मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भक्तीचे कर्ज — एक बोध कथा… ☆ संग्राहक – सुश्री कालिंदी नवाथे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ भक्तीचे कर्ज — एक बोध कथा ☆ संग्राहक – सुश्री कालिंदी नवाथे ☆

सावता माळी हा शेती करून पोट भरणारा एक भक्त होता. त्याचा पांडुरंगावर व पांडुरंगाचा त्याच्यावर खूपच लोभ होता. सोलापूर जिल्ह्यातील अरणगावी तो रहात असे. सावता माळी अभंग रचनाही करीत असे. काशिबा गुरव हे त्यांचे अभंग लिहून ठेवत असत. आज फक्त 37 अभंगच ज्ञात आहेत आपल्याला त्यांचे. पण तेवढेही पुरेसे आहेत भक्ती शिकायला. त्या अभंगांचं सार हेच की ‘प्रचंड उत्कट चिंतन केलं की भगवंत भेटतो.  

तर हा सावता माळी त्याच्या शेतात गव्हाचं पिक घेत असे. एके वर्षी भरपूर पिक आलं होतं. त्याच सुमारास पंढरपूरकडे जाणारी वारक-यांची दिंडी त्याच्या शेतावरून जात असताना त्याने थांबवुन त्यांना भोजन घातलं. सगळे भोजनाने खूश तर  झाले. पण मनोमनी दु:खी होते कारण त्या वारक-यांच्या गावी दुष्काळाने पिकं नष्ट झालेली होती. तेव्हा त्यांनी सावता माळ्याला विनंती केली की आम्हाला थोडं-थोडं धान्य द्या ना घरी न्यायला.   सावता माळ्याने बायकोला विचारलं तेव्हा बायको म्हणाली की यांना धान्य वाटून सगळंच संपेल धान्य. मग आपण वर्षभर काय खायचं. तेव्हा तो तिला जे म्हणाला त्याने तिच्या डोळ्यात पाणीच आले. तो म्हणाला,”हे बघ,जर निर्जीव जमिनीत एक दाणा पेरला तर पांडुरंग आपल्याला शेकडो दाणे देतो, तर त्याच्या जिवंत भक्तांच्या पोटात आपण दाणे पेरले तर तो आपल्याला उपाशी ठेवेल का ?”

सर्वांना आनंदाने धान्य वाटणा-या या दांपत्याला पहायला व हसायला सारा गाव लोटला होता. लोकं  नको-नको ते बोलत होते. कुटाळक्या,चेष्टा,टोमणेगिरी.पण हे आपले शांत होते.  सारं धान्य वाटून संपलं. दुस-या दिवशी पुन्हा शेत नांगरायला सुरवात केली सावत्याने. पण त्याच्याकडे पेरणी करायलाही धान्य शिल्लक नव्हते. गावात उसनं मागायला  गेला तरी कुणी दिलं नाही. एकाने मस्करीने त्याला भरपूर कडू भोपळ्याच्या बिया दिल्या पेरायला व म्हणाला की हे कडू भोपळे सकाळ संध्याकाळ भाजी बनवुन वर्षभर रोज खायला तुला पुरतील. सावताने त्या बिया घेतल्या व खरोखर पेरणीला सुरवात केली. सारा गाव हसत होता कारण कडू भोपळा तर गुरं पण खात नाहीत ! त्यावर्षी सावताच्या शेतात एक माणूस आत बसेल एवढे मोठे मोठे कडु भोपळे लागले वेलींना. साऱ्यांना आश्चर्य वाटले की असं कधी होतं का ? पण मग त्यावरूनही ते सावताची मस्करी करीत असत रोजच.  कडु भोपळ्यांची राखण करण्याची जरूरच नव्हती. कारण कोण चोरणार ते. पण तरीही रोज सावता शेतावर जाऊन राखण करत भजन करीत असे पांडुरंगाचं. थोडी कुठे मोल मजुरी करून दुस-यांच्या शेतावर,मग घरी येत असे. होता-होता लोक विचारू लागले की तू हे भोपळे एवढे कुठे साठवणार ? एके दिवशी भाजी करायला सावताने एक भोपळा घरी आणला. सावताच्या बायकोने भोपळा चिरला आणि काय आश्चर्य, संपूर्ण भोपळा तयार गव्हाच्या टपो-या दाण्यांनी भरलेला होता गच्च व ते सगळे गहू सांडले सारवलेल्या जमिनीवर. सावताचे डोळे पाणावले.”किती रे देवा तुला काळजी माझी.” 

मग दुस-या दिवशी पण भोपळ्यातून गहू निघाले. मग मात्र ही बातमी सगळ्या गावात वाऱ्यासारखी पसरली. सगळे जण हा चमत्कार बघायला येऊ लागले.कुणी भोपळा चोरून नेऊन चिरला तर त्यात गहू निघत नसे. ही बातमी त्यावेळेच्या मुसलमान राजाच्या कानावर गेली व तो स्वत: आला व सावताला भोपळा चिरून दाखवायला सांगितला. भोपळ्यातले गहू बघून तो मुसलमान राजाही गहिवरला व नमस्कार करून म्हणाला,”धन्य तुमची भक्ती!”. यानंतर सावता अधिकच विरक्त झाला. आपलं सर्वस्व देवाला दिलं की देवावरच भक्तीचं कर्ज चढतं. भक्तांचा चरितार्थ चालवण्यासाठी  देवांचाही देव करीतो भक्तांची चाकरी.  आपण सगळे कडू भोपळेच असतो. कुणा सावताचं भजन वा ज्ञान कानावर पडलं की आपल्या हृदयात भक्तीचे गव्हाचे दाणे तयार होत असतात. हा सगळा ना नामाचा महिमा आहे. तुमच्या मना भावली पंढरी, पांडुरंग पांडुरंग विठ्ठल विठ्ठल जय हरी…!

परोपकाराचा एक दाणा पेरला तर त्याची कितीतरी कणसे परतफेड म्हणून परत मिळतात.

परमार्थ हा संसारात राहूनही करता येतो त्यासाठी काही सोडावे लागत नाही. फक्त तो करताना तो भगवंताचा आहे,जे होते ते त्याच्या इच्छेनुसार होते हे ध्यानात ठेवावे.

प्रत्येक काम हे त्याचेच असून ते त्याच्या नामातच करावे. मग आपल्या वाईट संचिताचे,मागील पापाचे कडू भोपळे सुध्दा सात्त्विक पौष्टिक गव्हाने भरुन जातील.

बोध :  देव माझे चांगलेच करेल हा ठाम विश्वास मनी असू  द्यावा !

लेखक : अज्ञात 

संग्राहिका : सुश्री कालिंदी नवाथे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बुद्धांनी देवत्व का नाकारले ?… ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

डॉ गोपालकृष्ण गावडे

🌳 विविधा 🌳

☆ बुद्धांनी देवत्व  का नाकारले ?… ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

बुद्धांनी देवत्व का नाकारले ?

सामान्य लोक महापुरूषाच्या अंगात दैवी शक्ती आहे असे मानून त्यांच्या निस्पृहतेच्या कठिण मार्गावर चालण्याच्या खडतर कामापासून स्वतःला सोईस्कर रित्या दूर करून टाकतात. म्हणूनच बुद्धांनी देवत्वच नाकरले. बुद्धांनी अनुयायांना त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याशिवाय पर्याय शिल्लक ठेवला नाही. “बुद्ध देव होते. त्यांना जे जमले ते आपल्याला कसे जमेल?” असे बोलायची सोय ठेवली नाही.

आपल्या प्रत्येक समस्येला आपली हाव आणि आळस जबाबदार असताना ते खापर दुसऱ्या कुणाच्या तरी माथी मारून त्यांचा तिरस्कार करणे ही बहुतेक सामान्य माणसांची सहज प्रवृत्ती असते. पण असे का होते?

या जगात काहीही परिपूर्णपणे चांगले नाही. शोधले तर रामात-बुद्धातही दुर्गुण सापडतात. तसेच काही महाभागांनी रावणात आणि म्हैशासुरातही सद्गुण शोधून काढलेले आहेतच. आपण तर सामान्य लोक आहोत. आपण स्वतः परिपूर्णपणे चांगले नसताना जगाकडून परिपूर्णतेची अपेक्षा ठेवणेच मुळात चुकीचे आहे. तरी पण आपल्या वाट्याला आलेली प्रत्येक गोष्ट परिपूर्ण असावी अशी प्रत्येकाचीच अपेक्षा असते. अपेक्षित गोष्टी जागेवर उपस्थित असतील तर त्याचे कुणाला फारसे कौतुक वाटत नाही. उदा. जेवणात योग्य प्रमाणात मीठ पडले तर त्याचे कुणी कौतुक करत नाही. तसाच नव-याचा निर्वसणी असणे हा वाखाणण्याजोगा गुणही ब-याच वेळा दुर्लक्षिलाच जातो.

आपल्या वाट्याला आलेल्या गोष्टींमध्ये काही अपरिपुर्णता आली तर तो मात्र अनपेक्षित धक्का असतो. उदा.  नेहमी सुग्रण होणाऱ्या जेवणात मीठ कमी वा जास्त पडले. निर्व्यसनी नवरा झिंगत घरी आला. असे नकारात्मक प्रसंग अनपेक्षितरित्या धक्कादायक असल्याने मेंदूत खोलवर नोंदले जातात. अशा तणाव निर्माण करणाऱ्या नकारात्मक गोष्टी परत घडू नये म्हणून अशा गहन चिंतन चालू होते. म्हणजे आपण नकारात्मक गोष्टींचाच विचार करत बसतो. आयुष्यातील सर्व चांगल्या सकारात्मक गोष्टी  अपेक्षित असल्याने दुर्लक्षित राहतात तर प्रत्येक नकारात्मक गोष्टींवर गहन चिंतन होते. अशा प्रकारे बहुतेक व्यक्तीचे बहुतांश विचार नकारात्मक असतात.

आजुबाजूला घडणाऱ्या अनपेक्षित गोष्टी आणि अपेक्षांचा सरळ संबध आहे. जितक्या आपल्या अपेक्षा मोठ्या तितके अनपेक्षित नकारात्मक गोष्टींना आपल्याला सामोरे जावे लागते. तितके जास्त नकारात्मक विचार चिंतन चालू होते. तितके दुःख मोठे होत जाते.

जगात आपल्यासहित काहीच परिपुर्ण नाही. आपल्या वाट्याला आलेल्या व्यक्ती, वस्तू, ठिकाण, प्रसंग, संस्थां यामधील केवळ सकारात्मक गोष्टी पाहिल्या तर मन आनंदी आणि समाधानी होते. याऊलट  यातील केवळ नकारात्मक गोष्टी पाहिल्या तर मन दुःखी आणि असमाधानी होते. 

स्वतःला दुःखी करणारे आत्मघाती नकारात्मक विचार करणारे लोक आता स्वतःच्या मनात खदखदणा-या दुःखाच्या वड्याचं तेल काढायला बाहेर वांगे शोधतात. त्यातून मनात जन्माला येतो राग, तिरस्कार आणि ईर्षा. असे मन एक प्रकारे कचरापेटी होते. दुर्देवाने कचरापेटीला सर्वात जास्त त्रास कच-याचाच होत असतो. रागाचा सर्वात जास्त त्रास कुणाला होतो?  राग, तिरस्कार वा इर्षा या दुःखद भावना आपल्याच मनाला दुःखी करतात.

