मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गौरीमाय… ☆ सुश्री नीता कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ गौरीमाय… ☆ सुश्री नीता कुलकर्णी

“ अगं आई तू…..”

“ लेकरा माझ्या आगमनाची तयारी सुरू केलीस म्हणून आधीच तुला भेटायला आले ..मी येणार म्हणून  तुला काय करू काय नाही असं होतं… त्याचं मला समाधान वाटतं… पण खूप काम करून दमून नको जाऊस.. सण साजरा करताना त्यातला आनंद घ्यायला शिक.

आता लेकी बाळी नोकरी करणाऱ्या दिवसभर काम करणाऱ्या असतात. त्याच घराची खरी लक्ष्मी आहेत हे विसरू नकोस… त्या आनंदात असतील तर घर सुखात असतं…

उगीच स्वतःचा मोठेपणा दाखवायला जाऊ नकोस. हे केलंच पाहिजे ते केलंच पाहिजे असं म्हणत बसू नकोस. त्यांनी काही बदल सुचवला तर बदल कर .. आणि बदल करताना मनात भीती नको ग  ठेवूस… माझ्यावर प्रेम करतेस ना मग मला भ्यायचं कशाला   ……आपल्या घराण्यात अशीच परंपरा आहे ….हे पालुपद  तर अजिबात लावू नकोस….पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. घरात खाणारी माणसं होती.  आता तसे नाहीये हे लक्षात घे.

माझ्यासाठी हे करतेस ना…. मनातल एक  खरं सांगू …

… मला हे काही नको असतं ग…

आल्या दिवशी तू केलेल्या भाजी भाकरीवर मी तृप्त असते…

घरोघरी जाऊन तुम्ही सर्वजण सुखात आहात… हे मला बघायचं असतं…. तुमच्याशी  बोलायचं असतं..

मायेनी प्रेमानी त्या ओढीनी मी येते ग….घडीभर माझ्याजवळ नुसती बसत जा …मला बरं वाटेल बघ..

डेकोरेशनच्या गडबडीत पहिला दिवस जातो.  दुसऱ्या दिवशी जेवणाची गडबड..

हो आणि अजून एक सांगायचे आहे … करायलाच हव्यात म्हणून भाज्या कोशिंबिरी भजी वडे सगळं करतेस..  संपत नाही ग सगळं… मग राहिलेल्या अन्नाचं काय करतेस ते आठव बरं….

हे योग्य आहे का ?

शेतकरी बिचारा राब राब राबतो त्या अन्नाचा आदर कर… आणि संपेल इतकंच कर..

चार पदार्थ कमी केले म्हणून बाळा मी तुझ्यावर रागवेन का ग कधी ….

मला ओळखतेस ना तू …मग आता शहाणी हो …

खेड्यात  काहीजण राहिलेलं अन्न गाईला घालतात … पण गायी त्या  शिळ्या अन्नाला तोंड लावत नाहीत…

फार नासाडी होते ग अन्नाची …बघवत नाही म्हणून आधीच तुला समजावून सांगायला आले आहे

सणाची मजा घे…

हसत आनंदात सण साजरा कर…

यावेळेस फार छान साडी  घेतली आहेस  माझ्यासाठी…  आवडली बरं का…

आणि सुनबाईनी घेतलेलं नव्या पद्धतीचं गळ्यातलं झकासच…

.. ..  आता सजून घ्यायला आणि तुम्हा सगळ्यांना भेटायला येते की….

आणि हे बघ आईच ऐकायचं…. आईचा लेकीला सांगायचा हक्कच असतो ना… म्हणून बाळा प्रेमानी सांगतीये ……  तशी तू समजूतदार शहाणी आहेसच

…  आता भेटू आपण  लवकरच …

© सुश्री नीता कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मराठी मातीतलं शिल्पगीतरामायण ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ मराठी मातीतलं शिल्पगीतरामायण ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

ग.दि.मां.नी शब्दांचं रामायण बाबुजी सुधीर फडके यांच्या स्वरांतून अमर करून ठेवलं. हे शब्द जोवर मराठी माणूस या जगतात असेल तोवर नादब्रम्हांडात गुंजत राहतील. आधुनिक वाल्मिकी म्हणून कीर्ती प्राप्त झालेले ग.दि.मा.मराठी मातीत होऊन गेले याचा मराठी माणूस म्हणून अभिमान वाटतो. 

शब्दांना भाषेच्या मर्यादा पडतात हे प्रभूंना ठाऊक असावे म्हणून त्यांनी चित्रांना, शिल्पांना, सूरांना, रंगांना शब्दांपेक्षा अधिक पटीने व्यापक बनवले! पाषाणात,मृत्तिकेत आकाराला आलेली शिल्पं तर जणू सहस्रवदनांनी आपली कथा ऐकवत असतात आणि जणू दाखवतही असतात. 

तुलना करणं मोठ्या धाडसाचं असलं तरी गदिमांनंतर प्रभू रामचंद्रांची कथा मराठीत आणि गाण्यात  सांगण्याचं भाग्य कित्येक वर्षांनंतर एका मराठी माणसाला लाभावं हा मोठा योगायोग…! 

पण यावेळी कथा शब्दांतून नव्हे तर शिल्पांतून मूर्तीमंत समोर उभी राहणार आहे. चित्रांतून प्रतिमा उभ्या राहतील, त्या चित्रांवर आधारित शिल्पं मातीतून घडतील आणि या शिल्पांचे साचे तयार होतील आणि या साच्यांबरहुकूम पाषाणांतून मूर्ती उभ्या राहतील….रामललांच्या, प्रभु श्री रामचंद्रांच्या भव्यदिव्य जन्मस्थान मंदिराभोवतीच्या प्रदक्षिणा मार्गावर ! प्रभुंसह सीतामाई,बंधू लक्ष्मणजी,भरतजी,भक्तश्रेष्ठ हनुमानजी यांचे   दर्शन घेऊन भाविक मंदिर प्रदक्षिणा करायला निघतील तेव्हा ते प्रत्यक्ष रामायण अनुभवत, बघत पुढे पुढे जात राहतील आणि पुन्हा फिरून त्या रघुरायाच्या सामोरे उभे राहतील.

प्रभुंचा जन्म ते त्यांनी वनवास संपवून अयोध्येत परत येणे ह्या दरम्यानची सर्व कथा सुमारे शंभर शिल्पस्वरूपात सादर करणे ही कल्पनाच मुळात मोठी सुरेख आहे. मंदिर प्रदक्षिणा ही दर्शनाएवढीच महत्त्वाची मानली जाते. एका अर्थाने भक्त देवाला आपल्या तनमनात साठवून घेत घेत त्याच्या राऊळाभोवतीचं चैतन्य देहात साठवून घेत असतो आणि ते घेऊन आपल्या जीवनप्रवासात रममाण होत असतो. यासाठी ही शिल्पं घडवणारे हातही तेवढेच तोलामोलाचे पाहिजेत…म्हणून श्री राम मंदिर निर्माण करणा-या ज्येष्ठ-श्रेष्ठांनी देशभरातून हजारभर कलाकारांना आमंत्रित केले. प्रसिद्ध चित्रकार श्री.वासुदेव कामत यांनी ही शंभर चित्रे काढून तयार ठेवली आहेत. या चित्रांवरून हुबेहुब त्रिमिती मॉडेल्स तयार करायची आणि या मॉडेल्सबरहुकूम पाषाणांतून सर्व शिल्प घडवून घ्यायची अशी योजना होती. सर्वच कलाकारांनी देवाची सेवा म्हणून अक्षरश: जीव ओतून काम केले. पण प्रभुंचा प्रसाद यापैकी कुणा एकालाच मिळायचा होता… त्यासाठी प्रभुंनी मराठी मातीतल्या, मातीतून सृष्टी निर्माण करण्याची अदभूत कला अंगी असणा-या एका नम्र मराठी कलाकाराची निवड केली… प्रमोद दत्तात्रय कांबळे हे या दैववंताचे नाव… मुक्काम अहमदनगर ! 

गावाच्या नावाप्रमाणेच वागण्यात,बोलण्यात कोणतेही कानामात्रे, उकार, वेलांट्या,अनुस्वार नसलेलं व्यक्तिमत्व म्हणजे प्रमोद कांबळे. वडील दत्तात्रय कलाशिक्षक आणि दत्तभक्तानुग्रहित. प्रमोद कांबळे यांनी अत्यंत हलाखीच्या स्थितीतून पुढे येत मायानगरी मुंबईत चित्रकलेची-शिल्पकलेची जादू दाखवली. पुढे कर्मभूमी अहमदनगर मध्ये परतून कलाविश्व निर्माण केलं. प्रभू रामचंद्रांचं पूर्णाकृती चित्र असं जिवंत केलं  होतं की प्रभुंच्या चित्रातील त्यांच्या गळ्यातील यज्ञोपवीतातला धागा चिमण्या तोडून घेण्याचा प्रयत्न करीत होत्या. प्रमोदजींचा कलाप्रवास हा स्वतंत्र लेखनाचा आणि चर्चेचा विषय आहे.   

नानाजी देशमुख आणि तत्कालीन राष्ट्रपती महोदय अब्दुल कलाम साहेबांची शाबासकीची थाप पाठीवर पडलेला कलाकार काही सामान्य असेल काय? भारतीय लष्कराचा पहिल्या पसंतीचा शिल्पकार असणंही काही कमी महत्त्वाचं नाही. भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचा आवडीचा मूर्तीकार असणं, आंतराराष्ट्रीय किर्ती मिळवत शेकडो हातांना काम आणि नवोदित कलाकारांना घडवणं हेही सोपे काम नाही. आयुष्यभर कमावलेले सारे कलावैभव स्टुडिओला लागलेल्या भयावह आगीत डोळ्यांसमोर जळून राख होताना पाहूनही पुन्हा त्या राखेतून ताकदीनं उभा राहणारा हा कलाकार… प्रमोद कांबळे. यांच्या हातातील मातीतून आपल्या प्रभुंचा जीवनालेख पाषाणातील शिल्पांमधून सगुण साकार होणार आहे.. याचा तमाम मराठीजनांना अभिमान वाटेलच आणि प्रभुरामचंद्रांप्रतीच्या भक्तिभावाने भरलेली आणि भारलेली हृदयं प्रमोदजी कांबळेंना आशीर्वाद आणि शुभेच्छा देतीलच, यात शंका नाही. पुढील वर्षी प्रभुंचे मंदिर दर्शनासाठी उघडेल… कोटयवधी भक्त प्रदक्षिणा मार्गावर चालत असतील…एका मराठी कलाकाराच्या कलाविष्कारातून साकारलेली रामकथा… शिल्पांतून ऐकू येत असलेलं गीतरामायण… ते डोळ्यांत साठवत साठवत पुढे जाताना म्हणतील..जय श्री राम… राम प्रभु की सभ्यता, दिव्यता का ध्यान करिये ! 

(अहमदनगर येथील सुप्रसिद्ध चित्र-शिल्पकार श्री प्रमोद दत्तात्र्य कांबळे यांना अयोध्येतील श्री राममंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर उभारण्यात येणार असलेल्या पाषाण-शिल्पांच्या मातीतल्या थ्रीडी मॉडेल्स बनवून देण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. अनेक दूरचित्रवाहिन्या, वृत्तपत्रे यांनी हे वृत्त प्रसिद्ध केलेले आहे. हा लेख मी सहज परंतू मराठी माणसाच्या अभिमानाने लिहिला आहे.) 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “गीता आणि ज्ञानेश्वरी…” – ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै. ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “गीता आणि ज्ञानेश्वरी…”  ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै. ☆

“गीता आणि ज्ञानेश्वरी यात काय फरक आहे?” सखीने प्रश्न विचारल्यावर मी तिच्याकडे बघतच बसले.

“विचार करून सावकाश उत्तर दिलेस तरी चालेल.” सखीने उदार मनाने मला सवलत दिली.

मी म्हणाले, “गीता आणि ज्ञानेश्वरी यात आई मुलीचे नाते असावे. निश्चित फरक मला सांगता येणार नाही; पण ज्ञानेश्वरी मराठी भाषेत असल्याने, तिची भाषा गीतेपेक्षा अलीकडची असल्याने, अधिक विस्तृत असल्याने संकल्पना अधिक स्पष्ट होतात आणि मनाला अधिक तृप्तता येते. ज्ञानेश्वरी वाचनाने वेगळा दृष्टिकोन गवसतो. “

सखी: “उदाहरण दे.”*

हिचं डोकं आहे की प्रश्नपत्रिका हा प्रश्न गिळून, मनात ठेवून मी म्हटले,”भुंगा आणि कमळ म्हटले की काय आठवते?”

सखी: “कमळातील मधाचा मोह झाल्याने भुंगा रात्रभर कमळात अडकून पडतो.”

मी: “बरोबर. आपल्याला आजवर हेच सांगितले गेले आहे. गीताही सांगते की अपेक्षा हे दुःखाचे, बंधनाचे मूळ कारण आहे. पण असे असेल तर भ्रमर वृत्ती चांगली मानली गेली नसती. हे उलगडताना माऊली म्हणतात, कोणत्याही गोष्टीचा अर्थ लावताना सर्व बाजूने विचार करायला हवा.

भ्रमराला लाकडातून बाहेर यायचा मार्ग सापडत नाही, म्हणून लाकूड पोखरून बाहेर येतो. लाकूड पोखरणाऱ्या भुंग्याला कमळ पोखरणे अशक्य नाही. परंतु लाकूड आणि कमळ यातील भेद तो जाणतो. रात्र सरेल, सकाळ झाली की पाकळ्या उमलतील आणि आपण मुक्त होऊ, हे त्याला माहीत असते.

जी गोष्ट आपोआप होणार आहे, त्यासाठी विनाकारण कष्ट घ्यायचे, अस्वस्थ व्हायचे कारण नाही. काही कर्म करावी लागतात, तर काही साध्य होण्यासाठी योग्य वेळ यावी लागते. काही वेळा कष्ट घ्यावे लागतात तर काही वेळा धीर धरावा लागतो.

कृती आणि संयम यापैकी कधी काय करायचे, ते कळणे म्हणजे ज्ञान. गीतेचा कृतीवर भर आहे, तर ज्ञानेश्वरीचा संयमावर, सदसद् विवेक बुद्धीवर आहे.ज्या कमळातील मकरंद खाल्ला, त्याला छेद देणे  अयोग्य आहे. कमळाच्या कोमल सहवासात राहणे, सकाळ झाली की निघून जाणे, जास्त संयुक्तिक आहे.

गुळाला मुंगळा चिकटून राहतो त्याप्रमाणे पाकळी उमलल्यावर भुंगा कमळाला चिकटून रहात नाही. पोखरत नाही ही कृतज्ञता आणि निघून जातो ही अलिप्तता, दोन्ही गोष्टी माणसात असतात, त्यासाठी फक्त आत्मचिंतन करण्याची गरज असते.

आत्मचिंतन का करावे? हे सांगताना माऊली म्हणतात की प्रत्येक माणसाचा उपजत कल ओळखण्यासाठी आत्मचिंतन करावे. त्यासाठी एका जागी डोळे मिटून काहीही न करता सातत्याने, नियमित शांत बसावे. काहीच न करणे म्हणजे बाह्य गोष्टीकडे आकर्षित न होता स्वतःच्याच मन म्हणजे भावना आणि बुद्धी म्हणजे विचारांकडे लक्ष केंद्रीत करावे. निसर्ग ही खूप मोठी शक्ती आहे, पुरेसा वेळ दिला तर आपल्याला वैश्विक शक्तीशी जोडते.

कमळ म्हणजे बुद्धी,

भ्रमर म्हणजे मन,

पाकळ्या म्हणजे चक्षु,

रात्र म्हणजे अज्ञान,

सकाळ म्हणजे मोक्ष  असाही अर्थ होतोच.

प्रत्येक गोष्टीच्या अनेक मिती असतात. सर्व मिती लक्षात येणे, माणसाला शक्य नाही.

पण माणूस जी प्रतिक्रिया देतो, त्यावरून त्याचा कल लक्षात येतो.

ध्यान करावे हे गीता सांगते, का करावे हे ज्ञानेश्वरी सांगते.

माणूस एखाद्या शब्दाचा काय अर्थ घेईल, हे त्याच्या धरणाशक्तीवर अवलंबून असते. म्हणून लोकांकडे, बाह्य जगाकडे लक्ष न देता स्वतःच्या प्रेरणेकडे लक्ष द्यावे, हे ज्ञानेश्वरी वाचून कळते.

गीता बुद्धीला खाद्य पुरवते आणि ज्ञानेश्वरी मनाला ताब्यात ठेवायला शिकवते.

पूर्ण टाळून मनाने त्याचा विचार करण्यापेक्षा थोडा अनुभव घेऊन मनाने अलिप्त व्हावे, हा भ्रमर वृत्तीचा अर्थ माऊली सांगतात.

कृतीपेक्षा कल्पना माणसाला जास्त अधोगतीला नेते.

 गीता भक्ती शिकवते.डोळ्यांना दिसते त्यावरून, एकच बाजू जाणून निष्कर्ष काढू नये, ही सबुरी ज्ञानेश्वरी वाचताना येते.

गीता वाचली की छान वाटते, अहंकार सुखावतो. ज्ञानेश्वरी वाचल्यावर आपल्याला काहीच माहीत नाही, ही जाणीव होते. शब्द वाचता येतात पण अर्थ कळण्यासाठी मनन करावे लागते, ही जाग ज्ञानेश्वरी वाचून येते.

गीता शास्त्र असेल तर ज्ञानेश्वरी त्याचा वापर कसा करायचा ते सांगते.

सकारात्मक विचार करायला गीता शिकवते. नम्र रहायला ज्ञानेश्वरी शिकवते.

“काय करावे” ते गीता सांगते. “कसे करावे” हे ज्ञानेश्वरी वाचून कळते.                     

संग्राहिका :सौ. राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आल्या गौराई अंगणी… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

सौ.वनिता संभाजी जांगळे

🌸 विविधा 🌸

☆ आल्या गौराई अंगणी… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

गौरी गणपतीचा सण म्हटले की ,आपल्या आनंदाला सिमाच नसते. लहानांपासून थोरांपर्यंत उत्साह भरलेलेला असतो. गल्ली-गल्लीतून गणरायांच्या स्वागताची तयारी सुरू होते. ढोलतासे , लेझीम ही वाद्ये सुर धरण्यास सज्ज होतात.सगळीकडे आनंदाचे , जल्लोषाचे वातावरण असते. पण या सगळ्यात गोरी गणपतीचा सण म्हटले की ,खेड्यातून  विशेष करून कोकणातून लक्ष वेधले जाते ते झिम्मा-फुगडीच्या खेळाकडे .  गणपतीचे आगमण झाले की तिसर्‍या दिवशी  जेष्ठागौरीचे आगमण होते. तेंव्हा तरी स्त्रियांमधील उत्साह शिगेला पोहचतो. तेंव्हा हा खेळ खेळला जातो.

विशेष म्हणजे झिम्मा-फुगडीचा खेळ हा खेड्यातून जास्त खेळला जातो.  नागपंचमीच्या सणानंतर या खेळाची तालीम सुरू होते .तसे पाहिले तर हे दिवस शेतावरील हातघाईच्या कामाचे दिवस आसतात . तरीसुध्दा दिवसभर थकूनभागून आलेली बाई  रात्री बारा-एक वाजेपर्यंत आपला कंटाळा विसरुण या खेळात दंग होते. जणू झिम्मा -फुगडीच्या खेळातून ती आपल्या कष्टाचा शीण घालविते. इतकी ती या खेळात रमून जाते.  गौरी गणपतीच्या  पारंपारिक गाण्यांवर एकमेकींच्या हातात हात गुंफून फेर धरला जातो. तेव्हा बाईचे एकमेकीच्या सोबतीने एकजूट असणाऱ्या संघटित रूपाचे दर्शन दिसून येते. आपला कंटाळा,  सुख-दुःख, व्यथा , संकटे हे सर्वकाही विसरुण बाई या खेळात दंग होते.

काही दशकापुर्वीचा विचार केला तर बाई सणासुदीच्याच निमित्ताने घरा बाहेर यायची. या झिम्मा-फुगडीच्या खेळात तर स्वतःस पूर्ण झोकून द्यायची. फेर झिम्मा , उडत्या चालीचा झिम्मा ,फुगडी  ,मंगळागौरीचे खेळ यात ती देहभान विसरुण रमायची. झिम्मा-फुगडीच्या पारंपरिक गाण्यातून ती आपले माहेर ,सासर  ,सर्व नातीगोत्यांना तसेच बाईचे जगणे , तिचे राहणीमान  हे सर्व गोवत असे. यातून खेड्यातील  तिच्या संस्कृतीचे दर्शन घडायचे. लोकपरंपरेतून चालत आलेला आणि आपला सांस्कृतिक  वारसा जपणारा हा झिम्मा-फुगडीचा खेळ आजही तितकाच लोकप्रिय आहे.  गाण्याच्या तालावर धरला जाणारा ठेका आणि गमती-जमतीचे हावभाव हे सर्व पाहणारे सुध्दा दंग होतात .  ग्रामीण स्त्रीया विस-पंचवीस जणींचा मेळ करून गावचौकीत रात्री एकत्र येतात  आणि या खेळात रमून जातात. झिम्मा-फुगडी खेळाच्या विविध प्रकारातून बाईच्या शरिराचा सुध्दा व्यायाम होतो.

झिम्मा फुगडी ,मंगळागौर हे खेळ आपल्या महाराष्ट्रीय संस्कृतीचे विशेष आकर्षण आहे. मला या खेळाचे जास्त विशेष वाटते ते  खेड्यातील ग्रामीण स्त्री या खेळातून मनातून मोकळी होते. एरवी तिचे कष्टाचे हात शेतकाम  ,घरकाम  ,मोलमजूरीत बांधलेले असतात. पण गौरी गणपतीचा सण आला की आपले दागीणे,  साडी, चोळी याकडे तिचे लक्ष वेधते. घरातील साफसफाई पासून गौराईचे स्वागताची तयारी ती खुपच आनंदाने आणि उत्साहात करते .सणाची सगळी तयारी आटपून ती कितीतरी वेळ या खेळात जाऊन रमते. चारचौघी एकत्र येतात. भेटीगाठी होतात. माहेरवाशीण परतून येते. जिवाभावाच्या मैत्रीणी भेटतात. तसे सणवार आला की, आम्हा स्त्रीयांचा उत्साह अगदी शिगेलाच पोहचतो.  पण ग्रामीण स्त्रीला मात्र सणातून मिळणारा   हा आनंद वेगळाच.तिच्या दैनंदिन जीवनातून मिळणाऱ्या आनंदापेक्षा थोडा वेगळा आनंद. हा आनंद ती आपल्या सणासुदीच्या विविध चालीरूढीतून व्यक्त करू शकते. तिचा आनंद सणासुदीच्या काळात शिगेला पोहचतो. आणि गौरी-गणपतीचा सण म्हटलेकी ,माहेरच्या आठवणी जागून नकळत ओठावर गीत येते ,

”  बंधू येईल माहेरी न्यायला

गौरी गणपतीच्या सणाला “

आणि

” बंधू रे शिपाया  ,दे मला रूपाया

गौरीच्या सणाला रे ,चोळीच्या खणाला “

तसेच

“रूणूझुणूत्या पाखरा, जा माझ्या माहेरा”,

अजून म्हणजे गौराईच्याअलंकाराचे लेणं सांगताना गीत आहे

” पाटाची आरूळी बाय, पाण्यानं तुंबली

आमची गौराई इथं का बसली, का जोडव्या रूसली

…पाटल्या रूसली,.. डोरल्या रूसली”

असे एक एक करून अलंकार गोवले जातात. आणि हे सगळे बाईच्या रंग रूपाचे वर्णन आहे .इत्यादी गाण्याच्या ठेक्यावर झिम्मा रंगात येतो. अशी कितीतरी पारंपारिक गाणी आहेत ज्यांच्या अर्थामध्ये आपण खोल जाऊ तितकेच ते आपणास भावूक करतात.या गाण्यांचा अर्थ शोधत गेलो तर त्या काळच्या स्त्रीयांचे राहणीमान ,त्याचे जगणे, सुख-दुःख, सासर-माहेरचा अभिमान ,नात्यांचा आदर  अशा कित्येक बाबींच्या तळाशी आपण जाऊ. आज आपणा स्त्रीयांना स्वातंत्र्य आहे ते पुर्वीच्या स्त्रीयांना नव्हते. अगदी काही दशकांपुर्वीचा विचार केला तर बाई ही घर आणि संसार याच साखळदंडात बांधलेली होती. मग जात्यावरच्या ओव्यांतुन म्हणा नाहीतर सणासुदीच्या या पारंपारिक गाण्यातून ती व्यक्त होत होती.

झिम्मा-फुगडी हा फक्त खेळ नाही  तर तो एका पिढीने दुसर्‍या पिढीला दिलेला आपला सांस्कृतिक वारसा आहे. हा खेळ  त्यामधील  गाणी हे एकेकाळी बाईचे संपुर्ण जगणे आहे. आपण सगळ्याजणींनी हा सांस्कृतिक वारसा जतन करणे आणि येणाऱ्या पिढीला देणे हे आपले कर्तव्य आहे. आपला हा सांस्कृतिक वारसा चिरकाल टिकून रहावा हेच मागणे मी गणरायाकडे मागते.

© सौ.वनिता संभाजी जांगळे

जांभुळवाडी-पेठ, ता. वाळवा , जि. सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दि लास्ट एम्परर… भाग-२ – लेखक : श्री राज ठाकरे ☆ श्री सुनीत मुळे ☆

??

☆ दि लास्ट एम्परर… भाग-२ – लेखक : श्री राज ठाकरे ☆ श्री सुनीत मुळे ☆

(याच चित्रपटातली ‘अब के बरस भेज भैया को बाबूल’ आणि ‘ओ पंछी प्यारे’सारखी दोन अतिशय मोहक, मधाळ गाणी आशाताईंनी गायली आहेत. या गाण्यांना दुय्यम म्हणायची हिंमत कोणी करील का?) – इथून पुढे —

‘कारवाँ’ या चित्रपटाचं उदाहरण घ्या ना, तिथं नायिकेवर म्हणजे आशा पारेखवर चित्रीत झालेलं ‘दैया ये मैं कहां आ फसी’ हे गाणं आशाताईंनी गायलं आहे आणि अरुणा इराणीवर चित्रित झालेलं ‘दिलवर दिल के प्यारे’ हे गाणं दीदीचं आहे. अशी बरीच उदाहरणं देता येतील. ज्या सातत्यानं आशाताई गाणी गात राहिल्या, ते तर अफाट आहे, विस्मयजनक आहे.

‘उमराव जान’ हा चित्रपट म्हणजे आशाताईंचा अक्षरशः पुनर्जन्म होता. त्यांच्या कारकीर्दीचा मोठा आणि यशस्वी टप्पा तोवर होऊन गेला होता. एक प्रकारचा ठहराव त्यांच्या कारकीर्दीत आला होता. त्याच सुमारास अचानक ‘उमराव जान’ आला. दीदी त्यांच्या स्थानी अढळ होत्याच; तरीही संगीतकार खय्याम यांच्या ‘उमराव जान’नंतर आशाताईंच्या गायकीला, लोकप्रियतेला मिळालेली झळाळी अभूतपूर्व होती आणि अगदी या क्षणापर्यंत ती उंची तशीच कायम आहे.

मी ‘प्रभुकुंज’समोरून जातो, तेव्हा मनात येतं, की भारताचा सांगीतिक इतिहास लिहायचा म्हटलं, तर या इमारतीच्या एकाच मजल्यावर किमान २५ हजार गाणी आहेत. काजव्यांनी लगडलेलं एखादं झाड असावं, तशी ही इमारत गाण्यांच्या लखलखत्या सुरांनी लगडलेली आहे. असा चमत्कार जगात कुठं तरी असेल का? साक्षात प्रभूचंच तिथं वास्तव्य आहे, असं म्हणायला हवं. या सगळ्या पुरुषप्रधान उद्योगामध्ये या दोन बायकांनी अक्षरशः राज्य केलं. देश पातळीवर असा दरारा असणाऱ्या केवळ तीनच स्त्रिया मी पाहिल्या आहेत. एक लता मंगेशकर, दुसऱ्या आशा भोसले आणि तिसऱ्या इंदिरा गांधी.

एस. डी. आणि आर. डी. यांची बरीच गाणी ईशान्य भारतातील लोकगीतांवर बेतलेली आहेत. तिथल्या पारंपरिक संगीताचं सौंदर्य या दोघांनी हिंदी गाण्यांत अतिशय नजाकतीनं ओतलं आहे. ‘हम दोनों दो प्रेमी दुनिया छोड चले’ हे ‘अजनबी’मधलं गाणं ऐकून बघा किंवा ‘हरे राम हरे कृष्ण’मधलं ‘कांची रे कांची रे’ ऐकून बघा. अशा खूप चाली तयार झाल्या असतील. आपण त्या दीदी किंवा आशाताईंच्या आवाजात ऐकतो, तेव्हा मूळ चालींचं ते वेगळंच रूप असतं. मूळ ट्यूनपासून केवळ स्फूर्ती घेतलेली असते, बाकीची निर्मिती संगीतकाराची असते, गायक ते अधिक फुलवतो.

‘बाळासाहेब म्हणजे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्यासमोर दोन केवढे सक्षम पर्याय होते. एखादं गाणं दीदीला द्यावं, की आशाताईंना असा त्यांना प्रश्न पडत असेल,’ असं लोक अनेकदा म्हणतात; परंतु मला त्याहीपेक्षा पंचम यांचं जास्त कौतुक वाटतं. आशाताई तर त्यांच्या पत्नी होत्या; परंतु त्यांनी किती बरोब्बर वाटणी केली आहे बघा गाण्यांची. दीदींचं गाणं दीदींना, आशाताईंचं आशाताईंना. ‘हमशक्ल’ नावाचा चित्रपट होता, राजेश खन्ना आणि तनुजाचा. तनुजा वेडी असते आणि तिला वेड्यांच्या रुग्णालयात ठेवलेलं असतं. त्यातलं गाणं आहे, ‘देखो मुझे देखो, कैसी मैं दिवानी हूँ’ हे गाणं ऐका. त्या गाण्याची स्केल बघा. एक तर पंचम यांनी ते बसवलंच खूप वेगळं आणि आशाताईंनी काय गायलंय बघा. व्यक्तिरेखा ‘वेडी’ आहे, तो वेडेपणा सुरांमधून बरोब्बर थ्रो करायचा, म्हणजे काय आव्हान होतं! त्यात सुरुवातीला आशाताई अगदी एखाद्या वेडीसारखं हसल्यादेखील आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या कडव्याची चाल पूर्ण वेगळी आहे. वरच्या पट्टीतून थेट खालच्या पट्टीत गाणं येतं; पण आशाताईंनी ते सहजपणे पेललं आहे. ‘जवानी दिवानी’मधल्या ‘जाने जां ढूंढती फिर रहीं हूँ’मधले चढ-उतार ऐका. ‘ज्वेलथीफ’मधलं ‘रात अकेली है’ ऐका. ‘अनहोनी’ या चित्रपटातल्या ‘मैने होठों से लगाई तो हंगामा हो गया’ यातली मदहोशी अनुभवा. राजेश रोशन यांनी संगीत दिलेल्या ‘मिस्टर नटवरलाल’मधलं ‘आनेवाला, आयेगा आनेवाला’ बघा. त्या गाण्यात केवढे चढ-उतार आहेत. ही गाणी ऐकल्यावर मग तुम्ही थेट ‘ज्यूली’मधलं राजेश रोशननं संगीत दिलेलं भजन ऐका, ‘सांचा नाम तेरा…’ काय जबरदस्त भजन आहे. त्यात सोबत उषाताईही आहेत. या गाण्यात आशाताईंचा आवाज भक्तीरसात अगदी ओथंबलेला आहे. ही रेंज कल्पनातीत आहे.

आशाताईंना खाण्याची आणि खिलवण्याची आवड आहे. एकदा मी आशाताईंच्या घरी जेवायला गेलो होतो. संपूर्ण टेबल वेगवेगळ्या पदार्थांनी भरलं होतं. लॉबस्टर, प्राँझ, बांगडा, पापलेट, मटण, चिकन, बिर्याणी… तुम्ही नाव घ्या, तो पदार्थ टेबलवर होता. मी विचारलं, ‘आणखी कोण कोण आहेत जेवायला?’ त्या म्हटल्या ‘तुम्ही एकटेच आहात.’ मी हसून विचारलं, ‘अहो आशाताई, मला काय भस्म्या लागला का?’ तर मला म्हणाल्या, ‘सगळं खाऊ नका; पण सगळं खाऊन बघा. प्रत्येक पदार्थाची फक्त चव बघा.’ त्या दिवशी मला सुगरण या शब्दाचा खरा अर्थ कळला. गाणं असो की खाणं, प्रत्येक गोष्ट आशाताई जीव ओतून करणार. त्या साक्षात शारदा आहेत आणि साक्षात अन्नपूर्णही आहेत!

‘पुलं’चंच एक वाक्य आहे, ते सखाराम गटणेला म्हणतात, ‘करोडो लोकांमधून एक असा जन्माला येतो, ज्याच्या आयुष्याला जीवन म्हणतात. बाकीच्यांचं फक्त आयुष्य असतं.’ दीदी आणि आशाताई यांच्या जगण्याला जीवन म्हणतात. त्यांनी आपलं आयुष्य त्यांच्या गाण्यांनी समृद्ध केलं, सुसह्य केलं. त्यांना नव्वदी निमित्त त्रिवार शुभेच्छा !

– समाप्त – 

लेखक : श्री राज ठाकरे

प्रस्तुती –  श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पॉझिटिव्ह ऍटिट्यूड… ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ पॉझिटिव्ह ऍटिट्यूड ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ⭐

एक  आई डायनिंग टेबलाजवळ चिंतीत होऊन बसून होती.

कारण नेहमीचेच!

मार्च एंड असल्यामुळे इन्कम टॅक्स भरणे भाग होते.

घरातील सर्व कामे तर करायचीच होती, वर उद्या होळीच्या निमित्ताने बरेच पाहुणे जेवायला येणार होते.

या सगळ्या गोष्टींमुळे ती त्रस्त झाली होती.

जवळच तिची १० वर्षांची मुलगी आपल्या वहीत काहीतरी लिहीत होती.

तिने मुलीला विचारले, “काय करतेयस?”

मुलगी म्हणाली,

“आज Teacher नी होमवर्क दिला आहे. विषय आहे ‘Negative thanks giving’ आणि सांगितले आहे की अशा गोष्टींवर निबंध लिहा की ज्या आपल्याला सुरुवातीला आवडत नाहीत, पण नंतर आवडायला लागतात.”

आईनं आश्चर्य व्यक्त करून वही बघायला घेतली.

बघू या आपल्या मुलीने काय लिहीलंय.

मुलीने लिहीलं होतं –

“मी माझ्या वार्षिक परीक्षेला धन्यवाद देते, कारण त्यानंतर उन्हाळी सुट्टी चालू होते.

मी त्या सर्व कडू आणि खराब चवीच्या औषधांना धन्यवाद देते, कारण त्या घेतल्यावरच माझी तब्येत चांगली होते.

मी गजराच्या घड्याळाला धन्यवाद देते, कारण पहाटे पहाटे तेच मला मी अजूनही जिवंत असल्याचे सांगत असते .”

वाचता वाचता आईच्या मनात विचार आला की –

“अरे, माझ्याकडे पण अशा अनेक गोष्टी आहेतच की; ज्यांच्या साठी मी धन्यवाद व्यक्त करू शकते.”

विचार करता करता खूप बाबी समोर आल्या.

“Income Tax द्यावा लागतो याचाच अर्थ सुदैवाने माझ्याकडे चांगल्या पगाराची नोकरी आहे.”

“घरी भरपूर काम करावं लागतं, म्हणजेच माझ्याकडे एक घर, एक हक्काचे आश्रयस्थान आहे.”

” सणासुदीला मला खूप माणसांसाठी जेवण बनवावे लागते, म्हणजेच मला भरपूर नातेवाईक आहेत, जे माझ्या सुख दुःखाचे साथीदार आहेत.”

गोष्टीचे तात्पर्य –

प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन महत्त्वाचा….

चला, आपणही असाच Positive Attitude ठेवून आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस सोनेरी बनवूया.

संग्राहिका :सौ. प्रज्ञा गाडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “शेतकरी शेतमाल आणि भाव….” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

🌸 विविधा 🌸

☆ “शेतकरी शेतमाल आणि भाव…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

खरं म्हणजे याबाबतीत कित्येक वर्षै तेच चर्वित चर्वण ऐकतो आहे. शेतमालाला भाव का मिळत नाहीत ?  तसं पाहिलं तर भाज्या महाग झाल्या तर असा किती फरक कोणाचेही बजेटमध्ये पडणार आहे ?  नाही म्हणलं तरी कांदे बटाटे हे सुद्धा शंभरीच्या जवळपास अनेक वेळेला जाऊन आलेले आहेत. शेतमालाचे भाव वाढले की सगळ्यांचेच एकदम वाढत नाहीत. कुठल्यातरी  दोन तीन गोष्टींचेच भाव वाढतात. बाकीच्यांचे कमीच असतात. त्यामुळे ज्यांना बजेट सांभाळायचे आहे त्यांनी जास्त भाव असलेल्या भाज्या काही दिवस खाऊ नयेत.  भाव वाढले तरी किती दिवस वाढलेले राहतात? महिना दोन महिन्यात पुन्हा शेतकऱ्याला भाव मिळत नाहीतच. शेतकऱ्यांच्या हिताची सगळीच सरकारे येऊन गेली. प्रत्येक सरकार शेतकरी हिताचे निर्णय घेते असे म्हणतात.  तरीही शेतकऱ्यांना शेतमालाला भाव मिळावेत यासाठी आंदोलन करावेच लागते.  अगदी शरद जोशींच्या रस्ता रोको पासून आम्ही पाहतो आहोत.  कोणतेही सरकार शेतमालाच्या भावाच्या बाबतीत उदासीन का असते ? शेतमालाचे भाव वाढल्यास साधारण  मध्यमवर्गीयांमध्येच काहीशी नाराजी पसरते.  मला असे वाटते की मध्यमवर्गीयांची मते ही कोणत्याही पक्षाच्या दृष्टीने महत्त्वाची असतात. कारण तेच मोठ्या संख्येने मतदान करणारे मतदार असतात.  या मतदारांच्या नाराजीला घाबरून कोणतेही सरकार शेतमालाच्या भावांबद्दल निर्णय घेत नाही असे वाटते.

खरं म्हणजे सगळ्याच शेतमालाचे कमीत कमी भाव म्हणजेच बेसलाईन एकदा ठरवून घ्यावी आणि दरवर्षी सरकारी कर्मचाऱ्यांना जशी महागाई निर्देशांकाप्रमाणे वाढ मिळते त्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या भावालाही महागाई निर्देशांका प्रमाणे वाढ मिळावी असे ठरवून टाकावे.  काय हरकत आहे ? सर्व पक्षांनी येत्या निवडणुकीत आम्ही निवडून आल्यावर शेतमालाच्या भावासंबंधी आम्ही काय करणार आहोत आणि शेतमालाला नक्की कमीत कमी किती भाव देणार आहोत हे जाहीर करून मते मागावीत. शेतकऱ्यांकडे पैसा आला तर शेतकरी तो खर्च करतोच. शेतकऱ्याकडून पैसा खर्च झाला की तो मार्केटमध्ये येतो. मार्केटमध्ये आला की मार्केट सुधारेल. मार्केट सुधारल्यावर उत्पादन सुधारेल उद्योग सुधारतील.  संपूर्ण अर्थव्यवस्थाच मजबूत होऊ शकेल असे आपले माझ्या अल्पमतीला वाटते. यात अडचण काय आहे हे सुद्धा सर्व राजकीय लोकांनी एकदा जाहीर करावे.  पण आम्ही शेतकरी हिताचे निर्णय घेणार एवढेच म्हणून मते मागून सत्ता मिळाल्यावर, कुठलाही शेतकरी हिताचा निर्णय घेतला जात नाही. असे मागील पन्नास साठ वर्षे मी पाहतो आहे. तर मला वाटते एकदा असे होऊन जाऊ द्या. सर्व राजकीय पक्षांनी ते निवडून आल्यानंतर शेतमालाला कमीत कमी कसा आणि किती भाव देतील आणि त्याची अंमलबजावणी कशी करतील हेच त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात जाहीर करून टाकावे.  आहे कोणी डेरिंगबाज? अर्थात जो कधीच निवडून येऊ शकणार नाही अशांनी डेरिंग दाखवण्यात अर्थ नाही हेही खरे. परंतु महत्त्वाच्या मोठ्या राजकीय पक्षांनी याबाबत निश्चित योजना आकडेवारी सह जाहीरनाम्यात जाहीर करावी. करा तर खरं एकदा डेअरिंग! माझ्यासारखे मध्यमवर्गीय सुद्धा नक्की मत देतील अशा डेरिंगबाजांना !

©  श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

Email: [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दि लास्ट एम्परर… भाग-१ – लेखक : श्री राज ठाकरे ☆ श्री सुनीत मुळे ☆

??

☆ दि लास्ट एम्परर… भाग-१ – लेखक : श्री राज ठाकरे ☆ श्री सुनीत मुळे ☆

‘प्रभुकुंज’मध्ये मी एकदा ‘विम्बल्डन’ची एक जबरदस्त मॅच पाहिली होती. मी आणि लतादीदी सोफ्यावर गप्पा मारीत बसलो होतो. तेवढ्यात समोरून मीनाताई आल्या. आमच्या गाण्यांबद्दलच्या गप्पा ऐकून त्याही बसल्या. मग ‘अगं दीदी, ही हरकत अशी नाही, अशी आहे’ वगैरे त्या सांगू लागल्या. इतक्यात उषाताई आल्या, त्या गप्पांत सामील झाल्या. या गप्पा सुरू असल्याचं पाहून हृदयनाथजी आले आणि तेही गाण्यांबद्दल अधिक माहिती देत सामील झाले. मग दीदींनी ‘अरे बाळ. ते गाणं कुठलं’ वगैरे विचारणं सुरू झालं. वेगवेगळ्या गाण्यांच्या आठवणी निघू लागल्या, त्या गाण्यांचे मुखडे गायले जाऊ लागले, गाण्यांची बरसात सुरू झाली आणि त्याच क्षणी समोरून आशाताई आल्या. आशाताई आल्यावर त्या गप्पांची लज्जत अशी काही वाढली, की मला ऐकायला दोन कान कमी पडू लागले. माझ्यासाठी तर रॉजर फेडरर, नदाल, जोकोविच, अँडी मरे, बोर्ग, बेकर हे सगळे जणू एकाच वेळी खेळत होते. ‘दीदी, हे गाणं तसं नाही गं’, ‘आशा, ही ओळ अशी होती’, ‘उषा, ते जरा गाऊन दाखव बरं…’ मी फक्त आणि फक्त श्रवणभक्ती करीत होतो. हे सगळं सलग काही तास सुरू होतं. त्या गप्पा आणि चर्चा रेकॉर्ड करता आल्या असत्या, तर ती चिरंतन स्मृती राहिली असती. मला आजही ती हुरहूर लागून राहिली आहे. ‘आपण किती भाग्यवान आहोत’ असं वाटणारे जे मोजके क्षण आयुष्यात येतात, त्यातला हा एक क्षण होता. दीदी आज आपल्यात नाहीत. सुदैवानं आशाताई आहेत आणि त्यांच्या वयाची नव्वदी साजरी होताना आपण पाहत आहोत. एका अभिजात, श्रेष्ठ आवाजाची नऊ दशकं! आपल्याला अवर्णनीय आणि कालातीत असा आनंद देणारी नऊ दशकं!

मी त्या विशिष्ट काळाचा जेव्हा जेव्हा विचार करतो, तेव्हा मला आशाताई शम्मी कपूरसारख्या वाटतात. शम्मी कपूरसमोर राज कपूर होते, देव आनंद होते, दिलीपकुमार होते. या सगळ्यांनी चित्रपटसृष्टीचा अवकाश व्यापला होता. त्यांच्या प्रचंड लोकप्रियतेतून मार्ग काढत, शम्मी कपूर यांनी मोठं यश मिळवलं. स्वतःची वेगळी शैली प्रस्थापित केली. नृत्याची वेगळी स्टाइल लोकप्रिय केली. सोलो फिल्म हिट करून दाखवल्या. हे तीन दिग्गज समोर असताना इतकं सगळं करून दाखवणं महाकठीण होतं. आशाताईंच्या बाबतीतही आपल्याला तेच म्हणता येईल. साक्षात दीदी समोर असताना, गीता दत्तसारखी व्हर्सटाइल गायिका ऐन भरात असताना, आधीच लोकप्रिय झालेल्या शमशाद बेगम, सुरैया या गायिका असताना, स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणं, ही खरं तर अशक्यप्राय भासणारी गोष्ट होती; पण आशाताईंनी ती करून दाखवली. आजबाजूला चौफेर प्रतिभांचा सुकाळ असतानाही, शम्मी कपूर यांनी आपल्या नावाचा स्वतंत्र ब्रँड तयार केला; तशीच किमया आशाताईंनीही करून दाखवली.

उत्तुंग काम केलेले काय एकेक कलावंत होऊन गेले आहेत! आजच्या क्षणाचा विचार केला, तर ज्या व्यक्ती हयात आहेत, त्यात केवळ आशाताई या एकच अशा आहेत, की ज्यांना ‘भारतरत्न’ मिळायला हवं. भारताच्या सांगीतिक क्षेत्राकडं पाहिलं, तर माझ्या मते, संगीताच्या क्षेत्रातली आपली जी श्रेष्ठ आणि संपन्न परंपरा आहे, त्यातील आशाताई ‘लास्ट एम्परर’ आहेत. अखेरच्या सम्राज्ञी आहेत. एकाच घरात दोन दोन ‘भारतरत्न’ कसे देता येतील वगैरे सारखे प्रश्न विचारणं हा निव्वळ मूर्खपणा आहे. एका घरात दोन महान व्यक्ती जन्माला आल्या आहेत, त्याला काय करणार? ही जर भारताची रत्नं नसतील, तर मग कोण आहेत? ‘भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत’ असं आपण तोंडानं म्हणतो; परंतु ‘भारतरत्न’ देण्याची वेळ आली, की प्रत्येक जण आपापल्या प्रांतातली नावं पुढं करतो. ‘भारत माझा देश आहे’ हे साफ विसरून जातो.

आशाताईंना दुय्यम गाणी मिळाली, असं अनेकांना वाटतं. मला काही ते फार पटत नाही. दुसरं म्हणजे, त्या काळात फक्त ओ. पी. नैयर यांनीच आशाताईंना नायिकेची आणि महत्त्वाची गाणी दिली, या म्हणण्यातही तथ्य नाही. ओपीनं गाणी दिली हे खरं आहेच, त्याबद्दल वादच नाही. ‘आँखो से जो उतरी है दिल में’, ‘आओ हुजूर तुम को’, ‘ये है रेशमी जुल्फों का अंधेरा’, ‘आईये मेहरबाँ’ अशी पन्नास-शंभर गाणी मी लागोपाठ सांगू शकेन. या दोघांच्या गाण्यातलं कुठलं अधिक चांगलं, ते कसं ठरवणार आपण? एकाच ताटात आमरसाची वाटी असेल आणि श्रीखंड असेल, तर त्यातलं कुठलं अधिक चांगलं, ते कसं सांगणार? प्रत्येकाची स्वतःची चव आहे आणि ती तेवढीच श्रेष्ठ आहे; तसंच या गाण्यांचं आहे.

त्या काळातली आशाताईंनी म्हटलेली एस. डी. बर्मन यांची गाणी बघा. मी काही उदाहरणं सांगतो. ‘सुजाता’मधलं ‘काली घटा छाए मोरा जियरा तरसाए’, ‘काला बाजार’मधलं ‘सच हुए सपने तेरे’, ‘बंबई का बाबू’मधलं ‘दिवाना मस्ताना हुवा दिल…’ कसली अफाट गाणी आहेत ही! दीदी आणि एस. डी. बर्मन यांच्यात त्या काळात काही कारणानं वाद झाला होता, म्हणून आशाताईंना ही गाणी मिळाली, असं म्हणणंही साफ चुकीचं आहे. त्या वादामुळं कदाचित चार गाणी जास्त मिळाली असतीलही; परंतु दीदींशी संबंध उत्तम असतानाही एस.डी.नं अत्यंत वेगळी आणि महत्त्वाची अनेक गाणी आशाताईंना दिली आहेत. नायिकांची गाणी आशाताईंना मिळाली नाहीत, असं उगाचच कुणी तरी हवेत पसरवलेलं आहे. हजारो गाणी आहेत आशाताईंनी नायिकांसाठी गायलेली. ‘बंदिनी’ या चित्रपटाच्या वेळेस लतादीदी आणि बर्मनदा यांच्यातला वाद मिटला. त्या चित्रपटातही दीदींना दोन गाणी आहेत आणि आशाताईंनाही दोन गाणी आहेत. मला वाटतं गुलजार साहेबांचं कारकीर्दीतलं पहिलं गाणं ‘मोरा गोरा अंग लईले…’ याच चित्रपटातलं आहे आणि ते दीदींचं आहे. याच चित्रपटातली ‘अब के बरस भेज भैया को बाबूल’ आणि ‘ओ पंछी प्यारे’सारखी दोन अतिशय मोहक, मधाळ गाणी आशाताईंनी गायली आहेत. या गाण्यांना दुय्यम म्हणायची हिंमत कोणी करील का? 

– क्रमशः भाग पहिला 

लेखक : श्री राज ठाकरे

प्रस्तुती –  श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हिंदू म्हणजे काय हो ?… – लेखक : अज्ञात ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ हिंदू म्हणजे काय हो ?… – लेखक : अज्ञात ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

आपण हिन्दू आहोत हे खरे आहे परंतु, हिंदू म्हणजे काय हो???

सांगाल का???

तर मंडळी वाचा आणि एखाद्याने विचारले की हिंदू म्हणजे  काय, तर, चट्दिशी सांगता आले पाहिजे…!!!

“हिंदू” शब्द ‘सिंधु’ शब्दाचा अरबी अपभ्रंश आहे, असे आपल्याला आतापर्यंत सांगितले गेले आहे, पण, खालील लेखामध्ये ते कसे असत्य आणि दिशाभूल करणारे आहे, हे सप्रमाण सिद्ध करून दाखवले आहे.

“हिंदू” हा शब्द “हीनं दुष्यति इति|

हिन्दु: म्हणजे- ‘जो अज्ञान *आणि हीनतेचा त्याग करतो’ त्याला हिन्दू म्हणतात’.

‘हिन्दू’ हा शब्द अनन्त वर्षांपासून असलेला प्राचीन मूळ संस्कृत शब्द आहे.

या संस्कृत शब्दाचा सन्धीविग्रह केल्यास तो हीन+दू=हीन भावना+पासून दूर असलेला,मुक्त असलेला तो हिन्दू होय *आणि आपल्याला हे वारंवार खोटे सांगून फसविले जात होते, की, ‘सिन्धूचे अपभ्रंशित रूप म्हणजे हिन्दू’ हा शब्द आपल्याला मोगलांनी दिला. खरे म्हणजे ‘हिन्दू’ या शब्दाची उत्पत्ती ‘वेदकाळा पासून आणि वेदातूनच झालेली आहे, म्हणून, हिन्दू हा शब्द कुठून आला आणि त्याची उत्पत्ती कशी झाली, हे अवश्य जाणून घेऊयात, आपल्या वेद आणि पुराणातही ‘हिन्दू’ या शब्दाचा उल्लेख सापडतो.

आज आपण ‘हिन्दू’ या शब्दाची उत्पत्ती कशी झाली, ते पाहूयात… 

‘बृहस्पति अग्यम’ (ऋग्वेद) मध्ये हिन्दू शब्दाचा उल्लेख असा आलेला आहे. “हिमलयं समारभ्य यावत इन्दुसरोवरं। तं देवनिर्मितं देशं हिन्दुस्थानं प्रचक्षते।l” 

म्हणजेच … 

‘हिमालयापासून इन्दू सरोवरा (हिन्दी महासागर) पर्यन्त ईश्वर निर्मित राष्ट्र म्हणजे हिन्दुस्थान (‘हिन्दूं’ चे स्थान) होय.

केवळ ‘वेदांत’ च नव्हे, पण, ‘शैव’ ग्रंथातही ‘हिन्दू’ शब्दाचा उल्लेख असा आलेला आढळतो, “हीनं च दूष्यते एव्, हिन्दुरित्युच्चते प्रिये।”

म्हणजेच- “जो अज्ञान आणि हीनत्व यांचा त्याग करतो तो हिन्दू होय.”

कमीअधिक प्रमाणात असाच श्लोक ‘कल्पद्रुमा’तही आढळतो- “हीनं दुष्यति इति हिन्दु:।” म्हणजे- “जो अज्ञान आणि हीनत्व यांचा त्याग करतो त्याला हिन्दू म्हटले जाते.”

“पारिजात हरण” या संस्कृत नाटकात हिन्दूंचा असा उल्लेख आलेला आढळतो-

“हिनस्ति तपसा पापां,दैहिकां दुष्ट.

हेतिभिः शत्रु वर्गंच,स हिन्दुरभिधीयते।।”

.. म्हणजे,”जो आपल्या तप:सामर्थ्याने शत्रू,दुष्ट आणि पापाचा नाश करतो,तो हिन्दू होय.”

“माधव दिग्विजय,”मध्ये हिन्दू या शब्दाचा असा उल्लेख केला गेलाय- “ओंकारमन्त्रमूलाढ्य,पुनर्जन् गौभक्तो भारत:,गरुर्हिन्दुर्हिंसन दूषकः।।”

.. म्हणजे- “जोॐ काराला ईश्वर रचित रचना मानतो,ज्याची पुनर्जन्म आणि कर्मसिद्धान्त यावर श्रद्धा आहे,जो गौ पालन करतो आणि वाईटाला दूर ठेवतो, तो हिन्दू आहे.”

केवळ एव्हढेच नव्हे, तर, आपल्या ऋग्वेदात (८:२:४१) विवहिन्दू नावाच्या अति पराक्रमी आणि दानी राजाचे वर्णन आलेले आहे, ज्याने ४६००० गाईंचे दान केल्याचा उल्लेख आहे आणि ‘ऋग्वेद मंडला’तही त्याचा उल्लेख येतो.

“हिनस्तु दुरिताम्।” … ‘वाईटाला दूर सारण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे आणि सनातन धर्माचे पालन पोषण करणारे हिन्दूच आहेत.’

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ डब्यातला श्रीकृष्ण – एक सुंदर दृष्टान्त — लेखक – मनोहर कानिटकर ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ डब्यातला श्रीकृष्ण – एक सुंदर दृष्टान्त — लेखक – मनोहर कानिटकर ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

एक संन्यासी फिरत फिरत एका दुकानावरून जात होता.त्याचे सहज लक्ष गेले.त्या दुकानात बरेच लहान मोठे डबे,बरण्या होत्या.त्या संन्याशाच्या मनात सहज एक विचार आला आणि त्याने त्या दुकानदाराला एक डबा दाखवून विचारले,” यात काय आहे?” दुकानदार म्हणाला – “त्यात मीठ आहे.” संन्यासी बुवांनी आणखी एक डब्याकडे बोट दाखवून विचारले- “यात काय आहे?” दुकानदार म्हणाला- “यात साखर आहे.” असे करत करत बुवांनी शेवटच्या डब्याकडे बोट करून विचारले-“आणि यात काय आहे?” दुकानदार म्हणाला, ” यात श्रीकृष्ण आहे.”  संन्यासी अचंबित झाला आणि म्हणाला, “अरे, या नावाची कोणती वस्तू आहे?मी तर कधी ऐकली नाही. हे तर देवाचे नाव आहे.” दुकानदार संशयी बुवांच्या अज्ञानाला हसून म्हणाला,”महाराज तो रिकामा डबा आहे. पण आम्ही व्यापारी रिकाम्या डब्याला रिकामा नाही म्हणत. त्यात श्रीकृष्ण आहे असे म्हणतो.”

बुवांचे डोळे खाडकन उघडले आणि त्यांच्या डोळ्यात पाणी दाटून आले.ते ईश्वराला म्हणाले “अरे कोणत्या कोणत्या रूपाने तू ज्ञान देतोस.ज्या गोष्टीसाठी मी एवढा भटकलो, घरदार सोडून संन्यासी झालो, ती गोष्ट एक दुकानदाराच्या तोंडून मला ऐकवलीस.परमेश्वरा मी तुझा शतशः आभारी आहे”. असे म्हणून त्याने त्या दुकानदाराला साष्टांग नमस्कार केला.

जे मन-बुद्धी- हृदय काम, क्रोध, लोभ, मोह,मद,मत्सर, अहंकार,ईर्षा,द्वेष, चांगले-वाईट आणि सुख-दुःख अशा लौकिक गोष्टींनी भरले आहे, तिथे श्रीकृष्ण म्हणजेच भगवंत कसा राहील? जे रिकामे आहे म्हणजेच एकदम स्वच्छ आहे, अशाच ठिकाणी म्हणजे अशाच मन,बुद्धी व हृदयात परमेश्वर वास करतो.

लोकांना दाखवायला गीता व ज्ञानेश्वरी वाचली किंवा एकादशीला आळंदी-पंढरपूरची वारी केली, तरी मन-बुद्धी-हृदय जोपर्यंत रिकामे होत नाही, म्हणजे स्वच्छ होत नाही, तोपर्यंत परमेश्वर तिथे वास करणार नाही.

लेखक : श्री मनोहर कानिटकर 

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares