप्रसादः भक्तिगीत संग्रह, कादंबरीः चार, संदर्भग्रंथः खान्देशची लोकसंस्कृती व लोकधारा (उत्तर महाराष्र्ट विद्यापीठ जळगांवने लोकसाहित्य एम.ए. भाग 1 साठी संदर्भ ग्रंथ म्हणून लावला आहे), काॅलम लेखनः तरुण भारत, दै. गांवकरी
कामगार साहित्य संमेलन औरंगाबाद, अमरावती, नांदेड, नाशिक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डोंबिवली, सत्य शोधकीय साहित्य संमेलन, जळगाव, परीवर्तन साहित्य संमेलन जळगाव, फुले आंबेडकर साहित्य संमेलन, भुसावळ, समरसता साहित्य संमेलन, जळगाव, बोली भाषा साहित्य संमेलन, भुसावळ, अस्मितादर्श साहित्य संमेलन, जळगाव, औरंगाबाद, मुस्लिम मराठी साहित्य संमेलन, पनवेल, जळगाव, म. युवा साहित्य संमेलन, जालना, ओबीसी साहित्य संमेलन, जळगाव, साहित्य कला मंच कुडूस भिवंडी—साहित्य संमेलन, जळगाव जिल्हास्तरीय साहित्य संमेलन, अशा अनेक ठिकाणी निमंत्रित कवी, कवी संमेलनाध्यक्ष, कथासत्र अध्यक्ष, संमेलनाध्यक्ष. तसेच Online संमेलनांचे अध्यक्ष पद भूषविले आहे.
सन्मानप्राप्ती
1) महाराष्र्ट शासनाकडून विशेष कार्यकारी अधिकारीपदी नेमणूक
2) मराठी काव्यकोषातील महान ग्रंथ poetry mile stone या ग्रंथात “सामना” कवितेचा समावेश
3) महाराष्र्ट हिन्दी साहित्य अकादमीतर्फे “अभंग——महाराष्ट्र के हिन्दी कवी प्रातिनिधीक रचनाये” या ग्रंथात दोन कविता समाविष्ट
4) विश्व हिन्दी संमेलनसे संलग्न संस्था, महाराष्ट्र हिन्दी सेवी संस्थान द्वारा प्रकाशित “महाराष्ट्र के जिवंत हिंदी कवियोंकी रचनाये” या ग्रंथात ५ कवितांचा समावेश
5) ठाणे येथे आयोजित पोएट्री मॅरेथान या सलग 85 तास चाललेल्या व गिनीज रेकाॅर्ड तयार करणार्या कवी संमेलनात कविता सादर
6) आम्ही लेखिका गृप (ठाणे, मुंबई, नवी मुंबई) यांचेद्वारे आयोजित संमेलनात जेष्ठ साहित्यिक म्हणून सन्मानपत्र देऊन गौरव सहभाग इत्यादी.
पुरस्कार प्राप्ती
१) दलितमित्र, गुणवंत कामगार, कामगार भूषण हे महाराष्र्ट शासनाचे पुरस्कार प्राप्त
२) दै.लोकमतचा “सखी” पुरस्कार, दै.सकाळचा “तेजःस्विनी” पुरस्कार, अखिल भारतीय भावसार क्षत्रिय महासभेचा “जीवन गौरव” पुरस्कार
अन्य पुरस्कार – ग्लोबल एकाँनामिक्स कौंन्सिल नवी दिल्ली चा “राष्ट्रीय रतन” पुरस्कार, कथासंग्रह “अग्निपरीक्षा” यास पंजाब नॅशनल बँकेचे राष्ट्रिय स्तरावरील पुरस्कार, एल्गार साहित्य रत्न पुरस्कार, भारतीय साहित्य अकादमीचा सावित्रीबाई फुले पुरस्कार, युवा विकास फाऊंडेशनचा बहीणाबाई काव्य पुरस्कार, युवा विकास फाऊंडेशनचा प्रा. राजा महाजन स्मृती पुरस्कार, अखिल भारतीय मराठी परीषद पर्यावरण संमेलन पुणे यांचा “जीवन गौरव पुरस्कार अकोला “साहित्यरत्न” पुरस्कार, “साहित्य भूषण” पुरस्कार, पंजाब नॅशनल बँकेचे कथा, कविता, निबंध लेखन “पीएनबी दर्पण व पीएनबी स्टाफ जर्नल मधील उत्कृष्ठ लेखन, तसेच हिन्दीचे सर्वश्रेष्ठ योगदान असे विविध 50 पुरस्कार प्राप्त, स्टेट बँक, महाराष्र्ट बँक, सेंट्रल बँक, विजया बँक, कॅनरा बँक यांचेही पुरस्कार प्राप्त
डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कर्ष समाजसेवा पुरस्कार ——अनोखा विश्वास इंदौर म प्र., कामगार रत्न पुरस्कार मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई, नेरूल हिरकणी पुरस्कार, जलगाव हिरकणी पुरस्कार, “कर्तव्य योगिनी सन्मान” प्राप्त, आम्ही लेखिका, ठाणे जिल्हा द्वारा “नवदुर्गा सन्मान” प्राप्त, कोरोना योध्दा सन्मान, कवयित्री बहिणाबाई विशेष सन्मान, साहित्यभूषण पुरस्कार, नारी गौरव पुरस्कार
मनमंजुषेतून
☆ प्रेरणा… ☆ डॉ. शैलजा करोडे☆
चला सायंकाळचा स्वयंपाक आटोपला एकदाचा म्हणत मी थोडंस हुश्श केलं. मसालेदार खिचडी व स्वादिष्ट कढीचा छोटासा मेनू होता पण तेवढ्यानंही दमछाक होते आजकाल. “अगं वयपरत्वे होतं असं” मैत्रिणींचं अनुमान. “घाबरुन जाऊ नकोस, पण काळजी घे स्वतःची”.
मला हे सगळं आठवलं आणि चेहर्यावर स्मित पसरलं. चला आता थोडासा टीं व्ही लावून सह्याद्री वाहिनीवरील बातम्या पाहू असं म्हणताच, तेवढ्यात मोबाईलची रिंग वाजली. मी काॅल रिसिव्ह केला. “नमस्कार मॅडम, मी नितिन महाशब्दे बोलतोय.”
“बोला सर, तुमचा नंबर सेव्ह आहे माझेकडे.”
“मॅडम आपण जाणतातच, आपल्या अक्षर मंच प्रतिष्ठानद्वारे ‘अखंड वाचन यज्ञ’ उपक्रम आपण राबवित आहोत. उद्या, म्हणजे 13 ऑक्टोबरला गावदेवी विद्या मंदिर, डोंबिवली येथे या वाचन यज्ञाचा आपण प्रारंभ करीत आहोत. शाळेतील विद्यार्थी सलग दोन तास अखंड वाचन करतील आणि ते ही प्रत्येक वर्गात. त्यानंतर बक्षीस वितरण आपल्या हस्ते होईल. संस्थेने पन्नास प्रमाणपत्र व पुस्तकं पाठवली आहेत बक्षीस म्हणून. आपल्यासारख्या जेष्ठ लेखिकेकडून या अखंड वाचन यज्ञाचा प्रारभ व्हावा व बक्षीस वितरण व्हावं ही अक्षर मंचसाठी अभिमानाची गोष्ट आहे. आपण जाणार ना मॅडम.”
“होय नितिनजी, जाईन मी. मला तुम्ही शाळेचा पूर्ण पत्ता पाठवा.”
“मॅडम, मी शाळेच्या मुख्याध्यापकांचा फोन नंबर पाठवतो, आपण त्यांना फोन करा. सर सविस्तर सगळं सांगतील. बरं मॅडम, रजा घेतो आपली. पुढचेही अनेक नियोजन आहेत. धावपळ होतेय खूप.”
“ओ के सर, धावपळ करत असतांना स्वतःची ही काळजी घ्या.”
“ओ. के. मॅडम, शुभरात्री.” नितिन महाशब्देंनी फोन ठेवला.
चला अजून एक नवीन काम करायचंय. वाचन प्रेरणेवर उद्या बोलायचंय.. तयारी करावी लागेल थोडीफार.
मी शाळेत बरोबर 12.15 ला पोहोचले. शाळा 12.30 ला सुरू होते. शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांचा चिवचिवाट सुरू होता. सोबत पालक आलेले होते आपल्या पाल्याला सोडायला. अशा या ज्ञानमंदिरात बालकांच्या किलबिलाटात मन एकदम प्रसन्न झाले. संस्थेचे जेष्ठ शिक्षक पाटील सरांनी माझे स्वागत केले व मला एका वर्गात छानपैकी पंख्याखाली बसवले.
शाळेची घंटा झाली. राष्ट्रगीत, राज्यगीत व प्रतिज्ञा संपन्न झाली. एव्हाना मुख्याध्यापक सरही आले व आम्ही त्यांच्या रूममध्ये बसलो.
शाळा छोटीशी होती. पूर्व प्राथमिक व प्राथमिक इयत्ता 7 वी पर्यंत. पण विद्यार्थी संख्या चांगली होती 418. इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी मराठी झाकोळून जात असतांना या शाळेने मराठी बाणा जपला होता. शिक्षकवृंद चांगला व मेहनती होता.
थोड्याच वेळात ‘अखंड वाचन यज्ञा’ला सुरूवात झाली. “मॅडम चला, जाऊया प्रत्येक वर्गावर, विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल.”
मी वर्गावर जाताच सगळे विद्यार्थी उठून उभे राहिले व गुड माॅर्निंग टिचर, आपलं स्वागत आहे,” एका तालासुरात सगळ्यांनी म्हणत टाळ्यांचा कडकडाट केला. फळ्यावर आजचा उपक्रम व प्रमुख पाहुणे म्हणून माझे नाव लिहिलेले होते. मी सगळ्याच वर्गात जाऊन विद्यार्थ्यांचे वाचन ऐकले, वीर सावरकर, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, डाॅ. ए पी जे अब्दुल कलाम… छान वाचन सुरू होते.
शाळेच्या प्रांगणातच बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार होता. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व डाॅ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या फोटोंचे पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. संस्थेचे प्रास्ताविक व विविध क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घेतला जात होता आणि मी भूतकाळात शिरले होते, माझ्या शालेय जीवनात रमले होते.
“बरं का मीनाक्षी, उद्या जागतिक पुस्तक दिन आहे. आपल्या शाळेत कार्यक्रम आहे आणि प्रसिद्ध लेखक
उमाकांत नार्वेकर येणार आहेत. तुला उद्या भाषण करायचंय.;चांगली तयारी करुन ये. तशी तू प्रत्येकवेळी छानच भाषण करतेस. उद्याही करशील.”
सर्व शिक्षकवृंद व प्रमुख पाहुण्यांसमोर मी वाचन आणि पुस्तकाचे महत्व विषद करीत होते
“पुस्तकानेच होतो माणूस ज्ञानी,
ज्ञानानेच मिळतसे जीवनाला गती….”
” वाह, सुंदर, तू तर कविताही छान करतेस ” प्रमुख पाहुणे उस्फूर्तपणे बोलले. मला मिळालेली ही कौतुकाची पावती पुढे माझ्या लेखन यज्ञाला प्रेरक ठरली व कविता, कथा, कादंबरी, ललित, नाट्य, निबंध विविध अंगांनी फुलत गेली.
“आता आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मीनाक्षी परांजपे यांनी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे अशी मी त्यांना विनंती करतो”.
मी तंद्रीतून बाहेर आले. माईक हाती घेतला.
“आदरणीय अध्यक्ष, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, कर्मचारीवृंद आणि माझ्या देशाचे भविष्य घडविणारे आधारस्तंभ असणार्या विद्यार्थी मित्रांनो. आज तुम्ही अखंड वाचन यज्ञात सहभागी झालात. विविध ज्ञानोपासकांच्या पुस्तकांचं अभिवाचन केलंत. फार सुंदर. पण विद्यार्थी मित्रांनो, वाचनासाठी शिक्षणाचा गंध लागतो. आणि पूर्वीच्या काळी जनसामान्य व स्त्री वर्गाला शिक्षणाचा अधिकारच नव्हता. शिक्षण नसल्याने जनसामान्यांचे जीवन दुःखी होते. गुलामगिरीत खितपत पडल्यासारखे होते. ही बाब महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या लक्षात आली.
विद्येविना मती गेली
मतीविना निती गेली
नीतीविना गती गेली
गतीविना वित्त गेले
इतके सारे अनर्थ
एका अविद्येने केले
…म्हणून ज्योतिबा व सावित्रीबाईंनी शिक्षणाचा पाया रोवला. विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीमाई होत्या म्हणूनच आज मी तुमच्यासमोर भाषण करू शकतेय. त्यांनी दिलेला शिक्षणाचा वसा वसतेय.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेच आहे ‘वाचाल तर वाचाल’. स्वतः बाबासाहेब खूप वाचन करीत. परदेशातून भारतात येतांना त्यांनी 37400 पुस्तकांचं भांडारच जणू बोटीने भारतासाठी रवाना केले. पण बोट दुर्घटनेत ती सगळी पुस्तके गेली. यावरून लक्षात येईल की बाबासाहेबांना वाचनाचा केवढा व्यासंग होता. या व्यासंगातूनच जगातील सगळ्या राज्यघटनांचा अभ्यास करुन भारतासाठी समाजातील सर्व घटकांसाठी स्वातंत्र्य, समता व बंधुत्वावर आधारित परिपूर्ण संविधान त्यांनी लिहिले. बाबासाहेब म्हणायचे एक मंदिर बांधून 100 भिकारी निर्माण करण्यापेक्षा एक ग्रंथालय बांधा व 1000 विचारवंत तयार करा.
होय मित्रांनो, वाचनामध्ये खूप शक्ती असते. कारण पुस्तक वाचतांना पुस्तक व आपल्यात एक नातं निर्माण होतं. आपण पुस्तकाशी तादात्म्य पावतो. ते वाचन, ते विचार आपल्या काळजात घर करतात आणि यातूनच प्रेरणा मिळून आपल्या विचाराला, भावनेला गती मिळते, लेखनास आपणही प्रवृत्त होतो.
माझ्या शालेय जीवनात चांगले गुरूजन मला लाभले. कविताही खूप समजावून सांगायचे, ‘बेलाग दुर्ग जंजिरा’, ‘वसईचा किल्ला असला’, ‘ क्षणोक्षणी पडे, उठे परि बळे, उडे बापडी ‘, ‘ पोर खाटेवर मत्यृच्याच दारा ‘, ‘ बा नीज गडे, नीज गडे लडिवाळा ‘ या कविता वाचतांना, अभ्यासतांना तर माझ्या डोळ्यातून अश्रूधारा वहात असत. कवितेशी जोडली गेलेली मनाची ही तार मलाही कविता करण्यास सहाय्यक ठरली.
विद्यार्थी मित्रांनो, परवा भारताचे दिवंगत राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करतो.
डॉ. कलाम यांच्या मते, एक चांगले पुस्तक शंभर मित्रांप्रमाणे असते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात अनेक साहित्य पुस्तके वाचावी, आणि आपल्या जीवनाचा आणि समाजाचा उद्धार करावा.
जसे शरीराला अन्नाची गरज असते तसे आपल्या मेंदूला वाचनाची गरज असते. कारण त्यातूनच नव विचारांची ऊर्जा मिळते. विद्यार्थी मित्रांनो वाचनाचे पाच सहा फायदे आपणास सांगते.
वाचनामुळे मनाचा व्यायाम होतो.
वाचनामुळे विचार कौशल्य आणि विश्लेषणात्मक क्षमता सुधारते.
वाचन भाषेवर प्रभुत्व व प्रेरणेचा उत्तम स्रोत आहे.
वाचन मन आणि शरीरास ऊर्जा देते.
वाचनामुळे लक्ष आणि एकाग्रता सुधारते.
पण विद्यार्थी मित्रांनो आजच्या टी. व्ही. मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी वाचनसंस्कृती लयाला चालली आहे. आजच्या धावपळीच्या, स्पर्धेच्या व संघर्षाच्या युगात वाचनासाठी कोणाजवळ वेळच नाही. आजची शिक्षण पद्धती व गळेकापू स्पर्धा यामुळे विद्यार्थी वर्गाजवळही अवांतर वाचनाला वेळ नाही. तो विद्यार्थ्यांनी काढावा व आयुष्य सुख समृद्धीने परिपूर्ण व्हावे म्हणून हा आजचा ‘अखंड वाचन यज्ञ’ प्रपंच.
आपण यात सहभागी झालात, मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलंत, आपल्याशी मला हितगूज करता आलं, भरुन पावले मी. आपल्या व आयोजकांच्या ऋणात राहून इथेच थांबते.
धन्यवाद.”
एकेकाळी प्रेरणेतून घडत जाणारी मी आज एक प्रेरक ठरले होते. एक वर्तुळ पूर्ण झाले होते .