©  डॉ गोपालकृष्ण गावडे

सिटी फर्टिलिटी सेंटर, पाटिल हॉस्पिटल, सिंहगड रोड, पुणे 

मो 9766325050

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “जागर…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ “जागर” ☆ सौ राधिका भांडारकर 

नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने मी माझे काही विचार या लेखातून मांडण्याचा प्रयत्न करते.

।।नमो देव्यै महादेव्यै

शिवायै सततं नम:

नम: प्रकृत्यै भद्रायै

नियत: प्रणता स्मताम् ।।

अश्विन शुद्धप्रतिपदेपासून घरोघरी घटस्थापना होते. देवीचे मूर्त तेज वातावरण उजळते. मंत्रजागर आरत्या  यांचा नाद घुमतो. उदबत्त्या ,धूपार्तीचे सुगंध दरवळतात. दररोज नवनवे नैवेद्य देवीला अर्पण केले जातात.

नऊ दिवस नऊ रंगांची वस्त्रेही परिधान केली जातात. सर्वत्र उत्साह ,मांगल्य ,पावित्र्य पसरलेले असते.

लहानपणापासून आपण एक कथा  ऐकत आलो आहोत…महिषासुराची. या महिषासुराने पृथ्वी आणि पाताळात अत्याचार माजवला होता.आणि त्यास स्वर्गाचे राज्य हासील करायचे होते. सर्व देव इंद्रदेवांकडे जाऊन ,महिषासुरापासून रक्षण करण्याची प्रार्थना करतात. इंद्र आणि महिषासुरात युद्ध होते व या युद्धात इंद्रदेव पराभूत होतात. हतबल झालेले देव ब्रह्मदेवाकडे येतात, व आसुरापासून रक्षण करण्याची विनंती करतात. महिषासुराचा वध हा मनुष्यमात्राकडून होणे असंभव होते. मग ब्रह्मा, विष्णु, महेश यांच्या तेजातून एक स्त्रीशक्ती निर्माण केली जाते. ही स्त्रीशक्ती म्हणजेच आदीमाया… आदिशक्ती… दुर्गामाता.

शंकराचे त्रिशूळ, विष्णुचे चक्र, वरुणाचा शंख, यमाची गदा, तसेच कमंडलु, रुद्राक्ष, अशा दहा शस्त्रांची परिपूर्ण शक्ती…दशभुजा दुर्गा..सर्वशक्तीमान रुप. तिचे आणि महिषासुराचे घनघोर युद्ध होते, व महिषासुराचे दारुण मर्दन होते. म्हणून ही महिषासुरमर्दिनी…. सिंहारुढ ,पराक्रमी, तेज:पुंज देवी.

नवरात्रीचे महाराष्ट्रात आणखी एक विशेष म्हणजे भोंडला. भोंडला म्हटले की शालेय जीवनातले दिवस आठवतात. नवरात्रीत सगळ्या सख्या,नऊ दिवस .वेगवेगळ्या सखीकडे जमतात. पाटावर ,सोंडेत माळ धरलेल्या हत्तीचं चित्र काढायचं,अन् त्या पाटाभोवती फेर धरुन एकेक प्रचलित लोकगीतं गायची..

तर असा हा भोंडला, भुलाई, किंवा हादगा …. 

ऐलमा पैलमा गणेश देवा

माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा।।

अक्कण माती चिक्कण माती .. खळगा जो खणावा

अस्सा खळगा सुरेख बाई .. जातं ते रोवावं…

अस्स जातं सुरेख बाई .. शेल्यानं झाकावं

अस्सा शेला सुरेख बाई .. पालखीत ठेवावा

अश्शी पालखी सुरेख बाई .. माहेरी धाडावी

अस्सं माहेर सुरेख बाई .. खायाला देतं

अस्सं सासर द्वाड बाई .. कोंडून मारतं..

अस्सं आजोळ गोड बाई .. खेळाया मिळतं…

गाणी रंगत जातात. सख्या आनंदाने फुलतात. आणि मग शेवटी…. 

बाणा बाई बाणा स्वदेशी बाणा

गाणे संपले खिरापत आणा..।।

खिरापत ही गुलदस्त्यातील. ती ओळखायची.अन् नंतर चट्टामट्टा करायचा…नवरात्रीच्या या उत्सवातील,असा हा पारंपारिक खेळ…सामुहिक आनंदाचा सोहळा.

अर्थात् नवरात्र म्हणजे देवीचाच उत्सव. तिची शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा ,कूष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धीदात्री, ही निरनिराळी नऊ नावे असली तरी ती एकाच आदीशक्तीची विविध रुपे आहेत. देवीच्या कथाही अनेक आहेत. पण सामाईकपणे ही नारीशक्ती आहे. आणि तिचा अवतार,अहंकार, क्रोध, वासना, पशुप्रवृत्ती, यांचा संहार करण्यासाठीच झाला आहे…

दरवर्षी नवरात्री उत्सवात या सर्वांचं मोठ्या भक्तीभावाने पूजन, पठण होते. गरबा,दांडीयाचा गजरही या आनंदोत्सवाला सामायिक स्वरुप देतोच..

…. पण मग एका विचारापाशी मन येऊन ठेपतं…

आपले सर्वच सण हे आध्यात्मिक संदेश घेऊन येतात..अर्थपूर्ण , नैतिक संदेश.

उत्सव साजरे करताना या संदेशाचं काय होतं..?

ज्या स्त्रीशक्तीची नऊ दिवस पूजा केली जाते, दहाव्या दिवशी अनीतीचा रावण जाळला जातो ,आणि मग अकराव्या दिवसापासून पुन्हा तीच हतबलता…??

…… खरोखरच स्त्रीचा सन्मान होतो का? स्त्री सुरक्षित आहे का आज? ज्या शक्तीपीठाची ती प्रतिनिधी आहे, त्या स्त्रीकडे किंवा त्या स्त्रीबाबत विचार करण्याचा समाजाचा दृष्टीकोन  नक्की कसा आहे…?

आज तिच्या जन्माचा आनंदोत्सव होतो का? का तिला उमलण्याच्या आतच खुडलं जातं…?

ज्या पवित्र गर्भातून विश्वाची निर्मिती होते, त्या देहावर पाशवी, विकृत वासनेचे घाव का बसतात…?

विद्रोहाच्या घोषणांनी काही साध्य होते का?

समाजासाठी मखरातली देवी आणि आत्मा असलेली, चालती बोलती स्त्री..ही निराळीच असते का?

असे अनेक प्रश्न, अनेक वर्षे..  युगानुयुगे, अगदी कथांतून, पुराणातून, इतिहासातून व्यक्त झाले आहेत.

आणि आजही ते अनुत्तरीत आहेत.

स्त्रीचा विकास झाला म्हणजे नक्की काय झाले? …. ती शिकली. आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र झाली. उच्चपदे तिने भूषविली. तिच्या वागण्या बोलण्यातही फरक पडला. तिचा वेशही बदलला. ती आत्मनिर्भरही  झाली.

…. पण तिचा संघर्ष संपला का? तिचे हुंदके, तिची घुसमट, तिची होरपळ…. आहेच त्या चौकटीत.

एका मोठ्या रेषेसमोरची ती एक लहान रेषच… दुय्यमच. म्हणून डावलणं आहेच. सन्मान कुठे आहे तिचा…?

.. मग हा जागर कधी होणार?

तिच्या सामर्थ्याचं त्रिशूळ, बुद्धीचं चक्र, विचारांची गदा, सोशिकतेचं कमंडलु ,भावनांची रुद्राक्षं, तेजाचे तीर …. जेव्हा  धार लावून तळपतील, तेव्हाच या शक्तीपीठाचा उत्सव सार्थ ठरेल…

नवरात्री निमित्ताने जोगवा मागायचाच असेल तर  स्त्री जन्माच्या  पावित्र्याचा..मांगल्यांचा… शक्तीच्या आदराचाच असला पाहिजे हे मनापासून वाटते…

हे देवी ! तुझ्या दशभुजा, सर्व शस्त्रांसहित पसर आणि तुझ्या दिव्य तेजाचंच दर्शन दे…..!!!

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ श्री बालाजीची सासू… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

??

☆ श्री बालाजीची सासू… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

श्री बालाजीची सासू, मग सासरा,  नवरा, मग दीर , नणंद , आई, बाबा, भाऊ ,बहीण, मैत्रिणी, सखा , मामा, मामी, मावशी, आजी, आजोबा, पणजी, पणजोबा, खापर पणजी, खापरपणजोबा, कसले लाडू, कसल्या वड्या, कसल्या भाज्या, कसल्या उसळी ,कसले मुरंबे, कसले चिवडे, कसल्या चकल्या, कसली शेव ,कसले वेफर्स? 

हादग्याची खिरापत ओळखण्यासाठी असा शॉर्टकट आम्ही मांडत असू. पण एखादी सुगरण सांगे नाऽऽऽऽही.

मग गोड की तिखट?

तळलेले की भाजलेले?

कुठली फळं आहेत का?

बेकरीचे पदार्थ आहेत का? अशा तहाच्या वाटाघाटी सुरू व्हायच्या. चुळबुळ चुळबुळ सुरु व्हायची. पण आता उत्कंठा शिगेला पोचल्यानंतर सगळ्याजणी हार मानायच्या.

“हरलो म्हणा, हरलो म्हणा”. विजयी मुद्रेने आणि उत्फुल्ल चेहऱ्याने यजमानीणबाई  डबा घेऊन उभी असे. पण डब्याचं झाकण उघडण्यापूर्वी पुन्हा एकदा कन्फर्म करत असे.

१)लाह्याच्या पिठाचा उपमा कुणी म्हटलंय का?

२) फुटाणे कुणी म्हटलंय का?

३)गुलगुले कुणी म्हटलंय का?

४) शेंगोळी कुणी म्हटलंय का?

५) ढोकळा कुणी म्हटलंय का? 

किंवा एखादी गाणं म्हणायची.

“हरलीस काय तू बाळे?

गणगाची उसळ ही खुळे.”

मग आम्ही सगळ्या “खुळ्या” आनंदाने त्या खिरापतीला न्याय द्यायचो.

डबा उघडला जायचा. सर्वांना खिरापत मिळायची. त्यावेळेला द्रोण, वाट्या, चमचे, डिश यांचे फॅड नव्हते. प्रत्येकीच्या तळहातावर चमचाभर खिरापत घातली जायची. तेवढ्यानेही आमचे समाधान व्हायचे. सगळेच मध्यमवर्गीय. घरात एकटा मिळवता आणि सात आठ  खाणारी तोंडे. तुटपुंज्या पगारात भागवताना नाकी नऊ येत. पण तरीही हादग्याची खिरापत केली जायची च. सगळीकडे खिरापत “परवडणेबलच” असायची. श्री बालाजी ची सासू याचा अर्थ खालील प्रमाणे….. 

श्री=श्रीखंड,

बा=बासुंदी, बालुशाही

ला=लाडू, लापशी, लाह्या

जी=जिलबी

ची=चिवडा, चिरोटे

सा=साटोरी, सांजा साळीच्या लाह्या

सू=सुतरफेणी, सुधारस  सुकामेवा. वगैरे. 

त्याचप्रमाणे श्री बालाजीच्या इतर नात्यांवरून पदार्थ ओळखायचे… 

उदा. भाऊ .. भा=भातवड्या (तळलेल्या किंवा भाजलेल्या), भात, भाकरी.

अक्षरशः फोडणीचा भात ,भाकरी यांना सुद्धा खिरापतीचा मान असायचा. कुणीच कुणाला नावं ठेवत नसे. ओळखण्याचा आनंद आणि हादग्याचा प्रसाद म्हणून गट्टम करायचा.

=उंडे, उपासाचे पदार्थ…  एका केळ्याचे, रताळ्याचे, काकडीचे, छोट्या पेरूचे दहा तुकडे करून एक एक तुकडा हातावर ठेवला जायचा. खिरापत कोणतीही असो ओळखण्याच्या आनंदानेच पोट भरून जात असे. मग आमचा घोळका पुढच्या घराकडे निघायचा.

उगारला आम्ही चाळीतले सगळे मध्यमवर्गीय. घरोघरी असा हादगा साजरा करत असू. भिंतीवर एक खिळा मारून हादग्याचा कागद लावत असू. त्या रंगीत चित्रात समोरासमोर तोंड करून दोन हत्ती उभे असायचे. दोघांच्या सोंडेत माळा धरलेल्या असायच्या. त्याला सोळा फळांची माळ घातली जायची त्यात भाज्या देखील असायच्या. १६ फळं उगारसारख्या खेडेगावात मिळणं मुश्किल. बंगल्यातल्या मुलींच्या घरात फळझाडे भरपूर असायची. बिन दिक्कत आम्ही तोडून आणत असू. हातातली काचेची फुटकी बांगडी विस्तवावर धरून ठेवली की ती वाकडी व्हायची. मग त्यात शेतातली ताजी भाजी म्हणजे वांगी, दोडका कारली, मिरची, काकडी, भेंडी, ढबू मिरची अशा काही भाज्या  त्यात बसवायच्या. हत्तींना रोज ताज्या फुलांचा हार घातला जायचा. त्यासाठी दोन्ही बाजूला खिळे मारलेले असायचे. घरोघरी हादगा रंगायचा. आमंत्रणाची गरजच नसायची. सगळ्यांनी सगळ्यांकडे जायचेच. फेर धरायचा. मध्ये एक पाट ठेवून त्यावर हत्तीचे चित्र अंबारीसकट काढायचे. हळद, कुंकू, फुलं वाहून सगळ्यांनी पारंपारिक गाणी म्हणायची. पहिले दिवशी एक ,दुसरे दिवशी दोन अशा चढत्या क्रमाने १६ व्या दिवशी १६ गाणी म्हणायची. मग खिरापत ओळखायची. 

हादगा समाप्तीचा मोठा समारंभ असायचा. हादग्याच्या सगळ्या मुली,  शिवाय त्यांच्या आयांना देखील आमंत्रण असायचे. घागरीच्या पातेल्यात खिरापत केली जायची. सर्वांनी पोटभर खावे अशा इच्छेने आग्रह करून वाढले जायचे. ती चव, ती तृप्ती वर्षभर पुरायची. मग पुढच्या वर्षी पुन्हा नव्याने सगळा खेळ रंगायचा.

आता सर्वत्र आर्थिक सुबत्ता आली. पण वेळेअभावी एकच दिवस हादगा किंवा भोंडला खेळला जातो. पण खिरापत ओळखण्याची मजा आजही वेगळा आनंद देऊन जाते. आता घरोघरी चढाओढीने पदार्थ केले जातात. गुगलवर एका किकवर अनेक अनोख्या खिरापतींची रेसिपी मिळते.  लहानपणीची ” श्री बालाजीची सासू ” आता सुधारक पद्धतीने आकर्षक डिशमध्ये मिळते. आणि आम्हा महिलांना तोच आनंद पुन्हा मिळतो.

लेखिका : सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भारताचं बोलकं यश… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ भारताचं बोलकं यश… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

आज सारा देश शांतपणे समाधानाने झोपणार आहे. मुलीच्या लग्नात तिची पाठवणी केल्यावर दिवसभराच्या शिणवट्यातून  थकलेला बाप जसा कृतार्थ भावनेतून झोपतो किंवा इंडिया – पाकिस्तानच्या सामन्यात त्यांना हरवल्यावर जल्लोष करून भागलेले जीव जसे निवांत पहुडतात तशी झोप आज लागणार आहे..

का? का वाटत असावं असं.? अब्जाधीश व्यावसायिकांपासून खेड्यापाड्यात राहणाऱ्या एखाद्या म्हाताऱ्याला सुद्धा चांद्रयान ३ च लँडिंग बघावस वाटलं अस काय होत त्यात.??

ऑर्बिटर, रोव्हर, लँडर ह्यातला फरक पण न कळणारे ह्या यशासाठी देव पाण्यात घालून बसले होते..!! का.?

कारण स्वातंत्र्य मिळाल्याच्या दिवसापासून ह्या देशाने केवळ आणि केवळ संघर्ष पाहिला आहे. स्वातंत्र्य मिळालं त्या आधी इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये विन्स्टन चर्चिल म्हणाला होता की ” ह्या अर्धशिक्षित, गरीब..लोकांना स्वातंत्र्य दिले तर काही वर्षातच अराजक निर्माण होईल आणि हा देश गुंड मवाल्यांच्या ताब्यात जाऊन साऱ्यांची दुर्दशा होईल.” 

चर्चिल चुकीचा नव्हता..! फुटीरतावादी संस्थांनांचे  विलीनीकरण,  सर्वांना एका धाग्यात बांधू शकेल अशा संविधानाची निर्मिती, फाळणीतल्या विस्थापितांचे पुनर्वसन, भाषावार प्रांतरचना….ह्या एकेका प्रश्नाची व्याप्ती इतकी होती की देशाच्या पहिल्या काही पिढ्या त्यातच खर्ची पडल्या

फाळणीमुळे सुपीक प्रदेश पाकिस्तानात गेला होता, तर दुसऱ्या महायुध्दात जनता इतकी भरडली गेली होती की सगळी अर्थव्यवस्थाच जेरीस आली होती. त्यात अमेरिका – रशियाच्या शीतयुद्धात कोण्या एकाची बाजू घेतली असती तर स्वावलंबी राष्ट्र बनण्याच्या स्वप्नांना तिथेच सुरुंग लागून देश महासत्तांचे हातचे बाहुले झाला असता त्यामुळे देशाने अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला.

तेव्हा संपूर्ण जगासाठी भारत एक चेष्टेचा विषय होता. 

१९६२ च्या दुष्काळात अमेरिकेकडे गहू मागितला तर जनावरांना खायला घातला जाईल असा नित्कृष्ट दर्जाचा गहू त्यांनी पाठवून भुकेल्या भारतीयांची चेष्टा केली होती. 

चीनसोबत झालेल्या युद्धात पुरेशा शस्त्र – साधनाअभावी कडाक्याच्या थंडीत भारतीय सैन्य धारातीर्थी पडले होते. अवकाश मोहीम काढायची तरी रशियाची मदत घ्यावी लागे. कित्येक वर्षे ऑलिंपिकमध्ये पदकांचा दुष्काळ होता. मुठभर ७ – ८ देश जो क्रिकेटचा खेळ खेळतात त्यात विश्वविजेते म्हणवून घेताना आपल्यालाच कुठेतरी पटत नव्हतं. कारगिलच्या युद्धात बोफोर्स तोफा ३ – ३ दिवस खोळंबून होत्या कारण देशाची स्वत:ची GPS सिस्टीम नव्हती आणि जी होती ती अमेरिकेच्या नियंत्रणाखाली…!!!

पण ह्या देशाच्या मातीत एक गुण आहे. कित्येक संकटे आली तरी पुन्हा शून्यातून उभं रहायचं.  देश लढत राहिला. ज्या देशात एखाद्या राज्याला त्याच्या शेजारच्या राज्याची भाषा समजत नाही त्या देशात दोघांना एकत्र ठेवणारं एक आदर्श संविधान लिहिलं गेलं.  जिथे गहू मागायची वेळ आली होती तिथे हरित क्रांती होऊन देश गहू निर्यात करू लागला. शेजारचं शत्रूराष्ट्र आम्हाला कमकुवत समजत असताना त्याला ९०००० सैन्यासह शरणागती पत्करायला लावली. पाश्चिमात्य देशांनी सुपर कॉम्प्युटर द्यायला नकार दिला तर स्वतः आमच्या तंत्रज्ञांनी परम कॉम्प्युटर घडवला. 

आणि आता ज्या मित्रराष्ट्राची अंतराळ मोहीम अपयशी होताना दिसली होती त्याच्याचसमोर आपण अनुभव कमी असताना यशस्वी होताना दिसत आहोत हे यश खूप बोलके आहे. इंटरस्टेलर सारख्या साय – फाय सिनेमाच्या बजेटपेक्षा कमी बजेटमध्ये ही मोहीम आखण्यात आली होती.

चार वर्षांपूर्वी डॉ.सिवन रडले तेव्हा सगळा देश हळहळला होता. कारण त्यांच्या अश्रुंच्यामागे मोठा इतिहास आहे. आज उदयोन्मुख  महासत्ता असताना सुद्धा हा खर्च वारंवार परवडणारा नाही. त्यामुळे अपयश म्हणजे काय ह्याचा अर्थ त्यांना माहीत होता.  त्यांचं यश – अपयश प्रत्येकाला आपलंसं वाटलं  कारण फक्त पैसाच नाही, तर आपल्या गेल्या कित्येक पिढ्या हा दिवस बघायला खर्ची पडल्या आहेत ह्याची जाणीव सगळ्यांना आहे. शेकडो वर्षांच्या इतिहासात प्रथमच पृथ्वीची क्षितिजे पार करत एका दुसऱ्या भौगोलिक रचनेवर भारताची मोहोर उमटली जात आहे. हा प्रसंगच अभूतपूर्व आहे.

आज इस्रोचा तो प्रवास आठवतोय…  

दुसरी कोणतीच सोय नसल्याने सायकल, बैलगाडीवर लादलेले स्पेअर पार्टस, एका चर्चच्या आवारात सुरू केलेलं प्रक्षेपण केंद्र, बिशपच्या घरातच मांडलेलं वर्कशॉप, हे घडवण्यासाठी परदेशातील मोठ्या पगाराच्या नोकऱ्या नाकारून भारतातच थांबलेले वेडे देशभक्त संशोधक, विन्स्टन चर्चिलचं भाषण, पाश्चिमात्य कार्टूनिस्टनी इस्रोची उडवलेली खिल्ली, चांद्रयान २ च्या वेळेस पाकिस्तानी मंत्र्यांनी केलेले उपहासात्मक ट्विट……..सगळं डोळ्यासमोर तरळतं आहे.!!

आज झोपी जाताना रात्री दूर त्या चंद्राकडे पाहताना विलक्षण समाधान वाटत आहे. प्रज्ञान रोव्हर आता तिथे कामाला लागला असेल….आणि काळाच्या पटलावर कधीही पुसली जाणार नाही अशी भारताची मोहोर तिथे उमटली जाणार आहे..!!! जय हो इस्रो..!!

लेखक :  सौरभ रत्नपारखी

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ या भाळांवर कुंकवाचा सूर्य रेखूया… (चौथा माळ) – जीवनाच्या रणात लढतांना… ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆या भाळांवर कुंकवाचा सूर्य रेखूया… (चौथी माळ) – जीवनाच्या रणात लढतांना… ☆ श्री संभाजी बबन गायके 

तिच्या चेह-यावर सदा हसू असतं याचं नवल वाटत राहतं. कुणी परस्पर कधी हिशेब मांडलाच तर सुखाच्या बाजूला तशी अगदी किरकोळ जमा दिसायची आणि दु:खानं तर सगळा ताळेबंदच व्यापून टाकलेला होता.

दोन जिवंत माणसं वावरू शकतील एवढ्या जागेत सहा माणसं रहात असलेल्या घरात जन्माला येणं काही तिनं ठरवलेलं नव्हतं. एकवेळ मरण हाती असतं पण जन्म हाती नसतो हे खरंच हे तिला फार लवकर पटलं होतं. नात्यातली माणसं तिच्याघरी यायला नाखुश असतात, त्यांना हिच्या आईला भेटायचं असेल तर ती माणसं हिच्या घरी येण्याऐवजी ‘ तुम्हीच या की घरी आमच्या ’ असं का म्हणायची, हे तिला समजायला वेळ लागला.

आपल्या घराच्या आसपासची सगळी वस्तीच इतरांपेक्षा निराळी आहे, हे ती शाळेत जायला लागली तेंव्हा तिच्या लक्षात आलं. आपल्या शेजारी राहणारी माणसं काही आनंदाने या वस्तीत रहात आहेत, असं नाही हेही तिने विचारांती ताडलं. तिला सख्खा मामा नव्हता. पण मानलेले मात्र मामा होते. तिच्या शेजारच्याच खोपटात राहणारे. त्यांच्या गावी एकदा तिच्या आईने त्यांच्याबरोबर यात्रेला पाठवलं होतं. मामाच्या गावात एका गल्लीत एकाच आडनावाची माणसं राहतात. आणि ही घरं स्वतंत्र भिंतीचीही असतात, स्वच्छतागृहं घरांपासून तशी लांब असतात, हे पाहून तिला आश्चर्य वाटलं. नाहीतर तिचं घर वस्तीत सरकारनं बांधून दिलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहापासून अगदी काही फुटांच्या अंतरावर आहे. ही जागा सरकारने व्यापली नसती तर त्या जागेवर आणखी दहा-बारा झोपड्या सहज उभ्या करता आल्या असत्या. कारण वस्तीला लागूनच नदी किंवा नदीला लागूनच वस्ती होती. आणि आता आणखी लोकांना वस्तीत रहायला यायला वावच राहिला नव्हता. स्वतंत्र भिंती उभारण्याची चैन लोकांना परवडणारी नव्हती. आणि मुळात भिंती अशा नव्हत्याच. होत्या त्या पत्र्याच्या किंवा अशाच काही लाकडी फळ्यांच्या. लोकांनी वस्तीत जागा धरल्या होत्या, आपण पळत जाऊन,गर्दीत घुसून बसमध्ये जागा धरतो ना तशा ! चंदा याच वातावरणाला सरावलेली होती. तिथले आवाज, तिथला वास आणि गरीबीच्या सहवासाची तिला सवय झाली होती. आपल्या त्या एवढ्याशा घरात मागच्या बाजूला पडदा लावून एक आडोसा केलेला आहे, आणि त्यात एक आईस्क्रीमवाला मामा राहतो, त्याला त्याच्या जागेत जायला आपल्याच दारातून जावे-यावे लागते. आपले वडील त्या मामाशी आई सलगीने बोलली की भांडतात, काहीबाही बोलतात आणि बरेचदा तिला मारतात, असेही होई. पण अशा मारामा-या तर वस्तीतल्या ब-याच घरांत होतात, हे चंदाला ऐकून पाहून माहिती झाले होते. लग्न झाले की नवरा बायको असेच वागतात,ही तिची समजूत पक्की होत चाललेली होती. तिच्या शेजारी दोन बापे राहतात, मात्र ते रोज सकाळी बायकांसारखं नटून थटून बाहेर जातात. समोरच्याच झोपडीत एक बाई राहते. समोर म्हणजे हिच्या आणि त्या झोपडीत मुश्किलीने चार हातांचं अंतर असावं. त्या बाईच्या हाता,पायांची बोटं निम्मीच आहेत, ती सकाळी एका म्हाता-या माणसाबरोबर बाहेर पडते. त्या म्हाता-याच्याही हाता-पायांना नेहमी पांढ-या पट्ट्या बांधलेल्या असत आणि त्या पट्ट्यांवर रक्ताचे डाग असतात बहुतेकवेळा. डोळ्यांच्या पापण्याही झडून गेल्यात. रात्री वस्तीत अंधुक उजेड असतो, पण त्यामुळे आपल्याकडे नातेवाईक आलेच तर त्यांना अस्वस्थ का होतं, हे कोडं तिला काही केल्या उलगडत नव्हतं. तिला माहित नव्हतं की तिच्या आईच्या माहेरच्या लोकांना का चांगल्या घरची माणसं म्हणतात. त्यांची घरं आपल्यापेक्षा चांगली म्हणून त्यांना असं म्हणत असावेत, असं तिला वाटून जाई.

मुलीच्या जातीनं लवकर मोठं होणं किती वाईट असतं याची जाणीव तिला लवकरच व्हायला लागली. आई तिला सतत घरात थांब, पावडर लावू नकोस,कुणाशी जास्त बोलू नको असं म्हणायला लागली तेंव्हा तर चंदा खूपच गडबडून गेली. त्यात वस्तीच्या टोकावर रहायला असणा-या एका पोराने तिचा हात धरला आणि माझ्याशी दोस्ती करतेस का? असं विचारल्यापासून तिला भीतीच वाटू लागली होती. तशी तीही चार दोन वेळा त्या मुलाकडे पाहून ओळखीचं हसली होती, नाही असं नाही. पण ते सहजच. दिसायला बरा होता तो सिनेमातल्या हिरोसारखे केस ठेवणारा आणि वस्तीतल्या डबल बारवर व्यायाम करणारा. आईने यासाठी तिलाच का रागे भरले असावे, ह्या प्रश्नाचं उत्तर तिला आजवर नाही मिळालं. दोन्ही धाकटे भाऊ सातवी-आठवीतून शाळा सोडून गवंड्याच्या हाताखाली जाऊ लागले आणि घरात रोज रोख पैसे येऊ लागले होते.

एका दिवशी तिचं लग्नं ठरलं. पदरात निखारा ठेवून कसं जगणार आई? मुलगी मोठी झालीये आणि तिच्याकडे लक्ष द्यायला आपण दिवसा घरी थांबू शकत नाही. घरी थांबलं तर लोकलमध्ये भाजलेल्या, उकडलेल्या शेंगा विकायला कोण जाईल आणि घरात ज्वारीचं पीठ कसं येणार, हे तिचे प्रश्न इतर अनेक गोष्टींपेक्षा मोठे होते.

वस्तीतले लोक म्हणाले पोरगी बिघडली म्हणून तिच्या आईनं तिला उजवलं. चंदाचं लग्न मात्र तिच्या आईच्या सासरच्याकडच्या एका नातेवाईकाच्या मुलाशी झालं. पोरगा ड्रायव्हर, तीन भावांत मिळून तोकडी शेती आणि रूपानं चंदापेक्षा दहा आणे निराळा. आपली बायको आपल्यापेक्षा चांगली दिसते याचा त्या पोराला सुरुवातीला अभिमान आणि लग्नानंतर काहीच दिवसांत हेवा वाटायला लागला. दोन मुलं झाल्यावरही त्याचा जावईपणाचा तोरा काही कमी झालेला नव्हता. तरी बरं चंदाच्या आईनं पै पै साठवून त्याच्या गळ्यात सोन्याची साखळी, मनगटात घड्याळ असे लाड केले होते. तुझी वस्ती तशी, तुझं खानदान तसं अशी कारणं भांडणाला पुरेशी ठरू लागली. तुझं आधी वस्तीतल्या एकाशी होतं हे तर त्याने खास शोधून काढलेलं कारण. चंदा कायमची वस्तीत आईकडे रहायला आली. दरम्यान दोन्ही भावांची अशीच लग्नं झाली होती, त्यांच्यापेक्षा गरीब असलेल्या लोकांच्या अल्पवयीन मुलींशी. आता घरात एक नाही तर तीन चंदा होत्या.

वस्तीत पुराचं पाणी शिरलं की वस्तीकरांना सरकारी शाळांच्या ऐसपैस खोल्यांमध्ये रहायला मिळायचं. दोन-तीन दिवसांत पुन्हा वस्ती गजबजून जायची. निवडणुका आल्या की प्रचाराला जायची कामं मिळायची सगळ्यांनाच आणि पैसेही.

वस्तीच्या टोकावर रहात होता, त्या मुलाचेही लग्न झाले होते आणि त्यालाही तीन मुलं होती. पण आताही तो चंदाकडे पहायचा संधी मिळेल तेव्हा. चंदाने सरळ राखी पौर्णिमेला त्याच्या घरी जाऊन राखी बांधून प्रश्न मिटवला.

नवरा परत नेण्याची शक्यता नव्हती आणि चंदाची इच्छाही नव्हती.  भावजया कुरकुरायला लागायच्या आत काहीतरी करायला पाहिजे होतं. थोरला भाऊ आता मंडईत गाळ्यावर कामाला लागला होता, पण हमालांच्या संगतीनं हातभट्टीत रमला आणि घरी पगार कमी आणि आजारपण जास्त यायला लागलं. त्यालाही मुलं झालीच होती जशी वस्तीतल्या इतरांना होत, पटापट. कार्यकर्त्यांच्या बळावर वस्तीत नळ चोवीस तास,लाईट आकडे टाकून सर्रास. वस्तीतल्या घरां-घरांत किरकोळ उत्पादनं होत होतीच, त्यात एका कोप-यात स्वच्छतागृहाच्या बाजूला भट्टी लागायची, तिथूनही भरपूर माल निघायचा. एकूण हाताला कामं होती आणि कामाला भरपूर हात तयार असायचेच.

चंदाची आई मरण्यासारखी नव्हती. पण आजाराच्या साथीत अगदी किरकोळीत गेली. खर्च असा लागलाच नाही तिच्या आजारपणात. माहेरी आलेल्या लेकीचा आधार हरपला. बाप काही लेकीला माहेरी राहू देईल असा नसतोच बहुदा. ज्याची अमानत त्याच्याघरी बरी असं मानणारा पुरूषच तो. झटकलेली जबाबदारी पुन्हा खांद्यावर घ्यायला तो तयार नव्हता. दुसरं लग्न केलं तिनं तरी त्याची ना नव्हती. पण चंदा एकदा हरलेल्या जुगारात पुन्हा पैसे लावायला तयार नव्हती.

तिने आईची शेंगांची टोपली उचलली आणि तडक रेल्वे स्टेशन गाठलं. दोन दिवसांनी भावजयही आली सोबतीला. माणसांच्या गर्दीत आता या दोन तरूण पोरी सराईतपणे आणि लाज घरी ठेवून स्थिरावल्या. चुकून धक्का लागलेल्या माणसांना मनानेच माफ करीत, मुद्दाम धक्के देणा-यांना भाऊ म्हणत त्या या ठेशन पासून त्या ठेशन पर्यंत फिरतात….भुनेला,वाफेला सेंग असा पुकारा करीत. रेल्वेतील टी.टी.,पोलिस, पाकीटमार,किरकोळ विक्रेते, आंधळे भिकारी, फरशीच्या तुकड्यांनी ताल धरीत अनाकलनीय गाणी गात पैसे गोळा करीत फिरणा-या भावांच्या जोड्या त्यांना तोंडपाठ झाल्यात. चंदाने मात्र आपली दोन्ही मुलं दूरवरच्या गावातल्या बोर्डिंग स्कूलमध्ये नेऊन ठेवलीत….त्यांना शिकवायचा तिचा इरादा आहे तिचा. आपल्या मुलांच्या नशिबात येऊ पाहणारी वस्ती तिला आता दूर सारायची आहे. फलाटावरील एखाद्या मोकळ्या बाकावर थकून भागून बसलेली चंदा तिच्या टोपलीतली एखादी जास्त भाजली गेल्यामुळे काळी ठिक्कर पडलेली शेंग सोलते…त्या शेंगेतील शाबूत भाग दातांनी कुरतडून खाते आणि लोकलची वाट पहात राहते. या महिन्यात पैसे साठले की पोरांना अभ्यासाची चांगली पुस्तकं नेऊन द्यायचीत तिला….त्यासाठी कितीही ओरडावं लागलं तरी चालेल….भुनेला, वाफेला सेंग…मूंगफल्ली का सेंग !

चंदासारख्या अशा अनेक अष्टभुजा जीवनाच्या रणात उभ्या असतात लढायला…. आई भवानी त्यांच्या हातांना आणखी बळ देवो.

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ रिटर्न गिफ्ट – लेखक :अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

?वाचताना वेचलेले ?

☆ रिटर्न गिफ्ट – लेखक :अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

आताशा कनेक्ट होणं शिकलेय मी. नव्हे, फारच एन्जॉय करतेय म्हणा ना हवं तर.आणि हो. या कनेक्ट होण्याच्या खेळात सुरेख रिटर्न गिफ्ट पण मिळतं ते वेगळंच.

आता म्हणाल, हे काय नवीन? 

खूप सोप्पंय हो हे सगळं.

‘मॉर्निंग वॉक’ला जाताना प्राजक्ताच्या झाडाखाली पडलेल्या फुलांच्या गालिच्यातील  नारंगी देठ असलेली दोन शुभ्र फुलं हलकेच हातावर घेऊन नाकाजवळ नेली.त्यांचा सुवास थेट मनाला भिडला आणि कनेक्ट झाले मी त्यांच्याशी!

माहीत नाही, कशा कोण जाणे,मस्तिष्कातून मनापर्यंत चेतातंतूनी संवेदना वाहिल्या आणि पुढचे चार पाच तास त्या परिमलाने दरवळून टाकले.

मिळाले नं मला रिटर्न गिफ्ट…!

अशा शेकडो गोष्टी होत असतात; चांगल्या वाईट.

आपल्या सभोवताली. फक्त आपल्याला कनेक्ट होता आलं पाहिजे. बस्स!

परवा कामवाली सुजलेले डोळे आणि रडलेला चेहरा करून आली कामाला. तिच्या डोळ्यात पाहिलं तर नजर चुकवली तिने. काहीच न बोलता वाफाळलेला चहाचा कप आणि दोन बिस्कीट ठेवली तिच्या समोर, तशी चहाचा घोट घेत मोकळी झाली. मनात साचलेली सल बाहेर निघाली.

तिच्याशी कनेक्ट होताना हलकेच माझ्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. पण जातांना हसून “येती व्ह ताई,”म्हणून माझं रिटर्न गिफ्ट मला देऊन गेली.

बरं या कनेक्ट होण्याला जात, पात, धर्म, वर्ण, शिक्षण, सुबत्ता, सुंदरता या कशाचीही गरज नसते. फक्त लागते ती मनाची थोडी वेगळी मांडणी.

खेड्यातून शहरात आलेली मी, रमते थोडी गावाकडच्या वातावरणात. मग आठवडी बाजाराच्या दिवशी कधी मावशी, कधी मामा तर कधी दादा भेटतो त्या अनोळखी माणसांच्या गर्दीत. “कश्या आहात मावशी..?” एवढे दोनच शब्द पुरतात कनेक्ट व्हायला!

मग त्या गर्दीतून कुठूनतरी आवाज येतो, “ताई मेथीच्या ताज्या जुड्या ठेवल्यात गं.घेऊन जा.”

बळेच कडीपत्त्याच्या चार काड्या, भरलेल्या भाज्यांच्या पिशवीत खोचतात कोपऱ्यात बसलेले आजोबा, तर माप झाल्यावरही एक पेरू हलकेच सरकवत, “ठिवा ओ ताई लेकरांना.” म्हणणारा मामा सापडतो, घरी परतताना पिशवीसारखं मनही भरून जातं!

मुलांच्या क्लासबाहेर त्यांची वाट पाहत थांबलेले असतो आपण, मधूनच आठ दहा मुलांचा घोळका गोंधळ घालत येतो बाहेर. हसी मजाक, आरडाओरड, एकमेकांना चिडवत स्वतःतच रमलेली असतात ती.

हळूच आपण त्यांच्याशी कनेक्ट होतो अन् मनाच्या कोपऱ्यातील आपला ब्लॅक अँड व्हाइट कॉलेज कट्टा समोर येतो, नकळत त्या कट्ट्यावर चहाचा ग्लास घेऊन आपण बसतो. मग आपोआपच हात मोबाईल कडे जातो.

जुन्या मैत्रिणीचा नंबर डायल केला जातो. मग तासभर झालेल्या गप्पांमध्ये आपणही वय विसरून त्या घोळक्यातील एक होऊन जातो. मग पुढचे कित्येक दिवस हे रिटर्न गिफ्ट सांभाळतो आपण.

आयुष्य तेवढं रटाळ नक्कीच नाही.थोडंसं हरवून बघा.काढून टाका हा ‘शहाणपणाचा मुखवटा’.थोडे वेडेच व्हा कधीतरी.

म्हणजे बघा.

ऑफिसमधून घरी परतताना पार्किंगमध्ये खेळणाऱ्या मुलांसोबत फुटबॉलला किक मारून बघा आणि उडवून टाका सगळ्या चिंतांना.

कधीतरी चाखून बघा थंडगार आईस-गोळा. लागू द्या तो नारंगी, लाल, पिवळा, हिरवा रंग ओठांना.

नकाच राहू एक दिवस टापटीप.होऊ द्या केसांना अस्ताव्यस्त, घाला तोच घळघळीत पण मनाला रिलॅक्स करणारा जुना ड्रेस.

वाचत पडा एखादं सुंदर पुस्तक आणि भिडू द्या मनाला बॅकग्राऊंडमधील लतादीदींच्या सुरेल सूर.

नाटक पाहताना आवडलेल्या एखाद्या डायलॉगला उठून दाद देऊन पाहा.

जगून पाहा एखादा उनाड दिवस आपल्या स्वतःसाठीच!

आवडली का कल्पना कनेक्ट होण्याची?

तर सुरू करा मनाचा योगा मग बघा किती सुंदर सुंदर रिटर्न गिफ्टस् मिळतात ते.

प्रस्तुती : सौ. सुचिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नवरात्र विशेष लेख – नवरात्र महोत्सव… एक सृजन ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

?  विविधा ?

☆ नवरात्र विशेष लेख – नवरात्र महोत्सव… एक सृजन ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

आज नवरात्र महोत्सवाचे निमित्ताने  एक सुंदर विषय चर्चेत  आला आहे.  आपण  सर्वजण  या  बदलत्या  काळाचे प्रतिनिधीत्व करतो  आहोत.  केवळ  उलट सुलट विचार,  विधाने करून आपण  श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातील तफावत वाढवीत  आहोत.

नवरात्रीचे धार्मिक महत्त्व समजून घेताना  आपण स्वतः धार्मिक  आहोत का? याचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. हिंदू धर्माव्यतिरिक्त अन्य कोणत्याही धर्मात सण,  उत्सव, परंपरा यांची टिंगल,  टिका केली जात नाही.  आज केवळ आपले नाव चर्चेत यावे म्हणून  धार्मिक कर्मकांडावर टिका करणारे लेखक  घरात मात्र नाना देव पूजताना दिसतात. 

नवरात्र उत्सव हा भक्ती, शक्ती आणि  आराध्याविषयी स्नेहभाव व्यक्त करण्याचा  उत्सव  आहे.  असुर, समाज विघातक मनोवृत्तीचा विनाश,  विवेकाचा  अंकुश, आणि  सद्सद विवेक बुद्धीने षडरिपूंना दिलेला शह म्हणजे नवरात्र उत्सव.

धार्मिकता  आणि  कार्यप्रवणता यामध्ये  श्रद्धा ,  भक्ती  आणि निस्वार्थी सेवाभाव  यांचा समावेश झाला कि आपण  हा उत्सव  ख-या अर्थाने आनंदोत्सव म्हणून साजरा करू शकतो.

नारीशक्ती ही सृजनशीलता  आणि लक्ष्मी प्राप्तीचे प्रतिक मानली गेली आहे.  नर  आणि  नारी  यांच्यातील  एक काना आणि  एक वेलांटीचा फरक  फार मोठे समाज प्रबोधन घडवणारा आहे.  वास्तविक पहाता  नर,  नारी यांची कार्यशक्ती समान  असली तरी समाजमन त्यात पुरूष प्रधान संस्कृती  अबाधित रहावी म्हणून  काही बंधने  स्त्रियांवर युगानुयुगे लादत आले आहे.  तू माझी, मी  तुझा  हे  मानव्याचे बोधवाक्य  स्त्री पुरूष  एकत्र वावरताना संशयाच्या भोव-यात सापडते.  आपण  आपल्या  अंतर्मनातील काही सुप्त कलागुण  जागृत ठेवण्यासाठी देवापुढे  अखंड नंदादीप,  धान्य पेरणी,  आणि सुमनांची माला  अर्पण करीत आहोत.

विविधतेतून एकता हे  ब्रीदवाक्य जोपासणारे -या आपल्या  भारत देशात प्रादेशिक स्तरावर विविधता येणारच.  उत्सव साजरा करताना  चालिरिती भिन्न  असल्या तरी,  कौटुंबिक सलोखा,  सामंजस्य,  सुख, शांती, समाधान,  आणि सेवा भावी मानव धर्म जोपासणारी शिकवण  सर्वत्र एकच  आहे.  नवरात्र  उत्सवात देवीने परीधान केलेल्या  साड्या,  तिचे वाहन, परीधान केलेले अलंकार,  अर्पण केलेले नैवेद्य, हातातील शस्त्रे  आपणास  अंधश्रद्धेपासून परावृत्त करून समस्त मानव जातीच्या कल्याण्यासाठी आदिमाया आदिशक्ती  कशी  जागृत  आहे याचीच प्रचिती देते.

सारे माझे पण मी सर्वांची  ही शिकवण देणारा  हा  आनंदोत्सव  आहे. यामध्ये  जरूर  काही समाजात अंधश्रद्धा जोपासल्या जात आहेत.  काही  धार्मिक बाबींचे अवडंबर माजवले जात आहे.  एक फुल  श्रद्धेने अर्पण  केले काय  अन लाखभर फुले अर्पण केली काय? शेवटी भाव अत्यंत महत्त्वाचा आहे.  तीच गोष्ट खण,नारळ,  ओटी,  नैवेद्य यांच्या बाबतीत लागू होते. म्हणून  धार्मिक विधी करताना  आलेला यथाशक्ती  हा  शब्द  अत्यंत महत्त्वाचा आहे. या पद्धतीने मातामयी देवतेची  आराधना या  उत्सवात  अपेक्षित आहे.

गरबा खेऴणे म्हणजे काय ? हे जर  आपण शोधले तर गरबा (आपल्या भाशेत मडके )हे ब्रम्हांडाचे प्रतिक आहे.गरब्याला ( मडक्याला ) २७ छिद्र असतात.९ छिद्रांचि १ अशा ३ लाईन असतात

९ गुणिले ३ = २७ नक्षत्रे होत. १  नक्षत्र म्हणजे ४ चरण होय.२७ गुणिले ४ = १०८.नवरात्रात गरबा ( मडके ) मध्यभागि ठेवुन त्या भोवति १०८ वेळा गोल फेरा धराय़चा असतो.त्यामुळे आपल्याला ब्रम्हांडाची प्रदक्षिणा घातल्याचे पुण्य मिऴते अशा १०८ प्रदक्षिणा घातल्या जातात.

हेच खरे गरबा खेळण्याचे महात्म्य  होय. अशी पौराणिक माहिती संकलित आहे.

उत्पत्ती,  स्थिती,  आणि  लय.  हे  नितीतत्व जोपासणा-या देवता  म्हणजे  सरस्वती महालक्ष्मी आणि महाकाली या  आहेत. या  तिनही देवतेची भूत,  भविष्य  आणि वर्तमानातील  शक्तीरूपे आपण नवदुर्गा म्हणून  संबोधित करतो.  वर्तमानातील नारीशक्ती तिचा  आदर सन्मान  हा  दृष्टिकोन ठेवून नवरात्र उत्सव साजरा व्हावा  असे मला वाटते.

स्वतःचे महत्व प्रस्थापित करण्यासाठी समाजात   श्रद्धाळू लोकांना भय दाखवून  अंधश्रद्धा निर्माण केल्या जातात.  कौटुंबिक सौख्याचा विचार करून भोळी भाबडी जनता याला  बळी पडते.  वास्तविक पाहता देवीची जी वाहने  आहेत ती सर्व  वाहने  म्हणजे  हत्येपासून त्यांना देवीने , आदिशक्तीने दिलेले  अभय  आहे. तरीदेखील कोंबडी,  बकरू यांची निष्कारण कत्तल होत आहे.  भूतदया,परोपकार  आणि  अध्यात्मिक  उन्नती हा  या  नवरात्रीचा मुख्य  उद्देश आहे.

राजस,  तामस,  आणि  सात्विक  गुणांचा  समतोल आचारात ,  विचारात आणि  श्रद्धेत कसा जोपासायचा हे शिकवणारा हा  उत्सव  आहे. माणूस कितीही बदलला तरी माणसाला माणसाची गरज लागतेच. हा माणूस कसा ओळखायचा? कसा  टिकवून ठेवायचा?  आणि त्याच्या तील दुर्गुण कसा  नष्ट करायचा हे शिकवणारा हा  नवरात्र  उत्सव  आहे.

केवळ मनोरंजनाचे साधन म्हणून जर नवरात्र महोत्सव साजरा केला जात  असेल तर ते सर्वस्वी चुकीचे आहे.  माणूस  आपला  आहे.  आपण माणूस  आहोत. माणसात देव शोधायचा त्याची उपासना करायची  इतका  साधा सोपा संदेश नवरात्र महोत्सवाने दिला आहे.  आपण त्याचा कसा  उपयोग करतो हे  आपल्याच हातात आहे.

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आयुष्य आणि बासरी… ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आयुष्य आणि बासरी… ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

प्रत्येकाचं आयुष्य, हे बासरी सारखं पोकळच असतं अनेक ठिकाणी अनेक छिद्र असतात…! 

कोणतं छिद्र कधी झाकायचं ? कधी उघडायचं ? 

श्वास कधी घ्यायचा ? आणि फुंकर कधी मारायची ? 

— एकदा याचं गणित समजलं, की मग आयुष्य सुरेल होतं…!!! 

आयुष्यात दुःख कुणाला नाही ?

आता हेच पहा ना…. कुणी लिहितंय तर कुणी वाचतंय…. !!! 

गुरुस्थानी असलेले श्री. शिवलिंग ढवळेश्वर सर, मागच्या वेळी बोलताना मला म्हणाले, दुःख कमी करण्याचा एकच उपाय, तो म्हणजे ..  ” देके जावो, या फिर छोडके जावो…!”

सोबत घेऊन जायचा कोणताही पर्याय नसेल, जे आज ” माझं ” आहे ते मला इथेच जर सोडून जायचं असेल … तर मी उद्या ते दुसऱ्याला द्यायला काय हरकत आहे… ? ज्याचा आज मी उपभोग घेत आहे, ते माझं नाहीच… उद्या ते दुसऱ्याच्या पदरात असणार आहे, मी ज्याला माझं म्हणतोय ती फिरती ढाल आहे, आज माझ्याकडं आहे, उद्या दुसरीकडे ही ढाल जाणार, हे एकदा समजलं, तर जातांना ही ढाल दुसऱ्याला खुल्या दिलानं द्यायला काय हरकत आहे ? 

— लेके तो जा नही सकते….. तेव्हा ” देके जावो, या फिर छोडके जावो…!”

Give it… or leave it !!! 

वरील तत्व तंतोतंत अंमलात आणत, आपण तळागाळातल्या समाजाला आपल्या घासातला घास द्यायला अगोदरच सुरुवात केली आहे. 

आपल्या देण्याच्या या वृत्तीला मनापासून नमस्कार. 

भिक्षेकरी ते कष्टकरी …. 

१ . परिस्थितीने पिचलेले एक तरुण कुटुंब ! नाही म्हणायला एक झोपडं होतं, बाजूला शिवाजीनगर कोर्ट परिसरात “तो” छोटा विक्रीचा व्यवसाय करून बायको आणि दोन पोरांना जगवायचा. याचं झोपडं जिथं होतं, बरोब्बर तिथूनच मेट्रोला जायचं होतं… तिचा तसा हट्टच होता…. मग सर्व झोपड्या जमीनदोस्त झाल्या… याची कशी शिल्लक राहील ? अनेक कुटुंबं उध्वस्त झाली… मग आता नक्कीच विकास होणार याची खात्री पटली… ! 

ज्या रस्त्यावर अनेक लोक छोटे विक्री व्यवसाय करत होते, त्यांचे सर्व सामान उचलून त्यांना तिथे विक्रीस बंदी आणली… उदरनिर्वाह थांबला… लहान लेकरं भुकेने इकडे तडफडत होती, आणि चकाचक होण्याच्या नादात शहर मात्र तिकडं “स्मार्ट” होत होतं…! 

याचाही व्यवसाय थांबला, जगण्याचे आणि जगवण्याचे सर्व रस्ते बंद झाले. याने मग झाडाला लटकून फास घेण्याचा प्रयत्न केला… ऐनवेळी कुणीतरी बघितले आणि थोडक्यात वाचला ! 

याला मी आधीपासून ओळखत होतो. याला बोलावून घेतलं…. सातारी शिव्या आणि पुणेरी टोमण्यांनी याला आधी चांगला बुकलून काढला…. इतका, की यापेक्षा फास परवडला असता, असं त्याला वाटलं असेल. 

इलाज नव्हता… गोळ्या औषधांनी बरं होत नसेल, तर सुई टोचावीच लागते…! 

यानंतर मात्र त्याला प्रेमानं जवळ बसवून, तू गेल्यानंतर, बायको आणि लहान पोरांचे हाल कसे झाले असते… हे त्याला समजावून सांगितले. तो रडायला लागला. त्याला समजेल अशा भाषेत मग सांगितलं, ‘आपल्याला पाहिजे ती गोष्ट मिळत नसेल, तर वाट बदलून बघायची असते मित्रा… चालणं थांबवायचं नसतं…!.. ‘पानगळीत झाडं आपली पिकलेली पानं फक्त बदलतात येड्या … आपलं मूळ नव्हे !’ 

सोमवारी २५ सप्टेंबरला विक्रीसाठी याला लागतील त्या सर्व गोष्टी घेऊन दिल्या आहेत. विक्रीची जागा बदलली आहे… एक कुटुंब सावरलं आहे. बायकोच्या ज्या ओढणीने तो गळफास घेणार होता, तीच ओढणी, आता तो गळ्याभोवती गुंडाळून काम करतो…!  त्याच्या गळ्या भोवती पडलेले काळे निळे व्रण आणि झालेल्या जखमा आता हीच ओढणी झाकते… ! 

२ .  परिस्थितीच्या चटक्यांनी पोळलेले… पत्नीवर निस्सिम प्रेम करणारे… पण तिच्याकडूनच फसवले गेलेले… भ्रमिष्ट होऊन, रस्त्यात एक्सीडेंट होऊन पडलेले एक बाबा…!  २३ तारखेला शनिवारी रस्त्यावरच यांची दाढी कटिंग करून, आंघोळ घालून यांना उपचारासाठी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. पूर्ण बरे झाल्यानंतर, यांचे पुढे काय करायचे… याची दिशा भविष्यात समजेल… ! 

बाबांनी आतापर्यंत जगलेलं आयुष्य… त्यांचे झालेले विश्वासघात, हे सर्व ऐकून मी सुद्धा अंतर्बाह्य हलून गेलो होतो. 

शेवटी एकच समजलं ..  ” विश्वास किंमती असतो पण धोका खूप महाग… !!!” 

याच बाबांचा संपूर्ण आयुष्यपट “कुणी जीव घेता का जीव ?” या दीर्घ लेखात स्वतंत्रपणे मांडला आहे. 

वैद्यकीय

१.  एक वेळ अशी येते.. आई बाप थकून आणि सुकून जातात… गळून पडतात…. तेवढ्यात सुना, किंवा मुलं येतात, माने खाली हात घालून उठवतात… सुकलेल्या निर्जीव डोळ्यात तेवढ्यापुरती जान येते …चकाकी येते… सुकलेली ती पानं मग हरखून भावुक होवून विचारतात, ‘ मला कुठे नेत आहात ?’ 

समोरचा निर्विकारपणे सांगतो, ‘ जाळायला नेतोय… हल्ली सुकलेलं सरपण मिळतंय कुठं…??? ‘

अशी अनेक सुकलेली लाकडं आम्हाला रस्त्यावर ठिकठिकाणी मिळतात…. आम्ही आधी या लाकडांना शुचिर्भूत करतो, त्यानंतर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतो… झालेल्या सर्व जखमांवर फुंकर मारून, पुन्हा या जुन्या खोडातून पालवी फुटावी यासाठी प्रयत्न करतो. ! 

या महिन्यात अशा तीन अतिगंभीर रुग्णांना ऍडमिट केले आपल्या आशीर्वादाने ते जगले आहेत. 

त्यांची कर्मकहाणी इथे किंवा स्वतंत्र लेखात मांडावीशी वाटते, परंतु साहित्यातला बीभत्स रस सुद्धा इथे ओशाळेल, म्हणून संयमाने आणि नाईलाजाने थांबतो … !!! 

२. याव्यतिरिक्त रस्त्यावरील खरोखरचे गरजू ओळखून त्यांना कुबड्या, वॉकर, काठ्या, व्हील चेअर, मानेचे तथा कमरेचे पट्टे अशी वैद्यकीय साधने दिली आहेत.  त्याचप्रमाणे त्यांच्या रक्त लघवीच्या सर्व तपासण्या करून रस्त्यावरच त्यांना वैद्यकीय उपचार केले आहेत…. हेतू एकच …. बरं झाल्यानंतर स्वाभिमानानं यांनी काहीतरी काम करावं आणि सन्मानानं माणूस म्हणून जगावं…!

अन्नपूर्णा प्रकल्प

खिशाला छिद्र पडलं की पैशाच्या आधी नाती गळून पडतात ही आजची वस्तुस्थिती आहे ! 

बापाच्या शर्टाला पदर नसतो आणि आईच्या पदराला खिसा नसतो… तरीही आईबाप आपल्या मुलाबाळांना झाकायला…  त्यांना काही द्यायला… कधीही कमी पडत नाहीत…! 

पण जेव्हा बापाच्या खिशाला छिद्र पडतं किंवा आईचा पदर फाटतो , त्यावेळी मात्र त्यांची किंमत तुटलेल्या आणि झिजलेल्या पायताणासारखी होते…

वापरून फेकलेली अशी बरीच पायताणं आम्हाला रस्त्यावर जागोजागी उकिरड्यावर भेटतात…! आमच्या अन्नपूर्णा प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही अशा उकिरड्यावर पडलेल्या किंवा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असणाऱ्या किमान २०० गोरगरीबांना, रोज…. हो दररोज…. जेवणाचे डबे हातात देत आहोत. 

कोविडच्या पहिल्या लॉकडाऊन पासून सुरू केलेला आमचा हा प्रकल्प,  आजतागायत आपल्या आशीर्वादाने दररोज सुरू आहे…. ! 

खराटा पलटण

खराटा पलटण म्हणजेच Community Cleanliness Team ! 

अंगात व्यवसाय किंवा नोकरीचे कोणतेही कौशल्य नसणाऱ्या प्रौढ / वृध्द महिलांची एक मोळी बांधून, त्यांच्याकडून पुण्यातील अस्वच्छ भाग स्वच्छ करून घेत आहोत, त्या बदल्यात त्यांना पगार किंवा किराणा माल देत आहोत. या महिन्यातही खराटा पलटणाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी स्वच्छता केली आहे आणि त्या बदल्यात टीममधील प्रत्येकाला पंधरा दिवस पुरेल इतका कोरडा शिधा दिला आहे. 

आपण सर्वांनी सुद्धा कोणतीही गोष्ट “भीक” म्हणून देण्यापेक्षा त्यांना सन्मानानं “मजुरी” द्यावी अशी माझी आपणास विनंती आहे. 

आमच्या या सर्व महिला पुणे महानगरपालिकेच्या “स्वच्छता अभियान च्या ब्रँड अँबेसिडर” म्हणून सध्या चमकत आहेत. 

भीक नको बाई शिक

आपल्या माध्यमातून भीक मागणाऱ्या पालकांच्या ५२ मुलांना दत्तक घेतलं आहे, आणि त्यांच्या सर्व शैक्षणिक गरजा पूर्ण केल्या आहेत. 

माझ्या पूर्व आयुष्यावर मी जे पुस्तक लिहिलं आहे, त्याची विक्री करतो आहे. या विक्रीतून येणारा पैसा मुलांच्या शिक्षणासाठी वापरत आहे. 

आमचा हा संपूर्ण प्रवास आहे… भिक्षेकऱ्यांना  कष्टकरी बनवण्याचा… माणूस म्हणून त्यांना जगणं शिकवण्याचा…. !!! कोणत्याही प्रवासात, महत्वाचं काय असतं ? प्रवास सुखकर झाला …? नाही, हे फारसं महत्वाचं नाही…!  प्रवासात खूप अडचणी आल्या …? नाही, हेही फारसं महत्वाचं नाही, त्या तर येणारच …! 

मग ? इच्छित स्थळी पोचला नाहीत अजून ??? …. यालाही फारसं महत्व नाही, रोज थोडं थोडं चालतोय, इच्छित स्थळ येईलच कधीतरी …! 

अरे…. मग महत्त्वाचं काय…. ??? .. महत्त्व असतं, प्रवासात दिलेल्या सोबतीला….! 

चालताना दम लागला तर, पाठीवरून मायेनं फिरवलेल्या हाताला…!! 

धावताना तहानेनं जीव व्याकुळ झाला असता, ओंजळभर पाणी पाजणाऱ्या त्या ओंजळीला….!!! 

खाच खळगे पार करताना, कधी ठेच लागते, अंगठा रक्ताळतो… वेदना आपल्याला होते…. आणि अश्रू समोरच्याच्या डोळयात असतात… महत्त्व असतं त्या समोरच्या थेंबभर अश्रूला….! 

तुम्ही सर्वजण हेच तर करताय…. माझ्या या प्रवासात “सोबत” राहून….! 

आणि म्हणून “आपल्या सोबतीने” झालेल्या या प्रवासाचा लेखाजोखा आपणास सविनय सादर….!

सफर अहम नही…. मंजिल भी अहम नही…

अहम है…. सफर मे मिली हुई साथ….!!! 

प्रणाम  !!!

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ या भाळांवर कुंकवाचा सूर्य रेखूया… (तिसरा माळ) – जीवनसंघर्षरत एक दुर्गा ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆या भाळांवर कुंकवाचा सूर्य रेखूया… (तिसरी माळ) – जीवनसंघर्षरत एक दुर्गा ☆ श्री संभाजी बबन गायके 

नव-याला सोडलं असलं तरी कपाळावरचं कुंकू आणि गळ्यातला काळा मणी यांपासून वत्सलामावशींनी फारकत म्हणून घेतली नाही. पदरात एक ना अर्धे…तीन मुलं. त्यात पहिल्या दोन मुली आणि तिसरा कुळाचा कुलदीपक. सासरचं घर सोडताना वत्सलामावशींनी नव-याचा प्रचंड विरोध डावलून मुलाला सोबत आणलं होतं. “ मला तुमचं काही नको…आणि माझ्या मुलांनाही तुमच्या या पापाच्या दौलतीमधला छदामही नको ” असं म्हणून मावशींनी कर्नाटकामधलं ते कुठलंसं गाव सोडलं आणि महामार्गावरून जाणा-या एका मालवाहू वाहनाला हात केला.

“ कित्थे जाणा है, भेन? ” त्या मालट्रकच्या सरदारजी चालकाने वत्सलामावशींना प्रश्न केला. “ दादा,ही गाडी जिथवर जाईल तिथवर ने ! ” असं म्हणून मावशींनी ट्रकच्या क्लिनरच्या हातावर दोन रुपयांची मळकी नोट ठेवली. “ ये नोट नहीं चलेगी ! ” त्याने कुरकुर केली. त्यावर चालकाने “ओय..छोटे. रख्ख !” असा खास पंजाबी ठेवणीतला आवाज दिल्यावर क्लिनरने मावशीची तिन्ही मुलं आणि मावशींना हात देऊन केबिनमध्ये ओढून घेतलं आणि स्वत: काचेजवळच्या फळीवर तिरका बसला. आरशातून तो मावशींना न्याहाळत होता जणू. सरदारजींनी त्याला सरळ बसायला सांगितले आणि ट्रक पुढे दामटला.

वत्सला जेमतेम विवाहायोग्य वयाची होते न होते तोच तिच्या वडिलांनी तिला दूर खेड्यात देऊन टाकली होती. त्यांना नव्या बायकोसोबत संसार थाटायचा होता आणि त्यात वत्सला बहुदा अडसर झाली असती. तरी बरं त्या स्वयंपाकपाण्यात, धुण्याधाण्यात पारंगत झाल्या होत्या, त्यांची आई देवाघरी गेल्यापासूनच्या काही वर्षातच. वत्सलाबाई तशा रंगा-रुपानं अगदी सामान्य म्हणाव्यात अशा. बेताची उंची,खेड्यात रापलेली त्वचा आणि काहीसा आडवा-तिडवा बांधा. पण रहायच्या मात्र अगदी स्वच्छ,नीटस आणि स्वत:चा आब राखून. वत्सलेचे यजमान तिच्यापेक्षा डावे. सर्वच बाबतीत. उंची,रंग आणि मुख्य म्हणजे स्वभाव. त्यांची पहिली पत्नी निवर्तली होती. पण मूलबाळ नव्हतं. कसलासा व्यापार होता त्यांचा. बाकी नावालाच मोठं घर आणि घराणं….संस्कारांची एकही खूण त्या घरात दिसत नव्हती. घरात दिवंगत तरुण माणसांच्या काही कृष्णधवल तसबीरी टांगलेल्या होत्या. पण ती माणसं कशामुळे गेली हे विचारायची सोय नव्हती. एकतर कानडी भाषेचा अडसर होता आरंभी. नंतर सरावाने समजायला लागले…सर्वच. गावातल्या जमीनदाराचा उजवा हात म्हणून दबदबा असलेला नवरा….जमीनदाराच्या सावकारकीचा हिशेब याच्याच चोपडीत लिहिलेला. कर्जाचे डोंगर डोक्यावरून उतरवू न शकणा-या गोरगरीबांच्या जमिनी सावकाराच्या नावे करून घेण्यात सरावाने वाकबगार झालेला माणूस. एखाद्याला बरणीतलं तूप काढून देताना आपल्या हाताला माखलेलं तूप माणूस पोत्याला थोडंच न पुसतो….ते तुपाचे स्निग्ध कण जिभेवर नेण्याची सवय मग अधिकाधिक वाढत गेली आणि कधीही वाल्मिकी होऊ न शकणारा वाल्या उत्पन्न झाला. स्वत:चा स्वतंत्र व्यवसाय सुरू करून त्यात सर्वमार्गे धनसंपदा घरात येत गेली. घरात माणसांची वानवा नव्हती आणि कामाचीही. वत्सलाबाईंचा ऐहिक संसार इतरांसारखा ठरलेल्या मार्गावरून वाटचाल करू लागला आणि वत्त्सलाबाई घरात प्रश्न विचारण्याएवढ्या मोठ्या आणि धीट झाल्या. तोवर तीन मुलं घातली होती पदरात नियतीने. वत्सलेचे प्रश्न टोकदार आणि थेट होते. यजमानांच्या खात्यावर आता धन आणि काळ्या धनासवे येणारे यच्चयावत अवगुणही जमा होत होते. नव-याने,सासु-सास-यांनी छळ आरंभला आणि त्याची परिणती म्हणून आज तीन मुलांना घेऊन वत्सलाबाई अनोळखी दिशेला निघाल्या होत्या.

कर्नाटकाच्या सीमा ओलांडून ट्र्क मराठी मुलखात शिरला. दुकानांच्या मराठी पाट्या वाचत वाचत मुलं सावरून बसली होती. आपण कुठे निघालो आहोत याची त्यांनाही कल्पना नव्हती. वाटेत सरदारजी काहीबाही विचारत राहिले आणि वत्सलाबाईंनी पंजाबी-मिश्रीत हिंदी अजिबात समजत नसली तरी कर्मकहाणी सांगितली आणि त्या दणकट शरीराच्या पण मऊ काळजाच्या शीखाला समजली…. “ तो ये गल है? वाहेगुरू सब चंगा कर देंगे ! “ त्याने अ‍ॅल्युमिनियमचे चंदेरी कडे घातलेला हात आकाशाकडे नेत म्हटलं.

रात्रीचे आठ वाजत आलेले होते. जकात नाक्याच्या पुढच्या वळणावर सरदारजींनी ट्र्क उभा केला आणि म्हणाले, “ भेनजी…उतर जावो. मैं तो अभी सड्डे ट्रांसपोर्ट ऑफिस जाऊंगा !

वत्सलेने या नव्या भावाकडे असे काही पाहिले की त्याने ट्रकचं इंजिन बंद केलं. सरदारजीचा स्वत:चा ट्र्क होता तो. पंजाबमधून महाराष्ट्रात येऊन स्वत:ची ट्रांसपोर्ट कंपनी काढायची होती त्यांना. औद्योगिक परिसराच्या जवळच एक ट्रक टर्मिनल उभं रहात होतं. त्यातलीच एक मोकळी जागा विकत घेऊन त्यांनी पत्र्याचं शेड ठोकून तात्पुरतं कार्यालय थाटलं होतं. आणि त्याला तो नसताना ते सांभाळणारं कुणीतरी पाहिजे होतं. राहण्याचा जागेचा प्रश्न मिटत होता. मराठी मुलूख होता. वत्सलाबाईंनी होकार दिला.

झाडलोट करणं, ट्रांसपोर्टसाठी आलेल्या मालावर लक्ष ठेवणं आणि बारीक सारीक कामं सुरू झाली. तिस-याच महिन्यात सरदारजींनी दोन नवे ट्रक घेतले. कार्यालय मोठे झाले. त्यांनी वत्सलाबाईंची पत्र्याची खोली आता पक्की बांधून दिली. परिसरात आणखी बरीच ट्रांसपोर्टची कार्यालये, गोदामं उभी रहात होती. चालक,मेकॅनिक,क्लिनर इत्यादी मंडळींचा राबता वाढू लागला. त्या परिसरात राहणारी एकमेव बाई म्हणजे वत्सलाबाई. तिथून जवळची मानवी वस्ती हाकेच्या अंतरावर नव्हती. चहापाण्याला,जेवणाला चालक-क्लिनर लोकांना थेट हायवेवरच्या ढाब्यांवर जावे लागे. सरदारजींना विचारून वत्सलामावशींनी आपल्या खोलीतच चहा आणि अल्पाहाराचे पदार्थ बनवून विकायला आरंभ केला. चव आणि मावशींचे हात यांचं सख्य तर होतंच आधीपासूनचं. माणसं येत गेली, ओळखीची होत गेली.

घरादारांपासून दूर असलेली ती कष्टकरी चालक मंडळी. त्यात त्यांच्या आयुष्यात आलेल्या अपरिहार्य पण अस्विकारार्ह गोष्टी. एकटी बाई पाहून त्यांच्या नजरांत होत जाणं नैसर्गिक असलं तरी वत्सलाबाईंचा अंगभर पदर, कपाळावरचं ठसठशीत कुंकू,गळ्यातला काळा मणी आणि जीभेवरचं आई-बहिणीसदृश मार्दव. वत्सलाबाई आता सगळ्यांच्याच मावशी झाल्या. आणि काहींच्या बहेनजी ! त्या ड्रायव्हर, क्लिनर मंडळींच्या घरची,मुलाबाळांची आवर्जून चौकशी करायच्या. कधी नसले कुणापाशी पैसे तर राहू दे…दे सवडीनं म्हणायच्या. आणि लोकही मावशींचे पैसे कधी बुडवत नसत.

दरम्यान मुली मोठ्या होऊ लागल्या होत्या. त्यांना मात्र मावशींनी सर्वांच्या नजरांपासून कसोशीने दूर ठेवलं. त्याही बिचा-या मुकाट्यानं रहात होत्या. लहानपणी जे काही लिहायला-वाचायला शिकल्या होत्या तेवढ्यावरच त्यांना थांबायला लागले. पण वागण्या-बोलण्यात अगदी वत्सलामावशी. काहीच वर्षांत मावशीच्या दूरच्या नातलगांना मावशींचा ठावठिकाणा लागला. अधूनमधून कुणी भेटायला यायचं.

सरदारजींनी जवळच शहरात प्लॉट घेऊन बंगला बांधला. आपले कुटुंब तिथे आणले. आऊटहाऊस मध्ये मावशींचे घरटे स्थलांतरीत झाले. आता पोरींची शाळा सुरू झाली जवळच्याच नगरपालिकेच्या विद्यामंदिरात. धाकटा लेकही आता हाताशी आला. पण त्या पठ्ठ्याला ड्रायव्हरकीचा नाद लागला आणि त्याने मावशींच्याही नकळत लायसेंस मिळवलं आणि ते सुद्धा अवजड वाहनांचं. मावशींनी मात्र चहा-नाश्त्याचा व्यवसाय सुरूच ठेवला…शरीर साथ देईनासं झालं तरीही.

सरदारजी पंजाबातल्या आपल्या मूळगावी गेले तेंव्हा सारा बंगला मावशींच्या जीवावर टाकून गेले होते…गेल्या कित्येक वर्षांत त्यांनी विश्वास कमावला होताच तेवढा. घर सोडून आल्यानंतर उभं आयुष्य मावशींनी एकटीच्या बळावर रेटलं होतं. स्वाभिमानने जगल्या होत्या. पै न पै गाठीला बांधून ठेवली…लेकी उजवताना लागणार होता पैसा..थोडा का होईना.

दोन्ही मुलींना स्थळं सांगून आली. दोघींची लग्नं एकाच दिवशी होणार होती. मावशींचा इतिहास आडवा नाही आला. इतक्या वर्षांच्या अस्तित्वात मावशींनी चारित्र्यवान वर्तनाची,प्रामाणिकपणाच्या खुणा वाटेवर कोरून ठेवल्या होत्या. विपरीत परिस्थितीत संस्कार सोडले नाहीत,मुलांनाही देण्यात कमी पडल्या नाहीत.

कसे कुणास ठाऊक, पण लग्नाच्या आदल्या रात्री मावशींचे यजमान येऊन थडकले. वाल्याचे पाप कुणीही स्विकारले नव्हते..अगदी जवळच्यांनीही. पैसे,जमीन होती शिल्लक काही, पण कुणाच्या डोळ्यांत डोळे घालून बोलण्याइतपत पत नव्हती राहिली. मावशी काहीही बोलल्या नाहीत.

दिवसभर ट्रांसपोर्ट कंपनीच्या आवारातच कार्य पार पडलं. पंजाब,हरियाणा,केरळ,बंगाल….भारतातल्या प्रत्येक राज्यातील एक न एक तरी व-हाडी हजर होता लग्नाला…अर्थात पुरूषांच्या त्या मेळ्यात एकही स्त्री मात्र नव्हती. मराठी लग्नसोहळा पाहून ती परप्रांतीय माणसं कौतुकानं हसत होती. सरदारजी मालक सहकुटुंब आले होते. त्यांनाही ट्रकच्या रस्त्यात उभं राहून हात करणा-या वत्सलामावशी आठवत होत्या…आणि त्यांच्या सोबतची लहानगी मुलं.

सायंकाळी पाठवणीची वेळ आली. मावशींनी व्यवस्थित पाठवणी केली. एका ट्रकवाल्यानं सजवलेल्या मिनीट्रक मधून दोन्ही नव-या सासरी घेऊन जाण्याची तयारी केली होती…..गाडीभाडं आहेर म्हणून वळतं करण्याच्या बोलीवर ! एकंदरीतच चाकांच्या त्या दुनियेत दोन संसारांची चाकं अग्रेसर होत होती.

मुली निघून गेल्या चिमण्यांसारख्या…भुर्र्कन उडून. त्यांना आता नवी घरटी मिळाली होती हक्काची. व-हाडी आणि इतर मंडळी निघून गेली. मंडप तसा रिकामा झाला. वत्सलाबाईंनी लाडू-चिवड्याच्या पुड्या बाहेर खुर्चीवर बसलेल्या त्यांच्या नव-याच्या हातावर ठेवल्या आणि त्याला वाकून नमस्कार केला. आणि पलीकडे काथ्याच्या बाजांवर बसलेल्या ड्रायवर मंडळींकडे पाहून म्हणाल्या…’ कर्नाटका कोई जा रहा है अभी?’

एक चालक उठून उभा राहिला. मैं निकल रहा हूं मौसी थोडी देर में. त्यावर वत्सला मावशी नव-याकडे हात दाखवून म्हणाल्या…’ इनको लेके जाना1 और हाँ….भाडा नहीं लेना. तुमसे अगली बार चाय-नास्ते का पैसा नहीं लूंगी !’ 

असं म्हणत वत्सलामावशी लग्नात झालेल्या खर्चाच्या नोंदी असलेल्या वहीत पाहण्यात गर्क झाल्या….त्यांच्या यजमानाला घेऊन निघालेल्या ट्र्ककडे त्यांनी साधं मान वळवूनही पाहिलं नाही ! धुळीचा एक हलका लोट उठवून ट्रक निघून गेला…वत्सलाबाईंच्या डोळ्यांत त्यांच्या नकळत पाणी उभं राहिलं….पण आत मनात स्वाभिमानाच्या भावनेनं रिंगण धरलं होतं…एका बाईनं एक लढाई जिंकली होती…एकटीनं !

….. नवरात्रीनिमित्त ही दुर्गा मांडली. चारित्र्य, सचोटी, प्रामाणिकपणा, जिद्द, मार्दव, कर्तृत्व, करारीपणा आणि धाडस ह्या अष्टभुजा उभारून जीवनसंघर्षरत असलेली दुर्गा. संदर्भांपेक्षा संघर्ष केंद्रस्थानी ठेवून लिहिले. 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares