मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझ्या प्रिय भारतियांनो… 🇮🇳 ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

??

☆ माझ्या प्रिय भारतियांनो… ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

मु. पो.- ६८⁰ द. अक्षांश

दक्षिण ध्रुव, चंद्र 

उपग्रह – चंद्र

ग्रह – पृथ्वी

दि. २३ ऑगस्ट २०२३

माझ्या प्रिय भारतीयांनो, 

सर्वांना माझा स. न. वि. वि.

मी इकडे चांदोमामाच्या घरी सुखरूप पोहोचलो. काळजी नसावी. संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेणारी आजची चंद्रमोहीम फत्ते केली न् भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. अगदी भारावून गेलोय मी! तब्बल ४० दिवसांचा अथक प्रवास…. लाख्खो किलोमीटरचा! तसं पाहिलं तर, मी खूप दमलोय…. पण तुम्ही सर्वजण माझी खुशाली जाणून घ्यायला उत्सुक असाल आणि काही चांगली गोष्ट झाल्यावर ती आपल्या माणसांना शेअर केली की, आनंद अजून वाढतो ना! म्हणून पोहोचल्याबरोब्बर हे पत्र लिहीत आहे. 

दि. १४ जुलैला अवघ्या भारतीयांच्या साक्षीने माझ्या प्रवासाला सुरुवात झाली. उण्यापुऱ्या दीडशे कोटी शुभेच्छांचे गोड ओझं सोबतीला होतेच. हुरहूर, उत्सुकता, भीती आणि आपणां सर्वांच्या माझ्याकडून असणाऱ्या अपेक्षा…. यामुळे थोडं दडपण आलं होतं खरं! त्याचबरोबर चांदोबाच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचा पहिला मान ‘आपल्याला’ मिळणार म्हणून जाम खूष पण होतो !

पृथ्वीमातेपासून दूर जाताना पाय निघत नव्हता. थोडे दिवस तिच्याभोवतीच घुटमळत होतो खरा… पण दि.१ ऑगस्टला मनाचा हिय्या केला आणि चांदोबाच्या दिशेने कूच करायला सुरुवात केली. त्याच्याभोवती फिरत फिरत थोडा अंदाज घेतला. माझा दादा चंद्रयान-२ ने केलेल्या चुका (चुका नव्हे…. थोडा चुकीचा अंदाज) टाळत हळूहळू चांदोबाच्या जवळ जाऊ लागलो. आणि आश्चर्य…. चांदोबाच्या अगदी जवळ गेल्यावर तिथे दादानं, चंद्रयान-२ ने ‘welcome buddy’ म्हणत त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. दादाने केलेल्या स्वागतनं मला अजूनच स्फूरण चढलं. योग्य अशी जागा शोधून soft landing करत अलगदपणे चांदोबाजवळ गेलो. अगदी प्रेमभरानं स्वागत केलं त्याने माझं! इतका लांबचा प्रवास हिरीरीने पार पाडल्याबद्दल जवळ घेऊन कौतुकानं माझी पाठ थोपटली. त्यामुळे माझं मन अगदी भरून आलं. आत्ता तिथे पृथ्वीवर तुम्ही सर्वजण माझ्या यशस्वी landing चा सोहळा ‘ Yesssssssss, we have done it ‘ म्हणत जल्लोष करताहात. हळूच डोळ्यांच्या कडांचं पाणी टिपत एकमेकांना wish करता आहात. हे मी इतकं लांबवर असूनही अनुभवतोय. कोट्यावधी भारतीयांचे स्वप्न मी पूर्ण केलंय, याचं मला खूप खूप अभिमान वाटतोय. आपला भारत- चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिलाच आणि चंद्रावर उतरणारा चौथा देश ! एकदम भारी वाटतंय बुवा! भारताच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी कोरला गेलाय, हे नक्की…. अर्थात यामागे आपल्या इस्त्रोच्या शास्त्रज्ञांंचे अपार कष्ट आहेत आणि तुमच्या सदिच्छाही ! 

आणि अरे हो ! रशियाचे चंद्रयान Luna-25 फक्त १० दिवसच प्रवास करुन चंद्रावर पोहोचणार होतं…. तेही माझ्यानंतर निघून माझ्याआधी ! पण उतरताना त्याचं क्रॅश लॅंडिंग झालं. So sorry ! मग माझा ४० दिवसांचा प्रवास ससा-कासवाच्या गोष्टीसारखा ’ slow but steady wins the race ‘ प्रमाणे झालाय; असंच म्हणायला हवं, नाही का ?

असो…. आता थोडा फ्रेश होऊन लगेचच कामाला सुरुवात करणार आहे. फक्त १४ दिवसांच्या कालावधीत करायच्या कामांची भली मोठ्ठी यादी आहे. विक्रम व प्रज्ञान यांच्या मदतीने प्रयोग, अभ्यास, निरीक्षणेही करायची आहेत. इथं पाणी आहे का? हे पहायचं आहे. विविध नमुने गोळा करायचे आहेत. जमलं तर चंद्रयान-२दादाला भेटणार आहे मी. अर्थात इथे घडणारी प्रत्येक गोष्ट मी वेळोवेळी पृथ्वीवर कळवत राहणार आहे. एक गंमत सांगू? इथं गुरुत्वाकर्षण फारच कमी आहे. त्यामुळे अगदी तरंगत तरंगतच चालल्यासारखं वाटतं इथे ! मज्जाच मज्जा वाटतीय….

फावल्या वेळात चांदोबाशी गप्पा मारायच्या आहेत. ‘ तू एक उपग्रह नाही, आमचा नातलग आहेस. बालगोपाळांचा चांदोमामा आहेस. ते ‘चांदोमामा, चांदोमामा भागलास का?’ म्हणतच जेवतात. अंगाईगीतात तू आहेस. आमची आई तुला भाऊ मानते. तुला पाहिल्यानंतरच आमचा संकष्टी चतुर्थीचा उपवास सुटतो. तुझ्या वाटचालीनुसार भारतीय महिन्याची तिथी, सणवार साजरे होतात. युवतींच्या सुंदर चेहऱ्याला तुझी उपमा देतात( ते कितपत योग्य? इथं आल्यावर मला ते सत्य कळ्ळलं बरं) प्रेमीजन तुझीच साक्ष ठेवून आणाभाका घेतात. अनेक गाण्यांतही तू गुंफला आहेस….’ अशा खूप खूप गोष्टी त्याला सांगणार आहे. 

फारसं लिहीत नाही. बाकीचं नंतर सविस्तरपणे लिहीन. कामासंदर्भातील माहिती व फोटो  updates पाठवत जाईन ! एक सांगू….. हे पत्र लिहिताना माझ्या अंगावर कितीतरी वेळा रोमांच उभे राहिलेत आणि पत्र वाचताना तुमच्याही अंगावर उभे राहणार, हे नक्की ! 

पुन्हा एकदा …. I am proud to be an Indian! 🇮🇳

कळावे,

आपल्या सर्वांचा लाडका,

चांद्रयान -३

पत्ता – 

मु. पो. – प्रत्येक भारतीयाचे हृदय

देश –  भारत

खंड – आशिया

ठळक खूण – कर्क वृत्त 

(हिंदी महासागराजवळ)

ग्रह – पृथ्वी (सूर्यमालेतील तिसरा ग्रह)

मंदाकिनी – आकाशगंगा

लेखक : अज्ञात. 

प्रस्तुती –  सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ क्रोध जिंकायचा आहे ?… – डाॅ.सुरेश महाजन ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ क्रोध जिंकायचा आहे ?… – डाॅ.सुरेश महाजन ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

रशियात 90 ते 110 वर्षे वयाची 1कोटी लोक आहेत.…

सकाळी 5 वाजता उठुन….…

10 मिनिट मेडीटेशन 

6 किलोमिटर फिरणे 

अतिशय नियंत्रीत आहार..

खातांना आणि बोलतांना जिभेवर नियंत्रण. दैनंदिनी निर्व्यसनी

आणि आत्मविश्वास चिकाटी व नियोजन या शिदोरीवर हे रशियन औषधीची एक मात्रा/ गोळी न घेता द्रुष्ट लागावी असे आनंदी जीवन जगत आहेत. 

या नास्तीक मंडळींना राग /क्रोध  तिरस्कार द्वेष आणि अहंकार काय असतो हे संसारी असुनही  माहीत नाही.

एका  संमेलनापासून  त्यांच्या सहवासात आलेल्या माझ्या सारख्या अनेकांचा हा अनुभव.

त्यांच्या मते क्रोध हा लुळा असतो.

राग हा पांगळा असतो …

जसे उकाड्याने शुध्द दुध नासते तसे क्रोधाने स्नेह/ प्रेम/ जीवन नासते…

या लोकांना मी बुद्धाचे / विवेकानंदाचे /ज्ञानेश्वरीचे/ रामायण/ महाभारत/ सर्व संतांचे तत्वज्ञान सांगितले त्यावर या वयोवृद्धांनी या सर्वांचा सार एका वाक्यात आम्हाला सांगितला….. 

शांतीने रागाला.. 

नम्रतेने अभिमानाला..

सरळतेने मायेला 

तसेच 

समाधानाने लोभीपणाना जिंकले पाहिजे…

राग/ क्रोधावर सर्वात उत्तम उपाय म्हणजे मौन.. 

विनय/संयमाचा त्याग केला की क्रोधाचा जन्म होतो. 

नम्रतेच्या  उंचीला माप नसते. 

ज्याने क्रोध जिंकला त्याने सर्व जग जिंकले असे समजावे.

भारतात मात्र राग/क्रोध दुसर्यावर काढायचा असतो हे गृहीतचं धरले जाते… सर्वात मोठा अधिकारी सहकार्यावर रागावतो. 

हे सहकारी खालच्या  लोकांवर राग काढतात. 

हे लोक घरी येऊन बायकोवर विनाकारण राग काढतात. 

बायको लहान मुलांवर अकारण राग / क्रोध व्यक्त करते. 

निष्पाप मुलं चकित होऊन ते सुध्दा तोचं राग खेळणीला मोडूनतोडून ,  रडून व्यक्त करतात….

म्हणुनच भारतात सर्वात जास्त खेळणी तयार करण्याचे कारखाने आहेत.

संपूर्ण युरोपात राग क्रोध तर नाहीच….

पण दिवसभर हे लोकं

Sorry. 

Thank you.

Welcome किमान शंभरवेळा अगदीच आनंदाने म्हणतात…

याच्या उलट आपल्या कडे असते…

हे लोक देवपूजा कधीच करत नाही पण चोविस तास देशपुजा करतात…

 परिणामी या देशावर गुलामगिरी कधीच आली नाही. 

लंडन ते पॅरिस हा रेल्वेचा 790 किलोमिटरचा समुद्राखालुनचा दोन तासाचा प्रवास चालु असतांना अचानक आमच्या बोगीत दोन सुरक्षा महिला अतिशय नम्रपणे sorry म्हणून मला बाजूला खुर्चीच्या दिशेनं बसण्याची विनंती केली आणि मी बसलेल्या सीटवर एका मशीनद्वारे  किंचित छिद्र पडलेली सीट … फक्त 2 मिनिटात शिऊन स्वच्छ करून आभार मानून अगदी आनंदाने Welcome म्हणून निघून गेल्या…

आपल्या कडे भारतात आपण एस टी ने  /रेल्वेने प्रवास करतो. कागद/ कचरा/ थुंकी टाकून/ काही प्रसंगी सीट खराब करूनचं उतरतो आणि त्या जागी नविन प्रवाशांना Happy Journey प्रवास सुखाचा होवो म्हणुन शुभेच्छा देतो.

हि आहे गुलामगिरीत जगण्याची सवय असलेल्या भारतीयांची मनोवृत्ती….

आम्ही विमानतळावर पोहोचलो नंतर लक्षात आले की आपले मंगळसुत्र हरविले आहे. 

विमानतळावर तक्रार केली. 

एका तासात ऑटोरिक्षात पडलेले मंगळसुत्र आम्हाला अतिशय आनंदाने पोलीसांनी परत केले तेही त्यांनी आमची क्षमा मागून. 

कारण आमच्या देशाची तुमच्या देशात कृपया बदनामी करु नये या एकच अपेक्षेने… 

आपण भारतीय खुप हट्टी. 

हट्ट ही क्रोधाची बहिण. 

ती सदैव मानवासोबत असते.

क्रोधाच्या पत्नीचे नांव हिंसा. 

ती सदैव लपलेली असते. 

अहंकार क्रोधाचा मोठा भाऊ. 

निंदा/ चुगली हया  क्रोधाच्या आवडत्या कन्या. 

एक तोंडाजवळ दुसरी कानाजवळ.

 वैर  हा क्रोधाचा सुपुत्र. 

घृणा ही नात. 

अपेक्षा ही क्रोधाची आई. 

हर्षा (आनंदी) ही आपल्या परिवारातील  नावडती सुन. 

तिला या परिवारात स्थानच नसते. 

प्रत्येक भारतीय हा या परिवाराचा पारंपारिक घटक… 

परिवार त्याला सोडत नाही.. 

त्याला परिवाराला सोडवत नाही. 

अहंकार सुखाने  वाढतो..

दुःखाने कमी होतो.. 

अहंकारी (भारतीय) दुबळा असतो… 

दुबळे (ते वयोवृद्ध रशियन) अहंकारी नाहीत….

… म्हणून नेहमी हसत रहा आनंदी रहा .

लेखक : डॉ सुरेश महाजन, मुंबई

मुंबई  

माहिती संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मैत्र… लेखिका : सुश्री स्वप्नजा घाटगे – संकलक : प्रा. माधव सावळे ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ मैत्र… लेखिका : सुश्री स्वप्नजा घाटगे – संकलक : प्रा. माधव सावळे ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

एकदा सहज मी म्हणाले होते,” त्याचं आणि माझं मैत्र आहे..! “

माझी मैत्रीण पटकन मला म्हणाली,”स्वप्नजा ,मराठी ची विद्यार्थिनी ना तू?तुला मैत्री म्हणायचं आहे का? “

” नाही ग मुली,मला मैत्रचं म्हणायचं आहे..”

ती हसत म्हणाली,” बोला. आता नेहमीप्रमाणे वेगळं काहीतरी सांगणार आमची आद्यजा…”

आद्यजा हे आरतीताईने दिलेलं नांव.

मी तिचा हात हातात घेत म्हणाले,” सखी, मैत्री होत असते,ठरवावी लागत नाही. मैत्र हे सहानुभावाने आत उतरत असतं. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ना..भूता परस्परे जडो मैत्र जिवांचे…! ते माझं मैत्र!

मैत्री आणि मैत्र यात फरक आहे थोडा वेलांटीचा.पण यातला गाभा समजून घेतला न, तर आपल्यासारखे आपणच सुखी.

मैत्री दोन समविचारी, समान आवडीनिवडी, सहवास,एखाद्याचा आपल्यावर पडत असलेला प्रभाव…यामुळे होत असते.

पण मैत्र एकमेकांच्या जवळ जसेजसे जाऊ तसतसं फुलतं,बहरतं.हे फुलणं असतं ना, सखे, जाणिवेच्या पल्याड असतं.असतं ते केवळ संवेदन.शब्दांच्या पलिकडे असणारं.

त्यासाठी रोज भेटायची गरज नसते,असते फक्त एकरुप व्हायची गरज!

मी लिहिलेल्या एखाद्या शब्दातून माझ्या मनातील खळबळ,वेदना ओळखते ते माझं मैत्र!

यात परत स्त्री-पुरुष अशी गल्लत करायची नाही.

पांचालीच्या मनातील द्वंद ओळखून तिला अबोल मदत करणारा कान्हा.हे त्याचं मैत्र!

सुदामाने काही मागितले नाही,द्वारकाधीशांनी काही दिलं नाही.पण सुदामाला सारं मिळालं.हे त्याचं मैत्र!

हे असं मैत्र आपल्या आसपास असलं ना, की आपण चिंतामुक्त असतो.

हे स्त्री-स्त्री,स्त्री-पुरुष , किंवा पुरुष-पुरुष असं लेबल लावलेलं नसतंच मुळी.

जो कोणी मैत्रभावाने आपल्या हृदयाशी जोडला जातो तेव्हाच होतं ते मैत्र!

जनाला मदत करणारा,तुकोबांची गाथा परत करणारा,चोखोबांची गुरं राखणारा,नाथांच्या घरी कावड  वाहणारा, पुंडलीकासाठी अठ्ठावीस युगे विटेवर उभा राहणारा…

सखी,त्याच्याजवळ मैत्रभावाने कोण कोण गेलं, तो त्यांचा झाला…

साध्याच शब्दात बोलूया …मैत्र म्हणजे एकरुपता!

जिथे शब्देविण संवाद असतो ते मैत्र!

मांचा फोनवर आलेला वेगळा आवाज ऐकून कासावीस होणारी माझी लेक.हे तिचं आणि माझं मैत्र!

ती माझी घट्ट मैत्रीण आहे असं म्हणण्यापेक्षा, तिचं अन् माझं  ह्रदयस्थ मैत्र आहे , असं म्हणू या न!

ज्ञानदेव म्हणतात,असं मैत्र विश्वात व्हावं.

हा मैत्रभाव सहजासहजी निर्माण व्हायचा नाहीच, पण अवघडही नाही.

आपण आपल्या परीने प्रयत्न करुन आपल्या भोवतालच्या परिघात का होईना,मैत्रभाव निर्माण करायला हवा.

त्यासाठी

मनाला सतत समजवायला हवं,कुणाचा मत्सर, द्वेष, ईर्षा,वैर,कुणाकुणाच्या माघारी बोलणं करु नकोस.

सखी,हे ह्यातलं थोडसं जरी आपल्याला जमलं, तरी आपण मैत्र या शब्दाच्या जवळ जाऊ शकू.कळलं?

ती मला मिठी मारत म्हणाली,यार हे लईच भारीय…तुझं माझं मैत्र असंच अखंड राहू दे…!

आमेन….असं म्हणत मी तिच्या पाठीवर थोपटत राहिले.

लेखिका : सुश्री स्वप्नजाघाटगे

कोल्हापूर.  मो 8888033332

संकलक: प्रा. माधव सावळे

प्रस्तुती : सुश्री शशी नाडकर्णी -नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “शब्द… आणि… हुंकार…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “शब्द… आणि… हुंकार…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

शब्दांचा आधार घेतल्याशिवाय आपण मनातल काहीच व्यक्त करु शकत नाही. मनातल्या भावना पोहोचवण्याच प्रभावी माध्यम म्हणजे शब्द आणि हुंकार. आपल्या चेहऱ्यावर काही भाव दिसतात. पण भावनांना प्रकट करतात ते शब्द. म्हणूनच शब्दातून प्रेम, राग, तिरस्कार, अभिमान, कौतुक सगळ व्यक्त होत. *शब्दात धार आहे. शब्दात मार आहे. शब्दात प्रेमाचा सार देखील आहे. शब्द कठोर आहेत तसेच मवाळ, व मधाळ सुध्दा आहेत.

शब्दात प्रार्थना, याचना, मागणं आहे,  स्तुती, गौरव, क्षमा आहे. त्यात विश्वास, आधार आहे. आपलेपणा, परकेपणा आहे. उदारता आहे, स्वार्थीपणा सुद्धा आहे.*

एकदा शब्द दिला म्हणजे दिला असे म्हटले की यात ठाम विश्वास असतो. तर….. तर त्याच्या शब्दांवर भरवसा नाही.‌…. असं म्हटलं की अविश्वास. आपल वागण हिच आपल्या शब्दांची किंमत असते.

खूप आनंद झाला की बोलायला शब्द सुचत नाही. तर कठीण प्रसंगी शब्द फुटत नाहीत. काही वेळा म्हणतो, शब्दात कस सांगू तेच कळत नाही. किंवा सांगायला शब्द अपुरे आहेत.

शाहण्याला शब्दांचा मार असेही म्हणतात. माणूस नि:शब्द झाला की सुचेनासे होते, किंवा सुचेनासे झाले की माणूस नि:शब्द होतो.

एकाच गोष्टीसाठी अनेक शब्द असले तरी त्या शब्दांना आपला एक अर्थ आणि त्यात एक भाव असतो. थोड सविस्तर सांगायच तर प्रवीण दवणे यांनी एका गीतामध्ये आभाळ आणि आकाश असे दोन्ही शब्द आले त्या बद्दल विचारलेला किस्सा (बहुतेक शांताबाई शेळके यांनी लिहिलेले गीत आहे.) त्यावर मिळालेल उत्तर  निरभ्र असते ते आकाश. भरुन येत ते आभाळ. यावर पुढे असं सुद्धा म्हणता येईल की बरसात ते मेघ. असे समर्पक अर्थ शब्दात आहेत.

हुंकाराच ही तसच काहीसं आहे.  बऱ्याचदा विचारलेल्या गोष्टींना आपण हुंकाराने उत्तर देतो किंवा आपल्या प्रश्नांना हुंकाराने उत्तर मिळत. अं…. हं….. अंह….. उं….. असे काही हुंकार परिस्थिती नुसार आपण काढतो, किंवा ते नकळत निघतात.

या हुंकारात सुध्दा ते आनंदाचे, नाराजीचे, सकारात्मक, नकारात्मक, आळसावलेले असे असतात.  हुंकार कसा आहे हे त्याचा निघालेला आवाज आणि त्याची लय यावरून समजतो.

भावना पोहचवण्याच काम शब्द करतात. आणि आपण प्रेमाचे दोन शब्द ऐकायला आतुर असतो. शब्द तेच किंवा तसेच असतात. आपल्या भावना त्यात जाणीव निर्माण करतात.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “फूल उमलताना…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ “फूल उमलताना” ☆ सौ राधिका भांडारकर 

मी एक गोष्ट सांगते तुम्हाला.

दोन शेजारी होते.  एक निवृत्त शिक्षक आणि दुसरा तरुण बँकर.  एक दिवस ते दोघं एका नर्सरी मधून काही झाडांची रोपे आणतात.  ती रोपे आपापल्या अंगणात लावतात. निवृत्त शिक्षक रोपांना अधून मधून पाणी घालत असत. रोपांची जेवढी घ्यायची तेवढी काळजी ते घेत असत. तरुण बँकर मात्र रोपांना रोज रोज भरपूर पाणी घालत असे. त्यामुळे त्याची रोपे अधिक हिरवीगार आणि टवटवीत असत.  निवृत्त शिक्षकाचीही रोपे वाढतच होती मात्र दर्शनी पाहता बँकरची रोपे अधिक आकर्षक भासत होती.

एकदा काय झालं अचानक तुफान आलं आणि त्या तुफानात बँकरची वाढलेली हिरवीगार रोपं उन्मळून गेली. मात्र निवृत्त शिक्षकाची रोपे तुफानाचा सामना करत ताठ उभी होती.

“हे कसं?”

बँकरला  प्रश्नच पडला.

” मी तर माझ्या झाडांना रोज पाणी घालत होतो.  किती काळजी घेत होतो! “

त्यावेळी शिक्षक त्याला म्हणाले ,”अति पाणी घातल्याने, अति काळजी घेतल्याने तुझी रोपे बाह्यांगी वाढली पण त्यांच्या मुळांना काहीच ताण न मिळाल्यामुळे ती जमिनीत खोलवर पाण्याच्या शोधात पसरलीच नाहीत.  म्हणून तुफान आल्यावर अशी उन्मळून पडली.  याउलट माझी झाडे स्वयंपूर्ण बनली.  जास्त पाणी न मिळाल्यामुळे जमिनीत त्यांची मुळं पाण्याच्या शोधात खोलवर रुजत गेली आणि जमीन पकडून राहिली.”

मुलांचे व्यक्तिमत्व घडवताना नेमकं हेच घडतं.  त्यांना जे हवं ते, जेव्हां हवं तेव्हां मिळत गेलं,  त्यांचे प्रत्येक हट्ट लाडा कौतुकाने किंवा अतिरिक्त भावनेने पूर्ण होत गेले तर मुलं स्वयंपूर्ण, स्वावलंबी बनू शकत नाहीत.  त्यांच्यात  स्वतः काही मिळवण्याची जिद्दच निर्माण होऊ शकत नाही किंवा मिळवण्यासाठी स्वतः काही धडपड करण्याची त्यांची इच्छा, क्षमताच खुंटून जाते आणि अशा वातावरणात वाढल्याचे पडसाद पुढच्या आयुष्यात गंभीरपणे उमटू शकतात.  प्रचंड नैराश्य, उदासीनता, अकार्यक्षमता, कधीकधी गुन्हेगारी वृत्ती, व्यसनाधीनतेला ही मुलं बळी पडू शकतात.  त्यामुळे मुलांना घडवताना पालकांनी आपली मुले जबाबदार कशी होतील याचा प्रथम विचार करायला हवा.  जबाबदारी आली की स्वातंत्र्य येते आणि आत्मविश्वास बळावतो. 

मुलांचं व्यक्तिमत्व घडवणं ही खूप संवेदनशील बाब आहे. प्रत्येक मूल हे वेगळं असतं आणि प्रत्येक पालकाला वाटत असतं की आपलं मूल सर्वगुणसंपन्न असलं पाहिजे,  जगातलं जे जे बेस्ट ते त्याला मी मिळवून देईन पण त्याला “द बेस्ट चाइल्ड” चा पुरस्कार हा मिळालाच पाहिजे.  कधी कधी तर मुलांच्या यशात आई-वडील आपलंच स्टेटस शोधत असतात आणि अगदी लहानपणीच एक स्पर्धात्मक व्हायरस त्यांच्या जडणघडणीच्या काळात तेच ढकलतात.  सुरुवातीला जरी चित्र देखणं वाटत असलं तरी काळा बरोबर हळूहळू त्याचे रंग उडू लागतात.  त्यातूनच एक तर न्यूनगंड निर्माण होऊ शकतो किंवा विद्रोहाची भावनाही उफाळून येऊ शकते.  पण याची जाणीव जेव्हां होते तेव्हां  खूप उशीर झालेला असतो.

डॉक्टर गेनोट हे उत्तम बालमानसशास्त्रज्ञ.  त्यांनी एक संकल्पना मांडली. 

व्हॉइस आणि चॉईस

मुलांना बोलू द्या, त्यांना निवडीचा हक्क द्या, त्यांना काय हवंय हे सांगण्याचे स्वातंत्र्य  द्या.  म्हणजेच एकीकडे मुलांना शिस्त लावताना,वळण लावतानाच मुलांशी संवाद कसा होईल याची दखल घेणे हे जरुरीचं आहे.  ज्या घरात मुलांशी संवाद असतो, ज्या घरातली मुलं आपली मतं मांडू शकतात… ती अधिक धीट, धाडसी आणि आत्मनिर्भर होतात.  एक गोष्ट कधीही विसरू नये की लहान मुलालाही स्वतःचं असं मत असतं.  अगदी दोन महिन्याचं मूल ज्याला बोलून व्यक्त होता येत नाही ते रडून, गोंधळ घालून आपल्या मनासारखं करून घेतच की नाही?  प्रत्येक व्यक्तीच्या स्वातंत्र्याची ही पहिली पायरी असते.

पहिलं  मूल घडवताना तर  आई-वडिलांची खरोखरच तारांबळ उडते कारण तेही प्रथमच पालक झालेले असतात.  त्यामुळे त्यांच्या पालकत्वात कुठेतरी त्यांच्यावर झालेले संस्कार, त्यांचं बालपण आणि त्यातून सकारात्मक किंवा नकारात्मक विचारांची एक भूमिका दडलेली असते. शिवाय बदलत्या काळानुसार आजूबाजूच्या जगाबरोबर मुलाला वाढवताना मनात खूप गोंधळ उडालेला असतो. पुस्तकी ज्ञानाचाही प्रभाव पडलेला असतो आणि कधी कधी आपलंच मुल आपणच ओळखण्यात कमी पडू शकतो.

मला आजही आठवतं, माझी मुलगी पाच सहा वर्षाचीच असेल.  मी तिला काहीतरी करायला सांगितलं. थोडक्यात एक जॉब दिला मी तिला. ती नाही म्हणाली नाही. पण थोड्यावेळाने माझ्यासमोर दोन्ही हात सरळ करून ताठ उभी राहिली आणि म्हणाली,

” मम्मी चिमणीला पोहता येईल  कधी ?आणि बदक हवेत उडू शकेल का?”

बापरे!  प्रचंड हादरले होते मी तेव्हां. या एवढ्याशा मुलीत हा विचार आला कुठून?  मग मी माझी थिअरी बदलली. मी बेसावध राहिले नाही किंवा तिच्या बाबतीतला सावधपणा सोडला नाही पण तिच्या इवल्या इवल्या मतांनाही मान देत राहिले आणि तिच्याशी संवाद साधत, सांभाळत, काय बरोबर, काय चूक, काय चांगलं, काय वाईट हे यथाशक्ती दाखवत राहिले.

मुलं अत्यंत संवेदनशील असतात तसेच अनुकरणप्रिय असतात थोडक्यात कॉपीबहाद्दर असतात.  त्यामुळे पालकांच्या वागण्याचा, बोलण्याचा नकळत प्रभाव त्यांच्या मनावर पडत असतो. शिवाय मुलं निष्पाप असतात. जेव्हां ती काही बोलतात तेव्हा त्यात उद्धटपणा नसतो तर ते फक्त व्यक्त होणं असतं आणि त्यात पालकाच्या वागण्याचं प्रतिबिंब पडलेलं असतं.  ज्यावेळी पालक मुलांना सांगतात “तू हे करू नकोस, हे वाईट आहे. किंवा ही काय भाषा तुझी? कुठून शिकलास?”

अशावेळी एखादं मूल झटकन उत्तर देत.,” तू नाही का त्या दिवशी बोलताना असं म्हणालीस.” अशावेळी पालक निरुत्तरच होतात.  म्हणून अशी वेळच येऊ नये याचा पालकांनी जाणीवपूर्वक विचार केला पाहिजे. अशावेळी स्वत:च्या काही सवयी बदलणं गरजेचं असतं.

संस्कार हा ही असाच एक गहन विषय आहे.

“ये रे बाबा मी तुझ्यावर आता संस्कार करते” असा “तुला जेवण वाढते” सदरातील हा विषय नाही. संस्कार हे नकळत घडत असतात आणि ते घडवण्यासाठीचे वातावरण कसे आहे त्यावर त्यांचे चांगलेपण अथवा  वाईटपण अवलंबून असते. 

आणखी एक मुद्दा म्हणजे मुलांमध्ये प्रचंड ऊर्जा असते. त्यांना सतत काहीतरी करायचं असतं. त्यांच्या डोक्यात सतत प्रश्न असतात. प्रचंड औत्सुक्य असतं आणि प्रत्येक बाबतीतले  असंख्य “का” त्यांच्या प्रवाहात वहात असतात आणि त्यांची उत्तर ते शोधत असतात. अशावेळी,

” तुला नाही कळणार”

किंवा,

“हे करू नकोस”

” अजून तू लहान आहेस”

” याला हात लावू नकोस”

“मोडून ठेवशील”

“अरे पडशील ना..?”

” किती पसारा रे तुझा?”

” आणि हे काय? अशा भिंतीवर रेघोट्या मारून ठेवल्यात.तुला कितीदा सांगायचं?”

ही सारी बोलण्यातली नकारात्मकता आहे आणि ती त्यांच्या ऊर्जेचं खच्चीकरण करत असते.

तुम्हाला एक गंमत सांगते .

माझे पती आर्किटेक्ट आहेत.  बऱ्याच वर्षांपूर्वी एका तरुण जोडप्याच्या बंगल्याचं त्यांनी स्केच केलं.  ते तरुण जोडपं ऑफिसात  आलेलं असताना माझ्या पतींनी, केलेलं ते स्केच त्यांना दाखवलं.  त्यांच्या पसंतीसही उतरलं पण त्यांच्याबरोबर त्यांची छोटी पिंकी ही होती. ती माझ्या पतींना धिटुकलेपणाने म्हणाली,” काका आमच्या या बंगल्यात ना एक पसारा खोली पण करा माझ्यासाठी. आणि अशी एक भिंत ठेवा की जी फक्त माझी असेल आणि मी त्याच्यावर कशापण रंगरेघोट्या काढेन”       .

तिच्या या बोलण्यावर त्यावेळी आम्ही सगळे खळखळून हसलो होतो.  पण मामला गंभीर होता, डोळ्यात अंजन घालणारा होता याचीही जाणीव  झाली होती.पालकांच्या नकारात्मकतेला दणका देणारी होती.

पण काहींचे पालकत्व मात्र  खरोखरच लक्षवेधी असते. अरुण दाते, सुप्रसिद्ध गायक.  कुठल्यातरी एका शालेय परीक्षेत ते अगदी शेवटच्या नंबरावर होते. जवळजवळ नापासच होते म्हणाना.  घरी येऊन प्रगती पुस्तक कसे दाखवावे ही चिंता त्यांच्या बालमनाला कुरतडत होती.  रामू भैया —अरुण दाते यांचे वडील— त्यांनी ते ओळखले आणि ते आपल्या मुलाला म्हणाले, “अरे पण तुझ्यासारखं कुणाला गाता येतं का?  तिथे तर तुझाच पहिला नंबर आहे ना ?”

या दोन वाक्यांमुळे अरुण दाते सारखा एक महान गायक घडला.

आज हा लेख लिहिताना, मागे वळून पाहताना, माझ्या गतकाळातल्या पालकत्वाला निरखत असताना माझ्या कडून पालकत्वाच्या झालेल्या काही चुका मला खूप वेळा भेडसावतात आणि गंमत म्हणजे आई म्हणून माझ्या हातून झालेल्या चुकांची भरपाई नातवंडांच्या बाबतीत करताना माझी मुलगी मला म्हणते,” थांब ग आई!  तू आमच्यात आत्ता पडू नकोस. तू ही  तर आम्हाला अशीच रागवायचीस ना?”

तेव्हा जाणवतं पालकत्व हा अव्याहत वाहणारा विषय आहे.  काळाप्रमाणे बदलणारा आणि शिकवणाराही आहे.शिवाय तो एका पिढीतून दुसर्‍या पिढीकडे जाणारा प्रवास आहे.एक सूक्ष्म लिंक असते त्यांच्यात. त्यात नेमकं असं काहीही नाही.  कारण प्रत्येक मूल वेगळं असतं आणि प्रत्येक सुजाण पालकत्वाच्या व्याख्याही  निराळ्या असतात.

फूल उमलताना कुणी पाहिलं आहे का? पण जमिनीतल्या मुळांशी त्याच्या उमलण्याचं नातं असतं.

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सोमवती अमावस्या… या नावामागची कथा ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

? इंद्रधनुष्य ?

☆ सोमवती अमावस्या… या नावामागची कथा ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

सोमवारी येणाऱ्या अमावस्येला ” सोमवती अमावस्या ” म्हणतात. यासंदर्भात महाभारतात एक कथा आहे. 

कौरव-पांडव यांच्यात घनघोर युद्ध झाले. पांडवांचा जय झाला पण त्यासाठी त्यांना पूज्य गुरुवर्य व इतर कुटुंबीयांना मारावे लागले. या हत्या दोषाने ते व्यथित झाले व श्रीकृष्णाकडे आले. व पाप मुक्तीसाठी साकडे घातले. श्रीकृष्ण म्हणाले….. “नैमिषारण्यात जाऊन अखंड तपस्या करा. जेव्हा सोमवती अमावस्या येईल तेव्हा तेथील चक्रतिर्थावर स्नान, दान करा.” पांडवांनी बारा वर्षे तपस्या केली.  पण सोमवती अमावस्या आली नाही. तेव्हा त्यांनी तिला शाप दिला…  ” कलियुगात तुला दरवर्षी एकदा किंवा दोनदा यावेच लागेल व या दिवशी जे पवित्र स्नान, दान करतील त्यांना पाप मुक्त करावे लागेल.”

दुसरी कथा अशी आहे की कांचीपुरी गावात देवस्वामी व धनवती हे जोडपे राहत होते. त्यांच्या कन्येचे नाव गुणवती. एका साधूने सांगितले,…. ” ही सप्तपदीतच विधवा होईल. तो दोष टाळण्यासाठी तुम्ही सोमा पूजन करा. सिंहलद्वीप येथे “सोमा” नावाची परटीण आहे. तिला विवाहाला बोलवा.” …. गुणवती स्वत: तिथे गेली तिची सेवा केली व तिला घेऊन आली. गुणवतीच्या विवाहात सप्तपदी  सुरू झाली . नवरदेव चक्कर येऊन पडले. सोमाने आपले पुण्यबल देऊन त्याला जिवंत केले व ती घरी गेली. वाटेत सोमवती अमावस्या आली तिने विधीपूर्वक स्नान, दान व पिंपळ वृक्षाच्या छायेत विष्णू पूजन केले. ती घरी पोहोचली तर तिचा नवरा, मुलगा व जावई मृतावस्थेत दिसले. तिने आपले पुण्य बळ देऊन त्यांना  जिवंत केले…. तेव्हापासून तिचे हे व्रत सर्वजण करू लागले. दिव्यांची पूजा, पिंपळाची पूजा व भगवान शिव शंकराची पूजा करा. सात्विक अन्न, नैवेद्य, शक्यतो मौनव्रत,भाविकता असावी.व खालील प्रार्थना करावी….. 

दीपज्योती परब्रम्ह

दीपज्योतीर्जनार्दन

दीपो हरतु मे पापम् 

दीपज्योतीर्नमोस्तुते.

लेखिका : सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “फ्रिज…” ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “फ्रिज…”  ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर

असे म्हणतात, की एखाद्या देशाची परीक्षा तिथल्या सार्वजनिक रस्त्यावरुन होते. त्या धर्तीवर मी म्हणेन, की एखाद्या घराची  परीक्षा त्या घराच्या फ्रिजवरून होते. माझी आजी फ्रिजला आळशी कपाट म्हणायची. तिला वाटायचे की ज्या वस्तू नीट ठेवायच्या नसतील त्या कोंबण्यासाठी असतो हा फ्रिज.

त्याच्या पुढे जाऊन मला असे वाटते की फ्रिज हा घरच्या घडामोडींचा आणि वातावरणाचा द्योतक असतो.

माझ्या निरीक्षणात आलेले विविध प्रकारचे फ्रिज:

आळशी फ्रिज :

या फ्रिजमध्ये काय सापडेल याचा नेम नसतो. या फ्रिजमधले पदार्थ तिहार जेलच्या कैद्यांसारखे बाहेर पडायची वाट बघत असतात आणि एकमेकाना तू इथे कधीपासून आहेस हा प्रश्न विचारताना आढळतात. फाशीची शिक्षा मिळूनही प्रत्यक्षात ती मिळेपर्यंत वाट बघणाऱ्या कैद्यांप्रमाणे बसलेल्या एक्सपायरी डेट बाटल्यांपासून कधीही घरचे लोक भेटायला न येणाऱ्या कैद्यांसारख्या दुर्लक्षित काही दिवसापूर्वीच्या उरलेल्या शिळ्या अन्नापर्यंत सर्व प्रकार असतात इथे ! काही जन्मठेप मिळालेल्या भाज्या निर्विकारपणे “सडत” पडलेल्या असतात. हा फ्रिज जेलरच्या थंड डोक्याने या सर्व गोष्टींना सामावून घेत असतो !

टापटीप फ्रिज

या फ्रिजमध्ये सर्व वस्तूंना ध्रुवबाळासारखे स्वतःचे स्थान असते. प्रत्येक डब्याला स्वतःचे झाकण असते. भाज्यांच्या ट्रेमधल्या भाज्या फ्लॅट संस्कृतीप्रमाणे बंद डब्यात बसलेल्या असतात. त्यांना शेजारच्या भाजीचा “गंध” देखील नसतो.

बॅचलर फ्रिज

हा फ्रिज सहसा रिकामाच असतो. भाड्याच्या घरात घरमालकांनी ठेवलेल्या या फ्रिजमध्ये हॉटेलरूमच्या फ्रिजसारख्या फक्त बाटल्या मात्र असतात. कधी काळी येऊन गेलेल्या आईने जाताना पुसून गेल्यावर त्या फ्रिजची कोणी विचारपूस अथवा घासपूस केलेली नसते. जाताना आईने करून ठेवलेली लोणची, मुरंबे सांभाळत आईची आठवण काढत हा फ्रिज बसलेला असतो. कधी काळी अचानक आलेल्या गर्लफ्रेंडला किचनमधील पसारा दिसू नये म्हणून वस्तू कोंबण्यासाठीही याचा उपयोग होतो.

नवविवाहित फ्रिज

हा फ्रिज उत्साहाने आणि तरुणाईने सळसळत असतो. घरच्या जुन्या वस्तूंच्या बरोबरीने सुपर मार्केटमध्ये मिळणारी एक्झॉटिक फळं आणि फ्रोझन पदार्थांची रेलचेल असते या फ्रिजमध्ये. सगळे नवे पदार्थ या फ्रिज मध्ये स्वतःचे स्थान शोधत असतात. काचेच्या नव्या कोऱ्या बाटल्यांमध्ये शेजारी शेजारी चिकटून बसलेली ऑलिव्ह ऑइलमध्ये केलेली लोणची पाहून जुनी मुरलेली लोणची नाक मुरडत असतात.

NRI फ्रिज

इतर कुठल्याही फ्रिजपेक्षा गच्च भरलेला हा फ्रिज असतो. माहेरून आणलेली पिठं मसाले, पापड, लोणची एकीकडे सांभाळताना दुसरीकडे मुलांच्या आवडीचे चीज, पिझ्झा, जेली प्रकारही तो लीलया सांभाळत असतो. मात्र जास्त जागा कुठल्या पदार्थांना द्यायची या संभ्रमात असतो. अगदी त्या घरच्या गृहिणीसारखा. तोच संभ्रम. मुलांची आवड सांभाळताना आपली आवड मात्र फ्रीझरमध्ये गोठवणारा !

ज्येष्ठ नागरिक फ्रिज

हा सर्वांत केविलवाणा असणारा. एकेकाळी मुले मोठी होत असताना भरलेल्या या फ्रिजला आता पुन्हा दोघेच राहत असताना आलेलं रिकामपण खायला उठत असतं. एकेकाळी चॉकलेटनी भरलेल्या कप्प्यांची जागा आता इन्सुलिन इंजेक्शनच्या पेनांनी घेतलेली असते. आईस्क्रीमऐवजी फ्रीझरमध्ये मुलांनी भारतभेटीत दिलेला सुकामेवा असतो. सणावारांना मुलांच्या आठवणींसारखीच हमखास बाहेर येतो तो. भाजीचा ट्रे रिकामा असतो. कारण विरंगुळा म्हणून रोजची भाजी रोज आणून संपवली जाते. उमेदीच्या काळातली वेळेची तारांबळ आता नसल्याने त्या ट्रेला काही कामच नसते.

कसाही असो मात्र फ्रिजला प्रत्येक घरात मानाचे स्थान असते. जुना असो व नवा हा जर बंद पडला तर साऱ्या घराचे चैतन्य थंड पडते !

प्रस्तुती : सौ.शामला पालेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गझलेतला हवासा हसरा श्रावण… ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

प्रा. सुनंदा पाटील

? विविधा ?

☆ गझलेतला हवासा हसरा श्रावण ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

श्रावण ! प्रत्येक कवीचा आवडता विषय ! अगदी बालकवींच्या ” श्रावणमास “ या कवितेपासून तर आजच्या अगदी नवोदित कवी पर्यंत पिढी दरपिढी अनेक कवितांमधून श्रावण रसिकांच्या भेटीला येतोच आहे. मग गझलकार तरी याला अपवाद कसा असणार ? कारण आधी गझलकार हाही कवीच आहे ! फक्त त्याने गझलेच्या तंत्राकडे म्हणजेच शरीरशास्त्राकडे अतिशय गंभीरपणे बघायला हवे ! केवळ मंत्राच्या मागे लागून जर गझलेच्या आकृतीबंधाकडे दुर्लक्ष झाले तर ती कविताही राहत नाही आणि गझलही होत नाही , हे मी अत्यंत जबाबदारीने विधान करीत आहे. गझलेतील लय , यती आणि एकूणच आकृतीबंध सांभाळून वाचकाला आवडणारी रचना / गझल देणे हे साधे सोपे नसते ! यासाठी प्रचंड मोठा शब्दसाठा , किमान व्याकरणाची माहिती , शुद्धलेखन याची गरज असतेच . पण त्याच बरोबर भौगोलिक / प्रादेशिक जाणीवा असणे हे सुद्धा गरजेचे असते ! अन्यथा आषाढात रिमझिम पाऊस आणि श्रावणात कोसळधारा कवितेतून बरसतात ! काही गझलांमधे उन्हाळ्यात प्राजक्त फुलतो तर पावसात पानझड होते . हे हास्यास्पद प्रकार होऊ नयेत याचीही काळजी गझलकाराने घ्यायला हवी !

सध्या आणखी एक प्रकार बघायला मिळतो की , हवी तेवढी सूट घेऊ नवोदित गझलकार गझल लिहितात ! अगदी एक शेर झाला की त्यात भरीचे ४ शेर घालून गझल पूर्ण करून समाज माध्यमावर पोस्ट करतात ! बरं त्यावर कुणी प्रश्न विचारलाच तर ” अमुक तमुक प्रस्थापित गझलकाराने ही सूट घेतली होती म्हणून मीही घेतली !” हे सांगतात . यावर काय बोलणार ? आम्हीच आमची जबाबदारी ढिसाळपणे वापरत असू तर नवीन लोकांना कां दोष द्यायचा ?

गझल तंत्राधिष्ठीत पण काव्यात्म लेखन प्रकार आहे ! गझल असते किंवा नसतेच ! त्यात ” गझले सारखे किंवा गझलवजा ” म्हणण्याचा प्रघात आताशा रूढ होत आहे. याच्याशी अनेक कारणे निगडीत आहेत , त्यातील ” गझलगुरू ” हाही प्रकार महत्वाचा आहे. ते गझलतंत्र तर सोडाच , पण चक्क गझल शिकवतात . (?) त्यामुळे आज गझलेची संख्यात्मक वाढ होत आहे , पण गुणात्मकतेची काळजी वाटते ! अष्टाक्षरी , ओवी , अभंग , गवळण , भावगीत , भक्तीगीत , भारूड , पोवाडा , पाळणे , आरत्या , श्लोक , आर्या , दिंडी असे अनेक प्रकार मान्य करणाऱ्यांना गझलचे तंत्रच तेवढे का खटकते / का खुपते हा अभ्यासाचा विषय आहे ! त्यावर कृत्रिमतेचाही आरोप होतो . असो !

हीच बाब विषयांशीही निगडीत आहे . आज जुने , नवे जेवढे हात गझल लिहू लागले आहेत , त्या गझलेतला श्रावण शोधावाच लागतो . समाज , सुधारणा , भूक , दारिद्रय यांच्याच परीघात रमलेली गझल प्रेम , माया , निसर्ग यापासून दूर जाते आहे की काय ही भिती वाटते . पण तेव्हाच काही दादलेवा शेर वाचले की कळतं ” पेला अर्धा भरला आहे “.

मिठीत होती अधीरता अन् दिठीत होता साजण

सायंकाळी . ढगात आला श्रावण

हा श्रावणाचा माझाच एक शेर आहे ! अस्ताचलास जाणारा सूर्य , त्याची ढगावर पडलेली किरणे आणि उमटलेलं इंद्रधनुष्य , ही श्रावणाची ओळख चट्कन पटते ती सायंकाळी .

तुझ्या फुलांचा सडा पहाया रोज अंगणी

श्रावण येतो मज भेटाया रोज अंगणी

कोल्हापूर येथील श्री .नरहर कुलकर्णी यांचा हा राजस शेर मनाला भावतो !

हासरा नाचरा श्रावण कुसुमाग्रज दाखवतात ! तर ” ऋतू हिरवा ऋतू बरवा या ओळीनी श्रावण वेगळाच भासतो !

समीक्षक प्रकाश क्षीरसागर त्यांच्या एका शेरात म्हणतात ,

गझलेस भावलेला श्रावण किती निराळा

सृष्टीस भाळलेला श्रावण किती निराळा

श्रावण सुरू झाला की कवीच्या प्रतिभेला धुमारे फुटू लागतात , असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही . नयनरम्य श्रावण , रंगाने , गंधाने आपल्याला मोहून टाकतो . अशाच अर्थाचा प्रसाद कुलकर्णी यांचा एक शेर बघा !

तनही बरवा मनही बरवा श्रावण हिरवा

धुंद करी ही बेधुंद हवा श्रावण हिरवा

श्रावणावर अनेक कविता आहेत पण गझल मात्र मोजक्याच आहेत . त्यातही तुरळक शेर सापडतात . नवोदित आणि जेष्ठ गझलकारांना असे सुचवावेसे वाटते की सृष्टीतला कण न् कण आपल्या काव्याचा विषय होऊ शकतो . फक्त ती दृष्टी हवी ! त्यामुळे त्याच त्या विषयांच्या रिंगणात फिरण्यापेक्षा नवनवे विषय घेऊन आपली गझल पूर्ण करावी ! आज नवोदित गझलकारांमध्ये काही आश्वासक हात नक्कीच आहेत . त्यामुळे तंत्र सांभाळून गझलेचा मंत्र सांभाळला जात आहेच . एवढेच नाही तर नाण्याला जशा दोन बाजू असतात , आणि दोन्ही खणखणीत असाव्या लागतात , तीच गोष्ट गझलेची आहे . तंत्र मंत्र योग्यच असायला हवे एवढेच नाही तर नाण्याला एक तिसरी बाजू म्हणजे एक कडापण असते . अत्यंत गरजेची ! तशीच मराठी गझलेची कडा म्हणजे , मराठी व्याकरण आणि शुद्धलेखन सांभाळून , निर्दोष तंत्रात आलेली  गझलेतली गझलियत .

या तीनही बाजुंचा सारासार विचार करून गझलेकडे वळणारे बघितले की ,

” विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही “

ही भट साहेबांची ओळ सार्थ झाली असे वाटेल .

विस्तारभयास्तव इथेच थांबते माझ्या एका गझलेसह !

 घरात आला श्रावण ☆

संध्याकाळी मी जपलेला घरात आला श्रावण

मृद्गंधाची हाक ऐकुनी नभात आला श्रावण

 

या हळदीच्या देहावरती सोनरुपेरी आभा

केस मोकळे पाठीवरती मनात आला श्रावण

 

सायंकाळी शुभशकुनाच्या आज पाहिल्या रेषा

इंद्रधनूला झुला बांधुनी ढगात आला श्रावण

 

उत्साहाची घरात माझ्या अवघी पखरण झाली

ओलेती तू समोर येता क्षणात आला श्रावण

 

मल्हाराचे गूज उकलले वर्षत अमृत धारा

कूजन सरले तरी कुणाच्या स्वरात आला श्रावण

 

लयतालाने येत समेवर मैफल जिंकत गेले

गुणगुणताना गझल मनीची सुरात आला श्रावण

 

ओठावरती पुन्हा उमटली मेघसावळी नक्षी

पहाट होता प्रणयाची मग भरात आला श्रावण

© प्रा.सुनंदा पाटील

गझलनंदा

८४२२०८९६६६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ परातभर लाह्या… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

??

☆ परातभर लाह्या… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

” परातभर लाह्या त्यात  बंदा रूपया” असं कोडं सासूबाई माझ्या मुलीला घालत असत आणि मग त्याचे उत्तर त्याच देत असत, “आकाशभर चांदण्या, मध्ये असलेला चांदोबा!”

मनाच्या कढईत या आठवणींच्या लाह्या फुटायला लागल्या की त्या इतक्या भरभरून बुट्टीत जमा होतात की ती बुट्टी कधी भरून ओसंडून वाहू लागते ते कळतच नाही!”

नागपंचमी जवळ आली की आमच्या घरी लाह्या ,तंबिटाचे लाडू,मातीचे नागोबा तयार करणे, या सगळ्या गोष्टी सुरू होत असत ! त्यामुळे पंचमीच्या लाह्या म्हटल्या की मला सासूबाई डोळ्यासमोर येतात. आपुलकीने, उत्साहाने सर्वांसाठी लाह्या घरी करणाऱ्या ! सांगली- मिरजेकडे घरी लाह्या करण्याचे प्रमाण बरेच होते. आषाढी पौर्णिमा झाली की लाह्या करण्याचे वेध आईंना लागत असत !

सांगलीत असताना आमच्या घरी लाह्या बनवणे हा एक खास सोहळा असे. शनिवारच्या बाजारातून खास लाह्यांची यलगर ज्वारी मी आणत  असे. ती ज्वारी आणली की मग लाह्या केव्हा करायच्या तो वार ठरवून आई तयारीला लागत. त्यासाठी मोठी लोखंडाची पाटी बाईकडून घासून घ्यायची. ज्या दिवशी लाह्या करायच्या, त्याच्या आदल्या दिवशी रात्री चाळणीत ज्वारी  घेऊन त्यावर भ रपूर गरम पाणी ओतले जाई. याला ‘उमलं घालणं ‘ असं म्हणतात. ते पाणी निथळले की त्यावर पंचा किंवा सुती पातळ दाबून ठेवत असत  ! हे सर्व त्यांच्या पद्धतीने चालू असे. सकाळी उठून ती ज्वारी जरा कोरडी होण्यासाठी पसरून ठेवायची. लाह्या फोडायच्या म्हणून चहा, आंघोळ वगैरे कामे लवकर आटपून त्या तयारी करत असत !

गॅसच्या शेगडीवर मोठी लोखंडी पाटी ठेवली जाई. एका रवीला कापड गुंडाळून त्याचे ढवळणे केले जाई. तसेच लोखंडी पाटीवर टाकण्यासाठी एक कापड घेतलेले असे. शेजारीच एक बांबूच्या पट्ट्यांची टोपली (शिपतर) लाह्या टाकण्यासाठी ठेवले जाई. एवढा सगळा जामानिमा  झाला की आई लाह्या फोडायला बसत. लोखंडी पाटी चांगली तापली की, चार ज्वारीचे दाणे टाकून ते फुटतात की नाही हे बघायचे आणि मग मूठभर ज्वारी टाकून लाह्या फोडायला सुरुवात करायची ! मुठभर ज्वारी टाकून रवीने जरा ढवळले की ताडताड लाह्या फुटायला सुरुवात होई आणि त्या बाहेर पडू नयेत म्हणून त्यावर छोटे फडके टाकले जाई. त्या लाह्यांचा  फटाफट आवाज येऊ लागला की माझ्या मुलांना आनंदाच्या उकळ्या फुटत ! घरभर लाह्यांचा खमंग वास दरवळत असे. एक किलो ज्वारीत साधारणपणे मोठा पत्र्याचा डबा भरून लाह्या होत असत ! मग काय आनंदी आनंदच ! लाह्या सुपामध्ये चांगल्या घोळून घ्यायच्या. खाली राहणारे गणंग वेगळे काढायचे. लाह्या गरम असताना मिक्सरवर लाह्यांचे पीठ करायचे. तरी बरं आमच्या घरी ‘जाते’ नव्हते, नाहीतर माझ्या आजोळी लाह्यांचे पीठ लगेच जात्यावर काढले जाई !

मग सासुबाई दिव्याच्या अवसेला समयीसाठी आणि नागपंचमीच्या नागाच्या पूजेसाठी लाह्या वेगळ्या काढून ठेवत. मग तो मोठा लाह्यांचा डबा आमच्या ताब्यात येई. भरपूर शेंगदाणे घालून फोडणीच्या लाह्या, तर कधी तेल, मसाला, मीठ लावलेल्या लाह्या, आंब्याचे लोणचे लावून लाह्या, दुपारच्या खाण्यासाठी असत. त्या किलोभर ज्वारीच्या लाह्या खा ण्यात आमचे आठ पंधरा दिवस मजेत जायचे !

आता गेले ते दिवस ! अजून कदाचित सांगली मिरजेकडे हा लाह्या फोडण्याचा कार्यक्रम होत असेल, पण पुण्यात आल्यापासून गेली ती यलगर ज्वारी आणि त्या पांढऱ्या शुभ्र, चुरचुरीत खमंग लाह्या ! दुकानातून छोट्या पुडीतून लाह्या आणायच्या नैवेद्यासाठी । आत्ताच्या मुलांना मक्याचे पॉपकॉर्न आवडतात, पण आपले हे देशी पॉपकॉर्न फारसे आवडत नाहीत बहुतेक ! त्यामुळे लाह्या घरी कशा बनवतात तेही त्यांना माहित नाही ! असो ….  कालाय तस्मै नमः!!

श्रावणाचा सुरुवातीचा सण म्हणजे नागपंचमी ! त्यादिवशी नागोबाला लाह्यांचा  नैवेद्य दाखवतात .म्हणून या लाह्या फोडण्याचे महत्त्व ! निसर्गाशी जवळीक दाखवणाऱ्या आपल्या अनेक सणांपैकी नागपंचमी हा श्रावणातील पहिला सण ! सांगलीजवळ बत्तीसशिराळा येथे नागपंचमीला मोठी यात्रा असते. तिथे नाग, साप यांची मिरवणूकच काढली जाते. आम्ही पूर्वी बत्तीस शिराळा येथील नागपंचमीचा उत्सव पाहिला आहे .

श्रावणातील सणांची लगबग या दिवसापासून सुरू होते. झाडाला झोका बांधून मुली मोठमोठे झोके घेतात, फेर धरून गाणी म्हणतात. हाताला मेंदी लावतात, नवीन बांगड्या भरतात. माहेरवाशिणी नाग चवतीचा उपास करतात. चकल्या, करंज्या फराळाला बनवतात. ते दृश्य अजूनही डोळ्यासमोर उभे राहते. आत्ताही माझे मन त्या जुन्या आठवणींबरोबर श्रावणाची गाणी गात फेर धरू लागले आहे !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ तेरी मिट्टी में मिल जावां ! भाग-2 ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

तेरी मिट्टी में मिल जावां ! भाग-2 ☆ श्री संभाजी बबन गायके 

 (या वीरांचे त्यांनी जे हाल केले होते ते पाहून राक्षसही लाजले असते!) – इथून पुढे — 

दरम्यानच्या काळात भारतीय सैन्य अधिकाऱ्यांनी परिस्थिती हाताळण्यास आरंभ केला होता. घुसखोरांच्या हालाचालींवर नजर ठेवण्यासाठी कारगिल मधील तुर्तुकजवळच्या झांगपाल येथील  पॉइंट ५५९० या पर्वतावरील सैन्यचौकी महत्त्वाची भूमिका बजावू शकत होती. तो पर्वत लवकरात लवकर आपल्या ताब्यात घेण्याची आवश्यकता होती. जमिनीपासून ही चौकी तब्बल १८००० फूट उंचीवर होती. 

कॅप्टन हनीफुद्दीन

सतत उत्साहात असलेल्या कॅप्टन हनीफुद्दीन साहेबांनी या मोहिमेत स्वयंस्फूर्तीने नेतृत्व स्वीकारले. अत्यंत दाट धुके, प्रचंड बर्फवर्षाव, जीवघेण्या खोल दऱ्या आणि शत्रूची घातक नजर यांना तोंड देत साहेब आपल्या पाच सहकाऱ्यांसह सतत दोन दिवस रात्र हा पर्वत चढत होते… 

अखेर त्या चौकीच्या केवळ दोनशे मीटर्स अंतरावर असताना ते शत्रूच्या गोळीबाराच्या टप्प्यात आले आणि त्यांच्यावर तुफान गोळीबार सुरू झाला. अर्थात साहेबांनी प्राणपणाने प्रत्युत्तर दिलेच. इतर सैनिकांना सुरक्षित ठिकाणी लपून बसायला आणि गोळीबार करायला उसंत मिळावी म्हणून हनीफुद्दीन साहेबांनी आपल्याजवळील दारूगोळा संपेपर्यंत गोळीबार केला. त्यात त्यांना अनेक गोळ्या वर्मी लागल्या आणि साहेब कोसळले!…त्यांचा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे देह त्या बर्फात, वादळात तब्बल ४३ दिवस पडून राहिले… गोठून गेले!

हेमाजींना सात जून रोजीच ही दु:खद वार्ता कळवण्यात आली. त्यांच्या घरी सांत्वनासाठी येणाऱ्या लोकांची तोबा गर्दी उसळली होती. पण लेकाचा देहच ताब्यात नाही तर पुढचं काय आणि कसं करावं? किती भयावह परिस्थिती असेल? एकटी बाई! इथं नात्यातल्या कुणाचे निधन झाले तर दहा दिवस दहा युगांसारखे भासतात!

सैन्यप्रमुख अधिकारी महोदयांनी हेमाजींना भेटून परिस्थिती समजावली. त्यावर हेमाजी म्हणाल्या, “माझा लेक तर आता या जगात राहिलेला नाही. त्याचा देह आणण्यासाठी इतर सैनिकांना तिथे पाठवून त्यांचे जीवित धोक्यात टाकण्याची माझी इच्छा अजिबात नाही. मुलाचं जाणं किती क्लेशदायक असतं हे मी आता समजू शकते. ही वेळ कुणाही आईवर यावी, असं मला वाटत नाही. पण ज्यावेळी तिथे पोहोचणं शक्य होईल, त्यावेळी मात्र मला त्या पर्वतावर जायचं आहे, जिथं माझं लेकरू देशासाठी धारातीर्थी पडलं ती जागा मला पहायची आहे.”

भारताने युद्धात पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर आपल्या सैनिकांनी हनीफुद्दीन साहेब आणि आणखी एका सैनिकाचा मृतदेह पर्वतावरून खाली आणण्यात यश मिळवले. एवढा उंच पहाड चढून जाणे, तिथल्या हवामानाशी टक्कर देणे, बर्फात गाडले गेलेले देह शोधून ते बाहेर काढणे आणि ते कमरेएवढ्या बर्फातून पायी चालत, प्रसंगी खांद्यावर वाहून खाली आणणे हे अतिशय कठीण काम असते… यात सैनिकांच्या जीवावर बेतू शकते… पण या ‘ऑपरेशन शहीद हनिफ’ मध्ये आपल्या सैनिकांनी आपले प्राण पणाला लावले!

हेमाजी आपल्या लेकाचा देह पाहताच काही वेळ सुन्न राहिल्या. अवघ्या पंचवीस वर्षांच्या त्या सुकुमार देहाची ही अवस्था पाहून त्यांचे जग एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. पण ही एका शूराची आई! लगेचच त्या सावरल्या. आपल्या लेकाला निरोप देण्याची तयारी त्यांनी केली. त्याच्या कबरीवर लावायच्या स्मृतिस्तंभावरील वाक्ये त्यांचे स्वत:चे आहेत! 

ज्या ठिकाणी हनीफुद्दीन साहेबांनी आपले प्राण देशासाठी अर्पण केले त्या सबसेक्टर ला आता ‘हनीफ सब सेक्टर’ असे नाव देऊन भारतीय सैन्याने त्यांचा गौरव केला आहे…. ‘वीर चक्र’ हा सन्मान त्यांना मरणोत्तर प्रदान केला गेला आहे.     

प्रशिक्षणादरम्यान सुट्टीवर घरी आलेले असताना हनीफुद्दीन साहेब यांनी हेमाजींना भारतीय सैन्य बहादूर सैनिकांचा कशा प्रकारे गौरव करते त्याची उदाहरणे सांगितली होती… ते प्रत्यक्ष त्यांच्याच बाबतीत घडेल असे कुणाला वाटले तरी असते कां? 

दिल्लीच्या शहीद स्मारकामध्ये शहीद कॅप्टन हनीफुद्दीन अजीज यांचे नाव कोरलेले पाहून या माऊलीचे काळीज थरथरले असेल. आपला मुलगा देशासाठी कामी आला याचे त्यांना समाधान आहेच. जिथे आपल्या लेकाने देह ठेवला तिथे भेट देण्याची त्यांची इच्छा त्यांनी जिद्दीने पूर्ण केली. त्या पर्वतावर त्या ठिकाणी आपल्या थोरल्या लेकासह त्या जाऊन आल्या… त्याच्या स्मृती मनात साठवत साठवत पर्वत शांतपणे उतरत गेल्या! 

आजही हेमाजी सकाळी रियाजाला बसतात…. त्यांच्या कंठातून भैरवी आणि डोळ्यांतून आसवं ओघळू लागतात… हा आसवांचा ओघ अभिमानाच्या पायरी पर्यंत येऊन थबकतो… मनाच्या गाभाऱ्यात पुत्र विरहाच्या वेदनेला मज्जाव असतो… शूर मातांच्या!

आपण या सर्व मातांचे देणे लागतो… यांच्या कुशीत नररत्ने जन्म घेतात आणि आपल्याच संरक्षणासाठी मातीत मिसळून जातात.. कायमची!

ज्यांच्या कुलाचे दीपक विझून गेले, ज्यांचे पोटचे गोळे देशाच्या सीमा सांभाळत आहेत त्यांचेही आपण कृतज्ञ असले पाहिजे! सैन्यात एकच धर्म… देशसेवा. देव करो आणि असे आणखी हनीफुद्दीन या देशात जन्माला येवोत, ही भारतमातेच्या चरणी प्रार्थना. 

कारगिल युद्ध सुरू होण्यापूर्वी कॅप्टन हनीफुद्दीन साहेबांबाबत ही घटना घडली होती. प्रसार माध्यमांना याबाबत माहिती नव्हती. मात्र क्रिकेट वर्ल्ड कप प्रत्येकाच्या ओठी होता!कारगिल युध्दाचे कव्हरेज नंतर मोठ्या प्रमाणात झाले. पण दुर्देवाने हनीफुद्दीन साहेबांचा पराक्रम सामान्य लोकांच्या नजरेस त्यावेळी येऊ शकला नाही! नंतर मात्र काही लेखक, वृत्तपत्रांनी दखल घेतली. माध्यमांनी कशाची दखल घ्यावी, हे खरंतर जनतेने ठरवले पाहिजे ! असो.

२६ जुलै हा भारताच्या पाकिस्तानवरील युद्धाचा स्मृतिदिन जसा साजरा व्हायला पाहिजे तसा होतो कां? असो. या ‘ऑपरेशन विजय’ ला यावर्षी चोवीस वर्षे पूर्ण झालीत. येते वर्ष हे या पराक्रमाचे पंचवीसावे, अर्थात रौप्य महोत्सवी वर्ष असेल… या वर्षात सामान्य लोकांना खूप काही करता येईल ! 

 जय हिंद! 🇮🇳

– समाप्त – 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares